Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचरा टाकणाऱ्या चार गावांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या हद्दीत रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्या गावांना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. आंबेगाव, नांदेड, नऱ्हे, धायरी या चार ग्रामपंचायतींना नोटीस बजाविण्यात आली आहे.
पालिका हद्दीलगत असलेल्या गावांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांच्याकडेच लावावी, पालिकेच्या हद्दीत टाकू नये, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेक गावे सतत पालिका हद्दीत कचरा टाकत असल्याचे वारंवार समोर आले आहे. हद्दीलगतच्या गावांमधील नागरिक सर्रास कचरा टाकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका हद्दीत गोळा होणाऱ्या ओल्या आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिकेच्या वतीने त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. ग्रामपंचायत हद्दीमध्ये तयार होणारा कचरा दररोज उचलणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. यामध्ये सातत्य नसल्यामुळे त्याचा सर्व ताण सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयावर येत आहे. या गावांचा सुमारे ६० ते ७० टन कचरा पालिकेच्या हद्दीत टाकला जातो.
गावांनी त्यांचा कचरा पालिकेच्या हद्दीत टाकू नये, यासाठी ग्रामस्थांची बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या होत्या. कचरा टाकणाऱ्या चार गावांना क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त रवी पवार यांनी नोटीस बजाविली आहे. जे नागरिक पालिका हद्दीत कचरा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणेबाबत तसेच फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमिनीसाठी अपहरण करून जबर मारहाण

$
0
0

खंडणी विरोधी पथकाकडून दोघांची सुटका; दोघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांचे अपहरण करून त्यांना दत्तवाडी भागात डांबून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांची सुखरूप सुटका केली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
श्रीनाथ सुनील विटेकर (वय २९, रा. केळेवाडी, पौड रोड), प्रसाद विठ्ठल ढेणे (वय २९, रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. अपहरण झालेले दोघेही जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. श्रीनाथ विटेकर आणि ढेणे पैसे व्याजाने देणे आणि जमीन खेरदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने काही दिवसांपुर्वीच मुठा भागात एक एकर तीन गुंठे जमीन खरेदी केली होती. दोघेही एकच व्यवसाय करत असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. तक्रारदाराने दोन महिन्यापूर्वी आरोपींकडून साठ हजार रुपये उसने घेतले होते. नंतर ते परतही केले. दरम्यान, आरोपींना या दोघांकडे मुठा भागात एक एकर जमीन असल्याचे समजले. ती जमीन बळकाविण्यासाठी त्यांनी दोघांच्या अपहरणाचा कट रचला.
शनिवार पेठेतून १५ मे रोजी आरोपींनी दुचाकीवरून अपहरण केले. त्यांना दत्तवाडी भागातील एका इमारतीमध्ये डांबून ठेवून जबर मारहाण करण्यात आली. तक्रारदाराची पत्नी त्यांना सातत्याने फोन करीत होती. त्यावेळी तक्रारदार बाहेरगावी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, तक्रारदाराच्या पत्नीला संशय आल्याने त्यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी आणि तक्रारदाराच्या फोनचे ठिकाण तपासले. त्यानंतर पोलिसांना अपहरण झाल्याची खात्री पटली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार यांच्या पथकाने इमारतीमधून दोघांची सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर खून; टास्क फोर्स नेमा! : अंनिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ४५ महिने उलटले, तरी अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. या प्रकरणातील प्रमुख संशयित सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर सीबीआयकडून चार्जशीट दाखल होऊनही अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने त्वरित स्पेशल टास्क फोर्स नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवारी करण्यात आली.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येला ४५ महिने झाले तरी सीबीआयला सारंग अकोलकर व विनय पवार यांना पकडता आलेले नाही, या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘अंनिस’चे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पोलिस यंत्रणा आणि सीबीआयवर ताशेरे ओढले. सारंग अकोलकर व विनय पवार यांच्यावर चार्जशीट दाखल करूनही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तरीही त्यांना अद्याप पकडता आलेले नाही, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे एक स्पेशल टास्क फोर्स नेमावा, त्यांच्याकडे केवळ अकोलकर व पवार यांना पकडण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली.

हिंदू जनजागृती समितीचे रूद्र पाटील, प्रवीण लिमकर यांच्यासह सारंग अकोलकर व विनय पवार ही मंडळी गेल्या ९ वर्षांपासून फरारी आहेत. त्यांना जेरबंद करण्यात पोलिस प्रशासन आणि सीबीआय दिरंगाई करत असल्याचा आरोपही दाभोलकर यांनी या वेळी केला. ‘अंनिस’चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे आदी या वेळी उपस्थित होते.

आशिष खेतान यांनाही धमकी

ज्याप्रमाणे कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांना धमकीची पत्रे येत होती. तशाच प्रकारचे एक पत्र पत्रकार व आम आदमी पक्षाचे नेते आणि पत्रकार आशिष खेतान यांनाही दोन दिवसांपूर्वी आले असल्याची माहिती डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किशोरने केले दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या किशोर धनकुडे याने जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टवर (८८४८ मीटर) शनिवारी सकाळी तिरंगा फडकविला. ४२ वर्षीय किशोरने २०१४मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केला होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण बाजूने एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला गिर्यारोहक ठरला आहे.

किशोर १० एप्रिलला बेस कँपला पोहोचला होता. यानंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेत त्याने १५ मे रोजी एव्हरेस्ट समिटच्या दिशेने कूच केली. १९ मे रोजीच किशोरचे समीट झाले असते. पण खराब वातावरणामुळे त्याने कँप-४लाच राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर १९ मे रोजी सायंकाळी किशोरसह त्याच्या टीमने आगेकूच केली. यानंतर शनिवारी सकाळी त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला. किशोर हा नेपाळमधील सातोरी अॅडव्हेंचर कंपनी सोबत या मोहिमेसाठी गेला होता. त्यांच्या प्रमुखाने ही माहिती दिली. त्याच्यासोबत मिंगमा तेन्झी शेर्पाही होता. किशोरसह ऑस्ट्रेलियाचा सॅम्युएल सीलेय, मुंबईचा ब्रीज शर्मा, इटलीचे अँजेलो, डेव्हिड हे गिर्यारोहकही होते.

किशोर कँप-४ला परतला असून, तो येथेच मुक्काम करील. रविवारी तो कँप-२ ला पोहोचणार आणि सोमवारी (२२ मे) बेस कँपला पोहोचणार आहे. एव्हरेस्टच्या प्रवासात त्याला अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. खराब वातावरणामुळे क्षणाक्षणाला तेथील परिस्थिती बदलत होती. मात्र, किशोरने धैर्याने साऱ्या परिस्थितीचा सामना केला आणि मोहीम यशस्वी करून दाखवली.

