Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माजी सैनिकांचा आज सन्मान

$
0
0

पुणे : संस्कृती संवर्धन समिती आणि पूर्व सैनिक सेवा परिषदेतर्फे देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या तिन्ही संरक्षण दलांमधील माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे येत्या गुरुवारी (२८ मे) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील (निवृत्त) आणि सचिव पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमात तीन परमवीरचक्र विजेत्या योद्ध्यांच्या नातेवाइकांचा; तसेच महावीरचक्र विजेते मेजर जनरल अनंत नातू (निवृत्त), कीर्तीचक्र विजेते मेजर जनरल एस. एस. शर्मा (निवृत्त), हवाई दलाचे कॉर्पोरल सोमनाथ कबे, शौर्यचक्र मिळवणारे ब्रिगेडिअर व्ही. आर. दाणी (निवृत्त) यांच्यासह अन्य तिघांना, तसेच २२ वीरचक्र विजेत्यांचा आणि अशोकचक्र विजेते दिवंगत सुभेदार गुरुनाम सिंह यांच्या नातलगांना सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर कार्यक्रमाच्या दिवशी (२८ मे) सकाळी १० ते ८ या वेळेत भारताबरोबर पाकिस्तान व चीनशी झालेल्या युद्धांची छायाचित्रे व पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजिण्यात आले आहे. त्याचबरोबर तिन्ही सैन्यदलांमधील करिअर संधी, पात्रता व संबंधित बाबींवर दिवसभर मार्गदर्शन केले जाणार आहे. 'वीरश्री' या स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

ओतूर परीसरात बिबट्याच्या मानवी हल्ल्यांच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरातील अंगणाबाहेर लघुशंकेसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून पळविले. त्यावेळी महिलेचा आरडाओरड्याने घरातील मंडळी मदतीला धावली. पण बिबट्याने महिलेला जंगलात पळवून नेले होते. त्यानंतर लोकांनी शोध घेतला असता पहाटे तीनच्या सुमारास महिलेचा मृतदेह जंगल परीसरात सापडला. सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०,, बोकडदरा ) असे या मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना वनविभागाचे पिंपळगावचे वनसेवक डी. एस. कदम यांना कळविण्यात आली. उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे, सहायक वनसंरक्षक वाय. एल. केसकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटना-स्थळाच्या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी’ची अशीही मनमानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना निकृष्ट जेवण, जेवणाचे अवास्तव दर आणि असुरक्षित ठिकाणी घेतले जाणारे हॉल्ट अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

रात्री-अपरात्री जेवणासाठी एसटीच्या अधिकृत स्टॉपऐवजी अन्यत्र ढाब्यांवर आणि बीअरबार - परमीट रुमची सुविधा असलेल्या हॉटेलजवळ गाड्या थांबविल्या जातात. तसेच, या ठिकाणी जेवणाचे दरही तुलनेने जास्त असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. या प्रकरणी काही प्रवाशांनी एसटीच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांकडेही याबाबत तक्रार नोंदविली आहे.

एसटी बसमध्ये महिला, तरुण मुली, लहान मुले असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणत्याही हॉटेलवर, लोकवस्ती नाही अशा ठिकाणी किंवा मद्यविक्री होत असलेल्या ठिकाणी बस थांबविताना त्यांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही. काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. पुणे-मोहोळ प्रवासादरम्यान गणेश साठे या प्रवाशाला आलेला अनुभव त्यांनी 'मटा'शी शेअर केला. पुण्याहून मोहोळला जाताना यवत व चौफुल्याच्या दरम्यान हॉटेल सागर येथे बस थांबविण्यात आली. तेथेच बीअर बार व परमीट रुमची सुविधा होती. येथे बस ड्रायव्हर व कंडक्टर यांना स्पेशल ट्रिटमेंट दिली जात होती. तर, तेथे सामान्य माणसाला परवडतील असे जेवणाचे दर नव्हते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशालाही चाप बसतो, असे साठे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. असाच अनुभव कोल्हापूर-पुणे प्रवासादरम्यान काही प्रवाशांना आला. त्यांनी त्यांच्या तक्रारीचे निवेदन एसटीच्या पुणे विभागाच्या नियंत्रकांकडे सादर केले. या मार्गावर साताऱ्याच्या परिसरात बस थांबविण्यात येते, तेथे अत्यंत निकृष्ट आणि महागडे जेवण मिळते. या ठिकाणीच का थांबवता, दुसऱ्या ठिकाणी का नाही थांबवत गाडी, असे विचारल्यावर गाडी येथेच थांबविण्याची सक्ती असल्याचे सांगितले जात असल्याचे अमित गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून प्रवाशांची सुटका करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

आर्थिक लागेबंध

एसटी बस लांब पल्ल्यांच्या प्रवासात विशिष्ट हॉटेलवरच थांबविण्यात येते, या मागे एसटी बसचे ड्रायव्हर - कंडक्टर आणि हॉटेलचे मालक यांच्यात काही आर्थिक लागेबंध असू शकतात, अशा तक्रारी काही प्रवाशांनी 'मटा'कडे केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोची जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे?

