Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तुकाराम मुंढेंची बदली नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी असून त्यांची ‘पीएमपी’ला गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली करू नये,’ अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. भाजपचे पदाधिकारी मुंढे त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी करीत असताना खासदार अनिल शिरोळे गप्प का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) राजकीय कोंडी करण्याची कोणतीही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसल्याचे चित्र गुरुवारी महापालिकेत दिसले. महापौर मुक्ता टिळक यांनी बोलावलेल्या बैठकीस मुंढे यांनी पाठ फिरवल्याने मुंढे यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर तुपे यांनी मुंढे यांचा बैठकीला उपस्थित न राहिल्याने निषेध केला. मात्र, मुंढे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी असून त्यांची ‘पीएमपी’ला गरज आहे. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांची बदली करू नये, अशी मागणी तुपे यांनी केली. मात्र, मुंढे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील राजकीयवादामुळे पुणेकरांना वेठीस धरले जात असून आधी पुणेकरांना, विद्यार्थ्यांना चांगली बस सेवा पुरवावी आणि त्यानंतर भाजप-मुंढे यांनी वाद घालावेत, असे टोलाही तुपे यांनी लगावला.

मुंढे यांना परत बोलवावे : काँग्रेस

मुंढे यांना सरकारने परत बोलवावे. मुंढे यांनी महापौरांचा अवमान केला असून, काँग्रेस त्यांच्या या वागण्याचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांना परत बोलवावे, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केबल टेंडरच्या वैधतेबाबत प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या २२५ कोटी रुपयांच्या निविदांच्या वैधतेबाबत महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केसे आहे. ‘ही निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यास या निविदांच्या वैधतेबाबत गंभीर स्वरूपाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो’, असा अभिप्राय मुख्य विधी सल्लागारांनी पाणी पुरवठा विभागाला पाठवला आहे.

पाणीपुरवठा योजनेत ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी २२५ कोटी रुपयांची निविदा ‘एस्टिमेट कमिटी’ची मान्यता नसतानाही काढण्यात आल्या होत्या. या निविदांवरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. सलग झालेल्या दोन ‘इस्टिमेट कमिटी’च्या बैठकांमध्ये या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यात विधी विभागाने या निविदांना मंजुरी देण्याबाबत शंका उपस्थित केल्याने शुक्रवारी होणाऱ्या ‘एस्टिमेट कमिटी’च्या बैठकीत काय निर्णय होणार, याची पालिकेत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विरोधकांनी ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी २२५ कोटी रुपयांची निविदांविरुद्ध आवाज उठविल्यानंतर ही निविदा मंजुरीसाठी ‘इस्टिमेट कमिटी’समोर मे महिन्यात पहिल्यांदा ठेवण्यात आली होती. मात्र, मुळातच एवढ्या मोठ्या रकमेच्या निविदेला स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याचा शेरा ‘एस्टिमेट कमिटी’ने नोंदविला होता.

पुणे शहरासाठी चोवीस तास समान पाणी पुरवठा करण्यासाठीच्या कामात ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्याच्या अतिरिक्त निविदा या शहर सुधारणा समिती, स्थायी समिती, मुख्य सर्वसाधारण सभा यांची मान्यता न घेता काढण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सात मार्च रोजी दिलेल्या तोंडी आदेशानुसार हे काम समाविष्ट करण्यात आले असल्याचा उल्लेख या विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायामध्ये नोंदवण्यात आला आहे.

मुख्य विधी सल्लागारांनी आपला अभिप्राय पूर्ण करताना याबाबत स्पष्ट मत नोंदवले आहे. ‘प्राप्त परिस्थितीत असलेल्या निविदेमध्ये ऑप्टिकल फायबर केबल डक्ट’च्या रूपाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेले काम गरजेचे असले तरी नमूद केल्याप्रमाणे त्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे. या निविदेच्या वैधतेबाबत गंभीर स्वरूपाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असे आमचे मत आहे,’ असा अभिप्राय विधी सल्लागारांनी १२ जून रोजी पाणी पुरवठा विभागाला पाठवला आहे.


‘प्रक्रिया पूर्ण’

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे काम करू.

- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीला ‘जीएसटी’चा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जीएसटी’मुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढतील या भीतीपोटी आणि दुकानांतील ‘स्टॉक क्लिअर’ करण्यासाठी विक्रेत्यांच्या ‘ऑफर्स’मुळे ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानात गर्दी केली आहे. ‘जीएसटी’च्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंच्या खरेदीला वेग आला असून एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनसारख्या वस्तूंना मागणी आहे.
कडधान्यांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत आणि इलेक्ट्रिक वायरपासून ते इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूपर्यंत विविध वस्तूंवर जीएसटी लागणार आहे. या कराच्या अंमलबजावणीमुळे पुणेकरांच्या पोटात गोळा आला आहे. कोणत्या वस्तूंच्या किंमती वाढणार आणि कोणत्या वस्तू स्वस्तात मिळणार या विचाराने ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळे नव्याने खरेदी करण्याच्या फंदात न पडता, आहे तो माल लवकर विकून मोकळे व्हायचे आणि नुकसान टाळायचे ही व्यापारनीती विक्रेते अवलंबित असल्याचे दिसून येत आहे. शहरात झगमगाट असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमधून सध्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.
‘जीएसटी’मुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर तीन टक्के अधिक कर वाढणार आहे, तर ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीनंतर सरकार त्याचा विक्रेत्यांना ‘सेट ऑफ’ (परतावा) देणार आहेत. विविध कंपन्यांच्या वस्तूंच्या डीलर्सने त्यांच्याकडे शिल्लक माल विक्रीसाठी बाहेर काढला आहे. ग्राहकांनी खरेदी करावी यासाठी ऑफर्स, ‘डिस्काउंट’ दिले आहेत. साधारणतः १० ते ३० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात आला आहे. तरीही डीलर्सला त्यातून २० टक्के नफा मिळत आहे. यात ग्राहकांचा किती फायदा होतो, हा खरा प्रश्न आहे. तरीसुद्धा वस्तूंच्या किमती वाढतील या भीतीपोटी २० ते २५ दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. गेल्या २० दिवसांत व्यवसायही वाढला आहे,’ असे निरीक्षण पूना इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र अग्रवाल यांनी ‘मटा’कडे नोंदविले. एलईडी, वॉशिंग मशिन, फ्रीज यांसारख्या वस्तूखरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. ज्या वस्तूंना अधिक डिस्काउंट आहे, त्या खरेदीसाठी नागरिकांची पसंती आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘जीएसटी’मुळे किंमती वाढतील या भीतीपोटी नागरिक खरेदीला येत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून खरेदीला गर्दी वाढली आहे. लॅपटॉपपासून ते वॉशिंग मशिन, फ्रीज, ओव्हन, एलईडी, मोबाइल या वस्तू्ंना मागणी आहे,’ असे टिळक रस्त्यावरील विजय सेल्स दुकानाचे व्यवस्थापक बसवराज पाटील यांनी सांगितले.
इलेक्ट्रीकल वस्तूंची विक्री करणाऱ्या इलेक्ट्रिक हायर अॅन्ड पर्चेस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत शहा म्हणाले, ‘जीएसटी’मुळे इलेक्ट्रिकल वस्तूंमधील वायरचे दर वाढणार आहेत. २८ टक्के जीएसटी लागू होईल. त्यामुळे अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासून खरेदी बंद केली आहे. दर किती वाढेल, याचा अंदाज येत नाही. नेमके काय होणार हे सांगता येत नाही. त्यामुळे गरजेपुरत्याच वस्तू खरेदी केल्या जात आहेत. त्याशिवाय ग्राहकांकडूनदेखील या वस्तूंना मागणी आहे. स्वीच, केबल वायर, पाइप्सला मागणी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिकट परिस्थितीशी झगडून यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुंबरे हेरिटेज या बांधकामाच्या साइटवर तात्पुरत्या उभारलेल्या एकाच खोलीच्या घरात नरेंद्र गज्जला आणि त्याचे आई-वडील राहतात. नरेंद्रच्या घरात जाण्यासाठी वाटेतील बांधकाम साहित्य आणि राडारोडा पार करावा लागतो. नरेंद्रचे वडील नामपल्ली त्याच ठिकाणी सुरू असलेल्या कुंबरे बिल्डरच्या साइटवर मजूर म्हणून काम करतात, तर आई लक्ष्मी तेथे पूर्ण झालेल्या बिल्डिंगच्या परिसराची स्वच्छता करते. अंधारी खोली, सतत सुरू असणारे आवाज, माणसांचा कोलाहल, परिस्थिती अत्यंत बेताची, आई-वडील पूर्णपणे अक्षरशत्रू असल्याने घरातून मार्गदर्शन नाही, अशा परिस्थितीत नरेंद्र शिकतो आहे. नरेंद्रने एमआयटीमधून पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शालेय शिक्षणाचा आणि दैनंदिन जगण्याचा खर्च परवडत नसल्याने नाइलाजाने नरेंद्रचे शाळेतून नाव काढून नामपल्ली यांनी हैदराबाद येथे परत जाण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट कुंबरे बिल्डरचे संजीव कुंबरे यांना समजली, त्या वेळी त्यांनी नामपल्ली यांना नरेंद्रचे शिक्षण थांबवू नका, असे सांगून नरेंद्रला सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल करून घेतले. सिटी इंटरनॅशनल स्कूल ही सीबीएसई बोर्डाची शाळा आहे आणि एमआयटी एसएससी बोर्डाची. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये फरक आहे; पण नरेंद्रने जोरदार अभ्यास करून शाळेत गुणी विद्यार्थी म्हणून नाव मिळविले.