किशोरने २०१४मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केल्यानंतर २०१५मध्ये तो नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेला होता. मात्र, त्या वर्षी नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर त्या वर्षीची मोहीम रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी किशोर महाराष्ट्रातील काही गिर्यारोहकांना बेस कँपलाही घेऊन गेला होता, तर गेल्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉनही (९० किलोमीटर) पूर्ण केली होती. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेला किशोर गेल्या सात वर्षांपासून विविध मोहिमांमध्ये सहभागी होत आहे. या आधी त्याने सतोपंथ, कामेत या मोहिम यशस्वी केल्या आहेत. महाराष्ट्राचे इतरही गिर्यारोहक एव्हरेस्ट समीटसाठी रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिप्लोमाचे प्रवेश लवकरच

$
0
0

‘कॅप’प्रमाणेच फ्रिज, फ्लोट, स्लाइड पर्याय उपलब्ध; सविस्तर वेळापत्रक लवकरच
म. टा. प्रतिनिधी, पु‍णे
राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला लवकरच सुरुवात होणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांद्वारे (कॅप) होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इंजिनीअरिंगच्या कॅप फेऱ्यांप्रमाणेच फ्रिज, फ्लोट, स्लाइड पर्याय उपलब्ध राहणार आहे. या अभ्यासक्रमांमध्ये दहावीनंतर इंजिनीअरिंग डिप्लोमा, बारावीनंतर डिप्लोमा द्वितीय वर्ष, बारावीनंतर डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र असे अभ्यासक्रम आहेत. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर ऑनलाइन वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इयत्ता अकरावीला प्रवेश न घेणारे हजारो विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेतून इच्छुक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. दर वर्षी या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ही बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅपच्या फेऱ्या आणि त्यामध्ये फ्रिज, फ्लोट, स्लाइड असे पर्याय उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना आता आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची होणारी पायपीट थांबणार आहे.
या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधील सुविधा केंद्रातून माहिती पुस्तिका घ्यावी लागणार आहे. माहिती पुस्तिकेची किंमत खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपये, तर इतर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये राहणार आहे. माहिती पुस्तिकेच्या प्रवेश किटमध्ये असणाऱ्या अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखल्याच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.तसेच, या अर्जाच दहावी आणि बारावीचे गुण भरावे लागणार आहे. या सर्वांच्या आधारे सामान्य गुणवत्ता यादी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत काही सुधारणा करण्यासाठी कालावधी देण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या गुणवत्ता यादीनुसार कॅपच्या फेऱ्या होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पसंतीक्रम अर्जात भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज जाहीर झाल्यानंतर फ्रिज, फ्लोट, स्लाइड अशा पर्यायांचा अभ्यास करून प्रवेशाबाबत योग्य निर्णय घ्यायचा आहे. प्रवेश घ्यायचा झाल्यास सुविधा केंद्रात जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येईल. प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
.............
असे आहेत पर्याय
................
फ्रिज : विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या कॉलेजमध्येच त्याला प्रवेश घ्यायचा असून त्याला अधिक चांगल्या कॉलेजची अपेक्षा नाही. हा पर्याय निवडल्यानंतर पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी पात्र होणार नाही.
............
स्लाइड : विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या कॉलेजमध्येच त्याला प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, त्याच कॉलेजमध्ये इतर शाखा मिळण्यासाठी विद्यार्थी इच्छुक राहणार आहे. हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅपच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.
............
फ्लोट : या पर्यायात विद्यार्थ्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तसेच, त्या कॉलेजपेक्षा अधिक चांगले कॉलेज मिळाल्यास तेथे देखील तो प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. विद्यार्थ्यांना कॅपच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.
.........
- प्रवेशासाठी कॅपमध्ये एकूण तीन फेऱ्या होतील.
- फ्रिज, फ्लोट, स्लाइड पर्याय आहेत.
- ऑनलाइन अर्जात १ ते ३०० पर्याय भरता येणार आहे.
- अधिक माहितीसाठी www.dtemaharashtra.gov.in वेबसाइट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडापाव की बाकरवडी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘वडापाव की बाकरवडी,’ ‘दगडूशेठ की सिद्धीविनायक,’ ‘बेस्ट की पीएमपी,’ ‘राणीची बाग विरुद्ध सारसबाग’ आणि ‘पर्वती विरुद्ध मलबार हिल’....‘सांगा कोण जिंकणार’...अशा आशयाच्या संदेशांनी रविवारी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला.
आयपीएलच्या या अंतिम लढाईसाठी मुंबई विरुद्ध पुण्याच्या नेटिझन्समध्ये चांगलेच युद्ध पेटले होते. व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुकवर सातत्याने कल्पक पोस्ट पडत होत्या. पुणे आणि मुंबई या शहरांची वैशिष्ट्ये अचूक पकडत त्या आधारे या पोस्ट टाकण्यात येत होत्या. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर लाइक्स व रिट्विट मिळत होत्या.
‘मुंबई हे धावणाऱ्यांचं तर पुणे हे चावणाऱ्याचं शहर आहे,’ ‘एक ते चार दुपारी झोपणारे विरुद्ध एक ते चार रात्री झोपणारे,’ असे म्हणून एकमेकांना चिमटे काढले गेले, तर ‘दगडूशेठ की सिद्धीविनायक कोण पावणार,’ असा प्रश्न विचारणाऱ्यांवर टीकाही केली जात होती. मुंबईच्या संघाची मालकी कोणाकडे आहे, हे लक्षात घेऊन, ‘पुण्यानं आज जिंकू नाही दिलं, तर आख्ख्या जिल्ह्याचं जिओ बंद,’ असा गमतीशीर मेसेजही व्हायरल झाला होता.
‘मुंबईवाल्यांना म्हणावं काय ते मैदानात बघू...पुणेकरांना वेळ नाही भांडत बसायला,’ असे टोमणेही मारले जात होते. ‘भाऊ मॅच जोरदार व्हायला पाहिजे. मुंबई जिंको किंवा पुणे शेवटी विजय तर महाराष्ट्राचाच होणार आहे. मग कशाला भांडायचं,’ असाही मेसेज काही उत्साही कार्यकर्ते फिरवत होते.
...तर ट्रॉफी लोणावळ्याला!
पुणे आणि मुंबईपैकी कोणीही जिंकले तरी काय करायचे, याचे नियोजन तयार होतेच; परंतु मॅच टाय झाली तर? त्यावरही एक भन्नाट विनोद व्हायरल झाला. ‘आता ही अफवा कोणी पसरवली की मुंबई आणि पुण्याची मॅच टाय झाली, तर आयपीएलची ट्रॉफी लोणावळ्याला देण्यात येणार,’ या अफवेमुळेही अनेकांची करमणूक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट पुण्याला निसर्ग संपदेचे कोंदण

