Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर कारवाई

$
0
0

पालिका धोरण आखणार असल्याची सहआयुक्तांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने कचऱ्यासाठी बादल्या आणि पिशव्यांचे वाटप करूनही त्याचा वापर होत नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची मागणी करणारा ग्राहक, विकणारा व्यापारी आणि उत्पादन करणारे कारखाने या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत महापालिकेकडून दंडात्मक कारवाई न करता ग्राहक व व्यापारी यांचा विचार करून उपाययोजना व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसह संयुक्त बैठक घेतली. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, उपाध्यक्ष सुनील गेहलोत आदी या वेळी उपस्थित होते.
‘प्लास्टिक पिशव्यांवर उपाय योजनांबाबत आऱाखडा तयार कऱण्यात आला आहे. ग्राहक, व्यापारी, किंवा अधिकारी यांनी एकमेकांवर आरोप करून प्रश्न सुटणार नाही. प्लास्टिक पिशव्याबाबत उपाय योजनांना सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन जगताप यांनी केले. ‘शहरात प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आणण्यासाठी व्यापाऱ्यांचे वजनकाटे उचलणे, उद्धट बोलणे, जबरदस्तीने पावती फाडणे अशी कारवाई महापालिका अधिकाऱ्यांकडून होत आहे,’ अशी खंत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनने व्यक्त केली.
महापालिकेने ठरविलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन आम्हीही करु, असा विश्वास पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आला. महापालिकेने स्टिकर्स स्वरूपात नोटिसा लावून ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिक निर्बंधाबाबत जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गोवा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश ही राज्ये प्लास्टिकमुक्त झाली आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रही प्लास्टिकमुक्त करूया. यासाठी सर्व व्यापारी, प्रशासनासोबत आहेत. परंतु, या संदर्भात सरकार व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारताला नेतृत्व करण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी भारताला सध्या सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात सध्या मोठी क्षमता आहे. अमेरिका ही जगातील मोजक्या श्रीमंत व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन होती. आता मात्र, भारत हा जगातील उर्वरित सहा अब्ज व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन बनेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी व्यक्त केला.

पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसीतर्फे आयोजित ‘इट्स इंडियाज टर्न नाऊ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबाने आदी या वेळी उपस्थित होते. पीआयसीच्या ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील धोरण पत्रिकेचे अनावरणही सिन्हा यांच्या हस्ते झाले.

‘भारताला सध्या लोकसंख्येचे वरदान (डेमोग्राफिक डिव्हिडंड) लाभले आहे. त्याचबरोबर देशात तीस वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार सत्तेवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात एका पक्षाचे बहुमत आल्याने विकासाला चालना मिळाली आहे. या आधी मायबाप सरकार अशी सरकारची प्रतिमा होती. मोदी सरकारने मात्र, ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स’ हे सूत्र अंगिकारले आहे,’ असेही सिन्हा म्हणाले.

वाहतूक कोंडीचा अनुभव

‘पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल मी खूप काही ऐकून होतो. आज, मी एका अपघातासह त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुण्यातील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. बेंगळुरूमधील वाहतूक कोंडी सर्वांत जास्त असते. पुण्याची वाटचालही त्या दिशेने होत आहे,’ असे जयंत सिन्हा म्हणाले. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामांचे नाते विकासाशी जोडले. विकासकामे सुरू असल्यानेच वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगताच खसखस पिकली.

