Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रुपी ठेवीदारांचा निबंधकांना घेराव

$
0
0

पुणेः आर्थिक अडचणीत आलेल्या रुपी बँकेचा प्रश्न सोडवावा, या मागणीसाठी ठेवीदार संघटनेने मंगळवारी सहकार विभागाचे अपर निबंधक सुनील पवार यांना घेराव घातला. रुपी बँकेवर गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे सुमारे सात लाख ठेवीदार खातेदार अडचणीत आले आहेत. बँकेच्या विलिनीकरणाचे प्रयत्न सहकार खात्याकडून करण्यात आले, मात्र अद्याप त्याला यश मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरीक कृती समितीच्या वतीने सहकार आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी मुंबईत होते, त्यामुळे समितीच्या नेत्यांनी अपर निबंधक सुनील पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. थकीत कर्जाची वसुली करावी, प्रशासकांची बदली करा आणि ठेवीदार खातेदारांची सुटका करा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. मिहीर थत्ते, दत्ता घुले आदी या वेळी उपस्थित होते. याबाबत चर्चा करून पुढील पावले उचलण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्धवट प्रकल्पांना केंद्राचे अर्थसाह्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात मंजूर झालेल्या आणि पन्नास टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केलेल्या प्रकल्पांना 'अमृत' योजनेतून केंद्राचा निधी प्राप्त होईल, असे आश्वासन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी महापौरांना दिले. तसेच, त्यापेक्षा कमी काम झालेल्या प्रकल्पांना आर्थिक मदत हवी असल्यास, त्याचा सविस्तर अहवाल (डीपीआर) पुन्हा पाठवा, अशा सूचनाही केल्या.

'यूपीए'च्या काळातील 'जेएनएनयूआरएम'अंतर्गत पालिकेचे भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यासाठी केंद्राच्या निधीचा पहिला हप्ताही पालिकेला प्राप्त झाला आहे. तसेच, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणालाही हिरवा कंदील देण्यात आला होता. परंतु त्याचा निधी मिळाला नसल्याने ही योजना केंद्राच्या अनुदानातून रद्द केली गेली होती. त्यामुळे पालिकेच्या या महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी मिळावा, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. पालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, पालिकेतील गटनेते गणेश बीडकर या वेळी उपस्थित होते.

पालिकेच्या भामा-आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्राला केंद्र सरकारच्या निधीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यानंतर, गेल्या वर्षभरात कोणताच निधी मिळालेला नाही. 'जेएनएनयूआरएम'अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना 'अमृत' योजनेतून निधी देण्याचे नुकतेच केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यासाठी, संबंधित प्रकल्पांचे ५० टक्के काम पूर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असल्यास संबंधित प्रकल्पांना केंद्र सरकारतर्फे मंजूर केला गेलेला उर्वरित निधी देण्यात येईल, असे आश्वासन नायडू यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंजवणीचा वाद लवकरच कोर्टात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

आधी पुनर्वसन मगच धरण अशी ठाम भूमिका मांडून आपला विरोध धरणग्रस्तांनी आंदोलनाद्वारे करूनही गुंजवणी धरणाचे काम पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर धरणग्रस्तांनी आता या प्रकरणी कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शंकराराव भूरूक, माउली राऊत, किरण राऊत, भीमाजी देवगिरीकर, प्रताप शिळीमकर, प्रताप मरळ, लक्ष्मण पासलकर, राजेश निवंगुणे, रमेश शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्तांनी शुक्रवारी वेल्हे तहसील कार्यालय धरणस्थळी आंदोलन करून धरणाचे काम बंद पाडले. मात्र, शनिवारपासून पोलिस बंदोबस्तात पुन्हा धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनावेळी कोळसेपाटील यांनी सरकार दडपशाही पद्धतीने धरणाचे काम करीत आहे. आधी पुनर्वसन मगच धरण असा नियम असताना धरणाचे काम सुरू ठेऊन सरकार धरणग्रस्तांवर अन्याय करीत आहे. त्याकरिता धरणग्रस्तांनी जनहित याचिका दाखल करावी, अशी सूचना धरणग्रस्तांना केली होती. त्यानुसार आता न्यायालयांत दोषी अधिकारी, संबधित पदाधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याच्या तयारीला आम्ही लागलो असल्याची माहिती धरणग्रस्तांनी दिली. वेळ पडल्यास तुरुंगात जावे लागले, तरी चालेल परंतु आता अन्याय सहन करावयाचा नाही या निर्णयापर्यंत धरणग्रस्त आले आहेत.

या आहेत धरणग्रस्तांच्या मागण्या...

सर्व खातेदारांना जमीन वाटपाचे काम पूर्ण करावे. धरणाच्या दोन्ही तीरावरील गावठाणाचे काम पूर्ण करावे. निवी व भट्टी गावातील घरांचे पैसे मिळावेत. निवी, कोदापूर येथील अपात्र खातेदारांना जमीन मिळावी. निवी, भट्टी, कोंढावळे या गावांची चार एकरची कारवाई होऊन सहा- सात वर्ष झाली तरी पुढील कार्यवाही झालेली नाही. ती त्वरित पूर्ण व्हावी अशा धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांचे घूमजाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्याच आठवड्यात शहरातील अतिक्रमणांवरून प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी पालिकेने धडक कारवाई सुरू करताच घूमजाव केले आहे. अधिकृत परवानाधारकांवरील कारवाई थांबवा, अशी विनंती सर्व गटनेत्यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांकडे केल्याने या कारवाईला पुन्हा खीळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरातील अतिक्रमणांवर सोमवारपासून जोरदार कारवाई सुरू करणाऱ्या पालिकेची मोहीम थांबविण्यासाठी मंगळवारी दुसऱ्याच दिवशी प्रयत्न सुरू झाले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अतिक्रमण कारवाईत वाढ झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनीच मंगळवारी आयुक्तांची भेट घेत या कारवाईचा वेग कमी करण्याच्या सूचना केल्या. शहरातील सरसकट सर्वच अतिक्रमणांवर कारवाई केली जात असल्याने अधिकृत फेरीवाले, पथारी व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली; तसेच ही कारवाई केवळ अनधिकृत व्यावसायिकांवर केली जावी, असा आग्रह धरण्यात आला. सर्व पक्षनेत्यांना आयुक्तांनी कोणतेच आश्वासन दिले नसून, अतिक्रमण कारवाई सुरूच राहील, असे संकेत दिले आहेत.