$
0
0

उद्याच्या बैठकीत चर्चा होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) म्हणून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडेच (पीएमआरडीए) जबाबदारी सोपवावी, असा विचार 'पीएमआरडीए'कडून सुरू आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या 'पीएमआरडीए'च्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते; मात्र मेट्रो प्रकल्पात महत्त्वाची भूमिका असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका याबाबत काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

पुणे मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे या प्रकल्पाची उभारणी आणि अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या कंपनीची स्थापना झालेली नाही. केंद्र सरकारने या प्रस्तावावर मान्यतेची मोहोर उमटवल्यानंतर काही संचालकांची नावे निश्चित होतील आणि कंपनीच्या नोंदणीचे काम मार्गी लागेल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारने 'पीएमआरडीए'ची स्थापना केल्यानंतर शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या विकासाचे नियोजन काही प्रमाणात बदलणार असून, विकासाचे मोठे प्रकल्प 'पीएमआरडीए'कडून राबवण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पात पीएमआरडीए महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे 'पीएमआरडीए'चे अध्यक्ष पालकमंत्री गिरीश बापट यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यापेक्षा 'पीएमआरडीए'कडेच ती जबाबदारी सोपवावी, असा मतप्रवाह 'पीएमआरडीए'मध्ये आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पातील 'एमएमआरडीए'च्या सहभागाच्या धर्तीवर पुण्यातही व्यवस्था असावी, असे सांगण्यात येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर उद्या 'पीएमआरडीए'ची बैठक होणार आहे. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पात कोणत्या मार्गाने सहभागी व्हावे, या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 'पीएमआरडीए'कडे मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक प्रचंड भांडवलाच्या उभारणीची क्षमता असून, वेगवान अंमलबजावणी करण्याची यंत्रणा उपलब्ध होणार आहे. तसेच यामध्ये राजकीय अडथळे आणि लालफीतशाहीपासून सुटका होऊन वेगाने प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रस्तावासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांची मान्यता आवश्यक राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका काय भूमिका घेणार, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 'पीएमआरडीए'च्या सदस्यांमध्ये दोन्ही महापालिकांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या सहभागातूनच प्रकल्प मार्गी लागेल, असे म्हणणे मांडण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येरवडा परिसरातील रस्त्यावर स्पीडब्रेकर आणि दुभाजक बसविण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने एका नागरिकाने अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यालयातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव यश चव्हाण असे आहे. गोल्फ क्लब परिसरातील रस्त्यावर एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच, या ठिकाणी स्पीडब्रेकर आणि रस्ता दुभाजक बसविण्यात यावे, अशी मागणी चव्हाण यांनी पालिकेकडे केली होती. चव्हाण यांनी पालिकेच्या बाहेर उपोषणही केले होते. परंतु, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने बुधवारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात चव्हाण यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. चव्हाण यांनी विष घेतले नसून, हर्बल द्रव्य घेण्याचा प्रयत्न केला, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बायका, फजिती ऐका

$
0
0

पतीच्या मैत्रिणीचा बदला घेण्यासाठी सोनसाखळीचोरीची बनावट तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपली मैत्रीण आणि पत्नीची रस्त्यावरच तुंबळ हाणामारी झाल्याने पाषाण-सूस रोडवर एका पतिदेवांची चांगली पंचाईत झाली. पत्नीने तर नवऱ्याच्या मैत्रिणीला अडचणीत आणण्यासाठी सोनसाखळी हिसकावल्याची तक्रारच तिच्याविरुद्ध थेट पोलिस नियंत्रण कक्षात दाखल केली आणि तिघांवरही अटकेची वेळ आली. हा प्रकार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडला.

पाषाण-सूस रोडवर एका आलिशान सोसायटीत राहणाऱ्या नवऱ्याच्या मैत्रिणीने थेट त्याचे घर गाठले. त्या वेळी त्याची पत्नी आणि मैत्रिणीत जोरदार भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि हे सारे जण फुटपाथवर पोहोचले. नवऱ्याने दोघींनाही दोन-दोन फटके देऊन भांडण सोडवले आणि घरी पाठवले; मात्र या घटनेने व्यथित झालेल्या त्याच्या पत्नीने बदला घेण्याचा निर्णय घेतला. शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याने आपली सोनसाखळी चोरीला गेल्याचा कांगावा करून तिने थेट पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार दाखल केली. लाल रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेल्या महिलेने आपली सोनसाखळी हिसकावली, असा बनाव तिने केला.

पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. तसेच उपायुक्तांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, परिमंडळ तीनचे उपायुक्त बसवराज तेली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

सोनसाखळी हिसकावल्यानंतर संबंधित महिला रिक्षातून पळून गेल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीने तर फुटपाथवर चाललेल्या भांडणाचे रेकॉर्डिंगही केले होते. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दिलेल्या महिलेला खडसावून विचारले असता खरा प्रकार उघड झाला.

पोलिस नियंत्रण कक्षाला बनावट कॉल करून पोलिसांना त्रास दिल्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय सार्वजनिक जागेत भांडण केल्याने तिघांवरही अटकेची कारवाई झाली. त्यांना जामीन देण्याची कार्यवाही रात्री उशिरा सुरू करण्यात आली होती. पोलिस नियंत्रण कक्षाला बनावट, खोटे कॉल केले, तर कारवाई केली जाते आणि ती यापुढेही सुरू राहील, अशी माहिती सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रो ‘साइडलाइन’च

$
0
0

राज्याचे नवे कारभारीही 'बाबा-दादां'च्याच वाटेवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील तत्कालीन सत्ताधारी बाबा-दादा यांच्या दुर्लक्षामुळे पुणे मेट्रोला यापूर्वीच विलंब झाला असताना, नव्या सत्ताधाऱ्यांकडूनही विदर्भातील प्रकल्पांना झुकते माप मिळत असल्याने पुणे मेट्रो पुन्हा 'साइड ट्रॅक' झाली आहे. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाबाबत नेमलेल्या बापट समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होऊन दीड महिना उलटला, तरी मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यात राज्य सरकारकडून चालढकल केली जात आहे.

राज्य सरकारकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे केंद्रानेही पुणे मेट्रोबाबत हात वर केल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी पुणे भेटीदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. वनाज ते रामवाडी मार्गाबाबत अनेक स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप नोंदवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. या समितीने गेल्या महिन्यातच मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. त्यानंतर, मेट्रोबाबत राज्याकडून अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर होणे अपेक्षित होते; मात्र पुणे मेट्रोबाबत कोणताच निर्णय होताना दिसत नाही.

आघाडी सरकारमध्येही बाबा-दादा यांच्यातील वादामुळे पुणे मेट्रोबाबत निर्णय घेण्यात विलंब झाला होता. परिणामी, केंद्राने तत्त्वतः मान्यता दिलेल्या या प्रकल्पासाठी केंद्रीय बजेटमध्ये १० कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद होऊ शकली नाही. यंदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पुणे मेट्रोसाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद केली आहे; मात्र प्रकल्पाच्या मान्यतेला असाच उशीर होत राहिला, तर त्याचा विनियोगच होऊ शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

'राज्य सरकारकडून अद्याप मेट्रोचा प्रस्तावच दाखल न झाल्याने त्याला मंजुरी देण्यासाठीचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही,' असे वक्तव्य केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी केले होते. त्यामुळे, गेल्या सात वर्षांपासूनचा पुणे मेट्रोचा अनिश्चिततेचा प्रवास केंद्र आणि राज्यातील नव्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळ दिलेल्या पंखांची दमदार झेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांनी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून दिलेल्या भरभक्कम मदतीच्या आधारावर उभ्या राहिलेल्या 'मटा हेल्पलाइन'च्या शिलेदारांनी पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्या सर्वच विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे.

'मटा हेल्पलाइन' उपक्रमातील विद्यार्थी अमित जाधवने दहावीप्रमाणेच बारावीच्या वर्षातही जोरदार अभ्यास करून एकूण ९५.८४ टक्के, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणितात (पीसीएम) ग्रुपमध्ये सरासरी ९६ टक्के मार्क मिळवले आहेत. त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा असल्याने त्याने 'जेईई-मेन'ही दिली होती. त्यात १०५ मार्क मिळवून तो 'जेईई-अॅडव्हान्स्ड'साठी पात्रही ठरला होता; मात्र पुण्यातीलच इंजिनीअरिंग कॉलेजात शिकण्याची इच्छा असल्याने 'जेईई-अॅडव्हान्स्ड' दिली नाही, असे अमितने सांगितले.

