Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वीणाताईंच्या स्मृतींना उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिया मल्हार, रागेश्री, बिलासखानी तोडी अशा रागांमधील बंदिशी सादर करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींनी ज्येष्ठ गायिका विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांना आदरांजली वाहिली. प्रयोगशील वीणा हा कार्यक्रम सादर करून त्यांनी वीणाताईंच्या आठवणींना उजाळा दिला.

वीणा सहस्रबुद्धे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘वीणावादिनी वरदे’ हे प्रार्थनागीत सादर करण्यात आले. या गीतातून वीणाताईंना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर गायिका अंजली मालकर यानी राग रागेश्रीतील तराणा; तसेच शुद्धसारंग रागातील ‘आओ रे आओ कारे बदरा’ ही बंदिश सादर केली. आरती पाठक यांनी ‘हमें ना सिखाओ’ ही बिलासखानी तोडीतील बंदिश व ‘सिद्ध भजो’ हे निर्गुणी भजन सादर केले. या दोन्ही सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. डॉ. राजश्री महाजनी यांनी राग मिया मल्हारमधील ‘गहर आयो रे बादरवा’ ही बंदिश सादर केली.

सर्व गायिकांनी एकत्र राग हंसध्वनीतील ‘विहरती ब्रह्मनंदिनी'’ ही बंदिश सादर केली आणि या संगीत मैफलीचा कळस गाठला. अंजली आपटे यांनी वीणाताईंवर केलेल्या स्वरचित कवितेचे गायन केले. अरूण गवई यांनी (तबला) अमृता माळी (हार्मोनियम) या कलाकारांनी सुरेल साथसंगत केली.

‘महाविद्यालयात अध्यापन करताना अनेकदा अपरिहार्यतेमुळे शिकवावे लागणारे संगीत प्रकारही वीणाताईं मन लावून शिकवत असत. कोणत्याही सामान्य शब्दरचना असलेल्या काव्याला उत्तम चाल देऊन ते काव्य उंचीवर कसे जाईल, असा त्यांचा प्रयत्न होता,’ अशा शब्दांमध्ये संगीत विभागातील प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा धुमाळे यांनी वीणाताईंची कार्यशैली उलगडली. कार्यक्रमात वीणाताईंच्या काही ध्वनिचित्रफितीही दाखवण्यात आल्या. सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती बऱ्हाटे तसेच डॉ. रेखा इनामदार साने, भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे, माजी संगीत विभाग प्रमुख लता गोडसे, गायिका अपर्णा गुरव, किशोरी जानोरीकर, रंजना काळे आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओढ्यात पडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

भोर : वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील कुर्तवडी गावातील ओढ्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांनी गोंडेखल येथे बुधवारी दुपारी सापडला. जितेंद्र प्रकाश आंबेगावकर (वय ३६, रा. बुधवार पेठ, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आंबेगावकर यांचा गेले चार दिवस शोध सुरू होता. पानशेत धरणापासून सुमारे २५ किमी अंतरावर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कुर्तवडी गाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावकर रविवारी आपल्या मित्रांसोबत पानशेतवरून कुर्तवडी येथे राहणाऱ्या मित्रांकडे चारचाकी गाडी घेऊन निघाला होता. या परिसरांत गेल्या आठवड्यापासून मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे दुथडी भरून वाहत आहेत. कुर्तवडीजवळ आल्यावर आंबी नदीवरील एका ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याचा वेगही खूप होता. पाणी कीती आहे याचा अंदाज घेण्यासाठी जितेंद्र पुलावर गेला. परंतु, पुलावरील शेवाळावरून त्याचा पाय घसरला आणि तो वाहून गेला. कारमधील मित्रांनी मदतीसाठी हाका मारल्या. परंतु, आसपास कोणीही नव्हते. या ओढ्याचे पाणी पानशेत धरणात जाऊन मिळते. त्यामुळे पानशेत धरण परिसरात पुणे अग्निशमन दल आणि स्थानिकांमार्फत त्याचा शोध सुरू होता.

वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागांत पावसाळ्यात पर्यटक, नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेऊन फिरावे. अतिधाडसाचे पाऊल कोणीही उचलू नये, असे वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकाला आठ वर्षे सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने समोरच्या पिकअपला धडक देऊन पुढे जावून आणखी तीन ठिकाणी अपघात करून चौघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच चौघांना जखमी केल्याप्रकरणी एका ट्रकचालकाला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेत सात वाहनांचे नुकसान झाले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
सोमनाथ गणपत मुळूक (वय ४३, रा. चासकमान, ता. खेड) याला या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार आबाजी बाबूराव ठोंबरे यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी १२ साक्षीदार तपासले. २५ मार्च २०१२ रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लोणीकंद गावाच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेत प्रिया चौहान (वय एक वर्ष), प्रतिभा चौहान (२०), जितेंद्र साळवे (३५), राजेंद्र कर्पे (६५) या चौघांचा मृत्यू झाला.
अनिता जितेंद्र साळवे (२५, रा. दिघी), अशोक ढोरे ( रा. येरवडा), सुंदर चौहान (२२, रा. लोणीकंद), रफिक अजिज शेख (५२, रा. मंगळवार पेठ) हे चौघे जखमी झाले होते.
नगरच्या बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या भरधाव ट्रकने पिकअप टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की पिकअप टेम्पोविरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेला. पिकअप पलटी होताना त्याच्याखाली एक दुचाकी सापडली होती. पिकअपला धडक दिल्यानंतर ट्रक ड्रायव्हरने पुढे जावून एक जीपला आणि अॅपे रिक्षाला धडक दिली. त्यानंतर एका किराणा मालाच्या दुकानाला ट्रक धडकला होता.
सुंदर चौहान घटनेच्या दिवशी लोणीकंद येथे पंढरीनाथ हॉटेलच्या शेजारील किराणा माल दुकानात सामान भरत होते. त्यांची पत्नी प्रतिभा ही एक वर्षाची मुलगी प्रिया हिला घेऊन फुटपाथच्या कट्ट्यावर बसली होती. ट्रकची धडक बसून सुंदर चौहान खाली पडले. प्रतिभा आणि प्रियालाही धडक बसली होती. प्रियाचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या प्रतिभा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. चौहान यांना धडक देण्यापूर्वी ट्रकने इतर वाहनांना धडक दिली होती. या घटनेत सात वाहनांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाणीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
घरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाने धानोरी येथील खाणीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

