Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिवस आगींचा

$
0
0

नानापेठेत तीन दुकाने; सदाशिव पेठेत झोपड्या जळाल्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात आग लागण्याचे सत्र सुरूच असून, सोमवारी दोन ठिकाणी लागलेल्या आगीत तीन दुकाने आणि तीन झोपड्या जळून खाक झाल्या. नाना पेठेतील अशोक चौक येथे शॉटसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक झाली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सदाशिव पेठेत रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये विजेच्या खांबावर शॉटसर्किट होऊन आग लागल्यामुळे तीन झोपड्या जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी झोपड्यांमधील सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या दोन्ही घटनांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
नानापेठेतील अशोक चौक येथील जय भवानी स्टोअर्स या दुकानाला पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर या ठिकाणीच पहाटे पाच वाजता पुन्हा आग भडकली. यामध्ये ओम टेडर्स आणि सुभाष भुवन हॉटेल जळून खाक झाले. अग्निशमन दलाने हॉटेलमधील सहा सिलिंडर बाहेर काढले. ही आग मोठी असल्याने मुख्य अग्निशमन केंद्रासह कसबा, नायडू केंद्रातून गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. केंद्र प्रमुख शिवाजी चव्हाण, विजय भिलारे, कैलास शेंडे, प्रकाश कांबळे, चोरगे, मिळवणे, जोंधळे यांनी ही आगी आटोक्यात आणली.
सदाशिव पेठेत नीलायम थिएटरच्या शेजारी असलेल्या रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये विजेच्या खांबावर शॉटसर्किट झाले. त्याची ठिगणी झोपडीवरील पालापाचोळ्यावर पडल्याने आग भडकली. बाबासाहेब मोरे, अल्का चव्हाण, अमोल अडसूळ यांच्या झोपड्यापूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीत त्यांचे संसारोपयोगी साहित्यही नष्ट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या झोपड्यांमधील तीन सिलिंडर बाहेर काढले. या आगीमध्ये आणखी तीन झोपड्यांना झळ बसली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांमुळे होतोय कोट्यवधीचा तोटा

$
0
0

बिल्डरांच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याचा काँग्रेसचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांवर केल्या जाणाऱ्या जाहिरातीतून पालिकेला मिळणाऱ्या शुल्काला महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे चाप लागला असून, त्यातून पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. स्थायी समितीला विश्वासात न घेता, बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी केला.

शहराच्या विविध भागांत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्यासंबंधीची जाहिरात व्यावसायिकांकडून केली जाते. या जाहिरातीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने त्याचे शुल्क आकारले जावे, अशी भूमिका प्रशासनातर्फे घेण्यात आली. त्यानुसार, एका जाहिरात फलकाचे शुल्क वगळता इतर फलकांसाठी पालिकेने क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आकारणी सुरू केली. त्यातून, दरवर्षी सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा व्हायचे. मात्र, हे शुल्क रद्द करण्याची मागणी 'क्रेडाई'ने केल्यानंतर त्यावर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन तडकाफडकी बांधकाम व्यावसायिकांना जाहिरात शुल्कातून सूट देण्यात आल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. अशाप्रकारे बांधकाम व्यावसायिकांना जाहिरातीतून सूट दिल्यास, पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते, या अतिरिक्त आयुक्तांच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात सर्व शुल्क माफ करण्याचा निर्णय कसा घेतला, अशी विचारणा शिंदे यांनी केली.
महापालिकेच्या आर्थिक विषयांबाबतचा कोणताही निर्णय घेताना, त्याची माहिती स्थायी समितीला देणे अपेक्षित असताना, आयुक्तांनी स्थायी समितीला बगल देत परस्पर हा निर्णय घेतल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पद्धतीने शुल्क आकारणी केली जात असताना, विधी विभागाच्या संदिग्ध अभिप्रायामुळे आयुक्तांनी परस्पर निर्णय घेत, पालिकेऐवजी बांधकाम व्यावसायिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपद अळवावरच्या पाण्यासारखे

$
0
0

पाणीप्रश्नावरून पालकमंत्र्यांनी उडवली पुणेकरांची खिल्ली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नगरसेवक, आमदार, मंत्री ही सर्व पदे अळवावरच्या पाण्यासारखी असतात. पद असले तरी राजकारण्यांनी सामान्य माणसासारखे वागावे आणि आपले काम करत राहावे. आपण धडधाकट असलो तरी, पाण्याला घाबरतो. पुण्यात तर आता पाणी येत नाही, तरी पुणेकर पाण्याच्या कडेने जातात,' अशा मार्मिक शैलीत पालकमंत्री गिरीश बापट यांनी खिल्ली उडवली.

शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'शाहू मोडक स्मृती पुरस्कारां'चे वितरण सोमवारी झाले. त्यावेळी बापट बोलत होते. शाहू मोडक पुरस्कार बालकलाकार पार्थ भालेराव, बालगायिका शरयू दाते यांना प्रदान करण्यात आला. जलतरणपटू अथर्व मारणे यास जिद्द पुरस्कार तर, पं. सुधीर दाते यांना ज्योतिष पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक आदी या वेळी उपस्थित होते. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

'सामान्य माणूस आयुष्यात खूप रडतो. गाडी, बंगला, कपडे यासाठी माणसे रडतात. समाजात नकारात्मक चर्चा खूप होते. काय चाललय, असा एकंदरीत सूर असतो, पण त्याचवेळी काही माणसे सकारात्मक काम करून दाखवतात,' अशी टिप्पणी बापट यांनी केली. 'चांगली भूमिका सादर करणे हा अभ्यास व अनुभव असतो. अभिनय कौशल्यापलीकडे सजग माणूस कसा असावा हे शाहू मोडकांच्या अभिनयामुळे व व्यक्तिमत्वामुळे कळते,' अशी भावना खेडेकर यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

'भविष्य हे थोतांड नाही'

'भविष्य हे थोतांड नाही. योग्य व्यक्ती भेटली तर भविष्य सत्य ठरते. ज्या लोकांमध्ये प्रेरणा आणि करूणा असते, त्यांना डोक्यावर घेतले पाहिजे. अशाच लोकांमुळे समाजात आदर्श काम निर्माण होते,' याकडे लक्ष वेधून डॉ. पी.डी. पाटील यांनी भविष्याचे समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याचे पाणी कशासाठी वापरले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाची छाया गडद झाल्यानंतर दौंड-इंदापूरसाठी तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत; त्यावेळी सोडण्यात आलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या कारणांसाठी झाला, याचे उत्तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी द्यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. वर्षभरात तीन टीएमसी पाणी वाचविणाऱ्या पुणेकरांवर पाणीकपात लादता, मग पाच टीएमसीहून अधिक पाण्याचा अपव्यय करणाऱ्या दौंड-इंदापूरकरांना जाब कधी विचारणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाण्यात आणखी कपात करण्याचे संकेत पालकमंत्री बापट यांनी दिले होते. तेव्हापासून, सर्व राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनी बापट यांच्यावर टीका करताना, पुण्याच्या पाण्यात कपात करू नये, अशी मागणी लावून धरली आहे. सजग नागरिक मंचाने रविवारी पालकमंत्र्यांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली असतानाच, सोमवारी पुन्हा एकदा ग्रामीण भागांत सोडण्यात आलेल्या पाण्याविषयी अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

दौंडच्या पिण्याच्या तलावाची क्षमता ०.०४५ टीएमसी असताना, त्याच्या दसपट म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी का केली जात आहे, दौंडच्या तलावात आजमितीस किती पाणी आहे अन् ते किती दिवस पुरेल, पुढील दोन महिन्यांसाठी ०.०३ टीएमसी पाणी लागेल, अशी शक्यता असताना, हे पाणी रेल्वेदारे नेता येईल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गरज कुशल मनुष्यबळाची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करू शकणाऱ्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरण तयार कऱण्याची आवश्यकता आहे,' असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष (यूजीसी) प्रा. डॉ. वेद प्रकाश यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापनदिनानिमित्ताने जीवनसाधना गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी. पाटील, समाजवादी नेते भाई वैद्य, साहित्यिक द. ता. भोसले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर आणि विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, ५१ हजार रुपये असे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम होते. कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
'पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, उस्मानाबाद यासारख्या अनेक ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करू शकणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आजच्या विद्यार्थ्यांमधून निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून टेक्नोक्राफ्ट, वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. सध्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरणाची गरज आहे. त्यासाठी चांगल्या कार्यक्रम निर्मितीची आवश्यकता असून शिक्षकांनी संशोधनावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना रोजगार देणारे शिक्षण मिळाले पाहिजे,' असे मत यूसीजीचे अध्यक्ष वेद प्रकाश यांनी व्यक्त केले.
'उच्च शिक्षणासंदर्भात विद्यापीठांपुढे मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. ती आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठांनी स्वतःला सक्षम करण्याची गरज आहे,' असेही ते म्हणाले. पुरस्काराला उत्तर देताना भाई वैद्य यांनी भारत माता की जयचा मुद्दा उपस्थित करून चिंता व्यक्त केली.
सरकारी शाळा कॉलेजमधून दिले जाणाऱ्या शिक्षणाचे शुल्क वाढल्याने सुविधा कमी दिल्या जात असल्याने त्याचा फटका बहुजन विद्यार्थ्यांना बसत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उद्योग धोरण राबविणे गरजेचे असताना सरकार कंपन्यांना पायघड्या घालत असल्याने वैद्य यांनी त्याबाबत खंत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिलाहारकालीन नृसिंहमूर्तीवर वज्रलेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिलाहार राजघराण्याच्या काळातील शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असणारी कोकणातील नृसिंहांची मूर्ती मूळ रूपामध्ये भाविकांसमोर येणार आहे. सुमारे ८०० वर्षांच्या काळामध्ये पूजा आणि अन्य विधींमुळे या मूर्तीची झीज झाली होती. मात्र, वज्रलेपामुळे ही मूर्ती पूर्ववत होण्याची किमया साध्य झाली आहे.
चिपळूणपासून जवळच मावळण येथे हे नृसिंह मंदिर आहे. शिलाहार राजघराण्यातील विजयार्क या राजाने ११९०मध्ये या मंदिराची उभारणी केली आणि त्याचा मुलगा भोज याने या मंदिराचे काम पूर्ण केले. या घराण्याची सत्ता कोकणपट्ट्यात असल्यामुळे, मावळणकर, देसाई, गोविलकर, लळित अशा अनेक घराण्यांची ही कुलदेवता आहे. झीज भरून काढत, ही मूर्ती पूर्ववत करण्याचे आव्हान पुण्यातील शिल्पकार अशोक ताम्हणकर यांनी पेलले असून, त्यांनी केलेल्या वज्रलेपामुळे शिलाहार काळातील सर्व वैशिष्ट्ये स्पष्ट दिसत आहेत. 'ही देवता, त्या काळातील शिल्पकलेची वैशिष्ट्ये आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास या तिन्ही गोष्टींचा बारकाईने विचार केल्यानंतरच, वज्रलेपाच्या कामाला सुरुवात करावी लागते. या संशोधनातून मूर्तीचे अनेक बारकावे लक्षात येतात,' असे त्यांनी सांगितले. या मूर्तीच्या मागील बाजूला साडेतीन वेटोळ्यांचा शेष आहे. असा शेष मागे असल्यास मूर्तीची कुंडलिनी जागृत असल्याचे मानले जाते. तसेच, या कामानंतर मूर्तीच्या भोवती असणाऱ्या दशावताराच्या प्रतिमाही स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. माळवन येथे २० मे रोजी नृसिंह जन्मोत्सव होत असून, या उत्सवात नृसिंह मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे ‘राष्ट्रवादी’ शहराध्यक्ष पुढील आठवड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा शहराध्यक्ष बदलण्याचे वेध आता राष्ट्रवादी काँग्रेसला लागले आहेत. यासाठी येत्या २ मे ला पक्षाने बैठकही बोलाविली आहे. शहराध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली असून पाच इच्छुकांची नावेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेली आहेत.
राष्ट्रवादीच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना बदलण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे शहरातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांतर्फे केली जात आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सह्यांची निवेदने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांना दिली आहेत. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी शिवसेना, काँग्रेस यासह भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षांमध्ये बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीनेही नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती.
पक्षाच्या शहराध्यक्ष चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या आठवड्यात माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. त्या वेळी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत येत्या दोन मे रोजी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत शहराध्यक्ष तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत चर्चा होणार असल्याचे शहराध्यक्षा चव्हाण यांनी‌ पत्रकारद्वारे कळविले आहे. शहराध्यक्षपदी आपली निवड व्हावी, यासाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी शहराध्यक्षपद महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये सक्षम असणारी तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर पकड असलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे.

