Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचा कामावरून घरी परतत असताना विनयभंग करण्यात आला आहे. या तरुणीला टेम्पोत टाकून पळवून नेण्याचा नराधमांचा डाव होता. मात्र सुदैवाने ती या नराधमांच्या तावडीतून बचावली आहे.

१९ जुलै रोजी ही घटना घडली. हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणारी ही मुलगी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी चालली होती. दरम्यान, पाऊस आल्याने चांदेनांदे गावाजवळ तिने रेनकोट घालण्यासाठी दुचाकी थांबवली. तेवढ्यातच एक टेम्पो दुचाकीजवळ येऊन थांबला आणि टेम्पोतील इसमाने तिला खेचून टेम्पोत टाकले. मात्र कशीबशी तिने या नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेतली व पळ काढला.

दरम्यान, या प्रसंगाने ही तरुणी भेदरली असून तिला बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणीचा जबाब घेत असून त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्वजीत कदम, अविनाश भोसलेंच्या घरी छापे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसले यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापा नेमका कशासाठी घातला, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आलेत, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सावंतवाडी मार्गावर गणपती विशेष गाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते सावंतवाडी या मार्गावर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पुण्यातून कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल.

ही गाडी १८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या दरम्यान चालणार असून, पुणे-सावंतवाडी-पुणे अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. पुणे स्टेशनवरून दर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी गाडी सुटेल. ती शनिवारी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी येथून दर सोमवारी सकाळी आठ वाजता गाडी सुटेल. ती नऊ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. या गाडीला १० आरक्षित द्वितीय श्रेणीचे डबे, सहा जनरल डबे आणि दोन स्लिपर डबे असणार आहेत. या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड हे थांबे देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथम वर्ष डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ

$
0
0

गुणवत्ता यादी चुकल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात दहावीनंतरच्या प्रथम वर्ष ऑनलाइन डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत गोंधळ झाला आहे. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, प्रकाशित केलेली यादी चुकल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश ऐनवेळी रद्द करावे लागले आहेत. दरम्यान, कक्षाने सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरले आहेत. मात्र, त्यांना आता पसंतीचे कॉलेज मिळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील डिप्लोमा कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांवर डिप्लोमा कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्जात ११ जुलैपर्यंत कॉलेजांचे पसंतीक्रम भरले होते. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता १३ जुलै रोजी ऑनलाइन प्रवेश पद्धतीने जाहीर करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १४ ते १९ जुलै दरम्यान यादीनुसार मिळालेल्या (अॅलोट) झालेल्या कॉलेजांमध्ये शुल्क भरून प्रवेश घेतले. मात्र, ऑनलाइन सिस्टीमधील तांत्रिक चुकांमुळे गुणवत्ता यादीत घोळ झाला. त्यामु‍ळे विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कॉलेज अॅलोट झाले. त्यामुळे कक्षातर्फे १९ जुलैला सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

त्यामुळे कॉलेजांनी पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश रद्द करायला लावले. या कारणाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंध‍ळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांची इच्छा नसताना त्यांना प्रवेश रद्द करावा लागला. आता या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी येत्या २३ जुलैपर्यंत पसंतीक्रम भरायचे असून त्याची गुणवत्ता यादी २४ जुलैला जाहीर करण्यात येईल. मात्र, आता विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार ४७३ डिप्लोमा कॉलेज असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता एक लाख ५९ हजार एवढी होती.

मॅनेजमेंट कोट्याचे आमिष

प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे पाहून राज्यातील काही खासगी डिप्लोमा कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना ‘मॅनेजमेंट’ कोट्यातून प्रवेश घेण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. गोंधळामुळे आता विद्यार्थ्यांना इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच, कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ‘मॅनेजमेंट’ कोट्यातून डोनेशन भरून प्रवेश घेऊन टाका, असे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
......
तांत्रिक कारणामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत घोळ झाला होता. त्यामुळे नव्याने सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन अर्जात पसंतीक्रम भरावेत. विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये. प्रवेशासाठी ‘मॅनेजमेंट’ कोट्याचे आमिष दाखविणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. चंद्रशेखर ओक, आयुक्त, राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीचा अहवाल जुलैअखेरपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) केलेल्या बदलांवर मागविण्यात आलेल्या हरकती-सूचनांचा सविस्तर अहवाल येत्या महिनाअखेरपर्यंत राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढील दोन ते तीन-महिन्यांत सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी चिन्हे आहेत.

