Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नदीपात्रातील राडारोडा उचलण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रोड) पर्यायी ठरणाऱ्या विठ्ठलवाडी-वारजे रस्ता बांधण्यासाठी १६ कोटी आणि आता तो काढण्यासाठी सहा कोटी रुपयांहून अधिकचा खर्च होणार असल्याने, या २३ कोटी रुपयांच्या नाहक खर्चातून नेमके पुणेकरांच्या हाती काय लागले, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या रस्त्यावर झालेल्या वारेमाप खर्चाची जबाबदारी निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांच्या वेतनातून तो वसूल केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

विठ्ठलवाडी ते वारजे पूल या नदीकाठच्या रस्त्याचा राडारोडा उचलण्यास शुक्रवारी महापालिकेने सुरुवात केली. पूररेषेत हा रस्ता तयार करण्यात आल्याचा ठपका ठेवून या भागात पालिकेने टाकलेला राडारोडा काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पालिकेला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने विठ्ठलवाडी ते वारजे पूल या दरम्यान नदीपात्राच्या कडेने रस्ता तयार केला आहे. सिंहगड रोडला पर्यायी रोड म्हणून हा रस्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. नदीपात्रातून जाणारा अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करताना पूररेषेच्या आत तब्बल ३५ हजार ट्रक राडारोडा टाकण्यात आला होता. यामुळे नदीची वहनक्षमता कमी होऊन नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याची याचिका पर्यावरणवाद्यांनी एनजीटीमध्ये दाखल केली होती. कोर्टाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने हे काम सुरू देखील केले होते. मात्र हे काम अर्धवट ठेवण्यात आले होते. हा रस्ता तयार करण्यासाठी १६ कोटी रुपये, तर केलेला रस्ता काढून टाकण्यासाठी सहा कोटी रुपये, असे आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हा खर्च संबधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या भागात पालिकेने टाकलेला राडारोडा तसाच पडून होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात एनजीटीने पालिकेचे कडक शब्दांत कान टोचले होते. एनजीटीच्या आदेशानुसार अखेर पालिकेच्या पथ विभागाकडून या भागातील रस्त्याच्या राड्यारोड्याचे सर्व्हेक्षण करून शुक्रवारपासून हा राडारोडा उचलण्यास सुरुवात करण्यात आली, अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली. लवकरच हे काम पूर्ण होइल, असेही त्यांनी सांगितले.

मटा भूमिका

पुणेकर नागरिकांनी दिलेल्या कररूपी पैशांतून कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारणे आणि काही काळाने ते चुकले म्हणून स्वतःच ते नष्ट करणे, असा पुणे महापालिकेच्या कारभाराचा अनुभव गेल्या काही काळात वारंवार आला आहे. हे प्रकल्प कायदेशीर नव्हते, तर ते उभारलेच कसे? वाया गेलेल्या पुणेकरांच्या पैशांची जबाबदारी कुणावर, हे आता निश्चित करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकमान्यांच्या प्रतिमेवरून वादंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांचीच प्रतिमा महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या लोगोमधून हद्दपार करण्याचा प्रताप पुणे महापालिकेने केल्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी याबाबत सारवासारव केली; परंतु तोपर्यंत लोकमान्यांची प्रतिमा गायब केलेले महापालिकेचे फ्लेक्स शहरभर त्यांच्या कारभाराची साक्ष देऊ लागले होते.
महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२५ व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शनिवारी) या महोत्सवाचे उद़्घाटन होत आहे. ‘राज्य सरकारच्या स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशाच्या नोंदीनुसार स्वातंत्र्यसैनिक कै. भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली असून, यंदाचे गणेशोत्सवाचे हे १२६ वे वर्ष आहे. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच उत्सवाचे जनक असून, लोकमान्य टिळक हे त्याचे प्रचार व प्रसारक होते,’ असा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने केला आहे. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी महोत्सवाच्या ‘लोगो’मधून लोकमान्य टिळक यांचाच फोटो गायब करण्याचा पवित्रा महापालिकेच्या कारभाऱ्यांनी घेतला.
मात्र, त्यावरून शहरात वादंग उठले. काँग्रेस, शिवसेना; तसेच केसरी गणेशोत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक यांनी महापालिकेच्या या निर्णयाचा समाचार घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या एका पर्वाचे नेतृत्व ज्या टिळकांनी केले, त्यांचा फोटो महानगरपालिका वापरत नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली. समाज हा उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावा, यासाठी लोकमान्यांनी प्रयत्न केले. टिळकांच्या विचाराला १२५ वर्ष पूर्ण होत असताना त्यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळाली पाहिजे, यासाठी टिळकांची प्रतिमा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये असणे आवश्यक असल्याची भूमिका रोहित टिळक यांनी मांडली.
आरोप तथ्यहीन ः महापौर
गणेशोत्सवातील लोगोबाबत पसवण्यात आलेल्या गैरसमजामध्ये तथ्य नसल्याचा खुलासा महापौर मुक्ता टिळक यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पुणे महापालिकेतर्फे यंदा विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी स्वतंत्र लोगोही तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसामान्यांना जोडण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमा या फ्लेक्स, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी; तसेच जाहिरातींमध्ये वापरण्यात आल्या आहेत.’ परंतु शहरभर लागलेल्या फ्लेक्समध्ये लोकमान्यांची प्रतिमा गायबच असल्याचे दृश्य ​आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी वित्तविभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी शुक्रवारी (११ ऑगस्ट) विधानसभेत दिली. ‘मटा’ने पुणे सुपर फास्ट या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि ‘मटा’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला राज्यमंत्री पाटील यांच्या उत्तरामुळे यश आले आहे. पिंपरी-चिंचवड आणि अकोला या दोन शहरांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी; तसेच वाढते शहरीकरण या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज असल्याची बाब ‘मटा’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली होती. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ‘मटा’ याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनीदेखील याची दखल घेऊन यासाठी समिती स्थापन करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र आयुक्तालयाच्या रचनेबाबत चर्चा केली होती. पोलिस महासंचालकांनी दोन वेळा याचा सुधारित आराखडादेखील सादर केला होता.

पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी स्थानिक आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना पाटील यांनी वरील माहिती दिली. शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु त्यावर सरकारकडून विलंब का होत आहे, अशी विचारणा आमदारांकडून करण्यात आली होती. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, शरद सोनावणे, राहुल कुल या पाच आमदारांनी शुक्रवारी लक्षवेधी मांडली; तसेच आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखील ‘मटा’च्या मागणीचा आधार घेऊन पाठपुरावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

CM चा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीमार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या ई-उद्घाटन आणि भूमिपूजनानिमित्त भोसरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या ई-उद्घाटन आणि भूमिपूजनानिमित्त मुख्यमंत्री भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिकांनी कार्यक्रमाच्या सभागृहाबाहेर गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर रिंगरोडबाधित नागरिकांना न भेटताच मुख्यमंत्री जाऊ लागल्यामुळे घरे बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी परवानगी दिली. मात्र, नागरिकांचा संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी नाट्यगृहाच्या प्रवेशाद्वारासमोर उभे राहून घोषणा देत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक नागरिकांना हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. या गदारोळात मुख्यमंत्र्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला.
मागील काही दिवसांपासून रिंगरोड प्रकल्पामुळे अनेक नागरिकांची घरे हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे रिंगरोड प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आंदोलने, निवेदनाद्वारे प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांचा आज गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बिकट आर्थिक स्थितीशी सामना करून इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमांतर्गत चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम आज, रविवारी (१३ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमासाठी ‘मटा’च्या वाचकांना आग्रहाचे निमंत्रण आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
वाचकांनी दिलेली ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या मनात ‘विश्वास’ जागवणारे विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते यंदाच्या शिलेदारांना चेक प्रदान करण्यात येणार आहेत. हा केवळ चेक प्रदान करण्याचा समारंभ नाही, तर या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा कौतुक सोहळाही आहे. त्याचप्रमाणे ‘मटा’चे वाचक दर वर्षी ज्या विश्वासाने मदत करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही हे औचित्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयाला तत्त्वतः मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी तत्त्वतः मान्य करण्यात आली असून, योग्य कार्यवाहीनंतर त्याची स्थापना केली जाईल,’ याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे ई-उद्घाटन आणि भूमिपूजन भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, अशी शहरवासियांची इच्छा आहे. ती काळाची गरजदेखील आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही स्वतंत्र शहरे मोठी झाली आहेत. त्यादृष्टीने स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची कार्यवाही राज्य सरकारने चालू केली आहे. त्यामुळे येथे लवकरच नवीन पोलिस आयुक्तालय कार्यरत होईल, असे आश्वासन यानिमित्ताने देत आहे.’

दरम्यान, पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित न केल्याच्या निषेधार्थ कार्यक्रमापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्घाटन उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच रिंगरोड बाधित नागरिकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि ठोस आश्वासन मिळण्याच्या मागणीकरीता घर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली आंदोलकांनी भोसरी येथे फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा शनिवारी प्रयत्न केला. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

मुहूर्तमेढ लोकमान्यांकडूनच

‘सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली. त्यांनी पुढाकार घेऊन घरच्या देव्हाऱ्यातील गणेश रस्त्यावर आणला आणि समाजाला एकत्र आणले. आता सर्वांनी मिळून गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करावा,’ असे आवाहन फडणवीस यांनी केले. तसेच गणेश मंडळे, कार्यकर्ते आपलेच आहेत. ते कायदे पाळतील पण तुम्हीही प्रेमाने वागा, अशी सूचना त्यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना केली.

खंडपीठासाठीही सकारात्मक

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठ उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. फडणवीस आणि मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी शहरातील ज्येष्ठ वकील आणि पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी अर्धा तास चर्चा केली. मुख्य न्यायमूर्तींनी मंजुरी दिल्यास खंडपीठ उभारणीसाठी २२०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे वकिलांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळकांनीच रोवली मुहूर्तमेढ

$
0
0

गणेशोत्सवाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी टाकला पडदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली. इंग्रज सरकार स्वातंत्र्यलढा चिरडण्याचा प्रयत्न करीत असताना लोकमान्यांनी घराच्या देव्हाऱ्यातील गणपती रस्त्यावर आणून समाजाला एकत्र केले. त्यांनी गणेशोत्सवाचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी केला. आपण सर्वांनी मिळून गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात फडणवीस यांच्या हस्ते झाली, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, अनिल भोसले, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आदी या वेळी उपस्थित होते.

‘भारतीयांमधील शौर्य, आत्मविश्वास संपविण्याचे काम इंग्रजांनी केले. त्या वेळी लोकमान्यांनी ठणकावून सांगितले. स्वातंत्र्य हे भिकेपोट कोणाच्या दयेवर मिळणार नाही. तर ते मिळवावे लागेल. टिळकांनी समाजामध्ये क्रांतीची ज्योत पेटविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या निमित्ताने विभागलेला समाज एकसंध झाला. त्यामुळे स्वराज्य निर्मितीला बळ मिळाले,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. प्रास्ताविक आणि स्वागत मुरलीधर मोहोळ यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मानले.