संजोग थोकोबा वाघमारे (वय ३६, रा. लक्ष्मी सत्यम रेसिडेन्सी, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

संजोग हा धानोरीत राहण्यास असून रोज रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी जात होता. रविवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे बाहेर फिरण्यासाठी गेला. रात्री अकराच्या सुमारास मोबाइलवरून आईला फोन करून घरी येणार नसून मित्राकडे मुक्कामाला जात असल्याचे त्याने सांगितले होते.

संजोग सोमवारी सकाळी घरी परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. दोन दिवस उलटल्यानंतर बुधवारी सकाळी धानोरी खाणीतील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना काही स्थानिक नागरिकांनी दिसला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौगुले यांनी दिली. संजोग हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

पंधरा दिवसांत तीन आत्महत्या

पंधरा दिवसांपूर्वीच विश्रांतवाडी परिसरात राहणारा सनी जगताप आणि येरवड्यात राहणारी शीतल गायकवाड या प्रेमी युगलाने प्रेमप्रकरणातून धानोरी खाणीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी संजोग वाघमारे या तरुणाने पाण्यात उडी मारून जीवन संपविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्ती स्वप्नच

$
0
0

बारामती नगर परिषदेच्या निर्णयानंतरही नियमावली नाही

म. टा. प्रतिनिधी, बारामती
प्लास्टिक कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव करूनही बारामती नगर परिषदेचे प्रशासन या प्रश्नावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सात वर्षानंतरही प्लास्टिकमुक्त बारामती कागदावरच असल्याचे चित्र आहे.

प्रभागातील कचरा प्रभागात जिरवा, ही योजना किंवा कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे विकेंद्रीकरण आणि कचऱ्याचे वर्गीकरण होत असल्याचा प्रशासनाचा दावा यानिमित्ताने फोल ठरला. शहरातील प्लास्टिक कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. प्लास्टिकमुळे कचरा निर्मूलन, तसेच कचरा जमिनीमध्ये जिरविण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय बारामती नगर परिषदेने १६ एप्रिल २०१० रोजी घेतला होता. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेले अधिकारी निष्क्रिय असल्यामुळे त्यांनी फक्त कागदावरच कारवाई करत धन्यता मानली. त्यामुळे सात वर्षांनंतरही नियमावली तयार झाली नसल्याने बारामती प्लास्टिकमुक्त झालेली नाही.

तांत्रिक कारणामुळे नियमावली नाही

राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीबाबत रंगनाथन समिती नेमली होती. त्या समितीने संपूर्ण प्लास्टिक बंदी करता येणार नसल्याची शिफारस केली होती. तरीही बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने सात वर्षांपूर्वी १०० टक्के प्लास्टिक बंदीचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करून ती राज्य सरकारकडे पाठविण्याचे ठरविले होते. मात्र, राज्य सरकार या नियमावलीला कशाच्या आधारावर मान्यता देणार, हा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषदेने नियमावलीच तयार केली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

शहरात प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व फेरीवाले, भाजीपाला, फळे, फुले विक्रते यांच्यावरही दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने सांगितले.
...
बारामती प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आरोग्य प्रशासन कारवाई करणार आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे.
- सुभाष नारखेडे, मुख्य आरोग्य निरीक्षक, बारामती नगर परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवार पेठेतील आठ कुंटणखाने सीलबंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवार पेठेतील आठ कुंटणखाण्यावर कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुंटणखाने सीलबंद करण्यात आल्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही कुंटणखाने सीलबंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैधधंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शहरातील अवैध धंद्यावर कारवाई सुरू होती. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठेत सज्ञान व अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यावसाय चालत असणाऱ्या कुंटणखान्यावर छापे टाकण्यात आले. या प्रकरणी पिटा अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून सतत वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे स्थानिक पोलिसांना आढळून आले होते. सतत कारवाई कारवाई होणारे कुंटणखाने सीलबंद करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे पाठविण्यात येतो. या प्रस्तावावर पोलिस आयुक्तांमार्फत नोटिसा काढण्यात येतात. त्यानंतर या प्रस्तावांवर पोलिस आयुक्त सुनावणी घेतात. दोषी आढळलेल्यांवर सीलबंदीची कारवाई केली जाते. त्यानुसार, पोलिस आयुक्तांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (१९५६) मधील कलम १८ व २० च्या तरतुदीनुसार आठ कुंटणखाने सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत.
अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (१९५६) तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी व अतिरिक्त दंडाधिकारी म्हणून पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम मधील कलम १८ व २० च्या प्रयोजनासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांचे अधिकार देखील त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून पोलिस शुक्ला यांनी हे आठ कुंटणखाने सीलबंद केले आहेत. गेल्या काही वर्षातील कुंटणखाने बंद केल्याची ही मोठी कारवाई आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहोळच्या खुनातील आरोपीकडून खंडणीची मागणी

