Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नागरिकांच्या त्रासात भर

$
0
0

नव्या नियमामुळे बँक अधिकाऱ्यांकडून ग्राहकांवर प्रश्नांचा भडिमार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जुन्या नोटा भरण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये आलेल्या खातेदारांना मंगळवारी बराच मनःस्ताप सहन करावा लागला. जुन्या नोटा खात्यात भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र सोमवारी रिझर्व्ह बँकेने अचानक नवा नियम लागू केला. या नियमानुसार, आपल्याच खात्यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जुन्या नोटांच्या रूपात भरायची असल्यास किमान दोन बँक अधिकाऱ्यांना पटेल असा लेखी खुलासा देणे बंधनकारक करण्यात आले. तसेच बँकेला हा खुलासा कायमस्वरूपी जतन करण्याचे आदेशही देण्यात आले. वास्तविक पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम पहिल्यांदा भरताना कोणताही खुलासा देण्याची आवश्यकता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते; मात्र त्यांचे बोल आणि रिझर्व्ह बँकेची अधिसूचना यात तफावत असल्याने बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या खुलाशाबाबत सावध पवित्रा घेतला; मात्र यामुळे खातेदारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. गेला सव्वा महिना बँकांमध्ये प्रचंड रांगा असल्याने अनेकांनी अखेरच्या आठवड्यात पैसे भरू असे ठरवले होते. त्यांची या नव्या नियमामुळे खूप अडचण झाली.

कोथरूड येथील एक महिला राष्ट्रीयीकृत बँकेतील आपल्याच खात्यात २४ हजार रुपये भरण्यासाठी गेली होती. तिला हे पैसे नोटाबंदीआधी दोन दिवस भिशीतून मिळाले होते. भिशीतील १२ महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपये ५०० व १०००च्या नोटांमध्ये दिले होते. काही कारणामुळे संबंधित महिलेने ही रक्कम बँकेत भरली नाही. मंगळवारी बँकेत गेल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिच्याकडे खुलासा मागितला. त्यावर तिने ही माहिती दिली. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिला भिशीतील सर्व महिलांकडून एका कागदावर ही रक्कम संबंधित महिलेला भिशीपोटी देण्यात आल्याचे लिहून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेऊन येण्याचे फर्मान सोडले. ‘आम्हाला पुराव्यांशिवाय ही रक्कम घेता येणार नाही. घेतल्यास आम्ही अडचणीत येऊ,’ असे या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने या महिलेला संताप अनावर झाला होता.

वाकडेवाडी येथे एक प्राध्यापक १८ हजार रुपये घेऊन बँकेत गेले होते. त्यांच्याकडील जुन्या नोटा त्यांच्या पगारातूनच मिळाल्या होत्या; मात्र बँकांमधील रांगा पाहून त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याने नंतर पैसे भरू असे ठरवले होते. मध्येच त्यांना गावी जावे लागले. त्यामुळे मंगळवारी ते पैसे भरण्यासाठी गेले असता, त्यांना अडवण्यात आले. नोटा भरण्यासाठी उशीर झाल्याचे शपथपत्र आणा आणि प्रवासाचे पुरावेही जोडा, असे त्यांना सांगण्यात आले.

‘आम्ही अडचणीत येऊ’

‘पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम भरण्यास आलेल्या व्यक्तींकडून योग्य पुराव्यांशिवाय ही रक्कम स्वीकारू नये, असे आम्हाला आदेश आहेत. या पुराव्यांची माहिती शाखाधिकारी, तसेच विभागीय कार्यालयालाही कळवावी लागते. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर रक्कम स्वीकारा, असे आदेश आहेत. तसेच हे पुरावे जतनही करायचे आहेत. आम्ही खातेदारांना पूर्वीपासून ओळखत असलो, त्यांच्याबद्दल खात्री असली, तरी आम्ही काहीही करू शकत नाही. पुराव्यांशिवाय रक्कम स्वीकारली, तर आमची नोकरी धोक्यात येईल,’ अशी माहिती काही बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘परदेश प्रवासाचे पुरावे द्या’

कोथरूडमधील एक जोडपे आपल्या मुलाकडे अमेरिकेत गेले होते. त्या वेळी त्यांच्या घरात जुन्या नोटांच्या रूपात दहा हजार रुपये होते. त्यांची परतीची तिकीटे जानेवारीअखेरची असतानाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी ती रद्द करून १८ डिसेंबर रोजीच पुणे गाठले. त्यानंतर मंगळवारी ते पैसे भरण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांना उशीर झाल्याचे कारण, पासपोर्टची प्रत, तसेच बोर्डिंग पासची प्रत हे पुरावे दिल्यानंतरच पैसे स्वीकारण्यात येतील, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रे वॉटर प्रकल्पाला ‘स्थायी’ची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्यासाठीच्या पहिल्या ग्रे वॉटर प्रकल्पाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या प्रभाग क्रमांक ६७मध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारा हा प्रकल्प सहा महिन्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख लिटर पाणी शुद्ध केले जाईल.
दोन वर्षांपूर्वी बागूल यांनी आपल्या प्रभागात ग्रे वॉटरचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने प्रकल्प रखडला होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी तावरे कॉलनी परिसरातील सुमारे दीड हजार इमारतींमधील अंघोळीचे आणि स्वयंपाकाचे पाणी रोज एकत्र केले जाईल. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती आणि बागेला वापरण्यायोग्य केले जाणार आहे. पाणी एकत्र करण्याची प्राथमिक व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात असलेल्या महापालिकेच्या जागेवर येत्या काही दिवसातच प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात प्रकल्पाचे कामकाज पूर्ण होईल.
प्रकल्पाची एकूण क्षमता १० लाख लिटरची असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. संपुर्ण शहरासाठी अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करावा असे तत्कालीन पालिका आयुक्त महेश झगडे यांनी केलेल्या शहर विकास आराखड्यात नमूद केले होते. ते अद्याप शक्य झालेले नाही, मात्र त्याआधी हा प्रकल्प सुरू होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.


