Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि जिल्हा परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे १४.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे निम्मी भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांतील पावसामुळे वरसगाव धरण ४१.८८ टक्के, पानशेत ६७.३८ टक्के, खडकवासला ६२.९२ टक्के आणि टेमघर २५.५६ टक्के भरले आहे. टेमघर धरणात पाणी साठविण्यात येत नसले, तरी धरण क्षेत्रात पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये सुमारे १५.५२ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे धरणांच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणांमधील पाणीसाठा सुमारे १४.७५ टीएमसीवर पोहोचला आहे. वरसगाव धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे ३८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पाणीसाठा ५.३७ टीएमसीवर गेला आहे. पानशेत धरणाच्या क्षेत्रात सुमारे ३६ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा ७.१८ टीएमसीवर गेला आहे. खडकवासलाच्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. दिवसभरामध्ये १४ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा १.२४ टीएमसीवर गेल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सध्या टेमघर धरणाचे काम सुरू असल्याने धरणात पाणी साठविण्यात येत नाही. तरीही, या धरणात ०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठा ५.९३ टीएमसीवर पोहोचला आहे.

धरण आणि पाणीसाठा (टीएमसीत)
खडकवासला १.२४
पानशेत ७.१८
पवना ५.९३
भामा आसखेड ५.०३
चासकमान ६.२८
माणिकडोह ३.६८
डिंभे ७.२३
मुळशी ११.१३
वरसगाव ५.३७
टेमघर ०.९६
भाटघर १०.२८
वीर ३.४९
नीरा देवघर ५.४६
उजनी १.९९ (उणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिधाड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लोणावळा

लोणावळ्यातील सुप्रसिद्ध टायगर पॉइंटजवळच्या गिधाड धबधब्यात बुडून मुंबईतील एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

धवल विजय परमार असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतील अंधेरी भागातील कादंबरी इमारतीत राहत होता. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

लोणावळ्यातील टायगर पॉइंट हा परिसर राज्यातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पावसाळ्याच्या दिवसात राज्यभरातून पर्यटक इथं धाव घेतात. यात तरुणांचे प्रमाण मोठे असते. येथील धबधब्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी तरुणांची झुंबड उडालेली असते. पर्यटनाची ही मौज लुटतानाच एका बेसावध क्षणी धवलचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा मनोरुग्णालय अंधारात

$
0
0

केबल तुटल्याने चार दिवसांपासून वीज गायब

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला वीज पुरवठा करणारी उच्च दाबाची केबल तुटल्याने मागील चार दिवसांपासून रुग्णालय अंधारात आहे. प्रशासकीय कार्यालयसह फिट वॉर्ड, निरीक्षण वॉर्ड आणि आजारी रुग्णांवर उपचार करणारे हॉस्पिटल वॉर्ड अंधारमय झाले आहे. प्रशासनाकडून मेणबत्त्या पेटवून कामकाज करण्यात येत आहे. वीज नसल्याने शेकडो मनोरुग्णांना अंधारात रात्र काढावी लागत असून डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

मनोरुग्णालयाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीमधून एक उच्च दाबाची केबल मागील आठवड्यात शनिवारी अचानक तुटल्याने अनके वॉर्डांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रशासनाकडून ‘महावितरण’शी संपर्क साधून तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने तुटलेली केबल जोडून वीज पुरवठा सुरळीत केला. पण काही वेळाने पुन्हा केबल तुटल्याने रविवारपासून मनोरुग्णालयातील काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. तुटलेली केबल जोडणे शक्य नसल्याचे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगितले. त्यासाठी नवीन केबल टाकावी लागणार आहे. मात्र, नवीन केबल टाकण्यासाठी एक लाख रुपये खर्च होणार असल्याने काम ठप्प झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केबल तुटल्याने मनोरुग्णालयातील मुख्य प्रशासकीय इमारत, फिट वॉर्ड, निरीक्षण वॉर्ड चार दिवसांपासून अंधारात आहे. वीज लवकर येण्याची शक्यता नसल्याने प्रशासनाकडून या वार्डांत मेणबत्त्या पेटवून काम सुरू ठेवण्यात आले आहे.

प्रशासकीय कामावरही परिणाम

फिट वॉर्डमध्ये सुमारे ७०, निरीक्षण वार्डात ६० आणि हॉस्पिटलमध्ये (२७ नंबर) ५०हून अधिक रुग्ण वास्तव्यास आहेत. प्रशासकीय इमारतीचा देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने कम्प्युटरवरील काम ठप्प झाले आहे. याबाबत अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

मनोरुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याने मेणबत्त्या पेटवून उजेड देण्याचा खटाटोप चालू आहे. मात्र, एखाद्या मनोरुग्णाने रात्रीच्या वेळी पेटलेली मेणबत्ती घेऊन काही अनुचित प्रकार केल्यास अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कच्च्या कैद्यांची व्हॅन खड्ड्यात अडकली

$
0
0

पर्यायी व्हॅनमधून कैदी कोर्टाकडे रवाना

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या २४ कच्च्या कैद्यांना (अंडर ट्रायल) कोर्टात घेऊन जाणारी पोलिस व्हॅन गुरुवारी दुपारी तुरुंगाच्या आवारातील खड्ड्यात अडकून पडली. चालकाने प्रयत्न करूनही खड्ड्यातून व्हॅन बाहेर निघाली नाही. अखेरीस तुरुंग प्रशासनाने पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिसांच्या कडक बंदोबस्तात भर पावसात २४ कैद्यांना दुसऱ्या पोलिस व्हॅनमध्ये बसवून कोर्टात नेण्यात आले.

येरवडा तुरुंगात पुरुष आणि महिला कैदी सामावून घेण्याची क्षमता २,४४९ इतकी असताना प्रत्यक्षात पावणेपाच हजार कैदी वास्तव्यस आहे. पुरुष कारागृहाची क्षमता २,३२३ असताना सुमारे साडेचार हजार कैदी शिक्षा भोगत आहे. त्यातील सुमारे एक तृतीयांश म्हणजे सव्वातीन हजार कैदी हे कच्चे कैदी आहेत.

