Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. कसबे यांना कार्यकर्ता पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, २ सप्टेंबरला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी बुधवारी दिली.
या वेळी शास्त्रीय संगीताचे व्यासंगी पं. विजय सरदेशमुख आणि रक्तदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून काम करणारे 'रक्ताचे नाते' या संस्थेचे अध्यक्ष राम बांगड यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कसबे मोठे विचारवंत असून, त्यांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे.
पं. सरदेशमुख गेली ५० वर्षे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते पंडित कुमार गंधर्व आणि विठ्ठलराव सरदेशमुख यांचे शिष्य आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे कलागुरु म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. बांगड यांनी स्वतः ११७ वेळा रक्तदान केले असून, आजपावेतो एक हजारांहून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस-वेवर म्हशी चारणाऱ्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एक्स्प्रेस-वे'वर सहा म्हशी घेऊन बिनधास्त रस्ता ओलांडणाऱ्या आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या रणजितकुमार काळुराम वर्मा (वय १९, रा. मावळ) याच्याविरुद्ध महामार्ग पोलिसांनी तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 'एक्स्प्रेस-वे'वर जनावरे, दुचाकी, रिक्षा, बैलगाडी यांना बंदी घालण्यात आली आहे.

'एक्स्प्रेस-वे'वर स्थानिकांकडून जनावरे घेऊन रस्ता ओलांडण्याचे प्रमाण वाढते आहे. उर्से गावाच्या हद्दीत टोलनाक्याजवळ सहा म्हशी घेऊन वर्मा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. या म्हशींमुळे 'एक्स्प्रेस-वे'वरील वाहनांना अडथळा येत होता. अपघाताचीही शक्यता होती. त्याचवेळी महामार्ग पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन तेथून जात होती. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी म्हशींना एका जाळीतून बाहेर काढले तसेच, या म्हशींना तेथे घेऊन येणाऱ्या वर्मा याची खबर घेतली. महामार्ग पोलिस दलातील कर्मचारी संजय पालांडे यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात वर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला. 'एक्स्प्रेस-वे'वर अचानक जनावरे येऊन अपघात होऊ नये, यासाठी जाळी बसवण्यात आली आहे. स्थानिकांकडून अनेक ठिकाणी ही जाळी तोडण्यात आली आहे. तेथूनच जनावरांची ने-आण करण्यात येते. या प्रकारामुळे 'एक्स्प्रेस-वे'वर अपघातांची शक्यता वाढली आहे.

''एक्स्प्रेस-वेवर जनावरांना आणण्यास बंदी असतानाही वर्मा याने जनावरे आणली. त्यामुळे वाहन चालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. या प्रकरणी वर्माच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत, त्या दुरूस्त करण्यासाठी आयआरबी कंपनीला कळवण्यात आले आहे.'' - अमोल तांबे-पाटील, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांसोबत सेक्ससाठी बायकोवर बळजबरी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दारू पिण्यासाठी आणि त्याच्या मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी बळजबरी करणाऱ्या पतीविरोधात पत्नीनं वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनेकदा त्यानं मला जबरदस्ती दारू पाजली आणि त्याच्या मित्रांसोबत सेक्स करण्यास भाग पाडलं, असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.

दारू पिण्यास आणि मित्रांसोबत सेक्स करण्यास अनेकदा विरोध केला. पण त्यानंतर सिगारेटचे चटके द्यायचा. एकदा तर पतीनं मला जबरदस्ती दारू पाजली आणि माझ्य़ा इच्छेविरुद्ध सेक्स केला. अनेकदा त्याच्या मित्रांसोबत सेक्स करण्यास भाग पाडलं, असं पीडितेनं तक्रारीत म्हटल्याचं वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं. पत्नीवर अत्याचार करणारा पती आणि तिला शिवीगाळ करणाऱ्या सासू, दीर आणि नणंदेवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी समितीला मुदतवाढ

$
0
0

पिंपरी-चिंचवड पालिकेतील गॅस शवदाहिन्यांचा कथित भ्रष्टाचार; आरोप करणाऱ्या नगरसेविकांची सुनावणी


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरात ठिकठिकाणी गॅस शवदाहिनी बसवण्याच्या कामातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील समितीने आरोप करणाऱ्या नगरसेविकांची शुक्रवारी सुनावणी घेतली.

महापालिका प्रशासनाने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, दापोडी आणि पिंपरी वाघेरे या पाच ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसवण्याच्या खर्चाला मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. परंतु या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आंदोलनही केले. त्याची दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच या संदर्भात चौकशीसाठी सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि उपशहर अभियंता आयुबखान पठाण यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.

आरोपांची पुराव्यांनिशी कागदपत्रे सादर केल्यानंतर सावळे आणि शेंडगे यांची समितीपुढे सुनावणी झाली. पाचही स्मशानभूमींमध्ये एकाच प्रकारची गॅस शवदाहिनी बसवली जात असताना दोन गॅस शवदाहिन्या प्रत्येकी एक कोटी ३८ लाख रुपयांना आणि तीन गॅस शवदाहिन्या प्रत्येकी एक कोटी दोन लाख ३० हजार रुपयांना खरेदी करण्यास प्रशासन कसे काय तयार झाले, असा सवाल चौकशी समितीला करण्यात आला. तसेच संबंधित ठेकेदार, तळदेकर आणि कुलकर्णी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