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुख्यात संदीप मोहोळच्या खुनातील दोन आरोपींनी कोर्टाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानदाराला मारहाण करून पैसे न दिल्यास तुरुंगात राहून ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अनिल वाघू खिलारे (वय ४६) व सागर वाघू खिलारे (४२, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुभाष मारणे (४८, रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल खिलारे याच्यावर संदीप मोहोळच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर, तक्रारदार मारणे यांचे शुक्रवार पेठेत दुकान आहे. त्यांचा भाऊ अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून गुंड संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अनिल खिलारे व त्याच्या साथीदारांनी २००७ मध्ये संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी अनिल खिलारे हा जामिनावर सुटून बाहेर आला आहे. तक्रारदार यांनी खिलारे व त्याचे साथीदार तुरुंगात असताना भेट घेतली नाही. तसेच, तो तुरुंगातून आल्यानंतरही त्याची भेट किंवा मदत केली नाही. त्यामुळे मारणे यांच्यावर आरोपीचा राग होता. मारणे यांची शुक्रवार पेठेत जागा असून, त्यांनी ती एका दुकानदाराला भाड्याने दिली होती. खिलारेने त्या दुकानदाराला दमदाटी करून ते दुकान रिकामे करण्यास भाग पाडले.
तक्रारदार यांनी नऊ जुलैपासून त्या ठिकाणी गॉगल व घड्याळाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर अनिल व सागर खिलारे यांनी दुकानात येऊन कामगाराला शिवीगाळ केली. त्यांना दुकान बंद करण्यास सांगितले. तसेच, सुभाष मारणे यांना भेटायला येण्याचा निरोप दिला. मात्र, मारणे हे त्यांना भेटण्यास गेले नाही. त्यानंतर चिडून मंगळवारी दुपारी अनिल खिलारे व सागर खिलारे हे दुकानात आले. मारणे यांना शिवीगाळ करीत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, ‘तुझ्या भावामुळे आम्ही गुंड संदीप मोहोळचा खून केला. या खून प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू होत आहे. त्यासाठी मला दहा लाख रुपये दे. हे दुकान सुरू ठेवायचे असल्यास दरमहा दहा हजारांची खंडणी दे,’ अशी मागणी केली. ‘पैसे न दिल्यास तुरुंगातून तुझा गेम वाजवू,’ अशी धमकी दिली. त्यानंतर तक्ररादार यांनी तत्काळ खडक पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक संजय गाडकवाड यांच्या पथकाने दोघांना अटक केली. या प्रकरणी गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिखलीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिखली येथील पूर्णानगर परिसरात राहत्या घरी ३८ वर्षीय महिलेने बुधवारी (१९ जुलै) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा प्रकाश पाटील (रा. राजवर्धन अपार्टमेंट, पूर्णानगर, चिखली) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पूर्णानगर येथे दोन मुले व पती यांच्यासोबत राहत होती. पतीचे कामामुळे सतत बाहेरगावी जाणे-येणे असते. बुधवारी देखील ते कामानिमित्त कानपूर येथे होते. पूजा यांचा मोठा मुलगा दहावीला आहे; तर छोटा मुलगा पहिलीला आहे. छोटा मुलगा अपंग असून, सकाळी पूजा त्याला शिकवणीसाठी सोडायला गेल्या होत्या. मात्र, त्याची शिकवणी संपल्यानंतर शिकवणीच्या शिक्षिकेने पूजा यांना मुलाला घेऊन जा हे सांगण्यासाठी फोन केला. परंतु, पूजा यांनी फोन घेतला नाही. त्यांनी बराचवेळा वाट पाहिली; मात्र पूजा या न आल्याने त्यांनी सरळ पाटील यांचे घर गाठले. तसेच, दरवाजा वाजवूनही आतून काही प्रतिसाद दिला न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. तरीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी ही बाब त्यांचे पती प्रकाश यांना कळविली. त्यांनी वाकड येथील नातेवाइकांना घरी पाठविले असता, दार तोडल्यावर पूजा यांनी घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे उघड झाले. पूजा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन्ही पालख्या परतल्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी आळंदीत परतली. संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीत मुक्कामाला असून, गुरुवारी (२० जुलै) देहूत परतणार आहे. दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३२ दिवसांच्या प्रवासानंतर अलंकापुरीत परतली. सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. देहूफाटा येथे वारकरी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रींची पालखी धाकट्या पादुकाजवळ आल्यानंतर परंपरेप्रमाणे चोपदारांनी मंदिरात जाऊन माउलींचा पालखीसोहळा आळंदीसमीप आल्याचा निरोप दिला. या वेळी देऊळवाड्यातील वीणा मंडपात विष्णुबुवा चक्रांकित यांचे वतीने हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा चालू होती. पालखी येताच देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक माउली वीर, पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांनी वेशीवरील जुन्या पुलाजवळ स्वागत केले.
पालखी परतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज अर्ध पुतळा स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. ह. भ. प. मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या उपस्थित करण्यात आले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पालखीचे स्वागत केले. स्मारक परिसरासह मंदिरात पुष्प सजावट करण्यात आली होती.
आरती आणि पूजनानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सनई चौघडा वादन झाले. पालिका चौकात रथातून ‘श्रीं’ची पालखी उतरविण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी आजोळघरमार्गे श्री लक्ष्मी-नारायण मंदिर, श्रीराम मंदिरमार्गे प्रदक्षिणा करीत हरिहरेंद्र स्वामी मठामार्गे देऊळवाड्यात आणण्यात आली. सोहळ्यातील परंपरेचे पालन करण्यात आले. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठावर पिठलं- भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्नदानाची सेवा रुजू केली. आळंदी देवस्थानच्या वतीने सोहळ्यातील मानकऱ्यांना नारळप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुवारी (२० जुलै) एकादशी असल्यामुळे माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास देऊळवाड्यातून बाहेर येईल. हजेरी मारुती मंदिरात बारा वाजता दिंड्यांची हजेरी होणार आहे. येथे प्रथेने दिंड्याची हजेरी नारळ प्रसाद वाटप होणार आहे.

