Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

येत्या दोन दिवसांत मान्सून परतणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर येत्या दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. अनुकूल वातावरणीय बदलांमुळे मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात विश्रांती घेतली. साधारणतः पंधरा जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. मात्र, प्रतिकूल बदलांमुळे काही दिवसांपासून पावसाचा प्रवास थंडावला. महाराष्ट्रातही पुण्यासह बहुतांश जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन फसले होते. पण, सध्या कोकणाचा दक्षिण किनारा ते केरळच्या उत्तर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील चार दिवसांत पाऊस वाढणार आहे. देशपातळीवरही मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण असून, हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या काही भागात तसेच पूर्व राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे.
अनुकूल परिस्थितीमुळे गुरुवारपासून राज्यात पावसाची चांगली स्थिती राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल. कोकणच्या काही भागात १४ आणि १५ जुलैला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लाइट हाउस’चे मानापमान नाट्य

$
0
0

पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने कार्यक्रम रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर येथे उभारण्यात आलेल्या लाइट हाउसच्या उद्घाटन समारंभासाठी उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते तसेच स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे बुधवारी होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर आली. त्यामुळे लाइट हाउसच्या उद्घाटनाला ‘मानापमाना’ची गडद किनार लाभल्याची पालिकेत जोरदार चर्चा होती.
पालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्वयंरोजगार केंद्रांचा लाइट हाउस प्रकल्प सुरू केला आहे. त्यातील एक प्रकल्प हडपसर येथेही उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी महापौर मुक्ता टिळक आणि कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्याचा घाट घालण्यात आला होता. तसेच, या परिसरात उभारण्यात आलेल्या ७५० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाचे उद्घाटनदेखील महापौरांच्या हस्ते करण्यात येणार होते.
लाइट हाउसचा उपक्रम ‘पुणे सिटी कनेक्ट’कडून राबविण्यात येतो. त्यानुसार हडपसर येथील लाइट हाउसचे उद्घाटन त्यांनी ठरवले होते. या कार्यक्रम पत्रिकेवर केवळ महापौर आणि महापालिका आयुक्तांचेच नाव घालण्यात आले होते. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच गटनते, स्थानिक नगरसेवकांनाही विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जाण्यास फारसे कोणीही उत्सुक नव्हते. हा प्रकार महापौरांच्या लक्षात आल्यावर त्यांनीही कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला. त्यामुळे ‘पुणे सिटी कनेक्ट’ला उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. या घडामोडींमुळे पालिकेचा ‘प्रोटोकॉल’ही ‘पुणे सिटी कनेक्ट’ यांना समजला असावा, अशी अपेक्षाही काही नगरसेवकांनी खासगीत व्यक्त केली.
स्मार्ट सिटी प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त पालिका प्रशासन; तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (पीएससीडीसीएल) सुरू केलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही उद्घाटने करताना पालिकेतील पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांना विश्वासात घेण्याचे साधे औदार्यही दाखवण्यात येत नसल्याने ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लाइट हाउसच्या उद् घाटनाचा कार्यक्रम माझ्याच प्रभागात होणार होता. मात्र, त्याचे निमंत्रण मला ऐनवेळी देण्यात आले. त्यामुळे तेथे जाणे मला शक्य नव्हते. माझ्या इतर सहकाऱ्यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. असे कार्यक्रम करताना प्रोटोकॉल पाळला गेला नाही. आम्ही स्मार्टसिटीचे संचालक असतानाही आम्हाला निमंत्रण वेळेत दिले नाही.
चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वृक्ष’समितीसाठी फिल्डिंग

$
0
0

नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शर्यतीत; ७७ अर्ज दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य होण्यासाठी नगरसेवकांबरोबरच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. समितीतील सात जागांसाठी ७७ अर्ज दाखल झाले असून, नियमाच्या चौकटीत न बसलेले निम्म्याहून अधिक अर्ज छाननी समितीने बाद ठरवले आहेत. छाननी समिती उद्यान विभागाकडे आज, गुरुवारी यादी सुपूर्द करणार आहे.
पालिका निवडणुकांमुळे वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त झाली असतानाही शहरातील वृक्षतोडीला परवानगी कशी दिली जाते, असा आक्षेप घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिरणाने उद्यान विभागाच्या कारभारावर दोन महिन्यांपूर्वी ताशेरे ओढले होते. त्यानंतर पालिकेने नवीन समितीसाठी सात नगरसेवकांची निवड केली आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी अर्ज करण्याचे जाहीर केले होते. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य होण्यासाठी चढाओढ असल्याने उद्यान विभागाकडे ७७ स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे अर्ज दाखल झाले.
हरित न्यायाधिकरणाने दिलेले आदेश आणि वृक्ष संवर्धन कायद्यातील नियमामध्ये बसणारे प्रतिनिधी निवडण्यासाठी उद्यान विभागाने छाननी समिती नेमली होती. मात्र, यंदा सदस्य होण्यासाठी ‘हौशी वृक्षप्रेमीं’नी अर्ज भरल्याचे समितीच्या निदर्शनास आले. शिवाय यापूर्वीच्या समितीतील सदस्यांनीही पुन्हा सदस्य होण्यासाठी अर्ज केले आहेत. काही अर्जांमध्ये एकाच संस्थेने अनेकांच्या शिफारशी केल्याची माहिती पुढे आली आहे.
‘हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या सर्व आदेशांची पूर्तता करूनच आम्ही अर्जांची तपासणी केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून, पुराव्यांच्या आधारेच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अर्जांचा अहवाल उद्यान विभागाकडे दिल्यानंतर पुढील कार्यवाही त्यांच्यामार्फत होईल,’ अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आणि छाननी समितीचे सदस्य बी. व्ही. जगझाप यांनी दिली.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २० जुलैला सुनावणी दरम्यान वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार छाननी समितीकडून अर्जांचा अहवाल आल्यानंतर आम्ही नियमात बसणाऱ्या अर्जांपैकी सात प्रतिनिधींची निवड करणार आहोत, असे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी नमूद केले.

