Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अधिकारी उपस्थिती बैठकांना ​अनिवार्य

$
0
0

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेचा कारभार चालविणाऱ्या मुख्य सभेबरोबरच स्थायी समितीच्या बैठकांना सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समितीबरोबरच मुख्य सभेला अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आल्याने हजेरी बंधनकारक केल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहेत.
पालिकेच्या मुख्य सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होते. स्थायी समितीच्या बैठकांमध्येही विविध विषयांवर चर्चा होत असतात. या वेळी अधिकारी अनुपस्थित असल्याने सभासदांच्या शंकाचे निरसन होत नाही. त्यामुळे अनेक प्रस्ताव चर्चेविना पुढे ढकलले जातात. अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेही करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अधिकारी बैठकांना अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने उगले यांनी उपस्थितीचे आदेश काढले आहेत. जे अधिकारी या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या बैठकींनाही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने सदस्यांनी प्रशासनाचा निषेध करून सभा तहकूब केली होती. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी वरील आदेश काढले आहेत. आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पालिका कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक आदेशांना हरताळ
समित्यांच्या बैठकांना अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने अनेकदा काढण्यात आले होते. आदेश काढल्यानंतर पहिले आठ ते पंधरा दिवस त्याची अंमलबजावणी होते. त्यानंतर मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचे नक्की काय होईल, हे पुढील महिन्यात पाहणे रंजक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर राष्ट्रवादीचे कारभारी बदलणार?

$
0
0

अजित पवार साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात पक्ष मजबूत करण्याबरोबरच आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पुणेकरांच्या हितासाठी सतत झटणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व्हावे, या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात तटकरे आणि पवार शहरात येणार असून, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत. या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करून पक्षवाढीसाठी नव्याने जबाबदारी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना कडाडून विरोध करतानाच नागरिकांच्या हितासाठी अधिक आक्रमक होऊन प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सल्ला दिला कार्यकर्त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीनंतर विरोधी पक्ष म्हणून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे पक्षाला मरगळ आली असून गटातटाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. याचा जोरदार फटका पक्षाला बसत असून, त्यात लक्ष घालण्याची विनंती शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यासाठी तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ५ जुलैला तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे. मेळाव्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार तसेच माजी मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भाजपला जाब विचारणार
पालिकेत सत्ता स्थापन करुन भाजपला तीन महिने झाले आहेत. सत्ताधारी झाल्यापासून भाजपने घोषणाबाजी करण्यावरच भर दिला आहे. बहुमताच्या जोरावर अनेक चुकीचे आणि पुणेकरांवर अन्याय करणारे निर्णय सत्ताधारी घेत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पालिकेत तोडफोड करण्याचे दुर्दैवी प्रकार देखील घडले आहेत. या तीन महिन्यांत सत्ताधारी भाजपने विकासाच्या दृष्टिने काय केले, याचा जाब विचारणार असल्याचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूतखड्याचा आजार ‘तरुण’ होतोय

$
0
0

पुणे : गेल्या दशकात अगदी मोजक्या प्रमाणात मूतखड्याचा आजार झाल्याचे दिसून येत होते. परंतु, आता हा आजार डोके वर काढत आहे. पूर्वी वयाच्या पन्नाशी-साठीतील व्यक्तींमध्ये दिसणारा हा आजार आता ३० ते ४० वयातील तरुण पिढीत आढळत आहे. मूतखडा झाला की वेदना, रक्तस्राव यासारख्या लक्षणांना सामोरे जावे लागते. परिणामी, मूत्रविकाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पेशंटची संख्या वाढली आहे. दहा वर्षांत मूतखडा होण्याचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. आई-वडिलांपैकी कोणाला आजार असल्यास अनुवंशिकतेने पुढच्या पिढीत आजार होतो. त्याशिवाय बदलती जीवनशैली देखील त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. याबाबत मूत्रविकारतज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत.

मूतखडा होण्याची कारणे

‘बदलत्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण, धावपळ, सतत व्यग्र असल्याने लघवी काही तास थांबवून ठेवणे, कमी पाणी पिणे यामुळे मूतखड्याचा आजार उद्भवण्यास सुरुवात होते. काही आठवडे, महिन्यापर्यंत क्षार साठून राहतात. नंतर त्याचे रूपांतर खड्यात होते. नंतर दुखणे सुरू झाले की त्यालाच मूतखडा झाल्याचे म्हटले जाते. सोनोग्राफी किंवा वेळप्रसंगी सीटी स्कॅनद्वारे आजाराचे निदान होते. सोनोग्राफीद्वारे खडा किती आकाराचा आणि तो मूत्रपिंडाच्या कोणत्या बाजूला आहे याचे निदान झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे उपचार करणे अपेक्षित आहे याचा निर्णय घेता येतो,’ असे मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुबोध शिवदे सांगतात.

काही कारणास्तव प्रोस्टेटच्या मार्गात अडथळा येत असेल किंवा मूत्रनलिका आणि मूत्रपिंडामध्ये काही प्रमाणात लघवी साठते. तेथे क्षार जमा होतात. शरिराच्या विविध घटकांमध्ये कॅल्शिअम, यूरीक अॅसिड, फॉस्फेट यांच्या संसर्गामुळे देखील क्षाराचे खडे तयार होतात. त्याला ‘मेट्रिक स्टोन’ असे म्हटले जाते. हे खडे पाच मिलिमीटर ते अर्धा सेंटीमीटरच्या आकाराचे असतात. त्यामुळे ते लघवीवाटे बाहेर पडत नाहीत. मूत्रमार्गाद्वारे बाहेर न पडणारे खडे पेशंटना त्रास देतात. काही वेळा संसर्ग होण्याची शक्यता असून त्यामुळे वेदना होते. रक्तस्राव देखील होते. खड्यामुळे संसर्ग होऊन मूत्रपिंडाला सूज येते किंवा ताण येऊ शकतो. जंतू संसर्ग होऊन पूद्वारे मूत्रपिंड खराब होण्याची भीती असते.

मूतखड्याचे उपचार

‘पेशंट डॉक्टरांकडे गेल्यास लघवीच्या काही तपासण्या केल्या जातात. त्यानंतर वेदनाशामक औषधे दिली जातात. थोडा वेळ थांबल्यानंतर खडा निघणार नाही याची खात्री झाल्यास ९८ टक्के खडा हा दुर्बिणीद्वारे काढण्यात येतो. ‘एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिप्यूट’ (ईएसडब्ल्यूएल) थेरपी असे म्हटले जाते. सर्व चाचण्या आणि मूत्रपिंडातील खडा तपासण्यासाटी ही थेरपी महत्त्वाची ठरते. सर्व खडे या उपचार पद्धतीतून काढता येत नाहीत. दीड सेंटीमीटरच्या आतील आकाराच्या खड्यांचे ध्वनिलहरीद्वारे वाळूसारखे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर लघवीतून ते बाहेर काढले जातात. दीड सेंटीमीटरपेक्षा आकाराने मोठे आणि जादा प्रमाणात खडे असल्यास दुर्बिणीच्या उपचाराद्वारे ‘पीसीएनएल’ या थेरपीने मूत्रपिंडामध्ये सूक्ष्म छिद्र करून बाहेर काढले जातात,’ असे डॉ. शिवदे यांनी सांगितले.

