Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परिवहन विभागाने रिक्षा परवाना खुला केल्यानंतर परवान्यासाठीचा अर्ज घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अर्ज rtopune.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अर्जदाराने चारित्र पडताळणी अहवालासाठी पोलिस आयुक्तालयाच्या pes.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड या दोन्हीही कार्यालयांच्या कार्यक्षेत्रांतील नागरिकांना या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणार असल्याने रिक्षा परवान्यासाठी कोणालाही लेखी अर्ज करता येणार नाही. अर्जदाराने वेबसाइटवर दिलेला अर्ज, नामनिर्देशन प्रमाणपत्र, लायसन्स, बॅज, पत्त्याचा पुरावा, रहिवासी दाखला, शैक्षणिक पात्रता दाखला, फोटो आदी बाबी ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या वेळेत अर्जाची प्रत व मूळ कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहावे, असे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
रिक्षा परवान्यासाठी पाचशे रुपये शुल्क असून r.t.o. pune या नावे राष्ट्रीय बँकेच्या डीडीद्वारे जमा करावे. गेल्या वर्षी लॉटरी पद्धतीने रिक्षा परवाना वाटप करण्यात आले होते. यामध्ये यशस्वी झालेल्या; मात्र मुलाखतीसाठी गैरहजर राहिलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या उमेदवारांनी १५ जुलैपर्यंत सर्व कागदपत्रे कार्यालयात सादर करावीत, असे आवाहनही आरटीओ कार्यालयाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माउलींची पालखी वाल्हेनगरीत मुक्कामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड
मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत श्री ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सकाळी अकरा वाजता आगमन झाले. शनिवारी (दि. २३) नीरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.
शुक्रवारी पहाटे माउलींची महापूजा झाल्यानंतर खंडोबाच्या जेजुरीनगरीतून सकाळी सहा वाजता सोहळा वाल्ह्याकडे मार्गस्थ झाला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी थंडावा देत होत्या. यामुळे वारकऱ्यांची पावले झपाझप पडत होती. सकाळी आठ वाजता सोहळा न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला.
येथे डोंगरची आई युवक प्रतिष्ठानच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. हिरवा गालिचा पांघरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात दौंडज वारकऱ्यांनी न्याहरी केली. सकाळी ९ वाजता पालखी दौंडजकडे मार्गस्थ झाला. दौंडज येथे सरपंच जगन्नाथ कदम यांनी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. माउलींच्या सोहळ्याने विठुनामाच्या गजरात वाल्हे गावात प्रवेश केला. येथे सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपट पवार यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पालखी रथ न थांबल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावातील युवकांनी पालखी खांद्यावर घेऊन समाज आरतीच्या ठिकाणी आणली. या वेळी दर वर्षीपेक्षा समाज आरती लवकर झाली. समाज आरतीसाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाटेत राजराजेश्‍वर सेवा भावी ट्रस्ट व रणजित गणराया मंडळ, पुणे यांच्या वतीने मोफत चहा वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाजआरती घेतली जाते. सोहळ्यात केवळ वाल्हे येथे दुपारी पालखी पोहोचल्यानंतर समाजआरती घेण्यात येते. सोहळ्यात समाजआरतीला विशेष महत्त्व आहे. येथे सोहळ्यातील पुढील २७ व मागील २० दिंड्या तळावर येतात. समाजआरतीसाठी हजारो भाविक जमतात. या वेळी दिंडी समाजाच्या अडचणी विचारात घेऊन सोडविल्या जातात. समाजआरतीच्या वेळी मध्यभागी माउलींची पालखी ठेवून त्याच्या सभोवताली गोलाकार ४७ दिंड्या उभ्या असतात. पालखीसमोर चोपदार, संस्थान प्रमुख, मालक, वासकर, आळंदीकर, शितोळी प्रतिनिधी मानकरी उभे असतात. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

शिक्षणमंत्र्यांचा जेजुरी ते वाल्हे दिंडी प्रवास
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सकाळी जेजुरी येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत जेजुरी ते वाल्हे असा दिंडीचा पायी प्रवास केला. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसमवेत विठूनामाचा गजर करीत शिक्षणमंत्री तावडे सहभागी झाले. या वेळी पालखीमध्ये सहभागी झालेल्या दिंडी प्रमुखांशी त्यांनी संवाद साधला. तसेच, वारकऱ्यांसमवेत टाळ हाती घेत वारकऱ्यांच्या भजनामध्येही सहभागी झाले. या वेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष एकनाथ पवार, भाजपाचे नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, अशोक खोमणे, सचिन पेशवे, मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. याशिवाय वारीमध्ये गुरुवारी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेही सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंडवडीत भक्तांची मांदियाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल॥
हाती टाळ... त्यास मृदंगाची साथ, हरी नामाचा गजर करत रोटी घाटाचा हा टप्पा वारकरी तुकोबारायांच्या गजरात पार करतात. चढणीसाठी अतिशय त्रासदायक असा हा घाट, पालखीसाठी अतिशय सुकर बनतो तो हरी नामाने. याला कारण विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस! अशा भक्तिमय वातावरणात रोटी घाट सर करून संत तुकोबाची पालखी बारामती तालुक्यात दाखल झाली.
उंडवडीत गावाच्या हद्दीत गुणांजखेडा येथील शिवेवर पालखीचे स्वागत उपविभागीय अधिकारी हेमंत निकम , तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, आरटीओ विभागाचे विठ्ठल गावडे व उंडवडी गावाचे सरपंच एकनाथ जगताप यांनी संत तुकाराम पालखीचे स्वागत केले.
वारकऱ्यांच्या दिंड्या आपापल्या राहुट्यात विसावल्या. उंडवडीत विठ्ठल भक्तांची गर्दी झाली. टाळ वीणा सोबतीला हरिनामाच्या गजरात सर्वत्र वारकरी तल्लीन झाले होते. अनेक मंडळे, अनेक समाजसेवी संस्था आपापल्या परीने वारकऱ्याच्या सेवेत मग्न होती. पोलिसांनी आपला बंदोबस्त चोख बजावत तुकोबाची सेवा केली. टाळकरी, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळ्याचे अनेक पदाधिकारी यांचे बारामती तालुक्यातील व उंडवडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा शुक्रवारी उंडवडी मुक्कामी विसावला. गावात व परिसरात अभंग, कीर्तन, भारुडाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

निर्मल वारीसाठी प्रशासनाची पराकाष्ठा
संत तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी उंडवडीत मुक्कामी आहे. मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळा मार्गावर वारकऱ्यांना प्रातर्विधीसाठी शौचालयांची सोय नसल्यामुळे अनेकांना उघड्यावरच शौचास बसावे लागते. त्यामुळे या गावांजवळचा परिसर दूषित होत असतो. हे टाळण्यासाठी वारीमध्ये या वर्षीही ‘निर्मल वारी अभियान’ यशस्वी राबवण्यास प्रशासनाने पराकाष्ठा केली असल्याचे दिसून आले. गावामध्ये राज्य सरकारतर्फे तात्पुरती आणि फिरती शौचालये लावण्यात आली.

रोटी घाट दुमदुमला
दौंड : वरवंडच्या विठ्ठल मंदिरातून शुक्रवारी सकाळी सहा वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. भागवत वस्ती व पाटस येथे नागेश्वर मंदिर परिसरात विसावा घेऊन पालखी व दिंड्यांनी पाटस टोल नाक्याच्या पुढे वळण घेऊन महामार्गावरचा तीन दिवसांचा सरळसोट प्रवास संपवून रोटी घाटाकडे प्रयाण केले. पावसाचा हलका शिडकावा, मातीचा सुगंध व ढगांमुळे सुरू असलेला ऊन सावलीचा खेळ... या उत्साही वातावरणाने वारकरी सुखावले. एका तालात त्यांनी वळणा वळणाचा रोटी घाट नाचून गाऊन पार केला. तुकोबारायांची पालखी घाटातून पुढे जाण्यासाठी रोटी व पाटसच्या शेतकऱ्यांच्या चार बैल जोड्यांनी रथाला साथ दिली. पालखी घाट चढून वर आल्यावर माथ्यावर आरती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी-विरोधकांत ‘बाँड’वरून ‘तू तू मैं मैं’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समान पाणी पुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांचा मार्ग अवलंबणाऱ्यांचे अभिनंदन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी चांगलाच गाजला. या प्रस्तावावर बोलू ​न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
सत्ताधारी भाजपला सत्ता राबवता येत नसल्याने त्यांनी सभा कामकाज नियमावली पायदळी तुडवण्याचे धोरण स्वीकारले आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केला आहे. सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीने कर्जरोख्यांना विरोध दर्शवून आंदोलन केले. कामकाज सुरू झाल्यानंतर ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’वरील उत्तरे आणि काही जुन्या ठरावांवर चर्चा झाल्यानंतर सभा तहकूब करण्याचा सत्ताधारी-विरोधकांचा मानस होता. कर्जरोखे घेऊन पालिकेला कर्जबाजारी केल्याचा निषेध करण्याची तहकुबी विरोधी पक्षांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे सादर केली. मात्र, ती लक्षात आल्यावर भाजपतर्फे तत्काळ कर्जरोखेप्रकरणी अभिनंदन करणारी दुसरी तहकुबी सादर केली.
नगरसचिव सुनील पारखी यांनी ​विरोधकांची तहकुबी महापौरांनी फेटा‍ळल्याचे सांगितले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांची तहकुबी स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मतदान घेण्यात आले. सत्ताधाऱ्यांची तहकुबी ६३ विरुद्ध ३२ मतांनी मंजूर झाली. दरम्यान, तहकुबी न स्वीकारल्याने किमान वाचून दाखविण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी तहकुबीवर बोलायचे असल्याची विनंती महापौरांकडे केली. ही मागणीही फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधकांची तहकुबी सत्ताधाऱ्यांच्या आधी दिल्याने ती वाचून दाखविण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यास नगरसचिवांनी विरोध केला. त्यामुळे विरोधकांनी नगरसचिव सत्ताधाऱ्यांसाठी काम करतात, असा आरोप केला.

