Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ओला कॅबचालकाकडून महिलेचा विनयभंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा ओला कॅबचालकाने प्रवासात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतरही चालकाने फोन करून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कॅबचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंगळवारी रात्री उशिरा चालकाला अटक करण्यात आली.
याबाबत ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार कॅबचालक किशोर अप्पाराव यमगर (रा. भाईदर, ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील एका आयटी कंपनीत तक्रारदार या नोकरी करतात. त्या दररोज वडगाव शेरी येथून कॅबकरून कामावर जातात. चार ऑगस्ट रोजी त्यांनी कामावर जाण्यासाठी ओलाची कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी यमगर याच्या कॅबमधून त्या कामावर निघाल्या. त्यावेळी आरोपींनी प्रवासात सतत त्यांच्याकडे बघत होता. अधून-मधून गाण्यांचा आवाज वाढविणे आणि कमी करणे असे प्रकार सुरू होते. तसेच, त्याने रस्त्यात मध्येच गाडी थांबून तक्रारदार यांना ‘तुम्ही खूप सुंदर दिसता. मला तुम्ही आवडता,’ असे म्हणून त्यांना अपशब्द वापरले. तसेच, त्यांच्या मनास लज्जा येईल असे वर्तन केले.
तक्रारदार यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करून त्यादिवशी कामावर गेल्या. मात्र, कॅब चालकाकडे तक्रारदार यांचा मोबाइल क्रमांक गेला होता. त्यामुळे त्याने तक्रारदार यांना वेळोवेळी फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेने या प्रकारांबाबत कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारचा मालक वेगळा असून, त्यांनी यमगरला चालक म्हणून ठेवले होते. या घटनेनंतर यमगर हा पसार झाला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस तपास करत असून, मंगळवारी रात्री उशिरा चालकाला अटक करण्यात आली.

बडीकॉप ग्रुपमध्ये सहभाग नव्हता
आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांनी बडीकॉप ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला व पोलिस यांचा बडीकॉप ग्रुप तयार करण्यात आला होता. पण, ही महिला बडीकॉप ग्रुपमध्ये सहभागी झालेली नव्हती. तसेच, तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीने देखील बडीकॉपमध्ये सहभाग घेतला नसल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाहिरातीच्या दिवशीच मुलाखती घेतल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सेवा सुविधांचा गोंधळ समोर येत असताना प्रशासकीय विभागातील कामाच्या चुकादेखील चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटीद्वारे (आयएचएफडब्ल्यू) भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र, त्याच दिवशी मुलाखती ठेवल्याने अनेक उमेदवार त्यापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या कारभाराबाबत उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ‘आयएचएफडब्ल्यू’ या समितीद्वारे शहर कार्यक्रम व्यवस्थापक, अकाउंटंट, डाटा एंट्री ऑपरेटर, परिचारिका, एएनएम, लिपिक, शिपाई अशा सुमारे ८० पदांसाठी जागा भरण्यात येतात. या पदांसाठी दर सहा महिन्यांनी जागा भरण्यात येतात. या नेमणुका ‘प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम’ (आरसीएच) यासाठी भरण्यात येतात. त्यांना ठराविक वेतनावर करार पद्धतीने सहा महिन्यांसाठी नियुक्त केले जाते. त्या करिता राज्यातील रहिवासाबरोबर संबंधित कामाचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे.
त्यानुसार काही वर्तमानपत्रांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जाहिरात देण्यात आली होती. त्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधित पदासाठी काही उमेदवारांच्या मुलाखती भांडारकर रस्त्यावरील कार्यालयात घेण्यास सोमवारी सुरुवात करण्यात आली. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुखांसह ससून हॉस्पिटलच्या सहयोगी प्राध्यापकांनी या मुलाखती घेतल्या. पुढील आठवड्यात जागा निघणार असून त्या वेळी पुन्हा मुलाखती होणार असल्याचे काही उमेदवारांना मुलाखत घेताना सांगण्यात आले.
एकाच दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली. त्याच दिवशी मुलाखती घेण्यात आल्या. आरोग्य विभागाने हा ‘प्रताप’ केल्याने त्याबाबत उमेदवारांसह माननीयांकडून संताप व्यक्त होत आहे. ठराविक उमेदवारांनाच नोकरीची संधी देता यावी, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने ‘आयएचएफडब्ल्यू’साठी पुन्हा प्रशासनाची मान्यता घेऊन जाहिरात देण्यात येणार आहे. त्यामध्ये जाहिरात आणि मुलाखतींमध्ये काही दिवसांचा कालावधी ठेवण्यात येणार आहे. पुन्हा उर्वरित उमेदवारांना मुलाखती देण्याची संधी मिळेल. त्यामुळे सोमवारी झालेल्या मुलाखती आणि पुढे होणाऱ्या मुलाखतींमधून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
- डॉ. अंजली साबणे, उपआरोग्य प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वखार महामंडळासाठी १७० कोटींचा निधी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ई-कॉमर्स’ कंपन्यांकडून भविष्यात खासगी गोदामे उभारली जाणार असल्याने वखार महामंडळासमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान उभे राहिले आहे. केंद्र सरकारने महामंडळाच्या गोदामांची दुरुस्ती आणि गोदामे अद्ययावत करण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपये मंजूर केले आहेत.’ असे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार ठुबे, माजी अधिकारी रत्नाकर कुलकर्णी, संचालक के. प्रकाश, विश्वास भोसले आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘सध्याचा काळ हा महामंडळासाठी कठीण काळ आहे. आतापर्यंत महामंडळ राज्य सरकारला लाभांश देत आले आहे. मात्र, आता ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांचे आव्हान उभे राहणार आहे. या कंपन्यांकडून खासगी गोदामे उभारली जाणार आहेत. अॅमेझॉन कंपनी या क्षेत्रात येणार आहे. ती जमीन खरेदी करण्यापासून ते गोदामे बांधणे, माल वाहतूक या क्षेत्रात उतरणार आहे. त्यामुळे महामंडळाला खासगी कंपन्यांनी स्पर्धा करावी लागणार आहे.’
‘अनेक गोदामांकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत. पाणी, शौचालये यांची सुविधा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत महामंडळाचे कर्मचारी काम करत असतात. आता गोदामांची दुरुस्ती आणि गोदामे अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे १७० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे.’ असे ते म्हणाले.
‘महामंडळाकडे सुरुवातीला तीन गोदामे होती. आता एक हजार गोदामे झाली आहे. त्यापैकी ८४ गोदामे ही खासगी असून, भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. मध्यंतरी तुरीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गोदामांमध्ये सुमारे साडेबारा लाख क्विंटल तुरीच्या साठवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सध्या गोदामांमध्ये सुमारे ६० लाख क्विंटल तूर साठवून ठेवण्यात आली आहे.’ असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेची विशेष सोय