‘रंगारी ट्रस्टने बांधिलकी दाखवावी’

‘गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. टिळकांबरोबर काम केलेल्यांचे योगदान देखील नाकारता येणार नाही. टिळकांचे फोटो नाही, यावर वाद झाले. यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षे असल्याने आता सर्व वादांना पूर्णविराम देऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने देखील सामाजिक बांधिलकी दाखवावी,’असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. फडणवीस यांच्या हस्ते १२५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘कार्यकर्ते आपलेच आहेत’

गणेशोत्सव सर्वांचा आहे. गणेश मंडळे, कार्यकर्ते आपलेच आहेत. ते कायदे पाळतील, पण तुम्हीही प्रेमाने वागा, अशी प्रेमळ सूचना फडणवीस यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आयुक्तांना सूचना केली, म्हणून तुम्ही मनाला वाटेल तसे वागू नका, कायद्याचे पालन करा, असे सांगण्यासही फडणवीस विसरले नाहीत.

वादांशिवाय करमत नाय...

पुण्याचा गणेशोत्सव आता उत्सव न राहता चळवळ झाली आहे. पुण्यात काहीही असो त्याच्या चर्चा, वाद झडत असतात; त्याशिवाय आम्हालाही करमत नाही, अशी टिपण्णी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली, तेव्हा उपस्थितांमध्ये खसखस पिकली. फक्त आम्हाला तुमच्या कानावर घालावे लागते, त्यामुळे गणेशोत्सव तसेच पक्षातील वादाबद्दल विचार करू नका, असा अप्रत्यक्ष सल्लाच बापट यांनी फडणवीसांना दिला.

भोसले उपस्थित; शिरोळेंची दांडी

पालिकेच्या कार्यक्रमास फक्त सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारीच उपस्थित होते. ‌विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अनुपस्थिती जाणवत होती. भाजपचे शहरातील पदाधिकारी व्यासपीठावर सर्वत्र वावरत असल्याचे चित्र पहायला मिळाले. खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, दिलीप कांबळे आदी अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले मात्र उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानाला हवी नीतीमूल्यांची जोड

$
0
0

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिक्षणाला नीतीमूल्यांची जोड असेल, तर त्याचे ज्ञानात रूपांतर होते. अन्यथा ते केवळ माहितीपुरतेच उरते. नीतीमूल्यांचा आधार असलेल्या व्यक्ती तंत्रज्ञानाचा अधिक परिणामकारक वापर करू शकतील,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘एमआयटी’च्या ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’चे औपचारिक उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी साधू वासवानी मिशनचे दादा जे. पी. वासवानी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. जय गोरे, ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर, नानिक रुपानी, यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, श्रीकांत भारतीय, नाना कुलकर्णी, प्रा. डॉ. मंगेश कराड आणि माईर्स एमआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘यंत्रांना माणसांप्रमाणे भावना नसतात. त्यामुळे मानव इतरांपेक्षा वेगळा ठरतो. अलिकडे तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईटही वापर वाढला आहे. मात्र, नैतिक मूल्यांची बैठक असलेल्या व्यक्ती या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करू शकतात. त्यासाठी विश्वशांतीचा ध्यास असणारे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल,’ असे फडणवीस म्हणाले.
‘राजकारणामुळे कधीच आपला देश बदलला जाणार नाही. हा समाज आपल्यालाच बदलायचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या हृदयाची दारे उघडावी लागतील. तरच आपण समाजात शांती प्रस्थापित करू शकतो,’ असे दादा वासवानी यांनी सांगितले.
‘भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाला विश्‍वशांतीचा संदेश देण्यात हे विद्यापीठ अग्रेसर असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान अणि विश्‍वशांतीचा समन्वय साधण्यात येईल,’ असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
डॉ. भटकर, डॉ. माशेलकर, डॉ. गोरे, डॉ. मायकेल नोबेल आदींनीही मनोगत व्यक्त केले. राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले. मंगेश कराड यांनी आभार मानले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॅमिली कोर्टांत मने जुळावीत

$
0
0

उद् घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘एकत्र कुटुंबपद्धतीमुळे पूर्वीच्या काळी वाद होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सध्याच्या विभक्त पद्धतीत कौटुंबिक समुपदेशन होत नाही. विविध कारणांमुळे विभक्त कुटुंबाचे आणि पती- पत्नीतील विसंवादाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे फॅमिली कोर्टात वाद दाखल झाल्यानंतर संबंधित दोघांना एकत्र आणण्याचे काम झाले पाहिजे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली.
शिवाजीनगर येथील फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्या. रेवती मोहिते-डेरे, पुणे कोर्टाचे नूतन पालक न्यायमूर्ती भूषण गवई, प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक, पालकमंत्री गिरीश बापट, फॅमिली कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीश शैलजा सावंत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अॅड. गणेश कवडे, आमदार विजय काळे आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यातील कोर्टांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने दुप्पट निधीची तरतूद केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल, सुविधा चांगल्या असतील तर तेथे कार्यरत असणाऱ्यांची क्षमता वाढते. कोर्टात येणारे पक्षकार निराश झालेले असतात. कुटुंब कलहामुळे त्यांचा जीवनावरील विश्‍वास उडालेला असतो. त्यांना येथे अडचणीला सामोरे जावे लागू नये. फॅमिली कोर्टाची इमारत कल्पकतेने तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी कुटुंब एकत्र आणण्याचे काम झाले पाहिजे. येथे कमीतकमी प्रकरणे दाखल व्हावीत आणि दाखल प्रकरणांचा निपटारा व्हावा,’ अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘विभक्त झालेल्या पती-पत्नीला एकत्र आणणे हे पवित्र काम आहे. फॅमिली कोर्टाचे कामकाज आणि वातावरण अन्य न्यायालयापेक्षा वेगळे असते. येथे येणारी व्यक्ती आनंद, सुरक्षितता आणि शांतीसाठी येते. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले असेल तर, तुम्ही कोणत्याही पेशात असा काहीच करू शकत नाही. मुलांना आई आणि वडील दोघांची गरज असते. आई-वडिलांचे भांडण त्यांना लहान वयात पाहावे लागणे, दुर्दैवी आहे. येथील पक्षकाराचा आत्मविश्‍वास हरविलेला असतो. त्याला नैराश्‍य आलेले असते. त्यामुळे त्याला वकील, समुपदेशकांनी योग्य रितीने हाताळले पाहिजे. फॅमिली कोर्टात येणारे पक्षकार, त्यांच्या मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात गेल्यानंतर सर्वच प्रश्‍न सुटतात असा विश्‍वास निर्माण करणारी कामे झाली पाहिजेत,’ असे मत श्रीमती चेल्लूर यांनी व्यक्त केले.
न्यायाधीश शैलजा सावंत यांनी प्रास्तविक केले. अॅड. दौंडकर यांनी तालुका न्यायालयाच्या इमारतींचे नूतनीकरण करावे, शिवाजीनगर न्यायालयातील प्रश्‍न आणि पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली. अॅड. कवडे यांनी फॅमिली कोर्टाच्या इमारतीच्या संदर्भात वकिलांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देऊन आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी सीएम सकारात्मक

