Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माथेरान बचावसाठी ‘एनजीटी’ला साकडे

$
0
0

नियंत्रित वृक्षतोडीमुळे जैववैविध्य धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
विकासकामांमुळे काँक्रिटच्या जंगलाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या माथेरानला वाचविण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांनी 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा'कडे (एनजीटी) दाद मागितली आहे. अनधिकृत बांधकामे, अनियंत्रित पर्यटन, कचरा व्यवस्थापनाकडे होणारे दुर्लक्ष आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानचे सौंदर्य आणि जैववैविध्य धोक्यात आले आहे.
माथेरानमधील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा'ने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाला नुकतीच नोटीस पाठविली. दर वर्षी वाढत असलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक लोकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांची हॉटेल, रिसॉर्ट पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या परिसरात बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून तेथील जैववैविध्य धोक्यात आले आहे. माथेरानचा पर्यटन विकास आराखडा नसल्याने गेल्या काही वर्षांत प्रत्येकाने मनमानी पद्धतीने विकासकामे केली आहेत. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्याने बहरलेल्या माथेरानच्या जंगलाला आता काँक्रिटच्या जंगलाचे स्वरुप आले आहे. माथेरानची पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता (कॅरिंग कपॅसिटी) संपली आहे. तरीदेखील पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी लवकरच रोप-वे बांधण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. नेरळ ते दस्तुरी रोडचे रुंदीकरण होणार असून, उच्चभ्रू वर्गांच्या सोयीसाठी हेली टुरिझम अर्थात हेलिपॅडसाठी जागा शोधण्याला प्रारंभ झाला आहे.
अनियंत्रित विकासकामांमुळे धोक्यात आलेल्या माथेरानमधील जैवविविध्याच्या संरक्षणासाठी 'बॉम्बे एन्व्हॉयर्न्मेंट अॅक्शन ग्रुप'तर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माथेरान हिल्स स्टेशन म्युनिसिपल कौन्सिल आणि रायगडच्या जिल्हाधिकऱ्यांना प्रतिवादी केले आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड. संजय उपाध्याय बाजू मांडत आहेत.
प्रशासनाने दहा वर्षांपूर्वीच माथेरान पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांना अपयश आले. परिणामी माथेरामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आलेला नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तेथील हॉटेलमधील सांडपाणी प्रक्रियेशिवायच निसर्गात सोडले जाते. घनकचऱ्याच्या बाबतीतही कोणतेही व्यवस्थापन नाही. नियमानुसार या भागात नागरिकांना एक मजला बांधण्याची परवानगी असताना अनेकांनी सर्रास दोन आणि तीन मजली घरे उभारली आहेत, असे अनेक मुद्दे याचिकामध्ये मांडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसखरेदी पारदर्शक हवी

$
0
0

विविध सामाजिक संघटनांची एकमुखी मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंड‍ळाला (पीएमपी) नेमक्या किती बसची आवश्यकता आहे, या बाबत तांत्रिक अभ्यास करूनच बस खरेदीचा निर्णय घ्यावा. खरेदीत पारदर्शकता राहणार नसेल, तर बस खरेदी करू नये, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात ७०० नवीन बस आणि ५०० बस कंत्राटी तत्त्वावर नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यातून केवळ कंत्राटदारांचे हित साधले जाणार असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचाने केला आहे. त्याचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी पीएमपी बस खरेदीमध्ये पारदर्शकता नसल्यास खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. पीएमपीकरीता बस खरेदी करण्यापूर्वी राज्यातील तसेच राज्याबाहेरील संस्थांनी केलेल्या बस खरेदीचा आढावा घ्यावा. त्यांनी कोणत्या दराने, किती बसे खरेदी केल्या आहेत. त्याची माहिती घ्यावी. त्यानुसार तुलनेने स्वस्त दरात बस खरेदी करावी, असे मत सजग नागरी मंचाचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही शासकीय खरेदी म्हटले की, टक्केवारीची चर्चा होते. त्यामुळे पीएमपी बस खरेदीत असे काही होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. बस खरेदी करताना कोणतीही मध्यस्थ एजन्सी न नेमता थेट पीएमपीने व्यवहार केला पाहिजे. कारण, मध्यस्थ नेमल्यास बसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी सुचविले आहे.
'काही वर्षांपूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत पीएमपीने बस खरेदी केल्या होत्या. त्यावेळी नवी मुंबई महापालिकेने १७ लाख रुपयात खरेदी केलेल्या बस, पुण्यात २४ लाख रुपयांना खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्याबाबत कोर्टातही केस सुरू होती. मात्र, तो निकाल प्रशासनाच्या बाजूने लागला. असे असले तरीही, पुन्हा आता नवीन बस खरेदीत काही गौडबंगाल होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे,' असे मत पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला.
--------
संघटनांनी सुचविलेले उपाय
प्रतिबस ११०० प्रवाशांचे उद्दिष्ट गाठावे.
गर्दीच्या ५० मार्गांवर पाच ते २० मिनिटे वारंवारितेने बस सोडाव्यात.
ठेकेदाराला प्रतिकिमी उत्पन्नाएवढेच भाडे द्यावे.
प्रत्येक १०० बस मागे एक डेपो व प्रत्येक बससाठी पार्किंग द्यावे.
प्रवासी केंद्रित अभ्यास करून, गरजेनुसार ५०-५० च्या टप्प्यात बस ताफा वाढवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या वन्यप्राण्यांचे टॅगिंग करणार