वृक्षप्रेमींची प्रतीक्षाच
सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणी केलेल्या पर्यावरणप्रेमी संस्था अधिकृत असेल, असा नियम असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून काही ‘उत्साही’ वृक्षप्रेमींच्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यालयातील फेऱ्या अचानक वाढल्या होत्या. या फेऱ्या मारणाऱ्या संस्थांच्याच प्रतिनिधींनी अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर छाननी समितीसमोर गेलेल्या काही अर्जांवर प्राधान्याने करावे, असे शेरे असल्याची माहिती उद्यान विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदा तरी प्रामाणिक वृक्षप्रेमी समितीवर येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन क्वीन रोखणारे ठरले 'देशद्रोही'?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन क्वीन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून सोडण्याऐवजी एकवरून सोडण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. १०) प्रवाशांनी आंदोलन करून सुमारे तासभर गाडी रोखली होती. या आंदोलनात सहभागी प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रवाशांचे हे कृत्य 'देशविरोधी' असल्याचे रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात १०० प्रवासी सामील होते, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असून, त्यानुसार तीन महिला प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले होते. उर्वरित प्रवाशांची सीसीटीव्ही फुटेजद्वारे ओळख पटविली जाणार असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, आझाद-हिंद एक्स्प्रेस, पुणे-पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्यांना नेहमीच्या २३ डब्यांऐवजी २४ डबे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यासाठी १५ फेब्रुवारीपासून दोन जूनपर्यंत डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म एकऐवजी पाच क्रमांकावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जुलै महिना उजाडल्यानंतरही ही गाडी प्लॅटफॉर्म पाचवरून सोडण्यात येत आहे. सकाळी सव्वासात वाजता ही गाडी पुणे स्टेशन येथून सुटते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी सोमवारी आंदोलन करून गाडी पूर्ववत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून सोडण्याची मागणी केली होती.

सोमवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गाडी सुटताना प्रवाशांनी चेन खेचली. त्यामुळे गाडी थांबवावी लागली. या प्रकारानंतर प्रवासी रुळावर उतरले. त्यामुळे डेक्कन क्वीन एक तास उशिराने मार्गस्थ झाली. या प्रकाराची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तीन महिला प्रवाशांना प्रत्यक्ष आंदोलन करतेवेळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना रेल्वे कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईचा अहवाल संबंधितांच्या कार्यालयात वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. तीन पैकी दोन महिला सरकारी कर्मचारी आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

गाडी पाचवरून सुटणार

डेक्कन क्वीन भविष्यातही प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरूनच सोडण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन आता पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून केव्हा धावणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीप’वसुलीसाठी रेल्वे कर्मचारी ‘पेटले’

$
0
0

प्रवाशांकडून पैसे उकळण्यासाठी केला उद्दामपणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे गाड्यांमध्ये तृतीय पंथीयांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे प्रकार आपण यापूर्वी अनेकदा ऐकले आणि पाहिले असतील. मात्र, आता रेल्वेचे सफाई कर्मचारी आणि खानपान विभागातील कर्मचारीही प्रवाशांकडे ‘टीप’हट्ट धरत असल्याचे उघडकीस आले आहे. एका प्रवाशाने याबाबतची तक्रार केल्यानंतर ‘इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन’ने (आयआरसीटीसी) संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली आहे.
‘दुरांतो’ गाडी निवडक मार्गांवर धावते. त्यामुळे सामान्य एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या तुलनेत या गाडीमधील प्रवाशांना विशेष सेवा देण्यात येतात. त्यामुळे अन्य गाड्यांमध्ये प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीच्या तुलनेत ‘दुरांतो’ची सेवा चांगली असल्याचा अनेकांचा समज होता. मात्र, सहा जुलै रोजी धावणाऱ्या हावडा-पुणे दुरांतो गाडीमधील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांकडून ‘टीप’वसुलीसाठी हट्ट धरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूर-पुणे दरम्यान प्रवास केलेल्या प्रणय अजमेरा यांनी रेल्वे मंत्रालय आणि ‘आयआरसीटीसी’च्या ट्विटर अकाउंटवर तक्रार केली. त्याची दखल दोन्ही आस्थापनांनी घेतली. अजमेरा यांच्याकडून त्यांचा ‘पीएनआर’ क्रमांक आणि संबंधित गाडीची माहिती मागवून घेतली. त्या माहितीच्या आधारावर संबंधित गाडीच्या व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे अजमेरा यांना कळविण्यात आले.
सर्वसामान्य गाड्यांमध्ये भिक्षेकरी किंवा तृतीय पंथीयांकडून पैसे मागितले जातात. मात्र, रेल्वेचे कर्मचारीही त्यांच्या सोबतीला उभारल्याचे प्रथमच पाहण्यात आले. समोरील प्रवासी जोवर पैसे देत नाही, तोवर त्याच्या समोरून हलायचेच नाही, असाच काहीसा पवित्रा रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यांच्या या वागण्याला घाबरून काही विद्यार्थ्यांनीही त्यांना पैसे दिल्याचे अजमेरा यांनी नमूद केले.