$
0
0

हायकोर्टाने प्रस्ताव मान्य केल्यास २२ कोटी देण्याचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पुण्याला खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत अखेर सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठ उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील ज्येष्ठ वकील आणि पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या चेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी सुमारे अर्धा तास वकिलांचे खंडपीठाबाबतचे म्हणणे ऐकून घेतले.
पुण्याला खंडपीठ मिळावे ही मागणी गेली चार दशके सातत्याने करण्यात येत आहे. फॅमिली कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे वकिलांसाठी ही सुवर्णसंधी होती. व्यासपीठावर हा विषय मांडण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, वकिलांना कार्यक्रमानंतर काही वेळ देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रमुख न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये वकिलांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.
ज्येष्ठ ​विधीज्ञ अॅड. एस. के. जैन, अॅड. भास्करराव आव्हाड, अॅड. हर्षद निंबाळकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड, उपाध्यक्ष अॅड. संतोष जाधव, सचिव अॅड. विवेक भरगुडे, अॅड. आशिष ताम्हाणे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विकास ढगे पाटील, अॅड. वाय. जी. शिंदे, आणि असोसिएशनचे पदाधिकारी आदी या वेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ वकिलांनी खंडपीठाच्या मागणीमागील नेमकी भूमिका विशद केली. मुख्यमंत्र्यांनी खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार मुख्य न्यायमूर्ती यांच्या अधिकारात असल्याचे स्पष्ट केले. खंडपीठ देण्याला मुख्य न्यायमूर्तींनी मंजुरी दिल्यास खंडपीठ उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे अॅड. दौंडकर, उपाध्यक्ष अॅड. झंजाड यांनी स्पष्ट केले. खंडपीठ उभारणीसाठी लागणारी जागा कुठे उपलब्ध आहे त्याची माहिती देण्यात यावी अशा सूचना मुख्य न्यायमूर्तींकडून यापूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ताथवडे येथील राज्य सरकारच्या ताब्यातील १५० एकर जागेतील ४० एकर जागा उपलब्ध आहे. ती खंडपीठासाठी देण्यात यावी, असा मुद्दा या वेळी मांडण्यात आला.

खंडपीठाचा चेंडू हायकोर्टात
फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे पुण्यातील वकिलांच्या दोन संघटनांच्या अध्यक्षांना खंडपीठाबाबत जाहीर कार्यक्रमात बोलण्यास मनाई घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी याबद्दल जाहीर बोलणे टाळले. मात्र मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले असता उपस्थित वकिलांनी खंडपीठाबाबत बोला, अशी जोरात मागणी केली. त्यावर त्यांनी आपल्या मागणीसाठी येथे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित असून, त्यांच्याकडे योग्य पद्धतीने हा विषय मांडा अशी कोपरखळी मारली. खंडपीठ मागणीचा चेंडू मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात टोलवल्यामुळे उपस्थित वकीलही शांत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिकूल परिस्थितीतूनही प्रेरणा घ्या : नांगरे-पाटील

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मन स्वच्छ असेल, प्रामाणिक असाल तर कोणतेही ध्येय गाठता येते. प्रतिकूल परिस्थिती येते, पण संकटातून प्रेरणाही मिळते. आणि आव्हान स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या मागे 'महाराष्ट्र टाइम्स' उभा असेल तर भिती कसली, असा विश्वास विद्यार्थ्यांना ​कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक,विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. 'मटा हेल्पलाइन' कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, 'व्यक्तीमत्व स्मार्ट असावे, अपडेट असावे, स्वतःला ट्रेन करावे, इच्छाशक्ती असली पाहिजे. सकारात्मक राहा. भीती काढून टाका. भीती सोडून दिली तर अंगी साहस येते. चांगल्या गोष्टी स्वीकारल्या तर त्यातून प्रेरणा मिळेल'
'पेन ही तुमची ताकद आहे. दिवसभर काय करायचे आहे याचे प्लॅनिंग करा. मी दहावीला पहाटे तीन वाजता उठायचो. पाच तास अभ्यास करून ८८ टक्के मिळविले. आत्मविश्वास वाढला. टप्पे ठरवून पुढे चालत राहिलो,' असा कानमंत्र त्यांनी दिला.

