Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हवा एकत्रित डीपी

0
0

नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांसाठी कृती समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा एकत्रित विकास आराखडा (डीपी) तयार केला जावा, अशी मागणी हवेली तालुका नागरी कृती समितीने केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ११ गावे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित गावांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने या सर्व गावांसाठी एकत्रच डीपी केला जावा, असा आग्रह धरण्यात आला आहे.

कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांची भेट घेऊन त्यांना एकत्र डीपी करण्याचे निवेदन दिले.

शहरालगतच्या ३४ गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. सरकारच्या निर्णयानुसार पहिल्यांदा ११ गावे येणार असली, तरी आगामी काळात उर्वरित गावे येणार आहेत. त्यामुळे, सर्व गावांचा एकत्रितच आराखडा केल्यास त्याचा सर्व ग्रामस्थांना फायदा होईल, अशी विनंती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, सचिव बाळासाहेब हगवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समितीच्या सूचनेचे स्वागत केले असून, लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सूचित केले आहे. तर, ११ गावांसह उर्वरित सर्व गावेही पालिकेत समाविष्ट होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन समितीने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राणी छळप्रकरणी महिलेला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महंमदवाडी परिसरातील फ्लॅटमध्ये दोन मांजरी आणि कुत्र्याला साखळीने बांधून तीन दिवस अन्नपाण्याविना ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांजरींच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून सोसायटीतील नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
जेनिफर डेन्जील डिसोजा (वय २६, रा. गंगा किंगस्टन फ्लॅट नं. ए.२०३, महंमदवाडी) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वनिता असीम टंडन (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागण्यापासून प्रतिबंधक कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. टंडन या प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्वयंसेवी संस्थेसमवेत काम करतात. डिसोजा यांनी फ्लॅटमध्ये बेकायदा दोन पर्शियन मांजर आणि सेंन्ट बर्नाड जातीचा कुत्रा पाळला आहे. त्यासोबतच त्यांनी कासवही पाळले होते. त्यांनी हा फ्लॅट सोडला असून, घरातील साहित्य हलविण्याचे काम सुरु होते. त्या वेळी त्यांनी मांजरी आणि कुत्र्याला गॅलरीमध्ये तीन दिवस साखळीने अन्नपाण्याविना बांधून ठेवले. या मांजरींनी ओरडण्यास सुरुवात केली, तेव्हा सोसायटीतील रहिवाशांनी फ्लॅटचे मूळ मालक, प्राणीमित्र आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची वणवण
हे प्राणी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कोठे ठेवायचे, हा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर त्यांनी कासवाला कात्रज सर्पोद्यानात दाखल केले. तर, कुत्रा भवानी पेठेतील संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. आणि मांजरांना वाघोलीतील संगोपन केंद्रात भरती करण्यात आले. त्यासाठी पोलिसांचा अख्खा दिवस खर्ची पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीत गणिताचीही प्रात्यक्षिक परीक्षा

0
0

अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धतीत यंदापासून बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववीचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विज्ञानाप्रमाणेच आता गणितासाठीही प्रत्येक सत्राला प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत.
गणितासाठी पूर्वीप्रमाणेच ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापन अशीच गुण विभागणी असली तरी आता फक्त चाचण्यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांना मिळविता येणार नाहीत. त्यासाठी वर्षभर शिकलेल्या गणिती संकल्पना, सूत्रे यांचा व्यवहारासाठी वापर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवावा लागणार आहे. गणितासाठीही विज्ञान विषयाप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. चाचण्यांबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेही करावी लागणार आहेत. गणिताच्या दोन्ही भागांसाठी प्रात्यक्षिके राहणार आहेत.विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची प्रात्यक्षिके द्यावीत याबाबत पाठ्यपुस्तकातच नमुने दिले आहेत. त्रिकोणांची वेगवेगळी मापे घेऊन त्याच्या भौमितीक रचना करणे, औषधाच्या पकिटावरून प्रत्येक घटकाचे शतमान काढणे, एखाद्या खोलीतील सर्व वस्तूंची मापे लक्षात घेऊन प्रमाणबद्ध नकाशा काढणे, संख्यारेषेवरील दोन बिंदूमधील अंतर काढणे अशा प्रकारच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

बीजगणित, भूमितीची लेखी परीक्षा
प्रत्येक सत्रात चाचणी, प्रात्यक्षिके आणि लेखी परीक्षा मिळून गुण गृहित धरण्यात येणार आहेत. त्यानुसार बीजगणित आणि भूमिती प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा असेल. दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी २० गुणांची चाचणी परीक्षा असेल. चाचणी परीक्षेच्या एकूण ४० गुणांचे १० गुणांत रुपांतर करण्यात येईल. तसेच, प्रत्येक सत्रात दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी ५ गुणांचे प्रात्यक्षिक असे एकूण १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या हृदयाने दिल्लीत जीवदान

