Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऑक्टोबरचे अनुदान एक महिना आधीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कररचनेत (एलबीटी) बदल केल्यामुळे होणारे राज्यातील महापालिकांचे नुकसान भरून देण्यासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याचे सुमारे ४२० कोटी रुपयांचे अनुदान महापालिकांना वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. याद्वारे, पुणे महापालिकेला ८१ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

व्यापाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटीच्या उलाढालीच्या रकमेत बदल केला. त्यामुळे, ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच एलबीटी भरावा लागणार आहे. मात्र, यामुळे पालिकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पालिकांचे होणारे नुकसान भरून देण्याची जबाबदारी सरकारने उचलली असून, त्यापोटी पालिकांना आर्थिक मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या महिन्यात सरकारने सर्व पालिकांना सहायक अनुदान उपलब्ध करून दिले होते. ऑगस्टपाठोपाठ, सप्टेंबर आणि आता ऑक्टोबरच्या अनुदानाचा आदेशही सरकारने काढला आहे, अशी माहिती एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी दिली.

राज्यातील महापालिकांमध्ये एलबीटी लागू असेपर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या पुणे महापालिकेला या सहायक अनुदानाचा सर्वाधिक वाटा प्राप्त होणार आहे. सरकारच्या एकूण आर्थिक मदतीपैकी २० टक्के म्हणजेच ८१ कोटी ४१ लाख रुपयांची भर पुण्याच्या तिजोरीत पडणार आहे. त्या खालोखाल ६६ कोटींचा लाभ पिंपरी पालिकेला मिळणार आहे. ऑगस्टमध्ये राज्य सरकारने काढलेल्या अनुदानाची रक्कम पालिकेच्या खात्यात जमा झाली आहे.

९४ कोटींसाठी प्रयत्न

मुद्रांक शुल्कावर एलबीटीपोटी एक टक्का अधिभार वसूल करण्यात येतो. एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे अनुदान पालिकांना वितरित करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, या कालावधीचे ४५ कोटी रुपये आणि गेल्या आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च २०१४ दरम्यान, शिल्लक रक्कम असा ९४ कोटी रुपयांचा निधी पालिकेला तातडीने मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यातील मुली मिरजेत सापडल्या

$
0
0

पुणेः घरातून पळून गेलेल्या सातारा येथील तीन मुलींना मिरजेकडे जाणाऱ्या रेल्वेमधून ताब्यात घेण्यात आले. रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने या मुली लगेचच सापडल्या. त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ऐश्वर्या कुमार अवघडे (वय १३), नेहा संजय अवघडे (वय१३) आणि आकांक्षा हन्ना राडवड (वय १२, रा. सातारा) असे सापडलेल्या मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुली घरातून ​निघून गेल्याची माहिती सातारा पोलिसांना वायरलेस सेटवर सगळीकडे कळवली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी मिरज स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची तपासणी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भिंगारदिवे, कर्मचारी राजाराम पाटील, वनिता नरके यांनी केली. कोल्हापूर ते तिरुपती बालाजी या गाडीत तिन्ही मुली त्यांना आढळल्या. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या सातारा येथील असल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांजली निफाडकर-आवटे यांचे अपघाती निधन

$
0
0

पुणेः पुण्यातील उदयोन्मुख कथक नर्तिका प्रांजली निफाडकर-आवटे (वय २७) यांचे मंगळवारी निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रदीप निफाडकर यांच्या त्या कन्या होत. कथकच्या सरावासाठी सोमवारी सकाळी त्या दुचाकीवरून जात होत्या. समोरून जात असलेली दुचाकी अचानक वळल्याने धडकून त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती सुशांत आवटे, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे दमदार ‘कमबॅक’

$
0
0

मंगळवारी दिवसभरात २२ मिलिमीटरची नोंद; आजही बरसणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी शहर आणि परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. दुपारनंतर आलेल्या सरींनी काही ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडीही झाली होती. रात्री साडेआठपर्यंत शहरात २२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी मान्सून देशाच्या आणखी काही भागातून माघारी फिरला.

