Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेरपरीक्षेचा निकाल २४.९६ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २४.९६ टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक ३७ टक्के लागला असून मुंबईचा निकाल सर्वांत कमी म्हणजे १८.७४ टक्के लागला आहे.

पूर्वी मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. त्याऐवजी आता जुलै महिन्यातच परीक्षा घेऊन ऑगस्ट अखेरपर्यंत या विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश देण्यात येणार आहे. फेरपरीक्षेचे यंदाचे तिसरे वर्ष होते. सन २०१५ मध्ये परीक्षेचा निकाल २१.५९ टक्के, तर २०१६मध्ये २७.०३ टक्के लागला होता.

यंदा एक जुलै ते १० जुलै दरम्यान प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा, तर ११ ते १८ जुलै दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस नऊ विभागीय मंडळांमधून ९४ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार २८३ म्हणजेच २४.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे आणि सचिव के. बी. पाटील यांनी दिली.

परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. येत्या गुरुवारी (२४ ऑगस्ट) दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांना २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील. तर उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी २२ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतील. विद्यार्थ्यांना आता तीनऐवजी सहा विषयांसाठी उत्तरपत्रिकांचे पूनर्मूल्यांकन करता येणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना विभागीय मंडळात अर्ज करावा लागेल. या परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत फेब्रुवारी मार्च २०१८मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बसता येईल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धक्का लागल्यामुळे तरुणाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुचाकी पार्क करीत असताना ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला जबर मारहाण केली. त्यानंतर परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांची नासधूस केल्याची घटना जंगली महाराज मंदिरासमोर नुकतीच घडली. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज मंदिरासमोर एक तरुण शनिवारी दुपारी त्याची दुचाकी पार्क करत होता. त्याच्या गाडीचा धक्का एका ज्येष्ठ नागरिकाला लागला. त्याने ज्येष्ठ नागरिकाची माफी मागितली. मात्र, तेथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्याच्याशी वाद घालून त्याला हाताने, हेल्मेटने मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. त्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत माजवून येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, या प्रकरणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

खडक परिसरातील एका सराईताला दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिले. प्रवीण उर्फ चंक्या विलास साळवे (वय २७, रा. हरकानगर, भवानी पेठ) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन, खुनाचा प्रयत्नाचा एक, दुखापत करण्याचा एक असे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी २०१४मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार डॉ. बसवराज तेली यांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले

कट्ट्यावर बसलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व गंठण असा ६५ हजार रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लंपास केल्याची घटना बाणेर येथे शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ६७ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला या रात्रीच्या जेवणानंतर बाणेर रोडवर ग्रीन पार्क हॉटेलच्या गेटजवळ असलेल्या कट्ट्यावर बसला होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व एक छोटे गंठण असा ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसका मारून तोडून नेला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, दुचाकीवरील चोरांनी तोवर धूम ठोकली होती. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन नगरसेवकांवर टांगती तलवार

$
0
0

जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर करण्याची मुदत संपुष्टात

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर केलेला नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्यांत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला निवडणूक कार्यालयात सादर करणे नियमाने बंधनकारक आहे. त्यानुसार या महापालिकेत २२ ऑगस्टपर्यंत दाखला जमा करण्याची मुदत होती. या कालावधीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या ५८ पैकी ५५ जणांनीच दाखला सादर केला आहे. त्यामुळे उर्वरित तीन नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यामध्ये कुंदन गायकवाड, कलम घोलप आणि यशोदा बोईनवाड यांचा समावेश आहे. हे तिघेही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यापैकी गायकवाड यांचा दावा बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, गायकवाड यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. तर, घोलप आणि बोईनवाड यांनी स्थगिती आदेश मिळविल्याचा दावा प्रशासनाकडे केला आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या १२८ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी अट घालण्यात आली होती. तसे पत्रही यासंदर्भात निवडणूक विभागाने संबंधितांना पाठविली होती. त्यानुसार जुलै महिन्यात २२ जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल केले. आजअखेर ५५ नगरसेवकांनी दाखला सादर केला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत चिखली प्रभागातून अनुसूचित जाती प्रवगार्तून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात दावा अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन सरकारची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