या नावांची चर्चा

या पदासाठी आमदार अनिल भोसले, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले दीपक मानकर, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, यांच्यासह माजी उपमहपौर दिलीप बराटे, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पा रेणुसे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

सभागृह नेतेपद बदलणार?

शहराध्यक्षाबरोबरच अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड या बैठकीत होणार आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीबरोबरच पालिकेतील 'सभागृह नेते' पद बदलण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या एकाला या पदावरही संधी देऊन खूश करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होऊ शकतो. या माहितीला पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानेही दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यातील ३५ सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या विक्रीत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करा,' अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. या कारखान्यांचे बाजारभावानुसार सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे मूल्य असताना, अवघ्या एक हजार कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. त्यापैकी एक कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विकत घेतला असून, त्यांच्याप्रमाणे 'अनेक भुजबळां'नी हे कारखाने घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'आघाडी सरकारच्या काळात या कारखान्यांची विक्री करण्यात आली. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. 'ईडी'ने केलेल्या तपासात भुजबळ यांनी एक कारखाना कवडीमोल भावात विकत घेतल्याचे निदर्शनास आले आहे. हे कारखाने कोणी विकत घेतले, विकत घेणाऱ्या खासगी कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत आणि त्यामध्ये भागधारक कोण आहेत, ही माहिती लोकांना समजली पाहिजे. कारखाने उभारताना शेतकऱ्यांनी पैसे भरले होते. त्यांची ही रक्कम बुडाली आहे. हे कारखाने 'अनेक भुजबळां'नी विकत घेतले असून ते समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे,' असे खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 'विक्री करण्यात आलेले कारखाने आणि ते कोणी घेतले याची यादी दिली आहे. याबाबत सरकारने तातडीने पाऊले उचलली नाहीत, तर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.' असेही खोत म्हणाले.
'शेतकऱ्यांची कर्जातून कायमची मुक्ती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 'किसान ऋण मुक्ती अभियान' राबविणार आहे. हे अभियान पुढील महिन्यापासून राज्यात राबवण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड करणे पुढील पाच वर्षे स्थगित करावे. पाच वर्षांनंतर दिलेल्या कर्जावरील व्याज माफ करून मुद्दल पुढील १० वर्षांमध्ये फेडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आहे.' असे खोत म्हणाले. 'साखर कारखान्यांनी एक मेपर्यंत शेतकऱ्यांना २० टक्के एफआरपी द्यावी. सद्यस्थितीत कारखान्यांना सुमारे तीन हजार कोटी रूपये 'एफआरपी' द्यायची आहे. कारखान्यांकडे सुमारे २२ हजार कोटी रूपयांची साखर आहे. कारखान्यांना पैसे द्यायला जमत नसेल तर कारखान्यांनी तेवढ्या रकमेची साखर शेतकऱ्यांना द्यावी,' अशी मागणी खोत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारशे गुंडांना केले दोन वर्षांत तडीपार