सर्वात आधी वेटरने माझ्याकडे टीप मागितली. त्याला पैसे दिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी रांगच लावली. त्यांना पैशांसाठी नाही म्हटल्यावर, ते हट्टाला पेटले आणि पैसे द्याच अशी विनवणी करू लागले.
प्रणय अजमेरा,प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफवाय प्रवेशासाठी गुणवत्ता सिद्ध करा

$
0
0

‘फर्ग्युसन कॉलेज’ स्वायत्त झाल्याने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील नामवंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला की पदवी घेऊनच बाहेर पडायचे, हे चित्र आता बदलले आहे. त्यामुळे दहावीच्या गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. कॉलेजला मिळालेल्या स्वायत्ततेमुळे ‘इन हाउस कोटा’ रद्द झाल्याने कॉलेजमधील ‘एफ-वाय’ प्रवेशासाठीची स्पर्धाही तीव्र झाली आहे.
फर्ग्युसन कॉलेजला गेल्या वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे पुढील सहा वर्षांसाठी शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली. त्यामुळे कॉलेजला स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणे, स्वतंत्रपणे परीक्षा घेण्याबरोबरच अन्य बाबतीतही स्वायत्तता असणार आहे. या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच पदवी मिळणार असली, तरी त्यामध्ये कॉलेजच्या स्वायत्ततेचा स्वतंत्र उल्लेख असणार आहे. स्वायत्ततेमुळे कॉलेजला मिळालेल्या अधिकारांनुसार कॉलेजने पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवून गुणवत्ता यादी तयार करून त्याआधारेच प्रवेश देण्यात आले आहेत.
फर्ग्युसन कॉलेज नामवंत कॉलेज असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी येथील कट-ऑफ कायमच चढा राहिलेला आहे. येथील अकरावीचे प्रवेश ९०-९५ टक्क्यांना बंद होतात. त्यामुळे एकदा अकरावीला प्रवेश मिळाला की बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजमध्ये पदवीलाही प्रवेश मिळत होता. त्यासाठी त्यांना स्वतंत्र ‘इन हाउस कोटा’ उपलब्ध होत होता. त्यामुळे बारावीत कितीही गुण मिळाले, तरी त्यांना पदवीला प्रवेश मिळून पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधूनच पूर्ण करता येत होते. आता मात्र, कॉलेजला स्वायत्तता मिळाल्याने कोटा रद्द झाला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशप्रक्रियेतून जावे लागले आहे.

‘यूजीसीच्या धोरणानुसारच निर्णय’
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) फर्ग्युसन कॉलेजला स्वायत्तता दिली आहे. तसेच, कॉलेज ऑफ एक्सलन्सचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यातच कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवीचे कॉलेज या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा स्वतंत्र प्रवेशप्रक्रियेतून गुणवत्तेच्याच आधारावर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल,’ असे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांमुळे होते रस्त्यांवर वाहनकोंडी

$
0
0

रास्ता पेठेतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा वरदहस्त

म. टा.प्रतिनिधी, पुणे

शहराचा मध्यवर्ती भाग आणि रहदारीचा रस्ता अशी ओळख असलेल्या रास्ता पेठेतील जिवा महाले चौकात (अपोलो थिएटर) मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. मात्र, त्यावर कारवाई करण्यात पालिका उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
या भागात पथारी व्यावसायिक बिनदिक्कतपणे रस्त्यावरच खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावत असल्याच्या तक्रारी करूनही हेतुपुरस्सर काणा डोळा करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात असल्याची तक्रार स्था‌निक करीत आहेत. पादचारी तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईची घोषणा पालिका प्रशासनाने केली आहे. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे दूर करून वाहतुकीला होणारा अडथळा काढून टाकण्याचे काम अतिक्रमण खात्याने आरंभले आहे. वर्दळीचा भाग असणाऱ्या रास्ता पेठेतील अपोलो थिएटर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून मोठी अतिक्रमणे होत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक येथे हातगाड्या लावतात. रस्त्यावरच हातगाड्या लावल्या जात असल्याने संध्याकाळी नागरिक रस्त्यावरच आपली वाहने उभी करून पदार्थांचा आनंद लुटतात. त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ होतो.
वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने दूर करून वाहनकोंडी कमी करावी, यासाठी अनेकदा पालिकेच्या मुख्य विभागाबरोबरच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याची साधी दखल घेण्याचे सौजन्यही दाखवले जात नसल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने हातगाड्यांवर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याचा वरदहस्त येथील अतिक्रमणांवर असल्याने तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ देता का ‘आधार’?

$
0
0

नोंदणीसाठी सर्वसामान्यांवर वणवण करण्याची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रक्रिया कधी सुरू होणार ते माहीत नाही...’, ‘एक काम करा तुम्ही आठवड्याने चौकशी करा…’, ‘एकदा सांगितलं ना, सिस्टीम बंद पडली आहे, का उगाच वेळ वाया घालवताय?’
केंद्र सरकारने पॅनकार्डपासून ते पासपोर्टपर्यंत सर्वत्र सक्ती केल्यामुळे आधार कार्डाची नोंदणी करण्यासाठी वणवण फिरत असलेल्या पुणेकरांना संबंधित केंद्रांवर अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे एकीकडे नागरिक बेहाल असले तरी, या प्रकरणी लक्ष घालून संबंधित यंत्रणा जागेवर येईल यासाठी अद्याप एकही लोकप्रतिनिधी पुढे आला नसल्याचे चित्र आहे.
शहरात काही महिन्यांपूर्वी १७१ आधार नोंदणी केंद्रे कार्यरत होती. सध्या त्यापैकी केवळ आठ ते दहा केंद्रे कशीबशी सुरू आहेत. तेथेही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने त्यांच्या संतापात भर पडत आहे. एकीकडे प्रत्येक व्यवहारासाठी आधारची जोडणी बंधनकारक असल्याची घोषणा सरकारदरबारी करण्यात येत असतानाच दुसरीकडे सर्वसामान्यांवर ‘आधार मिळेल का आधार’ असे विचारण्याची वेळ आली आहे. ज्या केंद्रांवर आधार कार्डचे तपशील अपडेट करण्यासाठी किंवा नवे आधार कार्ड काढण्यासाठी अर्ज वितरीत केले जात आहेत. अशा ठिकाणी नागरिकांना नोव्हेंबरची तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे, शहरात आधार नोंदणी करण्याच्या यंत्रणेचा पुरता बोजवारा उडल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारतर्फे प्राप्तिकर भरण्यापासून ते बँकेत नवीन खाते उघडण्यापर्यंत, तसेच गॅस जोडणीपासून पॅन कार्ड जोडणीपर्यंत सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