सिन्हा यांच्या गाडीला अपघात

या कार्यक्रमासाठी जयंत सिन्हा येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास रेंजहिल्स चौकात सिग्नल लागल्यामुळे त्यांची कार सिग्नलवर उभी होती. तर, त्यांच्या कारमागे अभिजीत बल्लाण (रा. पुणे) यांची होंडा सिटी कार उभी होती. त्या वेळी पाठीमागून आलेला कारचालक विनोदकुमार सुरेंद्रसिंग याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने बल्लाण यांच्या कारला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, बल्लाळ यांची होंडा सिटी कार पुढे उभा असणाऱ्या जयंत सिन्हा यांच्या कारवर जाऊन आदळली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात तीन कारचे किरकोळ नुकसान झाले. जोरदार धक्क्याने सिन्हा गाडीच्या डॅशबोर्डवर आदळले. मात्र, तेथून ते तातडीने कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करणाऱ्या कॉलसेंटरचा पर्दाफाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जॉब पोर्टलच्या नावाखाली तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्ली येथील कॉल सेंटरचा सायबर सेलच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
अंकित सतीशकुमार सेहगल (२७, रा. जगतपरी, दिल्ली), चंदनकुमाप महेंद्र साहा (वय २६, मयूर विहार दिल्ली),उमेश विजय कुमार (वय ३०,रा. मयूर विहार, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील तरुणाला दिल्ली येथून फोन आला. एका नामांकित कंपनीच्या जॉब पोर्टलवर सीनियर एच आर हेड बोलत असल्याचे सांगून कतार येथे सोळा लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याला सिक्युरिटी डिपॉझिट व इतर कारणे सांगून एक लाख २६ रुपये खात्यावर जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित हे दिल्लीतून रॅकेट ऑपरेट करत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने दिल्ली येथील लक्ष्मीनगर येथे आरोपी चालवत असलेल्या कॉलसेंटरवर छापा टाकला. तेथून पाच सीमकार्ड, दोन वॉकीटॉकी, डेबिट कार्ड, डोंगल, अकरा डेबिटकार्ड, सात मोबाइल जप्त करण्यात आले.त्यांना दिल्ली येथील कोर्टात हजर करून प्रवासाची कोठडी घेण्यात आली.
नऱ्हे येथे राहणाऱ्या एका तरुणाची अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन १८ हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याचा तपास करताना सायबर गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील कॉलसेंटरवर धाड टाकून योगेंद्र श्रीरामकिशन शर्मा (किर्ती नगर दिल्ली) याला अटक केली. त्याच्याकडून हँडसेट, सिमकार्ड, बँकेचे डेबिट कार्ड, चेकबुक जप्क केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा समित्या भाजपच्या ताब्यात

$
0
0

‘एमआयएम’ने साधली भाजपशी जवळीक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रभाग समितींच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अकरा समित्यांवर भाजपने बाजी मारली. तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर, एका ठिकाणी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले होते.
येरवडा-कळस-धानोरी प्रभाग समितीच्या निवडणुकीत ‘एमआयएम’ने तटस्थ न राहता भाजपला मतदान केल्याने शिवसेनेची संधी हुकली. महापालिकेतील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. भाजपविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचे चित्र महापालिकेत पुन्हा एकदा दिसले. पंधरा पैकी सहा प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यापैकी पाच प्रभाग समित्या भाजपला तर, उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला मिळाली होती. उर्वरित नऊ प्रभाग समित्यांसाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सहा ठिकाणी भाजप, दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर एका
ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.
येरवडा-कळस-धानोरी या प्रभागात भाजप विरोधात सर्व विरोधक एकवटले होते. ‘एमआयएम’ वगळता भाजप आणि विरोधकांची संख्या समसमान होती. एमआयएम’ने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर चिठ्ठी टाकून निवडणूक पार पडली असती. मात्र, ‘एमआयएम’ने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने समितीवर भाजपच्या किरण जठार निवडून आल्या. ढोले पाटील प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान केले. या ठिकाणी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांची मते समसमान होती. मात्र, उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त होऊन भाजपच्या मतदानात घट झाली. त्याचा फायदा काँग्रेसने उचलला. यापुढील निवडणुकीत अध्यक्षांचे अतिरिक्त मत ग्राह्य धरण्यात येऊ लागले तर पुढील काळात या प्रभाग समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहू शकेल.

