Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​ कॉलेजांतून बेकारांची फौज

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कॉलेजांमधून सध्या शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमधून बेकारांची फौज तयार होत आहे. या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी होत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार मिळविण्यासाठी उपयोगी पडणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपी कॉलेजच्या १०२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य वसंतराव देसाई, अॅड. मिहीर प्रभूदेसाई, कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ आदी उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले, ‘कॉलेजांमधून शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यासाठी उपयोगी पडणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच, हे शिक्षण देत असताना ते चारित्र्यसंपन्न देखील कसे होतील, हे पाहण्यासाठी कॅरेक्टर डेव्हलपमेंट मॉड्युलसारखे क्रेडिट बेस कोर्स राबविणे गरजेचे आहे. शिक्षकांनीदेखील आपण विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देत आहोत, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी आपण माहिती देतोय की ज्ञान याचा विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याचा दूरपयोग होणार नाही याचे भान शाळा व विद्यार्थ्यांनी ठेवावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरीटीसारखे विषय शिकवणे गरजेचे आहे.’

अ‍ॅड. जैन म्हणाले, ‘चारित्र्य शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे हे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच, विद्यार्थ्यांनीदेखील हे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’ प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेठ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारती बालटे यांनी, तर आभार प्रा. अशोक मोरवाल यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ ​इंडियाचे (आठवले गट) डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या उमदेवार लता राजगुरू यांनी माघार घेतल्याने धेंडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकाली निधनामुळे उपमहापौरपद रिक्त झाले होते. त्यामुळे उमहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. काँग्रेसच्या उमेदवार राजगुरू आणि आरपीआय-भाजपचे उमेदवार डॉ. धेंडे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अर्ज भरले होते. या निवडणुकीसाठी खास सर्वसाधारण सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

पीठासीन अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण आयुक्त लहू माळी यांनी काम पाहिले. माळी यांनी दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे सांगून माघार घेण्याची वेळ जाहीर केली होती. या वेळी काँग्रेसच्या उमेदवार राजगुरू यांनी माघारीचा अर्ज सादर केला. त्यामुळे डॉ. धेंडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. डॉ. धेंडे हे तिसऱ्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी शहर सुधारणा आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच, त्यांनी ‘आरपीआय’चे गटनेते म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

काँग्रेसने उपमहापौरपदाची निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचेच नेते गोपाळ तिवारी यांनी यापूर्वी केली होती. तर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी कांबळे यांच्या दुर्देवी निधनामुळे ही निवडणूक होत असून ती बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना केले होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भिमाले यांच्या आवाहनाला मान देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भिमाले यांनी सभागृहात दोन्ही पक्षांचे आभार मानले.

‘अपूर्ण स्वप्ने पूर्ण करू’

दिवंगत उपमहापौर नवनाथ कांब‍ळे यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची ग्वाही देतानाच नवनिर्वाचित उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी परजिल्ह्यातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या धर्तीवर आणखी एक वसतिगृह बांधणे तसेच झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगिले.

डॉ. धेंडे यांची बुधवारी सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले तसेच इतर ज्येष्ठ नगरसेवकांनी धेंडे यांचे अभिनंदन केले. डॉ. धेंडे यांनी दिवंगत उपमहापौर कांबळे यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचे ग्वाही दिली. झोपडपट्टीवासियांना ५०० चौरस फुटांचे घर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय, एक डॉक्टर असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणार असून आर्थिक दुर्बल घटक वर्गातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवणार आहोत, असे ते म्हणाले. महानगरपालिकेचा वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून सत्ताधारी पक्षात असलो, तर विरोधकांना सोबत घेऊन काम करू, अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. शिवसेनेचे अविनाश साळवे यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच कांबळे यांनी श्रद्धांजली वा​हिली. शिवसेनेने या निवडणुकीत डॉ. धेंडे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. कांबळे यांचे रिपब्लिकन ​चळवळीतील आठवणी सांगतानाच डॉ. धेंडे यांनी येरवडा परिसरात केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला.

या वेळी दीपक मानकर, बाबूराव चांदेरे बापूराव कर्णे, मंगला मंत्री, सुनील टिंगरे, नंदा लोणकर, वैशाली बनकर, शीतल सावंत, लता राजगुरू यांनीही डॉ. धेंडे यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळ अखेर बरखास्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी काढले. शाळा सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस असतानाच हे आदेश काढण्यात आल्याने शिक्षण मंडळातील सभासदांना शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात मिरविण्याचा मार्ग बंद झाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे सर्व‍ शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश हायकोर्टाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळे विद्यमान महापालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत स्वतंत्र शिक्षण मंडळ अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर १५ मार्चला महापौर निवडीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले. कायद्याने त्याच वेळी शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. गेले तीन महिने आयुक्तांनी मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले नव्हते. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले असून राज्य सरकार; तसेच शिक्षण खात्याच्या संबधित विभागांना याची प्रत तातडीने पोहचविण्यात आली आहे.

शिक्षणमंडळ बरखास्त करण्यात आल्याने पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आता मंडळाचा कारभार चालणार आहे. शिक्षणाचा कारभार चालविण्यासाठी शिक्षण समिती स्थापन करायची, की पुन्हा शिक्षण मंडळ स्थापन करायचे, याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. सभागृहाने नगरसेवकांची शिक्षण समिती स्थापन केल्यानंतरही खरेदीचे संपूर्ण अधिकार हे स्थायी समितीकडेच असल्याने वेगळी शिक्षण समिती स्थापन करण्याऐवजी महिला व बालकल्याण समितीकडे शिक्षण विभाग सोपवावा, असाही मतप्रवाह पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण समिती स्थापन केल्यास त्यामध्ये पालिकेतील नगरसेवक हेच सभासद असतील, अशी अट असल्याने नाराज कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करता येईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

महापौर कार्यालयाकडून कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठीचा कार्यक्रम महापौर कार्यालयाकडून घेतला जाणार असून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत होणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गणवेश; तसेच साहित्याची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले डीबीटी कार्डचे वाटप या वेळी केले जाणार असल्याचे महापौर टिळक यांनी स्पष्ट केले.

