Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

FTII उपोषणकर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल

$
0
0

पुणेः फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) उपोषण सुरू केलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी हिलाल सवाद या विद्यार्थ्याची तब्येत शुक्रवारी सायंकाळी बिघडली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

गजेंद्र चौहान आणि इतर चार सदस्यांची नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. मात्र, सरकार काहीच प्रतिसाद देत नसल्याने विद्यार्थ्यांनी उपोषणाचा पर्याय स्वीकारला. हिलाल सवाद, अलोक अरोरा आणि हिमांशु शेखर या विद्यार्थ्यांनी गुरुवारी पहाटेपासून उपोषण सुरू केले. त्यापैकी हिलाल सवाद या विद्यार्थ्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण शुक्रवारी सायंकाळी कमी झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्टिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुलसचिव यू. सी. बोडके यांनी या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हिलालची जागा अंकित थापा या विद्यार्थ्याने घेतली आहे.

उपोषण सुरू झाल्याचे कळल्यावर अलोक अरोराची आई सुनीता शुक्रवारी सकाळी दिल्लीतून पुण्यात आली. 'विद्यार्थ्यांवर उपोषणाला बसण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे,' असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी यांनी शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संपाबाबत जाणून घेतले. 'संस्थेत जास्त वेळ काढण्यापेक्षा लवकरच शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष काम करण्यासाठी बाहेर पडा,' असा सल्लाही ओम पुरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीजेवरील बंदी हटविण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवादरम्यान डीजे व्यावसायिकांवर घातलेली बंदी तातडीने अथवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र चित्ररथ-वाद्यवृंद श्रमिक महासंघाने दिला आहे. डीजेवरील बंदी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व डीजेधारक आणि कर्मचारी येत्या मंगळवारी (१५ सप्टेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. यावेळी दहा सदस्य आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ग्रामीण पोलिस उपअधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून डीजेचा वापर न करण्याची सक्ती केली आहे. शहर पोलिस आयुक्तांनी शहरातील चार डीजे व्यावसायिकांना लेखी परवानगी दिली आहे. ग्रामीण भागाला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे व्यावसायिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील सात हजार व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात आली आहे, असे क्षीरसागर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ठसका लवंगी मिरचीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशात लांबणीवर पडलेला पाऊस आणि मध्य प्रदेशात पिकांवर पडलेल्या रोगामुळे वाया गेलेले पीक यामुळे लवंगी मिरचीसह गुंटूर मिरचीचा आता ग्राहकांना चांगलाच ठसका बसणार आहे. डाळी, तांदळानंतर आता मिरचीची आवक घटल्याने भावात क्विंटलमागे १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

'आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याने मिरचीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. मध्य प्रदेशातून सध्या मिरची येणे अपेक्षित होते. मात्र, तेथे मिरचीवर रोग पडल्याने तेथील ५० टक्के पीक वाया गेले आहे. या कारणांमुळे सर्व जातीच्या मिरचीचे प्रति क्विंटल भाव १००० ते १५०० रुपयांनी वाढले आहे,' अशी माहिती मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी दिली. क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ झाल्याने किलोमागे मिरची १० ते१५ रुपयांनी महागली आहे, असेही ते म्हणाले.

साधारणतः ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेशातील ​मिरची बाजारात येणे अपेक्षित असते. मात्र, रोग पडल्याने आवक महिनाभर पुढे गेली आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरऐवजी ही मिरची नोव्हेंबरमध्ये दाखल होईल. गुंटूर मिरचीचा पुरेसा साठा असून, या मिरचीच्या निर्यातीला मोठी मागणी आहे. पाकिस्तान, चीन, पश्चिम बंगाल येथे मोठ्या प्रमाणावर मिरचीला मागणी असते. पुण्यात येणारी मिरची साधारपणे औरंगाबाद, जालना येथील असते. या भागातून मिरचीची आवक होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती व्यापारी असे सोपान राख यांनी दिली.