$
0
0

पुणे : दख्खनचे पठार आणि सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेल्या पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक वारशाबरोबरच निसर्ग संपन्नतेचे कोंदण लाभले आहे. भौगोलिक विविधतेमुळे मिळालेले वनक्षेत्र, डोंगराळ भाग, गवताळ प्रदेश, नद्या, पाणथळ जमिनी, तलाव अशा अधिवासातील विविधतेमुळे पुणे हे एक ‘युनिक’ शहर मानले जाते. घाटमाथ्यावरील कोरडे हवामान आणि सह्याद्रीतील दमट वातावरण आणि डोंगररांगा ही पुण्याला मिळालेली देणगी आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करताना शहराचे हे नैसर्गिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

देशातील भौगोलिकदृष्ट्या समृद्ध शहरांमध्ये पुण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. शहरात वेगवेगेवळे अधिवास असल्याने वन्यजीवनही समृद्ध आहे. देशात साधारणतः १३०० पक्षी सापडतात. त्यातील ५५ टक्के म्हणजेच साडेसहाशेहून अधिक पक्षी पुणे आणि परिसरात वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असे बारा, तसेच धोक्यात आलेले पक्षीदेखील पुणे परिसरात आढळून येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज, लॉ कॉलेज, भांडारकर संशोधन संस्था, बीएमसीसी, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थांबरोबर एम्प्रेस गार्डन, गांधी भवन अशा ऐतिहासिक संस्था या पुण्यातील जैविविविधतेचे ‘हॉटस्पॉट’ आहेत.

वृक्ष वैविध्याच्या बाबतीत पुण्याचे कौतुक केले पाहिजे. शहर आणि परिसरात पाचशेहून अधिक प्रकारची झाडे आढळून येतात. यात दोनशे प्रजाती या विदेशी आहेत. वावळ हा पुण्याचा ग्रामवृक्ष आहे. महाराष्ट्राच्या राज्यपुष्पाचा मान मिळालेला ताम्हण वृक्ष, दुर्मिळ काळा शिरीष, चिंचा, देवसावर, हिंगण बेट यांसह परदेशी जातीचीही अनेक वैविध्यपूर्ण झाडे पुण्यात वर्षानुवर्षे तग धरून आहेत. महापालिकेने केलेल्या वृक्षणनेनुसार पुण्यात ३७ लाखांहून अधिक झाडे आहेत. शहरात सर्वांत जास्त झाडे औंधमध्ये, तर दुसऱ्या क्रमांकावर सहकारनगरचे नाव येते. कोथरूड, घोले रोड परिसरातील वृक्षाच्छादन उत्तम आहे, असे अभ्यासक सांगतात. विशेष म्हणजे या वृक्षाच्छादनाशिवाय पुण्याला चोहोबाजूला टेकड्यांचे कवच लाभलेले आहे. तब्बल अडीच हजार हेक्टर परिसरात वनक्षेत्र आहे. सिंहगडातील डोंगररांगांमुळे पुणे शहर पश्चिम घाटाला जोडले गेले आहे. त्यामुळे पुणे शहराला देशातील चौथ्या क्रमांकाचे हरित शहर म्हणून गौरविण्यात आले आहे.

नैसर्गिक परिसंस्था, अधिवासांमधील वैविध्यामुळे सर्व प्रकरचे वन्यप्राणी, पक्षी, कीटक, सरीसृप प्राणी आपल्याकडे वास्तव्यास आहेत. शहरात १०४ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली असून, शहराच्या बाहेरील बाजूस १७० प्रकारची फुलपाखरे सापडतात. रानवा संस्थेच्या अहवालानुसार शहरातील २५ किलोमीटर परिसरात ५२ प्रकारचे सरीसृप प्राणी आढळतात, त्यातील दोन तृतीयांश संख्या सापांची आहे. याशिवाय ६४ प्रकारचे सस्तन प्राणी वास्तव्यास आहेत. पूर्वी मध्यवर्ती भागातील टेकड्यांवर रानडुक्कर, चितळ, रानमांजर, भेकर पूर्वी दिसत होते. मात्र, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांनी जंगलाकडे पाठ फिरवली आहे. भेकर, ससे, मोर, रानकोंबड्या अजून दिसतात.

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करताना निसर्ग समृद्ध पुण्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. शहरातील वाढते रस्त्यांचे जाळे, क्राँक्रिटचे जंगल, प्रदूषण, नैसर्गिक संपत्तीच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. यापुढील काळातही पुण्याचे वातावरण निरोगी ठेवायचे असेल, तर पर्यावरणाचा समतोल साधण्याशिवाय पर्याय नाही.

...

चौकट

जैववैविध्याला बसलेला फटका

- सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडमुळे झाडांची वाढ खुंटते

- हवेतील प्रदूषकांचे कण वनस्पतींच्या पानावर चिकटून बसतात आणि प्रकाश संश्लेषणास अडथळा होतो

- वातावरणातील नत्र संयुगे वनस्पतींची कार्बन डायऑक्साइड शोषणाची प्रक्रिया कमी करतात

- पाण्यातील गाळाचे प्रमाण वाढल्यामुळे बीओडीचे प्रमाण वाढून ऑक्सिजन प्रमाण घटत आहे

- पाण्यावर तरंगणाऱ्या कणांमुळे पाण्यात येणारा प्रकाश कमी होतो आणि शेवाळ वाढते

- वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील बहुतांश पाणथळ जागा प्रदूषित

