Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ध्रुपदसाठी वेचले आयुष्य

$
0
0

ज्येष्ठ गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ध्रुपद गायकीसाठी ख्यातनाम असलेल्या डागर घराण्यातील ज्येष्ठ गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय ७८) यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयपूर येथील बाबा बेहराम खाँ निवासस्थानाजवळ त्यांचे पार्थिव दफन करण्यात येणार आहे. डागर घराण्यातील १९व्या पिढीतील ते गायक होते. त्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, पुत्र नफिसुद्दीन व अनिसुद्दीन, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. डागर यांनी ध्रुपद गायकीसाठी आयुष्य वेचले.

डागर हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. जयपूर येथील बाबा बेहराम खाँ यांच्या नावाने डागर घराणे ओळखले जाते. पुण्यात आणि महाराष्ट्रात ध्रुपद गायकीची ओळख करून देण्यात डागर यांचा मोलाचा वाटा होता. देश-परदेशातही त्यांचे शिष्य आहेत. ध्रुपद गायकीमध्ये महत्त्वाचे योगदान देऊनही त्यांच्या कार्याची दखल सरकारी पातळीवर म्हणावी तशी घेतली गेली नाही.

डागर यांचा जन्म राजस्थान येथील एका गावात १९३९मध्ये झाला. त्यांचा तारुण्यपणाचा काळ कोलकाता येथे गेला. पुण्यातील संगीताचे वातावरण, येथील संस्कृती भावल्याने १९८५मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले. संपूर्ण महाराष्ट्रात हातात तंबोरा घेऊन एस. टी. मधून फिरत त्यांनी ध्रुपदगायकीचा प्रसार केला.

‘ध्रुपद हे संगीताचे पालक आहेत. आई-बापाला कसे विसरता? शास्त्रीय संगीताचा उगम ध्रुपदमधून असताना फरक केला जातो. मी भीमसेनजींच्या शहरात राहतो, याचेच समाधान आहे. पुण्याने प्रेम दिले; पण माझ्या जगण्याचे काय? राजस्थानमधील विद्यापीठात मी शिकवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मला जीवनसाधना गौरवाने सन्मानित केले, असे असले तरी बाहेर एवढे कार्यक्रम होतात, तिथे ध्रुपदला का स्थान नाही? मी सैद्धान्तिक गातो. मी संगीताशी कधीही तडजोड केली नाही. म्हणून मी पात्रतेचा नाही का? ज्या पुण्याला मी आपले मानले, त्याने मला दूर ठेवले. रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवता आले पाहिजे. माझे दुर्दैव हे की, मी ते करू शकलो नाही,’ अशी भावना ते व्यक्त करत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुले-शिष्य यांच्यात भेद नव्हता

$
0
0

उस्ताद अनिसुद्दीन डागर यांची भावना

पुणे : ‘वडील म्हणून ते प्रेमळ होतेच; पण गुरुजी म्हणूनही ते प्रेमळ, मृदू स्वभावाचे होते. त्यांनी मुले आणि शिष्य परिवार यांच्यात कधी भेद केला नाही. प्रसंगी ते कठोर व्हायचे; पण ते तेवढ्यापुरतेच. खूपच लोभस व्यक्तिमत्त्व होते त्यांचे...’ उस्ताद अनिसुद्दीन डागर आपल्या वडिलांविषयी बोलताना भावुक झाले होते. ‘वडील जिवंत असताना सरकारने त्यांची दखल घेतली नाही. सरकारी कोट्यातील सदनिकेचा ताबा मिळाला नाही. आता काही मिळाले नाही, तरी फरक पडत नाही, कारण घरातील चैतन्यच हरपले आहे,’ अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली.

उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे पुत्र उस्ताद अनिसुद्दीन डागर यांनी सोमवारी ‘मटा’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. ध्रुपदगायकीची परंपरा १९व्या पिढीत समर्थपणे वाहणारे ज्येष्ठ ध्रुपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना सरकारच्या योजनेनुसार मिळालेल्या सदनिकेचा ताबा २७ वर्षांनंतरही मिळाला नसल्याने भाड्याच्या घरातच त्यांची संगीत सेवा सुरू होती. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी उस्तादजींना सदनिका उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. कागदपत्रेही तयार झाली, तरी मंत्रालयातील सरकारी बाबूंच्या मागण्या संपल्या नाहीत. व्यथित झालेल्या उस्तादजींनी अखेर कंटाळून जमविलेली कागदपत्रे फाडून टाकली. संगीतासाठी आयुष्य समर्पण केलेल्या या साधकाला त्या बाबी पूर्ण करता येणे शक्यच नव्हते. मध्यंतरी त्यांनी याबाबतीत पुन्हा सरकारशी पत्रव्यवहार केला असता, कोण हे डागर? असा धक्कादायक प्रश्न विचारण्यात आला होता.