पंधरा नव्हे पंधरा हजार जणांना मदतीची गरज आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही समाजात चांगला संदेश पसरवा. मटा हेल्पलाईनने हुशार विद्यार्थ्यांच्या पंखात बळ दिले. त्यांना संघर्ष करायला शिकविले. मदत देणाऱ्या सर्वांचे तसेच महाराष्ट्र टाइम्सचे आभार, अशा शब्दात नांगरे-पाटील यांनी मटा हेल्पलाइनला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सी.ए. मिलिंद काळेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायसन्सची छपाईच नाही

$
0
0

लायसन्सची छपाईच नाही


म. टा. प्रतिनिधी, पुणे
मे आणि जून महिन्यांत पक्क्या लायसन्सची चाचणी यशस्वी पूर्ण केलेल्या अनेक उमेदवारांना अद्याप त्यांचे लायसन्स मिळालेले नाही. याला घरपोच लायसन्स पाठविण्याच्या यंत्रणेतील त्रुटी कारणीभूत नाही, तर लायसन्स छपाई करताना निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमु‍ळे ही परिस्थिती उद् भ‍वली आहे. एखादी व्यक्ती लायसन्स न मिळाल्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात आल्यानंतरच, अमूक एका लायसन्सची छपाई झाली नसल्याचे समोर येत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत पक्क्या लायसन्ससाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेशी संलग्न असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अॅण्ड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे चारचाकी वाहनांसाठी आणि आरटीओच्या आळंदी कार्यालयात दुचाकीसाठी चाचणी घेतली जाते. ‘आयडीटीआर’ येथे ऑटोमॅटिक सेन्सर असलेल्या ट्रॅकवर चाचणी घेतली जाते. या चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा डेटा आरटीओच्या संगमवाडी येथील कार्यालयात पाठविला जातो. त्यानंतर लायसन्स विभागाच्या अधिकाऱ्याकडून यशस्वी उमेदवारांना लायसन्स देण्यास मंजुरी दिली जाते. त्यानंतर लायसन्सच्या स्मार्ट कार्डची छपाई होते. हे स्मार्ट कार्ड छपाईचे काम युनायटेड टेलिकॉम लिमिटेड या कंपनीकडे सोपविलेले आहे. प्राप्त डेटानुसार ही छपाई ऑटोमॅटिक पद्धतीने केली जाते. मात्र, एप्रिल व मे २०१७ मध्ये लायसन्स स्मार्ट कार्ड छपाईसाठी मंजुरी दिलेल्यापैकी अनेक लायसन्सची छपाई झालेली नाही.
ऑर्डर दिल्यापैकी किती लायसन्सची छपाई झाली, किती शिल्लक राहिले याची माहिती युनायटेड टेलिकॉमकडे उपलब्ध नसते. त्यामुळे दररोज छपाई होणाऱ्या लायसन्सपैकी छपाई न झालेल्या लायसन्सची कोणालाच माहिती मिळत नाही. एखादी व्यक्ती लायसन्स न मिळाल्याची तक्रार घेऊन येते, त्यावेळी चौकशी केल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे छपाई न झाल्याचे समजते. या प्रकारामुळे नागरिकांना आरटीओचे खेटे मारावे लागत आहेत.
दरम्यान, मे आणि जून महिन्यात ‘सारथी ४.०’ प्रणाली नव्याने सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या प्रणालीतील बारकाव्यांची माहिती आरटीओच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही फारशी नव्हती. एका दिवसात आठशे लायसन्स छपाईची आरटीओची क्षमता आहे. त्यामुळे आठशेपेक्षा अधिक लायसन्स एका दिवसात छपाईसाठी सोडल्यानंतर अतिरिक्त लायसन्सची छपाई होत नव्हती. या दोन महिन्यांतील काही अर्जदारांना अद्याप लायसन्स मिळालेले नाही, अशी माहिती आरटीओतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
..............
पाच हजार लायसन्सची छपाईच नाही
मे आणि जून महिन्यांतील उमेदवारांना पक्के लायसन्स मिळाले नसल्यास, त्यांनी आरटीओ कार्यालयात लायसन्स विभागात चौकशी करावी. त्यांच्या लायसन्सची छपाई प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिले. दरम्यान, चार ते पाच हजार लायसन्सची छपाई झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीपी मंजुरीचे अधिकार पीएमआरडीएला हवेत

$
0
0

टीपी मंजुरीचे अधिकार पीएमआरडीएला हवेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हिंजवडीला जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी म्हाळुंगे-माण परिसरातील नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) प्रारूप मंजुरीचे अधिकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) द्यावेत, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार त्याबाबत अनुकूल असून, येत्या काही दिवसांत हा निर्णय झाल्यास प्रशासकीय स्तरावरील कालावधी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पीएमआरडीएने म्हाळुंगे-माणमधील २९१ हेक्टरसाठी टीपी स्कीम राबविण्याचा इरादा नुकताच जाहीर केला आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी म्हाळुंगे-माण भागातून जाणारा पर्यायी रस्ता लवकर व्हावा, यासाठी टीपी स्कीम प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमातील तरतुदींनुसार इरादा जाहीर केल्यानंतर नऊ महिन्यांमध्ये टीपी स्कीमचे प्रारूप जाहीर करावे लागते. ते जाहीर करण्यापूर्वी त्याला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागते; तसेच त्यानंतर अंतिम योजनेलाही सरकारच्या मान्यतेची गरज असते. एकाच योजनेसाठी दोन वेळा सरकारच्या मान्यतेमध्ये जाणारा कालावधी कमी व्हावा, याकरिता प्रारूपच्या मंजुरीचे अधिकार पीएमआरडीएला द्यावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्या बैठकीत टीपी स्कीमच्या प्रारूपला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, त्या संदर्भात सध्या पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक स्तरावरील निर्णय त्वरेने व्हावेत, यासाठी सरकार अनुकूल असल्याचा दावा पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. येत्या एक-दोन महिन्यांत टीपी स्कीमच्या प्रारूप मंजुरीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, त्याचा फायदा पीएमआरडीएला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरणी... विश्वासाची, प्रेरणेची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता यशाचे शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांची ओंजळ रविवारी पुणेकरांच्या कोटीमोलाच्या मदतीने भरली. ‘नकारात्मकतेला, भीतीला बाजूला सारा. आजूबाजूला घडणाऱ्या लहान गोष्टींमधून प्रेरणा घ्या आणि सकारात्मक विचार करा,’ अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या पंखांना आणखी बळ दिले. या विद्यार्थ्यांच्याही मुखातून मग गगनभरारी घेतानाच इतरांनाही मदत करण्याचे आश्वासक बोल बाहेर पडले...

