Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महिलांचे तुरुंग दुरवस्थेत

$
0
0

पुणे : महिला कैद्यांसाठी तुरुंगामध्ये असलेले बाथरूम आणि टॉयलेट्स अत्यंत दुरवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा पुरेशा नसल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर राज्यातील प्रमुख तुरुंगांची पाहणी करण्यात आली. त्या वेळी तुरुंगात महिला कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा तुटपुंज्या असल्याचे समोर आले.

महिला कैद्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांना योग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी नेमावी, तसेच सहा वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना महिला कैद्यांना सातत्याने भेटता यावे यासाठी काही योजना राबविण्यात यावी, असा सूचना मुंबई हायकोर्टाने तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुण्यातील वकिलाने हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेत महिला तुरुंगामधील कैद्यांच्या प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला होता. हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि ए. एस. ओक यांनी हा निकाल दिला आहे. पुण्यातील जनअदालत संस्था, अॅड. इब्राहिम शेख, जेलमध्ये असलेला गणेश पवार यांनी हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत तुरुंगामध्ये असलेल्या गैरसोयी, तुरुंगामधील कैद्यांची मुलाखत घेताना येणाऱ्या अडचणी, कैद्यांचे आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले होते. ही जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर राज्यातील प्रमुख तुरुंगांमध्ये असलेल्या कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची संबंधित जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी करून घेऊन त्याचे अहवाल मागविण्यात आले होते. त्या अहवालावरून तुरुंगांमध्ये असलेल्या महिला कैद्यांच्या समस्याही समोर आल्या होत्या.

भायखळा तुरुंगांमध्ये असलेल्या महिला कैद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी श्रीमती ए. एस. शेंडे यांनी केली होती. त्याचा अहवाल त्यांनी दाखल केला होता. त्यानुसार या तुरुंगांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बाथरूम नाहीत. पुरेशा महिला कर्मचारी नाहीत. इमर्जन्सी बेड नाहीत हे मुद्दे समोर आले होते. तसेच येथील महिला कैद्यांनी त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले नाही अशा तक्रारीही न्यायाधीशांकडे केल्या होत्या.

येरवडा तुरुंगाची पाहणी जिल्हा न्यायाधीश आर. एस. तिवारी यांनी केली होती. महिला तुरुंगांमध्ये कोणतीही आरोग्य सुविधा नाही. महिला वैद्यकीय अधिकारी नाही. बाथरूम, टॉयलेट्सची दुरावस्था असल्याचे समोर आले होते. त्यांनी या संदर्भातील अहवाल सादर केला होता. महिला तुरुंगांमध्ये असलेल्या गैरसोयींचे मुद्दे लक्षात घेऊन हायकोर्टाने दिलेल्या आदेशात महिला कैद्यांचे आरोग्य, अन्नाचा दर्जा चांगला असावा, त्यांना स्वतंत्र बाथरूम टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश हायकोर्टाने तुरुंग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जनहित याचिका दाखल केलेले अॅड. इब्राहिम शेख यांनी, महिला कैद्यांच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे नमूद केले. येरवडा महिला जेलमध्ये आरोग्य सुविधा नाहीत. त्यांच्या मुलाखत घेतानाही अडचणी येतात. हे प्रश्न याचिकेद्वारे आपण मांडले होते, असे सांगितले.

................

मुलांच्या भेटीसाठी हवी तरतूद

महिला तुरुंगांमध्ये असलेल्या महिला कैद्यांना त्यांच्या सहा वर्षांवरील मुलांना भेटण्यासाठी खूप अडचणी येतात. आई तुरुंगात असल्याने नातेवाइक आईला मुलाला भेटू देत नाही. या महिलांना त्यांच्या मुलांना वारंवार भेटता यावे म्हणून काही योजना राबविता येईल का याचा विचार करावा; तसेच आवश्यकता वाटल्यास संबंधित महाराष्ट्र कैदी कायदा कलमात दुरुस्ती करण्यात यावी, असे मुंबई हायकोर्टाच्या निकालात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण काढण्यास गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर गलोलीने हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

कांदळी येथे वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी गेलेल्या वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर लोकशासन कार्यकर्त्यांनी गलोलीने दगड मारून हल्ला केला. त्यामध्ये तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे वनकर्मचाऱ्यांचे
मनोधैर्य खचले आहे. जखमी अवस्थेत संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले असून, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सिन्नर तालुक्यातील विविध वनक्षेत्रांत खासगी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शेती करण्यासाठीही अतिक्रमण करण्यात आले आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वनखात्याकडून वारंवार कारवाई केली जात आहे. या अंतर्गत रविवारी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक वाय. पी. मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राठोड, वनपाल मनीषा काळे यांच्यासह जवळपास ५० कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे जवान कांदळी येथे गेले होते. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आली. त्यानंतर हे कर्मचारी परत जात असताना तेथे लपून बसलेल्या आंदोलकांनी या कर्मचाऱ्यांवर गलोलीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यामध्ये सहायक वनसंरक्षक श्रीमंत गायकवाड, प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे, तसेच एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी आंदोलक नारायणगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेक पर्यटनस्थळांवरचालतो धांगडधिंगा

$
0
0

अनेक पर्यटनस्थळांवरचालतो धांगडधिंगा

Rohit.Athavale@timesgroup.com
Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे दारू, हुक्कापार्लर व मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची केंद्रे बनली आहेत. या पर्यटनस्थळी पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे धांगडधिंगा व हुल्लडबाजी करणाऱ्यांचा कुटुंबासह आलेल्या इतर पर्यटकांना त्रास होतो. पोलिसांकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा बोलले जाते. मात्र, त्यावर तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही. असे वाढते विकृत प्रकार व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत आहे.
जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या पर्टनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. लोणावळा येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे लेण्या, विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड हे गड, विस्तीर्ण पवना, वलवण, लोणावळा, भूशी, उकसान, मळवंडीठुले, तुंगार्ली ही जलाशये, टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी पॉइंटस पावसाळ्यात कोसळणारा मुबलक पाऊस, पावसाळ्यातील विलोभनीय व रमणीय नैसर्गिक दृश्य, कोसळणारे धबधबे अशा अनेक कारणांमुळे पर्यटकांचे मावळ व लोणावळा-खंडाळ्यातील पर्यटनस्थळांचे देशी-व विदेशी पर्यटकांना आकर्षण वाटते. मात्र, या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत चालली आहे. या पर्यटनस्थळांवर सावर्जनिक ठिकाणी दारूच्या पार्ट्या, हुक्क्याचे निघणारे धूर, काही मादक पदार्थांचे सेवन करून अलिशान कार आणि वाहनातील साउंड सिस्टीमवर धांगडधिंगा घालत बेभानपणे नाचणाऱ्या पर्यटकांचे थवे पहायला मिळतात. पण पोलिसांकडून या गोष्टीकडे कानाडोळा केला जातो.
दुसरीकडे मुळशी परिसरात; तसेच ताम्हिणी घाटातील पळसे धबधब्यावरही पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. लोणावळ्यातील बीभत्सपणा अंगावर येतो. पळसे धबधब्यावर अनेकदा भांडणे, हाणामारीच्या घटना घडतात. रायगड पोलिसांकडून येथे शनिवार-रविवार पोलिसांचा पौडपासूनच बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे टाटा पॉवरपर्यंत शक्यतो टवाळखोरांचा जास्त त्रास होत नाही. पौड-मुळशी येथे दारू विक्री बंद झाल्याने अनेक प्रमाणात त्रास कमी झालेले आहेत. लोणावळ्यातही पोलिसांकडून बंदोबस्त तैनात असतो. मात्र, येथील धांडगधिंगा कमी करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळी रात्री सातनंतर व्यवसाय करण्यास व पर्यटकांना परिरात फिरण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी फक्त नावापुरतीच असून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विविध उद्योग सुरू असतात. त्याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहेत. निर्जन पर्यटनस्थळांवर अवेळी पर्यटनाचा आनंद लुटणे, फिरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे; तसेच रात्री पर्यटकांना लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा वेळीच पोलिसांनी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. नवीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक या गोष्टींकडे नक्कीच लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.
.............
वाहतूक कोंडी नित्याची बाब
पौडपासून पळसे गावापर्यंत वाहतूक कोंडी असते. पुण्यातील अनेकांची तेथे गर्दी असते. लोणावळा-खंडाळा परिसरात वाहतूक कोंडी द्रुतगती मार्गापर्यंत आलेली असते. लोणावळ्यात मुख्य चौकांमध्ये पोलिस पावसाळ्यात स्वतंत्र मांडव टाकूनच येथील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याचा प्रयत्न करतात. पोलिस अनेकदा बळाचा वापर करीत येथील कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. पौड गावात शिरताच पोलिसांकडून होणारी तपासणी लोणावळ्यात सुरू झाल्यास अनेक गोष्टींना आळा बसू शकेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भाशय प्रत्यारोपणापेक्षा सरोगसीची फायद्याची

$
0
0

प्रश्न - अविवाहित तरुणीसुद्धा गर्भाशय प्रत्यारोपणाकडे वळत आहेत. ते कितपत योग्य आहे?

