Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणपतीबाप्पा निघाले परदेशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दीड महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी परदेशातही सुरू झाली आहे. पुण्यातून बाप्पाच्या मूर्ती परदेशवारीला निघाल्या असून लवकरच त्या तिथे दाखल होणार आहेत. परदेशातील मराठी मंडळे आणि संस्थांनी खास पुण्याहून बाप्पाच्या मूर्ती तयार करून घेतल्या आहेत. यंदा इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

मॉरिशस, हॉलंड, कॅनडा, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये प्रामुख्याने बाप्पाच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ, आसनारूढ असलेले बाप्पा अशा मूर्तींना यंदा परदेशात मागणी आहे. विमानाद्वारे बाप्पा परदेशी जाणार असल्याने मूर्तीकारांकडून त्यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे. बाप्पांच्या मूर्तीला विशिष्ट पद्धतीचे पॅकिंग करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या आधी एक महिना बाप्पा परदेशी पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

मूर्तीकार राजेंद्र देशमुख गेल्या चौदा वर्षांपासून गणेश मूर्ती परदेशी पाठवत आहेत. याही वर्षी हॉलंड, कॅनडा, मॉरिशस अशा ठिकाणी ते गणेश मूर्ती पाठवणार आहेत. नुकतीच त्यांनी लंडनला गणेश मूर्ती पाठवली आहे. छोट्या आणि पर्यावरणपूरक मूर्ती परदेशातील यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण असणार आहेत. मूर्तीला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून मुंबईत विशिष्ट प्रकारचे पॅकिंग करण्यात येणार असून त्यानंतर विमानाच्या स्वतंत्र कंटेनरद्वारे गणेश मूर्ती त्या त्या देशामध्ये पाठवल्या जाणार आहेत. देशमुख दरवर्षी नव्या क्लृप्ती वापरून मूर्तीमध्ये वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यंदा त्यांनी मूर्ती अधिकाधिक पर्यावरणपूरक कशी होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या साठी त्यांनी पर्यावरणपूरक रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातील वातावरणाला अनुसरून ते मूर्तीची निर्मिती करत आहेत. प्रवासात मूर्तीला इजा होऊ नये, यासाठी त्यांनी वजनाने हलक्या अशा बाप्पाच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. त्यांच्याकडे परदेशासह पुण्यातील चारशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती आकार घेत आहेत.
.....
गणपतीबाप्पाच्या प्रेमापोटी गेल्या ४५ वर्षांपासून आमचा कारखाना सुरू आहे. यंदा परदेशात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मोठी मागणी झाली आहे. लवकरच या मूर्ती परदेशात दाखल होतील. तेथील वातावरणाच्या दृष्टीने मूर्ती एक महिना आधी पाठवणे गरजेचे असते. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- राजेंद्र देशमुख, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा-कॉलेजजवळची दारुची दुकाने राजरोस सुरू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुप्रीम कोर्टाच्या दणक्याने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगतच्या मद्यविक्रीवर बंधने आली असताना, शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळांपासून ७५ मीटर अंतरावरील बंदीच्या अंमलबजावणीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहराच्या विविध भागांत केलेल्या पाहणीमध्ये शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळांपासून अवघ्या काही अंतरावर मद्यविक्रीची दुकाने आणि बार सर्रास सुरू असल्याचे आढळून आले आहे. सरकारचे नियमांकडे डोळेझाक करून सुरू असलेल्या या मद्यविक्रीवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने आणि परमिट रूम/बिअर बारवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे शहरांतील काही रस्त्यांवरील दुकाने/बार कायमस्वरूपी बंद झाले. याचप्रमाणे, शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांपासून ठरावीक अंतरावर दारूची दुकाने/परमिट रूम याला परवानगी देण्यात येऊ नये, असे महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्टमध्येच स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, या नियमाची माहितीच नाही किंवा माहिती असूनही त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने शहराच्या अनेक भागांत शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांपासून अत्यल्प अंतरावर मद्यविक्री जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांपासून ७५ मीटर अंतरामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या मद्य विक्रीस पूर्णतः मनाई आहे. म्हणजेच, शाळा-कॉलेजच्या किंवा प्रार्थना स्थळांच्या सीमा भिंतीपासून दारूचे दुकान किंवा परमिट रूम/बिअर बार ७५ मीटरमध्ये असता कामा नये. दुर्दैवाने, या कठोर नियमाला अनेक ठिकाणी केराची टोपली दाखवून बिनधास्त परवानगी देण्यात आल्याचे आढळून आले. शहराच्या मध्यवस्तीतच नाही, तर शहराच्या उपनगरांमध्येही बऱ्याच ठिकाणी शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थना स्थळांच्या या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करून देण्यात आलेल्या या परवानग्या कोणाच्या आदेशाने दिल्या गेल्या, त्यांच्यावर कारवाई करून मद्यविक्रीची ही ठिकाणे बंद होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
.
‘परवानगी देताना प्रवेशद्वार पाहिले जाते’

‘मद्याची दुकाने आणि बिअरबार यांच्यापासून प्रार्थनास्थळ किंवा शाळेपर्यंत असलेला रस्ता या दरम्यान पायी चालत जाण्याचे अंतर ७५ मीटरपेक्षा लांब असेल तर परवानगी देण्यात येते,’ असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले. ‘प्रार्थनास्थळे किंवा शाळेपासून मद्याची दुकाने​ जवळ दिसत असली तरी परवानगी देताना प्रवेशद्वार कोठे आहे, हे पाहिले जाते. दुकानांपासून प्रार्थनास्थळ किंवा शाळेपर्यंत पायी जाण्यासाठी लागणारे अंतर मोजले जाते. नंतरच परवानगी दिली जाते,’ असे वर्दे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नात्याला सँडविचप्रमाणे जुळवून घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आपण हॉटेलात गेलो, की सँडविचची ऑर्डर देतो. व्हेज किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचे सँडविच मागवतो. कारण काय तर मधल्या पदार्थाला महत्त्व असते. मधला पदार्थ दोन्ही स्लाइसला एकत्र ठेवतो. पन्नाशीच्या पुढची पिढी अशीच आहे. आपल्यालाही मुलगा-सून, मुलगी-जावई यांना असेच जुळवून घ्यावे लागते आणि स्वत:लाही जुळवून घ्यावे लागते...’ साध्या, सोप्या शब्दातील हे उदाहरण सासू-सासरे होणाऱ्या प्रत्येक पालकाला रविवारी अंतर्मुख करत होते.