नियमावली धाब्यावर
भाजपकडून नियमावली धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. बहुमताच्या जोरावर सभागृहाचे संकेत, नियमावली पायदळी तुडवण्यात येत असल्याचा आरोप चेतन तुपे, संजय भोसले, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, भय्यासाहेब जाधव यांनी केला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षांना हवीत पाच वर्षे

$
0
0

झेडपीच्या पदाधिकाऱ्यांच्या सरकारदरबारी मागण्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समितीद्वारे केले जाते. मात्र, विविध निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुऴे विकासकामांमध्ये अडथळे येत आहेत. या कारणांस्तव परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यात यावा, तसेच त्यांच्या अधिकारात वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला १७ अध्यक्ष आणि २१ उपाध्यक्ष उपस्थित होते. या वेळी २६ मागण्या मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. बैठकीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत मागण्यांची माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, पुणे जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टे-पाटील, गटनेत्या आशाताई बुचके, सदस्य रणजित शिवतरे या वेळी उपस्थित होते.
‘अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असावा, ई– टेंडरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवावी, जिल्हा नियोजन समितीवर अध्यक्ष, उपाध्यक्षांची निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक करावी, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सरकारी योजना झेडपीकडे हस्तांतर कराव्यात, वर्ग १आणि २ च्या रिक्त जागा त्वरीत भरा, सर्व संवर्गाचे बदल्यांचे व भरतीचे अधिकार झेडपीकडे असावेत, अध्यक्ष, उपाध्यक्षांना स्वतंत्र निधी द्यावा, सदस्यांना २५ हजार रुपये वेतन असावे, आदी मागण्या करण्यात आल्या,’ अशी माहिती देवकाते यांनी दिली.

ग्रामीण विकास परिषद स्थापणार
झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांच्या तक्रारी, समस्या नियमित मांडल्या जाव्यात यासाठी व्यासपीठ असावे या करिता राज्यस्तरीय ग्रामीण विकास परिषद स्थापन कऱण्यात येणार आहे. पुढील बैठक लवकरच सांगलीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

’नीट’मध्ये पुणेकरांची बाजी

$
0
0

अभिषेक डोग्रा पाचवा, रुचा हेर्लेकर तेहतिसावी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यामध्ये पुण्याचा अभिषेक डोग्रा देशात पाचवा तर, राज्यात पहिला आला आहे. पुण्याचीच रूचा हेर्लेकर ही विद्यार्थीनी पुण्यात, राज्यात दुसरी तर देशात ३३ वी आली आहे. या शिवाय शरयू आणि वैष्णवी निपाणीकर या जुळ्या बहिणींनीही यादीत झळकल्या आहेत. दरम्यान, ‘नीट’मध्ये पुण्याची कामगिरी सुधारली असून, बरेच विद्यार्थी सरकारी वैद्यकीय कॉलेजांमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
मूळचा पुणेकर असणारा अभिषेक कोटा (राजस्थान) येथे खासगी आकाश ट्युटोरियल्सच्या क्लासरूम प्रोग्रॅमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला ७२० पैकी ६९१ गुण मिळाले आहे. फर्ग्युसन कॉलेजात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या रूचाला ६८० गुण मिळाले आहेत. रुचाचे दहावीपर्यंतचे शिक्षण अभिनव विद्यालयात झाले आहे. तिला बारावीत ९०.०४ टक्के गुण होते. रुचाचे वडील टाटा मोटर्समध्ये कार्यरत असून, आई डेंटिस्ट आहेत.
‘अकरावी, बारावीच्या अभ्यासासाठी खासगी शिकवणी लावली. नीट परीक्षेची तयारी डीपर क्लासमध्ये केली. या शिवाय वेळ मिळेल तेव्हा नियमित अभ्यासावर भर दिला. परीक्षेत यश मिळविण्यासाठी स्वअध्ययनावर भर देणे आवश्यक आहे,’ असे मत रुचा ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, प्राइम अॅकॅडमीतून पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये जेईई अॅडव्हान्स परीक्षेत ‘ओबीसी- पीडी’ प्रवर्गात आलेला प्रथम आलेल्या किरण बापकरचा समावेश असल्याचे अॅकॅडमीचे संचालक ललित कुमार यांनी सांगितले.

जुळया बहिणींचे यश
पुण्यातील वैष्णवी आणि शरयू या जुळ्या बहिणींनीही गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. वैष्णवीला ६१९ गुण मिळाले असून, ती यादीत १३९१ वा क्रमांक मिळवला आहे. शरयुने ५९३ मिळवून गुणवत्ता यादीत ३,५३० वा क्रमांक मिळवला. ‘परीक्षेची तयारी आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रातून केली. अकरावी-बारावीची शिकवणी उपाध्ये क्लासेसमध्ये लावली. अकरावीला साधारणतः ४ ते ५ तास अभ्यास केला. बारावीला ८ तास अभ्यास केला. नीटमध्ये यश मिळवण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांचे वाचन आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याची आवश्यकता आहे,’ असे शरयूने सांगितले. दरम्यान, वैष्णवीने जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही येण्याचा बहुमान मिळवला होता.

गरीब विद्यार्थ्यांचीही बाजी
‘नीट’साठी ‘लिफ्ट फॉर अपलिपमेंट’ या संस्थेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते. यंदा संस्थेतील ११ विद्यार्थी यादीत पात्र झाले होते. त्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळविले आहे. यात बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या संतोष चाटे ५३४ गुण मिळविले आहे. यादीत अमेय हिरवे (४७८), सूरज जाधवर (४४५), प्रतीक गुंडगे (४४४), पवन डोंगरे (४२२), प्रसाद कांबळे (३८५), केतन दरेकर (३६१), नागेश्वर राव (३४९), प्रथमेश दडस (३४७), विपिन शेलार (३४६) आणि सौरभ पवार ( ३११) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसचे ‘चार्जिंग’ करायचे कोणी?

