Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिवसा उन्हाळा; रात्री हिवाळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमाल तापमानात झालेली लक्षणीय वाढ आणि त्याच वेळी किमान तापमान मात्र कमी असे चित्र असल्याने शहरात सध्या दुपारी उन्हाळा आणि रात्री हिवाळा असे वातावरण आहे. गेल्या आठवड्यापर्यंत दुपारीही गारठा अनुभवणाऱ्या पुणेकरांना गेले दोन-तीन दिवस दुपारी पंखे लावायची वेळ आली आहे.

गेल्या आठवड्यात कमाल तापमान २५ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान होते; तर किमान तापमान सात ते नऊ अंशांच्या दरम्यान होते. या आठवड्याच्या सुरुवातीपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. गेले दोन दिवस तर पारा ३४ अंश सेल्सियसपर्यंत गेला आहे. त्यामुळे दिवसा प्रचंड ऊन कमी जाणवत आहे. त्याच वेळी किमान तापमान मात्र दहा ते अकरा अंशांवर स्थिरावल्याने रात्रीचा गारठा कमी झालेला नाही. कमाल आणि किमान तापमानात तब्बल २४ अंशांचा फरक आहे.

पुण्यात शुक्रवारीही कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सियस, तर किमान तापमान १०.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. शहरात पुढील दोन दिवसांतही कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस, तर किमान तापमान ११ अंश सेल्सियस इतके राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान जळगाव येथे ९.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. कोकण आणि विदर्भातही किमान तापमानात घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवार पळवापळवीला उधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान घडणारे उमेदवार पळवण्याचे प्रकार साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीदरम्यानही घडू लागले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या माधव राजगुरू यांच्यावरून प्रा. मिलिंद जोशी आणि सुनील महाजन यांच्या पॅनेलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 'माधव राजगुरू आमचेच' असा दावा दोन्ही पॅनेलकडून करण्यात येत आहे.

परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीवरून वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रा. मिलिंद जोशी-आणि विद्यमान कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्या पॅनेलमध्येच खरी लढत होणार आहे. जोशी यांच्या परिवर्तन आघाडीतील उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. तरीदेखील स्थानिक कार्यवाह पदासाठी बिनविरोध निवडून आलेल्या माधव राजगुरूंचे नाव परिवर्तन पॅनेलमध्ये दाखवल्याने महाजन यांनी त्यास आक्षेप घेतला आहे. राजगुरू आपल्याच पॅनेलमध्ये असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. आपल्याकडे राजगुरू यांच्या पाठिंब्याचे पत्र पुरावा म्हणून आहे. ते लवकरच सादर करून परिवर्तन पॅनेलचा खोटेपणा उघडकीस आणणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

असे पत्र कोणालाच देता येत नाही; राजगुरू हे आमच्याच पॅनेलमधील उमेदवार आहेत, असा दावा परिवर्तन पॅनेलच्या प्रकाश पायगुडे यांनी केला. या रस्सीखेचीत राजगुरू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

..

महाजन यांचे 'नवनिर्माण'

सुनील महाजन यांचे 'नवनिर्माण' पॅनेलमधून मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असून, या पॅनेलमध्ये राजीव बर्वे (कार्याध्यक्ष), सुनील महाजन ( प्रमुख कार्यवाह), योगेश सोमण (कोषाध्यक्ष), दीपक करंदीकर ( स्थानिक कार्यवाह क्र १), बंडा जोशी (स्थानिक कार्यवाह क्र.२ ) उद्धव कानडे (स्थानिक कार्यवाह क्र. ३ ) प्रमोद आडकर (स्थानिक कार्यवाह क्र. ६) , डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. सतीश

देसाई, शिरीष चिटणीस (शहर प्रतिनिधी) हे संभाव्य उमेदवार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी ‘एसपीव्ही’; मगच केंद्राचे अनुदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) अनिवार्यच आहे. त्याशिवाय केंद्राचे अनुदान प्राप्त होणार नाही यावर शुक्रवारी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेशमधील निवड झालेल्या तिन्ही शहरांनी यापूर्वीच 'एसपीव्ही' स्थापन केली असून, लवकरात लवकर 'एसपीव्ही' स्थापन करणाऱ्या शहरांनाच तातडीने निधी उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट झाले.

नगरविकास विभागाच्या केंद्रीय सचिवांनी स्मार्ट सिटीत निवड झालेल्या महानगरपालिकांच्या सर्व आयुक्तांशी शुक्रवारी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे संवाद साधला. यामध्ये, शक्य तेवढ्या लवकर 'एसपीव्ही' स्थापन करा, अशा आशयाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 'एसपीव्ही' लवकर स्थापन झाल्यास केंद्रातर्फे लगेच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झालेल्या सर्व शहरांना पहिल्या वर्षी केंद्राकडून दोनशे कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. तेवढाच निधी, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभा करायचा आहे. स्थानिक महापालिका आणि राज्य सरकारच्या पुढाकारानेच 'एसपीव्ही'ची स्थापना होणार असल्याने सर्व निधी त्याच खात्यात जमा केला जाईल. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात नमूद केलेल्या योजनांसाठीच हा निधी वापरता येईल, असेही स्पष्ट केले गेले.

