Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘नियोजन’साठी १०२ अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

​जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १०२ अर्ज आले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या क्षेत्रांतून सदस्यांची निवड होणार आहे.
महापालिका क्षेत्रासाठी २१, जिल्हा परिषदेसाठी १७ आणि नगरपालिका क्षेत्रासाठी दोन जागा आहेत. २९ ऑगस्टला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारीची मुदत आठ सप्टेंबर आहे. १८ सप्टेंबर रोजी​ मतदान आणि १९ सप्टेंबरला मतमोज​णी केली जाणार आहे.
पुणे महापालिकेतून भाजपतर्फे १४ नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून वीरसेन जगताप आणि सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी दिली गेली आहे. खुल्या गटातून राजू लायगुडे, जयंत भावे, उमेश गायकवाड, अजय खेडेकर, मनिषा कदम, शीतल सावंत, वृषाली चौधरी आणि ज्योती गोसावी यांचा समावेश आहे. ओबीसी प्रवर्गातून धनराज घोगरे, दीपक पोटे, स्वप्नाली सायकर आणि गायत्री खडके यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, चांदबी नदाफ आणि वैशाली मराठे यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिवसेनेतर्फे अविनाश साळवे आणि पल्लवी जावळे हे उमेदवार आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भय्या जाधव, गफूर पठाण, दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, सुमन पठारे, सचिन दोडके, विशाल तांबे, दीपाली धुमाळ आणि अमृता बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट नोटिशीचे नवीन प्रकरण उघड

0
0

मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बिबवेवाडी येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा पाठवण्याच्या प्रकाराची पालिकेने शहानिशा केली असून, बनावट नोटिशीचे आणखी एक प्रकरण चौकशीसाठी आले आहे. ती नोटीस बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्थायी समितीत बनावट नोटिसा पाठविण्यात आल्याबाबत चर्चा झाली होती. या प्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये विश्‍वनाथ मोडगी यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केल्याचे सांगण्यात आले आहे. मोडगी यांच्या तक्रारीव्यतिरिक्त अन्य कोणतीही तक्रार प्राप्त झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
बनावट नोटिशीवर सहायक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जावक क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले आहे. तसेच या ​नोटिशीवर सहायक आयुक्त म्हणून सकपाळ या नावाची सही आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी गुन्हा दाखल झाला की नाही, याची शहानिशा केलेली नाही, की तशी कोणतीही माहिती अहवालात नमूद केलेली नाही.
जागरूक नागरिक मोडगी यांनी बनावट नोटीस महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त कोणतीही बनावट नोटीस पालिकेच्या निदर्शनास आली नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादाचे ‘उड्डाण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये ‘फटाके’ फुटण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थित नुकत्याच झालेल्या बैठकीत भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाषण करण्यास मिळणार नसल्याचे समजताच एका उच्चपदस्थ नेत्याने बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याची जोरदार चर्चा आहे. तर, फ्लेक्सबाजी होऊन वाद चिघळू नये, यासाठी फ्लेक्सचा ‘शिस्तबद्ध’ पॅटर्नही ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चांदणी चौकात पाचशे कोटी रुपये खर्चाच्या बहूमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन येत्या रविवारी (२७ ऑगस्ट) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनात बापट यांनी लक्ष घातले असून आढावा घेण्यासाठी त्यांनी महापौर बंगल्यावर बैठक घेतली होती. स्थानिक नगरसेवक, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील (एनएचएआय) अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमात भाषण कोण-कोण करणार, याबाबत चर्चा झाली, तेव्हा भाजपच्या नेत्याने भाषण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मात्र, ‘केंद्र सरकारचा कार्यक्रम असून त्यांचा प्रोटोकॉल असतो, त्यानुसारच कार्यक्रमाची रूपरेषा राहील,’ असे त्यांना ऐकविण्यात आले. त्यामुळे हा नेता तेथून निघून गेल्याचे समजते.

या पुलाचे काम एनएचएआय करणार असले,तरी आजूबाजूची सर्व कामे पालिका करणार आहे. मात्र, महापालिकेला कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येत नसल्याने नाराजीचा सूर होता. दरम्यान, उड्डाणपुलाचा ‘श्रेयवाद’ होर्डिंग्जद्वारे दिसणार नाही, यासाठी होर्डिंग्जचे डिझाइनही तपासून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा उड्डाणपूल खडकवासला विधानसभा तर बारामती लोकसभा मतदार संघात येतो. या पार्श्वभूमीवर श्रेयवादाची रंगत पुणेकरांना पाहावयास मिळू नये, यासाठी वरिष्ठांनी फ्लेक्सवरही ‘सेन्सॉरशिप’ आणल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुद्धी दे, बुद्धी दे गणनायका…

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणपती बाप्पा तुम्ही आलात… घराघरात आनंद, उत्साह आणि चैतन्य घेऊन आलात. शहराला आणि माणसांच्या मनाला आलेली मरगळ दूर करून उत्सवाचा ‘माहोल’ निर्माण करण्यासाठी आलात. आता आतापर्यंत लोक म्हणत होते, ‘यंदा काय नेहमीसारखं गणपतीचं वातावरण नाही बुवा…’ पण सकाळी ढोल-ताशांचा निनाद ऐकल्यावर, घराघरातून आरतीचे स्वर घुमू लागल्यावर आणि सगळ्या ‘टेन्शन’चं विसर्जन करून उकडीच्या मोदकांवर तब्येतीत ताव मारल्यानंतर हीच मंडळी गणरायाच्या उत्सवात नेहमीपेक्षा अंमळ अधिकच उत्साहाने सहभागी होतील.