उमेश मोकलने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित (पीसीएम) या ग्रुपमध्ये सरासरी ८० टक्के मार्क मिळवले आहेत. 'जेईई-मेन'च्या मार्कांवर तो 'जेईई-अॅडव्हान्स्ड'साठीही पात्र ठरला होता. ती परीक्षाही त्याने दिली आहे. आता इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी तो प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.

अंकिता ठोंबरेने बारावीला ८०.४६ टक्के मार्क्स मिळवले. 'मला पुढे इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे. 'जेईई मेन'मध्ये मला ७१ मार्क्स मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात 'मटा हेल्पलाइन'ने मला उपलब्ध करून दिलेल्या मदतीच्या आधारेच मी अभ्यास केला. त्यामुळेच मला हे यश मिळू शकले. आता इंजिनीअरिंगला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास माझे स्वप्न साकार होईल,' अशी भावना तिने व्यक्त केली.

सचिनचीही भरारी

रात्रशाळेचा विद्यार्थी असलेल्या सचिन कांबळे याच्या गुणवत्तेचीही 'मटा हेल्पलाइन'ने दोन वर्षांपूर्वी दखल घेतली होती. सचिनने यंदा आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेमधून बारावी कॉमर्स पूर्ण करून ७३ टक्के गुण मिळवले. त्याला अकाउंट्समध्ये ८०, 'ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स'मध्ये ८७ आणि सेक्रेटरिअल प्रॅक्टिसमध्ये ८१ गुण मिळाले. 'मटा हेल्पलाइन'ने केलेल्या मदतीमुळेच आपण ही कामगिरी नोंदवू शकलो, असे सांगून, नोकरी करता करता बारावीला हे यश मिळाल्याबाबत त्याने समाधान व्यक्त केले. आता बीकॉम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


PMP चालक कचरागाडीवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पीएमपी'च्या बस चालवण्यासाठी कामावर नियुक्त करण्यात आलेल्या राखीव चालकांना प्रत्यक्षात कचरा वाहतुकीच्या गाड्यांवर जाण्याची वेळ आली आहे. कंत्राटी पद्धतीने कचरा गाड्यांवर भरण्यात आलेल्या चालकांनी पुकारलेल्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

वेतन न मिळाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कचरा वाहतूक करणाऱ्या चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तेव्हापासून कचरा वाहतुकीच्या गाड्यांवर 'पीएमपी'च्या राखीव चालकांना पाठवण्यात येत आहे. 'पीएमपी'ऐवजी कचरा वाहतूक करण्याचे काम लावल्यामुळे काही चालकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

एप्रिल-मे महिन्यात बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे 'पीएमपी'च्या शहरांतर्गत वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊन प्रवासी संख्या कमी होते. त्यामुळे मार्गावरील बसची संख्याही काही प्रमाणात कमी असते. तसेच, बंद बसची संख्या वाढू लागल्याने 'पीएमपी'चे काही चालक सध्या बसून आहेत. 'जेएनएनयूआरएम'अंतर्गत येणाऱ्या बसही अद्याप दाखल झालेल्या नाहीत. ठेकेदारांच्या बसचे प्रमाण जास्त असल्याने 'पीएमपी'च्या चालकांना कामच शिल्लक नाही. सध्या या चालकांना राखीव चालक म्हणून दररोज पीएमपी कार्यालयात येऊन बसावे लागते. त्यामुळे हे राखीव चालक कचरा गाडीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे 'पीएमपी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

'पीएमपी'ची मदत

एप्रिल आणि मे महिन्यात 'पीएमपी'च्या बसना गर्दी कमी असते. त्यामुळे 'पीएमपी'कडे असलेले अतिरिक्त मनुष्यबळ कचरा वाहतूक करण्याच्या कामासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनाही काम मिळाले असून, कचऱ्याचा प्रश्न दूर झाला आहे. हे करताना 'पीएमपी'च्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. उलट या मार्गाने पीएमपी पुणेकरांच्या मदतीला उभी राहिली आहे, असे 'पीएमपी'चे महाव्यवस्थापक राजेंद्र मदने म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकरातून ४२९ कोटी

$
0
0

करात सवलत मिळवण्यासाठी अखेरचे चार दिवस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेने मिळकतकरातून चारशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, करात सवलत मिळवण्यासाठी आणखी चार दिवस शिल्लक असल्याने यंदा पालिकेला त्याद्वारे विक्रमी उत्पन्न प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. पालिका हद्दीतील सुमारे आठ लाख मिळकतींपैकी सव्वाचार लाखांहून अधिक नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.

एक एप्रिलपासून मंगळवार सायंकाळपर्यंत मिळकतकरातून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ४२९ कोटी २४ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तब्बल शंभर कोटी रुपयांहून अधिक असून, स्थानिक संस्था करातून (एलबीटी) घटणाऱ्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर मिळकतकराने पालिकेच्या बजेटला आधार दिला आहे.