…अन् बरखास्तीचे आदेश काढले

पालिकेच्या जुन्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही पालिका प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षणमंडळ बरखास्तीचे आदेश काढले नव्हते. त्यामुळे मंडळातील पदाधिकारी सर्रास वावरत होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले होते. त्यांच्या कार्यक्रमपत्रिका छापण्यात आल्या होत्या. महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. महापौर टिळक यांच्याकडे ही कार्यक्रम पत्रिका गेल्यानंतर त्यांनी मंडळाच्या अस्तित्वाबद्दल प्रशासनाकडे कडक शब्दात विचारणा केली. मंडळाच्या अध्यक्षा या राष्ट्रवादीच्या असल्याने या कार्यक्रमाचे श्रेय राष्ट्रवादीला मिळाले असते. त्यामुळे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला मंडळ बरखास्तीचे आदेश काढल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

२६ जणांचा भुर्दंड चार हजार जणांना

केवळ २६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाइन माहिती भरायची राहिल्याने तब्बल ४१०० शिक्षकांना गेल्या एका महिन्यापासून पगार मिळाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केला आहे. ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरली नाही, त्यांचा पगार न थांबवता सरसकट सगळ्यांनाच त्रास देण्याचा लालफितीचा कारभार पालिका प्रशासनाकडून हाकला जात असल्याची टीकाही तांबे यांनी केली.

तांबे म्हणाले, ‘शिक्षण मंडळातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० कॉलममध्ये ऑनलाइन माहिती संगणक प्रणालीमध्ये भरली जात आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट असून त्यात अनेक अडचणी आहेत. तरीही जवळपास ​सर्वच जणांची माहिती भरली गेलेली आहे. असे असतानाही केवळ २६ जणांची माहिती भरली न गेल्याने इतर सर्वांचेच मे महिन्याचे पगार थांबवण्यात आले आहे. जून महिन्याचे पगार करण्याची वेळ आली असताना त्यांना मे महिन्याचेच पगार मिळाले नाहीत.’

तांबे म्हणाले, ‘शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची परवड होऊ लागली असून अनेकांना गृहकर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यामध्ये तत्काळ लक्ष घालून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार करावेत. ज्यांनी आपली माहिती दिली नाही, त्यांचे पगार थांबवले तरी चालतील. मात्र, त्याचा फटका इतरांना बसू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओढे, नाल्यांच्या पाहणीचा ‘फार्स’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात पडलेल्या पहिल्याच पावसाने पालिकेने पावसाळापूर्व केलेल्या कामांची पोलखोल केल्याने केवळ सोपस्कार म्हणून गुरुवारी पालिकेतील अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन ओढे, नाले यांची पाहणी केली. या पाहणीतून शहरातील नाले तुंबल्याची नेमकी कारणे मात्र प्रशासनाला सापडली नसल्याने ही पाहणी केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.

शहरातील नाल्यांमध्ये; तसेच गटारांमध्ये कचरा अडकल्यानेच ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांनी केला. शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने पालिकेने केलेल्या कामाची दैना उडविली. शहरातील अनेक भागात पाणी साठल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटारे साफ केली होती, तर पाणी रस्त्यावर साचले कसे? असा प्रश्न उपस्थित करून अनेक सभासदांनी यावर नाराजी व्यक्त केली. शहरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे पुणेकरांना मनस्ताप झाल्याने त्याची शहानिशा करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांची टीम करून शहरातील विविध भागांतील नाले, ओढे, पावसाळी गटारे यांची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या.

या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी दिवसभर ही पाहणी केली. केवळ सोपस्कार म्हणून ही पाहणी केली जात असल्याचे समोर आले असून बुधवारी देखील अनेक नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ असतानाही ते काढण्याचे काम केले जात नसल्याचे समोर आले. तर, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा काढण्याचे काम सुरू होते. प्रशासनाने यापूर्वीच कचरा काढला होता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा आला कुठून, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अहवाल आज देणार

शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून त्यांच्या भागात असलेली पावसाळी गटारे, नाले, ओढे यांच्या कामाची पाहणी करण्यात आली. यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक पालिका प्रशासनाने केली असून याचा सविस्तर अहवाल गुरुवारी आयुक्तांकडे देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांचे आदेश रद्द करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पालिकेतील बांधकाम, पाणीपुरवठा; तसेच भवन रचना, पथ या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बदलीचे सर्व निकष डावलले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आपला आदेश मागे घेऊन केलेल्या बदल्या रद्द कराव्यात,’ अशी मागणी पालिका अभियंता संघाने केली आहे. या बदल्यांबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी संघटनेच्या सभासदांना वेळ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पालिका आयुक्त कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी पालिकेतील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले. पथ, मलनिःसारण, भवन रचना, प्रकल्प याबरोबरच बांधकाम विभागातील ५२ अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश काढले. या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून दोन दिवसांपासून पालिकेत सर्वत्र या बदल्यांची चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर पक्षांच्या गटनेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. बदली झाल्याने नाराज झालेल्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला दांडी मारून निषेध नोंदविला होता.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पा‌लिकेतील अभियंता संघाने पालिका आयुक्त कुमार यांना निवेदन देऊन अन्यायकारक बदलीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पुन्हा अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांना द्यावे, तीन वर्षे पूर्ण न झालेल्या बदल्या रद्द करणे, तसेच बदल्या नियमाप्रमाणे कराव्यात, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. बांधकाम परवाना विभागातील १४ पैकी १३ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली असल्याने या विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे, असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीच्या दिरंगाईमुळे आत्मदहनाचा इशारा

