Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मेट्रो पाच वर्षांत?

0
0

पहिल्या टप्प्यातील एलेव्हेटेड मार्ग वेगाने पूर्ण होणे शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मेट्रो, रिंग रोड, विमानतळ, महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरीकरण आदी प्रश्नांवर बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या पुढाकाराने मार्ग निघाल्यानंतर आता या सर्व योजनांची, विशेषतः मेट्रोची वाटचाल कशी होणार याची पुणेकरांना उत्सुकता लागली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एलेव्हेटेड मेट्रोचे काम कोणताही अडथळा न आल्यास वेगाने पूर्ण होऊ शकते. तसे झाले, तर पुण्यात २०२० पर्यंत मेट्रो धावलेली दिसू शकते.

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाला (पीआयबी) पाठविण्यात येईल. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होताच, मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.

यापूर्वी पुणे मेट्रोचे सादरीकरण पीआयबीसमोर झाले आहे; पण आता सुधारित आराखड्यासह वाढीव खर्चालाही मान्यता घ्यावी लागणार आहे. पीआयबीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच, मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. या तांत्रिक बाबींची पूर्तता त्वरेने करण्याचे आदेश बुधवारच्या बैठकीत गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे, अनेक वर्षे रखडलेल्या मेट्रोला काही महिन्यांमध्ये गती प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.

आता घाई हवी...

गेल्या वर्षी नागपूर मेट्रोचा प्रस्ताव पीआयबीसमोर सादर झाल्यानंतर अवघ्या आठवड्यामध्ये त्याला पीआयबीची मंजुरी मिळाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळानेही अल्पावधीतच नागपूर मेट्रोवर मान्यतेची मोहोर उमटविली होती. पुणे मेट्रोचे भूमिपूजन दिवाळीमध्ये करण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांकडून दिले जात आहेत.

पुणे मेट्रोचा फास्ट ट्रॅक...

केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत झालेले निर्णय मुख्यमंत्र्यांकडे जाणार

मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यावर त्यांच्या स्वाक्षरीने पीआयबीकडे प्रस्ताव

पीआयबीच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर आवश्यक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात

मेट्रोच्या उभारणीसाठी स्पेशल पर्पज व्हेइकलची स्थापना

तांत्रिक पूर्ततांनंतर शहरात मेट्रोचे पिलर उभारण्यास सुरुवात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिरीश बापटांची जीभ घसरली...

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'ज्या क्लिप्स तुम्ही रात्री बघता, त्या आम्हीही बघतो. त्यामुळे आम्ही म्हातारे झालो असं समजू नका. आमचं देठ अजून हिरवं आहे...'; हे शब्द आहेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचे. पुण्यात विद्यार्थी हक्क परिषदेत बोलताना बापटांनी हे वक्तव्य केले.

महायुतीच्या घटकपक्षांच्या वतीने पुण्यात विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एमपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ४० करावी तसेच आयपीएस सेवेसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ३३ करावी अशी मागणी करत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

परिषदेत विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री बापट बोलण्यासाठी उभे राहिले. भाषणादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात मंत्रीमहोदयांची जीभ सैल सुटली. श्रोत्यांचे आपल्या भाषणावरील लक्ष हटू नये म्हणून बापटांनी जे वक्तव्य केले त्यामुळे स्टेजवर बसलेले महायुतीचे अन्य नेतेही गडबडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे खंडपीठासाठी आंदोलन

0
0

पुणे : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. फर्ग्युसन कॉलेजसमोरच्या चौकात वकिलांनी निदर्शने केली. पुण्याला खंडपीठ मिळावे, या मागणीसाठी वकिलांकडून शहरातील विविध चौकात दररोज निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती मोहित शहा मंगळवारी सेवानिवृत्त झाले. शहा यांच्याकडून खंडपीठाबाबत कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळे पुण्यातील वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंडपीठाच्या मागणीसाठी आपला लढा चालू ठेवणार आहोत, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी दिली. शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सुहास फराडे, राहुल झेंडे, माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार, सदस्य अॅड. रोहित माळी, अॅड. साधना बोरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे मोबाइल चोरणाऱ्याला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेपर तसेच दूध टाकण्याच्या बहाण्याने घरातील लोकांची नजर चुकवून मोबाइल, लॅपटॉपची चोरी करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन वर्षांमध्ये या चोरट्याने सुमारे दीडशे मोबाइल चोरल्याचे उघड झाले आहे. या आरोपीकडून ३५ मोबाइल, तीन लॅपटॉप असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे चोरी पकडली गेल्यानंतर त्याने पुण्यात आश्रय घेतला होता.

सद्गुरू गोवर्धन निगवेकर (वय ३०, रा. दगडे चाळ, चांदणी चौक, बावधन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निगवेकर मूळचा कोल्हापूर येथील आहे. तेथे त्याच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरात चोरी पकडली गेल्यावर त्याने पुण्यात आश्रय घेतला होता. तो पुण्यात बावधन येथील दगडी चाळीत राहत होता, अशी माहिती फौजदार गिरीश सोनावणे यांनी दिली.

