Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उलगडला आठवणींचा पट

$
0
0

बहुआयामी अभिनेत्री दीप्ती नवल यांनी साधला पुणेकरांशी संवाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी प्रशिक्षित अभिनेत्री नाही. माझ्यामध्ये उपजतच अभिनयाचे गुण होते. अमृतसरमध्ये गर्दीच्या परिसरात राहत असल्याने मला अनेक जिवंत पात्र वाचायला मिळाली. असे निरीक्षण करूनच मी प्रत्येक सिनेमागणिक शिकत गेले. दृश्याची तालीम करायला मला अजिबात आवडायचे नाही. त्यामुळे फक्त तांत्रिक तालीमच केल्या. भूमिकेतील जिवंतपणा जपण्यासाठी थेट कॅमेऱ्यासमोर बिनधास्त उभी राहायचे.’ या आणि अशा अनेक आठवणींचा पट उलगडत गेला. त्यातून बहुआयामी अभिनेत्री आणि ज्येष्ठ कलाकार दीप्ती नवल बोलत्या झाल्या.
‘सिनेमा इंडस्ट्रीत माझी सुरुवात सहज झाली. नंतरचा प्रवासही तसा संघर्षाचा नव्हता. मात्र, इंडस्ट्रीत स्थिरावणे तुलनेने अवघड गेले; कारण कालांतराने साचेबद्ध आणि अप्रिय भूमिका ऑफर झाल्या. त्या मला करायच्या नव्हत्या. त्यामुळे नैराश्यही यायचे. मग या सगळ्यापासून काही काळ दूर जाण्यासाठी मी ट्रेकिंगकडे वळले. वेळप्रसंगी खर्चही कमी केला. ‘रील लाइफ’पेक्षा ‘रिअल लाइफ’चा मी पुरेपूर आनंद घेऊ लागले,’ या शब्दांत त्यांनी आपली वाटचाल कथन केली.
‘द मॅड तिबेटीयन : गोष्टी तेव्हाच्या आणि आताच्या’ या स्वलिखित पुस्तकाच्या मराठी अनुवाद प्रकाशनानिमित्त सोमवारी श्रीमती नवल पुण्यात आल्या होत्या. अभिनेत्री अमृता सुभाष यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’च्या (एनएफएआय) सहकार्याने मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक परिचय लेखिका डॉ. वीणा देव आणि अनुवादकार सुनंदा अमरापूरकर यांनी करून दिला. या कथासंग्रहात नवल यांनी अभिनेत्री म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांपेक्षा माणूस म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल छोट्या कथांच्या स्वरूपात लिखाण केले असून, माणसाच्या जगण्याचे विविध पैलू मांडले आहेत.
‘कमला’, ‘संध्या’, ‘आरती’ अशा विविध भूमिकांच्या आठवणीचा पट नवल यांनी चाहत्यांसमोर उलगडला. ‘श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ सिनेमातून मला सिनेमात ब्रेक मिळाला. मी सुरुवातील स्वकेंद्रीत होते. त्यामुळे काहीक गर्दीसमोर सेटवर अभिनय करताना अडचण यायची. विश्वास वाटणार नाही; पण चार-पाच सिनेमांपर्यंत म्हणजे ‘चष्मेबद्दूर’ प्रदर्शित होईपर्यंत माझा स्वकेंद्रीत स्वभाव मोकळा झाला नाही. नसरूद्दिन शहा, शबाना आझमी, नफिसा अली, स्मिता पाटील अशा ‘मेथड अॅक्टर’च्या सानिध्यात मी शिकत गेले. एखादी भूमिका प्रत्यक्ष अनुभ‍ण्यातून साकारण्यावर माझा भर असायचा,’ असे नवल यांनी नमूद केले. याबरोबरच बालपणीचा काळ, अमेरिकतले दिवस, तिथे रेडिओचे काम, हेमंत कुमार, सुनील दत्त, साधना, मेहदी हसन, गुलजार अशा दिग्गजांच्या भेटी अशा अनेक विषयांवर अमृताने नवल यांना बोलते केले.
सुनंदा अमरापूरकर म्हणाल्या, ‘दीप्ती नवल या व्यक्ती म्हणून खूप संपन्न आहेत. एखाद्या सीनवर कॅमेरा फिरत जातो आणि त्याचे सौंदर्य वाढत जाते, तशीच नवल यांची लेखणी प्रत्येक पात्राचे अनुभवविश्व वाचकांसमोर आणते. त्यांच्या लिखाणातून चित्रकार, फोटोग्राफर आणि कवीमन सतत डोकावते. प्रत्येक कथेत करुणभाव आहे; पण कुठेही नकारात्मकता नाही. प्रत्येक कथेत निसर्ग एखाद्या पात्राप्रमाणे आपल्यासमोर येतो.’
‘द मॅड तिबेटीयनमधील कथांमध्ये दुसऱ्याशी एकरूप होण्याची ताकद आहे. दीप्तीताईंच्या अंगी असलेल्या सगळ्या कला गोष्टींच्या माध्यमातून समोर आल्या आहेत, ’ असे सांगून देव यांनी पुस्तकातील कथांचे समीक्षण केले. राजेश दामले यांनी प्रास्ताविक केले. सुनील मेहता यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

मी अभिनेत्री आहे!
श्याम बेनेगल यांनी पहिल्या भेटीत दीप्ती नवल यांना ‘अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहेस का,’ असा प्रश्न केला. यावर ‘मी अभिनेत्री आहे,’ असे आत्मविश्वासाने सांगत त्यांनी बेनेगल यांचे मन जिंकले. यानंतर त्यांना एक जाहिरात मिळाली आणि बेनेगल यांच्याच ‘जुनून’ सिनेमातून करिअरचा श्रीगणेशाही झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखकांच्या रॉयल्टीवरही ‘जीएसटी’