0
0


भोर : वेल्हे तालुक्यातील विंझर येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या चार वर्षांपासून बेकायदा शुल्क आकारले जात आहे. या प्रकरणी चौकशीची दिरंगाई केली जात असल्यामुळे राज्य शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर वेल्हे तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष दिलीफ फडके यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे हे विद्यालय २० वर्षांपासून कार्यरत आहे. विद्यालय अनुदानित आहे. गेल्या चार वर्षांत येथील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून तीन ते पाच हजार रुपये प्रवेश शुल्क म्हणून घेतले जात आहे. या शुल्काची पावतीही दिली जात नाही. विद्यालय सोडून जाणाऱ्या विदयार्थ्यांकडूनही पाचशे रुपये दाखल्यांसाठी घेतले जातात. त्याचीही पावती दिली जात नाही. गेल्या चार वर्षांत सुमारे वीस लाख रुपयांची फी च्या नावाखाली लूटमार केल्याचा आरोप फडके यांनी केला आहे. अशा प्रकारे शुल्क आकारण्याचा विद्यालयास अधिकार नसल्याचे ग्राहक पंचायतीचे म्हणणे आहे. वारंवार अर्ज करूनही त्याची दखल न घेतल्याने अखेर आत्मदहनाचा इशारा देणारे पत्र सर्व संबंधितांना फडके यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुदाम काटे यांना ‘सिकल सेल’ पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या ‘सिकल सेल विभागा’चे प्रमुख डॉ. सुदाम काटे यांना वयाच्या ८६व्या वर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील ‘सिकल सेल १०१ संस्थे’तर्फे ‘सिकल सेल अॅडव्होकेट २०१७’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जुलै महिन्यात कॅलिफोर्निया येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रथमच भारतातील एका डॉक्टरला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. पाटील, सचिव अनिल गुजर यांनी डॉ. काटे यांचे अभिनंदन केले.

‘सिकल सेल’ हा रक्ताचा आनुवंशिक आजार म्हणून आदिवासी भागात आढळून येतो. विदर्भ, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी आदिवासी भागात डॉ. काटे हे रुग्णाचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करतात. सन १९७२ ते १९९१पर्यंत डॉ. काटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बायोकेमिस्ट्री विषय शिकवित होते. निवृत्तीनंतर त्यांनी हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळात डॉ. दादा गुजर यांच्यासोबत काम सुरू केले.

वीस वर्षांपासून महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अकुलखेडा येथे आरोग्य सुविधा केंद्रे उभारली आहे. तेथे वास्तव्य करणाऱ्या भिल्ल आणि पावरा या दोन आदिवासी समाजामध्ये ‘सिकल सेल’ हा दुर्धर अनुवंशिक आजार आढळतो. तेथे मंडळाकडून ‘सिकल सेल’; तसेच अन्य रुग्णांसाठी विनामूल्य रोगनिदान, आयुर्वेद पद्धतीने औषधोपचार आणि समुपदेशन या सुविधा उपल्बध आहेत. मंडळाने सिकल सेल रुग्णांसाठी sc-3 हे आयुर्वेदिक औषध विकसित केले आहे. आदिवासी भागातील तीन हजारांहून अधिक ‘सिकल सेल’चे रुग्ण या सेवेचा उपचार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘कैद्यांना सुधारण्याचे काम करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘गंभीर गुन्हे करून कारागृहात हजारो कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अशा कैद्यांच्या वर्तनात बदल घडवून त्यांना सुधारण्याचे काम करावे,’ अशी अपेक्षा कारागृह विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केली.

येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात बुधवारी तुरुंगाधिकारी तुकडी क्रमांक ६० आणि शिपाई तुकडी क्रमांक १०९चे दीक्षांत संचलन दिमाखात पार पडले. उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रा. शरद खटावकर, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जी. के. सरोदे, प्रकाश उकरंडे आदी उपस्थित होते. कारागृह शिपाई तुकडीत प्रगती जगनाथ पिवळ आणि प्रतिभा बसवराज घुगरे यांनी संयुक्तिक उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा बहुमान मिळविला. नेमबाजी परीक्षेत अजय बाळासाहेब माने, तर मैदानी परीक्षेत गणेश विजयसिंग घुसिंगे यांना बहुमान मिळाला.

महाविद्यालयातून आजपर्यंत २९ उपाधीक्षक, ९३६ तुरुंगाधिकारी आणि सात हजार ५३९ शिपाई यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तुकडी क्रमांक १०९मध्ये ४२ महिला आणि ५३ पुरुष शिपाई, तर तुरुंगाधिकारी तुकडी क्रमांक ६०मधून सात तुरुंगाधिकारी आणि एक उपाधीक्षक यांनी प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुरुंगाधिकारी संजय कांबळे यांनी, तर आभार एस. यू. म्हस्के यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्यामु‍ळे आरोग्य धोक्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

प्रभागातील रिक्त भूखंडावरील कचऱ्याने हद्द पार केल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कचऱ्याची ‘हद्द’ वाढली असल्याचे निरीक्षण आहे.

