Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘अपंग’चे शिक्षक पगाराच्या विवंचनेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील अपंग एकात्म योजनेतील २६ शिक्षकांना गेल्या तीन वर्षांपासून पगाराच्या रकमेचा एक दमडाही मिळालेला नाही. तीन वर्षे पगार थकल्यामुळे लाखांच्या घरात गेलेल्या रकमेसाठी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतरही पगारबिले निघायचे नाव घेत नाहीत. त्यामुळेच आता कोणा अधिकाऱ्याला लाखभर रुपये दिल्यानंतरच हक्काचे पगार आम्हाला मिळणार का, असा हताश सवाल शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

१९९०पूर्वी अपंग एकात्म योजनेद्वारे संबंधित शिक्षक माध्यमिक शाळांमध्ये रूजू झाले होते. २००९ नंतर केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीचा आर्थिक भार राज्य सरकारने उचलण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान सुरू झालेल्या अपंग समावेशित शिक्षण योजनेच्या माध्यमातून या शिक्षकांचे कामही सुरू झाले होते. अपंग समावेशित शिक्षण योजनेला मिळणारा निधी विचारात घेऊन राज्यात या योजनेद्वारे बोगस शिक्षक भरती झाली. त्यातूनच आर्थिक गैरव्यवहारही झाले. त्यावर बोट ठेवून केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान अनुदानाच्या मुद्द्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, या परिस्थितीमुळे सुरुवातीपासून प्रामाणिकपणे काम करणारे राज्यातील आम्ही २६ शिक्षक नाहक भरडले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळेच ऑक्टोबर २०१२ पासून आजतागायत या शिक्षकांना आपल्या हक्क्याच्या पगारापासून वंचित राहावे लागले आहे.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक, नंतरच्या टप्प्यात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे कार्यालय, मंत्रालयातील संबंधित अधिकारी वर्ग यांच्याशी या विषयी सातत्याने संपर्क करून पगाराविषयी विचारणा शिक्षकांकडून करण्यात आली. खात्यातील अधिकाऱ्यांकडून अपंग समावेशित योजना बंद होत असल्याने, तुमच्या पगारांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न फसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील तीन सराईत गुन्हेगारांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि जांबीया असा २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्हेगारांचे तीन साथीदार फरारी झाले आहेत.

सलीम मेहबूब पहिलवान शेख (वय ३६), चंद्रकांत गोरख सकट (वय २८, रा. गांधीनगर, देहूरोड) आणि भरत बळीराम जाधव (वय ३९, रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती लोहमार्गचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली. पिंपरी रेल्वे स्टेशन येथे पहाटे येणाऱ्या मुंबई-विजापूर पॅसेंजरवर सल्या शेख आणि त्याचे साथीदार दरोडा टाकणार असल्याची माहिती लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सतीश ढोले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे सापळा रचून तिघांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. अटक केलेल्या तिघांकडे तपास केला असता मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. अटकेतील आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्या विरोधात पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केले असता ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत लुईस मकासरे, कर्मचारी मंदार कंदूल, सुनील माने, संजय चोभे, पंकज मुळे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अंमली पदार्थाचा सूत्रधार गजाआड

पुणेः 'एलएसडी' हा अंमली पदार्थ पुरविणाऱ्या सूत्रधाराला मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आली असून, त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या प्रकरणी लब्धी ललित मेहता (२२, रा. अगरवालनगर, इंदूर) याला अटक करण्यात आली आहे. या पूर्वी टॉरेन्स फिरदोस मेहता, यश अविनाश जोगळेकर (वय २९, रा. भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मेहताला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या बँक खात्याची तपासणी करायची आहे. त्याचा आंतरराज्य टोळीशी संबंध आहे का, तसेच या गैरव्यवहारातून आलेला पैसा दहशतवादी कृत्यासाठी​ पुरविला आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण क्षेत्रातही पावसाची हजेरी

