Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रुट कॅनल करताना सुई मुलाच्या पोटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
दातांवर उपचार सुरू असताना उपकरणाची सुई लहान मुलाच्या पोटात गेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये घडला.
अधिराज भास्कर माळी (वय ७, रा. तळेगाव दाभाडे) असे त्या चिमुरड्याचे नाव आहे. अधिराज सकाळी वडीलांसह हॉस्पिटलमध्ये आला होता. त्या वेळी डॉक्टरांनी रूट कॅनल करण्यासाठी उपकरणाद्वारे (डेंटल ड्रील) उपचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा मशिनचे बीट (सुई) गळून थेट त्या चिमुकल्याच्या पोटात गेली. डॉक्टरांना संशय येताच त्यांनी मुलाच्या पोटाचा एक्सरे काढण्यास सांगितले. तेव्हा ही बाब उघड झाली.
या सर्व प्रकरणास हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अधिराजचे वडील भास्कर माळी यांनी केला आहे. सकाळी हा प्रकार घडल्यानंतर दुपारपर्यंत आम्हाला वेगवेगळ्या विभागांत फिरवण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत कोणतेच उपचार केले नसल्याचेही माळी यांचे म्हणणे आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता, अशा घटना घडत असतात, असे उत्तर दिल्याचेही माळी यांनी सांगितले.
उपचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचे आमच्या डॉक्टरांच्या लक्षात आले. पेशंटची प्रकृती स्थिर आहे. मात्र, डॉक्टरांच्या निगरणीखाली त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. यात कोण दोषी आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तसेच आम्ही उपचार करीत आहोत व सकाळी शौचाद्वारे सुई बाहेर येईल. यामध्ये मुलाला कोणतीही इजा होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत आहोत, असे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दंत विद्यालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिंगरोडला सर्वपक्षीय विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
प्रस्तावित रिंगरोडसाठीच्या भूसंपादन कारवाईला पिंपरी-चिंचवडमधील सत्तारूढ भारतीय जनता पक्ष वगळता सर्व विरोधकांनी एकत्र येऊन विरोध दर्शविला आहे. ‘कोणालाही बेघर होऊ देणार नाही. संघर्ष समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,’ अशी ग्वाही विरोधकांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शेतकरी कामगार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष हरीश मोरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पक्षांची भूमिका स्पष्ट केली.
वाघेरे-पाटील म्हणाले, ‘शहरात सध्या रिंगरोडचा प्रश्न ज्वलंत आहे. त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांहून अधिक घरे बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे केवळ अशक्य आहे. वास्तविक, महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाने अनधिकृत बांधकामांच्या एका विटेलाही धक्का लावणार नाही, अशी वल्गना केली होती. काहींनी तर पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे नियमित करणे आदी प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले असताना आता नव्याने कारवाईचा मुद्दा उकरून काढण्याची गरज नाही. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रिंगरोडच्या प्रस्तावात बदल करणे गरजेचे आहे.’
कलाटे म्हणाले, ‘नोकरी-व्यवसायानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आलेल्या कामगारांना बेघर करू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. या प्रश्नाला राजकीय वळण देण्याची गरज नाही. संघर्ष समितीच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. भाजपने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. नव्याने प्रश्न निर्माण करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. नागरिकांचा कौल लक्षात घेता त्यांच्या भूमिकेला राजकीय पाठिंबा असणार आहे.’
साठे म्हणाले, ‘रिंगरोड रद्द करण्याच्या मागणीबाबत आम्हा विरोधकांची एकवाक्यता आहे. कोणत्याही आंदोलनामागे विरोधकांचा हात आहे, असा राग भाजप आळवित असते. परंतु, हे जनतेचे आंदोलन आहे. त्यांनीच राजकीय पाठिंब्याची गरज व्यक्त केली आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या आंदोलनात राजकीय पक्षांनी भाग घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. जनहित लक्षात घेऊन नियमात बदल करणे आवश्यक आहे.’
चिखले म्हणाले, ‘जिकडे तिकडे घरे पाडण्याचेच उद्योग चालू आहेत. या मुद्यावरून नागरिक हवालदिल आणि भयभीत आहेत. शहरातील विकासकामांना विरोध नाही. मात्र, त्यासाठी नागरिकांनाही विश्वासात घ्यायला हवे. १९७६ ते ८४ या कालावधीत आरक्षित असलेल्या रिंगरोडची आता खरेच गरज उरली आहे का? याचाही विचार व्हायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहोत.’
तायडे आणि मोरे यांनीही या प्रश्नावर राजकीय वाद बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा पुनरुच्चार केला.