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात झाल्याचे ऐकले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण करण्याची पद्धत नवी आहे. तंत्र म्हणून ती पद्धत योग्य म्हणावी लागेल. पण खरे तर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात का घालावा, असाही प्रश्न आहे. प्रत्यारोपणानंतर महिलेला काही वर्षे स्टिरॉइड्ससह अनेक औषधोपचार घ्यावे लागतात. त्यामुळे काही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भाशय प्रत्यारोपण हा एक प्रयोग आहे. गर्भाशय प्रत्यारोपणात दाता आणि स्वीकारणारी व्यक्ती दोघांनाही ऑपरेशनला सामोरे जावे लागते. आम्ही अशा प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनला प्रोत्साहन देऊ शकत नाही. ही प्रक्रिया धोक्याची आहे. खूप कमी पेशंटना याचा फायदा होईल. त्या तुलनेत सरोगसीचा पर्याय हा महत्त्वाचा आणि महिलेच्या दृष्टीने फायद्याचा ठरत आहे. सरोगसीचे विधेयक जरी संसदेत प्रलंबित असले, तरी त्यात काही बदल होऊ शकतील. त्यामुळे महिलांच्या भविष्याच्या दृष्टीने सरोगसी फायद्याची ठरणार आहे. कायदा झाल्यानंतर त्यात सुसूत्रता येईल. त्याच्या किंमती कमी होतील.

प्रश्न - सरोगसीचा कायदा संसदेत प्रलंबित आहे. काय अपेक्षित आहे?

पूर्वी सरोगेट मदर दोन किंवा तीन बाळांना जन्म देत होती. त्यातून तिला आर्थिक फायदा होत असला, तरी तिची शारीरिक पिळवणूक होत होती. त्यामुळे सरोगट मदरला स्वतःचे मूल सोडून इतरांचे एकच मूल जन्माला घालता यावे, अशी त्यात दुरुस्ती करण्यात येत आहे. त्या संदर्भात संसदेत कायदा प्रलंबित आहे. कायद्यात काही बदल होऊन कायदा सोपा व्हावा. त्यातील बदलामुळे सरोगेट मदरसह त्या बाळाच्या पालकांनाही फायदा होणार आहे. सरोगेट मदरचा होणारा छळ यामुळे थांबेल. या कायद्याबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने कायदा प्रलंबित आहे.

प्रश्न - पीसीपीएनडीटी कायद्यातील काही तरतुदींचा डॉक्टरांना फटका बसतोय का?

‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात निश्चित काही तांत्रिक चुका आहेत. त्या चुकांमुळे डॉक्टरांना शिक्षा भोगावी लागत आहे. हे चुकीचे आहे. या तांत्रिक चुका दूर करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी आम्ही सातत्याने संपर्क करीत आहोत. त्याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडे याबाबत म्हणणे मांडले आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही सुधारणा होत नाही. याबाबत राज्य सरकारशी बोलणे केले आहे. आता त्यातून कशी सुटका होईल याकडे आमचे लक्ष आहे. प्रत्येक वेळी डॉक्टर चुकत नाहीत आणि प्रत्येक डॉक्टर लपवून सोनोग्राफी करीत नाही. काही बोगस डॉक्टर हे कृत्य करतात. त्यांच्यामुळे बाकीचे बदनाम होतात. नागरिकांच्या दबावामुळेही काही डॉक्टरांना सोनोग्राफी करून लिंगनिदान करावे लागते. त्यांच्या दबावाला काही मोजके डॉक्टर बळी पडतात. अर्थात ही गोष्ट चुकीचीच आहे.

प्रश्न - सध्या राष्ट्रीय स्त्रीरोग संघटनेपुढे कोणते आव्हान आहे?

देशातील महिलांचे आरोग्य कसे सुधारावे, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. या प्रश्नासंदर्भात संघटना काम करीत आहे. त्याशिवाय राज्य-केंद्र सरकार, वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवर महिलांच्या आरोग्याविषयी प्रयत्न करावे लागतील. देशात गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात असून त्याचा महिलांना धोका आहे. देशातील महिलांच्या मृत्यूला सर्वाधिक कारणीभूत ठरणारा हा आजार आहे. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी लसीकरणाचा उपाय आहे. मात्र, स्तनांचा कॅन्सर होऊ नये म्हणून तशी उपाययोजना नाही. स्तनांच्या कॅन्सरची वेळोवेळी तपासणी करून घेणे हाच त्यावर योग्य पर्याय आहे.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानद वन्यजीव रक्षकपदी अनुज खरे, किरण पुरंदरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वन विभाग, निसर्गप्रेमी संस्था आणि नागरिकांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मानद वन्यजीव रक्षक’ यादी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी नेचरवॉक संस्थेचे अनुज खरे आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व वनप्रदेशांसाठी एकूण ३५ वन्यजीव रक्षक निवडण्यात आले आहेत.

वन्यजीव आणि वनक्षेत्र संवर्धनाच्या कामामध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने वन विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वनक्षेत्रालगतच्या गावांतील लोकांसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या नेण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत वनक्षेत्रात उल्लेखनीय कामे सुरू आहेत. याच धर्तीवर नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि वन विभाग यांच्यामध्ये संवाद वाढवा याबाबत उपक्रम घेण्यासाठी वनविभागाने मानद वन्यजीव रक्षक ही संकल्पना पाच वर्षांपूर्वी पुढे आणली. पहिल्या फेरीत निवडण्यात आलेल्या मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ दीड वर्षांपूर्वीच संपला होता. पहिला प्रयोग यशस्वी ठरल्याने राज्य वन विभागाने नुकतीच नवीन यादी जाहीर केली आहे. या पदासाठी वन क्षेत्रात काम केलेल्या, अभ्यास असलेल्या व्यक्तीची निवड केली जाते. वन्यजीव व्यापारावर बंधन आणणे, वनसंवर्धन आणि संरक्षण, लोकसहभाग इत्यादी कामांकरिता वन्यजीव रक्षकांनी वन विभागाला मदत करणे अपेक्षित असते.