शवदाहिन्यांसाठी सुरुवातीला राबवलेल्या निविदा प्रक्रियेत एका ठेकेदाराने प्रत्येकी दोन कोटी ११ लाख आणि दुसऱ्याने प्रत्येकी दोन कोटी १२ लाख रुपये दर सादर केले. परंतु प्रशासनानेच संगनमताचा ठपका ठेवून फेरनिविदा काढली. त्या वेळी त्याच ठेकेदारांपैकी एकाने प्रत्येकी एक कोटी ३८ लाख आणि दुसऱ्याने प्रत्येकी एक कोटी दोन लाख रुपये असे दर सादर केले. हे दर मान्य करून प्रशासनाने गॅस शवदाहिन्या बसवण्याच्या कामाच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. निविदेत नमूद केल्यानुसार पाचही गॅस शवदाहिन्या एकाच प्रकारच्या आणि एकसारख्या सुविधा असणाऱ्या आहेत. असे असताना पाचही गॅस शवदाहिन्या वेगवेगळ्या दराने कशा काय खरेदी केल्या जात आहेत, अशी शंका उपस्थित करण्यात आली.

वास्तविक तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी या सर्व प्रकरणात संशय व्यक्त केल्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही कुलकर्णी यांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन प्रस्ताव पुन्हा सादर केला, असा आरोप या वेळी करण्यात आला. शवदाहिनी बसवण्याच्या कामात स्थापत्यविषयक कामाचा समावेश असताना कुलकर्णी यांनी अशा कामाचा विशेष अंतर्भाव नसल्याचे नमूद केले आहे. तसेच हे काम विशेष स्वरूपाचे असल्यामुळे त्या कामासाठी निश्चित केलेल्या जिल्हा दरसूचीचा उल्लेख त्यांनी केला नाही. प्रत्यक्षात या कामांमध्ये २५ टक्के काम स्थापत्य स्वरूपाचे आहे. गॅस शवदाहिनीसाठी एकाच प्रकारची शेड बांधण्यासाठी एका ठेकेदाराने २५ लाख रुपये आणि दुसऱ्याने १८ लाख रुपये दर सादर केले आहेत, असे निदर्शनास आणून देण्यात आले.

'फेरनिविदा काढा'

स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत, 'ही निविदा पुन्हा रद्द करून फेरनिविदा काढाव्यात. आयुक्त त्यांचे विषयपत्र मागे घेऊ शकतात,' असा मुद्दा नारायण बहिरवाडे यांनी उपस्थित केला. परंतु, 'शवदाहिन्यांची खरेदी केली नसताना त्यात भ्रष्टाचार झाल्याचा गवगवा कशासाठी केला जातो, हेच समजत नाही,' असेही बहिरवाडे यांनी स्पष्ट केले.

चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी

पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसवण्याच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेत तिरडी आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल पाच दिवसांत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. परंतु चौकशी आणि आवश्यक कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ती मान्य करून त्यांना १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन करा घरीच