राज्य सरकारने जानेवारीमध्ये महापालिकेच्या डीपीला मंजुरी दिली. या वेळी, सरकारने अनेक आरक्षणे पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतल्याने मूळ डीपीत १० टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाला. त्यामुळे, या संभाव्य बदलांवर पुन्हा हरकती-सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात दाखल झालेल्या सूचनांवर नगररचना सहसंचालकांकडे सुनावणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे. आता, नगररचना विभागाकडून अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, जुलै अखेरपर्यंत हा अहवाल नगरविकास विभागाकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

डीपीतील आरक्षणांप्रमाणेच अनेक ठिकाणी सरकारने रस्ता रुंदीमध्ये बदल केला आहे. शहराच्या मध्य भागातील काही रस्त्यांची रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव सरकारनियुक्त त्रिसदस्यीय समितीने ठेवला होता. त्याविरोधात, सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यामुळे, ही प्रस्तावित रस्ता रुंदी सरकारने रद्द केली होती. तसेच, शहराच्या विविध भागांतील काही महत्त्वाच्या आरक्षणांमध्ये बदल केले गेले होते. त्यावरील, सविस्तर अहवाल सरकारला प्राप्त झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळांतील चित्र बदलणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या शाळांमधील स्वच्छतागृहे, कचरा समस्येबरोबरच पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार केला जाईल, यामुळे पालिकेच्या शाळांमधील चित्र बदललेले पाहायला मिळेल, असा विश्वास पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी मुख्य सभेत व्यक्त केला.
महापालिका शाळांमधील पायाभूत सुविधांची झालेली दुरवस्था, डीबीटी कार्डचा उडालेला गोंधळ, शिक्षकांची अपुरी संख्या आणि यामुळे ढासळलेली गुणवत्ता यामुळे पालिकेच्या शाळांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पालिकेच्या शाळांमधील समस्यांचा पाढाच सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनाला धारेवर धरले. तब्बल तीन तास ४० पेक्षा अधिक सभासदांनी यावर भाषण केले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत पुढील तीन महिन्यांत शाळांची स्थिती पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन आयुक्त कुमार यांनी दिले. शिक्षणमंडळाच्या अंदाजपत्रकात या सुधारणांसाठी निधीची तरतूद अत्यंत कमी असून, स्थायी समितीने या सुधारणांसाठी आवश्यक निधी तातडीने वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आयुक्तांनी सभागृहात केली.
पालिकेच्या सर्व शाळांचे सर्वेक्षण करून पुढील २० दिवसांत शाळांमध्ये असलेल्या आणि नसलेल्या भौतिक सुविधांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी जेवढा निधी गरजेचा आहे. तो निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवला जाईल. शिक्षण मंडळ आता महापालिकेच्या अधिकारात असल्याने घनकचरा, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच बांधकाम विभागाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून मुलांना चांगल्या प्रकारचे शालेय वातावरण उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांवर देखरेख तसेच आवश्यक त्या खर्चासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महापालिकेच्या प्रभाग समित्यांना अधिकार देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शिक्षणमंडळ बरखास्त झाल्यानंतर त्याचा कारभार महापालिकेच्या ताब्यात आला असला तरी, हायकोर्टाने मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण मंडळ अथवा शिक्षण समिती नेमण्याचे अधिकार मुख्यसभा आणि महापौरांना दिले आहेत.

‘प्रशासनाला हवेत ठरावीक अधिकार’
पक्षनेत्यांनी त्याबाबत तातडीने निर्णय घेतल्यास पुढील महिन्याभरात समितीचा अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. ही समिती नेमल्यास मंडळाचे कामकाज अधिक सोपे होणार असले तरी काही बाबतीत वेळी प्रशासनाला समिती समोर येणे शक्य होणार नसल्याने प्रशासनाला काही ठरावीक अधिकार देण्याची मागणीही आयुक्तांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरती गैरप्रकारात कारवाई कधी होणार ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारचे अनुदान घेऊन चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांकडून सात हजार शिक्षकांची नियुक्ती करताना सरकारचे नियम पाळले नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने या शिक्षकांचे पगार थांबण्याचे संकेत दिलेले आहेत. मात्र, या शिक्षक भरती गैरप्रकारात सामील असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, याबाबतची चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरू आहे.
शिक्षण विभागाने शालार्थ ही संगणक प्रणाली सुरू केल्यानंतर अनेक शिक्षकांची नावे त्या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्याचे काम साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्या वेळी काही शिक्षकांकडे त्यांची कागदपत्रेच नसल्याचे समोर आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने तत्त्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची स्थापन केली होती. त्यामध्ये अनेक शिक्षकांना सरकारचे नियम न पाळता मान्यता दिल्याचे समोर आले आहे. साधारण दोन ते अडीच वर्षे ही चौकशी सुरू होती. त्यामध्ये अनेक शिक्षकांना नोटीसा देणे, त्यांच्या एकापेक्षा अधिक सुनावण्या घेणे आदी प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील जवळपास सात हजार शिक्षकांचा यामध्ये समावेश असल्याचे समोर येत आहे.
प्राथमिक चौकशीत आलेल्या सात हजार शिक्षकांपैकी तीन हजार शिक्षकांच्या मान्यता या नियमित आहेत. मात्र, त्यांना अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. तर, उर्वरित चार हजार शिक्षकांपैकी ६६० शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना पगार दिले जाऊ नयेत याबाबत वेतन विभागालाही पत्रव्यवहार झाला असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील या शिक्षकांची तपासणी होण्यासाठी व त्यांच्यावर आरोप निश्चित होण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात शिक्षण संस्थाचालकांवर काही कारवाई का होत नाही, अशी चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेने अशा प्रकारे अनियमित मान्यता दिली असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा काही कालावधीसाठी मान्यता काढून घेण्याची शिक्षा का देण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचऱ्याची समस्या प्रमाणाबाहेर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडमधील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून, त्यावर नियंत्रणासाठी नागरिकांवर नियमांच्या पालनाची सक्ती करावी, असा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात काढण्यात आला आहे. नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्यामुळे कचऱ्याची समस्या प्रमाणाबाहेर वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल बनविणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरांतील विविध घटकांचा अभ्यास करून २०१६-१७ चा पर्यावरण अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये वाढत्या घनकचऱ्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा एकत्रित करून त्याची जाळून किंवा पुरून विल्हेवाट लावणे नव्हे; तर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे होय. यासाठी सरकारने केलेले कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे २२ लाखांच्या आसपास असून, सद्यःस्थितीत रोज सुमारे ८११ मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर जागा राखीव आहे. यापैकी काही कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. परंतु, कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनासमोर आव्हान निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कचऱ्यातील प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन पाच मेट्रिक टन असून, सध्या केवळ दिड ते दोन मेट्रिक टन प्रतिदिन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. त्यापासून एलपीजी, डिझेलसदृश इंधन तयार करून ते औद्योगिक क्षेत्रात वितरित केले जात आहे.
शहरातील हॉस्पिटलमधून निर्माण होत असलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या उग्र होत आहे. गेल्यावर्षी शहरात तीन लाख ७५ हजार किलोग्रॅम जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला होता. त्यामध्ये वाढ होऊन यंदा चार लाख २१ हजार किलोग्रॅम कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅन्सरला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