या प्रभागातील भगत नावाचे नागरिक म्हणाले, ‘प्रभाग एक आणि दोनमध्ये मुख्य रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, पिण्याचे पाणी या समस्या मार्गी लागल्या आहेत. काही भागांतील अंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, घरासमोर असणाऱ्या रिकाम्या जागेतील कचऱ्यामुळे त्रास होत आहे. हा साचलेला कचरा वाऱ्यामुळे थेट घरात येतो.’

दुसरा एक नागरिक म्हणाला, ‘आरोग्य निरीक्षक या दोन्ही प्रभागात येत नसल्याने या भागातील स्वच्छता ठेकेदाराच्या भरवशावर असल्याचे पाहावयास मिळते. आरोग्य विभाग फक्त रोड चकाचक झाले पाहिजेत, याचा आग्रह धरतात. मात्र, रस्त्याच्या बाजूला रिकाम्या भूखंडांवर काम करीत नाही.’ रिकाम्या भूखंड मालकांची नोंद नगरपालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्न निर्माण होऊनही भूखंड माफियावर आरोग्य विभागाला कारवाई करता येत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

प्रभागातील नागरिक विकासकामाबाबत समाधानी आहेत, हेच कष्टाचे फळ आहे. मात्र, रिक्त भूखंड मालकांवर कारवाई केली जाईल. कचरा समस्या लवकरच मार्गी लावू.

जय पाटील, प्रभाग २ अ, उपाध्यक्ष, बारामती नगरपालिका

कचरा समस्या पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.

- समीर चव्हाण, नगरसेवक प्रभाग १ अ

आम्हाला विकासाची चिंता नाही. मात्र, कचरा प्रश्न पालिका प्रशासनाने मार्गी लावावा.

– अजय मोरे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस वर्षे झाली, तपास सुरू आहे!

0
0

पुणे : विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना पॅरोल आणि फर्लोच्या सुटीवर बाहेर आलेले पुण्यातील २१ कैदी गायब झाले आहेत. त्यांपैकी तीन कैदी २५ पेक्षा जास्त वर्षांपासून फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात नेमलेल्या पथकाने, या कैद्यांची वाट पाहण्याशिवाय काहीही न केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या शोधण्यासाठी नव्याने आदेश देण्यात आला आहे.

तुरुंगातील कैद्यांना फर्लो आणि पॅरोल अशा दोन सुट्या दिल्या जातात. यातील फर्लो तुरुंग प्रशासन, तर पॅरोल विभागीय आयुक्त कायार्लायाकडून दिली जाते. या सुटीवर बाहेर आल्यानंतर फरारी झालेल्या कैद्यांची संख्या राज्यात मोठी आहे. पुण्यात अशा प्रकारे २१ कैदी फरारी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पॅरोलचे सात आणि फर्लोच्या १४ कैद्यांचा समावेश आहे. यामध्ये एक कैदी १९७८पासून, तर दुसरा कैदी १९८४पासून फरार आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यातून फर्लोवर बाहेर आलेला ब्रेन सायमन हा कैदी १९९२पासून फरारी आहे.

फरारी झालेल्यांमध्ये काही गंभीर गुन्ह्यातील कैदी असल्याचे समोर आले होते. तसेच, यांची संख्या मोठी असल्यामुळे सरकारने या कैद्यांना शोधण्यासाठी एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश प्रत्येक पोलिस ठाण्याला दिले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यात या पथकांची स्थापना झाली. मात्र, त्यांच्याकडून शोधासाठी काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुन्हा एकदा पुण्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अशा कैद्यांचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे.

फर्ले आणि पॅरोल कशी मिळते

शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर कैद्यांना फर्लो सुटी दिली जाते. नातेवाइक आजारी असेल किंवा कार्यक्रम असेल तर विभागीय आयुक्तांकडून पॅरोलला मान्यता देण्यात येते. पॅरोल देण्यासाठी, त्या कैद्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलिस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याची वर्तणूक, त्याचा नातेवाइक आजारी असल्यास त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर होतो. त्यामध्ये वाढ करायची असेल, तर ही प्रक्रिया पुन्हा पार पाडावी लागते. अलीकडे कैदी फरारी होण्याचा घटना वाढल्यामुळे गंभीर गुन्ह्यांत पॅरोल आणि फर्लोची सुटी देणे बंद केले आहे. फक्त विशेष सवलत म्हणून ही सुटी देण्याचे नियम करण्यात आले आहेत.

पोलिस उदासीन

तुरुंगातून सोडलेला कैदी फरारी झाल्यानंतर त्याचा शोध पोलिस घेत नाहीत. शिक्षा झालेल्या कैद्यांना रजेवर सोडतना तुरुंग विभागाकडून काळजी घेतली जात नसल्याचा आरोप पोलिसांकडून केला जातो. तुरुंग विभागाकडून फर्लो देताना पोलिसांच्या अहवालाचा आधार घेतला जातो आणि पॅरोल विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दिली जाते, असे सांगत तुरुंग प्रशासनाकडूनही जबाबदारी झटकण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्याला गुन्हेगारीचा विळखा

0
0

बंडू येवले, लोणावळा

मावळातील गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळे ही दारू, हुक्कापार्लर व मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन हुल्लडबाजी आणि धांगडधिंगा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर्यायाने परिसरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथील गड-किल्ले, लेण्या व पर्यटन स्थळांचा लौकिक आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. या परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यास आणि गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