$
0
0

'अमोनिअम बायकार्बोनेट' मोफत देण्याचा पालिकेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीचे विसर्जन नदीच्या पाण्यात करून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांना घरीच 'श्रीं'चे विसर्जन करता यावे, यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट हे रसायन मोफत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रत्येक नागरिकाला प्रत्येकी दोन किलो या प्रमाणे हे रसायन देण्याची तयारी प्रशासनाने केली असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात हे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
नागरिकांना घरच्या घरीच आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करता यावे, यासाठी महापालिका, कमिन्स इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रमुख गणेश मंडळांनी अभिनव पर्याय शोधला असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, यांच्यासह कमिन्स इंडियाचे आणि एनसीएलचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या दृष्टीने नदी आणि कॅनॉलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत पुणेकरांसाठी १०० टन अमोनिअम बायकार्बोनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. या रसायनाचा वापर करून नागरिकांना घरच्या घरी बादलीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणे शक्य होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला दोन किलोच्या पिशवीचे मोफत वितरण पालिकेतर्फे केले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात हे रसायन उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीही यामध्ये दोन दिवसांत विरघळू शकतात, असा दावा केला जात आहे. या रसायनाच्या वापराचे प्रात्यक्षिक देखील शुक्रवारी पालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. घरगुती बाप्पांबरोबरच शहरातील छोट्या गणेश मंडळांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन या अभिनव पद्धतीने करावे, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले.
००००००००००
गणेशमूर्तीचे विसर्जन नागरिकांनी घरीच करावे. शहरातील छोट्या गणेश मंडळांनी आपल्या बाप्पाचे विसर्जनही अशाच प्रकारे करावे. त्यासाठी नागरिकांना अमोनिअम बायकार्बोनेट मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात हे रसायन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- सप्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलोपासक घेणार बालनाट्य स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाविद्यालयीन विश्वात नावलौकिक मिळवलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे गेली ५० वर्षे यशस्वीपणे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने आता बालवयातच नाट्यसंस्कार रुजवण्यासाठी बालनाट्यस्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 'कै. भालबा केळकर स्मृती करंडक' स्पर्धेची जबाबदारी कलोपासकने घेतली असून, पुढील वर्षी जानेवारीमध्ये अकादमीबरोबर कलोपासक ही स्पर्धा आयोजित करणार आहे.
'पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या नियमबद्ध चौकटीत आता ही बालनाट्य स्पर्धा भरविण्यात येणार असून, महाराष्ट्र कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 'कै. भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा' या नावाने ही स्पर्धा या पुढील काळात ओळखली जाईल,' अशी माहिती कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अकादमीचे विश्वस्त प्रकाश पारखी, कलोपासकचे मंगेश शिंदे, मिलिंद सबनीस आणि मकरंद केळकर उपस्थित होते.
ठाकूरदेसाई म्हणाले, 'रंगमंचावर पाऊल टाकण्याचे बाळकडू शालेय वयात मिळणे गरजेचे आहे. याच जाणीवेतून पन्नास वर्षांपूर्वी कलोपासकने आंतरशालेय नाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मात्र शासनाने बालनाट्य स्पर्धा सुरू केल्यानंतर संस्थेने नाट्यस्पर्धांचे आयोजन करणे थांबविले व पुरुषोत्तम स्पर्धा सुरू झाली. केळकर करंडक स्पर्धा बंद होऊ नये यासाठी 'कलोपासक'ने पुढाकार घेतला आहे. पुरुषोत्तम करंडकाच्या धर्तीवर अत्यंत शिस्तबद्द पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी शहरातील १०० शाळांशी संपर्क साधला आहे. तसेच पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा १ सप्टेंबर रोजी कर्वेनगर येथील ज्ञानदा प्रतिष्ठान येथे दुपारी १ वाजता होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात २५ दहीहंडी मंडळांवर गुन्हे दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहीहंडी उत्सवात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील २५ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीस फुटापेक्षा जास्त उंचीची दहीहंडी उभारणे, वाहतुकीस अडथळा, विना परवाना दहीहंडी साजरी करणे, वेळेचे उल्लंघन अशा विविध कारणांवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हुतात्मा बाबूगेनू मंडळ, सुवर्ण युग तरुण मंडळ, नातूबाग मित्र मंडळ, श्रीनाथ गणेश मंडळ यांचा समावेश आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ९७७ मंडळांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. दहीहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या पथकात १८ वर्षांखालील गोविंदाचा समावेश नसावा, दहीहंडी वीस फुटापेक्षा अधिक उंच नसावी, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे या आदेशाचे प्रत्येक मंडळाने काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना स्थानिक पोलिस ठाण्यांकडून संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उत्सवात कशाप्रकारची खबरदारी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. रात्री दहा नंतर लाउड स्पीकरला बंदी घालण्यात आली होती. तरीही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे २५ मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी २१ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये वीस फुटांपेक्षा जास्त दहीहंडी उभारणे, सुरक्षितेच्या उपाययोजना न करणे, वाहतुकीस अडथळा या सूचना २१ मंडळांनी पाळलेल्या नाहीत.
याबाबत पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले, की कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २५ मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही पथकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी अजून स्थानिक पोलिस ठाण्यांकडून चित्रीकरण तपासणी व पडताळणीची कामे सुरू आहेत. असे कोणतेही पथक आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच, या गुन्ह्यांमध्ये संबंधितांवरील आरोपपत्र तातडीने कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे खटल्यास विलंब होणार नाही.

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणारी मंडळे
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळ, हुतात्मा बाबुगेनू मंडळ, कसबा पेठेतील जुनाकाळ भैरवनाथ मंडळ, प्रभात प्रतिष्ठान, श्रीकृष्ण मित्र मंडळ, शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंडळ, श्रीनाथ गणेश मंडळ, राष्ट्रभूषण चौक क्रीडा संघ दहीहंडी मंडळ, जैन मंदिर चौक, बंदीवान मारुती मंदिरासमोरील मंडळ, रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौक या मंडळांविरोधात हंडीच्या उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ध्वनी प्रदुषणाचा भंग केल्याप्रकरणी ९३ मंडळांना नोटीसा
पुणे पोलिस आयुक्तालयात दहीहंडी उत्सवामध्ये ध्वनी प्रदुषणाचा भंग केल्याप्रकरणी ९३ दहीहंडी मंडळांना नोटीसा पाठविण्यता आल्या आहेत. फटाके वाजविणे, वेळेपेक्षा जास्त वेळ स्पीकर, दोनपेक्षा जास्त स्पीकर बॉक्स बसविणे याप्रकरणी ९३ मंडळांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन विकासासाठी अष्टविनायक’ मेगा सर्किट

$
0
0

पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून राज्यात अकरा प्रकल्प
म. टा प्रतिनिधी, पुणे
राज्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर अकरा प्रकल्पांची प्राधान्याने उभारणी करण्याचा महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचा मानस असून, त्यात नवीन अष्टविनायक मेगा सर्किट विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन संचित आणखी समृद्ध करण्यासाठी 'पब्लिक-प्रायव्हेट ट्रॅझॅक्शन अॅडव्हायझरी सेल' स्थापन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नुकतेच महाराष्ट्र पर्यटन धोरण-२०१६ जाहीर केले आहे. या धोरणामध्ये राज्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी येत्या दहा वर्षांत ३० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना हाती घेण्याचा आणि त्यात अधिकाधिक खासगी गुंतवणूक वळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
या धोरणाचाच एक म्हणून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये सर्वोच्च प्राधान्याने अकार प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. त्यात नवीन अष्टविनायक मेगा सर्किटचा समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद व विदर्भामध्ये येत्या पाच वर्षांत किमान दहा प्लॉट पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहेत. एलिफंटा येथे विकास कामे, कोस्टल टुरिझम प्रोजेक्टअंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती, जलदुर्गांचे सर्किट विकसन, अजंठा व एलोरा लेण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रकल्प, कोकणामध्ये सी वर्ल्ड प्रकल्प उभारणी, लोणारचा मेगा प्रकल्प म्हणून विकास, नागपूर-चंद्रपूर आणि वर्धा येथे लेक टुरिझम सर्किटची उभारणीचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्गांवर हॉटल्ससह विविध सुविधा तसेच नागपूरमधील ताडोबा येथे वाइल्डलाइफ टुरिझम इस्टेट उभारण्याच्या प्रकल्पाचाही पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी पर्यटन महामंडळ आणि गुंतवणूकदार यांच्याकडून एकत्रित विकास आराखडा तयार करणार आहे. त्यानंतर सेंट्रल फायनान्स स्कीममधून अर्थसाह्य घेण्यात येणार आहे. हा निधी नवीन सर्किट आणि पर्यटन झोन विकसित करण्यासाठीही वापरण्याचे प्रस्तावित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंटरनॅशनल क्रेडिट कार्डातून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परदेशातील बँकांमध्ये अकाउंट असलेल्या भारतीय नागरिकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा चोरून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी पकडलेल्या केरळ येथील टोळीने शेकडो अकाउंटवरून करोडो रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीचा म्होरक्या असलेला 'हमजा' याला केरळ पोलिसांनी नुकतीच अटक केली असून, त्याने 'ऑनलाइन' लुटीच्या कहाण्याच पोलिसांसमोर वाचल्या आहेत.