‘वडिलांचा या वयातही रिजाय, विद्यादान सुरू होते. विद्यादानासाठी ते पॅरिसला गेले होते. तिथे त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे. महिन्याभरापूर्वी फोन आला की गुरुजींवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे; पण त्यांची तब्येत ठीक आहे. त्यानंतर ते पॅरिसहून एकटेच आले. त्यांना मूत्रविकाराचा त्रास होत होता. पुण्यात आल्यानंतर उपचार सुरू होते. शिष्यांनी त्यांची जी सेवा केली त्याच्याशी कशाचीही तुलना होऊ शकणार नाही,’ असे सांगताना अनिसुद्दीन डागर यांना हुंदका अनावर झाला होता.
...
फार दुर्मिळ होत चाललेली धमार गायन पद्धती डागर यांनी जोपासली. या गायन परंपरेतील ते एक उच्चस्तरीय कलाकार होते. त्यांनी डागर घराण्याचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला. पुण्यात राहून विद्यादानाचे काम केले. त्यांना रागांबद्दल आणि ध्रुपद गायकीचे सखोल ज्ञान होते. ध्रुपद गायकांची संख्या कमी असताना त्यांच्या सारख्याचे जाणे ही संगीत क्षेत्राची हानी आहे.
- पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक
...
ख्याल गायकीची घराणी असतात, तसेच ध्रुपद गायकीचे घराणे असते. ध्रुपद व धमार गायकी ही स्वरप्रधान गायकी म्हणून ओळखली जाते. डागर घराण्याने स्वरप्रधान गायकी जपली आहे. शब्द असे उच्चराचे की स्वराच्या आत्म्याला ठेच पोहचू नये, याची काळजी ते घेत. डागर यांनी गायकीतील सौंदर्यमूल्य पाळले. स्वरांशी कधी तडजोड केली नाही. भला माणूस होता तो. त्यांनी खऱ्या अर्थाने विद्यादान केले. अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवले. माझा जवळचा मित्र गेला आहे.
- पं. सत्यशील देशपांडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक
...
ध्रुपध परिवारातील ज्येष्ठ गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे व्यक्तिमत्त्व कायम आनंदी आणि प्रसन्न होते. मला त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमी मिळाले. त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे.
- पं. उदय भवाळकर, ध्रुपद गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमेवरील सैनिकांसाठी २५ हजार राख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सीमेवरील या हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी पंचवीस हजारहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकर घेतला आहे.

भारत माता की जय... असा जयघोष करून विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या राख्यांचे कसबा गणपती मंदिरामध्ये पूजन करण्यात आले.

सैनिक मित्र परिवारातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी आणि पारंपरिक वेषात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, गंधाली पोटफोडे, माला रणधीर, विनया देसाई, स्वाती ओतारी, आनंद सराफ, राजू पाटसकर आदी उपस्थित होते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी रेखाटलेली चित्र, पत्र व राख्या या वेळी पाठविण्यात आल्या.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘सैनिक हो तुमच्यासाठी... हे गाणे ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. सैनिक देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम व संवेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात असायला हवी. देशवासीयांनी त्यांच्याबरोबर साजऱ्या केलेल्या अशा सणांमधून सैनिकांना बळ मिळणार आहे.’ सराफ म्हणाले, ‘सैनिकांप्रती सामाजिक कृतज्ञता व्यक्त करून देण्यासाठी आणि त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी १९९८पासून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. देशाच्या कच्छ, सियाचीन, आसाम, बंगाल आदी १५० सीमा भागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करून सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात.

ग्राहक पेठेचे सहकार्य

राखी संकलन आणि टपाल खर्चाकरीता ग्राहक पेठेचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. ज्यांना या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी ग्राहक पेठ टिळक रोड येथे ३ ऑगस्टपर्यंत राख्या पाठवाव्यात.’ अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२२८६१३०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रहणाच्या वेधात रक्षाबंधन करावे: दाते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच तारखेला आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या सोमवारी ७ ऑगस्टला चंद्रग्रहण असल्याने नागरिकांनी वेधकाळात म्हणजेच रात्री दहा पर्यंत रक्षाबंधन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