तुकोबांची पालखी पिंपरीत
पुण्यातील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीवाघेरे गावातील श्री भैरवनाथ मंदिरात मुक्कामाला होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखीचे आगमन होताच जलधारांनी भाविकांचे स्वागत केले. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही उत्साह होता. येथे परंपरेप्रमाणे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज प्रासादिक दिंडी क्रमांक ४९ (पालखी रथामागे) यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, भीमाबाई फुगे यांनी पालखी रथाचे स्वागत केले. दिंडीचे प्रमुख चिंधाजी गोलांडे (मामा), अंकुश वाघेरे, अण्णा कापसे, जयवंत शिंदे आदींनी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा केली. गुरुवारी (२० जुलै) सकाळी सात वाजता पालखी देहूकडे मार्गस्थ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचना सहसंचालकासह पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कंपनीच्या नावाचा फायदा घेऊन बनावट कागदपत्राच्या आधारे १८० गाड्या विकून फसवणूक केल्याच्या आरोपावरून अमरावती येथील नगररचना सहसंचालक, त्यांची पत्नीसह अन्य एकावर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ओमसाई ऑटोमोबाइलचे नितीन साहेबराव पाटील (वय ४०, रा. कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (५३), त्यांची पत्नी (४०, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि नवनाथ ऑटोमोबाइल कंपनीचे भागीदार प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगडरोड, पर्वती) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पाटील यांची ओमसाई ऑटोमोबाइल हे गाड्यांची विक्री करणारे डिलर आहेत. पाटील यांनी त्यांच्या कंपनीमध्ये संगीता हनुमंत नाझीरकर यांना भागीदार केले होते. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी भागीदारी तोडली. यासाठी त्यांनी संगीता नाझीरकर यांना ६८ लाख रुपये दिले. भागीदारी संपली असताना ओमसाई ऑटोमोबाइलचे हक्क पाटील यांच्याकडे होते. त्यानंतर संगीता नाझीरकर आणि प्रवीण सोरटे यांनी नवनाथ ऑटोमोबाईल कंपनी स्थापन केली. परंतु, ओमसाई ऑटोमोबाइल कंपनीची भागिदारी संपली असतानाही कंपनीच्या रजिस्टर प्रमाणपत्राचा आधार घेऊन तब्बल १८० गाड्यांची विक्री करून पाटील यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने पाटील यांनी सुरुवातीला पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल न झाल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक एस. डी. नरके अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्यांना जामीन नाकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बलात्कार केल्याची खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात दोन महिलांसह एकाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. पाटील यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

प्रणाली पवार उर्फ पूजा सुरेश जाधव उर्फ सोनम दत्तात्रय पवार (२४, भोसले चाळ, विठ्ठलवाडी, नेहरू नगर, पिंपरी), माया भास्कर सावंत (५०, भालेराव चाळ, खराळवाडी, संभाजीनगर, पिंपरी), रवींद्र मोतीराम सिरसाम (५६, सदाशिवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

या प्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सात जुलै रोजी आळंदी रस्त्यावरील एका लॉजमध्ये ही घटना झाली. सोनम हिने दुपारी अडीचच्या सुमारास स्वत: फिर्यादीशी संपर्क साधून भेटायला बोलावले. लॉजवर गेल्यानंतर संमतीने शरीरसंबंध ठेवले आणि त्यानंतर अडीच हजार रुपये घेतले. नंतर लॉजबाहेर पडल्यावर साथीदारांना बोलावून जबरदस्तीने कारमध्ये बसविले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीच्या खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले होते.

आठ जुलै रोजी संशयितांना भोसरी पोलिसांनी अटक केली. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. एप्रिल २०१५मध्ये संशयित महिला एका व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार देण्यासाठी भोसरी ठाण्यात आली होती. त्या वेळी तडजोड करुन त्यांनी तक्रार मागे घेतली. मात्र, पोलिस ठाण्यातील डायरीमध्ये याची नोंद झाली आहे. यावरून या महिला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करतात व पैशाची मागणी पूर्ण झाली की तक्रार मागे घेतात, हे दिसून आले आहे.
जामीन मिळाल्यास फिर्यादीला मारहाण होण्याची शक्यता असून, साक्षीदारांवरही दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिजिटल डिस्प्ले’मुळे पालिकेच्या उत्पन्नाला फटका