नव्या आर्थिक वर्षातील मिळकतकर मे अखेरपर्यंत भरल्यास पालिकेतर्फे सर्व नागरिकांना सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. पालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालये, खासगी बँका आणि ऑनलाइन स्वरूपातही कर जमा करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली होती. यंदा पोस्टाच्या माध्यमातून पालिकेने बिले पाठवल्याने बहुसंख्य नागरिकांना ती वेळेवर प्राप्त झाली. त्यामुळे, सुरुवातीपासूनच नागरिकांनी कर वेळेवर भरण्यास प्राधान्य दिले असून, सवलतीचा लाभ घेतला आहे.

नागरिकांना मिळकतकरातील सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी येत्या रविवारपर्यंत (३१ मे) सर्व नागरिक सुविधा केंद्रे आणि किऑस्क सेंटर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत खुली राहतील, असे कर आकारणी व करसंकलन प्रमुख सुहास मापारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोहिनूर’ला सात नळ कनेक्शन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्यात पाण्याच्या बिलावरून वाद सुरू असताना, महात्मा गांधी रस्त्यावरील हॉटेल कोहिनूरला पिण्याच्या पाण्याचे तब्बल सात नळजोड देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आणखी दोन नळजोड देण्याचे काम सुरू असताना शिवसेनेच्या कँटोन्मेंट विभागाच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले.

बोर्डाच्या परिसरात महापालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरवण्यात येते. सध्या बोर्डाच्या हद्दीत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रासले आहेत. तसेच महापालिका आणि बोर्ड यांच्यात पाण्याच्या बिलावरून वाद सुरू आहेत. ३१ मार्च रोजी महापालिकेचे अधिकारी बोर्डाच्या मुख्यालयाचा पाणीपुरवठा तोडण्यासाठी आल्यानंतर बोर्ड आणि महापालिका यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. पाण्याचे बिल चुकीचे असल्याचा दावा बोर्डाने केला असून, जकातीची थकित रक्कम दिल्यानंतरच बिल भरण्याचे जाहीर केले आहे.

या वादाचे पडसाद पाणीपुरवठ्यावर उमटू लागले आहेत. बोर्डाच्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या शुक्रवारी महापालिकेच्या लष्कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महात्मा गांधी रस्ता खोदून हॉटेल कोहिनूरच्या इमारतीला नळजोड देण्याचे काम करण्यात येत होते. शिवसेनेच्या कँटोन्मेंट मतदारसंघाचे विभागप्रमुख जावेद खान यांना ही बाब समजल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नळजोडाबाबत विचारणा केली असता, कोहिनूर हॉटेलसाठी नळजोड देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

'या हॉटेलच्या इमारतीमध्ये कोणीही राहत नाही. फक्त तळमजल्यावर हॉटेल आहे. यापूर्वीच सात अनधिकृत नळजोड देण्यात आले असल्याची बाब ज्युनिअर इंजिनीअर अमित शेट्ये यांच्या निदर्शनास आणून दिली. 'ते नळजोड तोडण्याऐवजी आणखी दोन नळजोड कशासाठी,' अशी विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले,' असे खान यांनी सांगितले.

या प्रकरणी खान यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केली असून, लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेट्ये यांनीही खान यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे.

दरम्यान, शेट्ये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, संपर्क होऊ शकला नाही.

'कितीही नळजोड देऊ शकतो!'

'एका हॉटेलला किती नळजोड देता येतात,' अशी विचारणा ज्युनिअर इंजिनीअर शेट्ये यांच्याकडे करण्यात आली. त्या वेळी त्यांनी 'मागणी असेल तेवढे नळजोड देऊ शकतो,' असे उत्तर दिले. या संवादाचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोबाइलवरून शूटिंग होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 'पाण्याची परिस्थिती आणि मागणी पाहून कनेक्शन देता येते,' असे स्पष्टीकरण केले. 'महापालिका एकाच ठिकाणी दहा कनेक्शन देऊ शकते का,' असे विचारल्यावर 'दहा कनेक्शन देऊ शकतो,' असे उत्तरही त्यांनी दिले. या सर्व प्रकाराचे शूटिंग करून त्याची क्लिप बकोरिया यांच्याकडे देण्यात आली असल्याचे खान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणात ‘पुणे सुपरफास्ट’

