Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खटले मागे घेण्यासाठी सीएमची भेट

$
0
0

गणेशोत्सव कार्यकर्त्यांना खासदारांचे आश्वासन; पारितोषिकांचे वाट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी देखील गणेशोत्सव मंडळाचाच एक कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवात काम करूनच राजकारणात आलो आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांना होणारा त्रास मी जाणतो. म्हणूनच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल,’ असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी मंगळवारी दिले. गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, रवींद्र माळवदकर, अॅड. प्रताप परदेशी, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी या वेळी उपस्थित होते. भोपळे चौकातील हिंद तरुण मंडळाला यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
‘गणेशोत्सव ही विधायक कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण करणारी शाळा आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजात प्रबोधनाचे काम सुरू आहे. आज कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या नेतृत्वाखाली आपण समस्यामुक्त पुण्याकडे वाटचाल करीत आहोत. समस्या सोडवण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे,’ असे शिरोळे म्हणाले. ‘चांगले पुणे घडवण्यासाठी केवळ सरकारच नाही तर नागरिकांचाही सहभाग असायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांवरील खटल्यांबाबत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची भूमिका मांडण्याची माझी जबाबदारी आहे. परंतु, आपणही आचारसंहिता ठेवली, तर पुढे अशा घटना घडणार नाहीत. दर वर्षी गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी पोलिसांप्रमाणेच पालिकेशीही कार्यकर्त्यांच्या संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्यासाठी मंडळांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सर्व परवानग्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे शहराचे नाव जगभरात न्यायचे असेल, तर पर्यावरणपूरक मार्गांचा अवलंब करायला हवा,’ असे मत महापौरांनी व्यक्त केले.

‘पोलिसांकडूनच उत्सवाला गालबोट’
खटले दाखल करुन पोलिस उत्सवाला गालबोट लावत आहेत. मानाच्या गणपती मंडळांवर गुन्हा दाखल करण्याचे कृत्य शोभनीय नसून, हा गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा अपमान आहे. त्यामुळे गणेश स्थापनेपूर्वी हे खटले मागे घ्यावेत, अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली. कायद्याचा बाऊ न करता सामंजस्याची भूमिका पार पाडण्याकरीता सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. आवाजावरील मर्यादेच्या मुद्द्यावरही सामंजस्याने चर्चा व्हायला हवी, याकडे अशोक गोडसे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात उद्या पाणी बंद

$
0
0

शुक्रवारी उशिरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (२९ जून) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (३० जून) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

नवीन होळकर जलकेंद्र : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवपावतीसह बँकेत संपर्काचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या एक लाख रुपयांवरील ठेवींपैकी २५ टक्के रकमेचे रुपांतर बँकेच्या भाग भांडवलात करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित ठेवीदारांनी त्यांच्याकडील ठेव पावतीसह मुख्य कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन बँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आले आहे.
लोकसेवा बँकेवर १९ मे २०१४ रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार एक हजार रुपयांवरील रक्कम काढण्यास निर्बंध घालण्यात आले. नवीन प्रशासकीय मंडळाने एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना दिली आहे. प्रशासकीय मंडळाने बँकेचे आर्थिक पुनर्गठण करण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये चार प्रमुख बाबी प्रस्तावित केल्या होत्या. त्यास मान्यता देण्यात आली आहे.
याबाबत प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींपोटी घेतलेल्या कर्जाची वसुली संबंधित ठेवींमधून करण्यास मान्यता दिलेली आहे; तसेच ठेवीदारांच्या एक लाख रुपयांवरील ठेवींपैकी २५ टक्के रकमेचे रुपांतर बँकेच्या भाग भांडवलात करण्यासही मान्यता मिळाली आहे. बँकेकडे असलेल्या पतसंस्थांच्या ठेवींपैकी ५० टक्के ठेवींचे रुपांतर कायमस्वरुपी ठेव योजनेत करण्यास मंजुरी मिळाली आहे. बँकेवर आथिक निर्बंध लादल्यात आलेल्या दिवशी अनुत्पादक नसलेल्या खात्यांवरील आजवरचे थकीत व्याज वसूल करून संबंधित खात्यांवरील व्यवहार सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.’
‘अटींची पूर्तता करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकेवरील अर्थिक निर्बंधांना १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुनर्गठण योजनेतील अटींची शंभर टक्के पूर्तता झाल्यास ठेवीदारांना रक्कम मिळण्याची शक्यता आहे,’ असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हींची सुरक्षा ‘रामभरोसे

$
0
0

भर चौकातून कॅमेऱ्यांच्या बॅटरींची चोरी; पोलिस यंत्रणा हतबल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दहशतवादी कारवाया, अपघात, चोरी आदी गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने कोट्यवधी रूपये खर्चून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जात असल्याचे उघड झाले आहे.
बॅटरी चोरीबाबत सात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एकाचवेळी चार ठिकाणी चित्रीकरण पाहणाऱ्या पोलिसांनाही याबाबत काहीच माहिती नसल्याने ‘दिव्याखाली अंधार’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. येरवडा येथील गुंजन चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बॅटरी चोरीला गेल्याचे नुकतेच उघड झाले. पोलिस आयुक्तालयातून नियंत्रित करण्यात येणाऱ्या या कॅमेऱ्यांच्या देखभालीचे काम ‘अलाइड डिजिटल सर्व्हिसेस’कडून केले जाते. कंपनीत नेटवर्क इंजिनीअर म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीश जाधव, संतोष हवळे यांना गुंजन चौकातील कॅमेरे काही मिनिटांसाठी बंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बसविण्यात आलेल्या बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले. या बॅटरीची किंमत २१ हजार रुपये आहे.
विशेष म्हणजे जाधव यांनीच बॅटरीचोर अब्दुल अजीज इस्माईल शेख (५०, रा. आकुर्डी) याला पकडून दिले आहे. शेख हा मार्केट यार्ड येथील भंगाराच्या दुकानात बॅटरी विकत होता. त्या बॅटरी दुकानदाराने बाहेर ठेवल्या होत्या. त्यामुळे चोराचा छडा लावला गेला. शहरातील सर्व प्रमुख चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण संबंधित पोलिस ठाणे, उपायुक्त कार्यालय आणि पुणे आयुक्तालयातील नियंत्रण कक्षासह वाहतूक शाखेच्या स्वतंत्र नियंत्रणकक्षातून पाहता येते. चौकातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडूनही याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून दंड आकारण्यात येणार आहे.

