Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संरक्षण मंत्रालयाला दिली नोटीस

$
0
0

एका दिवसाचे अधिकृत रेशन
साठ दिवसांत निर्णय रद्द न झाल्यास कोर्टात दाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शांततेच्या ठिकाणी (पीस स्टेशन) नियुक्तीवर असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची रेशन सुविधा बंद करण्यात आल्याने अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, लष्कराच्या कायदा विभागातील कर्नल मुकुल देव यांनी संरक्षण मंत्रालयाला याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
हा निर्णय परस्पर घेण्यात आला असून त्यामुळे सेवाशर्तींच्या अटीचा भंग होत आहे. येत्या ६० दिवसांत हा निर्णय रद्द केला गेला नाही, तर कोर्टात दाद मागण्याचा इशाराही देव यांनी दिला आहे.
‘लष्करासाठी पुरवठा करणाऱ्या आर्मी सर्व्हिस कोअरकडून सर्व रेशनची खरेदी केली जाते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. त्यामुळे त्यांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होतात. त्याआधारेच सरकारने हा दर ठरवला असावा. परंतु, एखादा अधिकारी बाजारात या दराने खरेदी करायला गेला, तर ९६ रुपयांत त्याला एका वेळचे जेवणही घेता येणार नाही,’ असे एका कर्नलने सांगितले.
‘रेशनच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या ९६ रुपयात दिवसभराचे सोडाच; एका वेळचा चौरस आहार घेणेही शक्य नाही. मग नियमानुसार लष्करी अधिकाऱ्यांना मान्य असलेल्या तीन वेळच्या जेवणाची तर गोष्टच सोडा,’ असे लष्करात कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘सरकारने हा निर्णय का व कसा घेतला, याची कल्पना नाही. मात्र, वेतन आयोगाचा सदस्य असलेल्या एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने कोणाशीही चर्चा न करता, कोणतीही माहिती न घेता, कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. यामुळे खरेच बचत होणार आहे का आणि किती बचत होणार आहे, याचाही अभ्यास झालेला नाही,’ अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. ‘यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची चर्चा होती. त्याच वेळी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कृष्णाराव यांनी त्याचे घातक परिणाम होतील, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे हा निर्णय बारगळला होता,’ अशी आठवण लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लवासा’प्रकरणी कदमांचा ‘यू-टर्न’

$
0
0

अन​धिकृत बांधकाम मुद्द्यावरून भाजपकडून कोंडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुळशी तालुक्यातील लवासामध्ये एकही अनधिकृत बांधकाम नसल्याचे लेखी उत्तर देणाऱ्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांनी कोंडीत पकडल्यानंतर तीन महिन्यांत चौकशी करण्याचा खुलासा करण्याची वेळ शुक्रवारी त्यांच्यावर आली. मात्र, लोकलेखा समितीची निरीक्षणे डावलून पर्यावरणमंत्र्यांनी लवासाला ‘क्लीन चिट’ कशी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.
खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लवासामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर, खुलासा करताना रामदास कदम यांनी पर्यावरणाचे सर्व निकष पूर्ण करून नियमावलीनुसारच सर्व बांधकामे झाल्याचे उत्तर दिले. राज्य सरकारने लवासाला दिलेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा नुकताच काढून घेण्यात आला असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत लवासाचे कामकाज होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लवासात एकही अनधिकृत बांधकाम झाली नसल्याबद्दलची पाहणी कोणी आणि कधी केली, असा प्रतिप्रश्न तापकीर यांनी विचारला. तर, बाबूराव पाचर्णे यांनी कदम यांच्या उत्तरालाच हरकत घेतली. ‘लोकलेखा समितीच्या अहवालामध्ये लवासामध्ये पर्यावरणाची हानी करून अनधिकृत बांधकामे झाल्याचे नोंदवले असताना, पर्यावरणमंत्री अनधिकृत बांधकाम नाही, असे उत्तर कसे देतात?’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर, कदम काहीसे गोंधळले आणि त्यांनी ‘पीएमआरडीए’कडून तीन महिन्यांत लवासातील बांधकामांची चौकशी केली जाईल, अशी सारवासारव केली.

गोंधळात चर्चा उरकली
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम ५७ अन्वये प्रशोत्तराचा तास रद्द करून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व एमएसआरडीएचे संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावे अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करून तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच लवासाच्या प्रश्नावरील चर्चा पूर्ण उरकण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानशेत धरणाने गाठली ‘शंभरी’

$
0
0

वरसगावही ८० टक्के भरल्याने पुणेकरांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात पावसाने अल्प विश्रांती घेतली असली, तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या तुरळक सरींमुळे धरणांतील पाण्याची पातळी वाढत आहे. शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही शंभर टक्के भरले आहे. वरसगाव धरण सुमारे ८० टक्के भरल्यामुळे पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मात्र, धरण क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पानशेत धरण शंभर टक्के भरले आहे. पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सुमारे २४.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत धरणात सुमारे २३ टीएमसी पाणीसाठा होता. प्रमुख चार धरणे सरासरी ८४ टक्के भरली आहेत. त्यामुळे सध्यातरी शहरासाठी पुरेसा पाणीसाठा झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही सुमारे ९६ टक्के भरले आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी चासकमान सुमारे ९८ टक्के, डिंभे धरण सुमारे ९६ टक्के, कासारसाई सुमारे ९४ टक्के, घोड आणि भामा आसखेड ही धरणे प्रत्येकी सुमारे ९० टक्के, आंद्रा आणि कळमोडी ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

धरण आणि उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

वरसगाव १०.१२
पानशेत १०.६५
खडकवासला १.९७
टेमघर १.७६
पवना ८.१८
निरा देवघर १०.२९
भाटघर २०.०२
वीर ८.६०
उजनी २७.०२
डिंभे १२.०१
चासकमान ७.४४
भामा आसखेड ६.९१
माणिकडोह ५.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्राचा निर्णय पुढील आठवड्यात

