Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फरजाना यांना तूर्त दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली असून फेर जातपडताळणी करण्याचे आदेश समितीला दिले आहेत.

शेख या फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातून इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित जागेवर निवडून गेल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नव्हती. या पडताळणीदरम्यान विभागीय जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला होता. शेख यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने यावर निर्णय देताना शेख यांच्यावतीने करण्यात आलेला दावा सकृतदर्शनी ग्राह्य धरण्यात आला आणि जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. कोर्टाने ही स्थगिती देतानाच शेख यांच्या जातपडताळणी अर्जाची फेरतपासणी करण्यात आदेश दिले आहेत.

शेख यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या भगवान जाधव आणि अर्चना कुचेकर यांनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला होता. तसेच, याबाबत विभागीय जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. समितीने जातीच्या पडताळणीसाठी १९६७पूर्वीचे पुरावे मागितले होते. मात्र, मुस्लिम धर्मियांची जात पडताळणीसाठी यापूर्वी कोर्टाने काही निकाल दिले असून त्यात ही अट शिथिल करण्यात आली आहे. तरीही शेख यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नातील निकाहनामा पुरावा म्हणून सादर केला आहे. हा निकाहनामा १९६१सालचा असून त्यामध्ये त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा शिंपी (दर्जी) असल्याचा उल्लेख आहे. या आधारे कोर्टाने स्थगिती दिली असल्याचा दावा उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘…तुझ्या गांधींना पकडलंय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘फार मोलाचा क्षण आला होता ७५ वर्षांपूर्वी. महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. मी झोपेत होतो. माझे वडील मला उठवत म्हणाले, ‘उठ रे, तुझ्या गांधींना पकडलयं.’ मी खडबडून जागा झालो. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही तरुणांनी काँग्रेस भवन, एसपी कॉलेज येथे मोर्चा काढला. पोलिसांचा सर्वत्र पहारा होता. पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला, की आम्ही पळून जायचो आणि पुन्हा येऊन धडकायचो...’ क्रांतिदिन केवळ पाहिलेली नाही, तर तो अक्षरश: जगलेली एक व्यक्ती बुधवारी बोलती झाली. क्रांतिदिनाची गोष्ट सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य.

‘चले जाव’ च‍ळवळीला बुधवारी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त घरगुती कार्यक्रमात भाईंनी या आठवणींना शब्दरूप दिले. आजारपणातून बरे झालेले भाई बुधवारी नेहमीप्रमाणेच तडफेने बोलत होते आणि ऐकणारे ऐकत होते. भाईंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना क्रांतिदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बुधवारी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ‘चले जाव’ चळवळीचे पुण्यात नेतृत्व केलेले, स्वातंत्र्यलढा जगलेले भाई हे सर्वांत मोठे अधिकारी व्यक्ती असल्याने उपस्थित मंडळी त्यांचा शब्द आणि शब्द कानात साठवून घेत होते.

‘स्वातंत्र्याची, देशाची विलक्षण भक्ती मला पाहायला मिळाली. यापेक्षा कोणती अत्युच्च गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आहे,’ असा उलट सवाल भाईंनी आपल्या मिश्किल शैलीत केला. ‘४२च्या चळवळीच्या वेळी गांधींविरोधात भयानक द्वेष पसरवला जात होता. या चळवळीची गरज नाही, असे संघ आणि हिंदुत्ववादी मंडळींचे म्हणणे होते. देशाच्या लष्करीकरणाची ही उत्तम संधी असल्याची भूमिका सावरकरांनी मांडली होती. चले जाव चळवळीत सहभागी झालेल्या संघाच्या एकाही व्यक्तीचे नाव सांगता येणार नाही,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

हुकूमशाहीचे लोक सत्तेत येताच इतिहास बदलण्याचे काम सुरू होते. याप्रमाणेच सध्या देशाचा इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. आपल्याकडे हिटलरप्रमाणे प्रयोग होणार नाही, यासाठी आपण सावध राहिले पाहिजे. भारतात अनेक आक्रमणे झाली, तरी देश धर्मनिरपेक्ष राहिला. देशाचा धर्मनिरपेक्ष चेहरा बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरोगामी विचारांनी भारलेला देश कुठे जाईल, ही काळजी मला या वयात करावी लागत आहे. प्रतिगाम्यांचे आव्हान स्वीकारण्याची तयारी केली पाहिजे.

भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त चालकांवर बडगा

$
0
0

वाहतूक पोलिसांच्या कारवाई मोहिमेत १,३५३ जणांचे परवाने निलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चौकांमध्ये लाल सिग्नल न पाळणे, अतिवेगात गाडी चालविणे किंवा गाडी चालविताना मोबाइल फोनवर बोलणे आदी प्रकार अद्यापही सर्रासपणे घडताना दिसतात. मात्र, वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या साहाय्याने या बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून, एक हजार ३५३ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत.

शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या परिस्थितीला सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधेच्या अभावाबरोबरच बेशिस्त वाहन चालक अधिक जबाबदार आहेत. पूर्वीपर्यंत बेशिस्त वाहनचालकांवर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामध्येही दंडाची रक्कम शंभर रुपयेच असल्याने वाहनचालकांना फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करताना वाहनचालकांच्या मनात भीती निर्माण व्हावी आणि पुन्हा नियम तोडण्याचा विचारही त्याच्या मनात डोकावू नये, यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. विशेषतः स्वतः वाहनचालक आणि रस्त्यावरील अन्य नागरिकांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकणाऱ्या गोष्टींना यामध्ये ‘टार्गेट’ करण्यात आले होते.