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
सकल मराठा समाजाच्या वतीने आज (बुधवारी) मुंबईत आयोजित मराठा क्रांती मोर्चासाठी सह्याद्री, महालक्ष्मी आणि तिरुचिरापल्ली (हमसफर) एक्स्प्रेस या तीन रेल्वेगाड्यांना प्रत्येकी एक जादा कोच लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेला, महालक्ष्मी एक्स्प्रेसला कोल्हापूर येथे प्रत्येकी एक जादा कोच लावण्यात येणार आहे. तर, तिरुचिरापल्ली एक्स्प्रेसला मिरज येथे एक जादा कोच लावण्यात येणार आहे.
मराठा मोर्चामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नागरिकांना मुंबईला जाण्या- येण्यासाठी प्रवासी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आयोजक संस्थांनी मध्ये रेल्वेकडे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना जादा कोच जोडावेत, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सह्याद्री, महालक्ष्मी आणि तिरुचिरापल्ली या तीन एक्स्प्रेस गाड्यांना जादा कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या गाड्यांना मुंबईला जाताना आणि येताना हे कोच जोडण्यात येणार आहेत.
कोल्हापूर येथील नागरिकांनी जादा कोचेससाठी सर्वाधिक मागणी केली होती. सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस दररोज कोल्हापूरहून मुंबईला जाते. या दोन्हीही गाड्यांना १६ ते १७ कोच असतात. आता यातील सह्याद्रीला एक; तर महालक्ष्मी एक जनरल कोच जोडण्यात येणार आहे. मुंबईहून कोल्हापूरला येतानाही या एक्स्प्रेसला हे कोच असतील. तिरुचिरापल्ली एक्स्प्रेसला मिरज येथे एक जनरल कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचीही सोय होणार आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चरखा चला के स्वराज्य लेंगे..

$
0
0

डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा यांनी जागविल्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आम्ही लहान होतो; पण सगळं लख्ख आठवतयं. आम्ही पहाटे एकत्र यायचो आणि प्रभात फेरी काढून प्रबोधन करायचो. काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरायचो आणि भारत माता की जय...महात्मा गांधी की जय...चरखा चलाके स्वराज्य लेंगे...अशा घोषणा द्यायचो. या घोषणा तसेच साने गुरुजींची गाणी आम्हाला रोमांचित करायची. भारावून टाकणारा काळ होता तो...’ ज्येष्ठ नेत्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ७५ वर्षांपूर्वीच्या ‘चले जाव’ चळवळीच्या या आठवणी. विशेष म्हणजे ही मंडळी आता नव्वदीमध्ये पोहचली असली तरी क्रांतीसाठी आणि सुराज्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे.
९ ऑगस्ट १९४२ या दिवशी महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँकवर ब्रिटिशांच्या विरोधात ‘चले जाव’चा नारा दिला. आज, बुधवारी ‘चले जाव’ चळवळीला ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी ‘मटा’शी बोलताना या चळवळीच्या आठवणी जागवल्या.
‘करेंगे या मरेंगे’ हा ठराव ८ ऑगस्ट रोजी झाला. तेव्हा मी १२ वर्षांचा होतो. वातावरण इतक छान आणि भारलेलं होतं. महात्मा गांधींनी ‘चले जाव’ची घोषणा केल्यानंतर आम्ही गुप्तपणे पत्रक वाटायला सुरुवात केली. भाई वैद्य आमचे नेते होते. साने गुरुजी भूमिगत राहून काम करायचे. गुरुजींनी स्वातंत्र्याच्या प्रेरणा खूपच जागवल्या. वय लहान असले तरी आमच्यावर सेवादलामुळे संस्कार संस्कार झाला आणि स्वातंत्र्यलढ्याचा अर्थ कळू लागला. माझा मामा लक्ष्मण गायकवाड आणि काही साथीदारांना अटक झाली होती; पण आम्हाला कसलीही भीती वाटत नव्हती. आम्ही लढत होतो,’ बाबा भरभरून सांगत होते.
ज्येष्ठ नेते पन्नालालभाऊ यांनीही अशाच मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले, ‘१९४२ च्या चळवळीवेळेस मी नऊ वर्षांचा होतो. आम्ही सहकारी प्रभातफेरी काढण्यासाठी बार्शीच्या किराणा खुंटावर जमायचो. तेथील पांडे चौकात फेरीचा समारोप व्हायचा तेव्हा भारत माता की जय... महात्मा गांधी की जय...चरखा चलाके स्वराज्य लेंगे...अशा घोषणांनी वातावरण भारावून जायचे. अ. दा. सहस्रबुद्धे यांनी सुरू केलेल्या वसतिगृहात सेवादलाचे काम जोरात चालायचे. केशवराव सहस्रबुद्धे, दिगंबर थळपती अशांचे आम्हाला मार्गदर्शन मिळत असे. गुप्तपणे काम करताना काही वेळेला पोलिसांची भीती वाटायची. मुंबईतील सत्याग्रहावर गोळीबार झाला असून सेवादलाच्या शाखेत झेंडा लावायला मनाई केली आहे, असे आम्हाला सांगण्यात आल्यानंतर आम्हा मुलामुलींच्या रागाला सीमा उरली नव्हती. 'आता उठवू सारे रान,' अशी साने गुरुजींची गीते आमचा प्रेरणास्त्रोत होती.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगी सर्व सुखी असा कोण आहे...