सात ठिकाणी बॅटऱ्यांची चोरी
भवानी पेठ (खडक), एस. जी. बर्वे चौक (शिवाजीनगर), सांगवी फाटा, होळकर पूल (खडकी) , राजीव गांधी पूल (चतु:श्रृंगी), कोहिनूर चौक (लष्कर), शहीद हेमंत करकरे चौक (कोरेगाव पार्क) आदी ठिकाणांहून शेखने बॅटऱ्यांची चोरी केली आहे. यातील बहुतांश ठिकाणी पोलिसांचा कायमच वावर असतो. तरीही बॅटऱ्यांची चोरी कशी झाली, या विषयी विचारले असता पोलिस अधिकारी मौन बाळगत आहेत. याबाबत गुन्हे शाखेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती नसल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वपक्षीयांचा मुंढेंवर निशाणा

$
0
0

सामोरे जाण्याचे दिले आव्हान; बसशुल्कात वाढ भोवणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आता पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत. एकाधिरशाही, लहरीपणा, दुराग्रहातून मुंढे यांचा मनमानीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना ‘हिंमत असेल, तर लोकप्रतिनिधींना सामोरे जाण्याची तयारी दाखवा,’ असे आव्हानही त्यांना देण्यात आले आहे.
पीएमपीतर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या बसच्या शुल्कात वाढ केल्याने नाराजी वाढत आहे. पालिकेत मंगळवारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचा आधार घेऊन सर्वपक्षीय सदस्यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर हल्ला चढवला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीही संचालक मंडळाला अंधारात ठेवून परस्पर निर्णय कसे घेतले जातात, अशी विचारणा केली.
नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून मुंढे यांची पीएमपीमध्ये बदली करण्यात आली. मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘पीएमपी’च्या कामाबाबत शिस्तीचा बडगा उगारताना अनेक निर्णयांचा धडाका लावला. पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांचे पीएमपीच्या आवारातील कार्यालयही त्यांनी काढून घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी मुंढे बैठकीला आल्याशिवाय अनुदान देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यापाठोपाठ आता पुणे महापालिकेतही मुंढे यांच्याविरोधात नाराजीचा सूर पसरू लागला असून, मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले.
संचालक मंडळाच्या मान्यतेविना दरवाढ करण्याचा निर्णय परस्पर कसा घेतला जातो, महापौरांनी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष कसे केले जाते, लोकप्रतिनिधींना विश्वासात का घेतले जात नाही आदी प्रश्नांची सरबत्ती करून सर्वपक्षीय सदस्यांनी मुंढे यांच्या एककल्ली कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली. पालिकेचे सभागृह, संचालक मंडळ यांना कायद्यान्वये अधिकार प्राप्त असून, त्याची समज मुंढेंना करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे नगरसेवक गोपाळ चिंतल, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासह अनेक नगरसेवकांनी या विषयावर भाषणे केली.

‘मुंढेंमध्ये केवळ नकारात्मकता’
चांगले काम करून दाखवण्याची क्षमता नसल्याने केवळ नकारात्मक गोष्टींमधून ‘हीरो’ची प्रतिमा पुढे करण्याचा हा प्रकार आहे, या शब्दांत काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी मुंढे यांचा अनुल्लेख करून टीकास्त्र सोडले. मुंढे यांना येत्या काही दिवसांत शंभर दिवस पूर्ण होणार असल्याने या कालावधीत पीएमपीसाठी काय केले, याचा लेखाजोखा त्यांनी पालिकेसमोर मांडावा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी दाखवावी, असे आव्हान चिंतल यांनी दिले.

विद्यार्थ्यांसह सेनेची पालिकेत गांधीगिरी

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसच्या शुल्कात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेने मंगळवारी गांधीगिरीने आंदोलन केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी दरवाढ तत्काळ मागे घेण्याची आग्रही मागणी केली. त्याबाबत, आज (बुधवारी) महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून, पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

पीएमपीकडून खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी, पीएमपीतर्फे गेल्यावर्षीपर्यंत प्रति किमी ६१ रुपये दर आकारण्यात येत होता; पण यंदा अचानक हा दुपटीहून अधिक वाढवल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पालिका सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला गुलाबाचे फूल देऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
दरवाढ मागे घेण्याचे आदेश यापूर्वी महापौरांनी दिले असतानाही, त्याबाबात हेतूपुरस्पर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पीएमपीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता केलेली ही दरवाढ मागे घेण्यासाठी महापौरांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. अखेर, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपीच्या बस शुल्काबाबत सर्वांशी चर्चा केली. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे मंगळवारी शहरात नसल्याने बुधवारी महापौरांकडे होणाऱ्या बैठकीत त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.

पीएमपीच्या दैनंदिन व्यवहारांचे सर्वाधिकार अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे, हा निर्णय संचालक मंडळाच्या मान्यतेविना अध्यक्षांच्या अधिकारात घेण्यात आला आहे. त्यामागील कारणमीमांसेची तपासणी करण्यासाठी बुधवारी बैठक घेण्यात येणार आहे.

कुणाल कुमार, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोरदार पावसाने पाणीपातळीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पानशेत आणि खडकवासला धरणांमध्ये सुमारे २.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १.५५ टीएमसी होते.
धरण परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांत पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात दिवसभरात १९ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत आणि वरसगावमध्ये प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पवना परिसरात ३४ मिलिमीटर, मुळशीत ६९ मिलिमीटर, भामा आसखेडमध्ये १७ मिलिमीटर पाऊस पडल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
टेमघर आणि वरसगाव या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येत नसल्याने या ठिकाणी शून्य पाणीसाठा आहे. पानशेत आणि खडकवासला या ठिकाणी सद्यपरिस्थितीत सुमारे २.८७ टीएमसी पाणी आहे. त्यापैकी पानशेतमध्ये २.६१ टीएमसी, तर खडकवासलामध्ये ०.२७ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या धरणांमध्ये सुमारे १.५५ टीएमसी पाणीसाठा होता.
धरण परिसरात एक जूनपासून आतापर्यंत पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. खडकवासलामध्ये ९९ मिलिमीटर, तर पानशेतमध्ये २४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये दिलासादायक पाणीसाठा उपलब्ध आहे.
पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये २.०२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. भामा आसखेड धरणामध्ये १.६२ टीएमसी, चासकमान धरणात ०.६३ टीएमसी पाणीसाठा ​उपलब्ध आहे.