अनेक दिवसांपासून शहरात पावसाने पूर्णतः ओढ दिली होती. दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून तापमानही ३२ अंशांपेक्षा अधिक होते. आकाश निरभ्र राहत असल्याने स्थानिक पातळीवर तापमान वाढून पावसाने हजेरी लावली. मध्यवर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांना भिजतच घर गाठावे लागले.

कोथरूड, वारजे, औंध, पाषाण, बाणेर भागात सायंकाळपर्यंत पावसाच्या काही सरींनी हजेरी लावली. हडपसर भागात दुपारी चांगला पाऊस झाला. लोहगाव, नगर रोड परिसरात रात्री पावणेआठपासून पावसाला सुरुवात झाली. सिंहगड रोड परिसरातही पावसाच्या काही सरी कोसळल्या. पिंपरी चिंचवड परिसरात रात्री नऊनंतर पावसाला सुरुवात झाली.

सर्वाधिक पाऊस उपराजधानीत

राज्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर येथे (१९ मिमी) झाली. सांगली, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, उस्मानाबाद येथेही पावसाने हजेरी लावली. पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमार करणारा युवक गजाआड

$
0
0

पुणेः वेताळ टेकडीवर एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला गुन्हे शाखेने अटक केली. या विद्यार्थ्याला लोंखडी रॉडने मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी आ​णि इतर ऐवज लुटण्यात आला होता.

सागर चंदू पवार (रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वेताळ टेकडीवर दो​न दिवसांपूर्वी विशाल गुंजाळ (वय १६, रा. वानवडी) या तरुणाला तीन आरोपींनी लुटले होते. या घटनेचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांना पवार याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पवार याला वानवडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा तपास डेक्कन पोलिस करत आहेत. पवारला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुंजाळ दोन दिवसांपूर्वी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना वेताळ टेकडीवर गेला होता. या वेळी आरोपींनी डोक्यात लोखंडी रॉड मारला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

$
0
0

पुणेः दत्तवाडी-पानमळा येथे पावसामुळे बैठ्या घरात वीजप्रवाह उतरल्याने अद्वैता चंद्रकांत वाघमारे या अडीच वर्षांच्या मुलीचा मंगळवारी शॉक बसून मृत्यू झाला आणि चार-पाच महिला जखमी झाल्या. लोखंडी खांबावरून वीज प्रवाह करण्यासाठी घरात आलेली वायर कट झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीजप्रवाह करणाऱ्या वायरचा गुंता झाल्यानेच ही घटना घडली असून, वायर बदलण्याची मागणी वारंवार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्वैताचे वडील इलेक्ट्रिकची कामे करतात, तर आई गृहिणी आहे. पानमळा येथे वाघमारे कुटुंबीय बैठ्या घरात राहतात. या घराला इलेक्ट्रिक खांबावरून वीज प्रवाह देण्यात आलेली वायर कट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अद्वैता; तसेच या ठिकाणी राहणाऱ्या महिला या लोखंडी जिन्यावर बसल्या असताना त्यांना विजेचा शॉक बसला. यावेळी अद्वैता गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती स्थानिक नगरसेवक राहुल तुपेरे यांनी दिली. 'या ठिकाणी वीज पुरवठा करणाऱ्या पोलवरून घरांमध्ये गेलेल्या वायरचा गुंता झाला आहे. या वायर बदलून एकच चांगल्या दर्जाची वायर टाकण्याच्या सूचना वारंवार महावितरणला केल्या होत्या. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. या गुंत्यामुळे कुठेतरी वायर कट झाली आणि त्या वायरचा स्पर्श लोखंडी जिन्याला झाल्यामुळे घरात वीजप्रवाह पसरला,' असे तुपेरे म्हणाले.

अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजप्रवाह बंद करून दुरुस्ती केली. पावसामुळे सर्व्हिस वायरचा संपर्क पत्र्याच्या घराशी येऊन ही घटना घडली असावी, असे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत नियमानुसार विद्युत निरीक्षक विभागास माहिती देण्यात आली आहे. विद्युत निरीक्षकांकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानंतर घटनेमागील कारण स्पष्ट होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

टोळीला अटक

पुणेः रेल्वेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तीन जणांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, एक रॅम्बो चाकू जप्त करण्यात आला आहे. रेल्वेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून तिघांना अटक केली आहे. तर, त्यांचे तीन साथीदार पळून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची भाजपवर कुरघोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुप्रतीक्षित मेट्रोचा रेंगाळलेला निर्णय मार्गी लावण्यासाठी श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले असून, आज बुधवारी (९ सप्टेंबर) भारतीय जनता पक्षाआधीच राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ केंद्रीय नगरविकास मंत्र्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत पोहोचणार आहे. भाजपच्या नेत्यांची बैठक दुपारी महाराष्ट्र सदनात होणार असून, तत्पूर्वी सकाळी आठ वाजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ मेट्रोसह पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश करण्याबाबत वेंकय्या नायडू यांची भेट घेणार आहे.

पुण्याचा मेट्रो प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार, बुधवारी दुपारी त्यांनी मेट्रोसह पुण्यातील इतर विषयांबाबतही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, नायडू यांचीही भेट घेण्यात येणार आहे.

एका बाजूला भाजपने ही बैठक आयोजित केली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही मेट्रोसह पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटीतील समावेशाबाबत नायडू यांची वेळ मागितली होती. नायडू यांनी त्यांना सकाळची वेळ दिली असल्याने शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, सभागृहनेते बंडू केमसे या बैठकीला उपस्थित असतील.

इतर पक्षांना डावलले

नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन मेट्रोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असताना, पालिकेतील इतर पक्षांना मात्र डावलण्यात आले आहे. यापूर्वी, दिल्लीत होणाऱ्या बैठकांना पालिकेतील सर्व पक्षांना निमंत्रित केले जात होते; पण भाजपसह राष्ट्रवादीला त्याचा विसर पडल्याची टीका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणेकरांसाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून, तो कोणीही मंजूर करून आणावा, अशी उपरोधिक टिप्पणीही शिंदे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ताळमेळ वेळापत्रकाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाणीकपात लागू करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी दोन दिवसानंतरही सुरळीत झालेली नाही. मात्र, याबाबत पालिकेकडे कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पाणी वाटपासाठी पालिकेने केलेल्या वेळापत्रकानुसार शहरातील सर्व भागांना पाणी दिले जात असून, पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी समोर येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जात असला तरी पाणीपुरवठ्यामधील प्रत्यक्ष अडचणी समोर येण्यास अजून दोन दिवसांचा कालावधी लागेल असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वॉशिंग सेंटरवर कारवाई

पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करणाऱ्या सहकारनगर येथील वॉशिंग सेंटरच्या मालकाला पालिकेने साडेचार हजार रुपयांचा दंड केला आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी शहरातील वॉशिंग सेंटर, बांधकामे, याची तपासणी करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. पाण्याच्या गळतीबाबत नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७ क्रमांकाचे अर्थकारण

$
0
0

अर्जाद्वारे खासगी विद्यार्थ्यांकडून फीवसुलीचे उद्योग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सतरा क्रमांकाच्या अर्जाद्वारे शहरातील बड्या कॉलेजांमध्ये खासगी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास नियमित विद्यार्थ्यांइतकीच फी भरावी लागत आहे. मुळातच नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांकडून कॉलेजे ही फी वसूल करत असल्याने, १७ नंबरच्या अर्जाचा वसुलीसाठीही दुरुपयोग होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ क्रमांकाच्या अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या आधारे गरजू विद्यार्थ्यांना खासगी विद्यार्थी म्हणून बोर्डाच्या परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होते. मात्र, शहरातील बड्या कॉलेजांमधून या सुविधेचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याची बाब 'मटा'ने मंगळवारी उघड केली. या बड्या कॉलेजांमधून प्रवेशित अतिरिक्त विद्यार्थ्यांना वेगळ्या मार्गाने नियमित करून घेण्यासाठी कॉलेजे या विद्यार्थ्यांना सतरा क्रमांकाच्या अर्जाद्वारे परीक्षेला बसवितात. शहरातील कॉलेजे त्यासाठी घालून दिलेली मर्यादा ओलांडून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसवत असल्याचेही समोर आले आहे. त्या पाठोपाठ अशाच विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या फीच्या पावत्यांमधून १७ नंबरच्या अर्जाशी निगडीत अर्थकारण उघड होत आहे. या अर्थकारणापोटीच कॉलेजे १७ नंबरची मर्यादा ओलांडत नाहीत ना, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शहरातील पूर्व भागातील एका बड्या कॉलेजमध्ये यंदा १७ नंबरच्या सुविधेद्वारे झालेल्या एका विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा पुरावा ठरणारी पावती मंगळवारी 'मटा'च्या हाती लागली. या पावतीवर दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये बारावी सायन्सला खासगी विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला आहे. त्याला मान्यताप्राप्त तुकडीमधून प्रवेश देण्यात आला असला, तरी त्याला अनुक्रमांक नाही. हा खासगी विद्यार्थी असला, तरी त्याच्याकडून कॉलेजने ट्युशन फीचे पाच हजार रुपये, लॅबोरेटरी फीचे आठ हजार रुपये, रजिस्ट्रेशन फी म्हणून एक हजार रुपये घेतले आहेत. वर्षामध्ये खासगी विद्यार्थी असतानाही या विद्यार्थ्याने एकूण चौदा हजार रुपये फी म्हणून या कॉलेजकडे भरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीआयडी’ नापास