$
0
0

स्मार्ट सिटीतील ई-बस डेपोतच पडून; दरमहा लाख रुपये खर्च

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे (पीएससीडीसी) ‘इलेक्ट्रिक’वर चालणारी बस पुण्यात दाखल झाली आहे. मात्र, या बसचे ‘चार्जिंग’ कोणी करायचे हा निर्णय होत नसल्याने ती अजून ‘ऑफ द रोड’ राहिली आहे. स्मार्ट सिटीच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त येत्या काही दिवसांत ही बस रस्त्यावर धावेल, असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत क्षेत्रनिहाय विकास प्रकल्पामध्ये (औंध-बाणेर, बालेवाडी) शंभर ई-बस धावतील, असे आश्वासन देण्यात आले होते. त्या दृष्टीने, ‘पीएससीडीसी’ने ई-बससाठी टेंडर काढले होते. त्यातून, तीन कंपन्यांची निवड करण्यात आली. या तिन्ही कंपन्यांकडून प्रायोगिक स्वरूपात प्रत्येकी एक बस घेण्यात येणार असून, महिनाभरात शहराच्या विविध मार्गांवर ती धावणार आहे. बसला मिळणारा प्रतिसाद आणि उपयुक्तता लक्षात घेऊन पुढील खरेदीचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार, काही दिवसांपूर्वीच एक बस कात्रजच्या डेपोमध्ये दाखल झाली आहे. बसच्या चार्जिंगचा प्रश्न निर्माण झाल्याने ती अद्याप रस्त्यावर धावताना दिसलेली नाही.
या इलेक्ट्रिक बससाठी लागणारा चार्जिंग पॉइंट कोणी उपलब्ध करून द्यायचा, यावरून महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) वाद निर्माण झाला आहे. ई-बस दाखल झाल्यानंतर त्याचे नियोजन आणि संचलनाची सर्व जबाबदारी पीएमपीकडे देण्यात येणार असल्याचे ‘पीएससीडीसी’ने जाहीर केले होते. या बसच्या चार्जिंगसाठी दरमहा एक लाख रुपये वीजबिल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तीन बससाठी तीन लाख रुपये खर्च करण्यास पीएमपीने असमर्थतता दर्शविली. तर, या बसद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून पीएमपीला विजेसाठी लागणारा खर्च भागू शकेल, असा दावा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तरीही, पीएमपीने हा खर्च करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता महापालिकेनेच चार्जिंग करण्याचे ठरवले आहे.
पुढील आठवड्यात धावणार?
स्मार्ट सिटी प्रकल्पाला उद्या, रविवारी (२५ जून) दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या निमित्त, ही ई-बस प्रत्यक्ष संचलनात आणण्याचे नियोजन ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने केले होते. स्मार्ट सिटीच्या वर्धापनदिनाला आता ४८ तासांहूनही कमी अवधी राहिल्याने या कालावधीत बससाठी आवश्यक चार्जिंग पूर्ण होणार का आणि २५ जूनला ही बस रस्त्यावर धावणार का याबाबत अनिश्चितता कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रामटेकडीत कचरा प्रकल्प नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

रामटेकडी इंडस्ट्रीयल विभागात दोन कचरा प्रकल्प असताना पुन्हा २३ एकर जागेवर नव्याने होऊ पाहणाऱ्या कचरा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सरकार एकीकडे उद्योगाच्या विकासाकरिता नवनवीन स्टार्टअप करताना दिसत आहे. मात्र, रामटेकडी इंडस्ट्रीयल विभागामध्ये कचरा प्रकल्प आणून महापालिका आमचे उद्योग बंद करत आहे. उद्योग वाचवण्याकरिता आम्ही कोर्टात तर जाणार आहोतच; त्याअगोदर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत, अशी भूमिका रामटेकडी इंडस्ट्रीअल असोशिएशनच्या बैठकीत उद्योजकांनी व नगरसेवकांनी स्पष्ट केली.
आम्ही पालिकेला करोडो रुपये टॅक्स भरूनही आम्हाला सुविधा देण्याऐवजी आमची पदरी कचराच टाकला जात आहे, यामुळे आमचे उद्योग धोक्यात आले आहेत, असे म्हणणे या बैठकीत मांडण्यात आले.
रामटेकडी येथे होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या कचरा प्रकल्पाच्या विरोधात रामटेकडी इंडस्ट्रीअल असोशिएशनच्या वतीने उद्योजक आणि हडपसर भागातील नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उद्योजक व नगरसेवकांनी कचरा प्रकल्पाच्या विरोधात मत व्यक्त केले. रामटेकडी इंडस्ट्रीअल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद डबीर, व्हाइस चेअरमन विकास जगताप, सचिव बालाजी माने, खजिनदार सचिन इनामदार, सहसचिव नितीन शिंगाडे, वसंत येमूल, दीपक देशमुख, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, स्थायी समिती सदस्य आनंद आलकुंटे, मारुती तुपे, नगरसेवक अशोक कांबळे, नगरसेविका रूकसाना इनामदार, माजी नगरसेवक सुनील बनकर यांच्यासह ११० उद्योजक उपस्थित होते. असोशिएशनने पालकमंत्री, मनपा आयुक्त व मुख्यमंत्र्यांना विरोधाचे पत्र दिले आहे, असेही डबीर यांनी सांगितले.
डबीर म्हणाले, ‘रामटेकडी औद्योगिक वसाहतीत अनेक अन्नपदार्थ, पाणी तसेच औषध उद्योग आहेत. त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या दोन कचरा प्रकीया प्रकल्पांमुळे अगोदरच मोठे दुष्परिणाम होत आहेत. उद्योग व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यापूर्वी न्यायालयात जावून येथील एक प्रकल्प आम्ही बंद केला आहे. नव्याने याठिकाणी कचरा प्रकल्प सुरू करून महापालिकेला वसाहतीची कचरा कुंडी करावयाची आहे का?’
आनंद आलकुंटे म्हणाले, ‘आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक मनभेद बाजूला ठेवून आयुक्तांना सामूहिक निवेदन देणार आहोत. यासाठी वेळ पडली, तर हजारो नागरिकांसह पुढच्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलन करू. कोणत्याही परिस्थितीत येथे कचरा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही.’
योगेश ससाणे म्हणाले, ‘या कचरा प्रकल्पामुळे उद्योजकांसह रामटेकडी, ससाणेनगर, गोसावी वस्ती, हडपसर गाव, गोंधळेनगर, काळेपडळ, सय्यदनगर या भागातील रहिवाशांना खूप त्रास होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एकही वीट या ठिकाणी लावू देणार नाही. तसेच महापालिका सभागृहात विरोध करणार आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत भर रस्त्यात बिल्डरवर गोळीबार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे आज सकाळी अज्ञात इसमानी एका बिल्डरवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात बिल्डर योगेश शेलार हे जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणी व का केला हे समजू शकलेलं नाही.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायनासोर गार्डनसमोरच्या बस थांब्याजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. भर रस्त्यात त्यांनी शेलार यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. शेलार यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निवडीसाठी पथकाकडून ‘टॉस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील गुन्हे शाखेत एका कर्मचाऱ्याच्या नेमणुकीसाठी खंडणीविरोधी पथक व दरोडा प्रतिबंधक पथक यांच्यात चक्क ‘टॉस’ झाला. अखेर हा टॉस खंडणीविरोधी पथकाने जिंकला आणि त्यांना हवा असलेला कर्मचारी मिळाला.

पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत बदलून आलेल्या ५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका खेळीमेळीच्या वातावरणात नुकत्याच पार पडल्या. गुन्हे शाखेतील सर्व पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात नेमणुकीसंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये सर्व पोलिस निरीक्षकांना त्यांना हवा असलेला कर्मचारी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यानुसार सर्व पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या आवडीचा व त्यांच्या कामाचा कर्मचारी त्यांच्याकडे घेतला. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची बैठक सुरू होती. आवडीनुसार सर्व कर्मचाऱ्यांना निवडून घेण्यात आले; पण एक पोलिस कर्मचारी खंडणीविरोधी पथक व दरोडा प्रतिबंधक पथक या दोन्ही पथकांना हवा होता.

सकाळपासून सर्व नेमणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या होत्या. एका कर्मचाऱ्यावरून वाद कशाला, असे धोरण वरिष्ठांनी घेतले. पण, दोघांपैकी एकाला कशा पद्धतीने कर्मचारी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या ‘टॉस’वरून वाद सुरू आहे. त्यामुळे देशभरात टॉसची चर्चा सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठीदेखील अखेर वरिष्ठांनी ‘टॉस’ करायचे ठरविले. त्याला दोन्ही निरीक्षकांनी सहमती दर्शविली. वरिष्ठांनी टॉस उडविला; पण त्यांनी तो हातावरच झेलला. तो टॉस दरोडा प्रतिबंधक विभागाने जिंकला. पण, उडविलेला टॉस हातात झेलायला नको, तो खाली पडू द्यावा, असा आग्रह सर्वांनीच धरला. पुन्हा एकदा टॉस उडविण्यात आला. हा टॉस खंडणीविरोधी पथकाने जिंकला. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या खेळीमेळीत पार पडल्या. पण, एका कर्मचाऱ्यांसाठी झालेला हा टॉस सर्वांसाठी चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सौदी’चे ‘गेम ऑफ थ्रोन्स’

$
0
0

निखिल श्रावगे

संरक्षणमंत्र्यानेच पुढे खुर्चीवर हक्क सांगावा, अशा उदाहरणांची कमी नाही. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी आपला मुलगा महंमद बिन सलमान याची युवराजपदी नेमणूक करून अजून एका उदाहरणाची भर घातली आहे. असे करताना, राजे सलमान यांनी युवराज आणि आपला पुतण्या असलेल्या महंमद बिन नाएफ यांची सर्व पदे काढून घेतली. वयोवृद्ध असणाऱ्या राजे सलमान यांच्यामार्फत मोठे निर्णय घेणाऱ्या बिन सलमान यांचे गेली दोन वर्षे महत्त्व वाढत होते. संरक्षणमंत्री आणि उपयुवराज म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. ऐन रमजान ईदच्या तोंडावर त्यांची झालेली बढती अभिप्रेत आणि त्यांच्या गटासाठी आनंदनीय आहे. आता युवराज म्हणून जाहीर झालेल्या ३१ वर्षांच्या बिन सलमान यांच्या कार्यशैली आणि दूरदृष्टीबाबत अनेक प्रवाद आहेत. मात्र, ही नेमणूक त्यांच्या कामगिरीवर आधारलेली नसून, या नेमणुकीला सौदी राजघराण्यांतर्गत आणि प्रादेशिक राजकारणाची छटा आहे.