आखाती देशांमध्ये नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा बँक 'डेटा' हे परदेशातील ऑनलाइन तस्करांकडून मिळवत असत. या 'डेटा'मध्ये इंटरनॅशनल क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती असते. 'क्लोनिंग' मशिनच्या साह्याने लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेला 'डेटा'चा वापर करत बनावट क्रेडिट, डेबिट कार्ड तयार करण्यात येत असे. या टोळीचा प्रमुख सूत्रधार हा हमजा होता.

केरळमध्ये असलेल्या या टोळीने देशभरातील बहुतांश शहरांमध्ये या बनावट कार्डचा वापर करत करोडो रुपयांचे सोने खरेदी केले आहे. हे सोने केरळ आणि इतर शहरांमध्ये विकण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी केरळ येथील तिघांच्या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांना त्यांच्याकडे मिळालेल्या 'चॅट हिस्ट्री'मध्ये २० ते २५ लाख रुपयांपर्यंत दरदिवशी खरेदी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार गेली दीड वर्ष सुरू होता.

पुणे पोलिसांनी हमजा टोळीतील तिघांना अटक केली आहे. टी. के. अजमल (वय २४), इरफान इब्राहिम (२५) आणि नूर महंमद इब्राहिम (३२, रा. केरळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून नऊ बनावट क्रेडिट कार्ड, सात मोबाइल, तीन सिमकार्डे, क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी लागणारे मशिन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

फसवणूक बँकाचीच
आरोपींनी परदेशातील बँक अकाउंटमधून फसवणुकीने पैसे काढले तर त्याची जबाबदारी बँकावर असते. ग्राहकाने याबाबत बँकेकडे तक्रार केल्यास बँकेला ग्राहकाचे पैसे भरून द्यावे लागतात. ग्राहकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या या आरोपींच्या लॅपटॉपमध्ये शेकडो बँक ग्राहकांचा 'डेटा' सापडला आहे. आरोपींकडून या 'डेटा'च्या वापरातून बनावट कार्ड तयार करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा गणपतीचे विसर्जन हौदात

$
0
0

यंदाच्या वर्षीही मंडळाने घेतला निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यंदाच्या वर्षीही 'श्रीं'चे विसर्जन नदीत न करता हौदात करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी याचे अनुकरण करावे, यासाठी कसबा गणपतीने यामध्ये पुढाकार घेण्याचे ठरविले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले. नदी तसेच ओढ्यांमध्ये 'श्रीं' च्या मूर्तीचे विसर्जन केल्यास मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. ही गोष्ट टाळण्यासाठी कसबा गणपती ट्रस्टने हा निर्णय घेतल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी धरणात कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गणेशोत्सवाच्या काळात नदीला पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मानाच्या गणेश मंडळांना नदीत आपल्या बाप्पाचे विसर्जन न करता हौदात करावे, असे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन मानाच्या पाच गणपती मंडळांबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, अखिल मंडई मंडळाने यात पुढाकार घेतला आणि वेगळा आदर्श घालून दिला होता.
दर वर्षी शहरातील गणेशमंडळे नदील गणपती विसर्जन करत असल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. गणेशोत्सवानंतर धरणातून पाणी सोडणे बंद केल्यानंतर 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने या मूर्ती तशाच राहतात. या गोष्टींना आळा बसवा यासाठी हौदांमध्ये गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही कसबा गणपती मंडळा 'श्रीं'चे विसर्जन हौदात करणार असल्याच्या वृत्ताला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष शेटे यांनी दुजोरा दिला आहे. मानाच्या गणपतींनी हौदात विसर्जन केले असल्याने बाकीच्या मंडळांनीही हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता.
......
'विसर्जन हौदातच करा'
२०१४पर्यंत गणेशोत्सवामध्ये सर्वसाधारण ३६ हजार गणेश मूर्तीचे विर्सजन हौदात केले जात होते. मागील वर्षी मानाच्या मंडळांनी यात सहभाग घेऊन आवाहन केल्याने सुमारे २ लाख ९६ हजार घरगुती आणि मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन हौदात झाले. ही चळवळ वाढविण्यासाठी कसबा गणपती मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. यंदाच्या वर्षी हौदाबरोबरच घरगुती 'श्रीं'चे विसर्जन घरच्या घरीच करावे, असे आवाहन शेटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडणार देवांच्या वाहनांचे कोडे