$
0
0

पाच वर्षांत ९४ पैकी केवळ १८ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) तपास केलेल्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत 'सीआयडी'ने तपास केलेल्या ९४ गुन्ह्यांपैकी फक्त १८ गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली आहे. राज्य शासनाकडून गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच त्यांची महत्त्वाची तपास यंत्रणा असलेल्या 'सीआयडी'चे गुन्हे उकलण्याचे प्रमाण (कनव्हेक्शन रेट) कमी असल्याचे समोर आले आहे.

'सीआयडी' ही राज्याची महत्वाची तपास यंत्रणा आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती असे 'सीआयडी'चे चार विभाग आहेत. एखाद्या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक पोलिस आणि इतर तपास यंत्रणांना अपयश आल्यास राज्य सरकार अथवा कोर्टाच्या आदेशावरून 'सीआयडी'कडे गुन्ह्याचा तपास दिला जातो. 'सीआयडी'ला तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. मदतीला फोटोग्राफी, फिंगरप्रिंट असे तांत्रिक विभागही मदतीला आहेत. तरीही गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या प्रमाणात घट होत आहे. त्याबरोबरच अनेक गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने सीआयडीकडून कोर्टात 'ए' अहवाल सादर करण्यात आले आहेत.

'सीआयडी'कडे तपास केलेल्या गुन्ह्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण माहितीच्या अ​धिकाराखाली मागविण्यात आले होते. 'सीआयडी'कडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत तपास केलेल्या ९४ गुन्ह्यांपैकी फक्त आठरा गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. 'सीआयडी'च्या नागपूर विभागाने तपास केलेल्या ३२ गुन्ह्यांचा निकाल लागला आहे. त्यामध्ये फक्त तीन गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली आहे. तर, २९ गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटले आहेत. अमरावती विभागात पाच वर्षांत एकाही गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही. औरंगाबाद विभागात पाच गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली असून, वीस गुन्ह्यांतील आरोपी सुटले आहेत. पुणे विभागाने तपास केलेल्या पन्नास गु्ह्यांचा निकाल लागला असून, त्यापैकी दहा गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ४० गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामासाठी एक लेन ६ महिने बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे'वर आडोशी व खंडाळा बोगद्याजवळील दरडप्रवण क्षेत्रात सुरू असलेले जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण होण्यास अंदाजे सहा महिने लागण्याची शक्यता आहे. या कामामुळे बंद ठेवण्यात आलेली एक लेन आणखी सहा महिने बंदच राहणार असल्याचे मंगळवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जून व जुलै महिन्यात काही दिवसांच्या अंतराने खंडाळा व आडोशी येथे कोसळलेल्या दरडींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे या भागात कोसळलेल्या दरडी हटविल्यानंतर पुन्हा दुर्घटना घडू नयेत, यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. 'जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ, इटालियन शास्त्रज्ञ व मुंबई आयआयटीतील तज्ज्ञांनी या ठिकाणी पाहणी करून तातडीच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार खंडाळा बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणावर खडक निखळले आहेत. त्यानुसार सध्या 'रॉक बोल्टिंग' करून उच्च क्षमतेच्या जाळ्या बसविण्यात येत आहे. कामाचे स्वरूप पाहता त्यासाठी सहा महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र, कामात प्रगती होईल, त्याप्रमाणे रस्ता सुरू केला जाईल,' अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी दिली. 'एक्स्प्रेस-वे'वर दरड कोसळण्याच्या घटना गेल्या महिन्यात वारंवार घडल्या होत्या. यामुळे महामार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती.