सौदी राजाची आणि अमेरिकेची मर्जी असल्यास, सौदी युवराजाला सिंहासन ताब्यात घ्यायला मदत होते. बिन सलमान हे उपयुवराज असताना त्यांनी याची विशेष काळजी घेऊन युवराज असणाऱ्या बिन नाएफ यांची राजकीय कोंडी केली. बिन नाएफ सौदीतील गुप्तचर विभाग आणि अंतर्गत कारभार पाहत होते. दहशतवादाला पायबंद घालणारे सौदी नेते म्हणून त्यांचे प्रस्थ मोठे आहे. मुत्सद्देगिरीचा पिंड असणारे बिन नाएफ हे वॉशिंग्टनचे ‘डार्लिंग’ समजले जातात. पश्चिम आशियातील गुंतागुंतीच्या प्रश्नांबाबत ते सामंजस्य दाखवतात. मात्र, आक्रमक असणारे बिन सलमान यांना इराणशी उघड आणि थेट वैर घेण्यात स्वारस्य आहे. येमेन, सीरिया आणि इराकमधील सौदीची भूमिका इराण विरोधी राहिली आहे. ट्रम्प सरकार इराणची कोंडी करू पाहात आहे; तसेच संयुक्त अरब अमिरातीचे युवराज महंमद बिन झाएद आणि बिन नाएफ यांचे सख्य नाही. या सर्वांना बिन नाएफ यांचा जाच वाटत होता. त्यांना पदावरून हटविण्यात बिन झाएद यांचा निर्णायक वाटा आहे. कारण, अमेरिकेत बिन सलमान नवखे समजले जातात. त्यांच्या पारड्यात ‘व्हाइट हाउस’चे वजन ओतण्यास बिन झाएद यांनी मदत केली. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्या-आल्या तत्कालीन अध्यक्ष बाराक ओबामांना पत्ता न लागू देता बिन झाएद यांनी ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेऊन बिन सलमान यांच्या राजकीय बढतीची तजवीज केली. त्यानंतर झालेल्या सर्व चर्चमध्ये बिन नाएफ यांना डावलण्यात आले होते. या निर्णयाने महंमद बिन नाएफ यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. त्यांच्या गटाच्या सर्व लोकांची महत्त्वाची पदे आता बिन सलमान गटाच्या ताब्यात आहेत. मागच्या महिन्यात, ट्रम्प यांनी सौदीला भेट देऊन बिन सलमान यांच्या युवराज म्हणून बढतीला जणू दुजोराच दिला. यामुळेच, बिन सलमान आणि बिन झाएद यांचा वारू चौफेर उधळू पाहतो आहे.

आपापल्या देशाचे युवराज असणारे बिन झाएद आणि बिन सलमान यांच्या धोरणांना आता धार चढेल. येत्या काळात या दोघांनी धक्कादायक निर्णय घेतल्यास नवल वाटायला नको. हे करीत असतानाच, आपला शत्रू असणाऱ्या इराणला खिंडीत कसे पकडता येईल, याचे सर्व प्रयत्न ते करतील. त्यांच्या सुदैवाने, डोनाल्ड ट्रम्प हे इराणविरोधाची भाषा करीत आहेत. त्यामुळेच, ट्रम्प यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बिन सलमान आणि बिन झाएद जुळवून घेत आहेत. पश्चिम आशियात वचक आणि वरचष्मा ठेवण्याच्या मनसुब्याने बिन सलमान आणि बिन झाएद यांना एकत्र आणले आहे.

त्यांची ही जोडगोळी पुढील काळात भीतीदायक ठरणार असल्याचे त्यांनी आपल्या प्राथमिक हालचालींमधून सूचित केले आहे. त्यांनी कतारसोबतचे सर्व संबंध तोडून या प्रदेशाला नव्या धोरणाचा पहिला झटका दिला. मात्र, दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोपावरून कतारची कोंडी केल्यामुळे सौदीचे कौतुक करणाऱ्या अमेरिकेने मागील आठवड्यात कतारला १२ अब्ज डॉलरची लढाऊ विमाने विकून आपला नेहमीसारखा दुहेरी डाव दाखवून दिला आहे. सीरियातील बशर अल-असद राजवटीला सौदीचा विरोध असून, सौदीला असद यांना सत्तेवरून हटवायचे आहे. रशिया आणि इराणच्या पाठिंब्याच्या जोरावर खुर्ची शाबूत राखणाऱ्या असद यांना खाली खेचण्यासाठी आता बिन सलमान आणि बिन झाएद कोणते फासे फेकतात हे पाहणे गरजेचे आहे.

भारतीय कामगार मोठ्या संख्येने या प्रदेशात काम करतात. त्यांना आणि ते मायदेशात पाठवत असलेल्या चलनाला या घडामोडींचा त्रास होणार नाही, याची दक्षता मोदी सरकारला घ्यावी लागेल. तसेच, भारत याच देशांवर तेलासाठी अवलंबून असल्यामुळे, सर्व घटकांशी जुळवून घेत, कोणा एकाच्या गोटात न जाता, आपली भूमिका सावधपणे मांडताना दिसत आहे.

आता कुठे ‘आयएस’विरोधी लढ्याला जरा आकार येत असताना, इराणविरोधात सौदी आणि अमिरातीचे कान भरत अमेरिका एकप्रकारे पश्चिम आशिया नव्याने पेटवू पाहत आहे. याच ‘आयएस’च्या वाढीसाठी अमेरिकेने आणि सौदीने बक्कळ पैसे ओतला आहे. कुर्दिश गटाला इराक, सीरिया आणि तुर्कस्तान सरकारशी दोन हात करण्यास मदत करून, स्वतंत्र कुर्दिस्तानच्या कुर्दिश गटाच्या मागणीला अमेरिकेचीच फूस आहे. परस्परविरोधी गटांना झुंजत ठेवणाऱ्या अमेरिकेकडून शांततेची अपेक्षा ठेवण्यात शहाणपण नाही. अमेरिकेच्या याच भूमिकेचा आपल्याला फायदेशीर असलेले धोरण राबवणारे बिन सलमान आणि बिन झाएद डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेमतेम अडीच वर्षांत राजकीय पटलावरचा नवखा खेळाडू, सौदीसारख्या महत्त्वाच्या देशाच्या सिंहासनाच्या एक पाऊल लांब येऊन ठेपतो, ही दिसते तितकी सरळ बाब नाही. यासाठी मुत्सद्देगिरीचा मोठा कस लागला आहे. या नेमणुकीला संयुक्त अमिराती आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अनुकूलता आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेच्या पश्चिम आशियातील ताज्या हालचाली या इराणविरोधात ते आखत असलेल्या डावाचे स्पष्टपणे संकेत देत आहेत. बिन सलमान यांची युवराजपदी झालेली नेमणूक याच डावाचा एक भाग आहे. ते सौदी अरेबियातील तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतात. ते बोलून दाखवत असलेली नवी धोरणे आणि विविध विषयांवरची मते आकर्षक जरी वाटत असली, त्यांच्या मतांना विचारांची आणि कृतीची पक्की मांड नाही. येमेनमध्ये दोन वर्षे संघर्ष सुरू असूनसुद्धा, अजून आवाक्यात न आलेले राजकीय यश त्यांची सेनापती म्हणून असलेली मर्यादा उघडपणे दाखवतो. मात्र, त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, धोरणात्मक अंग आणि राजकीय आकलन पाहता ते आपल्या मर्यादांवर संयतपणे विचार करतील, अशी अशा नाही. या तरुण नेत्याकडे आपले मनसुबे राबवायला आता भरपूर वेळ आणि बळ आहे. या बळाला अमिराती आणि अमेरिकेचा सर्वतोपरी पाठिंबा आहे. याचा उपयोग ते इराणला ठेचण्यासाठी करतील. तशी जाहीर भूमिका त्यांनी घेतलीच आहे. आक्रमक बिन सलमान पश्चिम आशियातील हिंसेला सढळ हातभार लावून या प्रदेशाच्या भविष्यकाळाला कठीण वळण देतील, असा होरा आहे. प्रसंगी सौदी आणि इराण समोरासमोर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. कतारला चेपण्यासाठी त्यांनी आधीच पावले उचलली आहेत. या सगळ्यांसाठी त्यांना घरच्या आघाडीवर शांतता आणि हाती निरंकुश सत्ता असणे गरजेचे होते. तसे त्यांनी घडवून आणले. यामुळेच, राज्याभिषेकाची फक्त औपचारिकता बाकी ठेवून आणि महंमद बिन नाएफ यांची राजकीय शिकार करून, महंमद बिन सलमान यांनी तूर्तास तरी या सौदीच्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा अध्याय जिंकलेला आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ क्रांती-प्रतिक्रांतीचे आशाळभूत नेतृत्व