गायकवाड यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवगार्तून निवडणूक लढविली होती. त्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी हरकत घेतली होती. त्यावर बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणीही झाली. या समितीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी टी. एम. बागुल, उपायुक्त तथा सदस्य व्ही. एस. शिंदे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एम. जी. बाठ यांनी सर्व कागदपत्रांची पाहणी करुन, दक्षता पथकाचा अहवाल विचारात घेऊन गायकवाड यांचा दावा फेटाळून लावला. तसेच खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकाने कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या प्रकरणी हायकोर्टातून स्थगिती मिळविली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.
.....
दाखल्यांसाठी धावपळ
काही नगरसेवकांच्या प्रमाणपत्राविषयी वाद चालू आहेत. बुलढाणा, औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जात पडताळणी समित्यांकडून या नगरसेवकांची जात प्रमाणपत्र पडताळणी दाखले आणण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू होती. तसेच ज्या नगरसेवकांची महापालिकेत प्रमाणपत्रे आली नाहीत. त्यांची दाखल्यासाठी धावपळ चालू होती. यशोदा बोईनवाड (प्रभाग क्रमांक सहा - धावडे वस्ती), कमल घोलप (प्रभाग क्रमांक १३ - यमुनानगर, निगडी) यांनी स्थगिती आदेश मिळविल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याची प्रत प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती, असे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रशांत आष्टीकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्मादाय’द्वारे संस्थांची ऑनलाइन नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध संस्थांची नोंदणी करण्यासाठी आता धर्मादाय आयुक्तालयात नागरिकांसह विश्वस्तांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्याऐवजी धर्मादाय आयुक्तालयाकडे ऑनलाइन अर्ज करताच तातडीने नोंदणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागणारे कार्यालय म्हणून धर्मादाय आयुक्तालयाची ख्याती होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ‘धर्मादाय आयुक्तालय आता विश्वस्तांच्या दारी’ अशी योजना राबविण्यात आली. त्यामुळे विश्वस्त आणि धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुसंवाद निर्माण झाला. त्या संवादातून विश्वस्तांच्या विविध अडचणी सुटू लागल्या. त्या अडचणी सोडविताना विविध पर्याय राबविण्यात येऊ लागले आहेत. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान राज्यातील धर्मादाय आयुक्तालयांमध्ये विश्वस्तांमधील वाद सोडविण्यासाठी दाखल करण्यात आलेले खटले निकाली काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात विविध कागदपत्रांअभावी काही खटले प्रलंबित असल्यास कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे खटले चालविण्यास कंटाळलेल्या विश्वस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यापाठोपाठ धर्मादाय आयुक्तालयाने अनेक संस्था संघटनांना त्यांच्या संस्थेच्या नोंदणीसाठी, कागदपत्रांसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्यास मनाई केली. कागदपत्रे सादर करून नोंदणी करण्याशिवाय थेट ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली. त्यामुळे काही संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ‘फर्टिलिटी सोसायटी अॅन्ड रीसर्च अॅकेडमी’ या संस्थेनेदेखील ऑनलाइन अर्ज करून संस्थेची नोंदणी केली. त्या संस्थेचे ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते संस्थेच्या विश्वस्तांना देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. भारती ढोरे पाटील, तसेच डॉ. शाहबाज दारुवाला यांनी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र स्वीकारले. सहायक धर्मादाय आय़ुक्त कांचन जाधव यांच्यामार्पत ही नोंदणी करण्यात आली. त्या वेळी सहआयुक्त शिवाजीराव कचरे, अॅड. पराग एरंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचा चेहरामोहरा बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापा‌लिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी शाळांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. शाळांसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी कृती आराखडा पालिकेने तयार केला आहे. यासाठी सुमारे ३१ कोटी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण आणि विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा यावर सतत चर्चा होत असते. गेल्या महिन्यात झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी शिक्षण विभागाच्या कामाचे वाभाडे काढून प्रशासनावर जोरदार टीका केली होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे पालिका हजारो रुपये खर्च करीत असतानाही त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली होती. यानंतर पालिका प्रशासनाने शिक्षण विभागाकडील २८७ शाळांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये सुमारे २० वेगवेगळ्या प्रकारच्या असुविधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत जवळपास सर्वच शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असुविधा आढळून आल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी सांगितले.

शाळांच्या तपासणीसाठी पालिका प्रशासनाकडून एक अधीक्षक अभियंता, दोन उपअभियंते, तर पाच कनिष्ठ अभियंत्याचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने दोन आठवड्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यानुसार, या शाळांच्या सुधारणांसाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा सादर केला आहे. या सर्व सुधारणांसाठी सुमारे ३१ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून या सुधारणांसाठीही स्वतंत्र अधिकारी नेमून या कामाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविला जाणार असल्याचे उगले यांनी सांगितले.

वीस घटकांची तपासणी

पालिकेच्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या या पथकाने शाळांचा रंग, शाळांमधील स्वच्छतागृहांची संख्या, त्यांची सद्यस्थिती, शाळेचे छत, उपलब्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, मैदानांची स्थिती, सुरक्षा रेलिंग, शाळांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा साधणे, अग्निशमन यंत्रणा, वर्गखोल्यांची स्थिती, अशा वेगवेगळ्या २० घटकांची तपासणी करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे प्रत्येक शाळेत करावे लागणारे काम आणि त्यासाठीच्या खर्चाचा आराखडा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तयार करण्यात आला आहे. प्राधान्यक्रम देऊन हे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरयाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात चिंचवड येथून श्री मंगलमूर्तींच्या पालखीने मोरगावच्या दिशने मंगळवारी प्रस्थान ठेवले.
भाद्रपद यात्रेनिमित्त चिंचवड येथून श्री मंगलमूर्तीच्या पालखीचे परंपरेप्रमाणे प्रस्थान होत असते. त्यानिमित्त दुपारी बारा वाजता मंगलमूर्ती वाड्यातून पालखी महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी देव आणि भक्त यांची भेट घडविण्यात आली. त्यानंतर पूजा करण्यात आली. महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त आनंद तांबे, विनोद पवार, विश्राम देव, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, गजानन चिंचवडे या वेळी उपस्थित होते. चिंतामणी धुपारती मंडळाचे सदस्य कौस्तुभ रबडे, मनोहर बेणारे, नारायण लांडगे, रमेश देव, विनायक पवार आदींनी संयोजन केले.
पूजेनंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गजलक्ष्मी मंडळाच्या ढोलपथकाने परिसर दणाणून गेला. हरिपाठ मंडळाच्या भक्तगणांनी भजन म्हटले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकाने मिरवणुकीत रंगत निर्माण केली. पालखी मिरवणुकीने देवधर सोसायटीत नेण्यात आली. त्यानंतर पालखी पुण्यात एकनाथ मंगल कार्यालयात मुक्कामासाठी रवाना झाली. बुधवारी (२३ ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजता पालखी सासवडकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर जेजुरीला मुक्कामाला जाईल. येथून दोन दिवसानंतर मोरगावला पोहोचणार आहे. गणेश चतुर्थीच्या पूजेनंतर ती मोरगावातून पुन्हा चिंचवडकडे प्रस्थान करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेरेंच्या चौकशीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांच्यावर भ्रष्टाचार; तसेच कामातील अनियमिततेबाबत परिषदेतील अशासकीय सदस्यांनी शिक्षण विभागाकडे जवळपास ११ लेखी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची दखल घेऊन शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी डेरे यांची चौकशी करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे अध्यक्ष असलेल्या त्रिसदस्यीय समितीला येत्या ३१ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वायत्त संस्था असलेल्या राज्य परीक्षा परीषदेत शासकीय अधिकाऱ्यांसोबतच अशासकीय अधिकारी काम करत आहेत. अशासकीय सदस्य असलेल्या रमेश खानविलकर यांनी डेरे यांच्या कामाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्त डॉ. शर्मा यांना पत्र दिले आहे. खानविलकर यांनी दिलेल्या पत्रात परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे हे अतिशय भ्रष्ट अधिकारी असून ते अनियमित काम करत आहेत. तसेच, त्यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. डेरे यांनी ‘गजानन एंटरप्रायजेस’ या ‘थर्ड पार्टी’ एजन्सीचा एक वर्षाचा करार २०१५ मध्येच संपला असतानादेखील अधिकार नसताना लाखो रुपयांची कामे दिली. याच एजन्सीच्या काळात कृषी सेवक परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. याबरोबरच कोणत्याही ‘थर्ड पार्टी’ एजन्सीला बिलाशिवाय लाखो रुपये दिले, अनेकांच्या नावावर लाखो रुपयांचे धनादेश बिलाशिवाय काढले, वाहन दुरुस्ती, पेट्रोल डिझेलची बोगस बिले दाखवून लाखो रुपये घेतले, विनाटेंडर कोणतेही काम आपल्या मर्जीतील कंपन्यांना दिले व औरंगाबाद या ठिकाणी ५२ शिक्षकांची नेमणूक भ्रष्ट मार्गाने केली आहे, असे आरोप केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार डेरेंवर आरोपांच्या सुमारे ५० तक्रारी तावडे व नंदकुमार यांच्याकडे गेल्या होत्या. त्यामुळे नंदकुमार यांनी शिक्षण आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. मात्र, म्हमाणे यांनी चौकशी करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. आता डॉ. शर्मा यांनी म्हमाणे यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे डेरे चौकशीच्या फेऱ्यात सापडले असून त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.