ताण नाही

खंडाळा घाटातील एका बाजुची केवळ एकच लेन बंद ठेवल्याने वाहतुकीवर त्याचा फारसा ताण पडत नाही. त्यामुळे जुलै महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतर झालेला वाहतूक कोंडीचा त्रास आता निर्माण झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभ्यासासाठी समिती

'एक्स्प्रेस-वे'वर जून व जुलै महिन्यात कोसळलेल्या दरडींची संख्या पाहता राज्य सरकारने या दरडींचा अभ्यास करण्यासाठी प्रशासनातील निवृत्त सचिव व हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांची द्विसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. या रस्त्यावर आजपर्यंत कोसळलेल्या दरडी, त्यानंतर केलेल्या उपाययोजना यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅमिली कोर्टाला अखेर निधी नाहीच

$
0
0

चार कोटींपैकी केवळ एक लाख रुपये मंजूर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा न्यायालयाजवळ उभारण्यात आलेल्या फॅमिली कोर्टाच्या फर्निचरच्या खर्चासाठी चार कोटी ९६ रुपयांचे अंदाजपत्रक पाठविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात एक लाख रुपये मंजूर करून या र‌कमेत सर्व कामे पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे नाराजी आहे.

'फॅमिली कोर्टाच्या उभारणीला २००९ मध्ये सुरुवात करण्यात आली असून, सहा वर्षे उलटली तरीही इमारतीचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले नाही. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून निधी मंजूर करण्यास विलंब झाल्यामुळे काम रखडलेले आहे,' असा आरोप पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असो​सिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भारती विद्यापीठ भवन येथे सातव्या आणि नवव्या मजल्यावर फॅमिली कोर्टाचे कामकाज चालविण्यात येते. या मजल्यांसाठी भाडे द्यावे लागते. फॅमिली कोर्टासाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाशेजारील जागेत नवीन इमारतीची उभारणी सुरू करण्यात आली होती. २००९ मध्ये न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण अपेक्षित होते. मात्र,​ सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध न करण्यात आल्यामुळे गेली सहा वर्षे हे काम रखडले आहे. या ठिकाणी फर्निचरचे काम पूर्ण करून फॅमिली कोर्टाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी वकील आणि पक्षकारांकडून करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे कोर्ट ‘रोल मॉडेल’ नाही

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com

पुणे : केंद्र सरकारतर्फे राज्यात पुणे आणि यवतमाळ येथील फॅमिली कोर्टात 'रोल मॉडेल कोर्ट' ही संकल्पना राबविण्यात येणार होती. मात्र, पुण्यातील फॅमिली कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पुण्याला रोल मॉडेल कोर्ट मिळण्याची संधी हुकली. केंद्र सरकारकडून या रोल मॉडेल कोर्टसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार होता.

कोर्टातील कामकाज आदर्श पद्धतीने चालविण्यात यावे. संपूर्ण कामकाज पेपरलेस असावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोर्टाचे कामकाज सुरळित चालविण्यात यावे, असा उद्देश समोर ठेवून रोल मॉडेल कोर्ट चालविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. केंद्र सरकारकडून याबाबत मुंबई हायकोर्टाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे आणि यवतमाळ येथील फॅमिली कोर्टात रोल मॉडेल कोर्ट सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. रोल मॉडेल कोर्ट कसे असावे, त्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव मुंबई हायकोर्टाकडून मागविण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील फॅमिली कोर्टाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता, अशी माहिती पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी दिली.

