Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एकतर्फी प्रेमातून विनयभंग; शाळेत घुसून मुलीला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शाळेत येता-जाता पाठलाग करणाऱ्या तरुणाने साथीदाराच्या मदतीने शाळेत घुसून विद्यार्थिंनीचा विनयभंग करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरातील शाळेत घडला. विद्यार्थिनीला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीलाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
भुऱ्या उर्फ कृष्णा भारतसिंग बावरी व त्याचा साथीदार चिक्या (रा. पोते वस्ती, येरवडा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे (वय ५६, रा. विश्रांतवाडी, धानोरी रोड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवडा परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत. शुक्रवारी दुपारी मधली सुट्टी संपल्यानंतर पीडित विद्यार्थिनी व तिची मैत्रिण वर्गात जात होते. त्या वेळी आरोपी भुऱ्या उर्फ कृष्णा व त्याचा साथीदार शाळेत घुसले. विद्यार्थिनीचा हात धरून त्याने तिला ओढत नेले. ‘मला हो म्हण’ असे म्हणत तिच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. घाबरलेली विद्यार्थिनी शाळेच्या ऑफिसकडे पळत निघाली. मात्र, आरोपीने तिला अडवून तिचा विनयंभग करत मारहाण केली. तिच्यासोबत असणाऱ्या मैत्रिणी तिला वाचवण्यासाठी जवळ येताच भुऱ्यासोबत असणाऱ्या आरोपीने एका मैत्रिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दहा ते पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर दोघेही तिथून पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या दोन्ही मुलींनी शिंदे यांना घटनेची माहिती दिली. भुऱ्या हा शाळेत येता-जाता त्रास देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेतील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की
मुलींना मारहाण करून पसार झालेल्या भुऱ्या व त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी पोलिस येरवड्यातील पोते वस्ती येथे गेले. त्या वेळी आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. आकाशसिंग राजूसिंग बावरी (२७), मोरनीकौर चिरंजीवसिंग दुधानी (३२), रजनीकौर चिरंजीवसिंग दुधानी; तसेच एक ६० वर्षीय महिला व ७० वर्षीय पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक जी. एच. जांभूळकर यांनी तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महारेरा’ कार्यालयास अखेर जागा

$
0
0

पुणे : बांधकाम क्षेत्राला नियंत्रणाखाली आणणारा महारेरा कायदा लागू होऊन तीन महिने उलटल्यानंतर अखेर महारेराच्या विभागीय कार्यालयासाठी पुण्यात जागा निश्चित झाली आहे. यासाठी महापालिकेने औंध येथे जागा देऊ केली आहे. लवकरच ही जागा महारेराच्या ताब्यात येईल. साधारण महिनाभरात या कार्यालयातून कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. याही बाबतीत नागपूरने आघाडी घेतली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच ‘महारेरा’चे नागपूर कार्यालय सुरू झाले आहे.
महारेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली; तर औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन येथे महारेराच्या विभागीय कार्यालयासाठी जागा देेण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. याच इमारतीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचेही (पीएमआरडीए) मुख्यालय आहे.
राज्यात एक मे रोजी ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी’ अर्थात महारेरा हा कायदा लागू झाला. देशात हा कायदा लागू झाल्यानंतर प्रत्यक्षात तो लागू करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले. महारेराचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. कामकाजाच्या सोयीसाठी पुणे व नागपूर येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी महारेराने पुणे महापालिकेशी संपर्कही साधला होता. त्यावेळी महारेराच्या पुणे विभागीय कार्यालयासाठी पुणे महापालिकेतर्फे आवश्यक जागा देण्याची घोषणा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली होती.
प्रत्यक्षात महारेरा लागू होऊन तीन महिने उलटले तरी विभागीय कार्यालयाबाबत घोषणा झालेली नव्हती. दुसरीकडे भोगवटापत्र न मिळालेल्या बांधकामांसाठी ‘महारेरा’अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै रोजी मध्यरात्री संपुष्टात आली. त्यासंदर्भातील अडचणींविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना मुंबईत जावे लागले होते. पुण्यासह, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या व ग्राहकांच्या सोयीसाठी पुण्यातील विभागीय कार्यालय लवकरात लवकर सुरू केले जावे, अशी मागणी केली जात होती. अखेर या कार्यालयासाठी औंध येथे जागा उपलब्ध करून दिली आहे.
‘लवकरच या कार्यालयासाठी प्रमुखाची नेमणूक केली जाईल. त्यानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून ही जागा ताब्यात घेतली जाईल. आवश्यक सुविधा व अन्य बाबींची पूर्तता झाल्यावर येथील कामकाज सुरू होईल,’ असे ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी सांगितले. ‘महारेराची प्रक्रिया ऑनलाइन आहे. मात्र, त्याविषयी मार्गदर्शन अथवा सल्ला हवा असल्यास पुण्यातील विभागीय कार्यालय उपयुक्त ठरणार आहे,’ असे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा हक्काच्या नव्या पळवाटा