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या २४ कच्च्या कैद्यांना गुरुवारी दुपारी कोर्टात नेण्यासाठी मागील गेटमधून पोलिस व्हॅनमध्ये (एमएच १४ सीएल १६३९) बसवण्यात आले. प्रेस कॉलनी मार्गाने कोर्टाकडे जात असताना समोरून दुसरी व्हॅन आल्याने चालकाने व्हॅन रस्त्याखाली उतरवली. त्यामुळे व्हॅनच्या डाव्या बाजूचे समोरचे आणि मागचे अशी दोन्ही चाके खड्ड्यात अडकली. या घटनेची माहिती तुरुंग प्रशासनाला कळविल्यानंतर कैद्यांना पर्यायी वाहनात बसविण्यासाठी विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिसांची मदत मागण्यात आली. काही वेळातच विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच कोर्ट कंपनीचे काम पाहणारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खड्ड्यात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली. तितक्यात पर्यायी पोलिस व्हॅन (एमएच १४ सीएल १६३४) उपलब्ध झाल्याने या वाहनातून कैद्यांना कोर्टाकडे रवाना करण्यात आले.

मोठा पोलिस बंदोबस्त

कैद्यांना एका व्हॅनमधून दुसऱ्या व्हॅनमध्ये बसवताना कोणीही पळून जाऊ नये, यासाठी सुमारे २५ ते ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा साखळी बंदोबस्त भर पावसात तैनात करण्यात आला होता. येरवडा पोलिस ठाण्याचे गुन्हे पोलिस निरीक्षक अशोक कदम, विश्रांतवाडीचे दिलीप शिंदे, कोर्टाचे पोलिस निरीक्षक यू. वाय. नवगिरे आणि कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला.

मोठ्या मनुष्यबळाचा वापर

येरवडा तुरुंगातून रोज शेकडो कच्च्या कैद्यांना पोलिस बंदोबस्तात कोर्टात सुनावणीसाठी न्यावे लागते. कैद्यांना कोर्टात नेताना आणि परत आणताना तुरुंग कर्मचाऱ्यांकडून बारकाईने तपासणी केली जाते. कैद्यांना कोर्टात नेण्यासाठी आलेल्या पोलिसांना बराच वेळ कैद्यांची वाट पाहत बसावे लागते. कच्च्या कैद्यांची संख्या मोठी असल्याने तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारवर पोलिस व्हॅनची गर्दी होऊ नये यासाठी मुख्य आणि पाठीमागील प्रवेशद्वारातून कैद्यांना बाहेर काढून कोर्टात पाठविले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फीवरून खुनाचा छडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
शिवशंकर उर्फ शिबू घोष या परप्रांतीय तरुणाच्या खुनाचा छडा दौंड पोलिसांच्या विशेष पथकाने मृताच्या सेल्फीवरून लावला. या प्रकरणी संदीप नारायण देठे (वय ३२, रा कूसखुर्द, ता. जि. सातारा), संतोष विष्णू शिरटावले (वय २१), श्रीकांत आबा शिरटावले (वय २६, दोघेही मूळ रा. खाडगाव ता. जि. सातारा, सध्या रा. मुंबई), ऋषभ उर्फ सोनू लक्ष्मण यादव (वय २१, रा. बनगर ता. जि. सातारा, सध्या मुंबई) यांना अटक केली आहे. दौंड येथील प्रथमवर्ग न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या प्रकरणाची माहिती दिली. जीरेगावच्या (ता. दौंड) हद्दीत भोळोबावाडी-बारामती रस्त्याच्या कडेला शिबूचा खून झाला होता. दौड पोलिस ठाण्यात सहा जूनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मृताच्या छायाचित्रांचे फ्लेक्स परिसरात लावले होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत लक्ष केंद्रीत करून उपनिरीक्षक गजानन जाधव यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरची बैठक घेऊन त्यांना तरुणाचे छायाचित्र दाखवले होते. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. या बैठकीनंतर अर्ध्या तासातच एका व्यक्तीने मृत तरुणाचा फेसबुकवरील सेल्फी दाखवला. त्यावरून तपास केल्यावर मृत तरुणाचे नाव शिवशंकर उर्फ शिबू घोष (रा. कोलकाता) असल्याची माहिती त्याच्या मालकाने दिली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या ऋषभ यादवकडे चौकशी केल्यावर त्याने सेल्फीबद्दल खुलासा केला.

खून झाल्याच्या दिवशी काढलेल्या या सेल्फीमध्ये शिवशंकरसोबत श्रीकांत शिरटावले आणि संतोष शिरटावले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी श्रीकांत आणि संतोषला मुंबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर खुनाचा मुख्य सूत्रधार संदीप देठे असल्याचे पुढे आले. संदीप आणि शिबू दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. साताऱ्यातील तुरुंगात दोघांची ओळख झाली. संदीपने शिबू याला खंडाळा कोर्टामध्ये एका चोरीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून दिला. त्यानंतर त्याने शिबूला कुसखुर्द येथील गोठ्यात कामाला ठेवले. शिबुने गावातील महिलांची छेडछाड, नागरिकांना दमदाटी असे उद्योग केले. त्यामुळे संदीपने शिबुला कामावरून काढून टाकले, तसेच गाव सोडून जाण्यास सांगितले. त्यानंतरही शिबू व्हाट्‍सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून गावातील मित्रांच्या संपर्कात होता. शिबू गावातील मुली, तसेच नात्यातील महिलांची बदनामी करत असल्याची माहिती संदीपला समजली. त्याच्या रागातून संदीप याने ऋषभ, संतोष, श्रीकांत यांच्या मदतीने पाच जूनला शिबूचा खून केला.

पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, उपनिरीक्षक गजानन जाधव, हवालदार के. बी. शिंदे, पी. एस. मांजरे, पोलिस नाईक सचिन बोराडे, असिफ शेख, शिपाई राकेश फाळके यांच्या पथकाने हा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’

$
0
0

ग्राहक आयोगाच्या सर्किट बेंचकडे कर्मचाऱ्यांचा अभाव

पुणे : राज्य ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच पुण्यात फक्त नावापुरतेच उरले आहे. बेंचचे कामकाज चालविण्यासाठी जागा नाही, कर्मचारी, मशिनरी नाही. बेंचपुढे दाखल असलेल्या सर्व केसेसमध्ये थेट पाच महिन्यांची तारीख देण्यात आली आहे. ग्राहकांना न्याय मिळणे तर दूरच बेंचच्या कामकाजालाच आता ‘तारीख पे तारीख’ पडू लागली आहे.

ग्राहकांना त्वरित न्याय मिळावा म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यासाठी झालेली मोठी चळवळही पुण्यातूनच करण्यात आली होती. ग्राहकांना कमी कालावधीत न्याय मिळावा असा ग्राहक संरक्षण कायद्याचा हेतू आहे. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत राज्य ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच पुण्याला मंजूर करण्यात आले. मात्र, या बेंचचे कामकाजही आता नावापुरतेच उरले आहे. बेंचचे कामकाज चालविण्यासाठी पुरेशा सुविधा मिळत नाही तोपर्यंत पुण्यात कामकाज करणार नाही, असा पवित्रा न्यायिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घेतला होता. बेंचचे पुण्यातील कामकाज सरकारच्या अनास्थेमुळे गुंडाळले गेल्याचे चित्र काही महिन्यांपूर्वी निर्माण झाले होते. राज्य सरकारकडून यासंदर्भात पत्रक काढून बेंचचे कामकाज सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

जिल्हा ग्राहक मंचाच्या जागेतच हे बेंच चालविण्यात येते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या बेंचचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच दाखल असलेल्या सर्व केसेसला पुढील तारखा देण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. पक्षकारांना थेट नोव्हेंबर महिन्यातील तारखा देण्यात आल्या आहेत.

ग्राहक कोर्टात प्रॅक्टीस करत असलेले अॅड. डी. जी संत यांनी, सर्किट बेंच म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती सध्या झाली असल्याचे सांगितले. ‘बेंचचे कामकाज चालविण्यासाठी पुरेशा सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी वकील वर्गाकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, याकडे कोणी लक्षच देत नाही. पालकमंत्र्यांनी तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे,’ असे अॅड. संत म्हणाले.

अॅड. नीलेश भंडारी म्हणाले, ‘सर्किट बेंचपुढे दाखल असलेल्या केसेसमध्ये थेट पाच महिन्यांची तारीख देण्यात आल्यामुळे पक्षकारांना न्याय मिळण्यास विलंब होणार आहे. ज्या पक्षकारांना आपल्या केसमध्ये तातडीने दिलासा हवा आहे, त्यांना मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागणार आहेत. बेंचच्या कामकाजासाठी तातडीने सुविधा देणे आवश्यक आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात टपाल खात्याची दोनच ‘आधार’ केंद्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आधार’साठी पुणेकरांची सुरू असलेली वणवण टपाल खाते थांबवेल, असा विश्वास वाटत असताना या खात्याकडून पुणेकरांची साफ चेष्टा करण्यात आली आहे. ३५ लाखांहून अधिक असलेल्या लोकसंख्येच्या शहरात टपाल खात्याने आधार कार्डची नोंदणी आणि माहितीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी केवळ दोन केंद्रे सुरू केली आहेत.

टपाल खात्याकडून लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्ट आणि जनरल पोस्ट ऑफिस या दोन ठिकाणी केव‍ळ ‘आधार’ची यंत्रणा बसवण्यात आली आहे. परंतु, उपनगरातील नागरिकांनी ‘आधार’साठी कुणाचे दरवाजे ठोठवायचे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने टपाल खात्याकडे ‘आधार’ची यंत्रणा दिल्यानंतर खात्याकडून समारंभपूर्वक आधार यंत्रणेचे उद्‍‍घाटन करण्यात आले. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीला एकच केंद्र सुरू होते. त्यानंतर दुसरे सुरू करण्यात आले. ‘आधार’च्या व्यवस्थेत सुसूत्रता येणार असे टपाल खात्याकडून सांगण्यात आले होते. खासदारांनीही त्याला दुजोरा दिला होता. आता केवळ दोनच केंद्रांच्या आधारे सुसूत्रता कशी आणणार, असाही प्रश्न उभा राहिला आहे.

‘आधार’साठी एकूण २० केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती खात्याकडून देण्यात आली होती. त्यामधील १३ केंद्रे सुरू करण्यात आली असून केवळ दोन केंद्रे पुण्यासाठी देण्यात आली आहेत. चिंचवड आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उर्वरीत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरीत केंद्रे लवकरच सुरू होतील, असे खात्याकडून सांगण्यात आले आहे.

टपाल खात्याने शहरात जरी दोन केंद्र सुरू केली असली, तरी जिल्ह्यासाठी एकही केंद्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे, पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना आता आधारसाठी शहराची वारी करावी लागणार आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून शहरात येण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे, जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण दिवस द्यावा लागणार आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या विस्कळित झालेल्या यंत्रणेतून टपाल खाते दिलासा देईल, असे वाटत असतानाच खात्याकडून मात्र, पुणेकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे, पुण्याच्या राजकीय नेतृत्वानेही या प्रकरणी लक्ष घालून आधारची केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
.......
‘आधार’ची एकूण २० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी १३ केंद्रांवर काम सुरू करण्यात आले आहे. पुण्यात सिटी पोस्ट आणि जनरल पोस्ट ऑफिस येथे दोन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लवकरच इतर सात केंद्रे सुरू होतील.
- गणेश सावळेश्वरकर, पोस्ट मास्तर जनरल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्याव्यवसायाचा मुंढव्यात पर्दाफाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंढव्यातील एका सोसायटीमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हाय प्रोफाइल रॅकेटाचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

दुर्गेश्वर उर्फ सूरज धनबहाद्दुर छत्री (वय २४, रा. मूळ, आसाम) याला ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश शिंदे, अनिता शिंदे, अरविंद सूर्यकांत येकुरगे (रा. पौड) यांच्यावर पिटा अॅक्टनुसार मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा येथे मांजरी रोड इव्हज गार्डन सोसायटीमध्ये गणेश शिंदे, अनिता शिंदे यांनी साथीदारांच्या मदतीने बाहेरच्या मुली बोलावून वेश्याव्यवसाय सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून बुधवारी छापा टाकण्यात आला.