सरड्यासारखा रंगबदल?
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मुद्यावर बरीच आंदोलने झाली. त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन जनआंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता. परंतु, आता सत्तेवर येताच त्यांनी घरे पाडण्याची मोहीमच हाती घेतली आहे. यावरून त्या पक्षाचे पदाधिकारी सरड्यासारखा रंग बदलत असल्याची टीका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली. रिंगरोडचा आग्रह आता कशासाठी? या प्रकल्पाच्या आजूबाजूला कोणाच्या जमिनी आहेत? टीडीआर घोटाळ्याची तर शक्यता नाही ना? या बाबी संशयास्पद आहेत. त्याचा खुलासा होणे आवश्यक आहे, अशी मागणी भापकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळक रोडवरील दुकानाला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
टिळक रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. या आगीमध्ये कम्प्युटरचे दुकान जळून खाक झाले असून शेजारच्या दुकानांनाही आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
टिळक रस्त्यावरील इंदिरा चेंबर ही चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये पहिल्या ‘मजल्यावर वर्ल्ड ऑफ लॅपटॉप’ नावाचे दुकान आहे. या ठिकाणी लॅपटॉप विक्री दुरुस्ती व अ‍ॅक्सेसरीजची विक्री करण्यात येते. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर करण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी दुकानातील स्वच्छता सुरू असताना शॉर्टसर्किट झाले आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर दुकानामधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे येथील दुकानदारांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
एरंडवणा अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या व टँकरने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने दुकानाला वेढले होते. मुख्य रस्त्यावरील दुकानात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. मात्र, दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेडिकल’चे प्रवेश ठरणार जिकिरीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदा राज्याच्या कोट्यातून मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश मिळणार आहे. दहावी परराज्यातून उत्तीर्ण मात्र, बारावी महाराष्ट्रातून झालेले विद्यार्थी आता मेडिकलच्या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. त्याचवेळी या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजांमध्ये ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’च्या प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. वेळ पडल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
देशात मेडिकल कॉलेजात प्रवेशासाठी संबंधित राज्याचा कोटा आणि अखिल भारतीय कोटा असे दोन प्रकार असतात. यंदा एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेच्या (नीट) गुणांवर होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील कोट्यातून या मेडिकलच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रातील असणे अपेक्षित आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा राज्यातून दिलेल्या असण्याची अट घातली होती. मात्र, या अटीच्या विरोधात काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार नियमात बदल करण्यात आला आहे. बाहेरील राज्यातून दहावी उत्तीर्ण झालेले; पण बारावी महाराष्ट्रातून केलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून त्यांना ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’च्या प्रवेशासाठी पराराज्यातील विद्यार्थ्यांशी झगडावे लागणार आहे. परराज्यातील विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्याने त्यांना ‘नीट’मध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक गुण मिळाले आहे. ‘सर्व राज्यांचे अभ्यासक्रम एकसारखे करण्याची आवश्यकता आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘नीट’ परीक्षेतील गुणांचा विचार केल्यास यंदा राज्यातील विद्यार्थ्यांना एमबीबीएस अथवा बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेताना झगडावे लागणार आहे, असे देवधर क्सासेसचे संचालक संदीप देवधर
यांनी सांगितले.

परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्याच्या कोट्यातून मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश मिळणार असल्यास हे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. देशातील इतर राज्यांमध्ये अशी तरतूद नाही. केवळ महाराष्ट्रात अशी तरतूद झाल्याने त्याचा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना बसेल. मात्र, या निर्णयामुळे राज्याचे नागरिक असलेल्या मात्र नोकरींमुळे परराज्यात स्थलांतर होणाऱ्या नागरिकांना फायदा होईल.
- हरिश बुटले, संस्थापक, डीपर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यसेवेची परीक्षा ३७७ जागांसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीपेक्षा उपलब्ध जागांमध्ये तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता ३७७ जागांसाठी मुख्य परीक्षा होणार असून उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक अशा पदांचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे ब गटातील उपशिक्षणाधिकारी पदाच्या जागाही वाढल्या आहेत.
राज्यसेवा परीक्षेची जाहिरात डिसेंबर २०१६ मध्ये काढण्यात आली होती. त्या वेळी १५५ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानुसार पूर्वपरीक्षा २ एप्रिलला झाली आहे. आता मुख्य परीक्षेसाठी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जाहिरातीपेक्षा जवळपास दुपटीने जागा वाढल्या असून ३७७ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. ‘अ’ गटात ७१ जागा होत्या त्या आता १०४ झाल्या आहेत; तर ‘ब’ गटातील पदांसाठी २७३ जागा आहेत. उपजिल्हाधिकारी पदाच्या १४; तर पोलिस उपअधीक्षक पदाच्या ५ जागांचा समावेश करण्यात आला आहे. वित्त व लेखा विभागातील सहायक संचालक पदाच्या (५), नगरपालिका मुख्याधिकारी (६) या पदांचा समावेश केला आहे. तसेच, सहायक संचालक कौशल्य विकास या पदाच्या २ जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘ब’ गटात उपशिक्षणाधिकारी पदाचा समावेश करण्यात आला असून या पदाच्या ५९ जागांवर निवड करण्यात येणार आहे. कक्षाधिकारी पदाच्या २ जागा वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना पसंतीच्या ज्युनियर कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावाच लागणार आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. दरम्यान, या फेरीतून तब्बल १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याने त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण उपसंचालक व समितीचे प्रमुख दिनकर टेमकर यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत उपस्थित होत्या. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १३ जुलैपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळालेल्या कॉलेजात शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, पसंतीक्रमात दोन ते दहा क्रमांकाचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश घेता येईल किंवा दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहता येणार आहे, असे टेमकर यांनी सांगितले. दरम्यान, व्यवस्थापन, संस्था अंतर्गत, अल्पसंख्याक आणि बायफोकल या कोट्यांमधून १० हजार ३०८ प्रवेश झाले आहेत.
समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स, आर्टस्, कॉमर्स, बायफोकल अशा शाखेच्या २६७ ज्युनियर कॉलेजांमधील एकूण ९१ हजार ६७० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत एकूण ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरले होते. त्यानुसार पहिल्या गुणवत्ता यादीनुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना पसंतीच्या ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये कॉलेजच्या पसंतीक्रमानुसार १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाचे पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. ही टक्केवारी २९.३४ अशी आहे. तर गेल्या वर्षी ३६ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळाले होते.‍ त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावाच लागणार आहे. या विद्यार्थ्यांना तसेच इतर पसंतीक्रमानुसार कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या १३ जुलैपर्यंत कॉलेजात शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या क्रमांकाचे पसंतीचे कॉलेज मिळूनदेखील संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेश न घेणारे प्रवेश प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडणार आहेत. तसेच, त्यांचा अॅप्लिकेशन आयडी ब्लॉक होऊन त्यांना पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र, पसंतीक्रमात दोन ते दहा क्रमांवर असणारे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश घेता येईल किंवा दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहता येणार आहे. त्यासाठी त्यांना पसंतीक्रमात बदल करण्याची संधी मिळणार आहे.

