Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बांधकाम ‌व्यावसायिकाला दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फ्लॅट बुक केल्यानंतर तीन वर्षांनंतरही फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोर्टाने दणका दिला आहे. फ्लॅटधारकाला मूळ अडीच लाख रुपयांची रक्कम सहा टक्के व्याजदराने परत देण्यात यावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे. स्थायी लोकअदालतीमध्ये चार महिन्यांच्या आता हा ​दावा निकाली काढण्यात आला.
स्वामी समर्थ असोसिएट बिल्डरचे संग्राम तुकाराम दांगट आणि त्यांच्या भागीदारांच्याविरुद्ध हा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी प्रमोद कुदळे यांनी अॅड. महेंद्र दलालकर यांच्या मार्फत हा दावा दाखल केला होता. त्यांनी स्थायी लोकअदालतीमध्ये हा दावा दाखल केला होता.
प्रमोद कुदळे यांनी स्वामी समर्थ बिल्डरकडे फ्लॅट बुक केला होता. कुदळे यांनी प्रथम ५० हजार रुपयांचा चेक दिला होता. त्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये त्यांनी हप्त्याने भरले होते. रक्कम दिल्यानंतर तीन वर्षांनंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यांनी या प्रकरणी संबंधितांकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी अॅड. दलालकर यांच्यामार्फत स्थायी लोकअदालतीकडे दावा दाखल केला.
कुदळे यांना अडीच लाख रुपये सहा टक्के व्याजदराने आणि २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला. स्थायी लोकअदालतीचे निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिनकर कांबळे, सदस्य आर. जी. खोडवे, आर. एल. चव्हाण यांनी हा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंदू सरकार’चे प्रमोशन उधळले

0
0

काँग्रेस कार्यकर्ते झाले आक्रमक; आक्षेपार्ह भाग वगळण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेंल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचे प्रमोशन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उधळून लावले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात आलेल्या दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना या गोंधळामुळे पत्रकार परिषद तसेच पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी काढून न टाकल्यास तो शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत ‘इंदू सरकार’ या चित्रपटात चुकीचे वक्तव्य करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातून काँग्रेस पक्षाने चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भांडारकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदांचे आयोजन केले होते. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केल्याने सर्व कार्यक्रम गुंडाळावे लागले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे भांडारकर यांची पहिली पत्रकार परिषद रद्द झाल्याने ते बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमाकडे रवाना झाले. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने तोही कार्यक्रम रद्द करण्यात आला.
पुणे स्टेशन येथील एका हॉटेलमध्ये भांडारकर यांची पत्रकार परिषद होणार होती. या ठिकाणीही बागवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते‍ पोहचले. भांडारकर यांच्या धिक्काराच्या, निषेधाच्या घोषणा देण्यात आल्याने ही पत्रकार परिषदही गुंडाळण्यात आली. या हॉटेलमध्ये बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी काढल्या जात नाही, तोपर्यंत हा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांनी बागवे यांना ताब्यात घेतले. नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, गोपाळ तिवारी, म. वि. अकोलकर, रमेश अय्यर, विकास लांडगे, सोनाली मारणे, नुरुद्दीन सोमजी यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

बागवेंना अटक आणि सुटका
‘इंदू सरकार’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेले दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह २२ जणांस अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉर्पिओ-कारच्या धडकेत महिला ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रजच्या नवीन बोगद्यात भरधाव स्कॉर्पिओने अल्टो कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातामध्ये अल्टो मोटारीतील ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक पसार झाला.
इंदुमती कृष्णा पाटील (वय ८३, रा. लोकमान्य नगर,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संजय पाटील (वय ४१, रा. शाहूनगर ता. शिरोळ जि. कोल्हापुर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार स्कॉर्पिओ चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कोल्हापूरहून अल्टो मोटारीतून तिघांना घेऊन पुण्याच्या दिशेने येत होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ते कात्रजच्या नवीन बोगद्यात आले. त्या वेळी त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओ धडक दिली. सुरेखा काळे आणि इंदुमती पाटील या कारमध्ये मागे बसल्या होत्या. त्यात इंदुमती पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुरेखा काळे आ​णि वसंत काळे जखमी झाले. अपघातनंतर स्कॉर्पिओ चालक पळून गेला. त्यामुळे कात्रज नवीन बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.
भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्पेक्टर राज जीएसटीमुळे नष्ट

0
0

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वस्तू आणि सेवा करामुळे इन्स्पेक्टर राज नष्ट झाले आहे. त्याचबरोबर बहुतांश वस्तू स्वस्त झाल्या आहेत. जीएसटी कायदा सर्व राज्यांनी (जम्मू काश्मीर वगळता) एकमताने संमत केला आहे. त्यामुळे जीएसटीचे श्रेय सर्वांनाच आहे’, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे आयोजित जीएसटी परिसंवादाला जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कस्टम विभागाचे आयुक्त व्ही. एस. चौधरी, जीएसटी पुणे (वन) विभागाचे आयुक्त मिलिंद गवई, विभाग दोनच्या आयुक्त वंदना जैन, अप्पर महानिरीक्षक राजेश पांडे, अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, राज्य जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त ओम भांगडिया उपस्थित होते. सीजीएसटीच्या पुणे विभागाच्या उपायुक्त राजलक्ष्मी कदम यांनी सूत्रसंचालन केले.
‘जीएसटी नुकताच लागू झाला आहे. त्यामुळे अनेकांना शंका किंवा अडचणी येण्याची शक्यता आहे. जीएसटीपूर्वी खरेदी केलेला मालही अजून वापरात आहे. त्यामुळे जीएसटीनंतरचे एक कर वर्तुळ पूर्ण झाले, की अनेक गोष्टी सोप्या होतील. जीएसटी संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी आणखी महिना-दीड महिना लागण्याची शक्यता आहे,’ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
‘देशाच्या स्वातंत्र्यानंतर विविध संस्थांनांचे संघराज्यात विलीनीकरण झाले, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने भारतात भौगोलिक क्रांती होऊन देश भौगोलिकदृष्ट्या एक झाला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली जीसएटी लागू होऊन देश आर्थिकदृष्ट्या एक झाला,’असेही जावडेकर म्हणाले. व्यावसायिकांनी आधार क्रमांक, पॅन क्रमांक, जीएसटीएन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक याची नोंद ठेवल्यास त्यांना सहजरित्या रिटर्न भरणे शक्य होईल, ’असेही जावडेकर म्हणाले.