खासदारांनाही लाल फितीचा फटका
आधार कार्डविषयक समस्या सोडवण्यासाठी सजग नागरिक मंचातर्फे खासदार अनिल शिरोळे आणि वंदना चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. दोन्ही खासदारांनी त्यामध्ये लक्ष घालून जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विचारणा केली असता त्यांनाही असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याचे समोर आले आहे. खासदारांनाच जर उत्तरे मिळत नसतील तर सामान्यांचे काय होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

मोबाइल नोंदणीही हवेतच
काही दिवसांपूर्वी ज्या नागरिकांना प्रकृती अस्वाथ्याच्या कारणांस्तव आधार नोंदणी केंद्रांवर जाणे शक्य नाही, अशांसाठी मोबाइल नोंदणी करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यावरही प्रशासनाने बोळा फेरला आहे. बहुतांश नागरिकांचे ठसे जुळत नसल्याने त्यांना आधार कार्ड मिळत नाही. त्यांच्यासाठीही प्रशासनाकडे कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे, आधारसाठी नागरिक हवालदिल झाले आहेत. दिवसभर वणवण भटकूनही त्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून आधार नोंदणी यंत्रणा सुधारण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यात प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे. एकीकडे आधारची सक्ती करायची आणि दुसरीकडे सरकारी यंत्रणा ठप्प करायची, ही कोणती पद्धत आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या व्यवहारात आधारसक्ती आड येत असेल, तर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

ज्येष्ठ नागरिक हतबल
आधार कार्डच्या बायोमेट्रिक नोंदणीसाठी संबंधितांना बोटांचे ठसे आणि बुब्बुळांचे स्कॅन करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वृद्ध नागरिकांच्या बोटांचे ठसे वयोमानाने पुसट झाल्यामुळे त्यांची नोंद होत नाही. तसेच काहीजणांना मोतीबिंदू झाल्याने बुब्बुळांचे स्कॅनही होत नाही. नियमावलीत यावर उपाय असले, तरी संबंधित केंद्रांवरील कर्मचारी नोंद करण्यास नकार देतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेशासाठी उडाली झुंबड

$
0
0

पहिल्या यादीनुसार प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर बुधवारी विद्यार्थी आणि पालकांनी मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्याचा आज, गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यादीनुसार मिळालेल्या कॉलेजांमध्ये सायंकाळी पाचपर्यंत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत १४ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी पसंतीच्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेतला. अद्याप, ३३ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २६७ ज्युनियर कॉलजांमध्ये अकरावीच्या सायन्स, आर्टस्, कॉमर्स आणि बायोफोकल शाखेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत एकूण जागा ९१ हजार ६७० आहेत. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यादीनुसार प्रवेश प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ३१५ जणांना प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. या फेरीतून १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. व्यवस्थापन, संस्था अंतर्गत, अल्पसंख्याक आणि बायफोकल या कोट्यांमधून १० हजार ३०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
दरम्यान, दोन ते दहा क्रमांकांपर्यंतच्या पसंतीक्रमातील कॉलेज मिळालेले विद्यार्थी लगेच प्रवेश घेऊ शकतात अथवा पुढील फेरीत आणखी चांगले कॉलेज मिळेल, याची वाट पाहत थांबू शकतात. तसेच, समितीने दिलेल्या कालावधीत पसंतीक्रमात बदलही करू शकतात. अधिक माहितीसाठी संबंधितांनी http://pune.11thadmission.net येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गुणवत्ता यादी ही विशेष आरक्षण कोट्यांसह आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे केली आहे.

अखेरची संधी...
पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या क्रमाकांचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या नियमानुसार या विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. यंदा, तात्पुरते प्रवेश बंद असल्याने प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकले जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेऱ्यांनंतर कॉलेजांमधील रिक्त जागांनुसार विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. रिक्त जागांनुसार प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुल्क भरून प्रवेश घ्यावा, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

‘मनुष्यबळ वाढवा’
पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रवेश घेण्यासाठी कॉलेजांमध्ये मोठी गर्दी होत आहे. अशा वेळी कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कॉलेजांनी मनुष्यबळात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

तारीख प्रक्रिया

१३ जुलै गुणवत्ता यादीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यत प्रवेश घेणे.

१४ जुलै रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणे.

१५, १८ जुलै दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करता येईल अथवा पहिल्या फेरीतील पसंतीक्रम ‘जैसे थे’ ठेवता येईल.

१९ जुलै प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी तयार करणे.

२० जुलै दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि ऑडिट.

२१, २४ जुलै गुणवत्ता यादीनुसार कॉलजांमध्ये प्रवेश घेणे.

२५ जुलै कॉलेजांमध्ये रिक्त जागा व दुसऱ्या फेरीचे ‘कट ऑफ’ प्रसिद्ध करणे.

२६, २७ जुलै तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करता येईल अथवा पूर्वीच्या फेरीतील पसंतीक्रम ‘जैसे थे’ ठेवता येईल.

२८ जुलै प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी तयार करणे.

२९ जुलै तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि ऑडिट

३१ जुलै, १ ऑगस्ट यादीनुसार कॉलजांमध्ये प्रवेश घेणे.

२ ऑगस्ट रिक्त जागा आणि तिसऱ्या फेरीचे ‘कट ऑफ’ प्रसिद्ध करणे.

३, ४ ऑगस्ट चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करता येईल अथवा पूर्वीच्या फेरीतील पसंतीक्रम ‘जैसे थे’ ठेवता येईल.

५ ऑगस्ट चौथी फेरीसाठी गुणवत्ता यादी तयार करणे.

६ ऑगस्ट प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि ऑडिट.

७, ८ ऑगस्ट गुणवत्ता यादीनुसार कॉलजांमध्ये प्रवेश घेणे.

९ ऑगस्ट अकरावीचे वर्ग सुरू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिस्ट अजय पडवळचा अपघाती मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | पुणे

देशातल्या टॉप टेन माऊंटन बाइकर्समध्ये समावेश असलेला पुण्याचा सायकलिस्ट अजय पडवळ याचा लेह-लडाखमध्ये सायकलिंग करत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. लडाखच्या खारदुंग ला पास इथं मंगळवारी रात्री अजयचा अपघात झाला.