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सिग्नल न पाळणे, अतिवेगात वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे आणि मद्यपान करून वाहन चालविणे या कारणांसाठी अनुक्रमे ७४६, १२, ५७९ आणि ९६ वाहन चालकांचा परवाना निलंबित केला आहे.

मद्यपान करून वाहन चालविण्याच्या गुन्ह्यासाठी १८० दिवस लायसन्स निलंबित केले जाते. त्याबरोबर वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्यासाठी ९० दिवस, धोकादायक व अतिवेगात वाहन चालविण्यासाठी ३० दिवस आणि सिग्नल न पाळण्यासाठी १० दिवसांच्या कालावधीसाठी लायसन्स निलंबित केले जाते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेलिमेडिसीन’द्वारे ८०० कैद्यांवर उपचार

$
0
0

तुरुंग विभागाकडून योजनेचा प्रभावी वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आजारी कैद्यांना चांगले उपचार मिळावेत, तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या टेलिमेडिसीन योजनेचा तुरुंग विभागाकडून प्रभावी वापर सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यातील तुरुंगात असलेल्या आठशे कैद्यांवर टेलिमेडीसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कैद्यांना चांगला उपचार मिळाले असून तुरुंग प्रशासनाचे मनुष्यबळ आणि वेळ वाचण्यास मदत झाली आहे.

तुरुंग विभागाच्या सुरक्षा यंत्रणेतील सुधारणा करण्यासाठी राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमण्यात आली होती. कैद्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून या समितीने टेलिमेडिसीन सुविधेची शिफारस केली होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा देत टेलिमेडिसीन योजना सुरू केली आहे. तसेच, तुरुंगांमध्येही कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार करणे शक्य आहे. त्यांच्या शिफारसीनुसार तुरुंग विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये ही योजना राबविण्याचे एप्रिल २०१७मध्ये आदेश दिले होते.

एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आलेल्या योजनेत राज्यातील विविध तुरुंगातील ८०० कैद्यांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार करण्यात आले आहेत. टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन अनेक कैद्यांना बरे करण्यात आले आहे. कैद्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेल्यानंतर ते पळून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक येऊन भेटतात. त्यांना घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत होते. टेलिमेडिसीनद्वारे उपचार सुरू केल्यामुळे या सर्व गोष्टी टाळण्यास मदत झाली आहे. राज्यातील सर्व तुरुंगांत ही योजना राबविण्यात यश आल्याचे तुरुंग विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकर महाराज मठाच्या विश्वस्तांची नियुक्ती

$
0
0

सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिला निकाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
धनकवडी येथील श्री सदगुरू संतवर्य शंकरमहाराज समाधी ट्रस्टच्या पूर्वीच्या विश्वस्तांनी केलेल्या शिफारशी रद्दबातल ठरवून सात जणांची नव्याने तीन वर्षांसाठी विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिले. शंकर महाराज मठाच्या ट्रस्टच्या विश्वस्तपदी काही विश्वस्तांची वारंवार निवड होत होती. त्यामुळे वीस वर्षानंतर पहिल्यांदाच नव्या विश्वस्तांची निवड झाली आहे.

शंकर महाराज मठाच्या विश्वस्तांच्या निवडणुकीसंदर्भआतील अर्ज धर्मादाय आयुक्तालयात दाखल करण्यात आला होता. पूर्वीच्या विश्वस्तांच्या वतीने अॅड. पराग एरंडे यांनी युक्तिवाद केला; तर प्रतिस्पर्धी अर्जदारांच्यावतीने अॅड. दिलीप हांडे, अॅड. तानाजी गायकवाड आणि अॅड. रणजित पाटील यांनी युक्तिवाद केला. ट्रस्टच्या योजनेतील कलम १०अ मधील तरतुदीनुसार सात विश्वस्तांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रकांत मालपाणी, सुरेंद्र वसंत वायकर, सुरेश येनपुरे, प्रताप भोसले, सदानंद खामकर, नागराज नायडू, भगवान खेडेकर यांचा समावेश आहे. या सात विश्वस्तांनी सात दिवसांनी विश्वस्तपदाचा पदभार स्वीकारावा, तसेच योजनेतील कलम १४अ मधील तरदुतीनुसार किंवा १५ दिवसांत चेअरमनपदाची निवड करण्यासाठी नवनियुक्त विश्वस्त मंडळाची सभा बोलवावी, असे आदेश सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिले.

कार्यकाळ संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वी त्या वेळच्या विश्वस्त मंडळाने दहा जणांची विश्वस्त पदासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नावे पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार दहा जणांची नावे पाठविली होती. विश्वस्त मंडळाने कार्यकाळ संपण्यापूर्वी योजनेतील तरतुदीनुसार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दहा पैकी सात जणांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात यावी, असा युक्तिवाद अॅड. एरंडे यांनी केला. तर, त्या वेळचे विश्वस्त हे काळजीवाहू विश्वस्त म्हणून काम करताना विश्वस्त मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांना केवळ नवे विश्वस्त मंडळ येईपर्यंत दैनंदिन कामकाज पाहण्याचा अधिकार आहे. दहा जणांची शिफारस करणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तो काळजीवाहू विश्वस्त मंडळास करता येणार नाही. त्यामुळे उपलब्ध उमेदवारांमधून सात जणांची विश्वस्त म्हणून नेमणूक करावी, असा युक्तिवाद अॅड. हांडे यांनी केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतीनंतर धर्मदाय सहायक आयुक्तांनी त्यांच्यापैकी सात जणांची विश्वस्तपदी नियुक्ती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक मूर्तींचा पर्याय

$
0
0

पश्चिम बंगालमधील कारागिरांनी केलेल्या मूर्ती दाखल

म. टा. प्रतिनिधी पुणे
पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘इको एक्झिस्ट’ संस्थेने या वर्षी देखील शाडूच्या, कागदाच्या पल्पपासून तयार केलेल्या मूर्ती पुणेकरांसाठी उपलब्ध केल्या आहेत. पुणे, पेणमधील मूर्तीकारांबरोबरच पश्चिम बंगालमधील कारागिरांनी माती आणि कापडाचा वापर करून बनविलेल्या मूर्ती यंदा पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाल्या आहेत.