$
0
0

शिक्षणमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत आज 'मटा'चे संवादसत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्येचे माहेरघर असा लौकिक मिरवितानाच कालसुसंगत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत जागतिक संदर्भात पुण्याची ओळख 'एज्युकेशन हब' म्हणून दृढ करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेतला आहे. शिक्षणक्षेत्रातील धुरिण आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी 'मटा सुपरफास्ट - एज्युकेशन' हे विचारमंथन आज (२८ मे) पुण्यात होत आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जानेवारीमध्ये 'पुणे सुपरफास्ट' हे संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रमुख पाहुणे होते. पीएमआरडीए, नव्या पुण्यासाठी नवी महापालिका, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आदी पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तोडगा शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आराखडा जाहीर केला. त्यानुसार सायबर पोलिस ठाणे, पीएमआरडीए-नवीन महापालिकेपासून अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत.

'पुणे सुपरफास्ट'च्या याच मालिकेमध्ये आता शिक्षणावर स्वतंत्रपणे विचारमंथन केले जाणार आहे. पुणे आणि परिसरातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, शिक्षणसंस्थाचालकांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षणमंत्री तावडे या वेळी बीजभाषण करतील. या उपक्रमाच्या माध्यमातून 'एज्युकेशन हब - पुणे' याबाबत विचारमंथन होणार आहे.

पुण्याचे 'एज्युकेशन हब'मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकार, सरकारी आणि खासगी शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र कशा प्रकारे भूमिका निभावू शकतील, या अनुषंगाने या सत्रात चर्चा होईल. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारताना विद्यार्थिकेंद्रित भूमिका ठेवून परवडणारे आणि रोजगारक्षम शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उद्योग-शिक्षण सहकार्य कसे वाढवता येईल आदी बाबींवरही चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीआयकडून स्केचेस जारी

$
0
0

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मोहीम तीव्र

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे (स्केचेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) जारी केली आहेत. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास पुणे क्राइम ब्रँचकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून दोघा हल्लेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सात वाजून २० मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकरांवर गोळीबार केला होता. प्रत्यक्षदर्शीने तपास पथकाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकरांवर गोळीबार केला होता. घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून राज्यासह परराज्यातही तपास केला होता; मात्र नऊ मे २०१४ रोजी मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसेच पुणे पोलिस दलात नियुक्त असणारे वरिष्ठ निरीक्षक गणपत माडगूळकर यांना या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयकडे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. सीबीआयचे उपअधीक्षक डी. एस. चौहान तपास अधिकारी आहेत.

पुण्याशी संबंधित तपास करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक माडगूळकर अन्य काही बाबींचा वापर करत आहेत. तसेच अन्य टेक्निकल विंगच्या अधिकाऱ्यांचीही मदत यासाठी घेण्यात येत आहे. मोटारसायकलचालक हल्लेखोराने सर्वप्रथम गोळीबार केला. त्यानंतर मागे बसलेल्या हल्लेखोराने दुसरी गोळी डॉ. दाभोलकरांवर झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तयार करण्यात आलेल्या रेखाचित्रापैकी मोटारसायकलचालकाचे रेखाचित्र ७०-८० टक्के जुळत असून, मागे बसलेला आणि वळून गोळी झाडणाऱ्याचे रेखाचित्र ८० टक्के जुळत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शक्यतो तपास करताना पुणे गुन्हे शाखेच्या तापासाचा आधार घेतला जाणार नसून, सर्व बाबींचा तपास नव्याने करण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

स्केचेसबाबत संभ्रम

स्केच हाताने आणि कॉम्प्युटराइज्ड अशा दोन पद्धतीने काढण्यात येते. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रथम एक स्केच जारी करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी दुसरे स्केच पुणे गुन्हे शाखेने जारी केले. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने हल्लेखोरांचे स्केच जारी केले. आता सीबीआयकडून स्केच जारी करण्यात आले आहे. दोन हल्लेखोरांची चार स्केच जारी करण्यात आल्याने प्रत्यक्षदर्शी किती आणि एकच असेल तर चार स्केच वेगळे कसे हा प्रश्न अनुत्तरीत असून, त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंड आप्पा लोंढे याचा खून

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन गावातील गुंड आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लोखेरांनी लोंढे याचा गोळ्या घालून खून केला.

लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना हल्लेखारांनी प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हत्याराने अनेक वार केले. लोंढेवर त्याच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोंढेवर खून, खूनाचे प्रयत्न, जमीन लुबाडणूक सारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर दहा वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांना हल्ला झालेल्या ठिकाणाहून गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली.