$
0
0

-अॅड. भास्करराव आव्हाड

आजही ज्या त्या समाजाचे वंशपरंपरागत धार्मिक कायदे किंवा त्या समाजासाठी, संसदेने केलेले कायदे लागत असतात. म्हणून प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी यांचे कायदे आजही परंपरागत आणि वेगळे आहेत. हिंदूचे कायदे तसे म्हटले तर हिंदूच्या परंपरागत वेद आणि स्मृती यावर आधारलेले कायदे ​स्त्रियांवर अन्याय करणारे होते. पुढे हळूहळू काही सुधारणा स्वातंत्र्यापूर्वीही केल्या गेल्या. उदा. सती बंदी कायदा, ​स्त्रियांचा मालकी हक्क, पुनर्विवाह कायदा. मात्र तरीही खासगी ​जीवनात हात घालायला कायदेमंडळे फारसा प्रतिसाद देत नव्हती. मात्र, हिंदूंनी १९५५-५६ सालात मोठ्या मनाने काही क्रांतिकारी दुरुस्त्या स्वीकारल्या आणि त्यातून १९५५ साली हिंदू विवाह कायदा झाला. या कायद्याने स्त्रियांना समानतेची वागणूक व संरक्षण मिळाले. १९५६ सालात हिंदू दत्तक विधान कायदा, हिंदू अज्ञान पालक कायदा व हिंदू वारसा कायदा हे मंजूर केले गेले. त्यापैकी आपण हिंदू वारसा कायद्याचा विचार करत आहोत.
हिंदू एकत्र कुटुंब पद्धती ही पिढीजात आहे. ही पद्धत चांगली असली, तरी त्यातूनही काही अन्यायदेखील होत होते. हिंदू कायद्याप्रमाणे आजही हिंदू कुटुंब हे एकत्र असते, असे कायदा गृहित धरतो. एकत्र कुटुंबाला मिळकत असण्याची गरज नसते ​किंवा ज्यांच्याकडे अजिबात मिळकत नाही ते एकत्र राहत-खात असतील व एकाच पूर्वजांचे वंशज असतील तर सुना, लेकींसह एकत्र कुटुंब असते. मात्र जर एकत्र कुटूंबात वडिलोपार्जित म्हणजे वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून मिळालेली मिळकत असेल तर ती एकत्र कुटुंबाच्या मालकीची समजली जाते. सर्वांत ज्येष्ठ पुरुष कुटुंबांचा कर्ता असतो व या मिळकतीवर नवीन जन्मणाऱ्या मुलांना जन्मानेच वडिलांच्या बरोबरीने मालकी हक्क मिळत असतो. असा मालकी हक्क स्त्रियांना मिळत नसे. या मालकी हक्कात सहमालकी अथवा संयुक्त मालकी (जॉइन्ट ओनरशिप) म्हणता येईल. अशा कुटुंबातील धारक व्यक्ती मयत झाली तर त्याची वेगळी मिळकत नसल्यामुळे वारसा हक्काचा प्रश्नच यायचा नाही. बाकीचे पुरुष सदस्य मालकी हक्क सहधारक म्हणून घेत असत. या मिळकतींना वडिलोपार्जित हा दर्जा दिल्यामुळे या मिळकतीच्या आधारे मिळविलेल्या मिळकतीही वडिलोपा​र्जित होत असत. त्यामुळे स्त्रियांच्यावर मोठा अन्याय होई. स्त्रियांना न्याय देण्यासाठी १९५६ च्या हिंदू वारसा कायद्याने खास तरतुदी केल्या.
या कायद्याने अशी तरतूद केली की, इथून पुढे धारकाची पत्नी, मुली किंवा मुलांच्या मुली व मुलींची मुले हेदेखील वारस होतील. मात्र, ही तरतूद दिसताना खूप समाधानकारक दिसत असली, तरी यात एक न्यूनता होती. समजा, एक हिंदू मयत झाला असेल व त्याला दोन मुले आणि एक मुलगी असेल व वडिलोपार्जित मिळकत असेल तर ही दोन मुले असं म्हणत की वडिलांच्या हातातील मिळकत सहमालकी हक्काची होती व त्यात दोन्ही मुलांचा हिस्सा होता. म्हणजेच संपूर्ण मिळकत वडिलांची नव्हती. म्हणून या कायद्याने एक काल्पनिक वाटपाची तरतूद केली. असा हिंदू पिता निवर्तला त्यावेळी इतर पुरुष सदस्यांच्या व त्याच्यामध्ये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप झाले असे समजून त्याचा एक तृतीयांश हिस्सा काढला जाई व हा एक तृतीयांश हिस्सा त्याच्या मुलांना व मुलींना सारखा जाई. म्हणजे प्रत्यक्षात मुलीला एक तृतीयांशचा एक तृतीयांश म्हणजे केवळ एक नवमांश हिस्सा मिळे.
मुलांना वाटपाने एक तृतीयांश व वारसा हक्काने एक नवमांश म्हणजे प्रत्येकी चार नवमांश हिस्सा मिळे आणि म्हणून मिळणाऱ्या या किरकोळ हिश्यासाठी मुली भावांशी भांडत नव्हत्या. मात्र, जर धारकाची प्रॉपर्टी वडिलोपार्जित नसेल म्हणजे स्वतंत्र किंवा स्वकष्टार्जित असेल, तर मात्र धारकाची आई, पत्नी, मुली, मुले यांना सारखा हिस्सा मिळत असे. म्हणजेच ५६ सालापासून स्वतंत्र व स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये ​स्त्रियांना समान हक्क मिळाले तरी वडिलोपार्जित मिळकतीत ते मिळत नव्हते. कारण फक्त मुलंच सहमालक व एकत्र कुटुंबांचे मालक सदस्य असत. म्हणून स्त्रियांना आणखी समता मिळणे गरजेचे होते.
१९९४ साली महाराष्ट्र विधीमंडळाने ‘हिंदू वारसा कायदा १९५६’मध्ये एक दुरुस्ती केली. त्यानुसार १९९५ पासून मुलीसुद्धा सहमालक होतील असे ठरविले. मात्र, यात एक बंधन होते. ते असे, की ज्या मुलींचे लग्न हा कायदा होण्यापूर्वी झालेली होती किंवा जिथे हा कायदा होण्याच्यापूर्वी एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप झालेले होते. तिथे मात्र मुली सहमालक किंवा कोपार्सनर होत नव्हत्या. ही त्रुटी महत्त्वाची होती व घटनेने दिलेल्या समतेच्या तत्वाच्या विरुद्धही होती. या दुरुस्तीचा मागोवा घेऊन केंद्रीय संसदेने २००५ मध्ये हिंदू वारसा कायदा १९५६ ला एक मोठी दुरुस्ती केली.
या दुरुस्तीने जो बदल केला तो संपूर्ण भारतभरच लागू झाला किंवा भारताबाहेरील मिताक्षर हिंदूनाही लागू झाला. या दुरुस्तीने असे ठरविले गेली की, सर्वच मुली सहमालक किंवा को-पार्सनर होतील. जरी मुलगी अगोदर जन्मलेली असेल किंवा दुरुस्तीपूर्वीच तिचे लग्न झालेले असेल तरी तिला सहमालकी मिळेल व पुरुष हिस्सेदारांच्या बरोबरीने तिला सारखा हिस्सा मिळेल हा महत्त्वाचा व क्रांतिकारी बदल हिंदू समाजाने स्वीकारला होता. आता स्वकष्टार्जित मिळकत, स्वतंत्र मिळकत आणि वडिलोपा​र्जित मिळकत या सर्वांतच​ स्त्रियांना सारखे हक्क मिळू लागले. हा बदल उशिरा का होईना; पण लागू होऊन स्त्रियांना वारसा कायद्याने समान हक्क दिले. कायदा बदलला, तरी अजूनही पुरुष वर्चस्वाची धारणा बदलत नाही. वडिलांची मिळकत म्हणजे मुलांच्यासाठी, हेच गणित डोक्यातून जात नाही. पुष्कळदा मुली किंवा बहिणीदेखील वडिलांची मिळकत भावांचीच आहे, असेच गृहित धरून चालतात आणि आपले हक्क बजावण्यात कमी पडतात.
कायद्याने दिलेला हक्क असूनही तो त्यांच्या पदरात पडत नाही. पित्याच्या मृत्यूपूर्वीदेखील मुलींना जन्माने सहवारस म्हणून हक्क आहेत. जसे मुलांना वाटप मागता येते, तसे मुलींना वाटप मागण्याचा हक्क आहे. एवढेच की तो त्यांनी बजावायला हवा.
कौटुंबिक खोच अशी आहे की, प्रत्यक्षात वडिलांच्या मृत्यूनंतर या नव्या कायद्याप्रमाणे आईची, मुलांची व मुलींची नावे मिळकतीला लागतात. सगळ्यांची नावे मालकी हक्क सदरी दाखल होतात. मात्र, नंतर भाऊ मंडळी या मुलींच्याकडून ‘हक्कसोडपत्र’ नावाचा दस्त करून घेतात. मग मधाळ शब्द त्यात वापरले जातात, ‘माझ्या वडिलांनी माझे लग्न खूप थाटामाटात करून दिले व मी माझ्या घरी अत्यंत सुखात आहे. म्हणून वडिलांच्या मिळकतीमधील मला वारसा हक्काने मिळालेला माझा हिस्सा मी भावांच्या लाभात सोडून देत आहे’.
हिंदू कायद्याप्रमाणे वाटप नोंदलेलेच पाहिजे अशी गरज नसते. या सर्व तरतुदींचा फायदा घेऊन आणि हा हक्कसोडपत्राचा दस्त नोंदलेला किंवा बिगर नोंदलेला हा कार्यालयात दाखवून भाऊ बहिणींची नावे मालकी हक्कातून कमी करून टाकतात. अशा प्रकारे दिलेले हक्क मागच्या दाराने पळविले जातात.
काही प्रकरणांत तर भावांनी आई आणि बहिणींकडून हक्कसोडपत्र करून घेऊन त्यांची नावे मालकी हक्कातून उडविली व स्वतःच्याच नावाने मिळकतीचा करार बांधकाम व्यावसायिकाबरोबर केल्याचे दिसते. मात्र, अशा हक्कसोडपत्राने ​ स्त्रियांचे हक्क जाणार नाहीत. तो दस्त मूलतः रद्दबातल ठरतो. असा प्रकरणांत मग त्यांना त्यांचे हक्क मिळाले आहेत. मात्र, तरीसुद्धा काहींचे म्हणणे असे होते की, हक्कसोडपत्र लेखी असेल तर हक्क सोडता येतील.
याबाबत दिशा स्पष्ट करणारा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही एका खटल्यात दिला आहे. न्यायमूर्ती रोहिंग्टन नरिमन यांनी सर्व न्यायमूर्तीच्या वतीने निकाल देऊन असे ठरविले की, ‘जेव्हा जेव्हा मयताला स्त्री वारस असते. तेव्हा तेव्हा ​स्त्रीचा हिस्सा वेगळा झाला आहे, असेच समजावे लागेल. तो हिस्सा तिची स्वतंत्र मिळकत असेल. म्हणजेच मग हक्क सोडण्याचा प्रश्न फक्त सहमालकी असेल, तोपर्यंतच असेल. सहमालकी संपल्यानंतर हक्कसोडपत्र लागूच होणार नाही.’ आता स्त्रियांना न्याय तर दिला आहे, फक्त त्यात अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
पूर्वी स्त्रियांची मिळकत ही नवऱ्याच्या वारसांकडे जात असे. मात्र १९५६ च्या कायद्याप्रमाणे स्त्री पूर्ण मालकी हक्काने मिळकत धारण करू शकते. तिची मिळकत तिच्या वारसांना जात असते. म्हणजेच वडिलांच्या वारसाकडे किंवा भावांच्याकडे परत न येणे. तिची मिळकत तिच्या मुलामुलींना मिळेल. म्हणजेच आता कायद्याने दिलेय पण संकुचित मनोवृत्तीने नेलेयं असे घडतेय. आता गरज आहे ती, भावांनी बहिणीचा बरोबरीचा हिस्सा मानसिकदृष्ट्या स्वीकारण्याची व बहिणींनी दडपणाखाली न जाता आपला मालकी हक्क मागून त्याची अंमलबजावणी करण्याची.
मात्र यात काही त्रुटीही आहेत, स्त्रियांचे हक्क अनिर्बंध व्हायचे असतील आणि त्यांना पूर्ण समानता मिळायची असेल तर हिंदू वारसा कायद्यातील व पारंपरिक हिंदू एकत्र कुटुंब कायद्यातील काही तरतुदींत बदल अपेक्षित आहेत. कारण वारसाचा प्रश्न पूर्वीचा धारक निर्वतल्यानंतर येतो. मुलींना जरी जन्माने सहमालक केले, तरी लग्न झाल्यानंतर ती वडिलांच्या कुटुंबाची सदस्य राहत नाही. ती नवऱ्याच्या कुटुंबातील सदस्य होते. सहमालकी हक्क किंवा कोपार्सनरीसाठी एकत्र कुटुंब असणे गरजेचे असते. यातूनच भाऊ-बहिण आणि बहिणीने ​हिंमत केली नाही तर मामा-भाचे असे कौटुंबिक वाद निर्माण होतील. हे सर्व वाद टाळण्याला एक उत्तम मार्ग असा असू शकतो की आता कुटुंबाचा सहमालकी हक्क किंवा वडिलोपार्जित मिळकत ही फक्त हिंदू कायद्यात असलेली कल्पना रद्द करावी आणि इथपर्यंत जाण्यात संसदेला अडचणी वाटत असतील तर निदान मुलीचे लग्न होताक्षणी तिचा एकत्र कुटुंबातील सहमालक किंवा कोपार्सनर म्हणून असलेला मालकी हक्क काल्पनिक वाटप करून वेगळा करावा. तसेच पुढे आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मिळकतीचा वारसा निर्माण होईल, तेव्हा परत मुलींना हे हक्क मिळतील. त्यामुळे आता गरज आहे ती आपल्या हक्कांबाबत जागरूक होण्याची.