कॅन्सरच्या आजाराला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी धानोरीतील मुंजाबावस्तीमधील अट्रिया सोसायटीत घडली. यामुळे सोसायटी काही वेळ गोंधळ उडाला .

सॅम्युअल वर्गीस (वय ६५, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वर्गीस यांना कॅन्सरचा आजार होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारामुळे बोलण्यास त्रास होत होता. गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील ए तीन बिल्डिंगमधील लिफ्ट समोरील पॅसेजमध्ये येऊन वर्गीस यांनी खाली उडी मारली. त्यामुळे मोठा आवाज झाला, सोसायटीतील रहिवाशांनी खाली धाव घेऊन पाहणी केली असता वर्गीस रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काहींनी त्यांना जखमी अवस्थेत ससूनला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वर्गीस यांनी राहत्या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली की घसरून खाली पडले, याबाबत ठोस काहीही सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल ,अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडसाठी समान आणि पुरेसा पाणीपुरवठ्याच्या सूचना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहराच्या सर्व भागांमध्ये समान तसेच पुरेशा दाबाने मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा आणि शहरातील २०१५ पर्यंतची सर्व अनाधिकृत नळजोड कायम करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या.
पाणीपुरवठा नियोजनाबाबत महापौर काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या वेळी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, गटनेते कैलास बारणे, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या नगरसेवकांनी त्यांच्या भागातील पाणीपुरवठ्याबाबतच्या समस्या मांडल्या.
काळजे म्हणाले, ‘विनाकारण होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच्या उपाययोजनेचे काम तसेच नादुरुस्त असलेल्या पाइपलाइनचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावे. शहरात ज्या ठिकाणी मध्यरात्री अथवा दुपारी पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी पाणी वितरण करण्याचे पुनश्च नियोजन करून नागरिकांच्या सोयीच्या वेळेस पाणी सोडण्यात यावे. शहरात सर्व भागांमध्ये समान तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा.’
हर्डीकर म्हणाले, ‘शहरातील अनधिकृत नळजोड तसेच जलवाहिन्यांमधील गळत्या शोधण्यासाठी प्रभागनिहाय भरारी पथके नेमण्यात येईल. पाण्याचा गैरवापर तसेच अपव्यय करण्याऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी संपूर्ण वार्डातील पाणी वितरणाबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीगळती लवकर दूर करून शुद्ध पाणीपुरवठा होईपर्यंत त्या भागात टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. रात्री उशिरा व पहाटे लवकर तसेच दुपारी होत असलेल्या ऐनवेळच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापट यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढून त्यावर अश्लील फोटो टाकणाऱ्यास सायबर सेलच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
ऋतुराज सावकार नलावडे (वय ३०, रा. धोलवड, जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात नलावडे याने ‘नामदार गिरीश बापट’ या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढले. त्यावर त्याने महिलांचे अश्लील फोटो पोस्ट करून बापट यांची बदनामी केली. आठ दिवसांपूर्वी बापट यांचे बनावट अकाउंट काढल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. तसेच, त्या अकाउंटवरून अश्लील फोटो टाकून त्यांची बदनामी केली जात असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ सायबर सेलकडे तक्रार केली. या प्रकरणी सायबर सेलने तपास करून नलावडे याला अटक केली. नलावडलेला कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला.
नलावडे हे शेती करतो. तसेच, तो साप्ताहिक चालवित आहे. बापट यांच्या नावाने बनावट अकाउंट सहज काढल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. स्थानिक पातळीवर नलावडे राजकारणात सक्रिय आहे. तो गावातील निवडणुकीमध्ये उभा राहिला होता. पण, निवडून आलेला नाही. त्याने हे अकाउंट का काढले, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच, त्याने आणखी काही जणांचे बनावट अकाउंट काढल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पुढील तपास सायबर शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर, कोंढव्याचे नगरसेवक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा पूर्व भाग असलेल्या हडपसर, कोंढवा भागातील पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याची तक्रार करत