‘जीएसटी अभ्यासक्रमात’
‘देशभरातील करप्रणाली व कॉमर्सशी संबंधित अभ्यासक्रमात जीएसटीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच, जीएसटीविषयीचा अभ्यासक्रम सरकारच्या स्वयम या पोर्टलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम मोफत आहे. व्हिडिओ, व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातील हा अभ्यासक्रम डीटूएचच्या माध्यमातूनही उपलब्ध असेल. मोबाइलवरूनही तो डाउनलोड करता येईल,’ असेही जावडेकरांनी सांगितले.

करविषयक प्रश्नांचा मारा
वस्तू व सेवा कराविषयी (जीएसटी) आयोजित परिसंवादात जावडेकर यांना शहरातील व्यावसायिकांच्या विविध शंका आणि प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला. या सर्व प्रश्न व शंकांची जावडेकर यांनी नोंद घेतली. तसेच या संदर्भात सविस्तर निवेदन ई-मेल द्वारे पाठविण्याचे आवाहन केले व या समस्यांचे उत्तर पाठविण्याचे आश्वासनही दिले.

कॉलेज कँटिनला ‘थेटभेट’
जावडेकर यांनी शनिवारी अचानक पुण्यातील एका कॉलेजच्या कँटिनला भेट देऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच काही पदार्थांची चवही चाखली. शिवाजीनगर येथील आयएमडीआरमधील सुविधा कँटिनला त्यांनी अचानक भेट दिली. अचानक दिलेल्या भेटीत त्यांनी कँटिनचा परिसर, विशेषतः स्वयंपाकघर, पदार्थांचा दर्जा व अन्य सुविधांची पाहणी केली. देशभरात शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कँटिनमध्ये योग्य सुविधा, स्वच्छता आणि दर्जेदार पदार्थ योग्य दरात उपलब्ध व्हायला हवेत, ही माझी भूमिका आहे. त्यामुळेच मी येथे भेट दिली, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे’ने कोंडले आरोग्य अधिकारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख नसल्याने पेशंटचे हाल होत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी पालिकेत चक्क अधिकाऱ्‍यांना कोंडून आंदोलन केले. सहायक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, डॉ. वैशाली जाधव या अधिकाऱ्यांना केबिनमध्ये कोंडून बाहेरून कुलूप लावत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोंडलेले असतानाही पालिकेचे सुरक्षारक्षक तसेच पोलिसांना कार्यालयाचे कुलूप काढता न आल्याने चिडलेल्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी घटनेचा अहवाल मागविला आहे.
‘अ’ दर्जाची पालिका असा नावलौकिक असणाऱ्या पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य प्रमुखांअभावी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुविधांची वानवा आहे. तक्रार नेमकी कोणाकडे करायची, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत असल्याचा आरोप करून मनसेने दुपारी सहायक आयोग्यप्रमुखपदावरील महिला अधिकाऱ्यांना कोंडले. मनसे स्टाइलने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला. मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यासह मनीषा कावेडिया, ज्योती कोंडे, उषा काळे, जयश्री मोरे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलकांनी डॉ. साबणे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी बाहेरून टाळे लावून कार्यालय बंद केले. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरु होते.

अन् देशभ्रतार संतापल्या...
अधिकाऱ्यांना दीड तास कोंडून ठेवल्याचा प्रकार समजल्यानंतर अतिरिक्त आयुक्त देशभ्रातार यांनी पालिकेच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले. कुलूप तोडण्याचे आदेश त्यांनी मुख्य सुरक्षाधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्यानंतरही काहीच झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या देशभ्रतार यांनी विभागाचे प्रमुख उमेश माळी तसेच सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांना चांगलेच फैलावर घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्यांचे सत्र सुरूच

0
0

नऱ्हे, वडगावात चार फ्लॅट फोडले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, वडगाव परिसरातील समर्थनगर सोसायटीतील तीन फ्लॅट आणि नऱ्हेतील आंगण सोसायटीमध्ये एक अशा चार फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले होते. शनिवारी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. वडगाव येथील समर्थनगर सोसायटीत शोभा हौसराव आसबे (वय ४०) यांचा फ्लॅट आहे. आसबे यांच्या कुटुंबातील व्यक्ती कामाच्या निमित्ताने फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. या सोसायटीतील अन्य एका इमारतीत विजय नातू यांचा फ्लॅटही चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले. समर्थनगर सोसायटीतील पेठकर यांच्या फ्लॅटमध्येही चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.
पेठकर कुटुंबीय परदेशी गेल्यामुळे त्यांच्या फ्लॅटमधून नेमके काय चोरीला गेले, हे समजू शकलेले नाही. या सोसायटीत दोन सुरक्षारक्षक आहेत. तरीही घरफोड्या होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नऱ्हे येथील आंगण सोसायटीमध्ये बाळासाहेब ज्ञानेश्वर इंगवले (वय ३५) यांचा फ्लॅट आहे. इंगवले कुटुंबीय कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात रेल्वे विकासाला गती

0
0

सुरेश प्रभू यांची माहिती; पाच वर्षांत होणार कायापालट

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जपान आणि चीनमध्ये सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास पद्धतीनुसारच आपल्या देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्यास सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत देशात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल,’ असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी व्यक्त केले. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या रेल्वेमार्गांवर प्रति तास २०० किलोमीटर वेगाने प्रवासी रेल्वे चालविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेसच्या (एसआयआयबी) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रभू बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, थायसनकृप इंडियाचे उपाध्यक्ष दारा दमानिया, एसआयआयबीच्या संचालिका डॉ. अस्मिता चिटणीस या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रभू यांच्या हस्ते एसआयआयबीच्या ‘अविस्मरणीय’ या कॉफी-टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

चीन आणि जपानने रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, त्या तुलनेत आपण मागे पडलो होतो, याची कबुली देत प्रभू म्हणाले, ‘देशात रेल्वेचा विकास होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद केली आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प येत्या काही वर्षांत २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येईल. देशात ४० हजार रेल्वेडब्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मीटरगेज रेल्वमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून कालांतराने त्यांचे विद्युतीकरण करण्यात येईल. देशातील ४० ते ५० रेल्वेस्थानके विमानतळासारखी करण्यावर भर दिला जाणार आहे.’