निमित्त होते, ‘अनुरूप’ विवाहसंस्थेने आयोजित केलेल्या ‘सासू-सासरे होताना’ या कार्यक्रमाचे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यक्रमाचा माध्यम सहकारी होता. महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. समुपदेशक श्रीरंग उमराणी, सुचित्रा तबीब, प्रीतम तिवारी, डॉ. सुखदा चिमोटे, ‘अनुरूप’च्या संचालिका गौरी कानिटकर यांनी पालक व भावी सासू-सासरे यांच्या शंकांचे निरसन केले. एस. एम. जोशी सभागृहातील कार्यक्रमाला तुफान गर्दीमुळे दुसऱ्या सभागृहात स्क्रीनची व्यवस्था करावी लागली.

मुलामुलींच्या लग्नाबाबतीत पालक आणि भावी सासू-सासरे म्हणून काय भूमिका असावी, याचा उहापोह या वेळी करण्यात आला. सासू-सासरे होताना स्वतःच्या विचारात, मानसिकतेमध्ये बदल करणे का आवश्यक आहे आणि योग्य तो बदल कसा करावा, प्रोत्साहन देणे म्हणजे नेमके काय करायचे, नात्यांच्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडतानाही समृद्ध कसे व्हायचे यांसारख्या अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा घडली.

कानिटकर यांनी सांगितलेल्या सँडविचच्या उदाहरणातून सारेच अंतर्मुख झाले. त्या म्हणाल्या, ‘या भूमिकेतून काय करावे काय करू नये, याचा विचार करावा लागतो. छोट्या छोट्या सवयी बदलाव्या लागतात. रोजच्या जगण्यातले प्रश्न सामोपचाराने सोडवले पाहिजे.’ ‘सासू सुनेला चोवीस तास सून म्हणून बघते. एखादी मुलगी कायम सुनेच्या भूमिकेत कशी असेल? ती एक व्यक्ती आहे, हे विसरले जाते. मग सूनही त्याप्रमाणे वागते आणि संवाद संपतो,’ याकडे डॉ. चिमोटे यांनी लक्ष वेधले. ‘मुलगा, मुलगी, सून व जावई यांच्याशी मैत्री केली पाहिजे. भावभावनांचा अंदाज घेऊन व्यावसायिकता पाळता यायला हवी. तटस्थतेपणाने संवाद आणि मैत्री शक्य आहे,’ हा विश्वास उमराणी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाणेघाटात अनिर्बंध पर्यटन

$
0
0

मद्यपींच्या धांगडधिंग्यामुळे सुरक्षेचा प्रश्न; पोलिस बंदोबस्ताची गरज

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
ऐतिहासिक नाणेघाटात वर्षा पर्यटनाच्या नावाखाली बेधुंद धांगडधिंगा होत असून त्यावर अंकुश ठेवणारी कोणतीही यंत्रणा येथे कार्यरत नसल्याने सुरक्षेसह अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

माळशेज घाटात सुरक्षेच्या कारणाने पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याने वीकेंडला वर्षा पर्यटनासाठी लोकांनी नाणेघाटात मोर्चा वळवला आहे. मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींचे घोळके वाहनांतून येथे येत आहेत. दुसऱ्या बाजूला दारूच्या पार्ट्या करण्याचे मनसुबे घेऊन दारूड्यांचे कंपू देखील येथे येऊ लागले आहेत. जुन्नरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या नाणेघाटाला त्यामुळे अनिर्बंध पर्यटनाचे गालबोट लागत आहे. या प्रकारांवर अंकुश ठेवणारी कोणतीही यंत्रणा येथे नाही.

घाटाबाहेरील परिसर वनखात्याच्या अखत्यारित आहे, तर मुख्य गुहा ही पुरातत्व खात्याच्या निगराणीत आहे. येथील स्थानिक वनसमितीच्या लोकांना अनिर्बंध पर्यटकांवर अंकुश ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मोठी टोळकी बेधुंद धांगडधिंगा करू लागल्यानंतर त्यांना मज्जाव करायला गेले, तर समितीच्या लोकांना धक्काबुक्की होण्याचे प्रसंग घडले आहेत. वीकेंडच्या दिवशी सरकारी सुटी असल्याने संबंधित खात्यांचे कर्मचारी अपुऱ्या संख्येने असतात. त्यामुळे पर्यटकांना शिस्त लावण्यात अडचण निर्माण होत आहे. पोलिस यंत्रणेकडून देखील कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने स्वैर पर्यटनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी सैनिक करणार बंदोबस्त

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नाणेघाटात अनिर्बंध प्रकार होत आहेत. ही बाब जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक परंपरेला बाधा आणणारी आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक नाणेघाटातील बंदोबस्ताच्या कार्यासाठी पुढे आले आहेत. या सैनिकांचे पथक पर्यटकांना जबाबदारीची जाणिव करून देण्याचे काम करणार आहे. त्यासाठीचा निर्णय माजी सैनिकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समन्वयक रमेश खरमाळे यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्ताची मागणी

नाणेघाटात विकेंडच्या दिवशी पोलिस बंदोबस्त असावा, तसेच कायमस्वरूपी बंदोबस्ताचा भाग म्हणून येथे पोलिस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी शिवाजी ट्रेलचे समन्वयक विनायक खोत यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथेच होणार

$
0
0

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्पष्टीकरण

म. टा. वृत्तसेवा, सासवड
‘पुरंदर विमानतळाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग काही राजकीय लोकांनी सुरू केला आहे. त्यातच अर्धवट माहितीवर आधारित बातम्या प्रसिद्ध झाल्याने लोक संभ्रमात आहेत. मात्र, त्यात तथ्य नसून विमानतळ पुरंदरमध्येच होणार आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.’