या भागातील नगरसेवकांनी आक्रमक होऊन शुक्रवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. वारंवार तक्रारी करूनही सोलापूर रस्त्यावरील पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही, अशी तक्रार या वेळी करण्यात आली. दरम्यान, या भागात उभारण्यात येत असलेल्या ३० हजार लिटर क्षमतेच्या नवीन टाकीचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाल्यावर माजी महापौर वैशाली बनकर यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच नंदा लोणकर, परवीन फिरोज, हाजी गफूर पठाण, अशोक कांबळे, योगेश ससाणे यांनीही याबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. वानवडी येथील १५ सोसायट्यांमध्ये गेला महिनाभर पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले असून आता ते आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे लोणकर यांनी सांगितले. सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई तर झोपडपट्ट्यांत मुबलक पाणी असून तेथील नळजोडांना तोट्याही नसल्याची तक्रार योगेश ससाणे यांनी केली. आंबेगाव पठार, धनकवडी परिसरातही पाण्याच्या अनेक समस्या असल्याचे अश्विनी भागवत यांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी आहे, मात्र, वितरणातील तुटींमुळे या भागात पावसाळ्यात पाणीटंचाई झाली असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते तुपे यांनी केली.
यावर खुलासा करताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी म्हणाले, ‘रामटेकडी भागात ६० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. परंतु, तिची क्षमता कमी पडत असल्यामुळे नवीन ३० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येत आहे. ते काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. वानवडीतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत तेथील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पूर्णविराम; नंतर अर्धविराम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आजपासून पूर्णविराम देत आहे,’ असे वक्तव्य करून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, त्यानंतर चौकशी समितीच्या प्रश्नांनाही सामोरे जाऊन त्यांनी उत्तरे दिल्याने या ‘पूर्णविरामा’चा काही वेळातच अर्धविराम झाला. ‘चौकशी समितीच्या प्रश्नावलीची उत्तरे दिल्याने नेतृत्वाने पुढील निर्णय घ्यावा. अंतिम निर्णयानंतर आपली पुढील भूमिका मांडू,’ असे सांगत त्यांनी संघटनेच्या कोर्टात चेंडू टोलविला.
संघटनेच्या चार सदस्यीय चौकशी समितीला खोत सामोरे गेले. या समितीने त्यांना लेखी प्रश्नावली दिली होती. त्यांची लेखी उत्तरे त्यांनी समितीला सादर केली. या वेळी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत, रविकांत तुपकर, सतीश काकडे आणि प्रकाश रोकडे उपस्थित होते. समितीकडे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भावनांना वाट करून दिली. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आजपासून पूर्णविराम दिला आहे. आता शेताच्या बांधावर जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहे. ऑगस्ट महिन्यात कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यानंतर पुढील दिशा ठरविणार आहे.’ मग समितीशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षात ठेवायचे की नाही, याबाबत संघटनेने निर्णय घ्यावा, असे सांगत घूमजाव केले. ते म्हणाले, ‘चौकशी समितीसमोर प्रश्नावलींची उत्तरे दिली आहेत. यापुढे कोणत्याही चौकशी समितीला सामोरे जाणार नाही. नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर भूमिका मांडणार आहे,’ असे ते महणाले. ‘लाठ्याकाठ्या खाऊन आणि तुरुंगात जाऊन शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या संघटनेमध्ये वाढलो आहे. त्यांच्यामुळेच मी मंत्री झालो आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून वाट्टेल ते आरोप आणि टीका करण्यात येत आहे. अपमानजनक शब्द वापरण्यात आले,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘ऑगस्ट महिन्यात राज्यभर दौरा काढून बांधावर जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. अधिवेशनानंतर दोन दिवसांचे शिबिर घेऊन अंतिम घोषणा करणार आहे. मंत्री आणि शेतकरी नेता म्हणून राज्याचा दौरा करणार आहे,’ असेही खोत म्हणाले.
‘संघटनेच्या चौकशी समितीच्या सदस्यांनी खासदार शेट्टी यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याचा पर्याय सुचविला. मी होकार दर्शविला आहे. मी संवाद करण्यासाठी तयार आहे. संघटनेने पाच वर्षांसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत खासदार शेट्टी हे २६ जुलै रोजी घोषणा करणार आहेत. त्यानंतर मी भूमिका मांडणार आहे,’ असे खोत यांनी सांगितले.