फरासखाना पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी हर्षल शिंदे यांना निगवेकर याच्याबाबत माहिती मिळाली होती. निगवेकर हा कोंबडी पूल या ठिकाणी मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याचे समजल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पेपर तसेच दूध टाकण्याच्या बहाण्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याने मोबाइल आणि लॅपटॉप कंपन्यांचे लाखो रुपयांचे हँडसेट चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडील पिशवीतून चोरीचे ३५ मोबाइल, तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले.

निगवेकर याने बावधन, कोथरूड, वारजे, नवी पेठ, फरासखाना पोलिस ठाण्याचा परिसर आदी ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पेपर टाकत असल्याचा बहाणा करून इमारतीत घुसायचे. एखाद्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असेल तर त्या फ्लॅटच्या हॉलमधून चोरी करायची. फौजदार सोनावणे, कर्मचारी इक्बाल शेख, हर्षल शिंदे, शंकर कुंभार, सागर केकाण, बापू खुटवड, रमेश चौधर, विनायक शिंदे, संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

भरधाव ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बायपास रस्त्यावर रविवारी रात्री घडली. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

संदिपान भीमराव उढाण (४२, राजाराम पाटीलनगर, खराडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक संजीवकुमार बिहारलाल गुप्ता (३५, रा. उत्तर प्रदेश) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उढाण हे सुरक्षारक्षकाचे काम करतात. रविवारी रात्री ते काम संपवून दुचाकीवरून घरी निघाले होते. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालक त्या ठिकाणाहून पळून गेला होता. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर चालकाला अटक केली.

ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवली

पायी निघालेल्या ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी आपटे रस्त्यावर घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साठ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सोमवारी सायंकाळी आपटे रस्त्यावरील मनीषा सोसायटीच्या गेटच्या आतमध्ये पायी जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किंमतीची सोन्याची जोंधळ्या मण्यांची माळ हिसका मारून चोरून नेली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुचिता खोकले पुढील तपास करीत आहेत.

तरुणाला मारहाण

भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण केल्याची घटना पौड रस्त्यावर रविवारी रात्री घडली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमित तांबे (२८, रा. ढमाले वाडा, कर्वे रोड) याने तक्रार दिली आहे. त्यावरून सचिन बाळासाहेब पवार (२३), नीलेश बबन धुमाळ (२१, रा. केदार एम्पायर, कर्वे रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित याच्या भावाला आरोपींनी हाताने मारहाण करून एक हजार रुपये काढून घेतले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी अमित रविवारी रात्री आरोपींकडे गेला असता त्याला सिमेंटचा ब्लॉक नाकावर फेकून मारला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बोबडे हे अधिक तपास करीत आहेत.

वेश्या व्यवसायातील तीन दलाल अटकेत

शहरात बांगलादेशी तरुणींकडून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या तीन दलालांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. या तरुणींनी गैरमार्गाने भारतात प्रवेश केला असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पिटा तसेच पारपत्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुमम मुमताज मुल्ला शेख (वय ३२, रा. मूळ गाव ग्राम चासला, पोस्ट तुलारामपूर थाना नाराईल, जि. नोराईल, बांगलादेश), जोशीन अन्नन शेख (वय ३५, रा. मूळ गाव ग्राम कालिचा, जि. नोराईल, बांगलादेश), सचिन सत्तार शेख (वय २६, रा. वाशी, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक देणार पाणीबचतीचा संदेश

0
0

पुणे : महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केल्याने पाणी काटकसरीने वापरण्याबाबत सर्वच स्तरातून बोलले जात आहे. त्याबरोबरच आता रिक्षाचालकही त्यांच्या रिक्षांवर विविध संदेशांचे स्टीकर लावून पाणी बचतीला प्रोत्साहन देणार आहेत.

पुणेकरांनी जास्तीत जास्त पाण्याची बचत करावी यासाठी शिवनेरी रिक्षा संघटनेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत संघटनेतील सुमारे ५०० रिक्षांच्या मागे संदेश स्टीकर लावण्यात आले आहेत. पाण्याची बचत होईल तरच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल, पाण्याचे महत्त्व जाणून घ्या, पाणी वाचवा देश वाचवा, निसर्गाला द्याल साथ, तर कठीण परिस्थितीवर कराल मात आणि जल है तो कल है, पाणीबचतीला प्रोत्साहन देणारे असे संदेश रिक्षांवर पाहायला मिळतील. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते या स्टीकर्सचे बुधवारी रिक्षा चालकांना वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, संघटनेचे आबा बाबर, गंगाधर महाडिक, नितीन साळुंखे, विनोद नलावडे, विजय लांडे, इरफान खान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीसाठी आठ कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिका यांच्यात जकात थकबाकी आणि पाणीपट्टीची थकबाकी यावरून वाद असताना, पाणीपट्टीची थकबाकी देण्याची वेळ आल्यास ऐन वेळी धावपळ होऊ नये म्हणून बोर्डाने बजेटमध्ये पहिल्यांदाच आठ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. महापालिकेने जकातीची सुमारे २४ कोटी रुपयांची थकबाकी देण्याची बोर्डाची मागणी आहे. मात्र, महापालिकेने नकार देऊन पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यास पाणीपट्टीची रक्कम देण्याची तयारी बोर्डाने करून ठेवली आहे.