$
0
0

विजय साळुंके

फ्रान्सचे अध्यक्षपद आणि संसदेच्या निवडणुकीत मोठा व चमकदार विजय मिळविणारे इम्यॅनुएल मॅक्रॉन (वय ३९) यांनी दुसरी क्रांती घडविल्याचे म्हटले जाते. नेपोलियन बोनापार्ट यांच्यानंतरचे दुसरे तरुण राष्ट्रप्रमुख… सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या फ्रेंच क्रांतीनंतरच्या प्रतिक्रांतीतून नेपोलियन पुढे आला. तरीही, त्यांना फ्रेंच क्रांतीचे अपत्य मानण्यात येते. चोविसाव्या वर्षी सेनापती झालेला नेपोलियन दहा वर्षांतच प्रजासत्ताक गुंडाळून सम्राट बनला. अलेक्झांडर किंवा चेंगीजखानसारख्या साम्राज्याचे स्वप्न तो पाहात होता. फ्रेंच क्रांती सोळावा लुईस राजा, चर्च व सरंजामदारांविरुद्धचा जनतेचा उठाव होता. मॅक्रॉन यांनी फ्रेंच राजकारणातील डावे, उजवे, अतिउजवे अशा सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांवर मात करून आपले नेतृत्व प्रस्थापि‌त केले आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या‌ विजयानंतर ते वारे अॅटलांटिक ओलांडून युरोपात पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. २००८मधील अमेरिकेतील आर्थिक मंदी युरोपात पोहोचली होती. पाश्चिम आशियातील ‘इस्लामी स्टेट’च्या हैदोसानंतर तेथून लाखोंच्या संख्येने येणारे मुस्लिम निर्वासित, स्थलांतरित; तसेच गेली काही वर्षे युरोपातील अनेक देशांत इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या दहशतवादी कारवायांमुळे संकुचित व असहिष्णू, अतिउजवा राष्ट्रवाद पसरण्याची लक्षणे दिसत होती. फ्रान्समधील तेव्हाचे सोशालिस्ट सत्ताधारी, उजवे रिपब्लिकन; तसेच डावे पक्ष, कडव्या राष्ट्रवादी मरीन ल पेन यांना मिळणाऱ्या प्रतिसादाने धास्तावले होते. अध्यक्षीय निवडणुकीत पेन यांना तीस टक्के मते मिळाल्याने मॅक्रॉन यांच्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाला संसदेत बहुमत मिळाले नाही, तर अध्यक्षपदी निवडून येऊनही मॅक्रॉन यांना आपल्या दीडशे पानी जाहीरनाम्याची अंमलबजावणी करता येणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. गेली तीन दशके फ्रान्समधील जनता प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सातत्याने अपेक्षाभंगाने निराश झालीच होती. त्यामुळेच फ्रान्स संसदेच्या निवडणुकीत जेमतेम ४३ टक्के मतदान झाले. तरीही, ५७७पैकी ३५० जागा जिंकून अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आघाडीने राजकीय निरीक्षकांना चकीत केले.

मॅक्रॉन हे राजकारणात नवखे, प्रवाहाबाहेरचे नेते. आधीचे अध्यक्ष फ्रान्क्वाँ ओलांद यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थ व उद्योग खाते सांभाळले; पण ते वर्षभरातच बाहेर पडले. त्यांनी वाऱ्याची दिशा ओळखून फ्रेंच जनतेला नवा राजकीय पर्याय देण्यासाठी ‘एन मार्च’ अथवा ‘रिपब्लिकन ऑन द मूव्ह’ (प्रजासत्ताक आगे बढो) हा नवा पक्ष उभारला. सोशालिस्ट, रिपब्लिकन या पक्षातील नेत्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेतून हौशे-गवशे-नवशे असे सारे त्यात सामील झाले. याचा अर्थ राजकीय तत्त्वज्ञानाबाबत त्या पक्षाला स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व नाही. एकजिनसीपणा नाही. त्यांनी महिलांनाही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली. एका वर्षाच्या आत या पक्षाने अध्यक्षपद व संसदेची निवडणूक जिंकली. आपल्याकडे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी पार्टी’ उभी केली. त्याच धर्तीवर मॅक्रॉन यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्था पोखरली गेली आहे, यावर बोट ठेवले. ‘आप’ने दिल्लीत भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांना साफ करून ७० ते ६७ जागा जिंकल्या. नंतरच्या दोन वर्षांत मूलभूत तात्त्विक पायाचा अभाव, सरकार चालविण्याच्या अनुभवाचा अभाव व प्रस्थापित केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन स्वत:च अवघड करून ठेवलेला कारभार; यामुळे ‘आप’च्या प्रभाव ओसरला. वादळातून उभे राहिलेले नेतृत्व हेकेखोर, आत्मकेंद्री, भांडखोर व विरोध दडपून टाकणारे होते. अरविंद केजरीवाल यांनी ते दाखवून दिले. मॅक्रॉन यांचेही तसेच होणार काय, या प्रश्नाचे उत्तर येत्या वर्ष, दोन वर्षांत मिळेल.

मॅक्रॉन प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहिलेले नेतृत्व असले, तरी ते स्वत: त्याच वर्गातून आले आहेत. त्यांचे शिक्षण उच्चभ्रूंच्या कॉलेजात झाले. ते बँक क्षेत्रात उच्च पदावर होते. कोणत्याही पक्षात ते कधीच नव्हते. आर्थिक प्रश्नांनी बेजार झालेल्या अध्यक्ष ओलांद यांनी त्यांना अर्थ व उद्योग खात्याची जबाबदारी सोपविली. परंतु, महत्त्वाकांक्षी मॅक्रॉन यांनी पद सोडून स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. त्यांना प्रतिसाद मिळू लागला. त्याचबरोबर त्यांनी पक्षाची निवडणूक यंत्रणा नियोजनपूर्वक बांधली. अमेरिकेत अध्यक्ष बराम ओबामा यांची निवडणूक मोहीम आखणाऱ्या कंपनीची मदत घेऊन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, मतदारांच्या भेटीगाठी, मुलाखती यांद्वारे त्यांनी आपली सकारात्मक व आशावादी प्रचारमोहीम जनतेच्या मनात ठसविली. अर्थात, ४ कोटी ७५ लाखांपैकी फक्त ४३ टक्केच मतदान झाले. याचा अर्थ फ्रान्समधील गरीब, कृष्णवर्णीय, स्थलांतरित व अल्पसंख्याक मतदारांना मतदान करून आपल्या काही चांगले वाट्याला येईल, असे वाटत नव्हते. एका अर्थी गेली काही वर्षे फ्रान्सचे राजकारण थिजले, गंजले होते. राजकारणात संघर्ष खूप पण खरी उत्तरे मिळत नाहीत. हाही अनुभव होताच.

मॅक्रॉन यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तसेच कोणत्याही ‘इझम’चा शिक्का नव्हता. आर्थिक उदारमतवादी, लवचिक, उजवेही नाही आणि डावेही नाही. आर्थिक सुधारणांसाठी सामूहिक एकजूट असा त्यांच्या भूमिकेचा आशय आहे. स्थलांतरितांविषयी सहानुभूती, धार्मिक स्वातंत्र्याबाबत सहिष्णूता यांद्वारे त्यांना लोकशाही क्रांती यशस्वी करायची आहे. फ्रान्सच्या उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को, ट्युनिशिया, अ‌‌ल्जिरिया आदी देशांमध्ये वसाहती होत्या. औद्यो‌गिक क्रांतीच्या काळात तेथून कृष्णवर्णीय, मुस्लिमांना मजुरीसाठी आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या पिढ्या शिक्षण, रोजगाराच्या संधीअभावी गुन्हेगारीकडे वळल्या. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये हे तरुण दंगली करीत होते. पंचवीस वयांखालील वीस टक्के तरुण बेरोजगार आहेत, तर एकूण लोकसंख्येत हा आकडा दहा टक्क्यांहून अधिक आहे. आता गेल्या दोन वर्षांत ‘इस्लामिक स्टेट’पासून प्रेरणा घेऊन फ्रान्स; तसेच अन्य युरोपीय देशांत दहशतवादी कृत्ये वाढली आहेत. त्यात निर्वासितांचे लोंढे. परिणामी, फ्रेंच समाजात असुरक्षा, अ‌सहिष्णुता व विविध घटकांत तणाव आहे. आर्थिक प्रश्नांइतकाच सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा असून मॅक्रॉन यांच्या कार्यक्रमात त्याबाबत स्पष्ट दिशा दिसत नाही.