$
0
0

सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिसांचा कारवाई धडाका Shrikrishna.Kolhe@timesgroup.com पुणे : गेल्या दोन वर्षांत पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुंडांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांत तब्बल चारशेपेक्षा जास्त गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही गुन्हेगारी टोळ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक तडीपीराची कारवाई परिमंडळ एक आणि परिमंडळ चारमधील गुंडावर करण्यात आली आहे. पुणे शहरात झोपडपट्टी परिसर आणि टोळ्यांचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी सराईत गुंडाकडून मारामारी, हप्ता वसुली , विनाकारण नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडत होते. तसेच, या गुंडामुळे संबंधीत परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात येत होती. त्यामुळे पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव संबंधित पोलिस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार गुन्हेगाराच्या रेकॉर्डची पडताळणी केल्यानंतर सव्वा दोन वर्षांत चारशेपेक्षा जास्त गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये पुणे शहरातून तब्बल २०८ गुंडांना तडीपार करण्यात आले होते. त्यामध्ये झोन एकमधून ६६, झोन दोनमधून ५५, झोन तीनमधून २६ आणि झोनचार मधून ६१ गुंडाना तडीपार करण्यात आले होते. तर, २०१५ मध्ये १६७ गुंडावर तडीपारी कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०१६ अखेरपर्यंत ३३ गुंडाना तडीपार करण्यात आले असून पन्नासपेक्षा जास्त गुंडांचे प्रस्ताव तडीपारीसाठी प्रलंबित आहेत. सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केल्यामुळे संबंधित भागात शांतता राखण्यात पोलिसांना मदत होत आहे. मात्र, तडीपार केल्यानंतरही अनेक गुंड शहरात आढळून येतात. त्यांच्यावर तडीपारीची केलेली कारवाई नावापुरतीच असल्याचे अनेक वेळा दिसून येते. त्यामुळे गुंडाकडून पुन्हा परिसरात दहशत निर्माण केली जाते. तडीपारीची कारवाई केल्यानंतर पोलिसांकडून त्या गुन्हेगाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की काही वेळेला तडीपार गुंड शहरात असल्याचे प्रकार दिसून आले आहे. मात्र, तडीपार गुंड तडीपारीच्या काळात शहरात दिसणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून झोपडपट्टी परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची तपासणी केली जाते. त्यामध्ये काही वेळेला तडीपार गुंड आढळून आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. अधून-मधून ही कारवाई सुरू असते. तसेच, तडीपार गुंडाची यादीवरून त्यांची तपासणी करण्यात येते.

चौदा टोळ्यांवर कारवाई गेल्या सव्वा दोन वर्षांत पुणे शहरात चौदा टोळ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या चौदा टोळ्यांमध्ये ७६ गुंडाचा समावेश आहे. वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिसांनी प्रत्येकी चार टोळ्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तर, सहकारनगर पोलिसांनी दोन टोळ्यांवर तडीपारीची कारवाई केल्याचे दिसून आले आहे. कुख्यात गजा मारणे टोळीवर कोथरूड पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती, पण ती कारवाई मंत्रालयातून रद्द करण्यात आली होती.

तडीपार झालेले गुंड वर्षे झोन १ झोन २ झोन ३ झोन ४ २०१४ ६६ ५५ २६ ६१ २०१५ ६१ ३० ४१ ३५ २०१६ १५ ०३ ०७ ०८ (मार्च अखेर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाच्या खर्चाचा अहवाल द्यावाच लागेल

$
0
0

साहित्य महामंडळाची ठाम भूमिका म. टा. प्रतिनिधी, पुणे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेने देणे बंधनकारक असून पिंपरी येथील साहित्य संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने संमेलनाच्या खर्चाचा अहवाल महामंडळाला द्यावाच लागेल, अशी ठाम भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतली आहे. २५ लाखाचा नव्हे तर संमेलनाचा एकूण खर्च मागवण्यात आला असून तो एका महिन्यात सादर करणे बंधनकारक असल्याचे महामंडळाकडून ठणकावून सांगण्यात आले आहे. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडे होता. महामंडळाने संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांच्याकडे खर्चाची विचारणा केली आहे. त्यावर 'कोणाकडूनही एका रुपयाचे अनुदान घेतलेले नाही. सरकारचे २५ लाख रुपये संमेलनाच्या समारोपावेळी महामंडळास परत दिले आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाला हिशेब देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे पैसे वापरलेच नाहीत, तर हिशेब कशाचा देणार' अशी भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या आयोजनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेने देणे बंधनकारक असल्याचे साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी मंगळवारी 'मटा'शी बोलताना ठणकावून सांगितले. 'महामंडळाने शासनाचा पंचवीस लाखाचा हिशेब मागितला नसून एकूण आयोजनाचा खर्च मागितला आहे. हा खर्च देणे आयोजक संस्थेला बंधनकारक आहे. संमेलनाच्या खर्चाचा अहवाल एका महिन्यात देणे बंधनकारक असताना विद्यापीठाने तो दिलेला नाही', याकडे पायगुडे यांनी लक्ष वेधले. '२५ लाखाचा हिशेब राज्य साहित्य व संस्कृती मंडळाला पर्यायाने शासनाला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे संमेलनाच्या एकूण खर्चाचा हिशेब महामंडळाच्या माहितीसाठी दफ्तरी नोंद करून घ्यावा लागतो. माहितीच्या अधिकारात खर्चाच्या माहितीची कोणी मागणी केल्यास ती माहिती देणे आवश्यक असल्याने संस्थेकडे ही माहिती नोंद असणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या सर्व आयोजक संस्थांनी खर्चाचा अहवाल दिला आहे. विद्यापीठाने कोणाची मदत घेतली किंवा ते संमेलन स्वबळावर आयोजित केले हा महामंडळाचा प्रश्न नाही. साहित्य संमेलन महामंडळाचे असते व ते आयोजित करण्यासाठी संस्थेला दिलेले असते, त्यामुळे खर्चाचा अहवाल महामंडळाकडे द्यावाच लागेल,' असे पायगुडे यांनी स्पष्ट केले.

