Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​ फडणवीसांना नोटीस देणार काय

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी प्रक्षोभक भाषणे करतो तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून पोलिसांनी पुण्यात विमानतळावर आल्यानंतर नोटीस बजावली; पण कितीही ​नोटिसा बजावल्या आणि गोळ्या घातल्या तरी मी बोलणे थांबविणार नाही,’ असा निर्धार मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला. ‘माझ्याप्रमाणे शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनाही नोटिसा देणार का’ असा सवालही त्यांनी केला.
‘एमआयएम’च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी यांची टिंबर मार्केट येथे मंगळवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आमदार इम्तियाज जलील, शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख, राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे आदी उपस्थित होते. ओवेसी विमानतळावर येताच खडक पोलिसांनी त्यांना प्रक्षोभक भाषण न करण्याबाबत नोटीस बजावली; तसेच त्यांच्या जीवाला धोका असल्याने नोटिशीत नमूद केले होते.
पोलिसांनी दिलेल्या नोटिशीचा दाखला देऊन ओवेसी म्हणाले, की ‘मी नागपूर आणि सोलापूरमध्ये सभा घेतल्या; पण तेथील पोलिसांनी नोटीस बजावली नाही. मात्र, पुणे पोलिसांनी नोटीस दिली. मी प्रक्षोभक भाषण करतो, असे त्यांचे म्हणणे आहे; पण मी प्रक्षोभक बोलत नाही, तर समाजातील प्रत्येकाच्या मनातील बोलतो. माझ्या जीवाला धोका असला, तरी घाबरत नाही. गोळ्या घातल्या तरी मी बोलायचे थांबणार नाही.’
‘मी तीन वेळा खासदार झालो आहे. घटनेने मला बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मलाच नोटिसा देण्यात येतात. माझ्याप्रमाणे पवार, फडणवीस आणि ठाकरे यांना नोटिसा बजावणार का? असा सवाल करून ते म्हणाले, की‘ मी २०१५ मध्ये पुण्यात आलो होतो. तेव्हाही भाषण केले; पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मला जेलमध्ये टाकले, तरीही मी घाबरणार नाही. गेली ६५ वर्षे भाजप, आरएसएस, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने मुस्लिम समाजाला घाबरवले. आता तरुणांनी घाबरणे बंद केले पाहिजे.’
अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पवार यांनी केलेले वक्तव्य सर्वांना माहीतच आहे. त्यांना पुण्यात हज हाउस बांधता आले नाही. निवडणुका आल्यावर त्यांनी हज हाउसचे उद्घाटन केले.’ मोहसीन शेख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

ओवेसींचा ‘यू टर्न’
जीवाला धोका असल्याची नोटीस पोलिसांनी दिल्यामुळे ओवेसी यांनी ‘सभेत मारेकरी उपस्थित असल्यास त्यांनी मला मारावे,’ असे आव्हान दिले. सभा संपल्यानंतर ते चालत उपस्थितांमध्ये गेले. मात्र, एकच गोंधळ झाल्यामुळे ते पुन्हा माघारी फिरून सुर​क्षित मार्गाने मार्गस्थ झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ओल्या’ पार्ट्यांवर पोलिसांची नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर जिल्ह्यात निवडणूक काळातील ‘ओल्या’ पार्टीत अतिमद्यसेवनामुळे पाच जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. इतर राज्य, जिल्ह्यातून बेकायदा दारूची पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री तर होत नाही ना, यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहत असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
नागपूर येथे शिवसेना उमेदवाराच्या ताफ्यातील गाडीने काहीजणांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच आता नगरमध्येही शिवसेनेच्याच एका उमेदवाराच्या दारूपार्टीने पाच लोकांचा बळी घेतला. या घटनेमुळे राज्यभर सुरू असलेल्या ओल्या पार्ट्यांवर उत्पादन शुल्क आणि पोलिसांचे छापे सुरू झाले आहेत. नगर ​येथील पाच बळी नेमके दारूमुळे गेले की अन्नातून विषबाधा झाल्याने याचा शोध घेण्यात येत आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा येथे सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाऊक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या विक्रेत्यांनी विक्री केलेल्या मद्याचा तपशील दररोज उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात कुठेही बेकायदा मद्य विक्री होणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचे उत्पादन शुल्कचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.
शहरात सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांकडून जेवणावळी घालण्यात येत आहेत. नाश्त्यापासून दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची सोयही करण्यात आली आहे. व्हेज-नॉनव्हेजचे बेत आखले जात असून, मद्याचाही महापूर आहे. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पथके तैनात करण्यात आली आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दररोज रात्री एक वाजेपर्यंत सगळीकडे गस्त घालत आहेत. बेकायदा मद्यविक्रीसोबत बनावट मद्य कुठेही वितरित होणार नाही, यासाठी सर्वत्र तपासणी करण्यात येत असल्याचे वर्दे म्हणाले. सर्व ठिकाणांचे निवडणूक निर्णय अधिकारी, स्थानिक पोलिसांशी उत्पादन शुल्क विभागाचा दैनंदिन संपर्क आहे. त्याशिवाय मद्यविक्रीबाबतच्या कारवाया वाढवण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतांचा परतावा विकासात दिसेल