$
0
0

आसावरी गुपचूप

जेव्हा हॉलिवूड नायक रॉबिन विलियम्सने आत्महत्या केली होती, तेव्हा माझ्यासकट अनेक लोक हळहळले होते. या माणसाला कसले दुःख असेल? सगळ्यांना हसवून हा स्वतः कशामध्ये बुडला होता? पण ह्याचं उत्तर फक्त तोच देऊ शकला असता कदाचित... पण आपल्याकडे सत्य हेच राहते, की तो गेला.

जगणे संपवावे असे वाटते, ती वेळ कडेलोटाची असते. एखादा धक्का असा बसतो, की आपण त्यातून सावरणारच नाही असे वाटते. तो धक्का कधी प्रिय व्यक्ती सोडून गेल्याचा असू शकतो, कधी अपयशाचा असू शकतो किंवा कधी बाकीच्या लोकांच्या दृष्टीने एखाद क्षुल्लक कारण असतं. आपल्याला कोणीच समजून घेऊ शकत नाही, असे वाटते. कोणालाच आपण नको आहोत असेही वाटते. आपण जगात अगदी एकटे आहोत, आपले म्हणावे असे कोणीच नाही अशीही भावना मनात येते. स्वप्रतिमेचा चक्काचूर होतो. कुठल्याच गोष्टीत रस वाटेनासा होतो. आणि अशा वेळी आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय डोळ्यासमोर दिसत नाही.

राजीखुषीने, गंमत म्हणून कोणी जीव देईल? थ्रिल म्हणून जीव देणाऱ्या व्यक्तीलाही स्वतःचे आयुष्य सहज संपवावे, असे वाटत असेल, तर तिला आयुष्यात मजा येत नाहीये. मुळात आत्महत्या करून तरी थ्रिल मिळावे, इतके आयुष्य कदाचित कंटाळवाणे झाले असेल? जन्माला आल्यावर जीवंत राहणे ही सर्वांत मोठी निसर्गदत्त भावना आहे. आपल्या सगळ्या कृतींमागची ती एक मूलभूत प्रेरणा आहे. आणि तिच्या विरुद्ध वागावे असे आपल्याला वाटत असेल, तर नक्की काहीतरी चुकते आहे.

जेव्हा आपल्याला स्वतःलाच संपवावे वाटते, तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला काय जाणवत असतं, तर या आपल्या दुःखामध्ये आपण एकटे असल्याची जाणीव. आणि या जाणिवेमुळे आपण जगापासून, आपल्या आप्त-स्वकीयांपासून तुटतो. या जाणिवेमुळे आपण आत्महत्येकडे जास्त वेगाने जातो.

एका अशाच शिबिरामध्ये सर्व शिबिरार्थींना आपल्या आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायला सांगितली. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचे दुःख वेगळे. पण प्रत्येकाला दुःखाचा अनुभव मात्र तोच. मग हाच प्रयोग आम्ही गटा बाहेर करायला सांगितला. मग असे लक्षात आले, की ज्यांना आत्महत्या करावीशी वाटत नाही, त्यांनाही दुःखाचा अनुभव आहेच. अगदी टोकाच्या दुःखाचा अनुभव आहे. कोणीच पूर्ण सुखी नाही.

यामुळे दुःख कमी होत का? तर नाही. दुसऱ्या कोणाचं दुःख पाहून आपले दुःख कमी वाटते का? तर तेही नाही. कारण आपले दुःख जड असतेच. (आणि ते नाकारायचे काहीच कारण नाही.) या दुःखात आपण एकटेच आहोत, ही जाणीव नक्की कमी होते. आपण जगापासून तुटलो आहोत, ही जाणीव कमी होते. वास्तविक या सगळ्याच दुःखाबद्दल आपल्यामध्ये संवेदनशीलता जागृत होते. आणि ही संवेदनशीलता आपल्याला जगाशी जोडते. या दुःखामुळे आपले आयुष्य समृद्ध होते.

पण तरीही दुःख शिल्लक राहते. आता आपण निर्णय घ्यायचा असतो, स्वतःबरोबर मैत्री राखण्याचा. स्वतःला प्रेमाने वाजवण्याचा. जर आपल्या परिस्थितीत आपला जीवश्च कंठश्च मित्र/मैत्रीण असेल, तर मी त्याच्याशी/ तिच्याशी कसे बोलेन? जर माझ्या परिस्थितीत माझं अपत्य असेल तर मी कसे वागेन?

जेव्हा मी स्वतःशी मैत्री करते, तेव्हा माझे दुःख कमी करण्यासाठी जर एखादी कृती, एखादा निर्णय घेणे जरुरी असेल, तर मी ते नक्की करेन. पण कधी कधी आपण परिस्थितीपुढे हताश असतो. आपल्या कोणत्याच निर्णयाने, कृतीने ते दुःख कमी होणार नसतं. प्रिय व्यक्तीच्या विरहाचं, मृत्यूचं दुःख, दुर्धर आजाराचं दुःख, सर्वस्व गमावल्याचं दुःख.... आणि ही यादी मोठी आहे. आणि पुन्हा याही वेळी मी या परिस्थितीत सापडलेल्या स्वतःच्या प्रिय व्यक्तीला किंवा अपत्याला कशा प्रकारे वागावेन? आणि तस मी स्वतःला वागवण्याची निर्णय घेणे, हे महत्वाचे असते.

आत्महत्येचा विचार हा हळूहळू होत गेलेला प्रवास असतो. कधी तो इतर लोकांना जाणवतो, तर कधी तो समजतही नाही. पण आपण तर आपला हा प्रवास बघत असतो ना? आपल्याला लागलेल्या पहिल्या ठेचेपासून ते रक्तबंबाळ होईपर्यंतचा प्रत्येक टप्पा आपल्याला माहिती असतो.