या घटनेनंतर उरुळी कांचन परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरंग बारणे यांना संसदरत्न पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

संसदेमध्ये अधिक प्रश्न विचारल्याबद्दल शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून चार खासदारांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

संसदेच्या दरवर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकसभेतील चार खासदारांना संस्थेकडून २००९ पासून 'संसदरत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. खासदार, न्यायाधीश यांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत ही निवड केली जाते. त्यानुसार मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार बारणे यांना लोकसभेत लोकहिताचे आणि चांगले प्रश्न उपस्थित केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबरच 'उत्कृष्ट महिला खासदार' म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना, चर्चेतील सहभागाबद्दल राजस्थानचे खासदार पी. पी. चौधरी आणि झारखंडचे निशिकांत दुबे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्काराचे वितरण ११ जुलैला संस्थेच्या चेन्नई येथील सभागृहात होणार आहे. बारणे म्हणाले, 'लोकसभेमध्ये विचारलेल्या अधिकाधिक प्रश्नांसाठी हा पुरस्कार दिला आहे. मी देशावासियांच्या हिताचे प्रश्न लोकसभेत मांडले. त्यामुळे हा सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रायसोनी’च्या संचालकांविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

ठेवींची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न करून चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भाई हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध बुधवारी (२७ मे) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सतीश हिराचंद गांधी (वय ३८, रा. जुना जकात नाका, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून, प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडिया, मोतीलाल ओमकार गिरी (सर्व रा. तळेगाव, जामनेर, जळगाव) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश गांधी यांनी २ डिसेंबर २०१२ रोजी भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या चिंचवड शाखेमध्ये ३ लाख ९० हजार एवढी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. मुदत ठेव योजनेंतर्गत त्यांना १६५ दिवसांनंतर १३ टक्के व्याजाने रक्कम पुन्हा मिळणार होती. तर, १० हजार ८९ एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पहिल्यापासूनच होती.

मुदत संपल्यानंतर आपली रक्कम काढून घेण्यासाठी ते पतसंस्थेमध्ये गेले असता, त्यांना काही कारणे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अनेक वेळा पतसंस्थेमध्ये जाऊनही त्यांना रक्कम न देता पतसंस्थेकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर गांधी यांनी बुधवारी चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेऊन संचालकांविरुद्ध फिर्याद दिली.

यापूर्वी २ जानेवारीला निगडी पोलिस ठाण्यामध्ये भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या १५ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तर, अनेक ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी यांच्यासह इतर १३ जणांना २ फेब्रुवारीला जळगाव पोलिसांनी अटक केली होती. सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १५ मिनिटांत २८ तोळे सोने लंपास

$
0
0

पिंपरीः मित्राकडे गप्पा मारण्यासाठी गेलेल्या सराफाच्या दुचाकीची डिक्की उचकटून चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने असणारी पिशवी अवघ्या पंधरा मिनिटांत लांबवली. पोलिस उपायुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर गुरुवारी (२८ मे) भरदुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. गिरीश नारायणदास सुरू (वय ५१, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश यांचा सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या होंडा अॅक्टिव्हा (एमएच १४ एबी ८८५५) दुचाकीच्या डिक्कीमध्ये २८ तोळ्यांचे दागिने ठेवले होते. ही दुचाकी एम्पायर इस्टेट येथील रांका ज्वेलर्सजवळ पार्क केली होती.

गिरीश सुरू हे त्याच परिसरात थोड्या अंतरावर असणाऱ्या मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी गेले. पंधरा मिनिटांनंतर सुरू हे दुचाकी असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी दुचाकीची डिक्की उचकटलेली त्यांना दिसली. डिक्कीमध्ये पाहिले असता सोन्याचे दागिने असणारी पिशवी निदर्शनास आली नाही. चोरट्यांनी डिक्की उचकटून दागिने चोरी केल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना या बाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरात नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, चोरट्यांचा माग लागला नाही. व्यवसाय सुरू करून गिरीश यांना एक दिवसाचाच कालावधी झाला आहे. त्यातच त्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलमालकांना इशारा़

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळा-खंडाळ्यातील हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरण, वृक्षसंवर्धन आणि आरोग्यविषयक नियम, सूचनांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून आवश्यक उपाययोजना न केल्यास संबंधित हॉटेलमालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा मावळचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून लोणावळा-खंडाळ्यातील निसर्गसंपदेवर कुऱ्हाड घालून, वनराई नष्ट करून बांधकामविषयक नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. यामध्ये मोठमोठे गृहप्रकल्प, हॉटेल्सची निर्मिती झाल्याने लोणावळ्यातील पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. या प्रकाराचा गांभीर्याने विचार करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. त्या समितीच्या आदेशानुसार लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने लोणावळा येथील श्री नारायणीधाम मंदीर येथे शाश्वत शहर विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोरकर बोलत होते. राधाकृष्णन म्हणाले, 'यापूर्वी लोणावळा खंडाळ्यात मोठ्या प्रमाणात घनदाट वनराई होती. मात्र, ती कालांतराने नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. जर येथील वैभव कायम ठेवून शहराचा विकास करायचा असल्यास पाण्याचे नियोजन करून ते वाचविले पाहिजे. प्रत्येकाने एक झाड लावून ते जगविले पाहिजे.'