भारतीय प्रत्येक सण पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी ‘इको एक्झिस्ट’ संस्था कार्यरत आहेत. संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची विक्री केली जाते. शाडूच्या गणपतींबद्दल जनजागृती वाढत असल्याने संस्था पेणमधील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून मूर्ती बनवून घेते. पुण्यातील आगरकर कुटुंबाकडून कागदाच्या पल्पपासून बनविलेल्या मूर्तींनाही संस्थेने व्यासपीठ उपलब्ध केले आहे. या शिवाय यंदा पश्चिम बंगालमधील पुरूलिया विग्रह या आदिवासी नृत्य प्रकारासाठी मुखवटे तयार करणाऱ्या कारागिरांनी पहिल्यांदाच संस्थेसाठी गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मूर्तींबरोबरच संस्थेतर्फे पर्यावरणपूरक साहित्याचाही प्रसार केला जातो.

याबद्दल ‘इको एक्झिस्ट’च्या लोलिता गुप्ता म्हणाल्या, ‘लोकांमध्ये जागृती वाढत असून दरवर्षी मूर्ती घेणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. संस्थेच्या सर्व मूर्तींसाठी या रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गेरूचा; तसेच भाज्यांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. कर्नाटक, पेण, पुणे आणि पश्चिम बंगाल येथील मूर्तीकार यामध्ये सहभागी आहेत. मूर्तींमध्ये मधुबनी गणेश, राजबैठक, गजवक्र, शीलापीठ, शेषनाग, आदी गणेश असे विविध प्रकार उपलब्ध आहेत या वर्षी आम्ही गणेश मूर्तींबरोबरच शाडूच्या गौरीही उपलब्ध केल्या आहेत.’

‘सजावट साहित्यामध्येही अनेक प्रकार असून पुणे, कर्नाटक, दिल्लीतील स्वयंसेवी संस्थांमधील मुलांकडून आम्ही हे साहित्य बनवून घेतो. ‘शोलापीट’ या लाकडापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू नागरिकांचे आकर्षण ठरतात. याशिवाय पाम या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू आणि जरीच्या काठापासून बनविलेल्या वस्तूही आम्ही पुणेकरांसमोर आणल्या आहेत,’ असे गुप्ता यांनी सांगितले. शहराच्या विविध भागात गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य आम्ही उपलब्ध केले आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

शाडू, कागदाच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन

शाडू आणि कागदाच्या पल्पपासून तयार केलेल्या मूर्तींचे प्रदर्शन ‘पेपरटेल्स’ या हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटतर्फे भरविण्यात आले आहे. रासायनिक रंग न वापरताही या मूर्ती देखण्या आणि आकर्षक झाल्या आहेत. येत्या सोमवारपासून कागदापासून बनविलेले सजावट साहित्यही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

‘हातकागदाचा प्रसार करण्यासाठी ‘पेपरटेल्स’तर्फे सातत्याने विविध सणांना आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. संस्थेतर्फे गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती आणि कागदी सजावट साहित्यालाही प्रोत्साहन देण्यात येते आहे. या वर्षी देखील शाडूच्या गणेश मूर्ती आणि कागदाचा पल्पमध्ये कापूस वापरून केलेल्या मूर्ती संस्थेने तयार केल्या आहेत. नागरिकांची मागणी वाढत असून लोक आवर्जून आता या मूर्तीची चौकशी करायला येत आहेत,’ असे गणेशमूर्ती उपक्रमाचे समन्वयक प्रमोद जाधव यांनी सांगितले. शिवाजीनगर येथील संस्थेच्या आवारातच सकाळी १० ते ८ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा कट उधळला

$
0
0

नऊ जणांच्या टोळीला अटक; सहा पिस्तुले जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुळशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्या खुनाचा कट उधळून लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपीसह खुनाची सुपारी घेतलेल्या नऊ जणांच्या टोळीला माण रस्त्यावरील लक्ष्मी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सहा पिस्तुले, २८ काडतुसे, पाच कोयते असा एकूण १२ लाख २६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

उमेश रघुनाथ वाघुलकर (वय ३८, रा. माण, ता. मुळशी), योगेश भाऊ गुरव (वय ३२, रा. विकास मित्रमंडळ चौक, कर्वेनगर), योगेश अंकुश वेताळ (वय २३), विशाल नवनाथ वेताळ (वय २३), विशाल आनंदा कळसकर (वय १९, तिघे रा. रा. मलठण, ता. शिरूर), चंद्रकांत दोरसिंग थापा (वय ३५, रा. नामदेव लोंढे चाळ, कासारवाडी), फिरोज अयुब खान (वय ४०, रा. दळवीनगर, चिंचवड), अन्वर हसन मुलानी (वय ४०, रा. रावेतगाव), आकाश प्रकाश रेनुसे (वय २२, रा. पाबे, ता. वेल्हा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघुलकर हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने वझरकर यांना मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

माण येथील लक्ष्मी पेट्रोलपंप लुटण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय निकम, सहायक निरीक्षक अन्सार शेख, विठ्ठल शेलार, उपनिरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचून या नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तुल व एक रिव्हॉल्वर जप्त केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. एका खुनाच्या गुन्ह्याचा कट तडीस नेण्यासाठी हा दरोडा टाकण्यात येणार असल्याचे समोर आले.