$
0
0

मेट्रो मार्गाच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या नदीपात्रातील १.७ किमीच्या मार्गासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) सुरू असलेली सुनावणी अखेर शुक्रवारी पूर्ण झाली; पण एनजीटीने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. हा निर्णय पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
वनाज ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचा १.७ किमीचा टप्पा नदीपात्रातून जात असल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा होण्याचा दावा करून खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी ‘एनजीटी’त याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षभराहून अधिक काळ त्यावर सुरू असलेली सुनावणी अखेर शुक्रवारी संपली. ‘एनजीटी’कडून याचिकेवर निर्णय दिला जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यावरील निर्णय प्रलंबितच राहिला असून, दोन्ही बाजूंना पुढील आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
पुणे मेट्रोच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) वकिलांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मेट्रो अॅक्टमधील तरतुदींमुळे याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार ‘एनजीटी’ला नसल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने मेट्रोला मान्यता दिल्याने नागरी हिताच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविला जात असल्याचे स्पष्ट केले. मेट्रो अॅक्टनंतर ‘एनजीटी’चा कायदा झाल्याने त्यावरील सुनावणी घेता येईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. तसेच, कोणताही प्रकल्प करताना, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाचे भूमिपूजन महिनाअखेर होणार

$
0
0

केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित राहणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या महिनाअखेरीस म्हणजेच २७ ऑगस्टला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे. अशी माहिती कोथरूच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह पुणे पौड-रस्ता आणि बावधन, कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे चांदणी चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठवड्यातच चांदणी चौकातील उतारावर झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) पुलाचे काम केले जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे पाचशे कोटी रुपयांचा असून, दुमजली पुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या कामासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने ‘एनएचएआय’कडे पाठपुरावा केला होता. अखेर, या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची चिन्हे असून, नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे. याच दिवशी गडकरी यांच्या उपस्थितीत ‘एनएचएआय’च्या इतर प्रकल्पांचा भूमिपूजन-उद्घाटन सोहळाही होणार आहे.

पालिकेकडून भूसंपादन नाहीच
या प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्या दृष्टीने महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी जमीन संपादित कराव्या लागणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. गेल्या तीन महिन्यांत त्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नसून, आता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनापूर्वी तरी पालिका भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करणार का, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएचडी ग्राह्य धरा

$
0
0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला हायकोर्टाने फटकारले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विद्यापीठे आणि कॉलेजांना प्राध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाने प्रदान केलेली पीएचडी पदवी ग्राह्य धरावी लागणार आहे. या बाबतचा आदेश नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिला. तसेच, दुसऱ्या विद्यापीठाची पीएचडी तपासण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला, असेही खडसावले. कोर्टाच्या या निर्णयामुळे देशातील विद्यापीठांमधून पीएचडी पदवी घेतलेल्यांना दिलासा मिळणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या खासगी कॉलेजमध्ये एकाची सहयोगी प्राध्यापक म्हणून सुमारे चार वर्षांपूर्वी नियुक्ती शैक्षणिक संस्थेच्या निवड समितीद्वारे करण्यात आली. त्यानंतर समितीने संबंधित प्राध्यापकाला प्रशासनाची आणि इतर मान्यता मिळण्यासाठी त्यांचा अर्ज विद्यापीठाकडे पाठविण्यात आला. संबंधित प्राध्यापकाने यूजीसीची मान्यता असणाऱ्या खासगी विद्यापीठातून २००९च्या पीएचडीच्या नियमांची पूर्तता करून पदवी मिळविली होती. विद्यापीठाकडे प्राध्यापकाचा अर्ज आल्यानंतर प्रशासनाने पीएचडीबाबत शंका उपस्थित केल्या आणि प्राध्यापकाला मान्यता देण्यापासून थांबविले. तसेच, विद्यापीठाने याबाबत यूजीसीसोबत पत्रव्यवहार केला. या प्रकारात प्राध्यापकाला नाहक त्रास सहन करावा लागला.
त्यामुळे संबंधित प्राध्यापकाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाज छगला आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्राध्यापकाच्या अर्जाला दोन आठवड्यात मान्यता देण्याचे आदेश दिले. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठ अशा दोन्ही विद्यापीठांना यूजीसीची मान्यता आहे. त्यामुळे एक विद्यापीठ दुसऱ्या विद्यापीठाच्या पदवीबाबत शंका उपस्थित करू शकत नाही. पदवीची पडताळणी करण्याचा अधिकार हा यूजीसी अथवा दुसऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा आहे. याबाबत विद्यापीठाने शंका उपस्थित करण्याचे कारण नाही, असे मत खंडपीठाने नोंदवले.
या निर्णयामुळे आता विद्यापीठ आणि कॉलेजांना सहयोगी प्राध्यापक पदासाठी नियुक्तीसाठी यूजीसीची मान्यता असणाऱ्या विद्यापीठाने प्रदान केलेली पीएचडी पदवी ग्राह्य धरावी लागणार आहे. तसेच, प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांची प्रशासनाच्या जाचक कारभारापासून सुटका होणार आहे.

‘विद्यापीठाने करावे मूल्यमापन’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यूजीसीने मान्यता दिलेल्या विद्यापीठांची चौकशी करण्याचा कोणताही अधिकार नाही. केवळ प्राध्यापक पदासाठी अर्ज केलेल्यांना कोणतीही त्रुटी काढून नाहक त्रास देणे, असा प्रकार प्रशासन करत आहे. विद्यापीठातच पीएचडीच्या नियमांचे उल्लंघन होऊन काही लोकांना पीएचडीची पदवी देण्यात येत आहे. तसेच, नेमणुका झालेल्या प्राध्यापकांना पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सवलत देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. पीएचडीचा सहा महिन्यांचा कोर्स वर्क दोन दिवसांत पूर्ण करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने इतरांकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:चे मूल्यमापन करावे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला डोकेदुखी कर्जरोख्यांची