आरक्षणाचा लाभ
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा माजी सैनिक, बदली संवर्ग, स्वातंत्र्य सैनिक, अपंग संवर्ग, क्रीडा संवर्ग, कला संवर्ग आदी कोट्यातून आरक्षणाचा लाभ तब्बल ८ हजार ६६७ विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यातदेखील कला कोट्यातून ५ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे दहावीत मिळालेल्या कला गुणांचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विशेष आरक्षणाचा फायदा हा विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी अधिक केला आहे. आरक्षणामुळे ५ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेत; तर २ हजार ११८ विद्यार्थ्यांनी कॉमर्स इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला आहे. दरम्यान, या प्रक्रियेत एकूण ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ४३ हजार ०६९; तर विद्यार्थिनींची संख्या ३५ हजार ३६९ अशी आहे, असे समितीतर्फे सांगण्यात आले.

शाखा - अर्जांची संख्या
आर्टस् - ५८९१
आर्टस् (इंग्रजी) - २२९०
कॉमर्स - १२९६८
कॉमर्स इंग्रजी - २२३९७
इंग्रजी - ३३४५९
एमसीव्हीसी - १४३३
.................
- एकूण प्राप्त अर्ज - ७८४३८
- कोट्यातील प्रवेश - १०३०८
- शिल्लक विद्यार्थ्यांची संख्या - ६८१३०
- पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश - ४८३२४
- गुणवत्ता यादीनुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या - १९८०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांशी हुज्जत; दोघांना कोठडी

$
0
0

पुणे ः पळसे गाव येथील धबधब्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना अंधार पडल्यामुळे तेथून बाहेर काढत असलेल्या पोलिसांबरोबर हुज्जत घातल्याप्रकरणी पौड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणी पोलिसांनी, अक्षय गजानन मांडगे (२६, रा. एनडीए रोड, खडकवासला), सुचिता सुरेश पेंढारे (२५, रा. रणजित को. ऑप. हौसिंग सोसायटी, मांडेकर चाळ) यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रिया संजय जाधव या महिला कॉन्स्टेबलने फिर्याद दाखल केली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी आणि इतर पोलिस कर्मचारी पळसे येथील धबधब्याजवळ बंदोबस्त करत होते. अंधार पडत असल्यामुळे त्यांनी पर्यटकांना तेथून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तेव्हा पोलिसांबरोबर आरोपी उद्धटपणे वागले. धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळही केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेचे ‘अॅप’ शोधणार स्वच्छतागृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृह व शौचालयांची एकत्रित माहिती देणारे ‘टॉयलेट लोकेटर’ हे अॅप विकसित करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात एकमेव आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये दर्शवणारे ‘टॉयलेट लोकेटर’ अॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे. पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते. पिंपरी महापालिकेनेही त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात येणार आहे. त्याअगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेला (क्यूसीआय) हे सर्वेक्षणाचे काम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात येणार आहे. याचा शहराबाहेरून आलेल्या नागरिकांना फायदा होणार आहे. जवळच्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहे, ते लगेच एका क्लिकवर कळणार आहे. देशातील दिल्ली, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला आहे. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिलीच पालिका आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाकरमान्यांनी अडवली ‘दख्खनची राणी’