या वर्षी सोमवारी, ७ ऑगस्टला चंद्रग्रहण आहे. रात्री १०.५२ ते १२.४९ पर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दुपारी एक वाजण्यापूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल, अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. सोमवारचा उपवास असल्यास दुपारी एक वाजण्यापूर्वीच फलाहार करावा आणि ‘वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडीत आहे’, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल. कारण वेधात जलपान निषेध नाही मात्र भोजन निषेध आहे. वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री दहा पर्यंत राखी बांधता येईल. यापूर्वी ६ ऑगस्ट १९९० या दिवशी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ ऑगस्ट २००८ शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते, असे दाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या लेखाधिकाऱ्याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
किशोर बाबूराव शिंगे (रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) असे लाच स्वीकारताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका ठेकेदाराच्या भाच्याने ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंगे हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लेखाधिकारी आहेत. त्यांच्याकडे पाइपलाइनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम आहे. या केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठीची फाइल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी लेखाधिकारी शिंगे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयाची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या वेळी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंगे यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ्यांच्या पुनर्वसनासाठी कोर्टात जाण्याचा इशारा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात पुनर्वसन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यांचे त्वरीत वाटप करा अन्यथा, आम्हांला कोर्टात दाद मागावी लागेल,’ असा इशारा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने दिला आहे.
निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने १९९२ मध्ये प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. परंतु, गेल्या २४ वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. गाळ्यांचे वाटप झालेले नाही, या मुद्याकडे संघटनेने वारंवार लक्ष वेधले आहे. आता तरी प्रश्न मार्गी लावून गाळ्यांचे वाटप व्हावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर अभियंता अंबादास चव्हाण, आरोग्य निरीक्षक विजय खोराटे, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, जयंत कड, प्रमोद राणे या वेळी उपस्थित होते.
औद्योगिक परिसरातील विविध समस्यांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. भोसरी येथील समस्यांनी लघुउद्योजक हैराण झाले आहेत. यावर उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. भोसरी औद्योगिक वसाहतीतील पुनर्वसन प्रकल्पात गाळा विकत घेण्यासाठी असलेले वाढीव दर लघुउद्योजकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे तेथे गाळे बांधून त्याचे लघुउद्योजकांना भाडेतत्वावर वितरण करावे. तळवडे, कुदळवाडी, चिखली आदी परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाण्याची गटारे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. त्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावावेत. एफ-ब्लॉक येथे अग्निशामक केंद्र उभारावे, एमआयडीसी परिसरात पीएमपीएमएल बसची सुविधा द्यावी या मागण्या लघुउद्योग संघटनेच्या शिष्यमंडळाने केल्या.
महापौर काळजे आणि आयुक्त हर्डीकर यांनी लघुउद्योजकांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुनर्वसन प्रकल्पातील गाळ्यांचे काम त्वरीत पूर्ण करावे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भरच पडेल, असा काळजे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायलंडच्या पाच तरुणींची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपळे सौदागर येथील येथे मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून थायलंडच्या पाच मुलींची सुटका करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अमोल खंडू जाधव (वय ३१, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर), दिलू गुआनबे जिबाहो (वय २१, रा. नागालँड) यांना अटक करण्यात आली आहे. पिंपळे सौदागर येथील फॉर्च्युना बिल्डिंगमध्ये चिवा स्पा सेंटर येथे मसाजच्या नावाखाली थायलंड येथील मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या माहितीची खातरजमा करूनव त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी थायलंडच्या पाच मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले. त्यांची सुटका करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. थायलंडच्या मुलींना स्पा सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी नोकरीवर ठेवले होते. त्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉटरी खेळण्यासाठी सायकल चोरणारा अटकेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील महागड्या सायकली चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. त्याने लॉटरी खेळण्यासाठी १८ दिवसांमध्ये शहरातून तब्बल २४ महागड्या सायकली चोरल्याचे समोर आले आहे. या सायकली त्याने गुरुवार पेठेतील कामगारांना कमी किमतीमध्ये विकल्याचे समोर आले आहे. त्या सर्व सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ग्यानु उर्फ बापू भगवान शिंदे (वय ३१, रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात घरफोड्या, वाहनचोरी, सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोसायटी समोरून व क्लासेस समोरून सायकली चोरीला जात असल्याचे आढळून आल्यानंतर आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलिसांना वरिष्ठांनी दिल्या होत्या. अलंकार पोलिसांना सायकल चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या वेळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील ग्यानु उर्फ बापू याच्याबाबत माहिती मिळाली होती. अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, सहायक निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला. त्या वेळी तो मुंबई येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने अलंकार, कोथरूड व सिंहगड रोड परिसरातून सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्याने या परिसरातून तब्बल तीन लाख रुपयांच्या महागड्या २४ सायकली चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी या सायकली जप्त केल्या आहेत.
शिंदे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. तो डेक्कन परिसरात स्वीटकॉर्नची गाडी लावत होता. त्याला ऑनलाइन लॉटरी खेळण्याचा नाद आहे. सायकल चोरी करायची आणि ती कमी किमतीमध्ये विकत पैसे आले की लगेच जाऊन लॉटरी खेळत असे. ते पैसे संपले, की पुन्हा सायकल चोरी करायचा. जुन्या सोसायटी परिसर, क्लासच्या समोरून त्याने सायकली चोरल्या आहेत. महागड्या सायकल तो हजार रुपयांना विकत होता. त्याच्यावर यापूर्वी स्वारगेट, सांगवी पोलिस ठाण्यात सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांचा वेग कमी