‘पुरंदर विमानतळाची जागा बदलणार,’ म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पुरंदरसह पश्चिम महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले होते. याबाबत शिवतारे म्हणाले, ‘आठवडाभर चाललेल्या गावगप्पा मी त्रयस्थपणे पाहत होतो. जनतेतून आणि सर्व स्तरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे अवलोकन करत होतो. काही पुढाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असून विमानतळ रद्द झाल्याचे सांगून ते लोकांना भ्रमित करत सुटले आहेत. कधीकाळी दुष्काळी असलेला पुरंदर तालुका आता प्रगतीच्या वेगळ्या टप्प्यावर जाणार असल्याचे जाणवल्याने काहींच्या पोटात भलताच गोळा उठला आहे. ज्या खेड तालुक्यात सुरुवातीला विमानतळ नियोजित होते ते लोक आज पश्चाताप करीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाला नाना प्रकारे पटवण्याचा प्रयत्न येथील लोकांनी करून पाहिला. पण सरकार आता पुरंदरवर ठाम आहे. विमानतळामुळे जगभरचे कारखानदार, गुंतवणूकदार, व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्या पुरंदरकडे डोळे लावून आहेत.’

‘सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार’

‘पुण्यातील विमानतळ संरक्षण विभागाचे आहे. तेथील उड्डाणे आणि लँडिगला पुरंदर विमानतळामुळे काही अडचण आहे का नाही, याबाबतचे तांत्रिक स्पष्टीकरण डीपीआरमध्ये देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याचा अंतर्भाव करावा, गरज भासल्यास फेरसर्वेक्षण करावे, असे निर्देश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे विमानतळ थेट रद्दच्या गप्पा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे,’ असे सांगून निर्धारित जागेवरच विमानतळ होण्याचे संकेत शिवतारे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन पावसाळ्यात खोदला रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
पावसाळ्यात रस्ते खोदई करण्यास परवानगी नसताना खासगी कंपन्यांनी दुसऱ्यांदा रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम केले आहे. पावसाळी लाइन टाकण्याच्या नावाखाली केबलचे काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात नोबेल हॉस्पिटलशेजारी हा प्रकार घडला आहे.

रस्त्यातील खोदकामामुळे हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, तसेच येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे मगरपट्टा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांच्या सुरक्षतेचा विचार न करता जेसीबीद्वारे रस्त्यात खोदकाम करणाऱ्या खासगी कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मगरपरपट्टा-मुंढवा रस्त्यावर नोबेल हॉस्पिटलशेजारी विनापरवाना जेसीबीद्वारे खोदकाम करून केबल टाकत असताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक उरली नव्हती. महापालिका पावसाळ्यात खोदकामाला परवानगी देत नाही. मागील महिन्यात विनापरवाना खोदकामाबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी तक्रार करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला पत्र देण्याशिवाय पुढे काही केले नाही. तसेच महापालिकेचे पैसे खर्च करून केबल लाइन काढून टाकण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत खासगी कंपन्या स्वतःचे काम उरकून घेण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असल्याचे मगरपट्टाच्या खोदकामावरून दिसून आले आहे.

अधिकाऱ्यांचा दावा

केबल लाइन टाकण्याच्या कामाबाबत पथ विभागाचे उपअभियंता विश्वजित भंडारे म्हणाले, येथील काम पावसाळी लाइन टाकण्याचे काम आहे. आता केबल टाकत असतील, तर हे काम थांबवायला सांगतो. संबंधित काम पावसाळी लाइन विभागाचे आहे. त्यांना याबाबत माहिती देतो. त्यानंतर पावसाळी लाइन विभागाचे उपअभियंता प्रकाश कुंभार यांनी सांगितले की, ‘पावसाळी लाइन चार दिवसांपूर्वीच टाकली आहे. फक्त खोदलेल्या कामावर कॉक्रीट करणे बाकी आहे. आम्ही केबल लाइन टाकत नाही. याबाबत पथ विभागाला कळवतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये दुबार पेरणीचे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
राज्यभरात दमदार पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असली, तरी दौंड तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठच फिरवली आहे. खरीपाची पिके वाचण्यासाठी , तसेच ऊस लागवडीसाठी सर्वदूर दमदार पावसाची गरज आहे. १६ जूनपर्यंत झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. बऱ्यापैकी उगवण झाल्याचा अहवाल कृषी खात्याने दिला आहे. सद्यस्थितीत जिरायत भागातील पिकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. या आठवड्यात दमदार पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

दौंड तालुक्यात आठ महसूल मंडळे आहेत. १६ जूननंतर देऊळगाव राजे, राहू मंडळात एक दोन ठिकाणी तुरळक पाऊस झाला. हा अपवाद वगळता मोठा पाऊस झालेला नाही. आभाळात ढग जमा होतात. पण पाऊस पडत नाही, अशी स्थिती आहे. हवामानात पावसासाठी पोषक बदल घडत असला, तरी शेतकऱ्यांना दिलासादायक पावसाची अपेक्षा आहे. इंद्रायणी आणि पवना नदीच्या पाण्यामुळे भीमा नदीला पाणी आले असून नदीकाठच्या गावांची पाण्याची चिंता मिटली आहे.