$
0
0

पुणेः पावसाळ्याचे अडीच महिने कोरडे गेल्यानंतर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील चार धरणांत पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दडी मारली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट हे हमखास पावसाचे दोन्ही महिने कोरडे गेले. पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्यामुळे धरणांत पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. या अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मान्सूनला परतीचे वेध लागल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाऊस पडेल अपेक्षा होती. शहरामध्ये मंगळवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पण धरण क्षेत्रात मात्र पावसाने हुलकावणी दिली. बुधवारी दुपारनंतर पावसाने धरण परिसरात हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत वरसगाव धरणात ३८ मिलिमीटर, पानशेतमध्ये १९ मिमी, खडकवासला धरणात ९ मिमी व टेमघरमध्ये एक मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा किंचित वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची जोरदार बॅटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकर सुखावले. शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळी साडेपाचपर्यंत ६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी शहरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र ते लक्षद्वीप दरम्यान वातावरणाच्या खालच्या थरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावर वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून राज्यात पाऊस पडत आहे. येत्या तीन ते चार दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे क्षेत्र निर्माण झाल्यास पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (७० मिलिमीटर) झाली. उस्मानाबाद येथे ५५, रत्नागिरी येथे ३०, कोल्हापूर येथे २४, नाशिक येथे ३१, सोलापूर येथे २३, वर्धा येथे १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकलेखा’कडून ‘लवासा’ची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेकडो एकर जमीन खरेदी, पर्यावरणविषयक आक्षेप, डोंगरांचे उत्खनन, कृष्णा खोरे विकास महामंडळाने केलेला करार आणि नगर विकास विभागाने दिलेली परवानगी यासंबंधी महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्याची लोकलेखा समिती 'लवासा'ची पाहणी करणार आहे.

लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह २५ सदस्यांची समिती लवासाची पाहणी करणार आहे. महालेखापालांनी आपल्या तपासणी अहवालामध्ये विविध खात्यांशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले होते. या तपासणीमध्ये केलेल्या सूचना व त्यांची झालेली पूर्ती याची पाहणी ही समिती येत्या ११ व १२ सप्टेंबर रोजी करणार आहे.

थंड हवेच्या ठिकाणी गिरीशहर वसविण्यासंदर्भात राज्य सरकाने १९९६ मध्ये कायदा केला. या कायद्याच्या आधारे लवासाने मुळशीमध्ये गिरीशहर वसविण्यासाठी ९ हजार ५०० एकर जमिनीची खरेदी केली. या जमिनीच्या खरेदीनंतर विविध खात्यांची परवानगी घेऊन लवासा गिरीशहर उभारण्यास सुरुवात झाली.

'लवासा'शी कृष्णा खोरे विकास महामंडळाने जमीन व पाणी देण्यासंदर्भात करार केला. लवासाला कृष्णा खोरे महामंडळाने १४१ हेक्टर जमीन दिली. त्यातील १२९ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे, तर १२ हेक्टर जमिनीवर पर्यटन विकासाचे काम केले आहे. याबद्दल मोठा वाद झाला होता. तसेच पर्यावरणाशी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस-वे’चा करार प्रसिद्ध

$
0
0

पुणेः राज्य माहिती आयोगाने सज्जड दम भरल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अखेर 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे'च्या टोल करारासह अन्य तपशील बुधवारी जाहीर केला. मात्र, त्यातील अपेक्षित वाहनसंख्येच्या तपशीलाबाबत ग्राहक प्रतिनिधींनी शंका व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच टोलचा मोठा भुर्दंड माथ्यावर बसल्याचा आरोप केला आहे.

'एक्स्प्रेस-वे'वर दरड कोसळून झालेल्या अपघातानंतर या विषयावरून वादंग निर्माण झाले होते. रस्त्याच्या देखरेखीची आणि अशा अपघातांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न गुलदस्त्यात राहिला होता. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी या रस्त्यासह खासगी सहभागातून उभारलेल्या (पीपीपी) सर्व प्रकल्पांचा तपशील आणि टोलचे करार प्रसिद्ध करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीला दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पाण्यालाही महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इजिप्तसह कर्नाटकातूनही आवक झाल्याने कांद्याचे भाव उतरत असतानाच स्थानिक भागातून होणारी आवक अचानक घटली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव किलोमागे ८ ते १० रुपयांनी वाढले असून, दहा किलो नव्या कांद्यासाठी ४०० ते ५०० रुपये, तर जुन्या कांद्यासाठी ५०० ते ६०० रुपये द्यावे लागणार आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मार्केट यार्डात इजिप्तहून कांदा आला. या कांद्याची चव, आकार नेहमीच्या कांद्यापेक्षा वेगळा आणि मुख्य म्हणजे तो ओलसर असल्याने सामान्य ग्राहकांच्या पसंतीस फारसा उतरला नाही. हॉटेलचालकांनी कमी दरात असल्याने या कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दरम्यान, कांद्याची काही दिवसांपूर्वी आवक चांगली होत असल्याने भाव उतरले होते. त्यामुळे ग्राहकांना काही दिवस दिलासा मिळाला होता. घाऊक बाजारात कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलोपर्यंत खाली घसरले होते. मात्र, किरकोळ बाजारात चढ्या दरानेच विक्री होत आहे.