पुणे जिल्ह्यामध्ये यापूर्वी अनुज खरे आणि किरण पुरंदरे यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन वनविभागाने त्यांची फेरनिवड केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या आकारानुसार मानद वन्यजीव रक्षकांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटकंती कराच... पण काळजीही घ्या

$
0
0

भटकंती कराच... पण काळजीही घ्या

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @chaitraliMT
पुणे : हिरव्या रंगाच्या अनेक छटांनी बहरलेल्या डोंगररांगा, मनमुराद कोसळणारे धबधबे, डोंगररांगांना क्षणार्धात अदृश्य करण्याचा खेळ खेळणारे धुके अन् पावसाच्या आगमनामुळे सुरेल शीळ घालणारे पक्षी... निसर्ग सौंदर्याचे अनोखे रूप दाखविणाऱ्या पावसात सहलीला तर गेलेच पाहिजे. मनाला फ्रेश करण्यासाठी डोंगरवाटा तुडवून निसर्गात मनसोक्त भटकंती करायलाच हवी. त्यात गैर काहीच नाही; पण आपल्या आनंदावर कटू अनुभवांचे विरजण तर पडणार नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी.
पावसाळी पर्यटनाला जाण्याचा अनुभव प्रत्येकासाठी ‘रिफ्रेशिंग’ ठरतो. त्यामुळे पहिला पाऊस पडला की लोकांचे पावसाळी सहलींचे नियोजन सुरू होते. दुर्दैवाने या वाढत्या पर्यटनाबरोबरच निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनाही पुढे येतात. लोणावळ्यातील धबधब्यांमध्ये सातत्याने अपघात घडत असतात. निसर्गाच्या नियमांना तोडून केलेली चूक अनेकांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष यातून पुढे येतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला जाताना कितीही अनुभवी माणूस असला, तरी काळजी घेतलीच पाहिजे. पश्चिम घाटात अनेक मोठे धबधबे असून त्या पाण्यात खेळण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. साहस दाखविण्याच्या प्रयत्नात या धबधब्यात पाय घसरून पर्यटकांचे अपघात होतात. काही ठिकाणी हटके फोटो काढण्यासाठी पर्यटक धोका पत्करून कड्यांवर उभे राहतात, पावसाने वाटा निसरड्या झालेल्या असतात, त्यामुळे पाय घसरून पर्यटक दरीमध्ये पडल्याच्या घटनाही घडतात.
पश्चिम घाटातील पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवण्याची मजा अवर्णनीय असली, तरी या पर्यटनात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे निसर्गाच्या नियमांचे पालन करून भटकंती केली पाहिजे. सहलीला जाताना एकटे असू वा सोबत ग्रुप असो. प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. प्रशासनाने येऊन पर्यटकांनी कसे वागावे, याचे नियम शिकवण्याची वाट बघण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यटकांनीच सावध राहावे.
केवळ गिर्यारोहण आणि धबधब्यात खेळतानाच नव्हे; तर डोंगरदऱ्यांमधून गाड्या चालवतानाही सावधानता बाळगण्याची गरज आहे. पावसाळा सुरू झाला की बहुतांश घाट धुक्यात हरवून जातात. आजही आपल्याकडील अनेक घाटांना सुरक्षा कठडे अथवा रेलिंग नाहीत. जिथे आहेत, त्यांची अवस्था फार चांगली नाही. वाहनचालकांनी अनोळखी वळणांवर गाडी
चालवताना काळजी घ्यावी. गाडी चालवताना केल्या जाणाऱ्या कसरती कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. वेळ वाचविण्यासाठी अथवा वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या उद्देशाने अनोळखी वाटांवर गाडी नेणे त्रासदायक ठरू शकते. घाट रस्ता उतरताना गाडी बंद करून जाण्याची अनेकांना सवय असते, हा प्रकार धोकादायक आहे. पावसाळी पर्यटन स्वतःला आणि इतरांना
आनंद देणारे असावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात बालकांना संसर्गाचा धोका

$
0
0

सर्वत्र कोसळणारा मुसळधार पाऊस... पावसाच्या धारा अंगावर झेलत भिजण्याचा मनसोक्त घेतला जाणारा आनंद... त्यात वाफाळणारा चहा आणि कांदा भजीची चव... मग काय पाऊस हा कधी मित्र वाटतो. कधी सखा वाटतो तर कधी आपलासा वाटतो...या पावसाच्या धारा अंगावर झेलताना मात्र थोडी काळजी ही घ्यावी, असा सल्ला आता वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. विशेषतः प्रौढांपेक्षा नवजात तसेच लहान बालकांना पावसाळ्यात आजारांचा विळखा पडणे लवकर शक्य असते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची पावसाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑयस्टर अँड पर्लच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, ‘नवजात अर्भकांसह नवजात बालकांमध्ये मुळातच प्रौढांच्या तुलनेत रोग प्रतिकारशक्ती कमी असते. उन्हाळा संपून जेव्हा पावसाळा सुरू होतो, त्या दरम्यान विषाणूंचे संक्रमण होते. त्यामुळे विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने विषाणूंसह जंतूचा लहान बालकांना संसर्ग लवकर होऊन ते आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळेच नवजात अर्भकांसह लहान बालकांच्या आरोग्याची पावसाळ्यात काळजी घ्यावी.’

पावसाळी वातावरणात गारवा असतोच त्याशिवाय जंतूचा प्रादुर्भाव वाढतो. दमट वातावरणामुळे लहान मुलांना जंतुसंसर्ग तातडीने होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वाइन फ्लू, जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला, न्यूमोनिया, या आजारांची लागण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नवजात अर्भकाची काळजी

नवजात अर्भकाची काळजी घेण्याबाबत डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, ‘नवजात अर्भकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अत्यल्प असते. त्यामुळे त्यांना कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्याशिवाय धोक्यामुळे गुंतागुंत वाढण्याची भीतीही असते, म्हणून काही दिवसांच्या अथवा महिन्यांच्या नवजात अर्भकाची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. नवजात अर्भकांना उबदार, मऊ कपड्यांत ठेवणे आवश्यक असते. हातमोजे, पायमोजे, टोपी घालून त्याचे गारव्यापासून संरक्षण करणे गरजेचे अशते. दुपट्यासाठी शक्यतो मऊसूत सुती कापडाचा वापर करावा. नवजात अर्भकांना देखील सर्दी, खोकला, ताप, जुलाब होऊ शकते. विषाणूंच्या संसर्गामुळे यापैकी आजार होण्याची शक्यता असते.’

ऋतू बदलले की जंतू बदलतात आणि कमी वेळेत त्यांचा प्रसार होतो. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने नाकातील ड्रॉप, तापाचे औषध, जुलाबांसाठी प्रो-बायोटिक, डिजिटल थर्मामीटर घरात ठेवण्याची आवश्यकता आहे. ते कसे तपासावे अथवा त्याचा वापर कसा करावा हे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरवावे. नवजात अर्भकाला मातेचे स्तनपान हा उत्तम आहार आहे. बाळाला जर बाटलीतून दूध दिले जात असेल, तर बाटलीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. उकळत्या पाण्यात बाटली टाकल्याने ती निर्जंतुक होते हे समज चुकीचा आहे. योग्य स्टरिलायझेशन करावे.

लसीकरण आवश्यक

पावसाळ्यात विषाणूंचा प्रसार होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाल्यास प्रादुर्भाव वाढतो. लहान बालकांमध्ये मुळातच रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. हे या पूर्वीच स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात डेंगीचे डास, स्वाइन फ्लू, फ्लू, यासारख्या आजारांचा संसर्ग होताना दिसून येतो. बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर त्याला विविध प्रकारच्या लसी देणे आवश्यक असते. त्यावर पालकांनी लक्ष देण्याची गरज असते. लसीकरणामुळे बाळाला विविध आजारांपासून सरंक्षण मिळावे हाच त्याचा हेतू असतो. सहा महिन्यानंतर ‘स्वाइन फ्लू’ची, जन्मानंतर दीड ते दोन महिन्यात ‘रोटा व्हायरस’ ही लस द्यावी. न्यूमोनियासाठी ‘पीसीव्ही’ व टायफॉइडसाठीची वेगळी लस द्यावी. लहान बाळांना थोडेसे जरी बरे वाटत नसेल तरी बाळ चिडचिड करते. बाळ सतत रडत असेल, फिडिंग घेत नसेल, किंवा फिडिंग घेताना दमत असेल आणि झोपत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. बाळा पाणी देताना ते उकळून द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडचा वाद संपवा

$
0
0

‘पीएमपीएमएल’चा तिढा; तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेण्याची मागणी

पिंपरी : पीसीएमटी आणि पीएमटीचे विलिनिकरण झाल्यानंतर जन्माला आलेल्या पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवला नेहमीच दुर्लक्षित ठेवले गेले. या प्रकरणाला व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या येण्याने पुन्हा एकदा तोंड फुटले. पुणे व पिंपरी-चिंचवडचे कारभारी मुंढे यांच्या विरोधात एकटल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी झाली. मात्र, पुण्याच्या महापौरांनी समेट घडवून वादावर पडदा टाकला. मात्र, अद्याप पिंपरी-चिंचवडला वाद काही केल्या मिटेना. मुंढे साहेब पिंपरी-चिंचवडला यायला तयार नाहीत, त्यामुळे मुंढे यांनीच पुढाकार घ्यावा जेणेकरून यामुळे होणारी प्रवाश्यांची होरपळ तरी थांबेल.

पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या समजावून घेण्यासाठी मुंढे यांनी शहरात यावे या मागणीला केराची टोपली दाखवत मुंढे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यानंतर पुणेकर कारभाऱ्यांचा वाद सुरू झाला. मिटींगला येण्यावरून सुरू झालेला वाद डिझेल खरेदीच्या किमतीपर्यंत जाऊन पोहचला. येत्या काळात ज्या बस खरेदी करायच्या त्या देखील सीएनजीऐवजी डिझेलच हव्यात, असा काही अधिकाऱ्यांचा अट्टाहास असल्याचेही या वादातून पुढे आले आहे.

पीएमपीएमएलच्या बसगाड्यांसाठी वर्षभरापासून बाजारभावापेक्षा कमी दराने डिझेल खरेदी केले जात आहे. मात्र, आता प्रशासनाने बाजारभावानुसार डिझेल खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे काम निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने सात वर्षांसाठी देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे पीएमपीएमएलला वार्षिक दीड कोटींहून अधिक आणि सात वर्षांत साडेदहा कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. डिझेल खरेदीचे काम थेट पद्धतीने देताना प्रशासनाने संचालक मंडळाला विश्वासात घ्यावे. पीएमपीएमएलला खड्ड्यात न घालता डिझेल खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील करदात्यांच्या पैशांची बचत करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या कारभाऱ्यांकडून करण्यात आली.

पीएमपीएमएलने एचपीसीएल या इंधन पुरवठादार कंपनीकडून बाजारभावानुसार डिझेल खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे याच कंपनीने पुणे महापालिकेला प्रति लिटर डिझेलमागे बाजारभावापेक्षा ५० पैसे कमी दराने डिझेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. पुणे महापालिकेला वार्षिक २ लाख ७० हजार लिटर डिझेल लागते, तर पीएमपीएमएलला वार्षिक १० लाख लिटर डिझेलची गरज भासते, असे गणित मांडण्यात आले. यात गौडबंगाल असल्याचा आरोप देखील झाला आहे. आरोप-प्रत्यारोप होत राहतील. पण शहरातील अंतर्गत भागात नसलेल्या बस सेवेबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाहीत. मुंढे हे प्रत्येक शहरात नियुक्त झाल्यानंतर वेगळा ठसा उमटविण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांना पीएमपीएमलच्या कामकाजात खरच सुधारणा आणायची असेल आणि वेगळा ठसा उमटवायचा असेल, तर ज्यासाठी पीएमटी आणि पीसीएमटीचे विलनिकरण झाले ते सर्व प्रथम मुंढे यांनी समजवून घेणे गरजेचे आहे. पुण्याचा वाद मिटविण्यात महापौरांनी पुढाकार घेतला. पिंपरी-चिंचवडला होणारा वाद मिटविण्यास मुंढेंनी पुढाकार घेतला तर बिघडले कुठे, अशी धारणा येथील कारभाऱ्यांची झाली आहे.

समस्या समजून घ्या

पिंपरी-चिंचवडला मिटिंगला या म्हणजे मुंढे यांना कोणाच्या घरी खासगी कामासाठी जावे लागणार नाही, हे देखील त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांना बोलाविताना घरी बोलावल्यासारखे न करता शहरातील समस्या सोडविण्याच्या मुद्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या बाबींचा जरी विचार झाला तरी पीएमपीएमएलची होणारी तूट, नागरिकांच्या समस्या, अंतर्गत भागात आवश्यक असणारी बससेवा याबाबी उजेडात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खडकी बोर्डावर दिवाळखोरीची वेळ

$
0
0

जीएसटीचा फटका; प्रशासनाची दिरंगाई

राजेश माने, खडकी
देशात एक जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या झालेल्या आर्थिक नुकसानीला बोर्डाचे प्रशासन आणि प्रशासक जबाबदार ठरले आहेत. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद वेळेत केली नसल्याने ही स्थिती ओढावली आहे. केंद्र सरकारकडून बोल्डाला नुकसान भरपाई मिळाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बोर्डावर सध्या दिवाळखोरीची टांगती तलवार आहे.

वर्षाकाठी तीस कोटी उत्पन्न

राज्यात जकात वसुली सुरू झाल्यापासून खडकी कँटोन्मेंट बोर्ड पुणे महानगरपालिकेवर अवलंबून होते. पुणे महानगरपालिका जकात वसूल करायची आणि त्यातील काही हिस्सा (महिन्याला सुमारे दीड कोटी, वर्षाला १८ कोटी) देत होती. बोर्डाच्या हद्दीतील मालमत्ता कर, दुकान भाडे, आणि अन्य करांतून मिळणाऱ्या उत्पन्नातून बोर्डाचा कारभार सुरू होता. मात्र, कालांतराने हे उत्पन्न कमी पडू लागल्याने बोर्डाने २०१०मध्ये उत्पन्न वाढीसाठी कँटोन्मेंट कायद्यातील तरतुदींनुसार वाहन प्रवेश फी आकारण्यास सुरुवात केली. त्यातून बोर्डाला दरवर्षी सुमारे साडेदहा कोटी रुपये मिळत. हे उत्पन्न मिळून बोर्डाला वर्षाला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले.

जकातीचे १८ कोटी बंद

बोर्डाच्या उत्पन्नातून शिल्लक रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यात येत होती. ही गुंतवणूक सध्या ७० कोटींच्या आसपास आहे. मात्र, २०१३मध्ये जकात बंद करून सरकारने एलबीटी कर लागू केल्याने बोर्डाला पहिला फटका बसला. बोर्डाला दरवर्षी पुणे मनपा कडून मिळणारे जकातीतील उत्पन्न १८ कोटी रुपये बंद झाले. ते आजही बंद आहे. वाहन प्रवेश फीमधून साडेदहा कोटी रुपये मिळत आहेत.

एलबीटीसाठी प्रयत्न नाही

एलबीटी लागू होणार असताना खडकी कँटोन्मेंट बोर्डाने प्रस्ताव करायचा का नाही, पुणे मनपाकडून पैसे घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, खडकीला एलबीटीतून फायदा नाही, त्या निकषांमध्ये आपण बसत नाही, असे सांगून प्रशासन आणि प्रशासकांनी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकत वेळ घालवला. त्यामुळे एलबीटीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाला बोर्ड मुकले. मात्र, त्या वेळी बोर्डाला वाहन प्रवेश फीमधून मिळणारे साडेदहा कोटी रुपयांचे उत्पन्न सुरू होते. त्यामुळे जकात बंद झाली, एलबीटी मिळत नसला, तरी बोर्डाचे व्यवस्थित चालले होते. त्यातच आमदार आणि खासदारांचा फंड मिळू लागला. खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीकडे थकीत असलेली रक्कम बोर्डाला याच काळात मिळाली. त्यामुळे बोर्डाला पैशाची अडचण भासली नाही.

जीएसटीपूर्वी तरतुद नाही

गेल्या वर्षभरापासून जीएसटी कर लागू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत होते. त्यासाठी जीएसटी काउंसिलची स्थापना झाली. पहिल्या काही बैठकांमध्ये कँटोन्मेंटची बाजू मांडणारा कोणताही प्रतिनिधी यामध्ये नव्हता. त्यामध्ये कँटोन्मेंटचे प्रतिनिधी म्हणून दिल्ली येथील महासंचालकांचा समावेश केला गेला. त्यातून कँटोन्मेंटचे काही मुद्दे चर्चेत आले. मात्र, ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

जीएसटीमुळे साडेदहा कोटी बंद

खडकी बोर्डाकडे वाहन प्रवेश फीचे काय होणार, याबाबत निश्चित निर्देश ३१ जूनपर्यंत नव्हते. रात्री बारा वाजता सर्व फी कलेक्शन नाके बंद करण्याचे आदेश आले. ही वसुली बंद झाल्याने बोर्डाला वर्षाला साडेदहा कोटींचा फटका बसला आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. मात्र, सध्या तरी बोर्डाकडे इतर कोणताही उपाय नाही.

