Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 25 of 25)
(showing articles 1 to 25 of 25)


Channel Description:

News from India by India number one website
  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  'क्रेडाई पुणे मेट्रो' या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे येत्या ६ ते ८ डिसेंबर दरम्यान 'मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल' या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील ६३ बांधकाम व्यावसायिकांकडील सुमारे ६०० प्रकल्पांमधील एक हजारहून अधिक घरांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

  क्रेडाईच्या 'मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल'च्या प्रदर्शन समितीचे प्रमुख अरविंद जैन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष मनीष जैन, सचिव आदित्य जावडेकर, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सचिन कुलकर्णी, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डी. के. अभ्यंकर आदी या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनाचे हे १९ वे वर्ष असून कृषी महाविद्यालयाच्या मागील मैदानावर ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळात हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

  'पुणे, पिंपरी-चिंचवड आणि 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (पीएमआरडीए) भागातील घरे या प्रदर्शनात पाहता येतील. २० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतची ही घरे असतील. गृहकर्जासाठीही विशेष दालनांचा प्रदर्शनात समावेश आहे,' असे अरविंद जैन यांनी सांगितले. 'गतवर्षी ११ हजार ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. यंदा १५ हजार ग्राहक भेट देतील, अशी अपेक्षा आहे,' अशी माहिती मनीष जैन यांनी दिली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  देशातील पोलिस महासंचालकांच्या पुण्यात होणाऱ्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस येण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख वाय. के. जेठवा यांनी गुरुवारी सुरक्षेचा आढावा घेतला. सात व आठ डिसेंबर हे दोन दिवस पंतप्रधान पुण्यात मुक्कामी असण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

  पुण्याच्या बाणेर परिसरातील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) या संशोधन संस्थेत सहा ते आठ डिसेंबर दरम्यान ही डीजी परिषद होणार आहे. या परिषदेला मोदी आणि शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अगोदर गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार यांनीदेखील परिषद होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून सुरक्षा यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासोबत पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, पुणे पोलिस आयुक्त उपस्थित होते. परिषद शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तीन दिवसांच्या या परिषदेत देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा यासह अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिषदेत मार्गदर्शन करतील.

  देशपातळीवरील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या परिषदेमध्ये आगामी वर्षभरातील सुरक्षाविषयक धोरणांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे ही परिषद महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्र पोलिस दलाला या परिषदेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अमित शहा हे परिषदेच्या माध्यमातून अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासाची व्यवस्था राजभवनात केली जाण्याची शक्यता आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) अधिकारी आणि त्यांची पथकेदेखील पुण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्याकडूनही कार्यक्रमस्थळासह, पंतप्रधान येण्या-जाण्याचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांसह देश पातळीवर सुरक्षा यंत्राणांना खबरदारीच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  'शिक्षण कशासाठी, शिक्षण आणि मूल्य याचा संबंध काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. समाजात मूल्यांवर संकट आले आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि विवेक यापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत. सामाजिक ऱ्हास सुरू झाला आहे,' अशी खंत माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी बुधवारी व्यक्त केली.

  पारतंत्र्याच्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान देणाऱ्या 'पुणे प्रार्थना समाज' या संस्थेने बुधवारी दीडशेव्या वर्षांत पदार्पण केले. संस्थेच्या १४९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय जैन संघटनेला डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, डॉ. विश्वास सापटणेकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अशोक कामत, संस्थेचे दिलीप जोग, जैन संघटनेचे विलास राठोड व अरुण नहार उपस्थित होते. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या आरंभानिमित्त बुधवार पेठेतील समाजाची वास्तू दिव्यांनी उजळून निघाली.

  'विज्ञान तंत्रज्ञानामुळे विकास सुरू आहे; पण पाणी, जमीन अशा साधनांचा नाश होत आहे. क्षेपणास्त्र आणि अणुऊर्जा विकसित करण्यासाठी जगात चढाओढ सुरू आहे. यामागे कोणती नीतीमत्ता आहे,' असा सवाल करून विद्यासागर यांनी 'शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाचा उपयोग त्याच्या परवानगीने होतोच असे नाही. केवळ शिक्षण व पैशातून सजगता येते का? आपल्या आचरणात शुद्धता आणि प्रामाणिकपणा नाही,' यावर बोट ठेवले. 'पुणे प्रार्थना समाजासारख्या संस्थांमुळे प्रगल्भता टिकली आहे. जात, वर्ण व्यवस्था न मानणे हे प्रार्थना समाजाचे वैशिष्ट्य आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपेक्षा जाधव, ज्ञानेश्वर दरेकर, वैष्णवी राऊत, यशस्वी साळवे, गौरव देवरे, पूजा शिर्के, सुकन्या फरांदे, धनराज निंबाळकर, अक्षय जगताप या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सुषमा जोग यांनी सूत्रसंचालन केले.

  \Bशहर चालवणाऱ्यांना रानडे माहिती आहेत का?\B

  'न्या. रानडेंचे कोणते स्मारक पुण्यात आहे? रानडेंनी काय कार्य केले याची कल्पना तरी आज आहे का? शहर चालवणाऱ्यांना रानडे माहिती आहेत का?' अशा प्रश्नांची सरबत्ती करून डॉ. अशोक कामत यांनी नाराजी व्यक्त केली. प्रार्थना समाजासारख्या संस्थांनी आपल्या पातळीवर रानडेंची स्मृती ठेवली आहे. रानडे सारख्यांचे स्मरण ठेवणे आजच्या राजकारणाला सोयीचे नाही याचे दु:ख आहे. ब्रिटिश काय करतील याची तमा न बाळगता स्वराज्याची ज्यांनी पायाभरणी केली अशा व्यक्तींचे स्वराज्यात स्मरण नाही. नवीन पिढीला अशा व्यक्तींचे काम माहीत नाही. किमान अशा वास्तू प्रेरणा स्थान म्हणून राखल्या गेल्या पाहिजे. समाजाला इतिहास जतन करण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षा महापुरुषांच्या नावाने हौदोस घालण्याची आणि त्यांच्या नावाने पैसे गोळा करण्याची सवय लागली आहे,' अशी टीका त्यांनी केली.