धरण आणि पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
खडकवासला ०.२७
पानशेत २.६१
पवना २.०२
भामा आसखेड १.६२
चासकमान ०.६३
माणिकडोह ०.५०
डिंभे ०.४०
मुळशी ०.७२
वरसगाव ०.००
टेमघर ०.००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासशुल्कात दुपटीने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेट्रो, मोनोरेल, जलद बस वाहतूक मार्ग (बीआरटीएस) यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी बांधकाम विकासशुल्क (डेव्हलपमेंट चार्जेस) आणि जमीन विकासशुल्कात (लँड डेव्हलपमेंट चार्जेस) दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी एकमताने मान्य झाला. बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची भीती आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमांत नुकतीच सुधारणा केली आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे, मोनो रेल किंवा बीआरटी आदी सार्वजनिक वाहतुकीचे प्रकल्प राबविण्यासाठी बांधकाम विकासशुल्कात दुप्पट वाढ करण्याचे अधिकार महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विकास आणि जमीन विकास शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. पालिकेतील विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्याने कोणत्याही अडथळ्याविना हा प्रस्ताव मंगळवारी मंजूर झाला. यामुळे बांधकाम विकास शुल्कात वाढ होणार असून, त्याचा भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याचा धोका वाढला आहे.

बांधकाम आणि जमीन विकास शुल्काच्या दरवाढीतून महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार आहे. त्याद्वारे जमा होणारा निधी केवळ संबंधित प्रकल्पांसाठीच खर्च करण्याचे बंधन सरकारने पालिकांवर घातले आहे. त्यामुळे वाढीव शुल्कातून जमा होणारा अतिरिक्त निधी पालिकेला मेट्रोसह इतर जलद वाहतूक सेवांसाठी वापरता येणे शक्य होणार आहे. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल ११ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यांपैकी किमान एक हजार कोटी रुपये पालिकेला उभारावे लागणार आहेत. त्याचा ताण पालिकेच्या अर्थसंकल्पावर येण्याची शक्यता होती. आता बांधकाम विकास शुल्कात वाढ करण्यास मान्यता मिळाल्याने पालिकेला काहीसा दिलासा मिळेल.

‘पालिकेला बांधकाम विकास शुल्कातून गेल्या वर्षी १३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. बांधकाम आणि जमीन विकास शुल्कात वाढ करण्यास मान्यता मिळाल्याने आता गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट रक्कम पालिकेला प्राप्त होईल. हा सर्व निधी मेट्रो आणि बीआरटीसाठी खर्च करता येणार आहे,’ अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

व्यावसायिकांना फटका?

शहरामध्ये डेक्कन जिमखाना, कोथरूड, औंध परिसरात सदनिकेसाठीचा रेडीरेकनरचा प्रति चौरस फूट दर ११ हजारांच्या आसपास आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर ४ टक्के दराने म्हणजेच ४४० रुपये बांधकाम विकास शुल्क वसूल केले जात होते. आता ८८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. पेठ भागांमध्ये रेडीरेकनरचा सरासरी दर सात हजारांच्या दरम्यान आहे. या भागांत पूर्वीच्या २८० ऐवजी ५६० रुपये शुल्क भरावे लागेल. व्यावसायिकांना त्याचा सर्वांत मोठा फटका बसण्याची भीती आहे. बिबवेवाडी-येरवडा भागांत व्यावसायिकांना आत्तापर्यंत ८८० रुपये शुल्क भरावे लागत होते. आता त्यांना १७६० रुपये मोजावे लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...निसर्गानेच माळीणची साथ सोडली !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुनर्वसित माळीण गावात पहिल्या पावसात उदभवलेल्या परिस्थितीनंतर माळीणकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या पावसाची सुरुवात असून, तुलनेने पावसाचा जोरही कमी आहे. पावसाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास आणखी संकटांशी सामना करावा लागेल. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत आम्ही पत्र्याच्याच शेडमध्ये राहतो, अशी भूमिका माळीणकरांनी घेतली आहे. या घटनेसाठी आम्ही प्रशासनाला जबाबदार धरत नसून, निसर्गानेच आमची साथ सोडली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आंबेगाव तालुक्यातील पुनर्वसित माळीण गावात गेल्या शनिवारी झालेल्या पावसानंतर भराव टाकलेली माती वाहून गेली, रस्ते खचले आणि काही ठिकाणी भिंतींना तडे गेले. या पार्श्वभूमीवर ‘मटा’च्या प्रतिनिधीने पुनर्वसित माळीणची पाहणी करून आढावा घेतला. माळीण गावाचे पुनर्वसन केलेली जागा डोंगर उतारावर आहे. त्यामुळे येथे गाव वसविताना डोंगराचे सपाटीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने बहुतांश ठिकाणचा भराव खचला आहे. रस्ता उखडला असून, काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. गटारांचे पाणी वाहून जाण्यासाठी काही ठिकाणी मार्ग ठेवलेला नाही. ड्रेनेजच्या टाक्याही खचल्या आहेत. काही घरांच्या स्लॅबमधून पाणी ठिपकत असल्याचेही दिसून आले.