$
0
0

जास्त परतावा देणाऱ्या वित्तीय संस्थेचा शोध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणी पुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांद्वारे उभारलेले २०० कोटी रुपये महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली असून त्याच्या व्याजापोटी दरदिवशी पाच लाख रुपये तर प्रतिमहिना दीड कोटी रुपये व्याज द्यावे लागणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर, हे २०० कोटी रुपये कुठे गुंतवावेत, कुठली वित्तीय संस्था जादा परतावा देईल, या विवंचनेत महापालिका अडकली आहे.
समान पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारा निधी हा कर्जरोख्यांद्वारे उभे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आणि त्याचा पहिला २०० कोटी रुपयांचे हप्ता उभाही करण्यात आला. विकासकामांसाठी महापालिकेकडून खुल्या बाजारातून कर्जरोखे उभे करण्याचा मान देशात पहिल्यांदा पुणे महापालिकेला मिळाला, त्याचे कौतुकही देशभरात झाले. समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदा रद्द झाल्याने कर्जरोख्यांद्वारे उभारण्यात आलेले २०० कोटी रुपये खर्च करण्याची पंचाईत झाली आहे. ही रक्कम बँक खात्यात जमा असली तरी त्याचा व्याजापोटी द्यावा लागणारा परतावा हा प्रतिमहिना दीड कोटी रुपयांच्या घरात आहे.
..
असा होणार पुढील प्रवास
समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदा रद्द करण्यात आल्या असून या कामांचे ​विभागीय दरपत्रक (डीएसआर) नव्याने तयार करण्यचे काम सुरू करण्यात आले आहे. दरपत्रक तयार करण्यात आल्यानंतर त्यानुसार या कामाचे ‘एस्टिमेट’ तयार करण्यात येणार आहे. या कामांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे (डक्ट) कामाचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने ‘डक्ट पॉलिसी’ तयार करण्यात येणार असून, त्याची मंजुरी स्थायी समिती आणि मुख्यसभेद्वारे घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तयार झालेल्या एस्टिमेटच्या आधारे निविदा काढण्यात येतील. त्या निविदा मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दावा आहे.
..
अडचण प्रतिमहिना ५० लाखांची
वित्तीय संस्थांमध्ये २०० कोटी रुपये ठेवले तरी मुदत ठेवीवर मिळणारे व्याज व कर्जावर द्यावे लागणार व्याज यात किमान दीड टक्क्यांचा तरी फरक राहणार आहे. मुदत ठेवीवर महापालिकेला दरमहा जास्तीतजास्त व्याज दर धरला तरी १ कोटी रुपये व्याज मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कर्जापोटी महापालिका दरमहा दीड कोटी रुपये देणार आहे. महापालिकेला दरमहा ५० लाख रुपयांचा तोटा होणार असल्याचा विरोधकांचा दावा आहे.
..

सत्ताधाऱ्यांकडून करा व्याजवसुली

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेसाठी घाई करून पालिकेने २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारातून उभारले आहेत. निविदा मान्य होण्यापूर्वीच हे कर्ज घेतल्याने या घेतलेल्या कर्जापोटी पालिकेला दररोज तब्बल तीन लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहे. प्रशासनातील अधिकारी तसेच पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे हे नुकसान सहन करावे लागणार असल्याने त्यांच्याकडून हे व्याज वसूल करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली.

चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने ही वादग्रस्त ठरलेली निविदा रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची कोणतीही वाट न पाहता कर्जरोख्यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपये देखील बाजारातून पालिकेने उचलले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या सर्व कामांचे फेरनिविदेचा निर्णय घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पालिकेने कर्ज घेतल्याने व्याज म्हणून पालिकेला रोज तीन लाख रुपये भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे, जुगल राठी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी चौथ्या फेरीची यादी वेबसाइटवर जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चौथ्या फेरीची प्रवेशाची गुणवत्ता यादी नियोजित वेळापत्रकापेक्षा एक दिवसापूर्वीच म्हणजे शनिवारी ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार प्रवेश प्रक्रियेतील १८ हजार ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ८३९ आहे. या विद्यार्थ्यांना ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने शनिवारी दिली आहे.
समितीतर्फे पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील २६७ ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीच्या ९१ हजार ६७० जागांवर प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून चौथ्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीसाठी २२ हजार ०६१ विद्यार्थी पात्र झाले होते. त्यापैकी १८ हजार ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ८३९ आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास ते प्रवेश प्रक्रियेबाहेर पडणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागणार आहे.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ आणि ८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर, ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, सोमवारी रक्षाबंधन असल्याने काही शाळांना जोडून असणाऱ्या ज्युनियर कॉलेजांना सुट्टी असण्याची शक्यता आहे. उर्वरित कॉलेज सुरू राहणार असल्याचे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. दरम्यान, या गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ५६ एवढी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योजनांचा ताळमेळ नाही

$
0
0

भाजपच्या माजी नगरसेवकांचा दावा; पत्राद्वारे विचारणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात चोवीस तास पाणी वाटप करण्यासाठीची मूळ योजना आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या नवीन योजनेचा ताळमेळ नसल्याचा दावा भाजपच्या दोन माजी नगरसेवकांनी केला आहे. अखंड पाणीपुरवठा करण्यासाठीची मूळ योजना ४५० कोटी रुपयांची असताना, ती तीन हजार कोटी रुपयांपर्यंत कशी पोहचली असा सवाल माजी नगरसेवकांनी विचारला आहे. तशी विचारणा करणारे पत्र त्यांनी पालिकेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी दिलेली योजना मुख्य ठरावाप्रमाणे कार्यान्वित केली जात नसल्याचा आरोप माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर यांनी केला आहे. पालिकेने ‘एसजीआय स्टुडिओ’ यांना समान पाणीपुरवठा या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करायला दिला होता. त्यामध्ये शहरातील अस्तित्वातील पाण्याच्या लाइनचे सर्वेक्षण आणि गळती शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच, प्रायोगिक प्रकल्प म्हणून तो चार ते पाच भागांत राबवण्याविषयी परवानगी दिली होती. मात्र यापैकी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच या विषयीचा कोणताही अहवाल कंपनीने अद्याप दिलेला नाही, असा दावाही या दोघांनी केला.
आयुक्त कुणाल कुमार ‘२४ बाय ७’ या नावाने जो प्रकल्प दाखवित आहेत, तो पूर्णपणे वेगळा आहे. या प्रकल्पाला पालिकेच्या मुख्य सभेची तसेच इतर कोणत्याही समित्यांची मंजुरी नाही. ज्या पाइपलाइनमध्ये गळती आहे त्या शोधून, बदलणे आवश्यक असताना त्याऐवजी सरसकट सगळ्या पाइपलाइन बदलण्याची निविदा प्रक्रिया केल्यानेच ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प तीन हजार कोटींवर पोहोचला आहे, असा दावा या दोघांनी केला.