उत्पादन क्षेत्रातच मिरचीचे भाव वाढले आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि कर्नाटकातील ब्याडगी जातीच्या मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. पाऊस कमी आणि निर्यात अधिक होत असल्याने भाववाढ झाली आहे. पुण्यात, गणपती विसर्जनानंतर मिरचीची मागणी वाढेल.

- वालचंद संचेती, मिरचीचे विक्रेते

आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याने मिरचीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. मध्य प्रदेशातून सध्या मिरची येणे अपेक्षित होते. मात्र, तेथे मिरचीवर रोग पडल्याने तेथील ५० टक्के पीक वाया गेले आहे.

- राजेंद्र गुगळे, मिरचीचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री निवासस्थानी ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन

$
0
0

पुणेः 'रात्री आम्हीही क्लिप बघतो,' असे वादग्रस्त विधान करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर राष्ट्रवादी युवती आणि विद्यार्थी संघटनांनी शनिवारी मूक आंदोलन करून निषेध व्यक्त केला. असंसदीय वक्तव्य करून पुणेकरांना बापट यांनी आपला असंस्कृतपणा आणि बेजबाबदारपणा दाखवून दिला, अशी टीका राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केली.

विद्यार्थी हक्क परिषदेच्या कार्यक्रमात शुक्रवारी​ पालकमंत्री बापट यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी संघटनेच्यावतीने बापट यांच्या घरासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 'सत्याचे प्रयोग' पुस्तक बापट यांच्या प्रतिनिधीला देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवतीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, युवतीच्या शहराध्यक्षा मनाली भिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बापट यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्यासह माजी महापौर मोहनसिंग राजपाल, भगवानराव साळुंखे यांनी निषेध केला आहे. 'असंसदीय विधाने करून पुण्याच्या संस्कृतीचा बापट यांनी अपमान केला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बापट यांनी पालकाची भूमिका गांभिर्याने पार पाडणे आवश्यक होते. अशा विधानाची अपेक्षाच नव्हती,' या शब्दांत चव्हाण यांनी टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापट मास्तरांना कोण सांगणार?

$
0
0

वादग्रस्त वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुण्याचे पालकमंत्री आणि शहरातील ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांनी जाहीर कार्यक्रमात केलेले वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक पुण्याची शोकांतिका आहे. दुसऱ्यांचे कान धरणाऱ्या बापट मास्तरांना कोण काय बोलणार,' अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बापट यांच्या वक्तव्यावर टीका केली.

विद्यार्थी हक्क परिषदेच्या कार्यक्रमात शुक्रवारी पालकमंत्री बापट यांची जीभ घसरली. तरुणांना उद्देशून ' तुम्ही जे पाहता ते मी देखील बघतो. त्यामुळे आम्ही म्हातारे-कोतारे झालो नाही,' असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यावरून सोशल मीडियासह शहरात त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करून पडदा टाकण्याची विनंतीही बापट यांनी केली. मात्र, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खरपूस शब्दांत बापट यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

'राजकीय मतभेदात टोकाचे वक्तव्य अनेकदा केले जाते. परंतु, जाहीर कार्यक्रमात बापट यांनी शुक्रवारी वक्तव्य केले. त्यांच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब त्यांनी कार्यक्रमात बोलून दाखवले. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराचे ते आमदार आणि पालकमंत्री आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक पुण्याची शोकांतिका आहे. त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यातून पुणेकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. बापट यांनी केलेले वक्तव्य ही अयोग्य मांडणी आहे. दुसऱ्यांचे कान पकडणाऱ्यांना आम्ही काय सांगणार,' असा उपरोधिक टोला श्रीमती गोऱ्हे यांनी लगावला. बापट यांच्या या वक्तव्याबाबत पक्षश्रेष्ठींनी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

'मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मेट्रोची बैठक खटकते'

पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मेट्रो हा विषय नगरविकास खात्याच्या अंतर्गत येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत झालेली बैठक खटकल्याचा टोला गोऱ्हे यांनी भाजपला लगावला. पुणे मेट्रो तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या समावेशाबाबत दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत शहरातील पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक झाली. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट तसेच अन्य आमदार उपस्थित होते. त्या बैठकीला कॉँग्रेसप्रमाणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या बाबत गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

पुणेः येरवडा जेलमध्ये एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या कैद्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपेश अजित उर्फ आझाद काळे (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी तुरुंग अधिकारी संतोष कोकणे (३५, रा. येरवडा) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे याला एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. १३ मार्चपासून तो येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी सकाळी काळे याने त्याच्याकडे असलेला टॉवेल फाडला. त्याच्या पट्ट्या तयार करून दोर बनविला. त्या दोराच्या आधारे त्याने बराकीमध्येच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटल्यामुळे तो वाचला. यामध्ये काळे जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एम. एम. साळुंखे हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

दुचाकीवरून आनंदनगरकडे निघालेल्या व्यक्तीला पाठीमागून दुचाकीनेच धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

रमेश रामचंद्र गोलखंडे (वय ५०, रा. गल्ली नं. ३, जनता वसाहत) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मनीषा गोलखंडे (वय २२, रा. पर्वती पायथा) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अमित दिलीप चिकणे (वय २६, रा. सदाशिव पेठ, कुमठेकर रोड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलखंडे हे त्यांच्या दुचाकीवरून आनंदनगरकडे निघाले होते. पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ आरोपी चिकने याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून गोलखंडे यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गोलखंडे हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर. बी. राजपूत हे अधिक तपास करीत आहेत.

सोनसाखळी हिसकावली

पतीसोबत दुचाकीवरून जाताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र असा ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. खडकीतील मिल्ट्री फ्यूल डेपोसमोर ही घटना घडली.

याबबात अरुण शेलार (वय ५१, रा. खडकी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार हे पत्नीसह दुचाकीवरून जात होते. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची साखळी हिसकावून नेली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राठोड हे अधिक तपास करीत आहेत.

फसवणूकप्रकरणी गुन्हा

चार्टड अकाउंटंट असल्याचे सांगून विक्रीकर विभागाची कामे करून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

याबाबत एस. शिंदे (३६, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून राकेश महादेव कोलते (रा. शिवाजी रोड, शुक्रवार पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे हे विक्रीकर निरीक्षक आहेत. कोलते याने नागरिकांना स्वतः चार्टड अकाउंटंट असल्याचे सांगून विक्रीकर विभागाशी संबंधित कामे करून देत असल्याचे सांगितले. तसेच, एका व्यक्तीला बनावट टीन नंबर प्रमाणपत्र देऊन विक्रीकर विभागाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेंडुलकरांचे योगदान दुर्लक्षितच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, पटकथा-संवाद या माध्यमांमध्ये विजय तेंडुलकर यांनी दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेतली गेली नाही,' अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे रेखा इनामदार-साने संपादित 'अ-जून तेंडुलकर' या पुस्तकाचे प्रकाशन निहलानी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी तेंडुलकरांच्या आठवणी आणि लेखनाविषयी भाष्य केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, प्रतिष्ठानचे अशोक कुलकर्णी, दिलीप माजगावकर, सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव आदी या वेळी उपस्थित होते.

'तेंडुलकरांनी सिनेमाच्या लेखनाला एक शैली दिली. सिनेमातील भूमिका आणि मानवी नातेसंबंधांची अचूक गुंफण हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. सर्वसामान्यांचे जगणे त्यांनी तरलतेने मांडले. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांचे योगदान नेहमीच उपयुक्त ठरणार आहे,' असेही निहलानी म्हणाले.