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

पुणे : पुस्तकांच्या व्यवसायाची जीएसटीमधून सुटका झाली असली तरी, लेखकांच्या मानधनावर जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे. १२ टक्के दराने हा कर लावण्यात येणार असून लेखकाचे वार्षिक उत्पन्न २० लाखांच्या आत असेल, तर तो कर प्रकाशकांना भरावा लागेल, अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रकाशकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सरकारने पुस्तक प्रकाशन व्यवसायाला जीएसटीतून मुक्त केले आहे. प्रकाशकांना केवळ कागदावर जीएसटी भरावा लागतो. परंतु, आता लेखकांना देण्यात येणाऱ्या मानधनावर (रॉयल्टी) जीएसटी आकारण्यात येणार आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने कागद वगळता पुस्तक प्रकाशनाशी निगडीत कोणत्याही वस्तू किंवा सेवेवर कर लादला नव्हता. लेखकांचे मानधनही करापासून मुक्त करण्यात आले होते. मात्र, आता केंद्राकडून लेखकांना देण्यात येणाऱ्या मानधनावर जीएसटी आकारण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुस्तकांचा व्यवसाय जीएसटीतून मुक्त असल्याने कोणत्याही प्रकाशकाने अद्याप जीएसटीएन घेतलेला नाही. लेखकांनाही आजवर कोणत्याही करासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करावी लागली नाही. ज्या लेखकाचे वार्षिक मानधन २० लाख रुपयांच्या आत आहे, त्यावरील जीएसटी प्रकाशकाला भरावा लागणार आहे. त्यामुळे, आता जीएसटी नंबर घेण्यासाठी प्रकाशकांची धांदल उडणार आहे. प्रकाशक आणि लेखक दोघेही २० लाखापेक्षा कमी उत्पन्न गटात मोडत असतील तर मात्र, त्यांची जीएसटीपासून सुटका होईल. मात्र, या निर्णयामुळे मोठ्या प्रकाशकांना काही प्रमाणात अर्थिक भुर्दंड बसणार आहे. लेखकांच्या मानधनावरचा जीएसटी वाढवल्याने मोठ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात सीए दत्तात्रय जायदे म्हणाले, की सुरुवातीला मानधनावर जीएसटी आकारण्यात येणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले होते. आता मात्र, मानधनावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, लेखक किंवा प्रकाशक यापैकी एकाला कर भरणे बंधनकारक आहे. अनेक प्रकाशकांनी त्यांना व्हॅट लागू नसल्याने जीएसटीएनही घेतला नव्हता. पुस्तकांवर जीएसटी नाही म्हंटल्यावर तोही नंबर घेतलेला नाही. त्यामुळे, मोठ्या प्रकाशकांनी जीएसटीचा क्रमांक घेणे बंधनकारक आहे.

मोठे प्रकाशक अडचणीत
सरकारने अचानक बदललेल्या या निर्णयामुळे प्रकाशक विश्वात खळबळ माजण्याची शक्यता आहे. पुण्यात बहुतांश मोठे प्रकाशक आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २० लाखांच्या पुढे आहे. अशा प्रकाशकांना जीएसटीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं. आज दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मंगेश तेंडुलकरांनी अखेरच्या क्षणापर्यंत ब्रश सोडला नव्हता. ते वयाच्या पाष्ठीनंतरही कार्यरत होते. अगदी मागील महिन्यातच पुण्यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्यांच्या चित्रप्रदर्शनला आजही गर्दी होतं होती इतकी बोलकी चित्र ते रेखाटायचे. हास्य व्यंगचित्रकार म्हणून मंगेश तेंडुलकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली ती साध्या सोप्या चित्रसंकल्पानांच्या आधारावर.

तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो. यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याशिवा त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता. व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.

तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणाऱ्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपसल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत.

सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होतच, पण सामाजिक जाणिवेतून ते पुण्यातल्या वाहतूक समस्येसाठी अगदी रस्त्यावरच उतरले होते. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ते कर्वे रोडवर उभे राहत. त्यांचं हे काम खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी होतं.

तेंडुकरांच्या जाण्याने सध्याच्या व्यंगचित्रकारांवर ज्यांचा प्रभाव आहे असे भारदस्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे मत कलाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंध जपा मैत्रीचे

$
0
0

सध्याचा काळ हा मैत्रीचा काळ आहे. आंतरजालामुळे क्रांतीच घडली आहे. फेसबुक म्हणू नका, ट्विटर म्हणू नका, व्हॉट्सअप म्हणू नका, सगळीकडे सगळ्यांची मैत्री ओसंडून वाहते आहे. कुणाला ५००, कुणाला २००, कुणाला हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. हे सगळे आकडे आपल्याला काय सांगतात ?
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. दुसऱ्या माणसाच्या संपर्कात राहणं, त्याच्याशी संवाद साधणं हे त्याच्यासाठी आवश्यक आहे, किंबहुना माणूस म्हणून विकसित होण्याच्या प्रक्रियेतला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण हल्ली या गोष्टी वेगळे वळण घेताना दिसतात.
फेसबुकवर शेकडो मित्र असलेला जीव प्रत्यक्षात मात्र एकटा असतो. त्याची निराशा, दुःख हे सगळे मनातच राहिलेले दिसते. सोशल मीडियामध्ये आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून प्रयत्न करणारा तो किंवा ती प्रत्यक्षात मात्र प्रियजनांपासून दुरावलेले असू शकतात. मध्यंतरी एका चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्तीने फेसबुकवर ‘आता मी आत्महत्या करतोय’ असे जाहीर केल्यावर त्याच्या पोस्टला लाइक आले. ते बघून तो आणखी निराश झाला. आपण जे लिहितोय ते कुणी नीट वाचतही नाही, ही खंत त्याच्या आत्महत्येला खतपाणीच घालणारी ठरली. शेवटी नैराश्याने ग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली. त्या व्यक्तीच्या शेकडो फेसबुक मित्रांचा त्या वेळी काय उपयोग झाला? त्यापैकी एकाही माणसाला त्याला फोन करावा, त्याची चौकशी करावी असे वाटले नाही का?

असे प्रसंग घडले की खरेच मनात विचार येतो, मैत्री म्हणजे काय? आपले जवळचे मित्र-मैत्रिणी कसे ओळखायचे? कसे ठरवायचे व्यक्त होण्याचे मापदंड? या प्रश्नांचा खोलवर विचार केला तेव्हा काही उत्तरे मिळत गेली. मुळात मैत्री दोन मनांची व्हावी लागते. त्यासाठी तुम्ही एका गावात राहण्याची अट असतेच नाही. एका शहरात, एका राज्यात किंवा एका देशातही राहण्याची गरज नाही. त्यात कुठलेही वस्तूंचे आदानप्रदान अपेक्षित नाही. मी तुला अडचणीच्या काळात मदत केली, ती तू सदैव लक्षात ठेवून त्याबद्दल मी केलेल्या उपकाराचे ओझे मनावर ठेवले पाहिजे हेही गरजेचे नाही. कुठलाही व्यवहार गृहीत धरलेला नाही. मित्र-मैत्रिणीच्या चुकीच्या आग्रहाला बळी पडून गैरकृत्य करणाऱ्या सगळ्यांनीच (कुठल्याही वयोगटातील) हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपले खरे मित्र नेहमीच आपल्या विकासात साह्यकारी होत असतात. याउलट वरवर मैत्री अन मनात असूया, स्वार्थ किंवा दुष्टभाव ठेवणारे लोक आपल्याला विनाशाकडे देऊन जातात. म्हणूनच खऱ्या मैत्रीची व्याख्या समजून घेतली पाहिजे.

खरी मैत्री ही एखाद्या झऱ्यासारखी असते निर्मळ, नितळ आणि प्रवाही. सहजता आणि अकृत्रिम प्रेम (शारीरिक नाही) हे तर तिचे आधारस्तंभच. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला/मित्राला फोन लावता किंवा भेटता आणि तुमच्या मनात असलेले प्रश्न मोकळेपणाने विचारता, तुमचे विचार मांडू शकता ती खरी मैत्री. कारण तिथे तुम्हाला कोणत्याही प्रस्तावनेची गरज पडत नाही. ‘आणखी काय?’ सारखी निरुपयोगी वाक्ये म्हणावी लागत नाहीत. तुम्ही दाटून आलेल्या मेघासारखे कोसळून घेता आणि मग तुमच्या मनाचं आकाश एकदम निरभ्र होऊन जाते. तुमचे विचार तुम्हालाच आणखी स्पष्ट होतात.