प्रभाग समिती-अध्यक्ष
१) औंध-बाणेर - विजय शेवाळे (भाजप)
२) शिवाजीनगर-घोले रोड - आदित्य माळवे (भाजप)
३) सिंहगड रोड - श्रीकांत जगताप (भाजप)
४) वानवडी-रामटेकडी - परवीन हाजी फिरोज (राष्ट्रवादी काँग्रेस)
५) कोंढवा-येवलेवाडी - रंजना टिळेकर (भाजप)
६) कसबा-विश्रामबाग - राजेश येनपुरे (भाजप)
७) बिबवेवाडी - मानसी देशपांडे (भाजप)
८) नगर रोड-वडगाव शेरी - शीतल शिंदे (भाजप)
९) येरवडा-कळस - किरण जठार (भाजप)
१०) ढोले पाटील - चाँदबी हाजी नदाफ (काँग्रेस)
११) कोथरूड-बावधन - दिलीप वेडे पाटील (भाजप)
१२) धनकवडी-सहकारनगर - अश्‍विनी भागवत (राष्ट्रवादी काँग्रेस)
१३) वारजे-कर्वेनगर - सुशील मेंगडे (भाजप)
१४) हडपसर-मुंढवा - योगेश ससाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
१५) भवानी पेठ - अजय खेडेकर (भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटवे यांची भावगीते ही धनदौलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी आता ९५ वर्षांचा आहे. मी शाळेत असतानाची गोष्ट आहे, म्हणजे खूप पूर्वीची. माझ्या भावे हायस्कूलने स्नेहसंमेलनात गजाननराव वाटवेंचा कार्यक्रम आयोजिला होता. एका मित्राने विचारले की, ‘तुला माहितीय का यांना शाळेने किती मानधन दिले ते,’ मला वाटले दहा-पंधरा रुपये असेल; पण तो म्हणाला, ‘शंभर रुपये मानधन दिले आहे.’ पुणेकरांनी त्या काळात दिलेले एवढे मानधन हा माझ्यासाठी धक्काच होता. गजाननरावांच्या अलौकिक प्रतिभेने हा धक्का दिला होता...’ ऐरवी आपल्या शिवशाहिरीतून अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी सोमवारी हा किस्सा सांगून पुणेकरांची फिरकी घेतली अन् पावसाळी वातावरणात हास्याचा स्फोट झाला.

मराठी भावगीताचे युगनिर्माते काव्यगायक गजाननराव वाटवे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे ‘गजाननराव वाटवे पुरस्कार’ प्रसिद्ध गायक-संगीतकार श्रीधर फडके यांना बाबासाहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे, वाटवे यांच्या कन्या मंजिरी चुनेकर उपस्थित होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात खुमासदार किस्से सांगत रसिकांना पोट धरून हसवले.

‘भारावून टाकणे म्हणजे काय प्रकार असतो ते गजाननरावांमुळे प्रत्ययाला आले. त्याच स्नेहसंमेलनात गजाननरावांचे गाणे पहिल्यांदा ऐकायला मिळाले. त्यांचे गाणे ऐकणे हा काही वेगळाच आनंद होता. गजाननराव, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, गदिमा, शांता शेळके यांची प्रतिभा खूप अलौकिक होती. अलीकडच्या पिढीला किरकोळ गाणी ऐकण्याची सवय झाली आहे. चांगली गाणी काय असतात, ती या प्रतिभावंताकडे पाहिले, की कळेल. भाव काळजापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य भावगीतांमध्ये आहे. भावगीते ही धनदौलत आहे,’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी संगीताचा सुवर्णकाळ आपल्या वाणीतून उभा केला.

‘वाटवेंनी माझे भावविश्व समृद्ध केले आहे. असंख्य गोड गाणी आणि चाली त्यांनी दिल्या. त्यांच्या चाली हा अभ्यासाचा विषय आहे. शब्दांना नेमके स्वर कसे येतात, हा नेहमी संशोधनाचा विषय आहे. माझ्यावर बाबूजींसह मागच्या पिढीतील सर्व कलाकारांचे संस्कार आहेत,’ अशी भावना फडके यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात ‘निरांजनातील वात’ हा वाटवे यांच्या अजरामर रचनांचा कार्यक्रम प्रमोद रानडे, अपर्णा संत, कविता जांभेकर यांनी सादर केला. अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेमघरच्या कंत्राटदारांवर दावा दाखल