लोणावळा आणि खंडाळा परिसराला निसर्गाचे वरदान लाभले असून, या ठिकाणांना ऐतिहासिक संदर्भही आहेत. येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे लेणी, शिवरायांनी उभारलेले विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड हे गड-किल्ले तसेच पवना, वलवण, लोणावळा, भुशी, उकसान, मळवंडीठुले, तुंगार्ली ही जलाशये, टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी (ड्युक्सनोज) ही ठिकाणी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायम पर्यटकांची गर्दी असते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी पर्यटक खरोखरीच निसर्गपर्यटनाचा आनंद घेत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मादक पदार्थांचे सेवन करून या ठिकाणी धांगडधिंगा घालणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व परिसरात दारूच्या पार्ट्या, हुक्का पार्ट्यांचे सर्रास आयोजन होते. भर गर्दीत हुक्का ओढणारी आणि गाडीतील साउंड सिस्टिमवर मोठ्या आवाजात गाणी लावून बेभानपणे नाचणारे पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्व ठिकाणी दारूच्या बाटल्या, काचांचा खच, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासचा खच पडलेला दिसतो. मात्र, या सर्व गोष्टींवर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही. मादक पदार्थांच्या अंमलाखालील तरुण मंडळी गैरप्रकार करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचे लोणावळा केंद्र बनत आहे.

पोलिस कारवाई करणार का?

काही दिवसांपूर्वी सिंहगड कॉलेजच्या श्रुती आणि सार्थक या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाली होती. ज्या पद्धतीने या दोघांची हत्या करण्यात आली ती पद्धत आणि या हत्येमागची कारणे अत्यंत धक्कादायक आहेत. त्यामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. श्रुती आणि सार्थक या दोघांचा जीव गेल्यावर या परिसरातील गैरव्यवहार समोर येत आहे. हुक्का पार्लरसह अनेक अवैध उद्योग चालणाऱ्या लोणावळ्यात यापुढे तरी कोणाचा जीव जाऊ नये असे वाटत असेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या दीड सेंटीमीटरची वनस्पती

0
0

पुणे : महाकाय खोड असलेली शेकडो वर्षे जुनी झाडे बघायला मिळतात, पण हाताच्या बोटाच्या पेरापेक्षाही लहान उंचीचे खोड असलेली वनस्पती कधी पाहिली आहे का...? जैववैविध्याने समृद्ध असलेल्या कोकणातील पठारावर ‘एरिओकोलॉन’ या वनस्पतीची देशातील उंचीने सर्वांत छोटी जात आघारकर संशोधन संस्थेतील वनस्पती अभ्यासकांनी शोधली आहे. या वनस्पतीची उंची अवघी दीड सेंटीमीटर आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील अभ्यासक कोकणातील पठारावर करीत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान देवगड ते मालवण रस्त्यांच्या पठारावर त्यांना एरिओकोलॉन या वनस्पतीची ही नवीन जात सापडली. संस्थेतील संशोधक अश्विनी दारशेतकर, डॉ. रितेशकुमार चौधरी, डॉ मंदार दातार आणि डॉ. शुभदा ताम्हणकर यांनी या वनस्पतीच्या अभ्यासावर आधारित शोधनिबंध नुकताच जागतिक कीर्तीच्या ‘फायटोटॅक्सा’ या रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. आघारकर संशोधन संस्थेमध्ये एका प्रकल्पाअंतर्गत एरिओकोलॉनच्या भारतभर आढळणाऱ्या जातींचा सविस्तर अभ्यास सध्या सुरू आहे.

‘संशोधनाच्या वेळी आम्हाला देवगड ते मालवण रस्त्यावरच्या पठारांवर ही वनस्पती आढळून आली. पठारांवर पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांच्या कडेला गवतांमधे आणि इतर वनस्पतींमध्ये ही एरिओकोलॉन वनस्पती वाढताना आढळली. तिची उंची अवघी दीड सेंटीमीटर आहे. वैशिष्ट्य म्हणजे भारतात सापडणाऱ्या खोड असणाऱ्या एरिओकोलॉनच्या जातींपैकी उंचीने ही सर्वांत छोटी जात आहे,’ असे डॉ. मंदार दातार यांनी सांगितले.

‘मानवी वस्त्यांमुळे वनस्पती नामशेष होतील’

सह्याद्रीमध्ये एरिओकोलॉन वनस्पतींच्या जाती पठारांवर आढळतात. या प्रजातींमधील काही जातींना स्थानिक लोक ‘धनगरी गेंद’ असे म्हणतात. कोकणामध्ये समुद्राजवळच अनेक पठारे किंवा सडे आहेत. या सड्यांवर आजपर्यंत अनेक नवनव्या वनस्पतींची नोंद झाली आहे. पण आजकाल काजू किंवा आंबा लागवडीसाठी व मानवी वस्तीसाठी ही पठारे बाधित झाली आहेत. त्यामुळे यावर वाढणाऱ्या अनेक वनस्पती, प्राण्यांच्या जाती नामशेष होतील, अशी भीती डॉ. मंदार दातार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी काळात वाहतुकीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर महामार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत येत्या शनिवारपासून मंगळवार (२० जून) पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

दोन्ही पालख्यांचे रविवारी (१८ जून) शहरात आगमन होणार आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर आकुर्डीपासून संपूर्ण पुणे-मुंबई रस्ता ते सीओईपी चौक या दरम्याचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आळंदीपासून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, दिघी मॅगझिन, म्हस्के वस्ती, कळस ओढा, विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज, सादलबाबा जंक्शन, संगमवाडी डीपी रोड, पाटील इस्टेट ते सीओईपी चौक हा रस्ता वाहतुकीला बंद राहील. रविवारी सायंकाळी संचेती चौकापासून जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने प्रस्थान करणार आहेत. या वेळेत सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

पालखी काळातील पर्यायी रस्ते

- सासवडकडे जाण्यासाठी : १. कात्रज, सातारा रस्त्याने कापूरव्होळ, नारायणपूरमार्गे सासवड. २. गोळीबार मैदान, कोंढवा, लुल्लानगर, बोपदेव घाट मार्गे सासवड.