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौंडकरांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, दौंड

‘राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार यांच्या पक्षाची अवस्था दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी आहे. त्यांना मते देऊन मत वाया घालवू नका. मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या मतांचा परतावा विकासाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल,’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेऊन भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी देण्याचे दौंडवासीयांना आवाहन केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मंगळवारी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौंड, शिरूर, बारामती, हवेली, तालुक्यातील भाजप, रासप आणि आरपीआयच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पशु आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल, मालेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, पृथ्वीराज जाचक, दादा पाटील फराटे, वासुदेव काळे यांच्यासह भाजप, रासप आणि आरपीआयचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
‘आघाडी सरकारने राज्याची तिजोरी रिकामी केली. धरणांची कामे टक्केवारीसाठी मारुतीच्या शेपटासारखी सुरूच ठेवली. त्यामुळे धड सिंचनही झाले नाही आणि राज्य कर्जबाजारी झाले. तिजोरी रिकामी असतानाह भाजप सरकारने शेतकरी हिताच्या योजना राबवताना हात आखडता घेतला नाही. जे विरोधकांना पंधरा वर्षांत जमले नाही, ते आम्ही दोन वर्षात करून दाखवले. भीमा पाटस सहकरी साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत आर्थिक संकटातून बाहेर काढला जाईल, यासाठी राज्य सरकार हवी ती मदत करेलच. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनाही विनंती करू आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत मार्ग काढू,’ असेही फडणवीस यांनी नमूद केले.
जानकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे नोटाबंदीशिवाय दुसरा मुद्दाच नाही. एकीकडे हे नोटाबंदीला जोरदार विरोध करतात आणि दुसरीकडे मोदींना जेवायला घरी घेऊन जायचे अशी यांची दुहेरी नीती आहे.’

अजित पवार म्हणजे पाण्यावाचून तडफडणारा मासा आहे. सत्तेअभावी त्यांची अवस्था सत्तेसाठी पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यांचे स्थान आता केवळ बारामतीपुरते राहिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते घोटाळेखोर असून, त्यांचे पुढील संमेलन तुरुंगातच घ्यावे लागेल.
गिरीश बापट, पालकमंत्री

राष्ट्रवादीला ‘दे धक्का’
शिरूर पंचायत समिती उपसभापतीपदाचा राजीनामा देऊन मंगल लंघे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी मंगळवारी वरवंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्टेंट मिळणार तीस हजारांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अँजिओप्लास्टीसाठी वापरण्या येणाऱ्या स्टेंटच्या किमती ८५ टक्क्यांनी घटणार असून, तो आता सुमारे ३० हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. परिणामी अँजिओप्लास्टीसाठी येणारा दोन ते तीन लाख रुपयांचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटी’ने (एनपीपीए) त्यावर शिक्कामोर्तब करून त्वरित अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असल्यास संबं​धित रुग्णाची अँजिओप्लास्टी करावी लागते. त्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे विशेषतः अमेरिकन कंपन्यांचे स्टेंट बसविले जात होते. ‘बेअर मेटल' आणि ’ड्रग इल्युटिंग’ असे स्टेंटचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी ‘ड्रग इल्युटिंग’ हा स्टेंट वापरण्यावर डॉक्टरांचा भर असतो. स्टेंटच्या अधिक किमतीमुळे त्याचा फटका पेशंटना बसत होता. कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत आणि पेशंटकडून वसूल करण्यात येणाऱ्या किमतीत मोठी तफावत होती. त्यामुळे डॉक्टरांकडून पेशंटांची लूट केली जात होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे स्टेंटच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यानुसार देशभरातील विविध ठिकाणच्या स्टेंटच्या किमतीचा अभ्यास करण्यात आला. समितीच्या अहवालाच्या आधारे १३ फेब्रुवारीच्या बैठकीत स्टेंटच्या किमती घटविण्यावर ‘एनपीपीए’ने शिक्कामोर्तब केले.
‘एनपीपीए’ने एक परिपत्रक जारी केले असून, त्यात ‘बेअर मेटल’च्या स्टेंटची किंमत ७ हजार २६० रुपये तर, ‘ड्रग इल्युटिंग’ स्टेंटची किंमत २९, ६०० रुपये निर्धारित करण्यात आली आहे. त्यामुळे स्टेंटच्या पूर्वीच्या किमतीपेक्षा आता किमती ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. सध्या पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये ‘ड्रग इल्युटिंग’ स्टेंटची किंमत ५५ हजार ते १ लाख २० हजार रुपयांच्या घरात आहे. स्टेंटची किंमत कमी होणार असल्याने अँजिओप्लास्टीचा खर्च कमी होणार आहे.