मूत्रनलिकेत अडकलेले खडे ‘यूआरएस’ पद्धतीने दुर्बिणीने बारीक करून काढले जातात. ही तिसरी पद्धत. उपचाराची चौथी पद्धत म्हणजे टाक्याचे ऑपरेशन. ही पद्धत कालबाह्य झाली आहे. खड्याचा आकार मोठा असल्यास आणि दुर्बिणीने खडे काढणे शक्य नसेल, तर या पद्धतीचा वापर केला जातो. त्याचे प्रमाण दोन टक्के आहे.

कामाच्या व्यापात पाणी पिण्याकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष, मूत्रमार्गात साठणारे क्षाराचे प्रमाण आणि संसर्गामुळे मूतखड्याचा (किडनी स्टोन) आजार उद्भवतो. गेल्या काही वर्षांमध्ये हा आजार वाढत आहे. वेदना होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दशकभरापूर्वी वयाच्या साठीत होणारा हा आजार तरुणांनाही होत असल्याचे चित्र आहे.

खडे न होण्यासाठीची काळजी

दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.

मूत्रमार्गात संसर्ग आहे की नाही याची तपासणी करावी. लघवीच्या मार्गात जळजळ होते. लघवीचा रंग बदलतो. त्यासाठी लघवीची तपासणी करावी.

मूतखड्याचा आजार झालेल्या व्यक्तींनी क्षारचे घटक, कॅल्शिअम, फॉस्फेट यांचे घटक असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे.

दूधाचे पदार्थ कमी खावेत. मासांहारात मासे खावेत, पण चिकन, मटण वर्ज्य करावे.

पालेभाज्यांमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने ते कमी करावे. मूत्रपिंड खराब असल्यास प्रथिने, क्षारयुक्त आहार कमी करावा. आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

आई वडिलांना आजार झाल्यास सोनोग्राफीद्वारे तपासणी करावी. ऑपरेशन टाळता येईल.

मूतखड्याच्या आजाराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. ज्येष्ठांमध्ये प्रमाण घटले आहे. मूतखड्याच्या लक्षणांमुळे आता जनजागृती वाढली आहे. त्यामुळे आजाराचे निदान होऊ लागले आहे.

- डॉ. सुबोध शिवदे, मूत्रविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आणि रिअल इस्टेट

$
0
0

अॅड. मीनल खेहर
रिअल इस्टेट हा प्रांत खूपच मोठा, तितकेच याचे घटकही खूप. कारण हा विषय शंभर टक्के स्थावर मालमत्तेशी निगडित असा आहे. त्यामुळे जमीन हा याचा मुख्य भाग. त्या अन्वये येणारे अनेक घटक म्हणजे जमीन मालक, जमिनीच्या कायदेशीर परवानग्या, त्या अनुषंगाने येणारे नगरपालिका, महानगरपालिका, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त इत्यादी अधिकाऱ्याच्या परवानग्या. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक, त्या अनुषंगाने येणाऱ्या परवानग्या. अगदी घर, सदनिका, जे काही असेल, ती मालमत्ता हातात येयीपावेतो, त्याचा ताबा मिळून आपण त्यात राहायला जाईपर्यंत वीज मीटर, पाण्याची सोय, लिफ्ट, पार्किंग अशा एक ना अनेक गोष्टी या घर या एका सोनेरी स्वप्नात समाविष्ट असतात आणि आतापावेतो या घर, सदनिका, दुकाने, गाळे, अशा गोष्टी खरेदी करताना फसवणूक झाल्याची, वर्षानुवर्षे ताबा न मिळाल्याची, बांधकाम सदोष असल्याची, एक ना अनेक बाबतीत ग्राहक फसलेली अनेक उदाहरणे आहेत. अनेक दावे ग्राहक न्यायालयात पडून आहेत हे सर्वांना माहीत आहेच.

अलीकडे स्त्रियांचा साऱ्याच क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातसुद्धा दमदार प्रवेश झाला आहे. महिला वास्तुविशारद, बांधकाम अभियंता, बांधकाम व्यावसायिक यासोबतच मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेच्या खरेदीदारही आहेत. सदनिका हाच पर्याय जास्त सोपा आणि परवडणारा झाला आहे. मात्र, यातही जर फसवणूक झाली, तर लागणारा पैसा आणि घराचे स्वप्न या दोघांचाही चुराडा होतो. त्यासाठी याबाबतीत किमान जुजबी माहिती असणे जरूरी आहे. कुणाच्याही फसव्या जाहिरातींना बळी न पडता केवळ घर नीट मिळेल याकडे लक्ष देणे त्यासाठी योग्य माहिती असणे गरजेचे आहे. अनेक वेळा महिलांना सदनिका अमुक एका तारखेपर्यंत बुक केल्या, तर किचन ट्रॉली मोफत, फर्निचर मोफत अशी अनेक फसवी आकर्षणे देऊन अग्रीम मोठी रक्कम बुकिंगला घेतली जाते. मात्र, नंतर दिलेल्या तारखेत बांधकामसुद्धा ताब्यात मिळत नाही. मिळाले, तर अनेक त्रुटी आणि ट्रॉली वगैरे काही नाही अशी स्थिती होते आणि खूप मनस्ताप होतो.

खरे तर याच सर्व बाबी, त्रुटी संपुष्टात आणण्यासाठी महारेरा या नावाचा खरेदीदाराचे हित सांभाळणारा आणि या व्यावसायिकावर नियंत्रण ठेवणारा कायदा आला. यामुळे फसवे, पैसे घेऊन पळून जाणारे, पूर्ण पैसे घेऊन निकृष्ट बांधकाम करणारे, वेळेत काम पूर्ण न करणारे अशा अनेक अवांतर बिल्डरवर आळा बसेल. मात्र, आपणही महिला म्हणून हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाच्या गोष्टी

बिल्डर आपल्या प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय त्या प्रकल्पाची जाहिरात करू शकत नाही.

त्यानंतर एकूण रकमेच्या केवळ दहा टक्केच रक्कम अग्रिम घेता येईल. ती रक्कम शेड्यूल बँकेत ठेवणे त्याला बंधनकारक राहील. प्रत्येक बांधकाम टप्प्यावर संबंधित अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यावरच त्यांना पैसे काढता येतील.

प्रकल्पाचा हिशेब महारेरा प्राधिकरणाकडे सादर करणे बिल्डरला बंधनकारक आहे.

सर्व परवानग्यांपासून तर पूर्णत्व वेळापत्रक महारेराच्या साइटवर प्रकाशित करावी लागेल. बुकिंग तपशील, बांधकामाची स्थिती, पार्किंग इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.

महारेराचा नोंदी क्रमांक व प्रकल्पाचा तपशिलाची वेबसाइट पत्ता देणेही जरूरी आहे.

बिल्डरला ग्राहकास दिलेल्या वेळेत ताबा देणे बंधनकारक असेल. वेळेवर ताबा देणे जमले नाही तर व्याजासह नुकसानभरपाई द्यावी लागेल.

एखाद्या ग्राहकाला मधेच काही कारणाने प्रकल्पातून बाहेर पडायचे असेल तर त्याला त्याची रक्कम व्याजासह परत मिळेल.

काही कारणास्तव बिल्डर प्रकल्प पूर्ण करण्यास असमर्थ ठरले, तर खरेदीदार एकत्र येऊन प्रकल्प पूर्ण करू शकतात.

ताबा घेतल्यावर त्रुटी आढळल्यास बिल्डरने दुरुस्ती करणे बंधनकारक आहे.

बिल्डरने कायदेशीर तरतुदी पूर्ण केल्या आहेत का, याची माहिती घेऊन मगच प्रकल्पात पैसे गुंतवणे इष्ट.