पंचवीस लाख देणगीच 'सरकारचा संमेलनासाठी मिळालेला २५ लाखांचा निधी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी महामंडळाला सुपूर्द केला आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी सरकारचा निधी स्वीकारून तो दुसऱ्या धनादेशाच्या स्वरूपात परत केल्याने निधी हा त्यांनी महामंडळाला दिलेली देणगी या स्वरूपात नोंद करण्यात येईल. शासनाचा निधी स्वीकारल्याने संमेलनासाठी तो वापरण्यात आला, असा अहवाल शासनाला दिला जाईल. डॉ. पाटील यांनी देणगी दिली आहे आणि ते जर ती नाम फाउंडेशनला मदत म्हणून देण्यासाठी परत मागत असतील, तर याबाबत महामंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागेल', असे प्रकाश पायगुडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागांचा निर्णय पुन्हा लांबणीवर

$
0
0

चार सदस्यीयसाठी सरकार अनुकूल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग करायचा की चार सदस्यांचा याबाबत अजूनही सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये एकवाक्यता होत नसल्याने निर्णय पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. चार सदस्यीय प्रभागासाठी अनुकूलता अधिक असून, येणाऱ्या काळात त्यावरच शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपाठोपाठ पालिका निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजपतर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या दोन सदस्यांचा एक प्रभाग असला, तरी पालिकांमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी चार सदस्यांचा प्रभाग अधिक फायदेशीर ठरेल, असे आडाखे भाजप नेतृत्वाने बांधले आहेत. त्यादृष्टीने, निवडणुकांसाठी प्रभाग रचना निश्चित करताना, चार सदस्यांचा एक प्रभाग असावा, असा आग्रह धरला जात आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही त्याला छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, चार सदस्यीय प्रभागाचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी वदंता होती.
राज्यातील ज्या महापालिकांमध्ये सध्या भाजपची सत्ता नाही, अशा ठिकाणी दोन अथवा चार पैकी किती सदस्यांचा प्रभाग फायदेशीर ठरेल, याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने केली होती. त्यातून, नेमका कल स्पष्ट होण्याची शक्यता होती; पण विविध महापालिकांमधील परिस्थितीबाबत सादर झालेल्या अहवालामध्येच द्विसदस्यीय की चार सदस्यीय प्रभाग यामध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले. त्यामुळे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर त्वरेने निर्णय घेण्यापेक्षा तूर्तास काही दिवसांसाठी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचे ठरले. त्यामुळे, आयत्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याने तो मंत्रिमंडळापुढे मंगळवारी सादरच केला गेला नाही. पुढील काही दिवसांत त्याबाबत मतैक्य निर्माण करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे, आगामी पालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभागानेच होतील, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी पूर्ण होईपर्यंत‘मेपल’चे व्यवहार थांबवा

$
0
0

जिल्हाधिकारी सौरभ राव यांची सूचना म. टा. प्रतिनिधी, पुणे 'पाच लाख रूपयांत घर' अशी योजना जाहीर करून नोंदणीसाठी पैसे गोळा करणाऱ्या मेपल कंपनीची केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना आणि 'म्हाडा'कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी होईपर्यंत मेपलच्या बांधकाम प्रकल्पातील सर्व प्रकाराचे व्यवहार थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. मेपल कंपनीने १२ प्रकल्पांसाठी परवानगी घेतली आहे. त्यातील सहा प्रकल्पांना जिल्हाधिकारी कार्यालय, दोन प्रकल्पांना सातारा जिल्हाधिकारी व चार प्रकल्पांच्या बांधकाम नकाशांना पीएमआरडीएने मंजुरी दिली आहे. पाच लाख रुपयांत घर देण्याच्या योजनेमध्ये मेपल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या मालमत्तांची विक्री, तारण, गहाण खत करण्यास मनाई आदेश काढण्यात आले असल्याचे राव यांनी सांगितले. पाच लाख रूपयांत घर देण्याच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची परवानगी न घेता छायाचित्र वापरण्यात आले होते. मेपल कंपनीने दिशाभूल करणारी जाहिरात दिल्याने त्याची चौकशी पंतप्रधान आवास योजनेचे मिशन डायरेक्टर तसेच म्हाडाच्या दक्षता विभागाकडून सुरू आहे. महसूल खात्याशी संबंधित केलेल्या चौकशीमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचे दिसून आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी तलाठ्यांचे कामबंद

