Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचरा डेपोविरोधात शिवसेना रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

‘रद्द करा, रद्द करा... रामटेकडी कचरा डेपो रद्द करा,’ ‘या सरकारचं करायच काय.. खाली डोके वर पाय,’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचे छायाचित्र असणाऱ्या फलकावर कचरा टाकून, कचऱ्याचा अभिषेक करून नियोजित रामटेकडी कचरा डेपोच्या विरोधात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
रामटेकडी चौकात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल हरपळे, नगरसेविका संगिता ठोसर, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, विक्रम लोणकर, दिलीप कवडे, राम खोमणे, भरत चौधरी, गंगाधर बधे, सतीश कसबे, जानमहंमद शेख यांच्या शिवसैनिक सहभागी झाले होते.
‘रामटेकडीला दोन कचरा डेपो आहेत, त्यातच तिसरा कचरा डेपोची निर्मिती करून करून हडपसरला कचरानगरीचे स्वरूप द्यायचे आहे. भूमिपूजनादिवशी मुख्यमंत्र्यांची गाडी जाऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यात आडवे होऊ, जीव गेला तरी चालेल नागरिकांच्या आरोग्यासाठी कचरा डेपो होऊ देणार नाही,’ असा इशारा माजी आमदार महादेव बाबर यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोरक्षणावरील दंगे राजकारणाचा भाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गोरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू असलेले दंगे आणि हत्या, हा भारतीय जनता पक्षाच्या नव्या राजकारणाचाच भाग आहे,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी केला. केंद्र सरकारने लागू केलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) यशस्वी होणार नाही, असे भाकित त्यांनी वर्तविले.

सिंह यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर कडाडून टीका केली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, आबा बागुल, अविनाश बागवे, अजित दरेकर उपस्थित होते. भाजपने आपल्या राजकारणात बदल केला असून, ते आता लव्ह जिहाद, बीफ अशा विषयांवरून दंगे घडवत आहेत. गो-हत्या बंदीचे कायदे अनेक राज्यांमध्ये १९५० पासून आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही गो-हत्या बंदी शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचे म्हटले होते. मोदी यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के गो-रक्षक हे समाजकंटक आहेत. मात्र, जे पकडले गेले ते बहुतांश विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते आहेत. देशात जाणीवपूर्वक मुस्लिम हत्या घडत आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या ५६ इंच छातीमधील काळीज हे अत्यंत छोटे आहे, अशी टीका सिंह यांनी केली.
मोदी यांनी बाहेर काढलेले धर्मांध राजकारणाचे भूत पुन्हा बाटलीत भरणे सोपे नाही. ज्या लोकांनी तुम्हाला पंतप्रधान बनवले आहे, ते विद्वेष आणि हिंसेचे पुरस्कर्ते आहेत. तुम्हाला त्यांच्याशीच लढावे लागेल, असा इशाराही सिंह यांनी दिला.

अर्थव्यवस्थेला ‘जीएसटी’चा झटका

‘सिंगल टॅक्स-सिंगल स्लॅब’ आणि ‘सिंपल कम्प्लायन्स’ ही योजना असलेल्या देशांतच ‘जीएसटी’ यशस्वी होऊ शकला आहे. ‘मल्टी स्लॅब-‘जीएसटी’ कोठेही यशस्वी झालेला नाही. आपल्याकडे सहा प्रकराची कररचना करण्यात आली आहे. व्यावसायिकांना आता ३७ वेळा विवरणपत्रे भरावी लागणार आहेत. नोटाबंदीच्या धक्क्यातून सावरत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘जीएसटी’चा झटका बसणार आहे,अशी टीका सिंह यांनी केली.

नितीश यांचा विवेक

राष्ट्रपती निवडणुकीसाठी ‘महागठबंधन’ झाले पाहिजे,अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांना भेटून केली होती. मात्र, त्यांचा आपला एक ‘विवेक’ आहे. उमेदवाराच्या निवडीची बैठक होण्यापूर्वीच त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला, अशी प्रतिक्रिया सिंह यांनी व्यक्त केली.

विदेश में प्यार की झप्पी

परदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटून ‘प्यार की झप्पी’ देणे, हेच आपले परराष्ट्र धोरण बनले आहे. चीनचे प्रमुख अहमदाबाद येथे आले, तेथे त्यांनी ढोकळा खाल्ला तसेच झोक्यावरही झोके घेतले, त्याचवेळस चिनी सैन्य आपल्या ​सीमांमध्ये घुसत होते. नेपाळबाबतही तसेच झाले. नेपाळच्या पंतप्रधानांबरोबर ‘प्यार की झप्पी’ घेतली गेली आणि त्यानंतर आपले संबंध बिघडले. अनेक देशांमध्ये पंतप्रधान भेटीसाठी गेले आणि आपले संबंध बिघडल्याची उदाहरणे आहेत, असेही सिंह म्हणाले.

कलमाडींची लवकरच घरवापसी

माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या काँग्रेसप्रवेशाविषयी ​सिंह यांना छेडले असता ते म्हणाले, कलमाडी यांच्यावरील खटला अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र अस्तित्वासाठी काँग्रेसचे गट सक्रिय

$
0
0

नेत्यांमधील अंतर्गत दुफळी आली चव्हाट्यावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेत केवळ दहा नगरसेवक निवडून येण्याची नामुष्की ओढावलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे आता चव्हाट्यावर आले आहेत. शहर काँग्रेसमध्ये चार गट कार्यरत असून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून शहरातील विविध प्रश्नांवर स्वतंत्ररित्या आंदोलन करण्यात येत आहे. या माध्यमातून आपापले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
पक्षातील बंडखोरी थांबविण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे अपयशी ठरले आहेत. पालिका हद्दीलगतच्या गावांचा समावेश न करण्यासाठीचे झालेले आंदोलन, राजीव गांधी यांच्यावर नववीच्या इतिहासाच्या पुस्तकाततील आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी शिक्षण आयुक्तांची घेतलेली भेट आदींमुळे काँग्रेसमधील एका गटाने बागवे यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. बागवे यांनीही या नेत्यांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची तयारी ठेवल्याचे सांगण्यात येते.
एकेकाळी पक्षाकडे शहरातील खासदारकी, आमदारकी, पालिकेतील सत्ता होती. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे केवळ दहा नगरसेवक निवडून आले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असणार की राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर दावा सांगणार, हे अद्याप स्पष्ट नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांमधील हेव्यादाव्याचे राजकारण आता रस्त्यावर आले आहे.
हद्दीलगतच्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पालिकेला साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे ही गावे पालिकेत घेण्याऐवजी स्वतंत्र महापालिका करणेच हिताचे ठरेल, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. त्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी नगरसेवक अभय छाजेड, संजय बालगुडे, श्रीकांत शिरोळे यांच्यासह काका धर्मावत, नरेंद्र व्यवहारे आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनापासून लांबच राहणे बागवे यांनी पसंत केले. बालभारतीच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात राजीव गांधी यांच्याबाबात आक्षेपार्ह मजकूर छापल्याची तक्रार काँग्रेसने शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. या वेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळात बागवे यांचा समावेश नव्हता. बागवे यांनी स्वतंत्ररित्या प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