या प्राथमिक गोष्टींकडे लक्ष दिले आणि सर्व तपासून आपली कष्टाची कमाई गुंतवली तरी पुढचे बिकट प्रसंग येणार नाही आणि आनंदाने गृहप्रवेश करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज दिवसभर पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील दोन दिवसांत कोकण किनारपट्टी, विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुण्यात दिवसभर पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सून आता अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग, सौराष्ट्र, कच्छ, गुजरात, मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानाच्या काही भागात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही पावसाची प्रगती सुरू असून गेल्या २४ तासात कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. घाटमाथ्यावर सोमवारी संध्याकाळ ते मंगळवार सकाळपर्यंत चांगला पाऊस झाला. कोयनामध्ये (नवजा) २२० मिलीमीटर, खोपोलीत १७० आणि ताम्हिणीत १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. थंड हवेचे असलेल्या महाबळेश्वरमध्ये १७०, पन्हाळ्यामध्ये १४० आणि राधानगरीत ५० मिलीमीटर पाऊस पडला. पुण्यात मंगळवारी पावसाचा खेळ सुरू होता. दिवसभर ढगाळ हवा आणि अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. शहरात दिवसभरात १.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक ११२ मिलिमीटर पावसाची नोंद नागपूरमध्ये झाली. याशिवाय, महाबळेश्वर, नाशिकसह इतर शहरातही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाचशे रुपयांपर्यंत जीएसटी नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘परफॉर्मिंग आर्ट्स’ या विभागांतर्गत येणाऱ्या नाटक, संगीत, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ५०० रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर जीएसटी आकारला जाऊ नये, या मागणीने आता जोर धरला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही हा प्रस्ताव जीएसटी काउन्सिलकडे पाठवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे, व्यावसायिक नाटकांचे; तसेच संगीत महोत्सवांच्या तिकिटांचे दर कायम राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नाट्य निर्माता संघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या बैठकीत मराठी नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दरांवर चर्चा झाली. मराठी नाटकांचा आणि कार्यक्रमांचा विचार केला, तर तिकिटांचे दर साधारण ३०० ते ५०० रुपयांपर्यंत असतात. त्यामुळे, मराठी निर्मात्यांना जीएसटी लागू झाल्यानंतर मोठा फटका बसेल, असे नाट्यनिर्माता संघाकडून सांगण्यात आले. त्यावर मुनगंटीवार यांनी ५०० रुपयांच्या पुढे जीएसटीची आकारणी करण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या जीएसटी काउन्सिलकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, जीएसटी काउन्सिलला कोणत्याही एका राज्यापुरता हा निर्णय करता येणार नसून संपूर्ण देशाचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचा प्रस्ताव काउन्सिलकडून मान्य होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ हा प्रकारही जीएसटी अंतर्गत घेण्यात आला आहे. त्यामध्ये २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर जीएसटी आकारण्यात येणार नाही. त्यापुढील किमतीच्या तिकिटांवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मात्र, नाटकांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अर्थिक गणिताचा विचार करता कार्यक्रमाच्या तिकीटांचे दर २५० रुपयांपेक्षा अधिकच असतात. त्यामुळे, ही मर्यादा वाढवून ५०० करावी, अशी मागणी नाट्यनिर्माता संघातर्फे करण्यात आली. ती मान्य करून तसा प्रस्ताव जीएसटी काउन्सिलकडे पाठवण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच जीएसटी काउन्सिलच्या निर्णयाविरोधात बेंगळुरू येथील जागृती थिएटर्स या संस्थेने ऑनलाइन याचिका दाखल केली होती. २५० रुपयांपर्यंतची मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी या संस्थेने केंद्र सरकारकडे केली होती. चित्रपटसृष्टीमधील कलाकारांसह समाजातूनही या याचिकेला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे, आता बेंगळुरूपाठोपाठ महाराष्ट्रातही जीएसटीला विरोध केला जात असून नाट्यनिर्माता संघाने सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या विरोधाला वाचा फोडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावाला केंद्राच्या जीएसटी काउन्सिलने मान्यता दिली, तर देशभरातील नाटक आणि संगीताच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी नसताना ५०० रुपयांच्या पुढील तिकिटांवर १५ टक्के सेवा कर लावण्यात येत होता. पण, जीएसटी आल्यानंतर केंद्र सरकारने सरसकट २५० रुपयांवरील सर्व तिकिटांवर १८ टक्के कराची तरतूद केली आहे. त्यामुळे, नाटकांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिकिटांचे दर वाढणार आहेत. या निर्णयात सुधारणा करून ५०० रुपयांपुढील तिकीटांवर जीएसटी लागू करावा, अशी मागणी केली आहे. मुनगंटीवार यांनीही ते मान्य करून प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रसाद कांबळी, अध्यक्ष, नाट्य निर्माता संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दऱडी कोसळणे मानवनिर्मित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पश्चिम घाटातील पावसाचा जोर वाढत असताना गेल्या दहा दिवसांत घाट रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र, या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे दरडी पडत आहेत.

जूनच्या पंधरावड्यानंतर पावसाने वेग घेतला, की एक्स्प्रेस वे, ताम्हिणी, माळशेज घाट, वरंधा, खंबाटकीसह कोकणातील घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना सुरू होतात. यातील अनेक घटनांमध्ये मोठ्या आकाराचे दगडही रस्त्यावर कोसळतात. रस्ते बंद होऊन वाहतूक ठप्प होते. पुढे महिनाभर दरडींसंदर्भात शासकीय पातळीवर ठोस नियोजनाबद्दल चर्चा होते आणि ती पावसातही वाहून जाते. या वर्षीदेखील गेल्या दहा दिवसांत वरंधा, अंबेनळी, ताम्हिणी, खेड दहिवाली मार्गावरील घाटांमध्ये दरड कोसळल्या आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसली, तरी दगड पडण्याचे प्रमाण धक्कादायक आहे.

घाट रस्ते करताना झालेली वृक्षतोड, खणलेले चर, उतारांचे केलेले सपाटीकरण, उभारलेली सिमेंटची जंगले ही पावसाळ्यात दरडी कोसळण्याची प्रमुख कारणे आहेत. डोंगरात नवीन रस्ते बांधताना किंवा रुंदीकरणादरम्यान उतारांवरील बदलांमुळे; तसेच बोगदे खणताना उडणाऱ्या सुरुंगांमुळे डोंगरांवरील तडे गेलेले खडकांचे थर अस्थिर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला थराचा आधार सुटतो आणि अतिवृष्टीच्या वेळी ते कोसळतात, असे अभ्यासकांचे मत आहे.

या संदर्भात ज्येष्ठ भूगर्भ अभ्यासक डॉ. सतीश ठिगळे म्हणाले, ‘एक्स्प्रेस-वे’बरोबरच पश्चिम घाटात घडणाऱ्या दरडींच्या घटना मानवनिर्मित आपत्ती आहेत. डोंगर उभे कापून घाट केल्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. दर वर्षी जून महिन्यातच घाटांमध्ये हे प्रकार घडतात. कारण उन्हाळ्यात डोंगरकड्यांवरील खडक तापतात आणि सैल होतात. पावसाळ्यात खडकाला पडलेल्या भेगांमधून त्याची रुंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. जोराचा पाऊस पडल्यावर दगड उतारच्या दिशेने कोसळतात.’