‘देशाला भ्रष्टाचार, गरिबी अशा विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा वेळी देशाला आधार कार्डची गरज नाही, तर उत्तम दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या सुविधेची आवश्यकता आहे,’ अशी अपेक्षा डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली. प्रभू यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, संजय किर्लोस्कर, एस. के. जैन, तसेच संस्थेचे माजी संचालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर भाषण केले. या समारंभानंतर उस्ताद सुजात खालन, पंडित रोणू मुजुमदार आणि पंडित अरविंद कुमार आझाद यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला.

प्रभूंकडून नरसिंहरावांचे कौतुक

‘नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी चांगले काम केले. भारतीयांच्या ‘माइंडसेट’मध्ये बदल करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. देशातील नागरिकांच्या आर्थिक विचारसरणीत आमूलाग्र बदल करण्याचे श्रेय त्यांचे आहे. तरीही, त्यांच्या आर्थिक विषयाशी निगडित निर्णयांना अनेक उद्योजकांनी विरोध केला होता,’ अशी आठवण प्रभू यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ राबविणार वेशांतर मोहीम

0
0

एजंट विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अनधिकृतरित्या शिरकाव करून नागरिकांची विविध कामे करून देण्यासाठी त्यांच्याकडून जादा पैसे उकळणाऱ्या एजंटविरोधात पुरावे गोळा करण्याचा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. तसेच, पुरावे गोळा करून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचनाही त्यांनी दिली. एजंटविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी वेशांतर करून, डमी ग्राहक बनून जाण्याची सूचनाही केली आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एजंट हटाव मोहीम राबविली होती. त्यांना आरटीओच्या परिसरात येण्यास व कामकाजात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर काही एजंटांच्या संघटनांनी कायदेशीर लढा दिला. अर्जदाराचा प्रतिनिधी म्हणून संबंधित व्यक्तीकडून कामकाजात सहभागी होण्याचे पत्र आणणाऱ्या व्यक्तीस कामकाजात प्रवेश देण्याचा निर्णय कोर्टाने दिला.

आता आरटीओची बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, नागरिकांना त्याद्वारे अर्ज करताना, पैसे भरताना अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीचा फायदा घेऊन आरटीओ कार्यालयाच्या आवारात पुन्हा एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. कोर्टाच्या आदेशामुळे या एजंटांविरोधात थेट कारवाई करता येत नाही. त्यामुळे नागरिकांकडून जादा पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या एजंटांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा आदेश परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिला आहे.

फसवणाऱ्यांवर कारवाई गरजेची

संगमवाडी येथीस आरटीओ कार्यालयाच्या परिसरात १० ते १२ एजंटांनी चारचाकी गाड्यांमध्ये यंत्रणा उभारून लायसन्सची अपॉइंटमेंन्ट, लायसन्स नूतनीकरण, अशी विविध कामे करून दिली जात आहेत. सुरुवातीला या प्रकारच्या कामांसाठी योग्य दर आकारला जात होता. मात्र, आता हे सर्व एजंट मनमानी शुल्क आकारत आहेत. याबाबत त्यांना समज दिली असता, चारचाकी गाडी, त्यात दोन लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर, दोन कामाला माणसे अशी गुंतवणूक केल्याचे ते सांगतात. या एजंटांमुळे सर्वच एजंट बदनाम होत आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एजंटांवर करावाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीए’ परीक्षेचा निकाल मंगळवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी व फायनल परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी (१८ जुलै) जाहीर होणार आहे. संस्थेच्या icaiexam.icai.org या वेबसाइटवर दुपारी दोननंतर हा निकाल उपलब्ध होणार आहे. या निकालासोबतच पहिल्या ५० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही वेबसाइटवर जाहीर होईल.

एसएमएस आणि ई-मेलद्वारे देखील हा निकाल पाहता येणार आहे. त्याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. फायनल परीक्षेसाठी ३७२ केंद्रांमधून एक लाख ३२ हजार सात, तर सीपीटीसाठी ९३ हजार २६२ विद्यार्थी बसले होते, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष अरुण आनंदगिरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक बस, हजार प्रवासी; उत्पन्न १५ हजार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पीएमपीला आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी एका बसची दिवसाची प्रवासी संख्या किमान एक हजार आणि १५ हजार रुपये उत्पन्न मिळविण्याचे ध्येय आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरची असणार आहे. यामध्ये जबाबदारीने काम न करणाऱ्या डेपो मॅनेजरवर कठोर कारवाईचा इशारा ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंढे यांनी पीएमपीच्या कामगिरीचा डेपोनिहाय आढावा घेतला. डेपोतील कंडक्टर, ड्रायव्हरच्या कामाचे नियोजन, बसफेऱ्यांचे नियोजन, याबाबत मुंढे यांनी सूचना केल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी ठेवलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच, खर्च आणि उत्पन्न याचा व्यवस्थित मेळ न घातल्यास आर्थिक नुकसानाची जबाबदारी व्यवस्थापकांची असेल, असे मुंढे यांनी म्हटले आहे.

डेपो मॅनेजरला केलेल्या सूचना

डेपोकडील उपलब्ध बसगाड्यांपैकी जवळपास ९० टक्के गाड्या रोज रस्त्यावर आल्या पाहिजेत.

‘ब्रेकडाउन’चे प्रमाण एका टक्क्यापेक्षा कमी असावे.

डेपो मॅनेजरने चांगल्या प्रवासी सेवेसाठी योग्य नियोजन करावे.

आयटी कर्मचाऱ्यांसाठी पीएमपी सेवा देणार

शहराची ‘आयटी हब’ अशी ओळख निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवासी सेवा देण्यात येईल, असे सूतोवाच पीएमपी प्रशासनाकडून मिळाले आहेत. येत्या काळात पीएमपीच्या ताफ्यात दोनशे मिडी बस दाखल होणार आहेत. या बसद्वारे ही सेवा देणे शक्य आहे.