'एसपीव्ही' कशा पद्धतीने स्थापन करावी, त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा-लोकप्रतिनिधींचा समावेश असेल, या बाबत नगरविकास विभागाने नव्याने 'मार्गदर्शक तत्त्वे' जाहीर केली आहेत. त्याचा आधार घेऊन स्मार्ट सिटीतील शहरांना 'एसपीव्ही' स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीत निवड झालेल्या मध्य प्रदेशमधील जबलपूर, इंदूर आणि भोपाळ या तिन्ही शहरांनी 'एसपीव्ही'ची स्थापना केल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यानुसार, इतर शहरांनी 'एसपीव्ही' स्थापनेबाबत 'स्मार्ट'नेस दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

................

एसपीव्हीच्या स्थापनेबाबत केंद्राने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यांचा सविस्तर अभ्यास करून पुण्यासाठी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

कुणाल कुमार

आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लीगल विंग्ज ठरेल वकिलांना उपयुक्त’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वकिलीच्या क्षेत्रात येणारे वकील अभ्यासू आणि तत्पर आहेत. कोर्टात अडीच वर्षांच्या प्रॅक्टिसचा अनुभव असताना वकिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तरुण वकिलाने सुरू केलेले लीगल विंग्ज अॅप राज्यातील तसेच, देशातील वकिलांनाही दिशादर्शक ठरेल,' असे मत पुणे जिल्हा कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे बार असोसिएशनतर्फे शिवाजीनगर जिल्हा कोर्टात आयोजित कार्यक्रमात अॅड. रोहित माळी या तरुण वकिलाने सुरू केलेल्या 'लीगल विंग्ज' या अॅपचे लोकार्पण सुमंत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, अॅड. हेरंब गानू, सचिव अॅड. राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे, अॅड. संदेश जायभाय, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रशांत माने उपस्थित होते. लीगल विंग्ज अॅप विकसित करण्यासाठी तांत्रिक सहायक म्हणून काम पाहिलेल्या नीलेश बोरकर आणि स्वप्निल शेंडे या तरुणांचाही सत्कार या वेळी सत्कार करण्यात आला.

'वकिली क्षेत्रात येणारे तरुण अभ्यासू आहेत. त्यांच्याकडून तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला जातो. या अॅपमुळे वकिलांना कायदेविषयक चांगली माहिती सहज उपलब्ध होईल. अॅपच्या वापराममुळे कोर्टातील कामकाजात अधिक सुलभता येईल,' असे कोल्हे म्हणाले. 'या अॅपमुळे वकिलांना कायदेविषयक माहिती सहज उपलब्ध होईल,' असा विश्वास अॅड. माने यांनी व्यक्त केला. कायद्याचा मतितार्थ समजून घेण्यासाठी सिनिअरची आवश्यकता असून त्यांनी ज्युनिअर वकिलांना मार्गदर्शन केले पाहिजे, असेही अॅड. माने म्हणाले. अॅड. रोहित माळी यांनी अॅपच्या निर्मितीतील टप्पे उलगडून सांगितले.

..

ग्रुप चॅटचीही सुविधा मिळणार

या अॅपमध्ये नव्याने काही सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामध्ये अॅडव्होकेट डायरी, रिमाइंडर, ग्रुपचॅट आदींचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुण्याची वाढीव पाणीकपात टळली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता, पुण्याच्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले, तरी तूर्तास पुणेकरांवरील हे संकट टळले आहे. शहराच्या पाणीकपातीमध्ये सध्या वाढ करण्याची गरज नसून, आगामी पाच महिन्यांच्या सविस्तर नियोजनासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हाधिकारी सौरव राव यांनी काही दिवसांपूर्वी शहराच्या पाणीकपातीमध्ये वाढ करावी लागेल, असे सूतोवाच केले होते. त्यावरून, पुण्याचे पाणी पुन्हा पळविले जात असल्याचा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर, धरणांतील पाणीसाठ्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता, तूर्त तरी पाणीकपातीमध्ये वाढ करण्याची गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा बापट यांनी दिला.

'धरणांत सध्या उपलब्ध असलेले पाणी जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात बाष्पीभवनामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणून, सर्वच नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा'' असे आवाहन बापट यांनी केले. धरणांतील संपूर्ण पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आला असला, तरी ग्रामीण भागांतील नागरिकांनाही पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. दौंड, इंदापूर, शिरूर या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. परंतु, आत्ताच पाणी सोडले, तर जून-जुलैमध्ये पाऊस लांबल्यास त्यांना पाणी कसे देणार हा प्रश्न आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रायणी, पवनेचीही ‘जायका’कडून शुद्धी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी 'जायका'चे सहकार्य मिळणार असल्याने त्याच धर्तीवर भीमा नदीला मिळणाऱ्या इंद्रायणी आणि पवना या दोन नद्यांच्या शुद्धीकरणासाठीचा सविस्तर प्रस्तावही 'जायका'कडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील नागरिकांना शुद्ध पाणी वापरायला मिळू शकेल, असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी केला.