तेंडुलकर हे 'लाडके नसणारे' व्यक्तिमत्व होते. त्यांना तांत्रिक गोष्टींचे आकर्षण होते, पण नाटक वा इतर लेखनात त्यांनी शब्दांनाच महत्व दिले. भारतीय नाटक ही संकल्पना त्यांच्या लेखनाने जगभरात नेली, असे आळेकर म्हणाले. समग्र मराठी साहित्य परंपरेत तेंडुलकरांचे स्थान अढळ आहे, अशी भावना इनामदार यांनी व्यक्त केली. माजगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

'प्रतिष्ठेचा मुद्दा करू नका'

एफटीआयआयच्य आंदोलनाविषयी बोलताना, 'विद्यार्थ्यांची भूमिकाही समजून घ्यायला हवी. सरकारने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये,' असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि सरकार यांच्यातला लढा असे या वादाचे स्वरूप झाले आहे. तो सोडवायचा असेल तर विद्यार्थ्यांना काय वाटते, यालाही महत्त्व द्यायला हवे, असे निहलानी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

$
0
0

पुणेः भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभी असलेली व्यक्ती गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना सोमावरी सायंकाळी ढोले पाटील रस्त्यावर घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिशोर जयमंगल ठाकूर (वय ५४, रा. माजी सैनिकनगर, येरवडा) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे बंधू अनिल ठाकूर (वय ४८, रा. येरवडा) यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोले पाटील रस्त्यावरील डीसीबी एटीएम समोर ठाकूर हे उभे होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ठाकूर गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला.

आत्महत्या करणाऱ्याचा मृत्यू

येरवडाः येरवडा क्षेत्रीय कार्यालयसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुलेनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या लाभार्थींना 'बीएसयूपी' योजनेत घरे देण्यात डावलल्याच्या रागातून ही घटना घडली होती. यासीन तांबोळी (वय ६२) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअरपोर्टसाठी बसचे आणखी १० नवीन मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातून लोहगाव विमानतळ येथे ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने कोथरूड व हिंजवडी या व्यतिरिक्त आणखी १० नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक ५० एसी बस कंत्राटी पद्धतीने घेतल्या जाणार असून त्याची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे, अशी महिती पीएमपीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी दिली.

लोहगाव विमानतळ येथे जाण्यासाठी पूर्वी केवळ डेक्कनवरून बस उपलब्ध होती. त्यामुळे शहराच्या अन्य काही भागातून या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पीएमपीने काही दिवसांपूर्वी कोथरूड व हिंजवडी येथून विमानतळ येथे जाण्यासाठी बस सुरू केली. कोथरूडवरून चार व हिंजवडी येथून तीन बस या मार्गावर सध्या धावतात. या बसेसला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अन्य मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे कृष्णा यांनी सांगितले. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून आता विमानतळाला जाणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

'पीएमपी बसला विमानतळाच्या आवारात अधिकृत स्टॉप नाही. सध्या हक्काचा स्टॉप नसल्याने बस तेथे फार काळ थांबू शकत नाही. त्यातच नवीन बस सुरू झाल्यानंतर जागेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल. त्यामुळे भविष्यात तेथे पीएमपीला हक्काचा स्टॉप मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे,' असे कृष्णा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या प्रवाशांच्या सेवेतील बसची संख्या १७०० वर पोहोचविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा ती संख्या १५०० झाली आहे. येत्या एक एप्रिलपासून सर्व बसचे वेळापत्रक केले जाणार आहे. त्यामध्ये बसची देखभाल दुरुस्ती, आरटीओ पासिंग व अन्य कामांची माहिती असेल.

