Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या, परंतु जात प्रमाणपत्राची पडताळणी न केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय, इंजिनीअरिंग, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेत.
विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, इंजिनीअरिंग, वास्तुशास्त्र व औषध निर्माण शास्त्र अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीच्या वर्षात जात प्रमाणपत्र पडताळणी करता येते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षातील काही विद्यार्थ्यांनी अपरिहार्य कारणास्तव जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी सामाजिक न्याय व विशेष विभागाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थी २० जुलैपर्यंत जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. हे अर्ज संबंधित कॉलेज किंवा शैक्षणिक संस्थेकडे जमा करावयाचे आहेत. त्यांनी ते अर्ज समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे २७ जुलैपर्यंत सादर करण्याचे बंधन राहणार आहे. सहायक आयुक्तांकडून जास्तीतजास्त ३१ जुलैपर्यंत ते अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दिले जातील. त्यानंतर संबंधित समितीकडून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज तपासून पडताळणी प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. यामध्ये कॉलेज, शैक्षणिक संस्था किंवा सहायक आयुक्तांनी मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज येण्याची प्रतीक्षा न करता अर्ज प्राप्त होताच ते संबंधितांकडे पाठविण्याची सूचना केली आहे.

‘उशीर झाल्यास समिती जबाबदार नाही’
जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जामध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यास, त्यामुळे दावा तपासण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, वैद्यकीय, इंजिनीअरिंग, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास किंवा प्रवेश मिळू न शकल्यास त्या गोष्टीला जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही. विद्यार्थ्यांना हे मान्य असल्याचे लेखी घेऊनच संशयित प्रकरणे स्वीकारली जातील, असे सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेरणादायी कहाण्या सांगणारा ‘स्वयम्’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समाजातील विविध घटकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. अमृतयात्रा प्रस्तुत ‘स्वयम्’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ जुलै रोजी करण्यात आले आहे. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिरात संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
मनीषा पाठक, पुष्कर औरंगाबादकर, सुजाता रायकर आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. स्वतःचा शोध घेतलेल्या व्यक्तींचे अनुभव, त्यांचा संघर्ष, जिद्द सर्वांसमोर यावी आणि त्यांच्या अनुभव कथनातून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मनीषा पाठक यांनी ‘कैझन लिंग्वा’ या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागांतल्या मुलांना मराठीतून परदेशी भाषा शिकवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातली अनेक मुले आज स्वतःच्या पायावर उभी आहेत. पारंपरिक कला आणि आधुनिक व्यवस्थापनशास्त्र यांचा सुंदर मेळ घालत ‘कॉर्पोरेट कीर्तन’ या उपक्रमाद्वारे पुष्कर औरंगाबादकर यांनी अनेकांना प्रेरणा दिली. मॅनेजमेंटमध्ये किचकट वाटणारी उपयुक्त तत्त्वे ते ओव्या, आर्या, अभंग, गाणी, नर्मविनोद कथा या स्वरूपात सोप्या भाषेत सांगतात.
सुजाता रायकर यांनी ‘थॅलिसिमिया’ या रक्ताच्या दुर्धर आजाराविषयी जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. सुमारे ऐंशी थॅलिसिमियाग्रस्त मुलांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्याविषयी रायकर संवाद साधणार आहेत. या तिघांसह ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत.
हा कार्यक्रम सशुल्क आहे. ‘मटा’ कल्चर क्लब सभासदांना त्यासाठी सवलत दिली जाणार आहे. कल्चर क्लब सभासदांसाठीच्या सवलतीच्या दरातील प्रवेशिका सोमवारी ‘मटा’च्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रोड) कार्यालयात दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. इतर वाचकांनी कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी ९८२०११८२९६, तसेच ९८८१४९८२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. कल्चर क्लबच्या सभासदांना या कार्यक्रमाची ‌३५० रुपयांची प्रवेशिका ३०० रुपयांत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलप्रलयातून श्रीनगर अद्याप सावरतेय

0
0

मयुरेश प्रभुणे, श्रीनगर

एकीकडे जवाहरनगरमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या भक्कम इमारती, नव्या रोषणाईने नटलेली लाल चौकातील बाजारपेठ आणि दुसरीकडे पुराच्या खुणा न पुसता छोट्या गाळ्यातून भाजी, किरकोळ वस्तू विकणारे गरीब काश्मिरी; सप्टेंबर २०१४ च्या महापुराने सर्वांचेच होते नव्हते ते गेले. काही जणांनी वर्षा- दोन वर्षांत पुन्हा जम बसवला; पण बहुतेकांना सावरायला आणखी काही वर्षांचा कालावधी जावा लागेल.
भौगोलिक रचनेनुसार पुरांसाठी अत्यंत अनुकूल असणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यात मोठ्या पावसाच्या अभावी नियमितपणे पूर येत नाही इतकेच. सर्व बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेले काश्मीरचे खोरे हे झेलम आणि तिला येऊन मिळणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळावरच प्रामुख्याने वसले आहे. अनंतनाग ते बारामुल्ला हा झेलमचा २२५ किलोमीटरचा मार्ग कमी उताराचा असल्यामुळे काश्मीरमधील झेलमचा प्रवाहही संथ आहे. मोठ्या बर्फवृष्टीच्या वर्षांमध्ये उन्हाळ्यात झेलमचे पाणी नेहमीच्या प्रवाहाच्या सीमा ओलांडून बाहेर येते. अशा स्थितीत काश्मीरमध्ये शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय सप्टेंबर २०१४च्या पहिल्या आठवड्यात जगाला आला. २०१४ च्या महापुरात सुमारे तीनशे जणांचा बळी गेला. काश्मीर खोऱ्यातील २६०० गावांना पुराचा कमी- अधिक फटका बसला. शेते, बागा वाहून गेल्या. हजारो घरे पाण्याखाली गेली. शेकडो दुकाने- हॉटेल पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे झालेले नुकसान काही हजार कोटींच्या घरात आहे.
तीन वर्षांनंतर नव्याने उभारी घेणारे श्रीनगर काश्मिरी लोकांची जिद्द दाखवते. पण, ज्याच्या- त्याच्या कुवतीप्रमाणे सावरायला लागणारा वेळही भिन्न आहे. लाल चौकात काश्मिरी कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या शेख यांच्या म्हणण्यानुसार लालचौकातील बाजारपेठ आठवडाभर पुराच्या पाण्यात बुडाली होती. येथील शेकडो दुकानदारांचा सर्व माल भिजून सडून गेला. सर्व बचत वापरून, तसेच बँकेने मदत केल्यामुळे दोन कोटींचे दुकान नव्याने उभे राहिले. मात्र, अनेक जण अजूनही पुराने झालेल्या नुकसानातून सावरत आहेत.
जवाहरनगरमध्ये लहानशा गाळ्यात भाजी विकणाऱ्या अब्दुल समद यांचे पूर्वीचे किराणा मालाचे दुकान पुरात वाहून गेले. पुरेशी सरकारी मदत न मिळाल्यामुळे आज ते भाजी विकून आपला संसार कसाबसा चालवत आहेत. समद यांच्या दुकानात पुराच्या खुणा आजही जशाच्या तशा आहेत. पुराच्या गाळामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. कर्ज काढून अनेकांनी नव्याने हॉटेल उभारलीही. मात्र, सध्याच्या अस्थिर वातावरणात श्रीनगरमध्ये पर्यटक फिरकत नसल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.