‘धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता…’ हे म्हणतात ते अगदी खरंय बाप्पा. तुमचं नुसतं नाव उच्चारलं तरी वातावरण भारून जातं. मग तुमच्या येण्यानं आम्हाला किती आनंद होत असेल, हे तुम्ही समजू शकताच. अधिकाधिक फ्रेंड्स, लाइक्स नि कॉमेंट्सच्या जमान्यात आपल्याच नातेवाइकांपासून दूर होत चाललेल्या कुटुंबांना काही दिवसांसाठी का होईना, तुम्ही एकत्र आणणार. उपनगरात रहायला गेलेला कार्यकर्ता आवर्जून तुमच्यासाठी जुन्या मंडळात हजेरी लावणार. ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून संवाद साधणारी मंडळी मुद्दामून मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे तुमच्या दर्शनासाठी ‘लाइव्ह’ उपस्थित राहणार.

बाप्पा, तुम्ही सर्वज्ञ आहातच. सध्या काय चाललंय हे तुम्हाला मुद्दामून वेगळं सांगायची गरज नाही. मस्त पाऊस कोसळल्यामुळं यंदा पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीवरचं संकट तूर्त तरी टळलंय असंच वाटतंय; पण अनेक संकटं आ वासून उभी आहेत बाप्पा. दुःखहर्त्या गणराया त्यांच्यावरही काहीतरी तोडगा काढा देवा. एकीकडे अधिकाधिक ‘सोशल’ होणाऱ्या माणसांची माणुसकी हद्दपार होतेय, की काय असंच वाटायला लागलंय. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोक फोटो आणि शूटिंगमध्ये रमतायेत. मन मोकळं करायला जवळचं कोणी नाही, म्हणून लोक ‘सोशल मीडिया’वर संदेश टाकून आत्महत्या करतायेत. कोवळी पोरंही मृत्यूला कवटाळला लागलीयेत. देवा, बघतोयस ना काय चाललंय ते?

सध्या सगळीकडे ‘माफी’चा बोलबाला आहे. करमाफी, व्याजमाफी आणि कर्जमाफी… असं असतानाही आम्ही मात्र, बहुतेक वेळा मोकळ्या मनानं चुका मान्य करून माफी मागायला कचरतो. शब्दाला शब्द वाढत जातो आणि किरकोळ चुकांमुळं सारं काही बिनसतं. हे लंबोदरा, आम्हालाही दुसऱ्यांच्या चुका पोटात घालण्याची, समजून घेण्याची बुद्धी दे. तुम्ही बुद्धीची देवता आहेत. त्यामुळे ‘शुद्धी दे, बुद्धी दे आमच्या मना…’ हेच आमचं तुमच्याकडं मागणं आहे. अंशतः आणि तत्त्वतः नको, सरसकटच देऊन टाका. संकटी पावणाऱ्या आणि निर्वाणी रक्षणाऱ्या श्री गणराया, तुमच्यावरच आमची सारी भिस्त आहे. तेव्हा नेहमीप्रमाणेच आमच्या पाठिशी तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या… हीच प्रार्थना. बोला, गणपती बाप्पा मोरया…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी दिल्या गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. शक्ती, भक्ती आणि ऐक्याचा संगम साधणाऱ्या या उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील गणेशभक्तांना मोदींनी अस्खलित मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवसानिमित्त गुरुवारी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. मोदी यांनी यावेळी मराठीतून भाषणास सुरुवात केली. त्यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अचानकपणे मराठीत बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी या कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. त्यानंतर उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे सांगत मोदींनी भाषणाचा समारोप केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छांचे स्वागत केले. मोदींनी त्यांच्या टि्वटर अकाऊंटवरूनही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. तर, सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षं पूर्ण होताहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळं इतिहासात या तिन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्व आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजिथ कुमार, पुनीता अव्वल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या (आयसीएसआय) वतीने जून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या ‘एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम’ आणि ‘प्रोफेशनल प्रोग्रॅम ऑफ कंपनी सेक्रेटरीज’ या दोन परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. बेंगळुरूच्या रणजिथ कुमार दासा रमेश बाबू या विद्यार्थ्याने प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये आणि दिल्लीच्या पुनीता गोयलने एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅममध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये दुसरा क्रमांक रिषभ राज मेहता तर तिसरा क्रमांक अदिती निगम यांनी पटकाविला. तसेच, एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅममध्ये दुसरा क्रमांक प्रशांत वेमुला तर तिसरा क्रमांक रवी क्रिष्णई मलिपेड्टी यांनी पटकाविला. एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅममध्ये २.८९ टक्के विद्यार्थी दोन्ही मॉड्युलमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या मॉड्युलमध्ये ९.५० टक्के तर दुसऱ्या मॉड्युलमध्ये ९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये २.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत पहिल्या मॉड्युलमध्ये १०.४४ विद्यार्थी तर दुसऱ्या मॉड्युलमध्ये १७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, तिसऱ्या मॉड्युलमध्ये १७.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षार्थ्यांना सविस्तर निकाल www.icsi.edu या वेबसाइटवर पाहता येईल. पुढच्या दोन्ही परीक्षा २० ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार असून या परीक्षांसाठी नोंदणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने २५ सप्टेंबरपर्यत करता येणार आहे, अशी माहिती ‘आयसीएसआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष पवन चांडक यांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेशर हॉर्नपासून सुटका कधी?