याबाबत माळीण गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय लेंभे म्हणाले, ‘अंगणवाडीच्या दारात वाहून आलेली माती जमा झाली आहे. घरांना कोटिंग केलेले असूनही छत गळत आहेत. ही परिस्थिती पहिल्याच पावसात निर्माण झाली आहे. मुसळधार पावसात काय होईल, याचा अंदाज यावरून येईल. ’

शाळा जुन्याच इमारतीत

या दुर्घटनेनंतर पुनर्वसित माळीण येथील शाळेत पाल्यांना पाठविण्यास पालक अनुत्सुक आहेत. त्यामुळे शाळा जुन्याच इमारतीमध्ये भरविण्यात येत आहे. शाळेत जवळपासच्या आठ गावातील मुले शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पावसाळा संपेपर्यंत शाळा जुन्या इमारतीतच भरविण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुकोबांची पालखी सराटी मुक्कामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आपला बारावा मुक्काम आटोपून बुधवारी बावडा मार्गे पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सराटी येथे विसावला.
बुधवारी पहाटे पाच वाजता इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्यासह इंदापूरवासीयांनी व सोहळाप्रमुखांनी काकडा आरती झाल्यानंतर पालखी सकाळी सहा वाजता शहरातून हरिनामाचा गजर करीत विठूरायाच्या ओढीने निघाली. पालखी सोहळ्यात खासदार संभाजीराजे छत्रपती व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले.
शहरातून पालखी सोहळा मुख्य बाजारपेठ, खडकपुरा, नेहरू चौक, आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरमधून ज्योतिबा मंदिरापासून ज्योतिबाच्या माळावरून पुढे मुख्य रस्त्याला लागून विठ्ठलवाडीकडे निघाला. या वेळी इंदापूरवासीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विठ्ठलवाडी गलांडवाडी नंबर दोनच्या ग्रामस्थांनी सोहळा गावाच्या वेशीवर येताच स्वागत केले. सकाळची न्याहारी येथेच झाली. गावातील अनेकांनी अल्पोपहार दिला. पुढे वडापुरी गावात पालखी तासभर विसावली. सुरवड वकिलवस्ती येथून बावडा गावात दुपारचे भोजन आणि नंतर तालुक्यातील शेवटचे गाव सराटीत मुक्कामी विसावली. आज गुरुवारी नीरा नदीत पादुका स्नानानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून माळशिरस तालुक्यातील अकलूज गावात मुक्कामी विसावणार आहे. अकलूज येथे पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण होणार आहे. अकलूज येथील पालखी सोहळ्याचा मुक्काम यंदापासून बदलण्यात आला असून, याला काही अकलूज ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र पूर्वीची जागा कमी पडत असल्यानेच मुक्काम बदलण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांनी घेतला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तीनाथांची पालखी जेऊरमध्ये विसावली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
त्र्यंबकेश्‍वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा बुधवारी जेऊर येथे विसावला. आज, गुरुवारी पहाटे पालखी सोहळा कंदर मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.
रावगाव येथे पहाटे जयंत गोसावी यांच्या हस्ते श्री निवृत्तीनाथांच्या पादुकांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पूजा व आरतीनंतर सकाळी साडेसात वाजता सोहळा रावगावहून जेऊर मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी सोहळा सकाळी साडेदहा वाजता करमाळा येथे पोहोचला. करमाळा नगरवासीयांनी निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. अल्पशा विश्रांतीनंतर सोहळा दुपारी साडेबारा वाजता जेऊरकडे मार्गस्थ झाला.
करमाळा-जेऊर या वाटचालीत अभंग, गवळणींनी वाटचाल रंगून गेली. आता प्रत्येकालाच विठूरायाच्या भेटीची ओढ लागली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या पायाला चंद्रभागेच्या प्रवाहाप्रमाणे गती आली होती. ढगाळ वातावरणाच्या आल्हाददायक वातावरणातच वारकरी मार्गक्रमण करीत होते. सोहळा सायंकाळी जेऊर समीप येताच मेघराजाने निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यावर मेघवृष्टी करण्यास सुरुवात केली. मेघराजा बरसू लागला तसे वारकरी चिंब होत आनंदाने नाचू लागले. टाळ, मृदुंगाच्या तालावर नाचत, गात अंगावर पावसाच्या सरी घेत जेऊर हद्दीत पोहोचला. आज, गुरुवारी सोहळा सकाळी शेलगाव वांगीमार्गे कंदर मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींचे धर्मपुरीत स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
आळंदी येथून लाखो भक्तांसह पंढरीकडे निघालेल्या पालखी सोहळ्याने बुधवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश केला. सायंकाळी समाज आरतीनंतर पालखी सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक एस. वीरेशप्रभू, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड आदींसह हजारो भाविक माउलींच्या स्वागताला धर्मपुरी येथे जमले होते.
सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी ६.३० वाजता नातेपुत्याकडे मार्गस्थ झाला. पहाटे श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीनंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाझप पडत होती. दिंड्यादिंड्यांमध्ये भजनाला रंग भरला होता. सकाळचे काकड्याचे अभंग गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधुर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सव्वा नऊ वाजता साधुबुवाच्या ओढ्याजवळ पोहोचला. रथातून माउलींची पालखी उतरविण्यात आली. ती असंख्य भाविकांनी खांद्यावर घेऊन माउली माउली नामाचा जयघोष करीत साधुबुवांच्या मंदिरात आणली. साधुबुवांच्या पादुकांवर माउलींच्या पादुका ठेवून तेथे पूजा व आरती करण्यात आली. या वेळी कुंभारगावकरांच्या वतीने अॅड. संपतराव कुंभारगावकर यांनी प्रवचनाची सेवा केली. सकाळची न्याहरी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता हा सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला. धर्मपुरी बंगला येथे दुपारचा नैवेद्य, भोजन व विश्रांतीसाठी हा सोहळा दुपारी बारा वाजता पोहोचला.
बरड मुक्कामानंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले हजारो वारकरी शिंगणापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी झाले. शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेऊन सोहळा नातेपुत्याकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी नातेपुते ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पालखी तळावर पोहोचला. समाज आरतीनंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.