- जलपर्णीसारख्या वनस्पतींमुळे जलसृष्टी संपुष्टात आली आहे

- अनैसर्गिक विकासकामांमुळे पाषाण तलावाचे सौंदर्य हरवले आहे

- पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड

- प्रदूषकांवर जगणारे पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ

- अधिवास नष्ट झाल्याने चिमण्यांसह अनेक पक्षी शहरातून गायब झाले आहेत

- सार्वजनिक अस्वच्छतेवर जगणाऱ्या भटक्या प्राण्यांच्या संख्येत वाढ

- वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली

- बेसुमार जलउपसा आणि पावसाचे पाणी जमिनीत शिरण्यासाठी मोकळ्या जागाच नसल्याने भूजलपातळीत घट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांमध्ये बांबू वापर वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सुमारे वीस वर्षांपूर्वी चीनने बांबूचा वापर करण्यास सुरुवात केली. आज जगात सर्वाधिक बांबूचा वापर चीन करतो. त्यामुळेच आज चीनमध्ये बांबूवर प्रक्रिया करणाऱ्या मध्यम आकाराच्या सुमारे तीन हजार कंपन्या कार्यरत आहेत. त्या तुलनेत भारत बांबूच्या वापरात मागे आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये बांबूचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे,’ असे मत प्राज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद चौधरी यांनी रविवारी व्यक्त केले.
मेळघाट सपोर्ट ग्रुप, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज (सीओईपी) सेवावर्धिनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्रासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चौधरी बोलत होते. उद्योजक संजय इमानदार, संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील आणि निरुपमा देशपांडे, सीओईपीचे उपप्राचार्य डॉ. बी. एन. चौधरी, नियामक मंडळाचे सदस्य राजेंद्र हिरेमठ उपस्थित होते. या वेळी बांबूवर संशोधन करण्यासाठी संपूर्ण बांबू केंद्र आणि सीओईपीमध्ये करार करण्यात आला; तसेच अॅटलस कॉपको कंपनीद्वारे बांबूपासून तयार होणाऱ्या शंभर स्वच्छतागृहांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांची मेळघाटात स्थापना होणार आहे.
चौधरी म्हणाले, ‘बांबू हे उत्तम प्रकारचे बायोमास आहे. त्यामुळे त्याचा वापर जैवइंधन तयार करण्यास होऊ शकतो. त्याचप्रमाणे बांबू वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतो. या कारणांमुळे बांबू हे एक चांगले उत्पादन आहे. त्याचा वापर उद्योगांमध्ये वाढावला पाहिजे. चीनने बांबूचा योग्य वापर करून आर्थिक विकासाला बळकट करण्याचे काम केले. चीनच्या तुलनेत भारतात विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये बांबू वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे. जैवइंधन तयार करण्यात बांबूचा बायोमास म्हणून उत्तम वापर होऊ शकतो.’
इमानदार म्हणाले, ‘देशपांडे दाम्पत्याने केलेले काम प्रेरणादायी आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा आणि मनुष्यबळ लागते. मात्र, या सर्वांवर मात करून देशपांडे दाम्पत्याने आदिवासी बांधवांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली आणि लोकांना रोजगार मिळवून दिला. ही फार मोठी गोष्टी आहे.’ संपूर्ण बांबू केंद्रासाठी काम करणाऱ्या सर्जू बांधिया, दया वाजगे, चंदा कनोजिया, कलाताई ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय कावरे, सहदेव शनवारे, सतीश मावसकर उपस्थित होते. ग्रुपच्या राघवेंद्र देशपांडे यांनी केंद्राची माहिती दिली. मिलिंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. मनिषा पाठक यांनी सूत्रसंचालन केले. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.
सौरउर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची भेट
समारंभात सीओईपीतर्फे सौरऊर्जेवर चालणारे सुमारे १२५ दिवे मेळघाटातील आदिवासी लोकांना देण्याची घोषणा करण्यात आली. हे दिवे कॉलेजातील सोलारिस क्लबमधील द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. दरम्यान, बांबूपासून तयार केलेल्या विविध घरोपयोगी आणि आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथे भरविण्यात आले होते. प्रदर्शनाला मोठ्या संख्येने पुणेकरांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैववि‌विधतेची नोंदवही ठरतेय मार्गदर्शक

$
0
0

Tweet: @ChaitanyaMT

पुणे : शहरातील विविध भागांत आढळणाऱ्या जैववि‌विधतेची माहिती गोळा करण्यासाठी जैवविविधता व्यवस्थापन समितीने गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबविले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पक्षी दिन, वनस्पती दिन याबरोबरच तण होळी, जैवविविधता महोत्सव असे कार्यक्रम राबविण्यात आले. याबरोबरच शहरातील ‘जैववि‌विधतेची नोंदवही’ तयार करण्याचे कामही या समितीने केले आहे. या प्रकल्पामुळे शहरात कोणत्या महत्त्वाच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, वेली आहेत, याची सविस्तर माहितीही कागदावर आली आहे.

प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करावी, अशी सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने ही समिती स्थापन केली होती. गेल्या तीन वर्षांपासून ही समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. जैवविविधता कायदा २००२ आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता २००८ नुसार महापालिकेने ही समिती स्थापन केली आहे. यामध्ये पालिकेत नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या सात सभासदांचा समावेश आहे. या समितीचे २१ सभासद आहेत. सात व्यतिरिक्त उर्वरित सर्व सभासद जैवविविधता क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ आहेत. यामध्ये वनस्पती, शेतकरी, सामाजिक कार्य, तसेच वनविभागातील अधिकारी यांचा समावेश आहे. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समि‌तीचे काम चालते.

शहरातील जैवविविधतेची नोंदवही (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) तयार करणे हा मुख्य उद्देश या समितीचा असल्याने यावर मोठ्या प्रमाणात काम केले जात असल्याचे महापालिकेचे पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी सांगितले. शेतकी जैवविविधता, मनुष्यवापरातील जैवविविधता, वन्य जैवविविधता; तसेच नागरी जैवविविधता या सर्वांचा अभ्यास करून शहराच्या विविध भागांना भेट देत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून समितीने ही नोंदवही तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहर पश्चिम घाटाच्या जवळ असल्याने शहर आणि परिसरात चांगल्या प्रकारची जैवविविधता असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक औषधी वनस्पती, फुलपाखरांच्या विविध जाती, प्राणी, पक्षी, याबरोबरच अनेक दुर्मिळ वृक्षांचा समावेश आहे. समितीने केलेल्या अभ्यासात गेल्या काही वर्षांमध्ये शहरात पारव्यांची संख्या अचानक वाढल्याचे समोर आले आहे. चिमण्यांची संख्याही कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

पारव्यांना खाण्यासाठी काही मंडळी खाद्य म्हणून धान्य देत असल्याने ठराविक जातीच्या पारव्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उपनगरांमध्ये; तसेच मध्यवर्ती पेठांमध्ये उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या इमारतींच्या रचनांमुळे शहरातून चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीचा समावेश या नोंदवहीत करण्यात आला आहे. समितीने नोंदविलेल्या माहितीची तज्ज्ञांकडून शहानिशा करून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शहराच्या आजूबाजूला सापडणाऱ्या जैवविविधतेची माहिती देणारे फोटोबुक देखील समितीने तयार केले आहे.