  - 'पुणे प्रार्थना समाज' संस्थेच्या १४९ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. विश्वास सापटणेकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने गौरविण्यात आले. डावीकडून दिलीप जोग, डॉ. जगन्नाथ दीक्षित, पंडित विद्यासागर आणि डॉ. अशोक कामत. \B(कल्पेश नुक्ते)\B

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला बोगस तिकीट तपासणीस (टीसी) आणि तिकीट विक्रेत्या एजंटचे ग्रहण लागले आहे. अधिकृत असल्याचे भासवून संबंधित व्यक्ती प्रवाशांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून, त्यांच्यासह रेल्वेचेही नुकसान होत आहे.

  रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) गेल्या काही महिन्यांत बोगस 'टीसी'वर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २९ ऑगस्ट रोजी पुण्याहून जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये एक बोगस 'टीसी' पकडण्यात आला होता. तर, पुणे-इंदूर एक्स्प्रेसमध्ये सहा सप्टेंबरला एका बोगस 'टीसी'ला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा बुधवारी पुणे-दौंड पॅसेंजरमध्ये एक बोगस 'टीटी' सापडला. त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, 'आरपीएफ'ने जानेवारी २०१८पासून आतापर्यंत ८६ बोगस एजंटवर कारवाई केली आहे. बोगस एजंटची संख्या अधिक असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांचे मत आहे.

  \Bदौंड पॅसेंजरमध्ये 'टीटी' पकडला\B

  पुणे ते दौंड पॅसेंजरमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासून पैशाची मागणी करणाऱ्या बोगस 'टीसी'ला 'आरपीएफ'च्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. त्याच्यावर पुणे 'आरपीएफ' ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साजन जयेश छावरिया असे अटक केलेल्याचे नाव आहे. छावरिया हा आपण रेल्वेचा 'टीसी' असल्याचे सांगत प्रवाशांची तिकिटे तपासून, तिकीट नसलेल्यांकडे पैशांची मागणी करत होता. पॅसेंजरमध्ये एक संशयास्पद व्यक्ती प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याची माहिती 'आरपीएफ'च्या सुरक्षा आयुक्त कार्यालयातील बापू कायगुडे यांना मिळाली. त्यानुसार 'आरपीएफ'चे लोणी येथील उपनिरीक्षक चंद्रशेखर रोकडे, हवालदार एस. एस. शेलार यांनी बोगस 'टीसी'ला ताब्यात घेतले.

  \Bरेल्वेतील व्यक्तींची मदत?\B

  बोगस 'टीसी'कडे रेल्वेच्या अधिकृत पावत्यांप्रमाणे पावत्या असल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे. रेल्वेच्या अधिकृत 'टीसीं'ना देण्यात आलेल्या ओळखपत्रांची हुबेहूब कॉपी असलेली ओळखपत्रे या बोगस 'टीसीं'कडून जप्त करण्यात आली आहेत; तसेच, रेल्वेच्या नावाचे दोन शिक्केही मिळाले आहेत. त्यामुळे या बोगस 'टीसीं'ना रेल्वेतीलच कोणा व्यक्तीची मदत मिळत आहे का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  दापोडी येथे झालेल्या कामगारांबाबतच्या दुर्घटनेविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.

  दापोडी येथे खड्ड्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानासह दोघांचा मृत्यू झाला. दुर्घटना झालेल्या ठिकाणी खड्डा कशासाठी खोदण्यात आला होता, खड्डा खोदण्यास महापालिकेने परवानगी दिली होती की नाही; तसेच मृतांच्या कुटुंबीयांना कोणत्या स्वरूपाची मदत देण्यात येणार आहे, आदी माहिती मागविण्यात आली आहे. त्याआधारे राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबीयांना गरज भासल्यास अतिरिक्त मदत देण्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

  ही दुर्घटना घडल्यानंतर तहसीलदारांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते. तहसीलदारांनी प्राथमिक अहवाल दिला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि त्या ठिकाणी करायच्या उपाययोजना, याबाबत तहसीलदार आणि तलाठ्यांकडे माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  'पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या ५१६ कोटी ९५ लाख रुपये निधीपैकी सुमारे ४४९ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रक्‍कम ताबडतोब शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत,' असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

  पुणे विभागातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईचा आढावा डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. बैठकीनंतर डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

  डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'विभागातील शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ३८९ कोटी ३५ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. घरांच्या नुकसानीसाठी २२० कोटी ३६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ऑक्‍टोबर महिन्यात अवेळी पावसामुळे नुकसान झाल्याने भरपाईसाठी ५२५ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. आतापर्यंत ४४९ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.'

  ............