जलप्रलयाची कारणे
काश्मीरमधील जलप्रलयाबाबत काश्मीर विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. शकील रॉमशू म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यात २०१४ मध्ये मोठी बर्फवृष्टी झाल्यामुळे झेलम आणि तिच्या उपनद्या आधीच भरून वाहत होत्या. अशा स्थितीत सप्टेंबर २०१४च्या पहिल्या आठवड्यात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा मान्सूनच्या वाऱ्यांशी संयोग होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. या स्थितीमुळे बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. नदीची पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता १७ हजार क्युसेक असताना तब्बल एक लाख २० हजार क्युसेकने पाणी वाहिले. कमी उताराचा प्रदेश असल्यामुळे हे पाणी संबंध काश्मीरच्या खोऱ्यात पसरले. मोठ्या प्रमाणात झालेले सिल्टेशन, पुराचे अतिरिक्त पाणी जिरवण्यासाठी बांधले गेलेले तलाव नष्ट होणे आणि पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरे बांधणे या कारणांमुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्टीच्या प्रवेशपरीक्षेत गोंधळ

0
0

मटा विशेष
Harsh.Dudhe@timesgroup.com
.............
@HarshDudheMT
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्थेतर्फे (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी घेतलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत (सीईटी) गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या दिवशी काही परीक्षार्थींनी दिवसभरात सोयीनुसार पेपर दिले. तसेच, काहींनी एकमेकांची उत्तरे पाहून प्रश्नपत्रिका सोडविल्या. तर, काहींना परीक्षा केंद्राची माहिती पूर्वीच माहिती असल्याने परीक्षेची ‘सेंटिंग’ केल्याचे समोर आले आहे. अशातच परीक्षेच्या जाहिरातीत ‘निगेटिव्ह मार्किंग’ असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ऐनवेळी ‘निगेटिव्ह मार्किंग’नसल्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातीच्या (एससी) १०० विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांला परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना दिल्लीतील नामांकीत प्रशिक्षण संस्थेत प्र‍वेशासाठी सुमारे दोन लाख रूपये आर्थिक साह्य देण्यात येते. तसेच, वर्षासाठी महिन्याला साधारण १२ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येतो. गेल्या वर्षापर्यंत ‘बार्टी’तर्फे ही प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जात होती. यंदापासून ही परीक्षा महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या सहकार्याने (एमकेसीएल) प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली. राज्यातील ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी २०१८ सालामध्ये निवडीसाठी ही परीक्षा दिली. त्यानुसार एमकेसीएलने अधिकृत केलेल्या पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील केंद्रांवर ही परीक्षा १ जुलैला ऑनलाइन पद्धतीने पेपर एक आणि दोन अशा दोन टप्प्यांमध्ये पार पडली. या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर मुलाखती होणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
ही परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू होणे अपेक्षित असताना सुमारे एका तास उशिराने सुरू झाली. अशातच काही केंद्रांवर परीक्षार्थींनी दिवसभरात ही परीक्षा दिली. दरम्यान, परीक्षेच्या वेळेत दोन विद्यार्थ्यांमधील कम्प्युटरचे अंतर कमी असल्याने विद्यार्थ्यांनी एकमेकांची उत्तरे पाहून पेपर सोडविले, अशा तक्रारी परीक्षार्थींनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या अर्जानुसार परीक्षा केंद्र मिळणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अाडनावावरून केंद्र देण्यात आले. तसेच, केंद्राची माहिती परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आली. काही विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे घराजवळची केंद्रे मिळाली. त्यामुळे विद्यार्थी आणि केंद्रप्रमुखाच्या मदतीने दिवसभरात सोयीनुसार परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेच्या नियमाविरूद्ध ही कार्यवाही करण्यात आल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. दरम्यान, प्रवेश परीक्षेच्या जाहिरातीत ‘निगेटिव्ह मार्किंग’ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कम्प्युटरवर परीक्षा सुरू झाल्यावर परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ नाही, अशी माहिती कम्प्युटरच्या स्क्रीनवर मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, ‘बार्टी’च्या प्रशासनाला देखील गोंधळ झाल्याची माहिती असल्याने त्यांनी परीक्षार्थींना ई-मेलद्वारे परीक्षेबाबत विविध माहिती विचारली आहे. तसेच, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी की नाही, अशी विचारणा केली आहे.

‘बार्टी’ प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणावर एका वर्षात सुमारे तीन लाख रूपये खर्च करते. अशा शंभर विद्यार्थ्यांची निवड बार्टी करणार आहे. या प्रवेश परीक्षेत भरपूर गोंधळ झाला आहे. परीक्षा केंद्रांवर ‘बार्टी’तर्फे कोणीच अधिकारी नव्हते. त्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडक परीक्षा केंद्रांवर पुन्हा ऑफलाइन फेरपरीक्षा घेण्यात यावी.
- परीक्षार्थी

प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत परीक्षार्थींनी आम्हाला सूचना कळविल्या आहेत. ‘एमकेसीएल’च्या सहकार्याने ही प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘एमकेसीएल’च्या चुकांमुळे या परीक्षेमध्ये विद्यार्थी गोंध‍ळले. परीक्षार्थींची परीक्षेबाबतची मते आम्ही त्यांना ई-मेल पाठवून जाणून घेतली आहेत. लवकरच फेरपरीक्षा घेऊ.
- राजेश ढाबरे, महासंचालक, बार्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमधून उतरताना विद्यार्थिनीचा मृत्यू

0
0

पुणे : सिग्नलला थांबलेल्या बसमधून उतरत असताना बस चालू झाल्यामुळे खाली पडून अंगावर चाक गेल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजजवळील सिग्नलला शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
पूनम दिलीप मिनियार (वय २०, रा. हरीजवळगा, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम ही मूळची लातूर जिल्ह्यातील असून एसपी कॉलेजला तृतीय वर्षाला शिकत होती. शनिवारी ती विश्रांतवाडी येथून कॉलेजला येत होती. सकाळी सव्वाअकरा वाजता पीएमपी बसमधून ती कॉलेजजवळच्या चौकात आली. या ठिकाणी बस सिग्नलला थांबली होती. त्यामुळे ती बसमधून उतरू लागली. पण, सिग्नल सुटल्यामुळे बस सुरू झाली. त्यामुळे ती खाली पडून बसच्या चाकाखाली सापडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी उपनिरीक्षक मुलानी तपास करत आहेत. पूनम अभ्यासात हुशार होती. आयएएस होण्याचे स्वप्न समोर ठेवून ती पुण्यात शिक्षणासाठी आली होती. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काहीजण तिला शिक्षणासाठी मदत करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा जुलैनंतर मान्सून सक्रिय