0
0

खड्डाबळी ठरलेल्या महिलेचे अवयवदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारामती-जेजुरी रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना रविवारी घडली. अपघातात ‘ब्रेनडेड’ झालेल्या या महिलेचे हृदय नवी दिल्लीतील ‘एम्स’ या सरकारी हॉस्पिटलमधील पेशंटला देऊन त्याला जीवदान देण्यात आले. ही घटना घटना मंगळवारी घडली. त्यामुळे पुण्याने हृदयदान करून अनमोल जीव वाचविण्याची हॅट् ट्रिक साधली आहे.
‘बारामतीहून जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी साताऱ्यातील ४३ वर्षीय महिला दुचाकीवरून मुलासोबत जात होती. खड्ड्यातून गाडी गेल्याने त्या डोक्यावर पडल्या. गंभीर जखम झाल्याने त्यांना रविवारी रात्री रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर सोमवारी रात्री त्या ब्रेनडेड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी अवयवदानाला संमती दिल्याने गरजूंचा शोध सुरू झाला. त्या वेळी पुण्यासह मुंबईतील गरजूंना लसीकरणाअभावी हृदयदान करता आले नाही. त्यामुळे केंद्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीमार्फत (नोटो) नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलला हृदयाची माहिती देण्यात आली. रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ग्रीन कॉरिडॉरमार्फत हृदय लोहगाव विमानतळापर्यंत नेले. तेथून विमानाने दिल्लीत नेण्यात आले,’ अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
त्यामुळे पुण्यातून हृदयदान केल्याची ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी दोन हृदयदान मुंबईत करण्यात आले आहे, असेही गोखले म्हणाल्या. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज डॉ. बिकास साहू यांनी यशस्वीरित्या हृदय, तर डॉ. कमलेश बोकील आणि डॉ. मनीष वर्मा यांनी यकृत काढले.

यकृत, डोळ्यांचे पुण्यात दान
‘महिलेला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्यांच्या मुलीने अवयवदानाची इच्छा प्रकट केली. त्यानुसार त्यांना अवयवदानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर गरजू पेशंटचा शोध सुरू करण्यात आला. महिलेच्या डोक्यासह पोटाला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे ते दान करता आले नाही. त्याऐवजी यकृत, दोन डोळे रुबी हॉस्पिटलला देण्यात आले. महिलेची त्वचा सूर्य सह्याद्री हॉस्पिटलमधील गरजूंना दान करण्यात आली आहे,’ असे रुबी हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएसएनएल’ देणार ‘आधार’

0
0

आठ केंद्रांवर सेवा झाली उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टपाल खात्यापाठोपाठ आता ‘भारत संचार निगम लिमिटेड’नेही (बीएसएनएल) आधार कार्डची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘बीएसएनएल’ ग्राहक आणि सामान्यांनाही या सुविधेचा लाभ होणार आहे. शहरात ‘बीएसएनएल’च्या आठ सेवा केंद्रांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ‘बीएसएनएल’तर्फे ‘आधार’ची नोंदणीही सुरू करण्यात येणार असल्याने पुणेकरांची वणवण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
‘बीएसएनएल’च्या सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, मॉडेल कॉलनी, धनकवडी, हडपसर, चिंचवड आणि भोसरी येथील ग्राहक सेवा केंद्रांवर ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली असून, लवकरच ‘बीएसएनएल’च्या पुणे, पिंपरी–चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व ग्राहक सेवा केंद्रांवर ‘आधार’ची माहिती अपडेट करण्याची यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ‘आधार’साठी नव्याने नोंदणीही करण्यात येणार असल्याची माहिती, ‘बीएसएनएल’च्या पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक डी. सी. द्विवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’चे (यूआयडीएआय) वरिष्ठ अधिकारी अभिषेक पांडे, आशिष पाठक आदी या वेळी उपस्थित होते.
‘आधार’ची माहिती अपडेट करण्यासाठी प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रावर वेगळी यंत्रणा बसवण्यात आली असून, ‘बीएसएनएल’चे प्रशिक्षित अधिकारी त्यावर काम करणार आहेत. ‘आधार’ अपडेट करण्याची प्रक्रिया जलदगतीने व्हावी या साठी कंपनीने १० एमबीपीएसचे डेटा कनेक्शन बसवले आहे. त्यामुळे, आधार कार्ड अपडेट होण्याची प्रक्रिया पाच ते १० मिनिटांमध्ये पूर्ण होईल, असे पाठक म्हणाले.
‘आधार अपडेट करण्याची प्रक्रिया टपाल खाते किंवा बीएसएनएलकडे दिल्याने नागरिकांच्या वैयक्तिक माहितीला कोणताही धोका पोहोचणार नसून, नागरिकांनी स्वतः माहिती पुरवल्याशिवाय कोणीही माहितीचा गैरवापर करणार नाही, याची खबरदारी आधारची संपूर्ण यंत्रणा घेत आहे’, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले.

खासगी एजन्सीना फाटा
काही दिवसांपूर्वी पुण्यात खासगी एजन्सीमार्फत चालवण्यात येणाऱ्या आधार केंद्रांवर नोंदणी केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरची तारीख दिली जात होती. शिवाय खासगी एजन्सीकडून आधारसाठी जास्त पैसे घेतले जात असल्याने त्या सर्व खासगी एजन्सीकडून यंत्रणा काढून घेण्यात आली आहे. यापुढे टपाल खाते आणि बीएसएनएल मार्फत आधारची कार्यवाही केली जाणार आहे. याशिवाय शहरातील बहुतांश पॅन आणि टॅन सेंटरमध्येही आधारची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नेहलता अवचट यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्नेहलता त्रिंबक अवचट यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट व प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांच्या त्या मातुःश्री होत. श्रीमती अवचट यांच्यामागे चार मुलगे, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतिशय बुद्धिमान असलेल्या श्रीमती अवचट यांचा वाचनाचा आणि कलांचा मोठा व्यासंग होता. शेवटपर्यंत त्या अनेक मराठी पुस्तके व मासिके नियमित वाचत. विविध क्षेत्रांत चमकलेल्या त्यांच्या मुलामुलींच्या घडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओची वेबसाइट क्रॅश