महापालिकेकडे जकातीची सुमारे २४ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपट्टी देण्यास बोर्डाने नकार दिला आहे. मात्र, महापालिकेने जकातीची थकबाकी नसल्याचे स्पष्ट करून पाणीपट्टीची थकबाकी देण्याचा आग्रह धरला आहे. आगामी काळात महापालिकेने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून बोर्डाने पहिल्यांदाच बजेटमध्ये आठ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे.

मूळ बजेटमध्ये तीन कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र, थकबाकी विचारात घेऊन सुधारित बजेटमध्ये आणखी पाच कोटी रुपये वाढविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेमध्ये जकात पद्धत असताना बोर्डाच्या हद्दीतून महापालिका जकात वसूल करीत होती. त्या बदल्यात महापालिका दर महिन्याला सुमारे दीड कोटी रुपये बोर्डाला देत असे. बोर्डाच्या परिसरात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जकातीच्या रकमेतून पाणीपट्टीची रक्कम वळती करून उर्वरित रक्कम पालिकेकडून बोर्डाला देण्यात येत होती. बोर्डाने २००६ ते २०१२ या सहा वर्षांमध्ये महापालिकेकडून देण्यात आलेल्या जकातीचा आढावा घेतला. त्यामध्ये सुमारे २४ कोटी ७९ लाख ९१९ रुपये महापालिकेकडे थकबाकी असल्याचे आढळून आले आहे.

बोर्ड आणि पालिकेत वाद

बोर्डाने गेल्या तीन वर्षांत पाणीपट्टीचे सुमारे नऊ कोटी आठ लाख रुपये थकविल्यामुळे महापालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने मार्च महिन्यात बोर्डाच्या मुख्यालयाच्या पाणीपुरवठ्यावर हातोडा घातला होता. त्यावरून बोर्ड आणि महापालिका यांच्यात वादाला तोंड फुटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्याचा परवाना रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅन्सर प्रतिबंधक इंजेक्शनची प्रिस्क्रिप्शनविना रस्त्यावर खुलेआम विक्री केल्याप्रकरणी कोरेगाव पार्कमधील वर्धमान स्पेशालिटी प्रा. लि. या औषध दुकानाचा घाऊक तसेच किरकोळ औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी केली.

कोणत्याही डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन नसताना तसेच एका फोनवरून पेशंटला रस्त्यावर औषधाची विक्री करीत असल्याचा सिंहगड रस्त्यावर २२ जुलैला प्रकार घडला. 'एफडीए'च्या औषध निरीक्षकांनी वर्धमान स्पेशालिटीचा कर्मचारी स्वप्नील चव्हाण याला औषध विकताना रंगेहाथ पकडले होते. औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी विजय चंगेडिया, दत्तप्रसाद टोपे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर 'एफडीए'ने संबंधित घाऊक औषध विक्रेत्याच्या दुकानाची तपासणी केली. यापूर्वी किडनीच्या औषधांची रस्त्यावर विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. कॅन्सरच्या इंजेक्शनची विक्री होत असल्याचे वृत्त 'मटा'ने सर्व प्रथम प्रसिद्ध केले होते. घटनास्थळावरून कॅन्सरवरील प्रतिबंधक 'क्रेस्प २५' हे १५९९ रुपये किंमतीचे इंजेक्शन होते. दोन इंजेक्शनची किंमत तीन हजार १९८ रुपये होत असताना सवलतीच्या दरात अडीच हजार रुपयांना दिले होते.

'कोरेगाव पार्कमधील वर्धमान स्पेशालिटी प्रा. लि. या घाऊक औषध विक्रेत्याच्या कर्मचाऱ्याने विना प्रिस्क्रिप्शन औषधे रस्त्यावर विकल्याचे तपासात उघडकीस आले. औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम ६५ (२) नुसार फार्मसिस्टच्या अनुपस्थिती औषधाची विक्री, कलम ६५ (९) (अ) नुसार प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करता येत नाही, घाऊक औषध विक्रीचा परवान्यामुळे डॉक्टरांना औषधे देता येतात. मात्र डॉक्टरांची खरेदीची ऑर्डर नसताना औषधे देणे हे ६५ (९) (क) या नियमाचा भंग करणारे कृत्य असल्याचे तपासात आढळले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध दिल्यानंतर 'सप्लाइड' असा शिक्का मारणे आवश्यक असते.