पुणे कँटोन्मेंट आघाडीवर

जीएसटी लागू झाला. वाहन प्रवेश फी बंद झाली. त्याच दिवशी पुणे कँटोन्मेंटने तातडीची बैठक बोलवली आणि या विषयावर चर्चा केली. मात्र, खडकीत तसे काही झाले नाही. बोर्डाचे सीईओ आणि काही नगरसेवकांनी बंद खोलीत चर्चा केली.

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोध आणि बचावकार्य २४ तास

$
0
0

शोध आणि बचावकार्य २४ तास

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet : @PrasadPawarMT
पुणे : निसर्गात घडणाऱ्या अपघातांमध्ये अनेकदा बचावकार्य आणि शोधमोहिमा विविध प्रकारच्या अडचणींमुळे दीर्घकाळ चालतात. अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळाली, तर अनेक जीव वाचू शकतात. शोध आणि बचावकार्याचा वेग वाढविण्याच्या हेतूने गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगतर्फे ‘महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर’ या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. त्यासाठी ७६२०२३०२३१ हा मदत क्रमांक चोवीस तास सुरू करण्यात आला आहे.
पदभ्रमण, गिर्यारोहण, विकेंड ट्रेक अशा उपक्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दरवर्षी धबधब्यात वाहून जाणे, दरीत पडणे, पोहताना बुडून मृत्यू अशा प्रकारच्या घटना कानी येतात. अपघात घडल्यावर तातडीने मदत उपलब्ध होत नाही. पोलिसांकडून शोध आणि बचावकार्य करणाऱ्यांची टीम (रेस्क्यू ऑपरेशन) येईपर्यंत अनेकदा उशीर होतो. अनेकदा अपघात घडलेले ठिकाण आणि रेस्क्यू करणारे यांच्यातील अंतर, मग ठिकाण शोधण्यासाठीची धडपड, तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ या विलंबामुळेच अपघातात कुणी वाचण्याची शक्यताही धूसर होते. अशा दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शोधणेही नंतर अवघड होऊन बसते.
या पार्श्वभूमीवर अपघातांमध्ये बचावकार्य आणि शोध मोहिमा राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागांतील गिर्यारोहण संस्था आणि व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगतर्फे ‘महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर’ हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थेचे संचालक उमेश झिरपे यांनी सांगितले. शोध आणि बचाव कार्याचे प्रयत्न सध्या विखुरलेल्या स्वरूपात सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणि योग्य समन्वय आणल्यास हे काम संघटितपणे होईल आणि अपघातग्रस्तांना अत्यंत प्रभावीपणे आणि वेगात मदत पोहोचणे शक्य होणार आहे. या विचारातूनच केंद्रीय शोध आणि बचाव व्यवस्था सुरू केली आहे. २४ तास मदत क्रमांकामुळे रेस्क्यूसाठी कॉल आला की संबंधित अपघाताचे ठिकाण आणि व्यक्तींचा तपशील तातडीने अपघाताच्या सर्वांत जवळ असणाऱ्या रेस्क्यू टिमला कळविला जाईल आणि त्यामुळे मदत वेळेवर पोहेचेल, असेही झिरपे म्हणाले.
…………..
स्वयंसेवकांनाही विमा संरक्षण
महाराष्ट्र माउंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरच्या (एमएमआरसीसी) माध्यमातून गिर्यारोहण संस्था, व्यक्ती तसेच ग्रामीण भागातील स्थानिकांच्या माहितीचे संकलन केले जाणार आहे. बचावकार्यासाठी लागणारी साधनसामग्री, बचावकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना विमा संरक्षण, २४ तास मदत केंद्र, अपघातग्रस्त व्यक्तीचे तसेच बचावकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे लाइव्ह ट्रॅकिंग अशा सुविधाही या केंद्रातर्फे राबविण्यात येणार आहेत. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यासाठी ७७६७०३१९७५, ९८२२३२३१४७ या मोबाइलवर अथवा ggimpune@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचे अप्रूप नसलेला प्रदेश

$
0
0

मयुरेश प्रभुणे, लेह-लडाख
यंदाचा मान्सून समाधानकारक राहणार की नाही याची देशभरातील शेतकऱ्यांना चिंता लागलेली असतानाच मान्सूनच्या उत्तर सीमेवर म्हणजेच जम्मू-काश्मीर राज्यामध्ये मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे. या वर्षी हिवाळ्यात भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे झेलम आणि सिंधू नदीच्या खोऱ्यातील शेतकरी यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये समाधानकारक पिक हाती येणार म्हणून खुषीत आहे.

मान्सूनने शनिवारी (एक जुलै) जम्मू-काश्मीरच्या बहुतांश भागात प्रवेश केला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. जम्मू हा हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेश वगळता काश्मीर आणि लडाख या भागांतील शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाचे विशेष अप्रूप नाही. हिमालयाच्या पर्वतरांगांवर हिवाळ्यात जमा झालेल्या पुरेशा बर्फामुळे झेलम आणि सिंधूच्या खोऱ्यातील लहान-मोठ्या नद्या, ओढे-नाले सध्या खळखळून वाहत आहेत. लडाख आणि काश्मीर भागांतून प्रवास करताना जून अखेरीसच डोंगर पायथ्याशी बहरलेली शेते या भागाचे भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय वेगळेपण दाखवून देतात. लडाखमध्ये बार्ली, गहू, तसेच बटाटा, वाटाणा, शेलगम आदी भाज्यांचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. काश्मीरमध्ये नदीकिनारी भात, केशर, तर उंच प्रदेशांत सफरचंद, जर्दाळू, अक्रोड, आदींची लागवड केली जाते.

मान्सूनचे वारे या भागात पोचत असले, तरी काश्मीर आणि लडाखला मिळणाऱ्या पाण्यामध्ये मान्सूनकडून मिळणाऱ्या पाण्याचा वाटा बराच कमी आहे. हिवाळ्यात पर्वतरांगांच्या माथ्यावर पडणारा बर्फ वितळून काश्मीर आणि लडाखमध्ये उन्हाळ्यात झरे वाहू लागतात. डोंगरउतारावर याच झऱ्यांचे पाणी अडवून लडाखमध्ये, तर काश्मीरमध्ये डोंगर उताराप्रमाणेच झेलम नदीच्या दुतर्फा शेती केली जाते. शेतीसाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे येथील शेतकरी मान्सूनवर विशेष अवलंबून नाही.

जम्मू- काश्मीरमधील पावसाबाबत श्रीनगर येथील हवामानशास्त्र केंद्राचे प्रमुख सोनम लोटस म्हणाले, ‘जम्मूमध्ये वार्षिक पावसापैकी ७१ टक्के पाऊस मान्सून काळात पडतो. मात्र, काश्मीर खोऱ्यात हेच प्रमाण २८ टक्के इतके कमी होते. लडाखचा बहुतांश भाग अतिउंचावर येत असल्यामुळे त्या भागात पावसाचे प्रमाण एकंदरीतच कमी आहे. एकाच राज्यातील जम्मू, काश्मीर आणि लडाख या तीन प्रदेशांमध्ये तीन भिन्न स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळतो. त्याला अनुसरूनच या तिन्ही भागांतील जनजीवन आणि जैवविविधताही भिन्न आहे.’

ते म्हणाले, ‘या वर्षी हिवाळ्यात काश्मीर आणि लडाखमध्ये पाच ते सहा फूट बर्फ पडला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच असल्यामुळे झेलम आणि सिंधूच्या खोऱ्यातील शेतकरी समाधानी आहेत. या उपलब्ध पाण्याव्यतिरीक्त मान्सून काळात मोठा पाऊस झाला तर मात्र आपत्ती व्यवस्थापनासाठी पावले उचलावी लागू शकतात.’