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, पुणे
स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत शहरात उभारले जाणारे डिजिटल डिस्प्ले महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर मर्यादा आणणारे ठरत आहे. पालिकेने रितसर शुल्क आकारुन शहरात ज्या चौकात डिजिटल जाहिराती आणि होर्डिंगसाठी परवानगी दिली आहे, त्याच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनीने आपले डिजिटल डिस्प्ले उभारले आहेत. त्यामुळे या डिस्प्लेची माहिती तातडीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीएसल) कंपनीस कळविण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने केली आहे. त्यासाठीचे पत्र महापालिकेकडून रीतसर कंपनीस पाठविण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतगर्त शहरात १५५ ठिकाणी नागरिकांना सूचना आणि माहिती देणारे डिजीटल डिस्प्ले उभारले जाणार आहेत. त्यातील जवळपास ७०डिस्प्ले उभारले असून, ते सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हे डिस्प्ले उभारताना आधी पदपथावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने त्यावर वाद निर्माण झाला होता. यामध्ये आता या डिस्प्लेमुळे महापालिकेने पैसे घेऊन मान्यता दिलेले होर्डिंग आणि डीजिटल जाहिरातींचे फलक झाकले गेले आहेत. ज्या जाहिरातधारकांनी हे होर्डिंग ‌नियमाप्रमाणे शुल्क भरून घेतले आहेत. त्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची तक्रार पुणे आउटडोर असोसिएशनने महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे या जाहिरातदारांचे नुकसान होत असून, भविष्यात महापालिकेचेही आर्थिक नुकसान होणार आहे.
यापुढील काळात स्मार्ट सिटी अंतर्गत डिजिटल डिस्प्ले उभारण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून पीएसडीसीएल कंपनीस ही बाब निदर्शनास आणून देण्याची मागणी आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने केली आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातर यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून, प्रशासनाने त्याचे पत्र स्मार्ट सिटी कंपनीला पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बार्टी’ घेणार पुन्हा परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्थेतर्फे (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी घेतलेली ऑनलाइन प्रवेश परीक्षा (सीईटी) पुन्हा शनिवारी येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सीईटीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे लक्षात आल्याने ‘बार्टी’ने परीक्षा नव्याने चोख बंदोबस्तात आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीईटीत झालेला गोंधळाचा प्रकार ‘मटा’ने उघडकीस आणला होता. ‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातीच्या (एससी) १०० विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांला परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीतील नामांकीत प्रशिक्षण संस्थेत प्र‍वेशासाठी सुमारे दोन लाख रुपये आर्थिक साह्य देण्यात येते. तसेच, वर्षासाठी महिन्याला साधारण १२ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येतो. यंदापासून ही परीक्षा महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या सहकार्याने (एमकेसीएल) प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली. राज्यातील सात हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी २०१८ सालामध्ये निवडीसाठी ही परीक्षा दिली. त्यानुसार एमकेसीएलने अधिकृत केलेल्या केंद्रांवर ही परीक्षा १ जुलैला ऑनलाइन पद्धतीने पेपर एक आणि दोन अशा दोन टप्प्यांमध्ये पार पडली.

परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू होणे अपेक्षित असताना सुमारे एका तास उशिराने सुरू झाली. दरम्यान, परीक्षेच्या वेळेत दोन विद्यार्थ्यांमधील कम्प्युटरचे अंतर कमी असल्याने विद्यार्थ्यांनी एकमेकांची उत्तरे पाहून पेपर सोडविले, असे पक्रार परीक्षेत घडले. विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या अर्जानुसार परीक्षा केंद्र मिळणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आडनावावरून केंद्र देण्यात आले. केंद्राची माहिती परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी आणि केंद्रप्रमुखाच्या मदतीने दिवसभरात सोयीनुसार परीक्षा घेण्यात आल्याचे परीक्षार्थींनी सांगितले होते.
प्रवेश परीक्षेच्या जाहिरातीत ‘निगेटिव्ह मार्किंग’ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात कम्प्युटरवर परीक्षा सुरू झाल्यावर परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ नाही, अशी माहिती कम्प्युटरच्या स्क्रीनवर मिळाल्याने परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ वाढला. या सर्व प्रकारामुळे परीक्षार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्याबाबत परीक्षार्थ्यांनी तक्रार देखील होती. त्यामुळे ‘बार्टी’ची सीईटी परीक्षा पुन्हा १ जुलैला होत असून सकाळी ११ ते दुपारी १२ पेपर एक (जीएस) तर दुपारी १२ ते १ पेपर दोन (सीसॅट) वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहे. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग होणार असून, अधिक माहिती ‘बार्टी’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे प्रसिद्धी पत्रकात सांगतिले आहे.
...........
‘बार्टी’तर्फे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी घेतलेल्या सीईटीबाबत परीक्षार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे परीक्षार्थ्यांच्या मागणीनुसार सीईटी पुन्हा घेण्यात येत आहे.परीक्षा केंद्रांवर देखरेखेसाठी कर्मचारी राहणार असल्याने गोंधळ होणार नाही. परीक्षार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही.

- राजेश ढाबरे, महासंचालक, बार्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरुळी देवाची, फुरसुंगीचामहापालिकेत समावेश

$
0
0

शहराच्या हद्दीलगतच्या गावांचा समावेश महापालिकेत करण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना बुधवारी अखेर अंशतः यश मिळाले, असेच म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेल्या एकाही गावाचा समावेश न करता सरकारने पालिकेत यापूर्वी निम्म्या आलेल्या गावांचा पूर्ण समावेश करून घेतला आहे. तसेच, कचरा डेपोवरून आंदोलनास्त्र उगारणाऱ्या उरळी देवाची आणि फुरसुंगी गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करून हद्दीबाहेर कचरा टाकण्याच्या पालिकेच्या प्रश्नावरही उत्तर शोधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता होणार चौथा डीपी