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वातावरणातील बदल अनुकूल नसल्याने मान्सूनने विश्रांती घेतली आहे. राज्यातही पावसाचा जोर पुन्हा वाढण्यासाठी अजून तीन ते चार दिवस वाट बघावी लागणार आहे. येत्या १२ जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या आठवडाभरापासून पुण्यासह राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पेरणी संकट ओढवले आहे. जूनमध्ये पावसाने वेग घेतला होता, बहुतांश जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मात्र, जुलै सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुण्यात आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. गेल्या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. शनिवारीदेखील शहरात दिवसभरात पाऊस पडलाच नाही, मात्र, किमान २३ आणि कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी उन्हाचे चटके बसत होते. संध्याकाळनंतर आकाशात ढग दाटून आले, मात्र पावसाने दडी मारली. येत्या दोन दिवसांत शहरात काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनचा प्रवास सध्या स्थिर असून, पुढील तीन ते चार दिवसांत पाऊस सक्रिय होईल. साधारणतः १२ जुलैनंतर राज्यात पाऊस वाढेल, अशी माहिती हवामान विभागाच्या संचालक सुनीता देवी यांनी दिली. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शतकांपूर्वीची रेल्वे पडद्यावर ‘जिवंत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अगदी १२१ वर्षांपूर्वी देशात प्रथमच फिल्म दाखविण्यात आली. पडद्यावर हलते चित्र पाहणे हा लोकांसाठी एक चमत्कारच होता. त्यात पडद्यावर धावती रेल्वे पाहून लोक घाबरून पळत सुटले होते. मात्र, शनिवारी तीच रेल्वे पडद्यावरून धावली, पण लोक घाबरले नाहीत.
देशात पहिल्यांदा फिल्म दाखवली ती तारीख होती ७ जुलै १८९६. शुक्रवारी या घटनेला १२१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने शतकमहोत्सवी फिल्म दाखविण्याचा खास कार्यक्रम शनिवारी आयोजिला होता. इतिहास, फिल्म याविषयी कुतूहल व जिज्ञासा असलेल्या मंडळींनी ‘एनएफएआय’च्या थिएटरमध्ये गर्दी केली होती.
१२१ वर्षांपूर्वी सहा फिल्म दाखविण्यात आल्या आणि या माध्यमाची भारताला ओळख झाली. मुंबईतील व्हॅटसन हॉटेलात दाखविलेल्या लुमिअर्स ब्रदर्स यांच्या फिल्मने देशात चित्रपटाचे युग अवतरले. त्या फिल्म तसेच आणखी काही दुर्मिळ फिल्म दाखविण्यात आल्या. लुमिअर्स ब्रदर्स यांनी काढलेली फिल्म पहिल्यांदा पॅरिस येथे दाखविण्यात आली, ती तारीख होती २८ डिसेंबर १८९५. यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत व्हॅटसन हॉटेलमध्ये ही फिल्म दाखवली गेली. हा दिवस यानिमित्ताने पुन्हा जिवंत झाला आणि रसिकांना कलासंपन्नतेचा अनुभव मिळाला.
तिसरा दिल्ली दरबार १९११ साली कोरोनेशन पार्क दिल्ली येथे भरला होता. किंग जॉर्ज व क्वीन मेरी उपस्थित होते. या दरबारामध्ये कोलकाताऐवजी दिल्ली राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्ल्स अर्बन यांनी या सोहळ्याचे केलेले चित्रिकरण लंडन येथे १२ फेब्रुवारी १९१२ रोजी दाखविण्यात आले होते. ही फिल्मही या वेळी दाखविण्यात आली. अवघ्या अर्धा तासाच्या या कार्यक्रमातून रसिक भारावून बाहेर पडले. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी फिल्मची माहिती दिली.

१२१ वर्षांपूर्वीची फिल्म कशी असेल, हे कुतूहल होते. आपण या माध्यमाला आता सरावलो आहोत पण तेव्हाच्या लोकांसाठी पडद्यावर हलणारे चित्र ही नक्कीच क्रांतिकारी घटना असेल. लोक पळत सुटले होते यातच काळाचा बदल सामावला आहे. काळाचे भान फिल्म या माध्यमातून येते.
- रोहन डुबे, धीरज वट्टमवार, चित्रपट प्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची झाडाझडती सुरू

0
0

‘एनजीटी’च्या दट्ट्यानंतर नदीपात्रातील बांधकामांच्या पाहणीला वेग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीपात्रात बेकायदा उभारण्यात आलेले पत्राशेड तसेच बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पालिकेला दिल्यानंतर या भागातील बांधकामांची पाहणी करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या भागातील मिळकतींनी पालिकेकडून अनधिकृत नळजोड घेतले आहेत की नाही, याची पाहणी शनिवारी पाणीपुरवठा विभागाने केली. यामध्ये काही मिळकतदारांनी बेकायदा नळजोड घेतल्याचे समोर आल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई केली. पालिकेकडून अधिकृत नळजोड घेतल्याची कागदपत्रे असल्याचा दावा काही व्यावसायिकांनी केल्याने उद्या, सोमवारपर्यंत (१० जुलै) ही कागदपत्रे सादर करण्यास त्यांना सांगण्यात आले.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपीरोड दरम्यान असलेल्या नदीपात्रात असलेली मंगल कार्यालये, हॉटेल्स, लॉन्स मालकांनी बेकायदा बांधकामे उभारली असून काहींनी अनधिकृत पत्राशेड उभारल्याचे समोर आले होते. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने स्वयंसेवी संस्थांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ‘एनजीटी’ने नदीपात्रातील निळ्या पूररेषेत (ब्ल्यू लाइन) असलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करुन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांपासून या भागातील मिळकतींची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. शुक्रवारी पालिकेच्या बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता तसेच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
नदीपात्रालगत असलेली मंगल कार्यालये, कार्यक्रमासाठी भाड्याने दिली जाणारी लॉन्स, हॉटेल्स तसेच इतर मिळकतींनी पालिकेचा अधिकृत पाणीपुरवठा घेतला आहे का, याची पाहणी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी केली. एकूण २८ मिळकतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ मिळकतदारांकडे पाणीपुरवठा घेतल्याची कागदपत्रे आढळली. उर्वरित २० जणांकडे कागदपत्रे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. काही‌ मिळकतदारांनी कागदपत्रे असल्याचा दावा केल्याने सोमवारपर्यंत कागदपत्रे सादर करावीत, तरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

माजी महापौरांच्या मिळकती?
पालिकेची परवानगी न घेता नळजोड घेतल्याचे उघडकीस आल्याबद्दल पालिकेने शनिवारी डीपी रोडवरील ज्या मिळकतींवर कारवाई केली आहे, त्यातील चार मिळकती माजी महापौरांसह विद्यमान नगरसेवकाच्या असल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेमेचि होते रस्त्यावर कोंडी