शहरात अतिक्रमणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनधिकृत फेरीवाले-पथारी व्यावसायिक यांच्यावर नियंत्रण ठेवणे पालिकेला शक्य होत नसल्याचा सूर सर्वसाधारण सभेत व्यक्त केला गेला. अनेक ज्येष्ठ सदस्यांनीही प्रशासनालाच जबाबदार धरून पुणे शहराची ग्रामपंचायत केली, अशी जोरदार टीका केली होती. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत, अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले होते.

राजकीय गरमागरमी

पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मंगळवारी तळजाई आणि सहकारनगर भागांत कारवाई केली गेली. काँग्रेसच्या माजी आमदारांच्या अनधिकृत बांधकामावरही हातोडा उचलण्यात आला. तळजाई परिसरातील कारवाई सूडबुद्धीने केली जात असून, ती चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.

'स्थायी'च्या सभेकडे सदस्यांची पाठ

स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या सूचनांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांचे सदस्य मंगळवारी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे, श्रद्धांजलीचे कारण पुढे करत ही बैठक तहकूब करण्याची वेळ राष्ट्रवादीवर ओढवली. खराडी-विमाननगर परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या तरतुदीवरून स्थायी समिती अध्यक्षा कदम आणि शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद पालिकेत अजूनही उमटत आहेत. या वादानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षनेत्यांच्या सभेवर बहिष्कार टाकला होता. आता तर स्थायी समितीचे कामकाज होऊ न देण्याचा पवित्रा घेण्यात आला असून, मंगळवारच्या बैठकीस उपस्थित राहू नये, अशा सूचना समिती सदस्यांना देण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेक्सपीअरची नाटके कथांमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अलौकिक नाट्यकृतींनी जागतिक रंगभूमीवर गारूड केलेल्या इंग्रजी नाटककार शेक्सपीअरच्या काही नाट्यकृती कथारूपात वाचकांपुढे आल्या आहेत. गणेश ढवळीकर यांनी १९५५च्या सुमारास अनुवादित केलेल्या या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. मात्र, या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपीअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे प्रकाशित केल्या आहेत.

वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपीअरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपीअरच्या नाटकांच्या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. मात्र, ते जीर्ण झालेले होते. त्यामुळे या लेखनाचे काही होते का हे पाहण्यासाठी त्यांनी भारद्वाज प्रकाशनचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांच्याकडे त्या सुपूर्त केल्या. त्या कथा वाचल्यावर रानडे यांना त्या महत्त्वाच्या असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी या कथा पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

पुस्तकाविषयीची माहिती देताना रानडे म्हणाले, 'गेली चारशे वर्षे शेक्सपीअर रंगभूमीवर राज्य करत आहे. त्याच्या नाटकांपासून कुणीच दूर राहू शकले नाही. गोपाळ गणेश आगरकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांनीही शेक्सपीअरची नाटके अनुवादित केली आहेत. मात्र, ढवळीकर यांनी केलेला कथारूप अनुवाद शेक्सपीअरच्या मराठीतील साहित्याला वेगळा आयाम देणारा आहे.'

'सुमारे साठ वर्षांपूर्वीची भाषाशैली या कथांमध्ये दिसते. या कथांचे पुस्तक करताना मूळ लेखनात काहीही बदल केलेला नाही. केवळ व्याकरणाच्या नव्या नियमांप्रमाणे शुद्धलेखन बदलून घेण्यात आले. नव्या पिढीपर्यंत शेक्सपीअर सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी या नाट्यकथा महत्त्वाच्या आहेत,' असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ लेखकांचे साहित्यही समाविष्ट

'शेक्सपीअरच्या नाट्यकथा' या पुस्तकात मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाइन ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, तुफान, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ आणि ज्युलिएट या कथारूप नाट्यकृती, ढवळीकर यांचाच स्वप्नातील जग हा लेख, वि. वा. शिरवाडकर, प्रा. ग. प्र. प्रधान अशा मराठीतील ज्येष्ठ लेखकांचे शेक्सपीअरविषयीचे लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्माघाताचे ७५७ बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाकिस्तानसह वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे भारत विशेषतः मध्य व उत्तर भारत होरपळून निघत आहे. या भागात अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट निर्माण झाली असून यामुळे सुमारे ७५७ जणांना प्राण गमवावा लागला आहे. पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

उन्हाच्या या तडाख्यामुळे गेल्या २४ तासांत देशात २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मरण पावलेल्यांची संख्या ७५७ इतकी झाली असून, सर्वाधिक मृत्यू आंध्रप्रदेश (५५१) आणि तेलंगणमध्ये (२६६) त्या खालोखाल गुजरातमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक तीव्र उन्हाळ्याचा महिना असलेल्या मे महिन्यात उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. परंतु, या वेळी अनेक गोष्टींमुळे या लाटांची तीव्रता वाढली आहे. भारताच्या पूर्व व वायव्य भागात उष्णतेची लाट आहे. पाकिस्तानच्या दक्षिण भागातून पश्चिमेकडे म्हणजेच भारताकडे वाहणारे वारे (वेस्टर्लीज) हे देखील यातील एक प्रमुख कारण आहे. विदर्भ, ओडिशा, झारखंड या भागात तीव्र उष्णतेची लाट आहे. तर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात तसेच पंजाब व छत्तीसगडच्या काही भागात उष्णतेची लाट आहे.