डोक्यावर हेल्मेट असतानाही दगडावर जोरदार आपटून आघात झाल्यानं अजयला गंभीर दुखापत झाली होती. अजयच्या सहकारी सायकलस्वारांनी त्याच्या मृत्यूसाठी प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. अजयला पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीला रवाना करण्याची परवानगी देण्यास प्रशासनानं दिरंगाई केली, असा आरोप अजयच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

अपघात झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हेल्मेट असतानाही डोक्याला बसलेला जबर मार आणि दुखापतीचं नेमकं स्वरूप कळणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळं पुढील उपचारासाठी अजयला वेळीच दिल्लीला हलवणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही. अन्यथा पुढचा अनर्थ टळला असता, असं अजयच्या मित्रांनी सांगितलं.

अजय पडवळ हे सायलिंगमधलं खूप मोठं नाव होतं. 'किक' सिनेमात त्यानं सलमान खानला स्टंट शिकवले होते. अनेक दृश्यं सलमानऐवजी स्वतः अजयनंच केली होती. अजयची शरीरयष्टी सलमानएवढी नसल्यानं त्याला ही दृश्यं साकारताना बॉडी पॅकिंग लावावं लागलं होतं. म्हणूनच ते स्टंट सीन्स खुद्द सलमाननं केल्याचा फिल आला. ट्रेनच्या पुढ्यातून सलमान सायकलवरून अगदी आरामात जातोय हा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवला जाणारा सीन खूप गाजला होता. हा स्टंट सीन सलमाननं स्वतः अजयकडून शिकून घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात आयटी इंजिनीअरची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

आयटी क्षेत्रातील नोकरीचा भरवसा नसल्यानं नैराश्य आलेल्या २५ वर्षांच्या एका आयटी इंजिनीअरनं पुण्यात आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असं त्याचं नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील आहे.

नोकरीनिमित्त गोपीकृष्ण तीनच दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. पुण्यात त्यानं एका कंपनीत कामाला सुरुवातही केली होती. मात्र, अवघ्या तीन दिवसांतच त्यानं स्वत:ला संपवलं. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. नोकरीतील अनिश्चितता हे आत्महत्येचं कारण असल्याचं त्यानं त्यात नमूद केलं आहे. 'आयटी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मला माझं भविष्य अंधकारमय वाटतंय. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळं मला कुटुंबाचीही काळजी वाटते. माझ्या कुटुंबाची काळजी घ्या. सॉरी. गुड बाय', असं त्यानं सुसाइड नोटमध्ये लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: नाट्यगृहातील अस्वच्छता मुक्ताकडून उघड

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | पुणे

स्वच्छतागृहात नुसता पाय जरी ठेवला तरी किळस येईल इतकी अस्वच्छता...तुटलेली आणि तुंबलेली भांडी...हे चित्र आहे पुण्याच्या यशवंत नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहाचं. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर कोथरुडच्या यशवंत नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहाचं भीषण वास्तव सर्वांसमोर आणलं आहे.

मुक्ताने यशवंत नाट्यगृहाच्या या दुरवस्थेचे फोटो पोस्ट करुन प्रशासनावर सडेतोड टीका केलीय.



नाट्यगृहांच्या दुरवस्थेचं हे काही पहिलं उदाहरण नाही. याआधीही कलाकारांनी नाट्यगृहांमधील अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला होता. आता मुक्ताच्या या पोस्टनंतर राज्यातील जवळपास सर्वच नाट्यगृहात थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट होतं. आता प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार हाच प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अस्वच्छ

$
0
0

अभिनेता सुमित राघवन, मुक्ता बर्वे यांची सोशल मीडियावरून टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या स्वच्छतेबाबतीत अनेक तक्रारी होत असताना आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अभिनेता सुमित राघवन आणि मुक्ता बर्वे यांनी यशवंतरावच्या स्वच्छतेच्या यंत्रणेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ग्रीनरूममधील स्वच्छतागृहे तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सगळीकडे घाणीचे साम्राज्य असल्याने या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता, सफाई कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपले असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी मुक्ता बर्वे यांच्या ‘कोडमंत्र’ नाटकाचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग होता. नाटकाची टीम ज्या वेळी रंगमंदिरात पोहोचली, तेव्हा ग्रीन रूममधील स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय वाईट होती. सार्वजनिक स्वच्छतागृहातही घाणीचे साम्राज्य होते. ते पाहून संतप्त झालेल्या मुक्ता बर्वे यांनी सोशल मीडियावर स्वच्छतागृहाची छायाचित्रे टाकली आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी अभिनेते सुमित राघवन यांनीही सोशल मीडियावर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील अस्वच्छतेला वाचा फोडली होती. त्यामुळे, आता नाट्यगृहात प्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांनी सातत्याने स्वच्छतेबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव असलेल्या शहरातच नाट्यगृहांची अशी अवस्था असेल तर त्यापेक्षा मोठी नामुष्की नाही, असा सूर कलाकार विश्वातून उमटू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ‘बालगंधर्व’चा अस्वच्छ कारभारही ‘मटा’ने उघड केला होता. त्यापाठोपाठ आता यशवंतराव नाट्यगृहाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘गेल्या दोन महिन्यांपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपले आहे. त्यामुळे, नाट्यगृहात सफाई कर्मचारीच नाहीत. याबाबत पालिकेकडे विचारणा केली तर, टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून ऑडिटसाठी पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली आहे,’ असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पण क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी परिसराची सफाई करणार का नाट्यगृहाची? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिवाय टेंडरची प्रक्रिया दोन महिन्यांहून अधिक काळ का रखडते, असा संतप्त सवालही कलाकारांनी केला आहे.
बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाप्रमाणेच पुण्यातील इतर नाट्यगृहांमध्येही स्वच्छतेची अवस्था फारशी चांगली नाही. ज्या ठिकाणी नाट्यगृहाकडे सफाई कर्मचारी आहेत. तिथे काहीसे समाधानकारक चित्र असले, तरी शहरातील अनेक नाट्यगृहामध्ये स्वच्छतेची वानवा आहे. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
----------------------------
‘गणेश कला क्रीडा’मध्येही सफाई कामगार नाहीत.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाप्रमाणे शहरातील सर्वात मोठे सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथेही सफाई कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपले आहेत. त्यामुळे, या स्वच्छतागृहातही सफाई कर्मचारी नाहीत. दोन हजारांहून अधिक प्रेक्षक क्षमता असणाऱ्या सभागृहातही स्वच्छता वाऱ्यावर सोडून सर्रास कार्यक्रम केले जात आहेत.
---------------------------------