$
0
0

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतंत्र अभ्यास करणार; रानमांजर, कोल्ह्याची ​निवड

Chaitrali.Chandokar@timesgroup.com

पुणे : वाघांच्या संरक्षणासाठी देशभरात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच अभयारण्यांमधील अन्य संकटग्रस्त प्राण्यांना वाचविण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षक असलेल्या या छोट्या जीवांच्या हालचाली टिपण्यासाठी आता त्यांचाही स्वतंत्र अभ्यास करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रानमांजर, कोल्हा, लांडगा यांची निवड केली असून, त्यांना टॅगिंग करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक आणि वाघ यांसह काही प्राण्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाने टॅगिंगला सुरुवात केली. या प्रक्रियेमुळे संबंधित प्राणी अभयारण्यात कुठे जातो, काय खातो आदी हालचाली टिपणे शक्य झाले आहे. 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या (जीपीएस) माध्यमातून प्राण्यांचा अभ्यास सुरू आहे. याच धर्तीवर वेगाने घटत असलेल्या इतर लहान प्राण्यांचेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वेक्षण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. पुणे विभागाने यात पुढाकार घेतला असून, काही प्राण्यांना प्रथमच जीपीएस कॉलरिंग करण्यात आले आहे,' अशी माहिती पुणे विभागाचे मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली.
सध्या बारामतीमध्ये आम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे. जीपीएस कॉलरमुळे वन्यप्राणी कुठे आहे, तो कोणत्या भागात फिरतो, वास्तव्यास आहे याची सविस्तर माहिती मिळते. 'अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्ह्यायर्न्मेंट' (अॅट्री) या संस्थेच्या मदतीने हे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कॉलरचा आकारही लहान झाला असून, वन्यप्राण्यांच्या हालचालींना त्यामुळे बाधा येणार नाही. आतापर्यंत आठ खोकडांना कॉलर बसविण्यात आली असून, सरकारकडून अजून बारा वन्यप्राण्यांसाठी परवानगी देखील मिळाली आहे. यातून कोल्हा, खोकड आणि रानमांजरांची निवड करणार आहोत, असे 'अॅट्री'चे प्रकल्प समन्वयक अबी टी वनक यांनी सांगितले.
आतापर्यंत मोठ्या वन्यप्राण्यांवरच लक्ष केंद्रीत झाले होते. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यामधील वन्यप्राणी चर्चेत होते. अभयारण्यांच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर असून, त्यांचे संरक्षण होण्याची गरज आहे. बाहेर फिरणाऱ्या या प्राण्यांवर स्थानिक लोकांचा दबाव आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यापूर्वी वावर असलेली ठिकाणे, हालचाली आणि सवयींचा अभ्यास झाला पाहिजे. रेडिओ कॉलरिंगमुळे चांगले निष्कर्ष मिळणार आहेत, असे वनक यांनी सांगितले.
..
'ओवीतील लांडगा'चे निष्कर्ष चांगले
दरम्यान, वन विभागाने दोन वर्षांपूर्वी 'ओवीतीला लांडगा' हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये वन्यप्राणी अभ्यासक, वन्यजीव छायाचित्रकार आणि स्थानिक लोक सहभागी झाले आहेत. पुणे परिसरातील अभयारण्ये, माळरानांमध्ये फिरून लांडग्यांचा अधिवास, मनुष्य आणि लांडग्याचे नाते यांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनाचा देखील जीपीएस टॅगिंग संशोधनाला उपयोग होणार आहे, असेही लिमये यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूच्या धाकाने महिलेला लुटण्याचा प्रयत्न

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे बंगल्यामध्ये रंगकाम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घरात शिरून महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटण्याची घटना मंगळवारी अरण्येश्वर येथे घडली. याप्रकरणी दोन व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत अरुणा देशमुख (वय ५२, रा. अरण्येश्वर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अक्षय लक्ष्मण थोरात (रा. तळजाई वसाहत) व आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी थोरातला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख या अरण्येश्वर परिसरात राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच बंगल्याचे रंगकाम आरोपी थोरात याच्याकडून करून घेतले होते. मात्र, बंगल्याचे टचअप काढायचे असल्याचे सांगून थोरात हा मंगळवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास त्यांच्या घरी आला. त्या वेळी त्याच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती. दोघांनी घरात शिरून इकडे-तिकडे पाहिले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत थोरात याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने देशमुख यांच्या गळ्याला सुरी लावली. आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पण, त्या वेळी घरामध्ये काम करत असलेली महिला नोकर छाया हिला देशमुख यांनी आवाज दिला. त्या वेळी थोरातने देशमुख यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांचा आवाज ऐकून काम करणारी महिला धावत आली. हे पाहून आरोपी घरातून पळून गेले. त्यानंतर देशमुख यांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना व सहकारनगर पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करणी उतरविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'तुमच्या घरावर करणी झाली आहे. ती काढून देतो,' असे सांगून प्रभात रोडवरील एका महिलेच्या कानातील सोन्याची फुले व रोख रक्कम असा वीस हजारांचा ऐवज फसवणूक करून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मयूर जोशी व आणखी एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला प्रभात रोडवरील अमृता अपार्टमेंट येथे राहण्यास आहेत. वीस दिवसांपूर्वी आरोपी हे महिलेच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी तक्रारदार यांना सांगितले, 'तुमच्या घरावर करणी करण्यात आली आहे. ती काढल्यानंतर तुमचे चांगले होईल.' करणी काढून देण्यासाठी तक्रारदार महिलेकडून आरोपींनी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघे निघून गेले होते. वीस दिवसांनंतर दोघे आरोपी हे मंगळवारी दुपारी तक्रारदार महिलेच्या घरी पुन्हा आले. तुमच्या घरावरील करणी मोठी आहे. त्यासाठी पुजा करू. त्यासाठी आणखी रक्कम द्यावी लागेल, असे आरोपी त्यांना सांगितले. आरोपींनी घरात पूजा मांडून तक्रारदार यांना पुजेच्या ठिकाणी कानातील सोन्याची फुले व काही रक्कम ठेवण्यास सांगितली. त्यानुसार तक्रारदार यांनी सोन्याची फुले व पैसे ठेवले. त्यानंतर पुजा करताना हातचलाखीने आरोपींनी सोन्याची फुले व पैसे घेऊन गेले. तक्रारदार महिलेने पुजेच्या ठिकाणी ठेवलेली सोन्याची फुले पाहिली असता ती दिसून आली नाही. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक खरात हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावला आठ तरुणींची सुटका