'इजिप्तचा कांदा बाजारात आला असला तरी तो ग्राहकांना फारसा रूचलेला नाही. हॉटेलचालकांनी सुरुवातीला त्याची खरेदी केली. परंतु, ग्रेव्ही तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कांदा नसल्याने त्याचा फारसा वापर झालाच नाही. त्यामुळे ग्राहकांना थेट खाण्यासाठी दिला जात आहे. त्यामुळे हॉटेलचालकांनीदेखील इजिप्तचा कांदा खरेदीसाठी हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक भागातून कांद्याची आवक थोडी घटू लागली आहे. त्यामुळे नव्या कांद्यासाठी दहा किलोला ४०० ते ५०० रुपये, तर जुन्या कांद्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहेत,' अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. मार्केट यार्डात जुन्या कांद्याची २० ट्रक, नवीन कांद्याची ४ ते ५ ट्रक तसेच इजिप्तच्या कांद्याची ४ ते ५ ट्रक आवक झाली आहे. मागील आठवड्यात आलेल्या कांद्याच्या तुलनेत बुधवारी आवक रोडावली. त्यामुळे भाव वाढले. इजिप्तच्या कांद्याला ४०० ते ४५० रुपये भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी दुरुस्तीला मान्यताच नाही’

$
0
0

पुणेः संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) रस्त्यावरील जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) तातडीने सुरू व्हावी, याकरिता बसथांब्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, हा निधी खर्च करताना स्थायी समितीची कोणतीच मान्यता घेतली नसल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.

आळंदी रोडवर बीआरटीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करूनही त्याचा वापर होत नव्हता. बसथांब्यांवर गैरप्रकारही सुरू झाले होते. काही समाजकंटकांनी त्याची नासधूस केली होती. एक बसथांब्यांसाठी तब्बल ३३ लाख रुपये खर्च करूनही बीआरटी सुरू करण्याकरिता पुन्हा त्याची दुरुस्ती करणे पालिकेला भाग पडले. या दुरुस्तीला मान्यताच घेण्यात आली नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कनीझ सुखरानी आणि आशिष माने यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संकेत झुगारून गाडीवर महापालिकेचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोटारीच्या पुढील बाजूला पालिकेचा बोधचिन्ह असलेला झेंडा लावण्याचा मोह उपमहापौर आबा बागूल यांनाही थांबविता आला नाही. महापालिकेचे बोधचिन्ह वापरून त्यावर उपमहापौर अशी अक्षरे लिहिलेला झेंडा तयार करून आपल्या गाडीवर लावण्यास बागूल यांनी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यासाठी महापौरांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर असलेल्या व्यक्तीला पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गाडीवर झेंडा लावण्यात येतो. महापालिकेच्या २४ एप्रिल २००७ च्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या गाडीवर झेंडा लावण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे. अन्य शहरातील महापालिकांच्या महापौरांच्या मोटारीप्रमाणेच महापौरांच्या मोटारीच्या फ्लॅगवर महापालिकेचे बोधचिन्ह आणि मराठीतून 'महापौर, पुणे' ही अक्षरे असवीत, असे प्रस्तावात म्हटले होते.

महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी परवानगी दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरसचिव विभागाकडे चौकशी केली असता त्यांनीही उपमहापौरांच्या मोटारीवरील झेंडा आमच्या विभागाकडून दिला गेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या कुटुंबीयांना ‘महावितरण’ची मदत

$
0
0

पुणेः पानमळा येथे विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना 'महावितरण'तर्फे वीस हजार रुपयांची तातडीची मदत बुधवारी देण्यात आली. या परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

बैठ्या घरात वीजप्रवाह उतरल्याने पानमळा परिसरात अद्वैता चंद्रकांत वाघमारे या अडीच वर्षांच्या मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला आणि चार महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर वाघमारे कुटुंबास महावितरणकडून वीस हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली आहे. विद्युत निरीक्षक विभागाकडून या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. उघड्या वीजवाहिन्यांमुळे शॉक बसण्याचा धोका वाढत असल्याने भूमिगत वीजवाहिन्या टाकाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावपट्टीचा आणखी विस्तार

$
0
0

पुणेः पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. विमानतळावरील वाढता ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी हवाई दलाची दहा एकर जागा लीजवर घेण्यात येणार आहे. याबाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करून तसेच तांत्रिक बाबी तपासून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

पुण्याचा लोहगाव येथील विमानतळ हवाई दलाचा विमानतळ आहे. दैनंदिन स्वरूपात तब्बल साडेअकरा हजार प्रवाशांचा राबता आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१४-१५) तब्बल ४१ लाख ९० हजार प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे.या तळावरून हवाई दलाच्या विमानांसह, विमान कंपन्यांची काही आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानांचे उड्डाण तसेच खासगी म्हणजेच चार्टर्ड फ्लाइट्सचीही उड्डाणे होतात. या तळावरून दिवसाला विमानांच्या ६६ फेऱ्या होतात. परंतु, हवाई दलाच्या सरावामुळे या विमानतळाच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे सध्याचा तसेच भविष्यातील ताण लक्षात घेऊन धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे.