याठिकाणाहून तीन तरुणींची सुटका केली करण्यात आली. दुर्गेश्वर छत्रीला ताब्यात घेण्यात आलो आहे, तर प्रमुख आरोपी गणेश शिंदे, अनिता शिंदे, अरविंद येकुरगे यांचा शोध सुरू आहे.

ग्राहकांना सुंदर मुलींकडून बॉडी मसाज केली जाईल, असे मेसेज पाठवून हा वेश्याव्यवसाय केला जात होता. यामध्ये तरुणींना ओढण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन चांगल्या कमाईचे आमिष दाखवले जात होते.

वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, कर्मचारी सचिन कदम, नामदेव शेलार, संजय गिरमे, प्रमोद म्हेत्रे, महिला कर्मचारी ननिता येळे, गीतांजली जाधव, रूपाली चांदगुडे, सरस्वती कागणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उप जिल्हा रुग्णालयातच मिळणार अपंगांना दाखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अपंग व्यक्तींना ससून रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात यावे लागत होते. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती; मात्र आता त्यांची यातून सुटका होणार आहे. पाच तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एका शुक्रवारी यापुढे अपंगत्वाची तपासणी करून, तेथेच प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सप्टेंबर २०१७ पासून केली जाणार आहे.
अपंग प्रमाणपत्रासाठी होणारी ससेहोलपट थांबवावी, राज्य सरकारच्या आदेशानुसार तालुकास्तरावर अपंग प्रमाणपत्रांचे वितरण व्हावे, या मागण्यांसाठी ‘प्रहार’ अपंग क्रांती आंदोलन संघटनेने सेंट्रल बिल्डिंग येथील सहायक आरोग्य संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाचे रुपांतर रास्ता रोकोमध्ये झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी ‘प्रहार’चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेन्द्र सातव, जिल्हा अध्यक्ष सुरेखा ढवळे आणि प्रसिद्धी प्रमुख रफीक खान यांच्याशी चर्चा करूण मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले.
जिल्ह्यामध्ये ससून रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचे अपंगत्व प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय तपासणी केली जाते. ससूनमध्ये बुधवार आणि गुरुवारी ही तपासणी केली जाते. तर, जिल्हा रुग्णालयात बुधवारीच तपासणी होते. या तपासणीसाठी नागरिक एक दिवस आधीपासून रांग लावतात. यामध्ये अनेकांना रिकाम्या हातांनी फिरून जाण्याची वेळ येते. यातून नागरिकांची सूटका होणार आहे. आता महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या तालुक्यासाठी अपंगतत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तेरा तालुक्यांसाठी पाच उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी महापालिकेत तूतू-मैमै

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
उपसूचनेच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तूतू-मैंमैं झाली. शाब्दिक वाद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरातील गंभीर प्रश्नांवर चर्चाच होऊ शकली नाही.
उपसूचना स्विकारणार नाही, या आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभेतील उपसूचनांना आक्षेप घेतला. त्यावरून सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये वाद झाला. रिंग रोड, स्वाइन फ्लू, आरोग्य, रस्त्यावरील खड्डे या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर विषयपत्रिकेवरील कामकाज संपल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले. त्यामुळे सभा चालू झाली. दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिस रकमेत वाढ करणे, पत्रकारांना पीएमपीएमएलचा बसपास मोफत देणे आदी विषय उपसूचनेसह मंजूर झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या काळातील कर्मचाऱ्यांना पालिकेत वर्ग करण्याचा आणि पीएमपीएमएलचे कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. त्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी उपसूचनांद्वारे भ्रष्टाचार होतो असा आरोप करणारे भाजप आता तेच करीत आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच पारदर्शक नव्हे तर खोटेनाटे काम करायचे आहे काय? असा सवाल उपस्थित केला.
बहल यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपच्या सदस्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बहलांनी विषयांतर न करता मूळ मुद्यावर चर्चा करावी. आमची सत्ता असल्यामुळे उपसूचना मंजूर करू शकतो, असे प्रत्युत्तर महापौर काळजे यांनी दिले. त्यावर चुकीच्या पद्धतीने सभागृह चालवू नका, असा आरोप करीत कोणाच्या सांगण्यावरून काम न करता स्वतःच्या अधिकाराचा वापर करा, असा सल्ला बहल यांनी दिला. त्यावर संतप्त होऊन महापौर म्हणाले, ‘माझ्यावर कोणाचा दबाव नाही. मी स्वत:च्या अधिकारांचा वापर करतो. मीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आलो आहे. तिथे कसे काम चालते? मला माहीत आहे.’ यावर सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पीठासन अधिकाऱ्यांच्या समोर उभे राहिले. आम्हांला बोलू द्या, अशी मागणी केली. त्यावर तुम्ही जागेवर बसेपर्यंत बोलू देणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर सर्व सदस्य आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न झाले.
सभेचे कामकाज पूर्ववत होताच मंगला कदम म्हणाल्या, ‘विषयानुरूपच बोलत होतो. तथापि, बोलू दिले नाही. राष्ट्रवादीच्या तालमीत आम्ही चांगलेच शिकविले. आता दुसऱ्या पक्षात गेल्यावर कोणाची आणि कशाची भीती वाटते ? महापौरपदाचा सन्मान राखा, आम्हाला बोलू द्या, दबावाखाली काम करू नका.’ यावर महापौर आणि कदम यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून काही नगरसेवकांनी ध्वनिक्षेपक बंद करा, अशा सूचना केल्या. तरीही गोंधळ थांबला नाही. शेवटी याच परिस्थितीत सर्व विषय मंजूर करून महापौरांनी सभा कामकाज संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चाच होऊ शकली नाही.