$
0
0









म. टा.प्रतिनिधी, पुणे पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) तळेगाव 'एमआयडीसी' येथील आंबीगावात एका लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ तरुणींची सुटका केली; तर एकाला अटक केली. सुटका केलेल्या तरुणींमध्ये तीन बांगलादेशी तरुणींचा समावेश आहे. जेहरूल जमाल इस्लाम (वय २७, सध्या रा. न्यू समाधान लॉज, आंबीगाव, ता. मावळ. मूळ रा. कोकराजर, आसाम) असे अटक केलेल्या लॉज व्यवस्थापकाचे नाव आहे. तो न्यू समाधान लॉजचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. आंबीगावातील न्यू समाधान लॉज राजेश शेट्टी याने चालवण्यास घेतले होते; तर या जेहरूल हा लॉचचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. 'एएचटीयू' पथकातील गणेश जगताप यांना या लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येथे छापा घालण्यात आला. लॉजचालक शेट्टी हा पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. शेट्टी हा जेहरूल याच्यामदतीने लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी.आर. पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर, सहायक निरीक्षक नीता मिसाळ, संपत पवार, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, दत्ता जाधव, संदीप होळकर, नितीन तेलंगे, प्रमोद म्हेत्रे, सचिन कोकरे, रमेश काळे, महिला कर्मचारी जयश्री जाधव, दमयंती जगदाळे, अनुराधा ठोंबरे आणि प्रगती नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये तीन तरुणी या बांगलादेशी; तर चार तरुणी या पश्चिम बंगाल येथील आहेत. बांगलादेशी तरुणींना नोकरीच्या आमिषाने फसवणूक पुण्यात आणण्यात आल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या तरुणींकडे चौकशी करण्यात आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आल्याचे मुजावर यांनी सांगितले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष हा केवळ पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सक्रिय होता. मात्र, दीड वर्षांपूर्वी पोलिस महासंचालकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वाढ केली. 'एएचटीयू'ची कार्यकक्षा ही शहर, जिल्हा आणि लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आगामी काळात देखील शहर, जिल्हा आणि लोहमार्गच्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाणार आहेत, असे पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रतज्ज्ञांच्या समस्यावर शनिवारी राष्ट्रीय परिषद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था (एनआयओ) आणि महाराष्ट्र नेत्ररोग संघटना, पुणे नेत्ररोग संघटना यांच्या सहकार्याने 'नेत्रतज्ज्ञांना प्रॅक्टीसमध्ये येणारे अडथळे' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे येत्या शनिवारी (दि. ३०) आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ली मेरिडियन येथे सुरू होणार आहे. परिषदेत कोरियाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रो. हुंगवॉन चा हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी एनआयओच्या वतीने डॉ. ए. एम. गोखले आणि डॉ. एम.जी. भिडे पुरस्कार अनुक्रमे डॉ. महेश शनमोगम आणि डॉ. सुजन जेकब यांना परिषदेत पुरस्कार देण्यात येणार आहे. एनआयओचे औंध येथे नव्याने उभारलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्राणनाथ नागपाल यांच्या हस्ते होणार आहे. 'वैद्यकविश्वात दररोज नवे तंत्रज्ञान येत आहे. तंत्रज्ञानाची नेत्ररोग तज्ज्ञांना नेहमीच फारशी माहिती असते असे नाही. नव्या तंत्रज्ञानासह उपचाराच्या तंत्राची माहिती व्हावी याकरिता नवे तंत्र आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. हेच सध्या नेत्ररोग तज्ज्ञांसमोर मोठे आव्हान आहे. त्या आव्हानांना तोंड कसे द्यावे, त्यावर कशी मात करावी. याबाबतचे धडे नेत्ररोग तज्ज्ञांना मिळावेत यासाठी ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद शनिवारपासून सुरू होत आहे. पुण्यासह महाराष्ट्र आणि काही देशातील तज्ज्ञ डॉक्टर परिषदेत सहभागी होणार आहेत,' अशी माहिती एनआयओचे संचालक आणि पुणे नेत्ररोग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. आदित्य केळकर यांनी दिली. महाराष्ट्र नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. सलिल गडकरी, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, डॉ. प्रशांत बावनकुळे, तसेच पुणे नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय शहा, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. जाई केळकर, डॉ. आशिष नागपाल हे चर्चेत सहभागी होणार आहेत, असेही डॉ. केळकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्यांची कामे महिनाभरात करा