$
0
0

पर्यावरण सद्यस्थिती अहवालातील माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा विस्तार अत्यंत गतीने होत असल्याने वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, वेगवान प्रवासासाठी वाहनांचा सरासरी वेग ३० किलोमीटर प्रति तास अपेक्षित असताना पुणे शहरात मात्र केवळ १८ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावत अल्याचे समोर आले आहे. वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी शहरातील रस्ते कमी पडत असल्याने वाहने कासवगतीने धावत असल्याचे पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालामधून समोर आले आहे.
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरापाठोपाठ अत्यंत वेगाने वाढणारे शहर अशी ओळख पुणे शहरची आहे. गेल्या काही वर्षांत चारही दिशांना शहराचा विस्तार अत्यंत वेगाने झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा समावून घेण्यासाठी आवश्यक असलेले रस्ते कमी पडत असल्याने जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे लागत असलेल्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा असे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण आणि रस्त्यांची क्षमता यांचे गुणोत्तर ०.८ इतके अपेक्षित आहे. मात्र, खासगी वाहनांच्या भरमसाठ संख्येमुळे पुणे शहरात हे गुणोत्तर १.४ इतके झाले आहे. परिणामी वाहतुकीची गती कमी झाली असल्याचे पालिकेने तयार केलेल्या पर्यावरणाच्या अहवालामधून समोर आले आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. एक लाख लोकसंख्येमागे एकूण बसची संख्या ५५ इतकी असणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यःस्थितीत एक लाख लोकसंख्येमागे २८ बसेस रस्त्यावर धावतात. सार्वजनिक वाहतुकीच्या फेऱ्या ४० टक्के अपेक्षित असताना त्या केवळ २६.८७ टक्के इतक्या होतात. रिक्षासारख्या लहान वाहनांची संख्या एक हजार इतकी अपेक्षित असताना शहरात तब्बल एक हजार ८९० रिक्षा रस्त्यावर धावत असल्याने वाहतुकीचा वेग घटला असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषेतील बांधकामांवर हातोडा

$
0
0

पालिकेकडून कारवाई सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान असलेल्या डीपी रोडवरील नदीपात्रातील पूररेषेत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्याचप्रमाणे पूररेषेत राडारोडा टाकून करण्यात आलेला भरावही काढण्यात येत आहे. या भागातील मंगल कार्यालयांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी उभारलेली पत्रा शेड देखील काढून टाकण्यात आली. हा राडारोडा उचलण्यासाठी झालेला खर्च संबधितांकडून वसूल केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
नदीपात्रातील पूररेषेत झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिका आणि जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. या आदेशानुसार नदीपात्रातील बेकायदा पत्राशेड, बांधकामे तसेच राडारोडा टाकून करण्यात आलेल्या भरावाची पाहणी पालिका प्रशासनाने केली. गेल्या दोन आठवड्यापासून याचा सर्वेक्षण सुरू होते. पालिका प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी केलेल्या सर्वेक्षणात नदीपात्रातील पूररेषेत ३० बांधकामे असल्याचे आढळून आले होते. याचा सविस्तर अहवाल पालिकेच्या बांधकाम विभागाने पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर ठेवला होता. त्यावर निर्णय देताना आयुक्त कुमार यांनी बेकायदा पद्धतीने करण्यात आलेली बांधकामे तसेच पत्राशेड, कच्चे व पक्के बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
‘आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करून प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्यात नदीच्या पूररेषेच्या पात्रात मंगल कार्यालये आणि लॉनसाठी जो राडारोडा टाकून जो भराव टाकण्यात आला होता, तो काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने तीन जेसीबी आणि सहा हायवा ट्रक अशी यंत्रणा कामाला लावली आहे. गेल्या तीन दिवसात जवळपास ४६ ट्रक राडारोडा या ठिकाणाहून काढण्यात आला आहे. प्रामुख्याने सिद्धी गार्डन, सृष्टी लॉन यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे,’ अशी माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश बनकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत’चा निधी नाही