0
0

उद् घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी उडाला गोंधळ; मनस्तापात भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा परवान्यांचे अर्ज करण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू झालेली वेबसाइट उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी बंद पडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला. ही वेबसाइट तयार करणाऱ्या राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) दिल्ली येथील कार्यालयास आग लागल्याने साइट बंद पडल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
रिक्षा परवान्यांचे खुल्या पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये परवान्यांचे अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने इच्छुकांनी गर्दी केली. ही गर्दी टाळण्यासाठी पुणे आरटीओ कार्यालयाने ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अधिकाऱ्यांनी वेबसाइट तयार केली. याचे प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर संपूर्ण राज्यासाठी एकच वेबसाइट तयार करण्याचा निर्णय ‘एनआयसी’ने घेतला आणि सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते तिचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर मंगळवारी लगेचच वेबसाइटने मान टाकली.
परवान्यांचे अर्ज करण्यासाठी ही वेबसाइटच ओपन होत नसल्याचा अनुभव रिक्षाचालकांना आला. त्यामुळे शेकडो रिक्षाचालकांनी आरटीओच्या कार्यालयात धाव घेतली. दरम्यान, राज्यभरातील अर्जदारांनी एकाच वेळी लॉगइन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे साइट बंद पडली असावी, असेही सांगण्यात येत आहे. ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर या शहरांतील आरटीओ कार्यालयांमध्ये कागदपत्रे भरून घेऊन रिक्षा परवाना वाटप करण्यात येत आहे. मात्र, या ऑनलाइन पद्धतीचा अट्टहास धरण्यात आल्यामुळे साइट बंद पडून हा गोंधळ उडाला, असा आरोप रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी केला आहे.
‘गेली अनेक वर्षे रिक्षा परवान्याच्या प्रतिक्षेत असलेल्या रिक्षाचालकांना या गोंधळामुळे अर्ज भरणे कठीण झाल्याने नेहमीच्या पद्धतीने परवाने द्यावेत,’ अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रहणाच्या वेधात रक्षाबंधन करावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण यंदा एकाच दिवशी आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या सोमवारी ७ ऑगस्टला चंद्रग्रहण असल्याने नागरिकांनी वेधकाळात म्हणजेच रात्री दहा पर्यंत रक्षाबंधन करावे,’ अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
‘यंदा सोमवारी, ७ ऑगस्टला चंद्रग्रहण आहे. रात्री १०.५२ ते १२.४९ दरम्यान ग्रहण पर्वकाळ असून, या ग्रहणाचे वेध दुपारी एकपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दुपारी एक वाजण्यापूर्वी पूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. सोमवारचा उपवास असल्यास दुपारी एक वाजण्यापूर्वीच फलाहार करावा आणि वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडत आहे’, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल. कारण वेधात जलपान निषेध नाही, मात्र भोजन निषेध आहे. वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री दहा पर्यंत राखी बांधता येईल. यापूर्वी ६ ऑगस्ट १९९० या दिवशी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ ऑगस्ट २००८ शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते,’ असेही दाते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग चौथ्या दिवशी पावसाची विश्रांती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याने मंगळवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. पुण्याबरोबरच राज्यातील बहुतांश भागात पावसाचा हलक्या सरी पडल्या. पुढील चार दिवस पुण्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात मंगळवारी दिवसभरात मोजक्याच शहरांमध्ये पाऊस पडला. महाबळेश्वरमध्ये सायंकाळी साडेपाचपर्यंत १७ मिलीमीटर, जळगाव ४, मुंबई ६, अलिबागमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली. घाटमाथ्यावरीलही पावसाचा जोर ओसरला. गेल्या चोवीस तासात डुंगरवाडी येथे ९० मिमी, ताम्हिणीत ७० मिमी, भिरा, अम्बोणे येथे ६० मिमी, लोणावळ्यात ४० मिमी, कोयनेत ३० मिमी पाऊस पडला. पुढील चार दिवस राज्यात पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार आहे. कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महारेरा’ नोंदणी अजूनही सुरूच

0
0

विलंबाने अर्ज देणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महारेरा’ अंतर्गत चालू बांधकामांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली. ज्यांना या मुदतीत अर्ज करता आलेले नाहीत, त्यांच्यासाठी ही नोंदणी अजूनही सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, उशिराने अर्ज करणाऱ्यांबाबत काय कार्यवाही करायची, याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी दिली.
ज्या बांधकाम प्रकल्पांना अजूनही भोगवटापत्र मिळालेले नाही, अशा प्रकल्पांसाठी ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ‘महारेरा’ अंतर्गत नोंदणी अर्ज करणे बंधनकारक होते. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत राज्यातून मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यावसायिकांनी अर्ज केले. मात्र, विविध प्रकारच्या पूर्ततांची आवश्यकता असल्याने अनेक व्यावसायिकांना अर्ज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ’क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या शिखर संघटनेने अर्जासाठी एक महिन्यांची मुदतवाढ मागितली. मुदतवाढ देण्यात आली नसली, तरी ‘महारेरा’तर्फे नोंदणी अर्जांसाठीची लिंक अजूनही कार्यान्वित ठेवण्यात आली आहे.
‘महारेरा’तर्फे चालू बांधकाम प्रकल्पांसाठी नोंदणी करण्याची लिंक अजूनही बंद करण्यात आलेली नाही. पूर्वी देण्यात आलेल्या मुदतीनंतर अर्ज करणाऱ्या व्यावसायिकांबाबत काय कार्यवाही करायची याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. ‘छोट्या शहरातील तसेच ग्रामीण भागातील व्यावसायिकांना सीएंकडून सर्टिफिकेट घेणे, ऑनलाइन फॉर्म भरणे अवघड जात होते. शहरातील प्रकल्पांच्या नोंदणीचा ताणही मोठा होता. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रांसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या धर्तीवर महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी एक महिन्याची वाढ द्यावी, अशी आमची मागणी होती. त्यामुळे संबंधित ग्राहकांनाही रेराचे संरक्षक कवच मिळाले असते. मुदतवाढ देण्यात आली नसली, तरी नोंदणी अजूनही सुरू ठेवण्यात आली आहे. जे उशिरा अर्ज करतील, त्यांच्याबद्दल सहानभूतीपर्वक विचार केला जाणार आहे. मात्र, अजूनही महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे,’ असे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले.