नरेंद्रचे वडील नामपल्ली म्हणाले, ‘नरेंद्रचे शिक्षण थांबू नये, यासाठी संजीव कुंबरे, कुंबरे सोसायटीतील सभासद आदींनी वेळोवेळी मदत केली आहे. मी आणि त्याची आई अशिक्षित आहोत. त्यामुळे आम्हाला आर्थिक स्थैर्यही नाही. त्यामुळे काहीही झाले, तरी नरेंद्रचे शिक्षण पूर्ण करणारच. त्याने शिकावे आणि मोठे व्हावे, हेच आमचे एकमेव स्वप्न आहे.’

‘नरेंद्र अत्यंत अभ्यासू आणि मेहनती मुलगा आहे. खरे तर क्लास, घरी अभ्यास घेणारे पालक अशा कोणत्याही सुखसोयी त्याला नव्हत्या. आर्थिक परिस्थितीही बेताची आहे; पण तरीही त्याने जिद्दीने अभ्यास करून उत्तम यश मिळवले आहे. त्याच्यासारखा विद्यार्थी मिळायला भाग्य लागते,’ असे मत नरेंद्रच्या शिक्षिका कँडी दुबे यांनी व्यक्त केले.

स्वप्न पूर्ण करणार

सिटी इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकवर्गाने अभ्यासासाठी मला कायम मदत केली आहे. बापट क्लासच्या बापट मॅडम यांनीही उत्तम मार्गदर्शन केले. माझे आई-वडील अशिक्षित आहेत, तरीही त्यांनी मला शिकवण्याचे, मी मोठा होण्याचे स्वप्न पाहिले आहे. मी आर्किटेक्ट नक्की होणार आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करणार.

- नरेंद्र गज्जला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीला दिली मेहनतीची जोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील गाढवे कॉलनी या नावाच्या कमानीला लागून बोराटे चाळ आहे. या चाळीतल्या मधल्या रुंद गल्लीतून चालत चाळीच्या टोकाकडे गेले, की आकांक्षा हब्बूचे घर येते. बोराटे चाळीतील दहा बाय दहाच्या या छोट्याशा घरात चार माणसे केवळ उभी राहू शकतील इतक्या जागेत हब्बू कुटुंबीयांचा संसार थाटला आहे. गावाकडे कोणी नातेवाइक नाही. तिकडे स्वतःचे घर आणि जमीन नाही. गेली अनेक वर्षे चाळीमध्ये ते भाड्याच्या घरात राहत आहेत...

घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा नाही. कोणताही क्लास लावलेला नाही. शाळेत शिकविण्यात आलेला प्रत्येक​​ विषय समजून घेऊन आकांक्षाने अभ्यास केला. एमआयटी शाळेतील शिक्षकांचे तिला चांगले मार्गदर्शन मिळाले. एखादा विषय समजण्यास अडचण आली, तर तो तिने शिक्षकांकडून पुन्हा समजून घेतला. रोज न चुकता पहाटे चार वाजता उठून तिने अभ्यास केला. गणित आणि सायन्स हे तिचे आवडते विषय आहेत. लहानपणापासूनच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. डॉक्टर होण्यासाठी खूप वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यासाठी येणारा खर्चही मोठा आहे.

दहावीत ९५ टक्के मिळतीलच, असा आकांक्षाला सुरुवातीपासूनच विश्वास होता. प्रत्यक्षात तिला ९७.२० टक्के मार्क मिळाले. त्यातील दहा गुण हे कलेतील नैपुण्यासाठी देण्यात आले आहेत, असेही ती प्रामाणिकपणे सांगते. आकांक्षाचे वडील एका खासगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करतात. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते रात्री उशिरापर्यंत रिक्षा चालविण्याचे काम करतात. आकांक्षा आणि तिचा भाऊ ओम या दोघांमध्येही शिक्षण घेण्याची​ जिद्द आहे. ‘आपली परिस्थिती मुलांच्या शिक्षणाच्या आड येऊ नये म्हणून लागेल ते कष्ट करण्याची तयारी आहे. मुलांची स्वप्ने पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे,’ असे तिचे वडील मल्हारी हब्बू सांगतात. ते म्हणतात, ‘रिक्षाचालक म्हणून दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना जवळून पाहतो. मला स्वतःला मुलगी आहे. त्यामुळे रिक्षाचालक म्हणून काम करताना महिलांची सुरक्षा या मुद्द्याकडे मी आवर्जून लक्ष देतो. प्रसंगी त्यांच्याकडून पैसे मिळाले नाही तरी चालतील; पण त्या सुखरूप घरी पोहचल्या पाहिजेत, या भावनेतून मी काम करतो.’

‘डॉक्टर व्हायचं आहे’

चांगले शिक्षण मिळावे म्हणून माझे आई-वडील कष्ट करत आहेत. आम्हाला काही कमी पडू नये म्हणून ते सतत काम करत असतात. त्यांच्यावर असलेला कष्टाचा भार मला कमी करायचा आहे. सतत कष्ट करणाऱ्या लोकांच्या वाट्याला येणारा त्रास कमी व्हावा, त्यांची आपल्याला सेवा करता यावी म्हणून मला डॉक्टर व्हायचे आहे.