$
0
0

नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी पालिका करणार आराखडा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या हद्दीत नव्याने अकरा गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी चौथा विकास आराखडा (डीपी) पालिकेला तयार करावा लागणार आहे. एकाच शहरासाठी हा चौथा डीपी असणार आहे. यापूर्वी पालिका प्रशासनाने शहराच्या जुन्या हद्दीचा, नवीन २३ गावांचा त्यानंतर येवलेवाडी या भागाचा असे तीन डीपी तयार केले आहेत. तर नव्याने समाविष्ट होणाऱ्या या ११ गावांसाठी नवीन स्वतंत्र डीपी पालिकेला तयार करावा लागणार आहे.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पालिकेच्या हद्दीत आजूबाजूच्या ३३ गावांचा समावेश करावा, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. सरकारने या गावांच्या समावेशाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन आपले म्हणणे सादर करावे, अशा सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत. कोर्टाकडे गावांच्या समावेशाबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करताना सुरुवातीच्या काळात ११ गावांचा समावेश केला जाणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. डिसेंबर २०१७पर्यंत याबाबतची अधिसूचना काढण्यात येईल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने अधिसूचना काढून या गावांच्या समावेश झाल्याचे जाहीर केल्यानंतर पालिकेला नव्याने समाविष्ट होणाऱ्या या ११ गावांचा डीपी तयार करावा लागणार आहे.

‘पालिकेत नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या या गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ ८०.७० चौरस किलोमीटरने वाढणार आहे. पालिकेचे सध्याचे एकूण क्षेत्रफळ हे २५० चौरस किलोमीटर असून, नवीन ११ गावांमुळे हे क्षेत्रफळ ३३० चौरस किलोमीटर होणार आहे,’ असे पालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

पालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या नवीन अकरा गावांमुळे शहराची लोकसंख्या तीन लाखांनी वाढणार आहे. तसेच, या गावांच्या समावेशामुळे पालिकेला या भागात आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, याबरोबरच ड्रेनेजलाइन, शाळा, उद्याने या कामांसाठी पालिकेला या गावांमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा भार पडण्याची शक्यता आहे. या गावांचा समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर या भागात पालिकेचे नियम लागू होणार असून अधिसूचनेनंतरच पालिकेला या गावांमध्ये हस्तक्षेप करता येणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
--
महत्त्वाचे...
नवीन हद्दीचा विकास आराखडा करावा लागणार

नवीन गावांच्या समावेशानंतर पालिकेचे क्षेत्रफळ ३३० चौरस किलोमीटर होणार

लोकसंख्या तीन लाखाने वाढणार

नवीन गावांसाठी दोन हजार कोटी खर्च करावा लागणार

पालिकेला आवश्यक त्या पायाभूत सुविधा द्याव्या लागणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१६ तास झाडावर लटकून दिली मृत्यूशी झुंज!

$
0
0

रमेश माने यांची सोळा तासांनी झाली सुटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धबधबा पाहताना ते पाय घसरून दरीत कोसळले खरे... पण, नशीब बलवत्तर असल्याने त्यांना झाडाच्या फांदीचा आधार मिळाला. त्यानंतर तेथे एक नव्हे दोन नव्हे तर सोळा तास काढल्यानंतर त्यांचे प्राण वाचले. पाऊस, वाऱ्यातही केवळ मानसिक बळ तसेच पोलिस आणि जीवरक्षकांच्या मदतीमुळे त्यांची मृत्यूच्या छायेतून सुटका झाली. एखाद्या चित्रपटाची कथा म्हणून शोभावी, अशी घटना वेल्हे तालुक्यातील प्रसिद्ध मढेघाट परिसरात रविवारी (१५ जुलै) घडली. या घटनेत रमेश सत्यवान माने (रा. चिखली, वय ३८) यांचे प्राण वाचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी थरमॅक्स कंपनीतील पंधरा कर्मचारी पावसाळी सहलीसाठी वेल्हा येथे गेले होते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मढेघाट येथून सर्व जण परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, जोरदार पाऊस आणि दाट धुक्यात अचानक रमेश माने सोबत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मित्रांनी आरडाओरड करून माने यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागला नाही. केळद गावच्या ग्रामस्थांना घेऊन रात्री दहा वाजेपर्यंत शोधाशोध करूनही माने सापडले नाहीत. शेवटी मध्यरात्री वेल्हे पोलिस ठाण्यात माने यांचे मित्र प्रवीण सदामत यांनी ते हरवल्याची तक्रार दाखल केली.
त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री पुण्यातील दादोजी कोंडदेव ट्रेकर्स आणि जिमच्या ग्रुपला बोलावणे धाडले. जोरदार पावसातच ट्रेकर्सनी रोप लावून दरीमधे उतरून शोधमोहीम सुरू केली. दाट झाडी, कपारी आणि घळी यांमध्ये माने यांचा शोध सुरू असतानाच सकाळी नऊच्या दरम्यान कड्याच्या तळाजवळ झाडाला लटकलेले माने त्यांना दिसले. माने यांना तत्काळ उचलून कड्यावर आणण्यात आले. वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढच्या उपचारांसाठी पुण्याला पाठविण्यात आले. या बचावकार्यात पोलिस आणि ट्रेकिंग ग्रुपला केळद ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.

सोळा तास प्राणाशी गाठ
धबधब्याच्या परिसरात माने उंच कड्यावरुन खाली कोसळले. कोसळताना ते दरीतील झाडाला लटकले. रविवारी संध्याकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंतचे १६ तास ते खोल दरीत तशाच अवस्थेत लटकून राहिले.