.............

नैसर्गिक अधिवास सुरक्षित हवा

वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडत आहे. परिणामी नैसर्गिक साधनांवर जगणारे जीव, लहान कीटक, वनस्पती यांचा अधिवास हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे जैवविविधता टिकविण्यासाठी नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे ही काळाजी गरज असल्याचा निष्कर्ष समितीने केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीका करणाऱ्यांना फाशी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सैनिकांना आम्ही सांगितले होते का सीमेवर जीव द्यायला, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना जोड्याने मारले पाहिजे. जो तो सैनिक, सरकार यांच्यावर टीका करतोय. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर टीका करणारे अनेक कन्हैया देशात निर्माण होत असून या सर्वांना फाशी दिली पाहिजे,' असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.
‘जात-धर्म हे घाणेरडे विचार विसरून सैनिक देशाचे रक्षण करतात. कोणी अंगावर गोळी झेलतो, तर कोणाचे अंग बर्फामुळे सडते. टीका करणाऱ्यांनी सैनिकांबरोबर एक तास राहून दाखवावे आणि नंतर गाढवासारखे बोलावे,' अशा शब्दांत गोखले यांनी मंत्र्यांना फटकारले. बलराज साहनी-साहीर लुधियानवी फाउंडेशनतर्फे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गोखले यांना ‘बलराज साहनी स्मृती पुरस्कार;’ तसेच लेखिका इंदुमती जोंधळे यांना ‘कैफी आझमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सैनिकांवर टीका करणाऱ्या मंडळींवर; तसेच तोंडी तलाकवरून गप्प असलेल्या खान मंडळींवर गोखले यांनी या वेळी हल्ला चढवला.
‘स्वत:ला मोठे समजणारे कलाकार सैनिकांवरून हुज्जत घालतात. सैनिकांबद्दल ऐवढी सहानुभूती कशाला, असा प्रश्न काही जण विचारतात. अशा सर्वांचा मला तिरस्कार वाटतो. अफूची गोळी असलेला धर्म आणि घाणेरडी गोष्ट असलेली जात विसरून सैनिक देशाचे रक्षण करतात. आपण सर्व शेतकरी व सैनिक यांच्यामुळे सुखी आहोत; पण देशात इतकी वर्षे लोकशाहीच्या नावाखाली मर्कटचेष्टा सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका गोखले यांनी केली.
‘समोरच्याचे ऐकूनच घ्यायचे नाही, अशी प्रवृत्ती वाढत आहे. आपण प्रतिगामी ठरू की काय अशी भीती बाळगणारे बहिरा कान पुढे करतात. राष्ट्रवाद ही बुरसटलेली विचारसरणी मानली तरी काही कारणामुळे ती आवश्यक असते,’ यावर मोरे यांनी बोट ठेवले. प्रास्ताविक सुरेश टिळेकर यांनी केले. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिवानी हरिश्चंद्रे यांनी संयोजन केले.
‘खान मंडळी गप्प का?’
‘तोंडी तलाक पद्धतीचा मुस्लिम महिलांना किती त्रास होत असेल; पण या मुद्द्यावर सर्व खान स्टार मंडळी; तसेच कैफी आझमींची कन्या शबाना हे गप्प का आहेत? त्रास सहन करणाऱ्या तुमच्या बहिणीच आहेत ना, मग धर्मातून काढून टाकले जाऊ, ही भीती तुम्हाला वाटते का,’ असा सवाल करत विक्रम गोखले यांनी परफेक्शनिस्ट, दबंग व किंग खान या कलाकारांना लक्ष केले. ‘कलाकारांच्या कामावर लोक प्रेम करतात; पण ते गाढवासारखे वागले, तर जाब का विचारत नाहीत? जनतेच्या विरोधात कोणी वागत असेल, तर त्याला जोड्याने का मारत नाही,’ अशी प्रेक्षकांची खरडपट्टीही गोखले यांनी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्डातील बांधकाम थांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आडत्यांकडून वर्गणी काढून जनावरांच्या बाजारातील मोकळ्या जागेवर उभारण्यात येणारे शेडचे बांधकाम समितीकडूनच थांबविण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत आडते असोसिएशनची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत ‘अनधिकृत शेड’ प्रचाराचा मुद्दा ठरू नये यासाठी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळातील काही संचालकांच्या आग्रहास्तव हे बांधकाम थांबविल्याची चर्चा मार्केट यार्डात सुरू आहे.
मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात आवक जास्त होत असल्याने अतिरिक्त आवकेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे कारण पुढे करून जनावरांच्या बाजारात मोकळ्या जागेत बाजार समितीतर्फे शेड उभारणीचे काम सुरू केले होते. तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारले जात असल्याचे बाजार समितीकडून सांगितले जात असले, तरी फाउंडेशन पक्क्या स्वरूपात आहे. याबाबत पणन संचालक किंवा पुणे महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. प्रशासकीय मंडळातील काही संचालकांच्या आग्रहास्तव हे बांधकाम सुरू असल्याची चर्चा बाजारात रंगली होती.
याबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘कांदा-बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने अतिरिक्त जागेचा पर्याय म्हणून जनावरांच्या बाजारात तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारले जात होते. मात्र, या कामास काही आडत्यांचा आक्षेप असल्यामुळे सध्या हे बांधकाम थांबविण्यात आले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील ‘हॉटस्पॉट’

$
0
0



पुण्यातील परिसर टेकड्यांनी आणि निसर्गसंपदेच्या वैविध्याने संपन्न आहे. जगातील सर्वांत विकसनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे शहराची वर्णी लागते. निसर्गसंपदेच्या वैविध्याने नटलेल्या या शहरातील काही जागा जैवविविधतेच्या हॉटस्पॉट आहेत. त्यांच्याबद्दल आजही लोकांमध्ये कुतूहल आहे. अभ्यासकांसाठी या जागा अभ्यास आणि संशोधनाच्या विषय आहेत.

वंदना घोडेकर


Tweet :

......................

फर्ग्युसन कॉलेज (फोटो ‘ब्लू मॉरमॉन’)

भारतातील प्रसिद्ध कॅम्पस असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पक्ष्यांच्या तब्बल १३७ जाती, ९० प्रकारचे कोळी, चार प्रकारचे वटवाघूळ, फुलपाखरांचे ९२ प्रकार, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २८ जाती, ५३४ प्रकारची झाडे आहेत. हिवाळ्यात स्थलांतर करणारे अनेक पक्षी या ठिकाणी आढळतात. राज्याचे फुलपाखरू असलेले ‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरू या कॅम्पसमध्ये दिसते. येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये अनेक प्रकारच्या देशी आणि परदेशी झाडांचे जतन करण्यात आले आहे.