विक्रेत्यांकडून सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याने त्याला प्रारंभी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सुनावणी होऊन घाऊक तसेच किरकोळ औषध विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला, ' अशी माहिती 'एफडीए'चे प्रभारी सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणूकप्रकरणी तरुणाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फ्लिप कार्डवरून ऑर्डर करून मागविलेले आयफोन खराब आहेत, म्हणून परत करताना बनावट आयफोन परत देऊन ९६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनील किरण शहा (वय २८, रा. अशोकनगर सोसायटी, पालडी, अहमदाबाद) याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याविरुद्ध महेश तुळशीराम सटेल ( वय ३४, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे​ फ्लिप कार्ड कंपनी बेंगळुरू या कंपनीचे हिंजवडी येथील शाखेत शाखाप्रमुख आहेत. आरोपीने कंपनीकडे ऑर्डर करून घेतलेले दोन आयफोन आणि सहा मोबाइल खराब आहेत, अशी तक्रार केली होती. हे मोबाइल परत घेताना आरोपीने बनावट आयफोन देऊन कंपनीची ९६ हजार रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ टक्केही पाऊस २४ जिल्ह्यांत नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असली, तरी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या साठ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीची टांगती तलवार अजूनही कायम आहे. त्यापैकी बारा जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के, तर सहा जिल्ह्यांमध्ये चाळीस टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे.

जूनमध्ये वेळेत हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. त्यानंतर सप्टेंबर उजाडला, तरी पावसाचे दमदार पुनरागमन झालेले नाही. त्यामुळे सांगली ते नाशिक आणि संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळी स्थितीचे सावट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही शहरांसह सोलापूर आणि पुणे व परिसरात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र, हा पाऊसही सर्वदूर नाही. राज्य सरकारच्या कृषि विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्याच्या ३४ पैकी २४ जिल्ह्यांमध्ये साठ टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. त्यापैकी नाशिक, जळगाव, नगर, यवतमाळ, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड,कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जून ते सप्टेंबर या काळातील सरासरीच्या पन्नास टक्क्यांहून कमी आहे. अमरावतीमध्ये राज्यातील सर्वात जास्त, म्हणजे ८४ टक्के पावसाची नोंद झाली, तर सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी, म्हणजे ३०.६ टक्के इतकाच पाऊस झाल्याचे कृषि खात्याने म्हटले आहे. पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ५८.७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या काळातील सरासरीच्या ४९. ५ टक्के इतका पाऊस झाला आहे.

पाणीसाठा ४९ टक्के

पावसाळ्याचे पारंपरिक महिने सरत आले, तरी राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये क्षमतेपैकी केवळ ४९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षातील पदाधिकारी डावलतात : कदम

0
0

माहिती शरद पवार, अजित पवार यांना देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत काम करताना सतत पक्षाच्या पदा‌धिकाऱ्यांकडून डावलले जाते. शहराच्या संबधित महत्वाच्या विषयांवर पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे न बोलविणे हे सवयीचे झाले असून याची संपूर्ण माहिती पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना देणार असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांना याबाबतचे पत्र देऊन पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीची सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे पालिकेतील पदाधिकारी गेले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते शंकर केमसे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. पालिकेचा संपूर्ण आर्थिक कारभार संभाळणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षांना या बैठकीसाठी बोलाविण्यात न आल्याने कदम यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांकडून नेहमी अशा पद्धतीनेच आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार अश्विनी कदम यांनी केली. दिल्ली येथे झालेल्या मेट्रोबाबतच्या बैठकीला स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही उपस्थित का नव्हत्या, याबाबत कदम यांना विचारले असता, बैठक होणार असल्याचा कोणताही निरोप नव्हता. या महत्त्वाच्या बैठकीबाबत महापौर, पालकमंत्री, सभागृह नेते, पालिका आयुक्त यांच्याकडून पत्र मिळाले नव्हते.

महत्त्वाच्या विषयांच्या बैठकींना न बोलाविणे सवयीचे झाले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आपल्याबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये, यासाठी शरद पवार, अजित पवार यांना पत्र देऊन वस्तुस्थितीची माहिती देणार आहे.

- अश्विनी कदम, स्थायी समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थेकडून फसवणूक

0
0

पिंपरी : औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेने मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना रक्कम परत न करता चार कोटी १९ लाख ६७ हजार ५४२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड, संभाजीनगर, आकुर्डी शाखेतील आजी-माजी संचालक, पदाधिकारी व कर्मचारी आदी एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. प्रशांत विठ्ठल देसाई (५४, रा. चिंचवड स्टेशन, पुणे) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पतसंस्थेचे संचालक मधुकर पाचपांडे, उपाध्यक्ष रेवानंद भिरूड, सचिव शिवाजी जगताप, सुरेश बडगे, कौतिक जंगले, वसंत पठारे, किरण देसाई, सोनाजी प्रधान, गोविंद काळे, विमल पाटील, सुशील पाटील, महेंद्र भुजंग, रवींद्र पाटील, वसंत सोनवले, कल्पना भोसले, संदीप देसाई, सीताराम पंडित, राजेंद्र चौधरी, मोतीराम ठोंबरे, गणेश काळे, ज्योती भोळे, जयश्री खांडेकर, अनिता झरेकर, श्रेया कुलकर्णी, सुजाता सोनवणे, दीपक जगताप, शिवाजी साळवे, राजेश पठारे, स्नेहल खडके, कविता मराठे, नीता ढाके आणि मधुकर काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे रडगाणे चालूच