  वाहतुकीच्या प्रश्नावर बैठक

  'वाहतुकीच्या प्रश्नावर १३ डिसेंबर रोजी बैठक घेण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महापालिका, मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) या विभागांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे,' असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  कात्रज येथील लेकटाउन सोसायटीजवळच्या वाहून गेलेल्या 'कल्व्हर्ट'च्या उभारणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये जुंपली आहे. 'कल्व्हर्ट'च्या जागेवर एका नगरसेवकाच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीची कथित मालकी असल्याची टीका दुसऱ्या नगरसेवकाने केल्याने संबंधित नगरसेवक चिडला आहे. 'कल्व्हर्ट'च्या कामास आपला विरोध नाही. मात्र, राजकारणापोटी बदनामी करण्यात येत असल्याने नेमकी मालकी कोणाची, याची माहिती संबंधितांना करून दिल्याचा दावा दुसऱ्या नगरसेवकाने केला आहे. दरम्यान, शहर अभियंता यांनी यामध्ये लक्ष घालत 'कल्व्हर्ट'च्या जागेपोटी संबंधितांना मोबादला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले; तर रस्ता असो की 'कल्व्हर्ट' याला कधीच विरोध केला नसल्याचे या नगरसेवकांकडून जाहीर करण्यात आले.

  आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये लेकटाउन सोसायटीजवळील 'कल्व्हर्ट' वाहून गेला होता. या 'कल्व्हर्ट'चे काम रखडल्याने तसेच स्थानिक जागामालकांकडून आडकाठी येत असल्याने या कामासाठी महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. 'कल्व्हर्ट' बांधण्यात येत असलेल्या जागेचे मालक ही एका नगरसेवकाच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहे. या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यासमवेत बुधवारी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कार्यालयात वस्तुस्थितीची माहिती दिली. स्थानिक राजकारणामुळे तसेच आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे या 'कल्व्हर्ट'चे काम रखडले होते. 'कल्व्हर्ट'ला कधीही विरोध केला नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मात्र, या ठिकाणी ही जागा आमची नसल्याचे काही जणांकडून सांगण्यात येत असून आम्ही कथित मालक असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. या बदनामीला कंटाळून संबंधितांना ही जागा कोणीची याची जाणीव करून देण्यात आल्याचा खुलासा या वेळी त्यांनी केला.

  दरम्यान, दोन नगरसेवकांच्या राजकीय इर्ष्येपोटी 'कल्व्हर्ट'चे काम गेले काही दिवस थांबल्याचा प्रकार नागरिकांनी अनुभवला आहे. कल्व्हर्ट वाहून गेल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्वारगेटहून राजस सोसायटीकडे जाणारी 'पीएमपी' बस याच मार्गावरून धावते; तसेच राजस सोसायटी परिसरातील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनही या मार्गाचा वापर करतात. मात्र, कल्व्हर्टच वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सुखसागर नगरमधील अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची रहदारी वाढली आहे.

  ...............

  \Bनागरिकांना नोटिसा

  \Bआंबिल ओढ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. आंबिल ओढ्यालगतची अनेक बांधकामे गुंठेवारीतील असून ते नियमित असतानाही त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याची तक्रार माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटिशीमध्ये संबंधित बांधकामे २४ तासांच्या आत काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन या प्रकरणी निर्णय घेण्यात येईल, असे धनकवडे यांनी सांगितले.

  ...........

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  महापालिका हद्दातील नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण पाहता भविष्यात नियमितपणे या नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रमुख नाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यासाठी महापालिका ड्रोन विकत घेणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने 'मलनिस्सारण विभागाला' तशी लेखी सूचनाही केली आहे.

  आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे नाल्यांमधील अतिक्रमणांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात आंबिल ओढ्यात २० ठिकाणांपेक्षा अधिक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख नाल्यांचे सातत्याने सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे मत शहर सुधारणा समितीमध्ये व्यक्त करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने त्यानुसार ड्रोनद्वारे हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  महापालिका प्रशासनाकडून त्यासाठी ड्रोन विकत घेतले जाणार असून त्याद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण रोखणे; तसेच योग्य वेळी या ठिकाणी होणारे अतिक्रमण ओळखून त्यावर कारवाई करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी आवश्‍यक असे ड्रोन हे 'मलनिस्सारण विभागाने' खरेदी करावेत, असे पत्र बांधकाम विभागाने दिले आहे. बाजारात असलेल्या ड्रोनच्या किमती पाहता ते खरेदी करणे हेच योग्य ठरणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या ड्रोनचा वापर महापालिकेच्या इतर सर्वेक्षणासाठी करणेही शक्य होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

  ..............

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यातील हवामान ढगाळ बनले आहे. ढगाळ हवामानामुळे शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारीही हवामान ढगाळ राहून अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  पुण्यात मंगळवारी आणि बुधवारीही ढगाळ हवामान होते. त्यामुळे पहाटेची वेळ वगळता अन्य काळात थंडी गायब झाल्याचेच चित्र होते. बुधवारी पुण्यात २७.८ अंश सेल्सिअस कमाल आणि १९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा सात अंशांनी अधिक होते. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता. गुरुवारी किमान तापमानात किंचित वाढ होईल. त्यानंतर मात्र, ढगाळ हवामान दूर होऊन तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे.

  अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुरुवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते किनारपट्टीपासून दूर सरकून पुन्हा त्याची तीव्रता कमी होईल. असेच दुसरे अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राच्या नैऋत्येकडील भागातही तयार झाले आहे. परिणामी, बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान ढगाळ झाले आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरसह काही ठिकाणी हलका पाऊस झाला. दरम्यान, ही दोन्ही चक्रीवादळे एखाद दिवसच टिकणारी असल्याने त्यामुळे निर्माण झालेले ढगाळ हवामानदेखील लगेचच दूर होईल. त्यानंतर राज्यातील थंडीचे प्रमाणही पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

  - ढगाळ हवामानामुळे शहरातील तापमानात वाढ झाली असून, बुधवारी दुपारी आभाळात ढग दाटले होते. ओंकारेश्वर मंदिराजवळील चित्र.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा-आसखेड योजनेतून पाणी घेण्यासाठी जलसंपदा विभागाने मागितलेला सुमारे १८१ कोटी रुपयांचा 'सिंचन पुनर्स्थापना' खर्च राज्य सरकारने माफ करताना, बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति हेक्टरी १५ लाख रुपये निधी देण्याचे आदेश दोन्ही महापालिकांना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला होता. या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत पश्चात मान्यता देण्यात आली. त्यामुळे या योजनेसाठी पाणी करार करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