महारेरा अंतर्गत नोंदणी झालेले प्रकल्प
पुणे जिल्हा - २९०८
पुणे विभाग - ३४६२
संपूर्ण राज्य - १०, ८५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारला अपघात; १ ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी । लोणावळा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मळवलीजवळ इनोव्हा कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.

सांदीपान भगवान शिंदे ( वय ६०, रा. बीड) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर, जखमींमध्ये सुभाष साहेबराव जगताप (वय-७०), किसन जठार (वय- ७१), मुक्ताराम किसन तावरे (वय- ७१, सर्व रा.धाने गल्ली, बीड) यांचा समावेश आहे.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे व त्यांचे सर्व सहकारी हे काही कामानिमित्त त्यांच्या इन्होवा कारने ( क्रमांक- एमएच-२३/एके-३८८८) मुंबईला गेले होते. तेथील काम आटपून ते पुन्हा लोणावळ्यात आले व त्यांनी लोणावळ्यात चिक्की खरेदी केल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून घरी निघाले होते. सुसाट वेगात असलेली कार मार्गालगतचे सुमारे दीडशे मीटर अंतर कापत मार्गालगतच्या दोन झाडांना धडकून तिसऱ्या झाडावर जोरात आदळली. यामध्ये शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहीती मिळताच खंडाळा महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक तंबीटकर, दिलीप कदम व लोणावळा ग्रामीणचे रहातेकर यांनी घटनास्थळी धाव घेत आयर्न देवदूत या आपत्कालीन पथकाच्या मदतीने जखमींना उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका वाजवणार ७० लाखांचे ढोल

0
0

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवावर दोन कोटींचा खर्च

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल वाजविण्याचा ‘विश्वविक्रम’ करून गिनीज बुकमध्ये स्थान मिळविण्यासाठी तब्बल ७० लाख रुपयांचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. या रकमेसह गणेशोत्सवाच्या विविध कार्यक्रमांसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या सूचनांनुसार महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांनी आपल्याकडील उपक्रमांसाठी खर्चाचा तपशील सादर केला असून, त्याच्या एकत्रित खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या महोत्सवाच्या अतिरिक्त खर्चास प्रायोजक मिळविण्यावरून महापालिकेवर टीका झाल्यानंतर हा प्रस्ताव सादर करण्यात आला.
ते म्हणाले, ‘महोत्सवासाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मांडव टाकण्यात येणार असून, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. एकाच वेळी सर्वाधिक शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याचा विक्रम करण्याचा संकल्प आहे. एकाच वेळी पाच हजार ढोलांचे वादन करून त्याचा विक्रम करण्याचाही संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या एक कोटी रुपयांच्या खर्चामध्ये मांडव, शाडूच्या मुर्ती बनवण्याचा खर्च समाविष्ट आहे, असे मोहोळ म्हणाले.

हे उपक्रमही होणार
- रौप्यमहोत्सवाचे बोधचिन्ह, शुभंकर तयार करणे (५० हजार रुपये)
- थीम साँग, सोशल मीडिया, थीम व्हिडिओ, प्रमोशनल व्हिडिओ, वेब सीरिज, मोबाइल अॅप (१५ लाख रुपये)
- सुशोभीकरण, वॉल पेंटिंग (पाच लाख रुपये)
- वृत्तपत्रे, वृत्तवाहिनी, टेलीव्हिजन शोज (साडे चार लाख रुपये)
- कलाकार, खेळाडू, मॅनेजमेंटचे विद्यार्थी, पर्यटक आदींची रौप्यमहोत्सवास भेट, माहिती कक्ष, समन्वय (एक लाख रुपये)
- बाइक, सायकल रॅली (एक लाख रुपये)
- जाहिरात फलक, होर्डिंग्ज (२० लाख रुपये)
- स्वागत कमानी (दोन लाख रुपये)
- विविध चौकांचे सुशोभीकरण ( सात लाख रुपये)
- पुणे स्मार्ट गणेशोत्सव स्पर्धा (दहा लाख रुपये)
- आशयनिर्मिती (चार लाख रुपये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगणे समजून घेताना