दरड कोसळणे हा गंभीर प्रकार असतानाही काही वर्षांपूर्वीपर्यंत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्यात या आपत्तीचा समावेश नव्हता. अलीकडेच केंद्र सरकारने आपत्तींच्या यादीच दरड कोसळण्याच्या घटनांचा समावेश केल्याने महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यादीत बदल केला आहे. पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यांवर पाहणी करून अपघात टाळण्यासाठी पावलेच उचली पाहिजेत, अशी अपेक्षा ठिगळे यांनी व्यक्त केली.

इथे पडल्या दरडी

१७ जून : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर अंबेनळी घाटात दरड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

२१ जून : सप्तश्रृंगी गडावर देवीच्या मंदिराच्या दक्षिण बाजूला दरड कोसळली; पण पर्यटन विभागाने बसविलेल्या जाळ्यांमुळे नुकसान टळले.

२३ जून : भोर महाड राज्य महामार्गावर शिरगावाच्या हद्दीत वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली, दगडाचे आकार मोठे होते.

२४ जून : घाटकोपर गोळीबार रोडवरील जगदुशानगरमध्ये दरड कोसळून एक लहान मुलगी जखमी झाली होती.

२५ जून : कोल्हापूरमध्ये गगनबावड्याजवळील करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. दर वर्षी या घाटात दरड कोसळते.

२६ जून : खेड दहिवली मार्गावर जैतापूरकडे जाणाऱ्या दिशेला दरड कोसळली. या वेळी मोठ्या आकारातील दगड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

का कोसळतात दरडी ?

पश्चिम घाटातील बहुतांश घाट रस्ते हे तीव्र उताराचे डोंगर उभे कापून केलेले आहेत. तसेच, पर्वतराजीत बोगदे खणल्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. लोहमार्ग आणि महामार्ग चौपदरी करण्याच्या प्रक्रियेत समस्या वाढत जाणार आहे. पावसाळ्यात बेसॉल्ट खडकाला पडलेल्या भेगांमध्ये पाणी जाऊन त्यातून भेगा रुंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा सैल झालेल्या शिळांमधून पावसाळ्यात पाणी जाऊन त्या भेगा मोकळ्या होतात आणि दरड कोसळते.

घाट सुरक्षेचे काम सुरू

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे’वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील दरडप्रवण क्षेत्रात दरडीचे संकट कायम आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने रस्ते विकास व आयआरबी कंपनीच्या निदर्शनास वारंवार ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर महामंडळ व आयआरबी कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी दुपारी धोकादायक दरडी व सैल झालेले दगड हटविण्याच्या काम सुरू केले आहे.

या कामासाठी कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. येत्या काही दिवसांत खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिटपर्यंतच्या परिसरातील धोकादायक दरडी हटविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी २२ जून व १९ जुलैला ‘एक्स्प्रेस-वे’रील खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही घटनेसह अवघ्या दीड महिन्यात खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तज्ज्ञांमार्फत पाहणी केली होती. पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये, यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गेल्या वर्षी २७ जुलैला सुरुवात करण्यात होती. हे काम करताना या तज्ज्ञांना इतर ठिकाणीही दरडींचा धोका असल्याचे निदर्शनास आले होते. निदर्शनास आलेल्या ठिकाणीही उपाययोजना राबविण्या संदर्भात संबंधितांनी सूचित केले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळ व आयआरबीने घाटमाथा क्षेत्रातील धोकादायक दरडी व दगडांची मंगळवारी पाहणी केली. धोकादायक दगड दिसल्यास तो काढण्यासाठी पाच ते दहा मिनिटे एक्स्प्रेस-वे वरील दोन्ही बाजूंची वाहतुक थांवबून तो काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पावसाळ्यातील एक्स्प्रेस-वे वरील हे नेहमीचे काम असून याकरिता कसलाही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. सध्या मुंबई पुणे लेनवर खोपोली एक्झिट जवळ पुण्याकडे येणार्या डोंगरावर काही धोकादायक झालेले दगड काढण्याचे काम सुरु आहे. हे काम झाल्यानंतर आडोशी बोगदा, अमृतांजन पूल व खंडाळा बोगद्यालगतच्या डोंगरावरील सैल दगडांची पाहणी करून ते दगड काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर पार्किंग स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळावरील पार्किंग शुल्क ८० रुपयांवरून कमी करून अर्ध्या तासासाठी ३० रुपये आणि एका तासासाठी ५० रुपये असे करण्यात येईल, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, विमानतळावरील नवीन कार्गो सुविधेमुळे वर्ष २०१७-१८ या कालावधीत ४० हजार टन मालवाहतुकीची सोय उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोहगाव विमानतळ विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीनंतर कार्गो सुविधेचे उद्घाटन शिरोळे यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार जगदीश मुळीक, विमानतळ संचालक अजयकुमार, डॉक्टर अनंत सरदेशमुख आदी उपस्थित होते. गेल्या काही काळात विमानतळावर पार्किंगसाठी प्रचंड शुल्क आकारण्यात येत असल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत होता. ते कमी करण्यात येईल, असे शिरोळे यांनी सांगितले. विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक अशा २० एकर जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने ती निश्चित करण्यात येईल. तसेच, विमानतळावरील पार्किंग शुल्क ८० रुपयांवरून कमी करून ३० मिनिटांसाठी ३० रुपये व एका तासासाठी ५० रुपये करणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. त्याचप्रमाणे विमानतळावरील उपलब्ध जागेवर स्थानिक व्यावसायिकांना संधी देणे, विमानतळावर वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी डॉग स्क्वाड, नो पार्किंगचे बोर्ड लावणे, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

विमानतळ विकास प्राधिकरणाचे काम अधिक पारदर्शक करण्यासाठी प्राधिकरणातर्फे यापुढील सर्व निर्णय, नियोजित विकासकामे; तसेच पूर्वी घेतलेले सर्व निर्णय, विकासकामांची माहिती प्रत्येकाला उपलब्ध करून देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. तसेच, विमानतळावरील विकासकामांसाठी काही उपयुक्त सूचना असल्यास त्या नागरिकांनी प्राधिकरणाला जरूर कळवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परवान्यासाठी करा रिक्षा खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा परवाना (परमीट) घेण्यासाठी सर्व इच्छुकांना नवी रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. नव्या रिक्षाखरेदीची ही अट रद्द करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यभरात सर्व इच्छुकांना रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, हे परवाने घेण्यासाठी नवी रिक्षा घेणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांना परवान्यांसाठी नवी रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. सध्या अनेक रिक्षाचालकांकडे सीएनजी किट असलेली रिक्षा असून इतरांचे परवाने वापरून ते व्यवसाय करीत आहेत. शहर आणि जिल्ह्यात असे १५ हजार रिक्षाचालक आहेत. या चालकांसाठी नवी रिक्षा घेण्याचे बंधन अन्यायकारक असल्याने ही अट रद्द करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनने केली आहे.

सरकारी आदेशानुसार राज्य परिवहन प्राधिकरण आाणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा परवाना मर्यादित करण्याचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयाने सर्व इच्छुकांना रिक्षा परवाना मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. परवान्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून गर्दी होऊ लागली आहे. परवान्यांची चौकशी आणि अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागल्याने परवान्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी www.rtopune.in ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. दरम्यान, प्रथमच हवा त्याला रिक्षा परवाना मिळणार असल्याने या परवान्यांना मोठी मागणी आहे. शहरात सध्या पन्नास हजार रिक्षा आहेत. यातील १५ हजार रिक्षाचालक इतरांच्या परवान्यावर रिक्षा चालवित आहेत. त्यासाठी त्यांनी सीएनजी किट असलेली रिक्षा खरेदी केलेली आहे. आता या रिक्षाचालकांना आता स्वतःचा परवाना मिळणार असला, तरी त्यासाठी नवी रिक्षा खरेदी करावी लागणार असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाल्याचे रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी म्हटले आहे.