$
0
0

जलसंपदा मंत्र्यांची माहिती; नवे टेंडर १०० कोटींचे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘टेमघर धरणाचे काम केलेल्या हैदराबाद येथील श्रीनिवासन आणि प्रोग्रेसिव्ह या जुन्या कंत्राटदारांविरूद्ध राज्य सरकारने हायकोर्टात ७०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला आहे. धरणदुरुस्तीचे काम औरंगाबाद येथील एसएसपीएल या कंपनीला देण्यात आले असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे,’ असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
‘या धरणाची सुमारे ३० टक्के दुरुस्तीची कामे झाली असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी यंदा १५ ऑक्टोबरपासूनच धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. एक जानेवारी २०१८ पर्यंत धरण पुन्हा रिकामे करून उर्वरित कामे पूर्ण केली​ जाणार आहेत,’ असेही महाजन म्हणाले.
धरणाच्या कामाची पाहणी सोमवारी महाजन यांनी केली. या वेळी जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे, पाटबंधारे खात्याच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी बोलभट, भामा आसखेड धरणाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. प्रदक्षिणे, गुणनियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप तवार, शाखा अभियंता सुधीर अत्रे आदी उपस्थित होते. धरणाची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. महाजन म्हणाले, की या धरणाची गळती सुरू झाल्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी जुन्या कंत्राटदारांना नोटिसा देण्यात आल्या होत्या; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नवीन कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यात येत आहे.
‘गळतीची कामे पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. या धरणाची​ लांबी एक हजार ७५ मीटर आहे. त्यापैकी ३०० मीटर लांबीचे काम करण्यात आले असून, जूनअखेर आणखी ३०० मीटरचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित कामे करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून या धरणातील पाणी सोडण्यास सुरवात केली जाणार आहे,’ असे महाजन म्हणाले. सध्या ड्रिलिंग आणि ग्राउटिंगचे काम करण्यात येत आहे. मोनोलिथ क्रमांक आठ ते १३ मध्ये सुमारे ८८ टक्के ड्रिलिंगचे काम झाले आहे. सुमारे ७२ टक्के ग्राउटिंगचे काम पूर्ण झाले आहे. मोनोलिथ क्रमांक १४ मध्ये सुमारे ८५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. ऊर्ध्व बाजूस मोठ्या प्रमाणात पोकळी असलेले बांधकाम आहे. त्या बांधकामामधून गळती होत असल्याने जीपी-२ या रेडिमिक्स मॉर्टरने पोकळी भरण्यात येत आहे. धरणमाथा, इन्स्पेक्शन गॅलरी, तळातील गॅलरी, उर्ध्व बाजू व अधोबाजू येथून ग्राउटिंग करण्यात येत आहे. ग्राउटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील हंगामात ऊर्ध्व बाजूकडून पाण्याची गळती रोखण्यासाठी संधानकाचा लेप लावण्यात येणार आहे,’ असे महाजन यांनी स्पष्ट केले. ही कामे तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार करण्यात येत आहेत. दुरुस्तीच्या कामांची परिणामकारकता तपासण्यासाठी स्वतंत्र पॅनल ऑफ एक्सपर्ट नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये केंद्रीय जल आयोग, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश आहे. धरणाच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची चाचणी नामांकित प्रयोगशाळांमधून करण्यात येत आहे, असेही मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले.

कर्जमाफी समितीची लवकरच बैठक
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे निकष निश्चित करण्यासाठी याबाबतच्या समितीची लवकरच बैठक होणार आहे. कोट्यवधी रुपये कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याची गरज नाही. सांगली, कोल्हापूर भागांत काही मोठ्या शेतकऱ्यांनी कोटींमध्ये कर्ज घेतले आहे, असे महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा निकाल ८८.७४ टक्के

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८८.७४ टक्के लागला असून मुलींनी यंदाही बाजी मारली आहे.

विद्यार्थ्यांना आपला संपूर्ण निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.

www.maharesult.nic.in या लिंकवर विद्यार्थ्यांना आपला निकाला पाहता येणार आहेच, पण 'नो यूवर रिझल्ट'च्या खालील बॉक्समध्ये आवश्यक माहिती भरूनही विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्यास अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अत्रे यांच्या बंगल्यातून त्याने मोबाईल चोरले होते.

जंगली महाराज रस्त्यालगत अत्रे यांचा बंगला आहे. तेथे त्यांच्या ‘स्वरमयी गुरुकुल’ या संस्थेतर्फे अभिजात संगीताचे वर्ग घेण्यात येतात. त्यांच्या बंगल्यात सध्या कोणी राहायला नाही. या बंगल्याच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी तेथे ठेवलेले मोबाईल संच लांबविले होते. ही घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. पोलिसांकडून अत्रे यांच्या बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस आरोपीच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकमेव भारतीय ‘क्लिक’

$
0
0

आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त ब्रिटीश स्ट्रीट फोटोग्राफर डेव्हिड गिब्सन याच्या यावर्षी प्रकाशित झालेल्या ‘१०० ग्रेट स्ट्रीट फोटोग्राफ्स’ या पुस्तकात विविध देशांतील १०० छायाचित्रांचा समावेश आहे. त्यात स्वप्नील जेधे या पुण्यातील फोटोग्राफरच्या छायाचित्रानं स्थान मिळवलंय.