$
0
0

प्राणी आणि देवता पुस्तकाचे प्रकाशन
Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
पुणे : श्रीगणेशाचे वाहन उंदीर, श्रीशंकराचे नंदी, विष्णू देवताचे शेष नाग तर सरस्वतीचे वाहन मोर.. प्रत्येक देवतेचा एक लाडका प्राणी अथवा पक्षी असल्याचे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. देवतांच्या मूर्ती कोरतानाही प्राणी हा अविभाज्य घटक ठरतात. प्रत्येक देवतेशी एक प्राण्याचे नाते जोडून पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेला निसर्ग संवर्धनाचा संदेश आता पुस्तक रूपातून वाचायला मिळणार आहे. या पुस्तकातून विविध देवतांचे वाहन असलेल्या घुबड, गाढव, खेकडा, मासे, घोरपड अशा साठहून अधिक प्राण्यांचे कोडे उलगडणार आहे.
विविध ग्रंथांमधून पूर्वजांनी दिलेला निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आजच्या पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी इला फाउंडेशन आणि वन विभागाने 'प्राणी आणि देवता' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. साडेतीनशे पानांच्या या पुस्तकात देशाच्या कानाकोपऱ्यातून मिळविलेल्या देवता आणि त्यांचे वाहन असलेल्या वन्यजीवांच्या पाचशे छायाचित्रांचा समावेश आहे. प्रसिद्ध सांस्कृतिकजीवशास्त्र (अथनोबॉलयॉजीस्ट) अभ्यासक डॉ. सुरूची पांडे आणि प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनसचिव विकास खरगे, सामाजिक वनिकरण विभागाचे सरसंचालक ए. के. झा यांच्या हस्ते नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
'गेल्या वीस वर्षात केलेल्या संशोधनातून या पुस्तकाची निर्मिती झाली असून, निसर्ग संवर्धनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन समाजाला मिळणार आहे. आपल्या पूर्वजांनी लिहिलेले ग्रंथ, परंपरा, संस्कृतीतून दिलेला निसर्ग संवर्धनाचा ऐतिहासिक ठेवा या पुस्तकात मांडला आहे. विशेष म्हणजे साठहून अधिक प्राणी, पक्षी, मासे, सरपटणारे, उभयचर प्राणी एवढेच नव्हे तर कीटकांच्या संवर्धनाचे संदर्भही विविध धर्मातील अभ्यासकांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहेत. हिंदू साहित्याबरोबरच बुद्ध, जैन आणि शीख समाजातील धर्मग्रंथ आणि संस्कृत वाड्मय, पाली भाषेतील प्राचीन साहित्यामध्ये याचे महत्त्वाचे उल्लेख आहेत. पुस्तक लिहिताना देशभरातील प्रसिद्ध मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये, किल्ले, विविध कला प्रकार, शिल्प, विविध वाद्ये यांचाही समावेश केला आहे,' असे पांडे यांनी सांगितले.
'संस्कृती ही निसर्ग संवर्धनाचे महत्त्वाचे साधन आहे. सध्या आरामदायी जीवनशैलीचे लेबल लावून सर्व पातळ्यांवर सुरू असलेला निसर्गाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण, वन्यप्राण्याच्या शिकारी, निसर्गपरिसंस्थांवर होत असलेली अतिक्रमणे रोखण्यासाठी केवळ कायद्याचा बडगा उगारून उपयोग होणार नाही किंवा शिक्षा करणे एवढा मार्ग नाही. या प्रक्रियेबरोबरच आपल्या संस्कृतीची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंपर्यत पोहोचणविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ग्रामीण भाग असून किंवा शहरी लोक प्रत्येकाचे आपल्या संस्कृतीशी भावनिक नाते आहे. याचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी झाला पाहिजे,' असे पांडे यांनी स्पष्ट केले.
....
पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी सखोल अभ्यास करून प्रत्येक प्राणी समृद्ध निसर्गाचे प्रतीक असल्याचा संदेश दिला आहे. देवतांवर आधारित आरती, कथांमध्येही आवर्जून या प्राण्यांचा उल्लेख असतो. सरस्वती देवतेचे वाहन मोर आहे, श्री गणपतीचे उंदीर, दुर्गा देवीचे वाहन वाघ, लक्ष्मीचे वाहन घुबड गाढव आहे. एवढेच नव्हे तर खेकडा, विंचू, घोरपड, शेळी ही देखील काही देवतांची वाहने आहेत.
- डॉ. सतीश पांडे
..........
देवतांची काही वाहने
तारिणी देवी - बदक
रुद्रकाली देवी - कावळा
भाल्लुका- अस्वल
योगिनी गौरी - घोरपड
भ्रामरंबा - कीटक
इक्षुमती - मगर
योगिनी कारकरी - खेकडा
योगिनी जलकामिनी - बेडूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जामीन मिळूनही वकिलाला अटक