$
0
0

अहोरात्र पाण्यासाठी पैसे देण्यास केंद्र सरकारचा नकार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील समान पाणीपुरवठ्याच्या (२४ बाय ७) दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून दोनशे कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळली आहे. पाणीपुरवठ्यापेक्षा शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या क्षमता वाढीसाठी २०१७-१८ मध्ये दोनशे कोटी रुपये मिळणार असून, त्यातही केंद्राकडून अवघे ६७ कोटी रुपये पालिकेच्या पदरी पडणार आहेत.
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्राकडून भरीव सहकार्य मिळण्याची अपेक्षा केली जात होती. स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेतून पाचशे कोटी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अमृत योजनेच्या निकषांनुसार पाणीपुरवठ्याची मोठी समस्या किंवा अडचणी असलेल्या शहरांना आधी निधी मिळणार असल्याने सुरुवातीच्या दोन वर्षांत पुण्याची वर्णी त्यात लागली नव्हती. तिसऱ्या वर्षी अमृत योजनेतून शहराला पाण्यासाठी निधी मिळेल, हा दावाही फोल ठरला आहे. पाण्याऐवजी मैलापणी शुद्धीकरण केंद्राच्या क्षमता वाढीसाठी निधी देण्यात येणार असल्याचे केंद्राने मंजुरी दिलेल्या वार्षिक कृती आराखड्यात (सॅप) स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी येणाऱ्या २०० कोटी रुपयांच्या निधीवर पाणी सोडण्याची तयारी पालिकेला ठेवावी लागणार आहे.
शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या क्षमता वाढीच्या दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये, केंद्राचा वाटा ३३ टक्के असल्याने त्यापैकी ६७ कोटी रुपये सरकारकडून मिळणार आहेत. तर, राज्य सरकारकडून ३३ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. उर्वरित, शंभर कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त अमृतमधून पुणे शहराला जादा निधी मिळणार नसल्याचेही नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे, पाणीपुरवठा योजनेसाठी दोनशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन प्रवेश कर आजपासून लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार ही आकारणी बंद करण्यात आली होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाने याबाबत नव्याने आदेश दिले असून, त्यानुसार पुन्हा प्रवेश शुल्क आकारणी सुरू करण्यात येणार आहे.
बोर्डाच्या सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या सभेला बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव आदी उपस्थित होते.
जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटीबरोबरच वाहन प्रवेश शुल्कही रद्द झाल्याने सर्वच कँटोन्मेंट बोर्डांपुढे उत्पन्नाची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे विकासकामांना खीळ बसणार असल्याने बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे धाव घेतली होती. त्यावर संरक्षण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. त्यामध्ये जीएसटी व वाहन प्रवेश कराचा काहीही संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने सर्व कँटोन्मेंट बोर्डांना वाहन प्रवेश कर पुन्हा लागू करण्याची परवानगी दिली. तसे आदेश नुकतेच बोर्डाला मिळाले होते. त्यानंतर या सभेने पुन्हा प्रवेश कर लागू करण्याचा निर्णय घेतला.
‘जीएसटीच्या तरतुदींचा अभ्यास करून संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाने हा सुधारित आदेश दिला आहे. वाहन प्रवेश शुल्क जीएसटीअंतर्गत येत नसल्याने शुल्क आकारणी पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, असे या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार मंगळवारपासून बोर्डाच्या हद्दीतील १३ नाक्यांवर प्रवेश शुल्क वसुली सुरू होईल,’ असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहेरभाई पुनावाला यांचे दुःखद निधन

$
0
0

म टा प्रतिनिधी, पुणे

ताहेरभाई पुनावाला यांचे आज ३१ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास वयाच्या पंचाण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले. सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ आणि माजी कोषाध्यक्ष असलेले ताहेरभाई विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे. म. फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ते होते. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
त्यांच्या पार्थिवाचे देहदान उद्या १ ऑगस्टला सकाळी दहा वाजता साने गुरुजी रुग्णालय, हडपसर, पुणे येथे होईल. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक नात आहे.