प्रोजेक्ट मेघदूतचे सातवे वर्ष

प्रोजेक्ट मेघदूत या मान्सूनचा सर्वंकष अभ्यास करणाऱ्या प्रकल्पांतर्गत यंदा जम्मू, काश्मीर आणि लडाख या मान्सूनच्या उत्तर सीमेवर असणाऱ्या प्रदेशांतील पावसाचा तेथील जनजीवनावर आणि निसर्गावर होणारा परिणाम अभ्यासण्यात येत आहे. जम्मू या हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेशापासून, झेलमकाठी विकसित झालेले काश्मीरचे खोरे आणि लडाख या देशातील सर्वात थंड आणि कोरड्या प्रदेशापर्यंत मान्सूनच्या सोबतीने प्रोजेक्ट मेघदूताचा प्रवास होत आहे. प्रोजेक्ट मेघदूतचे यंदा सातवे वर्ष असून, पुण्यातील सहा अभ्यासक या अभ्यासदौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत.
(क्रमशः)




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रायोगिकवाल्यांनी प्रेक्षकांना वळण लावावे

$
0
0

ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास भणगे यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘प्रायोगिक नाट्य चळवळीतील मंडळींनी व्यावसायिक नाटक केले पाहिजे. या चळवळीतील मंडळींनी केवळ प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षक घडवू नये. हा प्रेक्षक वर्ग केवळ प्रायोगिकपुरता न ठेवता व्यावसायिक नाटकांच्या प्रेक्षकांनाही वळण लावले पाहिजे. हे काम केवळ प्रायोगिक व समांतर रंगभूमीवरीलच लोक करू शकतात,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास भणगे यांनी रविवारी केली.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व दिग्दर्शक मोहित टाकळकर यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे, नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचाही विशेष सत्कार झाला. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख उपस्थित होते.

‘व्यक्तिरेखा बटाटेवड्यासारख्या नसतात. त्या खारीसारख्या असतात कारण व्यक्तिरेखेलाही पापुद्रे व गाभा असतो. अभिनेत्याचे काम संपेपर्यंत दिग्दर्शकाच्या पोटात गोळा असतो,’ याकडे लक्ष वेधून भगणे म्हणाले, ‘मोहनने साकारलेली मोरूची मावशी श्रेष्ठ वाटते. मोहनने साकारलेली मावशी ज्याने पाहिली नाही, त्याने त्याचे काहीच काम पाहिलेले नाही, असे म्हणता येईल. स्त्री भूमिका करणे अवघड काम आहे. आज मात्र पुरुषाने साडी नेसून भूमिका करण्याचे पेव फुटले आहे. दिग्दर्शक अभिनेत्याला घडवतात; पण अभिनेताही दिग्दर्शकाची दृष्टी बदलू शकतो हे मोहनने दाखवून दिले. तो एकपाठी नट आहे.’

‘पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपण कुठपर्यंत पोहोचलो, इतक्या वर्षांत काय काम केले याची चिकित्सा केली. प्रायोगिक रंगभूमीवर धोका पत्करून २००३पासून निर्मिती करत आहोत,’ अशी भावना मोहितने व्यक्त केली. ‘मी तरुणपणात अभिनय केला आहे. अभिवाचन केले आहे. नंबर हुकला तरी प्रशस्तीपत्र मिळाले. अभिनयाचा मोठा फायदा राजकारणात झाला. अभिनय आल्याशिवाय नेता घडत नाही,’ असे पवार यांनी सांगताच सभागृहात हशा-टाळ्यांचा पाऊस बरसला. उत्तरार्धात मोहन जोशी यांच्याशी राजेश दामले, ज्योती चांदेकर व सुहासिनी देशपांडे यांनी संवाद साधला. दादा पासलकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

$
0
0

समाजकल्याण वसतिगृहात मेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या नवीन वसतिगृहात गेल्या दोन दिवसांपासून मेस बंद आहे. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबरोबरच दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे विद्यार्थी अन्नपाण्याशिवायच होते. या विरोधात विद्यार्थ्यांनी रविवार सकाळपासून आंदोलन केल्यानंतर दुपारी प्रशासनाला जाग आली. त्यानंतर त्यांच्यासाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

समाजकल्याण आयुक्तालयाच्या परिसरातील संत ज्ञानेश्वर वसतिगृहातील विद्यार्थी विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात हलविण्यात आले आहेत. येथील मेसचे कंत्राट ‘बीव्हीजी इंडिया’ कंपनीला देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच शुक्रवारपासून हे कंत्राट संपुष्टात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता येथील मेस बंद ठेवण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांनी या वेळी केला. या वसतिगृहात ३० विशेष मुले असून, त्यात अंधांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मेस तातडीने सुरू व्हावी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागण्यांसाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग येऊन तत्काळ मेस सुरू करण्यात आली, तसेच पाण्याचीही व्यवस्था केली. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त हरिष डोंगरे यांनी सायंकाळी वसतिगृहाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. तसेच, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील सायंकाळी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली मेस आणि तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांते हाल झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मेस आणि पाणी याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे रेक्टरकडून दुर्लक्ष करण्यात आले, असे अंध विद्यार्थी दीपक ढोकळे याने सांगितले.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मेस बंद असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार झाली. अन्य दिवशी मिळणाऱ्या जेवणाचा दर्जाही चांगला नसतो. याबाबत तक्रार केली, तर रेक्टर दुर्लक्ष करतात. काही अडचण आल्यास त्याबाबत माहिती देण्यासाठी फोन केल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्याकडून फोन घेतला जात नाही. त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

सध्या मेसची तात्पुरती व्यवस्था केली आहे. येत्या चार दिवसांत वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवण, पिण्याचे पाणी, शालेय साहित्य, व्यायामासाठी साहित्य आदी प्रश्न सोडविले जातील. त्याबरोबर या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात वाहतुकीची कोंडी

$
0
0

पर्यटकांची गर्दी; वाहनांच्या नऊ किमीपर्यंत रांगा

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पर्यटकांचे आकर्षण असलेला लोणावळ्यातील भुशीडॅम भरून वाहू लागल्यानंतर रविवारी या ठिकाणासह लोणावळा, खंडाळा, तसेच मावळातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाहनांमुळे रविवारी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गासह भुशीडॅमकडे जाणाऱ्या मार्गावर दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका एसटीसह इतर प्रवासी वाहतुकीला बसला.

पर्यटकांच्या संख्येत दुपारनंतर वाढ झाल्याने वाहतूक ठप्प होऊन सुमारे ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागील रविवारपासून लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळ्यातील भुशीडॅमच्या सांडव्यावरील पायऱ्यांवरून पाणी जोरात वाहू लागले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी वर्षाविहार आणि पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी येथील सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी गर्दी केली होती. लोणावळ्यातील टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची हे पॉइंट, तसेच गिधाड तलाव आणि धबधबा, कार्ला, भाजे, बेडसे लेणी, पवना धरण परिसर, तुंगार्ली, लोणावळा, वलवण, शिरोता आणि उकसान या धरण परिसरासह लोहगड, विसापूर, कोराईगड, राजमाची, तुंग, तिकोना हे गड किल्ले पर्यटकांच्या गर्दीने गजबजले होते.

पाणीसाठ्यात वाढ

लोणावळ्यात मागील २४ तासांत ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या सात दिवसांत लोणावळ्यात १४३२ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या याच काळात ४५८ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पवनासह सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

एक्स्प्रेस वेवरही वाहने वाढली

पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहनांच्या संख्येत मोठी मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गासह भुशी, टायगर पॉइंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. लोणावळा व खंडाळ्यातील अंर्तगत रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने स्थानिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. दिवसभर चारचाकींसह दुचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय होती.