प्रसिद्ध ब्रिटीश स्ट्रीट फोटोग्राफर आणि फोटोग्राफीविषयक लेखक डेव्हिड गिब्सन यानं ‘१०० ग्रेट स्ट्रीट फोटोग्राफ्स’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यात जगभरातील वेगवेगळ्या देशांतील १०० छायाचित्रांचा समावेश आहे. गेल्या १० ते १५ वर्षांतील महत्त्वाचे १०० स्ट्रीट फोटो या पुस्तकात आहेत. त्यात जगभरातील १०० फोटोग्राफरचा प्रत्येकी एक फोटो आहे. त्यात भारतातील एकमेव स्ट्रीट फोटोग्राफरच्या छायाचित्राचा समावेश आहे, तो म्हणजे पुण्याचा स्वप्नील जेधे.

पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेणाऱ्या स्वप्नीलला छायाचित्रणाच्या आवडीनं कॉलेजमध्ये असतानाही स्वस्थ बसू दिलं नव्हतं. त्यानं याच दरम्यान व्यावसायिक छायाचित्रण करायचं ठरवलं. कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षांत त्यानं जाहिरातींसाठीचं छायाचित्रण आणि फॅशन फोटोग्राफी केली. याच दरम्यान ग्राफिक डिझायनिंगही सुरू झालं. अगदी सुरुवातीचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्यानं सुरू केलेल्या ग्राफिक डिझायनिंगमधूनच तो एका जाहिरात कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून गेली नऊ वर्षं काम करतो आहे.

हे सुरू असतानाच पाच वर्षांपूर्वी, साधारण २०१२ साली त्याच्या मनातील फोटोग्राफीच्या आवडीनं पुन्हा उचल खाल्ली. मग त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या ‘निकॉन डी टू १००’ या कॅमेऱ्यावर त्यानं छायाचित्र टिपायला सुरुवात केली. आठवड्याच्या अखेरीस बाहेर पडून फक्त पुण्यातील गल्ली-बोळांतून त्यानं हिंडणं सुरू केलं. तिथल्या माणसांचं आयुष्य, त्यांची दैनंदिन कामं यांची छायाचित्रं तो टिपू लागला. तिथेच त्याच्या ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यानंतर त्यानं ‘डी ६१०’ हा कॅमेरा घेतला. २०१५ पर्यंत वीकेंडला कॅमेरा घेऊन बाहेर पडणं स्वप्नीलनं सुरू ठेवलं आणि अनेक जिवंत आयुष्यं टिपली. याच दरम्यान त्याच्या पाहण्यात ‘दॅट्स लाइफ’ नावाची वेबसाइट आली. यात भारतीय स्ट्रीट फोटोग्राफर्सच्या छायाचित्रांचा संग्रह आहे. तिथून स्वप्नीलला अधिक मार्गदर्शन मिळालं आणि त्या प्रेरणेतून त्यानं हैदराबादच्या ‘इंडिया फोटो फेस्ट’मधील समूह छायाचित्र प्रदर्शनातील छायाचित्रानं प्रदर्शन गाजवलं.

जगभरात मान्यताप्राप्त असलेल्या मियामी स्ट्रीट फोटोग्राफी फेस्टिव्हलमध्ये २०१५ या वर्षी त्याच्या छायाचित्रानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वप्नीलनं यासाठी तीन छायाचित्रं पाठवली होती. त्यातील गिब्सन यांनी निवडलेलंच छायाचित्र इथंही प्रथम क्रमांकासाठी निवडलं गेलं. इथल्या निवडीचा स्वप्नीलला जगभरातील फोटोग्राफर्सपर्यंत पोहोचण्यासाठी तर फायदा होतो आहेच; शिवाय ऑनलाइन प्रदर्शनाबरोबरच मोठमोठ्या स्ट्रीट फोटोग्राफी फेस्टिव्हल्समधूनही त्याची छायाचित्रं प्रदर्शित केली जात आहेत. स्वपन पारेख, प्रशांत गोडबोले (भारत), मॅट स्टुअर्ट (लंडन) यांसारख्या ज्या लोकांना स्वप्नील मानतो, त्यांच्यापर्यंत या पारितोषिकांच्या निमित्तानं त्याचं काम पोहोचत असल्याचं आणि फोटोग्राफीतील दिग्गजांशी थेट संवाद साधता येत असल्याचाही त्याला आनंद आहे. वाराणसी, कोलकाता, राजस्थान यांसारख्या देशातील महत्त्वाच्या शहरांत फिरून स्वप्नीलला स्ट्रीट फोटोग्राफी करायची आहे. या स्वप्नासाठी त्याचा प्रयत्नही सुरू आहे.