.....

एम्प्रेस गार्डन (फोटो एम्प्रेस गार्डन)

पुण्यातील उद्यानांमध्ये सर्वाधिक आकर्षण असलेले एम्प्रेस गार्डन म्हणजे वनस्पती अभ्यासकांसाठी चालतीबोलती प्रयोगशाळाच आहे. या उद्यानात विविध प्रकारची दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात. एम्प्रेस गार्डनला राणी व्हिक्टोरिया यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले. राणीला इम्प्रेस ऑफ इंडियाचा किताब देण्यात आला, तेव्हा हे नाव देण्यात आले. हे उद्यान ब्रिटिश काळात सैनिकांचे आवडते उद्यान होते. हे सोल्जर्स गार्डन म्हणून ओळखले जात असे. बॉटल ब्रश, कॅसिया फिस्टुला, कॅननगा ओडोरटा, ब्राऊनिया अरिझा, डेलोनिक्स रेगिया, कॅसिया लॅन कॅसट्री अशा प्रकारची विविध झाडे, गार्डनिया जॅसमिनीओडीस, विन्सा रोझिया या प्रकारची फुले या ठिकाणी पाहायला मिळतात. काही झाडे २५० वर्षे जुनी, तर काचंन वेलाचे वय १५० वर्षे आहे.

.....................

पुणे विद्यापीठ (फोटो विद्यापीठ गार्डन)

पुणे विद्यापीठ हे जैववैविध्याने नटलेले आहे. जवळपास १६० हून अधिक हेक्टरमध्ये विद्यापीठाचा परिसर आहे. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ परिसरात आजही विविध प्रकारचे स्थानिक वृक्ष, परदेशी वृक्ष आढळतात. बनियान ट्री, रेड सिल्क कॉटन, रेन ट्री, गुलमोहर, नीम, कॉरक ट्री, कॉपर पॉड ही झाडे बहरल्यावर परिसराचा चेहेरामोहराच बदलतो. झाडांप्रमाणेच आवारात पक्षीवैविध्यही विपूल आहे. खारी, मुंगूस, विविध प्रकारचे कीटक, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी या ठिकाणी आढळतात.

...

पुण्यातील जैवविविधता

असलेली काही ठिकाणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

फर्ग्युसन कॉलेज,

लॉ कॉलेज,

भांडारकर संशोधन संस्था,

बीएमएसी, बॉटेनिकल सर्व्हे ऑफ इंडिया

एम्प्रेस गार्डन,

गांधीभवन

पुणे विद्यापीठ

एम्प्रेस गार्डन

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी

फर्ग्युसन कॉलेज

टाटा मोटर्स लेक हाऊस, पिंपरी

पाषाण तलाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत संशोधनात मागेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारताकडे सामरीक सामर्थ्य प्रचंड आहे; परंतु त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता नाही. संशोधन आणि नवनिर्मितीच्या आधारे साधलेले तंत्रज्ञान ही उद्याच्या भारताची खरी शक्ती असेल. मात्र, आजही आपण संशोधनात कमी पडत आहोत,’ अशी खंत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व लेखक संदीप वासलेकर यांनी रविवारी व्यक्त केली.
भारतीय विचार साधना प्रकाशन आणि विश्व संवाद केंद्र यांनी अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या विचार भारती साहित्य संमेलनात संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून वासलेकर बोलत होते. या वेळी आचार्य गोविंददेव गिरी, स्वागताध्यक्ष प्रदीप रावत, डॉ. मुकुंद दातार आदी उपस्थित होते.
‘संशोधन क्षेत्रात आपण कमी पडत आहोत. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगल्या दर्जाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बळावर आपण उद्याचा सामर्थ्यशाली भारत घडवू शकतो. तक्षशिला विद्यापीठ असताना आपल्याकडे जे संशोधन झाले तशा प्रकारचे संशोधन आज होण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे वासलेकर यांनी सांगितले.
त्यांनी दहशतवाद आणि इस्लामिक स्टेटच्या भवितव्याविषयीही आपले विचार मांडले. ‘दहशतवादी आता पाण्याच्या स्त्रोतांना लक्ष्य करू शकतात, अशी शक्यता मी वारंवार वर्तवली आहे. नागरिकांचे पाणी तोडण्यासाठी दहशतवादी धरणांवर कब्जा करू शकतात. त्यासाठी देशामध्ये धरणाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गोविंददेव गिरी म्हणाले, ‘साहित्य म्हणजे काय हे नेमकेपणाने समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जे मोठ्या प्रमाणावर खपते ते साहित्य असते का, असा प्रश्नही पडला आहे. साहित्याची गर्दी झाली असून त्याचा दर्जा हरवत चालला आहे.’ ललित साहित्यावर बोलताना गिरी यांनी आचार्य अत्रेंचा दाखला दिला. ‘जे लाजवते, खाजवते आणि माजवते, ते हे साहित्य असते, असे आचार्य अत्रे म्हणायचे. जर अशाप्रकारच्या साहित्याची गर्दी आजूबाजूला होणार असेल तर विचार करायची गरज आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवविविधता समितीचे पिंपरीत काम शून्य

$
0
0

पिंपरी : राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये जैवविविधतेवर विपरित परिणाम होत असून, पर्यावरणप्रेमी चिंतेत आहेत. महापालिका स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन होऊन तीन वर्षे उलटली, तरी कार्यवाही शून्य दिसून येत आहे. या अनुषंगाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

पर्यावरणाची समृद्धी टिकविण्यासाठी जीवसृष्टीतील पक्षी, प्राणी, वनस्पती, जलपर्णी, विविध प्रकारच्या जाती, प्रजाती टिकणे महत्त्वाचे आहे; परंतु वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे जैवविविधतेवर तणाव निर्माण होत आहे. काही वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे प्रमाण दिवसेंदिवस दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वांत लहान विषारी साप म्हणून नोंद असलेला फुरसे दहा वर्षांपूर्वी या शहरात आढळत असे. तो आता जवळपास नामशेष झाला आहे. याशिवाय सिमेंटच्या जंगलामुळे शहराची गवताळ माळरान अशी मूळ ओळख हळूहळू नष्ट होऊ लागली आहे.

केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पालिका स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे; परंतु या समितीच्या कार्यवाहीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यावरणाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अद्यापही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत. दरवर्षी ३१ जुलैला पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल प्रसिद्ध होतो. त्यातील निष्कर्षांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, अशी टीका होत आहे. शहरातील हरितक्षेत्र वाढविण्यासाठी कृती आराखड्याची गरज व्यक्त होत आहे.