- आकांक्षा हब्बू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ रचतोय स्वप्नांचे इमले

$
0
0

Asmita.chitale@timesgroup.com
@asmitachitaleMT
पुणे : चार पत्रे लावून केलेले एका खोलीचे तात्पुरते घर... घराच्या चोहोबाजूला पडलेले बांधकाम साहित्य, राडारोडा, काँक्रिट-मिक्सर, पोकलेनची घरघर, तेथील गोंगाट अन् बिकट आर्थिक स्थिती... अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत नरेंद्र गज्जलाने दहावीत सीबीएसई बोर्डात ९३ टक्के मार्क मि‍ळवले आहेत.
नरेंद्रला कला विषय मनापासून आवडतात. त्याला आता आर्किटेक्ट व्हायचे आहे. दहावीत चांगले मार्क मिळवायचे ध्येय ठेवून नरेंद्रने वर्षभर सातत्याने अभ्यास केला. दिवसभर बांधकाम सुरू असल्याने त्याच्या घरात प्रचंड आवाज येतात. साधे बोललेलेही ऐकू येत नाही. अशा वेळी नरेंद्र कानात कापसाचे बोळे घालून अभ्यास करीत असे. दहावीत चांगले मार्क मिळवण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले आहे. आता समाजाच्या पाठबळाच्या जोरावरच त्याला पुढचे शिक्षण घेणे सुकर होणार आहे. नरेंद्रच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या स्वप्नांना समाजाच्या दातृत्वाची साथ मिळाल्यास, त्याचे आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिच्या स्वप्नांना आस पंखांची

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com
Twitter : VandanaaMT
पुणे : चाळीतले ‘दहा बाय दहा’चे घर तिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांच्या आड आले नाही... पहाटे चार वाजता उठून मन लावून प्रत्येक​ विषय समजून घेऊनच तिने अभ्यास केला... कोणताही क्लास न लावता तिने जिद्दीने मेहनत करून दहावीच्या परीक्षेत तब्बल ९७.२० टक्के मिळवले आहे.
चाळीतले भाड्याचे ​छोटेसे घर. वडील रिक्षाचालक, आई गृहिणी. जगण्याचा संघर्ष प्रामाणिकपणे आणि सचोटीने करणाऱ्या हब्बू कुटुंबीयांतील आकांक्षाने मोठे यश मिळवून सर्वांची मान उंचावली. शिक्षणामुळे सर्व साध्य होते आणि परिस्थिती बदलते या त्यांच्या विश्वासाला आता साथ हवी आहे, ती समाजाची. शिक्षणासाठी लागणारा हा पल्ला मोठा आहे. त्यामुळे आर्थिक मदतीचे हात​ मिळाले, तर तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकोश उपलब्ध नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेत विश्वकोशाचे खंड तयार झाले; मात्र हे सर्व कोश आज अभ्यासकांना उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे. हीच अनास्था मराठीतील विविध कोश कार्यालयात पाहायला मिळते, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केली. ‘कोशवाङ्मया’च्या कामाबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले.

गुरूकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मराठीतील कोश साहित्याची आजची अवस्था’ या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. अविनाश चाफेकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ल. का. मोहरीर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर, डेक्कन कॉलेजच्या उपकुलगुरू डॉ. जयश्री साठे यांच्यासह कोशवाङ्मयाचे अभ्यासक उपस्थित होते.

कामत म्हणाले, ‘भाषा समृद्ध व्हायची असेल तर कोशवाङ्मयाची निर्मिती सातत्याने होत राहिली पाहिजे. मराठी भाषेतील कोश कार्य दुर्लक्षित राहिले आहे.’ साठे यांनी संस्कृत कोश प्रकल्पाचे, चाफेकर यांनी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा आणि कोशवाङ्मयाची, संस्कृत अभ्यासक वैदेही मिजार यांनी धर्मकोश कार्याची, वर्षा देवकर यांनी मराठी उपनिषद कोषाच्या कार्याबद्दल, डॉ. मुक्ता कुलकर्णी-गरसोळे यांवी सरिता कोश आणि कृषी ज्ञान कोशाची, विजय देवधर यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या कोशांची, डॉ. भाग्यश्री भागवत यांनी पारशी समाजाच्या अवेस्ता कोश कार्याची, वैदिक मंडळाच्या प्रणव गोखले यांनी हंसकोष या दुर्मिळ कोशाची आणि श्रीकांत जोशी यांनी मराठीतील आठ कोशांची माहिती दिली. निवेदन शुभदा वर्तक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देश को प्यार की जरुरत है…

$
0
0

पुरस्कार वापसीच्या काळात तुम्हाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशातील मोठा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. मुलांसाठी लिहिलेल्या साहित्यासाठी पुरस्कार मिळणार असल्याने अधिक समाधान आहे. यापुढेही बालसाहित्याची निर्मिती करत राहीन. पुरस्कार आपल्या कार्यावर मिळत असतो. हा पुरस्कार सरकारचा नाही. पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.

‘मेरा देश महान’ या पुस्तकातून तुम्हाला काही सुचवायचे आहे का ?

देशात शत्रुत्वाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली. पूर्वी इतके टोकाचे वातावरण नव्हते. शत्रुत्वाची भावना प्रेमात बदलायची गरज आहे. हे काम लेखक, कवी, कलाकार हेच करू शकतात. हीच मंडळी समाजाला एका धाग्यात बांधू शकतात. समाजाला प्रेमाच्या मार्गावर आणण्याची गरज आहे. ‘फूल को खार की जरूरत है, यार को यार की जरूरत है, नफरतो को हवा दे न भाई, देश को प्यार की जरुरत है,’ हा संस्कार पुस्तकातून लहान मुलांवर करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या सबंध साहित्याचे सूत्र हे प्रेम, सामाजिक एकोपा असे आहे.

गाय, भारत माता की जय, राष्ट्रगीत यावरून समाजात दरी पडते आहे का?

राजकारणासाठी सर्व काही सुरू आहे. देश मात्र दिवसेंदिवस विचित्र परिस्थितीत ढकलला जात आहे. जगात सर्वात चांगला आपला देश आहे. अनेक जाती, धर्म, संस्कृती यातून हा देश प्रेमावर टिकून आहे. पूर्वी दिवाळीत फराळासाठी हिंदूंच्या घरी मुस्लिम हक्काने जायचे आणि ईदला हिंदू मुस्लिमांकडे येत. हा बंधुभाव कमी झाला आहे.

घराणे राजस्थानातील असल्यामुळे तुमच्या बालमनावर फाळणीचा किती परिणाम झाला ?

राजस्थानात राजपुतांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचा समावेश होतो. आम्ही मुस्लिम राजपूत घराण्यातून असून जे नवाबाशी संबंधित आहे. आमच्या घरात कोणीच शिकलेले नाही. फाळणी झाली तेव्हा मी एक वर्षांचा असल्याने कळत नव्हते; पण लहानपणी कानावर अनेक गोष्टी येत गेल्या. फाळणीनंतर जगण्याचे साधन न उरल्याने वडिलांनी पुण्यात वास्तव्य करण्याचे ठरवले. त्या पाठोपाठ सर्व कुटुंब आले. तेव्हा मी १५ वर्षांचा होतो. गावातील वातावरण आता खूपच चांगले आहे. हिंदू-मुस्लिम यांचे घरगुती संबंध आहेत. फाळणी सोसलेली माणसे बंधुभाव राखून आहेत.

अशा वातावरणातूनच तुमच्यातील सर्जनशील लेखक, कवी घडला का ?