(शब्दांकन - वंदना घोडेकर )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरणावरणाच्या स्वयंपाकाचा महिना

$
0
0

- अस्मिता चितळे
‘श्रावण आला..’ असं म्हटलं रे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर किती तरी गोष्टी येतात. ऊन-पावसाचा खेळ, परिसरताली हिरवाई, मधूनच आकाशात उमटणारं इंद्रधनुष्य, श्रावणातल्या पावसावरची गाणी, व्रतवैकल्य, कुळधर्म कुळाचार, उपास असलं काय काय प्रत्येकाच्या मनात श्रावण या शब्दाच्या उच्चारानं डोकावून जातंच. अर्थात बदलत्या काळाला अनुसरून व्रतवैकल्यांचे अवडंबर कमी झाले असले, तरी त्या दिवसांना करायच्या पदार्थांची क्रेझ आजही कमी झालेली नाही. तेव्हा कितीही आधुनिक वगैरे झालो असलो, तरी अजूनही श्रावण घराघरातल्या स्वयंपाकघरांत आपलं ठळक अस्तित्व दाखवून देतो.
आखाड साजरा करून झालेला असतो आणि अगदी दिव्याच्या अवसेपासून व्रतांना आणि त्या पाठोपाठ गोडाधोडाच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली असते.
पहिला रविवार आदित्य राणूबाईचा, सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर, पंचमीला नागपंचमी, षष्ठीला वर्णसटी, सप्तमीला शि‍ळासप्तमी, शनिवारी संपत शनवार, शुक्रवारी जिवती, जन्माष्टमी आणि गोपाळकाला.. एक ना दोन अख्खा श्रावण ‘सेलिब्रेशन’चाच असतो. मग दिव्याच्या अवसेपासून या श्रावणाचं अस्तित्व स्वयंपाकघरात जाणवायला लागतं. श्रावणातल्या सणावारांना विविध भाज्या, गोडाधोडाचे पदार्थ करण्याची तयारी प्रत्येकीने सुरू केलेली असते. अर्थात श्रावण म्हणजे ‘पुरण’ असणार म्हणजे असणार. त्याला पर्याय नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात तुम्ही श्रावणात गेलात तर तुम्हाला पुरणपोळी, दिंड खायला मिळण्याची शक्यता नक्कीच असते.
दिव्याच्या अवसेला पुरणाचा नैवेद्य असतो. शुक्रवारी जिवतीला पुरणाचे दिवे करून त्यांनी मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. अर्थात पुरणपोळी केली जातेच. खमंग पुरणपोळी आणि कटाची आमटी, लोणकढे तूप हा खास देशावरचा बेत आहे. तर कोकणात नारळाचे दूध, तूप पुरणपोळीसोबत देण्याची पद्धत आहे.
नागपंचमीला काही कापायचे नाही, चिरायचे नाही आणि भाजायचे नाही असा एक समज होता. आपल्या पूर्वीच्या बायका खऱ्या चतुर. काही चिरायचे नाही, भाजायचे नाही, कापायचे नाही पण उकडायला बंदी नाही. मग त्यांनी पुरणाचा दिंड हा प्रकार शोधला असावा. कारण दिंड करताना पुरण घोटून बारीक करतात आणि मोहन घालून घट्ट भिजवलेल्या कणकेच्या पुऱ्या लाटून त्यात ते घालतात. मग दुमडून बंद करून उकडवले की झाले दिंड तयार. सोमवारी उपास सोडायला गव्हल्याची, शेवयांची खीर केली जाते. कोकणातल्या अनेक घरांमध्ये सोमवारचा उपास सोडायला श्रीखंड करायची पद्धत आहे. तेच केले पाहिजे असे नाही, पण साधारणपणे केले जाते. कोकणात किती तरी घरांमध्ये श्रावणातले नैवेद्य असतात. काही नैवेद्य तिथीनुसार असतात, तर काही सोमवारी आणि शनिवारचे असतात. पूर्वी शंकराच्या देवळातले पुजारी हे नैवेद्य नेण्यासाठी येत असतं. मग त्या निमित्त त्यांना वरणभाताच्या जेवणासह मुद्दाम गोड पदार्थ आवर्जून दिला जात असे. सोमवारच्या नैवेद्यांमध्ये गव्हल्याची किंवा शेवयांची खीर, खांडवी यांचा समावेश असायचाच. मंगळागौरीला संध्याकाळी हळदीकुंकवासाठी येणाऱ्या बायकांना भाजणीचे वडे, वर दही आणि मटकीची उसळ हा बेत अगदी ठरलेला. मग दुपारच्या जेवणाला अळूची भाजी, पडवळ डाळिंब्या किंवा नुसती डाळिंब्यांची उसळ (डाळिंब्या म्हणजे बिरडं किंवा वाल), खमंग काकडी (ज्याचा उच्चार कोकणात खमण काकडी असाच केला जातो), पंचामृत, नारळाचं दूध आणि पुरणपोळी हाही बेत अगदी सर्रास असतो किंबहुना या बेताशिवाय जणू मंगळागौर होतच नाही. रात्री जेवायला डाळमुगाची खिचडी असते. मंगळागौरीला आलेल्या साऱ्या जणी खमंग भाजणीचे वडे खाऊन वर भरपूर जायफळ घालून केलेली कॉफी घेऊन तृप्त होतात. मग मंगळागौरीला रात्रभर किती खेळ खेळलो यासह भाजणीच्या वड्यांची चवही आठवणीत कायमची जाऊन बसलेली असते. पाठोपाठ दहीकाला येतोच. घरोघरी जाऊन पोहे जमा केले जातात. प्रत्येकाकडचे पोहे वेगळे, दही वेगळे असे घेतले जाते. गावातल्या देवळात काल्याची तयारी होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी गोविंदा गोपाळा असं तालात म्हणत देवळात फुगड्या, आट्यापाट्या, कबड्डी रंगते आणि हंडी फोडल्यावर मग काल्याचा प्रसाद वाटला जातो. काल्याचा प्रसाद म्हणजे दहीपोहे आणि वर फोडणीची मिरची. खरे तर दहीपोहे नेहमीचेच असतात. पण काल्याच्या दिवशी त्या दहीपोह्यांची चव काही वेगळीच लागते. पानग्या, पातोळेही केले जातात. रानभाज्यांचे वेगवेग‍ळे प्रकारही आवर्जून केले जातात. श्रावणी अमावस्येला काही जणांकडे निनावं नावाचा पदार्थ केला जातो. एकुणात काय श्रावणात खाण्याची अगदी मज्जाच मज्जा असते. बदलत्या काळानुसार आता प्रत्येक गोष्ट घरात केली जाते असं नाही. व्रतवैकल्यही आपपल्या सोयीनं केली जातात. त्यातल्या अनावश्यक धार्मिक कर्मकांडांना बाजूला सारून आधुनिक आणि सुटसुटीत माणूसपण जपणाऱ्या प्रथा अनेकींनी सुरू केल्या आहेत. पण असं असलं तरी श्रावणातल्या पदार्थांची परंपरा अजून तरी मोडलेली नाही. फार तर पुरणपोळ्यांचा घाट घरात घातला जात नाही तर विकत आणल्या जातात. श्रा‍वणातली सवाष्ण आणि शनिवारचा नरसू असा सोयीनुसार एकाच दिवशी रविवारी बोलावला जातो आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत श्रावण साजरा होतोच..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडेंना भाजप कार्यकर्त्यांकडून घरचा अहेर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | पुणे