0
0

आसावरी गुपचूप
....
मन्मथच्या निधनाने सध्या सगळेच हळहळले आहेत. त्यावर अनेक उलटसुलट मतेही दिसून येतात. ‘हल्लीची पिढी अशी आहे’ इथपासून ते ‘पालक काय करत होते, इथपर्यंत. पण याबरोबरच एक खूप मोठी अजस्त्र भीतीदेखील सगळ्यांच्याच आणि विशेषतः पालकांच्या मनात घर करू लागली आहे, ‘आपल्या मुलाने/मुलीने असे काही केले तर?’ आणि मग या प्रश्नाला जणू बगल देण्यासाठीच पालकत्वावर टीकाटिपण्णी, आमचे पालकत्व कसे निर्दोष आहे, आम्ही कसा मुलांना वेळ देतो, आमचे कसे मुलांवर प्रेशर नाही, (म्हणजे कंसात ‘त्यांचं’ कसे चुकले, त्यांचे कसे प्रेशर होते. आता जे झाले ते वाईटच, पण त्यात त्यांचाही दोष होताच! इत्यादी इत्यादी!) आणि या सगळ्या टीकेनंतरही ही भीती राहतेच, की ‘उद्या हिने किंवा याने असा काही विचार केला तर?’
आत्महत्या हा शब्दही आपण सहजपणे उच्चारत नाही. त्यांनी ‘तसे’ करायला नको होते , किंवा तू तसा विचार करू नको बरं का; हीच भाषा आपण वापरतो. आज आपण आत्महत्या समजावून घ्यायचा प्रयत्न करू या. आणि एखाद्या माणसाशी मैत्री करताना आपण जसे आधी त्याचे नाव नीट उच्चारतो, तसेच आत्महत्या हा शब्द आपण न घाबरता वापरणार आहोत.
तर आत्महत्या का करावीशी वाटत असेल? संशोधन असे सांगते, की आत्महत्या करण्यास उद्युक्त झालेली व्यक्ती तीन प्रकारच्या अनुभवातून जात असते. पहिला म्हणजे असहाय वाटणे, दुसरा म्हणजे कोणतीच आशा न उरणे आणि तिसरा अनुभव म्हणजे स्वतःची किंमत शून्य वाटणं. जसा हा त्रिकोण अधिकाधिक बळकट होत जातो, तसा आत्महत्येचा विचार अजून अजून प्रबळ होऊ लागतो.
सामान्यतः एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्येचा विचार करू लागते, त्यानंतर ती लगेच काही आत्महत्या करत नाही. आधी हा विचार येतो. तो जेव्हा येतो, तेव्हा काही एवढा मजबूत नसतो. मात्र तो जोर धरू लागला, तर ती व्यक्ती काही जवळच्या माणसांना किंवा कधी अनोळखी व्यक्तींना सुद्धा बोलण्याबोलण्यातून सुचवायला लागते. ‘अगदी कंटाळा आलाय मला जगण्याचा’ किंवा ‘काही रामच उरला नाहीये जगण्यात’ किंवा अजून काही. हे बोलणं अगदी साधे किंवा वरवरचे असू शकते. परंतु खोलवर पाहता हा आक्रोश असतो, आपले कोणीतरी पाहावे, ऐकावे म्हणून. अनेकदा हे बोलणं गंभीरपणे घेतलं जात नाही.
यानंतर हा विचार वारंवार येऊ लागतो. पुन्हा एकदा: हे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. यानंतरची पायरी म्हणजे ही व्यक्ती आत्महत्येचा प्लॅन करू लागते. कधी करणार, कशी करणार? लक्षात घ्या, स्वतःला संपवणे ही काही छोटी गोष्ट नाही. आणि जेव्हा नियोजनही पूर्ण होते तेव्हा ती व्यक्ती खरोखर आत्महत्या करते.
आता याला कारणे वेगळी वेगळी असू शकतात. आपला कुत्रा, मांजर मेलं, इथपासून ते एखादा दुर्धर आजार जडला इथपर्यंत कोणतेही कारण असू शकते. पण दुःख हे दुःख असते. त्या व्यक्तीचा आयुष्याचा प्रवास आपल्याला माहिती नसतो (अगदी आपण जवळची व्यक्ती असलो, तरी), त्या व्यक्तीच्या ठेचा आपण खाल्लेल्या नसतात. तर आपण तिचं दुःख किती हे कसं ठरवणार? किती दुःख झालं की ते आत्महत्येला पात्र आहे, असा तराजू नसतो ना! ते किती मोठं कि लहान हे फक्त ते दुःख अनुभवणारी व्यक्ती ठरवू शकते.
खरे पाहता आपण सगळेच दुःखातून गेलेलो असतो, जात असतो. परंतु दुर्दैव असं, की आपण अनुभवलेल्या दुःखामुळे आपण दुसऱ्याच्या दुःखप्रती संवेदनशील व्हायला हवे, तसे होत नाही. जणू काही ही दुःख सोसायची स्पर्धाच आहे!
याला काय झालं? मला तर एवढं सगळं दुःख होत, तरी मी ठाम उभी राहिले/उभा राहिलो, असे सहजी म्हणून जातो आपण. कुठे तरी या स्पर्धेमुळेच ती आत्महत्या करणारी एक व्यक्ती आपले दुःख सांगायला कचरत असते. तुमच्या मते, ते दुःख कितीही लहान असले तरी सत्य हे असते, की ती व्यक्ती हरलेली असते. आणि हा प्रवास हळूहळू झालेला असतो आणि आपण एक समाज म्हणून कमी पडलेलो असतो, एका व्यक्तीला समजून घ्यायला.
यासाठी- निदान यासाठी तरी- आपण एक व्यक्ती म्हणून एक गोष्ट ठरवू या का? जर कोणी व्यक्ती मला तिच्या स्वतःबद्दल सांगत असेल, तर मी त्या व्यक्तीला माझ्या तराजूवर तोलणार नाही. मी फक्त ऐकेन. प्रेमाने आणि मन लावून. आणि असे निर्मळ ऐकणे जादू करते. त्या दुःखात असलेल्या व्यक्तीला वाटते, आपण एकटे नाही, असहाय्य नाही. आपण नक्कीच कोणी तरी आहोत. आपल्याला किंमत आहे आणि आपोआपच जगण्याची उमेद वाढू लागते. आत्महत्येचा तो त्रिकोण हळूहळू मोडून पडतो आणि त्यातून जन्म घेते जीवन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती कपात केल्यावरून राष्ट्रवादीचे आंदोलन