देशातील सर्वाधिक चार्टर्ड फ्लाइट्सचे उड्डाण होणाऱ्या विमानतळांमध्ये पुण्याचा समावेश होतो. धावपट्टीच्या विस्ताराबरोबर वाढत्या विमानफेऱ्यांची संख्या लक्षात घेऊन विमानांसाठीचे पार्किंग म्हणजेच हँगर व अन्य पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा निर्णयही पूर्वीच घेण्यात आला आहे. त्यासाठीही भूसंपादनाची गरज आहे. यासाठी विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी हवाईदलाची दहा एकर जागा लीजवर घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच एका खासगी व्यावसायिकाने विमानतळासाठी जवळची २५ एकर जागा देऊ केली आहे, त्याविषयी तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले आहे. याबाबत लवकरच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांना झापले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मेट्रोच्या तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांचा विचार तज्ज्ञांवर सोपवा, त्यांना त्यांचे काम करू द्या,' अशा शब्दांत केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी शहराच्या खासदारांना बुधवारी सुनावले. पुणे मेट्रोला आधीच खूप उशीर झाला असून, तुम्ही निर्णय घेत नसल्याने त्याचे खापर माझ्यावर फुटते आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

शहरात एलिव्हेटेडऐवजी भुयारी मेट्रो करावी, असा आग्रह स्वयंसेवी संस्थांसह शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनीही धरला होता. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीमध्येही शिरोळे यांनी भुयारी मेट्रोची बाजू लावून धरली. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) केलेला पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवालच (डीपीआर) सदोष असल्याची भूमिका मांडली. तसेच, डीएमआरसीऐवजी इतर संस्थांकडून मेट्रोचा अहवाल तयार करून घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

शिरोळे यांची भूमिका सविस्तर ऐकून घेतल्यानंतर गडकरींनी देशातील इतर सर्व महत्त्वाच्या शहरांतील मेट्रोचे अहवाल डीएमआरसीनेच केले आहेत, याची जाणीव करून दिली. पुणे मेट्रोबाबत आधीच खूप उशीर झाला असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही, शिरोळे यांनी डीएमआरसीच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा लावून धरला. अखेरीस, तांत्रिक आणि आर्थिक बाजूंचा विचार तज्ज्ञांनाच करू द्या, तुम्हाला सूचना करायच्या असतील, तर त्या जरूर करा, अशी भूमिका गडकरी यांनी मांडली. तसेच, यापुढे पुणे मेट्रो डीएमआरसीच्या अहवालानुसारच होईल, हे स्पष्ट करून एलिव्हेटेड-भुयारी या वादावर त्यांनी कायमचा पडदा टाकला.

'खापर माझ्यावर फुटले'

'मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाला आर्थिक मान्यता देणाऱ्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डासमोर (पीआयबी) गेल्यावर्षीच मेट्रोचे प्राथमिक सादरीकरण झाले होते. परंतु, त्यानंतर पुन्हा एलिव्हेटेड की भुयारी हा वाद वाढविण्यात आला. त्यामुळे, मेट्रोला उशीर होत गेला. या दरम्यान नागपूरच्या मेट्रोचे भूमिपूजन झाले, कामही सुरू झाले. त्यामुळे, गडकरींनी नागपूरसाठी पुण्याची मेट्रो रखडवली, अशी टीका होऊ लागली. त्याचा उल्लेख करीत, पुण्यात तुम्ही ठोस निर्णय घेण्यात कमी पडत आहात; पण त्याचे खापर माझ्यावर फुटते,' असेही गडकरींनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या पदाधिकाऱ्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर

वडकीतील युवा सेनेचा पदाधिकारी हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३५, रा. तळेवाडी, वडकी) यांचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडून खून केला. ही घटना वडकी येथील पोकेनगर परिसरात बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. गायकवाड यांचा सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गायकवाड पोकेनगर येथील फोटो स्टुडिओमध्ये त्यांच्या एका गार्डचा फोटो काढण्यासाठी आले होते. फोटोग्राफर त्याच्या स्टुडिओमध्ये नसल्याने ते एकटेच रस्त्यावर उभे होते, तर त्यांचा गार्ड स्टुडिओमध्ये बसला होता. गायकवाड यांचा मित्र रामदार मोडकही त्यांच्या बरोबर होते. मात्र, स्टुडिओच्याजवळच त्यांचा भाऊ राहत असल्याने ते त्याच्या घरी गेले होते. या वेळी चेहऱ्याला स्कार्फ बांधलेले हल्लेखोर दुचाकीवर तेथे आले. त्यातील एका हल्लेखोराने गायकवाड यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या शरिरात तीन गोळ्या मिळाल्या. घटनास्थळी पोलिसांना चार पुंगळ्या सापडल्या आहेत.