0
0

सभापतिपद मिळूनही पक्ष शिस्तभंगाचा ठपका; पक्षात दुफळी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असो किंवा नसो शहर काँग्रेसमधील रडगाणे चालूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता असतानाही एका समितीचे सभापतीपद काँग्रेसला देऊन त्या पक्षातील दुफळीला अप्रत्यक्ष हातभार लावला आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस निर्माण झाली असून, ते एकमेकांवर तोंडसुख घेण्यात मश्गूल आहेत.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या गीता मंचरकर यांची निवड निश्चित आहे. अर्थात, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हातभार लावला आहे. परंतु, त्यावरून काँग्रेसनेच मंचरकर यांच्यावर पक्षशिस्तभंगाचा ठपका ठेवून कारवाईचा आग्रह धरला आहे. त्यामुळे मंचरकर यांनी संतप्त होऊन निवेदन प्रसिद्धिस दिले आहे.

या निवेदनातील माहितीनुसार, 'खरे तर शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते सूडबुद्धीने वरिष्ठांकडे तक्रार करीत आहेत. यातून काँग्रेस कमजोर होत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी विरोधी पक्षनेत्यांच्या वहिनीस राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सहकार्याने सभापतिपद मिळाले होते. तसेच ते स्वतः प्रथम निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद 'राष्ट्रवादी'च्याच सहकार्याने मिळाले. त्यांच्या बंधूंनाही स्थायी समिती सदस्यपद 'राष्ट्रवादी'मुळे मिळाले आहे. त्या वेळी पक्षशिस्त कुठे गेली होती? त्यांच्याकडे पदे नसल्याने उद्योग करतात का? विद्यमान शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षहिताचे काय काम केले? ते कोणासाठी राबले? याचा लेखाजोखा कार्यकर्त्यांकडे आहे.

भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेसला वाढविण्याचे काम केले आहे. त्यांच्यामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होते. पक्षाला 'अच्छे दिन' येत आहेत. सध्याच्या नेतृत्वाने सलीम शिकलगार, नारायण लांडगे, बाबासाहेब तापकीर, गोपाळ कुटे, सतीश दरेकर, हरीश तापकीर ही मंडळी काँग्रेस सोडून का गेली, याचा विचार करायला हवा. नाहक खटाटोप करू नये. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शहरातील तिन्ही उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. हे अपयश लपविण्यासाठी वैयक्तिक षड्यंत्र रचून पक्षाची बदनामी करीत असल्याचा आरोपही मंचरकर यांनी केला आहे.

काँग्रेसला खिंडार?

काँग्रेसला सभापतिपद मिळाले म्हणून पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी अभिनंदन करायला हवे होते. परंतु, त्यांनी 'चमच्यां'सोबत मिळून पक्षाला बदनाम करण्याचा चंग बांधला आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे उर्वरित कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अकारण सूडबुद्धीचे राजकारण चालू आहे. पक्ष निरीक्षकांची दिशाभूल होत आहे. यामुळे काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया गीता मंचरकर यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्तांची कोर्टात धाव

0
0

वाढीव मोबदल्याची मागणी; साडेआठ हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरण व अन्य प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निवाड्यांवर थेट कोर्टात धाव घेण्याकडे प्रकल्पग्रस्तांचा कल वाढला असून, पुणे विभागातून तब्बल आठ हजार ८५७ प्रकरणे वाढीव मोबदल्यासाठी कोर्टात दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे त्यातील अडीच हजार प्रकरणांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निकाल लागले आहेत.

धरण, रस्ते वा अन्य विकासाच्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येते. त्यासाठी नोटीस काढून निवाडा जाहीर करण्यात येतो. या निवाड्यात दिलेल्या मोबदल्यावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून थेट जिल्हा न्यायालय व त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली जात आहे. या कोर्टबाजीमुळे पुणे विभागातील अनेक प्रकल्पांच्या उभारणीमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून तब्बल ५,४२७, सातारा जिल्ह्यातून ८१५, सांगली जिल्ह्यातील ८४, कोल्हापूरमधून १,०५९ व सोलापूर जिल्ह्यातून १,४७२ प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे जिल्हा कोर्टामध्ये दाखल झाली आहेत. यामधील २,६८६ अर्ज निकाली काढण्यात आले आहेतर तर ६,१७१ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जिल्हा कोर्टात धाव घेतलेल्या तब्बल २,६०३ प्रकरणांमध्ये कोर्टाने प्रकल्पग्रस्तांना दिलासा दिला आहे. केवळ ८३ प्रकरणांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात निकाल लागले आहेत.