पहिले गोल रिंगण आज
माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज, गुरुवारी सदाशिवनगर येथील पुरंदावडे हद्दीतील नवीन जागेत होणार आहे. या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आषाढी वारीसाठी एसटीकडून सोय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ३० जून ते १० जुलै २०१७ या कालावधीत पंढरपूर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर आगारासह सर्व आगारातून जादा बसगाड्यांची सोय करण्यात आल्याची माहिती शिरूरचे आगार व्यवस्थापक अमोल पवार यांनी दिली आहे.
पवार म्हणाले, ‘आषाढी यात्रेला जाण्यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी ४४ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास गाव ते पंढरपूर अशी थेट बस सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. भाविकांनी आपल्या तालुक्यातील आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यास गाव ते पंढरपूर व परत गावी येण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगाऊ ग्रुप बुकिंगची सोय आगारात करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील भाविकांनी संपर्कासाठी बसआगार व्यवस्थापक ०२१३८- २२२१३५ व २२२३०५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
विभागीय कार्यालय राज्य परिवहन, पुणे ०२०-२४४४७१५२, आगार व्यवस्थापक शिवाजीनगर - ०२० २५५३६६४१, २५५३०८८९, स्वारगेट ०२०-२४४४२९६८
भोर - ०२१२३-२२२६०७, २२२५३६
नारायणगाव - ०२१३२- २४२०८०, २४२२०३५
राजगुरुनगर - ०२१३५-२२२०४४, २२२०३५
तळेगाव - ०२११४-२२२४३५, २२२३४५
बारामती ०२१२-२२२३०६, २२३१२५
इंदपुर ०२१११- २२३१४४ २२३१२५
सासवड ०२११५- २२२४१५, २२२३३५
दौंड - ०२११७- २६३३३४, २६२३३४
पिंपरी चिंचवड - ०२०-२७४२०००७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक जुलैपासून काय बदलणार?

$
0
0

येत्या शनिवारी (१ जुलै) काय आहे, असे विचारले, तर एकमुखाने ‘जीएसटी’ असे उत्तर मिळेल. बहुप्रतीक्षित जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या कररचनेत आमूलाग्र बदल होणारच आहेत; पण जीएसटी व्यतिरिक्त शनिवारपासूनच इतरही अनेक व्यवहारांमधील तरतुदी बदलणार आहेत. काय आहेत हे बदल..?

‘इ रिटर्न’ साठी हवे ‘आधार’

येत्या शनिवारपासून प्राप्तिकराचे ई-रिटर्न भरण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक ठरविण्यात आला आहे. ‘आधार’शिवाय आता कोणीही ई-रिटर्न भरू शकणार नाही.

‘पॅन’-आधार जोडणी बंधनकारक

- कर चुकविण्यासाठी एकापेक्षा अधिक पॅन कार्डांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आधार आणि पॅन कार्डची जोडणी करणे एक जुलैपासून बंधनकारक करण्यात आले आहे. ही जोडणी न केल्यास संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड प्राप्तिकर कायद्यातील कलम १३९ (एए) नुसार अवैध ठरणार आहे. त्यामुळे ही जोडणी तातडीने करणे आवश्यक ठरले आहे.

आधार शिवाय पॅन कार्ड नाही

- नवे पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शनिवारनंतर आधार कार्ड सादर केल्याशिवाय नवे पॅन कार्ड काढता येणार नाही.

‘आधार’शिवाय पासपोर्ट नाही

पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या यादीत आधार कार्डचा समावेश करण्याचा निर्णय परराष्ट्र व्यवहार खात्याने घेतला आहे. त्यामुळे शनिवारनंतर पासपोर्ट काढणाऱ्यांनी आधार कार्ड सादर करणे आवश्यक ठरले आहे.

‘पीएफ’ खात्याशी आधारची जोडणी

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (इपीएफओ) कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी आधारची जोडणी बंधनकारक ठरविली असून त्याची मुदत ३० जून आहे. तसेच, पेन्शनरांनाही आधार कार्ड सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘आधार’ची जोडणी केल्यानंतर प्रॉव्हिडंट फंड काढण्याचा किंवा निवृत्तीनंतर पूर्ण रक्कम मिळविण्याचा कालावधी २० दिवसांहून दहा दिवसांपर्यंत कमी होणे शक्य असल्याचे इपीएफओने म्हटले आहे.

‘आधार’शिवाय सवलत नाही

रेल्वे तिकिटांवर देण्यात येणाऱ्या सवलतींचा गैरवापर होत असल्याचे रेल्वेला आढळून आले आहे. त्यामुळे शनिवारनंतर आधार कार्ड सादर केल्याशिवाय रेल्वे तिकिटांवर कोणतीही सवलत मिळणार नाही.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘आधार’

मनुष्यबळ विकास विभागानेही याबाबत शाळा आणि महाविद्यालयांना आदेश दिला आहे. त्यानुसार नव्याने शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र असलेल्या आणि सध्याही शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आधार सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार नसलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागेल.

रेशनवरील जिन्नस नाहीत

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे जिन्नस मिळविण्यासाठी लाभार्थींनी ‘आधार’ आणि रेशन कार्डची जोडणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, त्यांना सवलतीच्या दरात धान्य, रॉकेल किंवा कोणतेही अनुदान मिळणार नाही.

डिपार्चर कार्डची गरज नाही

येत्या शनिवारनंतर परदेशी विमानप्रवास करताना भारतीय नागरिकांना डिपार्चर कार्डची गरज भासणार नाही. इमिग्रेशनच्या प्रक्रियेत खर्च होणारा वेळ वाचवून प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सौदीतील रहिवाशांना अवलंबित्व कर

सौदी अरेबियात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी एक जुलैपासून अवलंबित्व कर (डिपेंडंट टॅक्स) भरावा लागणार आहे. प्रतिव्यक्ती १०० रियाल, म्हणजेच एक हजार ७२१ रुपये दरमहा हा कर भरावा लागेल. पुढील वर्षापासून हा कर दुप्पट, त्यापुढील वर्षात तिप्पट आणि त्यानंतर चौपट होणार आहे. सौदी अरेबियात सुमारे ४१ लाख भारतीय असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यापैकी अनेकांना हा फटका बसणार आहे.

‘सीए’साठी नवा अभ्यासक्रम

चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळविण्यासाठी येत्या एक जुलैपासून नवा अभ्यासक्रम लागू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स’च्या मानकांनुसार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानकांनुसार हा नवा अभ्यासक्रम असेल आणि त्यामध्ये शनिवारपासून लागू होणाऱ्या जीएसटीचाही समावेश असेल.

ऑस्ट्रेलियासाठी ऑनलाइन व्हिजिटर व्हिसा

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारतीय नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑस्ट्रेलियाला जाताना आता भारतीय व्हिजिटर्स व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. त्यामुळे व्हिसा मंजुरीची प्रक्रियाही वेगाने पूर्ण होऊ शकेल.

(इकॉनॉमिक टाइम्स)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक आनंदयात्री...