महापौरांकडून समाचार
‘महापौर दबावाखाली काम करतात. त्यांनी स्वत:चे अधिकार वापरायला हवेत. कोणाच्या तालावर भित्र्यासारखे काम करणे चुकीचे आहे,’ या विधानांचा महापौरांनी समाचार घेतला. मी कोणाच्या दबावाखाली नाही. कोणत्याही पुरुषाने चौकात भेटावे. मी दाखवतोच कोण भित्रा आहे ते, असे आव्हानात्मक प्रत्युत्तर देऊन खळबळ उडवून दिली. ‘मी कसे काम करायचे हे कोणी मला शिकवू नये. रिंगरोडवर त्यांनाच चर्चा होऊ द्यायची नव्हती. सन्माननीय सदस्यांनी जे शब्द वापरले, ते चुकीचे आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत शाळांजवळ सर्रास दारू विक्री

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी जयहिंद शाळच्या शेजारी बार, तपोवन मंदिर समोर बिअर शॉपी, पंडित जवाहरलाल नेहरूनगर येथे त्यांच्या पुतळ्याजवळील वॉइन शॉप, अजमेरा कॉलनी येथील देवीच्या मंदिरासमोर वॉइनशॉप, पिंपरी साई चौकातील समाजमंदिराजवळ दारूविक्री, संततुकारामनगर येथे वायसीएम हॉस्पिटलच्या रस्त्यावर समाजमंदिरासमोर बार, संततुकारामनगर पोलिस चौकी शेजारी परमिट रूम, टेल्को रस्त्यावरील कमलनयन बजाज शाळेसमोरील चार मद्यालय यासह चिंचवड, पिंपळेगुरव असो वा सांगवी वाकड अनेक ठिकाणी सर्रास नियम धाब्यावर बसवून दारू विक्री केली जात आहे.
शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळांच्या परिसरात नियम धाब्यावर बसवून पुणे शहरात सर्रास मद्यविक्री होत असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात पाहणी केल्यावर येथे देखील अशाच प्रकारे सर्रास मद्यविक्री होत असल्याचे दिसून आले. औंधरोड गणपती मंदिरासमोरील वाइन शॉप व परमीट रूम, खडकी डॉ. आंबेडकर रस्त्यावरील समाज मंदिरासमोरील देशी-विदेशी दारूदुकान व बार, दापोडी येथे समाज मंदिराजवळ मद्यालय, आकुर्डी म्हाळसाकांत कॉलेज जवळ दारूदुकान थाटण्यात आली आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूविक्री बंद झाली. परंतु, शहरातील अंतर्गत भागात नियमांची पायमल्ली करीत अनेकांनी दारूचा महापूर वाहण्यास हातभार लावल्याचे दिसून येते. पिंपरी कॅम्प परिसरात अनेकांची दुकान ही लीजवर आहेत. अनेकांकडे बांधकाम पुर्णत्वःचा दाखला नाही. भरवस्ती आणि बाजारपेठेत दारू विक्री केली जात आहे. आर्यसमाज शाळेच्या चौकात दारू विक्रीची दोन दुकान आहेत. चिंचवड लिंक रस्ता असो वा जगताप डेअरी चौक ते कोकणे चौक असो अनेक बार हे विविध पळवाटांचा आधार घेऊन सुरू करण्यात आले आहेत. हायवेवरील दारू विक्री बंद करण्याचे आदेश असताना देखील काहींनी हॉटेलला वळसा घालून ५०० मीटरचे अंतर कमी करण्याची शक्कल लढविली आहे.
महाविद्यालयांच्या इमारतींपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बार-वाईन शॉपमुळे विद्यार्थ्यांची दिवसाढवळ्या देखील येथे गर्दी होताना दिसते. संततुकारामनगर भागात डी.वाय. पाटील कॉलजचे दोन मोठे कॅम्पस आहेत. देशविदेशातून याठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. पण या दोन्ही कॅम्पसच्या आसपास चार ते पाच दारू विक्रीची दुकान सुरू आहेत. शाळा महाविद्यालय, समाज मंदिरापासून किमान ७५ मीटरच्या आत दारू विक्री होऊ नये असा नियम आहे. पण त्याची पळवाट म्हणून काहींनी हॉटेलचे प्रवेशव्दार दुसऱ्या बाजूला दाखवून मद्यविक्री सुरू ठेवली आहे. शहरातील बहुतांष ठिकाणी हीच परिस्थिती असून, राज्य उत्पादन शुल्कविभाग आणि शासनाकडून याकडे काणाडोळा केला जात आहे.

आधी बार की आधी शाळा...
शहरातील बहुतांष ठिकाणी शाळा, महाविद्यालय, समाजमंदिराजवळ दारू विक्री होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आधी बार की आधी शाळा हे देखील पाहिले जाते. जर बार किंवा दारू विक्री दुकान आधी सुरू झाले असेल आणि त्यानंतर शाळा सुरू झाली असल्यास दारू दुकानावर कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून कायदे तेवढ्या पळवाटा ही उक्ती स्पष्ट होत आहे.