पुण्यासारख्या शहरात स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. ही बाब संतापजनक आहे. स्वच्छतेसारखी प्राथमिक सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना मिळणार नसेल तर प्रयोग का करायचे? आणि प्रेक्षकांनीही अस्वच्छतेच्या वातावरणात ते का पहायचे ? एक साधे सफाई कर्मचाऱ्यांचे टेंडर पास करण्यासाठी पालिका प्रशासनाला इतका वेळ का लागतो, ही गोष्ट हास्यास्पद आहे. अशाने नाटक आणि ते पाहण्यासाठी येणारा प्रेक्षक या दोन्ही गोष्टी कमी होतील.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री
.....
सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भातील टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच नवी एजन्सी कामगार उपलब्ध करेल. केवळ ऑडिटसाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तोपर्यंत क्षेत्रीय कार्यालयाकडून सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण केले जात आहे. गुरूवारी ते उशीरा आल्याने मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
- प्रकाश अंमराळे, महापालिका नाट्यगृहांचे व्यवस्थापक
-
नाट्यगृहातील अस्वच्छतेसाठी कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्यात येईल. घोले रोडवरील पंडित नेहरू सांस्कृतिक केंद्राला भेट दिली तेव्हा तेथेही अस्वच्छता होती. सभागृह, नाट्यगृहातील अस्वच्छतांची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाट्यगृहांच्या स्वच्छतेबाबत महापालिका जबाबदारी टाळणार नाही.
- मुक्ता टिळक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सार्वजनिक काकांचा आदर्श तरुणांनी ठेवावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ब्रिटिशांच्या न्याय प्रक्रियेत काम करणाऱ्या भारतीयांपैकी सार्वजनिक काका हे एक होते. त्या काळी सार्वजनिक काकांनी कायद्याचा अभ्यास करून प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. शेतकऱ्यांचे अधिकार आणि स्त्री हक्काचा मुद्दा त्यांनी आग्रहाने मांडला. चळवळीचा मुख्य भाग म्हणून काम करत सामाजिक बदल घडवले. अशा सार्वजनिक काकांचे विचार आत्मसात करून तरुण पिढीने समाजासाठी काम केले पाहिजे,’ असे मत माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘लोकांच्या मदतीत जीवनाचा खरा आनंद व स्थैर्य असते. तोच आनंद आपण शोधला पाहिजे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे सार्वजनिक सभेतर्फे सार्वजनिक काका यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ दीक्षित यांना भाऊसाहेब जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे आणि कोशाध्यक्ष सुरेश कालेकर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली.
या वेळी दीक्षित म्हणाले, ‘सामाजिक बदलांसाठी सार्वजनिक काकांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. काकांनी त्या वेळी कायद्याचा तर्कशुद्ध अभ्यास करून बदलांसाठी काम केले. त्यांच्याप्रमाणे जगण्यात शिस्त आणि प्रामाणिक वृत्ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे.’
‘देशात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असूनही आपण त्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करत नाही. म्हणूनच साधनसंपत्तीने आपण परिपूर्ण असलो तरी मनोवृत्तीमुळे अजूनही विकसनशील आहोत,’ अशी टीका त्यांनी केली.
----------------
आपण आधुनिक जीवनशैलीच्या मागे धावत आहोत. या धावपळीत आपली मानसिकता कुचकामी झाली आहे. इंग्रजीच्या आग्रहामुळे मुलांना मातृभाषेत शिक्षण दिले जात नाही. मराठीपेक्षा इंग्रजी वरचढ हा दृष्टिकोन घातक आहे. या पेचात अडकून आपण मुलांवर सांस्कृतिक हल्ले करत आहोत. यापासून मुलांना वाचविण्यासाठी त्यांना मराठीत शिक्षण दिले पाहिजे.
- डॉ. प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉग्निटिव्ह एक्स्चेंज देणार विद्यार्थ्यांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शालेय विद्यार्थ्यांना समाजात अवांतर विषयांवर आत्मविश्वासाने विचार मांडता यावेत, या उद्देशाने अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या ‘कॉग्निटिव्ह एक्सेचेंज’ या संस्थेने पुण्यातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेतील मुलांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला असून, आत्तापर्यंत आठशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी ऑनलाइन धडे दिले आहेत.

‘कॉग्निटिव्ह एक्सचेंज’ संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नुकतीच वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा कमिन्स कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने संस्थेची अमेरिकेतील संस्थापिका श्रेया नाडगौडा, गेहेना मुज्जू आणि पुण्याचे समन्वयक अमित देवकुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विजेत्या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘भारतीय शैक्षणिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, समाजात वावरताना आत्मविश्वासाने स्वतःचे विचार कसे मांडले पाहिजेत, याचे धडे मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सामाजिक पातळीवर वावरताना पटकन पुढे येत नाहीत. त्यांच्यामध्ये लपलेल्या संवाद कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच सत्यप्रीत दास आणि आम्ही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षण पद्धतीचा आधार घेऊन भारतातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील विविध शाळांबरोबर हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. हा उपक्रम पूर्णपणे मोफत चालविण्यात येतो,’ अशी माहिती श्रेया नाडगौडा हिने दिली.