जिल्हा कोर्टाच्या निकालावर २,०५९ प्रकरणांमध्ये प्रशासनाने हायकोर्टामध्ये अपिल केले आहे. तसेच ६६ प्रकरणांमध्ये हायकोर्टात अपिल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हायकोर्टात अशी २,३८६ प्रकरणे निर्णयासाठी प्रलंबित आहेत. राज्य सरकारने भूसंपादनासाठी मोबदला देणारा निवाडा जाहीर केल्यावर शेतकऱ्यांकडून त्यावर आक्षेप घेण्यात येतो. योग्य मोबदल्यासाठी कलम १८ अन्वये जिल्हा कोर्टात धाव घेता येते. असा काही प्रकरणांमध्ये प्रकल्पग्रस्तांना योग्य व त्वरील मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकारी वा संबंधित विभागाच्या प्रमुखांची खुर्ची जप्त करण्यापर्यंतचे आदेश कोर्टाकडून झाले आहेत. जमिनीच्या मोबदल्यासाठी कोर्टात धाव घेण्याचा कल वाढल्यामुळे अनेक प्रकल्पांच्या कामाला खीळ बसली आहे. धरणांची कामे तसेच कालवे, पुनर्वसनाच्या योजना रखडल्या आहेत. परिणामी, प्रकल्पांची किमत वाढते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’च्या अडचणींचे पडसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचे पडसाद शुक्रवारी पुण्यात आयोजित विद्यार्थी हक्क परिषदेतही उमटले. कायद्यांतर्गत आरक्षित जागांवर प्रवेश मिळत नसल्याने वैतागलेल्या पालकांनी परिषदेत थेट पालकमंत्र्यांनाच प्रश्न विचारल्याने गोंधळ उडाला. सभाशास्त्रानुसार कार्यक्रम होण्याची अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. शहरातील लोकप्रतिनिधींना पालक आणि मुलांच्या प्रश्नांपेक्षा संस्थाचालकांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचा आरोपही पालकांनी केला.

शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात विद्यार्थी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आमदार गिरीश बापट यांच्यासह खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, महादेव जानकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर हा प्रकार घडला. उपस्थित पालकांनी 'आरटीई'चे प्रवेश मिळणार कधी, असा थेट सवाल केला. आरटीईचा प्रश्न विचारल्याचे लक्षात आल्यानंतर बापट यांनी प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना नोटिसा काढल्याचे सांगितले. तसेच, 'या प्रश्नावर अशी चर्चा होऊ शकत नाही. सभाशास्त्रानुसार आयोजकांनी प्रश्न विचारण्यास संधी दिल्यानंतरच असे प्रश्न विचारायला हवेत,' असे सांगून या विषयीची चर्चा थांबविण्यात आली.

या प्रकारामुळे चिडलेल्या पालकांनी कार्यक्रमानंतरही बापट यांना भेटून आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने सरकारवर आक्षेप घेतला. प्रकाश काळे म्हणाले, 'आम्ही आमच्या मुलांच्या हक्काच्या शिक्षणासाठी भांडत आहोत. महापालिकेचे शिक्षण मंडळ प्रमुख बी. के. दहिफळे, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या. मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने बापट यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. बापट प्रत्येकवेळी टाळाटाळ करत आहेत.'

'लोकप्रतिनिधी संस्थांच्या बाजूने'

आमदार मेधा कुलकर्णी यांनी संस्थाचालकांच्या बाजूने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बोलणी केली. आमदार आणि पालकमंत्री संस्थाचालकांसाठी काम करत असतील, तर नागरिकांच्या समस्या सोडविणार तरी कोण, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्लासविरोधात एल्गार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकत्र आलेल्या शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शुक्रवारी शिक्षण सम्राटांसोबतच खासगी क्लास चालकांविरोधातही एल्गार पुकारला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धारही या परिषदेत करण्यात आला.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आयोजित या परिषदेसाठी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, महादेव जानकर, भारती लव्हेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, 'शिवसंग्राम'चे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, रिपब्लिकन पार्टीचे अविनाश महातेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांसाठीची वयोमर्यादा सरसकट ४० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी करणारा ठराव या परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. तसेच, स्पर्धा परीक्षांच्या क्लासचालकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्याची राज्यात निर्मिती व्हावी, स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी किमान विभागीय पातळीवर मोफत हॉस्टेल्सची सुविधा मिळावी आदी मागण्याही या ठरावात समाविष्ट करण्यात आल्या.