शहरातील प्रवासी वाहतुकीचे प्रथम माध्यम म्हणून पीएमपीकडे पाहताना, गरिबातील गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांसाठी पीएमपीची सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे. शहराची प्राथमिक गरज भागवून अन्य पर्यायांचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये ‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’ यासारख्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग असलेल्या ठिकाणी प्रवासी सेवा देण्यासाठी पीएमपी प्रशासन भविष्यात विचार करेल, असे मुंढे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी मोठ्या संख्येने कारचा वापर करतात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी पीएमपीकडून हिंजवडी मार्गासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्याबरोबरच ‘मेट्रोझिप' या खासगी प्रवासी वाहतूकदार कंपनीकडून हिंजवडीला विशेष बस सेवा पुरविली जात आहे. या कंपनीच्या ९० बसची आरटीओकडे नोंद करण्यात आली आहे. त्याद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांतून हिंजवडीसाठी सशुल्क बससेवा दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःचे वाहन न वापरता चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत चार हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या बससेवाचा पर्याय स्वीकारला आहे. ‘मेट्रोझिप’ला मिळणारा प्रतिसाद पाहता पीएमपीने या प्रकारची सेवा दिल्यास निश्चितच येथील कर्मचाऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.


‘मेट्रोझिप’चे १५० मार्ग

‘मेट्रोझिप’च्या वेबसाइटवर दर्शविल्यानुसार त्यांचे १५० मार्ग आहेत. या मार्गांवर ठरलेल्या बसद्वारे सेवा दिली जाते आणि प्रवाशांनाही त्या ठराविक बसनेच प्रवास करावा लागतो. ही सेवा ‘प्रीपेड’ आहे. या बसचे स्टॉप निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवासी ठरलेल्या वेळेत स्टॉपवर येऊन थांबणे अपेक्षित असते. या बसदेखील मोबाइल अॅपद्वारे ट्रॅक करता येतात. त्यामुळे प्रवाशांना ते सोयीचे होते.


पीएमपीकडून सध्या शहराच्या विविध भागांतून हिंजवडीसाठी १२ मार्गांवर प्रवासी सेवा दिली जाते.

कात्रज ते हिंजवडी माण फेज-३

वाकड पूल ते हिंजवडी माण फेज-३

भक्ती-शक्ती ते हिंजवणी माण फेज-३

पुणे स्टेशन ते हिंजवडी

आळंदी ते हिंजवडी माण फेज-३

भोसरी ते हिंजवडी

पिंपळे गुरव ते हिंजवडी

वसंतदादा पुतळा सांगवी ते हिंजवडी

चिंचवड गाव ते हिंजवडी माण फेज-३

हडपसर गाडीतळ ते हिंजवडी

कात्रज ते हिंजवडी माण फेज-३ (कोथरूड डेपोमार्गे)

मनपा भवन ते हिंजवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जीएसटीवरून व्यापाऱ्यांचा मंत्र्यांसमोर अडचणींचा पाढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आता प्रत्यक्षात आला असला, तरी अजूनही व्यापाऱ्यांच्या मनात त्याविषयी खूप शंका आहेत. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातही त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचा आणि शंकांचा पाढा त्यांनी शनिवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर वाचला.

या सर्व प्रश्न व शंकांची जावडेकर यांनी नोंद घेतली. तसेच, या संदर्भात सविस्तर निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन केले व या समस्यांचे उत्तर पाठविण्याचे आश्वासनही दिले.

‘ग्राहकांनी परत केलेल्या औषधांवरील जीएसटी कसा आकारायचा, याबाबत पुरेशी स्पष्टता झालेली नाही. औषधांसाठी एक्स्पायरी डेट हादेखील कळीचा मुद्दा आहे. एक्स्पायर झालेल्या औषधांवरील जीएसटी व इनपुट टॅक्स क्रेडिटबद्दलही संभ्रम आहे. तो स्पष्ट करणे आवश्यक आहे,’ अशी मागणी सुरेश बाफना यांनी केली.

‘मर्चंट एक्स्पोर्टर्सना काही वस्तूंवर २८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. बिल सादर केल्यानंतर त्यांना सात दिवसांत या रकमेपैकी ९० टक्के रकमेचा परतावा मिळणार आहे व उर्वरित परतावा बिलाची पडताळणी झाल्यावर मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवली रक्कम यात गुंतून पडणार आहे. सर्व रक्कम हाती यायला आम्हाला चार महिने थांबावे लागणार आहे. त्यामुळे आम्हाला अन्य देशातील व्यावसायिकांनी देऊ केलेल्या दरात व्यवसाय करता येणार नाही,’ अशी तक्रार या क्षेत्रातील व्यावसायिकांनी केली.

‘चित्रपटांच्या तिकिटांवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीविषयी काही व्यावसायिकांनी तक्रार केली. विशेषतः मराठी चित्रपटांवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. चित्रपटगृह चालवताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करून व्यवसाय करताना जीएसटीमुळे आणखी त्रास होत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. तामिळनाडूने चित्रपटांच्या तिकिटावर अतिरिक्त कर लावला असला, तरी त्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर अशा प्रकारे स्थानिक कर लावता येणार नाही,’ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

‘वातानुकुलित रेस्टॉरंट आणि साध्या रेस्टॉरंटवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरात फरक आहे. परंतु, अनेक ठिकाणी एकाच रेस्टॉरंटमध्ये एसी व नॉन एसी भाग आहे. त्यामुळे सरसकट १८ टक्के जीएसटी देण्यास ग्राहकांचा विरोध आहे. मात्र, एसी व नॉन एसीमधील पदार्थांचे दर वेगवेगळे असल्याने या दरात फरक पडणार नाही,’ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. ‘इतर सर्वत्र एसी व नॉन एसीचे दर वेगवेगळे असताना पुण्यातच तसे का नाही,’ अशी विचारणाही जावडेकर यांनी केली.