कर्तृत्व आणि दातृत्वाचा हृद्य संगम घडवत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘हेल्पलाइन’ उपक्रमाचा रविवारी झालेला सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणा आणि विश्वासाची पेरणी करणारा ठरला. अन् केवळ ‘हेल्पलाइन’चे शिलेदारच नव्हे, तर या सोहळ्याला उपस्थित प्रत्येक जण वेगळी सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडला. कष्टातून उत्तुंग यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायक कहाणी आणि त्यांचे आत्मविश्वासपूर्ण बोल ऐकून सभागृहातील प्रत्येक जण हेलावून गेला. पुणेकरांच्या दानशूर वृत्तीचा उल्लेख होताना प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी दाद दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘हेल्पलाइन’ उपक्रमातील यंदाच्या वर्षीच्या १५ शिलेदारांना रविवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मदतीचे चेक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या देखण्या, भावपूर्ण सोहळ्याला उपक्रमाचे बँकिंग पार्टनर असलेल्या कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळेही उपस्थित होते. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी प्रास्ताविक केले; तर वृत्तसंपादक श्रीधर लोणी यांनी आभार मानले. स्पेशल करस्पॉडंट सिद्धार्थ केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा प्रेरणादायी संवाद, विद्यार्थ्यांची हृद्य मनोगते आणि ‘मटा’च्या वाचकांची उत्स्फूर्त उपस्थिती यांमुळे हा सोहळा वेगळ्या उंचीवर पोहोचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव कार्यक्रमावर लाखो रुपयांची उधळपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात‌ आलेल्या विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याचे धोरण पालिकेतील कारभारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले आहे.

यंदाच्या वर्षी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती सोशल मीडिया, वेबसाइटवर देण्यासाठी थीम साँग, ‌व्हिडिओ साँग, बोधचिन्ह तयार करणे; तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवाच्या जाहिराती करणे, शहरातील भिंती रंगविणे, ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे आयोजन अशा कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भाजपने संपूर्ण गणेशोत्सवावरच पक्षाचा प्रभाव राहील, या दृष्टीने नियोजन केले आहे. गणेशोत्सवानिमित्त मोबाइल अॅप तयार करणे, शहरात दुचाकीची रॅली काढणे, ढोल ताशांचे वादन, शाडू मातीच्या मूर्ती बनविणे, सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पालिकेने खास बोधचिन्ह तयार केले असून यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. याबरोबरच चार दिवस पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेलपर्यंत पोहचविण्यासाठी खासगी जनसंपर्क यंत्रणा (पीआर एजन्सी) नेमण्यात आली असून त्यांना साडेचार लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे. महापालिकेचा स्वतंत्र जनसंपर्क विभाग असतानाही, खासगी यंत्रणा नेमून त्यांच्यावर खर्च करण्याचे कारण काय, अशी विचारणा केली जात आहे. शहरातील विविध भिंती रंगविण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसेच, शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी आणि फ्लेक्स, जाहिराती लावण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च करण्याची तयारी सुरू आहे.

‘मराठी बाणा’ कोणी आयोजित केला?

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमानंतर अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम झाला. मात्र, हा कार्यक्रम नक्की कोणी आयोजित केला, यासाठी किती रुपये खर्च करण्यात‌ आले, याची कोणतीही माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांना नाही. गणेशोत्सव कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे सुहास मापारी यांना याबाबत विचारणा केली असता, सहआयुक्त सुरेश जगताप यांना विचारा असे त्यांनी सांगितले. जगताप यांना विचारले असता, बालगंधर्व रंगमंदिराचे प्रमुख प्रकाश अमराळे यांना माहिती असेल असे त्यांनी सांगितले. अमराळे यांना विचारले असता महापौर कार्यालयाने हा कार्यक्रम घेतला असून प्रोटोकॉल अधिकारी योगिता भोसले यांना माहिती विचारा, असे उत्तर त्यांनी दिले. तर भोसले यांनी याबाबत मलाच काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हांडे यांचा लोकप्रिय कार्यक्रम केवळ ‘मानाचा नारळ’ देऊन करण्यात आला की काय? अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.

पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने चालविली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार करण्याचे धोरणच भाजपने सुरू केले आहे. ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत वेगळी चर्चा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात वेगळेच खर्च केले जात आहेत.

अरविंद ‌शिंदे, गटनेते, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूर्तीच्या बुकिंगसाठी वीकेंडचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस राहिल्याने पुणेकरांनी सुट्टीचा मुहूर्त साधून शनिवारी आणि रविवारी गणेश मूर्तींच्या बुकिंगसाठी मूर्ती स्टॉलवर गर्दी केली. सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त पुणेरी, टिळक पगडी घातलेल्या, कोणी खंडेराय, शारदा गणेश तर कोणी बाहुबली प्रकारातील गणेश मूर्तींचे बुकिंग केले. पारंपरिक पद्धतीच्या मूर्तींनाही नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.

उत्सवाच्या पूर्वसंध्येला मूर्ती घेण्याऐवजी दहा पंधरा दिवसांपूर्वीच मूर्ती बुक करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात वाढला आहे. त्यामुळे मध्यवर्ती पुण्याबरोबरच उपनगरांमध्येही आता महिनाभर आधीच गणेश मूर्तींचे स्टॉल सुरू होतात. विशेषतः शाडूच्या मूर्तींची उपलब्धता कमी असल्याने त्यांचे बुकिंग लवकर सुरू होते. या वर्षी देखील नामाकिंत सिझनल स्टॉल बरोबरच गल्ली बोळांमध्ये मूर्तींचे स्टॉल उभे राहिले आहेत. शहराच्या चहूबाजूंना दिसणारे स्टॉल पाहताना उत्सवाच्या आगमनापूर्वीचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.