शहरातील १५ हजार रिक्षा चालकांच्या कुटुंबांचा चरितार्थ या व्यवसायावर चालतो. या सर्वांना आता स्वतःचा रिक्षा परवाना मिळविण्याची संधी आली आहे. मात्र, या सर्वांकडे सीएनजी किट असलेली रिक्षा उपलब्ध असतानाही सरकारच्या अटींमुळे त्यांना नवी सीएनजी किट असलेली रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, अन्यथा या सर्वांना निष्कारण पुन्हा कर्ज काढून नवी रिक्षा घ्यावी लागेल. तसेच, एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने देण्यात येणार असल्याने नव्या रिक्षांची मागणी वाढून रिक्षा कंपन्या व वितरकांकडूनही रिक्षाचालकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व रिक्षाचालकांसाठी नव्या रिक्षा खरेदीची अट रद्द करावी, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणाच्या पाणीसाठयात वाढ

$
0
0

पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मान्सूनच्या अपेक्षित आगमानामुळे पवना धरणसाठ्यात वाढ होत असून, पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणीसंकट टळण्यास मोठी मदत झाली आहे. मंगळवारी दिवसभरात ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शहरवासियांना पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर रोज पाणीपुरवठा होत आहे, तरीही दहा टक्के पाणीकपात लागू आहे. मान्सूनच्या दमदार आगमनामुळे पाणीसंकट टळण्यास मदत झाली, असा दावा करण्यात येत आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत सुमारे २०० मिलीमीटरहून अधिक तर, यंदाच्या मोसमात ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील उपयुक्त पाणीसाठाही वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात दहा टक्के पाणीकपात रद्द होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मान्सूनच्या अपेक्षित आगमनामुळे धरणसाठ्यात पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. यापुढील काळात हाच ‘फ्लो’ कायम राहिल्यास शहरवासियांचे पाणीसंकट टळण्यास मदत होईल. पालिकेमार्फत सध्या आढावा घेण्यात येत आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न चालू आहेत, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी सांगितले.
पवन मावळातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कासारसाई धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. या धरणातील एकूण पाणीसाठा ३.८० दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा २.४७ दशलक्ष घनमीटर आहे. सद्यःस्थितीत धरण १५.३८ टक्के भरले असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. बेबेडओहोळ पुलाजवळ पवना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याशिवाय पावसाने भात खाचरे तुडुंब भरली असून, पुढील आठवड्यात भातलावणीस सुरवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
....
पवना धरण आकडेवारी
पाणीसाठा क्षमता : ९२.४३ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा : ६१.२९ दशलक्ष घनमीटर
सध्याची टक्केवारी : २५.४३ टक्के
मंगळवारी झालेला पाऊस : ६२ मिलीमीटर
एकूण मंगळवारपर्यंत झालेला पाऊस :४३० मिलीमीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवरपोलिसांकडून कारवाई नाही

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पोलिसांकडून कारवाई करीत बेकायदा पिस्तुलांची विक्री आणि वापर यावर अंकुश मिळविला जात होता. मात्र, गेल्या महिन्यांपासून बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर अथवा त्याच्या व्यापारावरील कारवाई थंडावल्याचे चित्र असून, पिस्तुलांचा वापर तर होत असल्याचे पिंपळे गुरवमध्ये परवा घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडील आणि पोलिस ठाण्यांमधील काही ठराविक कर्मचाऱ्यांचा बेकायदा पिस्तूल विक्री आणि बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात हातखंडा आहे. कोणाची यात शंभरी (शंभर जणांना पकडणे) तर कोणाची त्यापुढेही कारवाई झाली आहे. पिंपळे गुरव येथील गोळीबार प्रकरणातील पिस्तूल कोणते होते, हा तपासाचा भाग आहे. परंतु, सध्या गोळीबार करणारे कोण होते हेच पोलिसांना समजत नसल्याने ते पिस्तुल कोठून आणले हे शोधणे दुरापास्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेशाखेच्या युनिट चारकडून म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही. फुकट चोऱ्या आणि हाणामारीतील सराईतांना पकडून गुन्हेशाखा स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. शहरातील काही झोपडपट्ट्या तसेच व्हॉइट कॉलर गुन्हेगारांच्या योग्य रीतीने शोध घेतल्यास बेकायदा पिस्तुल आजही सापडू शकतात यात शंका नाही. पण गुन्हे शाखा पहिल्यासारखी कामच करत नसल्याचे खेदाने या ठिकाणी नमूद करावे लागेल.

पोलिस ठाण्यांचे बोलायचे झाल्यास, दैनंदिन घडणाऱ्या घटनांचा तपास करण्यातच वेळ निघून जातो की दाखल नसलेल्या पिस्तुलांच्या प्रकरणाचा मागोवा घेण्यास येथील अधिकाऱ्यांना वेळच मिळत नाही असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अनेकांना त्यात काही स्वारस्थ देखील वाटत नाही. ज्या सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत परवाचा गोळीबाराचा प्रकार घडला, त्याचा तपास सांगवीचेच अधिकारी-कर्मचारी करू शकतील का, याबाबत वरिष्ठांच्या मनात देखील साशंकता आहे. पिंपळे गुरव येथील एकच घटना महत्त्वाची असे नाही, तर शहरात पिस्तुलांचा वापर करून खून किंवा खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याचा तपास लागला नसल्याच्या काही घटना अद्यापही पोलिस दफ्तरी पडून आहेत.

शहरातील गुन्हेगारीचा वाढता आवाका पाहता या परिसरासाठी खास नियुक्त असणाऱ्या गुन्हेशाखेच्या सहाय्यक आयुक्तांचे कार्यालयच पिंपरी-चिंचवडला हलविण्याचा विचार उच्चपदस्य अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. किमान त्यामुळे तरी गुन्हेशाखा सतर्क होऊन शहरातील बोकाळलेली गुन्हेगारी कमी करण्यास हातभार लावू शकेल.
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमलबजावणीही ‘स्मार्ट’ व्हावी

$
0
0

Tweet : @sunillandgeMT

....
पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याचे अधिकृतरित्या घोषित झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी एकप्रकारे सुटकेचा नि:श्वास सोडून आनंद व्यक्त केला. स्पर्धेतून एकदा आउट झाल्यानंतर पुन्हा ‘इन’ झाल्याचे समाधान नक्कीच आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीतही स्मार्टनेस दाखविण्याचे आव्हान राहणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुण्याबरोबर पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्याची राज्य सरकारने शिफारस केल्यामुळे पिंपरी-चिंचवडला ऐन वेळी वगळण्यात आले. त्यावर सर्वपक्षीय नाराजी व्यक्त करण्यात आली. हा मुद्दा महापालिकेच्या निवडणूक प्रचारातही गाजला. त्यामुळे योजनेत समावेश करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाला द्यावे लागले. त्याची परिपूर्ती यानिमित्ताने झाली आहे. या निर्णयामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला यापुढे अधिक गती मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. योजनेत समावेशासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे प्रयत्न केले, पाठपुरावा केला. याबाबत आवर्जून सांगितले जात आहे. त्याचे राजकीय श्रेय जरूर घ्यावे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीतही ठोस भूमिका रहायला हवी. तरच शहरवासियांना योजनेचे कौतुक राहणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनांबाबत पिंपरी-चिंचवडकरांचा गेल्या दशकातील अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. ‘जेएनएयूआरएम’ अंतर्गत ऐन वेळी समावेश झाल्यानंतर या शहराला मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळाले. टप्प्याटप्पायने जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्याचा विकासकामांसाठी मोठा उपयोग झाला. सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहराचा कायापालट होण्यास काही प्रमाणात मदत झाली. अर्थात, या कामांमध्ये पालिकेचाही मोठा वाटा होता. तरीही काही त्रुटी नक्कीच राहिल्या. त्याचा मोठा फटका बसला, ही बाब विसरता येणार नाही. ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत शहरात १८ प्रकल्प राबविण्यात आले. मात्र, आठ वर्षांच्या काळात बहुतांश प्रकल्प पूर्णत्वास गेले नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन, स्वस्त घरकुल, बीआरटीएस, पावसाळी गटार, पवना थेट जलवाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, जलनिस्सारण टप्पा क्रमांक एक आणि दोन आदी प्रकल्प आजही रखडल्याचे दिसून येते.