निवडलं गेलेलं छायाचित्र अॅक्शन पॅक्ड आहे. सावली आणि प्रत्यक्षातील संबंधांमुळे तिथं वेगळेपणा दिसतो; म्हणूनच जगभरातील १०० सर्वोत्तम स्ट्रीट फोटोग्राफ्समधून भारतातील एकमेव फोटो, तोही मी काढलेला निवडला जावा यासारखा दुसरा आनंद नाही.

- स्वप्नील जेधे, स्ट्रीट फोटोग्राफर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑल द बेस्ट... इथे पाहा दहावीचा निकाल

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्याचा दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला असून दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळासोबतच इतरही काही वेबसाइट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उपलब्ध होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी वेबसाइट्स

www.maharesult.nic.in

www.sscresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.knowyouresult.com

www.rediff.com/exams

www.jagranjosh.com

www.maharesult.nic.in या वेबसाइटवर निकालासोबत सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

'नो यूवर रिझल्ट'च्या खालील बॉक्समध्ये आवश्यक माहिती भरून आपण आपला निकाल पाहू शकाल.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट क्षेत्रात भाजपचा ‘प्रवेश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र, विविध राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळविल्यानंतर भाजपने आता चित्रपट क्षेत्रातही ‘प्रवेश’ केला आहे. राजकीय पक्षाची चित्रपट शाखा म्हटले, की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष डोळ्यापुढे येतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्ष संघटना या क्षेत्रात फारशा क्रियाशील नसल्याने भाजपने ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’ काढून थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे. भाजपप्रमाणे या संघटनेतही जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.

भाजपने देशात यश मिळविल्यानंतर विविध क्षेत्रांत पक्षाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. त्याप्रमाणे चित्रपट क्षेत्रातही भाजपने प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’ स्थापन करण्यात आली असून ती भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीशी संलग्न करण्यात आली आहे. चित्रपट कामगार आघाडीची मुंबईत स्थापना झाल्यानंतर नुकतीच पुण्याचीही शाखा सुरू झाली आहे. यामध्ये पुण्यातील अनेक कलाकारांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रात शिवसेना व मनसे यांच्या संघटनांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे पक्ष चित्रपट क्षेत्रात फारसे क्रियाशील नाहीत. चित्रपट क्षेत्रातही शाखा सुरू करून भाजपने शिवसेना व मनसे यांना धक्का दिला आहे. या पक्षांचे चित्रपट क्षेत्रातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

भाजप चित्रपट कामगार आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. करमणूक, कला या क्षेत्रासाठी असलेल्या सरकारच्या सवलतींचा प्रसार व प्रचार करणे, कलाकारांना व्यासपीठ; तसेच विविध प्रकारची मदत मिळवून देणे हा कामाचा अजेंडा ठरविण्यात आला आहे. केवळ चित्रपट नाही, तर नाटक, दूरचित्रवाणी, विविध कला यांसाठी ही आघाडी काम करणार आहे.

संतोष चोरडिया, शहर उपाध्यक्ष, भाजप चित्रपट कामगार आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काश्मिरींचे भारतावरील प्रेम कमी झाल्याची स्थिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारत-पाकिस्तान यांच्या युद्धात आणि त्यानंतरही काश्मिरी जनता भारताबरोबर होती. मधल्या काळात काश्मिरींचे भारतावरील प्रेम कमी झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या स्थितीची कारणे शोधण्याची गरज असून काश्मीरमधील परिस्थिती आणखी बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,’ अशा शब्दांत काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक संजय नहार यांनी काश्मीर प्रश्नावर भीती व्यक्त केली. ‘काश्मिरी जनता ही भारताची आहे, ही भावना रुजविण्यात सगळेच राजकीय पक्ष आणि संघटना अपयशी ठरल्या आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

‘अक्षर मानव’तर्फे आयोजित ‘काश्मीरचे प्रकरण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अक्षर मानवचे संस्थापक राजन खान, अनुवादक प्रशांत तळणीकर उपस्थित होते. नहार यांनी काश्मीर प्रश्नाचा वेध घेत तेथील परिस्थितीचे विश्लेषण केले. नहार म्हणाले, ‘काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे स्वरूप वेगवेगळे आहे. काश्मीर विरूद्ध जम्मू, काश्मीर विरुद्ध भारत, भारत विरुद्ध पाकिस्तान अशा वेगवेगळ्या संघर्षाची किनार त्याला आहे. या सगळ्या संघर्षांमुळे काश्मिरी माणसाची सगळ्यात जास्त कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी काश्मीर प्रश्न नेमका काय आहे, हे समजून घेऊन काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबत एक दीर्घकालीन धोरण ठरविणे, हेच भारताच्या फायद्याचे आहे.’