ग्रे वॉटरच्या प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याने अंघोळीचे तसेच स्वंयपाकाचे पाणी शुद्ध केले जाणार आहे. या पाण्याचा वापर गार्डनसाठी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा.
आबा बागूल, माजी उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही अडचणीत येऊ’

$
0
0

पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम भरून घेताना बँकांचा सावध पवित्रा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिझर्व्ह बँकेने सोमवारी लागू केलेल्या नव्या नियमानुसार, आपल्याच खात्यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जुन्या नोटांच्या रूपात भरायची असल्यास किमान दोन बँक अधिकाऱ्यांना पटेल असा लेखी खुलासा देणे बंधनकारक करण्यात आले. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी बँकांनी सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी बँकेत पैसे भरायला गेलेल्या ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागला.
‘पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम भरण्यास आलेल्या व्यक्तींकडून योग्य पुराव्यांशिवाय ही रक्कम स्वीकारू नये, असे आम्हाला आदेश आहेत. या पुराव्यांची माहिती शाखाधिकारी, तसेच विभागीय कार्यालयालाही कळवावी लागते. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर रक्कम स्वीकारा, असे आदेश आहेत. तसेच हे पुरावे जतनही करायचे आहेत. आम्ही खातेदारांना पूर्वीपासून ओळखत असलो, त्यांच्याबद्दल खात्री असली, तरी आम्ही काहीही करू शकत नाही. पुराव्यांशिवाय रक्कम स्वीकारली, तर आमची नोकरी धोक्यात येईल,’ अशी माहिती काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाकडेवाडी येथे एक प्राध्यापक १८ हजार रुपये घेऊन बँकेत गेले होते. त्यांच्याकडील जुन्या नोटा त्यांच्या पगारातूनच मिळाल्या होत्या; मात्र बँकांमधील रांगा पाहून त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याने नंतर पैसे भरू असे ठरवले होते. मध्येच त्यांना गावी जावे लागले. त्यामुळे मंगळवारी ते पैसे भरण्यासाठी गेले असता, त्यांना अडवण्यात आले. नोटा भरण्यासाठी उशीर झाल्याचे शपथपत्र आणा आणि प्रवासाचे पुरावेही जोडा, असे त्यांना सांगण्यात आले.
पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम पहिल्यांदा भरताना त्याविषयी खुलासा देण्याची आवश्यकता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी म्हटले होते; मात्र त्यांचे सांगणे आणि रिझर्व्ह बँकेची अधिसूचना यात फरक असल्याने बँकांकडून होणाऱ्या अंमलबजावणीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी पक्षांसाठी भाजपचे धक्कातंत्र

$
0
0

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांनंतर राष्ट्रवादीसह काँग्रेसमधील काही प्रमुख आजी-माजी पदाधिकारी गळाला लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी पक्षांना धक्के बसतील, असे प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्याशिवाय, इतरही अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून भाजपमध्ये अनेक पक्षांतून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. यामध्ये, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेत विविध पदांवर काम करण्याचा अनुभव असलेल्या आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या पदाधिकाऱ्याला पक्षात स्थान देऊन भाजपने राष्ट्रवादीला सोमवारी मोठा धक्का दिला. मात्र, केवळ कर्णे गुरुजींच्या प्रवेशाने हे सत्र थांबणार नसून, यापुढील टप्प्यात आणखी प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्यात येणार असल्याचे संकेत पक्ष वर्तुळातून देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाला प्रतिकूल असलेल्या भागांवर विशेषत्त्वाने लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कर्णे गुरुजींपाठोपाठ शहराच्या पूर्व भागांतून आणखी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश येत्या काही दिवसांत होईल, असे सांगण्यात आले. हडपसर, कात्रज-सहकारनगर, सिंहगड रोड, कोथरूड-वारजे अशा शहरांच्या उपनगरांतूनही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रस दाखवला असून, त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचे भाजपच्या वरिष्ठ गोटातून सांगण्यात आले. संबंधित प्रभागात भाजपला फायदा होणार असेल, तर अशा पदाधिकाऱ्यांना नक्की प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका मांडण्यात येत आहे.

भाजप कार्यालयातील वर्दळ वाढली
महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजप कदाचित महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास नेते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे, भाजपसोबत जाण्यासाठी इतर पक्षांतील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत गिरीश बापट यांच्यासह भाजपच्या पक्ष कार्यालयात भेटी-गाठी घेतल्याचे कळते.

कर्णे गुरुजी यांच्या फोटोला काळे फासले

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणारे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्या फोटोला मंगळवारी काळे फासण्यात आले. स्थायी समितीच्या कार्यालयातील कर्णे गुरुजींच्या फोटोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून निषेध केला. ‘कर्णे गुरुजी गद्दार है’ अशा घोषणा पालिकेत देण्यात आल्या.
येरवडा भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले ज्येष्ठ नगरसेवक कर्णे गुरुजी यांनी सोमवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनाम देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. याचे जोरदार पडसाद मंगळवारी पालिकेत उमटले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयात प्रवेश करून कर्णे गुरुजी यांच्या फोटोला काळे फासले. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीने गुरुजींना नेहमी सन्मान दिला. स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. आर्थिक फायद्यासाठी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली असल्याची टीका या वेळी करण्यात ली.
भाजपमध्ये सध्या अनेक पक्षातील नगरसेवकांचे प्रवेश होत आहेत. यामागे प्रदेश काँग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा हात आहे. या प्रवेशासाठी ‘मध्यस्थी’ म्हणून हा पदाधिकारी काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडे तक्रार करणार असून, त्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधितांना योग्य ती समज द्यावी; अन्यथा पुढील काही दिवसांत त्याचे नाव जाहीर करण्यास मागे पाहणार नाही, असेही काकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या हस्ते भूमिपूजन