0
0

भाजी, पथारी व्यावसायिकांमुळे वाहतुकीचे तीन-तेरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांत अत्यंत झपाट्याने विकसित झालेला भाग अशी ओळख असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
या रस्त्यावरील राजाराम पूल ते हिंगणे खुर्द दरम्यान असलेल्या रस्त्यांनजीकच्या पदपथावर भाजी विक्रेत्यांबरोबरच पथारी व्यावसायिक बसतात. भाजी खरेदीसाठी नागरिक रस्त्यावरच गाड्या उभ्या करत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते.
सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागात ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता असून, पर्यायी रस्ता नसल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. त्यातच राजाराम पूल ते हिंगणे खुर्द या दरम्यान अनेक पथारी व्यावसायिक, फळविक्रेते, भाजीविक्रेते पदपथावरच व्यवसाय करतात. भाजी घेण्यासाठी आलेले नागरिक रस्त्यावरच गाड्या पार्किंग करत खरेदी करत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. कामावरुन घरी जाणारे नागरिक बिनधास्तपणे आपल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावरच उभ्या करून भाजीपाला खरेदी करत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी येथे होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.
येथे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पालिकेने तातडीने अतिक्रमणे दूर करावीत, तसेच रस्त्यावर बसणाऱ्या पथारी व्यावसायिकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करुन खरेदी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अतिक्रमणे दूर करण्याची गरज आहे. संतोष हॉल चौकातही मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या त्रासाची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह पालिकेकडे करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

माहिती, फोटो पाठवा
शहरातील विविध रस्त्यांवर वाढणारी अतिक्रमणे आणि त्यामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे पुणेकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणारे पालिका प्रशासन तसेच पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग मात्र, वाहतून कोंडीकडे दुर्लक्ष करत असल्याने दोषींवर कारवाई केली जात नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे होत असलेल्या त्रासाची माहिती आणि फोटो नागरिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे
punemata1@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम ‘मटा’ निश्चित करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा तुरुंगात कैद्याचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ येरवडा

येरवडा मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने अपहरणाचा गुन्ह्याच्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी घडली. आठ दिवसांपूर्वी स्वयंपाकगृहात पाणी अंगावर पडल्याचा रागातून खून केल्याचे निष्पन्न झाले.

सुखदेव मेघराज मेहकारकर (वय ४३, रा. विळद, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी दिनेश सुरेश दबडे (वय ३२, रा. डोंगरी, जिजामाता, गोरेगांव पश्चिम, मुंबई) याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा तुरुंगातील कैद्यांना दैनंदिन लागणारा स्वयंपाक बनविण्यासाठी स्वयंपाकगृहात काही कैदी काम करतात. सुखदेव आणि दिनेश हे देखील तिथे काम करतात. आठ दिवसांपूर्वी काम करीत असताना दिनेशच्या अंगावर पाणी पडले होते. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे झाली होती. शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे सर्व कैदी खोलीतून बाहेर होते. स्वयंपाकगृहाचे काम झाल्यानंतर सुखदेव आपल्या सहकारी कैद्यांसाठी पत्र लिहीत बसला होता. त्यावेळी पाठीमागून येऊन दिनेशने सुखदेवच्या डोक्यात जोराने मोठा दगड घातला. डोक्यावर दगडाचा जोराचा प्रहार झाल्याने सुखदेव जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तुरुंगातील डॉक्टरांनी तपासणी केली असता सुखदेव मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पोलस उपायुक्त दीपक साकोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तुरुंगाताला भेट देऊन पंचनामा केला.

खून झालेला आरोपी नगरचा

खून झालेला आरोपी सुखदेव मेघराज महेकारकर (वय २४, विळद, ता. जि. अहमदनगर) याला एप्रिल २०१६ मध्ये साडेतीन वर्षांची शिक्षा देण्यात आली. त्याचा बंदी क्रमांक ३८०३९ होता. विळद येथील एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण व विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. खून केलेला आरोपी दिनेश दबडे (बंदी नं. १४८२२) याला एका खुनाच्या गुन्ह्यातच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो गेल्या आठ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगासाठी कोर्ट उतरले पायरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये,’ असे म्हणतात. कारण न्याय मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पण शनिवारी शिवाजीनगर कोर्टात घडले भलतेच. महालोकअदातीमध्ये एका अंपग ज्येष्ठ महिला पक्षकाराला न्याय देण्यासाठी कोर्ट दोन मजले खाली उतरून आले. कोर्टाने महिलेचे म्हणणे ऐकून घेत तिला न्याय दिला. कोर्टाची एक वेगळी बाजू देखील पक्षकाराला अनुभवायला मिळाली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी पुणे जिल्ह्यात महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका महिला पक्षकाराला हा सुखद अनुभव आला. हौसाबाई छबू पशाले (वय ६०, रा. आढळे खुर्द, ता. मावळ) असे न्याय मिळालेल्या पक्षकार महिलेचे नाव आहे. हौसाबाई ११ मार्च २०१५ रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी कारमधून कुटुंबीयांसोबत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीने त्या कारला धडक दिली. त्यामध्ये हौसाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. उपचारावर मोठा खर्च केला. तरीही त्यांना चालता येत नव्हते. नीट बसता येत नव्हते. त्यांनी नऊ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अॅड. तुषार पाचपुते यांच्यामार्फत जून २०१५ मध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.

रियालन्स इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, अपंगत्वामुळे हौसाबाई यांना कोर्टात हजर राहणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आली होती. शनिवारी हौसाबाई शिवाजीनगर कोर्टात आल्या. दुसऱ्या मजल्यावर त्यांना जाणे शक्य नसल्याने त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, हर्षदा वैद्य, प्राजक्ता कुलकर्णी दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरून आले. हौसाबाई यांचे म्हणणे जाणून घेतले. तडजोडीअंती त्यांना सहा लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. आर. अष्टुरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, विशेष न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवाणी, विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात, रिलायन्स कंपनीचे वकील अॅड. हृषीकेश गानू उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी जून महिन्यात मुंबई येथून पुणे येथे आले होते, असे अॅड. गानू यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पाला नागरिकांकडून टाळे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औंध

लहान मुलांना कचरा प्रकल्पातील घाण वासामुळे उलट्यांचा त्रास झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी बाणेर येथील कचरा प्रकल्प टाळे ठोकून बंद केला. ओल्या कचऱ्यापासून स्लरी करण्याच्या हा प्रकल्प बाणेर येथील सूसरोडवर आहे. या प्रकल्पाचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. या ठिकाणी सुमारे साठ टनाहून अधिक ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.

या प्रकल्पातील कचऱ्याची दुर्गंधी परिसरात दूरवर पसरते. यामुळे सूसरोड परिसरातील हजारो नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकल्प बंद करण्यासाठी पालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहे. आमदार मेधा कुलकर्णी व स्थानिक नगरसेवक यांनी देखील प्रकल्प बंद करण्याबाबत नागरिकांना आश्वासन दिले होते. परंतु, याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. रहिवासी परिसरात असा प्रकल्प सुरू असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु शहरातील ओल्या कचऱ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रशासन हा प्रकल्प बंद करण्याच्या विचारात नाही.