- अभिषेक कृष्णा, पीएमपीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतर्फे उद्या जेलभरो आंदोलन

$
0
0

पुणेः मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या १४ सप्टेंबर रोजी शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाला आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. पावसाअभावी पिके जळून चालली आहेत. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. तथापि, सरकारकडून दुष्काळ निवारणाच्या कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. सरकारला दुष्काळीस्थितीचे भान यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेलभरो आंदोलन करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले. 'शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. सरकारला जाग यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे,' असे आवाहनही कामठे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बँका बंद’मुळे नागरिकांचा संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बदललेल्या नियमांनुसार शनिवारी पहिल्यांदाच सर्व बँका बंद राहिल्या. त्यामुळे नेहमी अर्धवेळ कामकाज सुरू असण्याच्या आशेने बँकेत गेलेल्या खातेदारांना निराश होऊन परतावे लागले. अनेक बँकांनी आज बँक का बंद आहे, याबाबत कोणताही फलक न लावल्याने आज संप आहे का, अशी चर्चा काही ठिकाणी सुरू होती.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार आता बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्णवेळ बंद राहणार आहेत. तर पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत. या बदलानुसार शनिवारी (१२ सप्टेंबर) पहिल्यांदाच बँका बंद राहिल्या. हा बदल एक सप्टेंबरपासून अंमलात आला असला, तरी अजूनही बहुतांश बँकांनी आपल्या कामकाजाच्या वेळापत्रकाच्या फलकांमध्ये बदल केलेला नाही. त्याचबरोबर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील, असा वेगळा फलकही लावलेला नसल्याने शनिवारी बँकेत कामासाठी गेलेल्या नोकरदारांना हताश होऊन परतावे लागले. काही बँकांनी मात्र, शुक्रवारीच आपल्या ग्राहकांना मोबाइलवर मेसेज पाठवून शनिवारी बँक बंद राहणार असल्याचे सूचित केले होते.

सोमवारी कामाचा ताण वाढण्याची शक्यता

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस बँका बंद राहणार असल्याचा ताण सोमवारी आणि मंगळवारी जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणावर चेक क्लिअरिंगला येण्याची शक्यता आहे. तसेच, सलग दोन दिवस बँका बंद राहिल्याने एटीएममधील रोकडही संपण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलकडून नको औषध खरेदीची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलकडून त्यांच्याच मेडिकल स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती करण्यात येत आहे. पेशंटना बाहेरून औषध घेण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) केली आहे.

शहरातील सर्व हॉस्पिटलच्या बाहेर हॉस्पिटलची औषधविक्री दुकाने आहेत. त्या दुकानातून औषध खरेदी कऱण्याचा डॉक्टरांसह परिचारिकांचा आग्रह असतो. परंतु, पेशंटसह त्यांच्या नातेवाइकांना बाहेरील त्यांच्या ओळखीच्या अथवा जवळच्या केमिस्टकांडून औषधे घ्यायची असतात. हॉस्पिटलच्या सक्तीमुळे नाईलाजास्तव पेशंटना औषधे खरेदी करण्याची वेळ येते. या समस्येकडे सजग नागरिक मंचाने 'एफडीए'चे लक्ष वेधले आहे.

औषधाच्या गुणवत्तेबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याने रुबी हॉस्पिटलने हॉस्पिटलच्या बाहेरून औषध खरेदीची मुभा पेशंटना दिल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील अन्य हॉस्पिटलनेदेखील पेशंटना बाहेरून औषधे आणण्यास परवानगी द्यावी. त्याबाबत एफडीएने हॉस्पिटलना आदेश द्यावेत, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. बाहेरील केमिस्ट औषध खरेदीवर दहा टक्के सवलत देत असल्याने त्याचा पेशंटना फायदा होतो. त्यामुळे एफडीएने हॉस्पिटलला आदेश द्यावेत तसेच हॉस्पिटलने एफडीएचे आदेश व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याची मागणीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादांमुळे रखडला विकासः गाडगीळ

$
0
0

पुणेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात बेबनाव असल्यामुळेच पुणे आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक रखडली आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी शनिवारी केला. पुणे मेट्रोसाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीला काँग्रेसचे आमदार, पदाधिकाऱ्यांना न बोलावून सरकारने भेदभावाचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुणे मेट्रोच्या प्रश्नावर गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचा कोणीही आमदार किंवा महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. सरकार विरोधकांना भेदभावाची वागणूक देत असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका गाडगीळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळांवर गुन्हे दाखल होऊ नयेत

$
0
0

कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील बहुसंख्य गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात एकाही मंडळावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार नाही, अशी दक्षता कार्यकर्ते व पोलिस दोघांनीही घ्यावी. पोलिसांनीही याबाबत समजूतदारपणा दाखवावा', असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केले.