फोटो पाठवा
शाळा-महाविद्यालये किंवा प्रार्थना स्थळांपासून मद्य विक्रीची दुकाने किंवा बिअर बार ७५ मीटरच्या आत असल्याचे तुम्हांलाही आढळून आल्यास त्याची छायाचित्रे ‘सिटीझन रिपोर्टर’च्या माध्यमातून पाठवा. अशा छायाचित्रांना प्रसिद्धी देण्यात येणार असून, छायाचित्र पाठविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्यात २५३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील २५३ गावांना अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या विभागात २४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये १५०, सातारामध्ये ५२, पुणे जिल्ह्यात ३७ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही टँकरची मागणी नाही; मात्र सांगलीत अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. या जिल्ह्यातील १४७ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यामधील पुरंदरमध्ये २२, बारामतीत ११, दौंडमध्ये दोन; तर शिरूरमध्ये एक टँकर अशा ३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ८० गावे आणि २५१ वाड्यांमध्ये ५२ टँकरने पाणी पुरविले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये तीन आणि माळशिरसमध्ये एक टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात पर्यटकाचा बुडून मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळ्याजवळील टायगर व लायन्स पॉइंट नजीकच्या गिधाड धबधब्याच्या सुमारे १२ ते १५ फूट खोल खड्डयात पडून मुंबई येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धवल विजय परमार (वय २६, रा. अंधेरी, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. धवल हा त्याच्या एका मित्रासह तीन मैत्रिणी समवेत त्यांच्या कारने सकाळीच वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी आला होता. ते सर्वजण लोणावळ्याजवळील टायगर व लायन्स पॉइंट परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या वेळी ते सर्व गिधाड धबधब्याच्या सुमारे ३० ते ४० उंचीवरून जोरात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. धवलला धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे १२ ते १५ फूट खोल झालेल्या खड्ड्याची कल्पना नसल्याने त्याने त्या खड्डयात उडी मारली. लोणावळा परिसरातील डोंगर पठारावर मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार व मुसळधार पाऊस पडत आहे. गिधाड तलाव ओसंडून वाहत असल्याने तलावाचे पाणी मोठ्याप्रमाणात गिधाड धबधब्यातून जोरात वाहत आहे. यामुळे धवलला उंचीवरून जोरात वाहणाऱ्या पाण्यामुळे वर येता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कळताच लोणावळा शहरचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेत दिनेश कोकरे, दिनेश मरगळे व राजू हिरवे या स्थानिक तरुणांच्या मदतीने धवलचा मृतदेह दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.

पाच दिवसांतील दुसरी घटना
मागील अनेक वर्षांपासून गिधाड धबधब्यात बुडून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मागील रविवारी हडपसर पुणे येथील एका तरुणाचा भुशी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या घुबड धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही पाचव्या दिवसातील दुसरी घटना घडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयेजा सिटी रस्त्याची पुन्हा झाली चाळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरातील (सिंहगड रोड) प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्यामुळे केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सिंहगड रोड भागातून प्रयेजा सिटी आणि आसपासच्या अन्य वसाहतींकडे हा रस्ता जातो. या परिसरात मोठी लोकवस्ती असून त्यांच्या येण्याजाण्यासाठी हाच प्रमुख रस्ता आहे. त्याबरोबरच या भागातून वारजे आणि मुंबई बायपासकडे जाण्यासाठीही या रस्त्याचा मोठा वापर होतो. पूर्वीपासून हा रस्ता खराब झाला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यासाठी मोठा पैसा खर्च करण्यात आला आहे. आधी हा रस्ता पूर्ण खोदण्यात आला. त्यानंतर गटारे व अन्य कामे करून त्याचे डांबरीकरण झाले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा चाळण झाली आहे. काही दिवसांच्या पावसातच हा रस्ता पूर्ण उखडला असून तेथे पाण्याची मोठी तळी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे.
विशेष बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वी येथे डांबरीकरणाचे काम झाले, त्याआधी सहा महिन्यांपूर्वीच याच रस्त्याचे डांबरीकरण करून नव्या फूटपाथसह सुसज्ज रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, पुन्हा तो रस्ता खोदण्यात आला आणि नवे काम करण्यात आले. त्या कामाचीही वाट लागल्यामुळे नागरिकांच्या हालांमध्ये भर पडली असून महापालिकेचा कररूपी पैसा पुन्हा खड्ड्यात गेला आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’वर नियंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ऑनलाइन’ अभ्यासक्रमांच्या दुकानदारीवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नियंत्रण आणले असून या अभ्यासक्रमांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी आता विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नोंदवणेही बंधनकारक केले आहे. तसेच, आता यापुढे तांत्रिक आणि व्यावसायिक विद्याशाखांचे ऑनलाइन अभ्यासक्रम चालवता येणार नसल्याचेही नियमावलीत स्पष्ट केले आहे.
देशात अनेक विद्यापीठे, खासगी संस्थांकडून ऑनलाइन अभ्यासक्रम चालवण्यात येतात. त्यांची प्रमाणपत्रेही दिली जातात. दूरशिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून सोयीच्या वेळी शिक्षण देणे किंवा मार्गदर्शन मिळणे या उद्देशाने ऑनलाइन अभ्यासक्रमांची संकल्पना सुरू झाली. मात्र, त्यांचे नियमन होत नसल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकारही होत आहेत. या अभ्यासक्रमांतून मिळालेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता देतानाच त्यांच्यासाठी आता स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे.
यूजीसीच्या नियमावलीनुसार ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक नोंदणीच्या वेळी देणे बंधनकारक आहे. तसेच, परीक्षा देताना देखील हा क्रमांक लागणार आहे. त्याचप्रमाणे इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूरचना या विद्याशाखांचे आणि वैद्यकीय विद्याशाखांचे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करता येणार नाहीत. नोकरी करणाऱ्या किंवा नियमित पद्धतीनुसार शिकू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करून अभ्यासक्रमांची रचना करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या अभ्यासक्रमांना प्रात्यक्षिके किंवा प्रयोगशाळेत काम करावे लागत नाही, असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. नियमित अभ्यासक्रमांपेक्षा अधिक तीन वर्षे असा कालावधी ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी गृहित धरण्यात येईल. याबाबतची नियमावली यूजीसीने जाहीर केली असून त्यावर एक महिन्याच्या कालावधीत सूचना किंवा अभिप्राय देता येणार आहे. त्यासाठी यूजीसीकडून ugc.online2017@gmail.com हा ईमेल आयडी देण्यात आला आहे.
ज्या शिक्षणसंस्थांना सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत; तसेच राष्ट्रीय मूल्यांकन व श्रेयांकन परिषदेकडून (नॅक) त्यांना ‘अ’ दर्जा मिळाला आहे, अशाच संस्था आता ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करू शकतात. अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्थांना ऑनलाइन अभ्यासक्रमांचा स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यासाठी संचालक आणि इतर नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणेही बंधनकारक झाले आहे. त्यामुळे यापुढे नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थांना ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, असे नियमावलीवरून स्पष्ट होते.