$
0
0

पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून सुरू झालेली श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन केल्याचे जाहीर केल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (२३ डिसेंबर) भूमिपूजनाचा घाट घातलाआहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र तसेच राज्य सरकारने मान्यता दिली. हा प्रकल्प व्हावा, यासाठी आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करताना शरद पवार यांनाही आमंत्रित करावे, अशी विनंती महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. चारच दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पवार यांना आमंत्रित केले जाईल, अशी हमीही दिली होती. मात्र, आता भाजपच्या नेत्यांनी शब्द फिरविला आहे,’ अशी टीका महापौरांनी केली.
मोठ्या प्रकल्पांच्या उद् घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांना वेगळी वागणूक देण्याची भाजपची संस्कृती आहे. केवळ मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी राज्य सरकार हट्ट करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. वारंवार विनंती करूनही पालकमंत्र्यांनी फसवणूक केल्याने शुक्रवारी (२३ डिसेंबर) महापालिकेच्या वतीने मेट्रोचे भूमिपूजन केले जाईल, असेही महापौर म्हणाले. कामगार पुतळा येथे भूमिपूजन होणार असून, सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केल्याचेही महापौरांनी नमूद केले. पवारांच्या हस्ते भूमिपूजन व्हावे, असा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य करण्यात आला असून, आम्ही महापौरांना पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान साक्षरतेसाठी संवादसेतू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर जनजागृती व्हावी, यासाठी आणि विज्ञान साक्षरतेसाठी फर्ग्युसन कॉलेजातील चार विद्यार्थ्यांनी पूर्व आणि पश्चिम भारतातील राज्यांचा दौरा केला. या राज्यातील लोकांशी संवाद साधून, त्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवून या विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम यशस्वी केली.
या मोहिमेचे आयोजन २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान करण्यात आले होते. विशाल सवाई, खंडू डोके, योगेश थोरात, विकास जाधव या चार विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांमध्ये २२ दिवस प्रवास केला. ५००० लोकांना त्यांनी दाब, ऊर्जा, आवाज, बल इत्यादी वैज्ञानिक संज्ञा हसत खेळत प्रात्यक्षिके दाखवून, सोप्या भाषेत शिकवल्या. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेश देणारे पथनाट्य त्यांनी ठिकठिकाणी सादर केले. मोहिमेची सुरुवात कोलकाता रेल्वे स्टेशनवरून झाली. तिनसुकिया, तेजपूर या आसाममधील जिल्ह्यांत मोहीम केल्यांनतर लोवर दिबांग घाटी, बॉम्बडीला, तवांग या अरुणाचलमधील जिल्ह्यांत; तसेच गेझिंग, नामचि या सिक्कीममधील जिल्ह्यांत या विद्यार्थ्यांनी मोहीम पार पाडली. भारत-चीन सीमेलगत अरुणाचल प्रदेश येथील बुम्ला पास येथे मोहिमेचा शेवट करण्यात आला. या मोहिमेत त्यांनी १०,००० किलोमीटर अंतर पार केले. त्यांनी २५ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसमोर विज्ञानाचे प्रयोग आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयी पथनाट्य सादर केले.
मोहिमेसाठी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, रोइंग संस्थेचे विजयस्वामी सर आणि जयंत सर यांचे मोहिमेला मोलाचे सहकार्य लाभले. पूर्व आणि पश्चिमेकडील राज्ये आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. लोवर दिबांग घाटीचे आयुक्त दीपक शिंदे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरभास्कर महोत्सव येत्या शुक्रवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय रागसंगीतातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणारा स्वरभास्कर संगीत महोत्सव २३ ते २५ डिसेंबरदरम्यान कोथरूड येथील आयडियल कॉलनीच्या मैदानावर रंगणार आहे. गायन, वादन आणि नृत्याने परिपूर्ण अशा या महोत्सवात तरुण कलाकारांसह काही प्रसिद्ध गायक-वादकांची कला अनुभवण्याची पर्वणी कोथरूडकरांना साधता येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते होणार आहे. ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम या वेळी होणार आहे. रेवा नातू यांना या वेळी ‘स्वरभास्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महोत्सवाची सुरुवात पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांची जुगलबंदी रंगणार आहे. स्वीकार कट्टी आणि अभिषेक बोरकर यांची सतार आणि सरोदवादनाची जुगलबंदी २४ डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यानंतर रेवा नातू यांचे गायन होईल. या दिवसाचा समारोप पं. रामदास पळसुले आणि पं. श्रीधर पार्थसारथी यांच्या तबला आणि मृदंगमच्या जुगलबंदीने होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अपर्णा केळकर (गायन), उस्ताद शाहीद परवेझ (सतार) यांचे सादरीकरण होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना पार्ट्यांना पन्नास हजारांचा दंड