$
0
0

पालिकेने दोन कोटी देण्याची बापटांची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणीगळती रोखण्यासाठी खडकवासला धरणापासून वाहणाऱ्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे महिनाभरात करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे खात्याला दिले. या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यातील दोन कोटी रुपये पुणे महापालिकेने देण्याची सूचना बापट यांनी केली आहे. मात्र, कालवा दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे खात्याची असल्याने महापालिकेने खर्च करण्यावरून 'तू-तू मै-मै' सुरू झाली आहे.
कालव्याची बापट यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. त्यावेळी पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले यांनी कालव्याची १२ ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर महिनाभरात कालव्याच्या दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश बापट यांनी ​दिले. या आदेशानंतर महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधाचे हत्यार उपसले आहे. बापट म्हणाले, 'पाणीगळती रोखण्यासाठी कालव्याची तातडीने दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोन कोटी रुपये महापालिकेकडून घेऊन महिनाभरात कामे पूर्ण करण्याची सूचना पाटबंधारे खात्याला केली आहे. शहर आणि जिल्ह्यात पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.'
'कालव्याची क्षमता, खोली आणि गळती याची बारकाइने पाहणी करून सविस्तर आराखडा तयार करावा. त्यानंतर ताबडतोब दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकणार आहे. महापालिकेने याची तातडीने कार्यवाही करावी,' असेही बापट यांनी स्पष्ट केले. बापट यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.
'कालव्याच्या दुरुस्तीच्या कामात पाटबंधारे खात्याला सहकार्य करण्यात येईल. मात्र, या कामासाठी दोन कोटी रुपये देण्याच्या पालकमंत्र्याच्या सूचनेबाबत महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, ' असे महापौर प्रशांत जगताप म्हणाले. नगरसेवक दीपक मानकर यांनीही विरोध केला आहे. ते म्हणाले, 'कालव्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे खात्याची आहे. त्यामुळे महापालिकेने रक्कम देऊ नये. कालव्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.'
.............
अधिकाऱ्यांची कानउघाडणी
कालव्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता कपोले यांनी सांगितल्यावर बापट संतप्त झाले. त्यांनी पाटबंधारे खाते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तीन महिन्यांपूर्वी सूचना देऊनही कालव्याची दुरुस्ती का करण्यात आली नाही, याचा जाब त्यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अगरवाल यांचा जामिनासाठी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पाच लाखांत घर' अशी जाहिरात करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी 'मेपल' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला. त्यांच्या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्यावर आज, गुरुवारी शिवाजी नगर कोर्टात सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घर देण्याची फसवी जाहिरात दिल्याप्रकरणी अगरवाल, 'मेपल'चे संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, या साठी अगरवाल यांनी कोर्टात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. पोलिसांतर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी अटकपूर्व जामिनास विरोध केला. 'मेपल'मार्फत 'पाच लाखांत घर' अशी जाहिरात केली गेली होती. या फसव्या योजनेतून कंपनीकडे तीन कोटी रुपये जमा झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात मात्र बँक खात्यात सहा लाख रुपयेच असल्याचा युक्तिवाद श्रीमती पवार यांनी केला. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास होणे गरजेचे असून, अगरवाल यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी कोर्टाला केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोजक्याच कामांना १५जूनपर्यंत मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या (२०१५-१६) अर्थसंकल्पातील ठरावीक अपूर्ण कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे, स्थानिक स्तरावरील २५ लाख रुपयांच्या आतील कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आलेली भांडवली कामे पुढील दीड महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहेत.
गेल्या वर्षीच्या बजेटमधील अनेक कामे निविदा प्रक्रिया लांबल्याने किंवा इतर कारणांमुळे ३१मार्चपर्यंत पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे, या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यावेळी, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार, या कामांना आणखी दीड महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी सर्व विभागप्रमुखांना त्यासंबंधीचे परिपत्रक पाठविले असून, १५ जूननंतर सादर झालेली बिले अदा करता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या बजेटमधील २५ लाख रुपयांपर्यंतची कार्यादेश देण्यात आलेली सर्व कामे या कालावधीत पूर्ण करावीत; तसेच अशा कामांची सविस्तर यादी लेखा व वित्त विभागाला तातडीने सादर करावी, अशा सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसेच, २५ लाख रुपयांच्या पुढील कामांसाठी 'स्पिल-ओव्हर'मध्ये तरतूद केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बऱ्हाटेंविरोधात खंडणीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जमीन संपादनाचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते र​वींद्र बऱ्हाटे यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा व्यावसायिकाने केला आहे. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात बऱ्हाटे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक हेमंत लक्ष्मण गवंडे (वय ३८, रा. निगडी प्राधिकरण) यांनी गुन्हे शाखेकडे तक्रारी अर्ज केला होता. गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक तपासानंतर बऱ्हाटे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'पुणे महापालिकेने १९८७च्या विकास आराखड्यानुसार बोपोडी येथील माझ्या मालकीची जागा पीएमपी डेपोसाठी आरक्षित केली आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जमिनीच्या संपादन प्रक्रियेबाबत मुंबई हायकोर्टात खटला सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रक्रिया तत्काळ होण्यासाठी गेल्यावर्षी १५ मे रोजी मंत्रालयाच्या महसूल विभागात बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच निमंत्रण नसतानाही बऱ्हाटे उपस्थित होते. त्यावेळी बऱ्हाटे यांनी जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकर होण्यासाठी आणि निकाल माझ्या बाजूने लागण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितली. त्याची तक्रार मंगळवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली आहे,' अशी माहिती गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, संबंधित जागेचे आरक्षण रद्द करुन ती जागा बळकावून तेथे शिक्षण संस्था काढण्याचा बऱ्हाटे यांचा डाव असल्याचा आरोपही गवंडे यांनी केला. दरम्यान, बऱ्हाटे यांनी पुणे विधान भवनातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती, असे गवंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्या आधारे हा गुन्हा पुण्यात विधानभवनात घडला म्हणून बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड, इंदापूरवर बापटांची जलकृपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड आणि इंदापूरसाठी ०.८ किंवा ०.९ टीएमसी पाणी देण्याचे जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
पुणेकरांनी पाणीकपातीतून गेल्या आठ महिन्यांत सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत केली असताना त्याच पाण्यातून दौंड आणि इंदापूरला साठवण क्षमतेपेक्षा सुमारे २० पट जास्त पाणी देऊन भविष्यात पुणेकरांवर आणखी पाणीकपात लादली जाण्याची शक्यता आहे. खडकवासला ते पर्वती बंद जलवाहिनी, कालव्याची पाहणी बापट यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बापट यांनी पुण्यात आणखी पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, पाणीगळती, चोरी आणि दुरुस्तीच्या उपाययोजना केल्यानंतर दौंड आणि इंदापूरला केवळ पिण्यासाठी ०.८ किंवा ०.९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय आठ दिवसांमध्ये घेणार असल्याचे सांगितले.
या निर्णयाचा फटका पुणेकरांना बसणार आहे. दौंडमध्ये अवघी ०.०४५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. तरीही सुमारे २० पट पाणी देण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न पडला आहे. 'पुणेकरांनी गेल्या आठ महिन्यांत दरमहा ०.९५ टीएमसी पाण्याची बचत केली. त्यामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत झाली. हे पाणी पुणेकरांना मिळणे आवश्यक होते. त्याऐवजी ते दौंडला देण्यात येणार आहे. दौंडला पाणीसाठवण क्षमतेपेक्षा सुमारे २० पट जास्त पाणी देण्यात येणार आहेऽ' असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.
'जून महिन्यात वेळेवर पाऊस आला नाही तर पुढील पाण्याचे नियोजन काय आहे, दौंडला जून महिन्यातही पाणी द्यावे लागणार असल्याने ते पाणी कोठू आणणार, पालखीच्यावेळी ०.५ टीएमसी पाणी सोडावे लागते. त्याची व्यवस्था करण्यात आली आहे का?' असे प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केले आहेत.
'दौंडला पिण्याचे पाणी देण्यास विरोध नाही. कॅनॉलऐवजी आवश्यक तेवढाच रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात यावा.' अशी सूचना वेलणकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याची डाळ शिजू देणार नाही