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत केंद्र सरकारने कपात केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आंदोलन केले. शिष्यवृत्ती पूर्ववत करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, अॅड. सचिन औटे, विजय लोखंडे, सुनील गव्हाणे, सुनील कड, राहुल आहेर, सतीश चोरमले, उत्तम आल्हाट, मंदा आल्हाट आदींनी आंदोलनात भाग घेतला.
वाघेरे-पाटील म्हणाले, ‘केंद्र सरकारने मागील दोन वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी संपूर्ण ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना जवळपास पाचशे कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र ही रक्कम एकदम ५० कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत करण्यात यावी.’
आंदोलनानंतर आकुर्डीतील तहसीलदारांना डॉ. घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. ‘केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध,’ ‘ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करणाऱ्या ढोंगी सरकारचा धिक्कार,’ ‘कुठे आहे एक राज्य सरकारची शिक्षणाची हमी ओबीसींची शिष्यवृत्ती का करतायत कमी?’ अशा मजकूराचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४६ कोटींची फसवणूक; दोघांना जामीन मंजूर

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास एक ते दीड महिन्यात पैसे दीडपट आणि काही कालावधीतच तीन हजार पट करण्याचे आमिष दाखवून दीड हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ४६ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने दोघांना २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.
विशेष न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवाणी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार न्यायालयीन कोठडीत आहे. अन्य दहाजण अद्याप फरार आहेत. मेक इन इंडिया रॉक्‍स आणि रॉक्‍स फॅमिली ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे.
संदीप श्यामराव लोखंडे (वय ४४), परशुराम विश्राम तांबे (४८, दोघेही, रा. मुंबई) या दोघांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. सुहास कोल्हे आणि अॅड. निरंजन ढमाले यांनी काम पाहिले.
रूपेश अरविंद काटकर (३७ रा. मुंबई) हा मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात सुनील वाघमारे (रा. मुंबई), सचिन मुऱ्हे (रा. सोमाटणे फाटा), पदमराज थोरात (रा. सोमाटणे फाटा), युनूस शेख (रा. भोसरी) रवींद्र सावंत (रा. पिंपळे गुरव), नवनाथ रेपाळे, विश्‍वास भोर (रा. चिंचवड), विजय वघरे (रा. मुंबई), संदीप तावरे (रा. भोसरी), माधव भंडगे (रा. थेरगाव) हे दहा जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना जून २०१६ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत घडली. काटकर आणि इतर आरोपींनी WWW.makeinindia.rocks, www.rocksfamilyglobal.com या संकेतस्थळावर माहिती दिली. मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांच्या मिटींग घेतली. त्या मिटींगमध्ये गुंतवणूक एक ते दीड महिन्यात दीडपट आणि थोड्या कालावधीतच तीन हजार पटीने रक्कम देण्याचे आमिष दाखविले. अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत एक हजार ५२४ गुंतवणूकदारांची ४६ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर पशुवैद्यकीय दवाखाने होणार ‘आयएसओ’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी सात ते आठ अशा सुमारे १०० दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळणार आहे. त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, त्यामुळे जनावरांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील कडू बुद्रुक येथील एकाच पशुवैद्यकीय दवाखान्यास आयएसओ मानांकन मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे २२७ आणि राज्य सरकारचे ९५ असे ३२३ पशुवैद्यकीय दवाखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतून विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे जनावरांना चांगले उपचार मिळण्यास विलंब होत आहे. किंबहुना उपचार वेळेवर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती समोर आली आहे. दवाखान्यात परिचर, व्रणोपचारक, पशुधन विकास अधिकारी, व पर्यवेक्षकांची काही पदे रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत.
‘जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ७ ते ८ पशुवैद्यकीय दवाखाने हे आयएसओ मानांकन करायचे असून, सुमारे १०० दवाखान्याना आयएसओ दर्जा मिळवायचा आहे. आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील सर्व स्तरांतून याचे स्वागत होत आहे. जनावरांना उपचार देण्यामध्ये कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. त्याशिवाय त्यांना उपचार देताना येणाऱ्या समस्यांचा विचार करण्यास जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत. कर्मचारी, अधिकारी वेळेवर उपस्थित राहणे, अभिलेख वर्गीकरण यासारखे विविध उपाय करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांना वेळेवर उपचार मिळतील,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केला.
‘जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतून चांगल्या दर्जाची सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने १०० दवाखान्यांमध्ये आयएसओ मानांकन करण्याचा निश्चय केला आहे. त्या दृष्टीने संबंधित दवाखान्यांमध्ये काय सुधारणा करता येईल त्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीरंग पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात जुन्नरमध्ये २८, आंबेगाव २१, खेड २४, हवेली ११, मावळ १६ तर पुरंदर व भोर प्रत्येकी ११, बारामती २३ एवढे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तर इंदापूर, दौंडमध्ये प्रत्येकी २७, मावळ १६, मुळशी ९, वेल्हा ८ असे २२७ दवाखाने आहेत. आंबेगाव तालुक्यात कुडे बुद्रुक येथे एक फिरता दवाखाना आहे; तर राज्य सरकारचे ९५ असे ३२३ दवाखाने आहेत.