नहार म्हणाले, ‘काश्मिरी जनता ही भारताची आहे, अशी भावना रुजविण्यात सगळेच राजकीय पक्ष आणि संघटना अपयशी ठरल्या आहेत. मधल्या काळात दुभंगलेली आणि काश्मिरींना उर्वरित भारतीयांशी जोडण्याची प्रक्रिया माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केली. भावनिकदृष्ट्या काश्मीरशी भारताचे नाते त्यांच्यामुळे जास्त मजबूत होण्यास मदत झाली.’

नहार म्हणाले, ‘आपला देश हे एक कुटुंब आहे. काश्मिरी हे याच कुटुंबाचे सदस्य आहेत. तेही आपल्या देशाच्याच कुटुंबाचे घटक आहेत, भारतीयांना काश्मिरी आपले वाटले पाहिजेत, या बाजूने काही गोष्टी घडायला हव्यात. काश्मिरी माणूस हा खूप छोट्या गोष्टींनी खूश होतो आणि छोट्या गोष्टींनी दुखावतोही. काश्मीर प्रश्नाचे उत्तर शोधताना काश्मिरी माणसाचा स्वभाव लक्षात घ्यायला हवा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काष्ठशिल्प’मुळे कलेचे जतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चारूहास पंडित यांनी रंग न वापरता झाडांच्या सालींपासून विकसित केलेला काष्ठशिल्प प्रकार आणि त्याला दिलेली लेझर तंत्रज्ञानाची जोड यामुळे कला-संस्कृतीचे जतन, संवर्धन होण्यासोबतच त्या समृद्ध परंपरेचा कलेच्या माध्यमातून प्रभावी पद्धतीने प्रचार-प्रसार होईल,’ असा आशावाद ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केला.

पंडित यांच्या प्रयोगाला सलाम करण्यासाठी ‘रोटरी कल्ब ऑफ पुणे’ पर्वतीतर्फे त्यांना फडणीस यांच्या हस्ते व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अध्यक्ष चंद्रकांत जगताप, स्वानंद समुद्र, रामचंद्र शेट्ये आणि प्रकाश पायगुडे उपस्थित होते.

‘पंडित यांनी संशोधनातून विकसित केलेले काष्ठशिल्प त्यांच्यातील कलात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे. या कलेच्या माध्यमातून संस्कृतीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम पद्धतीने सादरीकरण होईल,’ असे गौरवोद्वगार फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले, ‘भारतात अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या सहायाने काष्ठशिल्प विकसित करण्याचा पहिला मान पंडित यांना मिळाला आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरले जात असून याचा बहुमान पंडितांनी मिळविला असल्याने त्यांचा अभिमान वाटतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रपटांना उधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढत असल्याने चित्रपटांना उधाण आले आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होत असताना दर्जा टिकविण्याचे आव्हान मराठी चित्रपटांसमोर आहे. हे चित्रपट देशातील महत्त्वाच्या पुरस्कारांपर्यंत जावेत, असा आशय गरजेचा आहे,’ असे खडे बोल ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांनी सोमवारी सुनावले.

संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कलासंस्कृती परिवार यांच्यातर्फे ‘सिटी प्राइड’ कोथरूड येथे आयोजित ‘सुवर्णपंचमी’ या सुवर्णकमळ विजेत्या मराठी चित्रपट महोत्सावाला सोमवारी सुरुवात झाली. ‘श्यामची आई’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या वझे यांना या वेळी गौरविण्यात आले. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, ‘श्यामची आई फाउंडेशन’चे अध्यक्ष भारत देसडला, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सिटी प्राइडचे अरविंद चाफळकर, निकिता मोघे, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

‘मराठी चित्रपटांना पूर्वी चित्रपटगृह मिळत नव्हते; पण आता संख्या वाढल्याने चित्रपटगृह मिळत नाही,’ असे सांगून वझे म्हणाले, ‘चित्रपटांचा व्यवसाय चांगला होत असताना दर्जा कायम राखणे गरजेचे आहे. चित्रपट हा मराठी प्रेक्षकांसाठी केवळ करमणूक नाही, तर मानवी नात्याचे बंध आहे, हे ओळखून निर्मिती केली पाहिजे.’