- नगरकडे जाण्यासाठी : १. तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गे नगर. २. कापूरहोळमार्गे नारायणगाव, सासवड, जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला, कडेगाव, पारगाव न्हावरे गाव फाटा ते नगर रस्ता.

- सोलापूरकडे जाण्यासाठी : १. तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, केसनंद, कोलवडी, थेऊरमार्गे सोलापूर २. देहू फाट्यापासून कात्रज बायपासने कात्रज जकात नाका, सातारा रस्त्याने कापूरहोळमार्गे नारायणपूर, सासवड बाहेरून मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’च्या दरवाढीने पालकांवर आर्थिक ताण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पीएमपी’ने अचानक शालेय विद्यार्थी वाहतूक सेवेमध्ये केलेल्या शुल्कवाढीचे पडसाद गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. ‘पीएमपी’च्या अचानक भाडेवाढीमुळे पालकांवर आर्थिक ताण आल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, महापौर मुक्ता टिळक यांनी ‘पीएमपी’ला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना वेठीस न धरता बससेवा पूर्वीच्या दराने तातडीने सुरू करावी, अशी सूचना केली. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा न करता ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी परस्पर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

महापालिकेत गुरुवारी सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला शिवसेनेचे गटनेते संजय भोसले; तसेच विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी ‘पीमपी’ने केलेल्या भाडेवाढीच्या निर्णयावर चर्चेला सुरुवात केली. या निर्णयामुळे अनेक शाळांनी बससेवा नाकारली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचा दावा केला. या चर्चेदरम्यान सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि माजी महापौर, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत भाडेवाढीवर कुठलीही चर्चा न करता निर्णय घेतला कसा, असा प्रश्न उपस्थित केला.

महापौर मुक्ता टिळक यांनी त्यानंतर ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्टीकरण करण्यास सांगितले. ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना याबाबत फारसे काही सांगता न आले नाही. त्यानंतर महापौरांनी मुंढे यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. अनुदानाचा प्रश्न असेल, तर महापालिका तत्काळ सहकार्य करेल. परंतु, बससेवा पूर्ववत करा, असे सांगितले आहे. ‘पीएमपी’ने दरवाढीचा निर्णय ऐनवेळी घेतला आहे. त्यामुळे पालकांशी त्यावर कुठलिही चर्चा झालेली नाही. ‘पीएमपी’ने या दरवाढीबाबत फेरविचार करावा, अशी मागणी मुख्याध्यापिका संध्या माने, शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. सुनालिनी सत्तूर तसेच नगरसेविका अश्विनी कदम यांनी केली.

हा तर प्रशासकीय निर्णय : मुंढे

‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे म्हणाले, ‘शालेय वाहतूक सेवा ही विशेष सेवा आहे. हा प्रशासकीय निर्णय असून धोरणात्मक नाही. धोरणात्मक निर्णयासाठी संचालक मंडळाच्या मान्यतेची आवश्यकता असते. त्यामुळे शालेय वाहतूक सेवेची करण्यात आलेली भाडेवाढ हा पूर्णपणे प्रशासकीय निर्णय आहे. शालेय वाहतूक सेवेच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला आहे. वास्तविक पाहता शालेय वाहतूक सेवेसाठी बसला लागणाऱ्या वेळेत इतर सामान्य प्रवासी सेवेच्या तीन फेऱ्या होतात. त्या तीन फेऱ्यापैंकी सामान्य फेरीत ‘पीएमपी’ला मिळणारे उत्पन्न पाहता शालेय वाहतूक केल्याने दोन फेऱ्यांचे उत्पन्न बुडते. त्याचा विचार कुठेही ही भाववाढ करताना केलेला नाही. डेपो ते शाळा, शाळा ते डेपो हे अंतरही विनाउत्पन्न असल्याने साहजिकच त्याचा फटका पीएमपीला बसतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’ विरोधात व्यापाऱ्यांचा बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू व सेवा करामधून (जीएसटी) ब्रँडेड अन्नधान्य वगळण्याच्या मागणीसाठी ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’च्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील भुसार विभागाच्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर आणि लातूर शहरातील व्यापाऱ्यांनीही बंद पुकारला होता.

जीएसटीची एक जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर ब्रँडेड अन्नधान्यांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ने एका दिवसाचा बंद पुकारला होता. त्या संदर्भात मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यासंदर्भात नायब तहसीलदार शारदा खाडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, अशोक लोढा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते.

‘ब्रँडेड अथवा नॉन-ब्रँडेड शेतमाल ‘जीएसटी’तून वगळावा; आटा, रवा, मैदा, बेसन, मिरची, हळद, चिंच, खजूर, मणुके, सुट्टा चहा यांसारख्या वस्तू व व्हॅटमुक्त असलेल्या वस्तूही जीएसटीमधून वगळण्यात याव्यात. सुका मेव्यावरील पदार्थांसाठी सहा टक्के व्हॅट होता. तो आता १२वरून ५ टक्के करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. कर आकारणी करताना वस्तूंचे वर्गीकरण सोपे जावे. विविध अटींनुसार वेगवेगळे कर असू नयेत. जीएसटीचे जाचक नियम आणि कायदे वगळावेत. वीज, इंटरनेट, संगणक अशा सर्व सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय जीएसटीची आकारणी करू नये,’ अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोणावळ्याच्या विकासाला सहकार्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

‘लोणावळा-खंडाळा येथील पर्यटनस्थळांचा आराखडा तयार करताना तो जागतिक दर्जाचा करावा,’ अशी सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. ‘लोणावळ्यातील पर्यटनाच्या विकासासाठी नगर परिषदेला पूर्ण सहकार्य करू व लोणावळा हे पर्यटन शहर म्हणून नावारूपाला आणू,’ असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.