लुटीला चाप बसणार
स्टेंटच्या पूर्वीच्या किमतीमध्ये वितरकांना १३ ते २०० टक्के नफा होतो. परंतु, हॉस्पिटलकडून पेशंटपर्यंत स्टेंट जाताना किमतीत दहापट वाढ होत असल्याने या लुटीला चाप बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शंभरीतही सोडवेना कामाचा ध्यास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शंभर वर्षांचे आयुष्य मिळाले त्याचा आनंद आहे...आता आणखी काय हवे. पुष्कळ वर्षे काम केले. अजूनही काम करण्याची इच्छा आहे, पण आता थकवा जाणवतो. जे केले, त्याबद्दल मी समाधानी आहे...’ नव्यान्नव वर्षांच्या अनुभवातून आलेले हे बोल आहेत, डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे... ज्येष्ठ संस्कृत पंडित, महाभारत, ऋग्वेद, निरुक्त तसेच पारशी धर्मग्रंथ ‘झेंद अवेस्ता’चे अभ्यासक असलेल्या डॉ. मेहेंदळे यांनी मंगळवारी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. शंभरीत पदार्पण करत असताना मेहेंदळे यांचा हसतमुख चेहरा आणि उत्साह उपस्थितांनाच एक नवी सकारात्मक ऊर्जा देत होता.
मेहेंदळे यांच्या शंभरीतील पदार्पणानिमित्त मेहेंदळे कुटुंबीयांतर्फे एक छोटेखानी घरगुती कार्यक्रम पौड रस्त्यावरील प्रशांत सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मेहेंदळे यांचे आप्तेष्ट, नातेवाइक आणि स्नेही असा गोतावळा जमला होता. सदरा, विजार आणि कोट अशा वेशात लाडके अप्पा अर्थात मेहेंदळे यांचे आगमन होताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यांच्या स्नुषा रोहिणी मेहेंदळे आणि महिलांनी त्यांचे शंभर दिव्यांनी औक्षण केले. वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला आणि त्यानंतर गप्पांची मैफल रंगली.
‘शंभर वर्षांचे आयुष्य मिळाले. आनंद वाटतोय. काम करण्याची इच्छा आहे, पण आता थकवा जाणवतो. आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. इतर लोक त्यांच्या परीने काम करत आहेत. तेही ठीक आहे,’ अशी भावना मेहेंदळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

कारकिर्दीवर माहितीपट
डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचा अभ्यास या वयातही सुरूच आहे. आणखी बरेच काम करायचे आहे, असा विश्वास ते व्यक्त करतात. प्रचंड इच्छाशक्ती, ज्ञानसंपादनाची प्रचंड महत्त्वाकांक्षा या जोरावर त्यांची ज्ञानसाधना सुरू आहे. पत्नी कुसुम मेहेंदळे यांच्या निधनानंतरही ते पुन्हा जिद्दीने उभे राहिले. एका शस्त्रक्रियेनंतर त्यांनी पुन्हा चालण्यास सुरुवात केली आहे. डॉ. मेहेंदळे यांच्या कार्यावर त्यांचे चिरंजीव (निवृत्त) कर्नल प्रदीप मेहेंदळे, डॉ. अशोक मेहेंदळे यांनी धनंजय वसंत मेहेंदळे (मेहेंदळे मोशन पिक्चर्स, पुणे) यांच्या सहयोगाने गेल्यावर्षी एक माहितीपट तयार केला. https://youtu.be/U8z-uArfPHw या लिंकवर हा माहितीपट विनामूल्य पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका नाट्यगृहांत पार्किंगशुल्क दुप्पट

0
0

बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये दुचाकी आणि चारचाकीसाठी निश्चित केलेल्या दरांपेक्षा पुन्हा जादा शुल्क घेण्यास सुरुवात झाली असून, बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पार्किंगसाटी दुप्पट शुल्क आकारले जात आहे. नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली असून, महापालिकेने तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
शहरात महापालिकेच्या मालकीच्या किंवा महापालिकेने बांधलेल्या इमारतींच्या आवारात पार्किंगसाठी किती शुल्क घ्यायचे, याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये एकसारखा दर असावा, यासाठी तीन तासांच्या प्रत्येक खेळांकरिता समान शुल्क आकारले जाते. दुचाकीसाठी हा दर पाच रुपये आहे, तर चारचाकीसाठी १० रुपये आहे. परंतु, पालिकेने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा पार्किंगसाठी ठेकेदारांकडून अधिक रकमेची मागणी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वेगवेगळ्या नाट्यगृहातील पार्किंगचे ठेकेदार मनमानी पद्धतीने शुल्क वसुली करत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. आता, बिबवेवाडी येथे महापालिकेने उभारलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दुचाकी पार्किंगसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून पार्किंगच्या शुल्काची पावतीवरच दुचाकीसाठी १० रुपये शुल्क असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, तीन तासांसाठी पाच रुपये शुल्क आकारणी केली जाणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिकांना पार्किंगच्या शुल्काची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेने सर्व ठिकाणी त्याच्या दरांचे फलक लावले आहेत. परंतु, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथील फलक जागेवर नसल्याने ठेकेदाराकडून वाढीव दराने शुल्क आकारणी सुरू आहे.