पुणे महानगरपालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 'बावळट' असे संबोधणाऱ्या खासदार संजय काकडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात 'पुणेकर बंधू भगिनींनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीय' या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्यामुळे संजय काकडे यांनी 'पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत', असं विधान केलं होतं. काकडे यांच्या विधानावरून पुणे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. याचाच परिणाम आज शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर्समधून पाहायला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीवर वार करून आत्महत्याचे प्रयत्न

$
0
0

सहकारनगरमधील लॉजमध्ये तरुणाचे कृत्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या गळ्यावर प्रियकराने झोपेतच वार करून स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. सहकारनगर येथील सागर लॉजमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शरद चंद्रकांत जगदाळे (वय २९, रा. तेर, जि. उस्मानाबाद) आणि २१ वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून शरद जगदाळे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद व तरुणी दोघे हे उस्मानाबद जिल्ह्यातील आहेत. तरुणी पुण्यात नोकरीनिमित्त आली होती. तर, शरद हा उस्मानाबाद येथे मोबाइलच्या दुकानात नोकरीस आहे. दोघांचे चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. दोघांनाही विवाह करायचा होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांचा विवाह करण्यास विरोधा होता. त्यामुळे तरुणी विवाहाला नकार देत होती. मात्र, तरीही शरद विवाहसाठी तिच्याकडे हट्ट धरत होता.

शरदचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्याने तरुणीला फोन केला. एक वेळेस शेवटचे भेटण्याची विनंती त्याने केली. तरुणीने भेटण्यास होकार दिल्यानंतर शरद तिला भेटण्यासाठी पुण्यात आला. त्यानंतर रात्री आठ वाजता दोघेही भेटले. साडेआठ वाजता सहकारनगरमधील सागर लॉजमध्ये त्यांनी भाड्याने खोली घेतली. त्याच ठिकाणी बाहेरून जेवण मागवून घेतले. जेवण करून झोपले. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शरद झोपेतून उठला. त्या वेळी तरुणी झोपेतच होती. तरुणी कुटुंबीयांमुळे विवाहाला नकार देत असल्याने शरदच्या मनात राग होता. त्या रागातचे त्याने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वत:च्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने आरडा-ओरडा केला. त्यामुळे लॉजमधील कामगार धावत आले. त्यांनी दोघांनाही भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान,पोलिसांनी तरुणीचा जबाब घेतला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार शरद याच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राठोड दाम्पत्य पोलिस दलातून बडतर्फ

$
0
0

चौकशीनंतर पोलिस आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे
माउंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या पुणे पोलिस दलातील राठोड दाम्पत्याला खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले. या दोघांनी ऐव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय दाम्पत्य असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याचे विभागीय चौकशीत समोर आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिनेश राठोड (वय ३०) आणि पत्नी तारकेश्वरी राठोड-भालेराव अशी पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. राठोड दाम्पत्य २००६मध्ये पोलिस दलात दाखल झाले. सध्या दोघेही पोलिस मुख्यालयात नेमणुकीला होते. २००८मध्ये त्यांनी लग्न केले. एव्हरेस्ट सर करण्यासाठी २० एप्रिलपासून दोघेही अधिकृत परवानगी घेऊन सुट्टीवर गेले होते. त्यानंतर थेट सात जून रोजी एव्हरेस्ट सर केल्याचे त्यांनी जाहीर केले. या दोघांनी २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला. दोघेही एव्हरेस्टवर हातात तिरंगा घेऊन फडकवत असल्याचे फोटोही सोशल मीडियावरून व्हायरल केले. ही बातमी पुणे पोलिस दलात मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच, या दाम्पत्यावर शुभेच्छा वर्षाव झाला होता.

राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याच्या दाव्यावर पिंपरी येथील गिर्यारोहकांनी संशय व्यक्त केला. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी गिर्यारोहकांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली होती. राठोड दाम्पत्य शिखर सर करून पुण्यात परत आल्यानंतर पोलिस दलाला माहिती दिली नाही, तसेच ते कर्तव्यावर हजरही झाले नाहीत. त्यांनी मोहिमेचा अहवाल सादर केला नाही. त्यानंतर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केलेल्या प्रकरणाची चौकशी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केली. चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांना निलंबित केले होते. पोलिस उपायुक्तांमार्फत खात्यातर्गत विभागीय चौकशी सुरू ठेऊन त्यांना बाजू मांडण्यास सांगितले होते. विभागीय चौकशीमध्ये त्यांना बचावाची व बाजू मांडण्याची पुरेशी संधी देऊनही त्यांनी कोणताच ठोस पुरावा सादर केला नाही. त्यानंतर शनिवारी शुक्ला यांनी त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ केले.