आपल्या मनाला आपण आपल्या प्रत्येक कृतीमधून काही सांगत असतो. शिकवत असतो. अनेक गोष्टी आपण सवयीने करत असतो. जितक्या वेळा आपण ती कृती परत करतो, तितकी तिची मनाला सवय होते आणि ती आपल्या अक्षरशः अंगवळणी पडते. थोड्याच दिवसांत आपण ती क्रिया काहीही विचार न करता आपोआप करू लागतो. आता प्रश्न असा आहे, की मी जर स्वतःचा सगळ्यात जवळचा मित्र असें, तर कशा प्रकारच्या सवयी मी मनाला लावेन? याबद्दल पुढच्या लेखात बोलू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक स्तरावरही ‘पुणे सुपरफास्ट’

$
0
0

पुणे : लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन आणि दुबईपेक्षा पुणेकरांना दर वर्षी दरडोई अधिक वीज मिळते, लंडन व लॉस एंजेलिसच्या तुलनेत पुण्यात झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे पुण्यातून या शहरांपेक्षा अधिक पेटंट्स दाखल होतात, तर या शहरांच्या तुलनेत १५ ते २४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाणही पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याला वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटाचे ‘प्लॅटिनम सर्टिफिकेट’ मिळाले आहे.
टाटा ट्रस्टने ‘वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटा’च्या सहकार्याने ‘सिटी डेटा फॉर इंडिया’ ही पाहणी केली. ‘आयएसओ ३७१२०’नुसार १७ संकल्पनांवर आधारित विविध १०० मुद्द्यांनुसार ही पाहणी करण्यात आली. भारतातील फक्त पुणे, सुरत आणि जमशेदपूर ही शहरेच हे सर्टिफिकेट मिळविण्यास पात्र ठरली. या पाहणीतील तुलनेसाठी निकषांची निवड करण्याचे स्वातंत्र्य संबंधित शहरांना होते, अशी माहिती टाटा ट्रस्टचे पार्टनरशीप अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रभात पाणी यांनी ‘मटा’ ला दिली. ऊर्जेच्या वापराबाबत या पाहणीतील ४१ शहरांमध्ये पुण्याचा ४१ वा क्रमांक लागतो. पुण्यात दर वर्षी दरडोई ७२९.९५ किलोवॉट विजेचा वापर होतो. हा आकडा दुबई, लॉस एंजेलिस, बोस्टन, ब्रिस्बन आणि लंडनपेक्षा अधिक आहे.
तरुणांची संख्या अधिक
या पाहणीनुसार पेटंट्स दाखल करण्यातही पुणे आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी १०.७७ पेटंट्स दाखल होतात, तर ब्यूनॉस आयर्समध्ये हे प्रमाण ८.९ आणि लंडनमध्ये अवघे ३.४ इतके आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीनेही पुण्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातील १८.५१ टक्के लोकसंख्या ही १५ ते २४ या वयोगटातील आहे. लंडनमध्ये हेच प्रमाण १२.१९ टक्के, दुबईत ११.२३ टक्के आणि अॅमस्टरडॅममध्ये १३ टक्के इतके आहे. त्यावरून पुण्याला कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीत योग्य लक्ष देऊन आर्थिक उन्नती साधण्याची संधी असल्याचे स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरचा पत्रा झोपडीवर आदळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

अवकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा दहा किलो वजनाचा लोखंडी पत्रा रामटेकडी झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरावर पडला. त्यामुळे छताचा पत्रा फाटून तसेच, लोड बेरिंगची फरशी तुटून घरात पडला. या अपघातात घरातील गृहिणी थोडक्यात बचावली. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पठाणवाडी येथे घडली.

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे बेनिथ फ्रान्सिस लोबो (वय ५०) यांचे पत्र्याचे घर आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधील लोखंडी वस्तू घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली. घटना घडली त्या वेळी घरात लोबो यांच्या पत्नी व्हिक्टोरीया होत्या. एकाएकी मोठा आवाज येऊन पत्रा फाडून एक जड वस्तू फरशीवर पडली. त्यामुळे घरातील आणि शेजारच्या व्यक्ती घाबरून बाहेर आल्या. त्याच वेळी हेलिकॉप्टर वरून गेल्याचे दिसले. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पाहणी करून लोखंडी वस्तू ताब्यात घेतली...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगसाठी ‘सीईटी’च होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंगसाठीही मेडिकलच्या धर्तीवर ‘नीट’सारखी परीक्षा घेण्याबद्दल अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. मात्र, राज्य सरकारने पुढील वर्षीच्या प्रवेशांसाठी सीईटीचा दर्जा आणि अभ्यासक्रमाबद्दल परिपत्रक काढल्याने पुढील वर्षीही सीईटी मार्फतच प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीईटीतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचा दर्जा ‘जेईई’प्रमाणे त बायोलॉजीचा दर्जा नीटप्रमाणे असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ‘नीट’च्या धर्तीवर एकसमान पात्रता परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र वगळता इतर काही राज्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून, नेमका कोणता अभ्यास करायचा याबाबत विद्यार्थी चिंतेत होते. ही चिंता अखेर तंत्रशिक्षण विभागाने (डीटीई) दूर केली आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या ‘सीईटी’बाबातचा दर्जा आणि अभ्यासक्रम ठरविणारे परिपत्रक डीटीईचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी जाहीर केले आहे.

बारावी अभ्यासक्रमाला अधिक प्राधान्य
पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) ‘सीईटी’त इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. तर अकरावीच्या अभ्यासक्रमाला कमी महत्त्व देण्यात येईल. याबाबत राज्य शिक्षण मंडळाशी व तज्ज्ञांशी चर्चा करून अंतिम अभ्यासक्रम जाहीर केला जाईल. पुढील परीक्षेतही निगेट‌िव्ह मार्क पद्धत बंद करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएमई’जवळ फुटला गॅसपाइप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महत्त्वाकांक्षी पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना, मंगळवारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ (सीएमई) महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) पाइपलाइन फुटल्याने त्यातून काही काळ गॅस गळती झाली.
पोलिस, अग्निशामक दल, एमएनजीएल आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती थांबवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. महामेट्रोतर्फे पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यान मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. सीएमईजवळ जिओ-टेक्निकल सर्वेक्षणाचे काम सुरू असताना, सकाळी दहाच्या सुमारास एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला खोदाईमुळे हानी पोहोचल्याचे लक्षात आले. त्यातून, गॅस गळती झाल्याने तातडीने अग्निशामक दलासह महामेट्रो आणि एमएनजीएलचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. युद्ध पातळीवर काम करून गॅस गळती रोखण्यात यश आल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्याखाली असलेल्या विविध सेवा वाहिन्यांची माहिती देणे आवश्यक आहे. या गॅस पाइपलाइनबद्दल महामेट्रोला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, या पुढील काळात खोदकाम करताना अधिक खबरदारी घेण्यात येईल, असेही स्पष्टीकरण महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपूजनात रंगणार श्रेयवाद