घरगुती उत्सवासाठी पद्मासन, चौरंगावर, सिंहासनावर बसलेल्या मूर्तींना अधिक मागणी आहे. मूर्तीला घातलेले सोवळे, अलंकार, मुकुटाविषयी नागरिक अधिक चिकित्सक आहेत. वर्षभरात लोकप्रिय ठरलेला चित्रपट अथवा टीव्ही मालिकेनुसार गणेश मूर्तींमध्येही नवनवीन प्रकार दाखल होत असतात. गेल्या वर्षी पेशवाई गणपती, त्याआधी खंडेरायाच्या वेशभूषेतील गणेशमूर्तींना मागणी होती. यंदा बाहुबली, खंडेरायाच्या मूर्ती स्टॉलमध्ये दाखल झाल्या आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमध्ये अनेक प्रकार असून मूर्तींना खडे, कुंदन आणि व्हेल्वेटचा वापर करण्यात आला आहे. घरगुती उत्सवाच्या या मूर्ती दीडशे रुपयांपासून पाच हजार रुपये दरात उपलब्ध आहेत. शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली असली, तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकत घेणारा वर्गही मोठा आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

श्रीगणेश कला केंद्राचे चैतन्य तागडे म्हणाले, ‘शाडूच्या मूर्तींची मागणी उल्लेखनीय प्रमाणात वाढली आहे. पूर्वी लोक गोकुळाष्टमीनंतर बुकिंग करीत होते, आता जागरूकता वाढल्याने लोकांनी यंदा महिनाभरापूर्वीच मूर्तींचे बुकिंग झाले आहे. आम्ही अकरा हजार मूर्ती उपलब्ध केल्या असून त्यातील ९० टक्के मूर्तींचे बुकिंग झाले आहे. विशेष म्हणजे जास्त उंचीच्या मूर्ती घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मूर्ती २५१ ते ११ हजार रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत. पेशवाई, मल्हार पगडी, टिळक पगडी घातलेल्या मूर्तींना पसंती मिळत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॉमा केअर सेंटर की गोडाउन?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आरोग्य सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे रूपांतर आता गोडाउनमध्ये झाले आहे. सिलिंडर, शीतपेयाच्या मोठ्या प्रमाणातील साठ्यासह विविध प्रकारचा माल या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले आहे.

एक्स्प्रेस वेवर ओझर्डे येथे दोन ते अडीच वर्षांपूर्वीच ट्रॉमा केअर सेंटरसाठी आवश्यक असलेली इमारत बांधून पूर्ण झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी आरोग्य सुविधा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. गेल्या वर्षी पनवेल येथे भीषण अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स्प्रेस वेवर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सार्वजनिक रस्ते उपक्रम मंत्री व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी देखील हे सेंटरमध्ये तातडीने सुरू करावी, अशी सूचना केली होती. मात्र, अद्याप त्याबाबत काहीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही.

दोन दिवसांपूर्वी एक्स्प्रेस वेवर एका कार चालकाला गाडी चालवित असतानाच हार्ट अॅटॅक आला. त्याने प्रसंगावधान दाखवित गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून मोठी दुर्घटना टाळली. मात्र, त्या चालकाचा मृत्यू झाला. तसेच, एक्स्प्रेस वेवर अपघातांच्या घटना सातत्याने घडतात. त्यामधील जखमींना उपचारासाठी पिंपरी-चिंचवड किंवा लोणावळ्याला जावे लागते. त्यामुळे ट्रॉमा सेंटर केव्हा सुरू होणार, अशी विचारणा सातत्याने केली जात आहे.

दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळाने ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाला कळविले असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर काही ट्रस्ट आणि खासगी हॉस्पिटलने देखील ट्रॉमा केअर सेंटरसाठी प्रस्ताव पाठविला आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्या प्रस्तावांवर चर्चा झाल्याचे दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाइल ट्रॅकिंग’ धूळ खात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत सर्वसामान्यांकडून केले जाणारे अर्ज-फायलींवर नेमकी काय कारवाई केली यासाठी सुरू करण्यात आलेली ‘फाइल ट्रॅकिंग सि​स्टीम’ सध्या धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. ही ​यंत्रणा तत्काळ सुरू करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी पावले उचलली असून विविध खात्यांना ही सेवा सुरू करण्यासाची तंबी दिली आहे.

नागरिकांना त्यांनी केलेले अर्ज, दाखल केलेली फाइल नेमकी कुठल्या ‘टेबल’वर, कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे, या अर्जावर काय कारवाई करण्यात आली, त्यात काही त्रुटी आहेत का, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना घरबसल्या ट्रॅक करता यावी, यासाठी ‘फाइल ट्रॅकिंग सिस्टीम’ तयार करण्यात आली होती. सध्या ही यंत्रणा धूळ खात पडून आहे. ही पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांनी पावले उचलली आहेत.

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमाकांवर आलेल्या पुणे महानगरपालिकेचा कारभार अधिकाधिक ‘स्मार्ट’ करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांसाठी ‘ऑनलाइन’ सुविधांचा वापर वाढवून कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले, तरी ‘फाइल ट्रॅकिंग सिस्टीम’चा वापर जाणीवपूर्वक टा‍ळण्यात येत असल्याचे प्रकार उघड होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे. अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांनी ही प्रणाली सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी त्याला महापालिकेच्या विविध विभागांकडून कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत शंकाच व्यक्त करण्यात येत आहे.