$
0
0

व्यापाऱ्यांचा सरकारला इशारा; मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
डाळींचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कायदा आणला असताना आधी राज्यात डाळ उपलब्ध करा, आणि मगच नियंत्रणाचे कायदे करा, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. कायद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण होण्यापेक्षा वाढच होत असल्याने कायद्याविरोधात राज्यभर रान उठविण्याचा चंग व्यापारी संघटनांनी बांधला आहे.
अन्नधान्य, कडधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू वायदे बाजारातून वगळण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दाद मागण्यात येणार आहे. राज्य सरकारने डाळींच्या वाढत्या भाववाढीला लगाम लावण्यासाठी डाळ नियंत्रण कायदा आणण्याचे ठरवले आहे. कायद्यामुळे डाळींचे भाव सरकार ठरविणार असून, त्या दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागणार आहे. एकीकडे सरकार डाळींच्या भाववाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असे सुनावून व्यापाऱ्यांनी कायद्यालाच विरोध करण्याचा निर्धार केला आहे. 'डाळ नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही, तर ते आपला माल घेऊन परराज्यात जातील. त्यामुळे आताच डाळींचा तुटवडा निर्माण होत असताना कायद्यामुळे आणखी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाववाढ नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही. त्यापेक्षा अन्नधान्ये, कडधान्यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वायदे बाजारातूनच वगळण्यात यावेत,' अशी मागणी द पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केली आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे डाळींचा अमर्याद साठा आहे. त्यांच्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे बाजारात डाळींचा तुटवडा निर्माण झाला की छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करायची, हे न्यायाला धरून नाही. नव्या कायद्यामुळे प्रश्न सोडविण्याऐवजी आणखी वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यात नियंत्रणात राहण्याऐवजी भाववाढ होईल, अशी भीतीही चोरबेले यांनी व्यक्त केली. 'भाववाढ रोखण्यासाठी कायदा करण्यापेक्षा बाजारात प्रथम पुरेशा प्रमाणात डाळ उपलब्ध करा. मग भाव वाढ नियंत्रण करण्यासाठी पावले उचला,' असा इशारा डाळीचे व्यापारी नितीन नहार यांनी दिला. अनुभवी व्यापारी, दाळमिलचालक, उत्पादकांशी कोणतीही चर्चा न करता कायदा करणे योग्य नाही. खुल्या बाजारात तुरीचे वाढलेले भाव कमी कसे करणार असा सवाल करून जीवनावश्यक वस्तू वायदे बाजारातून वगळण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
'सध्या डाळींचे उत्पादन कमी आहे. स्वस्त दरात डाळ देण्यासाठी आयात केली जात नाही. तुटवडा झाल्याने डाळींचे दर वाढतात. मग व्यापाऱ्यांना जबाबदार धरायचे कशाला, डाळ नियंत्रणाच्या कायद्याला आमचा विरोध कायम आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊ. कायदाच करायचा असेल तर राज्यातच नव्हे, तर देशात करा. वस्तूंची भाववाढ नियंत्रण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर होता कामा नये,' असे फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फॅम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी स्पष्ट केले.
..
डाळींच्या भाववाढ नियंत्रणासाठीचा कायदा आम्हाला मान्य नाही. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध राहील. याबाबत व्यापाऱ्यांची लवकरच राज्यव्यापी परिषद घेऊन त्याबाबत भूमिका निश्चित केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दाद मागणार आहोत.
प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, पूना मर्चंटस चेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीत घटक दुर्लक्षित