0
0

पोलिसांकडून कारवाई वाढूनही प्रकार थांबेना; अपघाताची शक्यता

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : वाहनाचा मूळ हॉर्न आणि सायलेन्सर बदलून त्याऐवजी प्रेशर हॉर्न बसवून मोठा आवाज काढण्याची क्रेझ वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत केलेल्या जोरदार कारवाईनंतरही कायम आहे. या चित्रविचित्र आवाजांमुळे रस्त्यावरील अन्य वाहनचालक आणि पादचारी अचानक दचकत असून, वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार उत्पदन करतेवेळी अधिकृत एजन्सीने प्रमाणित केलेले हॉर्न आणि सायलेन्सर ग्राह्य धरले जातात. त्या वाहनामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘मॉडिफिकेशन’ केल्यास ते कायद्यातील तरतुदीचा भंग मानून कारवाई केली जाते. मात्र, शहरात ‘मॉडिफिकेशन’ केलेल्या वाहनांची संख्या बरीच मोठी असल्याचे प्रत्यक्ष रस्त्यावरील वाहतुकीची पाहणी केल्यावर दिसून येते. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये ‘मॉडिफिकेशन’ केल्याने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे. जून महिन्यापासून वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई वाढविण्यात आली आहे.
चालू वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत १६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. जूनपासून १४ ऑगस्टपर्यंत ६४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनाकारण हॉर्न वाजविणे, सतत हॉर्न वाजविणे, प्रेशर हॉर्न, सायलेन्सर बदलणे, सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजविणे आदींसाठी कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मोराळे यांनी दिली.

व्यावसायिकांवरच कारवाई
वाहनांना ध्वनिप्रदूषण करणारे प्रेशर हॉर्न आणि सायलेन्सर बसविण्याला मोटार वाहन कायद्यानुसार मनाई आहे. मात्र, त्यानंतरही हे प्रकार थांबत नसल्याने थेट हे हॉर्न आणि सायलेन्सर बसवून देणाऱ्या व्यावसायिकांवरच कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘डमी’ ग्राहक म्हणून दुकानांमध्ये जाऊन प्रेशर हॉर्न किंवा सायलेन्सरची चौकशी करावी. काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी वाहनाचे फॅन्सी नंबर प्लेट बनवून देणाऱ्या व्यावसायिकांना इशारावजा सूचना करून, नियमाप्रमाणे अधिकृत नंबर प्लेट बनविण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे प्रेशर हॉर्नची विक्री करणाऱ्यांना सूचना करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केली आहे.

वाहनांवर केलेली कारवाई
महिना वाहनसंख्या दंडाची रक्कम (रुपयांत)
जानेवारी १८ १२,६००
फेब्रुवारी २४ ११,५००
मार्च २३ १५,०००
एप्रिल १२ ६,४००
मे ८६ ३१,०००
जून २६९ १,१५,९००
जुलै ३३६ ९१,२००
ऑगस्ट ४१ १८,७००

वाहनांना प्रेशर हॉर्न आणि मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत वाढवले आहे. येत्या काळातही ही कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे.
अशोक मोराळे, उपायुक्त, वाहतूक पोलिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सल्लागारांचे सल्ले पालिकेला महागात

0
0

बहुतांश प्रकल्प अजूनही अपूर्णच

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे

शहराच्या विकासासाठी उभारले जाणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत, यासाठी पालिकेच्या वतीने खासगी सल्लागार कंपन्यांनी नियुक्ती केली जाते. अशा प्रकारच्या सल्लागारांकडून सेवा घेण्यासाठी पालिकेने आतापर्यंत ४२.१७ कोटी रुपये खर्चले आहेत. ज्या प्रकल्पांसाठी पालिकेने सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे, त्यातील अनेक प्रकल्प अद्याप पूर्ण न झाल्याने सल्लागारांचे सल्ले पालिकेला महागात पडल्याचे दिसून आले आहे.
पालिकेच्या वतीने विकास प्रकल्प राबविले जातात. या प्रकल्पांसाठी पालिका सल्लागार नेमते. महापालिकेने २००७पासून आजपावेतो ४८ विकास प्रकल्पांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या सल्लागारांना पालिकेने सुमारे ४२ कोटी रुपयांपेक्षा अधिक शुल्क दिले आहे. त्यातील १८ प्रकल्प पाणीपुरवठ्याशी संबंधित असून, उर्वरित ३० प्रकल्प उड्डाणपूल उभारणे, भुयारी मार्ग बांधणे, नदी सुधारणांसंदर्भात आहेत. त्यापैकी सुमारे २५ प्रकल्प विविध कारणांमुळे अपूर्ण आहेत. तर काही प्रकल्पांना थेट प्रकल्पग्रस्तांकडूनच विरोध झाल्याने कामे थांबली आहेत.
काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालिका प्रशासनाने वरीलप्रमाणे माहिती दिली. पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पाचा प्राथमिक अभ्यास करणे, तांत्रिक पाहणी करणे, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे, प्रकल्पाचे बांधकाम व उभारणीदरम्यान देखरेख करणे आणि प्रकल्प वेळेत कार्यान्वित करणे आदी कामांची जबाबदारी या सल्लागारांवर असते.
पालिकेने ज्या विकास प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे, त्यापैकी बहुतांश प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत. नगररस्ता, वडगावशेरी, खराडी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेला भामा आसखेड प्रकल्प, रेल्वे मार्गाखालून जाणारा हडपसर ते हांडेवाडी मार्ग, स. गो. बर्वे चौकातील ग्रेड सेपरेटर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील उड्डाणपूल, अशा अनेक प्रकल्पांमध्ये सल्लागारांच्या कामांचा अपेक्षित फायदा पालिकेला झालेला नाही. या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना शुल्क देण्याचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अजून सुरूच