$
0
0

करमणूक कर विभागाचे प्रमाणपत्र बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात​ ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आयोजकांना करमणूक कर विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यक्रमांसाठी एंट्री फी आकारली जाणार असल्यास त्याचा करमणूक कर भरावा लागणार आहे. कर न भरल्यास किमान पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
‘नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी करमणूक कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी आयोजकांना सात दिवस अगोदर अर्ज करावा लागतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी एंट्री फी आकारली जाणार असल्यास करमणूक कर भरावा लागतो. करमणूक कर न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,’ अशी माहिती करमणूक कर अधिकारी सुषमा चौधरी यांनी दिली.
परवाना घेण्यासाठी अर्ज करताना आयोजकांनी सर्व माहिती देणे अत्यावश्यक आहे. हॉटेल्स, बंगला, लॉन्स, हॉल किंवा मोकळ्या जागेत पार्टी होणार असल्यास त्याबाबतचा तपशील अर्जात द्यावा लागणार आहे. अर्जासोबत आयोजकाने प्रतिज्ञापत्र देऊन त्यामध्ये सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे; तसेच पार्टीच्या ठिकाणाचे जागामालक किंवा हॉटेलचालक यांची संमतीपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर परवानगी दिली जाईल, असेही चौधरी म्हणाल्या.
‘परवानगी घेण्यासाठी अर्ज येत असून, आतापर्यंत २३ अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी सुमारे १५० जणांना परवानगी देण्यात आली होती,’ असेही चौधरी म्हणाल्या.

२५ पथकांकडून होणार कारवाई
विनापरवाना पार्टी आयो​जित केली असल्यास तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी २५ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नाताळ आणि ३१ डिसेंबरला पाहणी केली जाणार आहे,’ असेही चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरीच्या दुचाकी विकणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

कॉलेजमध्ये स्टाइल मारण्यासाठी महागड्या दुचाक्या चोरून त्यांची ‘ओएलएक्स’वर विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित विद्यार्थ्यांकडून दोन दुचाकी, पिस्तुल असा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नऱ्हे येथील जीम समोरून केटीएम कंपनीची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शोध घेत असताना ही दुचाकी ओएलएक्सच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ विष्णु जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचला. ओएलएक्सवर टाकलेली दुचाकी एक लाख दहा हजार रुपयांना खरेदी करायची असल्याचे सांगून संबंधिताला नवले पुलाखाली बोलवून घेतले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्या कमरेला एक पिस्तुल आणि तीन काडतुसे आढळून आली.
सिंहगड रोड पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो धायरी परिसरात राहण्यास असून येथील बारावी कॉमर्सला शिकत असल्याचे आढळून आले. कॉलेजमध्ये स्टाइल मारण्यासाठी तसेच, पैशाची गरज भागविण्यासाठी आपण दुचाकी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. नऱ्हे येथून दुचाकी चोरल्यानंतर त्यामध्ये कागदपत्रे होती. पैशाची गरज असल्यामुळे ती कागदपत्रे ओएलएक्सवर टाकून दुचाकीच्या विक्रीची जाहिरात दिल्याचे त्याने कबुल केले. संबंधित विद्यार्थी बालगुन्हेगार असून, त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला रिमांड होममध्ये पाठविण्यात येणार असून, त्याने पिस्तुल कोणाकडून घेतले याचा सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, सचिन माळवे, किशोर शिंदे, राहुल शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला जावडेकर सरांचा तास

$
0
0

केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला ‘कॅशलेस व्यवहारा’चा कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी ज्योतिषी नाही; पण भविष्य सांगणार आहे...नजीकच्या काळात आधार कार्डवर आधारित मोबाइल व्यवहारांचीच चलती राहील. देशात घडणाऱ्या डिजिटल क्रांतीचे सैनिक बनण्याची संधी विद्यार्थ्यांना आयती चालून आली आहे. ​किमान लाखभर लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांमध्ये डिजिटल क्रांती घडणार आहे. त्या क्रांतीचे साक्षीदार बना,’ असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
सर परशुरामभाऊ कॉलेजच्या खो-खो मैदानावर जावडेकर सरांचा मंगळवारी सायंकाळी क्लास रंगला होता. शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांच्या दहा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ‘कॅशलेस व्यवहार’ या विषयावरील व्याख्यानासाठी गर्दी केली होती. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, अॅड. एस. के. जैन, राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. शरद कुंटे, मेघा पंडित आदी याप्रसंगी उपस्थित होते. चाळीस मिनिटांमध्ये जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना ‘डिजिटल क्रांती’चे सैनिक बनण्याचे आवाहन केले. तसेच, या क्रांतीमध्ये सहभागी होणाऱ्यांना आपल्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, बँकेतील अधिकाऱ्यांनी पॉइंट ऑफ सेल अर्थात ‘पॉस’, आधार कार्डवर आधारीत मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल व्यवहार कसे करावे, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवले.
‘स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी तसेच अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी आंदोलने केली. आणीबाणीमध्ये कॉलेजच्या मैदानांत आम्ही सत्याग्रह केले; पुढे तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी डिजिटल क्रांती ही एक संधी आहे. त्याचे सैनिक बना, सेनानी बना,’ असे आवाहन जावडेकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांना निमंत्रणाबाबत बापटांचे तळ्यातमळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी सांगितले. मोदी यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (२४ डिसेंबरला) पुणे मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे.
‘शहरात मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने आम्हीच तो मार्गी लावला, असा डांगोरा पिटून राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पंतप्रधानांच्या राजशिष्टाचाराचे कारण पुढे करून भाजपच्या नेत्यांसाठी आणि अन्य पक्षीयांसाठी स्वतंत्र दोन व्यासपीठे उभारण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही भाजपने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेचा वापर करून भाजप चुकीचा पायंडा पाडत आहे. शहराच्या विकासात कोणतेही राजकारण आणणार नाही, ही आमची भूमिका असल्याने सर्व पक्षांना एकत्र घेऊनच मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल,’ असेही महापौर म्हणाले.
मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यामुळे शनिवारच्या कार्यक्रमाला महापौर म्हणून मी हजर राहणार नाही. एकाच प्रकल्पाचे दोनवेळा भूमिपूजन करण्याचे आपल्याकडे प्रथा नाही. त्यामुळे मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास त्यावर पालिका बहिष्कार टाकेल, असेही जगताप म्हणाले.