डक्टविषयी गंभीर आक्षेप
प्रकल्पाच्या कामात मध्येच घुसविलेल्या फायबर ऑप्टिक केबल डक्टच्या कामाबद्दलही कुलकर्णी आणि केसकर यांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे या विषयाचा सविस्तर अभ्यास करून, त्याचा ठराव करून आणि तो मंजूर करून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. केवळ फेरनिविदा काढून ही योजना करता येणार नाही, असेही या दोघांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील संघटनांच्या वादावर अखेर पडदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरुन पुणे बार असोसिएशन आणि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ​शनिवारी इमारतीची पाहणी करून पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. उद्घाटनाच्या दिवशी प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांना व्यासपीठावर बसण्याचा तसेच प्रत्येकी पाच मिनिटे भाषण करण्याचा मान मिळणार आहे.
नऊ वर्षानंतर फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. येत्या १२ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुल्ला चेल्लूर यांच्या उपस्थितीत इमारतीचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमात व्यासपीठावर कोणी बसायचे, यावरून वाद निर्माण झाला होता. याची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली होती. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक, मकरंद कर्णिक आणि रेवती मोहिते-डेरे यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.
बारामती आणि खेड जिल्हा न्यायालयाच्या उदघाटनाच्या वेळी पुणे बार असोसिएशन आणि तेथील स्थानिक बार असोसिएशनच्या अध्यक्षांना व्यासपीठावर बसण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार फॅमिली कोर्टाच्या इमारतीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशन आणि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशच्या अध्यक्षांना व्यासपीठावर बसण्यास संधी देण्यात येणार आहे.

खंडपीठ मागणीस मज्जाव
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे अशी मागणी वकिलांकडून होत आहे. फॅमिली कोर्टाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने ही मागणी पुन्हा होऊ शकते. हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या दिवशी मागणी व्यासपीठावरून मांडण्यास वकिलांना मज्जाव करण्यात आला आहे.

कोर्टासाठी जागेचा प्रस्ताव
शिवाजीनगर कोर्टाच्या शेजारी असलेली गोदामाची सात एकर जागा कोर्टाच्या विस्तारासाठी देण्याची मागणी होत आहे. मात्र, या जागी मेट्रोचे स्टेशन प्रस्तावित आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालय प्रशासन आणि महामेट्रोची हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी उपलब्ध जागेपैकी १५,००० चौरस फूट बांधीव जागा आणि पार्किंग कोर्टासाठी देण्याचा प्रस्ताव महामेट्रोने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर-रुग्णांचा संवाद खुंटतोय

$
0
0

तज्ज्ञांची खंत; ‘सजेस्ट अ डॉक्टर’ सर्च इंजिन सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद खुंटत असल्याची खंत वैद्यकीय तज्ज्ञांनी शनिवारी व्यक्त केली. हा संवाद होत नसल्याचा परिणाम दोघांच्या नात्यावर होत असल्याचे नमूद करतानाच, रुग्णांशी कशा प्रकारे संवाद साधावा याबाबतच्या कौशल्याचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश नसल्याकडेही त्यांनी वेधले.
पूना सिटीझन डॉक्टर फोरमच्या वतीने ‘डॉक्टर रुग्ण नाते : खुपते कुठे? उपाय काय?’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी हा मुद्दा मांडला. डॉ. नितीन भगली, डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. सुलभा बोरसे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या, तर सूर्यकांत पाठक, सुरेखा गाडे, तन्मय कानिटकर यांनी रुग्णांच्या बाजूने मुद्दे उपस्थित केले. तत्पूर्वी www.medimitra.org या वेबसाईटवरील ‘सजेस्ट अ डॉक्टर’ ही रुग्णांसाठीची सर्च इंजिन सुरू करण्यात आली.
‘डॉक्टरांनी रुग्णांशी कसा संवाद साधावा याचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश नाही. रुग्णांना कोणते अधिकार आहेत, त्यांच्याशी कसा संवाद साधावा, तसेच त्यांचे नैतिक मूल्ये काय आहेत आदींचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा. पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला असलेल्या काही परप्रांतीय विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा समजणे अवघड जाते. या विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषा न शिकल्यास रुग्णांशी संवाद साधणार तरी कसा? अशा डॉक्टरांकडे रुग्णांनी आजाराची लक्षणे सांगितली तर त्यांना त्याचे भाषांतर करावे लागते. ते चुकीचे होते. त्यामुळे रुग्ण काय म्हणतो हे कळत नाही,’ असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
‘डॉक्टर आणि रुग्णांत संवादाचा अभाव असतो. ज्युनिअर डॉक्टर आसाम अथवा अन्य राज्यातील असल्याने त्यांना येथील रुग्णांची भाषा कळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होते. त्यामुळे परराज्यातील विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश देताना याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांनी वेळ द्यावी अशी अपेक्षा असते,’ असे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नितीन भगली म्हणाले. डॉ. अरुण गद्रे यांनी प्रास्ताविक केले. जन आरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके, फोरमचे ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी उपस्थितांशी विविध मुद्यांवर संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधीर गाडगीळ यांना‘स्वरशब्दप्रभू’पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मुलाखतकार किंवा निवेदकाला कार्यक्रम जिवंत करता यायला हवा. समोरच्याला प्रश्न विचारून भंडावून सोडण्यापेक्षा त्याला सहज बोलतं करण्याची कलाही त्याच्याकडे असली पाहिजे. मर्यादापुरुषोत्तमाप्रमाणे वागून सूत्रसंचालकाने श्रोते व संबंधित व्यक्ती यांच्यामधला दुवा साधला पाहिजे. नेमकी हीच कला सुधीर गाडगीळ यांना अचूक अवगत आहे,’ असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
दिवंगत बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते स्वरशब्दप्रभू पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी श्रीमती अनुराधा सोमण, भाग्यश्री सोमण-गढवाल तसेच ‘स्वरानंद’चे प्रा. प्रकाश भोंडे उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर अरुण नूलकर यांनी गाडगीळ यांच्याशी संवाद साधला. गाडगीळांना त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत भेटलेल्या मुलखावेगळ्या माणसांचे शब्दचित्र या संवादातून उलगडले. गुणवर्धन सोमण यांनी आभार मानले.
‘पुण्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील रथी-महारथींना भेटण्याचा, त्यांचे भाषण, वादविवाद ऐकण्याचा योग आला. त्यातून काय बोलावे व काय बोलू नये, याची जाणीव झाली. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील तीन पिढ्यांशी मला संवाद साधता आला. शब्दांवरचे प्रेम आणि माणसांची आवडच मला पत्रकारितेकडे घेऊन गेली. त्यामुळेही अनेक दिग्गजांशी जवळून संवाद झाला. मनोहर मासिकामुळे मी घराघरात पोहोचलो. दिग्गजांचा संग आणि दैनंदिन प्रत्येक प्रसंगाची नोंद करण्याची सवय याचा मला मोठा फायदा झाला,’ असे गाडगीळ यांनी नमूद केले.

विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली
‘आतापर्यंत ३८०० व्यक्तींच्या मी मुलाखती घेतल्या. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, लता मंगेशकर, आशा भोसले आदींचा सहवासही मला लाभला. बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यातूनच त्यांनी मला विधानपरिषदेची उमेदवारीही देऊ केली होती. ती मी नम्रपणे नाकारली,’ असे गाडगीळ म्हणाले. ‘चित्रपटांसाठी विचारणा झाली पण शब्दांवरच प्रेम असल्याने एक दोन चित्रपटांतील छोट्या भूमिका वगळता मी त्याला नकार दिला,’ असेही गाडगीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीरस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’?

$
0
0

पालिकेचे नियोजन सुरू; सल्लागाराचीही नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पादचाऱ्यांना पदपथाचा (फूटपाथ) चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन पालिकेने सुरू केले आहे. सुरुवातीच्या काळात लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम) ते उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक) या चारशे मीटर अंतरात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, वॉकिंग प्लाझाचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.
शहरातील अतिवर्दळीचा परिसर असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत. कपडे, सराफ यांच्यासह नामवंत कंपन्यांची दुकाने येथे असल्याने बाराही महिने हा रस्ता गर्दीने फुललेला असतो. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लांबचलांब दुचाकी वाहने उभी केलेली नजरेस पडतात. शिवाय गर्दीमुळे पदपथावर चालणेही अवघड होते. पादचाऱ्यांना या भागातून ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ करण्याची संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली होती. मात्र, स्थानिक दुकानदारांनी विरोध केल्याने योजना बारगळली.
योजनेला यापूर्वी झालेला विरोध लक्षात घेता पूर्ण रस्त्याऐवजी टप्प्याटप्प्याने वॉकिंग प्लाझा करण्याचा विचार पालिका करीत आहे. चारशे मीटर अंतरासाठी सुरुवातीच्या काळात योजना राबविण्याचा निर्णय घेतला जाणार असून आठवड्यातून एक किंवा दोन दिवस अंमलबजावणी करता येईल का? याची चाचपणी सुरू केली आहे. योजनेसाठी सल्लागार म्हणून अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइनची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉकिंग प्लाझा करायचा झाल्यास लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते शगुन चौकादरम्यान वाहनांवर बंदी घालावी लागणार आहे. तसेच, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरून येणारी वाहने केळकर रस्त्यावरून वर्तुळाकार मार्गाने पुन्हा लक्ष्मी रस्त्यावर आणावी लागतील, असे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानांसाठी पाठवा राखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्या कुटुंबासोबत आनंदात सण साजरे करताना कुणीतरी देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे आणि त्यामुळे आपण या सणांचा, एकत्र असण्याचा आनंद लुटतोय, ही भावना जवानांची आठवण करून देणारी आहे. राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी महाराष्ट्र टाइम्स आणि कासट एक्सक्लुसिव्ह यांच्यातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. आज (६ ऑगस्ट) कर्वेनगर इथल्या करिष्मा सोसायटीजवळच्या कासट एक्सक्लुसिव्ह या स्टोअरमध्ये तुमचा संदेश आणि सुंदरशी राखी जवानांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत हा संदेश आणि राखी देता येणार आहे.
संपूर्ण देश सणाचा आनंद लुटत असताना सीमेवर लढणारे जवान कुटुंबीयांच्या आठवणीत नक्कीच रमत असतील, राखी पौर्णिमेच्या सणाला बहिण-भावाच्या नात्याचा पट त्यांच्या डोळ्यांसमोरून उलगडत असेल, त्यांच्या आनंदात तुमचाही सहभाग असावा आणि देशभरातल्या बहिणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत, ही भावना त्यांचा अभिमान नक्कीच द्विगुणित करणारी ठरेल. म्हणूनच या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जवानांसाठी खास तुमचा संदेश आणि राखी म्हणूनच कासट स्टोअरला भेट देऊन तिथे जमा करा. हा संदेश आणि राखी जवानांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तुमच्या शब्दांसह ही राखी जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा राखी पौर्णिमेचा सण जवानांसह तुमच्यासाठीही अविस्मरणीय ठरेल एवढे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथमोपचार पेटीचा अभाव