0
0

३८४ वाडे धोकादायक अवस्थेत; पालिकेची कबुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा निम्मा संपला असला तरी पालिकेचे धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. मध्यवर्ती पेठांमध्ये सुमारे ३८४ वाडे धोकादायक अवस्थेत असून, त्यापैकी‌ ११३ वाड्यांमध्ये आजही नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेनेच प्रश्नोत्तरामध्ये या विषयी कबुली दिली आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नारायण, सदाशिव, शनिवार अशा सुमारे १६ पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. यातील अनेक वाडे धोकादायक अवस्थेत असून, वारंवार नोटीस देऊनही वाडे ‘जैसे थे’च आहेत. पावसाळ्यात हे वाडे कोसळण्याची भीती असते. त्यामुळे पालिका दरवर्षी धोकादायक वाड्यांची पाहणी करून नोटीस बजावितात. राहण्यास योग्य नसलेल्या आणि धोकादायक झालेल्या वाड्यांच्या मालकांना तसेच ‌‌तेथील भाडेकरूनंना पालिकेकडून नोटीस दिली जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून भाडेकरू वाडा सोडत नसल्याचे समोर आले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून संबधितांवर कारवाई करण्याची घोषणा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, निम्मा पावसाळा संपत आला तरीही धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मध्यवर्ती भागात एकूण ३८४ वाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी २२४ वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित पाहणी सुरू आहे. यापैकी १११ वाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ११३ धोकादायक वाडे रिकामे झाले नसल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी या विषयी विचारणा केली होती. काही नागरिक वाड्यांमध्ये भाडेकरू म्हणून ५० ते ६० वर्षापासून राहतात. वाडा सोडल्यास जागेवरील हक्क जाईल, ही भीती बहुतांश जणांच्या मनात असल्याने वाड्यांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार काही भाडेकरूंना त्यांच्या मागणीनुसार राहत्या घराचे चटई क्षेत्र प्रमाणपत्र (संबंधित वाड्यात भाडेकरूचे क्षेत्रफळ) देण्यात आले आहे. त्यामुळे भाडेकरूंचा त्यांच्या जागेवरील हक्क अबाधित राहणार असून, हे प्रमाणपत्र न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येणार आहे. तरीही भाडेकरू वाडे सोडण्यास तयार नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय थोरात पुरस्कार जाहीर

0
0

डॉ. पुरव, खटावकर, हर्षा शहा यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा ‘कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ यंदा महिला सक्षमीकरण चळवळीतील डॉ. मेधा पुरव-सावंत यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. पुरव यांच्यासह शिल्पकार विवेक खटावकर आणि रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनाही पुरस्काराने गौरविले जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
धनंजय थोरात यांची आज, शनिवारी पुण्यतिथी आहे. डॉ. पुरव या १९९३पासून बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. पुण्यातील बहुतांश सर्व आणि मुंबईतील सहाशे झोपडपट्टीत काम करणाऱ्या अन्नपूर्णा परिवाराच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
खटावकर इको-फ्रेंडली मूर्तींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी घडविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तवांग येथे साडेचौदा हजार फूट उंचीवर बसविला आहे. तसेच, त्यांनी आजपर्यंत आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा ब्राँझचा आठ फुटी पुतळा, बाबा महाराज सातारकर यांचे प्रतीपंढरपूर येथील म्युरल्स आणि पुतळे, प्रती शिर्डी येथील अन्नछत्राचा राजवाडा आणि चित्ररथ यासह विविध कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. शहा यांनी रेल्वे प्रवाशांच्या सोयींसाठी व सुरक्षित प्रवासासाठी, पुण्याहून अनेक नवीन गाड्या सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे. प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या कायम अग्रेसर असतात.
पुरस्कारांचे सप्टेंबर महिन्यात वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तोरण्या’वरील तलावात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तोरणा किल्ल्यावरील तलावात पोहताना विद्यार्थ्याचा शुक्रवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. यशवंत नागेश्वरराव गोलापुडी (वय १९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो कॉलेजमधील ग्रुपबरोबर ट्रेकिंगसाठी गडावर गेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत मूळचा तेलंगणचा असून, सध्या तो सिम्बयोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सुट्टी असल्यामुळे कॉलेजचे ५० विद्यार्थी शुक्रवारी खासगी बस करून तोरणा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. सकाळी अकरा वाजता त्यांनी गड चढायला सुरुवात केली. दुपारी एक वाजता ते गडावर पोहोचले. तेथील मेंगाई मंदिरासमोरील लहान तलावामध्ये पोहण्यासाठी काही विद्यार्थी उतरले. तलावातील पाणी अतिशय थंड असल्यामुळे सर्व जण लगेच बाहेर आले. पण, यशवंत पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडा-ओरडा केला. काही जणांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गाडीच्या चालकाला फोन करून घटनेची माहिती दिली. चालकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
माहिती कळताच पोलिस निरीक्षक विकास बडवे, विठ्ठल महांगरे, अजय साळुंके, विशाल मोरे आणि मावळा जवान संघटनेचे कार्यकर्ते गडावर गेले. सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांना तलावात यशवंतचा मृतदेह सापडला. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची माहिती यशवंतच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसनाचे पडसाद भूमिपूजनात उमटणार