मुख्य आरोपी वाघुलकर आणि पंचायत समितीचे उपसभापती वझरकर या दोघांमध्ये राजकीय वैमनस्य आहे. त्यांच्यात अनेकदा मारामाऱ्या झाल्या आहेत. वझरकर यांचा बदला घेण्यासाठी वाघुलकरने खुनाचा कट रचला. तो तुरुंगात असताना त्याची शरद मोहोळ टोळीतील गुन्हेगार योगेश गुरव आणि थापा या दोघांची ओळख झाली. हे तिघेही बाहेर आल्यांनतर त्यांनी इतरांच्या मदतीने वझरकर यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी आठ जणांना प्रत्येकी दोन लाख रुपये वाघुलकर देणार होता. हा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी लक्ष्मी पेट्रोल पंपवार दरोडा टाकण्याची तयारी केली असल्याचे तपासात कबुल केले. आरोपी वाघुलकर याने नाशिक येथून चार पिस्तुले आणली आहेत; तर, गुरव याच्याकडे दोन पिस्तुले होती. त्याचा वापर गुन्ह्यात करणार होते.

पॅरोलवर आल्यानंतर गुन्हा

गुन्ह्यातील आरोपी योगेश गुरव हा कुख्यात शरद मोहोळ टोळीतील गुंड आहे. त्याला किशोर मारणेच्या खून प्रकरणात जन्मठेप झाली आहे. तो पॅरोलवर बाहेर आला आहे. ३० जुलै रोजी पॅरोल संपल्यानंतरी तो तुरुंगात गेला नाही. वाघुलकर याने त्याच्या मदतीनेच हा खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरंगा फडकतो तेव्हा…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महात्मा गांधींना अटक झाल्याची वार्ता समजताच काही तरुण एकत्र आले. इंग्रजांच्या जुलुमशाही विरोधात त्यांचे रक्त तापले होते. काँग्रेस भवन येथे असलेला युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकाविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अंग्रेजो भारत छोडो...भारत माता की जय, अशा घोषणा देत ते काँग्रेस भवनात दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. एक तरुण न डगमगता वर चढला आणि त्याने जॅक उतरवून तिरंगा फडकावला. त्याच क्षणी पोलिसांच्या गोळीने त्याचा वेध घेतला. भारत माता की जय...वंदे मातरम अशा घोषणा देत त्याने तिरंग्यापाशीच बलिदान दिले. अंगावर रोमांच उभा करणाऱ्या या प्रसंगाची बुधवारी पुनरावृत्ती झाली आणि पाहणारे थबकून गेले. अमर रहे अमर रहे नारायण दाभाडे अमर रहे, अशी एकच घोषणा निनादत राहिली.

क्रांतिदिन आणि दाभाडे यांच्या बलिदानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने काँग्रेस भवन येथे हा रोमहर्षक प्रसंग पुन्हा एकदा नाट्यरुपाने जिवंत करून स्मृतींना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे या वेळी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी मुंबईतील काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात ८ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांना छोडो भारतचा इशारा दिला. त्याच दिवशी गांधीजींसह इतर नेत्यांना अटक झाली. नेते तुरुंगात असले तरी नारायण दाभाडे या पुण्यातील कार्यकर्त्याने पुण्यातून मोर्चा काढला. इंग्रजांनी त्यांना अडवले, परंतु तरीही त्यांनी काँग्रेस भवनावर तिरंगा फडकावला. पोलिसांच्या गोळीबारात ते हुतात्मा झाले. हा संपूर्ण इतिहास बुधवारी जिवंत झाला. नारायण दाभाडे यांची भूमिका मुकुंद कोंडे याने साकारली. विष्णू जाधव, होनराज मावळे, मयूर दैठणकर यांच्यासह अनेक तरुणांनी या नाटकात भाग घेतला.
...
नारायण दाभाडे हे न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व सेवादलाचे कार्यकर्ते होते. सोळाव्या वर्षी त्यांनी बलिदान दिले. काँग्रेस भवन हे आपले तीर्थक्षेत्र आहे. पुण्यात काँग्रेस भवनला इंग्रजांचा गराडा पडल्याचे वृत्त कळताच दाभाडे यांनी मोर्चा काढला होता. त्या वेळी झालेल्या गोळाबारात ते हुतात्मा झाले. या घटनेचे स्मरण राहावे म्हणून हा प्रसंग जिवंत करण्यात आला.
- मोहन शेटे, अध्यक्ष-इतिहास प्रेमी मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गेल्या वर्षी शहरात दोन हजार मंडप

$
0
0

पालिकेला शुल्क देणारी मंडळे दहा टक्केच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन हजार गणेश मंडळांनी मोफत मंडप घातले होते. तर, महापालिकेकडून रनिंग मंडप आणि कमानीसाठी शुल्क आकारले जात असल्याने अशा परवान्यांची संख्या एकूण मंडळांच्या तुलनेत दहा टक्केही नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार महापालिकेने गेल्या वर्षी प्रथमच सण/उत्सवासाठी मंडप धोरण आखले होते. या धोरणानुसार शहरातील विविध गणेश मंडळांना मंडपाच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. शहरात साधारणतः अडीच हजार गणेश मंडळांतर्फे उत्सव साजरा केला जात असला, तरी पालिकेकडून मंडपाची परवानगी घेणाऱ्या मंडळांची संख्या दोन हजारांच्या दरम्यान होती. पालिकेच्या धोरणानुसार मंडपाच्या आकारानुसार शुल्क आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते; पण सर्वसाधारण सभेने मंडपासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असा ठराव केला. त्यामुळे, सर्व मंडळांनी मोफत मंडप घातले.