'पाकिस्तानातील सिंध प्रांतात कमाल तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत वाढले आहे. तेथून भारताकडे वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांसोबत तेथील उष्ण प्रवाह भारताकडे खेचले जात आहेत. हे वारे उष्ण व कोरडे असल्याने भारताच्या अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. वळवाच्या पावसाला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे,' असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मान्सून येणार ३० तारखेला

चार दिवस अंदमानात दाखल झालेला मान्सून सध्या श्रीलंकेच्या उंबरठ्यावर आहे. तेथून अरबी समुद्राचा दक्षिणपूर्व भाग, मालदिव आणि तामिळनाडूलगतच्या कॉमोरिन भाग व बंगालच्या उपसागराच्या मध्य व दक्षिण भागात काही ठिकाणी मान्सून दोन दिवसात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मान्सून ३० मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणातील हवेचा दाब कमी असल्याने मान्सूनचा प्रवास वेगाने होण्याची शक्यताही हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोबाबत केंद्राचे घूमजाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देऊ,' असे भरघोस आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी देणारे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आपली भूमिका बदलली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत कालबद्ध आश्वासन देता येणार नसल्याचा पवित्रा त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेतला.

निवडणुकीपूर्वी पुणे मेट्रोचा मुद्दा राजकीय बनला होता. नागपूर मेट्रोला प्राधान्य देताना भारतीय जनता पक्ष सरकारने पुण्याचा प्रकल्प जाणूनबुजून दुर्लक्षित केला आणि पुण्याला भेदभावाची वागणूक दिली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. चार दिवसांत पुणे मेट्रो प्रकल्पास मान्यता देऊ, असे आश्वासन नायडू यांनी त्यानंतर दिले होते. 'असे कालबद्ध आश्वासन देता येणार नाही,' अशी भूमिका नायडू यांनी आता घेतली आहे.

मेट्रो प्रकल्पाबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत असून, त्यानंतर प्रकल्प मार्गी लागेल, असे नायडू म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांबाबत विचारले असता, 'ते माजी आहेत,' अशी टिपण्णी नायडू यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी निकालात कोकणाची बाजी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

प्रत्येक विद्यार्थ्याच्या करिअरची दिशा ठरवणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाच्या निकालानं आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के असून हा नवा उच्चांक असल्याचं समजतं. या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकणातील ९५.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मुंबईचा निकाल ९०.११ टक्के लागला आहे.

आठ बोर्डांना ९०+

यंदाच्या निकालात नऊ विभागीय मंडळांपैकी, नाशिक वगळता आठ विभागांनी नव्वदी पार करण्याचा पराक्रम केलाय. नाशिक विभागातील ८८.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोकण विभागाखालोखाल अमरावती विभागाचा नंबर लागलाय. अमरावतीचा निकाल ९२.५० टक्के, तर कोल्हापूरचा ९२.१३ टक्के आणि नागपूरचा निकाल ९२.११ टक्के आहे. विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात ९१.९६ टक्के, लातूर विभागात ९१.९३ टक्के आणि औरंगाबादमध्ये ९१.७७ टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेतली आहे.


बारावी निकालाचे ताजे अपडेट बघण्यासाठी इथे क्लिक करा.

तुमचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरकरांची खोली पाहण्यासाठी खुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात असलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खोली त्यांच्या जयंतीनिमित्त आज नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. फर्ग्युसनच्या एक क्रमांकाच्या वसतिगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य होते. या खोलीमध्ये त्यांनी परिधान केलेले कपडे, त्यांची काही पुस्तके आदी साहित्य संग्रहित करून ठेवण्यात आले आहे. प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीरांचा स्मृतिदिन आणि जयंतीदिनी ही खोली सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय लायसन्सच्या प्रमाणात वाढ

$
0
0

अडीच वर्षांत सव्वासहा हजार जणांनी काढले लायसन्स

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहन चालवण्याचे आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी दोन आकडी असणारी ही संख्या आता हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या अडीच वर्षात सव्वासहा हजार जणांनी हे लायसन्स काढले आहे. नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या नागरिकांना या लायसन्सची गरज भासते.

गेल्या काही वर्षात पुण्याची ओळख 'आयटी सिटी' अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. देशातील अनेक आयटी कंपन्यांच्या परदेशातही शाखा आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांतून नोकरदारांना ठराविक काळासाठी परदेशात पाठवले जाते. तसेच इंटरनेटमुळे परदेशात नोकरी मिळवणे सोपे झाले आहे. परिणामी, परदेशात स्थायिक होण्याकडेही कल वाढत आहे. परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लायसन्सची आवश्यकता असते.

नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या 'व्हिसा'वर त्या देशात राहण्याची कालमर्यादा नमूद असते. संबंधित देशाचे नागरिकत्व असल्याशिवाय त्या देशातील यंत्रणेकडून लायसन्स दिले जात नाही. परिणामी आपल्या मूळ देशातूनच लायसन्स काढावे लागते. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी अनेक जण लायसन्स काढतात. तसेच, केवळ लायसन्स काढण्यासाठीही परदेशातून अनेक जण पुणे आरटीओ कार्यालयात येतात, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.

१४९ देशांत ग्राह्य

ड्रायव्हिंगचे आंतरराष्ट्रीय लायसनस काढण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज असते. स्थानिक ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हिसावरील पत्ता एकसारखा असेल, तरच आंतरराष्ट्रीय परवाना दिला जातो. या लायसन्सची मुदत केवळ एक वर्ष असते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जात नाही. हे लायसन्स जगभरातील १४९ देशांत ग्राह्य धरले जाते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आलेले आंतरराष्ट्रीय लायसन्स

वर्ष लायसन्सची संख्या २०१३ २८४८ २०१४ ३३१७ २०१५ १०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटपाथवर पार्किंग... दंड भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार हजार रुपयांच्या पटीत दंड वसूल करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांत वाहतूक पोलिसांनी फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्या चालकांकडून ९१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात आता जॅमर कारवाई सुरू असल्याने वाहन चालकांना त्याचीही 'किंमत' चुकवावी लागत आहे.