ही यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील आवक-जावक बारनिशीचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘फाइल ट्रॅकिंग सिस्टीम’ या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण दिले होते. महापालिकेने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असली, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांनी पाठवलेल्या सर्व विभागप्रमुखांना खरमरतीत पत्र पाठवले असून त्यात या प्रणालीचा वापर होत नसल्याने हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याची ताकीद दिली आहे. ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही अडचणी असतील, तर खातेप्रमुखांनी त्या दूर कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास नागरिकांनी त्यांनी दाखल केलेले अर्ज-फायलींचा प्रवास कसा सुरू आहे, याची माहिती घरबसल्या मिळणार आहे. हायकोर्टाच्या वेबसाइटवर कोर्टात दाखल असलेल्या खटल्यांचा प्रवास ऑनलाइन घरबसल्या पाहता येतो, त्या धर्तीवर महापालिकेने ही ‘फाइल ट्रॅकिंग सिस्टीम’ तयार केली आहे. ही प्रणाली सुरू केल्यानंतर ‘ऑफलाइन’ पत्रव्यवहार स्वीकारला जाऊ नये, असेही सुच​विण्यात आले आहे. ‘ऑफलाइन’ पत्रव्यवहार स्वीकारल्यास ही प्रणाली वापरण्याचा उद्देश साध्य होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. खातेप्रमुखांनी ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी इंटरनेटची सुविधा आपआपल्या कार्यालयात सुरू करावी तसेच इंटरनेटसाठी लागणारे हार्डवेअर (डोंगल) देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सहा ते सात जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून जबर मारहाण केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. या मारहाणीनंतर टोळक्याने परिसरात दहशत निर्माण करून पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या एका कारची तोडफोड केली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अक्षय डक (वय २४, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र ओंकार बिरगे (वय २४, रा. कोंढवा, मूळ : बार्शी) याने दिलेल्या तक्रारीवरून अंगराज राजू यादव, वृषभ हिरालाल यादव, लखन भीमल मंडल, शिवम जिवेंद्र बदोलिया, उत्तम अरूण लेखा, पंकज जयबहाद्दुर डांगी, राहुलकुमार राघलचंद्र रावा (सर्व रा. येवलेवाडी, कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार व त्याचा मित्र अक्षय हे शिक्षणासाठी पुण्यात आले आहे. कोंढवा परिसरातील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. येवलेवाडी येथे एका इमारतीमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहतात. ओंकार व अक्षय हे रात्री जेवणासाठी खाली आले, तेव्हा इमारतीजवळील गोठ्यातील जनावरांच्या ओरडण्याचा आवाज त्यांनी ऐकला. जनावरे का ओरडत आहेत, असे अक्षय याने विचारल्यानंतर गोठ्यातून दोघे जण बाहेर आले आणि त्यांनी अक्षयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अक्षयच्या मित्राने हा वाद मिटवला. दोघेही खोलीवर निघून गेले. त्यांच्या खोलीवर आणखी काही मित्र अभ्यासाठी आले होते. त्यांना घडलेला प्रकार दोघांनी सांगितला. त्याच वेळी हातात लाकडी दांडके, गाड्यांचे सायलेन्सर घेऊन सहा ते सात जण तेथे आले. त्यांनी लाथा मारून दरवाजा तोडला व विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोघांनी अक्षय याच्या डोक्यात सायलेन्सर घातल्याने तो जागीच कोसळला. तर, टोळक्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरवाजांवर लाथा मारल्या. टोळक्याने त्यानंतर या ठिकाणी पार्क केलेल्या एका कारची तोडफोड करून गोंधळ घातला. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदलात २०२७पर्यंत दोनशे जहाजे ताफ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय नौदलाने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. भारताच्या सागरी हद्दीचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारची एकूण २०० जहाजे २०२७पर्यंत नौदलात दाखल होतील. ‘मेक इन इंडिया’ या धोरणानुसार जहाजांची बांधणी भारतातच करण्यात येणार आहे. त्यापैकी ४० जहाजांची बांधणी सध्या सुरू आहे,’ अशी माहिती नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल ए. आर. कर्वे यांनी गुरुवारी दिली.

‘इंडियन मॅरिटाइम फाउंडेशन’तर्फे ‘इंडियन मॅरिटाइम पॅराडाइम-पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनपर सत्रात ते बोलत होते. व्हाइस अॅडमिरल विनोद पसरिचा (नि), व्हाइस अॅडमिरल एससीएस बंगेरा (नि), फाउंडेशनचे अध्यक्ष कमोडोर राजन वीर (नि), कार्यशाळेचे निमंत्रक कमोडोर अजय चिटणीस (नि) आदी या वेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतरच्या सत्रात कमोडोर जी. प्रकाश, कमोडोर श्रीकांत केसनूर, कॅप्टन सुधीर नाफडे (नि) व अॅडमिरल बंगेरा सहभागी झाले होते.

‘भारतीय नौदलासाठी पहिल्या देशी विमानवाहू नौकेसह आणखी दोनशे जहाजांची बांधणी करण्याचे काम भारतीय नौकाबांधणी कंपन्यांना देण्यात आले आहे. यापैकी एकही जहाज आयात केले जाणार नाही. त्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दुसरीकडे सागरमाला प्रकल्पाअंतर्गत सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून बंदरांचा विकास साधण्यात येणार आहे,’ असे अॅडमिरल कर्वे यांनी सांगितले.

हिंदी महासागरात सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - कर्वे

हिंदी महासागर क्षेत्र (आयओआर) हे जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. सध्या या क्षेत्रात विविध देशांची १५० जहाजे कार्यरत आहेत. त्यामुळे या क्षेत्रासाठी व्यापक सुरक्षाव्यवस्थेची गरज आहे. या क्षेत्रात सध्या तणावाचे वातावरण नाही. अमली पदार्थांच्या तस्करीपासून ते चाचेगिरीपर्यंतच्या विविध घटनांवर अंकुश मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असेही अॅडमिरल कर्वे यांनी सांगितले.

कोट

नौदलाने स्वदेशीकरणात मोठी आघाडी घेतली आहे. फ्लोट गटात ९० टक्के स्वदेशीकरण यशस्वी झाले आहे. तर प्रपोलशन आणि वेपन गटात अनुक्रमे ६० टक्के व ३० टक्के स्वदेशीकरण शक्य झाले आहे,'.

-ए आर कर्वे, व्हाइस अॅडमिरल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images