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचा सरकारला घरचा आहेर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीमध्ये सध्या शहरातील सर्व घटकांचा-समूहांचा विचार करण्यात आलेला नाही, अशी जाहीर कबुली देतानाच या घटकांना सामावून घेऊन प्रत्येक शहरानुसार स्वतंत्र रचना तयार करण्याचा निर्णय घेण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिले.
वक्तृत्वोतेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत स. गो. बर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'पुणेः एक स्मार्ट सिटी' या परिसंवादात ते बोलत होते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ समाजवादी नेत्या किरण मोघे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर या वेळी उपस्थित होते. दैनंदिन आयुष्यात काहीतरी बदल झाला आहे, हे जेव्हा शहरातील सर्वसामान्य व्यक्तीला वाटेल, तेव्हाच खरी स्मार्ट सिटी अस्तित्वात येईल, असे नमूद करून बापट म्हणाले, 'स्मार्ट सिटीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने निश्चित केली होती. त्यानुसार, त्याचा आराखडा बनविण्यात आला. त्यात शहराच्या सामाजिक रचनेला पुरेसे स्थान नाही. तसेच, भविष्यातील नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही ठाम योजना नाहीत. त्यामुळे, स्मार्ट सिटीतील पायाभूत सुविधांची निर्मिती पू्र्ण झाली, की समाजातील सर्व घटकांना त्यात सामावून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.'
'राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती, धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर, या त्रिसूत्रीवर स्मार्ट सिटीचे भवितव्य अवलंबून असेल', असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीमध्ये नागरिक नाही, तर भांडवल हा मुख्य केंद्रबिंदू असल्याची टीका किरण मोघे यांनी केली. लोकसहभागासाठी जादा अधिकार देणाऱ्या घटनेच्या ७३ आणि ७४ व्या दुरुस्तीला सुरुंग लावून महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कंपनीकरण करण्याचा डाव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मगरपट्टा आणि नांदेड सिटी वसविताना कोणत्याही नव्या संकल्पना मांडण्यात आल्या नाहीत, तर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यातील सर्व तरतुदींचा अवलंब केला. त्यातून, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केल्याचे मगर यांनी सांगितले.
सुकृत खांडेकर यांचेही भाषण झाले. मंदार बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
....................
कालवा रस्ता पुन्हा चर्चेत?
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालव्याच्या बाजूने रस्ता विकसित करता येऊ शकेल, त्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) आरक्षण टाकता येईल का, याची चाचपणी करा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले. काही वर्षांपूर्वी महापालिकेला कालव्यावरून रस्ता करायचा असेल, तर जलसंपदा विभागाला तेवढा टीडीआर महापालिकेने द्यावा असा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. आता, शहराचा डीपी अंतिम टप्प्यात असताना, पुन्हा बापट यांनी त्याचे सूतोवाच केल्याने कालव्याच्या बाजूने रस्ता आणि टीडीआर हे विषय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा मिसाळ विरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महंमदवाडी येथील ३७०६ चौरस मीटर (साधारणतः एक एकर) जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमजद बडगुजर (वय ४६, रा. कौसरबाग हौसिंग सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बडगुजर आणि त्यांच्या भावांनी मिळून लँड डेवहलपर कंपनीची स्थापन केली होती. या कंपनीने डिसेंबर २०१४मध्ये यशवंत नाना चव्हाण आणि आणखी नऊ जणांकडून महंमदवाडी येथील ही जागा खरेदी केली होती. या जागेशेजारी मिसाळ यांचा प्लॉट आहे. बडगुजर यांनी खरेदी केलेल्या प्लॉटला तारेचे कुंपण घातले होते. तसेच, सुरक्षारक्षकाची खोली बांधली होती. मिसाळ यांनी तारेचे कुंपण तसेच, सुरक्षारक्षकाच्या खोलीची तोडफोड केली आणि त्या जागेवर मिसाळ प्रॉपर्टीचा बोर्ड लावला. या जागेवर मिसाळ यांनी पत्र्याचे शेड टाकण्यास सुरुवात केली होती.
चव्हाण यांनी बडगुजर यांना या घटनेची कल्पना दिली. बडगुजर यांनी प्लॉटवर काम करणाऱ्या मजुरांकडे चौकशी केली होती. मिसाळ यांनी या ठिकाणी पत्र्याचे शेड टाकण्यास सांगितले आहे, अशी माहिती मजुरांनी बडगुजर यांना दिली होती. मिसाळ यांनी बळजबरीने जागेचा ताबा घेतला तसेच, तारेचे कुंपण आणि सुरक्षारक्षकांच्या खोलीची तोडफोड असे मिळून तीन लाख रुपयांचे नुकसान केल्याचा दावा बडगुजर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायीच्या पंचनाम्यासाठी लाच घेणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पशुधन विमा योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या मृत गायीच्या पंचनाम्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या, चाकण येथील पशुधन पर्यवेक्षकाला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे.