'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा'चे (पीएमआरडीए) अध्यक्ष गिरीश बापट यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच जपान दौरा केला. या दौऱ्यामध्ये जपानमधील विविध कंपन्यांना भेटी देण्यात आल्या असून, त्याद्वारे पीएमआरडीएच्या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा बापट यांनी पत्रकार परिषदेत केला. पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश झगडे आणि विवेक खरवडकर यावेळी उपस्थित होते.

'जायकातर्फे यापूर्वीच मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या नद्या पुढे भीमा नदीला मिळतात. या नद्यांसह इंद्रायणी आणि पवना या नद्याही भीमेला मिळतात. त्यामुळे, केवळ मुळे-मुठेचे नाही, तर इतर नद्यांमधून भीमेला मिळणारे पाणीही शुद्ध असायला हवे, या हेतूने जायकाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे,' असे बापट यांनी सांगितले. जपानमधील अनेक कंपन्यांची मुख्य संस्था असलेल्या 'जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन'च्या (जेट्रो) पदाधिकाऱ्यांशीही भेट या दौऱ्यात घेण्यात आली. या कंपन्यांतर्फेही पुण्यातील काही भागांची भविष्यात पाहणी केली जाणार असून, योग्य जागा उपलब्ध झाल्यास त्यांच्यातर्फे गुंतवणूक केली जाईल. त्यातून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

..............

'इतरांनाही दौऱ्यावर पाठवू'

पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचा समावेश होतो. परंतु, पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार वगळता इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश या दौऱ्यात नव्हता. त्याबाबत विचारले असता, 'हा प्राथमिक स्वरूपाचा दौरा होता. यापुढील टप्प्यात सातत्याने जपानला जावे लागणार आहे. त्यावेळी, महापालिकांमधील इतर पदाधिकाऱ्यांना पाठवू', असा खुलासा बापट यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिश कौन्सिलतर्फे आज, उद्या कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलांमधील कुतूहल जागे करण्यासाठी 'चूझ टू थिंक'तर्फे आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) 'क्युरिऑसिटी सेव्ह्ज द कॅट!' ही कार्यशाळा ब्रिटिश कौन्सिलमध्ये आयोजिण्यात आली आहे.

पालक, शिक्षक आणि पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी काम करणारे कोणीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. शनिवार आणि रविवारी दोन्ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रोड) ब्रिटिश कौन्सिलमध्येच ही कार्यशाळा होणार आहे. अध्ययनप्रक्रिया सुलभ होण्यासाठी, समाजातील विविध गटांतील लोकांशी संवाद साधण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी मुलांमधील कुतूहल जागे करणे गरजेचे असते. ते कसे जागे करावे, याच्या काही टिप्स या कार्यशाळेत मिळतील. संवाद सत्रे, प्रश्नमंजूषा असे काही उपक्रमही कार्यशाळेत असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या चित्रांनी स्टेशन ‘गजबजणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशनला जागतिक दर्जाचे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना, सुशोभिकरणासाठी 'एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग'च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून पुण्याची सांस्कृतिक आणि आधुनिक ओळख, सामाजिकता, लोककला, स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्य या विषयांशी संबंधित आकर्षक चित्रे स्टेशनच्या आवारात साकारली जाणार आहेत.

'एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग'च्या विद्यार्थ्यांनी साकारलेले पहिले चित्र पुणे स्टेशनवरील उच्चश्रेणी प्रतीक्षालयात शुक्रवारी लावण्यात आले. त्यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. चित्र काढण्यासाठी स्टेशन आणि परिसरात अनेक जागा आहेत. त्यातील भिंतीवर येत्या काळात अशा प्रकारची चित्रे काढण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाचा स्टेशनच्या सुशोभिकरणासाठी मोठा फायदा होणार आहे. पुढील काळात या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था सहभागी होणार असल्याची माहिती दादाभॉय यांनी दिली. रेल्वेचे वरिष्ठ उपव्यवस्थापक गौरव झा, कॉलेजच्या संचालक रंजना दाणी आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच, स्टेशनवरील वातावरण वातावरण प्रसन्न राहावे, या दृष्टिने 'एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग'च्या विद्यार्थ्यांनी काही संकल्पनांवर आधारित चित्रे रेल्वे स्टेशनच्या आवारात साकारण्याची (वॉल पेंटिंग) इच्छा व्यक्त केली. त्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला. रेल्वे स्टेशनच्या आवारात शक्य तितक्या ठिकाणी, चित्रे साकारण्यास आमचे प्राधान्य राहील, असे दादाभॉय यांनी सांगितले. पुणे स्टेशननंतर शहरातील अन्य स्टेशनांवरही चित्र साकारण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे दाणी यांनी सांगितले. उपक्रमात रोहित गिरासे, रसिका पवार, स्वरुप कोठारी, निरंजन चक्रवर्ती, पौर्णिमा बडवे आणि प्रियांका कुरेकर हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण भागात ‘एनए’ रद्द?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक विकास आराखड्यातील गावांमध्ये बांधकाम परवानगीसाठी बिगरशेतीची (एनए) अट रद्द करण्याबरोबरच ग्रामीण भागात बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी पोलिसांचा समावेश असलेली पथके नेमण्यासंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली.

राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेचा समारोप शुक्रवारी झाला. त्यावेळी श्रीवास्तव यांनी महसूल विभागाने परिषदेत घेतलेले निर्णय, राज्य सरकारला करण्यात येणाऱ्या प्रशासकीय शिफराशी, लोकाभिमुख प्रशासनासाठी करण्यात येणारे सकारात्मक बदल आणि सरकारच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शहरांच्या विकास आराखड्यानुसार बांधकाम परवानगी देताना 'एनए'ची अट रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक विकास आराखड्यातील (आरपी) बांधकामांना परवानगी दिल्यानंतर 'एनए' अट रद्द करण्यात यावी. आरपीमधील बांधकाम आराखडे जिल्हाधिकारी मंजूर करतात. त्यामुळे त्यांच्याकडूनच पुन्हा 'एनए' परवानगी घेण्याची गरज नाही. तशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

'महसूल प्रशासनाचे सक्षमीकरण करताना बेकायदा बांधकामे व गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व उपविभागीय स्तरावर पोलिसांचा समावेश असलेले पथक स्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन कर्मचारी भरती करावी लागणार आहे. त्याला वित्त विभागाचा आक्षेप असल्याने ही पथके स्थापन करता आलेली नाही. त्यासाठी नवी भरती न करण्याचा निर्णय शिथिल करण्यात यावा. तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येणार आहे,' असे श्रीवास्तव यांनी नमूद केले.

..

'ई-फेरफार ३१ मार्चपर्यंत पूर्ण'

ई-फेरफार योजनेमध्ये ३५८ पैकी ३०७ तालुक्यांचे काम पूर्ण झाले आहे. ३१ मार्चपर्यंत हे काम करण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय भूमि अभिलेख कार्यक्रमांतर्गत राज्यातील २६ कोटी अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. याशिवाय, सेवा हमी कायद्यातील सर्व सेवा २ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

..

इझ ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत भोगवटा वर्ग-२ च्या जमिनींचा डेटा ३१ मार्चपर्यंत तयार करण्यात येणार आहे. ही माहिती ग्रामपंचायतींपर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे एनए परवानगी देणे सुलभ होणार आहे.

मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव, महसूल विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय घटनेबद्दल विक्रमी भाषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय संविधान, राष्ट्रविकास अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 'भारतीय संविधान' या विषयावर सलग १६ तास ३० मिनिटे बोलण्याचा विक्रम केला आहे. पगारे यांनी २५ जानेवारीला सकाळी पावणेआठ वाजता संविधान हा विषय मांडण्यास सुरुवात केली आणि २६ जानेवारीला रात्री साडेबाराला त्यांचे भाषण थांबले.

मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन येथे झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजसेवक भाई वैद्य अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. पगारे यांनी भारतीय संविधान हा विषय मांडताना संविधानाचे विश्लेषण, त्याच्याशी संबंधित माहिती, संविधान निर्मिती प्रक्रिया, संविधान समितीतील सदस्यांच्या भूमिका अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. संविधान परिचयाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेता म्हणून काय अपेक्षा होती, हेदेखील डॉ. पगारे यांनी आवर्जून सांगितले. 'डॉ. आंबेडकरांनी आपल्या हयातीतच हा इशारा दिला होता, की एखादा महापुरुष जन्मभर तुमच्यासाठी लढला, तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करू नका. व्यक्तिपूजेपासून दूर राहा. संविधान समितीतील सर्व सदस्यांना एकत्र घेऊन काम करण्याबाबत व संविधानाचा अभ्यास करून त्याची रचना करण्यासाठी स्वातंत्र्य दिल्याबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद यांची डॉ. आंबेडकर यांनी मनापासून स्तुती केली होती,' असे डॉ. पगारे यांनी सांगितले.

'कोणतीही पक्षव्यवस्था राष्ट्रापेक्षा मोठी होऊ नये अथवा असू नये. पक्षाचे महत्त्व राष्ट्रहितापेक्षा व लोकशाहीहून अधिक असू नये, असे ठाम मत डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केले होते. कोणत्याही गोष्टीला विरोध दर्शवताना तो संविधानीय पद्धतीनेच सोडवला पाहिजे. क्रांतिकारी पद्धतीने आंदोलने केल्यास राष्ट्र पारतंत्र्यात जाण्याची शक्यता असते, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली होती,' असे डॉ. पगारे यांनी सांगितले. सलग सोळा तास 'भारतीय संविधान' या विषयाची मांडणी करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. पगारे ही पहिलीच व्यक्ती असून, हा जागतिक विक्रम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसात २५ गड सर