$
0
0

पोलिसांच्या कृत्याचा वकिलांकडून निषेध; शिवाजीनगर कोर्टात गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अटकपूर्व जामीन मंजूर होऊनही वकिलाला अटक केल्याप्रकरणी शिवाजीनगर कोर्टातील वकिलांनी शुक्रवारी गोंधळ घालून या प्रकाराचा तीव्र निषेध केला. संबंधित वकिलास बेकायदा अटक करण्यात आल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकरणी कोर्टाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
पौड पोलिसांनी अॅड. आकाश मारणे यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी अॅड. विपुल दु​शिंग यांच्यामार्फत कोर्टात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात अॅड. मारणेला कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
पौड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांनी मारणे यांच्या वडिलांना पोलिस स्टेशनला बोलावून मारहाण केली. मारणेला पोलिस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आले. त्याने पोलिसांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली. तरी तो हजर झाल्याशिवाय वडिलांना सोडणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आपण स्वतः पौड पोलिसांना फोन करून त्याला अटकपूर्व जामीन कोर्टाकडून मंजूर झाला होता, असे सांगितल्याची माहिती अॅड. दुशिंग यांनी दिली. पोलिसांना माहिती देऊनही मारणेला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले.
कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर असतानाही वकिलाला अटक केल्यामुळे शिवाजीनगर कोर्टातील वकील संतप्त झाले होते. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण ते करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. गिरीश शेडगे, अॅड. एन. डी. पाटील, अॅड. मिलिंद पवार आदी वरिष्ठ ​विधिज्ञांनी संरक्षण देऊन मोरे यांना कोर्टात जाऊ दिले. कोर्टात मारणेतर्फे अर्ज दाखल करण्यात आला. त्याला बेकायदा अटक करण्यात आली असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्रावर कोर्टातील १५० हून अधिक वकिलांच्या सह्या आहेत, अशी माहिती अॅड. दुशिंग यांनी दिली.
..
पोलिस उपअधीक्षकांना नोटीस
कोर्टाने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिस उपअधीक्षकांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणात मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे, असे अॅड. दुशिंग यांनी सांगितले.
..
कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला असेल आणि त्याची माहिती संबंधित अर्जदाराच्या वकिलाने लेखी स्वरुपात किंवा एसएमएसद्वारे पोलिसांना कळविली असेल तर, संबंधिताला अटक करता येत नाही. त्याला अटक केल्यास तो कोर्टाचा अवमान ठरतो.
अॅड. हर्षद निंबाळकर, ज्येष्ठ विधिज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-व्होटिंग’ पद्धतीची चाचपणी

$
0
0

प्रायोगिक तत्त्वावर शहरात कामाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मतदानासाठी लागलेल्या लांबलचक रांगा, उन्हातान्हात करावी लागणारी प्रतीक्षा, मतदान केंद्रातील असुविधा यामुळे मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्याना मतदारांना लवकरच 'ई-व्होटिंग' आणि ई-बॅलेट'ची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सोय उपलब्ध देण्याची योजना असून, प्रायोगिक तत्त्वावरील कामास शहरात सुरुवात झाली आहे.
कागदी मतपत्रिकांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रापर्यंतचा (इव्हीएम) निवडणुकीच्या कार्यपद्धतीतील बदल नागरिकांनी अनुभवला आहे. आता त्यामध्ये आणखी क्रांतिकारक बदल घडवून घरबसल्या 'ई- व्होटिंग'च्या माध्यमातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सरसावले आहे. ई-व्होटिंगचे काम अन्य राज्यांत सुरू करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आदेश देण्यात आले आहेत.
या दोन्ही अत्याधुनिक मतदान प्रक्रियांचे प्रायोगिक तत्त्वावरील काम पुण्यात निवडणूक शाखेमार्फत हाती घेण्यात आले आहे. त्याची चाचणीही घेण्यात आली असून, या संदर्भातील प्रात्यक्षिक आगमा काळात आयोगासमोर करण्यात येणार आहे. या सुविधेचा प्रारंभ ई-बॅलेटने केला जाण्याची शक्यता आहे. राज्यात सद्यस्थितीत १० ते १५ टक्के मतदार घरगुती अडचण, सरकारी नोकरी, लष्करीसेवा यामुळे टपाली मतदान (पोस्टल बॅलेट) करतात. हे पोस्टल बॅलेट तयार करण्यापासून त्याचे वितरण आणि प्रत्यक्ष मतपत्रिका जमा करणे आणि मतमोजणीच्या वेळी मतपत्रिकांची मोजणी करण्यात कर्मचाऱ्यांवर खूपच ताण येतो. हा त्रास कमी करून मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ई-बॅलेट सुविधा देण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.
..
आगामी निवडणुकीत नवे तंत्रज्ञान
पुण्यातील ई-बॅलेटचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो तो राज्यभर राबविण्यात येणार आहे. ई-बॅलेटचा प्रयोग यशस्वी झाल्यावर ई-व्होटिंगची सुविधा देण्याचा आयोगाचा विचार आहे. या दोन्ही सुविधा साधारणतः तीन वर्षांत म्हणजे २०१९मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत देण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्त पुण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ई-कचरा आहे समस्या मोठी, गोष्ट नाही तितकीशी सोपी', 'संपवा प्लास्टिकला, वाचवा पृथ्वीला' 'करूया पुणे प्लास्टिकमुक्त, प्रदूषणापासून मुक्त' आदी घोषणांचे फलक हाती घेऊन शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी 'प्लास्टिकमुक्त पुणे'चा जागर केला. ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढून विद्यार्थ्यांनी पुणेकरांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थितांना ई-कचरा आणि प्लास्टिकमुक्त परिसर राखण्याची शपथही घेतली.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या 'सामाजिक रक्षाबंधन' या संकल्पनेअंतर्गत 'ई-कचरा आणि प्लास्टिकमुक्त परिसर अभियान' या उपक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. २८ ऑगस्टपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
शनिवारवाड्यावर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसर प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेतली. या वेळी महापौर प्रशांत जगताप, आमदार माधुरी मिसाळ, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा विभागाचे संघचालक किशोर शशितल, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, लायन्स क्लबचे हसमुख मेहता, नगरसेवक दिलीप काळोखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात 'लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम'तर्फे घोषवाक्ये आणि स्वच्छता प्रतिज्ञेचा फलक मेहता यांच्या हस्ते मुख्याध्यापिका आशा रावत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.नूमवि प्रशालेच्या पालक-शिक्षक संघातर्फे शाळांना कचरापेटी आणि झाडू देण्यात आले. आकाश कुलकर्णी, श्रेयस पाटील आणि ऐश्वर्या राव या विद्यार्थ्यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
जैन म्हणाले, 'भविष्याचा विचार करून आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही अभियानाचे आयोजन केले आहे. आतापर्यंत १ लाख घरांमध्ये जनजागृती केली असून, पुढेही या अभियानाद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकसेवा’च्या खातेदारांना एक लाख रुपये मिळणार