संजयकुमार गजरे (वय ४७, रा. खेड) असे अटक करण्यात आलेल्या पशुधन पर्यवेक्षकाचे नाव आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयु​क्तिक पशुधन विमा योजनेमध्ये खेड येथील शेतकऱ्याने नाव नोंदवले होते. या शेतकऱ्याच्या गायीचा मंगळवारी मृत्यू झाला. शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळण्यासाठी मृत गायीचा पंचनामा होणे आवश्यक होते.
त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने गजरे यांच्याशी संपर्क साधला. गजरे यांनी पंचनाम्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली. गजरे यांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याशी संपर्क साधला. मृत गायीच्या पंचनाम्यासाठी पशुधन पर्यवेक्षक लाचेची मागणी करत असल्याचे त्यांना सांगितले. सरदेशपांडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पथक चाकणकडे रवाना केले. या पथकाने गजरे यांच्याकडे लाचेच्या रकमेची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये गजरे यांनी साडेसहा हजार रुपयांवर तडजोड केल्याचे आढळून आले. लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गजरे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गजरे यांच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना सरकारी अधिकारी त्यांना कसे नाडतात, याचे उदारहण चाकणमधील या घटनेने उघडकीस आले आहे. कुठल्याही सरकारी कामासाठी कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चाचा वाद शिगेला

$
0
0

अहवालास नकार घटनाविरोधी; महामंडळाची भूमिका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान घेतल्यानंतर महामंडळाचे नियमदेखील स्वीकारले जातात. देशात राहून आम्हाला राज्यघटना मान्य नाही, असे म्हणता येते का,' असा सवाल करून साहित्य संमेलनाच्या खर्चाचा अहवाल देण्यास नकार देणे हा महामंडळाच्या घटनेचा भंग असल्याची टीका महामंडळाच्या भावी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 'एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारे लोक विसंवादी का झाले,' असा खोचक सवालही विचारण्यात आला आहे.
पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडे होता. महामंडळाने संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांच्याकडे खर्चाची विचारणा केली आहे. त्यावर 'कोणाकडूनही एका रुपयाचे अनुदान घेतलेले नाही. सरकारचे २५ लाख रुपये संमेलनाच्या समारोपावेळी महामंडळास परत दिले आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाला हिशेब देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे पैसे वापरलेच नाहीत, तर हिशेब कशाचा देणार' अशी भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली आहे.
'संमेलनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेने देणे बंधनकारक असून, अहवाल महामंडळाला द्यावाच लागेल,' अशी ठाम भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतली आहे. महामंडळाच्या याच भूमिकेची री ओढून महामंडळाच्या भावी पदाधिकाऱ्यांनी देखील आयोजक संस्थेने संमेलनाचा खर्च देणे बंधनकारक असून तो नियम असल्याचे स्पष्ट केले. महामंडळाचे कार्यालय ३० एप्रिल रोजी विदर्भ साहित्य संघाकडे जाणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्रीपाद जोशी यांचे नाव चर्चेत आहे. साहित्य संमेलनाच्या खर्चावरून वाद निर्माण झाला असताना, महामंडळाची भूमिका काय असेल, याबाबत डॉ. जोशी यांना विचारणा केली असता, 'आयोजक संस्थेला खर्चाचे तपशील द्यावेच लागतील,' अशी स्पष्ट भूमिका त्यांनी 'मटा'शी बोलताना मांडली.
'महामंडळाच्या संमेलनविषयक नियमात याबाबत तरतूद असून संमेलनाचा खर्च सादर करणे ही प्रक्रिया आहे. महामंडळाच्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान घेतल्यानंतर महामंडळाचे नियम देखील स्वीकारले जातात. त्यामुळे नियमाच्या आधीन राहून आयोजकांनी खर्च सादर करायला हवा. राज्य सरकारचे पैसे घेतले की नाही हा मुद्द नाही. कागद आणि नियम काय बोलतात, हे अधिक महत्त्वाचे ठरते,' या कडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस खरेदीचाच अट्टहास का?