‘स्वीकृत’वरून कुरघोडी
स्वीकृत नगरसेवकपदाची नियुक्ती करताना डावलले गेल्याच्या भावनेनंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचा एक गट या निवडीच्या प्रक्रियेनंतर चांगलाच जागृत झाला असून, त्यामुळे नेत्यांमधील दुफळी वाढली आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये शहराध्यक्षांचे नाव न छापण्याचा पवित्रा घेण्यापर्यंत मजल गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’कडून तरुणांना चिथावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) स्थानिक तरुणांना चिथावणी देत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात उघडकीस आले आहे. ‘एनआयए’ने गेल्या आठवड्यात हैदराबाद येथे आठ तरुणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये या संशयितांनी हल्ले घडवण्यासाठी नांदेडमधून शस्त्रे मिळवल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

‘आयएस’शी संबंधित असल्याच्या संशयावरून हैदराबाद येथील आठ तरुणांना अटक करण्यात आली. ‘एनआयए’ने या संशयितांविरुद्ध गेल्या आठवड्यात विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये त्यांनी ‘आयएस’ स्थानिक तरुणांना देशातच हल्ले करण्यासाठी चिथावणी देत असल्याचे म्हटले आहे. तरुणांनी सीरिया येथे जाण्यापेक्षा भारतातच राहून आपले कार्य पार पाडावे, अशा सूचना आयएसकडून करण्यात येत असल्याचे गोपनीय संभाषण ‘एनआयए’ने उघड केले आहे.
‘आयएस’च्या म्होरक्यांनी संघटनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी ‘निष्ठेची-शपथ’ पाठविली होती. ही शपथ ‘आयएस’ प्रमुख अबु बक्र अल बगदादी याच्याप्रती घेण्यास सांगण्यात आले होते. देशातील तरुणांचा गट स्थापन झाल्यानंतर त्यांच्यात ‘आयएस’च्या धोरणानुसार वर्गवारी करण्यात आली. त्यानुसार अमीर (प्रमुख), नबीब अमीर (उपप्रमुख), महाशीर (लेखापाल), अस्कारी (प्रशिक्षण आणि दळणवळण) आणि रॅबिट (संदेशवहन) अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली. या गटाचे नाव ‘झुंड अल खलिफा अल हिंद फी बिलाद’असे ठेवण्याच्या सूचना होत्या. या तरुणांच्या म्होरक्याने ‘आयएस’ने पाठविलेली निष्ठेची शपथ कागदावर लिहून काढली. या शपथेची स्कॅन कॉपी आपल्या साथीदारांना पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे.

‘आयएस’ने या तरुणांना शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यास सांगितले होते. त्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक असून, तो अज्ञात स्थळी करावा अशाही सूचना होत्या. हा व्यायाम करताना एअरगन, पॅलेटगन, पेंटबॉल गन, टार्गेट बोर्ड याचा वापर करावा, असेही सांगितले होते. या वस्तू मिळविण्यासाठी तरुणांनी आपल्या पत्नीचे दागिने, तसेच इतर चीज वस्तूंची विक्री केली होती. या गटातील एका तरुणाला त्यांच्या कारवाया, तसेच ‘आयएस’मधून सूचना देणाऱ्यांबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याने गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा बनाव करून तो गायब झाला. ‘एनआयए’ने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कोर्टासमोर आपली कबुली जबाब नोंदवला. त्यात अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे वृत्त आहे.

शस्त्रपुरवठा नांदेडमधून

तरुणांच्या गटातील दोन प्रमुख संशयित हैदराबाद येथून दुचाकीने ३१ मे २०१६ रोजी नांदेडमध्ये दाखल झाले. तेथे त्यांना शस्त्रे देण्यात आली. शस्त्रांची देवाण-घेवाणही अत्यंत गोपनीय पद्धतीने झाली. ही शस्त्रे नांदेड येथे त्यांना कोणी पुरवली, त्यांच्यावर कारवाई झाली का? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या संशयितांचा शोध घेतला का? राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई विभागाने नांदेड येथून काही माहिती मिळवली का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाघोली- शिक्रापूर’ आठ पदरी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे नगर रस्त्यावर वाघोली ते शिक्रापूर या सुमारे २२ किलोमीटर अंतरावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हा रस्ता आठपदरी करणे आणि या मार्गावर तीन उड्डाणपूल उभारण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. त्यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात निधी न मिळणे आणि अतिक्रमण यामुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिला असून, या रस्त्यावरील कोंडी कायम आहे.
या रस्त्यावर लोणीकंद येथे झालेल्या भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने आठपदरी रस्ता आणि तीन उड्डाणपुलाचा प्रकल्प आखला आहे. त्यास मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात हा प्रकल्प कागदावरच आहे.
या प्रकल्पाअंतर्गत राज्य सरकारने सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वाघोली, भीमा कोरेगाव आणि शिक्रापूर या तीन ठिकाणी उड्डाणपूल करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या ठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि भूसंपादनाची समस्या आहे. त्यामुळे हा प्रकल्प अद्याप होऊ शकला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘रस्त्याची​ जबाबदारी कोणाकडे?’
पुणे-नगर हा रस्ता राज्य महामार्ग होता; परंतु हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सध्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन विभागांमार्फत पाहिले जाते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आल्यावर या रस्त्याची जबाबदारी कोणी घ्यावयाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र मेट्रो रेल्वेचा वन विभागाला प्रस्ताव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात मेट्रो मार्गादरम्यान तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात भरपाई म्हणून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे पाचगाव पर्वतीवरील वृक्षाच्छादन वाढविण्यात येणार आहे. वन विभागातर्फे या उपक्रमासाठी पाचगाव पर्वती वनक्षेत्रातील वीस हेक्टर जागा मेट्रो कॉर्पोरेशनला करार तत्त्वावर देण्यात येणार आहे.
पुणे शहरात सुरू असलेल्या ‘वृक्षारोपण महोत्सवा’अंतर्गत पाचगाव पर्वतीवर वृक्षारोपण करून मेट्रो कॉर्पोरेशनतर्फे या उपक्रमाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रोने दोन वर्षांपूर्वी सादर केलेल्या अहवालानुसार या प्रकल्पासाठी सहाशेहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. त्या बदल्यात महामेट्रोतर्फे ३ हजार ४२५ झाले लावण्यात येणार आहे. यासाठी मेट्रोतर्फे वन विभागाला जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. वारजे टेकडीच्या धर्तीवर हिंगणे टेकडीवर राबविण्यात येत असलेल्या नागरी वन उद्यान मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा पर्याय वनाधिकाऱ्यांनी दिला होता. यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंगणे आणि पाचगाव पर्वती येथील वन क्षेत्राची पाहणीही केली होती. त्यात पाचगाव पर्वतीची निवड करण्यात आली आहे.
नव्याने लावण्यात आलेल्या झाडांचे चांगल्यापद्धतीने संगोपन करावे तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत पर्यावरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी कॉर्पोरेशनचे अधिकारी जागेच्या शोधात होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते जागेच्या शोधात होते. आता पाचगाव पर्वतीची जागा निश्चित झाली असून, २० एकर जागेवर ते वन उद्यान साकारणार आहेत, अशी माहिती सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी दिली.