अनुबंध सेवा प्रतिष्ठानतर्फे लोकमान्य जीवनगौरव प्रतिष्ठान पुरस्कार हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांना बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी पोलिस आयुक्त के. के. पाठक, उपायुक्त तुषार दोशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अॅड. प्रताप परदेशी, सामजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, आनंद सराफ, पराग ठाकूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

महापालिकेचे आरोग्यप्रमुख सोमनाथ परदेशी यांना गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेश घोष, शैलेश बीडकर, राहुल जाधव, राहुल दीक्षित, कैलास तरडे यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांचा तर, अनेक वर्ष गणेशोत्सवादरम्यान आकर्षक फुलांची सजावट करणारे गंगाराम सरपाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 'गणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील मागील गुन्हे मागे घेतले आहेत. आता मंडळांनीही हा कोटा भरू नये व पोलिसांनीही त्यांचा कोटा पूर्ण करण्याच्या मागे लागू नये. यंदाच्या गणेशोत्सवात आपण चांगले वातावरण ठेवून गुन्हे दाखल करण्याची ही कोटा सिस्टीमच रद्द करू', असे बापट यांनी सांगितले.

'मंडळांना परवाने मिळावेत, यासाठी सर्व पोलिस स्टेशनमध्ये सर्व परवाने अर्ज केल्यानंतर ४८ तासात मिळण्याची व्यवस्था केली आहे. या कालावधीत परवाने न मिळाल्यास माझ्याशी किंवा उपायुक्तांशी संपर्क साधावा', असे पाठक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

पुणेः 'आयएलएस लॉ कॉलेज'मधील विद्यार्थ्याने वसतीगृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सिध्दार्थ काळे (वय २४, रा. दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सिद्धार्थचे वडील दिल्ली येथे नौदलात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थने बारावीनंतर पाच वर्षांच्या लॉ कोर्ससाठी २००९-१०मध्ये वर्षात प्रवेश घेतला होता. यंदा तो पाचव्या वर्षात शिकत होता. कॉलेजमधील सिनिअर विद्यार्थी असल्यामुळे त्याला वसतीगृहात स्वतंत्र खोली देण्यात आली होती. शनिवारी सकाळी सिध्दार्थची खोली बंद होती. त्यामुळे त्याच्या मित्रांनी सकाळी सव्वाअकरास खोलीमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

$
0
0

पुणेः पत्नीचा खून करून पतीने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. पिंपरीतील गांधीनगर भागामध्ये शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा मुकुंद गायकवाड (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरेखा यांचा खून केल्यानंतर पती मुकुंद बुधप्पा गायकवाड (वय ६०, रा. दोघेही गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) याने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडी गावचे आहेत. ते पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीत राहत होते. गायकवाड हा बिगारी काम करीत होता. तर त्याची पत्नी सुरेखा या केटरिंगच्या कामासाठी जात होत्या. दोघांना तीन मुले असून, तिघेही खासगी कंपनीत कार्यरत आहेत. मुकुंद यांना दारूचे व्यसन होते. तसेच तो पत्नी सुरेखाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी मुकुंद यांनी रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात घणाचा घाव घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यावर सुरीने वार करून आत्महत्या केली. सायंकाळी चार वाजता त्यांचा धाकटा मुलगा घरी आला. त्याने दरवाजा बराच वेळ ठोठावला. पण, दरवाजा न उघडल्यामुळे त्याने शेजारी राहणाऱ्या मित्रांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरा विद्यार्थीही हॉस्पिटलात दाखल

$
0
0

पुणे : 'एफटीआयआय'मधील उपोषणकर्त्या आलोक अरोरा या विद्यार्थ्याची तब्येत शनिवारी सायंकाळी खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पूर्वी एका विद्यार्थ्याला शुक्रवारीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपोषण सुरू होऊन तीन दिवस पूर्ण झाले असून, अद्याप सरकारने त्याची दखल घेतलेली नाही.