‘चौकशी करून कारवाई करू’
दरम्यान, याबाबत महापालिकेचे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘महापालिकेने ठरवून दिलेल्या पार्किंग शुल्कानुसारच दर आकारणे गरजेचे आहे. त्यापेक्षा अधिक दराने शुल्क घेतले जात असल्यास त्याची तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीचा निर्णय मुस्लिम विरोधी : शरद पवार

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय मुस्लिम विरोधी आहे. इस्लाममध्ये व्याज देणे-घेणे पाप मानले जात असल्याने बहुतांश मुस्लिम समाज बँकेत खाते उघडत नाहीत. त्यांचे सर्व व्यवहार हे रोखीनेच होतात. त्यामुळे नोटबंदीचा चांगलाच फटका या समाजाला बसला आहे,’ असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयो‌जित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या बैठकीत पवार बोलत होते. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, रणजित अरोरा, उस्मान हिरोली, अॅडविन रॉबर्ट, अक्रम मदारी यांच्यासह मुस्लीम, शीख, ख्रिश्चन धर्मांचे प्रमुख उपस्थित होते.
‘कोणताही निर्णय घेताना त्याचा परिणाम कोणत्या घटकांवर होतो, याचा संपूर्ण विचार करून त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. मात्र, समाजातील लहान घटकांवर परिणाम होणारे निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे मालेगावमधील ४० ते ५० टक्के वीणकर स्थलांतरित झाले आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले.
देशातील काही घटक सामाजिक ऐक्य टिकविण्याऐवजी समाजात फूट पाडत आहेत. एका बाजुला कुटुंबनियोजनासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे केंद्रातील काही महिला मंत्री मात्र हिंदूंची संख्या वाढविण्यासाठी नऊ ते दहा मुलांना जन्म देण्याचे वक्तव्य करत आहे, ही मोठी खेदाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.
‘समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची असून, गेले दहा वर्षे पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना पुणेकरांनी दाखविलेला विश्वास पक्षाने सार्थ ठरविला आहे. जात, धर्म यांच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवावा,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. ‘या निवडणुकीत शहरातील अल्पसंख्यांक समाज राष्ट्रवादीबरोबर राहील,’ असा शब्द या बैठकीसाठी उपस्थित विविध धर्मातील मान्यवरांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता भाजपला रस्त्यावर आणेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘मलिदा मिळविण्यासाठी आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये कधीच काम केले नाही. पुढच्या २५ वर्षांचे नियोजन करून नंतरच आम्ही काम करतो. आमच्या प्रकल्पाचा खर्च वाढला असला, तरी त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या नाहीत. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा कारभार रोडपती होण्यासारखा असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपला जनताच रोडवर आणल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

अजित पवार बुधवारी पिंपळेसौदागर येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, जगदीश शेट्टी आणि फजल शेख आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘अडीच वर्षांत भाजपने शहराला काय दिले? विकासावर भाष्य करण्याचे आव्हान मी भाजप नेत्यांना देतो.’ पालकमंत्री या नात्याने गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पवार यांनी केला.

‘एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रोडपतीची भाषा वापरणे योग्य आहे का, या शहराची गणना भारतातील चांगल्या शहरात होते. देवेंद्र फडणवीस अडीच वर्षांत किती वेळा शहरात आले. शहराच्या हिताचा त्यांनी कोणता निर्णय घेतला. विकासाचे कोणते काम त्यांनी केले. कोर्टात जाऊन समस्या सुटत नाहीत, तर त्या अधिक जटील होतात हे विसरून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फक्त झोपडपट्टीवासीयांना वेठीस धरण्याचे काम केले,’ अशी टीका पवार यांनी केली.

‘शास्ती कराच्या बाबतीत भाजपने शहरवासियांना पुन्हा गाजर दाखवले आहे. आचारसंहिता संपल्यावर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवणार, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथील सभेत केले. अडीच वर्षे यांना कुणी आडवले होते,’ असा सवाल पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे ‘बोलबच्चन’ असल्याची टीका त्यांनी केली.

पवार पुढे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शहरात आले होते. एकहाती सत्ता द्या, यापेक्षा वेगळा विकास करून दाखवू, राष्ट्रवादीला शहरातून उखडून टाकू असे वक्तव्य त्यांनी केले. ही भाषा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माझे आवाहन आहे, भाजपच्या ताब्यात असलेल्या कुठल्या महापालिकेचा विकास पिंपरी-चिंचवडप्रमाणे झाला ते सांगावे. निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचे, तर सर्वच प्रभागातील पॅनेल पाहिले तर राष्ट्रवादीच वरचढ दिसून येईल.’

‘भाजपवाले गुंडांचे समर्थन करून त्यांना पक्षात घेऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. चांगल्या व्यक्तींना गुन्ह्यात अडकवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असताना गुन्हेगारी वाढत आहे,’ असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी कर्मचाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडला संप

0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात एसटी चालक आणि कार चालकाच्या वादात कार चालकाने एसटी चालकाच्या कानशिलात वाजविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी पावणे सहा ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर चालक-वाहकांनी संप पुकारला. त्यामुळे अनेक प्रवासी स्थानकातच अडकून पडले. चालकाला मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यावर कर्मचाऱ्यांनी तीन तासानंतर संप मागे घेतला.

मिथिलेश गणेश राजपूत (वय २५, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबात अंकुश बाड (वय ३५, रा.सांगली) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लभनगर आगारात मुक्कामी येणाऱ्या विटा गाडीसाठी एक जागा राखीव आहे. मात्र बुधवारी सकाळी याच जागेवर कार चालकाने त्याची गाडी पार्क केली. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर कार चालकाने बसमध्ये चढून बसचालकाच्या कानशिलात लगावली. घटनेनंतर या आगारातील बस काही काळासाठी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालकाला मारहाण झाल्याचे समजताच चालक-वाहकांनी संप पुकारला. तर दुसरीकडे तोपर्यंत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्या कार चालकाला संत तुकाराम पोलिस चौकीत नेले. गुन्हा दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आली.

मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी आणि आगारप्रमुखांनी सांगितल्यावर चालक-वाहकांनी संप मागे घेतला. भिवंडी येथे रिक्षा चालकांनी मारहाण केल्याने चालकाला मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर पिंपरीत चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्यावर संघटनांनी याबाबत निषेध व्यक्त करून चालक-वाहकांना योग्य संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समतेवर आधारीत विचारधारा मजबूत करा

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आपण कोणत्या समाज अथवा जातीविरोधात नसून, विकृत विचारांच्या विरोधात आहोत. विकृत विचारांच्या विरोधात विचारांनी लढाई लढण्याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी,’ अशी सूचना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यावेळी ‘समतेवर आधारित विचारधारा मजबूत करण्याचा निर्धार करावा,’ असा विश्वास व्यक्त केला.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवसन्मान गौरव तसेच पवार यांचा विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम खेडेकर होते. या वेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे, पी. ए. इनामदार, प्रमोद मांडे, अॅड. मिलिंद पवार, रमेश राक्षे, विठ्ठल गायकवाड, वृषाली रणधीर यांचा पवार यांच्या शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरव कऱण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक विकास पासलकर यांनी केले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.
तरुण पिढीचे संघटन करा असे सांगताना ‘वाचन संस्कृती मजबूत करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण काय वाचतो, काय वाचायला सांगितले पाहिजे याची खबरदारी पुरुषोत्तम खेडेकर आणि विकास पासलकर यांनी घेतली पाहिजे,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना सूचना केली. ‘वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. तरुण पिढी काय वाचते याची खबदारी घेताना त्यांच्या हातात महात्मा फुले, शाहू महाराज यांचे चरित्र, त्यांचे विचार कसे पडतील याची काळजी घेतली पाहिजे,’ असे आवाहन पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक हजार कोटींचे मुद्रांक शुल्क बुडविले