- सुभाष वारे, कार्यवाह, सामाजिक कृतज्ञता निधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिलायन्स कम्युनिकेशनबद्दल ग्राहकांची नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रिलायन्स ब्रॉडबँडच्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असून, त्या संदर्भात तक्रार करणाऱ्या ग्राहकांना कॉल सेंटरद्वारे प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीकडून देण्यात येणारी इंटरनेट सेवा संथगतीने सुरू असून, त्याबद्दल तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीतर्फे इंटरनेटची सेवा पुरवण्यात येते. शहरातील अनेक ग्राहकांकडे ही सेवा आहे. काही ग्राहकांनी त्याच्या वर्षभराचे आगाऊ पैसे भरले आहेत तरी देखील इंटरनेटची सेवा अत्यंत संथगतीने सुरू आहे. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. या संदर्भात ग्राहकांनी अनेकदा कॉल सेंटरला फोन करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
रिलायन्सच्या ब्रॉडबँड संदर्भात ऑनलाइन तक्रारी करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु वेबसाइटवरच्या तक्रारींनाही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय कंपनीचे कल्याणीनगर येथे महाराष्ट्राचे विभागीय कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये संपर्क केला असता दोन्ही दूरध्वनी क्रमांक चुकीचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, रिलायन्स कम्युनिकेशनचे अस्तित्व पुण्यात केवळ ग्राहकांकडून बिल वसूल करण्यापुरते राहिले आहे का, असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.
‘माझ्या मुलीचे काही प्रोजेक्टस सुरू असून, घरातूनच त्यावर काम करावे लागते. त्यासाठी आम्ही दरमहा वेळेवर रिलायन्सचे बिल भरतो. गेल्या दोन महिन्यांपासून रिलायन्सची इंटरनेटची सेवा अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. जो प्लॅन आम्ही घेतला आहे. त्याप्रमाणे इंटरनेट मिळत नसून, अनेकदा बंदही पडते. याची तक्रार करण्यासाठी कॉल सेंटरला पन्नासहून अधिक फोन केले. त्यावर कोणताच प्रतिसाद दिला जात नाही,’ अशी माहिती एका ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला तोटा ५०० कोटींचा

$
0
0

समान पाणीपुरवठा योजनेबाबत डॉ. धेंडे यांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकण्याच्या वादग्रस्त निविदांमध्ये उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी उडी घेतली आहे. या निविदा २२ ते २६ टक्के जादा दराने भरण्यात आल्याने पुणे महापालिकेचे किमान ५०० कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याची तक्रार धेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार संजय काकडे यांनीही याच धर्तीवर मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली असताना धेंडे यांच्या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक हजार ७५० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. ठेकेदार कंपन्यांनी भरलेल्या निविदा या जादा दराने आल्या असून त्यांची रक्कम २१७१ कोटी रुपये आहे. या चारही निविदा जादा दराने मंजूर केल्यास ४२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर येणार आहे, अशी तक्रार धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या योजनेसाठी २०० कोटी रुपये कर्जरोख्यांद्वारे उभे केले आहेत. त्याशिवाय पुणेकरांवर १५ टक्के पाणी पट्टीची दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना ५०० कोटी रुपयांचा बसणारा भुर्दंड रोखला पाहिजे, अशी मागणी धेंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
या निविदाप्रक्रियेत महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) दर स्वीकारलेले नाहीत. ​‘एस्टिमेट’ तयार करताना पुणे महानगरपालिकेच्या विभागीय दरपत्रकाचा (डीएसआर) वापर करण्यात आला आहे. ‘एमजीपी’चे दर हे पुणे महानगरपालिकेपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी आहेत. भामा-आसखेडच्या निविदाही ‘एमजेपी’च्या दरांनुसार काढण्यात आल्या होत्या, त्यात देखभाल दुरुस्तीचा समावेश होता.
पाणी पुरवठा योजनेच्या काढण्यात आलेल्या निविदा या सरासरी २५ टक्के जादा दराने आल्या आहेत. त्यात ‘एमजेपी’च्या दरांचा विचार करता त्या १५ टक्के जादा दराने आहेत. अशा प्रकारे या निविदा सरासरी ४० टक्के जादा दराने भरण्यात आल्या आहेत. या निविदांचे ‘एस्टिमेट’ हे ‘जीएसटी’ लागू होण्याआधीचे आहे. ‘जीएसटी’मध्ये ‘स्टिल’चे (पाइप) दर कमी झाले आहेत. या कामात सर्वाधिक खर्च हा पाइपचा आहे. त्याचाही फायदा ठेकेदार कंपन्यांना होणार आहे. प्रशासनाने ऑप्टिकल फायबर केबलच्या २२५ कोटी रुपयांच्या निविदा या कामामध्ये समाविष्ट केल्या असून हे संशयास्पद आहे, असेही ते म्हणाले.
फेरनिविदेची मागणी
महापालिकेच्या दक्षता आणि पाणी पुरवठा विभागाचा अभिप्राय सकारात्मक नसतानाही प्रशासनाने ऑप्टिकल फायबर केबलच्या २२५ कोटी रुपयांच्या निविदा या कामामध्ये समाविष्ट केल्या असून हे संशयास्पद आहे. अशा प्रकारे या सर्व निविदा मंजूर केल्यास पुणेकरांच्या तिजोरीतील अतिरिक्त ५०० कोटी रुपये ठेकेदारांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे या कामांच्या फेरनिविदा काढव्यात आणि पुणेकरांना बसणाऱ्या भुर्दंडापासून वाचवावे, अशी मागणी उपमहापौर धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएमपी कर्मचाऱ्यांना आता ‘जॉब कार्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारावी आणि त्यांच्या कामावर पूर्णतः देखरेख ठेवता यावी, यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘जॉब कार्ड’ पद्धती राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सामान्य कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ विभाग प्रमुखापर्यंत सर्वांना हे कार्ड लागू केले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार जणांचे ‘जॉब कार्ड’ तयार करण्यात आले आहे. तसेच, सातत्याने ‘पीएमपी’च्या प्रत्येक विभागाचे अंतर्गत ऑडिट केले जाणार आहे.
सामान्य कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, डेपो मॅनेजर, विभाग प्रमुख यांना हे ‘जॉब कार्ड’ लागू केले जाणार आहे. त्यांच्या कामाचे परीक्षण केले जाणार आहे, अशी माहिती ‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली.
मुंढे यांनी ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारल्या दिवसापासून कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना नोटीस बजावण्यात आली असून, काहींना निलंबितही केले आहे. त्यामुळे पुन्हा शिस्त लावण्यासाठी आणि कामगिरी उंचावून ‘पीएमपी’ची उत्पादकता वाढविण्याचा या पर्यायाचा अवलंब करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पीएमपी आर्थिक तोट्यात आहे. चांगली सेवा दिल्यास आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केल्यास निश्चितच परिस्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे अंतर्गत ऑडिट करून, कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे समजून येईल. त्यामुळे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा परम‌िट २० वर्षांनी

$
0
0

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पहिल्यांदाच परवाने खुल्या पद्धतीने
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ हे धोरण स्वीकारल्यानंतर, वीस वर्षानंतर पहिल्यांदाच रिक्षा परवाना खुल्या पद्धतीने देण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने परिवहन विभागाकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी वेबसाइट करण्यात आली असून, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते वेबसाइटचे सोमवारी उद्‍घाटन झाले. सकाळच्या पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार ६०० जणांनी अर्ज सादर केले होते.
वेबसाइट उद‍्घाटनाच्या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिहवन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व विनोद सगरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पंतोजी, प्रणाली व्यवस्थापक मनोज बागमार, जगदीश कांदे, अमरसिंह गवारे आदी या वेळी उपस्थित होते.
‘खुल्या परवाना पद्धतीमध्ये होतकरू तरुणांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांना परवाना देण्यात यावा, अधिकाधिक महिलांनीही परवान्यासाठी अर्ज करावा,’ अशी अपेक्षा टिळक यांनी व्यक्त केली. ‘रिक्षा चालक व सामान्य नागरिक यांच्यामध्ये भाडे नाकारण्याच्या कारणावरून सातत्याने वाद होत असतात. यामध्ये दोन्ही बाजू समजून घेण्याची आवश्यकता असून, संवादाने आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे,’ असेही आवाहनही त्यांनी केले. ही वेबसाइट सुरू झाल्यानंतर अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणींचा सामनाही करावा लागल्याचे नागरिकांना सांगितले.
000