0
0

उड्डाणपूल भूमिसंपादनात रहिवासी इमारती बाधित होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, या भूसंपादनामध्ये किमान बारा रहिवासी इमारती आणि पाच शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनाचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, त्याचे पडसाद उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘एनडीए’, मुळशी रस्ता, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि बावधन येथील जमिनी ‘सर्व्हिस लेन’साठी संपादित करण्यात येणार आहेत. शहर सुधारणा समितीपुढे रस्त्यासाठीच्या जमिनी संपादित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून, तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौकात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे ‘एनडीए’, मु‍ळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी वाहतुकीत बदल करावे लागणार आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्गावरून कात्रज, तसेच देहू रोडच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना ‘एनडीए’, मु‍ळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची आखणी बदलणार आहे. पालिका प्रशासनाने या अनुषंगाने नवीन पाच रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही रस्ते चक्राकार वाहतुकीद्वारे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
हे रस्ते नव्याने तयार करण्यासाठी जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. निवासी परिसरातून हे रस्ते तयार करण्यात येणार असून, त्यासाठी १२ इमारती पाडाव्या लागणार आहेत. या इमारतींमध्ये शंभरहून अधिक कुटुंबे वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जैववैविध्य उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित जागेमधून रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता पाच शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जात असल्याने त्यांचेही पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, रविवारी (२७ ऑगस्ट) होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघात हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. उड्डाणुपुलाचे भूमीपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी भूसंपादन करण्याबाबत पालिका फारशी गंभीर असल्याचे जाणवत नाही.

प्रस्तावित रस्ते
१) सर्व्हे नंबर ५५ बावधन (खुर्द) अ ते ब ३० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी
२) कोथरूड सर्व्हे नंबर ७५ आणि ७७ क-ड-इ-फ ११० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदीचे दोन लूप रस्ते व रोटरी
३) बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० आणि कोथरूड सर्व्हे नंबर ९९ ग ते घ २३० मीटर लांबी आणि नऊ मीटर रुंदी
४) बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० च ते छ ६० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी
५) बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० ज ते झ २२० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांनी गुणवत्ता राखावी

0
0

‘सीएम’च्या कानपिचक्या; शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी लवकरच धोरण;

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी कॉलेजांनी स्वायत्तता घेण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यापीठांनी लक्ष देऊ नये; हे त्यांचे काम नाही. विद्यापीठांनी गुणवत्तेत सातत्य राखण्याकडे लक्ष द्यावे,’ असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्य सरकार लवकरच धोरण तयार करेल, अशी माहिती त्यांनी ​दिली.
फडणवीस यांनी स्वायत्ततेबाबत केलेले विधान मुंबई विद्यापीठाच्या निकालाहून सुरू असणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर असल्याची शक्यता आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वारजे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाचे उदघाटन फडणवीस यांनी केले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी देव महाराज, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या शाळा व कॉलेजांमधील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक यांनी आपले एक दिवसाचे वेतन तसेच विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री निधीला देण्यात आला.
फडणवीस म्हणाले,‘राज्यात शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढवायचा असल्यास अधिकाधिक कॉलेजांनी स्वायत्तता घेण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. कॉलेजांना स्वायत्तता मिळाल्यास कॉलेज प्रशासनाला काम करण्याची मोकळीक मिळेल. मात्र, अधिकाधिक कॉलेज आपल्या अखत्यारित राहावेत, अशी राज्यातील विद्यापीठांची भूमिका असते. विद्यापीठांचे हे काम नाही. त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यात सातत्य राखावे. गेल्या तीन वर्षात राज्याची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी सुधारत आहे. यापूर्वी शिक्षणाच्या बाबतीत राज्याचा क्रमांक १३ ते १८ यामध्ये होता. मात्र, आता राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. राज्यातील ३६ हजार शाळा डिजिटली कनेक्ट झाल्या असून ३० हजार शाळा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत.’
‘सरकारी शाळांची परिस्थिती सुधारत असल्याने खासगी शाळांमधील विद्यार्थी तेथे प्रवेश घेत आहेत. मात्र, अशातच काही खासगी शाळा शुल्क घेऊन शिक्षण चांगले देत आहेत, तर काही शाळा केवळ भरमसाठ शुल्काची आकारणी करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्य सरकार धोरण तयार करत आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले. बापट म्हणाले,‘ शिक्षण घेण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजांची निर्मिती झाली आहे. मात्र, यातून समाज घडविण्यासाठी आवश्यक असणारे विद्यार्थी घडत नाहीत, याची खंत वाटते. याचा विचार येत्या काळात करावा लागेल.’
या वेळी सोसायटीच्या पुस्तिकेचे आणि वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रास्तविक केले.