सुखदेव डेरे हे अतिशय भ्रष्ट अधिकारी असून त्यांच्या काळात परीक्षा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोनदा निलंबित करण्यात आले असून त्यांच्या दोन विभागीय चौकशीदेखील सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आता निलंबित न करता बडतर्फ करण्यात यावे.

- रमेश खानविलकर , अशासकीय सदस्य, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद


‘अद्याप लेखी पत्र नाही’

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘रमेश खानविलकर यांनी माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन आणि खोटे आहे. आयुक्त म्हणून मला परीक्षांच्या विविध कामांबाबत मान्यता घेता येत नाही. परिषदेच्या अध्यक्षांच्या मान्यतेनुसारच कामांबाबत निर्णय घेतले आहे. या सर्वांच्या बिलाबाबत अहवाल आणि माहिती शिक्षण विभागाला वेळोवेळी दिली आहे. ‘थर्ड पार्टी’ला कंपनीला देऊ केलेल्या बिलाशी माझा संबंध नाही. सर्व व्यवहार नियमाप्रमाणे झाले आहेत. माझ्यावर चौकशी नेमल्याची माहिती मला अद्याप नसून परिषदेकडेदेखील याबाबत लेखी पत्र आलेले नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकविरा गडावर दरड कोसळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा
लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला येथील एकविरा गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. लोणावळा परिसरात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे दरड कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
लोणावळा परिसरात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे सोमवारी एकविरा देवीच्या मंदिराशेजारी असलेल्या एकविरा ट्रस्टच्या खोलीजवळ दरड कोसळली. मंदिराजवळील डोंगर कपारींमधील एक मोठा दगड व इतर दगडगोटे डोंगराच्या पायऱ्यांवर व समोर आच्छादलेल्या जाळीवर पडले. या घटनेत पायऱ्यांचे आणि आच्छादनाचे नुकसान झाले आहे.
वेहरगाव-एकविरा येथील एकविरा गडावर प्राचीन कार्ला लेणी व एकविरा देवीचे मंदिर आहे. मागील काही वर्षांपासून गड परिसरात सैल झालेल्या दरडी व मातीचा भराव कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गड परिसराला धोका निर्माण झाला आहे.
...
वन विभाग ढिम्मच
मागील काही दिवसांपासून पावसामुळे गडावरील एकविरा मंदिर परिसरात दगड व माती ठिसूळ झाल्याने मंदिरा‍च्या वरील भागातील डोंगरातून दरड पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन वर्षांपासून गडावर दरड तसेच लहान मोठे दगड पडणे, भराव व संरक्षण भिंतीचे दगड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग व वन विभाग यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वार्षिक सभा सभासदांशिवाय