$
0
0

उत्साही आमदारांमुळे पालिकेला दूर ठेवल्याची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात चांगलेच फटाके फुटण्याची चिन्हे आहेत. या उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्गातर्फे (एनएचएआय) करण्यात येणार असल्याने कार्यक्रमात पालिकेला फारसे विश्वासात घेण्यात आलेले नाही. तर, दुसरीकडे खडकवासला मतदारसंघातील या पुलाच्या कामामध्ये कोथरूडच्या आमदारांनी अधिक रस घेतल्याने कार्यक्रमाला श्रेयवादाची किनार लाभल्याची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत उद्घाटनच्या कार्यक्रमाची रुपरेषा तयार केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये पालिकेला फारसे सहभागी केले नसल्याने पालिकेतील पदाधिकारी कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ आहेत. शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. २७ ऑगस्टला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे.
चांदणी चौक परिसर खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी उड्डाणपूल करण्यासाठी ​कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी रस घेतला आहे. तापकीर यांनीही जसा जमेल तसा या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला आहे. दरम्यान, या पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवे) करण्यात येणार असले तरी, पुलाच्या आजूबाजूची सर्व कामे पालिका करणार आहे. त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ कोथरूड विधानसभा मतदारसंघातीलच असूनही त्यांना भूमिपूजनापासून दूरच ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी तरी कार्यक्रमाविषयी चर्चा झाली की नाही, याबाबत शंका आहे. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह पुणे पौड-रस्ता आणि बावधन, कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे चांदणी चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यातच चांदणी चौकातील उतारावर झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनचएआय) पुलाचे काम केले जाणार आहे.

पाचशे कोटींचा प्रकल्प
हा संपूर्ण प्रकल्प सुमारे पाचशे कोटी रुपयांचा असून, दुमजली पुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या कामासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने ‘एनएचएआय’कडे पाठपुरावा केला होता. अखेर, या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची चिन्हे असून, नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे. याच दिवशी गडकरी यांच्या उपस्थितीत ‘एनएचएआय’च्या इतर प्रकल्पांचा भूमिपूजन-उद्घाटन सोहळाही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चासाठी बंदोबस्त तैनात

$
0
0

एक्स्प्रेस-वेवर जड वाहनांना बंदी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सकल मराठा समाजाचा राज्यव्यापी मोर्चा आज, बुधवारी (९ ऑगस्ट) क्रांतिदिनी मुंबईवर धडकणार आहे. मुंबईतील मोर्चाला जाणाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. हिंजवडीपासून तळेगाव दाभाडे मार्गे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, आज बुधवारी द्रुतगती मार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
मुंबईतील मराठा मोर्चासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव दाखल होत आहेत. सोमवार सकाळपासूनच ते मुंबईकडे रवाना झाले. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, नगर आदी परिसरातून ते जुना पुणे-मुंबई महामार्ग, बेंगळूर-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जाणार आहेत. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासूनच या दोन्ही महामार्गांवर मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांचे परिमंडळ तीन, वाहतूक शाखा, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, कामशेत, लोणावळा येथे ग्रामीण पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, महामार्ग पोलिस देखील गस्तीवर राहणार आहे. सुमारे सातशे ते आठशे पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे, परिमंडळचे तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, ग्रामीण उपअधीक्षक बी. शेळके, उपअधीक्षक जी. एस. माडगूळकर, ज्ञानेश्‍वर शिवतारे, वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक व प्रत्येक पोलिस ठाण्यांमधील तीन अधिकारी व पाच कर्मचारी असा अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार आहे.

जड वाहने थांबविणार
मुंबईला जाणाऱ्या मोर्च्यातील वाहनांना अडकाठी होऊ नये, तसेच मुंबई आणि परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बेंगळुरू-मुंबई मार्गावरील तसेच द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारी जडवाहने उर्से टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही वाहने पुढे सोडण्यात येणार नाहीत. सायंकाळी सात नंतर जड वाहने मुंबईच्या दिशेने सोडण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरमहा १.२५ कोटी व्याज

$
0
0

कर्जरोख्यांच्या २०० कोटींवरील भुर्दंड; मुदतठेवीत गुंतवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समान पाणी पुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांद्वारे घेतलेल्या २०० कोटी रुपयांचे पालिकेला ओझे झाले असून, त्यापोटी दरमहा एक कोटी २५ लाख रुपयांचे व्याज द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. ही रक्कम बँकेत मुदत ठेवीद्वारे गुंतवली तरी पालिकेला दरमहा १५ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कर्जापोटी घेतलेले २०० कोटी रुपये मुदत ठेवीद्वारे बँकेत गुंतवण्याचा निर्णय घेण्यात आला.
समान पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारा निधी कर्जरोख्यांद्वारे उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील २०० कोटी रुपयांचा निधीही उभारण्यात आला. या कामासाठीच्या वादग्रस्त निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने २०० कोटी रुपये खर्च न करताही दरमहा सव्वा कोटी रुपयांचे व्याज भरण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. त्यामुळे ही रक्कम सरकारी बँकेत मुदतठेवीपोटी गुंतवून व्याज मिळवण्याचा निर्णय ‘स्थायी’ने घेतला.
पालिका प्रशासनाने मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी हा प्रस्ताव मुंजरीसाठी आणला. या प्रस्तावाला विरोधकांनी उपसूचना दिली. कर्जरोख्यांद्वारे उभे करण्यात आलेले २०० कोटी रुपये संबंधित वित्तीय संस्थांना परत पाठवून द्यावेत आणि भविष्यात गरज भासल्यास पुन्हा घेण्याची उपसूचना करण्यात आली. मात्र, त्यावर एकमत न झाल्याने मतदान घेण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी उपसूचना दिली होती. ही उपसूचना आठ विरूद्ध पाच मतांनी फेटाळण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
विरोधकांनी उपसूचना दिल्यानंतर प्रशासनाने बैठकीतूनच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड’ या सल्लागार कंपनीशी संपर्क साधला. कर्जरोख्यांद्वारे उभे केलेले २०० कोटी रुपये संबंधित वित्तीय संस्थांना परत पाठवून देता येतील का? याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, सल्लागार कंपनीने अशी कुठलीही तरतूद नसल्याने ही रक्कम बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पालिकेने बँकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, सहा महि​न्यांसाठी मुदतठेव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्याच्या बँकांमधील मुदतठेवींवर सुमारे ६.६० किंवा ६.७० टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनशे कोटी रुपयांच्या ठेवींवर अंदाजे एक कोटी १० लाख रुपये व्याज मिळण्याचा अंदाज आहे. तरीही पालिकेला दरमहा १५ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