गजेंद्र चौहान यांना नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यावरून एफटीआयआयचे विद्यार्थी आणि सरकार यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. उपोषण सुरू करणाऱ्या तीनपैकी दोन विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेस्टएंड थिएटरचेही आता ‘मध्यंतर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅम्प परिसरातील नागरिकांचे आकर्षण आणि इंग्रजी चित्रपटांसाठी हक्काचे घर असणाऱ्या वेस्टएंड चित्रपटगृहाने तूर्तास विश्रांती घेतली असून, 'ब्रेक के बाद' नव्या स्वरूपात ते प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. नूतनीकरणासाठी थिएटर बंद राहणार आहे. त्यामुळे वेस्टएंडमध्येच सिनेमा पाहायला जाणाऱ्या नागरिकांना काही महिने 'वेटिंग'वर राहावे लागणार आहे.

शहरातील अनेक एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन थिएटर) काळाच्या ओघात पडद्याआड चालली आहेत. अशावेळी कॅम्पमधील वेस्टएंड थिएटरही प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्यात कमी पडत होते. शहरातील इतर सिंगलस्क्रीन थिएटरप्रमाणेच वेस्टएंडची आसनक्षमताही सुमारे नऊशेहूनही अधिक होती. त्यामुळे, काही मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळता, इतर चित्रपटांना ठरावीक प्रेक्षकच थिएटरमध्ये असायचे. त्यामुळे, थिएटरमध्ये काही बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत असून, त्यासाठीच सध्या थिएटर बंद ठेवण्यात आले आहे. 'वेस्टएंडच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे', अशी माहिती व्यवस्थापक टोनी यांनी दिली.

वेस्टएंड हे शहरातील जुन्या थिएटरपैकी एक म्हणून ओळखले जाते. १९९० च्या दशकापर्यंत वेस्टएंडची प्रशस्त आणि दिमाखदार वास्तू ही कॅम्पची शान होती. त्यानंतर, तेथे अरोरा टॉवर्सची भव्य इमारत उभी राहिली. मात्र, त्याच ठिकाणी वेस्टएंड पुन्हा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाले. गेल्या १५-२० वर्षांत नव्या रुपातील वेस्टएंडला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. मात्र, अलीकडच्या काळात वाढलेल्या मल्टिप्लेक्समुळे खास वेस्टएंडसाठी येणारा प्रेक्षकवर्ग हळूहळू कमी होत गेला. त्यामुळे, थिएटरचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याविषयी अधिक माहिती देण्यास असमर्थतता दर्शविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतवाडीतील अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विश्रांतवाडी बीआरटी मार्गाच्या दुतर्फा हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिक, हॉकर्स यांच्यावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी संध्याकाळी जोरदार कारवाई केली. विश्रांतवाडी चौकातील पथारी व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याने स्थानिक नगरसेविकेचे पती अनिल साळुंखे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्यांनीच महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप करून साळुंखे यांनीही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

विश्रांतवाडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले होते. ३१ ऑगस्टपासून बीआरटी सुरू झाल्यानंतरही अतिक्रमणे जैसे थे असल्याने 'विश्रांतवाडीतील अतिक्रमणे हटेनात,' याकडे 'मटा'ने लक्ष वेधले होते. त्यानंतर, शुक्रवारी सायंकाळी विश्रांतवाडी चौकातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. पथारी व्यावसायिकांवर कारवाई सुरू असतानाच स्थानिक नगरसेविकेचे पती अनिल साळुंखे यांनी हस्तक्षेप करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, दुसरीकडे पालिका अधिकाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई करताना महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images