जुन्या किंवा वापरलेल्या कारची विक्री करताना नेमका किती रकमेवर व कसा जीएसटी आकारायचा व त्याचे इनपुट क्रेडिट मिळणार का, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. तसेच रीसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांना सवलत देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. पशुखाद्य, खते तसेच ब्रँडेड धान्यासंदर्भातील शंकाही काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केल्या. ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी एमआरपी किती छापावी, याबाबत कायदा करण्याची मागणी केली. तसेच, वस्तूवर उत्पादन मूल्य छापण्याचीही सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने फळभाज्या स्वस्त

0
0

टोमॅटो, शेवगा, सिमला मिरची, गाजर महागच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यासह परराज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्याने गेल्या आठवड्यात महाग असलेल्या टोमॅटो, शेवगा, सिमला मिरची, गाजर वगळता सर्व फळभाज्या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे दोन आठवड्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

टोमॅटो, शेवगा, सिमला मिरची, गाजर यांची आवक कमी असल्याने त्याचे दर वाढलेले आहेत. मार्केट यार्डात फळभाज्यांची रविवारी १७० ते १८० ट्रक इतकी भाज्यांची आवक झाली. परराज्यातील कर्नाटकातून १५०ते २०० पोती मटार, कर्नाटक, गुजरातमधून १० ते १२ ट्रक कोबीची आवक झाली. इंदूर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरचीची आवक झाली. आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, तसेच कर्नाटकातून २ टेम्पो श्रावणी घेवड्याची आवक झाली आहे.

स्थानिक भागातील पुरंदर, पारनेर, वाई, सातारा येथून २०० पोती मटार, तर सातारी आल्याची १४०० ते १५०० पोतीची आवक झाली. फ्लॉवरची १८ ते २० टेम्पो, कोबीची ८ ते १० टेम्पो, तसेच टोमॅटोची अडीच ते तीन हजार पेटीची आवक झाली आहे. गेल्या काही आठवड्यापासून टोमॅटोची आवक घटलेली आहे. सर्वच भागातून टोमॅटोची आवक कमी होत असल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, टोमॅटोच्या दरांत मागील आठवड्यात झालेली दरवाढ कायम आहे. भुईमूग शेंगाची २०० पोती, सिमला मिरचीची ८ ते १० टेम्पो, तसेच वाशी येथून गाजर, तोंडली, डांगर आणि वांग्याची दोन ते तीन टेम्पोची आवक झाली आहे.

पुणे विभागातून कांद्याची ७० ते ८० ट्रक, बटाट्याची आग्रा, इंदूर आणि गुजरात येथून ३ ते ४ ट्रक एवढी आवक झाली आहे. तसेच लसणाची मध्य प्रदेश आणि गुजरात येथून पाच ते साडेपाच हजार गोणींची आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, मेथीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने रविवारी पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक दुपटीने झाली आहे. रविवारी बाजारपेठेत कोथिंबीरची दीड लाख, मेथीची एक लाख तर शेपूची २५ ते ३० गड्डींची आवक झाली.

सीताफळ, पेरूच्या दरात घट

पेरू आणि सीताफळांची आवक वाढू लागली असून मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही फळांच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी दरवाढ झाली. पेरूची ३०० ते ३५० ट्रे, तर सीताफळाची दोन ते अडीच टन एवढी आवक झाली. लिंबाची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून त्यामुळे त्याचे दर उतरले आहेत. लिंबाची ७ ते ८ हजार गोणींची आवक झाली आहे.

केरळहून अननसाची ६ ट्रक, मोसंबी ३० टन, संत्रा २ टनाची आवक झाली आहे. डाळिंबाची ६० ते ७० टन, पपई १० ते १२ टेम्पोची आवक झाली. चिक्कूची १०० बॉक्सची आवक झाली. लंगडा, दशहरी आणि चौसा या प्रकारच्या आंब्याची आवक वाढल्याने त्याच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात दरवाढ झाली. लिंबाची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली असून त्याचा परिणाम म्हणजे दरघट होण्यामध्ये झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कलिंगडची ८ ते १० टेम्पो, खरबुजाची १० ते ३० टेम्पो एवढी आवक झाली आहे.

भिजलेल्या फुलांचा भाव उतरला

गुरूपौर्णिमेनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, फूल बाजारात येणारा फुलांचा शेतीमाल भिजला आहे. त्याला उठाव कमी आहे. तसेच आवक घटल्याने त्याच्या दरात घसरण झाली आहे. पावसामुळे फुलांच्या तोडणीवर परिणाम झाला असून भिजलेला माल बाजारात येत आहे. त्यात शहरात पावसाने वास्तव्य केले आहे. त्यामुळे खरेदीस येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली आहे. आषाढ महिना असल्याने सध्या मागणी कमी असून झेंडूसह इतर फुलांच्या दरात २० ते २२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती फुलाच्या व्यापाऱ्यांनी दिली. श्रावण महिना सुरु होत असल्याने फुलांना मागणी वाढण्याची शक्यता आहे.

आषाढामुळे मासळीला भाव

सध्या आषाढ सुरू असल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीला मागणी दुप्पट झाली आहे. गुरूपौर्णिमा, सोमवार, गुरुवार आणि चतुर्थीमुळे मागणी कमी झाली होती. परंतु, रविवारी आषाढाचे शेवटचे काही दिवस असल्याने मासळीला मागणी दुप्पट झाली आहे. पुढील आठवड्यात आवक वाढून मागणीही जास्त राहणार आहे. खोल समुद्रातील मासळीची १० ते १२ टन, खाडीची मासळी २०० ते ३०० किलो, नदीची मासळी ५०० ते ६०० किलो, आंध्रचा रहू, कतला आणि सिलनची १४ टन इतकी आवक झाली आहे. पापलेट, सुरमई आणि वामच्या भावात वाढ झाली. करली, करंदी, भिंग, कोळंबी, तांबोशी आणि बांगड्याच्या दरात किचिंतशी घट झाली आहे. इंग्लिश अंड्याला मागणी कमी असल्याने शेकड्यामागे ४० रुपयांची घट झाली आहे. चिकनला मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर राहिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशक्ती’मध्ये साडेसहा कोटींचा अपहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाणेर येथील शिवशक्ती को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी व अधिकाऱ्यांनी तब्बल सहा कोटी ६३ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहकारी संस्था लेखा परीक्षक संजय पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून संस्थेचे प्रभारी महाव्यवस्थापक बाळकृष्ण यशवंत पोळ, कार्यकारी संचालक नौशाद महंमद तोहर पिरजादे, अध्यक्ष संजय पांडुरंग कलाटे, संचालक, राजेंद्र किसन नेटके, शरद परशुराम बोऱ्हाडे, दिलीप गेनभाऊ कलाटे, मच्छिंद्र बबन जांभुळकर, राहिदास बापुसाहेब मुरकुटे, दत्तात्रेय बाबूराव साने आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशक्ती को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये २४ नोव्हेंबर २०११पूर्वी सहा कोटी ६४ लाख २० हजार ३९२ रुपये शिक्कल असणे आवश्यक होते. प्रत्यक्षात २४ हजार २९५ रुपयेच शिल्लक होते. ही रक्कम कमी असल्याने त्याची तपासणी केली असता त्यात सहा कोटी ६३ लाख ९६ हजार ९७ रुपयांचा महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, अध्यक्ष, संचालकमंडळाने अपहार करून सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंदे अधिक तपास करत आहेत.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक

शिवणे येथे फर्निचरच्या कामावरून झालेल्या वादानंतर मानसिक त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दिनाराम बोरावट असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दुर्गाराम पुनाराम प्रजापती (वय ३७, रा. इंदिरानगर), उदाराम लनुराम दुगट (वय ३२, रा. आंबेगाव पठार) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लीलादेवी बोरावट (वय ३५, रा. शिवणे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरावट व प्रजापती हे नातेवाइक आहेत. बोरावट व प्रजापती हे दोघे फर्निचरचे काम करत होते. बोरावट यांनी बिलाचे पैसे कमी दिल्याने त्यांच्यात वाद सुरू होता. या दोघांनी पैशाचा तगादा लावल्याने त्यास बोरावट यांनी सात जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली.

अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी गोंधळ घालून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी डॉ. धनराज माने यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अभाविपचे प्रदेश महामंत्री राम सातपुते यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील विद्यापीठात डॉ. धनराज माने हे कुलसचिव असताना त्यांनी भरती प्रक्रियेत नियमबाह्य नियुक्ती केल्याचा ठपका ठेवल्याने त्यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली. परंतु, निलंबन न झाल्याने याविरोधात आंदोलन करण्याचा व विनोद तावडे यांची गाडी अडविण्याचा इशारा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. तरीही, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. त्यामध्ये माने यांना शिवीगाळ करत फायली फेकून दिल्या. सामानाजी तोडफोड केली, तसेच ‘शिक्षणमंत्री विनोद तावडे हाय हाय’ अशा घोषणा देत गोंधळ घातला. या प्रकरणी माने यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’च्या एजन्सीविरुद्ध गुन्हा

0
0

पुणे : वीजग्राहकांच्या मीटरचे सदोष रिडिंग घेऊन वीजग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या रिडिंग एजन्सीच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.

‘प्रकाशभवन’मध्ये महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व मीटर रिडिंग एजन्सीजचे संचालक यांची नुकतीच बैठक झाली. त्या वेळी ताकसांडे बोलत होते. या वेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

मीटर रिडिंग एजन्सीजने घेतलेल्या रिडिंगचे त्याच दिवशी महावितरणकडून पाच टक्के तपासणी करून पर्यवेक्षण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताकसांडे म्हणाले, ‘महावितरणने मोबाइल अॅपद्वारे वीजमीटर रिडिंगची प्रणाली विकसित केली आहे. पूर्वीच्या तुलनेत मीटर रिडिंगची पद्धती अधिक सोयीस्कर व सोपी झालेली आहे. रिडिंगमध्ये अचूकताही आलेली आहे; पण मीटर रिडिंग एजन्सीजद्वारे अनेक ठिकाणी सदोष रिडिंग घेतले जात आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांकडून रोज प्रत्यक्ष पाच टक्के मीटर रिंडीगची तपासणी करून एजन्सीजने घेतलेल्या रिडिंगचे पर्यवेक्षण सुरू आहे. त्यातून हा प्रकार दिसून येत आहे.’

‘सदोष मीटर रिडिंग घेतल्यामुळे महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. याशिवाय वीजबिल दुरुस्तीचा ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदोष मीटर रिडिंग सुरू राहिल्यास संबंधित मीटर रिडिंग एजन्सीजला दंड, काळ्या यादीत टाकणे आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे,’ असेही ताकसांडे म्हणाले. ‘महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘वीजग्राहकांना अचूक मीटर रिडिंगचे वीजबिल देणे, ही महावितरणची जबाबदारी आहे. सदोष मीटर रिडिंगकडे महावितरणचे लक्ष आहे. रिडिंग एजन्सीजने या कामात ताबडतोब सुधारणा करावी,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केटमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

0
0

बड्या व्यापाऱ्यांवरील कारवाई टाळली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केट यार्डातील गेट क्रमांक एकवरील काही मोजक्याच गाळ्यांसमोरील अतिक्रमणावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने हातोडा मारला. परंतु, हातोडा मारताना बड्या व्यापाऱ्यांना फारसा धक्का लागणार नाही याची काळजी घेताना गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई मात्र चोख करण्यात आली.

मार्केट यार्डात गाळ्यांसमोर अनेक व्यापाऱ्यांनी अनधिकृत ओटे बांधून त्या ठिकाणी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मार्केट यार्डातील गेट क्रमांक एकवर व्यापाऱ्याने रस्त्यावर भाजीपाला, कलिंगड, खरबूजाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे अनेकदा वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. हा प्रकार घडत असताना त्यावर हातोडा मारण्याऐवजी बाजार समितीने मात्र बड्या व्यापाऱ्यांना धक्का लागणार नाही आणि इतरांना बोलण्याची संधी मिळणार नाही, अशा पद्धतीने कारवाई केली.