वाहतूक पोलिसांकडून मोटार परिवहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. मोठ्या वाहन चालकांकडून पोलिसांच्या तोंडावर १०० रुपये फेकून काय कारवाई करा, असा अर्विभाव दाखवण्याच्या घटना घडल्या होत्या. यावर उपाय म्हणून फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्या चालकांविरुद्ध मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार कारवाई करण्याचा ठराव महानगरपालिकांनी केला होता. त्यानुसार गेल्या सहा वर्षांपासून वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात येते. वाहन चालकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम ही महापालिकांना देण्यात येते.

फुटपाथवर दुचाकीसाठी एक हजार, कारसाठी दोन हजार तर टेम्पो तीन हजार आणि जड वाहनांसाठी पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. वाहतूक पोलिसांकडून आता जॅमरची कारवाई सुरू आहे. फुटपाथवर वाहन पार्क केल्यानंतर जॅमर लावून पोलिस कर्मचारी निघून जातात. जाताना कारच्या काचेवर आपला संपर्क क्रमांक लिहितात. अनेकदा वाहन चालकांकडून फोन आल्यानंतर त्यांची कामे आटोपून ते जॅमर काढण्यासाठी येतात. अनेकदा वाहन चालकांना प्रतिक्षा करावी लागत असल्याने त्यांची चिडचिड होते. मात्र, फुटपाथ अडवणाऱ्या वाहन चालकांना अद्दल घडवण्यासाठीच पोलिसांकडून ही 'ट्रिक' वापरली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रास देवू नका-अमरेश राव

नळ स्टॉप येथील पाडळे पॅलेसजवळ माझ्या कारचा एक टायर फूटपाथवर होता. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी मला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. पोलिसांना फोन केल्यानंतर जवळपास ते दीड तासांनी तेथे आले. मला भर उन्हात थांबावे लागले होते. गाडीला जॅमर लावल्याने जाताही येत नव्हते. पोलिसांकडून देण्यात आलेल्या पावतीनुसार माझी गाडी फुटपाथवर होती हे दर्शवत नाही. पोलिसांनी ना​गरिकांना अशा प्रकारे त्रास देवू नये, असे अमरेश राव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपशामुळे पूल खचण्याचा धोका

$
0
0

तहसीलदारांचा अहवाल; कारवाईचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नीरा नदीवरील कांबळेश्वर बंधारा वाळू माफियांनी स्फोटकांनी उडवून दिल्याचा संशय असतानाच दौंड तालुक्यातील कोंढारचिंचोली येथील पूल वाळूच्या बेसुमार उपशामुळे खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा वाळू उपसा थांबवून ठेकेदेरांवर कारवाई करण्यासंदर्भात करमाळाच्या तहसीलदारांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारा सोमवारी फोडण्यात आला. हा बंधारा वाळू माफियांनी फोडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नदीतील वाळूचा सध्या ब्रासमागे सहा हजार रुपयांचा भाव आहे. त्यामुळे वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अधिकृत वाळू उपशांच्या ठेक्यांशिवाय स्थानिक गुंडांना हाताशी धरून ठेकेदार मंडळी वाळूची चोरीही करीत आहेत. या धंद्यात मिळणाऱ्या पैशांमुळे गुन्हेगारी क्षेत्राचा त्यात मोठा शिरकाव झाला आहे. त्यातून नीरा नदीवरील बंधारा स्फोटकांनी उडवून दिल्याचा संशय आहे.

दौंड तालुक्यातील कोंढारचिंचोली येथे वाळूचा ठेका आहे. या ठेक्याजवळ दिवस-रात्र वाळू उपसा होत असल्याची तक्रार आली होती. त्यानुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या तहसीलदारांनी पाहणी केली. त्यात दौंड तालुक्याच्या हद्दीत खानोटा बाजूने चार ते पाच बोटींद्वारे वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले. कोंढारचिंचोलीच्या पुलाजवळ दोनशे मीटरवर मोठा वाळू उपसा होत आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा तहसीलदारांचा दावा आहे. हा वाळू उपसा झाल्यावर पूल खचण्याचा धोका असल्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे पाठविला आहे. तसेच, दौंड तहसीलदारांमार्फत संबंधित ठेकेदारांचा उपसा थांबवून त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र त्यांनी दिले आहे.

पावसाळ्यापूर्वी वाळू उपशासाठी धडपड

पावसाळा सुरू झाल्यावर वाळू उपसा बंद केला जातो आणि पावसाळ्यानंतर पुन्हा वाळू ठिकाणांचे लिलाव करण्यात येतात. नीरा, भीमा नद्यांवरील वाळू उपशाची ठिकाणे ठेकेदारांनी लाखो रुपयांचा लिलाव करून खरेदी केली आहेत. हा पैसा वसूल करण्यासाठी ठेकेदेरांची धडपड सुरू आहे. त्यामुळे बोटीद्वारे रात्रंदिवस उपसा सुरू आहे. तसेच, यांत्रिक बोटींनी वाळू काढण्यास मनाई असताना ठेकेदार नियम धाब्यावर बसवून वाळू उपसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचा निकाल ९१ टक्के

$
0
0

नियमित विद्यार्थी उत्तीर्णांची टक्केवारी ९१.६

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा बारावीच्या राज्य पातळीवरील सर्वोच्च निकालाचे प्रतिबिंब पुणे विभागाच्या निकालामध्येही उमटले आहे. पुणे विभागातून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.९६ इतकी नोंदविण्यात आली आहे. विभागाच्या निकालात सोलापूर जिल्हा आघाडीवर असून, जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.०६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल ९१.३८ टक्के लागला आहे.