या प्रकल्पासाठी वन विभाग, मेट्रो कॉर्पोरेशन आणि स्वंयसेवी संस्था असा त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे. हा करार पाच ते सात वर्षांसाठी असेल. याअतंर्गत स्थानिक प्रजातींचे रोपण, नागरिकांसाठी पायवाटा, माहितीपर फलक असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येतील. हे वन उद्यान कसे असेल, याचे नियोजन करण्याचे काम मेट्रोचे अधिकारी करीत आहेत. त्यांनी नियोजन सादर केल्यानंतर चर्चा करून आमचा करार होणार आहे.
- महेश भावसार, सहायक वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय शहरांचे ‘उड्डाण’ नाहीच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘उडान’ (उडेगा देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत राज्यातील अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या शहरांना वगळण्यात आले आहे. ‘उडान’अंतर्गत या शहरांचाही समावेश करण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. मात्र, अद्याप या शहरांचे ‘उडान’ निश्चित झालेले नसून, औरंगाबादकडेही पूर्णपणे काणाडोळा करण्यात आला आहे.
देशांतर्गत हवाई वाहतुकीचे जाळे तयार करण्यासाठी उडान योजनेंतर्गत १२८ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. याद्वारे २० राज्यातील ७० शहरे जोडली जाणार आहे. या ७० शहरांपैकी ३१ शहरांतील विमानतळांवर सध्या हवाई प्रवासी वाहतूक होत नाही. तसेच, १२ विमानतळे पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत. फारशी विमानसेवा नसलेल्या किंवा विमानतळ असूनही सेवा सुरू नसलेल्या शहरांना विमान वाहतुकीच्या मार्गावर आणणे व ती सेवा रास्त दरात उपलब्ध करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात नांदेड, जळगाव, नाशिक (ओझर), कोल्हापूर आणि सोलापूर या पाच शहरांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यातुलनेत गोंदिया, अमरावती, शिर्डी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना मात्र त्यातून वगळले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच, राज्यातील विकासाच्या नवीन मार्गाची आशादेखील मावळली आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर ‘उडान’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. मात्र, निवडणुकीनंतर आपल्याला केवळ गाजर दाखविण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
या योजनेअंतर्गत एक तासाच्या आतील अंतर असणाऱ्या शहरांसाठी पहिल्या ५० टक्के तिकिटांसाठी २५०० रुपये प्रवास भाडे मोजावे लागणार आहे. राज्यातील निवडलेल्या शहरांपैकी नांदेडहून मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी ट्रू जेटचे विमान सुरू होणार आहे, तर जळगावहून मुंबईसाठी एअर डेक्कनचे विमान सुरू होत आहे. नाशिक येथून मुंबई आणि पुण्यासाठी सप्टेंबरपासून एअर डेक्कनची सेवा सुरू होणार आहे.

पर्यटन क्षेत्राच्या गरजेकडे दुर्लक्ष
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशी पर्यटक येथे येत असतात आणि बाराही महिने त्यांचा ओघ कायम असतो. स्थानिकांना याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. पर्यटनामुळे विविध प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय येथे उभे राहिले आहेत. येथे विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळेल, यात शंका नाही.

मिहान प्रकल्पाची गरज
नागपूरला केंद्र व राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘मिहान’ प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. देशविदेशातील नामांकीत खासगी कंपन्या व उद्योग या प्रकल्पात येत आहेत. तसेच, नागपूर देशाच्या मध्यवर्ती भागात असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘कार्गो हब’ तयार होत आहे. त्यामुळे नागपूरच्या विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहू विमानांनी वाहतुकीत प्रचंड वाढ होणार आहे. या कारणाने नागपूरच्या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी अमरावतीला असणाऱ्या विमानतळाचा विकास होणे गरजेचे आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती ही दोन प्रमुख शहरे उत्तम दर्जाच्या विमानसेवेने जोडली गेल्यास भविष्यात विदर्भाचा विकास शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायींच्या रक्षणाची जबाबदारी हिंदूंचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘गायींचे पालन कोण करतो? विक्री कोण करतो? आणि हिंदूच माणूस मग गायीला कत्तलखान्यापर्यंत का सोडतो, जोपर्यंत हिंदू माणूस इमानदारीने गोरक्षा करणार नाही तोपर्यंत गोरक्षा अशक्य आहे. म्हणून गोहत्येला हिंदूच जबाबदार आहे,’ असे प्रतिपादन बारामतीत चातुर्मासानिमित्त वास्तव्यास असलेल्या दिगंबर जैन समाजाचे राष्ट्रसंत प. पू. १०८ श्री पुलकसागर महाराज यांनी ‘मटा’शी बोलताना केले.

‘केंद्र व देशातील सर्व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. आता नाही तर कधीच गोहत्या रोखली जाणार नाही. मात्र, त्यासाठी प्रत्येक राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व हवे. तरच गोरक्षा शक्य आहे,’ असेही पुलकसागर यांनी स्पष्ट केले.