समाजवादी व डाव्यांमुळे गेली ३० वर्षे आर्थिक सुधारणा थांबल्या असून, कल्याणकारी राज्य या संकल्पनेत बदल आवश्यक आहे, अशी भूमिका असणारे मॅक्रॉन पुरोगामी-प्रतिगामी ही कृत्रिम विभागणी असल्याचे मानतात. स्वत:ला ते मध्यममार्गी सोशल डेमोक्रॅट म्हणतात. फ्रान्समध्ये कामगार संघटना पूर्वीसारख्या मजबूत व संघटित नसल्या, तरी आर्थिक सुधारणा व कामगारविषयक कायदे बदलण्याचे त्यांचे धोरण कामगारवर्गाच्या उद्रेकास निमंत्रण देऊ शकते. खुला बाजार, रोजगाराबरोबरच संपत्तीची निर्मिती हा त्यांच्या आर्थिक कार्यक्रमाचा गाभा आहे. युरोपीय संघ व ‘युरो’ या चलनास बळकटी देण्यासाठी जर्मनीतील आगामी निवडणुकीत चॅन्सलर अँजेला मर्केल या पुन्हा सत्तेवर येणे त्यांच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर २८ पैकी जर्मनी व फ्रान्स हेच त्याचा कणा बनले आहेत. हे दोन्ही देश स्वत:ला सावरून युरोपीय संघाला एकत्र ठेऊ शकले नाहीत, तर संपूर्ण पश्चिम युरोपात आर्थिक, राजकीय अस्थैर्याबरोबरच सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येईल.

मॅक्रॉन यांनी दुसरी फ्रेंच क्रांती घडविली असली, तरी सततचा तणाव व संघर्षामुळे क्रांतीची दमछाक होते. ती स्वत:चीच पिल्ले खाते. त्यातून प्रतिक्रांती होते. मरीन ल पेनसारख्या संकुचित अतिराष्ट्रवादी शक्ती विंगेत वाटच पाहात असतील. मॅक्रॉन यांच्या क्रांतीने अनेक स्वप्ने दाखविली आहेत. जनतेच्या व युरोपच्याही आशा उंचावल्या आहेत. मॅक्रॉन अपयशी ठरले, तर लोक दुसऱ्या टोकाला जातील. नेपोलियन साहसी होता. त्याच्याकडे आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, महत्त्वाकांक्षा, ऊर्जा होती. त्याच वेळी तो स्वार्थी, आत्मकेंद्री व क्षुद्र मनाचा होता. स्वत:च्या हाती सत्ता केंद्रीत करणे, हाच त्याचा ध्यास होता. क्रांती अथवा प्रतिक्रांतीतून निर्माण होणारे नेपोलियन, मॅक्रॉन वा केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हेकेखोर, एकाधिकारशाही वृत्तीचे बनते. समग्र बदलाचा त्यांचा आवेश बघता बघता ओसरतो. ‘power has an extraordinary way of currupting people’ याचा प्रत्यय येऊ लागतो. नेपोलियनला युरोप पुरेसा वाटत नव्हता. त्याला इजिप्त, भारतही पादाक्रांत करायचा होता. केजरीवालांनी दिल्ली सुधारण्याऐवजी देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले. मॅक्रॉन यांनी फ्रान्सला सावरण्याआधी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनच्या थेरेसा मे यांना शह देऊन संपूर्ण युरोपला अग्रकम दिला, तर फ्रान्सच्या मतदारांच्या

पदरी पुन्हा एकदा निराशा येईल. एकाएकी अमर्याद सत्ता हाती आल्यावर काय होते, याचा अनुभव आपण रोजच घेत आहोत!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी बोर्डाची पारितोषिके जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांसाठीची पारितोषिके शनिवारी जाहीर करण्यात आली. पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांमधील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी जाहीर केली.
मराठी विषयात (प्रथम भाषा) शिरूरच्या विद्याधाम प्रशालेच्या देवेंद्र संतोष वेताळ याने ९६ गुण मिळवून (एकूण गुण ९८.६० टक्के) प्रथम क्रमांक पटकावला. त्याला राम गणेश गडकरी पारितोषिकासह एकूण आठ पारितोषिके जाहीर झाली आहेत.
मराठी विषयात (प्रथम भाषा) मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नगर जिल्ह्यातील पारनेर येथील श्री गोरेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रियांका भाऊसाहेब नरसाळे (९६ गुण) हिला सुभद्रा पावगी व प्रतापराव सातव पारितोषिक जाहीर झाले आहे.
मराठी विषयात (द्वितीय भाषा) मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या अनन्या अभय जोशी (९६ गुण) हिला नरसिंह रामराव देशपांडे पारितोषिक जाहीर झाले आहे. गुजराती (प्रथम भाषा) मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आर. सी. मेहता गुजराथी हायस्कूलच्या राज चापसी डागा (९१ गुण) याला सुंदरलाल शाह पारितोषिक जाहीर झाले आहे. कन्नड प्रथम भाषेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कोथरूड येथील डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूलच्या नेत्रावती देवेंद्र पुजारी (९५ गुण) हिला कन्नड संघाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
रात्रशाळा विभागातून इंग्रजी (द्वितीय-तृतीय भाषा) या विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नगरच्या भाई सथ्था नाइट स्कूलच्या महेश किसन शिंदे याला (७१ गुण) मंगलाबाई शांताराम दाणी पारितोषिक जाहीर झाले आहे.
संस्कृत (संपूर्ण) विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत (एकूण ९८.२० टक्के) प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या समृद्धी उमेश पुरोहित हिला शंकरशेठ पारितोषिकासह अन्य पारितोषिके जाहीर झाली आहेत. गणितात १०० पैकी १०० गुण (एकूण टक्के ९८.४०) मिळवत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नगरच्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शंतनू चंद्रशेखर वडगावकर याला विष्णू सातव व चंदूलाल गांधी पारितोषिक जाहीर झाले आहे. गणितात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल बारामतीच्या एमईएस हायस्कूलच्या अभिषेक जयंत ढालपे याला (९८ गुण) चंद्रभागा भोसले पारितोषिक जाहीर झाले आहे. तर विज्ञान विषयात मुलांमध्ये सर्वप्रथम आल्याबद्दल अभिषेकलाच (१०० गुण) गणपती भोसले व मातोश्री कलावतीदेवी पारितोषिक जाहीर झाले आहे. विज्ञान विषयात मुलींमध्ये सर्वप्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल औंधच्या सलोनी अमर शेट्ये (१०० गुण) हिला मातोश्री कलावतीदेवी पारितोषिक जाहीर झाले आहे. समाजशास्त्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पंढरपूरच्या कवठेकर हायस्कूलच्या विनायक मुकुंद गोडबोले याला सदाशिव फडके व यशवंत देहाडराय पारितोषिक जाहीर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर अनुभवणार ‘स्वरमल्हार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परवीन सुलताना, उस्ताद राशीद खाँ, संतूरवादक राहुल शर्मा, गायक संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, गायिका आरती अंकलीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचे सादरीकरण एकाच मंचावर अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना लवकरच मिळणार आहे. वर्षाऋतूच्या स्वागत मल्हार स्वरांत करण्यासाठी व्हायोलिन अॅकॅडमीच्या वतीने ‘स्वरमल्हार’ या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ जून ते दोन जुलै या चार दिवसांत सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र या चार सत्रांत हा महोत्सव होणार असून, यात गायन, वादन, नृत्य या संगीताच्या तिन्ही पैलूंचा आविष्कार होणार आहे. गानरसिकांना विविध प्रहरातील रागांची अनुभूती या निमित्ताने मिळणार आहे. २९ व ३० जून आणि एक जुलै रोजी हा महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे आणि २ जुलै रोजी हा महोत्सव टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. महोत्सवातील प्रत्येक दिवस एकेका विशिष्ट संकल्पनेअंतर्गत सादर होणार आहे.
‘आरंभ’ या संकल्पनेअंतर्गत २९ जून रोजी महोत्सवाची सुरुवात संध्याकाळी ५.३० वाजता राजस व तेजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यानंतर युवा पिढीचे आयकॉन पं. राहुल शर्मा यांचे संतूर वादन होणार आहे. या दिवसाची सांगता शौनक अभिषेकी आणि आनंदगंधर्व आनंद भाटे या दोन कलाकारांच्या गायनाने होईल. हे दोन्ही कलाकार ‘परंपरा’ संकल्पनेअंतर्गत हे सादरीकरण करतील. त्यांना उदय कुलकर्णी संवादिनीची, तर भरत कामत तबल्याची साथ करतील.
‘पावित्र्य’ या संकल्पनेअंतर्गत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात संध्याकाळी ५.३० वाजता अॅकॅडमीच्या ६० व्हायोलिन वादकांच्या समूहवादनाने होईल. त्यानंतर ज्येष्ठ सरोदवादक तेजेंद्र नारायण मुजुमदार आणि मेवाती घराण्याचे लोकप्रिय गायक संजीव अभ्यंकर यांची ‘साज और आवाज’ या संकल्पनेअंतर्गत जुगलबंदी सादर होईल. या दिवसाची ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांच्या दमदार गायनाने होईल.
महोत्सवाच्या संकल्पनेनुसार एक जुलैची सकाळ खरोखरीच ‘प्रसन्न’ असेल. ‘सेरेनिटी’ संकल्पनेअंतर्गत सकाळी नऊ वाजता या दिवसाची सुरुवात गायिका मंजूषा पाटील यांच्या गायनाने होईल. त्यानंतर आरती अंकलीकर यांचे गायन होईल आणि उस्ताद राशीद खाँ यांच्या गायनाने सांगता होईल.
अखेरचा दिवस (दि. २ जुलै) रात्री नऊ वाजता टिळक स्मारक मंदिरात रंगेल. ‘उत्स्फूर्तता’ या संकल्पनेवर आधारित सुरुवात ‘राकेश अँड फ्रेंड्स’ या बँडच्या सादरीकरणाने होणार आहे. प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्यासह जगप्रसिद्ध ड्रमर जिनो बँक्स, बेस गिटार प्लेअर सेल्डन डिसिल्व्हा, अॅकॉस्टिक गिटार वादक संजय दास, कथक नृत्य कलाकार शीतल कोलवालकर आणि की- बोर्ड प्लेअर संगीत हळदीपूर यांचे सादरीकरण होणार आहे. या चार दिवसीय महोत्सवाची सांगता पं. विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणा वादनाने होणार आहे. महोत्सवास प्रवेशशुल्क असून, त्याच्या प्रवेशिका कोथरूडमधील नावडीकर म्युझिकल्स, टिळक स्मारक मंदिर व पौड रोडवरील मराठे ज्वेलर्स येथे उपलब्ध आहेत. ‘बुक माय शो’वरही महोत्सवाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडद्यामागच्या कलाकारांना सांभाळणारा रंगमंच