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाने विभागीय पातळीवरील निकालाविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यामधून या बाबी स्पष्ट झाल्या. विभागामध्ये बारावीच्या परीक्षेला बसलेल्या २ लाख ६ हजार ११६ नियमित विद्यार्थ्यांपैकी एक लाख ८९ हजार ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.९६ इतकी आहे. तसेच, परीक्षा दिलेल्या १५ हजार ३९९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ३२८ विद्यार्थीही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ४१.०९ टक्के इतकी नोंदविण्यात आली. नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची एकत्रित टक्केवारी ८८.४२ टक्के इतकी असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

पुणे विभागाच्या निकालामध्येही विद्यार्थिनींनी ९५.४४ टक्के इतकी टक्केवारी नोंदवित, विद्यार्थ्यांना पिछाडीवर टाकले आहे. पुणे, नगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे अनुक्रमे ९५.१५, ९५.७० आणि ९५.९५ टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. या बाबतीत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.१५, ८९.८५ आणि ९१.०७ टक्के इतके असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची जिल्हानिहाय टक्केवारी

जिल्हा........ विद्यार्थी..............विद्यार्थिनी......एकूण निकाल पुणे.............८८.१५..................९५.१५.............९१.३८ नगर...........८९.८५..................९५.७०..............९२.२७ सोलापूर.......९१.०७..................९५.९५..............९३.०६ पुणे विभाग एकूण.....८९.२५.......९५.४४..............९१.९६

नियमित विद्यार्थ्यांची शाखानिहाय टक्केवारी

जिल्हा...........................शाखा सायन्स..................आर्ट्स............कॉमर्स........एमसीव्हीसी पुणे......................९५.११............८३.१५...........९१.७४............९०.५८ नगर.....................९७.१६...........८५.५९............९३.४२...........८८.४६ सोलापूर.................९५.६०...........९०.०६............९५.०२..........९१.८० पुणे विभाग एकूण....९५.८५...........८६.०४...........९२.३३.........९०.५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळयान मोहिमेचे श्रेय शास्त्रज्ञांनाच

$
0
0

डॉ. अरुण निगवेकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मंगळयानासारखी आव्हानात्मक मोहीम यशस्वी करून शास्त्रज्ञांनी जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांना कित्येक वर्षे खर्च करावी लागली. खरे तर मंगळयान मोहिमेचे श्रेय त्यांनाच द्यायला हवे,' असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले.

निनाद, पुणे आणि निनाद पतसंस्थेच्या वतीने दर वर्षी उषा भालचंद्र केसरी यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे दहावे वर्ष असून, मंगळयान मोहिमेत योगदान देणारे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे यांना या वर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमावेळी डॉ. निगवेकर बोलत होते. महापालिकेचे उपायुक्त सुनील केसरी, चंद्रकांत सणस, माजी नगरसेविका शुभदा जोशी, 'निनाद, पुणे'चे अध्यक्ष उदय जोशी, मयुरेश जोशी, अनुप जोशी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले सचिन फडतरे, सचिन लहामगे, शुभांगी रणदिवे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

'मंगळावरील माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी मंगळयानावर अनेक यंत्रे बसवण्यात आली. ही यंत्रे चालण्यासाठी सौरऊर्जेशिवाय पर्याय नसल्याचे शास्त्रज्ञांनी ओळखले. ती जबाबदारी पुण्याचे नितीन घाटपांडे यांनी पार पाडल्याने त्यांचा अभिमान आहे,' असे डॉ. अरुण निगवेकर म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना नितीन घाटपांडे यांनी पंचागाच्या खगोलीय पैलूवर प्रकाश टाकला. त्या वेळी त्यांनी इंग्रजी कॅलेंडर, लीप वर्ष, पंचागातील पाच अंगे, त्याची सूत्रे याची माहिती दिली. 'सरकारकडून प्रत्येक व्हिजनला महत्त्व दिले जाते. परंतु, ते व्हिजन हे मिशन व्हावे यासाठी मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो'ने पाऊल उचलले. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. ज्ञानाचा सातत्याने विचार केला जातो. तसेच त्याच्या विकासाबरोबर विस्तारही केला जातो. त्यालाच आपल्या मते विज्ञान म्हटले जाते,' असेही घाटपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात बदलीचे वारे

$
0
0

८८ पोलिस उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील ८८ पोलिस उपअधीक्षक /सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामुध्ये पुणे शहरातील पाच पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पुण्यात दहा पोलिस अधिकारी बदलून आले आहेत. अर्जुन सुकंडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तर तुळजापूर येथील मोहन विधाते यांनी पुणे शहर आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातून बदलून गेलेले अधिकारी

रमेश गायकवाड (सहायक आयुक्त, पुणे ते सहायक आयुक्त, औरंगाबाद) राजन भोगले ( सहायक आयुक्त, पुणे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) गोपीनाथ पाटील ( सहायक आयुक्त, पुणे ते सहायक आयुक्त, सोलापुर) राजेंद्र साळुंखे ( सहायक आयुक्त, पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापुर) राजेंद्र भामरे ( सहायक आयुक्त, पुणे ते उपविभागीय अधिकारी, वाशिम)

पुण्यात आलेले अधिकारी

अर्जुन सकुंडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) श्यामकुमार निपुनगे (उपविभागीय अधिकारी रेल्वे मुख्यालय, पुणे ते 'सीआयडी' क्राईम, पुणे) प्रफुल्ल क्षीरसागर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते उपविभागीय अधिकारी रेल्वे, पुणे) प्रविण कुलकर्णी (सहायक आयुक्त, औरंगाबाद ते सहायक आयुक्त, पुणे) शंकर केंगार (उपविभागीय अधिकारी ते सहायक आयुक्त, पुणे) तुकाराम गौड (सहायक आयुक्त, नागपुर ते सहायक आयुक्त, पुणे) मोहन विधाते (उपविभागीय अधिकारी, तुळजापुर ते सहायक आयुक्त, पुणे) रशीद ताडवी (अतिरिक्त अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ते सहायक आयुक्त, पुणे) विजयकुमार भोईटे (अतिरिक्त अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहायक आयुक्त, पुणे) राम मंदुर्के ( उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मधुराचे ‘विशेष’ यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तशी ती 'विशेष' गटामध्येच मोडणारी; मात्र तिने याचा बाऊ न करता केवळ अभ्यासावरच भर दिला. आर्किटेक्ट व्हायच्या आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. केवळ दहावीमध्येच नाही, तर बारावीच्या परीक्षेमध्येही नव्वदीच्या पलीकडे झेप घेतली. त्यामुळेच ती एका वेगळ्या अर्थाने 'विशेष' ठरली आहे. तिचे नाव आहे मधुरा वझे.