थोडक्यात काय आपल्या आजूबाजूला, आपल्या शहरात आपल्या ओळखीचे लोक राहत असतात, ज्यांना आपण चुकून आपले जिवलग समजतो. खरे म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण फक्त गर्दीतला एक ओळखीचा चेहरा असतो. त्या लोकांमध्येही एखादा जिवलग असूच शकतो. ओळखीचे लोक आणि खरेखुरे मित्र यातला फरक मात्र आपण ओळखायला शिकायला हवे. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख आपल्या वाटायला येणार नाही. आपल्याला भेटणाऱ्या सगळ्याच माणसांशी आपण आपुलकीनेच वागायचे. मात्र, त्यांच्यात खरे मित्र म्हणून गुंतायचे नाही. शेवटी इतकेच म्हणेन की आपल्या खऱ्या मित्राशी /मैत्रिणीशी बोलणे हा स्वसंवाद असतो. ज्यात आपल्याला आपण अधिक उमगतो. आपला रस्ता आपल्याला सापडत जातो. ज्ञानोबा माऊली म्हणतात तसे हे ‘मैत्रं जीवांचे’ आपणा सगळ्यांनाच लाभो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाने उपद्रवमूल्य वाढवावे

$
0
0

धनगर आरक्षणाबाबत राम शिंदे यांचा सरकारला टोला

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘कायद्याच्या चाकोरीतून गेल्याशिवाय धनगर समाजाला परीपूर्ण आरक्षण मिळणार नाही. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकायला हवा असेल, तर लेचीपेची भूमिका घेऊन चालणार नाही. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मात्र, उशीर होत असल्याने आपले उपद्रवमूल्य वाढवणे गरजेचे आहे,’ असे मत व्यक्त करून जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. बारामतीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारामतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, रामराव वरकुटे व विश्वास देवकाते उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा धनगर आरक्षणाबाबत सूतोवाच केले आहे. मुस्लिम व मराठा आरक्षणासारखी याही आरक्षणाची परिस्थिती होऊ नये, यासाठी दक्षता घेऊन काम सुरू आहे. मात्र, आरक्षण देण्यास उशिर होत आहे. हे आरक्षण तातडीने देण्याचा निर्णय घेण्यासाठी समाजाने उपद्रवमूल्य वाढविले पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी विद्यार्थी व पालकांनी ज्युनिअर कॉलेजच्या आवारात प्रवेशांसाठी मोठी गर्दी केली होती. कॉलेजना केंद्रीय प्रवेश समितीकडून विद्यार्थ्यांची यादी उशिरा उपलब्ध करून देण्यात आल्याने काहीसा गोंधळा उडाला होता. सकाळी साडेदहा-अकराच्या सुमारास कॉलेजना यादी उपलब्ध झाली. त्यानंतर प्रवेशांचे कामकाज सुरळीत सुरू झाले.

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीचे प्रवेश सोमवारी रात्री जाहीर करण्यात आले. रात्री उशिरा विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लॉग-इन केल्यानंतर त्यांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, ते पाहता आले. केंद्रीय प्रवेश समितीने दिलेल्या माहितीनुसार एकूण ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी ज्युनिअर कॉलेजांमध्ये गर्दी केली होती. सुटीमुळे शांत असलेला कॉलेजांचा परिसर त्यामुळे गजबजून गेला होता.

९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावाच लागणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी पालकांसह कॉलेजमध्ये आले होते. मात्र, अकरा वाजेपर्यंत कॉलेजना विद्यार्थ्यांची यादी मिळालेली नसल्याने या विद्यार्थ्यांना तोपर्यंत ताटकळत बसावे लागले. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. याची माहिती प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेत देण्यात आली आहे. तरीही, काही विद्यार्थी व पालक आम्हाला कॉलेज बदलून हवे आहे, त्यासाठी काय करता येईल, याची चौकशी करीत होते. तर, काही विद्यार्थी पुढील फेऱ्यांची माहिती विचारत होते.

पहिल्या फेरीतून तब्बल १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळालेल्या कॉलेजात शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, पसंतीक्रमात दोन ते दहा क्रमांकाचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश घेता येईल किंवा दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहावी लागेल.

प्रवेशप्रक्रियेचा तपशील

एकूण प्राप्त अर्ज – ७८,४३८

कोट्यातील प्रवेश – १०,३०८

शिल्लक विद्यार्थ्यांची संख्या – ६८,१३०

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश – ४८,३२४

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या – १९,८०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महापौरांच्याच हस्ते प्रकल्पांचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त महापालिका प्रशासन; तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने (पीएससीडीसीएल) सुरू केलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि महापौरांच्या हस्ते ही उद्घाटने केली जाणार आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून स्मार्ट सिटीची योजना केली जात आहे. गेल्या महिन्यात २५ जूनला स्मार्ट सिटीला दोन वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून शहरातील गार्डन, हॉस्पिटलमध्ये मोफत वायफाय, स्मार्ट डिस्प्ले, लाइट हाउस या प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू होता. हा नियंत्रण कक्ष अनधिकृत असून शहरात अद्यापही ‘स्मार्ट ‌सिटी’चा एक प्रकल्पही दिसत नसल्याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे २५ जूनला होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलून ७ जुलैला करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी येण्याची कोणतीही वेळ पालिकेला दिली नाही. तसेच, त्यानंतर नक्की कधी येऊ शकतो, याबाबतची वेळही अद्याप दिलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट न पाहता पीएससीडीसीएल आणि महापालिकेकडून या प्रकल्पांची उद्घाटने उरकून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाइट हाउस प्रकल्पाचे उद्घाटन

पालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्वयंरोजगार केंद्रांचा लाइट हाउस प्रकल्प सुरू केला आहे. त्यातील एक प्रकल्प हडपसर येथेही उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज, बुधवारी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते केले जाणार आहे. या भागात उभारण्यात आलेल्या ७५० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाचे उद्घाटनदेखील महापौर टिळक यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-रिक्षांचा मार्ग खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ई-रिक्षांना परवानगी देण्याबाबत अनावश्यक हस्तक्षेप न करण्याचे धोरण परिवहन विभागाने स्वीकारले आहे. त्यामुळे शहरातील सर्व मार्गांवर परवानगी न घेता ई-रिक्षा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधनखर्च वाचवून नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने ई-रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या रिक्षांसाठीही परवाने खुले केल्यामुळे त्यासाठी आरटीओच्या परवानगीची गरज राहिलेली नाही. या धोरणाला रिक्षा संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत शहरातील कोणत्या मार्गावर या रिक्षांना परवानगी देण्यात यावी, याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी पाहणी करून वाहतूक कोंडी होणार नाही, या दृष्टीने ई-रिक्षांसाठी सतरा मार्गांची निवड केली; मात्र एकाही मार्गावर ई-रिक्षा सुरू झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर या विषयात अनावश्यक हस्तक्षेप न करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्यामुळे शहरात कोणत्याही मार्गावर कोणतीही परवानगी न घेता या रिक्षा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोल पथकांची महापौरांकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश मंडळांवरच्या नोटिसांसंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांनी मंडळांची बाजू मांडल्यानंतर आता ढोल-ताशा पथकांनीही सराव सुरू व्हावा, यासाठी महापौरांकडे धाव घेतली आहे. पथकांचा सराव २५ जुलैपूर्वी सुरू करण्यात यावा, अशी विनंती ढोल-ताशा महासंघाकडून महापौरांना करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडेही सरावावर घालण्यात आलेली बंधने शिथिल करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