दौंड तालुक्यात गेल्या वर्षी जूनअखेर ८६ मिमी पाऊस पडला होता. यंदाच्या वर्षी जूनअखेर १२४ मिमी पाऊस पडला आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वेळी जूनअखेर पावसाची सरासरी जास्त आहे.

यंदा पेरणी जास्त

यंदा खरिपाची पेरणी जास्त झाली आहे. तालुक्यातील बाजरीचे सरासरी क्षेत्र ३४०० हेक्टर असून मागच्या वर्षी जूनअखेर ३०४ हेक्टर पेरणी झाली होती. या वेळी १५३१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पाच पटीने बाजरीची पेरणी वाढली आहे. मका, तूर या पिकांची मागच्या वर्षीपेक्षा सहा पटींनी पेरणी जास्त आहे. चारा पिकांमध्ये मागच्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्रात मात्र पन्नास हेक्टरने घट झाली आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र ३१ हजार २६१ हेक्टर असून त्यापैकी ८७० हेक्टरवर जूनअखेर लागवड झाली असून मागच्या वर्षीपेक्षा तीन पटींनी जास्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या साठ्यात पावसामुळे वाढ

$
0
0

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे चासकमान आणि भामा आसखेड या दोन धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय प्रमाणात वाढ होत आहे.

सोमवारी सकाळपर्यंत चासकमान धरणामध्ये ७३ टक्के, तर भामा आसखेड धरणात ६० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चासकमान धरणात ५४ टक्के, तर भामा आसखेड धरणात ४८ टक्के इतका पाणीसाठा होता.

एक जूनपासून चासकमान धरण क्षेत्रावर सोमवारपर्यंत ४१२ मिमी, तर भामा आसखेड धरण क्षेत्रावर ५१८ मिमी इतका पाऊस पडला आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले कळमोडी धरण यापूर्वीच भरले आहे. कळमोडी धरण भरल्यामुळे चासकमानमधील एकूण पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहेत.

दरम्यान, चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ४५० क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दहा दिवसांसाठी हे आवर्तन सोडले जाणार आहे. खेड तालुक्यात चासकमान, भामा आसखेड व कळमोडी ही तीन धरणे आहेत. या तीन धरणांच्या माध्यमातून १८ टीएमसी इतके पाणी उपलब्ध होते. परंतु, योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्रात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगीतात अभिनव प्रयोग नाही

$
0
0

शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांचे मत; पारंपरिक दृष्टिकोनावर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देव-देवतांच्या कथा आणि प्रियकर-प्रेयसीच्या कहाण्या मांडण्यासाठीच आजवर शास्त्रीय संगीताचा वापर झाला आहे. संगीत हे अूमूर्त स्वरुपाचे आहे. त्याची शास्त्रीय आणि सुगम अशी विभागणी होऊ शकत नाही. शास्त्रीय संगीताच्या आधारे सामाजिक, अर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले जाऊ शकते. परंतु, ही बाब शास्त्रीय संगीतकारांना न रुचल्याने देशात असे अभिनव प्रयोग होत नाहीत,’ अशी खंत कर्नाटकी संगीताचे गाढे अभ्यासक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी व्यक्त केली.

प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेत यंदा कृष्णा यांनी संगीताबद्दल आपले परखड विचार मांडत अभिजात संगीताचा आधार घेऊन संकुचित विचार करणाऱ्या संगीतकारांवर ताशेरे ओढले. अभिजात संगीताच्या नावाखाली शास्त्रीय संगीतकारांनी स्वतःभोवती एक चौकट निर्माण केली आहे. त्या चौकटीमुळे शास्त्रीय संगीतात एक विशिष्ट वर्ग केवळ समाविष्ट केला जातो. त्यामध्ये समाजातील प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा भाव नसतो. त्यातूनच भेद निर्माण होत असून संगीत विभागले जात आहे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सदानंद मेनन, मकरंद साठे आदी या वेळी उपस्थित होते.

‘सध्या देशात गायले जाणारे शास्त्रीय संगीत हे अभिजात किंवा पुरातन नसून ते गेल्या काही वर्षांमधले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे ते संगीत नाही. त्या वेळी संगीताची विभागणी झालेली नव्हती. अभिजात संगीताचे पुजारी म्हणवून एक विशिष्ट वर्ग त्या संगीताची जोपासना करून रसिकांची दाद मिळवण्याचा प्रयत्न करतो. रसिकांनी दिलेली दाद म्हणजेच कलाकार आपले सर्वस्व मानू लागले आहेत. कलाकार म्हणून त्यांना स्वतःचा आवाज गवसला आहे का,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘संगीताला धर्म, जात, पंथ नाही तरीही अनेक संगीतकारांद्वारे संगीताचा धर्म तयार केला जातो. शिष्यांनाही तसेच प्रशिक्षण दिले जाते आणि कला ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादीत राहते. अशा सगळ्या वातावरणात संगीताची मुक्तपणे सेवा करण्याची संधी कलाकारांना मिळते का, याचाही विचार कलाकारांनी करायला हवा,’ याकडे कृष्णा यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांना आनंद देते, ते खरे बालसाहित्य

$
0
0

लेखिका रेणुताई गावस्कर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लहान मुलांच्या गोष्टींमध्ये तात्पर्य, शिकवण, संस्कार देण्याचा अट्टाहास न करता ते एक आनंद देण्याघेण्याचे माध्यम होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देते ते खरे बालसाहित्य,’ असे मत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे बाबुराव व शांतादेवी शिरोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माया धुप्पड (जळगाव) आणि गोविंद गोडबोले (कोल्हापूर) यांना बालसाहित्यासाठीच्या योगदानाबद्दल गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.