‘मार्केट यार्डात काही गाळ्यांसमोर व्यापाऱ्यांनी व्यवसायासाठी ओटे बांधले होते. ओट्यामुळे पावसाचे पाणी हे दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे साचते. पाण्यामुळे इतर व्यापाऱ्यांचा शेतीमाल भिजत असून त्यामुळे तो कुजत असल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या मुळे काही व्यापाऱ्यांनी थेट बाजार समितीकडे याबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन बाजार समितीने संबंधित काही व्यापाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या होत्या. परंतु, सूचना देऊनही न ऐकल्याने बाजार समितीच्या अतिक्रमण विभागाकडून ओटे तोडण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली,’ अशी माहिती बाजार समितीच्या कार्यालयातून देण्यात आली.

दरम्यान, मार्केट यार्डातील एका गरीब व्यापाऱ्याच्या गाळ्यासमोरील ओटे पाडण्याची कारवाई करताना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव खैरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘फळे भाजीपाला विभागात पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाळाधारकांनी ओटे बांधले होते. त्यामुळे पावसाचे पाणी दुसऱ्या गाळ्यांसमोर साचत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे,’ असे खैरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणांतील पाणीसाठा वाढला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढली आहे. या चार धरणांमध्ये सुमारे ११.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राज्यातील कळमोडी हे धरण शंभर टक्के भरले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. वरसगाव धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे ५६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या धरणात ३.९५ टीएमसी पाणी साठले आहे. पानशेत धरणाच्या क्षेत्रात सुमारे ६३ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धरणातील पाणीसाठा आतापर्यंत ५.९७ टीएमसी झाला आहे. खडकवासला धरणाच्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. दिवसभरामध्ये १७ मिलिमीटर पाऊस झाल्याने या धरणात ०.७२ टीएमसी पाणी झाले असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. टेमघर धरणाचे काम सुरू असल्याने या धरणात पाणी साठविण्यात येत नाही. तरीही, या धरणात ०.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या परिसरात सुमारे ६५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. दिवसभरात सुमारे १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात ५.०१ टीएमसी पाणी झाले आहे.

कळमोडी धरण शंभर टक्के

कळमोडी हे धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणातील पाणीसाठ्याची क्षमता सुमारे दीड टीएमसी असून, सध्या या धरणात १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.​ या धरणक्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत सुमारे ६८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

धरण आणि पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)

टेमघर १६.२१

वरसगाव ३०.८२

पानशेत ५६.१०

खडकवासला ३६.६५

पवना ५८.८४

भामा आसखेड ५६.५०

चासकमान ६६.९०

गुंजवणी ३५.४५

​निरा देवघर ३३.८५

भाटघर ३२.०८

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात कमी पाऊस

वेळेत दाखल झालेल्या पावसाने पहिल्या टप्प्यात राज्यातील काही जिल्ह्यांना ‘अच्छे दिन’ दाखवले, तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात घाम टिपण्याची वेळ आणली आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, परभणी असे मोजके जिल्ह्या वगळल्यास पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील टप्प्यात पाऊस ही घट भरून काढेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. राज्यातील सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद नाशिकमध्ये झाली असून या हंगामात नेहमीपेक्षा २९४.८ मिलिमीटर पाऊस अधिक पडला आहे.

राज्यात पावसाचे आगमन वेळेत झाले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला. एरव्ही, जुलैच्या पंधरावड्यात मान्सून संपूर्ण देश व्यापतो. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे पावसाचा प्रवास काही काळासाठी रेंगाळला होता. याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला असून बहुतांश जिल्ह्यातील पावसाने जुलै महिन्यापर्यंतची सरासरी गाठलेली नाही. मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणात रत्नागिरीमध्ये जून आणि जुलै महिन्यातील पंधरावड्यापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडलेला नाही. रत्नागिरीमध्ये एरव्ही सरासरी १३५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद होते. या वेळी जूनपासून १५ जुलैपर्यंत १०४१.८ मिमी पाऊस पडला. राज्यातील जिल्हा स्तरावरील सरासरीपेक्षा उल्लेखनीय प्रमाणात जास्त पाऊस नाशिकमध्ये पडला. नाशिकमध्ये आत्तापर्यंत ४९१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली.

रविवारी रात्री साडे आठपर्यंत पुणे आणि नाशिकमध्ये ३ मिमी, महाबळेश्वमध्ये ५५ मिमी, ब्रह्मपुरी ५० मिमी पाऊस नोंदवला गेला. घाटमाथ्यावरही जोराचा पाऊस पडला. ताम्हिणीमध्ये १४०, कोयना १३०, वाणगाव १२० मिमी पाऊस पडला. पुढील दोन दिवस कोकण आणि गोव्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यामध्ये दोन दिवस कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईच्या वेळीच आठवतो पाणी प्रश्न

0
0

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लोकांना पाणी मिळत नाही. पाण्याची टंचाई असते, त्या वेळेलाच त्यांना पाणी प्रश्न आठवतो. एरवी त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही,’ अशी टीका रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केली. दरम्यान, पाणी प्रश्नासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुढाकार घेतला जाणार आहे. रेल्वेच्या जमिनींखालील पाण्याच्या स्रोतांना पुनरुज्जीवित केले आहे. तसेच, येत्या काळात नवीन स्रोत करणे, पाणी पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ऑडिट, असे प्रयोग रेल्वेतर्फे राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे गुजरातचे माजी जलसंपदा आणि आरोग्य मंत्री डॉ. जय नारायण वाघ यांना पाणी प्रश्नावर केलेल्या कार्यासाठी प्रभू यांच्या हस्ते ‘जल-मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी प्रभू बोलत होते. जल भागीरथ फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त पृथ्वीराज सिंग, ‘जीएसटी’चे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