‘गोहत्या घडवून आणणारेसुद्धा हिंदूच आणि गोहत्येला विरोध करणारेसुद्धा हिंदूच. हा राजकीय दुहेरी डाव आहे; मात्र सत्ता व सत्तेची खरी ताकद लावली तर गोहत्या बंदी होतेच याचे उत्तम उदाहरण उत्तर प्रदेश आहे. गोरक्षकांच्या नावाखाली सरकार दुकानदारीचे नाव देऊन स्वतःचा बचाव करून गोहत्या सुरू ठेवते आहे. हे योग्य नाही,’ अशी खंत पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केली. ‘९० टक्के गोहत्याही विदेशासाठी होत आहे. हे थांबले पाहिजे यासाठी मुस्लिम समाजसुद्धा तयार आहे. भारतीय नागरिक रोज मांसाहार रोज करत नाही; मात्र गायीची कत्तल रोज होते. देशातील सर्व बेकायदा कत्तलखाने बंद झाले पाहिजे. तर अधिकृत कत्तलखान्यावर सरकारने करडी ठेवली पाहिजे,’ अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली.

‘प्रत्येक गावातील गायरान जमिनी गोरक्षणासाठी आरक्षित केल्या पाहिजेत म्हणजे शेतकरी गायी विकणार नाही. गाय उपयोगी बनेल यासाठी प्रत्येक राज्यातील सरकारने प्रयत्न केले पाहिजे. मोठ्या जेलमध्ये गोशाळा उभारल्या तरच गाय वाचेल व जे कैदी आहेत त्यांच्याकडून गोसेवा घडेल. यातून जेलचा खर्च दूध उत्पादनातून निघेल. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.’

‘नदीजोड प्रकल्प गरजेचा’

‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नदीजोड प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र पुढे हा प्रकल्प रेंगाळला. आज या प्रकल्पाची तीव्र गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास देशाची पाणी समस्या कायमची सुटेल. तरी विद्यमान सरकारने हा प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे,’ असेही पुलकसागर महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौंडला हुतात्मा स्तंभाचे काम ठप्प

$
0
0





म. टा. वृत्तसंस्था, दौंड
शहरातील हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत असून, या अपूर्ण बांधकामात पावसाचे पाणी साठले असून, त्यात कचराही पडला आहे. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मोठ्या उत्साहात नूतनीकरणाचे भूमिपूजन झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत काम दररोज सुरू होते; मात्र निवडणूक निकाल लागल्यानंतर अचानक स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम ठप्प झाले. गेली सात महिने हे काम बंद अवस्थेत आहे. निवडणुकीपूर्वी या कामाची सुरुवात करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे निवडणुकीनंतर दुर्लक्ष झाले.
पूर्वीच्या स्तंभावर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाची कोनशीला बसवण्यात आली होती. या स्मारकाची दुरवस्था झाल्याने आरपीआयचे शहराध्यक्ष नागेश साळवे यांनी या स्मारकाचा व हुतात्म्यांचा सन्मान राखला जावा या उद्देशाने स्तंभाच्या दुरुस्तीची व सुशोभिकरणाची मागणी नगर पालिकेकडे केली होती. तसेच, आंदोलनाचा इशाराही दिला होता. साळवे यांच्या बरोबरीने दौंडमधील नागरिकांनी हुतात्मा स्तंभाच्या दुरवस्थेबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. यामुळे नगरपालिका प्रशासनाने हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम निवडणुकीच्या तोंडावर हाती घेतले; परंतु काम ठप्प झाले.
याबाबत दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांना विचारले असता हे काम बंद असल्याचे व काम रेंगाळत असल्याचे मान्य केले. संबंधित ठेकेदाराला समज देण्यात येईल व दोन दिवसांत काम सुरू होईल असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे काढणार ४८ तासांत