पुढील काळात ऑनलाइन अभ्यासक्रम कसे असतील?
- तंत्रशिक्षण किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम करता येणार नाहीत.
- ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी नोंदणी तसेच परीक्षेसाठी आधार बंधनकारक
- परीक्षेसाठी बायोमेट्रिक किंवा त्या प्रकारची पद्धत वापरणे संस्थांसाठी बंधनकारक
- अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियमित अभ्यासक्रमापेक्षा तीन वर्षे जादा कालावधी
- संस्थांनी अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक
- स्वतंत्र अभ्यासक्रम रचना असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयराज ग्रुपच्या वतीने हमालांची नेत्रतपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जयराज ग्रुपच्या वतीने हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुमारे दीड हजार हमालांची नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच पाचशे हमालांना चष्म्यांचे वाटप, रेटिना स्क्रिनिंगही करण्यात आले.
हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हमालांच्या तपासणीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या वेळी काढले. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, हमाल पंचायत पुणे, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट यांचा या उपक्रमात सहभाग होता. या वेळी जयराज ग्रुपचे राजेश शहा, धवल शहा, कांतीलाल गुंदेचा, रवींद्र नहार, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, अहमदाबादच्या कंचनहिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉ. अतुल भावसार, कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, ‘मेडा’चे सरव्यवस्थापक किशोर शिंदे, ‘ग्राहक पेठ’चे सूर्यकांत पाठक, पूना हॉस्पिटलचे विश्वस्त देवीचंद जैन, रोटरी कात्रजचे अध्यक्ष विभाकर रामतीर्थकर व सदस्य, डिवाइन जैन ट्रस्टचे संकेत शहा व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी १५०० हमाल कामगारांची नेत्र तपासणी, ५०० चष्मे वाटप, ५० रेटीना स्क्रीनिंग, ५० मोतीबिंदूचे निदान करण्यात आले. त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल येथे करण्याचे ठरले. राजेश शहा यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरपत्रक बदलाची सल्लागाराची सूचना

$
0
0

आक्षेप टाळण्यासाठी ‘जीएसटी’ अन्वये सुधारणा आवश्यक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या विविध कामांसाठी तयार करण्यात आलेल्या विभागीय दरपत्रकात (डीएसआर) बदल करण्याच्या सूचना कर सल्लागाराने केल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व कर रद्द करून लागू केलेल्या वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’च्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जुन्या दरपत्रकानुसार वस्तूंची खरेदी केल्यास ऑडिट करताना त्यामध्ये आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांनी सुधारित करपत्रक सादर करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
‘जीएसटी’मुळे पालिकेच्या विविध सेवांवर नक्की काय परिणाम होणार आहे, जीएसटीची अंमलबजावणी विभागांनी नेमकी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पालिकेचे कर सल्लागार असणाऱ्या गावडे अँड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दरपत्रक बदलाची सूचना केली. आगामी काळात लेखापरीक्षणात (ऑडिट) आक्षेप घेण्यासाठी संधी मिळू नये, यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. ज्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप त्यांना मान्यता मिळालेली नाही अशा कामांच्या फेरनिविदा नवीन दरपत्रकानुसार तयार करण्याविषयी सूचना बैठकीत करण्यात आल्या.
पालिकेला विविध कामांसाठी वर्षभर खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंच्या बाजारातील दराचा आढावा घेऊन दरपत्रक केले जाते. निविदा प्रक्रिया राबविताना दरपत्रकाचा आधार घेऊन ठेकेदारांना कामे दिली जातात. आतापर्यंत सेवा कर आणि व्हॅटबरोबरच विविध करांची आकारणी करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचा समावेश करून सर्व विभागप्रमुख दरपत्रक तयार करीत होते. मात्र, देशात आता ‘जीएसटी’ची अंमलबजावणी सुरू झाल्याने काही वस्तूंचे दर वाढले आहेत, तर काहींच्या दरात घट झाली आहे. एक जुलैपासून ‘जीएसटी’ची अंमलबजावणी झाल्याने ठेकेदारांना ‘जीएसटीएन’ घेऊन शुल्क भरावे लागणार आहे. पालिकेने जुन्याच दरपत्रकाची अंमलबजावणी करून ठेकेदाराला काम दिल्यास पालिकेला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
पालिकेने केलेल्या वस्तूंच्या खरेदीचे ऑडिट राज्य, केंद्र पातळीवर तसेच ‘कॅग’मध्ये केले जाते. त्यामुळे जुन्या दरपत्रकानुसार खरेदी झाल्यास भविष्यात आक्षेप घेतला जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी ‘जीएसटी’नुसार वस्तूंच्या दरानुसार पालिकेच्या प्रत्येक विभागाने नव्याने दरपत्रक तयार करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार जीएसटीची अंमलबजावणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. जीएसटीमुळे काही वस्तूंचे दर वाढले आहेत, तर काहींचे घटले आहेत. त्यामुळे नवीन दर लक्षात घेऊन विभागप्रमुखांनी आठ दिवसांत दरपत्रक सादर करावेत, असे आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनजीटीने महामेट्रोला फटकारले