$
0
0

सात-बारा उतारे, फेरफार मिळण्यास अडचणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
तलाठी सजांची पुनर्रचना, ई-फेरफारच्या कम्प्युटर प्रणालीमधील दुरूस्ती, तलाठ्यांसाठी स्वतंत्र कार्यालये आणि गौण खनिज वसुलीतून तलाठ्यांची मुक्तता आदी मागण्यांसाठी राज्यभरातील तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंद आंदोलनामुळे फेरफार, सातबारा उतारे व दाखल्यांच्या कामांवर परिणाम झाला.
तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने महसूल मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये महसूल मंत्र्यांनी तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन उलटून एक वर्षे उलटले तरी, मागण्यांवर कोणताही विचार झाला नाही. या संदर्भात संघटनेने मागील आठवड्यात धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तथापी, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य तलाठी संघाचे हेमंत नाईकवाडी व सहचिटणीस संजय बडदे यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात सहभागील झालेल्या तलाठ्यांनी तलाठी कार्यालयांना सकाळी कुलूप ठोकले आणि त्याच्या चाव्या संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात जमा केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडल कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले. फेरफार उतारे, सातबारा तसेच दाखले घेण्यासाठी तलाठी कार्यालयांत आलेल्या नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली. तलाठी संघाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिले. दरम्यान, ऑनलाइन सातबारा कम्प्युटर प्रणालीमध्ये काही अडचणी आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. ती सोडविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्टेशन तयार करण्यात आले आहे. ज्या तलाठ्यांना कनेक्टिव्हीटी नसेल ते या ठिकाणी येऊन काम करू शकतील. त्याचबरोबर ५४ मंडल स्तरावर ब्रॉडबँन्ड देण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी राव यांनी शिष्टमंडळाला सांगितले. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याच्या समस्येसह रोजगार हमीची कामे आहेत. अशा स्थितीत तलाठ्यांनी संप करून नये असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना पिस्तुल दाखविणाऱ्या आरोपीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कोथरूड येथे पोलिसांना पिस्तुलाचा धाक दाखवत पळ काढणाऱ्या कारमधील दोघा संशयितांपैकी एकाला पकडण्यास पोलिसांना यश आले. या संशयिताचा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी अटक केलेला संशयित हा ठाण्याचा आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याने गुन्हाची कबुली दिलेली नाही. महमंद अस्लम अन्सारी (वय ५०, रा. भिवंडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या दुसऱ्या साथादीराचा शोध घेण्यात येत आहे. अन्सारीला पुण्यात आणल्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. कोथरूड येथे सोमवारी पहाटे एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार घडला होता. एक संशयित कार अडवण्याच्या प्रयत्नात कारमधील आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घातली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी कार रोखण्यासाठी गोळीबार केला होता. संशयितानी काही अंतर गेल्यानंतर कार सोडून पळ काढला होता. चोरट्यांनी वापरलेली कार ही ठाण्यातील असल्याचे उघडकीस आले होते. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांच्या पथकाने आरोपींच्या शोधासाठी ठाणे गाठले. तेथे त्यांना दोघा संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी शोधाअंती अस्लमला ताब्यात घेतले. त्याला घेऊन काही पोलिस मंगळवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले. कोथरूड पोलिस ठाण्यातील ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अस्लम आणि त्याच्या साथीदारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अस्लम पाहिल्यानंतर ओळखले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांना या कारमध्ये घरफोडीसाठी वापरण्यात येणारी काही हत्यारे मिळाली आहेत. या संशयितांकडून कार टेप चोरण्याचे गुन्हे करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रथमदर्शनी तरी अस्लमने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. त्याचा साथीदार ठाण्यातून गायब झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अस्लमवर पोलिस कोठडीत तपास केल्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होणार आहे. पोलिसांना कारमध्ये टोलची पावती मिळाली आहे. त्यानुसार ते तळेगाव येथील टोलनाक्यावर रात्री ११.५२ मिनिटांनी होते. पोलिसांनी या वेळेच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. कारमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या असून त्याआधारे एक्स्प्रेस-वेवरील हॉटेलमध्येही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर रोड बीआरटी उद्यापासून खुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोडवरील जलद बस वाहतूक मार्गातील (बीआरटी) सर्व अडथळे दूर झाले असून, उद्यापासून (२८ एप्रिल) या मार्गावर बस सेवा सुरू केली जाईल. वाघोली येथे पालिकेला उपलब्ध झालेल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनल उभारण्यात आले असून, १३९ बस या मार्गावर धावणार आहेत.
कात्रज ते हडपसर या मार्गावरील पथदर्शी बीआरटी प्रकल्प अयशस्वी ठरल्यानंतर पालिकेने संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) आणि नगर रोड बीआरटीसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यातील, आळंदी रोडचा बीआरटी मार्ग गेल्या वर्षी सप्टेंबरपासून कार्यान्वित झाला. टर्मिनलसाठी जागा मिळत नसल्याने नगर रोड बीआरटीला विलंब झाला होता. सरकारने वाघोलीची जागा पालिकेच्या ताब्यात देऊन हा प्रश्न सोडवल्याने गुरुवारी बीआरटीचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. बीआरटीसाठी आवश्यक सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनल उभारून बससेवा सुरू केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
बीआरटीसाठी आवश्यक सर्व बसथांब्यांवर; तसेच या मार्गावरून धावणाऱ्या सर्व बसवर 'आयटीएमएस' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चाचणी घेण्यात येत असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था सक्षम असेल. गुरुवारी उद्घाटनानंतर या मार्गावरून नियमित बससेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजी-माजी अध्यक्षांत भरसभागृहात जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकारनगर भागातील नाला बुजविला जात असल्यावरून स्थायी समितीच्या आजी-माजी अध्यक्षांमध्ये मंगळवारी जोरदार वाद झाला. 'आपण एकाच पक्षाचे असतानाही तुम्ही मला गप्प बसायला सांगता, हे योग्य नाही,' असे स्पष्ट करून स्थायीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सहकारनगर येथील नाला बुजविला जात असल्याचे भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सांगितले. 'पालिकेकडे पैसे जास्त झाले आहेत का,' असा सवालही त्यांनी केला. त्यावर संबंधित विभागाचे प्रमुख सध्या उपस्थित नसल्याने पुढील सभेत खुलासा केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. शिळीमकर यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे नाराज होऊन 'माझ्या प्रभागात नाक कशाला खुपसता' असा टोला कदम यांनी लगावला. त्यावर मी प्रशासनाला विचारत असल्याचे शिळीमकर यांनी सांगितले. प्रशासनाने आताच खुलासा करावा, असा आग्रहही कदम यांनी बैठकीत धरला. त्यावर समितीचे अध्यक्ष बोडके यांनी हस्तक्षेप करून ज्यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांना पुढील बैठकीत प्रशासनाचा खुलासा मिळाला तरी चालणार आहे. त्यामुळे हा विषय थांबविण्याचे आवाहन केले.
त्याकडे दुर्लक्ष करून 'मला आताच खुलासा हवा आहे,' असा आग्रह कदम यांनी धरला. स्थायी समितीची बैठक संपत असताना कदम यांनी नाराजी व्यक्त करून 'तुमची पध्दत योग्य नाही, तुम्ही माझी अवहेलना करत आहात. बघा मी तक्रार कुठे करते,' असे कदम यांनी सुनावले. त्यावर तुम्हाला कुठे तक्रार करायची ती करा, असे उत्तर बोडके यांनी दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सत्ताधारी पक्षाच्या दोन सभासदांमध्येच हा वाद झाल्याने याची जोरदार चर्चा पालिकेत रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘१०० वर्षे, १०० गाणी’चे येत्या शनिवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिंदी सिनेमासृष्टीने आपल्यासाठी समृद्ध असा सांगीतिक खजिना तयार करून ठेवला आहे. साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, गुलझार अशा अनेक गीतकारांच्या शब्दांना लता मंगेशकर, महम्मद रफी, मुकेश, आशा भोसले, किशोर कुमार आदी गायकांनी आपल्या आवाजाने सजवले. हाच समृद्ध खजिना ३० एप्रिलला '१०० वर्षे, १०० गाणी' या संकल्पनेखाली '१०० इयर्स ऑफ बॉलिवूड' या कार्यक्रमामध्ये रसिकांसमोर खुला होणार आहे.
'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम होईल. दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता यांच्या प्रवासातून कार्यक्रम खुलवत नेण्यात येणार असून, दादासाहेब फाळके ते संजय लीला भन्साळी, पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर, सैगल ते सोनू आणि लता ते श्रेया असा कालावधी यात सादर करण्यात येईल. विशेष म्हणजे, ऑडिओ व्हिज्युअल म्युझिकल असे याचे स्वरूप आहे आणि नृत्यातूनही काही रचना मांडल्या जातील.
मिलिंद ओक यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले आणि दीपिका दातार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून, त्यासाठी प्रवेशमूल्य आहे. कल्चर क्लब सदस्यांसाठी विशेष सवलत देण्यात येईल. कार्यक्रमाची तिकिटे महाराष्ट्र टाइम्स, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ येथे मिळतील. तिकिटे मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ती मिळतील.
संपर्कासाठी- ९७६२११५८१४
..
१०० इयर्स ऑफ बॉलिवूड
कधी : ३० एप्रिल
कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
वेळ : रात्री ९.३० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या हृदयाने दिल्लीकराला जीवदान