चार दिवसांत अहवाल
चौकशी समितीनेही पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. समितीचे अध्यक्ष सावंत म्हणाले, ‘खोत यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा अहवाल येत्या तीन ते चार दिवसांत दिला जाईल. नेतृत्त्वाने निर्णय घ्यावा, अशी भूमिका खोत यांनी घेतली. कोणताही​ निर्णय घेण्यापूर्वी विचारमंथन केले जाईल. आम्ही जपून पुढे जात आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या हितासाठी माध्यमांशी बोलणारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडेच्या (पीएससीडीसीएल) संचालकांनी माध्यमांशी संवाद साधण्यास अटकाव करणारा प्रस्ताव सादरच कसा झाला, याचा जाब येत्या बैठकीत विचारण्यात येणार आहे. महापालिकेच्या हिताविरुद्ध काही निर्णय झाल्यास त्याविरोधात माध्यमांशी बोलणारच, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संचालकांनी दिला आहे.
‘पीएससीडीसीएल’च्या संचालक मंडळामध्ये १६ सदस्यांपैकी सात सदस्य सरकारी नोकर, तीन सत्ताधारी पक्षांचे, दोन स्वतंत्र तर उर्वरित तीन सदस्य विरोधी पक्षाचे आहेत. अनेकदा ‘पीएससीडीसीएल’मधील निर्णयाबाबत विरोधी पक्षांकडून जाहीर टीका होते. ‘स्मार्ट सिटी’मध्ये सरकारची गुंतवणूक पालिकेपेक्षा कमी असल्याने या कंपनीला सरकारी कंपनीचा दर्जा मिळाला नाही. परिणामी या कंपनीला कोट्यवधी रुपयांचा कर द्यावा लागणार आहे. याबाबत विरोधी पक्षांनी टीकेचा सूर आळवला होता. बैठकीच्या कार्यपत्रिकेतून ही माहिती पुढे आली होती. त्या पार्श्वभूमीवर लगेचच संचालकांना बोलण्यास बंदीचे हत्यार उपसण्यात येत आहे.
कंपन्यांचा कारभार पारदर्शक राहावा, यासाठी प्रत्येक बैठकीची कार्यपत्रिका आणि इतिवृत्त वेबसाइटवर जाहीर करावे, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रारंभी गाजावाजा करीत याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. मात्र, गेल्या बैठकीपासून ही माहिती वेबसाइटवरून गायब झाली असून संचालकांनाही तोंड उघडण्यास मनाई करण्यात येत आहे. याचे पडसाद पुढील आठवड्यात संचालक मंडळाच्या बैठकीत उमटणार आहेत. गेल्या काही बैठकांची कार्यपत्रिका तसेच इतिवृत्त वेबसाइटवर का प्रसिद्ध करण्यात आले नाही, याची माहिती द्यावी, अन्यथा या सर्व कार्यपत्रिका, इतिवृत्त बेवसाइटवर प्रसिद्ध करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात येणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते​ विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना बैठकांची कार्यपत्रिका तसेच इतिवृत्ताबाबत विचारणा केली आहे.
‘मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेचा नारा दिला असताना सरकारी कंपनी असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार चार भिंतीच्या आत का सुरू आहे? स्मार्ट सिटीत जनतेची कामे होणे अपेक्षित आहे. संचालक मंडळामध्ये सर्वाधिक अधिकारीच आहेत, मग येथील निर्णयांबाबत का बोलू देण्यात येत नाही. कंपनीची गोपनीय माहिती भले जाहीर करणार नाही. मात्र, लोकहिताच्या निर्णयांसाठी बोलणारच आणि अशी आचारसंहिता कशी आणली, याचे उत्तरही संचालक मंडळाच्या बैठकीत विचारणार,’ असे तुपे म्हणाले. ‘संचालकांची मुस्कटदाबी करण्याला आमचाच विरोध आहे. जनतेच्या हितासाठी, पालिकेच्या हितासाठी माध्यमांशी बोलणार, गरज पडली तर आंदोलनाची भूमिकाही घेऊ,’ असे शिवसेनचे गटनेते आणि संचालक संजय भोसले म्हणाले.
‘लोकशाही मार्गाने जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. महापालिका या कंपनीची प्रमुख हिस्सेदार आहे. त्यामुळे महापालिकेच्या, जनतेच्या हितासाठी आम्ही बोलणारच. कोणाही आमची मुस्कटदाबी करू शकत नाही. चांगल्या कामाबरोबर आम्ही आहोत मात्र, चुकीच्या गोष्टींचा ठणकावून विरोध करणार,’ अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने ओलांडली सरासरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनुकूल वातावरणामुळे गेल्या आठवडाभरापासून पुण्यात मुक्काम ठोकलेल्या पावसाने यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. या हंगामात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ३४५.७ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीपेक्षा २४ मिमी अधिक पाऊस पुणेकरांना मिळाला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये मात्र पावसाने अद्याप सरासरीदेखील गाठलेली नाही. नाशिकमध्ये सरासरीपेक्षा २९२.१ मिमी अधिक पाऊस पडला आहे.
मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग ते केरळ या दरम्यान सक्रिय असलेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण असल्याने पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच कोकणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
राज्याच्या विविध भागांत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. विदर्भ आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टी झाली. शुक्रवारी मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक पाऊस ६९ मिमी भिरा येथे झाला. महाबळेश्वरमध्ये २७ मिमी, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ९, सांगली आणि रत्नागिरीमध्ये ३, साताऱ्यामध्ये २ मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यांवर गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत चोवीस तासांत ताम्हिणीमध्ये २३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कोयना (नवजा)मध्ये २४० मिमी, शिरगाव २००, डुंगरवाडी १४० मिमी, वळवण १३० मिमी पाऊस पडला.
दरम्यान पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासांत ३३ मिमी; तर दहा दिवसांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. पुण्यामध्ये साधारणतः जून महिन्यात सरासरी १३७.७ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा जूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७०.१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती. जून अखेरीस जिल्ह्यात २०७ मिमी पाऊस पडला. पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस दोन्ही महिन्यांची सरासरी पार करेल अशी अपेक्षा होती. मात्र जुलै महिन्यातील दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा गती पकडली असल्याने या महिन्याची सरासरीदेखील ओलांडली गेली आहे. जुलै महिन्यात सरासरी १८४ मिलिमीटर पाऊस होऊन जुलैअखेरपर्यंत सर्वसाधारणपणे एकत्रित ३२१.७ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा पावसाचे प्रमाण हंगामी सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे. शहरात शुक्रवारी सकाळपर्यंत ३४५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै अखेरपर्यंतच्या सरासरीपेक्षा आत्तापर्यंत २४ मिमी अधिक पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवस पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सुकाणू समितीला दंगल घडवायची होती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या वेळी शेतकरी सुकाणू समितीला राज्यामध्ये दंगल घडवायची होती,’ असा गौप्यस्फोट राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी केला. या आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीमार ​किंवा गोळीबार करू नये, असे आदेश दिले होते, त्यामुळेच राज्यात एकाही शेतकऱ्याचा बळी गेला नाही. असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीसामोर जाण्यापूर्वी खोत यांनी नवीन शासकीय विश्रामगृह येथे शक्तिप्रदर्शन केले. सकाळी दहापासूनच ते या ठिकाणी हजर होते. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘मंत्री असल्याने आंदोलनामध्ये सहभागी झालो नाही. त्यामुळे माझ्यावर काहीही आरोप केले गेले. अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. तरीही मी शांत होतो. कुटुंबीयांची शपथ घेऊन सांगतो, आंदोलन करीत असलेल्या सुकाणू समितीला राज्यात दंगल घडवायची होती. याची मला कल्पना होती. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार किंवा गोळीबार करू नका, असे आदेश मी दिले होते. त्यामुळे राज्यात शेतकऱ्याचा बळी गेला नाही.’