रोल मॉडेल कोर्टासाठी आवश्यक असलेल्या सूचना हायकोर्टाकडे पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, फॅमिली कोर्टाच्या इमारतीचेच बांधकाम पूर्ण नाही. तर, हे रोल मॉडेल कुठे राबविणार याचा विचार करून हा प्र्रस्ताव गुंडाळण्यात आला, अशी माहिती अॅड. कवडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटी पूर्ण करणाऱ्या कॉलेजनाच परवानगी

$
0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात दर्जेदार आणि एकसमान वैद्यकीय शिक्षण देण्याच्या उद्दिष्टामुळे केंद्रीय परिषदा तसेच आरोग्य विद्यापीठाच्या मानांकनानुसार सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्याऱ्या संस्थांनाच नवीन महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी भूमिका स्पष्ट केली. आरोग्य विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या वर्षासाठी नवीन महाविद्यालये सुरू करणे, पदव्युत्तर अभ्यासक्रम करणे, तसेच संलग्नित महाविद्यालयांसह अभ्यासक्रमांची विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रक्रियेबाबत इच्छुक संस्थाचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली.

'महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार वैद्यकीय शिक्षणाचे संपूर्ण राज्यात समन्यायी वाटप होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्या साठी विद्यापीठाकडून दर पाच वर्षांनी बृहत आराखडा तयार करण्यात येतो. संस्थाचालकांनी प्रस्ताव सादर करताना सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक असते. यात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध आरोग्य विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात प्रवेश किती होतात, शिक्षक आदींबाबत माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतरच केंद्रीय परिषदा तसेच विद्यापीठाच्या मानकांनुसार सर्व अटी व नियमांची पूर्तता करूनच प्रस्ताव सादर करण्यात यावा,' असे आदेश डॉ. जामकर यांनी दिले आहेत.

विद्यापीठाकडे विविध कारणास्तव अनेक संस्थांचे प्रस्ताव मंजुरीसाठी येतात. मात्र, त्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी आढळून येतात. नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी विविध पॅथीच्या केंद्रीय परिषदांचे नियम असतात. त्यानुसार प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे.

- डॉ. काशिनाथ गरकळ, कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी शाळेला बुट्टी

$
0
0

Swapnil.Shinde@timesgroup.com

पुणेः पाण्यासाठीची वणवण ऐन पावसाच्या दिवसांतही अनुभवणे यंदा पुणेकरांच्या नशिबी आले आहे. ही वणवण एवढी तीव्र आहे की शालेय विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळा बुडवावी लागते आहे, तर कमी पाण्यामुळे काही ठिकाणी भाडेकरू टिकेनासे झाले आहेत. उपनगरीय भागात पाणीटंचाईने दुष्काळाचेच स्वरूप धारण केले असून अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. काहींच्या घरामध्ये बोरवेल असून त्याचे पाणी कचरा डेपो जवळ असल्यामुळे ते पिण्यायोग नाही असे नागरिकांची मत आहे.

पावसाने दिलेली ओढ व धरणातील पाण्याचा घटता पाणीसाठा लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. शहरात नागरिकांना सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन घरोघरीही करावे लागणार आहे. पाण्यासाठीच्या धावपळीचे चित्र शहराच्या सगळ्याच भागांत दिसत असले तरी उपनगरीय भागात मात्र आठ दिवसांनी पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील नागरिक मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवत आहेत. उपनगरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टॅंकरने होणारा पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात नसणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. टँकर येऊन गेला की नळ कोंडाळ्यांवरही गर्दी पाहायला मिळते.