गोळ्यांच्या आवाजाने गायकवाड यांचा गार्ड आणि आजुबाजूचे नागरिक धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गायकवाड यांना तत्काळ हडपसर परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांनी दिली. हल्लेखोर सासवड रस्त्याच्या दिशेने पळून गेले आहेत. पोलिसांनी काही संशयितांची धरपकड सुरू केली आहे. मोडक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससूनमध्ये शिवसैनिकांची गर्दी

घटनेची माहिती समजताच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ससूनमध्ये धाव घेतली. त्यापूर्वीच शिवसैनिकांनी ससूनच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक अभिमान पवार यांच्याकडून शिवतारे यांनी माहिती घेतली. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, नगरसेवक विजय देशमुख, संतोष भाडळे आदी कार्यकर्ते जमा झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारची कृपादृष्टी

$
0
0

पुणेः सत्तेत आल्यानंतर वर्षभराने नव्या केंद्र सरकारची कृपादृष्टी बुधवारी पुणे व परिसराकडे वळली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहराच्या परिसरातील रस्ते सुधारणांच्या विविध योजनांचे 'गिफ्ट हॅम्पर'च पुणेकरांना दिले. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील काम प्राधान्याने सुरू करण्याबरोबरच दिघी ते जळगाव व्हाया पुणे आणि दोन्ही पालखी मार्गांना नॅशनल हायवेचा दर्जा देण्यासही गडकरी यांनी या बैठकीत मान्यता दिली. या दोन्ही रस्त्यांची कामे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साह्याने लवकर सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच पालखी मार्गावरील चार प्रमुख ठिकाणी निवासाची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे अशा सुविधा पुरविण्यासाठी केंद्राकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

पुणे-नाशिक या वाहतुकीने सदैव गजबजलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये भोसरी ते चाकण व खेड या परिसरात अनेक उद्योग असल्याने कामगार वर्ग आणि अन्य वाहनांमुळे येथे दररोज वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून भोसरी ते खेड हा रस्ता सहापदरी करण्यास केंद्राने मान्यता दिली.

लोहगाव विमानतळ विस्तार

लोहगावच्या नागरी (डोमॅस्टिक) विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाईदलाची दहा एकर जागा भाड्याने देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तसेच शेजारील २५ एकर खासगी जागा विमानतळाला घेण्यासाठी प्रस्ताव समोर आला आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या पुण्यातून दररोज विमानांच्या ९५ फेऱ्या होतात. गेल्या वर्षभरात पुण्यातील प्रवासीसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चांदणी चौकात सुधारणा

चांदणी चौकातही वाहतुकीची वारंवार कोंडी होते आणि अनेक अपघातही घडतात. या दोन्ही प्रश्नांवर उपाय म्हणून येथील वाहतूक सुधारणेच्या प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी फ्लायओव्हर किंवा भुयारी मार्ग यापैकी योग्य पर्याय स्वीकारण्यात येणार आहे, तसेच या रस्त्यावर तीव्र उतार असल्यामुळे त्यावरही काही उपाययोजनांचा विचार सुरू आहे. तसेच नगररोडवरही काही फ्लायओव्हर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

टोलनाक्यांवर अडसर नाही

सातारा-कोल्हापूर रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीमुळे येथील टोलनाक्यांवर वाहनचालकांना बराच काळ अडकून पडावे लागते. हे टाळण्यासाठी टोलनाक्यांची क्षमता वाढविण्याचे दुपटीने काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या टोलनाक्यांवरून वाहनचालकांची दोन-तीन मिनिटांतच सुटका होईल, असे सांगण्यात आले. यासाठी आवश्यक कामे रिलायन्स इन्फ्राकडून तातडीने हाती घेण्यात येणार आहेत.

जलवाहतुकीस अनुदान

पुणे शहरातून मुळा व मुठा या दोन नद्या वाहतात, तर जिल्ह्यातून विविध ठिकाणी सहा नद्या वाहतात, तेथे जलवाहतूक सुरू करणे शक्य आहे का, अशी विचारणा गडकरी यांनी केली. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जलवाहतुकीच्या योजनेचे प्रस्ताव सादर झाले, तर केंद्र सरकार त्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन केंद्राकडून देण्यात आले.