ढोल–ताशा पथकांना सरावासाठी २५ जुलैपासून परवानगी देण्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. परंतु, हा कालावधी सरावासाठी पुरेसा नाही. त्यामुळे सरावासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी मिळावा, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन महासंघाला दिले आहे. त्यामुळे, पोलिसांनी परवानगी दिलेल्या तारखेच्या आधी काही दिवस ढोल-ताशा पथकांना वादनाचा सराव करण्याची मुभा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनाही ढोल-ताशा महासंघाकडून पत्र देण्यात आले असून सरावाची तारीख थोडी अलिकडे घेण्यात यावी, अशी विनंती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, ५ जुलैला पोलिसांनी पथकांचा सराव बंद केला होता. २५ जुलैच्या आधी सराव सुरू केल्यास पथकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ताकीद पोलिसांनी दिली होती. तेव्हापासून ढोल-ताशा महासंघाच्या विनंतीवरून नदीपात्रातील, डीपी रस्त्यावरील; तसेच उपनगरांमधील बहुतांश पथकांनी त्यांचे सराव बंद केले आहेत. परंतु, लवकरात लवकर सराव सुरू व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणावर महापौर मुक्ता टिळक काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बेकायदा वृक्षतोडीचा बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण सातत्याने महापालिकेच्या उद्यान विभागाचे कान पिळत असताना वृक्षतोडीचे कंत्राटदार बेकायदा वृक्षतोडीचा बाजार मांडून बसले आहेत. दुसरीकडे धोकादायक झाडे तोडण्याची परवानगी मिळत नाही आणि फांदीला हात लावला, तरी खटला भरण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्यांचेही शहरात पेव फुटल्याने धोकादायक झाडांनी पुणेकरांना घाम आणला आहे.

गेल्या दहा वर्षांत शहरातील अनियंत्रित वृक्षतोडीमुळे उद्यान विभागातील गोंधळ चर्चेत आहे. ‘या विभागालाच शहरातील झाडांबद्दल आस्था नाही. बांधकाम व्यावसायिकांची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली आहे,’ असे आक्षेप घेऊन वृक्षप्रेमींनी हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. गेली तीन वर्षे सुरू असलेल्या या सुनावणीत या कारभारातील त्रुटी पुढे आल्याने वृक्षतोडीवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्याचा फायदा घेऊन पुणेकरांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत.

सहकारनगर, पर्वती, कर्वेनगर, कोथरूडमधील जुन्या सोसायट्या, बंगल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जुने वृक्ष आहेत. मात्र, त्यापैकी अनेक वृक्ष धोकादायक बनले असून त्यांच्या फांद्या छाटणे, तर काही झाडे पूर्ण तोडणे आवश्यक बनले आहे. यासाठी नागरिक उद्यान विभागाकडे सातत्याने अर्ज पाठवत आहेत. मात्र, उद्यान विभागाच्या संपर्कातूनच माहिती मिळणारे काही खासगी वृक्षतोड कंत्राटदार नागरिकांची फसवणूक करीत आहेत. महापालिकेच्या परवानगीनेच आम्ही हे काम करीत असल्याचे सांगून प्रत्येक झाड तोडण्यासाठी लाखभर रुपयांची सर्रास मागणी केली जात आहे. लहान झाडे असली, तरी हजारांच्या घरात दर आकारला जात आहे. झाड तोडण्यासाठी एवढे पैसे आणायचे कोठून हा नागरिकांसमोर प्रश्न आहे.

ऐन पावसाळ्यात सर्व निर्णय प्रलंबित

न्यायाधिकरणाने वृक्ष प्राधिकरण समितीच्या कामाबद्दल आक्षेप घेऊन वृक्षतोडीला परवानगी देण्यापूर्वी अर्जाची कठोर छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. पण, सध्या वृक्ष प्राधिकरण समितीच नेमलेली नाही, त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शेकडो अर्ज उद्यान विभागात पडून आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडे पाडण्याचेही सर्व निर्णय प्रलंबित आहेत.

पोलिसांकडे तक्रार करा

यासंदर्भात उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले, ‘उद्यान विभागाने वृक्षतोडीसाठी कोणतेही कंत्राटदार नेमलेले नाहीत. एका झाडासाठी लाखभर रुपये खर्च मागणे अपेक्षित नाही. वृक्षतोडीच्या दर आकारणीबाबत नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी उद्यान विभागाने दरपत्रक प्रसिद्ध केले असून झाडाचा प्रकार, त्याचा आकार, उंचीनुसार किती रक्कम आकारली जाऊ शकते, याचे दर यामध्ये आहेत. महापालिकेच्या वेबसाइटवर उद्यान विभागाच्या विभागात हे दरपत्रक उपलब्ध आहे. अवाजवी रक्कम मागणाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने तक्रार नोंदवावी.’

स्वयंघोषित वृक्षप्रेमींचा उच्छाद

धोकादायक झाडे किंवा फांद्या तोडण्याची परवानगी मिळत नसल्याने नागरिक नाईलाजाने ते तोडू लागले, तर स्वयंघोषित वृक्षप्रेमींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तक्रार करू, त्यामुळे गुन्हा दाखल होईल, अशा धमक्या देऊन पैसे उकळण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

वृक्षतोडीचे दर

३६८ ते ८४० रुपये

पाच मीटर उंचीच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी लांबीनुसार प्रत्येक फांदीचे शुल्क

३८४ ते ८८२ रुपये

पाच ते दहा मीटर उंच झाडाच्या प्रत्येक फांदीसाठी शुल्क

१२१८ ते ३ हजार ३३९ रुपये

पूर्ण झाडाचा दर

२५० रुपये

फांद्यांची विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रतिटन दर

१२०० ते ३३५० रुपये

तोडलेले झाड पाच किलोमीटर अंतरावर लावण्यासाठी दर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आता मी आउट ऑफ कव्हरेज जाणार’

$
0
0

शस्त्रक्रियेला जाताना मंगेश तेंडुलकरांनी व्यक्त केली होती भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुग्णालयात मंगेश तेंडुलकर यांना शस्त्रक्रियेसाठी घेऊन जात असतानाचा हा प्रसंग. तेंडुलकरांच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू होती. त्यांनी मुलगी नेहा ढवळे व मुलगा महेश तेंडुलकर यांना जवळ बोलावले. त्यांच्याकडे असलेला मोबाइल, पाकीट, जवळच्या वस्तू काढून त्यांनी मुलाच्या हातात ठेवल्या. शेवटी त्यांनी कानाचे यंत्र काढून मुलीच्या हातावर ठेवले आणि तेंडुलकर म्हटले, ‘आता मी आउट ऑफ कव्हरेज जाणार.’ नेहा ढवळे यांनी हा प्रसंग सांगताच उपस्थित प्रत्येक जण गहिवरून गेला. दोन दिवसांपूर्वीच आता आपण या जगाचा निरोप घेणार आहोत, हे तेंडुलकरांना कळले होते. त्यामुळेच, त्यांनी मृत्यूही आनंदाने स्वीकारला, अशी भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.