हे वातावरण होतेच. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरी शिक्षणाचे किंवा साहित्याचे कसलेच वातावरण नसताना मी वाचू लागलो. दिवसा काम आणि रात्री वाचन असा काळ होता तो. शिक्षण नव्हतेच. खूप वाचू लागलो आणि लिहू लागलो. चांगले वाचले तर चांगले लिहिता येते. घरात संवादाची भाषा राजस्थानी मारवाडी, कारण ती मातृभाषा आहे. तिच्या कुशीत आम्ही मोठे झालोय. पुस्तके वाचल्यामुळे माझी उर्दू भाषेची तालीम झाली. हिंदू धर्म, संस्कृती, कबीर, मीरा यांच्याविषयी जाणून घेतले आणि मला मार्ग गवसला. मुंबईतील कालिदास गुप्ता रझा हे पंजाबी विद्वान आणि मालेगावमधील अतीफ अहमद अतीफ हे माझे गुरू. अनेकांकडून जे शिकायला मिळाले तेच माझे शिक्षण.

लेखक म्हणून सिद्ध करताना संघर्ष करावा लागला का ?

१९७२ मध्ये दिल्लीच्या ‘हातूने मश्रिफ’ या उर्दू मासिकात मी लिहू लागलो. त्यातील लेखन कामगारवर्गाला आवडू लागले. पुढे आणीबाणीच्या आधी एक वर्ष ‘चट्टानो के बिच’ हे माझे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. राजस्थानच्या एका खेड्यातील अयशस्वी प्रेमकथा आहे ती. तेव्हा उर्दूमध्ये प्रकाशक नव्हते. कष्टाने पैसा उभा करून हे पुस्तक प्रसिद्ध केले. ‘जख्म औंर आँहे’ या पुस्तकाने मला साहित्य वर्तुळात मान्यता मिळाली. ‘बच्चो आयो गीत सुनाये’ हे माझे पहिले बालसाहित्य. आत्तापर्यंत ८० पुस्तके लिहिली असून, त्यामध्ये बालसाहित्य, उर्दू शायरी, कथा, कादंबरी अशा साहित्याचा समावेश आहे. माझ्या साहित्यावर दोन पी.एचडी आणि एक एम.फील केली आहे.

उर्दूला परकीय भाषा समजले जाते, त्याबाबत काय वाटते?

अर्थातच मला वाईट वाटते. उर्दूचा जन्म शहाजानच्या काळात दख्खनमध्ये झाला, असे म्हटले जाते. त्या काळात दिल्ली, मेरठ, गाझियाबाद या भागात शहाजानच्या सैन्यात सर्व धर्मांचे लोक होते. त्यांना समजेल अशा एक भाषेची गरज होती. फारशी, संस्कृत, खडी, पाली, हिंदी या भाषांच्या मिलाफातून हिंदवी त्यातून रेखता आणि नंतर उर्दू असा हा प्रवास आहे. उर्दू ही अस्सल भारतीय भाषा आहे. कुली कुतुबशहा हे या भाषेतील पहिले शायर होते.

प्रेमाचा संदेश देणारी ही भाषा मागे का पडली ?

उर्दू ही जितकी मुस्लिमांची तितकीच ती हिंदूची भाषा आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत हिंदू उर्दूपासून बाजूला गेले आणि ही मुस्लिमांची भाषा ठरवली गेली, म्हणून तिचे नुकसान झाले. हल्ली मुस्लिम तरी कुठे ही भाषा टिकवतात ? उर्दू कठीण म्हणून मागे पडली. पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत ती कठीण होती कारण उर्दूमध्ये फारसी शब्द होते. ते शब्द काढून टाकल्याने भाषा सोपी झाली आहे; पण लिहिणे अवघड आहेच, कारण लिपी अरेबिक आहे. जगातील अरबी,फारसी, सिंधी, उर्दू या चार भाषा अरबी लिपीमध्ये लिहिल्या जातात. सरावाने लिपी आत्मसात होते. प्रेमाची भावना रुजवणारी ही भाषा जिवंत राहिली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे.

शिक्षणातील उर्दूचे स्थान काय?

अनेक देशात उर्दू टिकून आहे. आपल्याकडे शाळांमध्ये उर्दू कमी आहे; पण महाराष्ट्रात सर्वात जास्त शाळा अशा आहेत, जिथे उर्दू शिकवली जाते. पुण्यात पालिकेच्या अनेक शाळांमध्ये उर्दूचे शिक्षण दिले जाते. महाराष्ट्राने उर्दू जपली आहे ती जिवंत केली आहे. राजस्थानमध्ये इयत्ता चौथी, सहावी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात माझ्या साहित्याचा समावेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीमध्ये समाजाला प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘हल्ली प्रत्येकाला कोणत्याही मार्गाने निवडून यायचे असते. शहरांमध्ये वाढदिवसाचे फलक लावले जातात. उर्वरित नागरिकांचा कधी वाढदिवस नसतो का? देशात राजकीय चमच्यांच्या फौजा निर्माण झाल्या असून सत्तास्थानासाठी रांगा लागल्या आहेत. सुदृढ लोकशाहीमध्ये नेता नव्हे तर समाज महत्त्वाचा असतो. त्यादृष्टीने आपली लोकशाही अद्याप बाल्यावस्थेतच आहे,’ असे मत भाषासंशोधक व विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

अक्षर मानवतर्फे देवी व त्यांच्या पत्नी तसेच नोबेल पुरस्कार (रसायनशास्त्र) समितीच्या माजी सदस्य डॉ. सुरेखा देवी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. देवी दाम्पत्याने सजग नागरिकांशी मुक्त संवाद साधून विविध विषयांवर भाष्य केले. राजन खान यांनी प्रास्ताविक केले.

‘राज्यव्यवस्था आणि नागरिक यांमध्ये झालेला नवा करार अद्याप अपूर्ण आहे. देशातील १३० कोटी लोकांपैकी १८ कोटी लोक देश चालवतात. उर्वरित ११० कोटी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. देशातील ७८० भाषांपैकी केवळ २२ भाषांचे लोक संसदेत प्रतिनिधित्व करतात. हे प्रमाण केवळ चार टक्के असून लोकशाहीचे हे स्वरूप बदलण्याची गरज आहे. आपल्याकडे विविधतेची लोकशाही येण्याची गरज आहे. ही प्रक्रिया कोणी थांबवू शकणार नाही. सर्व लोकांचे आवाज बोलणारे गट तयार झाले तर लोकशाही सुदृढ होईल,’ याकडे देवी यांनी लक्ष वेधले.

‘आदिवासींना स्वत:ची भाषा आहे. ते सुशिक्षित आहेत. त्यांना शहरात सन्मान मिळत नाही. देशातील नऊ कोटी आदिवासींपैकी काहीशेच लोक नक्षलवादी आहेत. आपली तथाकथित सभ्यता, नागरीकरण आदिवासींना नको वाटते. आपण त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो; पण आपला ते भूतकाळ नसून भविष्यकाळ आहेत,’ यावर देवी यांनी बोट ठेवले.