मधुराला जन्मतःच कर्णबधिरत्व आहे; मात्र ती इतर सर्वच बाबतींत सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच असल्याची बाब तिच्या पालकांनी वेळीच समजून घेतली होती. त्यामुळेच तिला सुरुवातीपासूनच सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकवण्यात आले. कर्णबधिर असल्याने भाषा शिकण्याची तिची अडचण सोडवण्यासाठी 'स्पीच थेरपी'च्या जोडीनेच घरातून भाषा शिकवण्यासाठीचे विशेष प्रयत्न झाले. दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के मिळवून तिने आपण कुठेच कमी नसल्याचे सिद्ध केले होते. बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्येही तिने आपली ही कामगिरी कायम ठेवत ९४.९२ टक्के मिळवले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आर्ट‍्स शाखेतून प्रथम येण्याचा मानही तिने पटकावला आहे.

सध्या हमटा ट्रेकवर असलेल्या मधुराच्या या कामगिरीविषयी तिची आई सिमन्तिनी वझे यांनी 'मटा'ला माहिती दिली. मधुराला आर्किटेक्टच व्हायचे आहे. त्यामुळेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये आर्ट्‍‍सला प्रवेश घेतल्यानंतर तिने गणित विषयासह बारावीची परीक्षा दिली. त्यासाठी तिने स्वअभ्यासावर भर दिला. तसेच चित्रकला आणि टेनिसची आपली आवडही जोपासली. तिने सुरुवातीपासूनच विषय समजून घेण्यावर भर दिल्याने, तिचा बारावीचा अभ्यास दिवाळीच्या सुट्टीमध्येच पूर्ण झाला होता. त्यानंतर आर्किटेक्चरच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यावरही तिने भर दिल्याचे वझे यांनी सांगितले. तिला बारावीला गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा विक्रमी निकाल

$
0
0

९१.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यात ९१.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याद्वारे विक्रमी निकालाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीही निकालाच्या टक्केवारीने नव्वदी (९०.०३) पार केली होती. नेहमीप्रमाणे मुलांच्या (८८.८०) तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण (९४.२९ टक्के) अधिक आहे. पुणे विभागात उत्तीर्णांचे प्रमाण ९१.९६ टक्के आहे.

मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी हा निकाल जाहीर केला. निकाल ऑनलाइन उपलब्ध झाला असून, विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका त्यांच्या शाळा वा ज्युनिअर कॉलेजमध्ये ४ जूनपासून मिळणार आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के आहे. उत्तीर्णांचे सर्वांत कमी प्रमाण (८८.१३) नाशिक विभागात आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यातून १२,३७,२४१ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ११,२९,०७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ९५.७२ टक्के, कॉमर्स शाखेतील ९१.६०, व्यवसाय अभ्यासक्रमांत ८९.२० टक्के आणि कला शाखेच्या ८६.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तरपत्रिकांच्या छापील प्रती

गुणपडताळणी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी छापील निकालपत्र मिळाल्यानंतर त्यासाठीची प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीचे अर्ज सादर करण्यासाठी १५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठीही १५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध असून, त्यासाठी उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येईल. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करणे गरजेचे असल्याचेही म्हमाणे यांनी सांगितले.

विभागनिहाय टक्केवारी

विभाग ..... टक्केवारी

कोकण .....९५.६८ अमरावती ..... ९२.५० कोल्हापूर ..... ९२.१३ नागपूर ..... ९२.११ पुणे ..... ९१.९६ लातूर ..... ९१.९३ औरंगाबाद ..... ९१.७७ मुंबई ..... ९०.११ नाशिक ..... ८८.१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिकहो, तुमच्यासाठी!

$
0
0

>> पांडुरंग बलकवडे

आपल्या सीमेवर असलेल्या कर्तव्यदक्ष सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. अशाच कर्तव्यनिष्ठ आणि विविध मोहिमांमध्ये पराक्रम गाजवलेल्या सुमारे ३३ विविध चक्र विजेत्या सैनिकांचा सन्मान आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. त्यानिमित्त..

भारतीय सैन्य हा आपल्या सर्वांच्याच अभिमानाचा विषय. युद्धामधील अतुलनीय शौर्याबरोबरच देशातील नैसर्गिक आपत्तींमध्येही आपल्या सैन्याने मोलाची भूमिका बजावली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये अनेक पुणेकरांनी सेवा बजावली आहे, किंवा बजावत आहेत. तिन्ही दलांमध्ये सेवा बजावत असताना केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैनिक किंवा अधिकाऱ्यांना विविध चक्र प्रदान केली जातात. यामध्ये परमवीरचक्र, महावीरचक्र, अशोकचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा विविध चक्रांचा समावेश असतो. असे ५१ चक्रविजेते पुण्यात वास्तव्यास आहेत, ही पुणेकरांसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. पुण्याला मिळालेल्या चक्रांचा आकडा भारतात सर्वाधिक आहे.