‘आयएसओ’ मानांकन मिळविण्यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. त्यासाठी लोकवर्गणीतून ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच, दवाखान्यात आवश्यक लागणारे साहित्य देखील जमा होणाऱ्या सेवा शुल्कातून खरेदी करण्यात येणार आहे.
- विश्वासराव देवकाते, अध्यक्ष,
जिल्हा परिषद, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या रखडल्या

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरात पावसाने समाधानकार हजेरी लावली असली तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पावसाने जुलै महिन्यात हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्केच पेरण्या झाल्या असून, काही भागांत पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण खरिपातील तृणधान्याचे १ हजार ४९३.९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप अन्नधान्यांचे १ हजार ७८७ हेक्टर; तर तेलबियाची ५२१.२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण २ हजार ३०८ क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. खरिपाच्या पेरणीचे प्रमाण हे ६० टक्के असून, उर्वरित ४० टक्के खरिपाच्या पेरण्या अद्याप रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने याबाबत दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील हवेली तालुक्यात २१.५५ हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, शिरूरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दौंडमध्ये अवघ्या २.४ हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे.
जून महिन्यात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरण्या केल्या. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्ये पेरणीला खरीप हंगामात प्राधान्य दिले जाते. हवेली तालुक्यात १३.७१ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. एकूण खरिपाच्या अन्नधान्याची २१.२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया ५.९ हेक्टर, अन्नधान्य व कापसाचे क्षेत्र २७.६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण ६३.४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यात एकूण खरीप तृणधान्यांची ३८.८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप अन्नधान्याची ३९.८६, तेलबिया ५.८ हेक्टर, एकूण खरीप क्षेत्र उसाशिवाय ४७.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भोर तालुक्यामध्ये खरीप तृणधान्ये ४०.२९ हेक्टर, खरीप अन्नधान्य ५०.४ हेक्टर, तेलबिया ३९.३ हेक्टर; तर खरीप मिळून ९०.९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. मावळ तालुक्यामध्ये खरीप तृणधान्ये ७२.४६, अन्नधान्ये ७२.४६ हेक्टर आणि तेलबिया १.९३ हेक्टरची पेरणी झाली आहे. म्हणजेच या तालुक्यात एकूण खरिपाची ७४.४ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात खरीप तृणधान्ये ३०.६१ हेक्टर, खरीप अन्नधान्ये ३१.४१ हेक्टर, तेलबिया ०.६४ हेक्टर एवढी झाल्याने खरिपाचे एकूण क्षेत्र ३२.२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये खरीप तृणधान्य ७९.३७ हेक्टर, खरीप अन्नधान्य ९२.८८ हेक्टर, तेलबिया ४२.८९ हेक्टरमुळे २९४.५ हेक्टरवर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. जुन्नरमध्ये खरीप तृणधान्याची १२७.९ हेक्टर, खरीप अन्नधान्य १३७.१३ हेक्टर, तेलबिया ८२.३१ हेक्टरची पेरणी झाल्याने एकूण खरीपाच्या पेरणीचे क्षेत्र ४८३.५ हेक्टर एवढे आहे. खेड तालुक्यात खरीप तृणधान्य १०६.२२ हेक्टर, खरीप अन्नधान्य ११७.५८ हेक्टर, तेलबिया ८५.८९ हेक्टर, एकूण खरीप क्षेत्र ३०६. ६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पुरंदरला ६४ टक्के हेक्टरवर पेरणी
पुरंदर तालुक्यात खरीप तृणधान्याची ६४.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे; तर ११८.७ हेक्टरवर ऊस वगळत खरिपाच्या पिकांची पेरणी झाली आहे. बारामतीमध्ये खरीप तृणधान्ये ९५.१३ हेक्टर; तर एकूण खरिपाचे क्षेत्र ११८.२ हेक्टर आहे. इंदापूर तालुक्यात खरीप तृणधान्ये ९७ हेक्टर आहे. तर खरिपाचे क्षेत्र ११८.२ हेक्टर आहे. दौंडमध्ये खरीप तृणधान्ये १९.३४ हेक्टर तसेच २९.६ हेक्टरवर ऊस वगळता खरिपाची पेरणी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केट यार्डातील शारदा गजानन गणेश मंडळातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटन ५ ऑगस्टला दुपारी चार वाजता मार्केट यार्डात मंदिरासमोरील प्रांगणात होणार आहे. ही स्पर्धा ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
श्री शारदा गजानन मंदिराचे अध्यक्ष गणेश घुले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या ढोल-ताशा पथकाला एक लाख रुपये, सन्मानपत्र व फिरता करंडक दिला जाणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या पथकाला ७५ हजार रुपये सन्मानपत्र आणि तृतीय क्रमाकांच्या पथकाला ५० हजार रुपये व सन्मानपत्र दिले जाणार आहे. इतर अनेक पारितोषिके मंडळातर्फे दिली जाणार आहेत. एका पथकाला कला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा वेळ असेल. स्पर्धेसाठी शुल्क आकारले जाणार आहे. गेल्या वर्षी ५० पथकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी स्पर्धकांची संख्या वाढण्याची शक्यता घुले यांनी वर्तविली. या वेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष यशवंत कोंडे, कार्याध्यक्ष संजय साष्टे, गणेश यादव, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, शशिकांत नांगरे, विजय चोरगे, प्रशांत साष्टे, अतुल बेहेरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालवाद्यांची अनोखी जुगलबंदी सादर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तबला, ड्रम्स आणि काहोन या तालवाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार... तीन वाद्यांचा एकत्रितपणे सादर झालेला तालबद्ध समन्वय...तालवाद्यांची अनोखी जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. आशय कुलकर्णी (तबला), उमेश वारभुवन (काहोन), अभिषेक भुरुक (ड्रम्स) या तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांनी केलेल्या तालवाद्याच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. लतेश पिंपळघरे यांच्या गायनाची अनुभूती रसिकांनी घेतली.
‘शुद्धनाद’ संस्थेतर्फे २२ व्या छोटेखानी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कलाकारांना आपली कला रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी प्रत्येक महिन्यात मैफलीचे आयोजन करण्यात येते. संस्थेचे संस्थापक अश्विन गोडबोले, अनुप कुलथे, कपिल जगताप उपस्थित होते.
मैफलीच्या पहिल्या सत्राची सुरुवात खंड चापु तालाच्या वादनाने झाली. तबला, ड्रम्स आणि काहोन या वाद्यांचा बाज वेगळा असला तरीदेखील या वाद्यांच्या एकत्रित सादरीकरणातून मैफलीत बहार आली. स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) आणि तेजस माजगावकर (टाळ) यांनी तालवाद्यांना अप्रतिम साथ दिली. मैफलीच्या दुसऱ्या सत्रात पिंपळघरे यांनी जोगकंस रागाने सुरुवात केली. ‘काहे गुमान करे अपनेको पहचान...’ या बंदिशीने रसिकांची वाहवा मिळविली. ‘जगत ये समझे सपना, पीर पराई जाने नहीं...’ या बंदिशींनी रसिकांची विशेष दाद मिळविली. मोहनकंस रागातील बंदिशींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भैरवी रागातील बंदिशीने मैफलीची सांगता झाली. गायनाला आशय कुलकर्णी (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
गोडबोले म्हणाले, ‘शुद्धनाद हा नवोदित कलाकारांसाठी असलेला एक खुला मंच आहे, जिथे कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करू शकतात. कलाकार आणि श्रोता यांच्यामध्ये असलेले अंतर कमी व्हावे, या उद्देशाने ही मासिक सभा २२ महिन्यांपासून आयोजित केली जात आहे. कलाकारांसाठी कलाकारांची कलाकारांनी सुरू केलेली मैफल म्हणजे शुद्धनाद होय.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पथकांना घरघर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेकडो वर्षांपासून पारंपरिक ठेक्यांनी ढोल-ताशांचा मर्दानी अंदाज सादर करणाऱ्या ग्रामीण भागातील खेळ बंद पडण्याची नामुष्की ओढवू लागली आहे. पुण्या-मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात ढोल-ताशा पथकांना अधिक पसंती दिली जात असल्याने ग्रामीण खेळांच्या सुपाऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुणांचे शहरात होणारे स्थलांतरही ग्रामीण खेळ बंद पडायला कारणीभूत ठरत आहेत.
गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये पुणे- मुंबई, नाशिक या शहरांच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये जवळ जवळ प्रत्येक गावामध्ये एक खेळ तयार केला जात होता. ढोल-ताशांचे वादन आणि झांजनृत्य असे या खेळाचे स्वरूप होते. १० ते १५ ढोल, ५ ताशे आणि १५ ते २० झांज वाजवणारे कलाकार आपल्या वादनाने गणेशोत्सवात जोश आणि उत्साह भरायचे. एकसारखा वाजत राहणारा टोल त्यांच्या वादनाचे वेगळेपण दाखवून द्यायचा. गेल्या दोन वर्षांपासून शहरांमधल्या मिरवणुकीत हे चित्र दुर्मिळ होत चालले आहे. गणेशोत्सव मंडळांनीही आता ग्रामीण पथकांपेक्षा शहरातील शिस्तबद्ध आणि पारंपरिक वादन करणाऱ्या पथकांना पसंती दिल्याने ग्रामीण खेळांमध्ये वाजवणाऱ्या कलाकारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून महाराष्ट्रात ग्रामीण भागात ढोल वादनाची परंपरा सुरू आहे. किंबहुना शिवाजी महाराजांच्या आधीच्या कालखंडातही काही ठिकाणी ढोल वादनाची कला सादर केली जायची, असे इतिहासात दाखले आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप मिळाल्यानंतर ग्रामीण पथके मिरवणुकांमध्ये गणरायासमोर वादन करीत होती. गावागावांमधील तरुण आणि ज्येष्ठांना एकत्र करून पथके उभारण्यात आली. पुणे, मुंबई, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पथके आपली कला सादर करत होती. पावसाळी पेरणी पूर्ण झाली की पुढचे दोन ते तीन महिने शेतीची कामे फारशी नसतात. अशा वेळी रोजगार म्हणून चार पैसे मिळावेत या उद्देशाने ग्रामीण भागातील अनेक तरुण वादनाची कला आत्मसात करतात. प्रत्येक सुपारीमागे त्यांना काही पैसे मिळून उत्पन्नास हातभार लागत होता. आता मात्र, या उत्पन्नात कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे. ग्रामीण खेळांना सध्या मिळणाऱ्या सुपाऱ्यांमधून येण्याजाण्याचा खर्चही निघत नसल्याने अनेक खेळ बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
पुणे शहराचा विचार केला, तर काही मोजकीच मंडळे आणि सोसायट्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ग्रामीण खेळांना प्राधान्य देतात. त्यांच्याकडूनही या पथकांना फारसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आता या खेळांमधील काही वादक शहरातील पथकांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. एक काळ असा होता ज्या वेळेला विशिष्ट गावातील खेळ आला की त्यांचे वादन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत होते. आज मात्र, त्यांची कला पाहण्यासाठीही कोणी थांबत नाही. पथक संस्कृतीच्या आधीपासून रूढ झालेली ही कला सातत्याने जोपासणाऱ्या या ग्रामीण कलावंतांबद्दल सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मर्दानी खेळांबरोबर ढोल-ताशा वादनाची परंपरा जपत आहोत. या वादनातून मिळणारा निधी गावातील विधायक कामांसाठी वापरला जातो. परंतु, पुण्या-मुंबईत पथक संस्कृती वाढल्याने आमच्या सुपाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ढोल-ताशांच्या डागडुजीचाही खर्च निघत नाही, अशी परिस्थिती आहे.
- शंकर मातेरे, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, मातेरेवाडी, घोटवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images