$
0
0

प्लॅटफॉर्म पाचऐवजी एकवरून गाडी सोडण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डेक्कन क्वीन गाडी पुणे स्टेशनवरून मुंबईसाठी रवाना करताना पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून सोडण्यात यावी, या मागणीसाठी प्रवाशांनी सोमवारी आंदोलन केले. गाडी सुटण्याच्या वेळेला प्रवाशांनी डब्यातून ‘चेन पुलिंग’ करून गाडी थांबविली. त्यानंतर ट्रॅकवर उतरूनही गाडी पुढे नेण्यास विरोध केला. या प्रकारामुळे गाडी तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली. परिणामी, अनेक प्रवाशांची गैरसोयदेखील झाली.
पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, आझाद-हिंद एक्स्प्रेस, पुणे-पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्यांना नेहमीच्या २३ डब्यांऐवजी २४ डबे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यासाठी १५ फेब्रुवारीपासून दोन जूनपर्यंत डेक्कन क्वीन गाडी प्लॅटफॉर्म एकऐवजी पाच क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, अद्यापही ही गाडी प्लॅटफॉर्म पाचवरून सोडण्यात येत आहे. सकाळी सव्वासात वाजता ही गाडी पुणे स्टेशन येथून सुटते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून पाचला जाण्यासाठी असलेल्या पुलाची रुंदी तुलनेने कमी आहे. सकाळच्या वेळेला या पुलावर प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म बदलताना दिलेली मुदत देखील आता संपली आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने अखेर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
दुसरा शनिवार आणि रविवारची सुटी असल्यामुळे सोमवारी या गाडीला प्रवाशांची गर्दी जास्त होती. प्रवाशांनी गाडी थांबविल्यानंतर रेल्वे स्टेशन व्यवस्थापक ए. के. पाठक यांनी प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी रेल्वेच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर गाडी रवाना झाली. सव्वाआठ वाजता निघालेली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी १२ वाजता पोहोचली.

‘त्या गाड्या दुसरीकडून सोडा’

पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, आझाद-हिंद एक्स्प्रेस, पुणे-पाटलीपुत्र एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या असल्यामु‍ळे या गाड्यांमध्ये पँट्री कार आहेत. पुणे स्टेशनला दाखल झाल्यानंतर त्या गाड्या स्वच्छतेसाठी पाठविल्या जातात. त्यावेळी या पँट्री कारमधील सर्व सामान बाहेर काढून ठेवावे लागते. हे सामान प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच ठेवले जाते. पुणे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा महत्त्वाचा मानला जातो. त्या ठिकाणी अशा पद्धतीने सामान ठेवणे चुकीचे आहे. या सर्व गाड्या या पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन किंवा तीनवरूनही सोडण्यात येत होत्या. त्यामुळे आता देखील त्याच प्लॅटफॉर्मवरून सोडव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागूल आणि मुंढे जुंपली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
एकदिवसीय मोफत पास योजनेविषयी चर्चा करण्यासाठी गेलेले काँग्रेस नगरसेवक आबा बागूल आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी शाब्दिक युद्ध रंगले. मात्र, या वेळी बागूल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून, मुंढे यांनाही दमबाजी केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाच्या तक्रारीवरून बागूल यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बागूल हे पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात गेले होते. पीएमपीच्या प्रवाशांना एक दिवसीय मोफत पास देण्याची योजना चर्चेत होती. त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बागूल गेले होते. त्यावेळी मुंढे आणि बागूल यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यावेळी त्यांच्या शाब्दिक युद्ध रंगल्याची माहिती मिळाली आहे. त्या वेळी बागूल यांनी मुंढे यांना दमबाजी करून, कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकामार्फत तक्रारीचे पत्र पाठविले. त्या पत्रात बागूल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावून मुंढे यांना दमबाजी केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरक्षा रक्षक सुरेश सोनावणे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