‘जेएनएनयूआरएम’ योजनेअंतर्गत समावेश झालेले १८ प्रकल्प दोन हजार ५८५ कोटी रुपये खर्चाचे होते. त्यामध्ये केंद्राचा एक हजार २३६ कोटी रुपयांचा आणि राज्याचा ७७१ कोटी रुपयांचा आणि पालिकेचा एक हजार ८१३ कोटी रुपयांच्या हिश्श्यांचा समावेश होता. केंद्र आणि राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी महापालिकेला प्राप्त झाला. परंतु, अनेक प्रकल्पांची कामे रखडल्याने जवळपास चारशे कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य सरकारने महापालिकेला दिलेला नाही. या प्रकल्पांना केद्र सरकारने मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली. अन्यथा, रखडलेल्या प्रकल्पांसाठी मिळालेला निधी केंद्राला व्याजासह परत करावा लागण्याचा इशारा दिला. त्यापैकी तीन प्रकल्पांना निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, प्रकल्प राबविण्याची घाई पालिकेला अंगलट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मार्ट सिटी योजनेतील प्रस्तावात प्रामुख्याने एरिआ बेस्ड डेव्हलपमेंट आणि पॅन सिटी सोल्युशन्स या दोन घटकांचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी एक हजार १४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या निवडलेल्या प्रकल्पांवर जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. झालेल्या त्रुटी सुधारण्यास वाव आहे. योजना सक्षम आणि प्रभावीपणे राबविल्यास त्याचा निश्चितच जनतेला उपयोग होणार आहे. त्यामुळे अंमलबाजवणीतही पालिका प्रशासनाने स्मार्टनेस दाखविण्याची गरज आहे.

.....
पुनर्वसन प्रकल्प अर्धवट स्थितीत
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना पालिकेने नियम धाब्यावर बसविले. निगडी, सेक्टर क्रमांक २२ मधील प्रकल्प ‘रेडझोन’च्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कामे पूर्ण होऊनही पूर्ण क्षमतेने घरकुलांचे वाटप पूर्ण करता आले नाही. चिखली येथे प्राधिकरणाच्या जागेत १३ हजार २५० स्वस्त सदनिकांचा राबविण्यात आलेला प्रकल्प सहा हजार ७२० घरापर्यंतच सीमित राहिला. प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचे तर पालिकेने सोडूनच दिले. असाच अनुभव अन्य प्रकल्पांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण तर आलाच शिवाय प्रकल्प अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे शहरवासीयांची नाराजीही ओढवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊंचा आज फैसला?

$
0
0

‘स्वाभिमानी’ची आज पुण्यात बैठक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज (बुधवारी) पुण्यात होत आहे. गेले अनेक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात धुमसत असलेल्या वादाचे पडसाद त्यामध्ये उमटणार असून खोत यांच्यावर काय कारवाई होणार, याचा फैसला होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील अल्पबचत भवनामध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून, शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. गेले काही दिवस शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी यांसह संघटनेत अनेक अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेले अनेक महिने खासदार शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात वाद सुरू असून, गेल्या काही दिवसांत तर हा दुरावा प्रचंड वाढला आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांनी संघटनेची आंदोलने आणि कार्यक्रमांकडे सातत्याने पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत मोठी नाराजी आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याकडे खोत यांनी ढुंकूनही पाहिले नाही. आजारपणाचे कारण सांगून या यात्रेकडे पाठ फिरविणाऱ्या खोत यांनी त्याच काळात इस्लामपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला. ‘हजारो कार्यकर्ते उन्हातान्हात चालत शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधत असताना खोत हे हारतुरे घेण्यात गर्क होते,’ अशी टीका कार्यकर्ते करीत आहेत.

नेतृत्वाला आव्हान

शेट्टी आणि खोत यांच्यातील दुरावा वाढीस लागला असून खोत यांच्यासह त्यांच्या चिरंजिवांच्या वक्तव्यांमुळे त्यांनी थेट नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची शेट्टी समर्थकांची भावना झाली आहे. वेगवेगळ्या विधानांबरोबरच खोत यांच्या कुटुंबीयांच्या आजारपणात शेट्टी यांनी केलेल्या मदतीची पत्र लिहून ‘जाहीर’ परतफेड करणेही अनेक कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. अशा वैयक्तिक प्रश्नांचीही या वादाला किनार आहे. यापूर्वी खोत यांच्यावर काय कारवाई करणार, असे विचारले असता, ‘त्याबाबतचा निर्णय पक्षाची कार्यकारिणी घेईल,’ असे शेट्टी यांनी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. खोत यांच्यावर शिस्तभंगाबाबत कारवाई करावी, यापासून ते त्यांना संघटनेतून दूर करावे, अशा वेगवेगळ्या मागण्या कार्यकर्ते करीत असून त्याबाबतही शेट्टी यांच्यावर दबाव असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

.............



सरकारसोबत राहणार की नाही ?

या सरकारसोबत रहायचे की नाही, याचा निर्णय महिन्याभरात घेणार असल्याचे शेट्टी यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्या विषयावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकार आणि संघटनांमधील चर्चेतून खोत यांना दूर केल्यानंतरच शेतकरी संपातून मार्ग निघाला, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटना सरकारसोबत राहणार की नाही, सरकारमधून बाहेर पडल्यास खोत यांच्या मंत्रिपदाचे काय होणार, याबाबतही मोठी उत्सुकता आहे.
...........
‘ब्रेकअप’ मूड

शेट्टी आणि खोत यांच्यातील दुरावा आता टोकाला पोहोचला असून वैयक्तिक बाबी उघड झाल्यानंतर आता पुन्हा ही दरी कमी होण्याची शक्यता नाही, असे कार्यकर्ते सांगत आहेत. गेले काही दिवस संघटना खोत यांच्यावर कारवाई करणार, की खोत हेच काडीमोड घेणार, असा पेशन्सचा खेळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या बैठकीनंतर हा ब्रेकअप होणार का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापूरमध्ये फिटले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया। विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥
आनंद तेथीचा मुकियासी वाचा। बहिर ऐकती कानी रे।
आंधळ्यासी डोळे पांगळांसी पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्ये रे ॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया। विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥

अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण इंदापूर येथील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले. इंदापूरकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच लाल मातीवर रेखीव रांगोळ्या काढल्या होत्या. रिंगणाच्या मध्यभागी इंदापूर नगर परिषदेने शामियाना उभारला होता. त्याठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पादुका असलेली पालखी विसावली. मानाच्या अश्वाचे पूजन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा व माजी आमदार बाळासाहेब भेगडे यांनी केले. प्रथम डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वेगाने परिक्रमा पूर्ण करीत होत्या. त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. हरीच्या दासांनी प्रदक्षिणा पूर्ण करीत रिंगण सोहळ्यास वेगळे चैतन्य निर्माण केले आणि रिंगणात मानाच्या अश्वांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या मानाच्या अश्वाने वाऱ्याच्या वेगाने रिंगणाच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या. लाखो भाविकांचा समुदायाच्या साक्षीने हा नेत्रदीपक सोहळा पार पडला. या वेळी विभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध प्रश्नांतून विद्यार्थिनी झाल्या व्यक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुमचे बालपण कसे गेले, कलेला पोषक वातावरण होते का, शालेय शिक्षण कुठे झाले, एकाच वेळी अनेक कला कशा जपता, लेखक शब्दांतून चित्र रेखाटतात; पण तुम्हाला चित्रातून लेखनाची प्रेरणा कशी मिळाली...’ अशा विविधांगी प्रश्नांची सरबत्ती कोणी मुलाखतकार करत नव्हता. तर हे प्रश्न होते शालेय विद्यार्थिनींचे. लेखकाला प्रश्न विचारून त्याच ‘व्यक्त’ होत होत्या. मुलींची अभिव्यक्ती, उत्साह, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची धडपड यातून मुलींचीच सर्जनशील जडण-घडण होत होती.

निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे. अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ लेखक, चित्रकार ल. म. कडू मंगळवारी शाळेत आले होते. कडू यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे तसेच विद्यार्थिनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू व कार्यवाह दीपक करंजीकर उपस्थित होते. एक-एक प्रश्न तोलून, मोलून विचारत विद्यार्थिनींनी लेखक, चित्रकार यांच्या जडण-घडणीच्या अंतरंगात डोकावून पाहिले. अनुष्का गुंजाळ, हिमानी हर्षे, सृष्टी आचार्य, वैष्णवी काळे, मीनल गानू, केतकी देशपांडे या विद्यार्थिनींनी कडू यांना बोलते केले.

‘तुमचे बालपण कसे गेले, कलेला पोषक वातावरण होते का,’ या प्रश्नाला उत्तर देताना कडू म्हणाले, ‘माझ्या लहानपणी आजच्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या; पण बालपण समृद्ध होते. शब्द नसतील असा अप्रतिम निसर्ग अनुभवता आला. कला शिकवता येत नाही. त्याचे काही एक तंत्र आहे; पण कलेसाठी लागणारे सर्जनशील बीज निसर्गातूनच मिळते. मी तर लहानपणी निसर्गातच डुंबून गेलो होतो. साधनांची कमतरता नाही म्हणून माणसाने गप्प बसू नये.’

ते पुढे म्हणाले, ‘शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. आमचा काळ असा होता की, मुख्याध्यापकांकडे जायचे धाडस व्हायचे नाही. तेव्हा गोखले सर मुख्याध्यापक होते. शाळेच्या नियतकालिकात विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र असले पाहिजे, हे सांगायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मागणी मान्य केल्याने आमच्या चित्रकलेला प्रारंभ झाला. शाळेसाठी किती करू आणि किती नाही असे व्हायचे. तुम्ही शाळेशी समरस असले पाहिजे.’

‘लेखकालाही हवा रियाज’

तुम्ही एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास करता ना, तसेच आम्ही एकाचवेळी अनेक कला जपतो. गायकाला रियाज लागतो तसा लेखकालाही लागतो. डायरी लिहा, वाचन करा तर तुम्हालाही लिहिता येईल. सरावाने ते जमते. माणसाला कोणती ना कोणती कला अवगत हवी. पैसा जगवेल; पण का जगायचे हे कला शिकवेल, असे पुलं नेहमी म्हणायचे.

- ल. म. कडू, लेखक-चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अनधिकृत’ना शास्तीकर माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्ती कर माफ करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तर, ६०० ते एक हजार चौरस फुटांच्या निवासी अनधिकृत बांधकामांना प्रति वर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने शास्तीकराची आकारणी करण्याचा निर्णय मान्य करण्यात आला आहे.

पालिका हद्दीत नियमित होऊ शकतील अशा अनधिकृत बांधकामांना मालमत्ता करावरील शास्तीकर आकारण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नवीन शास्ती कर आकारणीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्थायी समितीने एप्रिल महिन्यांत या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.

बेकायदा बांधकाम केलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून ६०० चौरस फुटापर्यंतच्या बेकायदा बांधकामांकडून घेतला जाणारा शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ६०१ ते १००० चौरसफुटांचे बेकायदा बांधकाम केल्यास त्यांच्या मालमत्ताकराच्या पन्नास टक्के रक्कम शास्तीकर म्हणून आकारण्यात येणार आहे. तर, एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक बेकायदा बांधकाम झाल्यास त्यांच्याकडून सध्याच्या नियमाप्रमाणे मिळकतकराच्या दुप्पट रक्कम शास्तीकर म्हणून आकारण्यात येणार आहे.

शास्तीकर आकारणीबाबत शासनाकडून नव्याने आदेश प्राप्त झाले असल्याने चार जानेवारी २००८ पासून ६०० चौरस फूट आणि ६०० चौरस फूट ते एक हजार चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींना मालमत्ताकराच्या दुप्पट दराने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. सर्वसाधारणसभेने एक एप्रिल २०१७ पासून या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.

पालिका हद्दीत नियमित होऊ शकतील अशा अनधिकृत बांधकामांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाचे धोरण सरकारने जाहीर केले आहे. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू झाली आहे. पालिकेकडून ‘एफएसआय’ तसेच ‘टीडीआर’ मिळेल या भरवशापोटी अनेक बांधकाम व्यावसायिक प्रकल्प उभारतात. त्यानंतर फ्लॅट नागरिकांना विकून टाकतात. मात्र, ‘एफएसआय’ न मिळाल्याने पालिका संबंधित फ्लॅटधारकांकडून मिळकत कराच्या दुप्पट आणि तिप्पट दंड वसूल करते. त्यामुळे चूक नसतानही सर्वसामान्यांना दंडवसुलीचा फटका बसत असल्याचे समोर आले होते. हा दंड अन्यायकारक असल्याची तक्रार करून काही वर्षांपूर्वी स्थायी समि‌तीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, आप्पा रेणुसे आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी सर्वसाधारण सभेत तिप्पट शास्ती कर रद्द करावा, अशी मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी नसल्याने महापौर चिडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहात असल्याने महापौर मुक्ता टिळक यांनी यापुढे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत खबरदारी घेण्याची ताकीद आयुक्तांना दिली.

गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील विविध समित्यांच्या बैठकांना अधिकारी उपस्थित नसल्याची तक्रार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून केली जात होती. मंगळवारच्या मुख्य सभेत कार्यपत्रिकेवर भाजी मंडईतील गाळे भाड्याने देण्याचा विषय मांडण्यात आला होता. त्या अनुशंगाने रविवार पेठ परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून घेण्यात येणारे शुल्क स्वीकारणे पालिकेने बंद केले आहे का, अशी विचारणा स्थानिक नगरसेवक अजय खेडेकर यांनी केली. या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश महापौरांनी दिले. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारीच सर्वसाधारण सभेत उपस्थित नव्हते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी मंडईतील गाळ्यांबाबतची माहिती घेऊन लेखी स्वरूपात दिली जाईल, असे आश्वासन संबंधित सभासदांना दिले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे लक्षात येताच, महापौर मुक्ता टिळक यांनी त्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘महापालिकेच्या सभेला सर्व खातेप्रमुख आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यापुढे सर्वसाधारण सभेला सर्व अधिकारी उपस्थित असतील, याची योग्य ती काळजी घ्यावी’, अशा शब्दांत महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना तंबी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पालिकेत आरोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र ​नवनिर्माण सेनेने (मनसे) सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर मंगळवारी बहिष्कार टाकल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सभागृहात येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या विरोधकांनी महापौरांचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. तर, सभागृह नेते विरोधी सदस्यांच्या निलंबनाची भाषा करीत असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमचे निलंबन करण्यापेक्षा आम्हीच सभागृहाबाहेर गेलो, असा पवित्रा विरोधकांनी घेतला.

सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सभेच्या कामकाजात अडथळे आणल्यास विरोधकांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याचे पडसाद सभागृहात उमटले. मंगळवारी दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे सदस्य सभागृहाबाहेर गेले. मात्र, त्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी सभेचे कामकाज सुरू ठेऊन अनेक प्रस्तावांवर चर्चा करून त्यास मान्यता दिली.

‘सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्ष कामकाज करू देत नसल्याचा सातत्याने आरोप करण्यात येत होता. मुख्य सभांमध्ये आम्ही पुणेकरांचे प्रश्न मांडले. नालेसफाई, रस्तेखोदाई, भ्रष्टाचाराची प्रकरणे, यावर आवाज उठवला, तर विरोधकांवरच टीका होते. आमच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडे उत्तरे नसल्याने विरोधक सभागृहात नको, अशा भूमिकेतून आमच्या निलंबनाचा इशारा देण्यात आला. सभा कामकाज नियमावलीमध्ये निलंबनाची तरतूदच नाही. मात्र, कामकाज करता येत नसलेल्या सत्ताधाऱ्यांना हे समजत नाही. तरीही सत्ताधाऱ्यांनी आमचे निलंबन करण्यापेक्षा आम्हीच सभागृहाबाहेर गेलो,’ अशी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली.


‘कामकाजात वारंवार व्यत्यय’

विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालून कामकाज होऊ देत नसल्याच्या आरोपाचा भिमाले यांनी पुनरुच्चार केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरही कामकाज करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांतील प्रलंबित ठेवलेले अनेक प्रस्ताव चर्चा करून मान्य करण्यात आले. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांना पुन्हा येण्याचे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले होते. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केलेली विनंतीही धुडकावून लावून त्यांचा अपमान केला, असा टोला भिमाले यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांची मुस्कटदाबी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विरोधकांनी कामकाजात अडथळे आणल्यास प्रसंगी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे खडे बोल सुनावणाऱ्या सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद मंगळवारी सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करून सर्व पक्षांनी पालिकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होत आहे. सभेचे कामकाज नियमानुसार चालवण्यासाठी महापौर प्रयत्नशील असल्या, तरी त्यांचाही मान विरोधकांकडून राखला जात नसल्याचा आरोप भिमाले यांनी केला होता. तसेच, यापुढे सभेच्या कामकाजात विरोधकांकडून असेच अडथळे आणले गेल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. ‘बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पुणेकरांनी आम्हांला सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी निवडून दिले आहे. तरीही, अतिशय चुकीच्या पद्धतीने कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा आरोप शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केला. तसेच, भिमाले यांच्या वक्तव्याचा निषेध करून निलंबन करून दाखवाच असे प्रतिआव्हान दिले. पुणेकरांच्या हितासाठी शिवसेना सतत सत्ताधाऱ्यांना जाब विचारत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिमाले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहात उभे राहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच, कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी होऊन सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, या चारही पक्षाच्या उपस्थित सर्व सदस्यांनी सभात्याग केला.

बहिष्कारास्त्र उशिराने का?

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. त्या वेळी, पीएमपीच्या शुल्कवाढीवरून आंदोलन सुरू होते. त्यामुळे, साहजिकच सभागृहात या विषयावर चर्चा झाली. यामध्ये, विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी मुद्दे मांडले. त्यानंतर, रस्ते खोदाईच्या विषयावरही विरोधक कामकाजामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर, कार्यपत्रिकेवरील विषय पुकारताच, विरोधकांना ‘बहिष्कार’ अस्त्राची आठवण झाली आणि त्यांनी भाजपवर आरोप करून सभात्याग केला.

‘इतरांकडून अपेक्षा नाहीत’

महापालिकेतील ज्येष्ठ सदस्य आणि माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनीही भिमाले यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांशी चर्चा करून लोकसभेतील रखडलेल्या विधेयकाबाबत मार्ग काढतात; पण पालिकेतील काहींना ‘ग’ची बाधा झाली आहे. अशावेळी तुम्ही समजूतदार असल्याने मार्ग काढू शकता’, असे आवाहन महापौरांना उद्देशून करतानाच, इतरांकडून अपेक्षाच नाहीत, असा टोमणा त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळीणसाठी विशेष निरीक्षण पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने यंदाचा पावसाळा संपेपर्यंत या गावासाठी विशेष निरीक्षण पथकाची स्थापना केली आहे. प्रांताधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता, तहसिलदार, गटविकास अधिकारी व पाच ग्रामस्थांचा त्यात समावेश असेल.
या पथकाच्या माध्यमातून सातत्याने माळीण गावावर लक्ष ठेवले जाणार आहे. येथे उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येचा बारकाईने अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे. दरम्यान, निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत कामाची संपूर्ण पाहणी करण्यात आली असून, येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
पुनर्वसित माळीण गाव उभारताना ठिकठिकाणी टाकलेला मातीचा भराव गेल्या शनिवारी झालेल्या पावसात वाहून गेला. यामध्ये रस्तेदेखील उखडले असून, घरांच्या अवतीभ‍वतीचा भराव खचल्याने नागरिकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसांपासून मदतकार्य सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी माळीण गावाची पाहणी करून येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. माळीणमधील घरे अत्यंत सुरक्षित आहेत. नागरिकांना येथे कोणताही धोका नाही. पहिल्या पावसात कामातील काही त्रुटी समोर आल्या आहेत. त्या दूर करण्यात येतील, असे आश्वासन राव यांनी दिले.
माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी निवडलेली जागा डोंगरउतारावर आहे. त्यामुळे डोंगरावर पडणारे पाणी गावाबाहेरून काढण्यासाठी डोंगर गटारे करणे आव‍श्यक होते. मात्र, हा पहिलाच पावसाळा असल्याने नेमकी गटारे करायची कोठे, हा प्रश्न होता. त्यामुळे गटारे केली नव्हती. त्यामुळे पावसाचे डोंगरावरून येणारे पाणी गावामध्ये शिरले. ‘आता आमचे अधिकारी पावसाचा जोर वाढल्यानंतर तीन दिवस येथे राहून पाहणी करतील. त्यानुसार डोंगर गटारे करण्यात येतील,’ असे सौरव राव यांनी स्पष्ट केले. पुनर्वसनाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांशी झालेल्या करारानुसार गावातील घरांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षात कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असेल, तर घरे वगळता अन्य कामांसाठी दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यामु‍ळे ‘मातीचा भराव पुन्हा टाकणे, काही भिंतींना गेलेले तडे, रस्त्यांची दुर्दशा, ड्रेनेज ना दुरुस्ती ही कामे कोणताही अतिरिक्त मोबदला न देता, त्या कंत्राटदारांकडून करून घेतली जातील,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images