‘चार कोटी रुपये खर्च’
समान पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या २०० कोटी रुपयांतून आतापर्यंत चार कोटी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेचे डिझायनिंग तसेच विविध कारणांसाठी ही रक्कम खर्च करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे सध्या १९५.८७ कोटी रुपये बँकेत मुदत ठेवीद्वारे जमा कण्रयात येतील.

‘कर्जरोखे परत करा’
प्रशासनाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांच्या पैशांचा चुराडा होतो. कर्जरोख्यांच्या व्याजापोटी पहिल्या महिन्यांत एक कोटी २५ लाख रुपयांचे व्याज फुकट भरावे लागले. भविष्यात आता दरमहा किमान पंधरा लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे हे कर्जरोखे परत करा, अशी मागणी उपसूचनेद्वारे करण्यात आली होती. मात्र, केवळ मतदानाच्या आधारे भाजपने ही सूचना फेटाळली. महापालिकेला अधिकाधिक कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोप स्थायी समिती सदस्य अविनाश बागवे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगाव ग्रामपंचायत अपहारप्रकरणी फौजदारी गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हवेली तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीत झालेल्या २७ लाख ९० हजार रुपयांच्या गैरव्यवहाराच्या सुरू असलेल्या चौकशीत अनिमियतता आढळली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सदस्य अशा ११ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भातील हवेलीच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. लोहगाव येथील बाजार कर वसूल करण्याचे अधिकार हे संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला देण्यात आले होते. हे अधिकार बेकायदा देण्यात आले होते. त्यामुळे बाजार करापोटी वसूल केली जाणारी रक्कम ग्रामपंचायतीला न मिळता ती ट्रस्टला जमा केल्याने २७ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचायतीच्या सदस्यांच्या विरोधात चौकशी सुरू होती. चौकशीचा अहवाल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे दिला होता. त्यानुसार ही कारवाई करणयात आली.

लोहगाव येथील बाजार कर वसूल करण्याचा अधिकार संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला देण्यात यावा याबाब ग्रामपंचायतीने २०१३मध्ये ठराव केला होता. त्यानुसार कर वसुलीचा ठेका खासगी ठेकेदारास देण्यात आला होता. करापोटी ठेकेदाराने २७ लाख ९० हजार रुपयांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम ग्रामपंचायतीला जमा करणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता ती ट्रस्टला जमा केली. बाजार कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची बाब आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीने रीतसर बाजार लिलाव करणे हे बंधनकारक केले आहे. संबंधित ठेकेदारास रीतसर पत्र देऊन बाजार कर वसुलीचा ठेका देणे व त्यासाठी अटी शर्तीनुसार करारनामा करून घेणे या प्रक्रिया केल्या नाहीत. परंतु, ग्रामपंचायतीने बेकायदा ठराव करून बाजार कर वसुली डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ अखेरपर्यंत संत तुकाराम महाराज ट्रस्टकडे जाणीवपूर्वक वसूल करण्याचा अधिकार ठरावाद्वारे दिले. परंतु, जमा केलेली रक्कम पंचायतीकडे जमा करणे अपेक्षित होते. तरीही, ती रक्कम अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तसेच लोहगाव ग्रामपंचायत बाजार कराची वसुली करण्यासंदर्भात कागदपत्रे, कराची जाहिरात करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केल्याचे स्पष्ट होत आहे.

परिणामी, या प्रकरणाला तत्कालीन ग्रामसेवक व माजी सरपंच हे जबाबदार आहेत. त्यांच्यासह अन्य ग्रामपंचायतीचे अन्य सदस्यदेखील जबाबदार असून या सर्वांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिले. गुन्हे दाखल करण्याबरोबरच अपहाराची रक्कम संबिधतांकडून वसूल करण्यात यावी, असाही आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विशेष कक्ष सुरू करण्यात यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर काही व्यावसायिक खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतात. यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मर्यादा येतात. ही गोष्ट लक्षात घेऊन विधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कक्ष सुरू करावा, असा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. पालिकेतील विधी सल्लागार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने या नोटीस बजाविण्यात याव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले बेकायदा स्टॉल्स, बांधकामे, जाहिरात फलक यांच्यावर कारवाई केली जाते. ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुंडाचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा राजकीय दबाब आल्याने कारवाई करताना अडथळा निर्माण होतो. मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीच्या बेकायदा स्टॉलवर कारवाई करताना काही समाजकंटक पालिका कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे समोर आले आहे. तर, काही वेळा पालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अॅट्रॉसिटीचे कारण पुढे करून कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण कारवाईच्या नोटीस विधी सल्लागार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने बजाविण्यात यावी. तसेच, पालिकेच्या सेवकांवर खोटे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होऊ नये म्हणून विधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कक्ष सुरू करण्यात यावा, अशा मागणीचा प्रस्ताव काँग्रेसचे अविनाश बागवे आणि राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी कोटीचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा गिरीश बापट यांच्यासह गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली. इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरी केली जाते. मात्र, गेली अनेक वर्षे सरकारी पातळीवर नाईक यांची जयंती साजरी केली जात नव्हती. याबाबत मुंबईतील आझाद मैदानात रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाची बापट यांनी फडणवीस यांच्याबरोबर भेट घडविली. तसेच, पुरंदर येथे असलेल्या नाईक यांच्या स्मारकासाठी सरकारच्या वतीने निधी मिळावा, ही मागणी मान्य करून १ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे बापट यांनी मान्य केले. रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबतही शासनाकडून सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्वेलरीच्या दुकानात मंगळसूत्र खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. रास्ता पेठेतील अपोलो थिएटरजवळ असलेल्या परमार ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी आनंद परमार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार यांचे रास्ता पेठेत अपोलो थिएटरजवळ ‘परमार ज्वेलर्स’ दुकान आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानात दोन अनोळखी महिला आल्या. त्यांनी मंगळसूत्र खरेदी करायचे आहे, असे कामगारांना सांगितले. त्या वेळी दुकानात गर्दी होती. महिलांनी कामगारांना खोटे नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर दाखविलेले ७१ हजार रुपयांचे मंगळसूत्र कामगारांची नजर चुकवून तेथून निघून गेल्या. त्यानंतर परमार यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी महिलांचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत त्या पसार झाल्या होत्या.