मुंढेंना नोटीस बजावणार : बागूल
‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता गेलो होतो. पुणे महानगरपालिकेने नऊ महिन्यांपूर्वी मुख्यसभेत ठराव केला होता. त्यात पुणेकरांना महिन्यातून एका दिवशी ‘पीएमपी’ मोफत असावी आणि त्या दिवशाची होणारी तूट महापालिकेला देईल, असा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपभोग घ्यावा, असा त्यापाठीमागे हेतू होता. अपघात टाळण्यासाठी ‘एक जीव, एक कुटुंब आणि एक शहर’ अशी भूमिका घेण्यात आली होती. या योजनेचे काय झाले, याबाबत माहिती घेण्यासाठी मुंढे यांच्या कार्यालयात गेलो होतो. तेव्हा मुंढे यांनी पहिली तुटीची रक्कम दिली तरच ही योजना राबवू, अशा पवित्रा घेतला होता. पुणे महापालिका ही ‘पीएमपी’ची ६० टक्के भागधारक आहे. त्यामुळे तुम्ही योजना राबवली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याचे बागूल यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान वेळप्रसंगी रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुंढे यांना कंपनीकायद्याप्रमाणे नोटीसही बजावणार आहे,’ असे बागूल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीरोडवरील मंगल कार्यालयांचा बेकायदा पाणीपुरवठा तोडणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपीरोडवरील मंगल कार्यालये, हॉटेल्स यांनी घेतलेले बेकायदा नळजोड पालिका प्रशासनाच्या वतीने तोडण्यात येणार आहे. पालिकेकडून अधिकृत नळजोड घेतल्याची कागदपत्रे येथील मिळकतदारांनी सादर न केल्याने मंगळवारपासून त्यांचे नळजोड तोडले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
डीपीरोडवरील नदीपात्रातील ब्ल्यूलाइन (निळी पूररेषा) मध्ये येणारी बांधकामे पाडण्याचे आदेश गेल्या आठवड्यात राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिकेला दिले आहेत. पालिकेला हे आदेश मिळाल्यानंतर पालिकेतील अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांबरोबर एकत्र पाहणी करून अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. या मिळकतींना करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने पाणीपुरवठा विभागाने शनिवारी या मिळकतींची पाहणी केली होती. २८ पैकी केवळ ८ मिळकतींकडे पालिकेचा अधिकृत पाणीपुरवठा घेतल्याची कागदपत्रे आढळली. त्यामुळे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. पाणीपुरवठा घेतल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी पालिकेने सोमवारपर्यंत येथील व्यावसायिकांना मुदत दिली‌ होती.
सोमवारी संपूर्ण दिवसभरात एकाही हॉटेल तसेच मंगल कार्यालय चालकाने अधिकृत नळजोड घेतल्याचा पुरावा दाखवला नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असून, मंगळवारीच हे नळजोड तोडण्यात येणार असल्याचे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख विजय कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भररस्त्यात वार करून २३ लाखांची रोकड पळविली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
दोन दिवस पेट्रोल पंपावर जमा झालेली २३ लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी निघालेल्या दोन कामगारांना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी चॉपरने वार करून लुटले. कात्रज-बायपास रोडवर सोमवारी दुपारी इंदू लॉनसमोर ही घटना घडली. यामध्ये एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोर पळून जाताना एका दुचाकी घटनास्थळी सोडून चौघेजण दुसऱ्या एका दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार बाबूराव बिराजदार (वय ४०) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे मॅनेजर अमोल बबन ढगे (२६, रा. नऱ्हेगाव) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रस्त्यावर भारत पेट्रोलियमच्या बेलदरे पेट्रोल पंपावर ढगे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. तर, जखमी विजयकुमार हे सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. तक्रारदार हे दररोज सकाळी आणि रात्री पंपावर काम करणाऱ्या मुलांकडून हिशोब घेऊन रोकड जमा केली जाते. ती रोकड सकाळी साडेआकरा वाजता कात्रज येथील सारस्वत बँकेत भरण्यात येते. शनिवारी व रविवारी दोन दिवस सुट्टी असल्याने दोन दिवसांची रोकड पेट्रोल पंपावर ठेवण्यात आली होती.
दोन दिवसांची जमलेली २२ लाख ९५ हजार रुपयांची रोकड सोमवारी सकाळी बॅगेत घेऊन तक्रारदार व विजयकुमार दुचाकीवरून कात्रज बायपास रोडने जात होते. त्यावेळी पंपापासून काही अंतरावर आल्यानंतर इंदू लॉनसमोर सीबीझेड दुचाकीवरून दोन मुले त्यांना कट मारून पुढे गेले. मात्र, त्यांचा वेग जास्त असल्याने ते पुढच्या स्कूल व्हॅनला धडकून खाली पडले. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवर दोघे आले. त्यांनी त्यांच्याजवळ येऊन गाडीवरून खाली उतरा, असे म्हणत झटापट सुरू केली. त्यातील एकाने विजयकुमार यांच्या डोक्यात व मानेवर चॉपरने वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सीबीझेडवरून आलेले दोघेही पळत तक्रारदार यांच्याजवळ आले. त्या दोघांनी ढगे यांना मारहाण केली. तसेच, विजयकुमार यांच्या पाठीवर अडकवलेली बॅग हिसकावली. त्यावेळी बॅगचा बंध तुटल्याने बॅग दोघांच्या हाताला लागली. बॅग मिळताच चौघेही एका दुचाकीवरून नऱ्हेच्या दिशेने पसार झाले.
विजयकुमार यांच्या डोक्यात व मानेवर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. तक्रारदार व नागरिकांनी त्यांना उचलून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड तसेच पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. हा प्रकार पाळत ठेवण्यात करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी राजकुमार वाघचौरे अधिक तपास करत आहेत.

गुन्ह्यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर
रोकड लुटण्यासाठी दोन दुचाकीवरून चौघेजण आले होते. त्यापैकी एक दुचाकी घटनास्थळीच पोलिसांना मिळून आली आहे. त्यातून पेट्रोल देखील संपलेले होते. रोकड असलेली बॅग हिसकवल्यानंतर चौघेजण एकाच दुचाकीवरून पसार झाले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे समोर आले आहे. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असताना चोरीच्या दुचाकीचा गुन्ह्यासाठी वापर केला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करण्यात आली. शहरातून बाहेर पडणारे सर्व पॉइंटवर कसून तपासणी सुरू केली होती. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू असा विश्वास देखील पोलिासंनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी व मुलाचा निर्घृण खून

$
0
0

चारित्र्याचा संशय; मुलगी व शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला

म. टा. प्रतिनिधी लोणावळा
चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर रागाच्या भरात मुलीवर व वाचवायला आलेल्या शेजाऱ्यावरही एका गृहस्थाने जीवघेणा हल्ला केला. मावळ तालुक्यातील कान्हे गावात ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
वसंत गोपाळ सातकर (वय ४०, रा. कान्हेफाटा, मावळ) असे हल्लेखोराचे नाव असून, या हल्ल्यात पत्नी रजनी (वय ३८) व मुलगा अनुष (१३) मरण पावले आहेत. सातकरची मुलगी श्रावणी (वय ९) व शेजारी गणेश आंबेकर (सर्व रा. कान्हेफाटा, मावळ) हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सातकरने पत्नीचे शेजारच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पत्नी, मुलगा, मुलगी आणि गणेश आंबेकर अशा चौघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. पत्नी आणि मुलाचा गळा चिरल्याने जागीच मृत्यू झाला, तर मुलगी श्रावणी हिच्या हातावर व चेहऱ्यावर आणि गणेश आंबेकर याच्या पोटावर वार करण्यात आले आहेत. त्यांच्यावर तळेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री सातकर यांच्या घरात सुरू असलेला आरडाओरडा ऐकून आंबेकर तेथे गेला असता, रागाच्या भरात सातकर यांनी आंबेकर याच्यावरही वार केले. वसंत सातकर हा कान्हेफाटा येथील महिंद्रा कंपनीत कामगार म्हणून कामाला आहे. हत्येनंतर आरोपी वसंत सातकर स्वतःहून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात हजर झाला. वडगाव पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा औद्योगिक संस्थांवर गुन्हे दाखल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील ३८ औद्योगिक सहकारी कंपन्या आणि संस्थांसाठी देण्यात आलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार झाले असून, संबंधित १४ संस्थांवर सहकार विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाज कल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या मागासवर्गीय औद्योगिक कंपन्या आणि संस्था स्थापनेसाठी हा निधी देण्यात आला होता.
राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून औद्योगिक सहकारी कंपन्या किंवा संस्था स्थापन करण्यासाठी भाग भांडवल म्हणून कर्जाच्या स्वरूपात हा निधी वितरित करण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरात २२ जिल्ह्यांमध्ये ३७२ कंपन्या आणि संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी १३२ संस्थांचे लेखापरीक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये ३८ संस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी १४ संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या सहकारी संस्थांच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगच्या अहवालात ओढण्यात आले होते. याबाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर समाज कल्याण विभागाने या संस्थांचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यामध्ये ३८ संस्था दोषी आढळल्या आहेत. या संस्थांना अत्यावश्यक सामग्री घेण्यासाठी सुमारे ५५० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. लेखापरीक्षण अहवालामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. काही संस्थांनी निष्कृष्ट दर्जाची सामग्री घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या १४ संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, उर्वरित संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामाजिक पीडा जाणण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नव्या पिढीला स्वच्छ समाजव्यवस्था मिळावी, यासाठी समता निर्माण करावी लागेल. समतेसाठी आपला स्वत:शीच संघर्ष आहे. परिवर्तन आणि सामाजिक संस्था यांची सांगड घातल्याशिवाय सामाजिक कार्य होणार नाही. आपला देश हे एक सामाजिक कुटुंब आहे. येथे गरीब आणि श्रीमंत अशी फार मोठी दरी पाहायला मिळते. समाजातील हे अंतर कमी करायचे असेल तर सामाजिक नेतृत्व करण्याआधी समाजाची पीडा कोणती आहे, हे जाणून घ्यायला हवे,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
दीपस्तंभ संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सार्वजनिक जीवनात नेतृत्त्व करू इच्छिणाऱ्या सर्जनशील व्यक्तींच्या नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा, या हेतूने सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी ते बोलत होते. युनिव्हर्सिटी वुमेन असोसिएशन अध्यक्षा शबनम पूनावाला, पल्लवी साबळे, श्यामला देसाई, वनराईचे राजीव धारिया, आयएसएस अधिकारी शेखर गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष के. सी. कारकर, प्रमोद बनसोडे, सूरज पोळ, कृष्णा जगदाळे, राहुल पाटील, सुप्रिया चव्हाण, शिवलिंग माळी उपस्थित होते.
कार्यशाळेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांनी संघटन कौशल्य विषयावर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सामाजिक संस्थांनी ‘सीएसआर’ अंतर्गत निधी मिळविण्यासाठी काय करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
सप्तर्षी म्हणाले, की सामाजिक जीवनात काम करताना नीतिमत्ता आणि संवेदनशील अतिशय महत्त्वाची आहे. समाजाचे भान असलेला व्यक्ती किंवा सामाजिक संस्था चांगल्या प्रकारे काम करु शकते. जातीव्यवस्था हा अतिशय गंभीर मुद्दा भारतात जाणवतो. जोपर्यंत जातीव्यवस्था देशातून जात नाही, तो पर्यंत आपण अंधकारमय वातावरणात आहोत. संजय सोमण यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे अव्वल