रिंगरोडला चालना

रिंगरोडची अलाइनमेन्ट आणि निधी उभारणी असे मोठे प्रश्न या प्रकल्पापुढे उभे आहेत. त्या पार्श्वभूमीवर मावळ-चाकण ते खेड या मार्गावर सर्वाधिक वाहतूक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या परिसरातील रिंगरोडचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या. सुमारे १०१ किलोमीटरचा हा रस्ता पहिल्या टप्प्यात करण्यावर एकमत झाले आहे. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळास शक्य झाले, तर त्यांनी हे काम हाती घ्यावे. अन्यथा केंद्र सरकार यामध्ये पुढाकार घेईल आणि त्याची नोडल एजन्सी म्हणून एमएसआरडीसीनेच काम पहावे, असाही पर्याय मांडण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा सुधारित आराखडा मान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भुयारी की एलिव्हेटेड या वादात रखडलेल्या पुणे मेट्रोचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अहवालानुसारच होईल, यावर केंद्र सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गात बापट समितीने सुचविलेल्या बदलांनाही मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून या वर्षीच पुणे मेट्रोचे काम सुरू करण्याचा मानस नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत मेट्रोला बापट समितीने केलेल्या शिफारसी स्वीकारून डीएमआरसीच्या मूळ आराखड्यानुसार मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्याची माहिती पत्रकारांना दिली. 'पुण्याच्या मेट्रो मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले असून, लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाईल. डीएमआरसीच्या अहवालानुसार एलिव्हेटेड आणि आवश्यकतेनुसार काही भागांत मेट्रो भुयारी असेल', असे बापट यांनी सांगितले.

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग एलिव्हेटेड ऐवजी भुयारी करण्याची मागणी करत, स्वयंसेवी संस्थांनी मेट्रोला तीव्र विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने सादर केलेला अहवाल राज्याने केंद्रीय नगरविकास खात्याकडे पाठवविला होता. परंतु, त्यावर निर्णय होत नव्हता. अखेरीस, गडकरी यांनी शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बोलाविलेल्या बैठकीत त्यावर तोडगा निघाला असून, चर्चेच्या ट्रॅकवर अडकलेल्या मेट्रोला गती प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.

या बैठकीला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, पालकमंत्री बापट, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर उपस्थित होते.

डेक्कन, महापालिका भवन मेट्रोशी जोडले जाणार

जंगली महाराज रोडवरील पाताळेश्वर मंदिर आणि शनिवारवाडा या राष्ट्रीय संरक्षित वास्तूंच्या जवळून मूळ आराखड्यात मेट्रोचा मार्ग दर्शविण्यात आला होता. परंतु, बापट समितीच्या शिफारसींनुसार आता वनाज ते रामवाडी मेट्रो जंगली महाराज रोडऐवजी नदीपात्रालगतच्या रस्त्याने डेक्कन, महापालिका भवन, कोर्ट या मार्गे पुणे स्टेशनजवळून नगर रोडच्या पूर्वीच्या मार्गे रामवाडीपर्यंत जाईल. तर, निगडी ते स्वारगेट ही मेट्रो शनिवारवाड्यावरून जाण्याऐवजी शनिवारवाडा कोर्टामार्गे मंडई आणि तेथून पुढे स्वारगेटपर्यंत जाईल. या बदलांमुळे मेट्रोच्या मूळ आराखड्यातील एक भूमिगत स्टेशन कमी होणार असल्याने खर्चातही घट होण्याचा अंदाज आहे.

दिवाळीत भूमिपूजन?

पुणे मेट्रोला आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यता यापूर्वीही घेण्यात आल्या होत्या. दोन्ही सरकारांनी मेट्रोसाठी तरतूदही केली होती. तरी, मेट्रोचे गाडे पुढे सरकत नव्हते. त्यामुळे, बुधवारच्या बैठकीनंतर इतर तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मेट्रोला अधिक विलंब न करता यावर्षीच, त्यातही दिवाळीच्या सुमारास मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा मानस भाजपने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राचे पुण्याला ‘गिफ्ट हॅम्पर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेले दीड वर्ष रखडलेल्या पुण्याच्या विकासाच्या गाडीला अखेर केंद्र सरकारने बुधवारी हिरवा कंदील दाखविला. पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, विमानतळाचा विस्तार आणि महामार्गांबाबत अनेक निर्णय घेऊन पुणेकरांना 'सुपरफास्ट' विकासाची भेट दिली. पुणे मेट्रोचा एलिव्हेटेड की भुयारी या वादावर पडदा टाकून दिल्ली मेट्रोने सुचविलेला मिक्स मेट्रोचा पर्याय केंद्र सरकारने मान्य केला. आता मेट्रो जंगली महाराज रोडऐवजी नदीकाठाने धावणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर आणि, केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट या नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर याबाबतचे निर्णय जाहीर करण्यात आले. मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीतील वादाबाबत नियुक्त केलेल्या गिरीश बापट समितीचा अहवाल केंद्राने मान्य केला आणि डीएमआरसीने सुचविलेल्या मिक्स मेट्रोचा पर्याय स्वीकारून वादावर पडदा टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेशातून परत आल्यावर मान्यतेची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबई-ठाण्यानंतर राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या पुणे शहराच्या विकासाचे गाडे मात्र राजकीय-प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अडून राहिले होते. नवे सरकार आल्यावरही शहरातील अनेक प्रकल्प चर्चेतच अडकून पडले होते. आठ आमदार, एक खासदार आणि दोन मंत्री अशी एकतर्फी राजकीय ताकद असूनही केंद्र आणि राज्य सरकारची कृपादृष्टी पुण्याकडे वळत नव्हती. मेट्रो, रिंगरोड, एअरपोर्टसह अनेक प्रश्न सोडविण्यासाठी 'पुणे सुपरफास्ट' या व्यासपीठाच्या माध्यमातून 'मटा'ने सतत पाठपुरावा केला होता आणि 'सुपरफास्ट' विकासासाठी आग्रही भूमिका घेतली होती.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांचे काम सुरू करण्याचा निर्णय बुधवारी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला. पुण्याच्या विमानतळ विस्तारीकरणाचे व रिंग रोडचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुण्याच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल.