प्रशासन व नागरिक यांच्यात वारंवार संघर्ष निर्माण होत असून हा प्रकल्प बंद करण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत. काही दिवसांपासून कचरा प्रकल्पातून सातत्याने दुर्गंधी व वास येत असल्याने नागरिकांनी कचरा गाड्या जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा टाकून रस्ता बंद केला. तसेच प्रकल्पाच्या गेटला टाळे ठोकले. या वेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर यांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या मागण्या योग्य आहेत, कचरा प्रकल्पाला पर्याय निर्माण करण्यासाठी वारंवार पाठपुरवा केला जात असल्याचे सांगितले. विनय देशपांडे म्हणाले, ‘हा कचरा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यामुळे या परिसरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला टाळे ठोकले आहे. पालिकेने याबाबत विचार करून हा प्रकल्प तातडीने हलवला पाहिजे.’ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन कचरा प्रकल्प बंद केल्याने पालिका प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. यामुळे परिसरातील हॉटेलांमधील सुमारे ६५ टन कचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा विचार प्रशासन करत असताना नागरिकांचा विरोधत वाढत आहे. यामुळे पूर्व पुण्यात फुरसुंगी उरळी देवाची येथील कचरा डेपोप्रमाणे या परिसरातील नागरिकांच्याही संघर्षाचा सामना पालिकेला करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवार राष्ट्रवादीला तारणार?

0
0

मेळाव्याद्वारे नगरसेवक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
Tweet - @AthavaleRohitMT
पिंपरी : महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करायला लागल्याने अजित पवार नाराज झाले होते. त्यांनी शहरातील राजकारणातून लक्षच काढून घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी अजित पवार यांनी शहरात नुकताच मेळावा घेतला. या वेळी राष्ट्रवादीत उरलेल्या सर्व नेत्यांनी आणि निवडून आलेल्या नगरसेवकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या मेळाव्याला नागरिकांची गर्दी पाहून अजित पवार यांचा शहरातील दबदबा कायम असल्याचे समोर आले आहे. परंतू अजित पवारांच्या मेळाव्याला झालेली गर्दी आणि त्यांचा दिसून आलेला दबदबा पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसला तारू शकेल असा सवाल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच शिलेदार भाजपमध्ये गेल्यावर उरलेल्यांची ताकदीवर पक्षाने ३३ जागा जिंकल्या. अजित पवारांच्या मेळाव्याला ‘राष्ट्रवादी’च्या तिकिटावर निवडून आलेल्या ३३ जणांची हजेरी देखील कौतुकाचा विषय ठरली. मात्र, या ३३ जणांना सक्षम विरोधीपक्षाची भूमिका प्रभावी मांडता आलेली नाही. त्यामुळे शहरात विरोधीपक्ष आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती
भाजपच्या काही प्रकल्प आणि उपक्रमांना या ३३ जणांनी विरोध दर्शविला देखील. मात्र, हा विरोध तोकडा पडत असल्याचे काही आंदोलन आणि आरोपांवरून स्पष्ट दिसत होते. त्यामुळे चार महिन्यांनी अखेर अजित पवार शहरात आले. त्यांनी मेळावा घेऊन पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पराभव विसरा आणि घराबाहेर पडा. लोकांची काम करा, असे पवार यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले. आपण केलेली काम लोकांपर्यंत न पोहचल्याने विरोध झाल्याचे दिसत असल्याचेही पवार यांनी उपस्थितांना सांगितले.
पक्ष संघटना मजबूत नसल्यानेच पराभवाला सामोरे जावे लागले असून, पक्षसंघटनेतील रिक्त जाता तातडीने भरा, असे फर्मानही त्यांनी सोडले. येत्या काळात ‘राष्ट्रवादी’मधील रिक्त पदांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाईल. पण तिकीट नाकारले म्हणून भाजपमध्ये गेले आणि पराभूत झाले असेही अनेकजण आहेत. त्यामुळे त्यांना आता ‘घरवापसी’चे वेध लागले आहेत. परंतु, एकदा गेलेल्यांना परत घेऊन पदांची खिरापत यापुढे तरी वाटली जाऊ नये, असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षसंघटना बांधताना पदाधिकाऱ्यांना या बाबींचा विचार देखील करावा लागणार आहे. तसेच ही पद भरल्यावर कितपत फरक पडेल याची चाचपणी देखील उरलेल्या शिलेदारांना करावी लागणार आहे.
अजित पवार शहरात आले की कार्यकर्ते त्यांच्या भोवती फिरू लागतात. शहरात तसेच राज्यात पराभव झाल्यानंतरही राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा महिमा कायम असल्याचे मेळाव्यावरून जाणवले. पण नेत्यांच्या नातेवाइकांचे हे कोंडाळे पुढील निवडणूकीत सत्तांतर करण्यात हातभार लावू शकेल का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तारण्यासाठी आणि भाजपला सक्षम विरोधीपक्ष असल्याचे दाखविण्यासाठी जर अजित पवारांनाच वारंवार शहरात यावे लागले तर उरलेल्या नेत्यांवरच आसूड उगारण्याची वेळ तर आली नाही, हे देखील राष्ट्रवादीच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी पाहण्याची आवश्यकता आहे.
------------
‘रिक्त पदांवर हवी तातडीने नियुक्ती’

पक्ष संघटना मजबूत नसल्यानेच पराभवाला सामोरे जावे लागले असून, पक्षसंघटनेतील रिक्त जाता तातडीने भरा, असे फर्मानही त्यांनी सोडले. येत्या काळात ‘राष्ट्रवादी’मधील रिक्त पदांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाईल. पण तिकीट नाकारले म्हणून भाजपमध्ये गेले आणि पराभूत झाले असेही अनेकजण आहेत. त्यामुळे त्यांना आता ‘घरवापसी’चे वेध लागले आहेत. परंतु, एकदा गेलेल्यांना परत घेऊन पदांची खिरापत यापुढे तरी वाटली जाऊ नये, असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती प्रक्रियाही ऑनलाइन

0
0

दहावी, बारावीसाठी महापालिकेचा निर्णय; आधार लिंक असणारे अकाउंट नोंदविणे गरजेचे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाइन भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पालकांनी हा फॉर्म ऑनलाईन भरून त्याची प्रिंट महापालिकेला द्यायची आहे. हा फॉर्म भरताना आधार क्रमांक ‘लिंक’ असलेले बँक अकाऊंट नंबर देण्यात यावे, अशी प्रशासनाची मागणी आहे. विद्यार्थ्यांना वेळेत अर्थसाह्य मिळावे, यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
‘महापालिका प्रशासनाने या वर्षी हा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी-पालकांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे. हा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक ‘लिंक’ असलेले बँक अकाउंट नंबरचा उल्लेख अर्ज भरताना करावयाचा आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना बँक अकाउंटची माहिती चुकणार नाही,’ असे नागरवस्ती विकास योजना विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेतर्गंत इयत्ता बारावीच्या परीक्षेत खुल्या गटात ८० टक्क्यांहून अधिक गुणांनी, तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थी, रात्र प्रशालेचे विद्यार्थी, ४० टक्के अपंग असणारे, मागासवर्गीय गटात ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. तसेच, मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेतर्गंत वरीलप्रमाणे उत्तीर्ण असणाऱ्या दहावातील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.
सध्याच्या प्रचलित पद्धतीनसार शिष्यवृत्तीचा फॉर्म क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत होता. अनेकदा तो फॉर्म स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात मिळतो. हा फॉर्म भरणे, त्याच्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्यात येतो. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील अर्जाचे गठ्ठे नागरवस्ती विकास योजना विभागाच्या कार्यालयात येतात. प्रत्येक अर्जांची माहिती कम्प्युटरमध्ये नोंदविण्यात येते आणि त्यानंतर प्रत्येक अर्जाची पडताळणी केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बँक अकाउंटची माहिती, ‘आरटीजीएस’साठी आवश्यक माहितीची पडताळणीनंतर त्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होते. ही सर्व प्रक्रिया पार पडण्यास वर्षाचा कालावधी लागत असल्याची दिसते आहे. त्यामुळे हा कालवधी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते.
महापालिकेच्या दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती १५ सप्टेंबरपूर्वी देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शिष्यवृत्तीचे वाटप करण्यास वर्षभराचा कालावधी लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिला बालकल्याण समितीत हा विषय बैठकीत मांडण्यात आला होता. या शिष्यवृत्ती वाटपामध्ये होणारी दिरंगाई पाहून आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. या पार्श्वभूमीवर अर्थसाह्य वाटपाची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
..........................
शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक अकाउंट देणे बंधनकारक आहे.