वाहतूक कोंडीची गंभीरता लक्षात घेऊन लोणावळा शहर पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजता ध्वनिक्षेपकाद्वारे भुशी डॅमकडे जाणाऱ्या पर्यटकांना सूचना दिल्या. पर्यटकांनी भुशीडॅम, टायगर, लायन्स पॉइंटऐवजी इतर पर्यटनस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. भुशीडॅमकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. रविवारी रात्री उशिरा वाहतूक कोंडीचे सुटल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यासाठी हवीत ‘अश्रूंची फुले’

$
0
0

Surendra.Dol@timesgroup.com
Tweet : @SurendraDolMT

सूरत येथे देशातील पहिला ‘हेल्दी क्राइंग क्लब’ सुरू

पुणे : मनात साचलेले दुःख आणि नैराश्य रडण्याद्वारे दूर करून मोठ्या आजारांना दूर ठेवता येते, या विश्वासातून गुजरातमधील सूरत येथे भारतातील पहिला ‘हेल्दी क्राइंग क्लब’ सुरू झाला आहे. महिन्यातील एका रविवारी या क्लबचे सदस्य एकत्र येऊन रडण्याच्या सत्रात सहभागी होणार आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या क्लबच्या पहिल्या सत्रात ८० जणांनी सहभागी नोंदवला.

सूरत येथील हास्योपचार तज्ज्ञ कमलेश मसालावाला यांनी हा ‘हेल्दी क्राइंग क्लब’ सुरू केला आहे. ‘माणसाला जीवनात हसण्याची जितकी गरज आहे, तितकीच दुःख हलके होण्यासाठी रडण्याचीही गरज आहे. मूल जन्माला आल्यावर प्रथम रडल्यानंतर त्याची तब्येत चांगली असल्याचे मानले जाते. समाजात रडण्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. घरात लहान मुलगा रडत असल्यास मुलींसारखा काय रडतोस, अशी शेरेबाजी पालक करतात. मात्र, मनावरील ताण हलका होण्यासाठी रडणे आवश्यक आहे,’ असे मसालावाला यांनी ‘मटा’ला सांगितले.

‘मनात दाबून ठेवलेले दुःख एखाद्या बाँबसारखे असते. त्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. खूप ताण आल्यास एकांतात किंवा विश्वासू व्यक्तीपाशी मन मोकळेपणाने रडणे गरजेचे ठरते. रडताना अश्रूंच्या रूपाने एकप्रकारे शरिरातील विषद्रव्येच बाहेर पडतात,’ असेही मसालावाला म्हणाले. आनंदी जीवन आणि आरोग्यासाठी ‘हास्ययोग’ची संकल्पना देशात रुजली आहे. मात्र, हसण्यासोबतच रडणेही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आत्महत्या किंवा सूडाचा विचार मनात आलेल्या व्यक्तीने जवळच्या माणसाजवळ रडून मन मोकळे केल्यास वाईट विचारांचा निचरा होईल, असेही त्यांनी सांगितले.

सूरतमध्ये सुरू झालेल्या या क्राइंग क्लबमध्ये शहरातील दहा डॉक्टरही सहभागी झाले आहेत. क्लबच्या पहिल्या बैठकीत ‘सायलेंट क्राइंग’ म्हणजेच डोळे बंद करून आवाज न करता रडण्याचे सत्रही घेण्यात आले. सदस्यांच्या रडण्याच्या आवाजाचा इतर नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी क्लबचे सत्र बंदिस्त जागेत घेतले जाणार आहे. सूरतमधील ‘माँ वैष्णव
शक्तिधाम मंदिरा’च्या हॉलमध्ये हा क्लब भरणार आहे. ‘फ्रॉम टियर्स टू चियर्स’ असे क्लबचे सूत्र आहे. स्पर्धेच्या युगात अनेकांना ताणतणावास सामोरे जावे लागते. त्या संदर्भात केलेल्या संशोधनातून ‘हेल्दी क्राइंग क्लब’ची कल्पना सूचल्याचे मसालावाला म्हणाले.

आणखी संशोधन करणार

महिलांच्या तुलनेत पुरुष मनातील ताण आणि दुःख अधिक दाबून ठेवतात. मनावरील संस्कार; तसेच सामाजिक समजुतींमुळे हे घडते. त्या पार्श्वभूमीवर महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हार्ट अॅटॅकचे प्रमाण अधिक असल्याकडे कमलेश मसालावाला यांनी लक्ष वेधले. ‘हेल्दी क्राइंग क्लब’च्या माध्यमातून या विषयावर आणखी संशोधन करण्यात येणार आहे. सूरतमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. निर्मल चोरडिया यांनी त्यासाठी डॉक्टरांची टीम तयार करण्यास पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्यापासून या अभ्यासाला सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीमुळे महागली चितळेंची बाकरवडी

$
0
0

पुणेः दुपारी एकच्या ठोक्याला कितीही गर्दी असली तर बंद होणारे ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे दुकान शनिवारी दुपारी बंद झाले नाही. या बदलाचे स्वागत करण्यासाठी अनेक ग्राहकांनी ठरवून दुपारी जाऊन दुकानात खरेदी केली. काळानुसार बदल करून दुपारी १ ते ४ या वेळेत दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय चांगला आहे, अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली. दरम्यान, वस्तू व सेवा कर लागू झाल्याने चितळेंची प्रसिद्ध बाकरवडीही महागली आहे.

बाकरवडीची किंमत वीस रुपयांनी महागली असून, यापुढे तीनशे रुपये किलो दराने बाकरवाडी मिळणार आहे. ग्राहकांच्या आग्रहास्तव ‘पुणेरी’ सवय मोडून पुण्यातील काही शाखा १ जुलैपासून दुपारी सुरू राहतील, असे ‘चितळे बंधू’ यांचे इंद्रनील चितळे यांनी दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार पुण्यातील डेक्कन जिमखाना, सहकारनगर आणि पौड रोड येथील चितळे यांच्या शाखा शनिवारी दुपारी बंद झाल्या नाहीत. बदलेली वेळ नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरल्याने पहिल्याच दिवशी काही उत्साही नागरिक आवर्जून दुपारी दुकानात खरेदीसाठी गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजर फेकल्याच्या वादातून महिलेची हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी-चिंचवड

मांजर घराबाहेर का फेकले? या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरीतील या घटनेनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

या वादात ठार झालेल्या प्रभा रंगपिसे या महिलेची मांजर रविवारी, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या साळवे यांच्या घरी गेले होते. साळवे कुटुंबिय जेवत असताना मांजराने जेवणाच्या ताटात तोंड घातले. त्यामुळे संतापलेल्या साळवेंनी मांजर घराबाहेर फेकले.

त्यावेळी प्रभा रंगपिसे यांचे नातेवाईक दादू खालसे याप्रकाराचा जाब विचारण्यासाठी साळवेंच्या घरी गेले. त्यावेळी दोन शेजाऱ्यांमध्ये टोकाचे वाद झाले. या भांडणात राजू नंदकिशोर साळवे आणि अन्य तिघांनी प्रभा रंगपिसे यांना लाथाबुक्या, लाकडी बांबू, सीव्हीसी पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रभा रंगपिसे यांचा मृत्यू झाला. तर, अजय रंगपिसे, ऋतिकेश रंगपिसे आणि दादू खलसे या मारहाणीत जखमी झाले.

पोलिसांनी याप्रकरणी अमोल बालगुडे, गणेश पाटील, आकाश मोंडे आणि राजू साळवे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान ३०२, ३२४,३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन शेजाऱ्यांमध्ये याआधीदेखील वाद झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे : दीक्षिताला हवीय समाजाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिस्थितीचा बाऊ दीक्षिताने कधीच केला नाही. आई-वडिलांच्या प्रयत्नांची साथ होतीच. त्या जोरावर तिनेही आव्हाने समर्थपणे पेलली आणि दहावीत चांगले यश मिळवले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनतीची तिची तयारी आहे. गरज आहे, ती समाजाच्या साथीची.

मांडवकर कुटुंब मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील केंभुर्ले या गावचे. गावात तशा फार सुविधा नाहीत. दीक्षिताचे वडील दिलीप मांडवकर कामाच्या शोधात पुण्यात आले. गावाकडे शेती आहे; पण ती असून नसल्यासारखी. महिना दहा हजार रुपयांत घरखर्च भागवून मांडवकर यांनी मुलींचे शिक्षण सुरू ठेवले आहे. परिस्थितीचा बाऊ करून ते थांबवलेले नाही. आई-वडिलांच्या प्रयत्नांना या मुलीही समर्थपणे साथ देत आहेत. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या जिद्दीने शिकत आहेत.