  या योजनेमुळे भामा-आसखेड धरणातून सुमारे २.६४ टीएमसी पाणी शहराच्या पूर्व भागासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका व जलसंपदा विभागात करार आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने जलसंदा विभागाकडे पत्र पाठविले होते. मात्र, जलसंपदा विभागाने धरणाच्या पाण्याचा मोबदला म्हणून, १८१ कोटी रुपये 'सिंचन पुनर्स्थापना' खर्च देण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पीएमआरडीए'च्या हा खर्च माफ करून, महापालिकेने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निधी देण्याचे आदेश दिले. या बैठकीचे इतिवृत्त येईपर्यंत पालिकेने या योजनेच्या कामाला गती मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाला पुनर्वसनासाठीच २५ कोटी रुपये निधी दिला होता. त्याला स्थायीची मान्यता अपेक्षित होती. या योजनेचा करार करण्यासाठी स्थायीच्या मान्यतेचा ठराव असणे अपेक्षित होते. त्यानुसार 'स्थायी'च्या बैठकीत ही मान्यता घेण्यात आली आहे; तसेच यापुढेही जिल्हा प्रशासनाला निधी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावाला मुख्यसभेची तातडीने मान्यता करून पाणी करार केला जाणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  संपूर्ण देशात हेल्मेटसक्ती लागू झालेली असतानाच आता गुजरातमधील शहरांमध्ये (महापालिका हद्दीत) हेल्मेटचा वापर ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. हेल्मेटसक्ती आणि दंडवसूलीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महामार्ग आणि खेड्यांमधील रस्त्यांवर हेल्मेट वापरणे सक्तीचेच राहील. वाहतूक नियमभंगापोटी असलेल्या दंडाची रक्कम कमी करण्यापाठोपाठ आता शहरांतील हेल्मेटसक्ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात हेल्मेटसक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेसह अन्य पक्षांचे सत्तेवर आलेले सरकार आता महाराष्ट्रात याबाबत काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  केंद्र सरकारने यापूर्वी वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर जबर रकमेचे दंड लागू केले होते. मात्र, गुजरात राज्य सरकारने हे दंड कमी केले. त्यापाठोपाठ आता तेथील शहरांच्या हद्दीतील हेल्मेटसक्ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'शहरांमध्ये हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्याच्या विरोधात अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यामुळे महापालिकांच्या हद्दीत हेल्मेटचा वापर ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,' अशी माहिती गुजरातचे वाहतूक मंत्री आर. सी. फालदू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. मात्र, 'शहरांच्या हद्दीबाहेर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग; तसेच गावांमधील रस्त्यांवर हेल्मेटसक्ती कायम राहील,' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 'शहरांच्या हद्दीत दुचाकीस्वार मोठ्या अंतराचा प्रवास करीत नाहीत,' असेही आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

  \Bनागरिकांमध्ये संतापाची लाट

  \Bगुजरातमधील विविध शहरांमध्ये हेल्मेटसक्ती लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दंडाची वसूली सुरू झाली. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अगदी भाजी खरेदीला गेल्यावर हेल्मेट कसे सांभाळावे, यांसारखे विविध प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले. मात्र, जबर दंड आकारणी सुरू झाल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांच्या या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  \B'महाराष्ट्र सरकारनेही दिलासा द्यावा'\B

  महाराष्ट्रातही पुण्यासारख्या शहरांमध्ये हेल्मेटसक्तीची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस वाहने अडवून दंडाची वसूली करताना दिसून येत होते. संतप्त नागरिक, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनांनंतर अखेर रस्त्यावर अडवून कारवाई न करता फक्त 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करावी, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, 'सीसीटीव्ही'द्वारेही नागरिकांकडून मोठ्या रकमांचे दंड वसूल करण्यात येत आहेत. आता गुजरात सरकारने शहरांमधील हेल्मेटसक्ती शिथिल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वर्षातील १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा कोटा संपल्याने परवानगी कशी द्यायची, असा पेच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना पडला होता. ध्वनिवर्धकास परवानगी मिळाल्याने १४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सवाई रंगेल.

  आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६७ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ११ ते १५ डिसेंबर या दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलावर होणार आहे. या महोत्सवासाठी दर वर्षी एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात येते. त्यानुसार यंदाही मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली. सर्वोच्च न्यायालयाच्या १५ दिवसांच्या निर्णयानुसार, राज्य सरकारतर्फे १३ दिवस निश्चित करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवस ठरविण्याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार, यंदाच्या गणेशोत्सवासाठी चारऐवजी सहा रात्री १२ वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील दोन्ही दिवस वापरले गेले. महोत्सव बंदिस्त मंडपात घेतल्यास परवानगीची गरज भासणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. मात्र, एक दिवस बाकी राहिल्याचे लक्षात आल्यानंतर, 'सवाई'ची परंपरा पाहता जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी स्पष्ट केले.