ही परिषद विद्यार्थ्यांच्या लढ्याचे कायमस्वरूपी व्यासपीठ व्हावी, अशी भावना शेट्टी यांनी व्यक्त केली. शेट्टी म्हणाले, की 'इतर राज्यांमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची वयोमर्यादा वाढविली आहे. महाराष्ट्रातही ती वाढवण्यात अडचण नाही. या पूर्वी साखर सम्राटांविरोधात लढण्याची वेळ होती. या पुढील काळ हा विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या शिक्षण सम्राटांविरोधात लढण्याचा आहे. सरकारने या सम्राटांवर टाच आणली नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.' केवळ उच्च शिक्षणासाठीच नव्हे, तर शालेय शिक्षणाच्या पातळीवरही या पुढील काळात सर्व पक्षांना तीव्र लढे उभारण्याची गरज असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले.स्पर्धा परीक्षांसाठीच्या वयात वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन या वेळी बापट यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद

'एमपीएससी'च्या उमेदवारांसाठीची वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत करण्याबाबत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली होती. फडणवीस यांनी या पत्राला उत्तर देताना, वयोमर्यादेत वाढ करण्याविषयीची सूचना स्वागतार्ह असल्याचे स्पष्ट केले. त्याविषयी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सूचनेवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीच्या लिफ्टमध्ये हिसकावली सोनसाखळी

0
0

कोंढव्यातील विष्णूविहार सोसायटीतील प्रकार

म. टा. प्रतिनधी, पुणे

रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोने हिसकवणाऱ्या सोनसाखळी चोरांचे धाडस वाढत असून, आता त्यांनी थेट सोसायटीत घुसून आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. कोंढव्यातील विष्णूविहार सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका साठ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या सकाळी बाहेर गेल्या होत्या. त्या परत आपल्या इमारतीमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये आल्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती लिफ्टमध्ये आली. त्या व्यक्तीने महिलेच्या गळ्याची सोन्याची साखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक एस. बी. पाचूरकर हे अधिक तपास करीत आहेत.

गेल्याच आठवड्यात कोथरूड भागात अशाच पद्धतीने सोसायटीमध्ये शिरून एका ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती सोसायटीमध्ये आली. त्या व्यक्तीने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली. त्यानंतर बाहेर उभ्या केलेल्या मोटारसायकलवरून आरोपी पळून गेले होते. रस्त्यावर सोनसाखळी हिसकावणारे चोरटे आता सोसायटीमध्ये येऊन साखळी चोरी करू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो खर्चवाढीचा पालिकेवर भार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमिनीवरून धावणारी ‌का भुयारी मेट्रो करायची या वादामुळे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यास झालेल्या विलंबामुळे मेट्रोचा खर्च गेल्या पाच वर्षात काही हजार कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे प्रत्येक वर्षी मेट्रोच्या खर्चात सुमारे सातशे ते साडेसातशे कोटींनी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. प्रत्येक वर्षी प्रकल्पाच्या खर्चात होणाऱ्या वाढीमुळे प्रकल्पासाठी पालिकेला द्याव्या लागणाऱ्या दहा टक्के रकमेतही वाढ होणार असून, त्याचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये (डीपीआर) काही प्रमाणात बदल करून मेट्रोचा नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे. पुणे मेट्रोचा प्रस्ताव अंतीम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे दाखल झाल्यानंतरही शहरात येणारी मेट्रो भुयारी असावी की जमिनीवरून धावणारी यावरून भाजपच्या आमदार, खासदारांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे या प्रकल्पाला कोणतीही गती मिळत नव्हती. परिणामी मेट्रा प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

शहरात मेट्रो करण्यासाठी होणाऱ्या एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र, राज्य सरकार, १० टक्के रक्कम महापालिका तर उर्वरित ५० टक्के रक्कम पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर उपलब्ध करावी लागणार आहे. मेट्रो प्रकल्पाला विलंब झाल्याने प्रकल्प खर्चात झालेल्या वाढीमुळे पालिकेच्या वाट्याला येणाऱ्या दहा टक्के वाट्यातही वाढ होणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्यांसाठी वसुलीपथक

0
0

सोसायटीतील मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांना वठणीवर आणणार

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे : किरकोळ कारणांमुळे पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा 'इगो' मनात ठेवून सोसायटीचा देखभाल खर्च (मेंटेनन्स) भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपद्रवी सभासदांना वठणीवर आणण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने कंबर कसली आहे. आर्थिक परिस्थिती असतानाही मुद्दाम थकबाकी ठेवणाऱ्या सभासदांच्या दारात वसुली अधिकारी ठाण मांडून बसणार आहेत. गेल्या महिनाभरात या अधिकाऱ्यांनी २० लाख रुपये सभासदांकडून वसूल केले आहेत.