$
0
0

अनंत दीक्षित

साधारण १५ वर्षांपूर्वीचा एक कार्यक्रम आठवतो. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन व पंडित दयाशंकर (वाराणसी) यांच्या सनईची जुगलबंदी ऐकली. संगीत हे स्वरकाव्य असते याचा तो अनुभव होता. संगीताला शब्दकोशविरहित भाषा असते. त्या अमूर्त भाषेचा व्याप वैश्विक असतो. हाच त्या जुगलबंदीचा साक्षात्कार होता. उपाध्येंचा परिचय झाल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा योग आला त्या प्रत्येक वेळी हा माणूस आनंदयात्री असल्याचे जाणवले.

उपाध्येंचे वडील पं. बाळकृष्णबुवा यांनी १९५१मध्ये व्हायोलिन अकादमीची स्थापना केली. घरात सतत व्हायोलिन वाजायचे. त्याचा संस्कार झाला. अतुलकुमार ८ वर्षांचे असल्यापासून व्हायोलिन वाजवतात. वादन आणि शिक्षणाचा हा जीवनप्रवास ५० वर्षांचा आहे. भारतीय संगीतातही एकरूप होणारे वाद्य म्हणूनच बाळकृष्णबुवांनी संपूर्ण आयुष्य व्हायोलिनला दिले. जे जे गाता येते ते सगळं व्हायोलिनमध्ये येते असे बाळकृष्णबुवा मानीत. त्यातच देवगंधर्व भास्करबुवा बखले घराण्याचे गायकीचे संस्कार झाले. पं. श्रीधर पार्सेकर व डॉ. यहुदी मेन्युहिन यांच्या शैलीचाही अतुलकुमारांवर मोठा प्रभाव पडला. त्यांचे वडील नेहमी म्हणायचे, की ज्याला कलेत सतत नवसर्जन सादर करायचे असेल, त्याने १०० वेळा तरी इतरांचे संगीत ऐकले पाहिजे. बाळकृष्णबुवांची दृष्टी व्यापक होती. त्यांनी डॉ. यहुदी मेन्युहिन यांचे वादन शिष्यांना ऐकविले. बापूराव केतकरांची सांगितिक विचारांची बैठक सतत चिंतनाच्या केंद्रस्थानी ठेवली. भीमसेनजींचा मियाँमल्हार समोर बसून ऐकायला लावला. किशोरीताईंचे स्वर अनुभवले. रविशंकरांची शैली कशी मनोहारी आहे, याचा अनुभव घेतला. पं. कुमार गंधर्वांचा प्रतिभाविलास पाहिला. साक्षात पु. ल. देशपांडेंनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची भेट घडवून आणली. उस्ताद शाहिद परवेझ, उस्ताद रशिद खाँ या दोघांनी तर बंधूवत प्रेम दिले आणि ज्ञानाचे आदानप्रदानही केले. उस्ताद आमीर खाँ साहेबांचा मारवा ऐकला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, विलायत खाँ साहेब, पं. जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम अली खाँ साहेब असे अनेक दिग्गज एकाग्रतेने ऐकण्याची संधी लाभली. पं. अतुलकुमार असे मानतात, की संगीत ही मुक्त आणि अमूर्त कला आहे. कलाकाराने ये हृदयीचे ते हृदयी अशी खूणगाठ पक्की करावी लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या आविष्कारात उपासना, रियाज आणि सिद्धी जाणवते. भारतीय संगीतात कोणाच्या आवाजात मादकता- कैफ आहे, कोणाच्या स्वरात शुचिता व मांगल्य आहे, या अर्थाने रोज नवी पूजा बांधावी, असे त्यांचे वादन असते. यासाठी त्यांना अनेक व्यवहारांवर पाणी सोडावे लागले. बँकेची नोकरी सोडावी लागली.

त्यांनी अनेक प्रगल्भ शिष्य घडविले. त्यांचे शिष्यांशी असणारे नाते हा एक मनोहारी भाग असतो. प्रत्येकाने स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करावी असा त्यांचा आग्रह असतो. गायन आणि वादन यांची एकरूपता, आत्मसंवाद, स्वरसंवाद, भावनांच्या गाभाऱ्यात पोहोचणे यासंबंधी त्यांची परिभाषा अत्यंत मोहक असते.

पं. अतुलकुमार यांनी स्वरझंकार हे व्यासपीठ उभे केले. पं. भीमसेन जोशी यांच्या सवाई गंधर्व महोत्सवातून प्रेरणा घेतली. लोकांना भारतीय संगीताचा कान दिला. शेकडो विद्यार्थी घडवले. जगाच्या क्षितिजावर विश्वसंगीताचे चिंतन केले. आयुष्यात तुडुंब भरलेला आनंद अनुभवला. याचा अर्थ अडचणी आल्याच नाहीत असे नाही. संगीत ज्ञानाची त्रिसूत्री पं अतुलकुमारांनी माझ्याशी बोलताना सांगितली. त्यातून त्यांचा दृष्टिकोन लख्खपणे जाणवतो.

१) आईच्या उदरात असतानाच लय आणि ताल यांचे शिक्षण मिळते. प्रत्येक जीव तिथेच या संस्कारांना सुरुवात करतो.

२) काहीतरी वेगळे करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते. दिशा आणि दृष्टीकोन त्यासाठी लागतो.

३) जीवनाकडे सतत नव्याने पाहण्याची साधना डोळसपणे करावी.