मारहाण करून दागिने चोरले

कारला पाठीमागून धडक दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तीन तरुणांनी तरुणीच्या मित्रांना मारहाण करून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. मगरपट्टा सिटी येथे अ‍ॅमानोरा मॉलसमोरील रस्त्यावर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत शितल जैन (वय २०, रा. सोमवार पेठ) या तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शंभूराज ज्ञानदेव तावरे (वय २८, रा. अ‍ॅमानोरा टाउनशिप, हडपसर) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन या शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शेवाळवाडी येथून आपल्या मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या. तेथून जेवण करण्यासाठी त्या व त्यांचे दोन मित्र व एक मैत्रीण असे चौघे त्यांच्या कारमध्ये कोरेगाव पार्क येथे जेवण करण्यासाठी जात होते. त्या वेळी ते मगरपट्टा सिटी येथील अ‍ॅमानोरा मॉलसमोर आल्यानंतर पाठीमागून त्यांच्या कारला तावरे याच्या गाडीने धडक दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी शितल जैन व त्यांचे मित्र मैत्रिण गेल्यानंतर तावरे व त्याच्या साथीदारांनी जैन यांच्या मित्रांना मारहाण केली. तसेच, शीतल यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट व सोन्याची साखळी असा ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दोन तडीपार गुंडाना अटक

पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करूनही शहरात फिरणाऱ्या दोन तडीपार गुंडांना दक्षिण विभागाच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली.

परशुराम जयराम शिंदे आणि फिरोज हुसेन शेख (दोघे रा. ताडीवाला रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गणेशोत्सव व दडीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार या दोघांची माहिती पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक केली. या दोघांवर जबरी चोरी, मारामारी आदी असे एकूण ११ गुन्हे आहेत. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन, बंडगार्डन भागात यांची दहशत असल्याने त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रकाश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कात्रज येथे घरफोडी

कात्रज येथील आदित्य अपार्टमेंट येथील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरांनी एक लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल आराध्ये (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराध्ये यांचा फ्लॅट शुक्रवारपासून बंद होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास ते घरी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक डी. आर. मोहिते करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वतःच्या मुलीला शेजाऱ्यांच्या मुलीकडे खेळण्यासाठी सोडण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली असून, त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील एका संस्थेत काम करतात. त्यामुळे दोघेही सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत घराबाहेर असतात. पीडित मुलगी घरी एकटीच असते. आरोपी हा त्यांच्या घराजवळ राहण्यास असून, त्याला दोन वर्षांची मुलगी आहे. पीडित मुलगी आरोपीच्या मुलीसोबत खेळत असते. रविवारी सुट्टी असल्याने पीडित मुलगी घरी होती. त्यावेळी तिचे आई-वडील कामावर गेले होते. सायंकाळी तक्रारदार या कामावरून घरी आल्यावर त्यांची मुलगी रडत होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आरोपीची दोन वर्षांची मुलगी पीडितेसोबत खेळत होती. सकाळी अकरा वाजता आरोपी हा त्यांच्या घरी आला. त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. तिने हा प्रकार आईला सांगितला. पण, समाजात बदनामी होईल म्हणून आई-वडिलांनी तक्रार केली नाही. पीडित मुलीकडे आईने पुन्हा चौकशी केल्यानंतर त्याने दोन ते चार वेळा असा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाची वकिलाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर येथील लघुवाद न्यायालयात सुरू असलेल्या दिवाणी दाव्यात उलटतपासणी घेत असताना विचारलेल्या प्रश्नांमुळे चिडून माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका ज्येष्ठ वकिलाला मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यांच्यावर गायकवाड यांनी रिव्हॉल्वर रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली.
या प्रकरणी कैलास गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अ‍ॅड. राजेंद्र विटणकर (६३, रा. कर्वेनगर) असे जखमी झालेल्या वकिलांचे नाव आहे. बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजीनगर येथील लघुवाद न्यायालयात वादी सुनील मोहोळ आणि प्रतिवादी नामदेव मोहोळ यांच्यातील दाव्याची सुनावणी सुरू आहे. अ‍ॅड. विटणकर हे सुनील माहोळ यांच्यातर्फे काम पाहत आहेत. कैलास गायकवाड हे प्रतिवादी असून त्यांची उलटतपासणी सुरू होती.
अ‍ॅड. विटणकर हे गायकवाड यांची उलटतपासणी घेत होते. त्यावेळी अ‍ॅड. विटणकर यांनी मुळशी येथील एका जमीन खरेदीबाबत त्यांना प्रश्न विचारला, त्यावरून गायकवाड यांना राग आल आणि त्यांनी अ‍ॅड. विटणकर यांना ‘मला ओळखत नाही का, बाहेर चल, तुझ्याकडे पाहतो,’ अशी धमकी दिली.
सुनावणी संपल्यानंतर अ‍ॅड. विटणकर हे न्यायालय कक्षाच्या बाहेर आले. त्या वेळी गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार- पाच जणांनी त्यांना गेट नंबर तीनच्या बाहेर नेले. तिथे त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला इजा झाली. त्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर विटणकर यांच्यावर रोखले. इतर साथीदारांनी त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली व त्यांना बरदस्तीने गाडीत बसवत असताना वकिलांची गर्दी जमली. त्या गर्दीत गायकवाड पसार झाल्याचे अ‍ॅड. विटणकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अ‍ॅड. विटणकर यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे बार असोसिएशनतर्फे निषेध
पुणे बार असोसिएशनतर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आणि राज्यातील कोणत्याही वकिलाने गायकवाड आणि इतरांचे वकिलपत्र कोणीही घेऊ नये, आवाहन बारतर्फे करण्यात आले आहे. या बैठकीला ज्येष्ठ विधिज्ञ के. आर. शहा, अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. सुभाष पवार, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. संतोष जाधव, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. कुमार पायगुडे, अ‍ॅड. अमित खोत, अ‍ॅड. चेतन भुतडा, अ‍ॅड. स्वप्नील काळे, अ‍ॅड. मंगेश लेंडघर, अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, अ‍ॅड. अनुप पाटील, अ‍ॅड. संतोष मोटे, अ‍ॅड. ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जपुरवठ्याचा निर्णय सहा महिन्यांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अठराशे कोटी रुपयांचा कर्जपुरवठा (२४५ मिलियन युरो) करण्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील सहा महिन्यांत घेण्यात येणार असल्याचे संकेत फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीने (एएफडी) बुधवारी दिले. पुणे मेट्रो प्रकल्पाचे विविध निकषांनुसार मूल्यांकन करण्यात येत असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीस त्याबाबत करार केला जाऊ शकतो, असे सूतोवाच करण्यात आले.