$
0
0

दिवसात २५ गड सर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर आणि नाशिक जिल्ह्यातील २५ गडकोटांची भ्रमंती एकाच दिवसात करण्याची आगळी-वेगळी मोहीम 'गिरीकूजन' संस्थेच्या मावळ्यांनी नुकतीच फत्ते केली. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सभासदांनी वेगवेगळे गट करून पंचवीस गडांना गवसणी घातली.
कलाडगड, भैरवगड (अंबीत), आड, पट्टा, मोरधन, त्रिंगलवाडी, कावनई, रांजणगिरी, अंजनेरी, वाघेरा, खैराई, रामसेज, हातगड, अचला, अहिवंत, मार्कंड्या, कण्हेरा, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचन-मांचन, इंद्राई, चांदवड, प्रेमगिरी, भिलाई आणि चौल्हेर अशा २५ गडांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या २५ गडांवर गिरीकूजन संस्थेचा ध्वज प्रथमच फडकणार होता. त्यासाठी संस्थेच्या ७५ सदस्यांचे २५ गट तयार करण्यात आले होते. या गटांमध्ये वय वर्षे १२ ते ७० या वयोगटातील ट्रेकर्सचा सहभाग होता. मोहिमेतील २५ गडांव्यतिरिक्त ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड आणि रायगड आदी पाच मोक्याच्या गडांवर संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांनी भगवा फडकावला.
स्थानिकांशी संवाद साधून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, गडांवरील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या तसेच इतर कचऱ्याची साफसफाई करणे असे उपक्रमही राबविण्यात आले. मोहिमेचे नेतृत्व संस्थेचे सदस्य तीर्थराज जोशी यांनी केले. 'संस्थेचे सचिव एव्हरेस्टवीर आनंद माळी यांचे मार्गदर्शन या मोहिमेसाठी मिळाले. मोहिमेतील २५ गड पुण्यापासून दूर असल्याने तिथे ट्रेक्स आयोजिले गेले नव्हते, ही गोष्ट मनाला सलत होती. त्यामुळे या गडांवर मोहीम काढायचे ठरले. योग्य नियोजन, कुशल नेतृत्व, सुसंवाद आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी झाली,' अशी माहिती संस्थेचे वैभव देशपांडे आणि अनिकेत कुलकर्णी यांनी दिली.
...................
चौल्हेरवर महिलांचा झेंडा
गिरीकूजन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिनित्त आयोजित 'एका दिवसांत २५ किल्ले' या मोहिमेत संस्थेच्या महिला सदस्यांनी वेगळा गट बनवून चौल्हेर किल्ला सर केला. या मोहिमेत सह्याद्री आणि निसर्गाचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले, अशी प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्यक्त केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गानसरस्वती महोत्सवात किशोरीताईंचे गायन

$
0
0

गानसरस्वती महोत्सवात किशोरीताईंचे गायन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 'गानसरस्वती' महोत्सवात यंदा किशोरीताईंचे अमृतमयस्वर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पाच ते सात फेब्रुवारी या कालावधीत स्वरांचा हा महोत्सव रंगणार असून अखेरच्या दिवशी किशोरी आमोणकर यांच्या स्वरांची अनुभूती रसिकांना मिळेल.
यंदाचा गानसरस्वती महोत्सव महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. 'हार्मन' आणि 'फ्लीटगार्ड' या संस्थांचे सहकार्य महोत्सवाला मिळाले आहे. महोत्सवाचा प्रारंभ पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता लालगुडी विजयालक्ष्मी यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यानंतर पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन होईल. पहिल्या सत्राचा समारोप दिग्गज कलावंत उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने होईल, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी दिली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता पं. संजीव अभ्यंकर यांच्या सुश्राव्य गायनाने होईल. जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना या वेळी घेता येईल. दुसऱ्या दिवसाची सांगता पं. राजन-साजन मिश्रा यांच्या दमदार गायकीने होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दोन सत्र होणार असून सकाळी नऊ वाजता होणारी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची मैफल रसिकांसाठी पर्वणी असेल. अंतिम सत्राचा प्रारंभ विशाल कृष्णन यांच्या नृत्याविष्काराने होईल, तर त्यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांचे मधुर गायन अनुभवता येईल. या तीन दिवसीय संगीत महोत्सवाची सांगता ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैफलीने होईल.
दरम्यान, यंदाचा 'गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार' ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया व 'गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार' सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांना या महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका नावडीकर म्युझिकल्स, शिरीष ट्रेडर्स, बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर व kyazoonga.com याठिकाणी उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी सवलतीमध्ये तिकीटे उपलब्ध केली जाणार आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या सहा फेब्रुवारी विशेष पासपोर्ट मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पासपोर्ट अर्जधारकांच्या सोयीसाठी पासपोर्ट कार्यालयातर्फे येत्या ६ फेब्रुवारीला (शनिवार) विशेष पासपोर्ट मेळावा आयोजित केला आहे. 'या विशेष पासपोर्ट मे‍‍ळाव्यामध्ये पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर येथील नागरिकांना एक हजार ४५० अपॉइंटमेंट उपलब्ध करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात अपॉइंटमेंटशिवाय येणाऱ्या अथवा 'होल्ड'वर असलेल्या अर्जदारांना प्रवेश मिळणार नाही,' अशी माहिती पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अर्जदारांना येत्या २ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पासपोर्ट कार्यालयाच्या passportindia.gov.in या वेबसाइटवर अपॉइंटमेंट उपलब्ध होणार आहेत. पासपोर्टचे शुल्क नागरिकांना ऑनलाइनच भरावे लागणार आहे. हा मेळावा मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये होणार आहे, असे गोतसुर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेमुला प्रकरणाचे मुद्दाम राजकारण केले’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आगामी काळात चार-पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुका असून, त्या डोळ्यांसमोर ठेवूनच काही राजकीय पक्षांनी रोहित वेमूलाच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे,' अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी शनिवारी केली. यापूर्वी तेथे आठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा कोणत्याही पक्षाचा नेता धरणे आंदोलनासाठी का गेला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर उपस्थित होते. रोहितची आत्महत्या ही दुःखद घटना आहे. त्यासाठी अलाहाबाद कोर्टाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'रोहितच्या पत्रामध्ये कुणाचेही नाव नाही, मात्र ते पत्रातील तपशिलानुसार, ते त्याच्या मित्रांभोवतीच फिरते. मात्र, या प्रकरणास जातीय स्वरूप देऊन राजकारण केले जात आहे. मात्र, याच हैदराबाद विद्यापीठात यापूर्वी १० जणांनी आत्महत्या केली. तेव्हा कोणीच रस्त्यावर उतरले नाही, हे देखील वास्तव आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर दादरीचे प्रकरण उकरून काढण्याचा किंवा पुरस्कार परत करण्याचा प्रकारही थांबला,' असे ते म्हणाले.
'मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेवर मिळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांशी समन्वय ठेवायला पाहिजे. मागासवर्गीय, अपंग यांच्यासाठीच्या शिष्यवृत्ती, विविध प्रकारच्या सोई-सुविधांमध्ये केंद्र सरकारने वाढ केली,'असे गेहलोत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नेत्यांना भाजपने दूर ठेवले