$
0
0

महिनाभरात प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी; निवारण केल्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसची अवस्था खराब असून, बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेटी नाही. याबाबत गेल्या महिनाभरात प्रवाशांनी सर्वाधिक तक्रारी नोंदवल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने शनिवारी दिली. दरम्यान, तक्रारींपैकी बहुतांश तक्रारींचे निराकरण करून परिस्थितीत सुधारणा केल्याच दावा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी केला.
पीएमपीने महिन्यापूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पीएमपी ई-कनेक्ट’ हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले होते. या माध्यमातून पीएमपीच्या विविध मार्गांपासून बसच्या लोकेशनपर्यंत विविध प्रकारची माहिती प्रवाशांना देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएमपीबाबतच्या तक्रारी करण्यासाठी अद्ययावत सोयही अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या महिनाभरात अॅपद्वारे तीन हजार २९२ प्रवाशांनी पीएमपीकडे ६७ विविध प्रकारातील तक्रारी केल्या. या तक्रारींपैकी तीन हजार २१० तक्रारींचे निवारण केल्याची माहिती मुंढे यांनी दिली. दरम्यान, पीएमपी प्रशासनाला प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी सात दिवसांच्या आत सोडविण्यात आल्या आहेत. तसेच, येत्या काळात अॅपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येतील, असेही मुंढे म्हणाले.
‘जास्तीत जास्त नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. जवळपास ९७.५१ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. नागरिकांनी अॅपद्वारे तक्रार नोंदवल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, हेल्पलाइनच्या माध्यमातून थेट आणि सविस्तर उत्तरे देण्यात येतील. त्या दृष्टिने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल,’ असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांशी उद्धट वर्तन आणि प्रवाशांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांची चूक नसताना त्यांच्यावर अन्याय होत असेल, तर प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पा​ठिशी खंबीरपणे उभे राहील.
तुकाराम मुंढे, अध्यक्ष, पीएमपी

वर्तनाच्या १९८ तक्रारी
पीएमपी बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या वर्तनाबद्दल प्रवासी सातत्याने तक्रारी करतात. पीएमपीकडे प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींमध्ये कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे वर्तन केल्याच्या तक्रारींची संख्या १९८ आहे. कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्याचा अभिप्राय १०२ प्रवाशांनी नोंदविला आहे. पीएमपी बसमध्ये मोजकीच अग्निशमन यंत्रे असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसच्या पासिंगवेळी ही यंत्रे आलटून पालटून वापरली जात असल्याचा प्रकार ‘मटा’ने उघडकीस आणला होता. याबाबत सुमारे ९८ प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.

तक्रारीचे स्वरूप संख्या
बसची खराब परिस्थिती ४४६
बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसणे ३१९
बस वेळेवर उपलब्ध न होणे ८०
बस स्टॉपवर न थांबविणे २०३
प्रवाशांशी उद्धट वर्तन १९८
मार्गावरील बस संख्या वाढविणे १५७
मार्गफलक नसणे १२३
बसमध्ये हेल्पलाइन नसणे १११
सेवकांचे अभिनंदन १०२
बस रस्त्यात थांबविणे १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्हांकडून निहलानींचे समर्थन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘चित्रपटांच्या सेन्सॉरशिपवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पहलाज निहलानी जर कायद्याच्या चौकटीत राहून काम करीत असतील तर चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याशी वाद घालू नये. त्याऐवजी थेट माहिती प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करावी,’ असे सांगत ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे समर्थन केले. पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डावर काम करत असताना त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ जपत नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआयआय) आयोजित पदार्पण या कार्यक्रमात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेले लघुपट दाखवण्यात आले. त्या वेळी सिन्हा यांनी उपस्थिती लावत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहलाज निहलानी आणि चित्रपट निर्माते यांच्यामध्ये चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
‘पहलाज निहलानी हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना चित्रपटाची जाण आहे. सेन्सॉर बोर्डावर कार्यरत असताना ते कायद्याच्या चौकटीत राहून चित्रपटांवर काही मर्यादा घालत असतील; तर त्यामध्ये त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे, असे मला वाटत नाही. निर्मात्यांना चित्रपटांवर घालण्यात येणाऱ्या बंधनांविषयी शंका असतील तर त्यांनी थेट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी संपर्क साधावा निहलानी यांच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही,’ असे सिन्हा यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सिन्हा यांनी अभिनयाचे बारकावेही समजावून सांगितले. ‘अंगापिंडाने गोरा, दिसायला देखणा, चमकणारे डोळे असलेला व्यक्तीच अभिनेता होऊ शकतो, असे नाही तर व्यक्तिमत्व बहारदार असेल आणि संवादफेक, नजरेचा अभिनय, पात्रानुसार होणारा वावर योग्य असेल तर कोणीही चांगला अभिनेता होतो. ओम पुरी, नसरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन हे अभिनेते त्यांच्या अभिनयगुण आणि व्यक्तित्वाने मोठे झाले आहेत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘तरुणांमध्ये नुसता उत्साह, जोश असून चालणार नाही त्याला अनुभवाचीही जोड द्यायला हवी. एफटीआयआय संस्थेने केलेल्या संस्कारांमुळेच माझी स्वतःची शैली निर्माण करू शकलो’, असेही त्यांनी नमूद केले.

बिहारबाबत ‘खामोश’
बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तांतराबाबत पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांना छेडले असता, ‘खामोश’... असे म्हणत त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. ‘ही कलेची संध्याकाळ आहे. मी इथे राजकारणाबाबत बोलायला आलो नाही. आज दिल्लीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती. त्यामुळेच मला यायला उशीर झाला. खरेतर मी कालच येणार होतो; पण निवडणुकीला उपस्थित राहिलो नसतो तर केंद्रात चुकीचा संदेश गेला असता,’ असे सूचक वक्तव्य मात्र त्यांनी केले.