$
0
0

गेल्या आठवड्यात आठ हजार प्रकरणांचा ​निपटारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा कोर्टात आठ हजार १५१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यामध्ये प्रलंबित २,८२२ आणि दाखलपूर्व ५,३२९ प्रकरणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गेल्या आठवड्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. देशातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येतो. प्रलंबित असलेल्या आणि दाखलपूर्व असलेल्या तडजोड योग्य प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येतात. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पुणे ​जिल्हा न्यायालयातही हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा राज्यात पहिला क्रमांक आला, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव पी. आर. अष्टुरकर यांनी दिली.
पुणे जिल्हा न्यायालयात या उपक्रमाद्वारे ८,१५१ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. यामध्ये प्रलंबित असलेली २,८२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे फौजदारी स्वरुपाची तडजोडयोग्य (१,२८६), धनादेश न वटल्याची (७६९), बँकेची (७), मोटार अपघात न्यायाधिकरणाची (१४०), कामगारांची प्रकरणे (५०), वैवाहिक स्वरुपाची (१२९), दिवाणी स्वरूपाची (४४०) आदींचा समावेश होता. त्यातून पाच कोटी ४७ लाख १८ हजार ६२९ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकेच्या ४२५, वीजबिलाच्या ५१, पाणीपट्टीच्या २१९, टेलिफोनच्या ४,६३४ आदी मिळून ५,३२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून एकूण दोन कोटी ९९ लाख ९ हजार २८२ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली.

लोकअदालतीचा निर्णय अंतिम
कोर्टात प्रलंबित प्रकरणांची आकडेवारी कमी व्हावी तसेच, दाखलपूर्व प्रकरणे कोर्टाबाहेरच निकाली निघाव्यात, यासाठी राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी वर्षांतून दोनदा लोकअदालत भरविण्यात येत होती. मात्र, कोर्टातील प्रकरणांची संख्या लक्षात घेता आता दर तीन महिन्यांनी लोकअदालत भरविण्यात येते. पक्षकार तडजोडीने आणि सामं​जस्याने लोकअदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढू शकतात. एकदा प्रकरण निकाली काढण्यात आल्यानंतर पक्षकारांना पुन्हा अपील करता येत नाही. लोकअदालतीचा निर्णय अंतिम असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्लायडिंगचे दरवाजे वापराविना पडूनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात स्लायडिंगचे दरवाजे असलेल्या बसपैकी बहुतांश बसच्या दरवाजांचा वापर केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तत्कालीन पीएमपी प्रशासनाने दरवाजे असलेल्या बसची खरेदी केली होती. परंतु, मार्गावरील बसचे दरवाजे बंदच केले जात नसल्याने तो उद्देश सफल होताना दिसत नाही.
सिग्नलला थांबलेल्या बसमधून उतरत असतानाच बस चालू झाल्याने खाली पडून चाक अंगावरून गेल्यामुळे विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजजवळील सिग्नलला शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर पीएमपी बसच्या दरवाजाच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बसचा दरवाजा बंद असता, तर त्या मुलीचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पीएमटी आणि पीसीएमटी अस्तित्वात असताना ताफ्यात लाल रंगाच्या बस होत्या. तेव्हाच्या बसला दरवाजे नव्हते. त्यानंतर पीएमपीची स्थापना झाल्यानंतर केलेल्या बस खरेदीत प्रवाशांची सुरक्षितता डोळ्यापुढे ठेवून ऑटोमॅटिक दरवाजाच्या बसची खरेदी करण्यात आली होती. आता शहरातील बीआरटी मार्गांवर ऑटोमॅटिक दरवाजांचा वापर केला जातो. मात्र, अन्य साधारण मार्गांवर ९० टक्के बसच्या दरवाजे कार्यान्वित नसतातच, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. यापैकी किती बसचे दरवाजे तांत्रिकदृष्ट्या सुरू आहेत, हा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांनी बस थांब्याऐवजी सिग्नल किंवा अन्य ठिकाणी उतरू नये. चालत्या गाडीतून किंवा सिग्नलला उतरताना जीव धोक्यात घातला जातो. तसेच, पीएमपीच्या ड्रायव्हर, कंडक्टरने उपलब्ध असलेल्या दरवाजांचा वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रवासी मंचाने केले आहे.

दरवाजे उपलब्ध असलेल्या बसमध्ये दरवाजांचा वापर केलाच पाहिजे. थांब्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी उतरणे किंवा धावत्या बसमधून उतरणे यात प्रवाशांची चूक आहे. मात्र, दरवाजे बंद ठेवल्यास दुर्घटना टाळणे शक्य होईल.
संजय शितोळे,पीएमपी प्रवासी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार बस पुरेशा