  'एक रात्र १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकासाठीची परवानगी मिळाली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे पत्र मिळाले आहे,' असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

  पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरच एजंट आपली वाहने उभी करून व्यवसाय करतात. त्यामुळे या रस्त्यावर गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने हा रस्ता दोन्ही बाजूने शंभर मीटरपर्यंत नो पार्किंग झोन करावा करण्याची विनंती वाहतूक पोलिसांना केली आहे. आरटीओच्या विनंतीला वाहतूक पोलिसही सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याने लवकरच या रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

  'आरटीओला एजंटांचा विखळा' या विषयावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी करून व्यावसाय करणाऱ्या एजंटांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांची होणारी फसवणूक याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त छापले होते. त्याची दखल घेऊन आरटीओ कार्यालयाने प्रवेशद्वाराजवळ वाहने उभी करून व्यवसाय करणाऱ्या एजंटांवर आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरटीओने कार्यालयासमोरील रस्ता दोन्ही बाजूने शंभर मीटरपर्यंत 'नो पार्किंग झोन' करावा, अशी विनंती वाहतूक शाखेचे उपायुक्तांना पत्र पाठवून केली आहे. वाहतूक विभागाकडून या विनंतीवर सकारात्मक विचार करण्यात आला असून, लवकरच या रस्त्यावर 'नो पार्किंग झोन' करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'वसतिगृह पाच'मध्ये मंगळवारी सायंकाळी दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक जण विद्यापीठात शिकत असून, इतर तिघे माजी विद्यार्थी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मद्यपी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.

  या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी दोघांनी काही दिवसांपूर्वीच दारू पिऊन धिंगाणा घातला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना तंबी दिली होती. मात्र, पुन्हा मंगळवारी झालेल्या प्रकारात या दोघांचा सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर विद्यापीठाने ठोस पावले उचलली. विद्यापीठाच्या 'वसतिगृह पाच'मध्ये एका विद्यार्थ्याच्या खोलीत काही विद्यार्थी दारू पिऊन धुडगूस घालत असल्याची माहिती सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा विभागाचे काही कर्मचारी वसतिगृहात पाहणीसाठी गेले. त्या वेळी एका खोलीत चार जण दारू पिताना आढळले. सुरक्षारक्षकांनी या चौघांनाही हटकल्यावर जोरदार गोंधळ सुरू झाला. त्यातच चौघांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आले. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी आणि चौकशी केली. त्यानंतर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये दारू पिऊन गोंधळ घालणे, युवकांवर शस्त्राद्वारे हल्ला असे गंभीर प्रकार घडले. त्यामुळे विद्यापीठात कायदा-सुव्यवस्थेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

  .....

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  माणिकबाग परिसरील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीचा खून झाल्याचे शवविच्छेदनानंतर समोर आले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिच्या ओळखीतील तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

  सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात सोमवारी दुपारी तेजसा श्यामराव पायाळ (वय २९) हिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत असताना बाहेरून कुलूप लावून आरोपी पळून गेले होते. त्यामुळे ओळखीतील कोणी यात सहभागी आहे का, या दृष्टीने तपास केला जात होता. त्यानुसार तरुणीसोबत असणाऱ्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. यानंतर ती त्यांच्या संपर्कात होती; तसेच घटनेच्या दिवशीही मृत्यू झालेल्या तरुणीच्या घरात पार्टी केल्याचे आढळून आले. मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री पोलिसांना तेथे सापडली होती. या प्रकरणी पोलिस आणखी काही गोष्टींवर तपास करत आहेत. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे सिंहगड रोड पोलिसांकडून सांगण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

  अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करताना खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या दुर्घटने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर भोसरीत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (४ डिसेंबर) पोलिसांनी महापालिकेत जाऊन चौकशी केली.

  महापालिका श्रावण हर्डीकर यांनी दापोडीतील दुर्घटनेनंतर शहर अभियंता आणि सहशहर अभियंता या दोघांची समिती चौकशीसाठी नेमली आहे. त्याचा अहवाल आयुक्तांमार्फत पोलिसांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांना अटक केली जाणार आहे. परंतु, महापालिकेच्या चौकशी अहवालाची वाट न पाहता पोलिसांनी महापालिकेत जाऊन समांतर तपास सुरू केला आहे. याद्वारे महापालिका प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात नाही ना, याची चाचपणी करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाचे तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी बुधवारी महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असून, कामाचा ठेका देण्यापासून ते प्रत्यक्षात काम सुरू होण्यापर्यंत कोणाचा यात संबंध आहे, याची माहिती पोलिसांनी घेतली. मूळ ठेकेदार किंवा सहठेकेदारांवर यापूर्वी कारवाई केली होती. त्यातील कोणाला काळ्या यादीत टाकले होते का, तशी मागणी करण्यात आली होती आणि त्यावर कार्यवाही झालेली नाही असे काही आहे का, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

  अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव व पाइप लाईन टाकरण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराचा मजूर नागराज जमादार या दोघांचा खड्यातील मातीत गाडले गेल्याने मृत्यू झाला होता. रविवारी (१ डिसेंबर) दापोडी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात नागराज याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मूळ ठेकेदार, दोन सहठेकेदार, सुपरवायझर आणि महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी अशांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने दादरला जाण्यासाठी जादा रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्र. ०१३१९) ही गाडी पाच डिसेंबरला सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी कलबुर्गी येथून सुटेल. ती सहा डिसेंबरला सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. त्या गाडीचा परतीचा प्रवास सहा डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. ती सात डिसेंबरला दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी कलबुर्गीला पोहोचेल. या गाडीला सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि दादर हे थांबे देण्यात आले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'कामगारांमधील सुसंवाद, स्नेहभाव, सामंजस्य आणि कामावरील निष्ठा यामुळे उद्योगसमूहाच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो,' असे प्रतिपादन क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. रजनी इंदुलकर यांनी भोसरी येथे केले. क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने भोसरी येथे सातव्या 'क्वॉलिटी मंथ सेलिब्रेशननिमित्त क्वॉलिटी इंप्रूव्हमेंट सक्सेस स्टोरी प्रेझेंटेशन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. इंदुलकर बोलत होत्या. स्पर्धेमध्ये विविध उद्योग समूहांतील २६ संघांमधून ८० स्पर्धकांनी भाग घेतला. गुणवत्ता सुधारणेसंदर्भात प्रबंध सादरीकरण, भित्तीपत्रक, घोषवाक्य, प्रश्नमंजूषा या स्पर्धांचा त्यामध्ये समावेश होता. अभिजित टेक्नो, के. एस. पी. जी. ऑटोमेटिव्ह, मिंडा कार्पोरेशन, मिंडा रेंडर, प्री-कॉल लिमिटेड, सॅँडविक एशिया, स्पायसर इंडिया, टाटा मोटर्स (ईआरसी), टाटा ऑटोकॅम्प या कंपन्यांतील विजेत्यांना मिंडा रेंडर उद्योगसमूहाचे विभागप्रमुख भूपेश मॉल यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अध्यक्षस्थानी वरिष्ठ अधिकारी सज्जीकुमार होते. डॉ. इंदुलकर म्हणाल्या, 'कोणत्याही उद्योगसमूहाचे प्रवर्तक त्यातील व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काम करणारे घटक सामूहिकपणे उत्पादित वस्तूंची गुणवत्ता आणि टिकाऊपणा यावर लक्ष केंद्रित करतात. परंतु, विविध विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा एकमेकांमध्ये संवाद आणि समन्वय नसल्यास कामावर विपरित परिणाम होतो. कर्तव्यात कसूर होण्याचा धोका संभवतो. या बाबी प्रत्येकाने कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. नियोजित ध्येयपूर्तीसाठी व्यवस्थापन व कामगार यांच्याकडून एकमेकांच्या भावना दुखावणार नाहीत, असे वर्तन असायला हवे. एखाद्याकडून चूक झाल्यास त्याचा सर्वांसमोर पानउतारा करू नये. योग्य मार्गदर्शन करावे. प्रत्येकाने करीत असलेल्या कामावर प्रेम केल्यास उद्योगसमूहाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कामगारांचे किंवा व्यवस्थापनाचे शोषण होणार नाही, यासाठी दक्ष राहायला हवे.' मॉल म्हणाले, 'कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धीबरोबरच प्रसंगी कौशल्यात भर पडावी यासाठी स्वतःला झोकून देणे आवश्यक आहे. कामात झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. स्वतःबरोबरच उद्योग समूहाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे.' स्पर्धेचे परीक्षक म्हणून जान्हवी यादव, पवनकुमार रौंदळ, अनंत क्षीरसागर यांनी काम केले. विजया रुमाले यांनी सूत्रसंचालन केले. ललिता परदेशी, चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे यांनी संयोजन केले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  राज्यातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत असताना आता डॉक्टरांसह रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्याची तसेच तोडफोडीची नोंद करण्यासाठी 'रजिस्ट्री' तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेने पुढाकार घेतला असून त्या करिता राज्यातील सर्व शाखांसह रुग्णालये; तसेच डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या शहरात, कोणत्या डॉक्टरांवर कशा प्रकारचे हल्ले झाले आहेत, याची नोंद ठेवली जाणार आहे.

  राज्य 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या वेळी 'आय़एमए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष आणि राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, सहसचिव डॉ. राजू वरियानी उपस्थित होते. 'डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे समाजातील डॉक्टरांची प्रतिमा मलीन होत आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी 'आयएमए'च्या राज्य शाखेने प्रयत्न सुरू केले आहेत. समाजात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये बाजू मांडण्याची भूमिका स्वीकारली आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ले कशा प्रकारचे आहेत, त्याची नोंद यापुढे प्रत्येक शहरात ठेवली जाणार आहे. त्याकरिता 'रजिस्ट्री' सुरू करण्यात आली आहे. डॉक्टरांना होणारी शिवीगाळ, मारहाण, गंभीर मारहाण, रुग्णालयाची तोडफोड, नासधूस यांची नोंद त्यात होणार आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारची माहिती संकलित होईल. याबाबत पोलिसांकडे देखील त्याची प्रत्येक वेळी नोंद होत नाही. घटनांमुळे हल्ल्याचे प्रमाण किती याची नोंद समोर येईल. हिंसाचार कोणत्या प्रकार होत आहे, त्यानुसार डॉक्टरांनी कोणती काळजी घ्यावी याची उपाययोजना करता येऊ शकेल,' अशी माहिती अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

  'सरकारच्या धोरणांविरोधी आंदोलने करण्यापेक्षा सरकारशी सल्लामसलत करून सरकारसोबत काम करण्याचा निर्णय राज्य 'आयएमए'ने घेतला आहे. नव्या प्रस्तावित कायद्यांबाबत राज्य आयएमए आता पाठपुरावा करील; तसेच त्यावर मत नोंदवेल. राज्य, जिल्हास्तरीय तसेच स्थानिक पातळीवर विविध समित्यांमध्ये 'आयएमए'च्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वैद्यकीय शिक्षण महाग होत असताना ते स्वस्त, परवडणारे कसे करता येईल यासाठी 'आयएमए' सरकारला मदत करील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

  'हल्लेखोरांच्या रुग्णांवर उपचारास नकार'

  'महाराष्ट्रात लोणंदसह दोन ते तीन ठिकाणी डॉक्टरांकडून खंडणी उकळण्याचे तसेच संघटनेच्या नावाखाली बिल कमी करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी यापुढे काळजी घ्यावी. डॉक्टरांवर समाजातील काही घटकांकडून हल्ले होत असतील; तर त्याबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. याबाबत हल्लेखोरांच्या नातेवाइक रुग्णांना उपचार आम्ही नाकारू शकतो. कायद्याने तसेच नैतिकदृष्ट्या ते शक्य होईल. यावर आता लक्ष देण्यात येणार आहे,' याकडे डॉ. भोंडवे यांनी लक्ष वेधले.