दरम्यान, निलंबित केल्यानंतर राठोड दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन पोलिस आयुक्तांवर आरोप केले होते. याविरुद्ध कोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वेचणारी ‘अभिनेत्री’

$
0
0

‘एफटीआयआय’च्या माजी सफाई कर्मचारी पार्वतीबाई सूर्यवंशी यांचा रंजक प्रवास

Tweet : @AdityaTanawadeMT

पुणे : तिने वयाची वीस-पंचवीस वर्ष ‘एफटीआयआय’मध्ये घालवली. सुरुवातीला कचरा वेचला, मग सफाई केली. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्याने आता काम जमेना म्हणून ती निवृत्त झाली; पण तिचे ‘एफटीआयआय’मध्ये वावरणे सुरूच राहिले. कधी मैदानात, कधी बाकड्यावर, स्टुडिओच्या पायऱ्यांवर ती बसून रहायची. ‘एफटीआयआय’च्या काही विद्यार्थ्यांनी तिला हेरले आणि आपल्या लघुपटात नायिका म्हणून घेतले. तिनेही हे नवे आव्हान स्वीकारले. दुर्गम भागात जाऊन शुटिंग केले. लघुपट तयार झाला तो परदेशातही नावाजला गेला. त्यानंतर तिने सेलिब्रिटी म्हणून मिरवायला हवे होते. पण आजही ती ‘एफटीआयआय’च्या परिसरात तशीच मनसोक्त वावरते.

ही गोष्ट आहे पार्वतीबाई सूर्यवंशी यांची. पर्वतीच्या वस्तीमध्ये अगदी छोट्या घरात अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्या पार्वतीबाई यांनी मुख्य पात्र साकारलेला लघुपट बर्लिनसह अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला आहे. तिथल्या रसिकांनीही या आजीबाईंच्या कामाचे कौतुक केले आहे. आजींना मात्र त्याचा पत्ताच नाही. लघुपटात काम केल्याचे त्या अभिमानाने सांगतात, पण त्यात अहंकाराचा अंशही नाही. शनिवारी झालेल्या ‘पदार्पण’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजींचा ‘कामाक्षी’ हा लघुपट दाखवण्यात आला. ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी सतेंद्रसिंग बेदी याने हा लघुपट तयार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांसह रसिकांनीही आजीबाईंचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात आले की आजीबाईंनी फक्त एका नाही, तर अनेक लघुपटांमध्ये अभिनय केला आहे. काही प्रदर्शित होऊ शकले नाहीत तर काही येऊ घातले आहेत. हळूहळू आजींनी त्यांच्या शूटिंगच्या गंमती सांगितल्या आणि एका अभिनेत्रीचा प्रवास उलगडला.

पार्वतीबाई म्हणाल्या, ‘सतेंद्रसिंग बेदी माझ्याकडे आला आणि मला लघुपटात काम करणार का विचारले. मी होकार दिला. मग आम्ही ढवळपूरनगर नावाच्या भागात पंधरा दिवस शूटिंग करत होतो. ‘कामाक्षी’मध्ये पाण्यासाठी झगडणारी एक स्त्री लहानाची मोठी होते. आयुष्यभर ती विहिरीला पाणी लागावं म्हणून झगडते, असा सगळा प्रवास मला काही न बोलताच साकारायचा होता. पंधरा दिवस कित्येक तास मला बसवून ठेवायचे मी बसून राहायचे, असे करत करत शुटिंग पूर्ण झाले.’ ‘आणखी एका विद्यार्थ्यांने लघुपटाच्या शुटिंगसाठी मला निगडी रेल्वे स्टेशनवर नेले होते. अंगावर फाटके कपडे आणि तोंडाला साखरेचे पाणी लावून बसवून ठेवले. चेहऱ्यावर माशा बसाव्यात म्हणून ही युक्ती वापरली होती. तिथेही तशीच बसून राहिले. अशाप्रकारच्या लघुपटांमध्ये अनेक कामे केली. विद्यार्थ्यांनी मला त्याचे पैसेही दिले. आता त्यातूनच जगण्यासाठी लागणारा खर्च थोड्याफार प्रमाणात सुटतो,’ शुटिंगच्या आठवणींना उजाळा देता देता त्या सहजपणे त्यांच्या जगण्याची गोष्ट उलगडून सांगत होत्या.
‘एफटीआयआय’ने आजवर अनेक उत्तमोत्तम कलाकार घडवलेह. त्याच ‘एफटीआयआय’ने पार्वतीबाई सूर्यवंशींसारखे कलाकारही घडवले आहेत. जे आपले खरे आयुष्य पडद्यावर मांडून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
--
‘एफटीआयआय’च्या अनेक लघुपटांमध्ये काम केले. विद्यार्थ्यांनी मला त्याचे पैसेही दिले. आता त्यातूनच जगण्यासाठी लागणारा खर्च थोड्याफार प्रमाणात सुटतो. खूप वर्ष ‘एफटीआयआय’मध्ये पडेल ते काम करते. साफसफाई करते, कचरा उचलते. वयोमानाने जमत नाही म्हणून आता निवृत्त झाले. पण इथली मुले माझ्यावर जीवापाड प्रेम करतात.

- पार्वतीबाई सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारजेत भरदिवसा नऊ लाखाची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारजेतील गणपती माथा येथे भर दिवसा कापड व्यापाऱ्याचे घर फोडून आठ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश चांदोरा (वय ४९, रा. गणपती माथा, वारजे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदोरा हे कापडाचे व्यापारी आहेत. त्यांचे वारजे परिसरात दुकान आहे. चांदोरा हे गणपती माथा येथे राहण्यास आहेत. शनिवारी दुपारी बारा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या घरातील सर्व जण बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमधील कपाटातून अकरा हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण आठ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी ते घरी आल्यांनतर चोरी झाल्याचे समोर आले.

मोबाइल शॉपी फोडली

वडगावशेरीत गुरुगणेश मोबाइल शॉपी फोडून चार लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निखील लुनावत (वय २८, रा. वडगावशेरी) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक ए. जी. मोरे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एडिट’ पर्याय नसल्याने मनस्ताप

$
0
0

पालिकेच्या शिष्यवृतीच्या ऑनलाइन अर्जात त्रुटी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा ऑनलाइन फॉर्म भरताना केवळ ‘एडिट ऑप्शन’ नसल्याने त्याचा त्रास पालक-विद्यार्थ्यांसह महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना होत आहे. चुकीचा भरला गेलेल्या फॉर्मची प्रिंट महापालिकेत नेल्यानंतर त्याची दुरुस्ती करावी लागत आहे. चुकीच्या पद्धतीने भरल्या गेलेल्या फॉर्मची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ‘एडिट ऑप्शन’ सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाइन भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पालकांनी हा फॉर्म ऑनलाईन भरून त्याची प्रिंट महापालिकेला द्यायची आहे. विद्यार्थ्यांना वेळेत अर्थसाह्य मिळावे, यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा फॉर्म भरताना चूक झाली, तर ती ऑनलाइन दुरुस्त करण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. हा फॉर्म ‘सबमिट’ केल्यानंतर त्यामध्ये ‘एडिट’ ऑप्शन नाही. त्याच वेळी अनेक विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना चूक होत आहे. त्यामुळे त्यांना ती चूक दुरुस्त करण्यासाठी महापालिकेत जावे लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरताना ‘एडिट ऑ​प्शन’ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खुद्द नागरवस्ती विकास योजना विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांनी ‘आयटी’ विभागाकडे केली आहे.