पवारांना निमंत्रणाबाबत बापटांचे तळ्यातमळ्यात

‘पुणेकरांनी अनेक वर्षे प्रतीक्षा केलेल्या मेट्रोचे भूमिपूजन येत्या शनिवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल,’ असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित करण्याचा आग्रह राष्ट्रवादीतर्फे धरला जात असला, तरी त्याविषयी कोणतेही भाष्य न करता सर्वांना सोबत घेऊ एवढीच पुस्ती बापट यांनी जोडली.
पुणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर मुख्य व्यासपीठावर असले तरी, राजशिष्टाचारामुळे सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल, असे सूतोवाच बापट यांनी पत्रकार परिषदेत केले. मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले. ‘पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांनुसार काही गोष्टींचे भान राखावे लागते. त्यामुळे, मुख्य व्यासपाठीवर मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती असेल. त्यात, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांना स्थान देण्यात आले आहे,’ असे बापट यांनी नमूद केले.
शरद पवार यांनी मेट्रोसाठी पाठपुरावा केला असल्याने त्यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले जावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे, त्यांनाही व्यासपीठावर बोलावणार का, याबाबत वारंवार विचारणा करूनही बापट यांनी थेट उत्तर देणे टाळले. मेट्रोसाठी सर्वांचे सहकार्य घेऊनच पुढे जाणार, याचाच पुनरूच्चार त्यांनी केला. मेट्रोचे भूमिपूजन हा पुणेकरांसाठी सर्वांत आनंदाचा क्षण असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पवारांची उपस्थिती; महापौरांचे घूमजाव

मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नेमके कोणाच्या हस्ते करायचे यावरून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (२४ डिसेंबर) होणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार यांचा सहभाग निश्चित मानला जात आहे. भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे; तसेच मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पवार यांना व्यासपीठावर बसण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवार यांचे नाव आणि त्यांना स्थान देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही आडकाठी आणली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, बुधवारपर्यंत वाट पाहण्याचे जाहीर केल्यानंतरही महापौरांनी पुन्हा भूमिका बदलून स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा घाट घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागात ३० कोटी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने पुणे विभागाअंतर्गत राबवलेल्या ५७ शोधमोहिमा व छाप्यांमधून आतापर्यंत १२.३२ कोटी रुपयांच्या नव्या चलनासह ३० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत १०० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती समोर आली आहे. मुंबई वगळता राज्यात पाच हजारांहून अधिक खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सुमारे, बारहाशे जन-धन खात्यांवरही प्राप्तिकर विभागाची बारीक नजर आहे.

‘आठ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर पुण्यातील प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण (इन्व्हेस्टिगेशन) विभागाने ५७ शोधमोहिमांतर्गत छापे टाकले आहेत. यामध्ये ३० कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६.३२ कोटी रुपये जप्त झाले असून, त्यात नवे चलन फक्त २४ लाख रुपयांचेच आहे. यापैकी ज्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आढळून आले आहे, अशी चार प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभाग व अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपवण्यात आली आहेत,’ अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागाच्या अन्वेषण विभागाचे अतिरिक्त संचालक करुण ओझा यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष आहे. मुंबई वगळता राज्यातील ज्या खात्यांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली, अशा पाच हजारांहून अधिक खातेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तसेच जन-धन खात्यांमध्ये पैसे भरण्यावर निर्बंध येण्यापूर्वी ज्या खात्यांमध्ये ५० हजारांहून अधिक रक्कम जमा झाली, अशा बाराशेहून अधिक खात्यांवरही प्राप्तिकर विभागाची नजर आहे,’ असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

‘प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर व अघोषित उत्पन्न जाहीर करण्याची योजना संपल्यानंतर केलेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत १०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघड झाली आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असेही सूत्रांनी सांगितले.

दूरध्वनीवरून मिळाली माहिती

प्राप्तिकर विभागाच्या हेल्पलाइनवर आतापर्यंत पुणे विभागातून १५० दूरध्वनी आले आहेत. यापैकी सात दूरध्वनींद्वारे मिळालेल्या माहितीआधारे केलेल्या कारवाईत अघोषित मालमत्ता किंवा रोकड आढळली आहे. काही दूरध्वनी करणाऱ्यांनी अगदी त्रोटक किंवा अपुरी माहिती दिली. काहींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दूरध्वनी करणाऱ्यांनी पुरेसा तपशील दिल्यास कारवाई करणे सोपे जाते, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोप काढते धक्क्यातून बाहेर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे


पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) असलेल्या व्यक्ती नेहमीच अति भावनिक होतात. त्यांच्याकडे बहुधा सतत तणावाखाली नेणाऱ्या आठवणी असतात किंवा आयुष्यात एकदाच मिळालेल्या जबर धक्क्याचा अनुभव पुन्हा- पुन्हा येत राहातो. ते ज्या धक्क्यातून नुकतेच गेले आहेत, त्यातून त्यांना बाहेर काढायला झोप उत्तम मदत करते.

‘झ्युरिच युनिव्हर्सिटी’चे मुख्य लेखक ब्रिजिट क्लाइम याविषयी म्हणाले, ‘मोठ्या धक्क्यांतून संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न अत्यंत शांत पद्धतीचा असतो. त्या आठवणीमुळे त्यांना काही आक्रमक करावंसं वाटू नये, यासाठी औषधं सुरू केली जातात आणि उपचारही दिले जातात.’ मोठ्या धक्क्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मनात भीतीची भावना निर्माण होते.