$
0
0

‘मसाप’च्या आजीव सभासदांना निमंत्रणच नाही
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आधुनिक आणि पारदर्शी कारभाराचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमंत्रण आजीव सभासदांना पाठवलेच नाही. मोफत संदेश पाठविण्याची आज अनेक माध्यमे असताना वाद नको म्हणून ठराविक सभासदच उपस्थित कसे राहतील, हे पदाधिकाऱ्यांनी पाहिले. अगदी मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत सोमवारी ही सभा गोंधळाविना उरकण्यात आली. सभा झाल्याचे अनेक सभासदांच्या गावीही नव्हते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. या सभेसाठी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात केवळ तीस-चाळीस सभासदांची उपस्थिती होती.
साहित्य परिषदेचे सुमारे बारा हजार आजीव सभासद आहेत. या सर्व सभासदांना सभेसाठी पत्र पाठविणे खर्चिक असले तरी मोफत संदेश पोहचवणारी अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत. मोफत एसएमएस सेवा किंवा व्हॉटसअॅप ब्रॉडकास्ट लिस्ट अशा माध्यमांचा आधार घेता येत असताना परिषदेने सभेची जाहिरात आपले मुखपत्र असलेल्या साहित्य पत्रिकेच्या गेल्या महिन्याच्या अंकात प्रसिद्ध केली. मात्र अनेक सभासदांना पत्रिकेचा अंक नियमित मिळत नसल्याने सभेचे निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहचलेच नाही. गेली तीन-चार महिने अंक मिळालाच नसल्याचे एका सभासदाने ‘मटा’ला सांगितले.
औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंतप्रतिनिधी आणि मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला भाडेतत्त्वावर जागा आणि देणगी दिली. त्यांच्यासह काही महत्त्वाच्या देणगीदारांची नावे लावण्यासाठी इमारतीवरचे साहित्य परिषद हे नाव वगळावे, असा अजब ठराव हाणून पाडण्यात आला. देणगीदारांनी आमचे नाव प्रसिद्ध होऊ देऊ नका, असे सांगितले होते. पण त्यांचे ऋण मान्य करण्यासाठी काहींचे छायाचित्र लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
वेबसाइट, यूट्यूब, व्हॉटसअॅप या माध्यमाद्वारे साहित्य परिषद ऑनलाइन झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या माध्यमांचा पुरेपूर उपयोग होतो आहे का, आणि सभासदांना त्याचा फायदा होतो आहे का, असे प्रश्न यंदाच्या सभेमुळे उपस्थित झाले आहेत. संदेश सर्वांपर्यंत गेला आणि सभेसाठी गर्दी झाली तर व्यवस्थेवर ताण येईल तसेच विरोधकांमुळे गोंधळ उडेल, या शक्यता गृहित धरून ही सभा मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत उरकण्यात आल्याची चर्चा आहे.
--------
दिल्ली विद्यापीठाचा निषेध ठराव
दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमातून मराठी विषय वगळल्याच्या प्रकाराचा सभेमध्ये निषेध करण्यात आला. हा विषय ‘मटा’ने लावून धरला होता. अभ्यासक्रमातून मराठी विषय वगळणे ही घटना देशातील एकतेला बाधा आणणारी आहे, असे सांगून डॉ. रावसाहेब कसबे यांनी निषेधाचा ठराव मांडला. दिल्ली विद्यापीठाला हा निषेध ठराव पाठविण्याचा हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट’ची योजना

$
0
0

राज ठाकरे यांनी सादर केला विकासकामांचा आराखडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात पाच नाट्यगृहे..., प्रायोगिक नाटकांसाठी स्वतंत्र रंगमंच..., नदीपात्रालगत लहान मुलांसाठी फुलराणी..., मैलापाणी शुद्धीकरणासाठी यंत्रणा..., नौकाविहार अशा अनेक संकल्पनांद्वारे बालगंधर्व रंगमंदिर ते म्हात्रे पुलादरम्यानच्या नदीपात्राचा विकास करण्याचे स्वप्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी दाखवले.

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असली, तरी शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी हा आराखडा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सादर केला. ठाकरे यांची ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट’ची संकल्पना समजून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पालिकेतील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार आवर्जून उपस्थित होते. मुठा नदीपात्राच्या विकासाचे सादरीकरण केल्यानंतर ठाकरे यांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून त्यासाठी निधी कसा उभारता येईल, याची माहिती दिली.

बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात सध्या एकच नाट्यगृह आणि कलादालन असून, त्याचा विस्तार करण्याची योजना ठाकरे यांनी मांडली आहे. रंगमंदिराच्या उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर करून आठशे ते हजार आसन क्षमतेची पाच नाट्यगृहे या ठिकाणी उभारता येतील. यामध्ये, प्रायोगिकसाठी वेगळ्या व्यवस्थेसह खुला रंगमंचही असेल, अशी कल्पना त्यांनी मांडली. बालगंधर्व रंगमंदिरापासून ते म्हात्रे पुलापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूस नागरी सुविधेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. यामध्ये, गणपती विसर्जनासाठी घाटांची व्यवस्था करण्यापासून ते स्वच्छतागृहे आणि वाहनतळांचा समावेश असेल. मैलापाणी नदीत सोडले जाऊ नये, यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, नौकाविहाराचा आनंद नागरिकांना घेता येऊ शकेल, असा दावा ठाकरे यांनी सादरीकरणादरम्यान केला.

बालगंधर्व ते म्हात्रे पुलादरम्यानच्या या संपूर्ण प्रकल्पासाठी ८४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आणि पुण्यातील अनेक उद्योजकांनी निधी देण्याची तयारी दर्शवली असून, एखाद्या ट्रस्टच्या माध्यमातून नदीपात्राच्या संपूर्ण विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे ठाकरे यांनी नमूद केले. या ट्रस्टवर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह पुण्यातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...
राज्यात किंवा महापालिकेत कोणाची सत्ता आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसून, शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, हेच उद्दिष्ट आहे. शहराच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करणार आहे.
- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिग्गजांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘शिवचरित्रावरील प्रदर्शन’ आणि ‘जाणता राजा’ हे महानाट्य या दिल्लीतील कार्यक्रमांच्या उद्घाटनांचे निमंत्रण बाबासाहेबांनी मोदींना दिले. सुमारे अर्धा तासाच्या भेटीत इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या; पण दोघांनीही राजकारण हा विषय बाजूलाच ठेवला. बाबासाहेबांनी पंतप्रधानांना शिंदेशाही पगडी आणि शाल भेट दिली. पगडी त्यांनी आपल्या हाताने पंतप्रधानांच्या डोक्यावर चढवली.

बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसोबत सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या जहाँगीर कला दालनात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शन काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन आता दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. बाबासाहेब त्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. ६ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शन; तसेच ९ ते १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत दिल्ली येथे ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांचे उद्घाटन पंतप्रधानांनी करावे, अशी बाबासाहेबांची इच्छा आहे. या इच्छेपोटीच मंगळवारी भेटीचा योग जुळून आला.

या भेटीचे छायाचित्र पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवर काही वेळातच प्रसिद्ध झाले. ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची भेट हा आनंददायी क्षण होता. आमचे अनेक वर्षांचे स्नेहाचे नाते आहे. बाबासाहेबांनी काही पिढ्या शिवाजी महाराजांच्या जीवनाशी जोडल्या आहेत,’ असे गौरवोद्वगार पंतप्रधानांनी टि्वटद्वारे काढले.

या भेटीबाबत स्वत: बाबासाहेबांनी ‘मटा’ला माहिती दिली. ‘दुपारी सव्वा बारा वाजता आम्ही भेटलो. सुमारे अर्धा तास इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर चर्चा झाली. राजकारणावर चर्चा झाली नाही. चित्रप्रदर्शन व महानाट्याचे प्रयोग ही कल्पना पंतप्रधानांना आवडली. या दोन्ही कार्यक्रमांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, यासाठी त्यांना निमंत्रण दिले. महानाट्याचे प्रयोग लाल किल्ल्यासमोर व्हावे, अशी आमची इच्छा असली, तरी ठिकाण अजून ठरलेले नाही. या भेटीचा आम्हा दोघांनाही आनंद झाला,’ असे बाबासाहेबांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेची पालिकेत घोषणाबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘हे गणराया सत्ताधाऱ्यांना उधळपट्टी न करण्याची सुबुद्धी दे,’ या शिवसेनेच्या घोषणाबाजीला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीही ‘सबुद्धी दे सुबुद्धी दे शिवसेनेला सुबुद्धी दे,’चा नारा दिला.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सव महापालिका साजरा करत असून त्यामध्ये पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत होता. गणरायाचा मुखवटा परिधान केलेल्या शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासोबत गटनेते संजय भोसले आणि त्यांचे सहकारी महापौरांसमोर येऊन उभे राहिले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली.

शिवसेनेच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपनेही केली होती. भाजपचे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांसमोर येऊन उभे राहिले आणि त्यांनीही शिवेसनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. भाजपच्या नवोदित फळीने शिवसेनेविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यामध्ये प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दिलीप वेडेपाटील, सम्राट थोरात, अमोल बालवडकर, तसेच वर्षा तापकीर, मंजूश्री खर्डेकर आदी सदस्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे बाळा ओसवाल, पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, नाना भान​गिरे, संगीता ठोसर, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजी जोरदार सुरू होती. अखेर गणेशाची आरतीही या वेळी करण्यात आली. दरम्यान, या गदारोळातच सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, शिवसेना भामा आसखेड पाणी योजनेला विरोध करत असून त्यांचा निषेध करणारा ठराव भाजपचे कर्णे गुरूजी यांनी या गोंधळातच मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहेरभाईंची लढाई पुढे नेऊ

$
0
0

श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी केला निश्चय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ताहेरभाई पूनावाला हे मिश्किल स्वभावाचे होते. ते वैचारिक निष्ठा कायम ठेवून समृद्ध जीवन जगले. ते कार्यकर्ते म्हणून जेवढे मोठे तेवढे त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठे होते. त्यांची लढाई खूप ताकदीने पुढे नेण्याची गरज असून ती आम्ही पुढे नेऊ,' अशा शब्दांत विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ ताहेरभाई पूनावाला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी ताहेरभाईंच्या आठवणींना उजाळा दिला. जेष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन, डॉ. हमीद दाभोलकर, ताहेरभाईंच्या पत्नी डॉ. झैनब पूनावाला, कन्या शबनम पूनावाला, नात सना पूनावाला या वेळी उपस्थित होते.
‘ताहेरभाई यांना कसलाही अहंकार नव्हता. त्यांना गप्पा मारायला खूप आवडत. त्यांनी नेहमी माणसे जोडली. स्वतःसाठी काहीही न मागता ते दुसऱ्यांच्या आयुष्यात सतत आनंद फुलवत राहिले,’ अशा शब्दांत आढाव यांनी ताहेरभाईंच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला उजाळा दिला.
सुभाष वारे म्हणाले, ‘ताहेरभाई यांचे चळवळीला मोठे वैचारिक पाठबळ होते. ते कार्यकर्ते म्हणून जेवढे मोठे तेवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे होते. त्यांची लढाई खूप ताकदीने पुढे नेण्याची गरज आहे.’
सय्यदभाई म्हणाले, ‘ताहेरभाई नेहमी समोरच्या माणसाचा आदर करीत. काम करणारी माणसे त्यांना फार आवडत. तत्त्व आणि परिवर्तन विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.’
‘ताहेरभाई यांचा प्रवास खूप खडतर होता. वैचारिक निष्ठा कायम ठेवून ते समृद्ध जीवन जगले. त्यांनी विचारात कधी तडजोड केली नाही. वैचारिक वाद झाले तरी व्यक्तिगत पातळीवर मैत्री कायम जपली,’ असे अन्वर राजन यांनी सांगितले.
‘ताहिरभाई समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी झटत होते. प्रवाहाविरूद्ध जाऊन परिस्थितीला तोंड देत. हे आम्हाला कौतुकास्पद वाटे. ते नेहमी काम करत राहिले. कधी तक्रार, निराशा नाही. त्यांनी कधीही हार मानली नाही,’ अशी भावना विलास वाघ यांनी व्यक्त केली. रत्नाकर महाजन, झैनब पूनावाला, सना पूनावाला आदींनी या वेळी श्रद्धांजली वाहिली.
..
माझे बाबा खूप वेगळे होते. त्यांचा स्वभाव मनमोकळा होता. एखाद्या विषयावर वाद होत असताना ते कधी माघार घेत नसत. मात्र, ते समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी कायम देत असत.