पश्चिमेकडे सह्याद्रीची पर्वतरांग आणि पूर्वेकडे गवताळ भाग यामुळे पिंपरी-चिंचवडला जैवविविधतेच्या बाबतीत अनुकूल वातावरण आहे. युरोप आणि हिमालयाच्या भागातून शहरात अजूनही हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी येतात. दिघी रोड भागातील जुन्या ओढ्यांमध्ये, तळ्यांमध्ये पावसाळ्यात खेकडावर्गीय दुर्मिळ जात आढळून येते. या ठळक बाबी वगळता शहरात जैवविविधतेवर प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

या संदर्भात निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानाचे अभिरक्षक दीपक सावंत म्हणाले, ‘शहराची जैवविविधता समतोल राखण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. महापालिका स्तरावर स्थानिक वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करीत आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात नक्कीच दिसून येतील.’

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे म्हणाले, ‘पूर्वीच्या तुलनेत शेतीचा भाग कमी होत आहे. त्यामुळे गाई-म्हशींच्या संख्येवर परिणाम झाला आहे. मात्र, पाळीव कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. मधमाश्यांसाठी उंच झाडांची कमतरता भासत असल्यामुळे या माश्या उंच इमारतींचा आसरा घेत आहे.’

………..

चौकट क्रमांक १

पिंपरी-चिंचवडमधील सद्यःस्थिती

- हरित पट्ट्याचे प्रमाण - ३०.७० टक्के

- एकूण उद्यानांची संख्या - १६८

- उद्यानांनी व्यापलेले क्षेत्र - १५६.६० हेक्टर

- वाहतूक बेटांची संख्या - १५

- आढळणाऱ्या पक्षांच्या जाती - १५५

- आढळणाऱ्या फुलपाखरांच्या जाती - १७

....

चौकट क्रमांक २

जैवविविधतेतील प्रमुख आव्हाने

- गवताळ माळरानांच्या संख्येत हळूहळू घट

- टेकड्या, मैदानांचे सरसकट सपाटीकरण

- स्थानिक वृक्षांची प्राधान्याने लागवड

- फुलपाखरांच्या परागीकरण प्रक्रियेत अडथळे

- स्थानिक प्रजातींच्या संख्येत झपाट्याने घट

- जमीनवापर बदलामुळे जैवविविधतेवर ताण

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-मेल वापरण्याची पोलिसांना तंबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आधुनिक युगात माहितीची देवाण-घेवाण जलद गतीने व्हावी आणि पोलिस दल ‘पेपरलेस’ करण्यासाठी सर्व विभागांना ई-मेल आयडीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु पुण्यात अनेक पोलिस ठाणी व विभागांकडून ई-मेलच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सर्वांना शासकीय ई-मेलचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस महासंचालक कार्यालय व शासनाच्या इतर विभागांकडून आलेल्या सूचना संबंधितांना ई-मेलद्वारेच पाठविण्यात येतील. त्यांची कोणतीही प्रत पोलिस ठाण्यांना दिली जाणार नाही. या आदेशाची अंमलबाजणी न झाल्यास कार्यालय किंवा विभाग प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. पोलिस दलाचे अत्याधुनिकीकरण व जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासन व पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाइन एफआयआर नोंदविण्यासाठी गुन्हे आणि गुन्हेगार शोध यंत्रणा (सीसीटीएनएस) प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांना सीसीटीएनएस गुन्हे नोंदविण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. पोलिस ठाणी पेपरलेस करण्यावर भर दिला जात आहे.
प्रत्येक पोलिस ठाणी व शासनाच्या इतर विभागांशी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी शासकीय ई-मेल तयार करून देण्यात आले आहेत. काही पोलिस ठाण्यांकडून नियमितपणे ई-मेलचा वापर केला जात आहे; परंतु काही पोलिस ठाणी व विभागांकडून ईमेलच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करण्यास उशीर होत आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘टेस्ट मेल’चा आग्रह
पोलिस महासंचालक कार्यालय, मंत्रालय, गुप्तवार्ता विभाग, केंद्र शासनाचे महत्त्वाचे ई-मेल, बंदोबस्त, दौरे, नागरिकांचे तक्रार अर्ज, माहिती अधिकाराचे अर्ज, कोर्ट समन्स, नोटीस अशी माहिती तातडीने मिळावी म्हणून ई-मेलवर पाठविण्यात येते. त्यामुळे विभाग प्रमुखांनी त्यांचे ई-मेल बंद असतील किंवा सुरू केलेले नसतील, त्यांनी तत्काळ सुरू करून घ्यावेत, असे आदेशात नमूद केले आहे. ‘ई-मेल सुरू झाल्यास गुन्हे शाखेच्या ईमेलवर टेस्ट मेल करावा. यापुढे शासकीय स्तरावरून ज्या विभागाशी संबंधित माहिती विचारली जाईल. त्यांना ई-मेलद्वारेच कळविले जाईल. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष प्रत पाठविली जाणार नाही. ईमेलवर माहिती न दिल्यास संबंधित विभागप्रमुख याला जबाबदार राहील,’ असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापूसचे भाव घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रत्नागिरी हापूसच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे़. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे २०० ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. आता आंबा सामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
आंब्याचा हंगाम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. या रविवारी रत्नागिरी हापूसची चार ते पाच हजार पेट्यांची आवक झाली. घाऊक बाजारात रत्नागिरी हापूसच्या प्रतिडझनास १५० ते २०० रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारातही २०० ते २५० रुपये प्रतिडझनास भाव मिळत असल्याची माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव आणि अरविंद मोरे यांनी दिली.
मार्केट यार्डात गावरान हापूस, पायरीची आवकही गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, सध्या रत्नागिरी हापूसचे दर खाली उतरल्याने गावरान हापूस, पायरी आणि रायवळ आंब्याना मागणी कमी आहे. हापूसचा हंगाम संपल्यानंतर या आंब्यांना दर वर्षीप्रमाणे मागणी वाढेल, असा अंदाज गावरान आंब्याचे व्यापारी तात्या कोंडे यांनी व्यक्त केला. गावरान आंब्याची आवक मुळशी तालुक्यातील बेलावडे, उरावडे, कोंडूर, हवेली तालुक्यातील मांडवे, आगळंबे, कुडजे व सांगरून या परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभक्तीपर गीत-नृत्यातून रंगला शताब्दी कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अपंग सैनिकांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते आणि नृत्य आणि विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून सैनिकांना केलेले अभिवादन अशा देशभक्तीमय वातावरणात खडकी येथील ‘क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट’च्या (क्यूएमटीआय) शताब्दीनिमित्त आयोजित ‘ऋण-अब हमारी जिम्मेदारी’ हा कार्यक्रम रंगला.
क्यूएमटीआय आणि रिडिफाइन कन्सेप्ट्स यांच्यातर्फे ‘ऋण-अब हमारी जिम्मेदारी’ या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख (सदर्न कमांड) लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिस, आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा झरिना हारिस, मेजर जनरल प्रितीसिंह, देवयानीसिंग, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले उपस्थित होते. या वेळी हारिस यांच्या हस्ते संस्थेच्या शताब्दीनिमित्त काढण्यात आलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे व पोस्टाच्या तीन खास तिकिटांचेही (तिन्ही संरक्षण दलांशी संबंधित) प्रकाशन करण्यात आले. या कॉफी टेबल पुस्तकात संस्थेच्या शंभर वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.
अभिनेत्री शर्वरी जमेनीस व सहकाऱ्यांनी कथक नृत्याद्वारे सैनिकांना अभिवादन केले. स्वप्नाली लेले व अनिरुद्ध जोशी यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर जवानांनी सादर केलेल्या गीत व नृत्यालाही मोठी दाद मिळाली.
‘अपंग जवानांना आणखी मदतीची गरज आहे. तांत्रिक प्रशिक्षणाच्या जोडीला पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत,’ असे हारिस या वेळी म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी दर वर्षी न चुकता क्यूएमटीआय संस्थेला भरीव आर्थिक योगदान दिले होते. त्यांचे संस्थेशी असलेले ऋणानुबंध विक्रम गोखले यांनी उलगडले. ‘सैनिकांच्या कार्याला सलाम करणे व त्यांचा आदर राखणे ही आपली जबाबदारी आहे,’ असेही गोखले म्हणाले. योगेश देशपांडे आणि अपूर्वा मोडक यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षण दलांमध्ये एकरूपता हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नव्या तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूपही बदलत आहे. भविष्यातील युद्धात तिन्ही संरक्षणदलांना एकत्रित लढाई करावी लागणार आहे. त्यासाठी तिन्ही संरक्षण दलांमध्ये एकरूपता असणे आवश्यक आहे,’ असे मत लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी नुकतेच व्यक्त केले.
लष्करी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी देशभरातील एकमेव संस्था असलेल्या खडकवासला येथील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) मधील ‘टेक्निकल स्टाफ ऑफिसर्स कोर्स’च्या दीक्षांत सोहळ्याला ले. जनरल दुआ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहशतवाद्यांविरोधीच्या कारवायांमधील तज्ज्ञ व काही काळापूर्वी भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावलेले लेफ्टनंट जनरल सतीश दुआ सध्या ‘चेअरमन ऑफ चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’चे ‘चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ही आहेत.
तिन्ही दलांचे एकत्रित प्रशिक्षण देणारी संस्था जगात सर्वप्रथम भारताने उभारली असे सांगून दुआ म्हणाले, ‘भविष्यातील युद्धात तिन्ही दलांना एकत्रित काम करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या युद्धसज्जतेचा आढावा घेऊन अधिक सज्ज राहणे आवश्यक आहे. अत्याधुनिक यंत्रणा, नवनवी तंत्रे, पुरेसे मनुष्यबळ, उपलब्ध तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर; तसेच तिन्ही दलांमधील भावी अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.’
पदक देऊन गौरव
‘टेक्निकल स्टाफ ऑफिसर्स कोर्स’च्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकाऱ्यांना दुआ यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. या तुकडीत भारतीय संरक्षण दलातील १४५ अधिकारी व श्रीलंकेच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता. लष्कराचे मेजर आर. प्रकाश, हवाई दलाचे विंग कमांडर ए. रेहमान, नौदलाचे कमांडर पी. व्ही. सूर्यनारायण आणि लेफ्टनंट सोहेल वर्मा यांना दुआ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंढव्यात वीस किलो गांजा पकडला