वेगळी चूल मांडण्याचे संकेत
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम देत आहे. यापुढे झेंडा आपला असेल; तसेच काठी आणि दोरीदेखील आपलीच असेल. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’ असे सांगत खोत यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचे संकेत दिले.
‘कार्यकर्त्यांनी कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर देऊ नये. सोशल मीडियावर काव काव करणारे पितरावरचे कावळे आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘सदाभाऊ खोत....धुमधडाका’ अशा घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सावंतवाडी मार्गावर गणपती विशेष ट्रेन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते सावंतवाडी या मार्गावर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पुण्यातून कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल.

ही गाडी १८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या दरम्यान चालणार असून, पुणे-सावंतवाडी-पुणे अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. पुणे स्टेशनवरून दर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी गाडी सुटेल. ती शनिवारी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी येथून दर सोमवारी सकाळी आठ वाजता गाडी सुटेल. ती नऊ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. या गाडीला १० आरक्षित द्वितीय श्रेणीचे डबे, सहा जनरल डबे आणि दोन स्लिपर डबे असणार आहेत. या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड हे थांबे देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित टिळक यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांना कोर्टाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशेष सत्र न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.
एका ४१ वर्षीय वकील महिलेच्या तक्रारीवरून टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या वतीने अॅड. नंदू फडके व संदीप फडके यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. या वेळी फडके यांनी युक्तिवाद केला, ‘तक्रारदाराशी फेसबुकवरून ओळख होण्यापूर्वीपासूनच टिळक यांचे स्टेटस ‘मॅरिड’ असेच असून त्यांनी पत्नीसोबतचे फोटोही फेसबुकवर टाकले होते. त्यामुळे लग्न झाल्याचे टिळक यांनी लपविलेले नाही. तक्रारदार टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कायदेशीर सल्लागार होत्या. त्यांना एप्रिलमध्ये कामावरून काढून टाकले. त्याचा राग मनात धरून बदनामी करण्यासाठी त्यांनी ही तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी तक्रारदारांच्या विरोधात टिळक यांच्याकडून नारायण पेठ पोलिस चौकीत तीन तक्रार अर्ज देण्यात आले आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्म-मृत्यू नोंदणी कारभाराचे वाभाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयातील कारभाराचे वाभाडे शुक्रवारी सर्वसाधारण सभेत काढण्यात आले. पालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाने एकाच दिवशी एका व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा प्रताप केला असल्याचे सांगत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी त्याचे पुरावेच सर्वसाधारण सभेत सादर केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. याची सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.
महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात अनेक चुकीचे प्रकार घडत असून मनमानी कारभार सुरू असल्याची टीका शिंदे यांनी केली. या कार्यालयात सुरू असलेल्या कारभारावर कडक शब्दांत टीका करत शिंदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. एका व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूचा दाखला शिंदे यांनी सभागृहात दाखविला. यावरून ‘डुप्लिकेट’ दाखले दिले जातात का? यामध्ये गैरप्रकार होतो का, याबाबत चौकशी करणार आहात का? असे दाखले दिले गेले आहेत का? याची तपासणी करण्याची यंत्रणा महापालिकेत आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करत जोरदार चर्चा केली.
उघडकीस आलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वसाधारण सभेत दिले. तर जन्म मृत्यू दाखल्यांवरील ‘वॉटर मार्क’ बाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीचा फायदा सर्वांनाच

$
0
0

भविष्यात करांचे दरही कमी होतील; मानकोसकरांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अप्रत्यक्ष करात क्रांती घडविणाऱ्या वस्तू आणि सेवा करामुळे आतापर्यंत करआकारणीबाहेर असलेल्या वस्तू व सेवांवर कर आकारणी होईल. परिणामी कर संकलनात वाढ होऊन हा आकडा २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. कर संकलन वाढल्याने जीएसटीमधील कराचे दर आणि स्लॅबही कमी होतील. करआकारणी कमी झाल्याने वस्तू व सेवा आणखी स्वस्त होतील आणि त्याचा सर्वांनाच फायदा होईल,’ अशी ग्वाही केंद्रीय जीएसटीचे पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांनी ‘मटा पुणे सुपरफास्ट’च्या व्यासपाठीवरून दिली.
महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित ‘मटा पुणे सुपरफास्ट- जीएसटी स्पेशल’ या कार्यक्रमात मानकोसकर आणि केंद्रीय जीएसटीच्या पुणे विभागाच्या उपायुक्त राजलक्ष्मी कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चंदूकाका सराफचे अतुल शहा या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी प्रास्तविक केले आणि आभार मानले. महाराष्ट्र टाइम्सचे स्पेशल करस्पॉडंट अभिजित थिटे यांनी सूत्रसंचालन केले.
‘जीएसटी करप्रणाली जगभरातील जवळपास १५०देशांनी स्वीकारली आहे. त्यापैकी अनेक देशांमध्ये कराचा दर एकच आहे. काही ठिकाणी दोन टप्प्यात करआकारणी केली जाते. त्यामुळे भारतातही अशा प्रकारे करआकारणी केली जावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, भारत हा खंडप्राय देश आहे. येथील हवामान, पीकपाणी, उद्योगधंदे, नैसर्गिक संसाधने यामध्ये विविधता आहे. त्यामुळे सर्वच वस्तू किंवा सेवांवर एकसमान कर लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे कराचे चार टप्पे ठरवून त्यानुसार करआकारणी करण्यात येत आहे. भविष्यात करसंकलन वाढल्यानंतर हे टप्पे कमी होऊन दोन किंवा एकवरही येऊ शकतील,’ असे मानकोसकर यांनी स्पष्ट केले.
‘जीएसटीपूर्वी विविध कर अस्तित्वात असल्याने व्यावसायिकांना अधिकाऱ्यांकडे वारंवार खेटे घालावे लागत असत. आता जीएसटी लागू झाल्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाला फक्त एकाच अधिकाऱ्याशी संपर्कात राहावे लागेल. त्याचबरोबर जीएसटीचे रिटर्न ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने भ्रष्टाचारालाही आळा बसेल. जीएसटीमध्ये नफेखोरीला आळा घालणाऱ्या तरतुदी असून, जीएसटीच्या नावाखाली काही व्यावसायिक नफेखोरी करत असतील, तर त्यांच्या विरोधात ग्राहकांनी तक्रार नोंदवावी,’ असे आवाहनही मानकोसकर यांनी केले.
'बांधकाम सुरू असताना खरेदी केलेल्या घरावर १२ टक्के दराने जीएसटी आकारण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अन्य काही व्यावसायिकांना यापूर्वी त्यांनी खरेदी केलेल्या कच्च्या मालावरील करावर सेट ऑफ मिळत नव्हता; जीएसटीमध्ये मात्र त्यांना १६० हून अधिक गोष्टींचा सेट ऑफ मिळणार आहे. बांधकामाचा खर्च २५०० रुपये प्रति चौरस फूट धरल्यास त्यांना प्रति चौरस फूट ५०० ते ७०० रुपये सेट ऑफ मिळणार असल्याने त्याचा फायदा त्यांनी ग्राहकांना देणे आवश्यक आहे,’ असेही मानकोसकर यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण देश एक बाजारपेठ