  'आरोपांना सडेतोड उत्तर देऊ'

  डॉक्टर कट प्रॅक्टिस करतात, जास्त बिल लावतात असे किंवा इतरही स्वरूपाचे आरोप समाजातील विविध घटक डॉक्टरांवर करतात. त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचादेखील सहभाग असतो. यापूर्वी डॉक्टर आरोप सहन करीत होते. आता मात्र, आम्ही आरोप सहन करणार नाही. जे आरोप चुकीचे, बिनबुडाचे आहेत, त्यांना सडेतोड उत्तरे देण्यात येतील. डॉक्टर चुकल्यास त्याबाबतदेखील गांभीर्याने कारवाईचा विचार केला जाईल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  पुण्यासह मुंबईत कांद्याचे किरकोळ बाजारातील दर गगनाला भिडले असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. किचनमधून कांदा हद्दपार होण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीचे गांभिर्य सरकारने ओळखून कांदा साठेबाजीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा साठविण्याचा घाऊक व्यापाऱ्यांना ५० टक्क्यांवरून २५ टक्के, तर किरकोळ व्यापाऱ्यांना ५ टक्के मर्यादा ठेवली आहे. यामुळे कांद्याची जाणीवपूर्वक साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला आळा बसणार आहे. कांद्याची बाजारात उपलब्धता वाढल्यास दर कमी होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

  अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. पीक वाया गेले. जे पीक हातात आले त्या कांद्याचा दर्जा ढासळला; तसेच ओला कांदा बाजारात आल्याने त्याची प्रत कमी झाली. कांदा खराब असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली. त्यात जुन्या कांद्याची आवक कमी होत गेली. गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या दराने किलोसाठी पन्नास रुपयांचा टप्पा ओलांडला. नव्या कांद्यासह जुन्या कांद्याची आवक घटल्याने रविवारी, सोमवारी कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडली. जुन्या कांद्याचे दर दीडशे रुपयांपर्यंत, तर नवा कांदा १२० रुपयांपर्यंत किरकोळ बाजारात पोहोचला. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय़ घेतला. इजिप्तपाठोपाठ तुर्कस्थानमधून कांद्याची आयात सुरू झाली आहे. दुबईमार्गे मुंबईमधून तुर्कस्थानचा कांदा पुण्यात आला. मात्र, त्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली. यामुळे कांद्याबाबत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

  कांद्याचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नवी उपायोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जास्त साठा ठेवता येणार नाही. घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असलेली कांदा साठवण्याची मर्यादा ५० टक्क्यांनी घटवून अनुक्रमे २५ आणि पाच टक्के करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक विषय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता सर्व राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन, तर किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपेक्षा जास्त कांद्याचा स्टॉक ठेवता येणार नाही. केंद्राचा हा आदेश तत्काळ लागू होणार आहे. कांद्याची आयात करणाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त येत्या ८ डिसेंबरला 'सरनाईक संगीत महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष असून, यंदा प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. आनंद भाटे आणि युवा कलाकार गंधार राम देशपांडे यांचे गायन होणार आहे. या वेळी गंधार देशपांडे यांना 'पं. निवृत्तीबुवा सरनाईक युवा पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे.

  कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता महोत्सव होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, प्रवेशिका आवश्यक आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'कल्चर क्लब' हा या कार्यक्रमाचा कल्चरल पार्टनर आहे. राजेंद्र सरनाईक, पं. विनोद डिग्रजकर, लता गोडसे यांची समिती आणि पं. निवृत्तीबुवा सरनाईक प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पं. निवृत्तीबुवांचे नाव भारतीय शास्त्रीय संगीतातील कार्य आणि त्यांची जुनी रेकॉर्डिंग्ज आणि बंदिशींची माहिती पुढील पिढीला व्हावी, या उद्देशाने मंदार वैद्य यांनी www.nivruttibuasarnaik.com ही वेबसाइट प्रसिद्ध केली आहे. युवा कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे पं. निवृत्तीबुवा सरनाईक युवा पुरस्कारही देण्यात येतो.

  यंदा हा पुरस्कार पं. राम देशपांडे यांचे चिरंजीव गंधार देशपांडे यांना जाहीर झाला आहे. कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर गंधार आणि भाटे यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्याची साथ भरत कामत आणि संवादिनीची साथ सुयोग कुंडलकर करणार आहेत. केशव परांजपे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

  प्रवेशिका 'मटा'च्या कार्यालयात

  सरनाईक संगीत महोत्सवाच्या मर्यादित प्रवेशिका खास 'मटा कल्चर क्लब'च्या सभासदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सभासदांना एका कार्डवर दोन प्रवेशिका देण्यात येणार आहेत. या प्रवेशिका नामदार गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात सोमवारी (२ डिसेंबर) दुपारी १२ ते ५ या वेळेत उपलब्ध होतील. नवीन सभासदांनाही या संधीचा लाभ घेता येईल.

  लोगो आवश्यक

  फोटो पी कोलनला सेव्ह केले आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
  जिम मध्ये व्यायाम करताना एका तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे तेथे साहित्य योग्य प्रकारे न ठेवल्याचे कारण देत व्यायाम करणाऱ्या एका युवकासह गोल्ड जिमचा मालक व दोन ट्रेनर वर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथे हा प्रकार घडला आहे.