नगरसेवकांची अशीही 'आस्था'

पर्यटनासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या कार्यशाळेला २६ नगरसेवकांपैकी केवळ तीनच नगरसेवकांनी हजेरी लावली. तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह इतर २३ जण गैरहजर होते. यामुळे येथील लोकप्रतिनिधींना कोणत्या विकासात अधिक रस आहे. हे जनतेसमोर उघड झाले आहे. या समितीचे नियम व सूचना ह्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या हितसंबंधातील व्यवसायिकांच्या व्यक्तिगत विकासाला आड येत असल्याने या समितीच्या नावाने ओरड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयटी’ला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मावळ तालुक्यातील नानोलीतर्फे चाकण येथे 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' (आयआयटी) स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, याबाबतच्या ग्राम ठरावाची निवेदने सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी (२८ मे) देण्यात आली.

केंद्र सरकारने नानोलीतर्फे चाकण या ठिकाणी ४० हेक्टर (शंभर एकर) गायरान जागेवर 'आयआयटी' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पंरतु, प्रकल्पाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध केला जाईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या बाबत बुधवारी (२७ मे) ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सुमन लोंढे होत्या. माजी उपसरपंच नीलेश लोंढे यांनीही मावळ गायरान बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोधी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचे निवेदन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सरकारला दिले आहे. यामध्ये नीलेश लोंढे यांच्यासह किसन लोंढे, बाळासाहेब नकामले, अरुण लोंढे यांचा समावेश होता.

राज्यकर्ते आणि शासनाचे अधिकारी ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन निर्णय घेत नाहीत. यापूर्वीही एमआयडीसी आणि अन्य प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या. आता गायरानाची जमीन संपादीत करून शेतकरी भूमीहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गायरानाच्या जागेवर मालकी हक्क सांगून बळजबरीने भूसंपादन होणार असल्यास ग्रामस्थांतर्फे लढा उभारला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. एमआयडीसीमुळे नवलाख उंब्रे, मिंडेवाडी, शेटेवस्ती भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. 'मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे गावाचे अस्तित्वच वेशीला टांगले जाणार आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता निर्णय घेणे योग्य नाही. नानोली ग्रामपंचायत हद्दीतील ७५ टक्के वाड्यावस्त्या गायरानावर वसलेल्या आहेत. गावाच्या विकासात शासनाचे फारसे योगदान नसून, सारा गावच उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात येत आहे, ' असे लोंढे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकरातून ४२९ कोटींचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेने मिळकतकरातून चारशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, करात सवलत मिळवण्यासाठी आणखी चार दिवस शिल्लक असल्याने यंदा पालिकेला त्याद्वारे विक्रमी उत्पन्न प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. पालिका हद्दीतील सुमारे आठ लाख मिळकतींपैकी सव्वाचार लाखांहून अधिक नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.

एक एप्रिलपासून मंगळवार सायंकाळपर्यंत मिळकतकरातून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ४२९ कोटी २४ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तब्बल शंभर कोटी रुपयांहून अधिक असून, स्थानिक संस्था करातून (एलबीटी) घटणाऱ्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर मिळकतकराने पालिकेच्या बजेटला आधार दिला आहे.

नव्या आर्थिक वर्षातील मिळकतकर मे अखेरपर्यंत भरल्यास पालिकेतर्फे सर्व नागरिकांना सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. पालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालये, खासगी बँका आणि ऑनलाइन स्वरूपातही कर जमा करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली होती. यंदा पोस्टाच्या माध्यमातून पालिकेने बिले पाठवल्याने बहुसंख्य नागरिकांना ती वेळेवर प्राप्त झाली. त्यामुळे, सुरुवातीपासूनच नागरिकांनी कर वेळेवर भरण्यास प्राधान्य दिले असून, सवलतीचा लाभ घेतला आहे.

सर्व सुविधा केंद्रे खुली

नागरिकांना मिळकतकरातील सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी येत्या रविवारपर्यंत (३१ मे) सर्व नागरिक सुविधा केंद्रे आणि किऑस्क सेंटर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत खुली राहतील, असे कर आकारणी व करसंकलन प्रमुख सुहास मापारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>