तरच त्यांनी दिल्लीत जावे....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, देवेंद्र हे नरेंद्र होणार असतील तरच त्यांनी दिल्लीत जावे. अन्यथा राज्यातच थांबावे, असा सल्ला डॉ. एकबोटे यांनी दिला. शिक्षकांची भरती पुन्हा सुरू व्हावी, विद्यापीठ कायद्यातील अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात अशा प्रमुख मागण्या डॉ. एकबोटे यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरियर दरोड्यातील पाच आरोपी अटकेत

0
0

कमी वेळात पैसे कमविण्यासाठी टाकला दरोडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कसबा गणपती जवळील ‘क्विक कुरियर’च्या कार्यालयात सशस्त्र दरोडा घालणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात दक्षिण प्रादेशिक विभागाच्या दरोडा प्रतिबंधक पथकास यश आले आहे. त्यांच्याकडून एक पिस्तुल, सहा मोबाइल, रोख रक्कम, दुचाकी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या उद्देशाने त्यांनी हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.
उत्तमकुमार जसाराम माली (वय ३०), भैरूलाल हरिशंकर रावल ( वय २०), शंभुसिंग मूलसिंग सिंदल (वय २१) जितेंद्र असुसिंग राजपूत (वय २२) आणि जितेंद्र सुमेरसिंह राठोड (वय २४, सर्वजन रा. कस्तुरे चौक, रविवार पेठ, मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून, रावल हा कस्तुरे चौकात खानावळ चालवतो.
कसबा गणपतीपासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या ‘क्विक कुरियर’ वर पाच ते सहाजणांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ऐन गणपतीच्या काळात दरोडा पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास फरासखाना पोलिस, गुन्हे शाखेची विविध पथके आणि दक्षिण विभागाचे दरोडा प्रतिबंधक पथक करीत होते. त्या वेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांनी कुरियर कार्यालयातील कामगारांचे सोबत नेलेले मोबाइल तपासण्याचे काम सुरू करण्यात आले. सीसीटीव्हीतून मिळालेल्या गाडीच्या क्रमांकावरून आणि मोबाइल लोकेशनवरून शोध घेण्यात आला. त्या वेळी पोलिस कर्मचारी कृष्णा बढे, योगेश घाटगे यांनी मिळालेल्या माहितीवरून एकाला गुरुवार पेठेतील कस्तुरे चौकातून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अन्य चार जणांना सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे यांच्या पथकाने अटक केली.

पैसे कमविण्यासाठी कृत्य
कस्तुरे चौकात रावल हॉटेल महाराणा दरबार येथे खानावळ चालवतो. त्याच्याकडे आरोपी जेवण्यासाठी येत होते. या प्रकरणी फरारी असलेल्या आरोपीने कमी वेळात जास्त पैसा कमविण्याची योजना इतरांना सांगितली. सिंदल हा क्विक कुरियरमध्ये अधून-मधून पार्सल आणण्यासाठी जात होता. त्यामुळे त्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती होती. त्यांनी या ठिकाणी दरोडा टाकण्याचा योजना आणखी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैतन्य, मांगल्याच्या ‘सरी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रचंड आनंद आणि मांगल्याने भारलेल्या वातावरणात शुक्रवारी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले. बाप्पांच्या स्वागतासाठी पावसाच्या सरींनीही हजेरी लावली. सकाळी अचानक आलेल्या पावसाने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने बाजारात दाखल झाल्याने शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. ‘श्रीं’चे घरोघरी आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणरायाची यथासांग पूजा करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्येही दिवसभर श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शहर व उपनगरात आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या.

आवडत्या मोदकाचा प्रसाद गणरायाला दाखविण्यात आला. नंतर बाप्पाच्या भक्तांनी उकडीच्या मोदकांवर यथेच्छ ताव मारला. सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ वे) वर्ष असल्याने मंडळे तर फारच उत्सुक होती गणरायाच्या स्वागतासाठी.