0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोंदणी आणि मुद्रांक विभागाने मुद्रांक शुल्क बुडविणाऱ्या राज्यातील दोन हजार प्रकरणांची तपासणी केली असून, बहुतांश प्रकरणांत पुणे आणि मुंबईतील बिल्डरांचा समावेश आहे. संबंधित बिल्डरांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचे निदर्शनास आले आहे.
‘डिम्ड कन्व्हेन्स, दस्त नोंदणी, नकल शोध, मिळकत मूल्यांकन, विवाह नोंदणी, मृत्यूपत्र नोंदणी, भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी मुद्रांक विभागाकडे करावी लागते. नोंदणी होणाऱ्या दस्तांपैकी सुमारे ५० टक्के दस्त हे डिम्ड कन्व्हेन्स असतात,’ असे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक एन. रामस्वामी यांनी सांगितले.
‘राज्यातील अनेकांनी मुद्रांक शुल्क चुकविले आहे. या पार्श्वभूमीवर बुडविलेला महसूल वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. सुमारे दोन हजार प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये बहुतांश बिल्डर आहेत,’ असेही रामस्वामी म्हणाले.
‘पुण्यात सुमारे पाचशे कोटी रुपये, मुंबई आणि ठाणे येथे सुमारे एक हजार कोटी रुपये, तर उर्वरित ठिकाणी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. त्याद्वारे सुमारे एक हजार कोटी रुपये तरी वसूल होऊ शकतील,’ असे डॉ. रामस्वामी यांनी स्पष्ट केले.
‘मुंबईतील एका बिल्डराने सुमारे सहाशे कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचे आढळून आले आहे. त्या ​बिल्डरवर कारवाई केली जाईल,’ असे रामस्वामी म्हणाले.
‘मुद्रांक शुल्क बुडविणाऱ्यांच्या सुमारे ५० बँकांतील खात्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाईल,’ असेही रामस्वामी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला कॅब चालकाकडून विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यात ओला कॅब चालकाने लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. तरुणीने आरडा-ओरडा केल्यामुळे नागरिकांनी कार थांबवून तरुणीची सुटका केली. चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष ज्ञानदेव तुपेरे (वय ३०, रा. दिनदयाळ रुग्णालयामागे, एफसी रोड) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मुळची मुंबईची असून, ती पुण्यातील एका नामांकित लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकते. शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनीत राहते. बुधवारी सकाळी आठ वाजत तरुणीने कॉलेजला जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी चालक तुपेरे हा मॉडेल कॉलनीत तरुणी राहत असलेल्या ठिकाणी गेला. मात्र, तरुणीला येण्यास बराच वेळ लागला. काही वेळाने तरुणी आल्यानंतर कॅबचालक व तरुणीमध्ये कारमध्ये वाद सुरू झाला. तरुणीने त्याला रस्त्यात सोडण्यास सांगितले. मात्र, तुपेरेने तिला न सोडता कार तशीच सुरू ठेवली. तिला कॉलेजच्या दिशेने घेऊन न जाता दुसरीकडे घेऊन निघाला. त्यामुळे तरुणीने आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. किर्लोस्कर बंगल्याजवळ असणाऱ्या काही नागरिकांनी तरुणी कारमध्ये ओरडत असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ कार थांबवून माहिती घेतली. चालक तुपेरेला नागरिकांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस नियत्रंण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तुपेरेला ताब्यात घेतले. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांचे सोशल इंजिनीअरिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यापारी मेळावा, अल्पसंख्याक मेळावा यांसह विविध समाजगटांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सोशल इंजिनीअ​​रिंगचा प्रयोग करण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी वर्गासोबत चर्चा, अल्पसंख्याक नेते, प्रमुख कार्यकर्ते यांचे ‘गेट टुगेदर’, साहित्य, उद्योग क्षेत्रातील विविध प्रमुख व्यक्ती, आयटी क्षेत्रातील मान्यवर अशा विविध घटकांशी संवाद साधत ‘ग्राउंड रिअॅलिटी’चा आढावा पवार यांनी घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पवार यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग गेले दोन दिवस सुरू ठेवला होता. पवार राजकीय सभांसाठी दोन दिवस पुण्यात तळ ठोकून होते. यादरम्यान त्यांनी समाजातील विविध घटकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संवाद साधत शहरातील निवडणुकीची परिस्थिती तसेच समाजमनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पवार यांनी मंगळवारी हॉटेल प्रेसिडेंट येथे शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी जवळपास दोनशेहून अधिक व्यापारी या चर्चेसाठी उपस्थित होते. पवारांनी तब्बल सव्वा तास त्यांच्यासमोर भाषण करत नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला. औपचारिक कार्यक्रमानंतर अनेक व्यापाऱ्यांनीही पवारांशी संवाद साधत सद्यपरिस्थितीतील अडअडचणींबाबत चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी बुधवारी अल्पसंख्यांक नेते, प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पवार यांनी त्याशिवाय साहित्य, कला, आयटी तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांशी फोनवर संपर्क साधत सद्यस्थितीचा आढावा घेतला. महापालिका निवडणुकीचे वातारवण, नोटाबंदीनंतरचे समाजमन जाणून घेताना ‘ग्राउंड रिअॅलिटी’ची माहिती घेतली. पवारांचे सोशल इंजिनीअरिंग दर निवडणुकांच्यावेळी होत असले, तरी यावेळी या सोशल इंजिनीअरिंगला बरेच संदर्भ आहेत. विधानसभा निवडणुकीत पुण्यात विरोधी पक्षांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा विधानसभा निवडणुकांच्यावेळी जाणवली होती. ही हवा महापालिका निवडणुकीत कितपत जाणवत आहे, याचा अंदाचही पवार बांधत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिकांची प्रत ई-मेलवर मिळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत (फोटोकॉपी) मिळण्याऐवजी स्कॅन केलेली कॉपी विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर कॉलेजामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकांच्या डिजिटल स्कॅनिंगचा प्रारंभ आज (दि. १६) होणार आहे.
सुरुवातीला इंजिनीअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपीचा निर्णय प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विद्याशाखांसाठी स्कॅन कॉपीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज येत आहेत. या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता स्कॅन कॉपी मिळणार आहे.
छायांकीत प्रत मिळण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागतो. ही प्रत वेळेत मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्या पार्श्वभूमीवर आता उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ई-मेलद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजच्या प्राचार्यांमार्फत फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर त्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत तातडीने उपलब्ध होणार आहे. ही प्रत कॉलेजांमार्फत विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या भूमिकेत स्पष्टता हवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वागतार्ह असली, तरी शरद पवार यांच्या याबाबतच्या विधानावर जनतेचा विश्वास आहे काय, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे नमूद करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार यांच्या विश्वासार्हतेवर बुधवारी निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सुरुवातीला राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. महापालिका निवडणुकीसाठी युती तोडल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्य सरकारला ‘नोटीस पीरिएड’वर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आपली आधीची भूमिका बदलत पवार यांनी भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता चव्हाण यांनी, राष्ट्रवादीची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आपण विश्वास ठेवता का, असे विचारले असता, ते म्हणाले, ‘प्रश्न माझ्या विश्वासाचा नाही. जनतेचा त्यावर विश्वास आहे का, हा खरा प्रश्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने मागितलेला नसतानाही राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केला होता. त्याबाबत अजूनही त्यांची भूमिका स्पष्टपणे समोर आलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत’ भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. भाजपला पाठिंबा न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका एक पाऊल पुढे टाकणारी आहे. मात्र, त्यामध्ये अजून स्पष्टता येणे आवश्यक आहे.’
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर एकत्र प्रचार करण्यात आपल्याला काहीच अडचण नाही. या संदर्भात स्थानिक नेतृत्वाने नियोजन करावे, असे चव्हाण म्हणाले.