$
0
0

शत्रुघ्न सिन्हांनी 'खामोशी' तोडली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपने राजकारणापासून दूर ठेवले, अशी कबुली देत सध्या आम्ही दबंग आणि सन्मान या दोन्ही स्थितींच्या मध्येच अडकलो आहोत. परंतु, शेवटी विजय आमचाच होणार आहे, अशा शब्दांत भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या 'खामोशी'ला वाट करून दिली.
'भाजप सरकारने तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना राजकारण आणि सत्तेपासून दूर ठेवले आहे का?' या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर सिन्हा यांनी सडेतोड भाष्य केले. 'जोशी, वाजपेयी, अडवाणी हे राजकारणातील आमचे मार्गदर्शक. राजकारणात त्यांना जो मानसन्मान मिळाला, त्यापेक्षा किती तरी पटीने त्याला ते पात्र आहेत. सन्मान मिळविण्यासाठी उपहास, उपेक्षा, तिरस्कार आणि दबंग या चार गोष्टींच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात. सध्या आम्ही सन्मान आणि दबंग यांच्यामध्ये अडकल्याने आम्ही सध्या तरी 'खामोश' आहोत. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनापासून आम्ही सध्या वंचित राहिलो आहोत. पण शेवटी आमचाच विजय होणार आहे. सध्याच्या परिस्थितीविरोधात वेळ आली तरी आम्ही आणखी लढू,' असे ते म्हणाले.
'बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने योग्य चेहरा जनतेसमोर ठेवला नाही. भाजपसमोर काँग्रेस, राजद, जेडीयू यांच्या युतीचे मोठे आव्हान होते. तर बिहारमध्ये नितीश कुमार यांची प्रतिमा चांगली असल्याने निवडणुकीत पराभव झाला. किर्ती आझाद भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. अरुण जेटलींची प्रतिमा चांगली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत त्यांनी कायदेशीर लढा न देता राजकीय लढा देणे गरजेचे होते,' असेही सिन्हा म्हणाले.
'देशाच्या परिस्थितीकडे लक्ष द्या..'
'केंद्रात आलेले नवे सरकार कायद्याबरोबर घटना देखील बदलायला निघाले आहे. जमीन, पाणी हस्तांतरण, खनिज संपत्ती या देशांतील नेत्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न आहे. शास्त्र, विज्ञान, कायदा, घटना यांच उल्लंघन करून विकासाचे ढोल वाजविले जात आहेत. पाणी, पेप्सी, कोकाकोला पिऊ नका. चुकीच्या गोष्टींच्या विरोधात खामोश राहू नका,' अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तरुणांना आवाहन केले. पठाणकोट हल्ला आणि चीनच्या सीमेवर सैन्यांशी कुरघोडी सुरू आहे. त्याकडे लक्ष न देता देशांतर्गत काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. समता आणि न्यायाचा आदर करा. आंदोलनाला की राजकारणाला महत्त्व देणार असा सवाल विद्यार्थ्यांना मेधा पाटकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माधव राजगुरूंच्या नावाचा गैरवापर