हडपसर उपनगराच्या ढमाळवाडी, पापडे वस्ती,गंगानगर, काळेपडळ, भेकराई नगर, फुरसुंगी, वडकी, उरूळी देवाची या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. या परिसरात पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीतर्फे पुरविले जाते. मात्र रोजच्या वापरास लागणारे पाणी हे नागरिकांना विकत घ्यावे लागत असून, त्यासाठी प्रती टँकर चारशे ते पाचशे रूपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.आणि छोट्या हॉटेस व्यावसाय़िकांना फार मोम्या त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यशवंतराव गडाखांना ‘सुर्वे जीवनगौरव’

$
0
0

पुणेः महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेतर्फे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांना 'नारायण सुर्वे जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असून, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

रविवारी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व अखिल भारतीय साहित्य महांडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कृष्णाबाई नारायण सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या वेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना नारायण सुर्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे आजपासून उपोषण

$
0
0

पुणेः फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील कंत्राटी प्राध्यापकाने सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून काहीच संवाद साधला जात नसल्याने आजपासून (१० सप्टेंबर) विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत.

गेल्या ९० दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपाबाबत अद्याप काहीही मार्ग निघालेला नाही. केंद्र सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने माहिती व प्रसारण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालाचा तपशीलही सरकारने जाहीर केलेला नाही. त्यामुळे संस्थेविषयी समितीचे काय म्हणणे आहे आणि संप मिटवण्यासाठी सरकार काय करणार हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे संस्थेतील वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. संस्थेतील कंत्राटी प्राध्यापक अभिजित दास यांनी उपोषण केले होते. आता विद्यार्थीही त्याच मार्गाने जात आहेत. संस्थेच्या आवारातील विस्डम ट्री व मुख्य प्रवेशद्वारापाशी विद्यार्थी उपोषण करणार आहेत. तीन चार विद्यार्थी या उपोषणाची सुरुवात करणार आहेत.

'संप ताणून धरण्यात आम्हालाही आनंद वाटत नाही. मात्र, सरकारकडून काहीच संवाद साधला जात नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. पूर्ण नियोजन करूनच हे उपोषण केले जात आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेपर्यंत उपोषण करण्याची तयारी आहे,' अशी माहिती विद्यार्थी प्रतिनिधी अमेय गोरेने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळाची मोठी चणचण

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यात एखाद्या गुन्ह्याचा तपास 'सीआयडी'कडे आल्यानंतर स्थानिक पोलिस फारशी मदत करत नाहीत किंबहुना चांगले अधिकारी 'सीआयडी'मध्ये येण्यास उत्सुक नसतात. या सर्व प्रकारामुळे 'सीआयडी'चे महत्त्व तुलनेने कमी झाल्याची खंत राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि सीआयडीचे माजी प्रमुख जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केली.

'सीआयडीचे वास्तव' या वृत्तमालिकेद्वारे सीआयडीचे काम आणि त्यांना येणाऱ्या अडचणींना 'मटा'ने वाचा फोडली. या वृत्तमालेच्या अनुषंगाने उमराणीकर यांना विचारले असता, त्यांनी सीआयडीच्या सद्य परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. उमराणीकर म्हणाले, 'सीआयडीकडे नेहमी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास येतो. या गुन्ह्यांचा पूर्वी तपास झालेला असतो. पूर्वीच्या तपासाची छाननी करून, त्यात काय राहिले शोधून तपासाचा योग्य मार्ग काढावा लागतो. सीआयडीकडे तपास येईपर्यंत बराचसा कालावधी उलटलेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा पुरावा नष्ट होतो. त्यामुळे सीआयडीला नवीन पुरावे शोधणे अवघड जाते. त्यासाठी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट आदींचा वापर केला जातो. या माध्यमातून गुन्ह्यांमागील शक्यतांची पडताळणी केली जाते.'

'सीआयडी'कडे मनुष्यबळाचा अभाव आहे. एखादा गुन्हा तपासासाठी आल्यानंतर स्थानिक पोलिसांकडून हात झटकले जातात. त्यामुळे काम करताना अडचणी येतात. अलीकडे 'सीआयडी'मध्ये चांगले अधिकारी येण्यास उत्सूक नसतातच.