दीक्षिता ही शुक्रवार पेठेतील डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी. शालेय जीवनातच तिने आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली. इयत्ता नववीत तिने ८८ टक्के गुण मिळवले होते. दहावीला तिने ९०.८० टक्के गुण मिळवून यशाच्या मार्गावरील घौडदौड सुरू ठेवली आहे.

‘घर ते शाळा हे अंतर फार असल्याने मला सकाळी नऊ वाजताच निघावे लागत असे. शाळेतून घरी यायला संध्याकाळचे सात वाजायचे. त्यानंतर रात्री, पहाटे, जसा वेळ मिळेल, त्या पद्धतीने अभ्यास करत गेले. शिकवणी न लावता स्व-अध्ययन केले. शिकवणीचा आर्थिक भार मला कुटुंबावर टाकायचा नव्हता. मला कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. शिक्षण घेऊन कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे...’ असे दीक्षिता सांगते. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती तिच्या शब्दा-शब्दातून जाणवते. ‘उत्पन्न फारसे नसले, तरी तिन्ही मुलींना शिकविण्याची इच्छा आहे. प्रसंगी आणखी कष्ट करत राहू; पण मुलींचे शिक्षण सुरू ठेवणार आहोत,’ हे तिच्या वडिलांचे उद्‍गार त्यांच्या प्रगल्भतेतीच साक्ष देतात.

मांडवकर कुटुंबाची परिस्थिती सर्वसाधारण आहे. दीक्षिता परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत आहे. शाळेतील तिची वर्तणूक खूपच चांगली होती. ती नम्र आणि कष्टाळू मुलगी आहे. तिला आर्थिक मदतीचे बळ मिळाले, तर ती नक्की चांगले करिअर करून दाखवेल.

- आशालता ससाणे, वर्गशिक्षिका, डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन शाळा

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : नऱ्हे गावात एका उंच आणि धोकादायक टेकडीवरील चाळीत मांडवकर कुटुंब वास्तव्य करते. म्हणायला दोन खोल्यांचे घर; पण तशी ती एकच खोली. घरात नवरा, बायको आणि तीन मुली. कमावती व्यक्ती एकच. घरात कुणीच शिकलेले नाही; पण या तीन मुली आपण सावित्रीच्या लेकी असल्याचे सिद्ध करू पाहताहेत. दीक्षिताचे गुण आणि उच्च शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध करण्याची तिची जिद्द हेच दर्शवते. प्रतिकूल परिस्थितीत दीक्षिताने ९० टक्के गुण मिळवून यशाचा रस्ता तर आखला आहे; पण तिच्या स्वप्नांना गरज आहे ती सुजाण लोकांच्या मदतीची.

दिलीप मांडवकर हे रत्ना हॉस्पिटलमध्ये गेली दहा वर्षे ऑपरेटर म्हणून काम करीत आहेत. दीक्षिता ही त्यांची द्वितीय कन्या. तिला कम्प्युटर इंजिनीअर होऊन कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे. तिच्या दोन बहिणीही याच विचारांनी शिक्षण घेत आहेत. थोरली दीप्ती ही बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे, तर धाकटी दिव्या आठवीत आहे. तिन्ही मुलींचे शिक्षण व्हावे, म्हणून झटणारे दिलीप मांडवकर आणि त्यांची पत्नी दीपाली मांडवकर फार शिकलेले नाहीत; पण मुलींना शिकवायचे आहे, ही अत्यंत प्रगल्भ जाणीव ते बाळगून आहेत. ती सत्यात उतरण्यासाठी गरज आहे, ती त्यांचे हात बळकट करण्याची.

घर ते शाळा हे अंतर फार असल्याने मला सकाळी नऊ वाजताच निघावे लागत असे. शिकवणी न लावता स्व-अध्ययन केले. शिकवणीचा आर्थिक भार मला कुटुंबावर टाकायचा नव्हता. मला कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. शिक्षण घेऊन कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे...

- दीक्षिता मांडवकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी जागांच्या स्वच्छतेपायी दोन कोटींचा भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड करण्यात आलेल्या औंध, बाणेर, बालेवाडी भागातील पडीक हद्दीच्या साफसफाईसाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ज्या मालकांच्या या जागा आहेत, त्यांनी याची स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना केवळ स्मार्ट सिटीचा भाग स्वच्छ दिसावा यासाठी हा अट्टहास केला जात आहे. परिणामी याचा बोजा पुणेकरांच्या माथी‌ पडणार आहे.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून स्मार्ट सिटी योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये ‘एरिया डेव्हलपमेंट’ या उपक्रमांतर्गत औंध, बाणेर, बालेवाडीमधील भागाची निवड करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक आठ आणि नऊमध्ये प्रामुख्याने हा भाग येतो. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीसीएल) या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी तब्बल ३ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही या भागातील कचरा अजूनही महापालिकेच्या माध्यमातूनच उचलला जात आहे. त्यातच आता या भागातील पडीक जागांची स्वच्छता करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय अंतीम मंजुरीसाठी येणार असून, त्यावर समितीच्या बैठकीत मतदानाद्वारे निर्णय होण्याची शक्यता आहे.
.....
प्रस्तावाची उलटसुलट चर्चा
संपूर्ण शहरातील पडीक जागेतील स्वच्छतेसाठी संपूर्ण वर्षभरात एका क्षेत्रीय कार्यालयाला सर्वसाधारण एक कोटी रुपये खर्च येतो. मात्र, केवळ दोन प्रभागांसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यास पालिका तयार असल्याने यामध्ये नक्की कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, याची उलटसुलट चर्चा पालिकेत सुरू आहे. या कामासाठी पालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत सर्वच ठेकेदारांनी जादा दराने निविदा भरल्या आहेत. या दोन प्रभागांचे झाडणकाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा या २१ ते ४० टक्के जादा दराने आहेत. त्यामुळे २१ टक्के दर देणाऱ्या ठेकेदाराबरोबर तडजोड करून १० टक्के जादा दराने ही निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालभारती रस्त्यासाठी आज आढावा बैठक

$
0
0

स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वे रोड आणि लॉ कॉलेज रोडवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी आज, मंगळवारी स्थायी समिती अध्यक्षांकडे महत्त्वाची बैठक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर राहिलेल्या या रस्त्याला आता तरी गती मिळणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

कोथरूड-कर्वे रोडवरील नागरिकांना सेनापती बापट रोड-चतुःशृंगीकडे सहज जाता यावे, यासाठी या रस्त्याची संकल्पना मांडण्यात आली होती. महापालिकेने डोंगराच्या बाजूने सुचविलेल्या रस्त्याच्या आखणीबद्दल (अलायनमेंट) आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे, अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे. राज्य सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या शहराच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) बालभारती-पौड फाटा रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. हा रस्ता झाल्यास अनेक वाहनचालकांचा वेळ वाचण्याची शक्यता असल्याने स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज, मंगळवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला विधी आणि पथ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी सादर केलेल्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये पौड रोड-कर्वे रोडवर मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे, रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी बंद करावा लागणार असल्याने इतर पर्यायी मार्गांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. बालभारती-पौड फाटा रस्त्याचे काम गतीने करता आले, तर कदाचित हा ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी पालिकेने यापूर्वीच काही प्रमाणात भूसंपादन केले असल्याने हा रस्ता त्वरेने मार्गी लावता येईल का, याची चाचपणी मंगळवारच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याची टीका सातत्याने केली जात आहे. त्यामुळे, त्याचाही आढावा घेण्यात येणार आहे.

..............


राजकीय इच्छाशक्तीची एकजूट

महापालिकेतील एखाद्या योजनेच्या किंवा प्रकल्पाच्या कामात राजकीय पक्षांची भूमिका वेगवेगळी असते. बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत पालिकेतील विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष किंवा यापूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या सर्वांची भूमिका रस्त्याच्या बाजूने आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचाही या रस्त्याला पाठिंबा असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा सदुपयोग करून घेऊन हा रस्ता तातडीने मार्गी लागावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images