संबंधित धक्क्याच्या आठवणीने ती भीतीची भावना पुन्हा-पुन्हा मनात जागृत होते. मात्र, चांगली झोप मिळाली, तर या आठवणींची तीव्रता कमी व्हायला मदत होते. आठवणींचे संदर्भ पुसायला, माहितीवर प्रक्रिया करायला आणि आठवणी साठवायला झोप नेहमी मदत करते. यांपैकी माहितीवर प्रक्रिया होण्यासाठी काही रात्रींची गरज पडू शकते, असं संशोधकांचं मत आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी सहभागींना धक्कादायक व्हिडिओ पाहायला दिला. त्यातील घाबरवणाऱ्या आठवणी या सलग काही दिवस सहभागींचा पिच्छा पुरवत होत्या. हा धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर सहभागींपैकी एका गटाला एक रात्र लॅबमध्ये झोपायला सांगण्यात आलं. ही त्यांची झोप इलेक्ट्रोसेफॅलोग्राफ (ईईजी) द्वारे रेकॉर्ड केली गेली. दुसरा गट मात्र जागा राहिला.


संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर झोप झालेल्यांवर कमी ताण होता, तर अजिबात झोप न झालेल्यांच्या आठवणी रात्रीनंतरही तितक्याच तीव्र होत्या. ‘यामुळेच हे सिद्ध झालं, की एखाद्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्या धक्क्यानंतर पहिल्या २४ तासांत झोप ही अत्यंत महत्त्वाची असते; कारण या झोपेमुळे धक्क्याची तीव्रता आणि त्यातून निर्माण होणारी भीतीची भावना कमी होण्यास मदत होते,’ असं क्लाइम यांनी सांगितलं. ‘स्लीप’ नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचए’च्या कामगारांना दिलासा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
केंद्र सरकारने हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची (एच. ए.) अतिरिक्त जमीन विक्रीचा निर्णय घेतल्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीचे पुनरुज्जीवन होऊन औद्योगिकनगरीत सलोख्याचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात औद्योगिक नगरीची मुहूर्तमेढ रोवणारी आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेली एच. ए. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक डबघाईला आली होती. कंपनीतील उत्पादनच बंद झाल्यामुळे २५ महिन्यांचे वेतन कामगारांना मिळाले नव्हते. आर्थिक झळ पोचलेले सुमारे अकराशे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्यासाठी वारंवार आंदोलने झाली. पाठपुराव्यानंतर जमीन विक्रीचा मार्ग खुला झाला. त्यातून थकीत वेतनाची रक्कम मिळणार असल्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महिलांनी तर एकमेकांना साखरवाटप करून निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निर्णयावरून श्रेयवादाची लढाई रंगण्यास सुरुवात होणार आहे. परंतु, कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्वपक्षीय प्रयत्न झाले आहेत, ही बाब सर्व कामगार मान्य करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नात राजकारण निर्माण करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जमीन विक्रीच्या माध्यमातून थकीत देणी मिटवावीत. त्याचबरोबर कंपनीचे पुनरुज्जीवन होऊन नागरिकांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे उत्पादित व्हावीत, अशी अपेक्षा कामगार वर्गातून व्यक्त होत आहे. अतिरिक्त जागा खरेदीसाठी ‘म्हाडा’ने यापूर्वीच तयारी दर्शविली आहे. त्यामुळे याबाबतचा पुढील निर्णय काय होतो? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांचा पाठपुरावा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील ४५व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दोनच दिवसांपूर्वी झाला. या वेळी पवार यांनी एच. ए. कामगारांच्या थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित करून तातडीने मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. पवार यांनी एच. ए. मजदूर संघटनेच्या अध्यक्षपदाची धुराही काही काळ सांभाळली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनीही अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘कामगारांच्या आंदोलनाला यश’
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘आर्थिक डबघाईला आलेल्या एच. ए. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि कामगारांचे थकीत वेतन देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यातून कामगारांच्या थकीत वेतनासाठी शंभर कोटी रुपये तातडीने उपलब्ध होणार आहेत. आमच्या प्रयत्नाला यश आले असून, अखेर सरकारने एच. ए.च्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांचे थकीत वेतन मिळून प्रश्न सुटण्यास मदत होईल. कंपनीला पुन्हा चांगले दिवस येतील. कामगारांनी वेळोवेळी उपोषण, धरणे आंदोलने करून तसेच सरकारशी पत्रव्यवहाराद्वारे सातत्याने प्रयत्न केले. त्याला यश मिळाले.’

‘भाजपचे महत्त्वाचे पाऊल’
खासदार अमर साबळे म्हणाले, ‘एच. ए.चा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न झाले. पाठपुरावा झाला. परंतु, निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने घेतला. केंद्रात आणि राज्यात सत्ता पालटानंतर भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षांतच ठोस निर्णय घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय मी आणि पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे यश मिळू शकले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी इंद्रायणी, पवनेचे पाणी नेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मुंबईत समुद्रात जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांची पाणी आणि माती मंगलकलशातून नेण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन येत्या शनिवारी (२४ डिसेंबर) होणार आहे. त्यासाठी देशभरातील प्रमुख नद्यांचे पाणी आणि माती मंगलकलशातून आणण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पक्षाच्या पिंपरी-चिंचवड विभागाने इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे पाणी आणि माती नेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२२ डिसेंबर) सकाळी दहा वाजता उपक्रम राबविला जाईल. त्यानंतर शहरातील सहा ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन मंगलकलश मुंबईला नेण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक उपस्थित होत्या. या उपक्रमाची जबाबदारी पक्षाचे मंडलप्रमुख काळूराम बारणे, अमोल थोरात, संतोष लांडगे, प्रमोद निसळ, अरुण पवार, सारंग कामतेकर, रवींद्र इंगवले, माउली थोरात, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, अण्णा गर्जे, बाबू नायर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरीकांसाठी दुपारी एक ते चार वेळेत एलसीडी स्क्रिनची सुविधा करणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूनावाला हॉस्पिटलचे उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामान्य रुग्णांना कमी किमतीत उपचारांच्या चांगल्या सोयीसुविधा मिळव्यात या उद्देशाने वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या विलू पूनावाला मेमेरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बुधवारी केले. या हॉस्पिटलटची ६० बेडची क्षमता असून अतिदक्षता विभाग, पाच ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सेंटरची त्यामध्ये निर्मीती करण्यात आली.