- शबनम पूनावाला, (ताहेर पूनावाला यांची कन्या)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी ५७ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थोरले बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाड्यासमोरील पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा दगडी बांधकामामध्ये नव्याने तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी ५७ लाख ५४ हजार रुपयांची निविदा मंजूर केली आहे. त्यामध्ये शनिवारवाड्याच्या भिंतीलगत ‘लँडस्केपिंग’करून लॉनही विकसित करण्यात येणार आहे.

बाजीराव पेशेवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा दगडी बांधकामाचे आकर्षक अशा डिझाइनमध्ये तयार करण्यात येणार आहे. बाजीराव पेशवे यांच्या गेल्या आठवड्यात जयंतीदिनी पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दुरवस्थेमु‍ळे पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या ठिकाणची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम तत्काळ हाती घेतले आहे.

शनिवारवाडा येथे पायाभूत सुविधा तयार करण्यातर्गंत ही कामे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पटांगणातील ​दुरुस्ती, सुशोभिकरण, पुतळ्याच्या चौथाऱ्याची दुरुस्ती, तसेच बैठक व्यवस्थेची कामे करण्यात येणार आहे. ही सर्व कामे चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने या कामाच्या ५७ लाख ५४ हजार रुपयांच्या निविदांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. या निविदेस स्थायी समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गेल्या आठवड्यात बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दुरावस्थेबाबत टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याच्या दुरुस्तीच्या सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी दिल्या होत्या. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात एकाही लढाईत पराजित न झालेल्या बाजीरावांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळ नसल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, स्थानिक नगरसेवक हेमंत रासने यांनी या पुतळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण, दुरुस्ती यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्तित्व टिकवणारे काम करा

$
0
0

अभिनेता सुबोध भावे यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जीवनात सर्वच क्षेत्रात अस्तित्वाची लढाई असते. अस्तित्व झाडासारखे असते. कितीही उंच वाढले, तरी जमिनीशी नाते तोडत नाही. कलाकाराचे आयुष्य संकुचित पद्धतीने घडवू नये. तोडफोडीसाठी कल्पकता लागत नाही, मात्र जोडणे अवघड असते. सकारात्मक विचार करा. कलाकार, मूर्तीकार, गायक किंवा माणूस म्हणून तुम्ही जे काम करता ते इथेच ठेवून जावे लागते. ठेवून गेलेल्या कामाच्या आनंददायी खुणा म्हणजे अस्तित्व असते. म्हणून अस्तित्वाच्या खुणा राहतील असे काम करा,’ असा कानमंत्र सुप्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘अस्तित्व २०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भावे बोलत होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, वृषाली महाजन, प्रसाद बर्वे उपस्थित होते.

‘स्पर्धेचे विनाकारण दडपण घेतले जाते. आपण जिंकतो पण त्यातून शिकत नाही. यापेक्षा जो हारतो पण खूप काही शिकतो, तो खऱ्या अर्थाने जिंकत असतो. अपयशी होण्यात काही दुःख नाही. एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे म्हणजे स्पर्धा असते. ती आपली आपल्याशीच असते, दुसऱ्यांशी तुलना करणे योग्य नाही. माझ्या कालपेक्षा आजचा मी व उद्याचा मी महत्त्वाचा असतो,’ अशा सल्ला भावे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