‘महापालिका प्रशासनाने या वर्षी शिष्यवृत्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी-पालकांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे. हा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक ‘लिंक’ असलेल्या बँक अकाउंट नंबरचा उल्लेख अर्ज भरताना करावयाचा आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना बँक अकाउंटची माहिती चुकणार नाही,’ असे रांजणे यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेअंतर्गत बारावीच्या परीक्षेत खुल्या गटात ८० टक्क्यांहून अधिक गुणांनी, तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थी, रात्र प्रशालेचे विद्यार्थी, ४० टक्के अपंग असणारे, मागासवर्गीय गटात ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. तसेच, मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेतर्गंत वरीलप्रमाणे उत्तीर्ण असणाऱ्या दहावातील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.

सध्याच्या प्रचलित पद्धतीनसार शिष्यवृत्तीचा फॉर्म क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत होता. अनेकदा तो फॉर्म स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात मिळतो. हा फॉर्म भरणे, त्याच्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्यात येतो. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील अर्जाचे गठ्ठे नागरवस्ती विकास योजना विभागाच्या कार्यालयात येतात. प्रत्येक अर्जांची माहिती कम्प्युटरमध्ये नोंदविण्यात येते आणि त्यानंतर प्रत्येक अर्जाची पडताळणी केली जाते.

प्रक्रियेला वर्षभराचा काळ

प्रत्येक विद्यार्थ्याच्या बँक अकाउंटची माहिती, ‘आरटीजीएस’साठी आवश्यक माहितीची पडताळणीनंतर त्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होते. ही सर्व प्रक्रिया पार पडण्यास वर्षाचा कालावधी लागत असल्याचे दिसते. त्यामुळे हा कालवधी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकिटांबाबत निर्णय नाहीच

$
0
0

‘जीएसटी’बाबत निर्माते संभ्रमात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपटांच्या तिकिटांवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीबाबात राज्य सरकारने चित्रपट निर्माते आणि चित्रसृष्टीला अजूनही संभ्रमावस्थेत ठेवले आहे. मराठी चित्रपटांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले असले तरी अद्याप ‘जीएसटी’बाबतीत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.
केंद्र सरकारने देशातील चित्रपटांसाठी सरसकट करप्रणाली लागू केल्याने प्रादेशिक चित्रपटांच्या तिकीटदरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्यात मराठी चित्रपट टॅक्स फ्री होता. जीएसटी लागू झाल्यानंतर १०० रुपयांपर्यंतच्या तिकीटदरांसाठी १८ टक्के, तर त्या पुढील दरांसाठी २८ टक्के जीएसटी लावण्यात आला. परिणामी, मराठी चित्रपटांची तिकिटेही महागली आहेत. या दरवाढीमुळे प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवतील अशी भिती निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जीएसटी संदर्भात अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही अनेकदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. तिकीटदरावर आकारण्यात येणाऱ्या करात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका केंद्राने घेतली. राज्य सरकारला चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मुभा आहे, असेही केंद्राकडून सांगण्यात आले. त्यामुळे, राज्याच्या वाट्याला येणारा जीएसटी रद्द करून सरकार स्वतःचे नुकसान करून घेणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर सरकारने मराठी चित्रपटांचा प्रेक्षक कमी होऊ देणार नाही. तसेच निर्मात्यांचेही नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ‘जीएसटी’बाबत सरकार नेमके काय करणार हे कळू शकलेले नाही.
या संदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले, ‘राज्य सरकार तिकीट दर कमी करण्याविषयी कोणतीच भूमिका घेत नाही. महामंडळाला सुरुवातीला केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. मराठी चित्रपटांची अवस्था आधीच फारशी चांगली नाही. त्यात ‘जीएसटी’चा अधिकचा भार लागल्याने सर्वसामान्य प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येणे बंद झाले आहे. गेल्या महिन्याभरातील थिएटर बुकिंगवरून हे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने त्वरीत बैठक घेऊन मराठी चित्रपटांना टॅक्स फ्री करण्यासंदर्भात त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा दिवसेंदिवस प्रेक्षक संख्या कमी होत जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चातर्फे जनजागृती रॅली

$
0
0

मुंबईतील ९ ऑगस्टच्या मोर्चाची तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी काढण्यात येणाऱ्या सकल मराठा मूक मोर्चाबाबत जनजागृतीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीला मार्केटयार्ड येथून प्रारंभ करण्यात आला. तेथून दांडेकर पूल, अलका चौक, टिळक रोड या मार्गे स्वारगेट येथून मार्केटयार्ड येथे रॅलीची सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने अद्याप या मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याने नऊ ऑगस्ट रोजी मुंबईत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

बारामतीमध्ये तरुणांचा सहभाग

बारामती : मुंबईत निघणाऱ्या मराठा मोर्चाबद्दल जनजागृती करण्यासाठी रविवारी बारामतीमध्ये मराठा समाजातर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. बारामतीत रेल्वे ग्राउंडवरून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तरुणी, महिला अग्रभागी होत्या. त्यानंतर तरुण कार्यकर्ते होते. भगवे ध्वज लावलेल्या हजारो दुचाकींचा रॅलीमध्ये समावेश होता.

रॅलीला शहरातील रेल्वे ग्राउंडपासून सुरुवात झाली. भिगवण चौक, इंदापूर चौक, कसबा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुन्हा गुणवडी चौक, महात्मा गांधी चौक, भिगवण चौक, पेन्सिल चौक मार्गे रॅली पुन्हा रेल्वे ग्राउंडवर आली. रॅलीमध्ये बारामतीसह ग्रामीण भागातील ११५ गावांतून तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिरूरमध्ये दुचाकी रॅली

शिरूर : मुंबईत नऊ ऑगस्टला निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी शिरूर शहरातून मराठा समाजातर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. येथील बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरुवात करण्यात आली. शहरातील पुणे नगर रस्त्यावरून मारुती आळी, हलवाई चौक, सुभाष चौक, कुंभार आळी, मुंबई बाजार, कापड बाजार, राम आळी, सूरजनगर, स्टेट बँक कॉलनी, हुडको कॉलनी, बाबूरावनगर या भागातून ही रॅली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आता संस्कृतीच्या नव्या व्याख्येची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘संस्कृतीबद्दल सध्या कंठशोष केला जात आहे. संस्कृती या विषयाच्या मूळाशी जाऊन तिची नव्याने व्याख्या करण्याची गरज आहे. त्यावर सखोल चर्चा व्हावी. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन नवा आयाम द्यावा,’ असे मत प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) सांस्कृतिक विभागाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे उद््घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य पवार उपस्थित होते.
‘तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या आभासी जगाला सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बाहेर काढता येईल. परंपरेला प्रश्न विचारून, त्याचे समायोजित अर्थ लावून, स्वतःची भूमिका मांडल्या तरच परंपरा वाहती राहील. प्रत्येकाचे जगणे हा एक प्रयोग आहे. तो ज्याचा त्याने जगला पाहिजे. स्वतःचा, स्वतःच्या अस्तित्वाचा, अवकाशाचा शोध घेतला पाहिजे,’ याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. पुराणिक यांनी वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. हृषिकेश बोरकर व ईशा काळे यांनी सूत्रसंचालन केले. शुभम गिजे यांनी परिचय करून दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावर आज चिंतन

$
0
0

पालकमंत्री, शहराध्यक्ष घेणार पदाधिकाऱ्यांची शाळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेच्या निविदेवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज पालिकेतील कारभारी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांच्यात होणाऱ्या या बैठकीत समान पाणीपुरवठा योजनेची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

समान पाणीपुरवठा योजनेवरून भाजपमधील मतभेद पूर्ण चव्हाट्यावर आले आहेत. या निविदा रद्द कराव्या, की मान्य करायच्या यावरून भाजपमध्ये दोन गट पडले होते. तर, निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला होता. त्यावरून, काकडे आणि पदाधिकाऱ्यांमध्येही कलगीतुरा रंगला होता. अखेर, या सर्व वादातून तोडगा काढण्यासाठी आता पालकमंत्री बापट यांनी मध्यस्थी करायची ठरवली आहे. बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, सोमवारी दुपारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत समान पाणीपुरवठा योजना वेळेत मार्गी लावण्यासाठी कोणती पावले उचलायची, याबाबतची नेमकी दिशा स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्यांच्या (पाइपलाइन) निविदा २५ टक्के जादा दराने आल्याने पालिकेचे सुमारे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती होती. त्याविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठविला. तरीही, सत्ताधाऱ्यांमधील एका गट हा निविदा मंजूर करण्यासाठी आग्रही होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) कारण देत, पाइपलाइन आणि वॉटर मीटरसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या मूळ योजनेचा भाजपच्या दोन माजी नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे.