मंगेश तेंडुलकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर उपस्थित कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी तेंडुलकर यांना आदरांजली अर्पण केली. त्या वेळी ‘बाबांनी मृत्यू जवळ आल्याचे ओळखले होते. ते हसत खेळत मृत्यूला सामोरे गेले,’ अशा भावना व्यक्त करून तेंडुलकरांची कन्या नेहा ढवळे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ‘बाबांचा स्वभाव परखड होता. आता आपल्याला प्रकृती साथ देणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मृत्यू स्वीकारण्याची तयारी केली होती. आम्हाला मात्र ते बरे होतील, अशीच अपेक्षा होती. त्यामुळे, ते त्या वेळी काय बोलून गेले त्याचा मतितार्थ आज कळतो आहे, त्यांची शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. काही वेळात त्यांना भेटायला मिळेल, अशा आशेने आम्ही बसलो होतो. पण मृत्यू आलाय, हे त्यांनी ओळखले होते. त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बाबांची प्राणज्योत मालवली,’ असे ढवळे यांनी सांगितले.

‘बाबांनी आम्हाला खूप काही दिले आहे. त्यांनी व्यंगचित्रातून कुणाला दुखावले नाही. उलट ज्यांची चित्रे काढली त्यांच्याशी मैत्री केली. बाबांच्या चित्रांमध्ये व्यंग असले तरी त्या चित्रांमधून कुणाचा अपमान केला नाही. व्यंगचित्रांची १०० प्रदर्शने करणे हे त्यांचे स्वप्न होते आता ते आम्ही पूर्ण करू,’ असे ढवळे यांनी नमूद केले.
...
अल्पचरित्र
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर व अर्थतज्ज्ञ डॉ. सुरेश तेंडुलकर यांचे ते बंधू होते. वैद्यकीय उपचारांसाठी तसेच हॉस्पिटलसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचा तेंडुलकर यांचा व्यवसाय होता. व्यंगचित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी ही कला आत्मसात केली होती.

१९५८ मध्ये पुणे विद्यापीठातून ते विज्ञान शाखेचे पदवीधर झाले. १९६० ते १९८६ या कालावधीत त्यांनी संरक्षण खात्याच्या मॅकॅनिकल प्रयोगशाळेत नोकरी केली. १९५४मध्ये त्यांनी काढलेले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले, तरी १९९५ नंतर त्यांची व्यंगचित्रकला खऱ्या अर्थाने बहरली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या मृत्यूचेही व्यंगचित्र काढले होते. रेषांच्या फटकाऱ्यांबरोबर त्यांनी विविध वर्तमानपत्र, नियतकालिकांमधून ललित लेखनही केले.

तेंडुलकरांची काही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यात प्रामुख्याने भुईचक्र, पॉकेट कार्टून्स आणि संडे मूड या पुस्तकांचा समावेश आहे. संडे मूड पुस्तकासाठी ‘वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार’ त्यांना मिळाला होता. त्याशिवाय त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘चिं. वि. जोशी पुरस्कार’ मिळाला होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यसमीक्षेसाठी ‘वि.स. खांडेकर पुरस्कार’, राज्य नाट्यस्पर्धा अभिनायचे रौप्यपदक, व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पोस्टरसाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, लायन्स क्लबचा सर्वोत्कृष्ट स्वाक्षरी पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
०००
कलाक्षेत्राची मोठी हानी

विविध मान्यवरांनी वाहिली तेंडुलकरांना श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चेहऱ्याआडचा माणूस व्यंगचित्रातून दिसतो, असे मंगेश तेंडुलकर आपल्या कलेतून सांगायचे. ‘तेंडुलकर मोठे की त्यांच्या बोटातून उतरलेली व्यंगचित्रे मोठी,’ असा प्रश्न कायमच उपस्थित व्हायचा. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी यांवर ते कायमच मार्मिक टिप्पणी करत. त्यांनी काढलेली व्यंगचित्रे लेखाइतकी, कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी महत्त्वाची आहेत. त्यांचे निधनाने कलाक्षेत्राची आणि पुण्याची मोठी हानी झाली आहे. वाहतुकीचे नियम पाळणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे ही त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दांत तेंडुलकर यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.
...
चेहऱ्याआडचा माणूस व्यंगचित्रातून दिसतो, असे सांगणारे तेंडुलकर माझे मित्र होते. व्यंगचित्रांतून त्यांनी रसिकांचे कलात्मक मनोरंजन आणि शिक्षण घडवले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या सामाजिक जीवनात सातत्याने वावरणारा ज्येष्ठ नागरिक आपण गमावला आहे.

- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम

----------

‘मंगेश तेंडुलकर मोठे, की त्यांच्या बोटातून उतरलेली व्यंगचित्रे मोठी,’ असा प्रश्न कायमच उपस्थित व्हायचा. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी यांवर ते कायमच मार्मिक टिप्पणी करत. त्यांनी काढलेली व्यंगचित्रे लेखाइतकी, कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी महत्त्वाची आहेत. सरस्वतीचा पुत्र आपल्या नकळत दूर गेला आहे. परंतु, हा दोस्त वेगळ्या रूपात परतणार अशी खात्री आहे.

- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-----------
मंगेश तेंडुलकर यांचे निधनाने पुण्याची मोठी हानी झाली आहे. आज या देशात जी काही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यापैकी ते एक होते. सामाजिक कामात लोकांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक मोहिमांसाठी उपयुक्त ठरला. पुणे शहरातील अनेक समस्यांबाबतीत त्यांनी आवाज उठवला. त्यांना विरोध झाला तरीही ते सर्वाधिक लोकप्रिय होते. माझा एक वैयक्तिक मार्गदर्शक हरपला आहे.

- मुक्ता टिळक, महापौर
---------------
साधारण एक वर्षापूर्वी माझी आणि तेंडुलकर सरांची भेट झाली. त्या भेटीत शहरातील वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक पोलिस याबाबत त्यांनी चर्चा केली. त्या दरम्यान त्यांना शहराच्या वाहतुकीची अत्यंत काळजी असल्याचे जाणवले. त्यानंतर मी अनेकदा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते.
- रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त
-------------
मंगेश तेंडुलकर हे मला सर्वप्रथम लेखक म्हणून परिचित झाले. तेंडुलकर घराण्यातील शब्दमाहात्म्य त्यांच्याकडेही उपजत होते. नाट्यसमीक्षक म्हणूनही ते नावारूपाला आले. १९९४ पासून माझी आणि त्यांची घट्ट मैत्री झाली. त्यांच्या ‘संडे मूड’ व ‘तेंडुलकरी स्ट्रोक्स’ या दोन पुस्तकांमध्ये विविध राजकीय, सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे भाष्य केले आहे. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते या समस्या मांडताना सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून रस्त्यावर उतरून काम करत. त्यांच्यामुळे व्यंगचित्र कलेच्या क्षेत्राला सुगीचे दिवस आले.
- शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार
----------------
मंगेश तेंडुलकर यांच्या रेषा ‘बोलक्या’ होत्या. थोड्या रेषेत ते अधिक बोलायचे. त्यांनी कलेचे शिक्षण घेतले नव्हते. त्यांना जी नैसर्गिक देण होती, ती त्यांनी जनसमूहासमोर ताकदीने मांडली.