गावस्कर म्हणाल्या, ‘प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता, आकलनक्षमता, आवड वेगवेगळी असते. त्यामुळे परीक्षेतल्या यशानुसार मुलांशी आपली वागणूक ठरते. तसे न करता, ‘तू मला आवडतोस किंवा आवडतेस’ हा विश्वास आपल्या सहवासात बालकांना वाटत राहणे महत्त्वाचे आहे.’

प्रा. जोशी म्हणाले, ‘मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुलांच्या धावपळीच्या जीवनशैलीत खेळ आणि वाचनासाठी वेळ नाही ही चिंतेची बाब आहे. बालकुमारांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांनी केवळ स्वतःच्या बालपणीचे अनुभव न मांडता आजच्या मुलांचे भावविश्व समजून घेऊन लेखन केले पाहिजे. तंत्रशरण झालेल्या पिढीला भावसंपन्न बनविण्यासाठी बालसाहित्याची नितांत आवश्यकता आहे.’

‘मुलांना बालपणी आपण चालायला-बोलायला शिकवतो, तसे वाचायलाही शिकवायला हवे. फक्त पाठ्यपुस्तके नाही, तर अवांतर वाचनाची आवड जोपासण्यासाठी घरात त्यांनी आपले उदाहरण मुलांसमोर ठेवायला हवे,’ असे गोडबोले यांनी सांगितले. ‘रागावून छड्या न मारता, मुलांना गप्प न करता, त्यांना बालसहज वृत्तीतून खेळू-बागडू द्यायला हवे. वाचन-श्रवण-दर्शन, अनुभवातून, रेडिओ, टीव्ही इंटरनेट अशा सगळ्या माध्यमातून मुलांची आकलनशक्ती, अभिरुची, संवेदनशीलता वाढते, जपता येते, याकडे धुप्पड यांनी लक्ष वेधले. बंडा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहुला-बाहुलीचा लग्नसोहळा थाटात

$
0
0

मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे विशेष मुलांसाठी कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मंगलाष्टकांचे मंगलमय सूर....विविध वस्तूंनी सजलेले रुखवत...पारंपरिक वेशात जमलेले विशेष वऱ्हाडी....बँडच्या ठेक्यावर वाजत काढलेल्या वरातीमध्ये धमाल करीत दुपारी १२.२०च्या शुभ मुहूर्तावर बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा थाटात पार पडला.

निमित्त होते, लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन दिलासा केंद्रामध्ये मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे विशेष मुलांसाठी आयोजित बाहुला-बाहुलीच्या अनोख्या लग्नसोहळ्याचे. या वेळी मैत्रयुवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, वरिष्ठ शिक्षिका संगीता नागपूरकर, प्रतिक्षा कंठाळे, श्रीराम निजामपूरकर आदी उपस्थित होते. सेवासदन दिलासा केंद्रामधील मतिमंद मुले, बालसदनमधील अनाथ मुली आणि देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या ‘सहेली’ संस्थेतील चिमुकले कार्यक्रमात सहभागी झाले होते. उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष होते.

विशेष मुलांना देखील लग्नसोहळ्याचा निखळ आनंद घेता यावा, या उद्देशाने आम्ही दरवर्षी हा उपक्रम आयोजित करतो. हा सोहळा पाहताना एका वेगळ्याच भावविश्वात मुले रमतात, मनापासून आनंद व्यक्त करतात, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्य लग्नात होणारे सगळे समारंभ या लग्नामध्ये करण्यात आले. लग्नाच्या आधी एक दिवस मेहेंदी, तसेच बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. विशेष मुलांमधील अनेक जणांना आपल्या सारखे सण-उत्सव, तसेच लग्नसमारंभाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी बाहुला बाहुलीचे लग्न अगदी घरचे लग्न ठरले आहे. दरवर्षी अतिशय आतुरतेने मुले या लग्नाची वाट पहात असतात, अशी माहिती नागपूरकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेसाठी गणवेशात आंदोलन

$
0
0

बनकर शाळेत सुविधांसाठी सह्यांची मोहीम
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महापालिकेच्या कै. रामचंद्र बनकर ई-लर्निंग स्कूलमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. याबाबत वारंवार तक्रार व निवेदन देऊनही प्रशासन तातडीने शिक्षक व शालेय सुविधा पुरवत नसल्याने हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांनी शालेय गणवेश परिधान करून आंदोलन केले. या वेळी पालकांच्या सह्या गोळा करण्यात आल्या.
महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक योगेश ससाणे यांनी विद्यार्थ्यांसारखा शालेय गणवेश परिधान करून पालकांच्या सह्यांची मोहीम बनकर ई-लर्निंग स्कूलमध्ये सकाळी सात वाजता राबविली. त्यामध्ये स्कूलच्या पालकांनी अपुरे शिक्षक व स्कूलमध्ये असणाऱ्या गैरसोयी तातडीने दूर कराव्यात यासाठी पालकांनीही सही मोहिमेत सहभाग घेतला.
पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बनकर ई-लर्निंग स्कूलमध्ये सुमारे एक हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत एकूण ५४ खोल्या आहेत, मात्र त्यापैकी फक्त २७ वर्ग उपयोगात आणता येण्याच्या स्थितीत आहेत. या २७ वर्गांसाठी फक्त १५ शिक्षक आहेत. त्यामुळे एकाच वर्गात १८० विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविले जाते. या सर्व १८० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतात. बनकर शाळा पुणे महानगर पालिकेची सर्वांत अद्ययावत शाळा मानली जाते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी असणारे ग्रंथालय, सायन्स लॅब, एअरोमॉडेलिंग, कम्प्युटर लॅब, संगीत (म्युझिक) रूम, तसेच ऑडिटोरियम, जिम, बॅडमिंटन हॉल, स्नूकर हॉल, स्विमिंग टँक आणि टेबल टेनिस आदी सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही.
पालिकेला याबाबत वारंवार सूचना देऊन वा पत्रव्यवहार करून या सर्व बाबींची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकारांमुळे पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे महापालिकांचे लक्ष वेधण्याकरिता सह्यांचे मोहीम राबवून आंदोलन करण्यात आले. महापालिका हडपसर विभाग सहायक शिक्षण प्रमुख सुरेश उचाळे यांनी आंदोलकांनी दिलेले निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यांकुर शाळेची होणार चौकशी