हेल्मेट न घातल्याने रिक्षाचालकाला दंड
पुणे : दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल ‘ई-चलन’ प्रणालीच्या माध्यमातून दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येते. मात्र, आता रिक्षा चालकाने हेल्मेट घातले नाही, म्हणून त्यावर देखील दंडात्मक कारवाई केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला.
वाहतूक पोलिस शाखेच्या कंट्रोल रूममधून पोलिस कर्मचारी बेशिस्त वाहन चालकांना ई-चलन पाठवितात. या ई-चलनासोबत संबंधित वाहन चालकाने केलेल्या नियमभंगाचा फोटो देखील पाठविला जातो. ‘एमएच-१२, सीटी-६९२०’ या नोंदणी क्रमांकाच्या रिक्षासाठी धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, ड्रायव्हरकडे लायसन्स नसणे, सिग्नल न पाळणे आणि ड्रायव्हरने हेल्मेट न घालणे, आदी गोष्टींसाठी एकूण दोन हजार २०० रुपये दंडाचे ई-चलन संबंधित रिक्षा मालकास प्राप्त झाले आहे.
रिक्षाचालकास हेल्मेट सक्ती नसल्यामुळे दंड आकारण्यात आल्याने या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या ई-चलनासोबत नियमभंग केल्याचा फोटो उपलब्ध नाही. त्यावरून हे चलन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दिले असण्याची शक्यता आहे. दंड आकारताना हेल्मेट नसल्याचा दंड चुकीने आकारल्याची शक्यता आहे. संबंधित रिक्षा चालकासमोर दंड भरण्याबाबत प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहेरभाई पूनावाला यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पुणे

सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ आणि माजी कोषाध्यक्ष ताहेरभाई पूनावाला यांचे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि नात असा परिवार आहे. पूनावाला यांच्या पार्थिवाचे आज (मंगळवारी) हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात येणार आहे.
ताहेरभाई विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत विशेष उल्लेखनीय आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे ते माजी अध्यक्ष होते; तसेच राष्ट्रीय एकात्मता समितीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. पूनावाला यांचे बोहरा समाजात सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. प्रत्येक परिवर्तनवादी कार्यकर्त्याला ते प्रोत्साहन देत असत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रीमियम एफएसआय’ बदला

$
0
0

पालिकेची राज्य सरकारकडे मागणी; बदल होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘प्रीमियम एफएसआय’च्या (चटई क्षेत्र निर्देशांक) दरात बदल करण्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे नगरविकास खात्यातील सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या ‘प्रीमियम एफएसआय’च्या दरांपुढे हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) महाग होण्याची भीती आहे. परिणामी विकास आराखड्यातील आरक्षणे संपादित करणे अवघड होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ‘प्रीमियम एफएसआय’च्या दरांमध्ये बदल करण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.
प्रीमियम एफएसआयचे दर राज्य सरकारने गेल्या आठवड्यात निश्चित केले. त्यानुसार निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाच्या प्रीमियम एफएसआयसाठी बाजार मूल्याच्या (रेडीरेकनर) ५० टक्के दर प्रती चौरस फुटांसाठी निश्चित करण्यात आला आहे. निव्वळ व्यावसायिक स्वरूपाच्या वाढीव बांधकामासाठी ६० टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. औद्योगिक बांधकामासाठीही ५० टक्के दर निश्चित करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ‘टीडीआर’च्या दरापेक्षा ‘प्रीमिअम एफएसआय’चा दर कमी झाला आहे. त्याचा फटका आरक्षणे ताब्यात घेण्यावर होणार आहे. विकास आराखड्यात ८५० आरक्षणे असून ती ताब्यात घेण्यासाठी टीडीआर हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. बाजारात ‘टीडीआर’पेक्षा ‘प्रीमिअम एफएसआय’ कमी भावात मिळायला लागला तर, बांधकाम व्यावसायिकांकडून टीडीआर खरेदी केला जाणार नाही. त्याचा परिणाम विकास आराखड्यातील आरक्षणे ताब्यात घेण्यावर होणार आहे. त्यामुळे नागरी सुविधा रखडल्या जातील, अशी वस्तुस्थिती राज्य सरकारच्या निदर्शनास आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने याबाबत विचार केला असून, त्यावर पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरविंद साने यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँक ऑफ बडोदामधील माजी अधिकारी आणि नाट्य कलाकार अरविंद केशव साने (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने अमेरिकेतील सॅनहोजे येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, मुले सचिन व श्रीनिवास तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
साने धडाडीचे नाट्यकर्मी होते. पीडीए, कलोपासक, जागर तसेच सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्या चिल्ड्रन्स थिएटरमध्ये ते सक्रिय होते. या संस्था चालविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू, वासुदेव पाळंदे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. विश्वास मेहेंदळे या कलावंतांबरोबर त्यांनी विविध नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. साने यांनी वृत्तपत्र विक्रीपासून कामाला सुरुवात केली. बँक ऑफ बडोदामध्ये ते लिपीक म्हणून रुजू झाले. पुढे प्रादेशिक व्यवस्थापक या मोठ्या पदावरून ते निवृत्त झाले. बँकेच्या युगांडा शाखेचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. गेली तीस वर्षे ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती आणि सवलत न मिळवता त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images