- संजय रांजणे, प्रमुख नागरवस्ती योजना विभाग
..
अशा आहेत शिष्यवृत्या

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजना
० इयत्ता बारावीच्या परीक्षेत खुल्या गटात ८० टक्क्यांहून अधिक गुणांनी, तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थी, रात्र प्रशालेचे विद्यार्थी, ४० टक्के अपंग असणारे, मागासवर्गीय गटात ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
० मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना
या योजनेतर्गंतही वरीलप्रमाणे उत्तीर्ण असणाऱ्या दहावातील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येते.
....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशामक दलाच्या मिळणार जवानांना दर वर्षी गणवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गेल्या पाच वर्षांत केवळ दोनदाच गणवेश मिळणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांनाही यंदापासून नियमित गणवेश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांप्रमाणेच अग्निशामक दलातील सर्व कर्मचाऱ्यांना ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अंतर्गत (डीबीटी) कार्ड दिली जाणार असून, त्यांना पालिकेने निश्चित केलेल्या दुकानांतून गणवेश घेता येणार आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांसाठी डीबीटी कार्डसंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या मंगळवारी (११ जुलै) बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये, अंतिम निर्णय झाल्यास गणवेशासाठी जवानांना करावी लागणारी प्रतीक्षा संपणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेने केवळ दोनदाच जवानांना पूर्ण गणवेश दिला असून, इतर वर्षी ही सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या संथ कारभारामुळे वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांना दर वर्षी तीन पँट, दोन शर्ट, एक कोट, टोपी, बूट, मोजे असे गणवेशाचे साहित्य पालिककेडून पुरवले जाते. महापालिकेच्या भांडार विभागाकडून ही खरेदी दिली जाते. या खरेदीदरम्यान दर वर्षी गोंधळ होत असल्याने गेल्या वर्षी जवानांना गणवेशच मिळाले नव्हते. अनेक आपत्कालीन स्थितीत प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या जवानांच्या गणवेशाबाबत हलगर्जीपणा होत असल्याने आता थेट ‘डीबीटी कार्ड’द्वारेच सर्व प्रक्रिया राबविण्याची चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. त्याचा दुहेरी फायदा अपेक्षित असून, जवानांना वेळेत गणवेश उपलब्ध होणार असून, पालिकेचे ठेकेदारावर जाणारे पैसे वाचण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड सिटी परिसरासाठी नवा पिनकोड

0
0

नवीन पोस्ट ऑफिस सुरू

म. टा.प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रोडवरील शहरी वस्तीचे थेट नांदेड गावापर्यंत विस्तारीकरण झाल्याने आता नांदेड सिटी जवळील भागाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने या भागाला एक नवा पिनकोड दिला असून धायरी फाट्याच्या पुढील भाग आता पुणे ६८ नावाने ओळखला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच नांदेड सिटी परिसरातील वस्ती आणि वाढते औद्योगिक क्षेत्र लक्षात घेऊन टपाल खात्याने या परिसराला नवा पिनकोड देण्याचे ठरवले. नुकतेच या परिसरात पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले तेंव्हापासून नांदेड सिटी आणि त्या पुढील भागाची ओळख ‘पुणे ६८’ अशी झाली आहे.

उपनगरांचा झपाट्याने विस्तार होत असल्याने गेल्या काही वर्षात टपाल खात्याचाही विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. नांदेड सिटीचा परिसर यापूर्वी ४११०४१ या पिनकोड अंतर्गत येत होता. त्यामध्ये वडगाव, धायरी, तुकाईनगर, लगडमाळा असे परिसर येत होते आता या सर्व परिसरांमध्ये नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे पत्रांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वडगाव पोस्ट ऑफिसवर अतिरिक्त भार पडत होता. पोस्टमनची संख्याही तुरळक असल्याने नांदेड सिटीच्या पुढे पत्र लवकर पोहोचत नव्हती. त्यासाठी म्हणून टपाल खात्याने नांदेड सिटी परिसराला एक वेगळी ओळख देऊन धायरी फाट्याचा पुढचा परिसर ‘पुणे ६८’ या क्रमांकाखाली आणला आहे.

गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये टपाल खात्याने पुणे शहरात अनेक नवे पिनकोड दिले आहेत. औंध, बाणेर,पाषाण, बालेवाडी या परिसराचाही विकास झाला असल्याने या भागातही नवे पिनकोड देण्यात आले आहेत. शहराचा विस्तार होत जाईल तशी पत्रांची संख्या वाढत जाईल त्या दृष्टिकोनातून पिनकोड देणे हे टपाल खात्याच्या कार्यपद्धतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरते, त्यामुळे यापुढेही जशी उपनगरे वाढत जातील तशी पुणेकरांना नवी ओळख मिळत राहणार आहे.

-------------------------------
पिनकोडचा तसा लोकवस्तीशी थेट संबंध नसतो. पण लोकवस्तीतून पत्रव्यवहार वाढला की त्याची नव्याने व्यवस्था करावी लागते. नांदेड सिटी परिसरात गेल्या वर्षात पत्रव्यवहार खूप वाढला होता. त्याचा भार वडगावच्या कार्यालयावर पडत होता. याच कारणाने नांदेड सिटी येथे ‘४११०६८’ हा नवीन पिनकोड सुरू करण्यात आला असून नवे पोस्ट ऑफिसही सुरू करण्यात आले आहे.