शहराच्या मध्य वस्तीमध्ये मानाच्या प्रमुख मंडळांसह इतर महत्त्वाच्या मंडळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सर्वाधिक २७८ मंडप कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत घालण्यात आले होते. तर, त्यापाठोपाठ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २०१ मंडळांनी मंडप घातले होते. बिबवेवाडी आणि सहकारनगर या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मंडपांची संख्या सर्वांत कमी म्हणजे अनुक्रमे ६६ आणि ७९ होती.

मंडपांसाठी मंडळांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द केले गेले असले, तरी कमानी आणि रनिंग मंडपासाठी पालिकेने शुल्क आकारले होते. मोफत मंडपांच्या तुलनेत कमानी आणि रनिंग मंडप घालणाऱ्या मंडळांची संख्या अतिशय तुटपुंजी होती. गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात २२५ कमानी घालण्यात आल्या होत्या, तर १३५ मंडळांनी रनिंग मंडपासाठी परवानगी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध

$
0
0

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘पेसा’ कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी बुधवारी सांगितले.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच वेबसाइट आणि मोबाइल अॅपचे उद्घाटन सावरा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री राजे अंबरीश राव, महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आमदार डॉ. अशोक ऊइके, डॉ. देवराज होळी, पास्कल धनारे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश जगदाळे उपस्थित होते. ‘आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी मुलांना सरकारच्या वतीने प्रत्येक शहरातील नामांकित शाळेत संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा विकास होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात राहण्याची सोय करून दिली जात आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आदिवासी मुलांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात येते. तसेच आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवल्या जात आहेत,’ असे सावरा म्हणाले. सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर मुक्ता टिळक, माया इवनाते, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार डॉ. अशोक ऊइके यांची भाषणे झाली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासींनी रेला, तारपा आणि किंगरी ही पारंपारिक नृत्य सादर केली. या वेळी www.mahatraibal.gov.in या वेबसाइटसह आदिवासी विकास अॅप आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मनीषा वर्मा यांनी प्रास्ताविक केले. रामचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरासरीत मागेच

$
0
0

यंदा हंगामात देशात सरासरीच्या ९८ टक्केच पाऊस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाच्या आतापर्यंतच्या हंगामात देशभरात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस झाला असला तरी, महाराष्ट्रासह काही राज्यांनी अद्याप सरासरी गाठलेली नाही. पुढील दोन महिन्यात देशात पाऊस १०० टक्के सरासरी गाठेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
अनुकूल वातावरणामुळे देशात या वेळी पाऊस नियोजित वेळत दाखल झाला होता. ‘एल निनो’चे सावट दूर झाल्याने पहिल्याच महिन्यात पावसाचा प्रवास समाधानकारक होता. महाराष्ट्रातही पाऊस चांगला झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे जुलैमध्ये पावसाने ओढ दिली आणि महाराष्ट्रासह काही राज्ये पावसाच्या सरासरीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. एकीकडे गुजरात, राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या पूरपरिस्थिती असताना राज्यात मात्र, पावसाने विश्रांती घेतली आहे.
यंदाच्या हंगामात जूनपासून ८ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाला आहे. मुख्यतः देशाच्या वायव्येकडील राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १११ टक्के पाऊस पडला असून, मध्य भारतात ९८ टक्के पाऊस पडला आहे. देशाच्या दक्षिण भागात मात्र सरासरीच्या तुलनेत कमी म्हणचेच ८२ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपर्यंत न पोहोचू शकलेल्या भागांमध्ये कर्नाटक (६५ टक्के) कर्नाटक किनारपट्टी (८० टक्के), केरळ (७३ टक्के), मराठवाडा (७२ टक्के) आणि विदर्भ (७३ टक्के) यांचा समावेश होतो.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक म्हणजेच १०० टक्के होण्याचा अंदाज आहे. मान्सूनपूर्व अंदाजानुसार आत्तापर्यंत सर्व घडामोडी झाल्या असून, हीच परिस्थिती कायम राहणार आहे. या अंदाजामध्ये ८ टक्के पाऊस कमी अथवा जास्त होऊ शकतो. यंदाचा हंगाम संपेपर्यंत प्रशांत महासागरावरील तापमान सरासरीपेक्षा कमी होण्यासारखी (ला निना) परिस्थिती नसून, यंदा सामान्य परिस्थितीच कायम राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने सध्या पाऊस लांबला आहे. जोरदार पावसासाठी २० ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सरासरीपेक्षा जास्त अथवा कमी झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
स्टेशन पडलेला पाऊस (जूनपासून) सरासरीच्या तुलनेत पाऊस
मुंबई १११८ ३२० (कमी)
नागपूर ५८८.७ १६.४ (जास्त)
पुणे ४०६.६ ४१.४ (जास्त)
औरंगाबाद २५३.२ ८४.९ (कमी)
नाशिक ७४०.५ ३९७.६ (जास्त)
कोल्हापूर ४०२.४ १७८.३ (कमी)
सातारा ३४७.९ १५०.९ (कमी)
सांगली १३९.५ ११६.४ (कमी)
रत्नागिरी १५५१.६ ५१२.२ (कमी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या फेरीसाठी दुपारपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या फेरीला आज, गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, अतिरिक्त फेऱ्यांमधील पहिल्या फेरीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी बुधवारी दिली
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पिंपरी-चिंचवडमधील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशाची शेवटची चौथी फेरी बुधवारी संपणार होती. मात्र, या फेरीला एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे अकरावी प्रवेशासाठी चार नियमित फेऱ्या झाल्यानंतर तीन अतिरिक्त फेऱ्या घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार विशेष तीन फेऱ्यांमधील पहिल्या फेरीला आज गुरुवारी सुरुवात होत आहे. गुरूवारी सायंकाळी पाच वाजता विशेष पहिल्या फेरीसाठीच्या रिक्त जागा व कट ऑफ गुण जाहीर करण्यात येतील. या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांना ११ ते १३ ऑगस्टपर्यत अर्ज भरता येणार आहे. या विशेष फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीनुसार विद्यार्थ्यांना शुल्क भरून १८ व १९ ऑगस्ट रोजी प्रवेश घेता येणार आहेत.