$
0
0

पुणे : प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात कलाकारांच्या अभिनयाने कळस गाठलेला असताना रंगमंचाच्या मागे तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकारांची पळापळ सुरू असते. वर्षानुवर्षे या पडद्यामागच्या कलाकारांची नाळ बालगंधर्वच्या रंगमचाशी जुळलेली आहे. महाराष्ट्रात कुठेही जा, गंधर्वमध्ये जो प्रयोग रंगतो तो कुठेच नाही, अशी या कलाकारांची श्रद्धा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रंगमंदिराची धुरा खऱ्या अर्थाने पडद्यामागचे कलाकार सांभाळत आहेत. नाटकाच्या कपड्यांना इस्त्री करणाऱ्यापासून ते कलाकारांना जेवण पोहोचवणारे. नाटकाचा बॅनर रंगवून देण्यापासून ते तिकीटांची विक्री करणारी सर्व मंडळी या गंधर्वनगरीच्या उलाढालीवर अवलंबून आहे. नकळत हे रंगमंदिर पडद्यामागच्या शेकडो कलाकारांसाठी रोजगार मिळवून देणारे एक साधन आहे. त्यामुळे, ही सर्व मंडळी रंगमंदिराबाबतीत कृतज्ञ आहेत. संपूर्ण राज्यात शेकडो नाट्यगृह आहे. प्रत्येक नाट्यगृहात काहीतरी सोयी-सुविधांचा अभाव आढळतो. नाट्यगृहाच्या बांधणीतच चुका असल्याने अनेकदा तंत्रज्ञांना नाटकाला साजेसे असे काम करताच येत नाही. पण बालगंधर्व त्याबाबतीत पूर्ण वेगळे आहे, असे या सर्व तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. स्वतः पु.ल. देशपांडे यांनी जातीने लक्ष घालून हे रंगमंदिर उभे केले आहे. त्यामुळे इथे नाटकासाठी काम करणाऱ्या तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांचा विचार सर्वांत आधी केला गेला आहे. त्यांच्या सोयीसाठी रंगमंगदिराची विशिष्टप्रकारे बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळेच तंत्रज्ञ आणि पडद्यामागच्या कलाकारांच्या दृष्टीने बालगंधर्व रंगमंदिर आदर्श ठरले आहे.

गेल्या पंधरा वर्षापासून बालगंधर्व मध्ये नेपथ्याची जबाबदारी सांभाळत आहे. आजपर्यंत ५००हून अधिक प्रयोग रंगमंदिरात केले. इथे जो आनंद मिळतो तो महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही. नेपथ्याच्या दृष्टीने बालगंधर्वचा रंगमंच हवा तसा वापरता येतो. कमी वेळात जास्त चांगले काम करता येत असल्याने ही वास्तू आमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. रात्री उशिरा कधीही आलो तरी बालगंधर्व म्हणजे आधार असल्यासारखे वाटते.
- अरुण जगताप (मयाचार्य), नेपथ्यकार

माझ्या आयुष्यातले बहुतांश चांगले प्रसंग बालगंधर्व रंगमंदिरामध्ये घडले आहेत. त्यामुळे या रंगमंदिराला मी घर मानतो. गाढवाचे लग्न या नाटकाचा २०००वा प्रयोग बालगंधर्व मध्ये झाला. अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते या प्रयोगाला आले होते. या रंगमंचाने खूप दिले आहे, असे सांगत त्या वेळी माझे वडील नतमस्तक झाले होते. तेव्हा या वास्तूचे महत्त्व पटले. तेव्हापासून आम्हा कलाकारांच्या मनात या वास्तूचे स्थान मोठे आहे.
- अभिजित इनामदार, ध्वनि संयोजन

कोणत्याही व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असला की तो बालगंधर्वमध्येच घेतला जातो. त्या जागेत एक विलक्षण ताकद आहे जी कलाकारांना बांधून ठेवते. या रंगमंदिरामुळे अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टिस्टना रोजगार मिळाला आहे. गंधर्वमध्ये प्रयोग आहे, असे सांगितले की पडद्यामागच्या कलाकारांची आर्धी चिंता मिटते.
- तेजस ढमढेरे, प्रकाशयोजना, संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जल्लोष, सत्कार आणि निरोपही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उत्साहात झालेले स्वागत....हिप हिप हुर्रेचा गजर...गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...एकमेकांसोबत काढलेले सेल्फी...गुरुजनांना केलेले वंदन आणि त्यानंतर एकमेकांचा घेतलेला भावपूर्ण निरोप...अशा वातावरणात शनिवारी विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका अर्थात मार्कलिस्टचे वाटप करण्यात आले. यंदा प्रथमच मार्कलिस्टसोबत कलचाचणीचा अहवालही मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी उत्सुकता दिसून आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी तीन वाजता शाळांमधून मार्कलिस्ट व कलचाचणीच्या अहवालाचे वाटपही करण्यात आले.
अनेक शाळांमध्ये मार्कलिस्ट वाटपासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत पहिल्या तीन किंवा पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. काही शाळांमध्ये पेढे व मिठाईवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही शाळेत गर्दी केली होती.
अकरावीनंतर प्रत्येक जण आपापल्या मार्गाने पुढे जाणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो, सेल्फी काढून घेतले, शिक्षकांचे आशीर्वाद घेतले, एकमेकांना शुभेच्छा देत एकमेकांचाही निरोप घेतला.
दरम्यान, बारामती येथील निंबुत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शनिवारी उशिरापर्यंत निकाल मिळू शकला नाही. या शाळेचा निकाल मंडळाकडून तयार ठेवण्यात आला होता. मात्र, या शाळेचा प्रतिनिधीच निकाल नेण्यासाठी आला नाही, असे मंडळाचे विभागीय सचिव दहिफळे यांनी सांगितले.