डॉ. सुरेखा देवी म्हणाल्या, ‘आपल्या शिक्षणपद्धतीत मार्कांना प्रचंड महत्त्व आहे. मात्र, हेच मार्क श‌िक्षणाची पातळी मोजण्याचे माप होऊ शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता मार्कांच्या पलीकडे असते. एखाद्या विषयात प्रगती साधण्यासाठी त्या विषयात आपले मन रमायला हवे. त्या विषयाचा सखोल अभ्यास हवा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘विद्यापीठांमधील वातावरण भयतेने ग्रासले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरवले आहे. सरकारच्या हिताला बाधा पोहचवणाऱ्या संघटनांना बाजूला सारले जात आहे. प्रत्येक जण आपल्या जातीला, धर्माला पुढे नेत आहेत. सोशल मीडियावर कोण काय लिहितो, यावर लक्ष ठेवले जात असून विद्यार्थ्यांवर राजकीय, सामाजिक, आर्थिक दडपण आहे,’ असा हल्लाबोल विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला. ‘मुस्लिम असल्याची ओळख लपवावी का,’ असा विचार मनात येत असल्याची उद्विग्न भावना एका विद्यार्थ्याने बोलून दाखवून व्यथांना मोकळी वाट करून दिली.

विद्यापीठांमध्ये भयमुक्त वातावरणासाठी ख्यातनाम भाषासंशोधक व विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध ठिकाणहून आलेल्या समविचारी विद्यार्थ्यांनी विवेकवादी चळवळीपुढील अडचणी मांडल्या. छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

‘आपण लोकशाहीवर विश्वास ठेवतोय; पण अंमलबजावणी होत नाही. समविचारी लोक असतात तिथेच बोलू शकतो. पुढारलेला महाराष्ट्र, शिक्षिणाचे माहेरघर पुणे असे चित्र केवळ नावाला आहे. विद्यार्थ्यांनी भीती बाळगावी, दडपणात राहावे, असे वातावरण जाणूनबुजून तयार केले जात आहे. एखादी व्यक्ती याच विचारांची आहे, मुस्लिम म्हणजे केवळ मांसाहारी, अमुक व्यक्तीला देशाबद्दल प्रेम नाही, असे शिक्का मारण्याचे प्रकार सुरू आहेत,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी ट्रोलिंगच्या प्रकारांवर घणाघाती हल्ला चढावला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करताना देवी म्हणाले, ‘नागरिकत्वाची व्याख्या बदलली असून माणूस हा शारीरिक व्यक्ती आणि डिजिटल व्यक्ती यांचे संकर झाला आहे. आपल्या विचारांना घटनात्मक कामाचे स्वरूप देता आले पाहिजे. सूत काढून स्वराज्य मिळणार नाही. ते संवादाने मिळेल. गांधींनी सूत कापण्याची जागा शोधली आपण संवादाची जागा शोधायली हवी.’

‘निर्भय तरुण आवश्यक’

विचार करत नाही तोपर्यंत भीती नसते. सरकार, भाजप, संघ यांच्यातील तरुण विचार करू लागले की त्यांच्यामध्येही भीती निर्माण केली जाईल. निर्भय समाजासाठी निर्भय तरुण आवश्यक आहेत. निर्भय समाज नसेल तर संसदेचा काय उपयोग? भीती कमी करण्यासाठी प्रतिभीती निर्माण करणे ही हिंसा आहे. भीतीमुक्त कॅम्पस करण्याची गरज आहे. मी स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्याशी तडजोड करणार नाही, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.

- डॉ. गणेश देवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचा खर्च कमी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे स्टिलसारख्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे विकासकामांवरील खर्च कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून विकासकामांचा ‘डिपार्टमेंट शेड्युल रेटस्’चा (डीएसआर) फेरविचार करावा लागणार आहे. ‘जीएसटी’मुळे जून अखेरीपर्यंत काढण्यात आलेल्या सगळ्या निविदांमधील दरांमधील बदल होणार आहेत.

‘जीएसटीमुळे कररचना बदलली असल्याने या बदलला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. महापालिकेतील सर्व विभागांना ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेचे सर्व विभाग तसेच वॉर्ड ऑफिसेसला जीएसटीची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे,’ अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी दिली.

‘जीएसटी’ची अंमलबजावणी आज, शनिवारी एक जुलैपासून देशभर होत असून या बदलाला सामोरे जाण्यासाठी पालिकेचे सर्व विभागांमध्ये शुक्रवारी लगबग सुरू होती. अनेक विभागांकडून जून अखेरपर्यंतची ​बिले शुक्रवारी सादर करण्यात येत होती. तर, विकासकामांबाबतची बिले काढताना ‘जीएसटी’ची अंमलबजावणी कशी करायची, याची माहिती पालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी-कर्मचारी घेत होते.

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमुळे विकासकामांसाठी लागणारे स्टिल, सिमेंटसारख्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. या वस्तुंवरील कर कमी करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा विकासकामांना होणार आहे. नव्याने निविदा काढताना ‘जीएसटी’मुळे स्वस्त होणाऱ्या वस्तूंचा ‘डीएसआर’ तयार करताना विचार होणार आहे. तसेच, ज्या विकासकामांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत, तसेच ​विकास सुरू असून त्यांची यापुढील बिले काढण्यात येणार आहे, अशा विकासकामांच्या ‘डीएसआर’चा फेर​विचार संबंधित विभागप्रमुखांना करावा लागणार आहे. स्वस्त झालेल्या वस्तूंच्या किमती या ‘डीएसआर’मध्ये अंतर्भूत करून नवीन बिले तयार करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

किरकोळ खर्चावर मर्यादा

चहा-नाश्ता, निमंत्रणे, झेरॉक्स, पुष्पगुच्छ श्रीफळ यासारखे किरकोळ खर्च करतानाही पालिका प्रशासनाला विचार करावा लागणार आहे. ‘जीएसटी’च्या अंमलबजावीत कोणतीही खरेदी किंवा सेवा घेताना संबंधित व्यापाऱ्याने ‘जीएसटी’ची नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. नोंदणी न केलेल्या व्यक्तीकडून सेवा घेतल्यास सदर खरेदीवर महापालिकेला ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्र विवरणपत्र (रिटर्न) भरावे लागणार आहे. त्यामुळे चहा देणाऱ्या व्यावसायिकालाही ‘जीएसटी’ची नोंदणी करावी लागणार आहे.

महापालिकेने सूचवलेल्या सूचना

- एक जुलैनंतर कोणतीही खरेदी किंवा सेवा जर अनोंदणीकृत (जीएसटी) व्यक्तीकडून घेतल्यास सदर खरेदीवर महापालिकेस ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्र विवरणपत्र (रिटर्न) भरावे लागणार आहे.
- महापालिकेने सर्व खरेदी नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून करावी. अन्यथा संबंधित संबंधित व्यक्तींना कर भरावा लागेल.
- सर्व विभाग, वॉर्ड ऑफिस यांनी स्वतंत्रपणे ‘जीएसटी’ नोंदणी करणे सक्तीचे आहे.

आठ टक्के वाढ

महापालिकेला ‘जीएसटी’च्या माध्यमातून पहिल्या वर्षी १५७१ कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे. महापालिकेला ‘जीएसटी’मधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी १५७१ कोटी रुपये आधारभूत किंमत धरण्यात आली आहे. दर वर्षी त्यात आठ टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘जीएसटी’च्या नोंदणीमुळे करदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या आर्थिक आराखड्यावर चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) संचालक मंडळाची बैठक आज, शनिवारी पुण्यात होणार असून, पुणे मेट्रो प्रकल्पाच्या आर्थिक आराखड्याबाबत त्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, पुणे मेट्रोने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या प्रगतीचा आढावा संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार आहे.