६५,००० प्रवेश पूर्ण करणार
प्रवेशाच्या गुणवत्ता यादीनुसार कॉलेज देऊनही प्रवेश न घेतलेल्या व आतापर्यत कोणतेही कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्जाचा फक्त ‘भाग २’ भरावा लागणार आहे. हा अर्ज भरत असताना किमान दहा कॉलेजांना पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. हा भाग भरणारे विद्यार्थीच या फेरीसाठी पात्र होणार आहेत. चौथ्या फेरीपर्यंत साधारण ६० ते ६५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण होणार आहे. उर्वरीत १२ ते १५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश देखील या विशेष फेरीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन निधीसाठी शास्त्रज्ञ रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, देशात वैज्ञानिक विचारांचा प्रसार करावा आणि अवैज्ञानिक संकल्पनांना पायबंद घालावा या मागण्यांसाठी बुधवारी शास्त्रज्ञांनी, विज्ञान प्रसारकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुण्यात ‘सायन्स फॉर मार्चा’चे आयोजन केले होते.
सायंकाळी पुणे रेल्वे स्थानक ते आंबेडकर पुतळा या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन, प्रश्न विचारण्याचा हक्क, पुरावे मागण्याचा हक्क, मूलभूत विज्ञानाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि संशोधकांनी घोषणा दिल्या. हा मोर्चा कोणा एका सरकार विरुद्ध नसून, देशात मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले होते.
संशोधनासाठी निधी कमी होत असल्याकडे वक्त्यांनी लक्ष वेधले. मोर्चाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई रानडे, विवेक मॉन्टेरो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर आणि शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ आदींनी आपले विचार मांडले. ‘हमें चाहिये आझादी’च्या घोषणेसह राजकीय भाषणेही मोर्चात झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांनी केला प्रशासनाचा निषेध

$
0
0

उड्डाणपूलासाठी दिरंगाई होत असल्याचे कारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने आवश्यक भूसंपादन करण्यास दिरंगाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा निषेध करून आंदोलन केले. सत्ताधारी नगरसेवकांनीच आंदोलनाची भूमिका घेतल्याचे पाहून विरोधकांनाही त्यांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला.
कोथरूड-बावधन प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप वेडे-पाटील, डॉ. श्रध्दा प्रभुणे, किरण दगडे पाटील, अल्पना वर्पे या भाजपच्या नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारणसभा सुरू होताच निषेधाचे फलक घेऊन ‘वेल’मध्ये उभे राहिले. सत्ताधारी नगरसेवक आंदोलन करत असल्याचे पाहून विरोधकांनीही संधी सोडली नाही. त्यांनीही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. सभेचे कामकाज पाहणारे सभापती, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही विशेष सभा असल्याने आंदोलन करू नका, अशी सूचना केली. त्याला काँग्रेसच्या गटनेत्यांनी हरकत घेतली.
चांदणी चौकातील भूसंपादन कधी होणार, अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आदी प्रश्न नगरसेवकांकडून विचारण्यात आले. पुढील सर्वसाधारणसभेत या विषयी प्रशासनाकडून खुलासा करण्यात येईल, असे सभापतींनी सांगितल्यानंतर आंदोलन संपले. चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलासाठी अद्याप भूसंपादनच झालेले नसताना भूमिपूजनाची घाई केली जात आहे, प्रशासन भूसंपादनाच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही करण्यात आला.
शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. मात्र, या उड्डाणपूलाला लागणाऱ्या जागेचे भूसंपादन झालेले नाही. संपादन नसतानाही भूमिपूजन कसे, असा सवालही विरोधकांनी केला.