$
0
0

नदीपात्राबाबत ‘एनजीटी’च्या आदेशाची पालिकेकडून अंमलबजावणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नदीपात्रातील बांधकामे काढण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेले आदेश मिळाल्यानंतर पुढील ४८ तासात या बांधकामांवर कारवाई करून ती काढली जातील,’ असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले. जलस‌ंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची माहिती देऊन त्यांच्याबरोबर ही बांधकामे काढण्याची कारवाई महापालिका करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डीपी रस्त्यावरील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान नदीपात्रात आणि ब्ल्यू लाइन (निळ्या रेषेत) येणारी सर्व बांधकामे चार आठवड्यात पाडण्याचे आदेश एनजीटीने महापालिकेला दिले आहेत. या भागात असलेल्या बांधकामाचे आठ दिवसात सर्वेक्षण करावे. त्यानंतर पुढील चार आठवड्यांत त्यावर कारवाई करून नदीपात्र मोकळे करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कुमार यांना विचारले असता ‘एनजीटी’चे आदेश मिळाल्यानंतर पुढील ४८ तासात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
डीपी रोडवर गेल्या काही वर्षांत उभी राहिलेली कार्यालये आणि लॉनमुळे नदीपात्र तसेच पूररेषेमध्ये अतिक्रमण केले असल्याचा आक्षेप घेऊन सुजल सहकारी संस्थेतर्फे ‘एनजीटी’कडे याचिका दाखल केली होती. या रोडवर तसेच राज्यातील बहुतांश शहरांमध्ये लग्नातील वरातींमुळे होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाची तक्रारही यात राज्यभरातील सर्व वकिलांनी नोंदवली होती. त्यावर निर्णय देताना ‘एनजीटी’ने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या भागात उभारण्यात आलेली मंगल कार्यालयांनी अतिक्रमणे करून बेकायदा बांधकामे केली असल्याचे यापूर्वीच महापालिकेने कबूल केले आहे.
...
कारवाईचा मार्ग मोकळा
नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर २३ बांधकामांना पालिकेने नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, २० जणांनी कोर्टात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. त्यामुळे कारवाई थांबविण्यात आली होती. हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे नदीपात्रात करण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडथळे ठरणारे डिस्प्ले हटवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील फूटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा ठरतील, असे डिजिटल डिस्प्ले काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत फूटपाथवर मोठ्या हौसेने हे डिस्प्ले लावण्यात आले होते. हे डिस्प्ले काढण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले.
शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये विविध स्वरूपाची माहिती देणारे फलक लावण्यासाठी सुरू असलेल्या खोदाईची माहिती पालिकेच्या पथ विभागापासून लपविली असल्याचे समोर आले होते. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. ‘स्मार्ट एलिमेंट्स’ या उपक्रमांतर्गत यामध्ये वाहतूक, हवामान याची माहिती दिली जाणार असून, काही ठिकाणी ‘वाय-फाय’ सुविधा दिली जाणार आहे. शहरातील तब्बल २७० ठिकाणी असे फलक बसविण्यात येणार आहेत. या सर्व डिस्प्लेमुळे पादचाऱ्यांना त्रास होणार असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर नगरसेवक अविनाश बागवे यांनी पालिकेच्या मुख्य सभेत हा विषय चर्चेसाठी आणला होता. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता फूटपाथवर स्मार्ट सिटीचे डिस्प्ले लावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. या डिस्प्लेमुळे कोर्टाचे आदेश तसेच पालिकेच्या पादचारी धोरणाची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी बागवे यांनी केली होती.
स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक बागवे यांनी या डिस्प्लेमुळे पादचाऱ्यांना त्रास होत असल्याचे फोटो बैठकीत सादर केले. पादचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल स्थायीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीही नाराजी व्यक्त करून हे डिस्प्ले तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यावर पालिका आयुक्त कुमार यांनी लेखी आदेश देत पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डिस्प्ले काढणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नांना हवे आर्थिक पाठबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुक्रवार पेठेतील महानगरपालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतनचा अक्षय तवले हा विद्यार्थी. त्याला विज्ञानाची आवड असून, शास्त्रज्ञ बनण्याचे त्याचे ध्येय आहे. जैवतंत्रज्ञान विषयात त्याला संशोधन करायचे आहे. विशेष म्हणजे आपली आवड आणि इच्छा ओळखून लहान वयातच हे ध्येय त्याने निश्चित केले आहे. त्या दृष्टीने स्वतःची तयारीही त्याने सुरू केली आहे.
अक्षयच्या गावी प्यायच्या पाण्याचेही हाल आहेत. पाण्याअभावी शेतीही कोरडी पडली आहे. त्यामु‍ळे तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च तवले कुटुंबाला झेपणारा नव्हता. अक्षयची आत्या शोभा आणि त्यांचे पती नागनाथ गरड या दाम्पत्याने अक्षयची हुशारी ओळखून त्याला पुण्यात आणले. त्याला चांगले शिक्षण मिळेल, त्याच्या हुशारीला वाव मिळेल, यासाठी धडपड केली. त्यानेही आजवर मनापासून अभ्यास केला.
‘आयसर’; तसेच ‘एनसीएल’मध्ये प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. वर्ल्ड ऑफ नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी हा प्रोजेक्ट त्याने केला. स्पेलिंगच्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये तो पुण्यात पहिला आला. त्याच्या वर्गशिक्षिका आशालता ससाणे सांगतात, ‘विज्ञानाचे उत्तमोत्तम प्रकल्प त्याने केले आहेत. मराठी माध्यमातील असूनही त्याने प्रकल्पांचे सादरीकरण इंग्रजीतून आत्मविश्वासाने त्याने केले. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शाळेने त्याला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले आहे. शाळेतील लॅब अटेंडंट सुजाता पराडकर यांनी अक्षयची फॉर्म फी भरली. कोणताही क्लास न लावता त्याने दहावीत यश मिळवले.’
...
दहा वर्षांच्या माझ्या नोकरीत अक्षय हा मी पाहिलेला सर्वोत्तम विद्यार्थी आहे. तो खूप अभ्यासू, जिज्ञासू आणि कष्टाळू आहे. शाळेकडून अनेक विज्ञान स्पर्धांसाठी त्याला पाठविण्यात आले. त्यानेही त्यात यश मिळवले आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळाल्यास तो खूप पुढे जाईल.
- आशालता ससाणे, वर्गशिक्षिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मात करायचीय परिस्थितीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आई-वडील त्यांच्या परीने आमचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करीत आहेत. आजारपणातही वडिलांना काम करताना पाहून जीव तुटतो. कधीकधी आपणही शिक्षण सोडून काम करावेसे वाटते,’ अशा शब्दांत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द बाळगणाऱ्या ज्योती सुभाष गोरडने आपली व्यथा मांडली.
रस्त्याशेजारीच घर असल्याने परिसरात सतत गोंधळाचे वातावरण. मात्र, त्याची तमा न बाळगता तिने पहाटे चार वाजता उठून अभ्यास केला आणि दहावीत ९०.८० टक्के गुण मिळवले. हडपसरमधील गंगानगर येथील छोट्या दोन खोल्यांच्या (खरं तर एकच) घरात प्रवेश केला, तर पाच जण झोपतील एवढीच जागा असल्याचे लक्षात येते. आपल्या घरची परिस्थिती शिक्षणाद्वारे बदलू शकते, या एकाच ध्यासाने ज्योतीने जिद्दीने अभ्यास केला. क्लास लावण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्याने शाळेतील प्रत्येक विषय व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास केला. त्यासाठी योग्य नियोजनही केले. शाळा, घरातील कामे, भावांची काळजी, त्यांचा अभ्यास अशी सारी कसरत तिने केली. रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या ज्योतीचे सोशल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे आवडीचे विषय. यात तिला अनुक्रमे ९१ आणि ९६ गुण मिळाले. प्रशासकीय अधिकारी व्हायची तिची इच्छा आहे. ते केवळ पैशांसाठी नाही, तर तिला इतरांनाही मदत करायची आहे, जेणेकरून पैशांअभावी कोणाला शिक्षण सोडायला लागू नये.
‘परिस्थितीमुळे लहान वयातच तिच्यात खूप समजूदारपणा आला आहे. केवळ शिक्षणामुळे घरची परिस्थिती बदलेल, ही एकच गोष्ट डोक्यात ठेवून तिने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला. अभ्यासातील एखादी गोष्ट समजली नाही, तर ती शाळा सुटल्यानंतर समजून घेत होती. तिला मदत मिळाली, तर तिच्या आयुष्याचे कल्याण होईल,’ अशी माहिती ज्योतीचे शाळेतील शिक्षक सुहास गवळी यांनी दिली. लिहिता-वाचता येईल, एवढेच ज्योतीच्या आई-वडिलांचे शिक्षण. मात्र, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि गरिबी दूर व्हावी, ही त्यांची भावना. त्यामुळेच सोलापूर सोडून त्यांनी पुणे गाठले. आपण शिकू शकलो नाही. मात्र, मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी मिळेल ते काम त्यांनी केले आणि करत आहेत. यातून पाच जणांचा संसाराचा गाडा कसाबसा रेटला जात आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमवताना गोरड दाम्पत्याची दमछाक होत आहे. ‘मुलीला मदत मिळेल ना,’ हा तिच्या आईचा निरागस प्रश्न परिस्थितीसमोर हतबल झाल्याचे निर्दशक आहे.
...
आई-वडिलांच्या हातांना लवकरात लवकर आराम कसा मिळेल, याचाच विचार डोक्यात सुरू असतो. या विचारांमुळेच अभ्यासाला ब‍ळ मिळते. मोठी मुलगी म्हणून मला माझ्या घराची जबाबदारी सांभाळायची आहे. चांगल्या शिक्षणामुळेच हे शक्य होईल.
- ज्योती गोरड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किशोर धनकवडे यांचे नगरसेवक पद रद्द