- गिरीश बापट, पालकमंत्री

पुण्याचा विकाससंकल्प

मेट्रोचा सुधारित आराखडा - मेट्रोमार्गात काही बदल अपेक्षित असून, आता नदीकाठाने कोर्टापर्यंत मेट्रो धावण्याची शक्यता

लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी दहा एकर जागा

रिंगरोडच्या पहिल्या टप्प्याला अनुकूलता

चांदणी चौकातील वाहतूक सुधारणांसाठी दोनशे कोटी रुपये

दिघी बंदर ते जळगाव व्हाया पुणे आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी मार्गांना नॅशनल हायवेचा दर्जा

सातारा रोडवरील टोलनाक्यांची क्षमता दुपटीने वाढविण्यात येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथना करता येणार अॅलोपॅथीची प्रॅक्टिस

$
0
0

विद्यापीठाची फारमॅकॉलॉजीला मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

होमिओपॅथना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेला एका वर्षाचा 'सर्टिफिकेट कोर्स इन फारमॅकॉलॉजी' हा अभ्यासक्रम राबविण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीमुळे होमिओपॅथना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्या परिषदेची गुरुवारी बैठक झाली. बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अभ्यासक्रमाला २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी मान्यता देण्यात आली असून, आता कॉलेजांमध्ये अभ्यासक्रम राबविण्यापासून प्रवेश प्रक्रियेपर्यंतच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या संदर्भात 'मटा'' वारंवार पाठपुरावा केला होता. शहराच्या विविध भागासह ग्रामीण भागातील पेशंटच्या उपचारांसाठी होमिओपॅथ डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या औषधांची गरज भासत होती. त्यावेळी होमिओपॅथी संघटनेच्या अनेक मागण्यानंतर राज्य सरकारने होमिओपॅथसाठी एका वर्षाचा फारमॅकॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार नसल्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम राबविण्याची जबाबदारी आरोग्य विद्यापीठाकडे सोपविण्यात आली.

'होमिओपॅथीचे सध्या शिक्षण घेत असलेले व त्या पुढे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्णवेळठी असेल. राज्यातील होमिओपॅथना हा अभ्यासक्रम वर्षभर आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस असणार आहे. प्रत्येक दिवशी आठ तास म्हणजे चार तास व्याख्यान अथवा तासिका व चार तास प्रात्यक्षिकाचा त्यात समावेश आहे. तसेच दोन दिवस प्रत्येकी चार तास आपत्कालीन विभागात कामकाज करावे लागणार आहे,'अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

सहा महिन्यांत शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक

ज्या वैद्यकीय महाविद्यालयात फारमॅकॉलॉजीचा अभ्यासक्रम राबवयाचा असेल, त्या ठिकाणी उपलब्ध शिक्षकांमार्फत अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु, महाविद्यालयांना या अभ्यासक्रमासाठी सहा महिन्यात स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. होमिओपॅथ डॉक्टरांना विद्यापीठातर्फे त्यांच्या नोंदणीच्या ज्येष्ठतेनुसार अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली लवकरच तयार करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमादरम्यान, सहा महिन्याच्या कालावधीनंतर अंतर्गत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा व एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही डॉ. जामकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती कंत्राटदाराकडेच