भाजप सतत बॅकफूटवर

महापालिकेतच संपूर्ण बहुमतासह प्रथमच सत्ता प्राप्त करूनही गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबातच प्रभाव पाडता आलेला नाही. शहरातील कचऱ्याची समस्या असो किंवा समान पाणीपुरवठ्याची योजना, प्रत्येक वेळी विरोधकांच्या रेट्यापुढे भाजपला नमते घ्यावे लागले आहे. नव्वदहून अधिक नगरसेवकांचे घसघशीत पाठबळ असूनही पक्षाला एक पाऊल मागे घ्यावे लागत असल्याने शहराच्या हिताच्या दृष्टीने राबवायच्या योजनांबाबत वाटचाल कशी असावी, यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किशोर’स्वरात रसिक दंग

$
0
0

‘गीत गाता हू मै’ या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आने वाला पल’, ‘वो तो कोई और थी’, ‘जो आखो मे समा गयी’, ‘कोरा कागज था’, ‘ये मन मेरा’, ‘चिंगारी कोई भडके’ अशा एकाहून एक सरस आणि वेगळा बाज असलेल्या किशोर कुमार यांच्या गीतांनी संगीताचे सुरेल पर्व रंगमंचावर अवतरले. ‘अगर तुम ना होते...’ अशा किशोरदांच्या गाण्याचा निराळा अंदाज रसिकांना अनुभवता आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त ‘गीत गाता हू मै’ हा जितेंद्र भुरुक आणि सहकाऱ्यांचा विशेष कार्यक्रम झाला.
किशोरदांनी अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायिकीसोबतच अभिनय व मिश्किलतेच्या आठवणी ऐकताना रसिक रमले होते. ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू...’ या एस. डी.बर्मन यांचे संगीत असलेल्या गीताच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उर्त्स्फूत दाद दिली. ‘गीत गाता हू मै’, ‘ओ मेरी हंसिनी’, ‘तुम आ गये हो...’ अशा गीतांच्या सादरीकरणासोबतच चित्रपटातील त्या गाण्यांच्या चित्रफितीही दाखविण्यात आल्या.
देवानंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन अशा सुपरस्टार अभिनेत्यांसाठी किशोरदांनी गायलेली गाणी ऐकण्याचा स्वरानुभव पुणेकरांनी कार्यक्रमातून घेतला. कलाकारांनी सादर केलेल्या शोले चित्रपटातील ‘कोई हसिना जब रुठ जाती है तो’,प्रेम पुजारी या चित्रपटातील ‘शोखियों मे घोला जाये’, याराना चित्रपटातील ‘सारा जमाना हसिनों का दिवाना’, ‘एक लडकी भिगी भागीसी’, ‘अबके सावन में जी करे’, ‘रिमझिम गिरे सावन’ या गाण्यांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गंमत जंमत चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ या गीताला रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून भरभरून दाद दिली. महेश गायकवाड यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाकी कॉलेजांचे काय?

$
0
0

‘नॅक’ मूल्यांकन नसलेल्या कॉलेजांवर कोणतीही कारवाई नाही
म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या आदेशानुसार कॉलेजांना स्थापनेनंतर साधारण दोन वर्षांत राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. मात्र, या आदेशाला राज्यातील कॉलेजांनी तिलांजली दिली आहे. राज्यातील एकूण दोन हजार ९०९ कॉलेजांपैकी केवळ एक हजार १२७ कॉलेजांनीच नॅक मूल्यांकन केले आहे. या कॉलेजांची मान्यता काढण्याचे अधिकार विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाला असताना विद्यापीठ व विभागाने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यापीठ व विभाग मिळून संबंधित कॉलेजांवर कारवाईचा बडगा उगारणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेने सुरू झालेल्या आर्टस्, सायन्स, कॉमर्स विद्याशाखेच्या कॉलेजांना स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांत नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करावी लागते. अशाच प्रकारची प्रक्रिया तंत्र शिक्षण विद्याशाखेत सुरू होणाऱ्या कॉलेजांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅसेसमेंटकडून (एनबीए) करावी लागते. राज्यात उच्च शिक्षण विभागातील आर्टस्, सायन्स, कॉमर्स विद्याशाखेच्या कॉलेजांची एकूण संख्या दोन हजार ९०९ आहे. या कॉलेजांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी केवळ एक हजार १२७ कॉलेजांनीच नॅक मूल्यांकन केले आहे. तब्बल एक हजार ७८२ कॉलेजांनी नॅकचे मूल्यांकन केलेले नाही.

राज्यात एकूण २८ सरकारी कॉलेज आहे. त्यापैकी २३ कॉलेजांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. राज्यात अनुदानित कॉलेजांची एकूण संख्या एक हजार १७२ असून त्यापैकी मूल्यांकन झालेल्या कॉलेजांची संख्या ९८५ आहे. विनाअनुदानित कॉलेजांची संख्या एक हजार ७०९ आहे. त्यापैकी केवळ ११९ कॉलेजांनीच नॅकचे मूल्यांकन केले आहे. विभागाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार कॉलेजांची स्थापना झाल्यावर कॉलेजांना दोन वर्षांत नॅकचे मूल्यांकन करावे लागते. मूल्यांकन न केल्यास त्यांची मान्यता रद्द समजण्यात यावी; तसेच संबंधित कॉलेजांमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थ्यांची संख्या आढळल्यास त्या कॉलेजची मान्यतादेखील रद्द करण्याची कारवाई कॉलेज संलग्नित असणाऱ्या विद्यापीठ आणि विभागाने करायची आहे. त्याबाबतचे अंतिम आदेश विभागीय सहसंचालकांना काढायचे आहेत. ही परिस्थिती असताना राज्यातील विद्यापीठांनी आणि विभागीय सहसंचालक कार्यालय संबंधित कॉलेजांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच राज्यात खासगी कॉलेज बेकायदा पद्धतीने सुरू असून, त्याचे गांभीर्य सरकारला कधी येईल, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारण्यात येत आहे. दरम्यान, एनबीए मूल्यांकनातदेखील अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रामुळे भाजप अस्वस्थ

$
0
0

पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या गटबाजीचे पडसाद; निनावी पत्रावरून चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्गंत (भाजप) गटबाजीचे उट्टे काढणाऱ्या एका निनावी पत्राने शहरात खळबळ उडवून दिली आहे. हे निनावी पत्र सर्व नगरसेवकांना पाठवण्यात आले असून हा विरोधकांचा डाव आहे की सत्ताधारी पक्षातील गटबाजी हेही स्पष्ट झालेले नाही. या खोडसाळ पत्राने सत्ताधारी भाजपला मात्र अडचणीत आणल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समान पाणी पुरवठा निविदा रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय काकडे यांच्या मुखातून ‘आमचे पदाधिकारी बावळट आहेत,’ असा ओझरता उल्लेख झाला होता. त्याचे पडसाद भाजपमध्ये जोरदार उमटले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी, ‘आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये,’ असा टोला लगावला होता आणि त्यातून भाजपमधील सुप्त संघर्षाला वाट मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांना पाठवण्यात आलेल्या पत्रात खासदार काकडे यांच्या समर्थकांवर होत असलेल्या कथित अन्यायाला वाचा फोडण्यात आली आहे. या पत्रात काकडे यांचा उल्लेख ‘नाना’ असा करण्यात आला आहे. या पत्राद्वारे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असल्याने पुढील काळात भाजपमधील अंर्तगत संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हे पत्र नेमके कोणी पाठवले हे स्पष्ट झालले नाही.