एक इंच जागाही ताब्यात नाही
नियोजित उड्डाणपुलासाठी साडेबारा हेक्टर जागा आवश्यक आहे. त्यापैकी एक हेक्टरही जागा अद्याप संपादित झालेली नाही. त्यामध्ये वनविभाग, खासगी जागा, पालिका आणि संरक्षण विभागाच्या जागांचा समावेश आहे. भूसंपादन न झाल्याने या कामासाठीच्या निविदेस मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही भूमिपूजनाचा घाट घालण्यात आल्याने प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाक्या चोरणारे विद्यार्थी गजांआड

$
0
0

छाप मारण्यासाठी, मौजमजेसाठी केले कृत्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळेत छाप पाडण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चार शाळकरी मुलांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून शहरातील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ही मुले शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील आहेत.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तेरा आणि चौदा वर्षाच्या चार मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून फरासखान्यातील दोन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. वाहनचोरीच्या अन्य गुन्ह्यांचा शोध घेत असताना फरासखाना पोलिस ठाण्याचे अमेय रसाळ यांना माहिती मिळाली. एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर दोन दुचाकी उभ्या असून, दोन्ही दुचाकींचा क्रमांक एकसारखाच आहे. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, रसाळ, योगेश जगताप, अमोल सरडे यांच्या पथकाने तेथे धाव घेऊन दुचाकीची माहिती घेतली. त्या वेळी या दुचाकी शाळकरी विद्यार्थ्यांच्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या चारही मुलांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे आणखी एक दुचाकी असल्याचे समोर आले.
या दुचाकी त्यांनी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या दुचाकी जप्त करून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील दोन विद्यार्थी नववी तर, उर्वरित दोघे दहावीचे आहेत. हे चौघेही सुशिक्षित कुटुंबातील असून, त्यांनी पंधरा दिवसांपुर्वी दुचाकी चोरल्या. शाळेत छाप मारण्यासाठी तसेच, मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची पालकांना काहीही माहिती नव्हती. त्यांनी दुचाकींबाबत विचारले असता, मुलांनी त्या आपल्या मित्रांच्या असल्याचा बनाव केला होता. त्यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली असता, धक्काच बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलांची मुस्कटदाबी

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चकार शब्द न उच्चारण्याची तंबी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात प्रथमच कौटुंबिक न्यायालयासाठी (फॅमिली कोर्ट) स्वतंत्र इमारत पुणे शहरात उभारण्यात आली आहे. इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र, तेथे पुण्यातील वकिलांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाची मागणी करणारा शब्दही उच्चारू नये, अशी तंबी देण्यात आली आहे. गेली चार दशके खंडपीठाची मागणी लावून धरणाऱ्या वकिलांसाठी शनिवारचा कार्यक्रम ही सुवर्णसंधी असतानाही त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्यात आली आहे. त्यामुळे वकीलवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायसंस्थेचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, तसेच आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन रितसर मार्गाने खंडपीठ उभारण्याची पुण्यातील वकिलांची मागणी आहे. पुण्याला खंडपीठ द्यावे, असा ठराव राज्य विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र अद्याप या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मंजूर असतानाही त्याकडे गेली चार दशके दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली; मात्र खंडपीठाची मागणी तशी दुर्लक्षितच राहिली. खंडपीठाच्या मागणीला कोणताही राजकीय पक्षाने अजूनही गांभीर्याने घेतलेले नाही, हे पुणेकरांचे दुर्देव आहे.
पुण्यातील वकिलांनी गेल्या काही वर्षांत खंडपीठाच्या मागणीसाठी वारंवार आंदालने छेडली. खंडपीठ नाही तर, किमान सर्किट बेंच तरी द्या अशी मागणीही करण्यात आली. खंडपीठ देण्यापेक्षा ते देणे योग्य कसे नाही यासाठी अनेक मुद्दे उपस्थित करून मागण्यांना चार दशके वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
]
‘अँटिचेंबरमध्ये मागणी करा’
येत्या शनिवारी पुणे कोर्टाच्या इतिहासात प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती फॅमिली कोर्टाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. खंडपीठ मागणीचा मुद्दा मांडण्यासाठी ही सुवर्णसंधी असतानाही वकिलांच्या भाषणस्वातंत्र्यावर मात्र निर्बंध आणण्यात आले आहेत. गेली चार दशके जाहीररित्या मागणी करणाऱ्या वकिलांना मात्र व्यासपीठावर मूग गिळून गप्प बसावे लागणार आहे. खंडपीठाची मागणी करण्यासाठी वकिलांना मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींशी अँटिचेंबरमध्ये केवळ दहा मिनिटे बोलण्याची मुभा देण्यात आली आहे. हा प्रकार वेळ मारून नेण्यासाठी केल्याची वकिलांची भावना आहे.

मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती यांच्या अधिकारात खंडपीठ देता येते. त्यामुळे ते एकत्र असतानाही व्यासपीठावर चकार शब्द काढायचा नाही, हा वकिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. पुण्याला खंडपीठ मिळावे ही आमची मागणी रास्तच आहे.
अॅड. मंगेश लेंडघर

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वराज मला वाचवा; पुणेकराचं 'जबरा' ट्विट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

आपल्याला जर अस्सल पुणेकर व्हायचं असेल, तर समोरच्याचा किमान शब्दांत कमाल अपमान करता यायला हवा, असं विनोदाने म्हटलं जातं. पुणेरी पाट्यांमधून अनेक पुणेकरांनी त्यांची ही 'खासियत' दाखवूनही दिली आहे. याच 'गुणा'ची झलक दाखवत काल एका पुणेकर तरुणाने ट्विटरवर धम्माल उडवून दिली.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या 'जब हॅरी मेट सेजल' या सिनेमाचा अनेकांनी पाणउतारा केला आहे. परंतु, विशाल सूर्यवंशी या तरुणानं हा सिनेमा पाहताना थिएटरमधूनच थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं आणि लवकरात लवकर मला वाचवा, अशी साद घातली. त्यातून सिनेमा किती 'डेंजर' आहे, हे त्यानं अत्यंत मार्मिक शैलीत सांगितलं. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. हा संपूर्ण सिनेमा युरोपमध्ये घडतो. म्हणूनच तिथून सोडवण्यासाठी विशालनं स्वराज यांना विनंती केली.