मंडळांनी मोठ्या दिमाखात मिरवणूक काढून विघ्नहर्त्या विनायकाचे स्वागत केले. मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे वैभव. दगडूशेठ गणपती म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. मंडईची शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू, तर भाऊ रंगारीची मूर्ती गणरायाच्या शक्तिस्थानाचे प्रतीक. अशा या मंडळांबरोबर शहरातील उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या सर्व मंडळांच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले. मिरवणुकांमुळे शहरातील मध्यभागात उत्साहाला उधाण आले होते. काही मंडळांनी गणरायाच्या आगमनाबरोबर देखाव्यांचेही उद्घाटन केले. पुढील अकरा दिवस आता चैतन्याचे, आनंदाचे, सर्वांना जोडणारे आणि उत्सहाला उधाण आणणारे असणार आहेत. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन झाले. महानगरांसह शहरे, छोटी गावे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. राज्याच्या विविध भागात गणरायाच्या आगमनासाठी पावसाने हजेरी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनकवडे यांचे पद रद्दचा निर्णय मागे

0
0

पुणे : धनकवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर ऊर्फ बाळू धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मागे घेतला. हायकोर्टाने धनकवडे यांच्या याचिकेवर निकाल देताना त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या फेरपडताळणीचे आदेश दिल्याने आयुक्तांनी यापूर्वी काढलेला त्यांचाच आदेश रद्द केला.

धनकवडी-आंबेगाव पठार प्रभाग क्रमांक ३९मधून धनकवडे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातून विजयी झाले आहेत. त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने फेटा‍ळल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश काढला होता. त्यांनी या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले होते. या दरम्यान, महापालिका प्रशासनाने धनकवडी-आंबेगाव पठार प्रभाग क्रमांक ३९च्या नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातून पोटनिवडणूक जाहीर केली होती.

धनकवडे यांनी या पार्श्वभूमीवर हायकोर्टात पुन्हा दाद मागितली होती. हायकोर्टाने जात पडताळणी समितीला धनकवडे यांच्याकडे असलेले नवीन पुरावे दाखल करून घेण्याचे आदेश देत जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यप्रमुख नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेला पूर्णवेळ मुख्य आरोग्य अधिकारी मिळावा, यासाठी पालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून आरोग्य अधिकाऱ्याबरोबरच दहा तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरतीही केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून १९ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडीनंतर सहा वर्षानंतर पालिकेला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेचे आरोग्य प्रमुख हे पद रिक्त आहे. पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद भरण्यात आलेले नाही. डॉ. परदेशी यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी हे पद राज्य सरकारकडील अधिकाऱ्यांना द्यावे, तसेच सरकारने त्या ठिकाणी प्रमुख आरोग्य अधिकारी नेमावा, अशी मागणी महापालिकेकडून सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, राज्याकडून कोणीही अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने येण्यास तयार नसल्याने हे पद रिक्तच आहे. पालिका आयुक्तानंतर महत्त्वाचे पद म्हणून आरोग्यप्रमुख हे पद असल्याने हे पद भरण्यासाठी पालिकेने आपल्या स्तरावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य प्रमुख हे पद भरले जात नाही, तोपर्यंत या या पदाची जबाबदारी पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे आणि डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅमिली कोर्टात केसेस वाढल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु झाल्यानंतर याठिकाणी दाखल होणाऱ्या केसेसची संख्या वाढली आहे. यापूर्वी फॅमिली कोर्टात रोज दहा-बारा केसेस दाखल होत होत्या. मात्र हे आता हे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. भारती विद्यापीठ भवन येथे जाऊन केस चालविण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टीस करणारे बहुतांश वकील कौटुंबिक स्वरुपाच्या केसेस घेणे टाळत होते. मात्र, आता शिवाजीनगर कोर्टाजवळच फॅमिली कोर्टाचे कामकाज सुरू झाल्यामुळे वकिलांच्या सोयीचे झाले आहे.

भारती विद्यापीठ भवन येथे सातव्या आणि नवव्या मजल्यावर यापूर्वी फॅमिली कोर्टाचे कामकाज चालविण्यात येत होते. मात्र कोर्टाच्या कामकाजासाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे नवीन इमारतीची गरज भासू लागली होती. फॅमिली कोर्टासाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत कोर्टाचे कामकाज आता सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नव्याने कामकाज सुरू करण्यात आल्यानंतर दाखल होणाऱ्या केसेसची संख्याही वाढू लागली आहे. यापूर्वी कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसची संख्या दहा-बारा इतकीच होती. मात्र आता दाखल होणाऱ्या केसेसची संख्या वाढली आहे.

फॅमिली कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसमध्ये घटस्फोट, परस्परसंमतीने घटस्फोट, मुलांचा ताबा, पतीकडून पोटगीसाठी दावा, अशा प्रकारच्या केसेस दाखल होतात. पुण्यातील फॅमिली कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसमध्ये परस्परसंमतीने दाखल होणाऱ्या घटस्फोटाच्या केसेसची संख्या अधिक आहे. नवीन इमारतीत कामकाज सुरू झाल्यानंतर या ठिकाणी दाखल होणाऱ्या केसेसची आकडेवारी वाढली आहे, अशी माहिती फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी दिली.