‘पूर्वी किचकट कररचना, विविध राज्यातील करांमुळे होणारी गुंतागुंत यामुळे अनेक व्यापारी व्यवसायाचा विस्तार करणे टाळत होते. किंवा थेट निर्यातीलाच पसंती देत होते. आता मात्र, विविध वस्तू व सेवांवर देशभर एकच कर लागणार असल्याने व्यावसायिकांच्या अडचणी दूर होणार असून त्यांना संपूर्ण देश हा एक बाजारपेठ म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायाचा विस्तार करणे सुकर होईल,’ असेही मानकोसकर म्हणाले.

बहुतांश वस्तू स्वस्त
वस्तू व सेवा कराची (जीएसटी) रचना करतानाच जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे; तर अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने विविध वस्तू व सेवांवरील कराचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे बहुतांश वस्तूंवरील कर कमी होऊन वस्तूंचे दरही कमी झाले आहेत. त्याचा थेट फायदा ग्राहकांनाच होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य मोबदला
घटनादुरुस्ती व विविध राज्यातील विधानसभेत जीएसटी कायदा मंजूर करून जीएसटी अस्तित्वात आला. जीएसटी कौन्सिलमध्येही राज्याच्या प्रतिनिधींची संख्या अधिक असल्याने राज्याच्या हिताची जपणूक होणार आहे. राज्य शासन, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आला आहे. त्यासाठी २०१६-१७ हे आर्थिक वर्ष आधारभूत मानून त्यानुसार दर वर्षी १४ टक्के अधिक मोबदला दिला जाणार आहे.

प्रश्नांकित चेहऱ्यांवर समाधानाचा भाव

पुणे : वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजे नेमके काय; त्याचा सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे; जीएसटी कोणाला भरावा लागणार, त्याचा फायदा कोणाला होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुणेकरांनी उत्साहाने सायंकाळी भर पावसातही मोठी गर्दी केली होती. जीएसटीसीची गाथा सहजसोप्या भाषेत उलगडल्याने अखेर सर्वांनी समाधान व्यक्त केले.
जीएसटीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पुणेकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे गरवारे कॉलेजच्या सभागृहात आयोजित ‘पुणे सुपरफास्ट जीएसटी स्पेशल’ कार्यक्रमाला गर्दी केली होती. यामध्ये व्यापारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची संख्या लक्षणीय होती. या वेळी सुरेंद्रकुमार मानकोसकर आणि उपायुक्त राजलक्ष्मी कदम यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
जीएसटीचा सोन्याच्या दागिन्यांवर कसा परिणाम होईल, असा प्रश्न अनेकांनी विचारला. तयार होणाऱ्या दागिन्यावर एकच कर लागणार असल्याचे मानकोसकर म्हणाले. त्याचबरोबरच दगड, वाळू, मातीच्या व्यवहारांवर जीएसटी लागणार नाही. मात्र, वीट आणि खडीला काही प्रमाणात जीएसटी लागणार आहे. दरम्यान, घरभाड्यावर आणि सुमारे वीस लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्यांनाही जीएसटी भरावा लागणार नसल्याचेही ते म्हणाले.

‘जीएसटी भवनात संपर्क साधा’
जीएसटीबाबत अधिक माहिती www.cbec.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. नागरिकांना जीएसटीविषयीची सर्व प्रकारची माहिती तेथे ‘पीपीटी’मध्ये उपलब्ध असेल. वेबसाइटवर जाएसटीचा उद्देश आणि नियमावली, मसुदा, जीएसटीबाबत नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तसेच जीएसटीच्या सर्व प्रकारांची माहिती सविस्तर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी वाडिया कॉलेजसमोरील जीएसटी भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले.

सामान्यपणे विचारण्यात आलेले प्रश्न
जीएसटीचा घरांच्या किंमतीवर काय फरक होईल, वीजबिलात वाढ होईल का, किराणा माल स्वस्त होईल की महाग, जीएसटीमुळे शिक्षण घेणे महागणार का असे विविध प्रश्न उपस्थितांनी विचारले. त्यावर मानकोसकरांनी समर्पक उदाहरणांच्या माध्यमातून रंजक पद्धतीने उत्तरे दिल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images