अशा या महान पुणेकरांचा भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ५१ चक्रविजेत्यांपैकी ३३ विजेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. यातील २५ चक्रविजेते स्वतः तर उर्वरित विजेत्यांचे कुटुंबीय हा सन्मान स्वीकारणार आहेत. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे व अखंडतेचे संरक्षण करण्यास सदैव सिद्ध असलेले संरक्षणदल हा आधुनिक राष्ट्रजीवनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. राष्ट्राचे अस्तित्व या संरक्षणदलाच्या सक्षमतेवर, कार्यक्षमतेवर आणि सैन्यदलाच्या राष्ट्रभक्ती, शौर्य व नीतीधैर्यावर अवलंबून आहे.

परकीय शत्रूपासून आपल्या सीमांचे रक्षण करणे; तसेच देशातील हिंसक, फुटीरतावादी चळवळींना नेस्तनाबूत करून देश अखंड राखणे आणि नैसर्गिक व अन्न आपत्तींच्या वेळी जनतेच्या साहाय्यास धावून जाणे, हे कर्तव्य वेळोवेळी पार पाडताना भारतीय जवान कधीही मागे हटला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्याने अप्रतिम शौर्य, साहस आणि आपल्या युद्धकौशल्याचा प्रत्यय जगाला दिला. स्वातंत्र्योत्तर काळातही शत्रूशी झालेल्या प्रत्येक संघर्षात भारतीय सैन्याने हीच परंपरा पुढे चालवली.

१९४७-४८ मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर केलेले आक्रमण परतवून लावत भारतीय सैन्याने हा भूभाग आपल्या ताब्यात ठेवला. १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केले. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. तेव्हा विपरित स्थितीतही भारतीय सैन्याने आपले कर्तव्य बजावताना आपले शौर्य व धैर्य दाखवून दिले. लेह आणि अरुणाचल प्रदेश हा आजही भारताचा अविभाज्य भाग राहिला, याचे श्रेय भारतीय सैन्याच्या पराक्रमालाच द्यावे लागेल. १९६५ सालच्या युद्धातले अतुलनीय शौर्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारतीय सैन्याने बांग्लादेश नावाच्या एका नव्या राष्ट्राची निर्मिती केली. श्रीलंका शांतता मोहीम व त्यानंतर १९९९ चे कारगिल युद्ध यामध्येही भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य गाजवले. या सर्वच मोहिमांमध्ये तिन्ही संरक्षण दलांचा मोलाचा वाटा होता. भारतातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्येही सैन्यदलाने मोलाची भूमिका पार पाडली. जोपर्यंत भारतीय जवान देशरक्षणाला सिद्ध आहे, तोपर्यंत कोणालाही देशाकडे वाकड्या नजरेने पाहता येणार नाही, हे आपल्या आजवरच्या इतिहासाने सिद्ध करून दाखवले आहे. शिवरायांचा आदर्श असलेला महाराष्ट्र हा लढवय्यांचा देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, तसेच स्वातंत्र्यानंतर देश रक्षणासाठी महाराष्ट्राने दिलेले बलिदान संपूर्ण देशाला नेहमीच स्मरणात राहील. स्वतःचा मृत्यू तळहातावर घेऊन रात्रं-दिवस ऊन-वारा-पावसात, हाडं गोठवणाऱ्या भयाण थंडीत आपले कर्तव्य बजावून देशाचे रक्षण करणाऱ्या त्या महान वीरांमुळेच तुम्ही-आम्ही या देशात सुरक्षित जगत आहोत.

अशा सदैव प्रेरणादायी माजी सैनिक, अधिकाऱ्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी समस्त पुणेकरांच्या वतीने हा समारंभ आयोजिण्यात आला आहे. सत्कार समारोह समितीच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हा भवदिव्य समारंभ होणार असून प्रत्येक पुणेकराने या कार्यक्रमाला उपस्थित राहून सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, अशी आमची इच्छा आहे.

(सैनिक सन्मान समारंभाचे आणि संस्कृती संवर्धन समिती, पुणे महानगरचे सचिव आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शास्त्रीय गायनाला अधिकाधिक व्यासपीठे मिळावीत’

$
0
0

आजच्या पिढीचा गायक सुरंजन खंडाळकर याने आपल्या गानकौशल्याने अनेक नामवंत पुरस्कार पटकाविले आहेत. नुकत्याच झालेल्या आकाशवाणीच्या ऑडिशनमध्ये संपूर्ण भारतातील सुमारे २ हजार स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक पटकावून त्याने आकाशवाणीची 'बी ग्रेड' वयाच्या अवघ्या २२ वर्षी मिळवली. यानिमित्त त्याच्याशी श्रद्धा सिदीड यांनी साधलेला संवाद.

आपल्या वडीलांकडून मिळालेला गायनाचा वसा सुरंजन खंडाळकर समर्थपणे पेलतच नाही, तर आश्वासकपणे पुढे नेत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाची स्कॉलरशिप, व्हॉइस ऑफ इंडिया अॅवॉर्ड, दूरदर्शन आणि स्पीक-मॅकेतर्फे आयोजित नाद-भेद स्पर्धेत संपूर्ण देशात प्रथम येऊन मिळवलेला भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा पुरस्कार, पं. गंगाधरबुवा पिंपळखरे स्मृती सन्मान, श्रीरंग संगोराम पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याच्या खात्यात जमा झाले आहेत. मिरजेतील अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या प्रसिद्ध दर्ग्यात गानसेवा करण्याची संधीही त्याला नुकतीच मिळाली. कारकीर्दीतील हे टप्पे चढत असताना त्याने हे मनोगत व्यक्त केले.

तुझे वडील पं. रघुनाथ खंडाळकर प्रसिद्ध गायक आहेत. सामान्यतः आई-वडिलांच्याच क्षेत्रात मुलेही करिअर घडवतात. तुझेही ओघाने तसे झाले, की तुला गाण्यात मनापासून रुची वाटली?