वेगाने विकसित होत असलेल्या पुणे शहरामध्ये सध्या सुमारे पंधरा हजार सोसायट्या आहेत. यातील प्रत्येक सोसायट्यांमधील अडचणी वेगवेगळ्या असल्या तरी थकबाकीदारांची समस्या सगळ्यांना भेडसावत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सोसायटीचा देखभाल खर्च देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या वाढत असून, ही उपद्रवी मंडळी पदाधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहेत. एकाच सोसायटीत शेजारी राहायचे मग वैर कशाला घ्यायचे, अशा मानसिकतेतून पदाधिकारीच सभासदांवर कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याचे चित्र अनेक सोसायट्यांमध्ये दिसते. काही ठिकाणी बड्या नेत्याचा अथवा अधिकाऱ्याचा वरदहस्त असलेले सभासद सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाच दमदाटी करीत आहेत.

उपद्रवी सभसादांना धडा शिकविण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आता पाठीशी उभा राहिला आहे. उपनिबंधकाच्या निर्णयानंतरचे वसुलीचे अधिकार महासंघाला दिले आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून महासंघाचे वसुली अधिकारी थकबाकीदारांकडून पैसे मिळवून देत आहेत. यासाठी महासंघाने दोन वसुली अधिकारी नेमले आहेत.

'काही वर्षांपूर्वीपर्यंत थकबाकीच्या तक्रारी कमी होत्या. मात्र, सोसायट्यांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच थकबाकीची समस्या गंभीर झाली आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा याबद्दल सोसायट्यांना मदत करण्यास सुरुवात केली तेव्हा काहीच जागृती नव्हती. आज मात्र महिन्याला आता आठ ते दहा तक्रारी आमच्याकडे दाखल होतात,' असे महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले.

'तक्रार घेऊन येणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सुरुवातीला आम्ही थकबाकी कशी वसूल करायची याचे मार्गदर्शन करतो. कायदेशीर नोटीस कशा पाठवायच्या, त्यानंतर उपनिबंधकाकडे पत्र कसे लिहावे, जप्तीची कारवाई ही प्रक्रिया निश्चित असून यामध्ये आमचे वसुली अधिकारी सोसायटीला मदत करतात. वसुलीचा दाखला मिळविला की अधिकारी बंधिताच्या घरी जाऊन थकबाकीचा पाठपुरावा करतात, गरज पडल्यास पोलिसांच संरक्षणही घेतले जाते. आत्तापर्यंत काही मोठ्या राजकीय व्यक्तींबरोबरच सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन वसुली पथकाने लाखो रुपयांची थकबाकी वसूल करून दिली आहे,' असे पटवर्धन यांनी सांगितले.

येत्या वर्षी ६० लाखांचे टार्गेट

गेल्या दोन वर्षात तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दोन वसुली अधिकारी नेमण्यात आले

गेल्या वर्षी ३९ लाखांची थकबाकी वसुली

कल्याणीनगरमधील मोठ्या सोसायटीतून एकाच व्यक्तीकडून १७ लाख ५० हजार वसूल केले.

या वर्षात ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे २५ लाख रुपयांची वसुली

वर्षाअखेरीस ६० लाख रुपयांचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

कोथरूडमधील दोन नगरसेवकांकडून थकबाकी रोख रक्कमेत वसूल केली.

सनदी अधिकाऱ्यांनीही जप्तीच्या भीतीने भरली थकित रक्कम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीएतील छात्रांना विषबाधा

0
0

२५० जणांना अपचनाचा त्रास; नाश्त्यातून विषबाधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या २५० हून अधिक छात्रांना अपचनाचा त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या छात्रांनी गुरुवारी एनडीएच्या कॅडेट मेसमध्ये नाश्ता व जेवण घेतल्यानंतर हा त्रास झाला. हा प्रकार अन्नातून विषबाधा झाल्याने घडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अपचनाचा त्रास होऊ लागल्यानंतर या छात्रांना तातडीने एनडीएच्या आवारातील खडकवासला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. एनडीएमधील सर्व छात्र कॅडेट मेसमध्ये एकाच वेळी जेवण अथवा नाश्ता घेतात. त्यामुळे हा आकडा अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत एनडीएकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना हा त्रास झाला. नाश्त्याला देण्यात आलेल्या अंड्यामुळे हा त्रास झाल्याची शक्यता असल्याचेही सूत्रांकडून समजते.

शुक्रवारी नाश्ता व जेवण केल्यानंतर एनडीएच्या २५० छात्रांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांच्यावर एनडीएच्या आवारातील खडकवासला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर छात्रांना घरी सोडण्यात आले असून त्यांनी त्यांच्या नियमित सराव व प्रशिक्षणाला सुरुवातही केली आहे. या मुलांना अपचनाचा त्रास कशामुळे झाला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे एनडीएतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काही छात्रांना अन्य हॉस्पिटलमध्येही उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. परंतु, त्यांनाही उपचारानंतर हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या छात्रांना दररोजचा नाश्ता, जेवण कॅडेट मेसमध्ये देण्यात येते. या मेसमध्ये एकाच वेळी २१०० छात्र जेवण घेऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. सर्व छात्र या ठिकाणीच जेवण घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images