नागपूरसह पुणे मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती. महामेट्रोच्या संचालक मंडळाची पहिली बैठक तीन महिन्यांपूर्वी नवी दिल्लीत झाली होती. त्यानंतर, पुण्यात प्रथमच बैठक होणार असून, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे नवनियुक्त सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. केंद्राच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या नगरविकास आणि अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला हजर राहणार आहेत.

केंद्र सरकारने पुणे मेट्रोसाठी चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ९५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून, मेट्रोच्या कामाला गती प्राप्त झाली असली, तरी मेट्रोच्या ५० टक्के खर्चासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने, यापूर्वी वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मेट्रोच्या कर्जपुरवठ्याबाबत संचालक मंडळात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर प्रत्यक्ष जागेवरील काम सुरू झाले असून, आगामी काही दिवसांत वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या दुसऱ्या मार्गावरील कामही सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, प्राधान्य मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या सरकारी जागा तातडीने हस्तांतरित केल्या जाव्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या.

काम लवकरच सुरू

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यान नाशिक फाट्याजवळ मेट्रोच्या पहिल्या पिलरचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आता, त्यापुढील टप्प्यात आणखी दोन पिलरच्या कामासाठी एनसीसी लिमिटेडने नुकतेच खोदकाम सुरू केले आहे. हा प्राधान्य मार्ग १०.७ किमीचा असून, मेट्रोच्या मार्गिकांचे (व्हायडक्ट) सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. त्यामुळे, या मार्गावर फुगेवाडी आणि खडकीजवळही पुढील काही दिवसांत काम सुरू होण्याची शक्यता आहे.

चर्चा होणार

गेल्या तीन महिन्यांमध्ये पुणे मेट्रोने केलेल्या प्रगतीचा आढावा या बैठकीत प्रामुख्याने घेतला जाणार आहे. त्यासह आर्थिक आराखड्यावर चर्चा होणार आहे.

ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनावश्यक खर्चाला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वित्त विभागाच्या मान्यतेविना नव्या प्रकल्पाला मान्यता/निविदा काढण्यास मनाई, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अनुदानातील अखर्चित रकमेचा आढावा, कार्यालयीन खर्चात कपात, प्रधान सचिव वगळता इतर अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासास स्थगिती, प्रवास खर्च आणि भत्ते टाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय... अशा एक ना अनेक उपाययोजनांतून कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा ताण हलका करण्यासाठी वित्त विभागाने पावले उचलली आहेत.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीचा परिणाम विकासकामांवर होण्याची भीती असतानाच भांडवली आणि महसुली खर्चाला सरकारने थेट कात्री लावली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या ७० ते ८० टक्के खर्च करण्याचे आदेश देऊन विकासकामांवरील खर्चात थेट २० टक्के कपात केली आहे. त्याशिवाय कोणताही नवीन खर्चिक प्रकल्प सादर करू नये किंवा मंजूर प्रकल्पाच्या निविदा काढतानाही आर्थिक तरतुदीचा आढावा घेण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना वित्त विभागाने सर्व खात्यांना दिल्या आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेऊन त्याच स्वरूपाचे राज्य सरकारचे कार्यक्रम/योजना केंद्राच्या योजनांमध्ये विलिन करण्यात याव्या, असे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत; तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पाडणारे कोणतेही प्रस्ताव तूर्तास सादरच करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन शाळा/तुकड्या, नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात येऊ नये; तसेच रिक्त झालेली पदे तूर्तास भरण्यात येऊ नयेत, असेही सूचविण्यात आले आहे.
कंबरडे मोडले
कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तिजोरीवर वाढणाऱ्या भाराने सरकारचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने कर्ज घेण्याची उच्चतम पातळी गाठली असून, कर्ज घेण्याबाबत कोणत्याही स्वरूपाची प्राथमिक चर्चाही केली जाऊ नये, असेही सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात कर्ज घेण्याच्या कोणत्याही नव्या प्रकरणाचा विचारही केला जाऊ नये, अशी ताकीद सर्व विभागांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनावश्यक खर्चाला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वित्त विभागाच्या मान्यतेविना नव्या प्रकल्पाला मान्यता/निविदा काढण्यास मनाई, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अनुदानातील अखर्चित रकमेचा आढावा, कार्यालयीन खर्चात कपात, प्रधान सचिव वगळता इतर अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासास स्थगिती, प्रवास खर्च आणि भत्ते टाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय... अशा एक ना अनेक उपाययोजनांतून कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा ताण हलका करण्यासाठी वित्त विभागाने पावले उचलली आहेत.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीचा परिणाम विकासकामांवर होण्याची भीती असतानाच भांडवली आणि महसुली खर्चाला सरकारने थेट कात्री लावली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या ७० ते ८० टक्के खर्च करण्याचे आदेश देऊन विकासकामांवरील खर्चात थेट २० टक्के कपात केली आहे. त्याशिवाय कोणताही नवीन खर्चिक प्रकल्प सादर करू नये किंवा मंजूर प्रकल्पाच्या निविदा काढतानाही आर्थिक तरतुदीचा आढावा घेण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना वित्त विभागाने सर्व खात्यांना दिल्या आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेऊन त्याच स्वरूपाचे राज्य सरकारचे कार्यक्रम/योजना केंद्राच्या योजनांमध्ये विलिन करण्यात याव्या, असे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत; तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पाडणारे कोणतेही प्रस्ताव तूर्तास सादरच करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन शाळा/तुकड्या, नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात येऊ नये; तसेच रिक्त झालेली पदे तूर्तास भरण्यात येऊ नयेत, असेही सूचविण्यात आले आहे.
कंबरडे मोडले
कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तिजोरीवर वाढणाऱ्या भाराने सरकारचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने कर्ज घेण्याची उच्चतम पातळी गाठली असून, कर्ज घेण्याबाबत कोणत्याही स्वरूपाची प्राथमिक चर्चाही केली जाऊ नये, असेही सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात कर्ज घेण्याच्या कोणत्याही नव्या प्रकरणाचा विचारही केला जाऊ नये, अशी ताकीद सर्व विभागांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वराभिषेकाला रसिकांनी दिली उत्स्फूर्त दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बरसे बदरिया सावन की... सावन की मनभावन की’ म्हणून घुमड घन आणि चमकणारी दामिनीही आपल्या स्वरांच्या लख्ख प्रकाशात उजळवणारी बंदीश पं. संजीव अभ्यंकर यांनी सादर केली आणि त्यांना दाद देण्यासाठी रसिकांनीही मग तितकीच मनापासून टाळ्यांची बरसात केली. निमित्त होते, व्हायोलिन अॅकॅडमीतर्फे आयोजित ‘स्वरमल्हार’ या महोत्सवाचे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातच अॅकॅडमीच्या ६० व्हायोलिन वादकांनी स्वरबरसात करून केली. पाच ते ८० या वयोगटातील अॅकॅडमीच्या शिष्यांनी भूप रागाने सुरुवात करून काफी, शिवरंजनी, मिया मल्हार हे रागही सादर केले. त्यानंतर स्वरमंचावर आलेल्या पं. संजीव अभ्यंकर यांनी मेघ रागाने सादरीकरणाची सुरुवात करून गायनासह मूर्च्छना या प्रकाराविषयीही सोदाहरण माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या देस रागातील बंदिशीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला चारचाँद लागले. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद यांनी तबल्याची आणि मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमची साथ केली. मृण्मयी फाटक हिने तानपुरा साथ केली.

तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी शुद्ध गंधारयुक्त रामदासी मल्हार रागाने सरोदवादनास आरंभ केला. आलाप, जोड, झाला यानंतर त्यांनी धमार सादर करून नटमल्हारच्या धूनने वादनाची सांगता केली. यानंतर बेगम परवीन सुलताना यांनी मंचावर प्रवेश करत शाल, हार, मानपत्र देऊन आणि पगडी घालत अॅकॅडमीचे संस्थापक आणि ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचा सत्कार केला. त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त आयोजित या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरेल सांगता परवीन सुलताना यांच्या गायनाने झाली. त्यांना मुकुंदराज देव यांनी तबल्याची, श्रीनिवास आचार्य यांनी हार्मोनियमची, विद्या जाई, सचिन शेटे व आभा पुरोहित यांनी तानपुरा साथ केली.

गाजला संतरचनांचा ‘मेडले’

महोत्सवाचा पहिला दिवसही राजस-तेजस उपाध्ये यांच्या सादरीकरणाने बहारदार झाला. त्यांनी चारुकेशी रागानंतर ‘रघुपति राघव राजाराम’ या भजनाने आपल्या व्हायोलिन वादनाची सांगता केली. राहुल शर्मा यांनीही राग मेघ आणि पहाडी धून सादर करत संतूरवादन मोहक केले. उपाध्ये बंधू आणि राहुल या दोघांनाही मुकेश जाधव यांनी तबल्याची साथ केली. ‘परंपरा’ या संकल्पनेअंतर्गत शौनक अभिषेकी आणि आनंद भाटे यांनी पहिल्याच दिवशी अभोगी कानडा सादर केला. शौनक यांनी कुकुभ मल्हार व सुहा कानडा हे राग सादर केले. आनंद यांच्या सूर मल्हार रागानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अबीर गुलाल’ यांसारख्या संतरचनांचा ‘मेडले’ सादर केला. ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ या भैरवीने त्यांनी केलेल्या सांगतेला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली.

आज महोत्सवात

आज (दि. १ जुलै) गणेश कला क्रीडा मंच येथे ‘स्वरमल्हार’च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी नऊ वाजता मंजूषा पाटील यांच्या गायनाने होईल. त्यानंतर आरती अंकलीकर यांचे गायन होईल आणि उस्ताद राशीद खाँ यांच्या गायनाने सांगता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यांचे जगणे ही संघर्षाची कथा...

$
0
0

पिंपरी : कोमल आणि अपेक्षा यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी एकट्या आईवर आहे. मात्र, त्यादेखील सतत आजारी असतात. भाड्याच्या रूपातून दोन-तीन हजार रुपये मिळतात; पण त्यातून उदरनिर्वाह कसा चालवायचा, ही चिंता आहेच. अपेक्षाच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी आता हवे आहेत आर्थिक मदतीचे पंख.

तरटे कुटुंबीय मूळचे बीड जिल्ह्यातील डोईठाण गावचे. कामाच्या शोधात अरुण तरटे २० वर्षांपूर्वी दिघी येथे आले. चणेफुटाणे विकून उदरनिर्वाह करू लागले. रतन यांच्याशी विवाह झाला. कुटुंबाच्या गरजा वाढल्या. त्यामुळे त्यांनी आचाऱ्याचे काम सुरू केले. त्यातून जेमतेम पैसे मिळू लागले. सत्यनारायण महापूजा, वाढदिवस किंवा एखादा कौटुंबिक

कार्यक्रम या निमित्ताने त्यांना ऑर्डर मिळू लागल्या. पै-पै करून दिघीत घरही बांधले; परंतु पुरेसे पैसे नसल्यामुळे घराला फरशा बसवू शकले नाहीत. लोखंडी पत्र्याच्याच स्वच्छतागृहाचा वापर करणे भाग पडले. कोमल आणि अपेक्षा या दोन्ही मुली अभ्यासात अतिशय हुशार! कोमलला दहावीत ९३ टक्के गुण होते. आता बारावी सायन्समध्ये ७७ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्याच पावलावर पाऊल ठेवून अपेक्षाने उज्ज्वल यश संपादन केले आहे.

‘तुमच्या दोन्ही मुली अतिशय हुशार आहेत. त्यांना खूप शिकवा,’ असे शिक्षक घरी येऊन सांगत असत, तेव्हा अरुण तरटे यांची छाती अभिमानाने फुलायची. ते म्हणायचे, ‘मी जीव गहाण ठेवीन; पण तुमचे शिक्षण पूर्ण करीन.’ त्यामुळेच त्यांनी दहावीनंतर कोमलला सायन्समध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. बहिणीची कामगिरी आणि वडिलांची जिद्द लक्षात घेऊन अपेक्षाने खूप अभ्यास केला. प्रसंगी मनातील हौसही बाजूला ठेवली. दहावीची परीक्षा दिली. वडीलही खूश होते; परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. मे महिन्यातील सहा तारीख तरटे कुटुंबीयांसाठी आघात करणारी ठरली. घरातून बाहेर पडत असतानाच अपेक्षाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन ते जमिनीवर कोसळले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपेक्षाचे यश तिचे वडील पाहू शकले नाहीत, हे सांगताना अपेक्षा आणि तिच्या आईला हुंदका अनावर होतो.

अपेक्षाच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या मामाने कुटुंबाला आधार दिला आहे; परंतु त्यांची परिस्थितीही बेताचीच आहे. त्यामुळे ते किती दिवस मदत करणार? अपेक्षाला दोन चुलते, आजोबा आहेत. मात्र, त्यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. अशात आता कोमल आणि अपेक्षा यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी एकट्या आईवर आहे. त्यादेखील सतत आजारी असतात. त्यामुळे भाड्याच्या रूपातून मिळणाऱ्या दोन-तीन हजार रुपयांवर कसा उदरनिर्वाह करायचा, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. बहीण कोमलला सायन्स शिक्षणासाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन अपेक्षाने कॉमर्सला जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच शाखेत मला सर्वोत्तमतेचे शिखर गाठायचे आहे, असे अपेक्षाने सांगितले. तिची शिकण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, परिस्थिती आश्वासक नाही. समाजातून मदतीचा हात मिळाल्यास चांगली कामगिरी करून दाखविण्याची जिद्द तिने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला ‘आयपीएस’ व्हायचेय...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रोडवरील रामवाडी येथील महापालिकेच्या सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यालयातील हृतिक राजू खिल्लारेने दहावीच्या परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. आता त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देऊन भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) जायचे आहे. सध्या त्याने अकरावी सायन्सला प्रवेश घेतला असून, ‘आयपीएस’ होण्याचे ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करीत आहे. हा प्रवास तितकासा सोपा नसल्याची त्याला जाणीव आहे; परंतु ‘जे माझ्या हातात आहे, ते मी करून दाखवणारच. मी ‘आयपीएस’ होणारच,’ हा विश्वासही त्याच्यात आहे. त्याचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्याला गरज आहे, ती मदतीची.