$
0
0

स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
धनकवडी येथील प्रभाग क्रमांक ३९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेले उमेदवार बाळाभाऊ उर्फ किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद बुधवारी रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हे आदेश काढले. भोर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी धनकवडे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच पद रद्द झालेले ते पहिले नगरसेवक आहेत.
फेब्रुवारीत प्रभाग क्रमांक ३९ अ या ओबीसी गटासाठी राखीव जागेवर धनकवडे विजयी झाले होते. आरक्षित जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निकालानंतर सहा महिन्यामध्ये जात पडताळणी समितीकडून जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. धनकवडे यांनी भोर येथील उपविभागीय कार्यालयाने त्यांना दिलेला कुणबी जातीचा दाखला निवडणूक कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र, या कार्यालयाने धनकवडे यांच्या जातीचा दाखला ‘अवैध’ ठरविला असल्याचा निर्णय दिला होता. या विरोधात धनकवडे यांनी हायकोर्टात दाद मागितली असून १० जुलैला यावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच पालिका आयुक्त कुमार यांनी धनकवडे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला.
खोटी कागदपत्रे सादर केल्याने संबधित उमेदवाराने फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सभासदाचे पद रद्द करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. याचा आधार घेत आयुक्तांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्या दिवसापासून (पूर्वलक्षी प्रभावाने) धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले. त्यामुळे त्यांना पालिकेने दिलेल्या सेवासुविधा काढून घेऊन यापूर्वी देण्यात आलेले मानधनही वसूल केले जाणार आहे.
..
पालिका आयुक्त कुमार यांनी आकसाने आणि भाजपच्या दबावामुळे हे पाऊल उचलले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधोत कोर्टात दाद मागितली असून त्यावर १० जुलैला सुनावणी होणार आहे.
- किशोर धनकवडे,
...
उपविभागीय कार्यालयाने धनकवडे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. कायद्यातील तरतूदीनुसारच ही कार्यवाही करण्यात आली आहे.
कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा केंद्रात अधिक सेवा

$
0
0

‘महसूल’च्या सेवाही मिळणार; स्थायी समितीची मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत आता महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. उत्पन्न आणि रहिवासी दाखल्यासह ६९ प्रकारच्या सेवा पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात मिळणार आहेत.

नागरिकांसाठी आवश्यक आणि महसूल विभागाकडून देण्यात येणारे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्ड बनविणे, दुबार रेशनकार्ड बनविणे, जातीचा दाखला, हॉटेल परवाना, नॉनक्रिमिलेयर, संजय गांधी निराधार अनुदान योजना, संजय गांधी स्वावलंबन योजना, राष्ट्रीयत्व दाखला, श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना इत्यादी ६९ प्रकारचे सेवा आता पालिकेच्या विविध ४४ नागरी सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रति अर्ज ३३ रुपये शुल्क आकारण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सध्या नागरी सुविधा केंद्रामधून सध्या महापालिकेशी संबंधित विविध सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात आता महसूल विभागाच्या सेवांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना त्यांच्या जवळच्या केंद्रातच सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महसूल विभागात हेलपाटे मारण्याची गैरसोय टळण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

बैठकीत सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रक्षक चौक ते औंध उरो रुग्णालय येथील विकास आराखड्यातील मुख्य गुरुत्वनलिका शिफ्ट करणे व इतर अनुषंगिक कामे, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ साठी पावडर पॉली अॅल्युमिनियम क्लोराइड खरेदीच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

‘सीओपी’चा सल्ला घेणार

गॅस शवदाहिनी खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर दोषींवर कारवाईसाठी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीओपी) सल्ला घेण्यात येणार आहे. त्यासाठी फी अदा करण्याच्या आर्थिक प्रस्तावास बैठकीत मंजुरी देण्यात आली. गॅस शवदाहिनी बसविण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधात असताना केला होता. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये पालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता आयुबखान पठाण आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांचा समावेश होता. या समितीने चौकशी अहवाल स्थायी समितीसमोर ठेवला होता. परंतु, गॅस शवदाहिनी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी सल्ला घेण्याचा विषय अगोदर मंजूर करण्याची गरज आहे, असे मत पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. त्यानुसार प्रा. बी. जी. बिराजदार आणि प्रा. एस. एन. सपाली यांचा सल्ला घेण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

विषयपत्रिकेवरील प्रस्ताव मागे

विषयपत्रिकेवरील पाच प्रस्ताव बैठकीत मागे घेण्यात आले. यामध्ये यमुनानगर येथील जलतरण तलावाची देखभाल आणि दुरुस्ती, हुतात्मा चापेकर आणि श्री भैरवनाथ वाचनालयासाठी पुस्तक खरेदी, प्रेमलोक पार्क, तानाजी गावडे आणि संत तुकाराम नगर येथील व्यायामशाळा सेवाशुल्क तत्त्वावर चालविण्यास देणे यांचा समावेश आहे. भोसरी इंद्रायणीनगर येथे जलतरण तलाव उभारण्याचा आठ कोटी ९७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.

‘पीएमपीएमएल’ला निधी देणार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन चर्चा केल्याशिवाय कंपनीला सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या स्थायी समितीने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंढे यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर आणि त्यांनी येत्या तीन महिन्यांत कारभार सुधारण्याचे आश्वासन दिल्यामुळे ‘पीएमपीएमएल’च्या अनुदानाचे प्रस्ताव मान्य करण्याचे ठरविले आहे, असे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही एक पाऊल मागे आल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनीही मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोबोटिक्स तंत्राद्वारे गुडघा सांधेरोपण

$
0
0

देशातील पहिले ऑपरेशन पुण्यात यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तीव्र स्वरूपाच्या सांधेदुखण्यावर ‘नेव्हिओ रोबोटिक’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण कृत्रिम गुडघा सांधेरोपणाचे पहिले ऑपरेशन लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आले. रोबोटिक तंत्रामुळे सांध्याच्या सर्व नैसर्गिक रचना कायम ठेवता येत असून रक्तस्त्राव कमी झाल्याने पेशंट लवकर बरा होण्यास मदत होत आहे.