काकडे यांनी गत निवडणुकांमध्ये केलेल्या नियोजनामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेक मंडळींना भाजपमध्ये आणले. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंगावर घेतले. हे नेते आता काकडे यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असून त्यात स्वपक्षीय आघाडीवर असल्याची टीका करण्यात आली आहे. काकडे समर्थकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

‘शहराच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये काकडे यांना सहभागी करा. अन्यथा काकडे समर्थक असलेले ५५ नगरसेवक स्वतंत्ररित्या निर्णय घेऊ. यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही,’ असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, विजय काळे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल, गणेश बिडकर यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, हे पत्र पाठवताना त्याबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सद्य कारभारावर टीका करण्यात आली आहे.

‘बावळट’वरून रंगली फ्लेक्सबाजी

पुणेकर बंधू, भगिनिंनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाही, अशा आशयाचे फ्लेक्स शहरात लागले आहेत. काकडे यांच्या टिप्पणीनंतर उमटलेल्या प्रतिक्रियेचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही व्यक्तींनी सुरू केला असून योग्य राजकीय वेळ साधली असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालचित्रवाणीतून ‘सारथी’

$
0
0

समितीची रूपरेषा लवकरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापनेची (सारथी) पूर्वतयारी पुण्यातील ‘बालचित्रवाणी’ या संस्थेत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ‘सारथी’ संस्थेच्या घोषणेनंतर तब्बल सात महिन्यांनी आता समितीची रूपरेषा ठरविण्यासंबंधीची कार्यवाही होणार आहे.

मराठा क्रांती (​मूक) मोर्चांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, सहा महिन्यातच या घोषणेचा सरकारला विसर पडवा, असे चित्र निर्माण झाले होते. ‘सारथी’ संस्थेच्या स्थापनेच्या पूर्वतयारीसाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) घडविण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावणारे ‘बार्टी’चे माजी महासंचालक डी. आर. परिहार यांच्या समितीची स्थापना तीन जानेवारी २०१७ रोजी केली होती. ही समितीचे कामकाज सुरू झाले नव्हते. त्यांना कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. ही बाब ‘मटा’ने समोर आणली होती. आता राज्य सरकारने समितीला कामकाज सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखविला आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, अर्थशास्त्र, शेती, समाज जीवनातले बदल आणि बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या संस्थेची रचना कशी असावी, तिचे कार्य कशा पद्धतीने असावे, यासाठी डॉ. मोरे व परिहार यांची समिती निकष ठरविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरनिविदांचा परिणाम साठवण टाक्यांवरही?

$
0
0

टाक्यांचे काम पूर्ण झाले, तरी पाइपलाइनशिवाय वापर शक्य नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (२४ बाय ७) जलवाहिन्या (पाइपलाइन) आणि मीटरच्या कामांच्या फेरनिविदांचा परिणाम साठवण टाक्यांवर होण्याची शक्यता आहे. टाक्यांचे काम वेळेत पूर्ण झाले, तरी पाणी साठवण्यासाठी पाइपलाइन जोडण्यात आल्या नाहीत, तर त्याचा उपयोगच होणार नसल्याची बाब पुढे आली आहे.
शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा करता यावा, याकरिता ही योजना आखण्यात आली. त्या अंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागांत ८२ साठवण टाक्या उभारण्याचे काम गेल्यावर्षीच सुरू झाले. या टाक्यांपाठोपठ पाइपलाइनचे काम सुरू होणे अपेक्षित होते. पाइपलाइनच्या निविदा ठराविक कंपन्यांनी जादा दराने भरल्याचे समोर आल्याने पालिकेला पाचशे कोटी रुपयांचा भुर्दंड बसण्याची शक्यता होती. पाइपलाइनच्या निविदांतील त्रुटी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघड केल्या, तर विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवल्याने अखेर वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) कारण देत, या कामांसाठी फेरनिविदा काढण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले.
फेरनिविदा काढल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यादेश (वर्क ऑर्डर) देईपर्यंत किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. साठवण टाक्यांचे काम गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहे. या कामाची मुदत दोन ते अडीच वर्षांची असल्याने त्यापैकी कमी क्षमतेच्या काही टाक्यांचे काम पुढील सहा महिन्यांमध्येही पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. लहान टाक्यांची कामे पूर्ण झाली, तरी या टाक्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनचे काम पूर्ण केल्याशिवाय महापालिकेला पाणी साठवता येणे शक्य नाही. त्यामुळे, पाण्याचे असमान वितरण आणि पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी टाक्यांसोबतच पाइपलाइनचे काम पूर्ण होण्याची गरज असली, तरी सध्याच्या परिस्थितीत या कामांना विलंब होणार असल्याचे स्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा परवाने अद्याप ‘ऑफलाइन’

$
0
0

Tweet : @kuldeepjadhavMT
ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटींमुळे यंत्रणा ठप्प
पुणे : रिक्षा परवाना वाटपासाठी राज्यभरात ‘मॅन्युअली’ अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. यामागे प्रामुख्याने आरटीओतील गोंधळ आणि इच्छुकांची गैरसोय टाळून सुरळीत कामकाज चालावे, हा मुख्य उद्देश होता. मात्र, नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) कार्यान्वित केलेल्या प्रणालीतील त्रुटींमुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया यशस्वी पार पडताना दिसत नाही. त्यामुळे महिनाभर विलंबाने सुरू झालेली प्रक्रिया अद्यापही ठप्पच आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाकडून ऑनलाइन प्रक्रियेचा अट्टाहास का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राज्य सरकारने जून महिन्यात मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याची घोषणा केली. दुसऱ्या दिवसापासूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परवान्याचा अर्ज घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दोन दिवसांची गर्दी पाहून आरटीओ प्रशासनाने ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर आरटीओची ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठीची नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केलेली वेबसाइट कार्यान्वित झाली. या वेबसाइटचे उद्घाटन सोमवारी (ता. ३१ जुलै) झाले. त्या दिवसापासून वेबसाइट तांत्रिक अडथळ्यांमध्ये गुरफटलेली आहे. उद्घाटनाच्या दिवशीच ‘एनआयसी’च्या दिल्ली येथील कार्यालयाला आग लागली. तेव्हापासून ही अर्ज प्रक्रिया ठप्प झाली आहे. वेबसाइट काही वेळासाठी सुरू होऊन पुन्हा बंद होत आहे. त्यातच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज केल्यानंतर शुल्क भरता येत नाही, शुल्क भरले गेल्यास त्याची पावती प्रिंट होत नाही. या पावतीवर संबंधित अर्जदाराला मिळालेल्या अपॉइंटमेंटचा उल्लेख असतो. त्यामुळे अर्जदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे आरटीओ प्रशासनाने अर्जदारांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पैसे भरल्याची पावती मिळाली नाही, तरी कामकाज थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी पैसे भरल्याचा ‘मेसेज’ आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images