खिल्लारे कुटुंबीय हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील नंदगावचे असून, गेल्या सात-आठ वर्षांपासून पुण्यातील खराडी येथील पंढरीनगरमध्ये राहतात. रेखा आणि राजू खिल्लारे यांना हृतिक, उमेश व सतीश ही तीन मुले आहेत. अगदी लहानपणापासूनच तिन्ही मुले शाळेत पहिला क्रमांक मिळवणारी! गावाकडे त्यांचे शिक्षण नीट होईल की नाही, या चिंतेने हृतिकच्या मावशीने खिल्लारे कुटुंबाला पुण्यात बोलावून घेतले. जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झाल्याने गावाकडे मिस्त्रीकाम करणारे राजू खिल्लारे पुण्यातही ते करू लागले; पण एकट्याच्या कामाने भागणार नाहीस म्हणून आई रेखा यांनीही धुणीभांडी करण्यास सुरुवात केली. आजही दोघे तेच काम करतात. वडिलांना कधी काम असते, तर कधी नसते. त्यामुळे जेव्हा काम मिळेल, तेव्हा २५०-३०० रुपये मिळण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकते. धुणीभांडी करून महिना अडीच-तीन हजार रुपये मिळवणारी आई आणखी कामे मिळण्याच्या शोधात असते. महिना पाच हजार रुपये घरभाडे, तीन मुले, शिक्षण यांचा खर्च पाहता जमा-खर्चाचा मेळ बसणे अवघड, अशी परिस्थिती. त्यातूनही परिस्थितीचा बाऊ न करता हृतिकने घवघवीत यश मिळवले.

‘आतापर्यंत मी एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जायचो, तेव्हा प्रत्येक वेळी मला ९० टक्क्यांहून अधिक मार्क असायचे. आताही मला दहावीला ९३.२० टक्के गुण मिळाले; परंतु दहावीपर्यंतचा शिक्षणाचा तितका खर्च नव्हता. आता माझ्या शिक्षणाचे काय होईल, याची आई- वडिलांना चिंता सतावते आहे. मला ‘आयपीएस’ व्हायचे आहे. माझ्या शिक्षणासाठी वाटेल तितके कष्ट घेण्याची माझी तयारी आहे,’ असे हृतिक म्हणाला. ‘तुमचा मुलगा हुशार आहे. गरीब परिस्थिती असतानाही त्याने दहावीत चांगले टक्के मिळविले, असे सगळे सांगतात. हृतिकचा अभिमान वाटतो. त्याला पुढे शिकवण्याएवढी आमची परिस्थिती नाही...’ हे सांगताना ऋतिकच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशाही’वर प्रवाशांची मोहोर

$
0
0

मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर मार्गावर प्रवासी संख्या दुप्पट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांची पसंती मिळाली आहे. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि लातूर ते पुणे या मार्गांवर प्रत्येकी दोन ‘शिवशाही’ बस धावत असून, या मार्गांवरील प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
एसटी महामंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शिवशाही’ सेवेचा प्रारंभ मुंबई ते रत्नागिरी आणि लातूर ते पुणे या दोन मार्गांवर झाला. एशियाड बसच्या तिकीट दरात प्रवाशांना अधिक सुलभ आणि वातानुकूलित सेवा मिळत असल्याने प्रवासी खूष असल्याचे दिसून आले आहे. मुंबई-रत्नागिरी या मार्गावर पूर्वीपासूनच चार एशियाड गाड्या सोडल्या जातात. सणवार वगळता या गाड्यांचे सरासरी प्रवासी भारमान ४० आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये भारमान मोठ्या प्रमाणावर घटते. वास्तविक, कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही एसटीचे प्रवासी कमी आहेत. मुंबईवरून रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्सद्वाये प्रवासी मोठ्या संख्येने कोकणात जातात. मात्र, मुंबईहून रत्नागिरीसाठी शिवशाही सेवा सुरू केल्याने हे चित्र बदलले आहे. एक जूनपासून आजपावेतो ‘शिवशाही’चे प्रवासी भारमान ८० टक्के राहिले आहे. तुलनेने एशियाड बसचे भारमान ४० टक्के कायम आहे. याचा अर्थ शिवशाही बसमुळे खासगी वाहनांचे प्रवासी एसटीकडे वळाल्याचा दावा एसटीचे अधिकारी करीत आहेत.
पुणे-लातूर मार्गावरील ‘शिवशाही’ सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसचे प्रवासी भारमान ६५ टक्के आहे. ही बस लातूर डेपोतून सुटते. त्यामुळे लातूरवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीनुसार या गाडी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, तरीही दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारसा फरक नाही. पुण्यावरून लातूरला जाण्यासाठीही मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खासगी वाहतुकीला टक्कर
रत्नागिरी पर्यटनस्थळ असल्याने तेथे कायमच प्रवाशांचा ओढा असतो. पुण्यामध्येही लातूरहून शिक्षण, नोकरी या निमित्त स्थायिक झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर खासगी वाहतुकीचा मोठा सु‍ळसुळाट आहे. मात्र, आता खासगी वाहतूकदारांना टक्कर देण्याचे काम ‘शिवशाही’च्या माध्यमातून केले जात आहे.

आजपासून तिकीटदरात घट
आज, शनिवारपासून् वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या शिवनेरी, अश्वमेध आणि शिवशाही या वातानुकूलित बसचे तिकीट दर कमी होणार आहेत. या बसच्या तिकिटावर १४.५ टक्के सेवा कर आकारला जात होता. तो आता पाच टक्के आकारण्यात येत आहे. पुणे ते दादर शिवनेरी बसचे तिकीट ४४६ रुपये होते. ते आजपासून ४४१ रुपये असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीचा आजपासून ‘यज्ञ’

$
0
0

जिल्ह्यात २३ लाख झाडे लावण्याचा संकल्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यात आजपासून सात जुलैपर्यंत २३ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.. विविध सरकारी विभाग, अशासकीय संस्था, निमशासकीय मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन वृक्ष लागवडीचा यज्ञ पूर्ण करणार आहेत.
राज्य सरकारतर्फे चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी वृक्षलागवडीचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत पुण्याला २२.१० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील उत्साही नागरिकांमुळे वृक्ष लागवडीच्या नियोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध सरकारी विभाग आणि संस्थांनी २३.८९ लाख खड्डे खणले आहेत. पुढील आठवडाभरात दररोज वृक्षरोपणाच्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विविध पातळ्यांवर नागरिक हा उपक्रम राबविणार आहेत. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आमदार विजय काळे आणि आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.
उपक्रमामध्ये वन विभाग, ग्रामपंचायत, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी, नगरविकास विभागाबरोबरच शैक्षणिक संस्था तसेच इतर स्वयंसेवी संस्था सहभाग होणार आहेत. जिल्ह्यातील वन क्षेत्रात वन विभागातर्फे १० लाख १४ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागतर्फे ३८ रोपवाटिकांमध्ये ७५ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत रोपे पोहोचविण्यासाठी आम्ही जिल्ह्यात नऊ ठिकाणी ‘रोपे आपल्या दारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून आतापर्यंत साडेतीनशे जणांनी सुमारे सहा हजार रोपे विकत घेतली आहेत, असे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.

महोत्सवाचे उद् घाटन
वन विभाग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महोत्सवाचे उद घाटन आज, शनिवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. मुंढवा येथील रेणुका मंदिराजवळ सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. वृक्ष महोत्सवादरम्यान राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. पुण्यामध्ये ३ जुलैला मुनगंटीवार येणार असून, त्यांच्या हस्ते वारजे जलशुद्धीकरण केंद्राजवळ साकारण्यात येणाऱ्या वन उद्यान प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे खांडेकर यांनी सांगितले.

विभागवार वृक्षारोपण
विभाग एकूण वृक्षारोपण
वन विभाग १० लाख १४ हजार
ग्रामपंचायत ३ लाख ४० हजार
ग्रामविकास १ लाख २२ हजार
कृषी २ लाख १० हजार
नगरविकास १ लाख ४ हजार
शैक्षणिक संस्था ५६ हजार
इतर विभाग ३ लाख ८४ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images