रावळ म्हणाले, ‘आपल्या देशाचा सांस्कृतिक ठेवा जतन, विकसित आणि वृद्धिंगत करणे, हा ‘अस्तित्व’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या वर्षी पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रश्नमंजूषा, नृत्य, गायन, चित्रकला, छायाचित्रण, रेखाटन, कोलाजकार्य, डूडल मेकिंग, मेहंदी, निबंध आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपहरण करून सराफाला लुटणाऱ्यांना तिघांना अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्राप्तीकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून, खंबाटकी घाटातून सराफाचे अपहरण करून दोन कोटी ९० लाखांचे सोन्याचे दागिने लुटल्याचा गुन्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३३ किलो घाऊक व दहा किलो निव्वळ वजनाचे सोने असा दोन कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंबाटकी घाटातून त्यांना भोर-महाड मार्गावरील हिर्डोशी हद्दीत घेऊन जात असताना शनिवारी सायंकाळी लुटण्यात आले होते.
शंतनू नितीन डांगे (वय ३२, रा. सदिच्छा अपार्टमेंट, नवसाह्याद्री, कर्वेनगर), संदीप ज्ञानेश्वर राजीवडे (३२) व राहुल बाळकृष्ण धवले (२८, रा. ढोणे अपार्टमेंट, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, महेश साळुंखे (३०, रा. कात्रज) हा फरार आहे. या प्रकरणी सराफ व्यवसायिक मीत शहा (रा. निपाणी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिस ठाण्यात अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे सोन्याचे दागिने तयार करून सराफ व्यवसायिकांना विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सराफ व्यवसायिकांना सोन्याच्या दागिन्यांचे डिझाइन दाखवून त्यप्रमाणे दागिने बनवून देतात. १९ ऑगस्ट रोजी मीत शहा व त्यांची आई सोन्याचे दागिने घेऊन चारचाकी गाडीने पुण्यावरून निपाणीला निघाले होते. खंबाटकी घाटात आल्यानंतर त्यांच्या गाडीला लाल दिव्याच्या चारचाकीने थांबविले. त्या गाडीमधून उतरलेल्या व्यक्तींनी ‘आम्ही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आहोत, आमच्याबरोबर पुण्याला चला’ असे सांगण्यात आले. त्यानंतर शहा व त्यांची आई तसेच चालक यांना गाडीतील सामानासह आपल्या गाडीत घेतले. भोर-महाड मार्गावर हिर्डोशीला गेल्यावर मीत शहा आणि त्यांच्या आईला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळची दागिन्यांची पिशवी, रोख रक्कम, मोबाइल असा ऐवज चोरट्यांनी घेऊन पसार झाले होते. चालकाने त्याच्या मोबाइलवरून शहा यांच्या नातेवाइकांना हा प्रकार कळविला.
या प्रकरणी पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपींनी वापलेल्या कारचा क्रमांक खेड शिवापूर टोलनाक्यांच्या सीसीटीव्हीत सापडला. त्यानंतर त्यावरून गाडीची माहिती काढली असता ती कार मालकाने सर्व्हिसिंगला दिल्याचे समोर आले. त्यानुसार गॅरेजमालकाचा शोध घेतल्यानंतर आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
भोर-महाड रस्त्यावर लुटल्यानंतर आरोपी ऐवज घेऊन जात असताना वरंधा घाटाच्या खाली त्यांना रायगड पोलिसांची नाकाबंदी दिसली. आरोपीनी त्यांच्याकडील कार न थांबवता तशीच पुढे नेली. परंतु, त्याच्या पुढेही नाकाबंदी असेल आणि पोलिस पकडतील म्हणून त्यांनी कार एका कच्च्या रस्त्याने आत नेली. त्या रस्त्यावर उभ्या मोडकळीस आलेल्या ट्रकमध्ये सर्व सोन्याचे दागिने व ऐवजाच्या पिशव्या टाकून आरोपी पळून गेले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी भोर आणि खंडाळा पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील चोरीस गेलेली ३३ किलो घाऊक व दहा किलो निव्वळ असे दोन कोटी ९० लाख रुपयांचे दागिने जप्त केले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून, त्याला मिळालेल्या टिपवरून त्याने ही योजना आखल्याचे तपासात समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदावा वित्त आयोगातून ‘झेडपी’ला ७६ कोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
चौदाव्या वित्त आयोगातून २०१७ ते १८ या वर्षांसाठी ग्रामपंचायतीसाठीचा सुमारे ७६ कोटी २२ लाख ९८ हजार रुपयांचा पहिला हफ्ता जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पायाभूत विकास करण्यासाठी मदत होणार आहे.
चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७ ते १८ या वर्षांसाठीच्या पहिला हफ्त्यासाठी १२९ कोटी ८५ लाख ५ हजार रुपयांचा निधी राज्याला देण्यात आला आहे. हा निधी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमार्फत ग्रामपंचायतींना देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. त्याबाबत राज्याने निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना हा निधी वितरित करण्यात आला आहे.
‘चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्राकडून प्राप्त झालेले अनुदान ग्रामपंचायतींना द्यायचे आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यासाठीचा ७६ कोटी ९८ लाख २२हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. हा निधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून लवकरच ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येणार आहे. हा निधी आरटीजीएस पद्धतीने करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली.
‘वित्त आयोगाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेला २०१५ ते १६ आणि २०१६ ते १७ या वर्षांसाठी २२८ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे. त्यानंतर २०१७ ते १८ या वर्षीचा एकूण सुमारे १०० कोटींपैकी ७६ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जिल्ह्याला मिळाला आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना पायाभूत विकासांची कामे करता येतील. त्याशिवाय गावातील विविध विकासकामांवर लक्ष केंद्रीत करता येईल. अजून अनुदानाचा एक हफ्ता जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे,’ अशी माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
या निधीपैकी ९० टक्के निधी हा पायाभूत विकासांसाठी; तर १० टक्के निधी हा प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी खर्च करायचा आहे. गावाची नेमकी गरज काय आहे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखडा लोकप्रतिनिधी व इतर घटकांच्या माध्यमातून करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा, असे अपेक्षित आहे, याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते झाडण्यासाठी दहा कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्ते झाडण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याची ओरड सर्वच क्षेत्रीय कार्यालयांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने दहा कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. ही रक्कम पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना विभागून देण्याचा निर्णयही या वेळी झाला.

झाडण्याच्या कामासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्यामुळे नगरसेवकांकडून तक्रारींचा ओघ सुरू झाला होता. सहयादीतील पैसे घ्या. मात्र, आमचा प्रभाग झाडून द्या, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. रस्ते झाडण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यासाठी होणारी मागणी पाहता दहा कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. हे वर्गीकरण सायकल ट्रॅक आणि सायकल खरेदी याअंतर्गत करण्यात आले असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या अर्थसंकल्पात ‘स्वीपिंग’ मशिन घेण्याचा निर्णय घेतला होता. ‘स्वीपिंग’ मशिन घेण्यात येणार असल्याने ठेकेदारांना देण्यात येणाऱ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात कमी करण्यात आली होती. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनाही आयुक्तांच्या निर्णयानुसार सफाईसाठीची आर्थिक तरतूद कायम ठेवली होती. मात्र, ‘स्वीपिंग’ मशिन वेळेत न घेण्यात आल्याने सध्या सफाईकामासाठी ​पुरेसा निधी नसल्याची ​ओरड होत होती. या पार्श्वभूमीवर झाडणकामाच्या वर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘स्वीपिंग मशिन’ खरेदी करण्यासाठीची आर्थिक तरतूद तशीच ठेवण्यात आली आहे. सायकल खरेदी आणि सायकल ट्रॅक या तरतुदीमधून वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्येही सायकल ट्रॅक करण्याची तरतूद कमी करण्यात आलेली नाही. सायकल ट्रॅक तयार झाल्यानंतरच सायकल खरेदी होणार आहे. त्यामुळे सायकल खरेदीच्या तरतुदीमधून वर्गीकरण करण्यात आले असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘स्वीपिंग’ मशिन घेण्यास अद्याप काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे. मशिन घेण्याचा निर्णय झाला असला, तरी त्याच्या निविदा अद्यापपर्यंत काढण्यात आलेल्या नाहीत. काही प्रभागात ठेकेदारांच्या कामगारांना पैशांची बचत करण्यासाठी अर्ध वेळ कामावर बोलावण्यात येत आहे. पुढील दोन महिने असलेले पैसे पुरवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. शहरातील रस्ते झाडण्यासाठी ‘स्वीपिंग’ मशिनचा पर्याय शोधण्यात आला आहे. या मशिनीने शहरातील निम्मे रस्ते झाडण्यात येणार आहेत. तसेच, उर्वरित रस्ते हे ठेकेदारांकडून झाडून घेण्याचे नियोजन आहे. ‘स्वीपिंग’ मशिन येण्यास लागलेला वेळ, सफाईकामांसाठी कमी करण्यात आलेला निधी, यामुळे सध्या गोंधळाचे वातावरण होते.