$
0
0

वकील गैरहजर राहिल्यास अंतिम निर्णय घेण्याचा दिला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोरील (एनजीटी) सुनावणीस महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) वकील गुरुवारी अनुपस्थित राहिले. या कृतीची गंभीर दखल घेऊन आगामी सुनावणीस वकिलांनी उपस्थिती न लावल्यास याचिकेवर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी तंबीही ‘एनजीटी’ने महामेट्रोला दिली. प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जुलैला होणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते रामवाडी या मार्गावरील १.७ किमीच्या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गाला पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. या मार्गामुळे नदीची वहनक्षमता कमी होणार असल्याचा दावा करून खासदार अनु आगा आणि इतरांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी मे मध्ये झालेल्या सुनावणीत महामेट्रोचे वकील अनुपस्थित होते. त्याचवेळी, गुरुवारी सुनावणी होणार असे निश्चित झाले होते. तरीही, महामेट्रोचे वकील हजर राहिले नाहीत. महामेट्रोचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहत असल्याचा आरोप याचिकाकर्ते सारंग यादवाडकर यांनी केला आहे.
नदीपात्रातील मेट्रो मार्गाबाबत केवळ नियोजन करण्यास ’एनजीटी’ने मुभा दिली आहे. मात्र, महामेट्रोने काम सुरू करण्याची तयारी केली आहे. या मार्गासाठी टेंडर काढण्यात आले असून, नदीपात्रातील कामावर बंधने आली तर नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होईल. त्यामुळे, हे काम थांबवावे, अशी मागणी करणारे पत्र याचिकाकर्त्यांनी न्यायाधिकरणासमोर सादर केले. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर कोर्टाने महामेट्रोच्या वकिलांनी पुढील सुनावणीस बाजू मांडण्यास हजर राहावे, असे आदेश दिले. या सुनावणीला गैरहजर राहिल्यास याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात येईल, असेही बजावले.

नदीपात्रातील कामांचा निकाल लागणार?
या संदर्भातील ‘एनजीटी’समोरील पुढील सुनावणी येत्या, सोमवारी ( २४ जुलै) होणार आहे. याच सुनावणीत नदीपात्रातील कामावर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत ‘एनजीटी’कडून निर्णय होण्याची शक्यता आहे. ‘एनजीटी’ने यापूर्वी मेट्रोच्या कामाला अंतरिम स्थगिती दिली होती; पण ‘महामेट्रो’ने सुप्रीम कोर्टात जाऊन ‘एनजीटी’च्या निर्णयावर स्थगिती घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’विषयक विशेष कार्यक्रम

$
0
0

तज्ज्ञांच्या उपस्थितीत शंकानिरसनाची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा तसा गुंतागुंतीचा विषय...मात्र, तो नेमका गुड आणि सिंपल कसा आहे, हे याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजून घेण्याची संधी आज, शुक्रवारी पुणेकरांना मिळणार आहे. तसेच, जीएसटीविषयीच्या सर्व शंकाचे निरसनही करून घेता येणार आहे.
निमित्त आहे, ‘मटा पुणे सुपरफास्ट-जीएसटी स्पेशल’ या कार्यक्रमाचे.... आज, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. केंद्रीय जीएसटीच्या पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर आणि उपायुक्त राजलक्ष्मी कदम उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार आहेत.
वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी नेमका आहे तरी काय, कोणत्या वस्तू किंवा सेवांकर किती कर आहे, जीएसटीसाठी नेमके किती रिटर्न भरायचे, एखाद्या वस्तूवर इनपुट क्रेडिट नेमके किती आणि कसे मिळणार, एखाद्या व्यापाऱ्याने नोंदणी केली नाही किंवा एंट्री दाखवली नाही, तर दंड कोणाला बसणार, आइस्क्रीम व सॉफ्टड्रिंक एकत्र विकले तर किती कर आकारायचा, एसी, नॉन एसी हॉटेलचे बिलिंग कसे करायचे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात मिळणार आहेत. आपल्याला आकारण्यात आलेला कर योग्य आहे का, आपली फसवणूक तर होत नाही ना, जीएसटीमुळे नेमके काय महाग होणार, काय स्वस्त होणार याची सामान्य
ग्राहकांना चिंता सतावत आहे. या सर्व शंका, समस्यांचे निराकरणही कार्यक्रमात होणार आहे. शहरातील विविध व्यापारी-व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी, सदस्य, व्यापार-उदीम क्षेत्रातील मान्यवरही या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

‘मटा पुणे सुपरफास्ट- जीएसटी स्पेशल’
कुठे : आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता
कधी : आज, शुक्रवारी
किती वाजता : सायं. ५.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोत यांचा 'स्वाभिमानी'ला राम-राम?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अखेर संघटनेला राम-राम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत. 'आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम', असं सूचक वक्तव्य करूनच ते चौकशी समितीशी चर्चा करायला गेलेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची चिन्हं आहेत.

सदाशिव खोत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आल्यानंतर काही महिन्यांतच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विसरले, असा आरोप शेट्टी आणि त्यांचे समर्थक करत होते. परिणामी, एकेकाळच्या या जिगरी दोस्तांमधील दरी वाढत गेली. वाद इतका विकोपाला गेला की, वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशाचे ‘हिशेब’ही त्यांनी जाहीरपणे चुकते केले. त्यानंतर, गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्यात खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी, खोत यांच्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, असं सूचक विधान शेट्टींनी केलं होतं. खोत यांची स्वाभिमानीमधून हकालपट्टी होणार आणि ते भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. परंतु, त्यापैकी काहीच झालं नव्हतं.

या पार्श्वभूमीवर, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीशी चर्चा करण्याआधी सदाभाऊंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली आणि संघटना सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले.

आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम. ऑगस्ट महिन्यापासून राज्यभर दौरा करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे शिबीर घेऊ. स्वतंत्र संघटना उभारावी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही कार्यकर्तेच मायबाप आहात. तुमच्यामुळेच खुर्चीत बसलोय. मी संघटनेच्या विरोधात कुठलंही काम केलेलं नाही, अशी भूमिका सदाभाऊंनी मांडली. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images