‘रोबोटिक्समुळे ऑपरेशनमध्ये अचूकता येत असून पेशंटना दीर्घकालीन होणारी वेदना बंद होणार आहे. परिणामी, पेशंटला वेदनामुक्त चालता येईल. या तंत्राद्वारे केलेल्या ऑपरेशनमुळे पेशंटला मांडी घालून बसणे, वाकणे आणि गुडघ्याच्या हालचाली नैसर्गिकरित्या करण्यात येऊ शकतील. गुडघ्यातील सर्व अस्थिबंध (लिगामेंट्स) जसेच्या तसेच राहतात. अशा स्वरूपाचे ऑपरेशन वेबकास्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पश्चिम महाराष्ट्रातील चारशेहून अधिक डॉक्टरांना पाहता आले. अमेरिकेतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विवेक नेजीन्हाल यांच्या उपस्थितीत हे ऑपरेशन करण्यात आले,’ अशी माहिती लोकमान्य हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी दिली. अमेरिकेनंतर अशा स्वरूपाचे पहिले ऑपरेशन देशात पुण्यात प्रथमच करण्यात आल्याचा दावाही हॉस्पिटलने केला आहे.

‘गुडघ्याच्या सांधेदुखीमुळे पेशंटना वेदना होतात आणि चालताना पायाला बाक येतो. त्यामुळे पेशंटच्या हालचाली बंद होतात. आर्थिकदृष्ट्या उपचाराचा खर्चही वाढतो. सांधेदुखीच्या काही टप्प्यांत औषधे, फिजिओथेरपी आणि इतर ऑर्थोस्कोपीच्या उपचारांचा उपयोग होत नाही. अशा पेशंटना संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज असते. अशा पेशंटना पूर्वीच्या पद्धतीनुसार दीर्घकाळापर्यंत हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. तसेच फिजिओथेरपीचाही समावेश आहे. रोबोटिक तंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या कृत्रिम अवयवरोपणाचे ऑपरेशन १०० टक्के अचूक असते. या ऑपरेशनचा खर्च दीड ते तीन लाखापर्यंत येऊ शकतो. तसेच ऑपरेशनच्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज मिळू शकतो. ऑपरेशननंतर करावयास लागणाऱ्या उपचारांचा खर्च कमी येतो,’ अशीही माहिती डॉ. वैद्य यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न तपासला; गुणच नाही दिले!

$
0
0

पुनर्मूल्यांकनाच्या वेळी समोर आल्या चुका

prasad.panse@timesgroup.com

Tweet : @PrasadPanseMT

पुणे : शेवटची दोन पाने तपासलीच नाहीत... एखादा प्रश्नच तपासायचा राहिला... प्रश्न तपासला; पण गुणच द्यायचे राहिले... अशा अनेक गोष्टी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनातून समोर आल्या आहेत. त्यामुळे या चुकीची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना योग्य गुण द्यावे लागले आहेत. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात चूक केलेल्या परीक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, छायांकित प्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर झालेल्या कार्यवाहीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाअंतर्गत बारावीच्या परीक्षेनंतर एक जुलैपर्यंत ६०० विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांनी २,७९५ उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागितल्या होत्या, तर १४४ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या कार्यवाहीत तीन जुलैपर्यंत गुणपडताळणीत तीन विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला आहे. छायांकित प्रतींमध्ये १२४ विद्यार्थ्यांच्या, तर पुनर्मूल्यांकनात २३ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. छायांकित प्रत मागवलेल्या एका विद्यार्थ्याच्या निकालात (नापास-पास) बदल झाला आहे. अजून काही अर्ज प्रलंबित आहेत.

पुणे विभागीय मंडळाकडे दहावीच्या परीक्षेनंतर एक जुलैपर्यंत एकूण ३०९ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केला होते. त्यांनी १४३१ उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागवल्या होत्या. त्यानंतरच्या कालावधीत १२ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी, तर १७३ छायांकित प्रतींसाठी नव्याने अर्ज केले. त्यावरील कार्यवाहीत तीन जुलैपर्यंत छायांकित प्रतींमध्ये ८३ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाले, तर कोणाच्याही निकालात बदल झाला नाही. अजूनही काही अर्ज प्रलंबित आहेत.

....

‘चूक असेल, तर कारवाई होणार’

‘परीक्षेपूर्वीच विभागीय मंडळ व राज्य मंडळातर्फे सर्व मॉडरेटर्सचे प्रशिक्षण घेण्यात येते. त्यात त्यांनी उत्तरपत्रिका तपासताना काय दक्षता घ्यावी, यावर भर देण्यात येतो. बेरीज नीट करणे, सर्व पाने उलटून पाहणे, प्रत्येक पानावर खूण करण्याविषयी सूचना दिल्या जातात. मात्र, तरीही काही मॉडरेटरकडून यात चूक झाली असेल, तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यांना मंडळातर्फे दिले गेलेले मानधन जप्त होईल; तसेच त्यांच्या शाळेच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असे मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिव बी. के. दहिफळे यांनी सांगितले.

०००
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो. एका गुणामुळेही त्यांची संधी हातची जाऊ शकते. त्यांच्या बाबतीत असा निष्काळजीपणा दाखविणाऱ्या मॉडरेटरवर कडक कारवाई केली पाहिजे.

- पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५०० पैकी केवळ २५० मराठी सिनेमांचे जतन

$
0
0

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये (एनएफएआय) हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांच्या तुलनेत मराठी चित्रपटांची संख्या अगदीच नगण्य असल्याची बाब समोर आली आहे. मराठी चित्रपटांच्या शंभर वर्षांच्या इतिहासात सुमारे साडेतीन हजार चित्रपटांची नोंद असताना यातील केवळ अडीचशे चित्रपट संग्रहालयाकडे असल्याने तेवढ्याच चित्रपटांचे जतन केले जात आहे. हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. चित्रपट संग्रहालय देशात फक्त पुण्यात असताना मराठी चित्रपटसृष्टी चित्रपट जतन करण्याच्या दृष्टीने उदासीन राहिली आहे.
संग्रहालयामध्ये १८ ते १९ हजार चित्रपटांची एकूण १ लाख ३२ हजार रिळे आहेत. यामध्ये हिंदी व देशातील अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपट अधिक संख्येने आहेत. मराठी चित्रपटांचे महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या पुण्यात ही संस्था असूनही केवळ अडीचशेच चित्रपट संस्थेकडे आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व अभिनेते मकरंद अनासपुरे हे संग्रहालयात गेले होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याशी त्यांच्या झालेल्या चर्चेतून ही बाब समोर आली. मराठी चित्रपट निर्माण करणारे कलावंत, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडे चित्रपट जतनाचे भान नाही का, असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे.
संग्रहालयाकडे असणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या कमी असल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘मटा’शी बोलताना मान्य केले. ते म्हणाले, ‘देशात केवळ पुण्यात चित्रपट संग्रहालय असल्याने देशातील सर्व भाषांचे चित्रपट येथे जतन केले जातात. संग्रहालयाकडे असणाऱ्या चित्रपटांमध्ये हिंदीचे प्रमाण अधिक आहे. मराठी चित्रपटांची संख्या अडीचशेच्या आसपास असण्याची शक्यता आहे. चित्रपटांशी संबंधित कोणत्याही घटकाने किंवा रसिकांनी आपल्याकडील फिल्म आम्हाला द्याव्यात, असे आवाहन आम्ही वारंवार करत आहोत. मराठी चित्रपटांचा इतिहास समृद्ध असून हे चित्रपट जतन करणे आवश्यक आहे. संस्था पुण्यात असून मराठी चित्रपटांचे महत्त्वाचे केंद्र पुणेच असल्याने मराठी चित्रपटांना जतन करण्यासाठी अधिक फायदा करून घेता येऊ शकतो. चित्रपट ही कला जतन करण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज आहे.'

मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडे पुढच्या पिढीसाठी चित्रपट जतन करण्याची वृत्ती असण्याची गरज आहे. प्रभात, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, राजकमल यांनी तयार केलेले चित्रपट जतन झाले. आचार्य अत्रेंचे चित्रपट आज उपलब्ध नाहीत. सरकार चित्रपटांसाठी अनुदान देते; पण चांगले चित्रपट जतन होत आहेत का, यावर सरकारने नजर ठेवायला हवी. किमान दर्जेदार चित्रपटाची एक प्रत संग्रहालयाकडे देण्याची सक्ती करता येईल. किती चित्रपट जतन करणार हा मुद्दा आहेच. चित्रपटांचे आयुष्य कमी झाले असून या मार्गाने तरी दीर्घायुष्य देणे शक्य आहे.
- सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक

दर वर्षी १२५ मराठी चित्रपट तयार होतात. त्यापैकी २५ चांगले चित्रपट निवडून जतन करता येतील. पण चांगले चित्रपट कोणी निवडायचे हा प्रश्न आहे. त्यासाठी निवड प्रक्रिया ठेवता येईल. संग्रहालयाने निर्मात्यांना पत्र पाठवले तर सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. सगळेच चित्रपट जतन करणे शक्य नाही आणि ते गरजेचेही नाही. या प्रक्रियेला उशीर झाला असला तरी यापुढे प्रयत्न करता येतील.
- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर देश बदलण्यास मदत ः हजारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लोकप्रतिनिधी आणि चारित्र्यशील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र काम केल्यास देश पुढे जाईल. नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची उक्ती आणि कृती एक असेल, तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही,’ असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी सांगितले. ‘निवडणुका आल्या की फक्त भाषणांचा भडीमार होतो. भाषणाने समाज बदलणार नसून त्याला शब्द आणि कृतीची आवश्यकता आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.
डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठाच्या माईर्स एमआयटी स्कूल गव्हर्न्मेंट आणि सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हजारे यांच्या हस्ते करण्यात आला. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष डॉ. राहुल कराड, तेलंगणातील राचकोंडा येथील पोलिस आयुक्त महेश भागवत, देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालास्वामी, यूपीएससीचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल, मेजर जनरल दिलावर सिंग, यशवंत मानखेडकर, अरुण पवार, प्रा. सुजित धर्मपात्रे, डॉ. शैलश्री हरिदास, प्रा. गौतम बापट आदी उपस्थित होते. यूपीएससीत देशातून पहिली आलेली नंदिनी के. आर. आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह अन्य यशवंतांचा सत्कार या वेळी
करण्यात आला.
चारित्र्यशील सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित काम केल्यास ७० वर्षांत जे झाले नाही, ते १० वर्षांत होऊन देश उभा राहील. युवक हे माझे आशास्थान असून आजचे युवकच देशाला घडवतील. चारित्र्यशील नेतृत्वासाठी शुद्ध आचार-विचार, निष्कलंक जीवन, अपमान पचवण्याची ताकद आणि जीवनात त्याग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नव्या अधिकाऱ्यांनी गाव, समाज आणि देशासाठी सेवा करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. त्यासाठी मनात सेवाभावी संकल्प यायला हवे, मनात उमटणाऱ्या चांगल्या
विचारांमुळे समाजाला दिशा मिळते, असे हजारे यांनी सांगितले.
‘आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येऊ शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे,’ असे आगरवाल यांनी सांगितले.
‘प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे,’ असे नंदिनीने सांगितले.

मोदींना पाठवणार पत्र
राजकारणात चारित्र्यशील नेतृत्व तयार करण्यासाठी प्रत्येक राज्यात प्रशिक्षण केंद्रे उभारली पाहिजेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. विधानसभा आणि लोकसभेत चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी पाठवले पाहिजेत. यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रौप्यमहोत्सवानिमित्त ४२ दिवस कार्यक्रम

$
0
0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान सलग ४२ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ते होतील.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांना ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. रोज सकाळी विविध याग होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रमोद गायकवाड व भीमण्णा जाधव यांच्या सनई -सुंद्री जुगलबंदीने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रवींद्र साठे, माधुरी करमरकर, महेश काळे, पं. नीलाद्री कुमार, सत्यजित तळवलकर, मधुरा दातार, ॠषिकेश रानडे, विभावरी आपटे, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार, रूपकुमार राठोड, सुनील राठोड, पं. हरिप्रसाद चौरसिया, अभिजित पोहनकर, तौफिक कुरेशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, पं. विजय घाटे, श्रीधर फडके, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, मंजूषा कुलकर्णी, नंदेश उमप, अनुराधा पौडवाल, एन. राजन व संगीता रागिणी, नंदिनी शंकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. अमान अली व अयान अली बंगश, सावनी शेंडे, जयतीर्थ मेवुंडी, आशा खाडीलकर, राहुल देशपांडे, सुरेखा पुणेकर, राधा मंगेशकर, प्रशांत नासेरी, विभावरी आपटे, पं. शिवकुमार शर्मा, इक्बाल दरबार, श्रीरंग गोडबोले, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, पं. राशीद खान, पं. सुरेश तळवलकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, बेला शेंडे, पं. राजन साजन मिश्रा, सुरेश वाडकर आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत.
याच दरम्यान बाबामहाराज सातारकर, सुधांशूजी महाराज, दादा जे. पी. वासवानी, विजेंदरसिंगजी महाराज, प्रीती सुधाजी, डॉ. बाबासाहेब तराणेकर, डॉ. सुनील काळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, आचार्य गोविंदगिरी, भक्तिप्रिय स्वामीजी, गाणपत्य स्वानंदजी पुंड शास्त्री यांचे प्रवचन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images