$
0
0

येत्या एक सप्टेंबरपासून वाटपाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकसेवा सहकारी बँकेच्या सर्व प्रकारच्या खातेदारांसाठी रक्कम काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून रकमेच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. बँकेच्या प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
लोकसेवा बँकेवर रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १९ मे २०१४ रोजी आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर बँकेच्या सर्व प्रकारच्या खातेदारांना केवळ एक हजार रुपयांची रक्कम फक्त एकदाच काढण्याची मुभा देण्यात आली होती. २१ मार्च रोजी नवीन प्रशासकीय मंडळ आल्यानंतर एक जुलै २०१६पासून 'आरबीआय'च्या परवानगीने ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत तीन हजार ३०० खातेदारांना सुमारे नऊ कोटी १८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. खातेदारांना रक्कम काढण्याची मर्यादा आतापर्यंत ५० हजार रुपये होती. ती आता वाढवून एक लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. या रकमेचे वाटप १ सप्टेंबरपासून केले जाणार असल्याचे अनास्कर यांनी स्पष्ट केले.
बँकेने यापूर्वी अडचणीतील असलेल्या एक हजार ४२६ ठेवीदारांना 'आरबी​आय'च्या परवानगीने एक लाख रुपयांचे वाटप केले. आता ही सवलत सर्व खातेदारांना मिळणार आहे. बँकेचे १५ हजार ५५५ ठेवीदार असून, त्यापैकी १३ हजार २३० खातेदारांच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. त्यांना सर्व रक्कम मिळू शकणार असल्याचेही अनास्कर म्हणाले. 'ठेवीदारांना रक्कम मिळण्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज सकाळी ११ ते दुपारी दोन या कालावधीत स्वीकारले जातील. दुपारी तीन ते सहा या कालावधीत चेकचे वाटप करण्यात येईल,' असे त्यांनी नमूद केले. लोकसेवा बँकेचे दुसऱ्या सक्षम बँकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेनकोट खरेदीच्या चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या घनकचरा विभागातील 'स्वच्छ' संस्थेसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या रेनकोट आणि रेनसूटच्या लॅब टेस्टिंगचा अहवाल बदलला आहे. त्यामुळे पालिकेची ८९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याने या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली.
'स्वच्छ' संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट आणि रेनसूट खरेदी करण्यासाठी पालिकेने टेंडर मागविले होते. या टेंडर प्रक्रियेद्वारे आलेले रेनकोट आणि रेनसूट पालिका प्रशासनाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यामध्ये मध्यवर्ती कोठी कार्यालयात २१ जुलै २०१६ मध्ये पारा लॅबकडून आलेल्या अहवालामध्ये ब्रेकिंग स्ट्रेन्थमध्ये वेफ्ट अवघे २१ केजीएफ असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे प्रमाण किमान ४० केजीएफ असणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कंत्राटदाराने खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर अहवाल सादरीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २२ जुलै २०१६ रोजीच्या अहवालात पालिकेची दिशाभूल करून हेच प्रमाण ४१ केजीएफ असल्याचे दाखविण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ही टेंडर प्रक्रिया रद्द करून संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सुपूर्द केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा फोटो पडला महागात

$
0
0

तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोणत्याही व्यक्तीचा विनापरवानगी फोटो काढणे हे कृत्य गुन्ह्यात मोडते. असा प्रकार केल्यास शिक्षाही होऊ शकते. सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने अशाप्रकारचे फोटो काढण्याची लाटच आली आहे. हाती मोबाइल असल्याने आपण कोणाचाही, कधीही फोटो काढू शकतो अशा अविभार्वात असणाऱ्या तरुणाला नुकतीच कोर्टाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पीडित तरुणी भावाबरोबर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी जवळून जाणाऱ्या तरुणाने मुलीचा फोटो काढला. गणेश मारुती पारखे (वय २५, रा. कात्रज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संबं​धित मुलीने फिर्याद दिली होती. १४ जून २०१४ रोजी ही घटना घडली. या केसचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी या केसमध्ये चार साक्षीदार तपासले.