महापालिकेकडे ७० कोटींची थकबाकी

विकासकामे करताना ठेकेदारांकडून गौणखनिज उत्खननापोटी वसूल करण्यात येणारी रॉयल्टी पुणे महापालिकेने गेल्या दोन वर्षांत सरकारी तिजोरीत जमा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेकडे सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी असून, संबंधित रक्कम जमा करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी​ सौरभ राव यांनी महापालिकेला पाठविले आहे. ही रक्कम न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी​ उत्खनन करण्यात येते. त्यामुळे संबंधित गौणखनिज वापरावर रॉयल्टी आकारली जाते. ती रक्कम सरकारकडे जमा करणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून संबंधित ठेकेदार ​किंवा कंपनीकडून रॉयल्टी वसूल केली जाते. ती रक्कम सरकारी तिजोरीत जमा करणे बंधनकारक असतानाही पुणे महापालिकेने आजतागायत ही रक्कम जमा केलेली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या दोन वर्षांत सुमारे ३६ कोटी २८ लाख ६९ हजार ४१७ रुपये जमा केले आहेत. मात्र, पुणे महापालिकेने रक्कम भरली नसल्याने जिल्हाधिकारी राव यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून ही रक्कम भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुणे महापालिकेकडे सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, ही रक्कम देण्यात महापालिकेकडून चालढकल करण्यात येत आहे. संबंधित रक्कम भरण्यासाठी जिल्हाधिकारी राव यांनी गेल्या दोन वर्षांत महापालिका आयुक्तांना चार ते पाच स्मरणपत्रे पाठविली आहेत. तरीही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा पत्र पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या दोन वर्षांतील रॉयल्टी भरली आहे. पुणे महापालिकेला स्मरणपत्रे पाठवूनही कार्यवाही झालेली नाही. या महापालिकेकडे सुमारे ६० ते ७० कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम न भरल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या तीन नगरसेवकांचे पद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे तीन सभासद निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीत पालिकेत आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरले असून त्यांना पालिकेच्या कामकाजामध्ये आता सहभागी होता येणार नसल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

महापालिकेची निवडणूक आरक्षित प्रभागातून लढविणाऱ्या आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ज्या उमेदवारांनी ही पडताळणी केलेली नाही, त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरतानाच त्याचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाते. महापालिकेच्या निवडणुकीत १६२ पैकी ६८ जागा आरक्षित होत्या. या जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सहा महिन्यांची मुदत मंगळवारी संपली. या मुदतीत भाजपच्या दिशा माने, कविता वैरागे, वर्षा साठे आणि आरती कोंढरे या चार नगरसेवकांना पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करता आले नाही. यातील कोंढरे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित नगरसेवकांनी आपले पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर न केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरले असल्याचे पालिका आयुक्त कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत या तीन नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना आता पालिकेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही, तसेच त्यांना पालिकेच्या सेवा-सुविधाही मिळणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तीन नगरसेवकांचे पद रद्द ठरणे हा भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आरक्षित जागेवरून विजयी झालेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांत प्रशासनाकडे आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे, असा नियम निवडणूक आयोगानेच घालून दिलेला आहे. या मुदतीत कागदपत्रे सादर न करणाऱ्या उमेदवारांचे पद आपोआपच रद्द होते.

कुणाल कुमार, पालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरचा बाप्पा आज साकारण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

येत्या दोन दिवसांतच प्रत्येकाच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर घरी विराजमान होणारा बाप्पा आपणच साकारला तर, त्याचा आनंद नक्कीच अवर्णनीय असेल... याच विचाराने ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने शाडूमूर्तीचा बाप्पा बनवण्याची कार्यशाळा आज, बुधवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

शाडू माती पाण्यात पूर्णपणे विरघळते. त्यामुळे घरामध्ये बादलीत पाणी घेऊनही आपण घरच्या बाप्पाचे विसर्जन करू शकतो. त्यामुळे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा गणेश साकारण्याची कला या कार्यशाळेत शिकविण्यात येणार आहे. ही कार्यशाळा निगडीच्या ‘इन्स्पिरिया मॉल’मध्ये तिसऱ्या मजल्यावरील ‘थिएटर वर्कशॉप’ कंपनीच्या हॉलमध्ये होणार आहे. प्रशिक्षिक सरोज राव या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेसाठी येताना प्रत्येकाने ८ बाय ८ इंची लाकडाची फळी, पाण्याची बाटली, हात पुसायचे कापड, बाउल, पॅड, पेन्सिल, जुने वर्तमानपत्र, चार अथवा पाच नंबरचा ब्रश आदी साहित्य आणायचे आहे. ‘मटा कल्चर क्लब’च्या वतीने शाडू माती पुरवली जाईल.
ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून, सशुल्क आहे. कल्चर क्लबच्या सदस्यांना यात सवलत असणार आहे. कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी ९९७५४०४०२६, ९७६२४२९३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images