$
0
0

खासदार अनिल शिरोळे यांचा दावा; पार्किंगसाठी पाठपुरावा करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, संपूर्ण शहरासाठी दोन हजार बस पुरेशा असल्याचा दावा खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी केला. तसेच, बस डेपो आणि पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार म्हणून गेल्या तीन वर्षांत केलेल्या विविध कामांची जंत्री शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पीएमपीच्या ताफ्यात १ हजार ५५० बस खरेदी करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली असली, तरी नव्याने आठशे बसची खरेदीही पीएमपीसाठी फायदेशीर ठरू शकते, अशी भूमिका शिरोळे यांनी मांडली. शहरात सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या अभ्यासानुसार दोन हजार बस पुरेशा आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी मुंढे चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘डिझेल आणि सीएनजी बसच्या खरेदीची किंमत, संचलनासाठी त्यावर येणारा खर्च आणि देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारा निधी, याचा अभ्यास करून नव्याने घेण्यात येणाऱ्या बस कोणत्या स्वरूपात घ्यायच्या, हे निश्चित केले जाईल’, अशी माहिती पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
संपूर्ण शहरात पाइप गॅस पुरविण्यासाठीचा विस्तृत आराखडा येत्या १५ जुलैपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पालिकेला सादर केला जाणार आहे. त्यानंतर, ऑक्टोबरपासून त्याचे काम सुरू होईल आणि ‘सिलिंडरमुक्त पुणे’ ही योजना प्रत्यक्षात येऊ शकेल, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.
पुरंदर व लोहगाव विमानतळ, स्मार्ट सिटी, खासदार निधीतील कामे यासह गेल्या तीन वर्षांतील इतर वेगवेगळ्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

‘मेट्रोची जबाबदारी पीएमपीकडे द्या’
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कंपनी स्थापनेच्या मसुद्यामध्येच ‘मल्टिमॉडेल सेवां’चा अंतर्भाव आहे. पीएमपीतर्फे शहरात बससेवा पुरविली जात असून, आता मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. भविष्यातील सर्वच वाहतूक सेवा एकाच कंपनीच्या अधिपत्याखाली असल्यास नियोजनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकेल, असा दावा करून सर्व प्रवासी वाहतूक सेवांसाठी पीएमपीला मान्यता द्यावी, अशी मागणी सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांचा समावेश येत्या आठवड्यात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांच्या समावेशाबाबतची अनिश्चितता येत्या आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (१४ जुलै) राज्य सरकारला मुंबई हायकोर्टापुढे गावांच्या समावेशाची भूमिका मांडावी लागणार असल्याने आगामी दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.
शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश केला जावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. गावांच्या समावेशाची अधिसूचना काढल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही अंतिम निर्णय घेण्यात टाळाटाळ केली जात असल्याने हवेली तालुका नागरी कृती समितीतर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सरकारला तीन आठवड्यांची मुदत दिली होती. येत्या आठवड्यात गावांच्या समावेशाबाबतची नेमकी भूमिका सरकारला कोर्टापुढे सादर करावी लागणार असल्याने पुढील दोन-तीन दिवसांतच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, सर्व ३४ गावे एकाचवेळी समाविष्ट करायची झाल्यास पायाभूत सुविधांसाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा खर्च करण्याची पालिकेची क्षमता नसल्याने सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार गावांच्या समावेशाबाबत आग्रही असले, तरी पालकमंत्री गिरीश बापट गावे घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. एकाचवेळी सर्व गावे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात यावी, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे, नेमका निर्णय काय होणार, याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाअभावी विद्यार्थी कात्रीत

$
0
0

मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांवर ‘एमपीएससी’ला मुकण्याची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विद्यापीठांच्या इंजिनीअरिंग परीक्षांचे निकाल रखडल्याने मेकॅनिकल शाखेचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. ‘एमपीएससी’ने मुख्य परीक्षा देण्यासाठी मेकॅनिकल शाखेत अंतिम वर्षात मिळालेले गुण १५ जुलैपर्यंत अर्जात भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजार आहे.
‘एमपीएससी’तर्फे ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी पूर्व परीक्षा ३० एप्रिलला पार पडली. राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेतून ९ हजार ८४८ विद्यार्थी येत्या ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले. मात्र, ‘एमपीएससी’ने मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना अंतिम वर्षाचे गुण भरण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मेकॅनिकल शाखेत पदवी मिळविली आहे, त्यांना अर्ज भरण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा इंजिनीअरिंगच्या मेकॅनिकल शाखेचा अंतिम वर्षाचा (बीई) निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, अशांना अर्जात गुण भरता येत नाहीत. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अर्ज करता येत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा २४ मे रोजी तर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा २ जूनला संपली. मुंबई विद्यापीठाची परीक्षा ३० मे रोजी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा याच कालावधीत संपली. विद्यापीठांचा निकाल ४५ दिवसांपूर्वी लागणे अपेक्षित आहे. मात्र, काही विद्यापीठांच्या परीक्षा संपून ४५ दिवसांचा कालावधी संपला तरी निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही.
मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत राज्यातील विद्यापीठांचे निकाल जाहीर न झाल्यास ते परीक्षेला मुकण्याची भीती आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कुलपती सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विविध विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याकडे तक्रार केली आहे.

एमपीएससी एखाद्या पदाबाबात जाहिरात प्रसिद्ध करतानाच त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हतेची माहिती आणि पूर्वकल्पना देते. या परीक्षेबाबात आणि पात्रतेबाबत काही महिन्यांपूर्वी माहिती प्रसिद्ध केली आहे. एमपीएससीतर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांचे वेळापत्रक फार पूर्वी ठरलेले असते. त्यामुळे त्यात ऐनवेळी बदल करता येत नाही.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images