पर्यटन विकास व पावसाळ्यात लोणावळा येथे पर्यटकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लोणावळा नगर परिषदेतर्फे मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.

‘लोणावळ्यात सहा उद्याने असून त्यांचा विकास करावा, तुंगार्ली धरणाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करावा, पार्किंगची व्यवस्था तसेच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव पाठवा आणि कामांना सुरुवात करा, त्यासाठी निधी देऊ,’ असे आश्वासन असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पर्यटनाच्या दृष्टीने करावयाच्या विविध कामांसाठी आराखडा बनविण्यासाठी मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात येणार असून याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासह विविध सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

‘पर्यटकांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असून त्या दृष्टीने पोलिस विभागाने सुरक्षा यंत्रणा पुरवावी, तसेच पालिकेतर्फे त्यांना ५० सहायक पुरवावेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशीडॅमवर पालिकेतर्फे प्रशिक्षण देऊन लाइफगार्ड नियुक्त करावेत,’ अशा सूचनाही रावल यांनी दिल्या आहेत.

रात्री बारापर्यंत दुकाने सुरू

पर्यटकांच्या सोयीसाठी दुकाने रात्री १२पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मिळावी, अशी मागणी नगर परिषदेतर्फे करण्यात आली. यावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व या संदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भू-संपादनानंतर सहा वर्षांत विमानतळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी पुरेसा आहे. मात्र, त्यासाठी आधी भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली पाहिजे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी दिली.

केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या कामगिरीविषयक माहिती देण्यासाठी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पुरंदर येथे विमानतळ होण्याबाबतचे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. येथील जमीनधारकांपुढे भू-संपादनासाठी पर्याय ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सिन्हा यांनी केली. पुणे शहर आणि विमानतळ यामध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण केली पाहिजे. त्याबरोबरच महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून पुढील ५० वर्षांचा विचार करून या भागाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, देशातील सर्वच हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या नफ्यात आहेत. आता देशात ५०० व्यावसायिक विमाने आहेत. तर, कंपन्यांकडून नव्याने ८५० विमानांची मागणी करण्यात आली आहे. येत्या काळात देशात दर दीडशे किमी अंतरावर विमानतळ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी देशातील विमानतळांची संख्या दोनशेवर नेण्यात येणार आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबाबत विचार असता सिन्हा म्हणाले, ‘शेतीचा विकास आणि शेतीशी संबंधित सर्व निर्णयांची जबाबदारी राज्य सरकारची असून, त्यासाठी ते सक्षम आहे.’

‘नव्याने नियम करणार’

मेडिकल टुरिझम किंवा खासगी कारणास्तव हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अलीकडील काळात त्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबरोबरच दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर सुरक्षिततेच्या उपाय योजनांबाबत नव्याने नियम करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत सिन्हा यांना विचारले असता, त्यांनी हे सांगितले.

वाहतूक समस्येवर उपाय

पुणे शहराचा विकास झाला आहे. प्रत्येक घरामध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, त्यामुळे शहरात वाहतुकीची, प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व चांगले रस्ते यांसह विविध उपाय केले पाहिजेत, असे जयंत सिन्हा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेविना बजेट मंजूर

0
0

पिंपरी महापालिकेत विरोधकांचा सभात्याग
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गुरुवारी २०१७-१८ चे सुमारे चार हजार ८०५ कोटी रुपयांचे बजेट सुमारे २० मिनिटांत मंजूर करण्यात आले. चर्चा करू न दिल्याच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी सभात्याग करीत हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त टीका केली.
महापालिकेच्या २०१७-१८ चे बजेट स्थायी समितीने एप्रिलमध्येच मंजूर केले. त्यानंतर पावणेदोन महिन्यांनी बजेट मंजुरीसाठी विशेष सभा घेतली. परंतु, केवळ १५ ते २० मिनिटांत बजेट मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चर्चा गुंडाळल्याचा आरोप करीत सभात्याग केला. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी बजेटचे सादरीकरण केले. त्यानंतर नामदेव ढाके यांनी बजेटला मंजुरी देण्याची सूचना मांडली. त्यास सुजाता पालांडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर काळजे यांनी लगेचच बजेटला मंजुरी दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी संताप व्यक्त केला. साटेलोट्याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे एवढ्या उशिरा अर्थसंकल्प आणला आहे काय? चर्चा न करताच अर्थसंकल्पाला मंजुरी कशी दिली जाते? भाजप चुकीची प्रथा पाडत आहे. चुकीच्या पद्धतीने बजेट आणले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
यानंतर बहल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘हा दिवस पालिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना आम्ही सभागृहात १७ ते १८ तास चर्चा केली आहे. परंतु, कधी हेकेखोरपणा केला नाही. परंतु, भाजपने पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन लोकशाहीचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. काही मिनिटांत बजेट मंजूर करणे म्हणजेच भाजपची पारदर्शकता आहे काय? यामागील गौडबंगाल काय आहे? तेच समजत नाही. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि सभेत मांडलेल्या बजेटमध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनेक योजनांचा समावेश बजेटमध्ये काल आहे. त्यात नावीन्य नाही.’
शिवसेनेचे शहरप्रमुख आणि गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘बजेटवर सभागृहात सविस्तर चर्चा करायची होती. परंतु, भाजपने दादागिरी करीत चर्चा करण्याची संधी न देता बजेटला मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. स्थायीच्या विद्यमान अध्यक्षा सावळे विरोधात असताना चर्चेसाठी आग्रही असायच्या. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अर्थसंकल्पावर बोलू न देणे म्हणजे मस्तवालपणाच म्हणता येईल.’
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘हुकूमशाही मार्गाने केवळ १८ मिनिटांत बजेट मंजूर केले आहे. बजेटला विरोध नव्हता. परंतु, चर्चा न करताच ते मंजूर केल्याचा आम्ही निषेध करतो.’
आर्थिक शिस्त लावल्याचा भाजपचा दावा
सत्ताबदल झाल्यानंतर भाजपने पहिल्याच बजेटमध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सभेत बजेट मांडल्यानंतर त्यावर विरोधकांनी बोलण्याची परवानगी न मागितल्यामुळे मंजुरी दिली, असा दावा भाजपने केला आहे. बजेट सादर केल्यानंतर कोणतीही उपसूचना दिल्या नाहीत. त्यामुळे भाजपने आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विरोधकांनी बजेटवर बोलण्याची कोणतीही परवानगी मागितली नाही. त्यामुळे महापौर काळजे यांनी बजेटला मंजुरी दिली.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी बजेटवर चर्चा केली. बोलू दिले नाही म्हणून सभात्याग करणे म्हणजे स्टंटबाजी असल्याचा दावा नगरसेविका आशा शेंडगे यांनी केला. बजेट सर्वसमावेशक असल्याचे मत भाजपच्या नगरसेविका माया बारणे, माई ढोरे, अंबरनाथ कांबळे, विकास डोळस, शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’च्या मदतनिधीचा प्रस्ताव तहकूब