$
0
0

अवयवदानामुळे सहा जणांना पुनर्जन्म; आंतरराज्यीय हृदय प्रत्यारोपण यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवयवदानाबाबत जनजागृती होण्यास सुरुवात झाल्याने पुण्यातील हृदयदान चळवळीने मुंबईनंतर आता थेट दिल्लीपर्यंत मजल मारली. पुण्यातील तेवीस वर्षाच्या तरुणाचे हृदय दिल्लीतील 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स'मधील (एम्स्) पेशंटला देण्यात आले. या कृतीमुळे 'नॅशनल ऑर्गन टिश्यू अॅन्ड ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन'च्या (नोटो) माध्यमातून प्रथमच पुणेकराचे हृदय दिल्लीकराला देण्यात यश आले आहे.

तरुणाच्या इतर अवयवांपैकी एक किडनी, यकृत आणि दोन डोळे 'रुबी हॉस्पिटल'च्या पेशंटांना, उर्वरीत किडनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील पेशंटला देण्यात आली. यापूर्वी मुंबई आणि आता दिल्लीत हृदय पाठविण्यात आले. राज्याची सीमा ओलांडून प्रथमच पुण्यातून हृदय दिल्लीला गेल्याची ही पहिलीच वेळ असून, या घटनेला वैद्यकविश्वात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