कलचाचणीचा अहवाल
दहावीच्या टप्प्यावरच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांचा कल कोठे आहे, हे समजावे, यासाठी विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या या कलचाचणीचा अहवाल विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्कलिस्टसोबत देण्यात आला. त्याविषयीही विद्यार्थ्यांना मोठी उत्सुकता होती. या अहवालात कला, ललितकला, तांत्रिक अभ्यासक्रम, कॉमर्स, आरोग्य विज्ञान, मानव्यविद्या अशा विद्याशाखांपैकी त्यांचा प्राधान्यक्रम कसा असावा, हे सुचविण्यात आले आहे.

मंडळाच्या नियोजनाचा फटका
मंडळातर्फे शनिवारी सकाळी शाळांना निकाल वितरित करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शाळांचे लिपिक मंडळाच्या कार्यालयात आले होते. मंडळाचे कर्मचारी कमी असल्याने तेथे गोंधळ होऊन चेंगराचेंगरीचेही प्रकार घडले. त्यामुळे महिला लिपिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनीच रचला फरारी झाल्याचा बनाव

$
0
0

पिंपरी : कात्रज घाटात लघुशंकेसाठी थांबल्यानंतर तीन सराईत पळून गेल्याची खोटी माहिती खुद्द पोलिसांनीच पसरवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पळून गेलेले सराईत कात्रज नव्हे तर पिंपरी मोरवाडी कोर्टासमोरून पळून गेल्याचे उघड झाले आहे.
काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे (रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मच्छिंद्र जगताप (रा. मोरवाडी, पिंपरी) आणि लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदिलकर (रा. लवळे, ता. मुळशी) अशी पळून गेलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या प्रकरणी सुरुवातीला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात समोर आलेल्या या बाबींनंतर हा गुन्हा तपासासाठी पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल्या, संतोष आणि लुभ्या यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सातारा येथील गुन्ह्यासंदर्भात १० एप्रिलला खंडाळा (जि. सातारा) येथे हजर करण्यात आले होते. तेथून परतताना लघूशंकेचे कारण देऊन पोलिस व्हॅन कात्रज घाटात थांबविण्यात आली होती. तेव्हा तिघे पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याची तक्रार संबंधित पोलिसांनी केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दिलेली माहिती खोटी असून, सराईत पिंपरी मोरवाडी कोर्टासमोरून पळून गेल्याची धक्कादायक बाब वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड, सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांनी उघड केली. ते तिघे पिंपरीतून पसार झाले तेव्हा, पोलिसांची सरकारी गाडी तेथे नसल्याचेही उघड झाले अहो. या तिघांची
कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यासाठी पोलिसांनी बेकायदा त्यांना मोरवाडी पिंपरी येथे खासगी वाहनातून आणल्याचेही उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरवर गोळीबार

$
0
0

माजी नगरसेवकाच्या मुलीने हल्ला केल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केला. हल्ल्यात व्यावसायिकाच्या पायाला गोळ्या लागल्या आहे. शनिवारी सकाळी पिंपळेगुरव येथील भरवस्तीत ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
योगेश शंकर शेलार (वय ४० रा. सांगवी) असे जखमी बिल्डरचे नाव आहे. शेलार यांनी दिलेल्या जबाबावरून पुणे महापालिकेच्या माजी नगरसेवकाच्या मुलीने जीवे मारण्याची सुपारी दिल्यानेच हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, ही घटना खरच घडली की केवळ बनाव रचण्यात आला आहे, याची माहिती सांगवी पोलिस आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेलार त्यांच्या चारचाकीतून पिंपळे गुरव येथील बस स्टॉपजवळील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर शेलार यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. घटनेनंतर ते दोघे पसार झाले. या गोळीबारात शेलार यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या असून, त्यांना उपचारांसाठी औंध येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर, मुख्य बसथांबा आणि राजमाता जिजाऊ उद्यानाचा हा परिसर वर्दळीचा असतो. येथे भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.हा गोळीबार पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीने घडवून आणल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. संबंधित मुलीवर पाच वर्षांपूर्वी तलवारीने वार केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा ‘पंचमदा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वॉल्टझ म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा कल्चरल पार्टनर असणार आहे. हा कार्यक्रम चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २७ जून रोजी रात्री साडेआठ वाजता असणार आहे. कल्चर क्लबच्या सदस्यांना या कार्यक्रमाचा मोफत आस्वाद घेता येईल.
सुप्रसिद्ध संगीतकार आणि श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पंचमदा हे आजच्याही पिढीला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या ७८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘हम भी चले आप की राह पर’ या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडच्या श्रोत्यांसाठी खास हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका रेश्मी मुखर्जी, गायक जितेंद्र भुरुक यांच्या आवाजाची जादू अनुभवता येईल. याचबरोबर केविन रुबदी आणि मनीष रुबदी त्यांच्या वाद्यवृंदासह या कार्यक्रमात रंगत आणतील. पंचमदांच्या सुरेल गाण्यांना या वेळी उजाळा देण्यात येईल. त्यांची सुप्रसिद्ध गीते पेश केली जातील.
या कार्यक्रमास प्रवेशमूल्य आहे. मात्र, ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या सदस्यांना या कार्यक्रमाचे मोफत पास मिळणार आहेत. कल्चर क्लबच्या सदस्यांनी आपले कार्ड दाखवून हे मोफत पास घ्यायचे आहेत. निगडीच्या इन्स्पिरिया मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर ‘एकलव्य हॉलमध्ये’ आणि आकुर्डीच्या जय गणेश फेमच्या मागे आंगण हॉटेलच्या बाजूला ‘वॉल्टझ अकॅडमीत’ हे पास उपलब्ध असणार आहेत. एका कार्डवर एका व्यक्तीस मोफत पास मिळणार आहेत. सोमवारपर्यंत सदस्यांनी या कार्यक्रमाचे पास घ्यायचे आहेत. अधिक माहितीसाठी ९९७५४०४०२६, ९७६२४२९३८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळाचे कर्मचारी पालिकेत समाविष्ट

$
0
0

पालिका नियमावलीनुसार कारभार चालणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी‌ घेतल्याने आतापर्यंत वर्षानुवर्षे शिक्षणमंडळात ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश पालिकेत झाला आहे. मंडळात शिपाई, रखवालदार (सुरक्षारक्षक) तसेच क्लार्क म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली पालिकेच्या अन्य विभागांमध्ये होणार आहे. तसेच, पालिकेच्या इतर विभागात काम करणाऱ्यांनाही मंडळात काम करावे लागणार आहे. पालिकेचे सर्व नियम मंडळात काम करणाऱ्यांना लागू होणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे सर्व ​शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेण्याचेही कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळे विद्यमान पालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत स्वतंत्र शिक्षण मंडळाचे अस्तित्व ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यंदा फेब्रुवारीमध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर १५ मार्चला महापौर निवडीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले. कायद्याने त्याचवेळी शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. त्यानंतर तीन महिने आयुक्तांनी मंडळाच्या बरखास्तीचे आदेश काढले नव्हते. मात्र, १४ जूनला आयुक्तांनी शिक्षण मंडळाच्या बरखास्तीचे आदेश काढले. त्यामुळे मंडळात कार्यरत पदाधिकाऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात आले.
मंडळ बरखास्त केल्याने पुढील कारभार पालिका नियमावलीनुसार अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांचे एकत्रिकरण करुन पालिकेचा ‘शिक्षण विभाग’ असे त्यांना म्हटले जाणार आहे. मंडळात आतापर्यंत काम करणाऱ्या सेवकांना पालिकेत वर्ग केले जाणार आहे. तसेच शिपाई, क्लार्क याबरोबरच अन्य पदांवर काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांची पदे इतर पालिकेच्या विभागांमध्ये असतील, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची बदली देखील होणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने काढलेली सर्व परिपत्रके, आदेश आता पालिकेत समाविष्ट झालेल्या मंडळातील कर्मचाऱ्यांना लागू असणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाचा पसारा
प्राथमिक शाळा : २८७
माध्यमिक शाळा : ३०
एकूण कर्मचारी : ४१००
क्लार्क : ५० ते ६०
रखवालदार : ४००
शिपाई : ३६४

‘कारभारी’ बदलणार
गेली अनेक वर्षे शिक्षणमंडळाचा आर्थिक कारभार प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने चालत होता. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मंडळाचे स्वतंत्र खाते होते. आता मंडळ बरखास्त झाल्याने पूर्वीची सर्व खाती बंद करून पालिकेच्या मुख्य लेखा आणि वित्त विभागामार्फत आर्थिक कारभार चालविण्यात येणार आहे. पूर्वीच्या बँकांमधील शिल्लक रक्कम नवीन खात्यात वर्ग करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images