- मुरली लाहोटी, ज्येष्ठ चित्रकार
------------
गेल्या २५ वर्षांपासून मंगेश तेंडुलकरांसोबत माझा स्नेह होता. ते उत्कृष्ट नाट्यसमीक्षक होते. सरकार आणि समाजाबद्दलचे आपले मत ते परखडपणे व्यंगचित्रातून स्पष्ट करत. त्यांच्या अचानक जाण्याने रेषांचा बादशहा आणि चांगला माणूस हरवला आहे.
- रवी परांजपे, ज्येष्ठ चित्रकार
-------------
व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रभावी जीवनभाष्य करणारा आणि सामाजिक भान असलेला व्यंगचित्रकार हरपला आहे. साहित्य आणि कलाक्षेत्र त्यांना कधीही विसरणार नाही. तेंडुलकर घराण्याचा कलेचा वारसा त्यांनी मोठा केला.
- डॉ. न. म. जोशी, साहित्यिक
--------------
मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. तेंडुलकर बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले मित्र होते. राजकारण्यांकडून चुका झाल्या, तर ते त्वरित निदर्शनास आणून देत. त्याच्यामुळे एका वडिलधाऱ्या माणसाचा हात आपल्या पाठीवर कायम आहे असे वाटत असे. आता मात्र पाठीवर सरांची थाप मिळणार नाही, याचे दुःख आहे.
चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे माजी आमदार
------------
तेंडुलकरांच्या जाण्याने व्यंगचित्र जगताचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक चित्रकारांच्या पिढ्या त्यांची चित्रे पाहत आणि निरीक्षण करत मोठ्या झाल्या. त्यांनी केवळ राजकीय आणि विनोदी व्यंगचित्रे साकारली नाहीत, तर समाजकारण आणि तत्त्वांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे साकारून या कलेत वेगळा पायंडा निर्माण केला.
- चारुहास पंडित, व्यंगचित्रकार

-----------
मंगेश तेंडुलकर सर्जनशील कलाकार आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते होते. आसपासच्या खुपणाऱ्या बाबींवर परखड भूमिका घेण्याचे त्यांनी कधी टाळले नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे ही त्यांना आदरांजली ठरेल.
- सुभाष वारे, विश्वस्त, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन

--------------
मंगेशजींनी चित्रकलेमध्ये वेगळ्या पद्धतीने व्यक्तिमत्त्व प्रस्थापित केले. व्यंगचित्रांमधून त्यांनी समाजाला वेगळी दिशा दिली. संस्कार घडविण्याचे काम केले. प्रत्येक साहित्यिक त्यांचा चाहता होता. त्यांच्या जाण्याने आमच्यासारख्या कलाकारांवर शोककळा पसरली आहे. पुण्याच्या वैभवात भर घालणारा हा कलावंत होता.
- दिनकर थोपटे, ज्येष्ठ शिल्पकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालयांना संचालक मंडळच नाही

$
0
0

कामगार आयुक्तांनी दिली माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रंथालयांसाठी प्रशासनाने अद्याप संचालक मंड‍ळाची निवड केलेली नाही. त्यामुळेच दोन वर्षांमध्ये लाखो रुपये उपलब्ध असूनही ग्रंथालयांसाठी कोणत्याही दर्जेदार पुस्तकांची खरेदी केलेली नाही, असे सांगत स्वतः कामगार आयुक्तांनीच कामगार कल्याण मंडळाचा संथ कारभार समोर आणला आहे.
ग्रंथालयांच्या देखरेखीसाठी तयार करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि ते प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हापासून कामगार कल्याणच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये कोणत्याही पुस्तकाची खरेदी झालेली नाही. दर वर्षी कामगार कल्याण मंडळाला पुस्तक खरेदीसाठी लाखो रुपयांचा निधी मिळतो. तो निधीही पडून राहिल्याने त्यामध्ये संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप, साहित्य वर्तुळातून होत आहे. कामगार कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी न्यायालयात खटला सुरू असल्याने दोन वर्ष पुस्तकांची खरेदी करण्यात आलेली नाही, असे सांगून कामगार कल्याण मंडळाच्या संथ कारभारावर प्रकाश टाकला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नेमण्यात आलेले संचालक मंडळ भाजप सत्तेत आल्यानंतर बरखास्त करण्यात आले. तत्कालीन संचालक मंडळाने त्या निर्णयाविरोधात नव्या सरकारच्या विरोधात न्यायालयाकडे धाव घेतली. तेव्हापासून आजपर्यंत कामगार कल्याण विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प असून कामगारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळेच, पुस्तक खरेदीसाठी दर वर्षी मंजूर झालेले ८० लाख रुपये विभागाकडे पडून आहेत. न्यायालयीन खटल्याचे कारण पुढे करून कामगार कल्याण आयुक्तांनीही पुस्तक खरेदीसाठी टाळाटाळ केली आहे. राज्यभरात असलेल्या कामगार कल्याण विभागाच्या एकूण ९० पेक्षा जास्त ग्रंथालयांची अवस्था अडगळीसारखी झाली आहे. चांगली पुस्तकेच उपलब्ध नसल्याने वाचक फिरकतच नसल्याचे चित्र आहे.
नव्या संचालक मंडळाची नियुक्ती होईपर्यंत कामगार कल्याण मंडळाकडून पुस्तकांची खरेदी करता येणार नाही, असे दाभाडे यांनी सांगितले आहे. सरकारी स्तरावर नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतरच पुढे पुस्तकांची खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखी किती वर्ष उजाडणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
---------------------
नव्या संचालक मंडळाची नियुक्ती होईपर्यंत कामगार कल्याण मंडळाकडून पुस्तकांची खरेदी करता येणार नाही. सरकारी स्तरावर नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतरच पुढे पुस्तकांची खरेदी केली जाईल.