एएफडीच्या तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी महामेट्रोच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली. तसेच, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या शिष्टमंडळात एएफडीच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख निकोलस मायकल बर्नार्ड, वाहतूक विभागाचे प्रमुख मॅथ्यू वेरडूर आणि प्रकल्प प्रमुख रजनीश आहुजा यांचा समावेश होता. ‘नागपूर मेट्रो प्रकल्पाला एएफडीने कर्जपुरवठा केला आहे. त्यामुळे, महामेट्रोच्या पुणे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने त्यांच्याकडून कर्ज घेण्याची शिफारस केली होती. त्यांच्या शिष्टमंडळाने पुणे मेट्रोची माहिती घेतली असून, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल’, अशी अपेक्षा दीक्षित यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या माध्यमातून २००८पासून एएफडी कर्जपुरवठा करत आहे. त्यामध्ये, सर्वाधिक भर सार्वजनिक वाहतुकीच्या बळकटीवर आहे. बेंगळुरू आणि कोची मेट्रो यांना यापूर्वी कर्जपुरवठा करण्यात आला असून, नागपूर मेट्रोबरोबरही करार झाला आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी पुणे मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून, तांत्रिक, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय निकषांवर त्याची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर, एएफडीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, या सर्व प्रक्रियेस सहा महिन्यांचा अवधी लागेल’, अशी माहिती निकोलस मायकल बर्नार्ड यांनी दिली.

एएफडीने मेट्रो प्रकल्पांसाठी केलेला कर्जपुरवठा

कोची मेट्रो : दोन हजार ७०० कोटी रुपये (३६० मिलियन युरो)

बेंगळुरू मेट्रो : एक हजार ५७५ कोटी रुपये (२१० मिलियन युरो)

नागपूर मेट्रो : ९७५ कोटी रुपये (१३० मिलियन युरो)

पुणे मेट्रो : एक हजार ८०० कोटी रुपये (२४५ मिलियन युरो)


‘परदेशी वित्तीय संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यासाठी केंद्र सरकारकडून हमी देण्यात येते. त्यामुळे, अल्प व्याज दरांमध्ये मेट्रो प्रकल्पाला कर्जपुरवठा होतो. एएफडीचे कर्ज २० वर्षांसाठी असेल.’

ब्रिजेश दीक्षित

व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो


पालिकेचा निर्णय ‘मेट्रो’ला मान्य

कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागेवर पुणे मेट्रो प्रकल्पाचा डेपो, की शिवसृष्टी याबाबत वाद उद्भवला असताना, महापालिकेचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) मान्य करेल, अशी भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने महापौर, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असे संकेत महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.

कोथरूडच्या जागेवर मेट्रोचा डेपो होणार, की शिवसृष्टी याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी शिवसृष्टीचा आग्रह धरला असताना, आता महामेट्रोनेही पालिकेचा निर्णय मान्य करण्याची भूमिका घेत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा मेट्रोला देण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या; पण बुधवारी पालिकेनेच त्यावर निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करत महामेट्रोने कचरा डेपोच्या जागेचा चेंडू पालिकेच्या कोर्टात ढकलला आहे. महापौर, पालकमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि महामेट्रो पालिकेच्या संबंधित निर्णयाचा आदर करेल, अशी ग्वाही व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली.

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी करण्याचा ठराव पालिकेने केला आहे. तर, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) केलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात त्याच जागेवर मेट्रोचा डेपो दाखविण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शिवसृष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेत विशेष सभा घेण्यात आली होती. तरीही, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मेट्रो आणि शिवसृष्टी दोन्ही एकाच ठिकाणी करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मेट्रोचा डेपो आणि शिवसृष्टी एका जागेवर होऊ शकणार नाही, असा अभिप्राय डीएमआरसीने यापूर्वी दिला आहे.

वनाझचे काम दोन आठवड्यांत?

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सचे काम यापूर्वी सुरू झाले आहे. येत्या दोन आठवड्यांत वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या दरम्यानच्या सात किमीचे काम सुरू होईल, असे सूतोवाच ब्रिजेश दीक्षित यांनी केले. या प्रकल्पासाठी सादर झालेल्या निविदांची तपासणी सुरू असून, पुढील आठवड्याभरात पात्र कंपनीची निवड करण्यात येईल. त्यानंतर, या मार्गावरील कामही तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images