विलू पूनावाला यांच्या स्मरणार्थ वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनतर्फे हडपसरला हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने हॉस्पिटल उभारण्यासाठी संपूर्ण आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली आहे. या वेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला, फाउंडेशनच्या अध्यक्षा नताशा पूनावाला, फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. किरण शहा, डॉ. भूषण मानगावकर आदी उपस्थित होते.

अनुभवी डॉक्टर्स आणि परिचारिका असलेले हे हॉस्पिटल रुग्णांसाठी २४ तास खुले राहणार आहे. तसेच, पाच ऑपरेशन थिएटर, दहा बेडचा अतिदक्षता विभाग, डायलिसिस सेंटर, अत्याधुनिक लॅबोरेटरी, तीन नवजात शिशु अतिदक्षता विभाग, बाह्यरुगण विभाग, प्रसूती विभाग अशी यंत्रणा आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी ईएनटी, युरॉलॉजी, न्युरॉलॉजी, स्किन आदींशी संबंधित आजारांवर तपासणी केली जाणार आहे.

नताशा पुनावाला म्हणाल्या, ‘फाउंडेशनतर्फे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्यात येत आहे. सामान्य रुग्णांना कमी किमतीत उपचारांच्या चांगल्या सोयीसुविधा मिळव्यात या उद्देशाने हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील एक तृतीयांश बेड हे सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असतील.’

‘गरीब रुग्णांवर दोन महिने मोफत उपचार’

‘हॉस्पिटलचा नुकतेच उद्घाटन झाल्याने पुढील दोन महिन्यांसाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये मोफत उचार केले जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी हॉस्पिटलशी संपर्क साधला तर त्यांच्यावर मोफत उपचार होऊ शकतील,’ असे नताशा पूनावाला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वयोमर्यादेवर अखेर शिक्कामोर्तब

$
0
0

‘पीएसआय’ पदाबाबतचा निर्णय ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी शिक्कामोर्बत केले. त्यामुळे ‘पीएसआय’ परीक्षेसाठी यापुढे खुल्या प्रवर्गासाठी ३१ तर राखीव प्रवर्गासाठी ३४ वयोमर्यादा झाली आहे. ‘एमपीएससी’च्या या निर्णयाने ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांत ‘पीएसआय’ परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढीची, तसचे विद्यार्थ्यांची बाजू ‘मटा’ने बातम्यांद्वारे मांडली. ‘एमपीएससी’तर्फे ७५० पीएसआय पदांसाठी १२ मार्चला राज्यातील ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. ‘एमपीएससी’तर्फे ७ डिसेंबरला प्रकाशित झालेल्या जाहीरातीत किमान वयोमर्यादा १९ ते कमाल वयोमर्यादा २८ ठेवण्यात आली आहे. एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची वयोमर्यादा वाढावी यासाठी काही वर्षांपासून विविध विद्यार्थी संघटना आक्रमक होत्या. त्यावर राज्य सरकारने ज्या परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ व मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षे आहे, त्या परीक्षांमध्ये पाच वर्षे वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय या वर्षी २५ एप्रिलला घेतला. मात्र, ‘एमपीएससी’च्या इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आणि ‘पीएसआय’च्या परीक्षेमध्ये फरक आहे. ‘पीएसआय’चे निकष व पात्रता वेगळ्या आहेत. त्यामुळे या परीक्षा देण्याची वयोमर्यादा वाढविण्यात आली नव्हती.

त्यामुळे या विरोधात स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी नव्याने आंदोलन छेडण्याच्या तयारीत होते. तेव्हा विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘पीएसआय’ परीक्षेसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी वाढविण्याबाबत अनुकुल असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पाटील यांनी ‘पीएसआय’ परीक्षा देण्यासाठी लागणारी वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी २८ हून ३१, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३१ हून ३४ करण्याचा सरकारचा निर्णय विधान परिषदेत जाहीर केला. यावर ‘एमपीएससी’ने बुधवारी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा २८ हून ३१, तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३१ हून ३४ झाल्याचा निर्णय बुधवारी वेबसाइटवर प्रकाशित केला.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