मोदी यांची टिप्पणी असंस्कृत
‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाष्य अत्यंत असंस्कृत असून निवडणुकीत विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने पायाखालची वाळू घसरू लागल्याचे हे निदर्शक आहे,’ अशी टीका चव्हाण यांनी केली. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने माजी पंतप्रधानांविषयी इतक्या खालच्या पातळीला येऊन टीका केलेली नाही. तसेच मोदी यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील, तर त्यांनी त्या कथित गुन्ह्यांची माहिती संबंधित यंत्रणेला न देता त्याआधारे विरोधकांना ब्लॅकमेल करणे निंदाजनक आहे, असेही ते म्हणाले.

लुटूपुटूची भांडणे
भाजप आणि शिवसेना यांच्यातील भांडणे लुटूपुटूची असून सरकार पडेल, असे आपल्याला वाटत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सरकारमध्ये कितीही अपमान झाला, तरी सत्ता सोडायची नाही, अशी शिवसेनेची वर्तणूक दिसते आहे. वाद घालून ते आणखी काही पदरात पाडून घेतील. अगदीच टोकाची भूमिका घेतली, तर सरकार आपोआप पडत नाही. त्यासाठी अविश्वास ठराव आणवा लागतो आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष या नात्याने ती सेनेची जबाबदारी आहे. याबाबत शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडांना सुधारण्याचे वर्ग मुख्यमंत्री घेणार का?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला ‘खंडणीखोरांचा पक्ष’ म्हणतात. शिवसेना फडणवीसांना ‘गुंडांचे सरदार’ म्हणते. राज्य सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे एक मंत्री गुंडांना पक्षात घेण्याची कबुली देत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री गुडांना सुधारण्याचे वर्ग स्वतः घेणार आहेत का? भाजप किळसवाण्या राजकीय संस्कृतीचे दर्शन आहे’, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुणे महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण बुधवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत असंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवले. त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात दिसतील. पंतप्रधान विरोधकांच्या कुंडल्या आपल्याकडे असल्याचे सांगत एका-एकाकडे बघून घेईन, असे धमकावतात. विरोधकांबाबत काही माहिती असेल तर तिचा वापर करून ब्लॅकमेल करतात. हे गल्लीबोळातील राजकारण सध्या दिल्लीत सुरू आहे. पंतप्रधानांना एखाद्या गुन्ह्याची माहिती असेल तर ती दडवून ठेवणे हाही एक गुन्हा आहे. त्याच माहितीचा वापर करून धमकावणे हा दुसरा गुन्हा आहे, कदाचित त्यांना कायद्याचे ज्ञान नसेल, अशी टीका चव्हाण यांनी केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्याकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये वारंवार करण्यात येत आहेत. भाजपकडून पक्ष वाढवण्यासाठी कोणालाही पक्षात घेण्यात येत आहे. त्यासाठी दहशतीचा, चौकशीचा वापर करण्यात येतो आहे. आमिष, प्रलोभन दाखवून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यांना कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्यात आली, हा त्यातीलच एक प्रकार आहे. पुण्यातही असे प्रकार सुरू असतील, असे चव्हाण म्हणाले.
राज्य सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे एक मंत्री गुंडांना पक्षात घेण्याची कबुली देत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री गुडांना सुधारण्याचे वर्ग स्वतः घेणार आहेत का, भाजप अशा किळसवाण्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवत आहे, अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेक्कन क्वीन’ प्लॅटफॉर्म पाचवरून सुटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, आझाद-हिंद एक्स्प्रेस, पुणे-पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्यांना नेहमीच्या २३ डब्यांऐवजी २४ डबे लावण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी ते दोन जून या कालावधीत डेक्कन क्वीन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म एक ऐवजी प्लॅटफॉर्म पाचवरून सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच, ट्रॅक दुरुस्तीच्या कामासाठी पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म पाचवरील वाहतूक १६ ते १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन या वेळेत बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून पुणेकरांचा विश्वासघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लोकसभा, विधानसभेला पुणेकर जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून एक खासदार आणि आठ आमदार निवडून दिले. या सर्वांची आजपर्यंतची कामगिरी पाहिल्यास, ते लोकप्रतिनिधी पुण्यासाठी काम करतात की नागपूरसाठी हेच कळत नाही,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी पुण्यात सभा घेतली. या वेळी ते बोलत होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, संघटक महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. ‘पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखविला. सर्व आमदार आणि खासदार त्यांचेच निवडून दिले. मात्र, गेल्या दोन ते अडीच वर्षात त्यांनी पुण्यासाठी काय केले, हा प्रश्न आहे. कोणताही नवीन विकासाचा प्रकल्प त्यांनी पुण्यात आणला नाही,’ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रोचे उदघाटन केल्यानंतर काही दिवसांतच हरित लवादाने कामास स्थगिती दिली. राज्य सरकारने योग्य अभ्यास करून मेट्रोचे नियोजन करणे अपेक्षित होते. पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास साधणे मान्य नाही. पुणेकरांनी काँग्रेसची सत्ता अनुभ‍वली. राष्ट्रवादी काँग्रेसचे भोग भोगले. भाजपचे परिवर्तन आपण सध्या पाहातच आहात. त्यामुळे पुणेकरांनी आता आम्हाला एकदा संधी देऊन पहावे, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले.
भाजपच्या सरकारने पुण्यात येऊ घातलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरला नेले. नवीन उद्योग गुजरात आणि नागपूरला नेण्याचे कामही त्यांनी केले. हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याऐवजी कोल्हापूरला हलविले, ही भाजपच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींची कामगिरी आहे, असे खडे बोल निम्हण यांनी सुनावले.