$
0
0

संबंधितांवर कारवाई करण्याचा नवनिर्माण पॅनलचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक कार्यवाह पदासाठी माधव राजगुरू स्वत:च्या कर्तृत्वाने बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, असे असताना परिवर्तन पॅनेलने त्यांच्या नावाचा गैरवापर केला असून या विरोधात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' असा इशारा नवनिर्माण पॅनेलच्या सुनील महाजन यांनी शनिवारी दिला. मतदार यादीमधील पाटण शाखेच्या १३१ जणांचे पत्ते एकसारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजगुरू यांच्या नावाचा परस्पर वापर झाल्याच्या निषेधार्थ नवनिर्माण पॅनेलच्या राजीव बर्वे, महाजन, योगेश सोमण, अॅड. प्रमोद आडकर, तुकाराम पाटील, भगवान राऊत व बंडा जोशी यांनी परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. राजगुरू यांच्या पाठिंब्याचे पत्र पुरावा म्हणून दाखवत महाजन यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.
परिवर्तन पॅनेलच्या प्रकाश पायगुडे यांनीही राजगुरू यांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर केले आहे. पायगुडे यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होण्याची माझी इच्छा होती, पण आमच्यात संवाद होऊ शकला नाही. बर्वे यांच्या पॅनेलमध्ये माझे नाव असताना पायगुडे यांच्या पॅनेलमध्ये माझे नाव आले असले तरी त्यात कोणाचा दोष नाही. माझ्या नावाचा संदर्भ घेऊन राजकारण केल्यास पदाचा राजीनामा देईन, असे यात म्हटले आहे.
..
खोट्या सह्या करून कागदपत्रे सादर करण्याचा प्रकार यापूर्वीही साहित्य परिषदेत घडला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार असेल तर साहित्य परिषद कुठे नेऊन ठेवणार ?
- सुनील महाजन
--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणा चांगल्या, पण कृती हवी

$
0
0

मोदी सरकारला चंद्राबाबूंचा टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियानासारख्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या घोषणा चांगल्या आहेत. पण या घोषणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती हवी,' अशा शब्दांत आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारला टोला लगावला.
आंध्रप्रदेश राज्य नव्याने प्रस्थापित झाले आहे. राज्याला राजधानी नसल्याने अमरावती शहराला आम्ही राजधानी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येत्या २०५० पर्यंत अमरावती हे आंध्रप्रदेशाची राजधानी तर देशातील उत्कृष्ट शहर म्हणून उदयाला येईल. तसेच ग्रीन सिटी म्हणून हे शहर आम्ही विकसित करणार असल्याचा मानस चंद्राबाबू नायडू यांनी बोलून दाखविला.
माइर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी नायडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 'आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार'पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते.
'देशाच्या राजकारणाच्या इतिहासात मोदींनी क्रांती घडवून बिगर कॉँग्रेसचे सरकार म्हणून सत्तेवर आले. मोदी सरकारने दिलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत सारख्या घोषणा निश्चितच चांगल्या आहेत. पण त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृतीची जोड हवी. आंध्रप्रदेश या राज्याची नव्याने निर्मिती करताना अडचणी अनेक होत्या. पण अडचणी याच संधी मानून आम्ही पुढे चालत आहोत,'असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