‘अँग्री यंग मॅन’च्या आठवणींनी सिन्हा गहिवरले
शत्रुघ्न सिन्हा यांनी ४५ वर्षांपूर्वी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत असताना मुख्य पात्र साकारलेला ‘अँग्री यंग मॅन’ हा लघुपट विद्यार्थी आणि रसिकांना दाखवण्यात आला. सिन्हा यांच्या तेव्हाच्या तरुण अंदाजाने सभागृहातील प्रेक्षकही भारावून गेले. स्वतः सिन्हाही या लघुपटाच्या आठवणीत रमले. ‘अँग्री यंग मॅन’ ही पदवी काही जणांच्या नावाला जोडली गेली आहे. पण ठीक आहे, त्याला आता पर्याय नाही, असे म्हणत सिन्हा यांनी अप्रत्यक्षपणे अमिताभ बच्चन यांना टोलाही लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचे प्रवासी हैराण

$
0
0

गेल्या सात महिन्यांत चालत्या बसमध्ये चोरीच्या २१० घटना

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
@ShrikrishnaMT

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये शहरात पीएमपी आणि एसटी बसमधील प्रवाशांकडील रोकड आणि मौल्यवान ऐवज चोरून नेल्याच्या २१० घटना घडल्या आहेत. या चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एसटीच्या तुलनेत पीएमपीमधील चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
शहरात प्रवासाचे महत्त्वाचे साधन म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. नोकरी किंवा अन्य कामासाठी दूर अंतरावर जायचे असल्यास अनेकजण पीएमपीलाच प्राधान्य देतात. त्यामुळे पीएमपी बसला नेहमीच गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेऊन चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात पीएमपीमध्ये मौल्यवान ऐवज आणि रोकड चोरून नेल्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत. कात्रजहून येरवडा येथे गेलेल्या दाम्पत्याच्या बॅगेतील तीन लाखांची रोकड बसमधील चोरट्यांनी लंपास केली. कात्रज ते निगडी, हडपसर, वारजे माळवाडी, कोथरूड, चिंचवड, भोसरी, वडगावशेरी, कोंढवा, लोहगाव या मार्गांवर बसमधील चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.
बसमध्ये चोऱ्या करण्यात पुरुषांबरोबर महिला चोरटेही सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, त्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी बसमध्ये चोऱ्या करणारी टोळी डेक्कन पोलिसांनी पकडली होती. या टोळीतील सर्व आरोपी बाहेरच्या राज्यातील होते. ते शहरात विविध ठिकाणी नावालाच किरकोळ व्यवसाय करत होते. मात्र, त्यांचे मुख्य काम पीएमपी बसमध्ये चोऱ्या करत असल्याचे आढळून आले होते. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

अशी करतात चोरी
मोठ्या प्रमाणात गर्दी असलेली बस हेरायची. त्या बसमध्ये चार ते पाच महिला एकदम शिरतात. बसमध्ये मोठी बॅग असलेली अथवा अंगावर दागिने असलेली महिला शोधायची. तिच्या बाजूला जाऊन या महिला थांबतात. त्या महिलेच्याजवळ एकदम गर्दी करून तिच्या बॅगेतील मौल्यवान ऐवज काढून घ्यायचा. अंगावरील सोने काढून घ्यायचे. महिलेला संशय येऊ नये यासाठी गर्दीत ढकलाढकली करायची. दागिने, रोकड चोरल्यानंतर पुढील बस स्थानकावर लगेच उतरायचे. तक्रारदार व्यक्तीला कळेपर्यंत या महिला पळून गेलेल्या असतात. पोलिसांनी यामध्ये चोरीची तक्रार दाखल करून घेतल्याशिवाय पुढे काहीच केले जात नाही.

किरकोळ गुन्हे म्हणून दुर्लक्ष
पीएमपीमध्ये चोरी झालेल्या गुन्ह्यांकडे किरकोळ गुन्हे म्हणून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. कधी-कधी पर्स, पाकीट मारलेले असते. त्यामध्ये एक दोन हजार रुपये असतील तर पोलिसांकडून प्रॉपर्टी मिसिंग म्हणून गुन्हा दाखल केला जातो. अशा वेळी साधा चोरीचा सुद्धा गुन्हा दाखल पोलिस करत नाहीत. त्यामुळे या चोरट्यांचे चांगलेच फावते. गेल्या काही महिन्यांपासन पीएमपीमध्ये मोठमोठ्या रकमा व मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रवासादरम्यान, ही काळजी घ्या..
- मौल्यवान दागिने टाळा.
- प्रवासात मोठी रोकड जवळ बाळगून नका.
- मोठी रोकड असल्यास गर्दी असलेल्या बसमधून प्रवास करू नका आणि बॅगची काळजी घ्या.
- शेजारी गर्दी करत असल्यास किंवा ढकलाढकली सुरू झाल्यास मौल्यवस्तू सांभाळा.
- वस्तू चोरीला गेल्याचे आढळल्यास तत्काळ बसच्या वाहक अथवा चालकास सांगा आणि पोलिसांना कळवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कॉलेजांवर कारवाई कधी?

$
0
0

‘ईबीसी’ लाटणाऱ्यांची मान्यता रद्दचे पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांच्या हक्काच्या ‘ईबीसी’ शिष्यवृत्तीचे पैसे न देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करून त्यांची मान्यता काढून टाकण्याबाबतचे पत्र विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालनालयाला (डीटीई) पाठविले आहे. त्यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील १६ कॉलेजांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संचालनालयाकडून कॉलेजांवर कारवाई करण्यात येणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारकडून तंत्रशिक्षणात विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ‘ईबीसी’ शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थांनी शिष्यवृत्तीचा अर्ज कॉलेजमध्ये भरून दिल्यानंतर शिष्यवृत्ती मंजूर होणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्कम मिळते. कॉलेजांनी ही रक्कम विद्यार्थ्यांना देणे विहीत मुदतीत देणे अपेक्षित आहे. मात्र, विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने १६ कॉलेजांना वारंवार सूचना देऊनही कॉलेजांनी ‘ईबीसी’ शिष्यवृत्ती वाटपाचे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचे उपयोगिता प्रमाणपत्र कार्यालयात अद्याप जमा केलेले नाही. तसेच, या कॉलेजांनी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेतले. मात्र, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केलेले नाही.
त्यामुळे या कॉलेजांवर कारवाई करून त्यांची मान्यता काढून टाकावी, असे पत्र कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालनालयाला पाठविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पुणे विभागातील कॉलेज विद्यार्थ्यांना ‘ईबीसी’ शिष्यवृत्तीचे पैसे देत नाही. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने कॉलेजांवर कारवाई करून मान्यता काढावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि विक्रांत अमराळे यांनी केली होती. संचालनालयाकडून अशा कॉलेजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल का, याकडे लक्ष लागले आहे.