फिर्यादीचा फोटो काढताना पारखे याला रंगेहाथ पकडलेल्या व्यक्तीची साक्ष या प्रकरणी महत्त्वाची ठरली. फिर्यादी कात्रज परिसरात राहावयास आहे. पारखे हा नेहमी फिर्यादीला त्रास देत असे; तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करीत असे. घटनेच्या दिवशी फिर्यादी भावासोबत बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी पारखे तिचा फोटो काढत होता. हे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाच्या लक्षात आले. त्याने पारखेला रंगेहाथ पकडले आणि त्याचा मोबाइल काढून घेतला. त्यानंतर पोलिसांना बोलावून पारखेला त्यांच्या देण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये फिर्यादी मुलीचे फोटो आढळले. या प्रकरणी कोर्टाने विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधासाठी सरसावले आजी- माजी नगरसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी 'वॉटर मीटर' बसवणे हा एकमेव उपाय नसून, महापालिकेने आधी पाण्याची गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी शुक्रवारी केली. तसेच, महापालिका आयुक्त अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाण्याची गळती पूर्णपणे रोखल्यानंतर मगच मीटरची अंमलबजावणी करावी, असे पत्र स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, श्याम मानकर, बाळासाहेब मारणे आणि नगरसेवक संजय बालगुडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत वॉटर मीटर बसवण्यासाठी पालिका आयुक्त आग्रही असून, पाचशे कोटी रुपयांहून अधिकच्या योजनेचे टेंडर काढण्यात आले आहे. योजनेसाठी अद्याप केंद्र-राज्याकडून अनुदान किंवा अर्थसाह्य उपलब्ध न झाल्यामुळे खर्चाचा संपूर्ण भार पालिकेवरच पडणार आहे. त्यामुळे, या योजनेला विरोध केला जात असून, काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनीही मीटरची योजना व्यवहार्य नसल्याची टीका केली आहे.
मीटरची योजना कार्यान्वित झाल्यावर पाणीगळती कशी थांबणार, याचा खुलासा आयुक्तांनी करावा असे मंत्री यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, एखाद्या योजनेसाठी आग्रह करताना, आयुक्तांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात असून, शहराच्या हितासाठीच्या योजना राबवा अशी विनंती त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यासाठी द्या १३०० एमएलडी पाणी

$
0
0

महापौर प्रशांत जगताप यांची 'पाटबंधारे'कडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराला पाणीपुरवठा करणारी तीन धरणे काठोकाठ भरली आहेत. या पार्श्वभूमीवर गळती सुरू असूनही टेमघर धरण सुमारे ९० टक्के भरल्याने पुणेकरांना पूर्वीप्रमाणेच दोनवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी १३०० एमएलडी पाणी देण्याची मागणी शहराचे प्रथम नागरिक महापौर प्रशांत जगताप यांनीही शुक्रवारी केली. शहराच्या अनेक भागांत सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असून, दैनंदिन स्वरूपात १३०० एमएलडी पाणी मिळाल्यास, पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल असा दावा त्यांनी केला.
शहरातील धरणांत पुरेसा पाणीसाठा झाल्याने सुमारे ११ महिन्यांनंतर शहराची पाणीकपात मागे घेण्यात आली. त्यावेळी उजनीमध्ये ६० टक्के साठी झाल्यानंतर पाणीपुरवठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे पालकमंत्री ​गिरीश बापट यांनी स्पष्ट केले होते. शहराला पाणीपुरवठा करणारी तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, टेमघरमध्येही ८८ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे, पुणेकरांसाठी आवश्यक असलेले तेराशे एमएलडी पाणी देण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाला करण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली. सध्या महापालिकेला दररोज १२०० एमएलडी पाणी मिळत आहे.
शहराच्या पूर्व भागामध्ये सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असून, नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. महापालिकेला पूर्वीप्रमाणे १३०० एमएलडी पाणी मिळाले, तर पूर्व भागांतील नागरिकांची समस्या दूर होऊ शकेल. धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता, शहरासाठी आवश्यक जादा पाणी तातडीने दिले जावे, असे पत्रच महापौरांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवले आहे.
..............
'टेमघर'बाबत तातडीची बैठक
टेमघर धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने हे संपूर्ण धरण रिकामे करण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाकडून सुरू आहेत. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करून आगामी काळातील नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात पाटबंधारे विभागासोबत तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. टेमघर धरणांतून पाणी सोडायचे झाल्यास पुन्हा महापालिका आणि पाटबंधारे विभागात वाद होऊ नयेत, यासाठी वेळीच निर्णय घेण्याची गरज असल्याचे महापौरांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा डाव

$
0
0

मनसे स्टाइलने आंदोलनाचा आयुक्तांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा महापालिका आयुक्तांचा डाव असून, त्यांच्या या हुकूमशाही विरोधात मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यापूर्वीच आयुक्त घरोघरी मीटर लावून, उलट्या दिशेने प्रवास करत असल्याची टीका मनसेने केली.
शहरात घरोघरी वॉटर मीटर बसविण्यात येणार असून, सुमारे सव्वातीन लाख मीटर मोफत वाटण्यात येणार आहेत. त्यासाठी, पालिकेवर सुमारे पाचशे कोटी रुपयांहून अधिक भुर्दंड पडणार आहे. वॉटर मीटरचा घाट केवळ खासगी कंपन्यांच्या हितासाठी घातला जात असून, त्यातून पुणेकरांवरचा बोजा वाढणार असल्याची टीका शिंदे यांनी केली. स्मार्ट सिटीपाठोपाठ मीटरबाबतही आयुक्त मनमानी पद्धतीने कारभार करत असून, कोणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
'महापालिकेच्या कर्तव्यांमध्ये पाणीपुरवठा हे मूलभूत सेवा असली, तरी आता त्याच्याही खासगीकरणासाठी आटापिटा सुरू असून, पाणी मीटरमुळे पुणेकरांना वेठीस धरले जाणार आहे. मीटरबाबत हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जाणार असतील, तर मनसे स्टाइलने त्यांची ही पद्धत मोडून काढण्यात येईल,' असा इशाराही शिंदे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images