$
0
0

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वानवडी येथील एका पाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न एका रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश येथे भीक मागण्यासाठी आरोपी तिला घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन वानवडी पोलिसांकडे दिले आहे. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमीत मुरली मनोहर खन्ना (२१, रा. रामनगर, चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील सीटीसी हॉस्पिटल परिसरात मुलीचे वडील राहतात. ते वानवडीतील लष्कराच्या क्वाटर्समध्ये हाउसकिपिंगचे काम करतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित मुलगी सीटीसी हॉस्पिटल समोर खेळत होती. आरोपीने तिला बिस्किटाचे आमिष दाखवले आणि तिला घेऊन रेल्वे स्टेशनवर आला. त्यानंतर लखनौ एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात तो चढला. पीडित मुलगी खूप रडत असल्याने रेल्वे पोलिस विनोद पानसरे यांना खन्ना याचा संशय आला.
पानसरे यांनी आरोपीकडे मुलीबाबत चौकशी केली. त्या वेळी खन्ना याला नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने मुलीला भीक मागण्यासाठी पळवले असल्याचे सांगितले.
रेल्वे पोलिसांनी खन्नाला ताब्यात घेऊन घटनेची माहिती वानवडी पोलिसांना दिली. वानवडी पोलिस व मुलीचे आई वडील आल्यानंतर मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खन्ना हा पुण्यात वॉचमनचे काम करत होता. तसेच, तो सतत काम बदलत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बी. के. मुठे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर पॉलिसीतून बीडीपी, हिलटॉप वगळले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका क्षेत्रात आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्याच्या नव्या धोरणामधून जैवविविधता उद्यान (बीडीपी), हिलटॉप हिलस्लोप आणि सीआरझेडमधील आरक्षणे वगळण्यात आली आहेत. या आरक्षणांचा जमीनमालकांना मोबदला देण्याचा स्वतंत्र निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे.
महापालिकांच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला टीडीआर स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दाट लोकवस्तीच्या भागात तिप्पट आणि विरळ लोकवस्तीमध्ये दुप्पट टीडीआर दिला जाणार आहे. तसेच हा टीडीआर रस्ता रूंदी आणि प्लॉटच्या आकाराप्रमाणे वापरण्याचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे.
आरक्षणांच्या मोबदल्यात निर्माण होणारा टीडीआर कोठे वापरता येईल याच्याही स्पष्ट सूचना यासंदर्भातील अधिसूचनेत करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील ०.७५ पेक्षा कमी चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) असलेल्या भागांमध्ये टीडीआर वापरास मनाई करण्यात आली आहे. याचाच अर्थ ०.७५ व त्यापेक्षा अधिक एफएसआय असलेल्या जागांवरच हा टीडीआर वापरास मुभा आहे.
महापालिका हद्दीतील शेती झोन, शेती व ना विकास झोन, ग्रीन झोनमध्ये नवीन धोरणानुसार टीडीआर वापरता येणार नाही. महापालिकेच्या समाविष्ट गावांतील टेकड्यांवर 'बीडीपी'चे आरक्षण टाकण्यात आले आहे. 'बीडीपी'मध्ये बांधकाम परवानगी देण्यापासून टीडीआर देण्यापर्यंत मतमतांतरे आहेत. 'बीडीपी'त बांधकाम परवानगी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. पण ही जागा ताब्यात घेण्यासाठी किती टीडीआर दिली जाणार हा विषय अजून आधांतरीच आहे. नव्या टीडीआर धोरणात याचा समावेश झालेला नाही. 'बीडीपी'मध्ये नव्या भूसंपादन कायद्याच्या आधारे जमिनीच्या आरक्षणाचा मोबदला मिळावा अशी मागणी आहे. नगर रचना संचालकांनीही 'बीडीपी'मध्ये जादा टीडीआर देण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर बीडीपी व हिलटॉप हिलस्लोपसाठी स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीतील नद्यांच्या ब्लू लाईन तसेच सागरी नियंत्रण झोनमध्ये टीडीआर वापरावर मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्र व राज्य सरकार आणि संरक्षण विभागाने अधिसूचित केलेल्या परिसरामध्ये हा टीडीआर वापरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संघाने महात्मा स्वीकारला असता, तर वाद संपले असते’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महात्मा गांधीजींचा फोटो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हेडगेवार, गोळवलकरांच्या शेजारी असतो ही चांगली गोष्ट आहे. परंतु, संघाने जर गांधीजींमधील महात्मा स्वीकारला असता तर सगळे वादच संपले असते,' असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी सांगितले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त 'महात्मा गांधी व स्वातंत्र्य लढा' या विषयावर डॉ. सबनीस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आमदार अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते.
'गांधीजी हे नोबेल विजेत्यांसह अनेकांची प्रेरणा आहेत. परदेशातील लोक त्यांना आदर्श मानतात. मात्र, पुण्यातील करंट्या लोकांना त्यांचे महात्म्य पटत नाही. जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणारे गोळवलकर गुरुजी आणि जाती व्यवस्थेला विरोध करणारे गांधीजी एकत्र बसू शकतील, पण त्यांच्या विचारांची बेरीज कशी होईल?' असा सवाल डॉ. सबनीस यांनी उपस्थित केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे प्रॉडक्ट आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक संचिताचं प्रॉडक्ट आहेत,' असेही त्यांनी सांगितले.
'स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रभक्ती मोठी असून त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान मोठे आहे. त्यांची राष्ट्रभक्ती नाकारणारा देशातील सर्वात मोठा कृतघ्न असेल. त्यांनी भोगलेला तुरुंगवास, त्यांची वागणी, प्रतिभा आणि कर्तृत्व यातून त्यांची राष्ट्रभक्ती प्रतीत होते. त्यांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेऊन चालणार नाही. ते ब्राण आहेत, म्हणून कोणी त्यांची राष्ट्रभक्ती जानव्यामध्ये बंदिस्त करत असतील तर ते मोठे पाप आहे,' असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.
गांधीजींनी शेतकऱ्यायाला समृद्ध करायला सांगतिले होते. गेल्या ६५ वर्षात शेतकऱ्यांच्या नावाचे कुंकू लावून अनेक पक्ष सत्तेत आले. मात्र, ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकले नाहीत. आत्महत्या थांबवता येत नसतील, तर राजकारण्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, असे सांगतानाच गांधीजींच्या सल्ल्याप्रमाणे शेतकरी जगवा, काँग्रेस जगेल आणि देशही जगेल, असा सल्ला डॉ. सबनीस यांनी कॉँग्रेसजनांना दिला. जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यात वाद लावून देत आपल्या पक्षाचा अजेंडा पूर्ण करून घेणे, हे त्यांच्या विचारांचे अपयश आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images