$
0
0

शिक्षण विभागाने दिला आदेश
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून सुमारे पस्तीस विद्यार्थ्यांना तास चालू असताना वर्गाच्या बाहेर फरशीवर दोन तास बसवून ठेवणाऱ्या वडगांव शेरीतील विद्यांकुर शाळेची शिक्षण विभागाने चौकशी करण्यात करून शाळेला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
वडगांव शेरी येथील खाजगी विद्यांकुर शाळेत शिकणाऱ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांमधील ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, त्यांना वर्गाबाहेर फरशीवर बसवण्यात आले आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी फी भरण्याबाबत फोनवर बोलायला लावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१४ जुलै) घडली होती. सुमारे दोन तास फी न भरलेले सुमारे ३५ विद्यार्थी वर्गाबाहेर होते.
याबाबत शनिवारी 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने ‘मटा’च्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन सोमवारी दोन पर्यवेक्षकांमार्फत शाळेची चौकशी केली. या घटनेविषयी शाळेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिले.
वडगांव शेरी परिसरात विद्यांकुर नावाची मोठी इंग्रजी शाळा आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांत फी भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही काही विद्यार्थ्यांची फी भरण्यात आलेली नव्हती. अशा विद्यार्थ्यांच्या नावाची यादी शाळेतर्फे तयार करण्यात आली. त्यानंतर यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू असताना वर्गाबाहेर बोलावून फरशीवर बसविण्यात आले. त्यानंतर शाळेच्या लँडलाइनवरून प्रत्येक विद्यार्थ्याला फी भरण्याबाबत पालकांशी बोलायची सक्ती करण्यात आली. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. संबंधित मुलांच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी शाळेत धाव घेतली. परिसरातील नगरसेवक भय्यासाहेब जाधव, मनोज पाचपुते, निखिल बटवाल यांनीही याबाबत शाळा प्रशासनाकडे चौकशी केली. त्यानंतर शाळेकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, असे आश्वासन शाळेचे संचालक फादर टोनी फ्रान्सिस यांनी दिले होते.
...
शाळेची फी वेळेत न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेचे तास चालू असताना वर्गातून बाहेर काढून फरशीवर बसविणे आणि विद्यार्थ्यांना फोन लावून पालकांना फी भरण्यास सांगितल्याची घटनेची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. शिक्षण विभागाच्या दोन पर्यवेक्षकांकडून सोमवारी शाळेची चौकशी करावी आणि पाहणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तातडीने द्यावा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
- एम. आर. जाधव, सहायक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई

$
0
0

कंत्राटी ड्रायव्हरना किमान वेतनापेक्षा कमी पगार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
किमान वेतनापेक्षा कंत्राटी वाहनचालकांना कमी पगार देणाऱ्या ठेकेदाराला नोटीस जारी करण्यात आली असून, त्याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय नव्या ठेकेदाराची नियुक्तीही लवकर होणार आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन चालकांच्या नियुक्तीसाठी ठेकेदाराकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जुना ठेकेदाराकडून नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यावर सभेत चर्चा करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी संदर्भात कारवाईचे आश्वासन दिले आहे.
कंत्राटी वाहनचालकांना किमान वेतनापेक्षा कमी पगार ठेकेदाराकडून मिळत असल्याची तक्रार वाहन चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर ठेकेदाराकडून वाहन चालकांनी किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्याबाबत तक्रारीही करण्यात आली.त्यामुळे नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. किमान वेतनाबरोबर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी तसेच इतरही सुविधा देण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केली.
.......
‘कायम स्वरूपी कर्मचारी हवेत’
कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मागणी केली होती. त्या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भरतीला अद्याप परवानगी दिली नसल्याकडे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिस्थितीला कंटाळून अपंग पित्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मुलाचा दुर्धर आजार आणि स्वतःचे अपंगत्व यामुळे हताश पित्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी (१६ जुलै) चिखली येथे ही घटना उघडकीस आली.
नितीन शंकर फालके (४१, रा. रस्टीक पॅराडाइज, चिखली) असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. रविवारी सकाळी त्यांनी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हे जन्मापासून उजव्या पायाने अपंग होते. मात्र, त्यावर मात करत त्यांनी नोकरी मिळवली होती. संसार ही थाटला होता. कालांतराने मुलगा झाल्यावर मूळचे दापोडी येथील रहिवासी असणारे फालके हे चिखली येथे राहण्यात आले. परिस्थिती तशी बेताचीच पण त्यातही समाधान मानून त्यांनी सगळ्या गोष्टींवर मात करत आयुष्य जगण्यास सुरुवात केली.
काही दिवसांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला दुर्धर आजार असल्याचे समोर आले. वय वर्ष बारा असताना त्याला दुर्धर आजाराने ग्रासल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना डायलेसिस करण्यासाठी सांगितले. काही दिवसांपासून उपचारही सुरू होते. मात्र, डायलेसिसचा खर्च हा न परवडणारा होता. त्यातच स्वतःचे अपंगत्व या साऱ्या परिस्थितीला कंटाळून निराशेतून नितीन यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. ‘मी माझ्या आयुष्याला पुरता कंटाळलो आहे. त्यामुळे कोणालाही दोषी धरू नये. मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे,’ अशा आशयाचा मजकूर त्यात लिहिलेला आहे. या प्रकरणी पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इस्रायलचा अभ्यास आपण कधी करणार ?