- सतीश दाभाडे, कामगार कल्याण आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेविकेचा जातीचा दाखला अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
वडगाव शेरी मतदार संघातील फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक दोनच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचा जातीचा दाखला विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. याशिवाय कळस धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका किरण नीलेश जठार यांनीदेखील जातीचा बनावट दाखला सादर केल्याचे समोर आले आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन नगरसेविकांचे पद धोक्यात आले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत फरजाना शेख या प्रभाग दोनमधून इतर मागासवर्गीय महिला गटातून भाजप-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून विजयी झाल्या. त्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी केली नव्हती. त्यामुळे वकील भगवान जाधव आणि अर्चना कुचेकर यांनी तक्रार केली होती.
शेख यांनी जातीचा दाखला मिळविण्यासाठी वडीलांचे शॉप अॅक्ट प्रमाणपत्र लावले होते. त्या प्रमाणपत्रावर ‘दर्जी’(शिंपी) असा उल्लेख होता. केवळ या उल्लेखामुळे जात स्पष्ट होत नसल्याने जात पडताळणी समितीने घेतलेल्या सुनावणीत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे शेख यांचे पद धोक्यात आले आहे.
तसेच कळस धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका किरण जठार यांचेही जात प्रमाणपत्र पडताळणी सुनावणी लवकरच होणार आहे. जठार यांनी महापालिका निवडणुकीत बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी पुणे शहर तहसील कार्यालय आणि महापालिकेच्या उपायुक्त (निवडणूक) यांना दिला आहे. त्यामुळे जठार यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत जठार यांच्या जात दाखल्यावर सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकारनगर ते ‘एमआयटी’दरम्यान बोगद्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोथरूड-पौड रोड आणि लॉ कॉलेज रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच्या प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्याऐवजी पत्रकारनगर ते एमआयटी कॉलेजदरम्यान बोगदा केल्यास पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल, असा दावा नगरनियोजनाचे अभ्यासक डॉ. प्रकाश भावे यांनी केला आहे. या प्रस्तावित बोगद्याला जोडणारे ‘अॅप्रोच रोड’ सध्या अस्तित्वात असून, त्यातून वाहतुकीची मोठी समस्या दूर होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी गेल्या आठवड्यात स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतली. या रस्त्यासाठी पर्यावरण आघात मूल्यांकन (एन्व्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट अॅसेसमेंट) करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या रस्त्याला पर्यावरणप्रेमींचा मोठा विरोध आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असेल, तर या रस्त्याऐवजी पत्रकारनगर ते एमआयटी असा बोगदा निर्माण करून प्रश्न सोडवता येऊ शकतो, अशी कल्पना डॉ. भावे यांनी मांडली आहे. या बोगद्यासाठी ‘अॅप्रोच रोड’ एमआयटी कॉलेज आणि पत्रकारनगर परिसरात सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे बोगद्यामुळे या भागांतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने २००३ मध्येच या बोगद्याच्या व्यवहार्यता तपासणीचे काम दिले होते. त्यामुळे पुन्हा बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी अहवाल आणि सल्लागारावर खर्च करण्याची आवश्यकता नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पत्रकारनगर ते एमआयटीच नाही, तर सेनापती बापट रोड (चतुःशृंगी ते एनसीएल) आणि हिंगणे खुर्द ते सहकारनगर असे आणखी दोन बोगदे काढण्याचा प्रस्तावही डॉ. भावे यांनी ‘पुणे रीच’ संस्थेच्या माध्यमातून मांडला होता. त्यापैकी हिंगणे खुर्द ते सहकारनगर या बोगद्याचा समावेश महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) केला आहे. सध्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याने (सिंहगड रोड) सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी किंवा अरण्येश्वर-कात्रज या परिसरात जायचे असेल, तर खूप मोठा वळसा घालावा लागतो. या प्रस्तावित बोगद्यामुळे हे अंतरही कमी होऊ शकणार आहे. त्यामुळे त्याचाही प्राधान्याने विचार केला जावा, अशी
मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी रस्त्यावरील हॉटेलांचे पाणी तोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डीपी रस्त्यावरील म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यान मुठा नदीकाठच्या बांधकामांना पाणीपुरवठा करत असलेल्या अनधिकृत नळांची जोडणी तोडण्यास महापालिकेने सुरुवात केली असून मंगळवारी सात हॉटेल आणि एका सभागृहाचे नळजोड तोडण्यात आले.
डीपी रस्त्यावरील म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यान मुठा नदीच्या पूररेषा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे दोन आठवड्यात शोधून त्यापुढील चार आठवड्यांत पाडून टाकण्यात यावी, असा आदेश ‘एनजीटी’च्या खंडपीठाने दिला. त्यानुसार महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात नदीपात्रातील आणि निळ्या पूररेषेतील (ब्लू लाइन) बांधकामांचे संयुक्त सर्वेक्षण केले. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी नदीपात्रातील बांधकामांना असलेल्या नळजोडांची पाहणी केली. अखेर मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विष्णूजी की रसोई, हॉटेल कावेरी, गॅरेज (हॉटेल कोकणरत्न), कृष्णा गार्डन, पी के बिर्याणी, सिंहगड चौपाटी, हॉटेल चूलमटण अशी सात हॉटेल्स आणि रेड्डीज पार्टी हॉल अशा आठ मिळकतींचे नळजोड काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हलाखीच्या परिस्थितीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
रूपीनगर येथील बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरची हलाखीची परिस्थिती व अभ्यासाच्या ताणतणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (११ जुलै) दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.
स्वाती सुभाष चितवे (रा. स्वामी समर्थ हाउसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातीने राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी तिची आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती, दोन लहान भावंडे शाळेत; तर वडील कामावर गेले होते. आई भाजी घेऊन परत आली असता घराचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला.
स्वाती ज्ञानदीप शाळेमध्ये १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. घरात वडील एकटेच कमावते होते. त्यांचाही पगार जेमतेम असल्यामुळे त्यांची परिस्थिती बेताचीच होती. मात्र, वडीलांचा तिला शिक्षणाचा आग्रह होता. त्यामुळेच तिने विज्ञान शाखेत प्रवेशही घेतला होता. मात्र, हा सारा ताण असह्य झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समजते आहे. चितवे कुटुंब मुळचे लातूर येथील चाकुरचे राहणारे असून, स्वातीवर गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाळ्यात ओढणारी कथित अभिनेत्री अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
देशभरातील गुन्ह्यांचे नाट्यरूपांतर करून नागरिकांना सर्तक ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मालिकेत काम करणाऱ्या कथित अभिनेत्रीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील अनेकांना जाळ्यात ओढून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली असून, आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी ती पोलिस ठाण्यात आल्यावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे खरे प्रकरण उघड झाले.
कथित अभिनेत्री पूजा जाधव ऊर्फ प्रणिता पवार हिच्यासह रवींद्र शिरसाम, माया सावंत (रा. खराळवाडी, पिंपरी), सोनम दत्तात्रेय पवार (२४, रा. नेहरूनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन साथीदार अनिता जाधव आणि माया ओव्हाळ पसार झाल्या आहेत.
शनिवारी (८ जुलै) रवींद्र हा तीन महिलांसह भोसरी पोलिस ठाण्यात आला. एका व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार या चौघांना द्यायची होती. महिला ज्या पद्धतीने घडलेला प्रकार सांगत होत्या, त्यावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; तसेच त्या महिलांची चौकशी केल्यावर हा वेगळाच प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
धनाढ्य तसेच व्यावसायिकांना जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधायची, त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असा उद्योग या टोळक्याकडून सुरू होता. पोलिसांनी चौकशी करताना पूजाने सुरुवातीला आपले नाव प्रणिता पवार असल्याचे सांगितले होते. तसेच तिचे आई-वडील हे कोल्हापूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पूजासह तक्रार देण्यासाठी आलेल्या महिला आणि रवींद्र हे आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याचे पोलिसांना सांगत होते.
या वेळीही पूजा व तिच्या सहकाऱ्यांनी एकाला बिल्डर समजून जाळ्यात ओढले. परंतु तो पीओपीचे काम करणारा कामगार निघाला. त्यांनी त्याला लॉजवर बोलावले, त्याच्याशी पूजाने जवळीक साधली. नंतर गाडीमध्ये बसवून अनोळखी ठिकाणी नेऊन त्याच्याकडे ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ज्यावेळी तो पुरुष बिल्डर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याच्या जवळचे ६ हजार रुपये काढून घेतले.
पोलिसांनी प्रत्येकाला वेगवेगळे बसवून चौकशी केल्यावर प्रणिताने स्वतःचे नाव पूजा जाधव असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यांचे नाट्यरूपांतर करणाऱ्या हिंदी मालिकेत तिने पोलिसाची भूमिका केल्याची माहिती दिली. मात्र, पूजाने यापूर्वी कधीही मालिकेत काम केले नसल्याचे मालिकेच्या संबंधित व्यक्तींकडे चौकशी केल्यावर समजले.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये बलात्कार अथवा विनयभंगची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडितेबरोबर काही महिला आणि एक-दोन पुरुष असतात. ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते असल्याचे पोलिसांना सांगून, गुन्हा दाखल करण्यास भाग पाडत असल्याचे भोसरी पोलिसांना माहीत होती. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी वाकड, लोणावळा यासह काही पोलिस ठाण्यांमध्ये चौकशी केल्यावर महिलांची ही टोळी असल्याचे समोर आले.