जगभरातून कुणीही मदतीसाठी ट्विट केल्यास सुषमा स्वराज तत्परतेनं धावून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यावरून, कधीकधी काही ट्विपल्स त्यांची फिरकी घेण्याचाही प्रयत्न करतात. त्यांना स्वराज त्यांच्याच 'स्टाइल'मध्ये उत्तरही देतात. पण, विशाल सूर्यवंशीच्या ट्विटला खरंच तोड नव्हती. आता ट्विटरचा उपयोग अशा पद्धतीने करावा का, हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. पण एक गंमत म्हणून या ट्विटकडे पाहायला काहीच हरकत नाही, नाही का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लू व्हेल’च्या नादात मुलगा बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई, पुण्यापाठोपाठ राज्यातील अन्य शहरात ‘ब्लू व्हेल गेम’ या खेळाचे लोण पसरत चालल्याचे उघडकीस आले आहे. या गेममधील आव्हान (टास्क) स्वीकारत खेळ खेळणारा सोलापूरमधील चौदा वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता झाला आहे. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध घेतला. त्या वेळी तो बसमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिगवण पोलिसांना कळवून त्याला बसमधून ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सोलापूर शहरातील एक चौदा वर्षीय मुलाला ब्लू व्हेल गेम खेळण्याचा नाद लागला होता. त्याच्या पालकांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. या गेममधील एक आव्हान स्वीकारून शाळकरी मुलगा बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडला. सोलापूर बसस्थानक भागातून तो बसमधून पुण्याकडे निघाला. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. मुलाकडे मोबाइल असल्याने पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. मुलगा बसमधून पुण्याच्या दिशेने निघाल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुलाचा माग काढण्यात येत होता. तेव्हा तो बसने भिगवण स्थानकात आल्याची माहिती मिळाली. भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी बसमधून मुलाला ताब्यात घेतले. भिगवण पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या मुलाचे वडील व्यावसायिक असून आई नोकरी करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाची दहीहंडी लाउडस्पीकरविना

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दहीहंडीच्या ऐन तोंडावर राज्यभरातील लाउडस्पीकर व्यावसायिकांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीच्या आणि कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात येत असल्याने सणासुदीच्या काळात राज्यभरात लाउडस्पीकर बंद राहणार आहेत.

पुण्यात झालेल्या बैठकीत साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने बंदची हाक दिली. पोलिसांकडून डी.जे.चालकांना होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टम जप्त करण्याची होणारी कारवाई आणि होणारा छळ या विरोधात हा बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचं असोसिएशनने स्पष्ट केलं. सामान्य वातावरणाचा आवाजही ५५ डेसिबल असतो. मग स्पीकर वाजवायचे तरी कसे? असा सवाल करतानाच पोलिसांकडे डेसिबल मोजण्याची यंत्रणाही नाही, असेही असोसिएशनने स्पष्ट केले. हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. दहीहंडीसह कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात लाउडस्पीकर वाजविण्यात येणार नसल्याचं असोसिएशनने स्पष्ट केल्याने उत्सव मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका

$
0
0

जाहिरात चुकल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशात अडचण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध करताना हलगर्जीपणा केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विभागातील पदव्युत्तर पदवी व पदविका प्रवेशासाठी प्रवेश घेताना कोणत्याही विद्यापीठाची पदवी व संस्कृत विषयाची माहिती, अशी अहर्ता जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज केले. मात्र, आता ऐन वेळी विभागाकडून नवी नियमावली प्रकाशित करण्यात आली असून, त्याद्वारे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत.

विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी संस्कृत विषयाशी संबंधित असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी जाहिरात प्रकाशित केली. विभागात एमए इन संस्कृत लिंग्विस्टिक्स, पीडी डिप्लोमा इन लिंग्विस्टिक्स, एमए इन ट्रान्स्लेशन, एमए इंडियन लॉजिक अँड एपस्टॉमॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी या प्रमुख अभ्यासक्रमांसोबतच पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालतात. या अभ्यासक्रमांना प्रवेशाची मुख्य पात्रता ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि संस्कृत विषयाची माहिती, असे ठरविण्यात आली होती. त्यामुळे विविध शाखेत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३५० रुपये शुल्क भरून अर्ज केले.

विभागाने संबंधित अभ्यासक्रमांसाठी लगाणारी प्रवेशाची अर्हता बदलली आणि दहावी व बारावीला संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत संबंधित अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावच प्रकाशित करण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत माहिती विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी विभागात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विभागाने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून न घेता आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असल्याने जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘ विभागाकडून जाहिरात प्रकाशित करताना चूक झाली असेल. यापुढे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची चूक करता येणार नाही. नियमानुसार आणि शैक्षणिक अहर्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.’
..
‘अभाविप’चा आंदोलनाचा इशारा

संस्कृत विभागात जागा रिक्त राहण्यापेक्षा प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आली आहे. दरम्यान, संस्कृत विभागाने आपली भूमिका बदलावी. तसेच, इच्छुक विद्यार्थ्यांना विभागात प्रवेश द्यावा, अन्यथा अभाविपतर्फे विद्यापीठात आंदोलन करण्यात येईल, असे अभाविप विद्यापीठ प्रमुख श्रीराम कंधारे यांनी सांगितले.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images