$
0
0


Chintamani.Patki@timesgroup.com
--------------------------
Tweet: @chintamanipMT
पुणे : ‘इस्रायली लोक भारतीय प्राचीन विद्या, संस्कृती यांचा तळमळीने अभ्यास करतात. आपण त्यांच्या संस्कृतीचा, ज्यू परंपरेचा, हिब्रू भाषेचा अभ्यास कधी करणार,’ असा सवाल वैदिक आणि बौद्ध वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ‘मटा’शी बोलताना केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठात भारतविद्या अध्यासनाची स्थापना केली आहे. बहुलकर यांची परिषदेने भारतविद्या अध्यासनावर नियुक्ती केली होती. या अध्यासनावर नियुक्त होण्याचा मान बहुलकर यांच्या रूपाने प्रथमच मराठी व्यक्तीला मिळाला. बहुलकर हे आपला कार्यकाळ पूर्ण करून नुकतेच पुण्यात परतले असून, यानिमित्त ‘मटा’ने त्यांच्या या दौऱ्याविषयी जाणून घेतले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही याच कालावधीत इस्रायलच्या दौऱ्यावर होते.
‘या काळात एक जाणवले, की इस्रायलमध्ये भारत, भारतीय संस्कृती, योग, संगीत, भाषा या सर्वांविषयी प्रचंड कुतूहल आहे. या कुतूहलापोटी तेथील विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात किंवा भारतात येऊन अभ्यास करतात. हे पाहून वाटले की, आपण इस्रायल देश, ज्यू धर्म, हिब्रू भाषा या संस्कृतीचा अभ्यास कधी करणार ? ही संस्कृतीही जुनी असून, तिचा अभ्यास करावा असे वातावरण आपल्याकडे का नाही,’ असा सवाल बहुलकर यांनी केला. ‘भारतात हिब्रूचा अभ्यास करण्याची सोय नाही. त्या संस्कृतीचे फारसे विद्वान आपल्याकडे नाहीत. भारतासंबंधी अभ्यास करणारे अनेक देश आहेत. आपल्याकडे परकीय म्हटले, की मात्र ठरावीक भाषांचा अभ्यास होतो. सर्व देश आणि संस्कृती यांच्या सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास व्हायला पाहिजे,’ यावर त्यांनी बोट ठेवले.
‘विद्वानांसाठी ओळखले जाणारे तेल अविव विद्यापीठ आणि जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठ अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याने तेथील विद्वानांशी संवाद साधता आला. त्याचा फायदा भांडारकर संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला व्हावा, अशी माझी इच्छा आहे. दोन देशांचे सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत, हा आपला प्रयत्न असला पाहिजे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बहुलकर म्हणाले, ‘भारतविद्या अध्यासनात संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषा तसेच धर्म, संस्कृती, पुरातत्वशास्त्र अशा विषयांचा अभ्यास केला जातो. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी तिथे आहेत. वेद, उपनिषदे, गीता, संस्कृत, प्राकृत, पाली यांचे वाचन ते करतात. तिथे जाऊन शिकवणे हे आव्हान होते आणि आनंदही होता.’

मराठी बोलणारे ज्यू
‘दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यू लोक भारतात येऊन सुखाने राहिले. अनेकजण परत गेले असले तरी बेने इस्रायली म्हणून त्यांची भारताशी नाळ जुळलेली आहे. तेथील दूतावासातील एक बाई आणि एक चालक मराठीत बोलत होते. मला आश्चर्य वाटले. ते ज्यू मराठी होते. घरात मराठी बोलून ते मराठी भाषा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायलमध्ये सैनिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विविध ठिकाणी जाऊन अभ्यास करतात. भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे,’ अशी माहिती डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ यंत्रणा ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संगमवाडी कार्यालयातील ‘वाहन व सारथी ४.०’ प्रणाली ठप्प झाली होती. कार्यालयीन वेळेतील बहुतांश वेळ कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे भर पावसातही विविध कामांसाठी आरटीओत दाखल झालेल्या नागरिकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.
आरटीओमध्ये ‘वाहन व सारथी ४.०’ प्रणाली कार्यान्वित केल्यापासून दैनंदिन कामकाजात सातत्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी इंटरनेटच्या सेवा सुरळीत किंवा कमी ‘स्पीड’ मिळाल्याने यंत्रणा ठप्प झाली, तर कधी मूळ यंत्रणेच तांत्रिक बिघाड झाल्याने कामकाज होऊ शकले नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे. आरटीओचे कामकाज सकाळी १० वाजतापासून सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळपासूनच प्रणाली ठप्प होती. त्यामुळे कामकाज सुरू झाले नाही.
आरटीओला भारत संचार निगम लिमिटेडमार्फत (बीएसएनएल) इंटरनेट सेवा दिली जाते. मात्र, बीएसएनएलची पुरवठा वायर तुटल्याने आरटीओची इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास ही सेवा पूर्ववत झाली, अशी माहिती आरटीओ प्रशासनाने दिली. त्यानंतर काही वेळ कामकाज झाले. दरम्यान, लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा घेणे, नवीन वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी, विविध प्रकारचे कर भरणे आदी कामांसाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. या सर्वांनाचा हेलपाटा झाला. त्यांना रिकाम्या हातांनी माघारी जावे लागले.