बापट झाले पारदर्शक !
भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिंहगडावर पारदर्शकतेची शपथ घेतली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पालकमंत्री गिरीश बापट यांनी पारदर्शकपणे मुख्यमंत्र्याच्या कार्यकालात ६३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जाहीरपणे सांगितले. शपथ घेतल्याने बापट सत्य बोलले, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. तसेच, ‘बापट हे फिल्म बघण्यात फार बिझी असतात. त्यामुळे त्यांना फोन करण्याचा प्रश्नच येत नाही,’ या ठाकरे यांच्या वक्तव्यावर हशा पिकला. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही दुसरा काही विचार करू नका. त्यांच्याकडे संत-महात्मांच्या फिल्म असतील.’

भाजपला धडा शिकवा
स्वाभिमानी शेककरी संघटनेने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याचे संघटेनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी सभेत जाहीर केले. शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या भाजपला चांगलाच धडा शिकवा, असे ठाकरे म्हणाले.

पालकमंत्री बदला
आमचा पक्ष सर्वात मोठा अशा थापा मारायच्या आणि दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यायची, अशी दुसऱ्यांची मुले कडेवर घेवून किती दिवस बारसे करणार, अशी टीका शिवतारे यांनी केली. तसेच, पुण्याचे पालकमंत्री बापट काहीच कामाचे नाहीत. प्रथम त्यांना बदला, असेही शिवतारे म्हणाले.

‘भाजपची आणीबाणी’

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीदरम्यान १६, २० आणि २१ फेब्रुवारीला ‘सामना’चा अंक प्रसिद्ध न करू देण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ‘आणीबाणी लागू करणाऱ्या इंदिरा गांधींच्या विरोधात बोलण्याचा अधिकार भाजपला नाही. भाजपने सामनाचा अंक प्रसिद्ध न करण्याची केलेली मागणी, ही आणीबाणीच आहे,’ या शब्दांत ठाकरे यांनी टीका केली.

भारतीय जनता पक्षाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट आहे, असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु, ही लाट नसून विल्हेवाट आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तमिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, पुदुच्चेरी या राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
उद्धव ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त पोलिसांची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त ३००० पोलिसांची मागणी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे केली आहे. मतमोजणी यंत्रे पोहोचवणे, मतदान करून घेणे आ​णि त्यानंतर ती यंत्रे मतमोजणी केंद्रात पोहोचवणे, तसेच निवडणूक आणि मतमोजणीच्यादिवशी शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येतात. या दोन्ही ठिकाणी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे काही भाग पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे अंदाजे पाच हजार तीनशे मतदान केंद्रावर बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे.
पुणे महानगर पालिकेत निवडणूक आयोगाने आतापर्यंत बूथ कोठे असणार याची माहिती पोलिसांना दिलेली नाही. पोलिसांनी बंदोबस्ताचा अंदाज बांधून आराखडा तयार केला आहे. शहरातील संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जेथे पाचपेक्षा जास्त मतदान बूथ असणार आहेत, अशा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा २० टक्के अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची पोलिसांची योजना आहे. मतदान आणि मतमोजणीच्यावेळी पोलिस ठाण्यांतील मनुष्यबळ बंदोबस्तासाठी वापरण्यात येणार आहे. त्याशिवाय पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र टीम तैनात असणार आहेत. शहरात कुठेही गोंधळ उडणार नाही, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. काही सराईतांना तडीपारही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच पक्षांकडून गुन्हेगारांना तिकीट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १७ टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२ टक्के उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने गुन्हे दाखल झालेले सर्वाधिक उमेदवार उभे केल्याचा दावा स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ आणि ’नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज’ यांच्यातर्फे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून विविध माहिती संकलित करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील अकराशे उमेदवारांपैकी ७६७ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील ७७४ पैकी ५४१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती ‘महाराष्ट्र इलेक्शन वॉच’चे पुणे समन्वयक सतीश खोत यांनी दिली. निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर असलेल्या उमेदवारांची नेमकी माहिती व्हावी, यासाठी हा अभ्यास करण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.
गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक २० उमेदवार (२१.१ टक्के) शिवसेनेचे असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस (१५), भाजप (१४) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (९) यांचा क्रमांक लागतो.

बीडकर कर्जबाजारी
महापालिका निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांच्यावर कर्जाचा सर्वाधिक बोजा आहे. आपल्यावर सुमारे ११ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. भाजपने पुरस्कृत केलेल्या उमेदवार रेश्मा भोसले यांच्यावरही सुमारे सात कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे.

सहा उमेदवार निर्धन
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व उमेदवारांच्या संपत्तीचे विश्लेषण केल्यानंतर पुण्यात प्रति उमेदवार सरासरी ३ कोटी ६१ लाख रुपयांची संपत्ती आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सरासरी उमेदवारांकडकडे २ कोटी ८७ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. सहा उमेदवारांनी आपल्या नावावर एक रुपयाचीही मालमत्ता नसल्याचा खुलासा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images