‘पर्यावरणातील बदलांमुळे बिकट परिस्थिती ओढावली असून, बाहेरील वातावरणाऐवजी पंचांग पाहून पावसाळा सुरू असल्याचे सांगावे लागते. देशाच्या एकूण वापरातील ८५ टक्के पाणी पावसाद्वारे आणि उर्वरित १५ टक्के पाणी अन्य स्रोतांद्वारे उपलब्ध होते. यापैकी सर्वाधिक पाणी शेतीसाठी लागते. मात्र, ते देखील अपुरे पडते,’ असे प्रभू म्हणाले. ‘पाणी नसल्याने शेतीचे नुकसान होते, तर काही भागात अतिपाण्यामुळेही नुकसान होते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीची धोरणे ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करायला हवे,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर टर्मिनसवरून लवकरच वाहतूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला हडपसर टर्मिनसचा प्रश्न येत्या काही महिन्यांत सुटण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हडपसर स्टेशन येथून प्रायोगिक तत्त्वावर लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पुणे स्टेशनवरील रेल्वे गाड्यांचा भार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या स्टेशनवरून होणाऱ्या रेल्वे वाहतुकीमध्ये आता वाढ करण्यास फारसा वाव राहिलेला नाही. तसेच, प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे वाहतुकीसाठी पर्यायी टर्मिनसचा विचार केला जात होता. पुणे विभागामध्ये हडपसर स्टेशन हे एक मोठे स्टेशन आहे. या ठिकाणी टर्मिनस उभारून तेथून चांगल्या क्षमतेने रेल्वे वाहतूक करणे शक्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून फार पूर्वीच यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्ये हडपसर टर्मिनसच्या विकासासाठी १७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सध्या या ठिकाणी काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी व्यक्त केली.

हडपसर टर्मिनसचा प्रश्न जागेअभावी कित्येक वर्षे रखडला होता. अखेरीस जागा मिळतच नाही म्हटल्यावर रेल्वे प्रशासनाने उपलब्ध जागेत टर्मिनस उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही प्रमाणात कामे सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, हडपसर स्टेशन येथे सध्या १२ डब्यांचे दोन प्लॅटफॉर्म आणि पादचारी उड्डाणपूल आहे. हे स्टेशन मुंढवा-खराडी बायपास रस्त्यावर आहे. या स्टेशनला जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून केवळ एकच रस्ता आहे. त्यामुळे स्टेशनला येण्यासाठी व प्रवाशांच्या वाहन पार्किंगसाठी जागा आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने या टर्मिनसचा सविस्तर प्रकल्प अहवाल पुणे महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे ११ हजार चौरस फूट जागेची मागणी केली आहे. महापालिकेकडून जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी दोन नवीन प्लॅटफॉर्म, पार्किंगची जागा, पार्सल ऑफिस, ‘वेटिंग रूम’ करण्याचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद देणे हे बालगंधर्व तत्त्व

0
0

बकुळ पंडित यांचे प्रतिपादन; बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ईशतत्त्व, गुरुतत्त्व आहे, तसे बालगंधर्व हे एक गोड, सुरेल, मधाळ, मंजूळ, मधुर आवाजाचे तत्त्व आहे. ज्ञानी आणि साध्या लोकांना आनंद देणे हे बालगंधर्व तत्त्व आहे. बालगंधर्वांच्या गायनात कुठेही वावगा आलाप किंवा वावगी तान आली नाही. त्यांचे जे गायन होते ते नेमके, नेमस्त आणि जिथल्या जिथेच होते,’ अशी भावना ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांनी रविवारी व्यक्त केली.

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे पंडित यांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘बालगंधर्व गुणगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार’ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांना, ‘अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार’ आप्पा बाबलो गावकर, तर ‘डॉ. सावळो केणी पुरस्कार’ धनंजय पुराणिक यांना देण्यात आला. ‘गोविंद बल्लाळ पुरस्कारा’ने शुभदा दादरकर, ‘काकासाहेब खाडिलकर पुरस्कारा’ने कविता टिकेकर, ‘खाऊवाले पाटणकर पुरस्कारा’ने राया कोरगावकर, ‘रंगसेवा पुरस्कारा’ने सयाजी शेंडकर आणि लक्ष्मण म्हांबरे यांना गौरविण्यात आले.

‘द. कृ. लेले पुरस्कारा’ने उल्हास केंजळे, बाल कलाकार निर्झरी चिंचाळकर, कार्तिकी भालेराव यांना, तसेच राज्य संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्या राधाकृष्ण कलामंदिर या संस्थेला सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी, भोजराज तेली, अवंती बायस उपस्थित होते. ‘गंधर्वरंग’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

‘शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट संगीतातही दैवी तत्त्व असते. जो या तत्त्वानुसार गातो किंवा चाली लावतो त्याचा संगीत आविष्कार बालगंधर्वांच्या पठडीतला असतो,’ याकडे पंडित यांनी लक्ष वेधले. ‘आजच्या पिढीने केवळ सुवर्णकाळाचे स्मरणरंजन न करता आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मागील पिढीतील गायकांचे अनुकरण न करता अनुसरण हे तत्त्व जोपासले पाहिजे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.

प्रभू म्हणाले, ‘बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली. त्यांची कुणाशीही तुलना करता येत नाही. संगीताची ही परंपरा पुढे नेली नाही, तर कुणाला कळणार नाही.’ पुरस्कारानिमित्त झालेल्या नाट्यसंगीत मैफलीत पंडित, पणशीकर, टिकेकर, साखवळकर यांच्यासह रवींद्र कुलकर्णी, डॉ. मंजिरी तेंडुलकर, अस्मिता चिंचाळकर यांनी गीते सादर केली. ऑर्गनवर राया कोरगावकर यांनी साथसंगत केली. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार टन गोमांस रांजणगावात पकडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टेम्पोमधून मुंबईला नेण्यात येणारे चार टन गोमांस गोरक्षकांनी पकडून रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवशंकर स्वामी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कौसर नसीर शेख, अब्दुल नसीम खान, महंमद शाहिद शब्बीर कुरेशी, आरिफ अहमदलाल कुरेशी, महंमद आरिफ दिलबहार खान, सलीम कलीम खान, महंमद रिसायद खान, मोमिन अबिद अहमद, लाजुद्दीन मेहकू खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायी विकणारा वसीम कुरेशी, मुंबईतील व्यापारी बललू शेठ, गनी भाई याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरून मुंबईकडे दोन टेम्पोंमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार गोरक्षकांनी रांजणगाव बस स्थानक येथे टेहळणी सुरू केली. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन टेम्पो जाताना दिसले. गोरक्षकांनी पाठलाग करून त्यांना अडविले. पोलिसांच्या मदतीने या गाड्यांची तपासणी केली. त्या वेळी दोन टेम्पोमध्ये गायी व बैलांचे मांस आढळले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रांजणगाव पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images