‘ईबीसी’ न देणाऱ्या संस्था

१. डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, लोहगाव
२. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजनेंट, तळेगाव
३. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे
४. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, मावळ
५. सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी, पिंपरी
६.राजीव बिझनेस स्कूल, ताथवडे
७. पी. के. टेक्निकल कॅम्पस, पुणे
८. शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जुन्नर
९. गौरीशंकर पॉलिटेक्निक, लिंब, सातारा
१०. नोवेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चिंचवड
११. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बार्शी
१२. सातारा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅन्ड मॅनेजनेंट, सातारा
१३. गौरीशंकर एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्टचे गौरीशंकर पॉलिटेक्निक, लिंब, सातारा
१४. मन विद्या प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज, दहिवडी, सातारा
१५. आयडीएल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिरोळ, कोल्हापूर
१६. विद्या प्रसारिणी सभेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसरीच्या पुस्तकात सहा धडे ‘रिपीट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तिसरीच्या मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये अनेक अक्षम्य चुका आढळल्याने ‘बालभारती’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. मराठीच्या पुस्तकातील सात धडे गायब झाले असून सहा धडे ‘रिपीट’ झाल्याची माहिती समोर आली आहे. पुस्तकातील १६ पाने वगळण्यात आली आहेत.
दरम्यान, शाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरी मराठी पुस्तकातील अक्षम्य चुकांची प्राथमिक शिक्षकांना अद्याप या संदर्भात माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे. जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम शाळेत तिसरीच्या पुस्तकात त्रुटी असल्याचा प्रकार शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आणला. या संदर्भात स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘बालभारती’च्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. परंतु, जिल्ह्यात वाटलेल्या पुस्तकातील चुकांची पुनरावृत्ती राज्यात वितरित केलेल्या पुस्तकांमध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘बालभारती’च्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषदेला वितरित केलेल्या पुस्तकांचे मूल्यमापन करून त्याची तपासणी होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात अशी कोणतीही तपासणी न करताच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या समितीने पुस्तकांना मान्यता दिली आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने होऊनही पुस्तकातील चुका अद्याप शिक्षकांच्या लक्षात आलेल्या नाहीत. चुका लक्षात का आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करीत जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला जाब विचारला आहे.
तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पान क्रमांक आठपर्यंत अनुक्रमणिका व्यवस्थित आहे. त्यानंतर पान क्रमांक ४१ ते ५६ असा क्रम लावण्यात आला आहे. पुन्हा पान क्रमांक २५ ची छपाई करण्यात आली आहे. त्यामुळे तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना एकच धडा पुन्हा पुन्हा शिकावा लागणार का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील पाठ्यपुस्तकातील पुन्हा छपाई, पानाच्या क्रमांकांमधील चुका, १६ पाने गायब असणे यासारख्या चुकांची चौकशी करणार आहे.
- विश्वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चुकांबाबत जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात येतील.
- शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या ३४ दवाखान्यांत अळ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खासगी दवाखान्यांपाठोपाठ आता महापालिकेच्या विविध भागांतील ३४ दवाखान्यांमध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पालिकेच्या दवाखान्यांसह शहरातील २५ खासगी हॉस्पिटलमध्येदेखील अळ्या सापडल्याने त्यांना नोटिसा देऊन कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पालिकेच्या दवाखान्यांतील टेरेस, डक, कुलर, फ्रीज, टाक्या, प्लास्टिक डबे, भंगार, बॅरेल तसेच ड्रमच्या झाकणाखाली विविध प्रकारच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यात डेंगी, चिकुनगुनियाचे एडिस इजिप्ती डास, मेंदूज्वराचे क्यूलेक्स, मलेरियाच्या अॅनाफिलिस डासाची मादी अशा प्रकारच्या डासांच्या अळ्या सापडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
महापालिकेच्या वतीने गेल्या सोमवारपासून शहरातील पालिकेचे दवाखाने, खासगी दवाखाने, हॉस्पिटल, मॉल, मल्टिप्लेक्स यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे; पण महापालिकेच्या हॉस्पिटल, दवाखान्यांची स्थिती नेमकी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
‘पालिकेच्या दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३४ दवाखान्यांमधील टेरेस, डक, फ्रीज, कुलर आदी ठिकाणी डेंगीसह चिकुनगुनिया, मलेरियाचे डासाच्या अळ्या सापडल्या आहेत. त्याशिवाय शहरातील खासगी २५ हॉस्पिटलमध्येदेखील अळ्या सापडल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्या २५ हॉस्पिटलना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४ हजार ३४० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी खासगी हॉस्पिटल, मल्टिप्लेक्स, मॉल यांनादेखील नोटिसा पाठवून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील ३० मल्टिप्लेक्स आणि सभागृहे आणि ५१ मॉलमध्ये डेंगीसह अन्य डासांच्या अळ्या सापडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात आली आहे,’ अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
घोले रोडवरील सर्वाधिक सोसायट्यांना नोटिसा
शहरातील विविध भागांतील सोसायट्यांमध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्याने नोटिसा जारी करण्यात आल्या. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अर्थात शहराच्या मध्यवस्ती असलेल्या शिवाजीनगरमधील २९५ सोसायट्यांना सर्वाधिक नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ ढोले पाटील, कोथरुड, वारजे या भागातील सोसायट्यांचा क्रमांक लागतो. औंध आणि कसबा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भागात सर्वाधिक कमी डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. कसबामध्ये १११; तर औंधमध्ये १५२ ठिकाणी अळया सापडल्याने नोटिसा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images