लहानपणापासून सभोवतीच्या वातावरणामुळे एखाद्या गोष्टीत रस निर्माण होतो. माझे बाबा मला त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमांत घेऊन जायचे. त्यांचे गाणे पाहून मला आपणही गावं असे वाटू लागले. ३-४ वर्षांचा असल्यापासून मी गाण्याचा प्रयत्न करायला लागलो. घरातल्या वातावरणामुळे माझे कान तयार झाले. गायनात गोडी वाटू लागली. त्यानंतर मी बाबांकडे आणि गुरू मधुसूदन कुलकर्णी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. सध्या पं. अजय पोहनकर यांच्याकडे शिकतोय.

वयाच्या २२ व्या वर्षी तू गायनात बरंच नाव कमावले आहेस, अनेक पुरस्कारही मिळवलेस. आताची भावना काय आहे?

खूप आनंदात आहे मी. आई-वडील आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी इथंवर पोहोचलो आहे. अशा पुरस्कारांनी प्रोत्साहन मिळते आणि आपण योग्य दिशेने चाललो असल्याची खात्रीही पटते. मला आयुष्यभर गाणंच करायचे आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

सध्याची तरुणाई शास्त्रीय संगीतापेक्षा पाश्चिमात्य संगीताकडे अधिक आकर्षित होते. त्याबद्दल तुला काय वाटते?

हो. हे खरंय. दुसरे संगीतप्रकारही चांगले आहेत, मात्र या सगळ्याचे उगमस्थान शास्त्रीय संगीत आहे. आपल्याला त्याची मोठी परंपरा आहे, हे कोणी विसरू नये. आजच्या पिढीला फ्युजन आणि उडत्या चालीची गाणी आवडतात. त्यांनी त्याचा आस्वाद जरूर घ्यावा. मात्र, त्याचबरोबर शास्त्रीय गायनाकडेही डोळसपणे पाहावे. नृत्य आणि गायनाचे बरेच रिअॅलिटी शो होतात. त्याचप्रमाणे खास शास्त्रीय गायनासाठी अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध केली पाहिजेत.

शास्त्रीय गायक सामान्यतः सिनेसंगीत किंवा पार्श्वगायनास प्राधान्य देत नाहीत. तुला अशी ऑफर आल्यास सिनेमासाठी गायला आवडेल का?

नक्कीच आवडेल. मात्र, गाणीही तशी हवीत. आजकालच्या सिनेमांतील गाण्यांमध्ये गोडवा किंवा मेलडी फार कमी दिसते. एखादं गोड, भावणारे गाणे असेल तर नक्कीच गायला आवडेल मला.

नामवंत संगीत महोत्सवात गायला मिळावे, अशी गायकांची धडपड असते. ती कितपत गरजेची वाटते? आणि त्याचा खरंच भविष्यात फायदा होतो का?

महोत्सवांमध्ये गायला मिळावे, ही इच्छा काही चुकीची नाही. कारण रसिकांची मानसिकताच तशी आहे. रसिक त्या महोत्सवांना महत्त्व देतात. मात्र, मोठ्या स्टेजवर गाणारा प्रत्येक गायक तेवढाच प्रतिभावान असेल, असे नाही. अमुक एका महोत्सवात एखादा गायक गायला म्हणजे तो श्रेष्ठ, असे नसते. तो 'तिथे' गायला यापेक्षा तो तिथे काय गायला, हे श्रोत्यांच्या लक्षात राहाते. त्यामुळे मोठा महोत्सव असो, की छोटी मैफल आपली कामगिरीच श्रोत्यांच्या कायम लक्षात राहाते. युवा कलाकारांनाही मोठ्या महोत्सवांमध्ये संधी दिली पाहिजे, असेही मला वाटते.

तुझे आदर्श कोण?

एका व्यक्तीचे नाव सांगता येणार नाही. माझ्या आदर्शस्थानी बाबा, माझे गुरू मधुसूदन कुलकर्णी आणि पं. अजय पोहनकर, पं. जसराज, बडे गुलाम अली खाँ, आमीर खाँ साहेब असे सगळे गुरुजन आहेत. त्यांच्या गायकीतून त्यांचा विचार घेण्याचा मी प्रयत्न करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किल्लेसंवर्धन रेंगाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील दीडशेहून अधिक किल्ल्यांवरील वास्तूंचे संवर्धन, गडांचे मॅपिंग करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम रेंगाळली आहे. या संदर्भातील अधिकार राज्याच्या वनविभागाकडे सोपविल्यास ही मोहीम राबविणे शक्य होईल, अशी मागणी राज्यातील दुर्गसंवर्धन संस्थांकडून करण्यात आली आहे.

वनविभागाच्या ताब्यात राज्यभरातील १५० हून अधिक गडकिल्ले आहेत. या गडांवरील कामांची परवानगी मिळवण्याची किचकट प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी राज्य वनविभागाला या परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थांतर्फे करण्यात आली आहे.

वनविभागाच्या ताब्यात असणाऱ्या गडांवरील वास्तूंचे संवर्धन, गडांचे मॅपिंग अशी कामे रखडल्याने ही मागणी करण्यात आली आहे. सध्या ही प्रक्रिया 'फॉरेस्ट कॉन्झर्वेशन अॅक्ट' मधील तरतुदींनुसार करावी लागते. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तो फॉर्म दिल्लीला जातो. यासह किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही मिळवावे लागते. अर्ज दिल्लीला पोहोचल्यावर भोपाळ येथून एक समिती येऊन पाहणी करते आणि मगच गडावरील कामाची परवानगी दिली अथवा नाकारली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने राज्याच्या वनविभागाला ही परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

गडावरील कामासाठी फक्त एक महिना आणि परवानगी मिळवण्यासाठी तीन महिने, असा हा प्रकार असल्याने जावडेकर यांच्याशी याबाबत विविध दुर्गसंवर्धन संस्थांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केल्याचे समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी सांगितले.

वनविभागाकडे पाठपुरावा

वनविभागाच्या ताब्यात असणाऱ्या गडांवरील वास्तूंचे संवर्धन, गडांचे मॅपिंग अशी कामे रखडली असून गडावरील कामांसाठी वनविभागाने परवानग्या द्याव्यात, यासाठी वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images