‘पुण्यातील सर्व प्रकारच्या प्रातिनिधिक शाळांच्या आम्ही संपर्कात आहोत. शाळा आम्हाला विद्यार्थ्यांची नावे पाठवतात. इंटरनेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संस्थेतर्फे त्यांना मार्गदर्शन केले जाते. संवाद कौशल्य, देहबोली, वादविवादात मत मांडण्याची पद्धत शिकवली जाते. आठ आठवड्यांचा एक कोर्स अशी याची रचना आहे. आत्तापर्यंत आठशेहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. पूर्वी आम्ही वर्गात शिक्षकांशी बोलतानाही घाबरत होतो आता आत्मविश्वासाने बोलतो, ही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच पुण्यात आम्ही वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. या पुढेही प्रशिक्षण वर्ग सुरू राहणार आहेत,’ असे वैभव नाडगौडा आणि नितीन जोगळेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगला ‘स्वराभिषेक’

$
0
0

देवकी पंडित आणि शौनक अभिषेकींच्या मैफलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘गणपत विघ्नहरण गजानना’, ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा’, ‘उभा तो जिव्हाळा योगियांचा’, ‘एक निरंजन’ अशा अभंग आणि भक्तिगीतांतून मैफल रंगली. गायिका देवकी पंडित व शौनक अभिषेकी या दोन दिग्गज गायकांनी सुमधुर स्वरांची पुष्पांजली गणरायाचरणी अर्पण केली. एकाहून एक सरस गीतांतून बसरलेल्या स्वरधारांनी लाडक्या गणरायाला स्वराभिषेक घडला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वराभिषेक हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यापूर्वी मंदिरामध्ये होम करण्यात झाले तसेच बाबामहाराज सातारकर यांचे चातुर्मास प्रवचन झाले.
स्वराभिषेकाची सुरुवात देवकी पंडित यांनी ‘सांजभयी’ने केली. त्यानंतर त्यांनी किशोरी आमोणकर यांची रचना सादर केली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. देवकी पंडित यांना हर्षद कानिटकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम), सुस्मिरता डावलकर (तानपुरा), माऊली टाकळकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. शौनक अभिषेकी यांनी कर्नाटकी संगीतातील अभोरी रागातील रचना सादर केल्या. ‘सपने मे आये शाम’ आणि ‘काटा रुते कुणाला’ ही गीते रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. अभिषेकी यांना सत्यजित बेडेकर, राज शहा (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड-पुणे शटलसाठी डेमूऐवजी जुन्या रेक

$
0
0

आजपासून निर्णयाची अंमलबजावणी
म. टा. वृत्तसेवा, दौंड
दौंड-पुणे शटलसाठी डेमू ऐवजी जुन्या रेक दौंडवरून सकाळी ७.०५ वाजता आणि पुण्यावरून सायंकाळी ७.४५ वाजता बारामतीसाठी आजपासून (१४ जुलै) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी दिली.
मध्य रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दौंड-पुणे-दौंड जुना शटल रेक प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. हा जुना रेक सकाळी ७.०५ वाजता दौंडवरून सुटेल आणि पुण्यात ८.५० मिनिटांनी पोहोचेल. दोन तास पुणे येथे थांबून त्यानंतर तोच जुना रेक कर्जतपर्यंत धावेल आणि सायंकाळी तोच रेक कर्जतहून बारामतीला जाईल.
डेमू सुरू झाल्यापासून दैनंदिन प्रवास अडचणीचा ठरत होता. गाडी वेळेत न पोहचणे, डब्याखालून धूर निघणे, कधी एखादी फेरी अचानक रद्द होणे या प्रकाराने चाकरमाने हैराण झाले होते.
जुना रेक बंद झाल्यापासून अडचणी मध्ये सातत्याने वाढच होत झाली होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे त्वरित थांबवावे आणि शटलचा जुनाच रेक त्वरित या मार्गावर चालवावा या मागणीसाठी दौंड-पुणे -दौंड प्रवासी संघाचे ठिय्या आंदोलन नुकतेच झाले होते. शटलच्या रेकबाबत सर्वच राजकीय पक्ष, विविध संघटना, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अॅड. राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता.
मध्य रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादाभोय तसेच मध्य रेल्वे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ यातायात व्यवस्थापक गौरव झा यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सल्लागार समितीचे स्थानिक सदस्य गणेश शिंदे व अय्यूब तांबोळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिशन मिलाप’ सुरू

$
0
0

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातर्फे नागरिकांसाठी हेल्पलाइन
म. टा. वृत्तसेवा, कात्रज
उपनगरातील महाविद्यालयीन वातावरण सुरक्षित व्हावे आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालकांसह शिक्षण संकुल परिसरातील नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याने हाती घेतलेल्या मिशन मिलाप या उपक्रमासाठी हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली.
परिसरातील शिक्षण संस्थांच्या सहकार्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, गुन्हे निरीक्षक राजकुमार वाघचवरे आणि आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांच्या संकल्पनेने मिशन मिलाप हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पोलिस, सामाजिक संस्था, नागरिक, संस्था चालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या चर्चेतून ही हेल्पलाइन सुरू झाली आहे.
भारती विद्यापीठ परिवाराचे बाबा शिंदे, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे राजीव जगताप, सिंहगड महाविद्यालयाचे बी. एस. चौगुले, सरहद संस्थेचे शैलेश वाडेकर, पीआयसीटी महाविद्यालयाचे अंकुश सपकाळ, चाटे शिक्षण समूहाचे फुलचंद चाटे, महाराष्ट्र पेरेंटस असोसिएशनचे अजय साठे, डॉ. संभाजी करांडे, परिसरातील नागरिक आदींच्या उपस्थितीत हेल्पलाइनचे लोकार्पण अभिनव संस्थेचे राजीव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी राजीव जगताप म्हणाले, ‘संवादाने समस्या सोडवणे सहजसोपे होते. सर्व घटकांना एकत्र आणून शैक्षणिक वातावरण सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी घेतलेला पुढाकार आदर्श असा आहे.’ उदय जगताप म्हणाले, ‘उपनगरातील शिक्षण संकुलं आणि परिसरातील नागरिक यांच्यात सलोख निर्माण करण्याचे काम मिशन मिलाप समिती करणार आहे. हेल्पलाइनचा माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न सर्व सहभागी घटक करणार आहेत.’ वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड म्हणाले, ‘समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. हेल्पलाइनची मदत घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक व परिसरातील नागरिकांनी ७७५६९३४६४६ या क्रमाकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईला मध्येच ‘ब्रेक’