‘पीएसआय’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या वेबसाइटहून ऑनलाइन पद्धतीने अर्ज २७ डिसेंबरपर्यंत भरायचे होते. मात्र, आता वयोमर्यादा वाढीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यत वाढवून दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क चलनद्वारे भारतीय स्टेट बँकेत २ जानेवारीपर्यंत भरावे लागणार आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’द्वारे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बँकेत वादांचे नाट्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्या खात्यामध्ये बाद नोटांच्या रूपात पाच हजार किंवा त्याहून अधिक रक्कम भरण्यास आलेल्या खातेदारांना बुधवारीही मनस्ताप सहन करावा लागला. योग्य पुराव्यांअभावी अनेकांची पैसे भरण्याविनाच बोळवण करण्यात आली. त्यावरून खातेदार आणि बँकेचे अधिकारी यांच्यामध्ये वादविवादांचे नाट्यही रंगत होते. दुपारनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय गुरुवारपासूनच लागू होईल, असे बँकांतर्फे सांगण्यात आले.
बाद नोटा खात्यात भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत अवधी असताना, रिझर्व्ह बँकेने अचानक फतवा काढून खातेदारांना आपल्याच खात्यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जुन्या नोटांच्या रूपात भरायची असल्यास किमान दोन बँक अधिकाऱ्यांना पटेल असा लेखी खुलासा देणे बंधनकारक केले होते. तसेच बँकेला हा खुलासा कायमस्वरूपी जतन करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मंगळवारपासूनच या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येत होती. मंगळवारी अनेक ग्राहकांना परत पाठविण्यात आले. बुधवारीही अनेकांना परत पाठविण्यात आल्यावर दुपारनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय मागे घेतला. केवायसी प्रक्रिया पूर्ण असलेल्या खातेदारांना कितीही रक्कम भरण्याची परवानगी दिली. मात्र, हा निर्णय झाला असला, तरीही तो गुरुवारपासून लागू होईल, असे सांगून अनेक बँकांनी खातेदारांना परत पाठवले. मोजक्याच बँकांनी दुपारनंतर पाच हजारापेक्षा अधिक रक्कम स्वीकारली.
काही बँकांनी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेवर निर्बंध लागू झाल्यानंतर आपल्या सिस्टिममध्ये तसे बदल केले होते. बुधवारी दुपारी हा निर्णय झाल्याने या सिस्टिममध्ये तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक होते. तशी सुधारणा बँकेच्या कामकाजाच्या वेळात न झाल्याने अशा खातेदारांची गुरुवारी येण्यास सांगून बोळवण केली गेली.

कार्यान्वित एटीएमची संख्या वाढली
शहरातील आणखी काही एटीएम बुधवारपासून सुरू झाली. आतापर्यंत शहरातील अंदाजे ४० टक्के एटीएम कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काहीशा कमी झाल्या आहेत. मात्र, रोकड टंचाईमुळे यातील बहुतांश एटीएममध्ये एकदाच रोकड भरण्यात येत आहे. एकदाच भरलेली रोकड अवघ्या तासा-दीड तासात संपत आहे.
मंगळवारी बँकेत बाद नोटांच्या रूपात पैसे भरताना स्वराज पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी दिलेले स्पष्टीकरण त्यांनी ट्विटरवरही टाकले. ‘मी आठ नोव्हेंबरनंतर माझ्या खात्यात एकही रुपया भरला नव्हता. त्यासाठी माझ्याकडे कोणतेही विशेष कारण नाही. रांगेत उभे राहण्यापेक्षा रांगा कमी होईपर्यंत थांबणे मला योग्य वाटते. पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेने ३० डिसेंबरपर्यंत खात्यात पैसे जमा करता येतील, त्यामुळे सध्या बँकांमध्ये गर्दी करू नका, असे सांगितले होते. त्यावर मी विश्वास ठेवला’, असे त्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकोरियांच्या बदलीमागे रिलायन्स जिओचा हात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केबलसाठी रस्तेखोदाई करताना रिलायन्स जिओ कंपनीने मनमानी पद्धतीने आणि बेकायदेशीर काम केल्याचा अहवाल पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आयुक्तांना दिला होता. ‘‌रिलायन्स’कडून पालिकेतील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असून, कंपनीतर्फे स्थानिक गुंडांची नेमणूक केल्याचेही बकोरिया यांनी आपल्या अहवालात म्हटले होते.
बकोरिया यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना लिहिलेले पत्र काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी समोर आणले आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बकोरिया यांच्या बदलीमागे रिलायन्स कंपनी तर नाही ना, असा संशय बालगुडे यांनी‌ पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
‘रिलायन्स जिओ’ला रस्ते खोदाईसाठी पालिकेने काही अटींवर परवानगी दिली होती. मात्र कंपनीचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन बकोरिया यांनी पाहणी अहवाल फेब्रुवारी महिन्यात आयुक्तांना दिला होता. बकोरिया यांनी अहवाल दिल्यानंतर काही महिन्यांतच त्यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. विशेष म्हणजे बकोरिया यांना महापालिकेत तीन वर्षांचा कालावधी मिळणे आवश्यक असताना केवळ दोन वर्षातच त्यांना हटविण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच महापौर प्रशांत जगताप यांनीही बकोरिया यांच्या बदलीमागे रिलायन्सचा हात असल्याचा दावा केला होता. त्यातच बकोरिया यांचे पत्रच समोर आल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘जिओ’ची दादागिरी
- वडगावशेरीत इंजिनीअर खोदाई पाहणीसाठी आला असता, त्याला धमकाविण्यात आले.
- स्थानिक गुंडांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना धमक्या.
- खोदकामासाठी कंपनीकडून बालमजुरांचा वापर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार कार्ड नसल्यास शिष्यवृत्तीचा लाभ नाही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येतील आणि त्यासाठी संबंधित कॉलेज जबाबदार असेल, असे आदेश उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी व पदवीव्युत्तर शिक्षणासाठी केंद्र सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज अपडेशनसाठी कॉलेजांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये अर्जाबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक आवश्यक असून या क्रमांकाशी त्याचे खाते लिंक असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज बाद करण्यात येईल व त्यास कॉलेज जबाबदार असेल, असे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्याबरोबरच संबंधित माहिती पुढील तीन दिवसांत न आल्यास त्यानंतर आलेल्या माहितीचा विचार केला जाणार नसल्याचेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना सक्ती नाही. मात्र, ऑफलाइन माहिती मागविताना ‘आधार’ची सक्ती केल्याने पुणे विभागीय सहसंचालक डॉ. नारखेडे यांनी काढलेल्या पत्राबाबत शिक्षण वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images