$
0
0

पुणे : कोंढवा परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने कोंढवा परिसरातून अटक केली. त्याच्याकडून साडे तीन लाख रुपये किमतीचा २० किलो ३१५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

मोहसीन आयूब खान (वय ३६, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन खान हा दुचाकीवरून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन कोंढवा परिसरातील कोरिएंथन क्लबजवळील इमारतीसमोर येणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्या वेळी तेथे मोहसीन खान आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील तीन लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा व दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात ‘एनडीपीएस अॅक्ट’नुसार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा गांजा कोठून आणला होता, त्याची कोणाला विक्री होणार होती आदी बाबींचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठेकेदारांच्या संगनमताने निविदा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी मंजुरी दिलेल्या ९८ कोटी रुपयांच्या निविदांवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला आहे. या ​निविदांसाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली नाही. तसेच, ठेकेदार-कंपन्यांनी या निविदा संगनमत करून भरल्या असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

‘या प्रस्तावित कामांच्या फेरनिविदा काढाव्यात. तसेच यापूर्वीच्या निविदा चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,’ अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून मंजूर करण्यात आलेल्या निविदांबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नाल्यांची साफसफाई करणे, पावसाळी लाइन टाकणे, कल्व्हटर्स बांधणे आदी कामांसाठी ९८ कोटी रुपयांच्या ​निविदांना स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने या निविदांना मुदतवाढ देण्यात आली. कोथरूड, औंध, बावधन, पाषाण, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, दत्तनगर, वडगाव बुद्रक, कोंढवा बेसिन या परिसरातील पावसाळी व्यवस्थापनासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार एका कंपनीने ५४ कोटी १६ लाख रुपयांची निविदा भरली आहे.

विश्रांतवाडी, मनोरुग्णालय, येरवडा, हडपसर, शिवाजीनगर बेसिन या ठिकाणी पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासह विविध कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. या कामांसाठी एका कंपनीची ४३ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा होती. हे दोन्ही प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या दोन्ही निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांकरिता या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे.

शिंदे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या निविदांचा प्रस्ताव ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या चौकशीचा अहवाल पक्षनेत्यांना सादर करावा. तसेच, चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या कामाच्या निविदांना पाच वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी निविदांना मंजुरी द्यायची असल्यास सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचा दावा विरोधकांनी केली आहे. या निविदा मंजूर करताना सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा झालेली नाही, तसेच या निविदा संगनमत करून ठेकेदार कंपन्यांनी भरल्या असल्याने त्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images