‘कड्यावर जाऊ नका’
मढेघाट परिसरात दाट धुके आणि पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या परिसरात फिरताना धबधब्याच्या माथ्यावर जाण्याचा मोह टाळावा तसेच कड्याच्या टोकाशी जाऊन फोटो काढण्याच्या फंदात पडू नये, असे आवाहन वेल्हा पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात झाल्यास शाळेवर फौजदारी

$
0
0

परिवहन समिती स्थापन करण्याचे ‘आरटीओ’चे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय परिवहन समितीची स्थापना न झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यास, संबंधित शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी दिली.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी न करणाऱ्यांना ‘आरटीओ’ने नोटिसा पाठवल्या आहेत. अद्याप साडेअकराशे वाहनांची तपासणी झालेली नाही. शालेय वाहतूक धोरणाला वाहतूकदारांकडून हरताळ फासला जात असून, शिक्षण विभाग याकडे पूर्णपणे काणा डोळा करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शालेय परिवहन धोरणात निश्चित केलेली जबाबदारी शाळांनी पार पाडावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, आजरी यांनी स्पष्ट केले.
किती शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना झाली, त्या समित्यांच्या किती बैठका झाल्या, याचा तपशील शिक्षण विभागाकडे उपलब्ध असणे बंधनकारक आहे. मात्र, अशी कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शाळांमधील परिवहन समित्यांच्या बैठका होत असण्यावरही शंका उपस्थित कण्यात येत आहे. बहुतांश शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना झाली नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन समित्या स्थापन न झालेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असेही आजरी यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शन शिबिर शनिवारी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलिस शाखा, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन, बस ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने स्कूलबस चालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता शिबिर होणार आहे. त्यामध्ये स्कूलबस चालक आणि अटेंडंटला विद्यार्थी वाहतुकीचे महत्त्व, घ्यावयाची काळजी, आपतकालीन परिस्थितीत काय करायचे आदींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या चालक, अटेंडंटचा एक लाख रुपयाचा अपघात विमा काढला जाणार आहे, अशी माहिती बाबासाहेब आजरी यांनी दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बस ओनर्स असोसिएशनचे सचिव किरण देसाई, रोटरीचे संजय डेगरे, सुदाम जांभुळकर आणि बाबा शिंदे या वेळी उपस्थित होते.

‘आरटीओ’ची पालकांना विचारणा
- अनधिकृत स्कूल बस आणि व्हॅनला कोण पाठिंबा देते?
- अनधिकृत वाहनातून पाल्याला पाठविण्याच्या धोक्याविषयी पालक अनभिज्ञ आहेत का?
- क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये मुलांना का पाठवता?
- अशा वाहनांमध्ये पाल्याची गैरसोय होते, हे लक्षात येत नाही?

अधिकृत स्कूलबसना रस्त्यावर संरक्षण मिळते. वाहतूक कोंडी किंवा आपतकालीन परिस्थितीमध्ये वाहनाची रंगसंगती आणि ‘स्कूलबस’ असा उल्लेख वाचून संबंधित वाहनाला मदत केली जाते. त्या तुलनेत अनधिकृत वाहनात विद्यार्थी असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे पालकांनी अनधिकृत वाहनातून पाल्यांना पाठवू नये.
बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप’ हॅक करून ई-व्हाउचरवर डल्ला

$
0
0

बिदरच्या हॅकरविरोधात गुन्हा दाखल; अडीच लाखांची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चित्रपटाचे ट्रेलर, शॉर्ट फिल्मच्या परीक्षणांसाठीचे ‘रिव्ह्यू देदे’ नामक अॅप हॅक करून अडीच लाख रुपयांचे ई-व्हाउचर पळवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यापैकी दहा हजार रुपयांच्या व्हाउचरचा हॅकरने वापर केला आहे. या प्रकरणी सायबर सेल पोलिसांनी तपास करून चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वैभव भार्गव (वय ३६, रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विवेक राजोले (रा. आदर्श कॉलनी, बिदर) नावाच्या व्यक्तीवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भार्गव यांची बाणेर येथे पोडियम सिस्टीम नामक कंपनी आहे. कंपनीकडून अॅप बनविली जातात.
कंपनीतर्फे चित्रपटांचे ट्रेलर दाखविण्यासाठी ‘रिव्ह्यू देदे’ या अॅपची निर्मिती केली. या अॅपवर चित्रपटाचे ट्रेलर पाहून चांगले परिक्षण लिहिणाऱ्यांना गिफ्ट व्हाउचर दिली जातात. त्यासाठी कंपनीने पीव्हीआर सिनेमाकडून ६७, कार्निव्हल सिनेमाकडून २६, आणि शॉपर स्टॉपकडून् अशी अडीच लाख रुपयांची १४० ई-व्हाउचर विकत घेतली होती. तसेच, व्हाउचरचा ओटीपी पाठविण्यासाठी एका कंपनीकडून एक लाख एसएमएसचा पॅक घेतला होता.
अॅप सादर झाल्यानंतर वीस दिवसांनी एका व्यक्तीने ते हॅक करून अडीच लाखांची ई-व्हाउचर प्राप्त केली. दोन दिवसानंतर कंपनीला हा प्रकार समजला असता, त्यांनी तत्काळ सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर कंपनीने व्हाउचर ब्लॉक करण्यास सांगितले. तोपर्यंत त्या व्यक्तीने शॉपर स्टॉपच्या दहा हजार रुपयांच्या व्हाउचरचा वापर केल्याचे आढळून आले. कंपनीने माहिती घेतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या एसएमएस पॅकचाही हॅकरने वापर केल्याचे आढळून आले. या एसएमएसद्वारे अनेकांना बदनामीकारक, व्यक्तिगत सिस्टीम हॅक कशी करायची याची माहिती आणि धमकी दिल्याचे उघड झाले आहे. सायबर सेलच्या तपासात आरोपी आरोपी बिदरचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अॅप हॅक झाले असले तरी, त्यावरील डेटा सुरक्षित असल्याचे भार्गव यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांश शाळांना वाइन शॉपचा शेजार