'पुण्याजवळील खेड तालुक्यातील एका तरुणाचा प्रवासात अपघात झाला. गाडीमध्ये तो मागच्या बाजूला बसूनही त्याला गंभीर इजा झाली. रुबी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, बेशुद्ध झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड म्हणून सोमवारी जाहीर केले. अवयवदानासंदर्भात पेशंटच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्यांनी नकार दिला. अखेर सोमवारी रात्री पुन्हा समुपदेशन केल्यानंतर नातेवाइकांनी अवयवदानाची तयारी दाखविली. त्यानंतर ब्रेनडेड तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान मिळाले,' अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी यांनी दिली. 'रुबी हॉस्पिटलमध्ये अवयवदाता असल्याचे कळताच पुण्यासह मुंबईतील गरजू पेशंटांची माहिती घेण्यात आली. मुंबईतील गरजूंपैकी एका पेशंटचे वजन, उंची न जुळाल्याने ते अनफिट ठरले. त्यामुळे दिल्लीतील गरजू पेशंटला हृदय देण्यासाठी पहाटे दोन ते पाच या वेळेत थेट 'नॅशनल ऑर्गन टिश्यू अॅन्ड ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्यांच्यामार्फत 'एम्स'मध्ये हृदयासाठी पेशंट वेटिंगवर असल्याचे कळाले. 'एम्स'' हृदय प्रत्यारोण तज्ज्ञ डॉ. मिलिंद होटे सकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये आले. ब्रेनडेड पेशंटचे हृदय काढून त्यांनी विमानाद्वारे दिल्लीला नेले,' अशी माहिती पुणे विभागाच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
..
'ग्रीन कॉरिडॉर'आले धावून

हृदय काढल्यानंतर पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने 'ग्रीन कॉरिडॉर'च्या माध्यमातून विमानतळावर पोहोचविण्यात आले. रुबी हॉस्पिटलमधून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी निघालेले ह्दय ७.८ किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेसहा मिनिटांत पूर्ण करून विमानतळावर पोहोचले, असे वाहतूक आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत 'एम्स'मधील पेशंटवर हृदयप्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू होती. रुबी हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी डॉ. मनीष वर्मा, डॉ. कमलेश बोकील, डॉ. शीतल धडफळे, किडनीसाठी डॉ. अभय हुपरीकर, डॉ. शिरीष यंदे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी डॉ. मनोज दुरईराज यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालमहाल कात टाकणार

$
0
0

सुशोभीकरणासाठी पन्नास लाखांची निविदा मंजूर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वाचा इतिहास सांगणाऱ्या लाल महालाचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये विविध विकासकामे तसेच सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी ५० लाख रुपयांची निविदा मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आली. या कामांमुळे लाल महालाचे अंतर्बाह्य रूप बदलण्यास मदत होणार आहे.
शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेला लाल महाल पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत‌ असतात. लाल महालाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी यापूर्वी महापालिकेने खासगी संस्थेकडे दिली होती. मात्र, त्यांच्याबरोबर केलेला करार संपुष्टात आल्यानंतर पालिकेने ही वास्तू ताब्यात घेतली. लाल महाल चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पालिकेने हे काम एका संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वास्तू संस्थेला देण्यापूर्वी वास्तूची आवश्यक ती डागडुजी करण्याबरोबरच सुशोभिकरणाचे काम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पन्नास लाख रुपये खर्च केला जाणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
लाल महालातील पहिल्या मजल्यावर साकारण्यात येणाऱ्या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्मिळ आज्ञापत्रक, विविध बारा मोठी तैलचित्रे, नकाशे यांच्यासह काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असणार आहे. तसेच, लाल महालाच्या गच्चीवर राज्यातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे, या कामामुळे लाल महालाचा कायापालट होणार असल्याने पर्यटकांची गर्दी होइल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी पाणी येते कुठून?

$
0
0

पथ, 'पाणीपुरवठ्या'कडून जबाबदारी झटकण्यावर भर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील रस्ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी नक्की कोठून येते, याची शहानिशा करण्यासाठी पालिकेचा कोणताही विभाग पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यासाठी वारपले जाणारे पाणी पिण्याचे आहे की बोअरचे हे ठरविण्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नसताना पाणीटंचाई असतानाही ठेकेदार मात्र रस्त्यांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरत आहेत.
रस्ते तयार करताना नक्की कोणते पाणी वापरले जाते, हे पाहण्याची जबाबदारी पाणीपुरवठा आणि पथ विभागाची नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याची स्थिती अधिकच गंभीर होत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिले आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरबरोबरच अन्य कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्यात आला आहे. पाण्याची उपलब्ध्ता पाहूनच रस्ते तयार करताना पिण्याच्या पाण्याचा वापर न करण्याच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरासह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामासाठी बिनधिक्कतपणे पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.
स‍ध्या सर्वत्र निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेली रस्त्यांची कामे तातडीने थांबवावीत, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पालिका प्रशासनाकडे केली होती‌. शहरातील बांधकामे, तसेच रस्त्यांच्या कामासाठी पिण्याचा पाण्याचा वापर होतो की नाही, हे पाहण्यासाठी पथ विभाग, पाणीपुरवठा विभागासह त्रयस्थ संस्थेमार्फत पाहणी करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.
..
आयुक्तांच्या आदेशाला फासला हरताळ
आयुक्तांनी आदेश देऊनही महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाही पालिकेचा पाणीपुरवठा किंवा पथ विभाग नक्की कोणते पाणी वापरले जाते, हे पाहण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी आजही पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेचा पथ विभाग आणि पाणीपुरवठा या दोन्ही विभागांनी नेमका कोणत्या पाण्याचा वापर होतो, याची पाहणी करण्याची जबाबदारी झटकली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images