उपाध्येंचा सर्वांत महत्वाचा पैलू म्हणजे भविष्याविषयी ते आशावादी आहेत. नव्या पिढीवर विश्वास आहे. येत्या ५० वर्षांत भारतीय संगीताला खूपच चांगले दिवस येतील असे त्यांना वाटते. याच दृष्टीने Center for promotion of music विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. स्वरझंकारही महाराष्ट्राच्या गावोगावी पोहोचवला आहे. Center for promotion of music ला देशीविदेशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सुरू केलेले हे ज्ञानसत्र आहे. आजकाल चांगला गुरू आणि चांगला शिष्य यांना फार महत्त्व आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका येथेही या सेंटरला शिष्य मिळाले आहेत. भारतीय संगीतातील कोणत्याही रागाचे व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल, तर त्या रागाचे चौफेर दर्शन कसे घ्यावे यावर त्यांचा कटाक्ष असतो. परिणामी, पुण्यातही या व्हायोलिन अकादमीला अनेकांच्या अंतःकरणात अढळ स्थान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंध क्रिकेटपटूंना नोकरीत डावलले जाते’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शारीरिकदृष्ट्या फिट असलेल्या क्रिकेटपटूंना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाते, ही स्वागतार्ह बाब आहे, आम्ही देखील देशाचे प्रतिनिधित्व करतो; पण अंध म्हणून आम्हाला नोकरीत डावलले जाते,’ अशी खंत दृष्टीहीन क्रिकेटपटू अमोल करचे यांनी व्यक्त केली.
आडकर फाउंडेशन आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने करचे यांना गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अॅड. प्रमोद आडकर यांनी त्याची मुलाखत घेतली. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे, श्यामची आई फाउंडेनचे भारत देसडला या वेळी उपस्थित होते.
‘अंध असूनही आम्ही इतरांसारखीच सर्व कामे करू शकतो. सरकारने कोणत्याच स्तरावर आमच्या क्षमतांना कमी लेखू नये. आज अंधांची क्रिकेटची टीम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला यश प्राप्त करून देत आहे. आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला देखील आम्ही तीन वेळा पराभूत केले. जिद्द बाळगली की आपण कोणतेही यश संपादित करू शकतो यावर माझा विश्वास आहे,’ असे करचे याने सांगितले.
लोढा समितीने केलेल्या शिफारशींमध्ये अंध व्यक्तींना मुख्य क्रिक्रेट मध्ये सामावून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे आपटे यांनी सांगितले. संचेती यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘यूपीएससी’तील गुणवंतांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सैनिक होऊन देशसेवा करणे ही देशभक्ती आहे. त्याचप्रमाणे नागरी सेवेत येऊन समाजात चांगले काम कारणे ही देखील प्रशंसनीय बाब आहे. त्यामुळे ही सेवा करीत असताना अधिकारी समाजशील आणि संवेदनशील असणे जास्त महत्त्वाचे आहे,’ असे मत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) विविध योजनांद्वारे प्रायोजित केलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६ च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा यशदा येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी बडोले बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे, आयकर उपायुक्त अजय ढोके आदी या वेळी उपस्थित होते.

‘यूपीएससी’ परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. अपयश ही केवळ एक मानसिकता असून त्यातून बाहेर पडत यशस्वी होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे बडोले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केल्यामुळे नोटाबंदी…परेशान राहुल गांधी…’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आपल्या देशात केल्यामुळे नोटाबंदी, फारच परेशान दिसताहेत राहुल गांधी...
देशात आलीय नरेंद्र मोदींची आंधी, त्यांनी तोडून टाकली काँग्रेसची फांदी...
शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली, काँग्रेसची सत्ता गेली...’

ही चारोळी सादर झाल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी हास्यस्फोट घडला. ही राजकीय चारोळी सादर करणारे रामदास आठवले हे व्यक्तिमत्त्वही तितकेच दिलखुलास असल्याने कार्यक्रमात आणखी रंगत आली.बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित हास्य कवी संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले आणि त्यांनीच आपल्या कवितेतून अवघे सभागृह डोक्यावर घेतले. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, हास्यकवी बंडा जोशी, भरत दौंडकर, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आयोजक मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

‘मी कवी नाही पुस्तकातला, शब्दांशी शब्द जोडण्याची आहे माझ्याजवळ कला, माझा कवी होण्याचा विचार होता; पण फक्त कवी झालो असतो तर उपाशी राहण्याची वेळ आली असती.’ ‘बंद झाली पाहिजे हातभट्टी, आपणच घेत नाही तिच्याशी कट्टी, पिणारा असतो फारच हट्टी, म्हणूनच बंद होत नाही हातभट्टी...’ अशा चारोळ्यातून आठवले यांनी धम्माल उडवून दिली, ज्यामुळे सभागृहात हास्यबॉम्ब फुटत राहिले. एका दिलखुलास नेत्याने केलेले निखळ मनोरंजन काय असते, याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.

‘आम्हाला आठवले, आमचे नाव रामदास आहे, मंत्री नाही म्हणून तर हा वनवास आहे,’ अशी वात्रटिका सादर करून फुटाणे यांनी आठवले यांची फिरकी घेतली. ‘राजकारणात टोप्यांचे रंग बदलत असतात, मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा बदल घडत नाही. राजकारण हाताबाहेर आणि डोक्याबाहेर गेले आहे. राजकारणी जसे दिसतात, तसे असतातच असे नाही, 'अशी कोपरखळी त्यांनी मारली.

‘हवेच्या दिशेने जाणार’

‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो. त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. राजकारणात फार काळ एका व्यक्तीबरोबर राहायचे नसते. आता मी पुढील दहा वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाहीत. त्यानंतर हवा ज्या दिशेला वाहणार, तिकडे आम्ही जाणार,’ असे आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा सहली जाणार भिलारला

$
0
0

Chintamani.Patki @timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : राज्यभरातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून त्यांच्या सहलींसाठी तातडीने तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावात शाळांच्या सहली नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सहलींसाठी आराखडा तयार करण्यात येत असून, दिवाळीनंतर शाळांच्या सहली पुस्तकांच्या गावाला जातील. शाळांनी सहलीच्या नियोजनामध्ये भिलार या गावाचा समावेश करायचा असला तरी शाळांवर यासाठी सक्ती केली जाणार नाही.