$
0
0

कोथरूड, पौड रस्ता परिसरातील वास्तव; बिअर बारही जोरात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्य वस्तीसह वेगाने विकसित झालेल्या कोथरूड-पौड रोड परिसरात शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांपासून ७५ मीटरच्या आतमध्येच दारूची दुकाने असल्याचे आढळून आले आहे. शहराच्या मध्यवस्तीत तर अनेक ठिकाणी शाळेपासून अवघ्या काही अंतरावरच परमिट रूम आणि बिअर बार बिनदिक्कत सुरू असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून पाचशे मीटर अंतरातील दारूच्या दुकानांवर सुप्रीम कोर्टाने बंधने लादली. कोर्टाने निर्णय देण्यापूर्वीच शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांपासून ७५ मीटर अंतराच्या आतील दारू विक्रीची दुकाने किंवा परमिट रूम/बारवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या धोरणाचा विसर पडल्याने अनेक भागांमध्ये शाळांपासून अतिशय कमी अंतरावर दारू दुकाने सुरू आहेत. शहराच्या मध्य वस्तीत येणाऱ्या सदाशिव-शनिवार-नारायण-शुक्रवार या पेठांसह पूर्व भागांतील रास्ता-रविवार-नाना-भवानी या पेठांमध्ये सरकारी नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावर पालिकेच्या सिद्धिविनायक मंदिर या शाळेच्या शेजारीच परमिट रूम सुरू आहे. कसबा पेठेतील आरसीएम गुजराती हायस्कूलपासून जवळच बिअरबार सुरू आहे. सोमवार पेठेत प्रार्थना स्थळांपासून ७५ मीटरच्या आतच दारुची दुकाने सुरू आहेत. सदाशिव-शनिवार पेठेच्या काही भागांतही सरकारी नियम झुगारून दारूची दुकाने सर्रास सुरू आहेत.
मध्य पेठांसह शहरात सर्वाधिक वेगाने वाढलेल्या कोथरूड आणि परिसरामध्येही सरकारच्या नियमांकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. कोथरूड भागातील पौड रस्ता महामार्गाचा एक भाग असल्याने येथील बहुतांश दारूची दुकाने आणि बार बंद झाले आहेत. मात्र, आतील भागात काही दारूची दुकाने व बार सुरू आहेत. त्यापैकी पौड रस्त्यावरील रामबाग कॉलनीमध्ये टेकडीवर असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरापासून अवघ्या ५०-६० मीटर्सवर शाराव लॉन्समध्ये एक्स्टसी हा बार नियमितपणे सुरू आहे. सोमवारी भरदुपारी देखील तेथे कॉलेजचे काही विद्यार्थी मद्याचा आस्वाद घेताना दिसतात. त्यापुढे काही अंतरावर आणखी एक बार सुरू आहे. मात्र, तो शंभर मीटरदरम्यान येत नाही, तसेच महामार्गापासूनही पाचशे मीटर अंतराच्या बाहेर असल्याने हा बार सुरू आहे. गांधीभवन, सहजानंद नगर, एकलव्य कॉलेज या भागात रहिवासी क्षेत्र असल्याने बिअर बार आणि परमीट रूम नसले तरी आशिष गार्डन येथील डीपी रोडवरील महेश विद्यालयासमोरील बाजूस वाइन शॉप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वनाझ’ मार्गासाठी पाच कंपन्या इच्छुक

$
0
0

येत्या पंधरा दिवसांत अंतिम निवड करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) दरम्यानच्या मार्गिकेसाठी (व्हाय-डक्ट) मागविण्यात आलेल्या फेरटेंडरला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत पात्र कंपनीची निवड करण्यात येईल, असे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्पष्ट केले.
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या १०.७ किमीच्या प्राधान्य मार्गाचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. या मार्गासह महामेट्रोने वनाझ ते सिव्हिल कोर्ट या ७.१ किमी मार्गासाठी टेंडर मागविले होते. या सात किमीच्या मार्गासाठी अपेक्षित धरलेल्या खर्चापेक्षा जादा दराने टेंडर भरण्यात आल्याने महामेट्रोने फेरटेंडर मागवण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने मागविण्यात आलेल्या टेंडरची मुदत नुकतीच संपली असून, त्यामध्ये पाच कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
वनाझ ते सिव्हिल कोर्टसाठी एनसीसी लिमिटेड, अॅफकॉन्स, आयएल अँड एफएस, सिम्प्लेक्स आणि गॅमोन इंडिया या पाच कंपन्यांनी टेंडर भरले आहे. त्यांनी सादर केलेल्या टेंडरची तांत्रिक आणि आर्थिक छाननी त्वरेने पूर्ण करण्याचा मानस महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मेट्रोच्या प्राधान्य मार्गाचे काम एनसीसी लिमिटेडला मिळाल्याने वनाझ ते सिव्हिल कोर्टचे काम करण्यास कोणती कंपनी पात्र ठरणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या कामासाठी फेरटेंडर मागविण्यात आल्याने गेलेला जादा वेळ भरून काढण्यात येणार असून, पात्र कंपनीची निवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचा मानस महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘सीओईपी’कडून आराखडा सादर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो उभारणीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी महामेट्रोकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे काम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून (सीओईपी) करून घेण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा प्राथमिक आराखडा ‘सीओईपी’ने तयार करून महामेट्रोकडे दिला आहे. हा आराखडा लवकरच वाहतूक पोलिसांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images