तसेच, 'सीआयडी'कडे साइड पोस्टिंग म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे 'सीआयडी'ला पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. राज्या सरकार जोपर्यंत सीआयडीला विशेष महत्त्व देत नाही, चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करीत नाही, तोपर्यंत सीआयडीच्या कामामध्ये सुधारणा होणार नाहीत, असेही उमराणीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसआरए’च्या जागा बिल्डरांच्या घशात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मालकीच्या जागा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बिल्डरला देण्याच्या वादग्रस्त निर्णयावर आज (गुरुवारी) निर्णय होणार आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार असून, पालिकेच्या मालकीच्या जागा बिल्डरला दिल्यास पालिकेचे ७० ते ८० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यामध्ये काही नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने काही महिन्यांपूर्वी अमान्य झालेला हा प्रस्ताव मान्य होणार असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

कोथरूड येथील श्रावणधारा वसाहतीतील ११७ गुंठे तसेच, शुक्रवार पेठेतील हिराबाग झोपडपट्टीतील २९ गुंठे जागेवर महापालिकेच्या माध्यमातूनच एसआरए योजना राबविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या दोन्ही जागा खासगी बिल्डरला दिल्यास पालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर पाणी सोडण्याची वेळ येईल, अशी चर्चा झाल्याने पालिकेनेच या जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून या दोन्ही जागा एसआरए प्रकल्पासाठी खासगी बिल्डरला द्याव्यात, असा फेरप्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सभासदांनी दिला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, यासाठी बिल्डरांनी पालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली. या बिल्डरांनी शहरातील एका वजनदार मंत्र्यासह, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन हितसंबंध वाढवल्याची चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी सभेने नामंजूर करून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेल्या या वादग्रस्त प्रस्तावावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेचे आर्थिक नुकसान शक्य

सर्वसाधारण सभेने या वादग्रस्त प्रस्तावाला मंजुरी देऊन पालिकेच्या जागा एसआरए योजना राबविण्यासाठी खासगी बिल्डरला देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यास शहरातील १५२ जागांबाबतही असाच निर्णय होऊ शकतो. यामुळे पुढील काळात पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती पालिकेतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी नको बँकवारी

$
0
0

नव्या नियमांनुसार बँकांचे कामकाज बंद राहणार; ग्राहक अनभिज्ञ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँकांमधील काम येत्या शनिवारी उरकण्याच्या बेतात असाल, तर सावध व्हा...कारण १२ सप्टेंबरला बँका बंद राहणार आहेत. कोणत्या संपासाठी नव्हे, तर बदललेल्या नियमांनुसार बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहणार आहेत. बदललेल्या नियमांचे येत्या शनिवारी प्रथमच पालन करण्यात येणार आहे. बँकांनी सुधारीत वेळापत्रक बोर्डावर न लावल्याने खातेदारांना याबाबत फारशी माहिती नसल्याने शनिवारी अनेकांची बँकवारी वाया जाण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र सरकार तसेच, रिझर्व्ह बँकेने महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांचे कामकाज बंद ठेवण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या व तिसऱ्या शनिवारी बँकांचे कामकाज अर्धवेळऐवजी पूर्णवेळ चालणार आहे. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. गेल्या शनिवारी या नियमानुसार बँका पूर्णवेळ सुरू होत्या. परंतु, येत्या शनिवारी पहिल्यांदाच बँका बंद राहणार आहेत. परंतु, खातेदारांना या विषयी फारशी माहिती नसल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यातच बहुसंख्य बँकांनी आपल्या कामकाजाच्या वेळापत्रकातही आवश्यक बदल न केल्याने खातेदार संभ्रमात पडण्याची शक्यता आहे.

काही बँकांनी केवळ नोटीस बोर्डावर बदललेले वेळापत्रक लावले आहे. अनेक बँकांच्या शाखांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. काही शाखांमधून नवे बोर्ड रंगवायला दिले असल्याचे सांगण्यात आले. तर काही बँकांच्या शाखांनी जुन्याच वेळापत्रकावर कागद चिटकवून मार्करच्या मदतीने हे बदल सूचित केले आहेत. खातेदारांना जुन्याच वेळापत्रकाची सवय असल्याने त्यांचे सहसा या वेळापत्रकाकडे लक्ष जात नाही. याचबरोबर बँकांमधील काही कर्मचारी, अधिकारी नियमित ग्राहकांना या बदलांची माहिती देत आहेत. परंतु, ठळक स्वरूपात या बदलांची माहिती दिलेली नसल्याने खातेदारांमध्ये याबाबत संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images