तक्रार देण्यासाठी पुढे या
युवतीशी लगट केल्यावर जाळ्यात अडकलेले कोणीही बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे या टोळक्याचे फावते आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास, संबंधितांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. सध्या या टोळक्याच्या चौकशीत काही फसवणूक झालेल्यांची नावे पोलिसांना समजली आहेत. त्यामुळे तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुक्का पार्लरवर छापे

$
0
0

पो​लिस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे शहरातील अवैधधंदे आणि हुक्का पार्लवर छापे टाकण्यात धाडी टाकण्यात येत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये वीसपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करून, हजारो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असण्यावरून मोठा गोंधळ झाला होता. त्या वेळी पोलिस आयुक्तांनी शहरातील हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेकडून दररोज कारवाई सुरू आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडई परिसरातील लॉटरी सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन जणांवर कारवाई करण्यात आली. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका खेळणाऱ्यांवर आणि चालकावर कारवाई करण्यात आली.
काळेपडळ येथे गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करून २०लिटर दारू जप्त करण्यात आली. भोसरी परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आले. विश्रांतवाडी बसस्टॉपच्या मागे असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ४१० रुपयाचा ऐवज जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांवर कारवाई केली. कोरेगांव पार्क येथील ‘हुक मी अप’ या हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का चालवणारा, हुक्क्याचे साहित्य पुरविणाऱ्या आणि हुक्का ओढणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक हजार आठशे रुपये किमतीचे पॉटस आणि वेगवेगळ्या चवीची तंबाखू आणि हुक्का ओढण्याची साधने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
कोरेगाव पार्क परिसरातील नेरल रस्ता, बंगला नं. ए नऊ आणि गोल्ड फिल्ड रो हाउस नं. ३९७ या दोन आलिशान बंगल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने छापा टाकून तेथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या ठिकाणी राज्यातील, दिल्ली,बेंगळुरूतील मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या कारवाईत पोलिसांनी नऊ मुलींची सुटका करून, सूरज गुप्ता, राजेंद्र यादव यांना अटक करून १६ जणांवर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणसाठ्यात घट

$
0
0

पाणलोटक्षेत्रातील पाऊस घटल्याचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत सुमारे १०.०५ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, यंदा प्रमुख धरणांमध्ये सुमारे ८.०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरण परिसरात जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांची पाणी पातळी वाढली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे धरण पातळीत फारशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत सुमारे १०.०५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा तुलनेने पाणीसाठा कमी असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांमध्ये गेल्या वर्षी असलेल्या पाणीसाठ्याचे प्रमाण सुमारे ३४.४८ टक्के होते. यंदा अवघे २७.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरण परिसरात पाऊस थांबला आहे. खडकसवासला धरण परिसरात आतापर्यंत सुमारे १९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. वरसगाव धरणाच्या ठिकाणी ५९३ मिलिमीटर, टेमघर भागात ९१२ मिलिमीटर, पानशेत भागात ५६९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण २९.१५ टक्के, पानशेत धरण ४५.२३ टक्के, वरसगाव १९.०५ टक्के आणि टेमघर ६.६३ टक्के भरले आहे.
धरण आणि पाणीसाठा (टीएमसीत)
खडकवासला ०.५८
पानशेत ४.८२
पवना ३.८७
भामा आसखेड २.९२
चासकमान २.७५
माणिकडोह १.८२
डिंभे ३.४३
मुळशी ५.७९
वरसगाव २.४४
टेमघर ०.२५
भाटघर ५.५४
वीर १.४५
नीरा देवघर ३.०७
कळमोडी १.५१
आंद्रा २.१५
उजनी ८.८० (उणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमतदारांसाठी मोहीम

$
0
0

कॉलेजमध्ये प्रवेशावेळी मतदार नोंदणीची माहिती विचारणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तरुण मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम घेण्यात येत असून, वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतानाच संबंधित विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव आहे की नाही, याची माहिती द्यावी लागणार आहे; तसेच कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याची मतदार नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र प्राचार्यांकडून घेण्यात येणार आहे.

विधानसभेच्या २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १८ ते २१ या वयोगटातील मतदारांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नवमतदारांकडून ‘अर्ज ६’ भरून घेण्यात येत आहे.

याबाबत जिल्हा उपनिवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या, ‘तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी आठ ते २२ जुलै या कालावधीत मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी ​जिल्ह्यातील १२२ कॉलेजांमध्ये मतदार नोंदणी केंद्र आहेत. बारावी उत्तीर्ण होऊन वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतानाच प्रवेश अर्जासोबत मतदार नोंदणीचे अर्ज दिले जाणार आहेत. यापूर्वी मतदार यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांकडून याबाबतचे हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची माहिती द्यावी लागणार आहे. कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्यांकडून घेण्यात येणार आहे.’

‘शहर आणि जिल्ह्यातील १२२ कॉलेजांमध्ये मतदारनोंदणी करून घेण्यात येणार आहे. या कॉलेजमध्ये सुमारे सात हजार ४६९ लायझिनिंग ऑफिसर नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मतदार नोंदणीचा आढावा घेण्यात येणार आहे,’ असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

शहर आणि जिल्ह्यात २३ मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी करण्याची व्यवस्था आहे. त्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, कसबा पेठ, पर्वती, हडपसर आणि पुणे कँटोन्मेंट यांचा समावेश आहे,’ असे सिंह म्हणाल्या.
..........
आतापर्यंत एक हजार ३९८ तरुण आणि एक हजार १७९ तरुणी अशा दोन हजार ५७७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. २१ वर्षांवरील मतदारांकडूनही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, त्यांच्या नोंदणीचे काम सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
- मोनिका सिंह, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images