$
0
0

पीएमपी सक्षमीकरणासाठी डेपो, अत्याधुनिक वर्कशॉपही आवश्यक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सक्षमीकरणासाठी बस डेपो आणि वर्कशॉपची संख्या वाढविणे तसेच, अस्तित्वात असलेले वर्कशॉप अद्ययावत करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पीएमपी प्रशासनाने कर्ज उभारणीचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र, बस डेपो आणि वर्कशॉप या आवश्यक गोष्टींना फाटा देऊन केवळ बस खरेदीलाच मान्यता दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीच्या सक्षमीकरणाची गरज आहे. मात्र, केवळ बसची संख्या वाढविल्याने पीएमपी सक्षम होणार नाही. तर, रस्त्यावर येणाऱ्या बसची देखभालदुरुस्ती करण्यासाठी अत्याधुनिक आणि चांगल्या वर्कशॉपची गरज आहे. सध्या पीएमपीच्या शेकडो बस बंद आहेत. दररोज ब्रेक डाउन होणाऱ्या बसचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे सुसज्ज वर्कशॉप ही काळाची गरज आहे. तसेच, सध्या पीएमपीच्या बसचा विनाउत्पन्न प्रवास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा विनाकारण होणारा तोटा कमी करण्यासाठी ठिकठिकाणी डेपो उभारावे लागतील, अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली होती.

त्यासाठी खासगी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने यापूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत दोनदा ठेवला होता. पहिल्या बैठकीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करू इच्छिणाऱ्या कंपनीने त्यांची मार्जिन रक्कम कळविली नसल्याने, कर्ज घेण्याचा निर्णय राखून ठेवण्यात आला. दुसऱ्या बैठकीत एका बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असतानाही काही तांत्रिक कारणे पुढे करून निर्णय राखून ठेवण्यात आला. आता कर्ज घेण्याबाबत एक समिती नेमण्यात आली असून, त्या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयावरून पीएमपी संचालक मंडळाकडून कर्ज उभारण्याबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
-----------
खासगी कर्जउभारणी का नाही?

पीएमपीच्या ताफ्यात आता १२०० बस दाखल केल्या जाणार आहेत. त्यापैकी ७०० बस नवीन असणार आहेत. त्यासाठी हप्तेबंद पद्धत किंवा दीर्घ कर्जाचा अवलंब केला जाणार आहे. थोडक्यात, आता देखील कर्ज घेऊनच बसची खरेदी केली जाणार आहे. असे असताना, पीएमपी प्रशासनाने खासगी वित्तीय संस्थाकडून कर्ज उभारणीस मान्यता का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी आयुक्तांची बदली़

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नवी मुंबई महापालिकेचे सध्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत जाधव यांची बदली करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहेत.

राज्यातील ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये आयुक्त जाधव यांचाही समावेश आहे. त्यांची नाशिकला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, जाधव यांची बदली रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती महापौर शकुंतला धराडे आणि पक्षनेत्या मंगला कदम यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार जाधव यांनी आठ फेब्रुवारी २०१४ रोजी स्वीकारला. त्या वेळी राजकीय दबावातून डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यामुळे जाधव यांना कसरत करावी लागण्याची चिन्हे होती. त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले. त्यामुळे हेच आयुक्त त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशी अपेक्षा सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला होती. परंतु, ती अपेक्षा फोल ठरवित मुख्यमंत्र्यांनी वाघमारे यांची नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षांना धक्का दिला आहे. गेल्या वर्षभरात शहरातील विकासकामांना गती मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या बजेटविषयीदेखील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे विकासकामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी सर्वच सदस्यांची मागणी आहे. 'नवीन आयुक्त चांगलेच असतील. त्यांना विरोध नाही. परंतु, कोणतीही कामे तातडीने मार्गी लावताना त्यांना अडथळा निर्माण होणार आहे. या परिस्थितीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणे संयुक्तिक होणार आहे,' असा मुद्दा उपस्थित करून महापौर धराडे आणि पक्षनेत्या कदम यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या मागणीला सर्वपक्षीय सदस्य पाठिंबा देतील, असा दावाही त्यांनी केला.

'कार्यकाळ पूर्ण करू द्या'
महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात बहुतांशी विकासकामे मार्गी लागली असून, ती वेगात चालू आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास सात ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी कामे वेगाने व्हावीत, अशी सर्वच नगरसेवकांची मागणी आहे. त्यामुळे जाधव यांना त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत.
- मंगला कदम (सत्तारूढ पक्षनेत्या) पिंपरी-चिंचवड महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शवविच्छेदन विभागाचे दोन डॉक्टर निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागाचे डॉ. राजेश शहारे व डॉ. श्रीराम भंडारे यांचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी (२३ एप्रिल) चिमुरडीच्या शवविच्छेदन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी (२७ एप्रिल) यांनी दोघा डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. शवविच्छेदनासाठी सात शव रुग्णालयात आल्यानंतरही संबंधित दोन्ही डॉक्टर कामावर असतानाही गैरहजर असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या वायसीएमला कायम सेवेत ३३ डॉक्टर आहेत तर सरकारी कंत्राटी ७३ व इतर कंत्राटी मिळून असे १५० डॉक्टर असून, शवविच्छेदन विभागाच्या कामासाठी १५ डॉक्टरांच्या भरतीचे आदेश आयुक्तांनी काढले असल्याचे डॉ. राय यांनी सांगितले. हे डॉक्टर दर तीन महिन्यांनी पाच अशा रोटेशन पद्धतीने वायसीएमला काम करतील. सध्याही पाच डॉक्टर या ठिकाणी कार्यरत आहेत, असेही डॉ. रॉय यांनी सांगितले. शनिवारी आठ महिन्यांच्या बालिकेच्या शवासह सात शवांना व नातेवाइकांना डॉक्टर अनुपस्थित असल्याने १२ तास ताटकळत राहावे लागले होते. माध्यमे व राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images