  तेजश्री भास्कर मोरे (वय २६, रा. पिंपरी) या तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तर गोल्ड जिमचे मालक सनी गरेवाल, तेथे व्यायाम करणारा मुकेश सुखानी, ट्रेनर मुकेश कथुरडे, ट्रेनर रिटा अडगळे आदींवर निष्काळजीपणा करून तेजश्रीला जखमी करण्यास कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत माहिती दिली. मोरे पिंपळे सौदागर येथील गोल्ड जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी जात होती. ९ नोव्हेंबरला मोरे या जिम मध्ये व्यायाम करताना तेथे साहित्य (वजने व अन्य मशीन) नीट ठेवले नव्हते. त्यामुळे मोरे हिच्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे वरील लोकांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म.टा. वृत्तसेवा,इंदापूर
  इंदापूर तालुक्यातील सणसर जवळील जाचकवस्ती (ता. इंदापूर) येथील रमजान लालसाहेब शेख ३५ वर्षीय युवकाचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला असल्याचा अंदाज वालचंदनगर पोलिसांनी वर्तविला आहे.

  रमजान शेख हा जाचकवस्ती येथील रहिवासी असून तो मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. जाचकवस्ती येथील रमेश जामदार यांच्या बारामती इंदापूर रस्त्यालगत असलेल्या उमेश इंजिनियरिंग या वर्कशॉपच्या पत्रा शेडमध्ये शेख हा बुधवारी रात्री झोपलेला होता. गुरुवार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. रमेश जामदार यांचे वर्कशॉपच्या मागील बाजूस घर असून गुरुवारी सकाळी सहा वाजता ते व्यायामासाठी बाहेर आल्यानंतर शेख झोपलेल्या ठिकाणी पायरीवर रक्त सांडले असल्याचे दिसून आले.

  पायरीला रक्त का लागले आहे हे पाहण्यासाठी जामदार पुढे आल्यानंतर शेख झोपलेल्या ठिकाणी रक्ताचा थर दिसून आला. यावरून जामदार यांनी त्यांच्या नातेवाईकाला संपर्क साधला व त्या ठिकाणी नातेवाईक जमा झाले. जामदार यांच्या वर्कशॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यार आले असून संबंधित खुनी हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे. सदर घटनेची माहिती समजाताच बारामतीचे पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर,वालचंदनगर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी यांनी घटनास्थळी भेट देवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून खून झालेल्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. तर मृत रमजानचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.


  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  पुणे: भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने कोणताही अन्याय केलेला नाही. त्यांना पक्षाने वेळोवेळी अनेक संधी दिल्या. त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे ते भाजपवर टीका करत आहेत, अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी खडसेंवर केली. तसेच मी भाजपचा खासदार नाही, भाजपचा सहयोगी खासदार आहे. त्यामुळे भाजपला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या कारस्थानामुळेच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे. भाजपमध्ये बहुजन समाजातील नेत्यांना डावलले जात आहे, असा आरोप खडसे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी हे विधान केलं. खडसेंना भाजपने खूप संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांची नाराजी काही कारणांसाठी असू शकेल. परंतु, ते आपल्या मुलीच्या पराभवामुळे बोलत असतील. आपल्या मुलीला निवडून आणता आले नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी काही विधाने केली असतील, असं संजय काकडे म्हणाले.

  भाजपला धक्का! १२ आमदार पक्ष सोडणार?

  मुंबई: ४०० नाराज शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

  आमदार आघाडीसोबत जाणार नाही

  भाजपमधील १२ आमदार काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचं वृत्तही त्यांनी फेटाळून लावलं. सध्याच्या घडीला भाजपचे १२ आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत जातील असं वाटत नाही. या आघाडीकडे १७० आमदारांचं भक्कम बळ आहे. त्यामुळे विनाकारण १२ आमदारांना ही आघाडी निमंत्रण देणार नाही. त्यामुळे आमदार फुटणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचंही ते म्हणाले. राज्यसभेतील एक खासदारही आघाडीसोबत जाणार आहे, हा खासदार तुम्ही तर नव्हे? असा प्रश्न काकडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट करत आपल्याबाबतचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं. बातमीनुसार भाजपचा राज्यसभेचा खासदार फुटणार आहे. मी तर भाजपचा सहयोगी खासदार आहे. त्यामुळे माझ्यावर संशय व्यक्त करणं चुकीचं आहे. मी भाजपसोबत असून भाजपसोबत कायम राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  आमदार फुटीच्या चर्चेवर भाजप संतापला; शेलार म्हणाल...

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे पुणे बाजार समितीत कांदा साठा कोणी केल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई करू, असा इशारा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिला. कांदा साठेबाज पुण्यात आढळण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

  पुण्यासह महाराष्ट्रात कांद्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्या कांद्याच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कांद्याच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांना कांदा विक्रीची मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत. घाऊक विक्रेत्यांना ५० टक्के तर किरकोळ विक्रेत्यांना ५ टक्के कांदा साठवणुकीची मर्यादा ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा साठवणुकीवर मर्यादा आल्याने आता कांद्याचे दर नियंत्रणात येतील. तसेच कांदा साठेबाजीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

  अहमदनगर बाजार समितीत कांदा १५० रुपये

  या संदर्भात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याशी संपर्क साधला. 'कांद्याच्या साठेबाजीबाबतचा केंद्र सरकारचा आदेश अद्याप प्राप्त झाला नाही. हा आदेश आल्यानंतर त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करू. मात्र, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची साठेबाजी होत नाही. मात्र, चुकून कोणी साठेबाजी करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,' असा इशारा देशमुख यांनी दिला. पुणे बाजार समितीत कांदा साठवणुकीला जागाच नाही. कांदा साठवणार कोठे असा सवाल उपस्थित करून साठेबाजी करणाऱ्यांचा शोध घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  उन्हाळ कांदा १३ हजारांच्या टप्प्यांत

  गावठी अंड्यांचे भाव कडाडले

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट