Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

$
0
0

टिळकांवरील चित्रपटाची अनुदान वसुली रखडलेलीच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकमान्य टिळकांवरील चित्रपटासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले अनुदान वसूल करण्यासाठी नोटीस देऊन सहा महिने झाले तरी अद्याप ते वसूल झालेले नाही. या आदेशाची कार्यवाहीची टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचतर्फे करण्यात आली आहे. या विषयाला ‘महाराष्ट्र टाइम्स’नेच प्रथम वाचा फोडली होती.
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आले होते. अनुदानाला २० वर्षे उलटून गेली तरी देखील निर्माते विनय धुमाळे यांनी चित्रपट प्रदर्शित केलेला नाही. तसेच संबंधित अनुदानाची रक्कम व्याजासह सरकारला परत करण्याची नोटीस सांस्कृतिक खात्यातर्फे सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
वसुलीसाठी टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. टिळकांच्या जीवनावरील चित्रपटासाठी राज्य सरकारने १९९८ मध्ये निर्माते धुमाळे यांना ५० लाख रुपयांचे तर केंद्र सरकारने अडीच कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र, अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते विष्णू कमळापूरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचनालयाने संबंधित निर्मात्याला राज्य सरकारच्या ५० लाख रुपयांच्या अनुदानाच्या रक्कमेचे व्याजासह १ कोटी ८२ लाख ९६ हजार ७२० रुपये सरकारला परत करण्याची नोटीस २३ जानेवारी २०१७ रोजी काढली होती. मात्र, अद्याप यावर कार्यवाही करण्यात आली नाही. सरकारने संबंधित रक्कम त्वरित वसूल करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी वेलणकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातही संसर्ग

$
0
0

आठ महिन्यांत २४ जण दगावले; ८६ जणांना लागण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराप्रमाणे स्वाइन फ्लूचा संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यांत ८६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, पैकी २४ जण दगावल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरात गत वर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातही त्याची झळ बसली आहे. त्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली असून, जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘ जिल्ह्यात आतापर्यंत ८६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये प्रत्येकी १२ स्त्री आणि पुरुषांचा समावेश आहे. २०१५ आणि २०१७मध्ये स्वाइन फ्लूचे पेशंट वाढले आहेत. २०१५मध्ये २१२ जणांना लागण झाली होती. त्यापैकी ६६ जण दगावले होते. बारामती, हवेली, जुन्नर, शिरुर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पेशंटचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर येणाऱ्या स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या पेशंटना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा लागण होणाऱ्यांच्या तुलनेत दगावलेल्यांचे प्रमाण २८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ ते ५० या वयोगटातील २० जणांचा तर, तर पन्नाशीच्या पुढील ४ आणि शून्य ते पाच या वयोगटातील एकाचा समावेश आहे.

चोवीस तासांत चौघांचा मृत्यू

‘स्वाइन फ्लू’मुळे गेल्या चोवीस तासांत शहरातील चौघे दगावल्याचे समोर आले आहे. मृतांमधील दोन रुग्ण शहरातील असून, उर्वरित दोघे पुण्याबाहेरील आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ८० वर पोहोचली आहे. शिवाय ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोग्य विभागाच्या विविध दवाखान्यांतून ३ हजार २२४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत लागण झालेल्या बावीस जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात ३७५ जणांना लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यातील २७३ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये शहरातील २४ जणांचा समावेश, असून ५६ जण पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत दगावलेल्या चौघांपैकी तिघे ज्येष्ठ नागरिक आहेत. दोन रूग्ण अनुक्रमे वानवडी आणि बुधवार पेठेतील असून, उर्वरीत दोघे नगर आणि सातारा जिल्ह्यातील आहेत. वानवडी येथील ९६ वर्षीय रूग्णाचे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, संसर्ग वाढल्याने अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवार पेठेतील ५२ वर्षीय रूग्णाला रक्तदाबाचा त्रास होता. त्यांना संसर्ग झाल्यानंतर न्यूमोनियाबरोबर सेप्टिक शॉक झाल्याने अवयव निकामी झाले. सातारा जिल्ह्याली मल्हारपेठेतील पेशंटलाही रक्तदाबाचा त्रास होता. त्यावर उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनियाबरोबर स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना क्षीरसागर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हमाल, रिक्षाचालक आणि कष्टकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र हमाल सेनेचे अध्यक्ष अॅड. किशोर माधवराव ऊर्फ नाना क्षीरसागर (वय ६१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
अॅड. क्षीरसागर यांच्यावर मधुमेहाच्या त्रासामुळे वैद्यकीय उपचारही सुरू होते. सोमवारी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडचा घाटरस्ता आठ दिवस बंद

$
0
0

पुणेः घाटात पडलेल्या दरडीची सफाई करण्याबरोबरच या मार्गावरील दरड प्रवण क्षेत्राचे सर्वेक्षणासाठी सिंहगडाचा घाटरस्ता आठ दिवस बंद राहणार आहे. पर्यटकांनी गडावर जाण्यासाठी पायवाटेचा वापर करावा, असे वन विभागाने सोमवारी जाहीर केले.

सिंहगडावर रविवारी दुपारी पडलेल्या मोठ्या दरडीमुळे घाट रस्ता दोन तासांसाठी बंद झाला होता. या काळात गडावर सुमारे दोन हजार पर्यटक गडावर अडकले होते. गडाच्या घाटरस्त्यावर गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी डोंगरावरून मुरूम घसरून खाली आला आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रविवारी पडलेल्या दरडीचे मोठे दरडही अद्याप रस्त्यावर पडून आहेत. या रस्त्यावर सर्व अडथळे दूर करण्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही येत्या रविवारपर्यंत सिंहगड बंद ठेवणार आहोत. गडावर जाण्यास इच्छुक पर्यटकांनी पायवाटेचा वापर करावा, अशी माहिती वन विभागाचे सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी दिली. दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सहभागातून तातडीने घाट रस्त्याची पाहणी करावी, अशी सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिनेट निवडणुका त्वरित घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विविध विद्यापीठांची अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी पदवीधरांची मतदार नावनोंदणी मोहीम संपत आली आहे. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करावे. तसेच, विद्यापीठांचा कारभार व्यवस्थ‌ित चालण्यासाठी कुलपती आणि कुलगुरू यांनी त्यांच्याकडून नेमणूक होणाऱ्या सदस्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचाद्वारे करण्यात आली आहे.

नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांमध्ये निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी विद्यापीठांमध्ये नावनोंदणी अखेरच्या टप्प्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवीधरांची मतदार नावनोंदणी संपली आहे. तीन ऑगस्टपर्यत शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना मतदार म्हणून नावनोंदणी करता येणार असून त्यांना ८ ऑगस्टपर्यत अर्ज कागदपत्रांसह विद्यापीठाच्या निवडणूक कार्यालयात जमा करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीधरांची नावनोंदणी सुमारे ८१ हजार झाली आहे. तर, मुंबई विद्यापीठाची पदवीधर मतदार नावनोंदणी ६० हजारांच्या सुमारास आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पदवीधर मतदार नावनोंदणी सुमारे १५ हजार ५६९ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे ३६ हजार झाली आहे. तसेच, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची (एसएनडीटी) मतदार नावनोंदणी एक हजार झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदवीधर मतदार नोंदणी येत्या काही दिवसात संपणार आहे. तर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पदवीधर मतदार नावनोंदणी संपली आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. राज्यातील विद्यापीठांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सिनेट सदस्यांची गरज आहे, अशी मागणी मंचाचे प्रांतप्रमुख डॉ. ए. पी. कुलकर्णी आणि जोगेंद्रसिंह भिसेन यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलपर्णी काढण्यासाठी ७२ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे नदीचा नैसर्गिक समतोल ढासळला असून जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होते आहे. जलपर्णीच्या वाढत्या पसऱ्याबरोबरच तिला काढण्यासाठी दर वर्षी खर्चाचे आकडे मोठे होत आहेत. या वर्षी महापालिकेने हे जाळे काढण्यासाठी तब्बल ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

पावसाळ्यातील संसर्गजन्य रोगांमध्ये जलपर्णीचा मोठा वाटा आहे. पुण्यातील नद्या, तलावांमध्ये मुक्काम ठोकलेल्या जलपर्णीचे जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत. मुठा, मुळा, पवना नदी, पाषण, कात्रजच्या दोन तलावामध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरत आहे. त्यामुळे नदीकाठ आणि तलाव परिसरातील नागरिकांना डास आणि कीटकांचा त्रास सहन करावा लागतो आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय पुण्यातील जलपर्णी संपणार नाही, असा निष्कर्ष जलअभ्यासकांनी काढला आहे.

नदी प्रदूषण कमी होण्याची वाट बघण्यापेक्षा सध्या तरी दर वर्षी नियमित जलपर्णी काढत राहणे एवढा एकच पर्याय महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडे आहे. पावसाळा संपला की निविदा प्रसिद्ध करायची आणि कंत्राटदाराकडून जेसीबी आणि इतर यंत्रणा वापरून जलपर्णी काढली जाते आहे. जलपर्णीचा वाढत्या पसाऱ्यामुळे खर्चाचा आकडा वाढतो आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिकेने दर वर्षी पन्नास लाख रुपयांची तरतूद केली होती. कीटक प्रतिबंधक विभागाने ७२ लाख रुपयांचा निधी यासाठी ठेवला आहे.

‘पावसाळ्यामध्ये जलपर्णी वाहून पुढे जाते. त्यामुळे ऑक्टोबरनंतर आम्ही यंत्रणा लावून जलपर्णी काढतो. जलपर्णी कायमस्वरूपी काढण्यासाठी व्यावहारिक पर्याय अद्याप उपलब्ध नाही. जलपर्णी ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते. ती जमिनीवर काढल्यानंतर पाणी कमी होते आणि तिचा आकारही कमी होतो. त्यामुळे विल्हेवाट लावणे सोयीस्कर ठरते. नद्यांमधील प्रदूषण कमी झाल्याशिवाय जलपर्णी कमी होणार नाही,’ अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.

‘कायमस्वरूपी उत्तर नाही’

पुण्याबरोबर देशभरातील नव्हे तर प्रगत देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या जलपर्णीवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. जलपर्णीला कायमस्वरूपी उत्तर मिळालेले नाही. जलपर्णीपासून वस्तू बनविण्यात येत असल्या तरी तिची उत्पत्ती रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय मिळालेला नाही. पुण्यात दर वर्षी सत्तर लाख तर पवना नदी सात लाख आणि इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी पाच लाख रुपये खर्च येत आहे. पवईतील जलपर्णी काढण्यासाठी सात कोटी रुपये खर्च करावा लागला. कोल्हापूरमधील रंकाळा तलावातील जलपर्णी हटविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जलपर्णीचे तोटे

जलपर्णी पाण्याचा प्रवाह तर अडवतेच; पण तिच्या पाण्यावरील थरामुळे सूर्याची किरणे आणि ऑक्सिजन पाण्यात तळापर्यंत पोहोचत नाही. पाणवठ्यांवर राहणाऱ्या पक्ष्यांना आवश्यक असलेले कीटक आणि जलचरांचे प्रमाण घटते. जलजीवांवर विपरित परिणाम होतो. तसेच जलपर्णीच्या मुळांच्या पोकळीत डास अंडी घालतात.

जलपर्णी आली कुठून?

जलपर्णीचे मूळ स्थान आहे दक्षिण अमेरिका. पारतंत्र्यात असलेल्या भारताची १८९६ मध्ये कोलकाता राजधानी होती. त्या वर्षी तिथे ब्रिटनचे युवराज आले होते. ब्रिटनच्या वसाहती त्या वेळी अनेक देशांमध्ये पसरलेल्या होत्या. त्यामुळे अनेक देशांतील प्रतिनिधी युवराजांची भेट घेण्यासाठी आले होते. ब्राझीलमधल्या एका अधिकाऱ्याने युवराजांना नजराणा देण्यासाठी म्हणून एका काचपात्रातून आकर्षक रंगाची फुले असलेली एक छोटीशी वनस्पती आणली होती. त्याचे नाव जलपर्णी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कारला धडक देणाऱ्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना दहा हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा कोर्टाने सुनावली. सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
विनायक तुळशीराम दुधाणे (वय ५९), गुलाब तुळशीराम दुधाणे (५७, रा. दुधाणेनगर, वारजे जकातनाका), विजय विश्वनाथ मापारे (५०, रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर) या​ तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी शरद रामचंद्र सुर्वे यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी हे पोलीस अधिकारी असून, ते २० ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री नऊ वाजता त्यांच्या कारमधून चांदणी चौकातून पुण्याकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची कार मागे घेत असताना फिर्यादींच्या कारला धडक दिली आणि तेथून पळ काढला.
त्यामुळे फिर्यादी यांनी बावधान चौपाटीपर्यंत आरोपींचा पाठलाग केला व त्यांना अडवले. त्यावेळी आरोपींनी सुर्वे आणि त्यांचा ड्रायव्हर हनुमंत रामा बांगर यांना मारहाण केली. सुर्वे आणि बांगर यांनी आरडाओरडा केल्याने तेथील नागरिकांनी त्यांची भांडणे सोडवली.
आरोपींनी पुन्हा तेथून पळ काढला. सुर्वे व बांगर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुर्वे यांनी फिर्याद दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकिल मच्छिंद्र गटे यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी शशांक सत्यवान बोरकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास हिंजवडी पोलिस स्टेशनचे संतोष शिंदे यांनी केला. दंडाची रक्कम म्हणून जमा होणारे ३० हजार रुपये सुर्वे आणि बांगर यांना प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे देण्यात यावे, असे कोर्टाने निकालात नमूद केले आहे. कोर्ट कामकाजात दीपक गायकवाड यांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीला पुन्हा ‘दृष्टी’

$
0
0

‘नेत्रपटला’च्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहावीच्या परीक्षेदरम्यान डोळ्यांच्या नेत्रपटलाला सूच आल्यामुळे (रेटिनल व्हॅस्क्युलिटीज) तिची दृष्टी गेली होती. त्यामुळे उपचार सुरू ठेवून रायटरच्या मदतीने परीक्षा दिल्यानंतर गेलेली दृष्टी ‘मायक्रो इन्सिजन व्हेटरिओ रेटिना’ या प्रकारच्या ऑपरेशनद्वारे (एमआयव्हीएस) पुन्हा प्राप्त करता आली. यामुळे आता त्या विद्यार्थिनीला अकरावीला प्रवेश घेणे शक्य झाले.

‘निगडी येथील दहावीतील विद्यार्थिनी सलोनी मोरे हिला परीक्षा सुरू असताना अस्पष्ट दिसू लागले. त्या वेळी तिने राष्ट्रीय नेत्रचिकित्सा हॉस्पिटलमध्ये (एनआयओ) आमच्याशी संपर्क साधला. डोळ्यांची तपासणी केली. त्या वेळी तिच्या दोन्ही डोळ्यांच्या पडद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज आल्याने रेटिनल व्हॅस्क्युलिटिजचा आजार झाल्याचे आढळले. एका विषयाचा पेपर झाल्यानंतर तिला दिसेनासे झाले होते. उत्तरपत्रिकेत काय लिहिते हे कळत नव्हते. तिला स्टेरॉड्स देण्यात आले. रायटरच्या मदतीने तिने सर्व पेपर लिहिले. परीक्षेनंतर तिच्या दोन्ही डोळ्यांवर ‘एमआयव्हीएस’ची सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्जरीनंतर तिला दोन्ही डोळ्यांना पूर्वीप्रमाणे दिसू लागले. तिला दृष्टी प्राप्त झाली,’ अशी माहिती राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

डॉ. केळकर यांच्यासह डॉ. हेतल मेहता-खांडगे, डॉ. अक्षय कोठारी यांनी हे ऑपरेशन यशस्वी केले. सलोनी मोरे म्हणाली, ‘दहावीची परीक्षा देताना मला अचानकपणे डोळ्यांना दिसेनासे झाले होते. परंतु, डॉक्टरांसह शाळेच्या शिक्षकांनी मला धीर दिला. रायटरच्या मदतीने पेपर दिले. त्यानंतर दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले. आता पूर्वीसारखे दिसू लागल्याचे समाधान आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस यंत्रणेद्वारे महिलांचे संरक्षण सक्षम व्हावे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलिस यंत्रणेने राबविलेल्या बडी कॅप, पोलिस काका योजनेची व्यापक जनजागृती करावी आणि एसएमएस, मोबाइल अॅपसारख्या यंत्रणेचा प्रभावी वापर करावा,’ असे आवाहन पोलिस, पिंपरी-चिंचवड महापालिका महिला पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासन अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी करण्यात आले.
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक सागर अंगोळकर, डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकीता कदम, रेखा दर्शले, आशा धायगुडे, नगरसचिव उल्हास जगताप, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे, प्राचार्य शशिकांत पाटील, किशोर केदारी उपस्थित होते.
तापकीर म्हणाल्या, ‘मुली आणि महिलांच्या सुरक्षेततेसाठी पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जातात. परंतु, त्याची व्यापक प्रमाणात जनजागृती नसल्यामुळे अनेकांना याबाबत माहितीच नसते. त्यामुळे बडी कॅप, पोलिस काका योजनांची जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पोस्टर, सिटी केबल, प्रसार माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. शाळा, कॉलेज, कार्यालये या ठिकाणी लेडी पोलिस मार्शल नेमण्यात यावे.’
शहरातील सर्व शाळा, कॉलेज, कार्यालये, यामध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून पोलिस अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर तातडीने कार्यवाही करावी. कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या नियमित उपस्थितीची माहिती पालकांना होण्यासाठी मोबाइल अलर्ट सिस्टीम तयार करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या इन-आउटच्या माहितीकामी शाळा, कॉलेजमध्ये पंचिंग प्रक्रिया राबवावी. त्यासाठी महापालिकेतर्फे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच, महिलांच्या समस्यांबाबत लवकरच सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांची बैठक घेण्यात येईल. शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये होमगार्ड, एनएसएस., एनसीसीचे स्वयंसेवक, सक्षम ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पोलिस मित्र यांची पोलिस यंत्रणेने संयुक्त समिती स्थापन करावी, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या.
सावळे म्हणाल्या, ‘पोलिस यंत्रणा सक्षम असल्यास शहरातील महिला सुरक्षित राहतील. सर्व कॉलेज आणि शाळांमध्ये तक्रार पेट्या ठेवण्यात याव्यात, जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत, महिलांना निर्भयपणे जगण्यासाठी पोलिस यंत्रणेने दक्ष राहावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.’
‘पूर्वी अस्तित्वात असलेली विशाखा समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी,’ अशी मागणी डॉ. घोडेकर यांनी केली. पोलिस मित्रांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी अवश्य करण्यात यावी, असे आंगोळकर यांनी सांगितले. सुलक्षणा शिलवंत यांनी पोलिस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळे यांचा सहभाग महिला तक्रार निवारण समितीमध्ये असावा, अशी सूचना केली.
बैठकीमध्ये पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या, अधिकारी यांनी मांडलेल्या महिलांच्या समस्या निवारणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच शहरातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्त शिंदे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाई चित्रपट महोत्सव ४ व ५ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारत आणि थायलंड या देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त थाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ४ व ५ ऑगस्ट रोजी हा महोत्सव रंगणार आहे. थाई चित्रपटांच्या आस्वादातून तेथील चित्रपट संस्कृती व देशाची संस्कृती समजून घेता येणार आहे.

थायलंडचा मुंबई येथील दूतावास आणि चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे हा महोत्सव आयोजिला आहे. थायलंडचे मुंबई येथील उच्चायुक्त एकापोल पुलपिपेट व संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे उद‍्घाटन ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात थायलंडचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. दुपारी १.३० वाजता ‘साँग ऑफ राइस’ ही उद‍्घाटनाची फिल्म म्हणून दाखवली जाणार आहे. त्यानंतर ४.३० वाजता ‘एटर्निटी’, सात वाजता ‘द स्विमर्स’ हे चित्रपट पाहता येतील.

शनिवारी सकाळी १० वाजता ‘वँडरिंग’, दुपारी १ वाजता ‘अ गिफ्ट’, दुपारी ४ वाजता ‘द स्कॅर’ आणि सायंकाळी ६ वाजता ‘स्नॅप हे चित्रपट पाहता येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

‘पूर्वी दिल्ली आणि मुंबई येथे हा महोत्सव झाला असून पुण्यात प्रथमच होत आहे. अशा सांस्कृतिक महोत्सवातून दोन्ही देशांचे नाते अधिक दृढ होईल,’ अशी भावना पुलपिपेट यांनी व्यक्त केली.

‘फादर ऑफ सिनेमॅटोग्राफी’

भारतीय वंशाचे छायाचित्रणकार रत्तना पेस्टोनजी यांना थायलंडच्या चित्रपट क्षेत्रात ‘फादर ऑफ सिनेमॅटोग्राफी ऑफ थाई सिनेमा’ म्हणून ओळखले जाते. पेस्टोनजी यांचा जन्म २२ मे १९०८ रोजी बँकॉक, थायलंड येथे एका भारतीय पारशी दाम्पत्याच्या पोटी झाला. थाई चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि छायाचित्रणकार अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. त्यांनी थाई चित्रपटांना जागतिक पटलावर आणले. ३५ एमएम फिल्म हे तंत्रज्ञान त्यांनी प्रथम वापरले. थायलंड सरकारने थाई चित्रपटांना मदत करावी, यासाठी ते झटले. त्यामुळे त्यांना हॉलिवूडमधून धमक्याही आल्या होत्या. १७ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

विविध संस्था, संघटनांच्या वतीने अभिवादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मंगळवारी साठे यांना अभिवादन केले. निराधार विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, महिलांना साड्यांचे वाटप, देशी वृक्षांच्या रोपांची भेट, दुचाकी रॅली, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कुमठेकर रोड येथील शाळेतील छायाचित्रास, तसेच सारसबागेसमोरील, बिबवेवाडी आणि येरवडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माजी आमदार, मोहन जोशी, गोपाळ‍ तिवारी उपस्थित होते.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अण्णा भाऊंना अभिवादन करण्यात आले. हिराबाग येथील पक्ष कार्यालयात मंगळवारी पक्षाचे कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष मिलिंद वालवडकर यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शशिकांत तापकीर, पंडित कांबळे, राकेश कामठे यांची भाषणे झाली. प्रभाग क्रमांक १९च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संजय गायकवाड यांच्या हस्ते महापालिकेतील कर्मचारी रोहिदास खंधारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वैभव जाधव, अक्षय गायकवाड, धोंडिबा साठे, वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संजय गायकवाड यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबागेजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोहन सोनवणे, रमा पवार, साधा सोनवणे, अमोल पवार, अक्षय कांबळे उपस्थित होते.

फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेच्या वतीने शहराच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बोपोडी, शिवाजीनगर, औंध आणि सातववाडी शाखेच्या वतीने स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू आणि हृदयविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ताडीवाला रोड, भेकराईनगर, बिबवेवाडी, गणेशनगर शाखेच्या वतीने अपंग आणि निराधार महिलांना साड्या वाटप, तसेच अंध विद्यार्थ्यांना चष्मे आणि छडी वाटप करण्यात आले. वारजे, आंबेगाव, कात्रज, धायरी शाखेने कर्णबधीर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्रे देण्यात आली. सातारा रोड, पाषाण रोड, हिंगणे खुर्द या शाखांच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन सोनावणे, अनिल गाढवे, पंकज शहा, श्रीपाद पाध्ये, रमेश कुंदूर, जयवंत कुलकर्णी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भीमा छावा संघटनेच्या वतीने पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प करून येरवडा येथील आक्सा मशिदीजवळ वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, रघुनाथ कुचिक, राहुल डंबाळे, डॅनियल लांडगे, शैलेंद्र भोसले उपस्थित होते. आलोक भिंगारदिवे, मनीष लाडे यांनी संयोजन केले.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने भगवान वैराट यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काशिनाथ गायकवाड, प्रदीप पवार, संतोष बोताळजे, युवराज महामुनी आदी उपस्थित होते. दलित पँथर संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल खिलारे यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे, ऋणा पाटोळे, लहू गायकवाड, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. जय महाराष्ट्र मंडळाच्या वतीने नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्या हस्ते अण्णा भाऊंना अभिवादन करण्यात आले. चेतन जाधव, किरण थोरवे, विनायक फाळके आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने कैलास हेंद्रे यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुरेखा हेंद्रे, बाळासाहेब भोसले, नामदेव सोनावणे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी साठे यांना अभिवादन केले. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महासचिव वसंत साळवे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नागेश भोसले, किरण कदम, दीपक ओहोळ, बाळासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन मातंग सेना, रिपब्लिकन जनशक्ती, साई सेवा अन्नछात्र संस्था, रिपब्लिकन संघर्ष दल, विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान, भीमशक्ती अशा विविध संस्थांच्या वतीनेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याचे मणी म्हणून दिले वाळूचे खडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एका ज्येष्ठ महिलेला सोन्याच्या मण्याचे आमिष चांगलेच महागात पडले आहे. बस स्थानकावर उभ्या असलेल्या दोन महिलांनी ज्येष्ठ महिलेला सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सर्व दागिने घेतले. परंतु, सोन्याच्या मण्यांऐवजी वाळूच्या खड्याचे गाठोडे देऊन ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ महिलेला लक्षात आले.
पुणे महापालिकेसमोरील लोहगावकडे पीएमपी बस जाणाऱ्या स्थानकावर हा प्रकार घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सीता आनंदा माकर (वय ६६, रा. सुतारवाडी रोड, पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माकर या नातेवाइकांकडे जाण्यासाठी मनपा येथील बस स्थानकावर उभ्या होत्या. त्या वेळी दोन महिला त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी माकर यांना त्यांच्याजवळील सोन्याचे मणी दाखविले. त्यांच्याजवळील सोन्याच्या बदल्यात सर्व सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखविले. माकर यांनी त्यांच्या अंगावरील २५ ग्रॅमचे दागिने दोन महिलांना काढून दिले.
आरोपी महिलांनी त्यांना सोन्याचे मणी असलेले गाठोडे दिले. जास्त सोने असल्यामुळे या ठिकाणी उघडू नका असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी सोन्याचे मण्याचे गाठोडे घरी जाऊन उघडले. त्यावेळी त्या गाठोड्यात सोन्याच्या मण्यांऐवजी वाळूचे खडे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तक्रारदार महिलेने शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून दोन महिलांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकमान्य टिळकांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था संघटनांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शहराच्या विविध भागात मंगळवारी दिवसभर कार्यक्रम घेण्यात आले.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केसरीवाडा आणि मंडई येथील टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टिळकांना अभिवादन करण्यात आले. हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे शहर उपाध्यक्ष अशोक राठी यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शिवाजी गायकवाड, संजय दमोदरे, मोहन कांबळे, मिनाक्षी शिंदे यांची भाषणे झाली. शंकर शिंदे, मोहन सोनवणे, संजय गायकवाड, विक्रम मोरे, मनोज पाचपुदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, मुकारी अलगुडे, म. वि. अकोलकर आदी उपस्थित होते.

एस. पी. कॉलेजमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. दिलीप शेठ आणि वादसभा प्रमुख प्रा. दीपक कर्वे या वेळी उपस्थित होते.

डॉ. मोरे यांच्या हस्ते या वेळी रेणुका केणेकर, विपुल धनगर, नम्रता जहागीरदार आणि स्नेहल पोरेडी यांना ‘सत् शील विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच वादसभेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. नम्रता जहागीरदार हिने वादसभेचे सूत्रसंचालन केले, रेणुका केणेकर हिने पाहुण्यांच परिचय करून दिला, पूर्वा अंबर्डेकर हिने अहवाल वाचन केले. प्रा. विद्या गारखेडकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्तृत्व नसताना खूप मिळाले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘काँग्रेस पक्षाची परंपरा, काँग्रेसचा विचार, लढा आज कोण सांगतो? काँग्रेसचा इतिहास लिहू शकणारे दोनच नेते आहेत, ते म्हणजे प्रणवदा आणि उल्हासदादा,’ असे गौरवोद्वगार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी काढले. ‘संजय गांधी उल्हासदादांना मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत होते. आमचे कर्तृत्व नसताना आम्हाला खूप मिळाले; पण कर्तृत्व असताना दादांना काही मिळाले नाही,’ ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश भट गझलमंच व उल्हासदादा पवार मित्र परिवार यांच्यातर्फे उल्हासदादा यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, शशिकांत पागे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शंकरदत्त महाशब्दे, कमल व्यवहारे, नरेंद्र व्यवहारे, सुरेशकुमार वैराळकर उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची संस्कृती आणि जळजळीत इतिहास सांगणारा उल्हासदादा हा शेवटचा दुवा आहे. नियती त्यांच्या गळ्यात हार घालेल, कारण ८० वर्षांनंतरही अनेक नेत्यांना मोठी पदे मिळाली आहेत,’ असे भाकीत शिंदे यांनी वर्तवले. ‘उल्हासदादा काँग्रेसचे एनसायक्लोपीडिया आहेत. तत्त्वज्ञान समजणारे आणि सांगणारे ते कार्यकर्ते आहेत. उल्हासदादांना ७३ वर्षे पूर्ण झाली, असे वाटत नाही. डोक्यावरचा रंग सोडला तर ते ‘अभी मै जवान हूँ,’ असे आहेत. मीच एकटा हसतो, असे नाही तर सातमजली हसणारा हा मित्र आहे. माझ्यापेक्षा लहान असून त्यांचा राजकीय प्रवास आधी सुरू झाला,’ अशा शब्दांत शिंदे यांनी उल्हासदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले.

‘पद येणे व जाणे सुख दु:खाचा भाग आहे. मन चेहऱ्यावर उमटत असते. कर्मयोगात राहणे हे मला कळते. दुसऱ्याला आनंद दिला की माणूस प्रसन्न राहतो,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात वैराळकर यांच्यासह कौस्तुभ आठल्ये, मनीषा नाईक, अनिल आठलेकर, वैभव कुलकर्णी, स्वाती शुक्ल, स्वप्नील शेवडे, पूजा फाटे, सुशांत खुरसाळे यांचा गझल मुशायरा रंगला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदित लेखकांसाठी ‘रंगभान’ उपक्रम

$
0
0

फेब्रुवारी २०१८ पर्यंत मान्यवर करणार मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठीमध्ये केवळ नव्या नाट्यसंहिताच नव्हे, तर नव्या काळाचे भान असलेले नाट्यलेखक तयार व्हावेत, यासाठी निखिल राणे फाउंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे ‘रंगभान २०१७’ या नाट्यलेखन कार्यशाळांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नवोदित लेखकांना फेब्रुवारी २०१८ पर्यंत विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली लेखनाचे धडे गिरवता येणार आहेत.

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते या नुकताच उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. निखिल राणे फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त अश्विनी राणे, साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी, लेखक दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि चित्रकार सुनील भोंडगे आदी या वेळी उपस्थित होते.

मराठीतील नवलेखकांसाठी सुरू करण्यात आलेला, हा दीर्घकालीन व्यापक उपक्रम ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या सात महिन्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील आणि भारतभरातील नाट्यलेखन करणाऱ्या, नव्या लेखकांना आवाहन करण्यात येत आहे. कार्यशाळेच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या लेखकांना त्यांचे पूर्वीचे लेखन आणि प्रत्यक्ष मुलाखती या द्वारे निवडण्यात येणार आहे. त्यासाठी आशुतोष पोतदार, रेखा इनामदार, सागर देशमुख, चंद्रकांत कुलकर्णी, सुनील सुकथनकर यांची निवड समिती लेखकांची निवड करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये २५ नवोदित लेखकांची कार्यशाळेसाठी निवड करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या लेखकांसाठी नाट्यलेखनाच्या विविध अंगांची माहिती देणारी संवादमाला आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये या उपक्रमामध्ये तीन वाचनसत्रे होणार असून दिग्दर्शक मोहित टाकळकर, नील चौधरी आणि संदेश कुलकर्णी तसेच लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर, डॉ. समीर कुलकर्णी, रामू रामनाथन ही सत्र घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परदेशी कंपन्यांचे आक्रमण

$
0
0

आचार्य बालकृष्ण यांची टीका; ‘टिळक सन्मान पारितोषिक’ प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘हजारो परदेशी कंपन्या भारतावर आक्रमण करून आपल्याला गुलाम करत आहेत. महिलांना साबण विकायला लावून आपली परंपरा, संस्कृती, मूल्ये उद्ध्वस्त करत आहेत. पूर्वी एकच ईस्ट इंडिया कंपनी होती. आता हजारो कंपन्या लुबाडत असून हे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वदेशी हाच राष्ट्रवाद आहे,’ अशा शब्दांत पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी मंगळवारी स्वदेशीचा नारा दिला.

लोकमान्य टिळक यांच्या ९७व्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्टतर्फे आचार्य बालकृष्ण यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते ‘टिळक सन्मान पारितोषिक’ प्रदान करण्यात आले. डॉ. गीताली टिळक-मोने , डॉ. प्रणति टिळक उपस्थित होते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. बालकृष्ण यांनी रकमेत भर घालून ती रक्कम पुन्हा ट्रस्टकडे दिली.

‘साबण, टूथपेस्ट या परदेशी वस्तू वापरायच्या नाही, असा विचार लहानपणी मनात आला. नंतर याच विचारासाठी झटू लागलो. सरकार प्रकल्पांना मान्यता देत नाही. परवाने घेताना अडचणी आल्या. तरीही आम्ही सरकारला टक्कर दिली. पतंजली समाजाचे , देशाचे आहे. लोकांना स्वदेशी नको असेल, तर ते बंद पडेल,’ अशी टिप्पणी बालकृष्ण यांनी केली.

‘क्रांतिकारकांनी देशापुढे आपल्या जीवनाचा विचार केला नाही. लोकमान्यांनी आयुष्य समर्पित केलेच; पण अनेक तरुणांना त्यासाठी स्फूर्ती दिली. काँग्रेसचा इतिहास पाहिला की हे लक्षात येते की, अनेक लोकांनी आयुष्य समर्पित केल्याने आपण मोकळा श्वास घेत आहोत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘योगाच्या टीकाकारांची योग करण्यासाठी आता गर्दी उसळते,’ असा टोला त्यांनी लगावला. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश बडवे यांनी लोकमान्य स्तवन सादर केले.

‘स्वदेशीची शपथ घ्यावी’

महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला; पण त्या विचाराचे मूळ लोकमान्यांच्या विचारात होते. स्वदेशीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हा मूलमंत्र लोकमान्यांनी दिली. स्वदेशी वापरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. स्वदेशी वापरणे हीच क्रांतिकारकांना श्रद्धांजली ठरेल. स्वदेशी म्हणजे चांगला दर्जा आणि स्वस्त वस्तू असे समीकरण आहे. याउलट अनेक कंपन्या लोकांना भीती दाखवून रसायनाकडे ढकलत आहेत. परदेशी वस्तू वापरणार नाही, असे लोकांनी ठरवले तर जागतिक षड्यंत्रापासून आपण वाचू आणि परदेशी कंपन्या देशातून पळून जातील, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोक्याची २६ ठिकाणे

$
0
0

अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील २६ ठिकाणे ही अत्यंत धोकादायक असून, त्या ठिकाणी किमान तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावाही करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे शहरात दररोज अपघातामध्ये किमान एक तरी जीव जातो. अपघाती मृत्यूंच्या आकड्याने ४००चा टप्पा ओलांडला असून, त्यामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी सर्वाधिक मृत्युमुखी पडत आहेत. शहरातील २६ ठिकाणे ही अत्यंत धोकादायक असून, त्यातील प्रत्येक ठिकाणी किमान तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची आकडेवारी उघड झाली आहे.
वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक मृत्यू झालेल्या अपघाताच्या ठिकाणांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये तीनपेक्षा अधिक मृत्यू झालेल्या अपघाताची ठिकाणे समोर आली आहेत. या ठिकाणी भविष्यात अपघात होऊ नये, येथील पायाभूत सुविधांमध्ये कुठल्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
अपघाताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेली ही ठिकाणे शक्यतो शहराच्या बाहेरच्या बाजूने जाणारे महामार्ग आहेत. त्यामध्ये कात्रज-देहूरोड बायपास हा अत्यंत धोकादायक बनला आहे. वडगाव पुलावर, वडगाव पुलाखाली आणि वडगाव बसस्टॉपसमोर या २०० फुटाच्या अंतरामधील तिन्ही ठिकाणे अत्यंत धोकादायक आहेत. या तिन्ही ठिकाणी अनेकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जुना कात्रज बोगदा, कात्रज बोगदा, बायपास क्रमांक १, नवीन कात्रज बोगदा या तिन्ही ठिकाणी गंभीर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.

या महामार्गांवर वाहनांचा वेग अधिक आहे. रस्त्यावरील रहदारी वाढली आहेत. त्यामध्ये जडवाहनांना आपले नियंत्रण राखता आले नाही तर गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक गडद असते, असे यापूर्वी झालेल्या अपघातांच्या अभ्यासातून दिसत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. वाहन चालकांनी, विशेष करून दुचाकीस्वारांनी या डोक्यावर हेल्मेटचा वापर करावा. या महामार्गावरून प्रवेश करत असाल तर सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट घातलेच पाहिजे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंटच्या सभेत पत्रकारांना मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांना प्रवेश असताना पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सभेला मात्र, पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. या सभेला उपस्थित राहता येणार नाही,’ असा अजब पवित्रा बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी यांनी घेतला आहे. ‘मला नकारात्मक प्रसिद्धी आवडत नाही. मी या (कँटोन्मेंट बोर्ड) कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यामुळे मी माझ्या अधिकारात हा निर्णय घेतला आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
वाहन प्रवेश शुल्क आकारणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी बोर्डाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत बोर्डाच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेला पत्रकार उपस्थित राहात होते. या वेळी पत्रकारांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. कर्मचारी, अधिकाऱ्यांना फोन बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. सदस्यांना मोबाइल सायलेंट करण्याचे आदेश देण्यात आले. बोर्डाच्या यापूर्वीच्या सभेलाही पत्रकार उपस्थित होते. त्या वेळी झालेल्या शाब्दिक चकमकीचे वर्णन पत्रकारांनी केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
सभेनंतर पत्रकारांनी सेठी यांच्याकडे याबाबत विचारणा केली. ‘माझ्या अधिकारात मी पत्रकारांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मला योग्य वाटेपर्यंत मी बोर्डाच्या सभेत पत्रकारांना प्रवेश देणार नाही,’ असे सेठी म्हणाले.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विमा महागला

$
0
0

न्यू इंडिया इन्शुरन्सच्या नव्या पॉलिसीमुळे ग्राहकांना जादा रकमेचा भुर्दंड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने २०१२ मध्ये सुरू केलेली मेडिक्लेम पॉलिसी बंद करून नवी पॉलिसी सुरू केली आहे. या नव्या पॉलिसीमुळे पूर्वी येणाऱ्या हफ्त्याच्या रकमेत कंपनीने भरमसाठ वाढ केल्याने विमाधारकांना भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे विमाधारकांसह एजंटांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने सध्या प्रचलित असलेली ‘मेडिक्लेम २०१२’ ही योजना १ ऑगस्टपासून बंद केली आहे. १ ऑगस्टपासूनच २०१७ ही नवी योजना लागू केली आहे. या योजनेमध्ये जुन्या विमाधारकांनी सहभागी व्हावे लागणार असल्याचे पत्र पाठविण्यात येत आहे. या पत्रामध्ये नवीन योजनेची माहिती दिली आहे. परंतु, नव्या योजनेत हप्ता वाढणार असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. एक ऑगस्टनंतर नूतनीकरण करायच्या पॉलिसीमध्ये सुधारित हप्त्याची रक्कम ऐकून विमाधारकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रीमियमची दरवाढ करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीने ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ची (इर्डा) मान्यता घेतली आहे.
‘न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने नव्याने सुरू केलेली मेडिक्लेम योजना ही पूर्वीसारखीच आहे. २०१२ ची योजना बंद करून त्याऐवजी ‘मेडिक्लेम २०१७’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कंपनीने प्रीमियमच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात रकमेत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे पूर्वी २० ते २२ हजार रुपयांपर्यंतचा येणारा हप्ता आता ५० ते ५४ हजार रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे. जुन्या विमाधारकांना नवी योजना बंधनकारक केली असल्याने नूतनीकरण करताना या अडचणी येण्याची शक्यता आहे. नव्या योजनेचा प्रीमियम ग्राहकांना परवडायला हवा,’ अशी अपेक्षा विमा एजंट बिपीन देशमुख यांनी व्यक्त केली.
मोतिबिंदू, मॅटर्निटीसाठी वेगळे पैसे
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक दिलीप लिमये यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘२०१२ ची पॉलिसी बंद करून या वर्षीची ऑगस्टपासूनची नवी पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. त्याला ‘इर्डा’ची मान्यता आहे. नवी योजना १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. विमाधारकांच्या स्लॅबनुसार हप्त्याची रक्कम वाढत गेली आहे. ५० वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींना जास्त हप्ता आहे. नव्या पॉलिसीमध्ये मॅटर्निटी, तसेच मोतिबिंदूच्या ऑपरेशनसाठी वेगळे फिचर घेतले असून त्यासाठी ग्राहकांना वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यप्रमुख १५ दिवसांत

$
0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेले आरोग्यप्रमुखांचे पद येत्या १५ दिवसांत भरण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. तसेच, पालिकेच्या सोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कामकाज, खरेदीमध्ये झालेले गैरव्यवहार आणि आरोग्यप्रमुखांसह इतर रिक्त पदांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. महापालिकेतील आरोग्यप्रमुख पद गेल्या सात वर्षांपासून रिक्त होते, याकडेही काळे यांनी लक्ष वेधले. सोनोग्राफी खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. काळे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य प्रमुखांचे रिक्त पद पुढील १५ दिवसांत भरण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. सोनोग्राफी मशिन खरेदीची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
काळे यांच्या ‘लक्षवेधी’वरील चर्चेदरम्यान कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनीही महापालिकेच्या आरोग्य खात्यातील दुरवस्था सभागृहासमोर मांडली. महापालिकेच्या अनेक हॉस्पिटलमध्ये महागडी उपकरणे घेऊनही ती बंद अवस्थेत आहेत; तसेच, आरोग्य खात्यातील अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर त्याचा परिणाम होत असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरही खुलासा करताना, आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना पालिकेला करण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
...............
आरोग्य विभागात
२५ टक्के पदे रिक्त

महापालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार आरोग्य विभागाअंतर्गत दोन हजार ५२ पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी, सद्यस्थितीत ५१४ पदे रिक्त असल्याची कबुली सरकारनेच लेखी उत्तरामध्ये दिली आहे. म्हणजेच, एकूण मंजूर पदांपैकी तब्बल २५ टक्के जागा रिक्त असून, त्याचा मोठा ताण कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्गावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
...
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या
शाळांना मदतीचे आश्वासन
स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडक १०० शाळांना विशेष आर्थिक मदत देण्याचा काँग्रेस आघाडी सरकारचा निर्णय विद्यमान सरकारने रद्द केला असला, तरी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शाळांना ही मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलची ही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शाळांना मदत दिली जाईल,’ असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. विखे पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक १०० शाळांना ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु, आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल, अशी सबब सांगून राज्य सरकारने पाच जुलैला या शाळांना निधी देण्याचा निर्णय रद्द केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images