$
0
0

मूळ कंत्राटाच्या प्रती 'एमएसआरडीसी' कडून जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक्स्प्रेस-वेसह जुन्या पुणे-मुंबई हायवेची नियमित देखभाल दुरुस्ती, सुरक्षा आणि सुरक्षितता यांच्यासह दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक सुरळित ठेवण्याची जबाबदारी टोल कंत्राटदाराकडेच असल्याचे समोर आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि टोल कंत्राटदार कंपनी 'आयआरबी' यांच्यात झालेल्या कराराच्या प्रती 'एमएसआरडीसी'ने जाहीर केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळून अपघात झाला होता आणि त्यामुळे काही दिवस वाहतूक विस्कळित झाली होती. त्यानंतर या प्रकाराची जबाबदारी नेमकी कोणावर, हा प्रश्न उभा राहिला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन एक्स्प्रेस-वेसह राज्यात खासगी सहभागातून उभ्या राहिलेल्या (पीपी) प्रकल्पांचा तपशील आणि करार जाहीर करण्याचा आदेश राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर 'एमएसआरडीसी'ने या कराराच्या प्रती जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार एक्स्प्रेस-वेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदार कंत्राटदार कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई हायवेवर शीळफाटा ते निगडी या रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्य त्या निकषांप्रमाणे करण्याची जबाबदारी, तसेच या पूर्ण रस्त्यावरील स्थानिक जोडरस्ते आणि अन्य कामेही कंत्राटदारानेच करावीत, असेही या करारात म्हटले आहे. या रस्त्यावर एकूण २७ अंडरपासेस, २३ ओव्हपासेस, तसेच पादचारी क्रॉसिंग यांच्याही दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, या दोन्ही रस्त्यांवर अपघात किंवा अन्य दुर्घटना झाली, तर घटनास्थळास्थळावरील जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे आणि रस्त्यावरील वाहतूक तातडीने सुरळीत करणे, याचीही जबाबदारी टोल कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे.

'वास्तवदर्शी टोलरक्कम निश्चित करावी'

या करारात रस्त्यावरील वाहनसंख्येचा अंदाज बांधण्यात आला असून, त्यानुसार टोलची रक्कम आणि त्यातील वाढ गृहित धरण्यात आली आहे. त्यामध्ये २००४ मधील वाहनसंख्या गृहित धरून दरवर्षी त्यामध्ये पाच टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या संख्येवर टोलमध्ये वाढ करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही वाढ पाच टक्क्यांहून अधिक वेगाने होत आहे. त्यामुळेच वाहनसंख्येतील कमी वाढ गृहित धरून त्याआधारे टोलच्या रकमेत केलेल्या वाढीचा वाहनचालकांना जबर फटका बसत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे सरकारने सध्याच्या वाहनसंख्येची माहिती समोर आणावी आणि त्यावर आधारित वास्तवदर्शी टोलच्या रकमा निश्चित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर वकील उतरले रस्त्यावर

$
0
0

पुणे : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुणेकर खंडपीठ कृती समिती आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे गुरुवारी कर्वे पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. वकिलांकडून शहरातील विविध चौकामध्ये आंदोलने सुरू आहेत.

गुरुवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचा नववा दिवस होता. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, अॅड. हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार साधना बोरकर, संजीव जाधव, युवक काँग्रेसचे चेतन चव्हाण व पुणेकर कृती समितीचे अध्यक्ष मिहीर थत्ते आदी वकील आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते. सलग नवव्या दिवशी आंदोलन असूनही सरकार किंवा लोकप्रतिनिधींकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी सिटी पोस्ट चौकात वकिलांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनीतील शिक्षणसंधी जाणून घ्या उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जर्मनीमधील उच्च शिक्षणाच्या विविध संधींविषयी जाणून घ्यायचे असेल, तर उद्या, शनिवारी (१२ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेले मार्गदर्शन सत्र चुकवू नका. 'रिडिस्कव्हर जर्मनी २०१५' या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना जर्मनीसाठीच्या स्टुडंट व्हिसा अर्जप्रक्रियेपासून तेथील शैक्षणिक संधींबाबत सर्वंकष माहिती मिळेल.

जर्मनीच्या शिक्षण खात्याचा विभाग असलेल्या 'जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्व्हिस'च्या (डाड) पुणे माहिती केंद्रातर्फे हे सत्र आयोजिण्यात आले आहे. जर्मनीत उपलब्ध उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी, अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची; तसेच स्टुडंट व्हिसाची प्रक्रिया, जर्मनीतील विद्यार्थीजीवन याची या सत्रात माहिती दिली जाईल.

जर्मनीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी, व्यावसायिक यांच्याशी थेट संवाद साधायची संधीही विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळेल. इंटर्नशिप या विषयावरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. जर्मनीत उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र विनामूल्य खुले आहे.

वेळापत्रक

सेमिनार : 'रिडिस्कव्हर

जर्मनी २०१५'

स्थळ : एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक,

नवी पेठ, पुणे-३०

तारीख : शनिवारी, १२ सप्टेंबर

वेळ : सकाळी १०.३० ते

दुपारी १२.३०

अधिक माहितीसाठी संपर्क : डाड माहिती केंद्र, पुणे (ई-मेल : pune@daadindia.org, फोन : ०२०-२६१६१३४०/४१ किंवा ९७६७९२३५५४)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>