भारती विद्यापीठ भवन येथे सुरू असलेल्या फॅमिली कोर्टात यापूर्वी शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टीस करणारे नामांकित वकील, ज्येष्ठ वकील जाणे टाळत होते. फॅमिली कोर्टासंदर्भात येणाऱ्या केसेस टाळण्याचे प्रमाण अधिक होते. कारण त्यासाठी वकिलांकडे पुरेसा वेळ नव्हता. मात्र, शिवाजीनगर कोर्टाजवळ फॅमिली कोर्ट सुरू झाल्यामुळे पक्षकार आणि वकिलांच्या सोयीचे झाले आहे. फॅमिली कोर्टात आता शिवाजीनगर कोर्टातील वकीलही प्रॅक्टीस करण्यासाठी जाऊ शकतील. त्यामुळे आता या ठिकाणी दाखल होणाऱ्या केसेसची संख्या वाढल्याचे चित्र काही दिवसांत दिसेल. या ठिकाणी आता नवोदित वकिलांनाही प्रॅक्टीसच्या संधी उपलब्ध होतील, असे पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी सांगितले.

शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टीस करत असलेल्या वकिलांना फॅमिली कोर्टात जाऊन प्रॅक्टीस करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. भारती विद्यापीठ भवन येथे जाऊन पार्किंगसाठी जागा शोधणे, सातव्या आणि नवव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची वाट पाहणे यात बराच वेळ जात असते. त्यामुळे फॅमिली कोर्ट आणि शिवाजीनगर कोर्ट या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी प्रॅक्टीस करताना अडचणी येत असत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या गणेशोत्सवातील एक आगळी ओळख असलेल्या पुणे फेस्टिव्हला गणरायाच्या आगमनाबरोबर सुरुवात होत आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज, शनिवारपासून पुणे फेस्टिव्हलचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा होणार असून संपूर्ण गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद घेता येईल.

कार्यक्रमांना आजपासून बालगंधर्व रंगमंदिरात सुरुवात होणार आहे. तर महोत्सवाचे उद्‍‍घाटन १ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता गणेश कला क्रीडा येथे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी दिली. महोत्सवादरम्यान विविध मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहेत.

दुर्वे म्हणाले, ‘२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अंधकलाकार ‘अपूर्व मेघदूत’ ही संगीत नृत्यनाटिका सादर करणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता ‘तदैव लग्नं’ हे मराठी नाटक, तर ३० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता ‘कथकांजली’ हा नृत्याचा अविष्कार सादर होईल. ३१ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता ‘नादब्रम्ह कॉन्सर्ट’ सादर होईल. १ सप्टेंबर रोजी महोत्सवाचे उद्‍‍घाटन होणार आहे. २ सप्टेंबरला ‘एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडे..’ ही नृत्यनाटिका सादर होईल.

दरम्यान २८, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत इंद्रधनू कार्यक्रम सादर होईल. तसेच २६, ३०, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ‘उगवते तारे’ हा कार्यकम सादर होईल. सर्व कार्यक्रम खुले आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणशेत धरण १०० टक्के भरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संततधारेमुळे पानशेत धरण हे शंभर टक्के भरल्याने खडकवासला धरणात दिवसभरात सुमारे चार हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणाचा पाणीसाठा सुमारे ९१ टक्के झाला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास शनिवारी (दि. २६) सकाळी या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणातून मुळा नदीत दिवसभरात सुमारे तीन हजार ६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यातील पानशेत आणि पवना या धरणांसह नीरा देवघर, चासकमान, डिंभे, कळमोडी, कासारसाई आणि आंद्रा ही आठ धरणे शंभर टक्के भरली आहेत.

‘पानशेत धरण परिसरात झालेल्या पावसामुळे या धरणातून दिवसभरात सुमारे चार हजार क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरण सुमारे ९१ टक्के भरले गेले आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून शनिवारी सकाळी पाणी सोडण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या गणपतींचे या दिवशी विसर्जन असल्याने धरणातून पाणी​ सोडावे लागणार आहे.’ असे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. ‘पवना धरणातून मुळा नदीमध्ये दिवसभरात सुमारे तीन हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला,’ असे ते म्हणाले.

वरसगाव धरण सुमारे ९० टक्के भरले गेले आहे. टेमघर धरण सुमारे ४० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी डिंभे धरण पूर्णपणे भरले गेले आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा १२.४७ टीएमसी झाला आहे. कळमोडी धरणही भरले असून, या धरणाच्या पाणीसाठ्याची क्षमता सुमारे दीड टीएमसी आहे. चासकमान धरणात सुमारे ७.५७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, हे धरण शंभर टक्के भरले गेले आहे. आंद्रा धरणात २.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कासारसाई धरणात ०.५६ टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. नीरा देवघर धरणही धरले आहे. या धरणात ११.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरण सुमारे ९५ टक्के भरले आहे.

गणपतीच्या स्वागताला पावसाची हजेरी

पुणेकरांबरोबरच पावसानेही शुक्रवारी सकाळपासूनच हजेरी लावून गणरायाचे स्वागत केले. सूर्योदयापासून शहराच्या सरी पडत होत्या. दुपारनंतर काही भागात जोराचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यात पावसाचा मुक्काम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शुक्रवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणेशमूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ झाली. मानाच्या गणपतींसह शहरातील बहुतांश गणेश मंडळाचे मिरवणुकीच्या नियोजनावर पावसाने पाणी फिरवले. दुपारी पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे मंडळांनी मिरवणुका संध्याकाळपर्यंत पुढे ढकलल्या. शहरात सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images