पुन्हा अपॉइंटमेंटची गरज नाही
लर्निंग लायसन्सची परीक्षा होऊ न शकल्याने सोमवारी अपॉइंटमेंट मिळालेल्या अर्जदारांना येत्या आठ दिवसांत परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई यांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण तसेच जातीवाचक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांसह इतर चार जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पाटील यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.
तृप्ती देसाई यांसह त्यांचे पती प्रशांत नारायण देसाई, दीर सतीश नारायण देसाई व भूमाता ब्रिगेड संघटनेचे कार्याध्यक्ष कांतीलाल ऊर्फ अण्णा गवारे (सर्व रा. पुणे) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
या प्रकरणी विजय अण्णा मकासरे (वय ३३, रा. श्रीरामपूर, जि. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम येथील महामार्गावर ही घटना घडली.
तृप्ती देसाई यांच्यासह इतर चौघांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी आणि दोन हजार रुपये असे मिळून एकूण २७ हजारांचा ऐवज लुटला; तसेच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बचाव पक्षातर्फे कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यांच्या अर्जाला सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी विरोध केला. अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायदा १९८९ मधील कलम १८ नुसार आरोप असतील तर आरोपीला जामीन देता येत नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केला. तो ग्राह्य धरून कोर्टाने देसाईसह इतर साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणीच्या त्रासातून हवी व्यापाऱ्यांना सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि विविध जयंत्या व पुण्यतिथीनिमित्त व्यापाऱ्यांना वर्गणीचा त्रास होतो. हे सण, उत्सव आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्यामुळे व्यापारी आनंदाने वर्गणी द्यायला तयार असतो, परंतु ती न घेता, विशिष्ट रकमेचा आग्रह धरून ती जबरदस्तीने घेतली जाते. त्यातून वादविवाद होतात. व्यापाऱ्यांना मारहाण केली जाते. व्यापाऱ्यांची या त्रासातून सुटका व्हावी व त्यांना संरक्षण मिळायला हवे, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांकडूनही विनाकारण त्रास दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘शहरात सुमारे ४० हजार छोटे दुकानदार व व्यापारी आहेत. सध्या हे सर्व व्यापारी दहशतीखाली व्यवसाय करीत आहेत. व्यापाऱ्यांवरील हल्ल्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. वारजे माळवाडी, किरकटवाडी, लेक टाउन, येरवडा, दांडेकर पूल, कोंढवा परिसरात दुकानदार व व्यावसायिकांवर हल्ले झाले आहेत. त्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रारी दिल्या आहेत. परंतु, हल्लेखोरांना जरब बसलेली नाही,’ असे निवंगुणे यांनी या वेळी सांगितले. असोसिएशनचे सोमारामजी राठोड, सुनील गेहलोत, नवनाथ सोमसे, उमेश यादव, युवराज दळवी, उमेश चौधरी, रवींद्र सारुक, सोहन कुमावत, विनोद चौधरी आदी उपस्थित होते.
‘महापालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून कोणीही व्यापाऱ्यांना दमदाटी करतात. नोटीस न पाठवताच कारवाई करण्यात येते. व्यापाऱ्यांनीही पारदर्शक व्यवसाय करावा, कर भरावा व अद्ययावत व्हावे, यासाठी असोसिएशनच्या वतीने नियमित प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात,’ अशी माहिती निवंगुणे यांनी दिली. व्यापाऱ्यांना होणाऱ्या या त्रासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे व संजय काकडे, उर्वरित सात आमदार, महापौर व महापालिका आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचे निवंगुणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेसीबी’पेक्षा रिक्षा महाग

$
0
0

नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांचा पालिकेवर आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची गंगा खोलवर रुजली असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केला आणि त्याचा नमुना समोर ठेवला आहे. पालिका प्रशासनाकडून ‘जेबीसी’ पेक्षा रिक्षाला जादा भाडे आकारण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ‘जेसीबी’द्वारे करण्यात येणारी कामे ही भ्रष्टाचार केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
‘जेसीबी’साठी प्रति तास ३१६ रुपये भाडे आकारण्यात येते. डिझेल, चालक हा खर्च पकडता आठ तासांसाठी तीन हजार तीनशे रुपये आकारण्यात येतात. मात्र, त्याचवेळी एखाद्या योजनेच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रिक्षाला तेवढ्याच कालावधीसाठी तीन हजार हजार रुपये भाडे देण्यात येते. त्यामुळे महापालिकेत ‘जेबीसी’पेक्षा रिक्षाला भाडे अधिक मिळत असल्याचा आरोप ओसवाल यांनी केला आहे.
महापालिकेने जेबीसी आणि रिक्षा पुरवण्यात काढलेल्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ओसवाल यांनी केला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना त्यांनी पाठवलेल्या नि​वेदनामध्ये ‘जेसीबी’च्या काढलेल्या निविदांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या व्हेइकल डेपो विभागाने ‘जेसीबी’ पुरविण्याचे टेंडर काढले होते. गतवर्षीच्या निविदांमध्ये संबंधित ठेकेदारांनी ३१६ रुपये दर आकारला आहे. त्याचवेळी मिळकतकर विभागाने कर भरण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांमध्ये रिक्षाचा वापर केला होता. या रिक्षाला प्रतिदिनी तीन हजार रुपये भाडे देण्यात आले होते. ‘जेसीबी’चा विचार करता तो आठ तास चालतो. प्रतितास ३१६ रुपये भाडे, डिझेल, चालकाचा पगार हा सर्व विचार करता तीन हजार ३०० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ठेकेदारांनी भरलेला निविदेचा दर पाहता हे काम भ्रष्टाचार केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी ओसवाल यांनी केली आहे.
००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images