राज्य सरकारने ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून वसविले आहे. पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन होऊन दोन महिने पूर्ण होत आहेत. या अनोख्या प्रयोगाचे कौतुकही झाले; पण लोक विरंगुळ्यासाठी येणार की पुस्तक वाचायला, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा उपक्रम सुरू राहावा यासाठी शाळांच्या सहली भिलारमध्ये नेण्याची तयारी सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांवर वाचनाचे संस्कार व्हावेत तसेच पुस्तकांच्या वातावरणात ते रमावेत या उद्देशाने भिलारला सहली आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यातील बहुतांशी शाळांच्या सहली महाबळेश्वरला जात असतात. महाबळेश्वरपासून जवळ असलेल्या भिलारला भेट द्यावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्था ही सरकारची संस्था प्रयत्न करणार आहे. संस्थेने त्यासाठी आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत. सहली आल्यानंतरपुस्तकांच्या गावात काय उपक्रम राबवावेत, नियोजन कसे असावे, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

याबाबत संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी ‘मटा’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘दिवाळीनंतर शाळांच्या सहली सुरू होतात. बहुतांशी शाळांच्या सहली महाबळेश्वरला जात असतात. महाबळेश्वरपासून भिलार हे गाव जवळ असून शाळांनी पुस्तकांच्या गावाला भेट द्यावी, यासाठी नियोजन केले जात आहे. हा उपक्रम नवीन असल्याने तेथील सुविधा मर्यादित आहेत. तसेच निसर्गाला हानी पोहचू नये म्हणून जास्त गर्दी जमवणे हा हेतू नाही. शाळांना हा उपक्रम सक्तीचा केला तर व्यवस्था करणे अवघड जाईल. त्यामुळे सक्ती करण्यापेक्षा आवाहन केले जाणार असून टप्प्या-टप्प्याने सहलींना परवानगी देण्यात येईल. काय उपक्रम राबवावेत याचा आराखडा दिवाळीपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर शाळांना माहिती देण्यात येईल.’


‘विविध उपक्रम’

भिलार या पुस्तकांच्या गावात काही प्रमाणात बालसाहित्य उपलब्ध आहे. आगामी काळात ते वाढविण्यात येईल. कोणत्या वयोगटाचे विद्यार्थी येणार हे पाहून भाषेशी संबंधित खेळ, गमती-जमती, अभिवाचन, गोष्टी, कविता वाचन, लेखक-कवी यांच्याशी भेट, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

- डॉ. आनंद काटीकर, प्रभारी संचालक-राज्य मराठी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारमधून बाहेर पडू : शेट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने २५ जुलैपर्यंत स्पष्टीकरण न दिल्यास सरकारमध्ये राहायचे की नाही, याचा निर्णय घेणार आहे.’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात अल्पबचत भवन येथे झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवि तुपकर, सतीश काकडे आदी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचे आकडे फसवे आहेत. स्वामिनाथन समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळाला पहिजे. याबाबत सरकारने २५ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अद्यापही तयार आहोत. मात्र, या मुदतीनंतर आम्ही थांबणार नाही. सरकारला वाकवून आमच्या मागण्या मान्य करून घेतल्या जातील.’ ‘सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी ही संशयास्पद आहे. ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी फसवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानुसार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार असेल, तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष का आहे?’ असा सवाल खासदार शेट्टी यांनी केला.

‘राज्य सरकारने नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मदत दिली जाणार आहे. कर्जांचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांना काय लाभ ​मिळणार आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. सरकारने मोठे आकडे जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे.’ असा आरोप खासदार शेट्टी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंढेंना परत बोलवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर मुक्ता टिळक यांनी बोलावलेल्या बैठकीस येण्यासाठी टाळाटाळ करणारे ‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना परत बोलवा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या बैठकीस अनुप​स्थित राहून मुंढे यांनी केवळ महापौरांचा नव्हे तर ४० लाख पुणेकरांचाही अपमान केला असल्याने त्यांचा निषेधही पदाधिकाऱ्यांनी केला.

विद्यार्थी वाहतुकीच्या शुल्कवाढीवरून मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. मुंढे यांना सर्वसाधारणसभेत बोलवा, अशी सभासदांची मागणी होती. या वेळी मुंढे यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची मुंढे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार बुधवारी महापौर यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला मुंढे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मुंढे यांनी बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपण बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचा निरोप पाठवला आणि या बैठकीसाठी ‘पीएमपी’चे दोन अधिकारी पाठवले. मुंढे हे पुण्यात असूनही या बैठकीला उपस्थित न राहिल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला. यावर प्रतिक्रिया नोंदवताना महापौर टिळक म्हणाल्या, ‘विद्यार्थी वाहतुकीचा विषय संवेदनशील असल्याने या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस मुंढे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी या बैठकीस येण्याचे साफ धुडकावून लावले आणि दोन अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाठवले. मुंढे यांनी महापालिकेचा अपमान केला आहे. मुंढे यांनी पुणेकरांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे. मात्र, त्यांना त्याची गरज वाटत नाही’, अशी टीका महापौरांनी केली.


‘डिझेलसाठी हवी निविदा प्रक्रिया’

पिंपरी : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) डिझेल खरेदीसाठी थेट पद्धतीऐवजी निविदा प्रक्रिया राबवावी,’ अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी बुधवारी केली. यामुळे करदात्यांच्या पैशांची बचत होईल, असा दावा केला आहे.

या संदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएमपी’च्या बसगाड्यांसाठी वर्षभरापासून बाजारभावापेक्षा कमी दराने डिझेल खरेदी केले जात आहे. मात्र, आता प्रशासनाने बाजारभावानुसार डिझेल खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे काम निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने सात वर्षांसाठी देण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, या निर्णयामुळे ‘पीएमपी’ला वार्षिक दीड कोटींहून अधिक आणि सात वर्षात साडेदहा कोटी रुपयांचा तोटा होणार आहे, असे सावळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे डिझेल खरेदीचे काम थेट पद्धतीने देताना प्रशासनाने संचालक मंडळाला विश्वासात घ्यावे, ‘पीएमपी’ला खड्ड्यात न घालता डिझेल खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील करदात्यांच्या पैशांची बचत करावी, अशी मागणी त्यांनी ‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘पीएमपी’च्या भूमिकेवर शंका

‘पीएमपी’ला वार्षिक दहा लाख लिटर डिझेलची आवश्यकता आहे. त्यामुळे एचपीसीएल कंपनीकडून थेट पद्धतीने डिझेल खरेदी केल्यास वार्षिक दीड कोटींहून अधिक आणि सात वर्षांत साडेदहा कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. याशिवाय ‘पीएमपी’साठी नव्याने आठशे बस खरेदी केल्या जाणार आहेत. या बस ‘सीएनजी’ऐवजी डिझेलच्या खरेदी कराव्यात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विनानिविदा बाजारभावानुसार डिझेल खरेदी आणि डिझेलवर चालणाऱ्या आठशे बसेस खरेदी करण्याचा अट्टहास यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images