$
0
0

पीएमआरडीएची मोहीम थंडावली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील तब्बल सोळाशेहून अधिक अतिक्रमणांवर धडक कारवाईची मोहीम अचानक थंडावली आहे. पीएमआरडीएच्या अखत्यारितील अनधिकृत इमारतींवर मे अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला जोरदार हातोडा चालविण्यात आला होता; पण आता या कारवाईला ‘ब्रेक’ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पीएमआरडीचे आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने किरण गित्ते यांची नियुक्ती केली. मेच्या सुरुवातीला गित्ते यांनी कार्यभार स्वीकारला. पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये नऱ्हे, आंबेगावपासून ते भूगाव, पौड आणि चाकण-खेड अशा औद्योगिक पट्ट्यातही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार अनधिकृत बांधकामांना नोटिसा देत, त्यावर जोरदार कारवाई करण्याच्या सूचना गित्ते यांनी दिल्या होत्या. पीएमआरडीएकडे कारवाईसाठी स्वतंत्र साधनसामग्री नसल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर मर्यादा येत होत्या; परंतु गित्ते यांनी अनधिकृत बांधकामे आणि इमारतींच्या निर्मूलनाचे काम ‘आउटसोर्स’ करण्याचा निर्णय घेतला.
मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पीएमआरडीएच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. तीन मजली इमारतींसह औद्योगिक क्षेत्रात अनधिकृतरित्या उभारलेल्या गाळ्यांवरही कारवाई केली गेली; तसेच यापुढे कारवाईचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. पीएमआरडीएने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार सुमारे सोळाशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी सहा महिने सातत्याने कारवाई करावी लागेल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र, जूनच्या सुरुवातीला झालेल्या कारवाईनंतर गेल्या काही दिवसांत हा जोर एकदम थंडावला आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात उघडलेली ही मोहीम अचानक का थांबवण्यात आली, याची विचारणा केली जात आहे.
...
पीएमआरडीएकडे ‘लवासा’ची सूत्रे
पुणे ः राज्य सरकारच्या निर्देशांनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गुरुवारी लवासाची सर्व सूत्रे हाती घेतली. लवासातील सर्व बांधकामांवर यापुढे पीएमआरडीएचे नियंत्रण राहणार आहे.
मुळशी व वेल्हा तालुक्याच्या १८ गावांमधील तब्बल १० हजार पाचशे एकर क्षेत्र लवासा कॉर्पोरेशनच्या मालकीचे आहे. तत्कालीन राज्य सरकारने लवासाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला होता. त्यावरून बराच गहजब झाला अन् केंद्रानेही लवासाने पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता; तसेच पीएमआरडीएची स्थापना झाल्याने सरकारने डिसेंबर २०१६ पासून लवासाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पीएमआरडीएचे आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी लवासाच्या कार्यालयाला भेट देऊन सर्व सूत्रे ताब्यात घेतली. या वेळी महानगर नियोजनकार विवेक खरवडकर आणि लवासा कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लवासा येथे सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रवेश मिळावा, यासाठी पीएमआरडीएकडून प्रयत्न केले जातील, असे गित्ते यांनी स्पष्ट केले. लवासासारख्या हिल स्टेशनचा विकास करताना सर्वसामान्यांना त्याचा लाभ होईल, या दृष्टीने पीएमआरडीए कार्यरत राहील आणि स्थानिक नियोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येईल असे गित्ते यांनी नमूद केले.
......
प्रवेश कर रद्द होणार का?
लवासात प्रवेश करण्यासाठी सध्या बाहेरच्या वाहनांकडून अवाजवी शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. लवासाची सर्व सूत्रे पीएमआरडीएकडे आल्याने आता हा प्रवेश कर रद्द होणार का, याकडे लक्ष लागले आहे. कोणत्या नियमांखाली हा कर आकारला जातो, याचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढणाऱ्या तरुणांना भुशी डॅम येथे अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळ्यातील भुशीडॅम येथे वर्षाविहार आणि पर्यटनासाठी कुटुंबासमवेत ठाणे येथून आलेल्या एका मुलीची चार हुल्लडबाज तरुणांनी छेड काढली. तसेच त्या तरुणांनी संबंधित मुलगी व कुटुंबातील सदस्यांना अपशब्द वापरून त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता भुशीडॅम येथे घडली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी चार हुल्लडबाज तरुणांना अटक केली आहे.
सचिन तुकाराम शिंदे (वय २२), शरद सखाराम शिंदे (वय २८, दोघेही रा. आंबोली, ता. खेड), महेश अंकुश शिंदे (वय २४, रा. पुणे) आणि गणेश गणपत साबळे (वय २५, रा. साबळेवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या हुल्लडबाज तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा, ठाणे येथील एक कुटुंब लोणावळा येथील भुशीडॅम येथे पर्यटन व वर्षाविहारासाठी आले होते. त्यातील तरुणी, तिचा भाऊ, वहिनी आणि इतर नातेवाइकांसमवेत भुशीडॅम येथील पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद लुटत होते. त्या वेळी मागे बसलेल्या चार हुल्लडबाज तरुणांनी फिर्यादीसह तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अंगावर पाणी उडविण्यास सुरुवात केली. याबाबत तरुणीने विचारणा केली असता, त्यापैकी एकाने उद्धट तसेच लज्जा उत्पन्न करणारे वक्तव्य केले. यामुळे राग अनावर झालेल्या फिर्यादी तरुणीने एका तरुणाच्या गालात चापट मारली. त्यानंतर सदर तरुणांनी फिर्यादी आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली; तसेच अश्लील वक्तव्य केले. या घटनेसंदर्भात तरुणीने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून लोणावळा शहर पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांच्या विरोधात छेडछाड व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चारही तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images