0
0

प्रश्नावलीची उत्तरे मिळेपर्यंत स्थायी समितीची भूमिका
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या समस्येसंदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीने ‘पीएमपी’ला प्रश्नावली पाठविली आहे. त्याची उत्तरे येईपर्यंत ‘पीएमपी’ला मदतनिधी न देण्याची भूमिका समितीने घेतली आहे. तोपर्यंत सदरचा प्रस्ताव पुन्हा एकदा तहकूब ठेवण्यात आला आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शैक्षणिक सहलीचे बील ‘पीएमपी’ला देण्याचा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आहे. सुमारे सोळा लाख रुपये देण्याचा विषय समितीसमोर चर्चेला आल्यानंतर सदस्यांनी ‘पीएमपी’कडून पिंपरी-चिंचवडला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आणि प्रस्ताव तहकुबीचा निर्णय घेतला.
बैठकीला अधिकार नसलेले अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. याबाबत तक्रारी केल्यानंतर जोपर्यंत ‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे सभेस उपस्थित राहणार नाहीत तोपर्यंत विषय मंजूर करायचा नाही, अशी भूमिका अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली होती. मात्र, यावरून मुंढे आणि सावळे यांच्यात जुंपली होती. मुद्दा प्रतिष्ठेचा झाल्यामुळे ‘पीएमपी’चे उपमुख्याधिकारी डी. जी. मोरे आणि नितीन घोगरे उपस्थित होते.
संचलन तुट कशामुळे, पिंपरीतील रूट का बंद केले याची कारणे, विलीनीकरणापूर्वी कोणाच्या किती बस होत्या, पिंपरीतील वर्कशॉप बंद करण्याचे कारण काय, पिंपरी-चिंचवड परिसरात महिलांसाठी बस का सुरू केल्या नाहीत, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, संबंधित अधिकारी निरूत्तर झाले आणि माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना लेखी प्रश्नावली देण्यात आली. त्याची उत्तरे येत्या २८ जूनपर्यंत द्यावीत, तोपर्यंत विषय तहकूब ठेवण्यात आल्याचे सावळे यांनी सांगितले.
00
पिंपरी-चिंचवडमधून कररूपातून ‘पीएमपी’ला चाळीस टक्के अनुदान देते. मात्र, त्या तुलनेत सार्वजनिक बस सुविधांबाबत अन्याय होत आहे. तुकाराम मुंढे हे कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी बैठकीस उपस्थित राहून पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. प्रश्न सुटेपर्यंत अनुदान देणार नाही.
- सीमा सावळे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्लास्टिकमुक्त वारी’साठीजिल्हा प्रशासन प्रयत्नशील

0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
पालखी सोहळा मुक्कामी असणाऱ्या गावात रोगराई पसरू नये, यासाठी त्या गावच्या प्रत्येक ग्रामपंचायतींनी व आरोग्य विभागांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच वारी दरम्यान वापरून फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पत्रावळ्यांमुळे कचऱ्याची समस्याही मोठी असते. वारी दरम्यान प्रदूषण आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी संबधित ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात आणि यंदाची वारी प्लास्टिकमुक्ती वारी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जगद्‍गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळा (१६ व १७ जून) देहू व आळंदीहून प्रस्थान करणार आहेत. या पालखी सोहळ्याची पुणे जिल्ह्यातील आढावा बैठक दौंड तालुक्यातील यवत येथे गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी देसाई बोलत होते.
या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे, दौंड तालुका आरोग्य अधिकारी अशोक राजगे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अनिल बडे, जि. प. सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य निशा शेंडगे, यवतच्या सरपंच रजिया तांबोळी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव, बाबा मुलाणी, तसेच लोणी काळभोर, यवत, वाल्हे, इंदापूर, बारामती आदी ठिकाणचे आरोग्य, पाणीपुरवठा विभाग, विद्युत वितरण व आदी विभागांचे आधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘वारी दरम्यान आरोग्यविभागाने दूषित आणि पिण्यास अयोग्य असणाऱ्या पाणीसाठ्याजवळ त्याबाबतच्या सूचना लिहाव्यात. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ‘महावितरण’ने प्रयत्नशील राहावे, तसेच वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images