- गणेश सावळेश्वरकर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल, पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द

0
0

सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे आयुक्तांचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने प्रशासकीय कारणाने केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास पालिकेतील सत्ताधारी पक्षाने सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने केलेल्या आरोग्य निरिक्षकांच्या आणि सहाय्यक आरोग्य निरिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या दबावामुळे या बदल्या रद्द करण्याचा निर्णय पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे.
वर्षानुवर्षे एकाच प्रभागात काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील आरोग्य निरीक्षक आणि सहायक निरिक्षक असलेल्या ११० जणांच्या अतंर्गत बदल्या करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी प्रशासनाने काढले होते. संबधित कर्मचाऱ्यांबरोबर चार तास चर्चा करून त्यांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र, काही राजकीय लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी या बदल्या रद्द कराव्यात यासाठी थेट सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे फिल्डिंग लावली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून बदल्या रद्द करून तीन महिने पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. बदली करण्यात आलेल्या काही निरीक्षकांवर गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी असतानाही पालिकेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागा अंतर्गत शहरातील प्रभागांमधील कचऱ्याचे नियोजन करणे वर्गीकरण, कर्मचाऱ्यांवर देखरेख, क्रॉनिक स्पॉट कमी करणे तसेच प्लास्टिकमुक्तीची कारवाई करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर असते. त्यांना संबधितांना दंड आकारण्याचेही अधिकार आहेत. पालिकेकडे सुमारे १२८ आरोग्य निरिक्षक आणि सहायक आरोग्य निरीक्षक आहेत. त्यापैकी ७० ते ८० निरीक्षक तीन वर्षांहून अधिक काळ काही ठराविक क्षेत्रीय कार्यालयांकडे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे त्या परिसरात हितसंबध निर्माण झाल्याने महापालिकेकडून वर्गीकरण, प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी करण्यात येणारी कारवाई, क्रॉनिकस्पॉट कमी करणे अशा प्रकारचे कामकाज परिणामकारक होत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवून सेवाज्येष्ठतेनुसार, त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेले क्षेत्रीय कार्यालय देण्यात आले. मात्र, त्यामुळे ज्या निरीक्षकांचे प्रभागात हितसंबध निर्माण झाले होते, असे कर्मचारी नाराज झाले.

प्रशासनाने केलेल्या बदल्या रद्द कराव्यात यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्याची भेट घेतली. प्रशासनाची कोणतीही बाजू समजून न घेता बदल्या रद्दच करा, असा हट्ट या पदाधिकाऱ्यांनी धरल्याने आयुक्त कुमार यांनी आपल्या अधिकारात या बदल्या तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

शिपायाची बदलीही विचारून करावी लागणार

प्रशासकीय बदल्यांवरुन ज्या पद्धतीने दबाव येत आहे, याचा विचार करता यापुढील काळात शिपायाची बदलीही पदाधिकाऱ्यांना विचारून करावी लागणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासकीय नियमानुसार कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. पण आता प्रत्येक बदलीमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने काम करणे अवघड होत असल्याची कबुली या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवान्याच्या प्रतीक्षेत रिक्षाचालक

0
0

अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावरही वेबसाइट बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा परवान्यासाठीची अर्ज प्रक्रिया राबविण्यासाठी आता परिवहन आयुक्तालाकडून राज्यासाठी एक स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आली आहे. येत्या मंगळवारपासून ही वेबसाइट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांनंतरही वेबसाइटच्या प्रतीक्षेत असलेल्या रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरण आाणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मागेल त्याला खुल्या पद्धतीने रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीओमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अचानक वाढलेली गर्दीचा ताण व रिक्षा चालकांची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज प्रक्रियेसाठी rtopune.in ही वेबसाइट विकसित करण्यात येईल, असे आरटीओ प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर आरटीओमध्ये अर्ज देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. तसेच, कोणाचाही लेखी आदेश स्वीकारला जाणार नाही, असे सांगण्यात आले. या निर्णयाला आता दहा दिवस होऊन गेले आहेत.

या ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत अर्जदाराने वेबसाइटवर दिलेला अर्ज, लायसन्स, बॅज, नामनिर्देशन प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, रहिवासी दाखला, शैक्षणिक पात्रता दाखला, फोटो आदी बाबी ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या वेळेत अर्जाची प्रत व मूळ कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित रहावे, अशा सूचनाही आरटीओने केल्या होत्या. मात्र, वेबसाइटच अस्तित्वात न आल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजी आहे.

आरटीओच्या कारभारामुळे परवाना मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परवाना अर्ज भरण्यासाठीची वेबसाइट तातडीने सुरू करावी, अर्जदारांची चारित्र पडताळणी सुलभ पद्धतीने व्हावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आरटीओ अधिकारी व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी पत्राद्वारे केली आहे.
.........
चारित्र्य पडताळणी प्रक्रिया किचकट
रिक्षा परवान्यासाठी प्रत्येक उमेदवाराला चारित्र्य पडताळणी करण्याचे बंधन आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या pes.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. मात्र, ऑनालाइन चारित्र्य पडताळणी करण्यासाठीची पद्धत किचकट आहे. या वेबसाइटवर अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्रांचे स्कॅनिंग अपलोड होत नाही. त्यामुळे चारित्र्य पडताळणीच्या अर्ज प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी बापू भावे यांनी केली.
.......
मंगळवारपर्यंत वेबसाइट सुरू
‘नवीन रिक्षा परवान्यासाठीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी वेबसाइट करण्यात येणार होती. त्या वेबसाइटचे कामही पूर्ण झाले होते. मात्र, परिवहन आयुक्तालयाने राज्यासाठी एकच वेबसाइट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ‘एनआयसी’कडून संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात येत आहे. येत्या मंगळवारपर्यंत ही वेबसाइट नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. शनिवारी व रविवारी या वेबसाइटची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर ती सेवेत दाखल होईल,’ अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवइंधनाबाबत हवी सर्वसमावेशक भूमिका

0
0

जैवइंधनाबाबत सरकारची भूमिका कशी आहे ?
- पर्यावरणपूरक इंधन निर्मितीला सरकार प्रोत्साहन देते. मात्र, सरकारने जैवइंधनाबाबत अद्यापही धोरण निश्चित केलेले नाही. सरकारने बायोडिझेल निर्मितीसाठी वापरलेल्या खाद्यतेलाच्या वापरास प्रोत्साहन देणारे कायदे करून पूरक यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तरच आपल्या स्वच्छ, हरित व अपारंपरिक इंधननिर्मितीचे स्वप्न साकार होऊ शकेल. सरकारने या क्षेत्राकडे महसूलाचे साधन म्हणून न पाहता सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे.
...
खाद्यतेलाच्या पुनर्वापराने काय धोके संभवतात ?
- भारतात दर वर्षी २२ दशलक्ष टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यातून तीन ते चार दशलक्ष टन वापरलेले खाद्य तेल (युज्ड कुकिंग ऑइल) तयार होते. मात्र, अनेक व्यावसायिक या तेलाची काळ्या बाजारात विक्री करतात. व हे तेल खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यातून कॅन्सर, हृदयरोगासह विविध रोगांना आमंत्रण मिळते. वापरलेल्या खाद्य तेलाच्या पुनर्वापराने निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे
...
खाद्यतेलाचा बायोडिझेलसाठी वापर झाल्यास काय फायदे होतील ?

- वापरलेले खाद्यतेल बायोडिझेल निर्मितीसाठी उपलब्ध झाल्यास देशभरात सुमारे चार दशलक्ष टन बायोडिझेल निर्मितीची क्षमता निर्माण होईल. त्यामध्ये ३६ हजार व्यक्तींना थेट रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तर हे वापरलेले खाद्यतेल संकलनाच्या प्रक्रियेत दहा लाख व्यक्तींना रोजगार मिळू शकतो. प्रत्येक हॉटेल, स्टॉलपर्यंत जाऊन हे तेल संकलित करावे लागणार असल्याने त्याद्वारे मोठी रोजगारनिर्मिती होईल.
..
जैवइंधनावर १८ टक्के जीएसटी लावल्याने काय परिणाम होतील ?
- नव्याने लागू झालेल्या वस्तू व सेवाकराअंतर्गत जैवइंधनावर अठरा टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका या क्षेत्राला बसणार आहे. त्यामुळे हा व्यवसायच ठप्प होऊ शकतो. तेल कंपन्यांना बायोडिझेल खरेदीवर इनपूट क्रेडिट मिळणार नसेल, तर त्या बायोडिझेल खरेदी करणार नाहीत. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मजात हृदयदोषाची पालकांना चिंता

0
0

धावपळीच्या जगात स्मोकिंग, ड्रिंकिंगसारख्या सवयी लागणे फारसे नवल वाटण्यासारखे नाही. परंतु, याच सवयी पुढे जाऊन घातक ठरत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. त्याचे दुष्परिणामही अनेकांना भोगावे लागत असल्याचे दिसून आले आहे. हृदयविकार बळावणे हादेखील त्याच्याच दुष्परिणामाचा एक भाग मानला जातो. परंतु, लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयदोषाचा आजाराचे निदान होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जन्मजात हृदयदोषाची कारणे

जन्मजात हृदयदोष आढळण्याची निश्चित अशी कारणे सांगता येत नाही. मधुमेह, गर्भावस्थेमध्ये निदान होणारा मधुमेह, त्या शिवाय मद्यसेवन केले, तर जन्माला येणाऱ्या बालकामध्ये जन्मजात हृदयदोष दिसून येतो. गर्भावस्थेत रुबेला नावाचा आजार झाल्यानंतरही जन्मजात हृदयदोषाचा आजार होतो. आईच्या पोटात बाळाचे हृदय विकसित होताना त्यात काही वेळा दोष राहून जातात. मुस्लिम वर्गात नात्यात लग्न होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या बालकांमध्ये जन्मजात हृदयदोष होण्याचे प्रमाण अधिक असते. अनुवंशिकतेने हा आजार होत असला, तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे, असे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप सांगतात.

हृदयदोष काय आहे?

जन्मजात हृदयदोषाचे दोन प्रकार आहेत. जन्मानंतर बाळाची प्रकृती गंभीर होते. त्याला ‘ब्लू बेबी’ असे म्हणतात. शुद्ध आणि अशुद्ध रक्त जेथे मिसळते आणि उपचारांशिवाय बाळ जगत नाही, अशा बाळांना ‘ब्लू बेबी’ म्हणतात. ‘ट्रान्पोझिशन ऑफ ग्रेट आर्टरी’ म्हणजेच शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या उलट्यासुलट्या असतात. ‘ट्रंकस आर्टेरिओअस डिसिज’मध्ये फुफ्फुसाकडे जाणारी रक्तवाहिनी तयार झालेली नसते. यामुळे शुद्ध अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळतात.

‘टीएपीव्हीसी’ अर्थात ‘टोटल अॅनॉमॉलस पल्मनरी व्हेनस कनेक्शन’ यामध्ये फुफ्फुसाकडून येणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवाहिन्याना अप्रत्यक्ष जोडल्या जातात. त्यामुळे रक्त मिसळते. त्याशिवाय, ‘टेट्रॉलॉजी ऑफ फॅलोट’ या प्रकारात फुफ्फुसाकडे जाणारी रक्तवाहिनी तयार नसते. त्यामुळे सगळे अशुद्ध रक्त हृदयातील छिद्रामुळे शुद्ध रक्तात मिसळते. ‘ट्रायकस्टिड अॅट्रेझिया’ या आजारात हृदयाची एक झडप तयार नसते. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त हृदयाच्या छिद्रामध्ये जाऊन मिश्रित होते. या पाच प्रकारांना

‘फाइव्ही टी’ असे म्हटले जाते. हृदयाच्या भागात चार कप्पे, झडपे नसणे, एक झडप छोटा असणे, हृदयात छिद्र असणे, रक्तवाहिनी, झडपा तयार न होणे यासारखे आजार असतात. या आजारांना तातडीचे उपचार लागतात, असे डॉ. जगताप यांनी सांगितले.

मुख्य रक्तवाहिनी ‘कोआक्टेशन ऑफ एओर्टा’मध्ये ‘एओर्टा’ नावाची मोठी रोहिणी ही रुंद असते. ही हृदयापासून निघते आणि ती शरीरात कोठेही रुंद असते. त्यामुळे रक्त पुढे जाण्यास अडथळा तयार होतो. परिणामी हृदयावर ताण येऊन ‘हार्ट फेल्युअर’ होते. त्यामुळे हृदयदोष तयार होतो.

हृदयात छिद्र असणे

बाळ जन्मल्यानंतर अनेक बालकांमध्ये हा दोष दिसून येतो. त्या वेळी तातडीने उपचार सुरू करावे लागतात. बाळाला दम लागणे, श्वास घेण्यास अडचण येणे, रक्तात ऑक्सिजन कमी असते. ‘स्टेटोस्थोप’ने तपासल्यास वेगळे ‘हार्ट साउंड’ ऐकू येतो. ‘इको कार्डिओग्राफी’ने (टू डी इको) छिद्राचे निदान केले जाते. त्याबाबत बालरोग हृदयरोग, हृदय शल्यविशारदांना दाखवून उपचार घेणे योग्य असते, असा सल्लाही ते देतात. अशा आजारातील ऑपरेशन अनेकदा गुंतागुंतीचे ठरते. अशा प्रकारचे ऑपरेशन यशस्वी होण्याचे प्रमाण चांगले आहे. पेशंट वेळेत हॉस्पिटलमध्ये आला, तर तो जगू शकतो. पण, गंभीर प्रकृती असल्यास त्याचा मृत्यूदरही तेवढाच अधिक आहे. ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ असेल, तर पेशंटच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक पेशीपर्यंत १०० टक्के रक्त, ऑक्सिजन पुरविणे गरजेचे असते. पण, रोहिणी वाहिन्या किंवा रक्तवाहिन्यांमधील काही दोष असल्याने रक्तपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम हार्ट, किडनी, फुफ्फुस, यकृतासारख्या अवयवांवर होतो.

जन्मजात हृदयदोषावर उपचार

काही बाळांवर तातडीने ऑपरेशन करावे लागते. त्याद्वारे दोष दूर केले जातात. नसा व्यवस्थित केल्या जातात. एखादी नस रुंद असेल, तर मोठी करून हृदयातील छिद्र बंद केले जाते. छिद्र बंद करण्यासाठी स्टेंट लाइफ सेव्हिंग म्हणून बसविले जाते. करेक्टिव्ह सर्जरी करताना गुंतागुंत असल्यास स्टेटिंग केले जाते. त्यानंतर बाळाची प्रकृती सुधारते. जन्मजात हृदयदोषाचा आजार बरे करणे आता आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

जन्मजात बालकांमध्ये दोष आढळत आहेत. निदान होत असल्याने प्रमाण वाढत आहे. या आजारावर उपचार होऊ शकतात. मुलांच्या आजाराबाबत पालकांनी काळजी घ्यावी.

डॉ. रणजित जगताप, हृदयरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images