उसगावकर म्हणाल्या, ‘मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी झगडावे लागते. मराठीचा दर्जा हिंदीपेक्षा चांगला असला, तरी मार्केटिंग आणि वितरणामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.’

‘चित्रपट यशस्वी झाला, की केवळ कलाकार, दिग्दर्शक दिसतात. परंतु, मोठा खटाटोप करून ज्या निर्मात्याने पैसे खर्च केलेले असतात तो प्रकाशात येत नाही. निर्मात्यांनादेखील योग्य ती प्रसिद्धी आणि चित्रपट यशस्वीतेमध्ये वाटा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा फुटाणे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले. उत्तरार्धात ‘श्यामची आई’ चित्रपट दाखविण्यात आला.

‘आता तरी माझे नाव लक्षात राहील’

वर्षा उसगावकर यांनी भाषण करताना सूत्रसंचालकाकडे माधव वझे यांचे नाव विचारून घेतले. यावरून कुजबूज झाल्याने वझे यांनी मनोगत व्यक्त करताना टोला लावण्याची संधी सोडली नाही. ‘श्यामची आई’ हा चित्रपट ६० वर्षांनंतरही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे काही लोक मलाही ओळखतात. यापुढे तरी मी वर्षा उसगावकरांच्या लक्षात राहीन, अशी आशा करतो, अशी कोपरखळी वझे यांनी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोहर कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्कार

$
0
0

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे दिले जाणारे बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षीचा मुख्य पुरस्कार हा मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना देण्यात येणार आहे. त्याशिवाय, इतर पाच पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली असून येत्या २६ जून रोजी एका खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

या वर्षीचा मुख्य पुरस्कार हा मनोहर कुलकर्णी यांना दिला जाणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. कुलकर्णी हे मनोरंजन संस्थेचे प्रमुख; तसेच गेली ६० वर्षे नाट्यसृष्टीशी संबंधित आहेत. नाट्य चळवळीचे खंबीर आधारस्तंभ म्हणून मनोहर कुलकर्णी यांची ख्याती आहे. त्याशिवाय, विशेष पुरस्कारांमध्ये यश रुईकर (पुरुषोत्तम करंडक विजेते), विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), चंद्रशेखर देशपांडे (ऑर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर (अभिनय, गायन) आणि दत्तात्रय शिंदे (सेटिंग) यांना जाहीर झाले आहेत. मुख्य पुरस्कारार्थींना रोख ५१ हजार रुपये तर इतर विशेष पुरस्कारार्थींनी प्रत्येकी ११ हजार रुपये देऊन पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येते.

साहित्य पाठविण्याचे आवाहन

बालगंधर्व रंगमंदिरास २६ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे महानगरपालिकेने ५०व्या वर्धापनदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व तथा नारायण राजहंस, बालगंधर्व रंगमंदिराविषयीची माहिती, तत्कालीन छायाचित्रे, व्हिडिओ, सीडीज, लेख, आठवणी, बालगंधर्व रंगमंदिराची जुनी तिकिटे; तसेच इतर संग्रहित साहित्य बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे २० जूनपर्यंत द्यावी, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बृहन्महाष्ट्रातील संस्थांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक मदतीच्या विवंचनेत असलेल्या बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना मदत करण्याचे शहाणपण राज्य सरकारला तब्बल सात वर्षांनंतर सुचले आहे. सरकारने २०१०मध्ये स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणानुसार बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे; पण ही जबाबदारी सरकारच्या कोणत्या विभागाने घ्यायची, या एका प्रश्नावरून बृहन्महाराष्ट्रातील संस्थांचे अनुदान थांबवून ठेवण्यात आले होते. सरकारला आता जाग आली असून इतर राज्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.

बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी मदत बंद झाली होती. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीमुळे बृहन्महाराष्ट्रातील संस्था मराठी भाषा, संस्कृती व साहित्य यांच्या प्रसाराचे काम आता अधिक जोमाने करू शकणार आहेत. या संस्था आर्थिक कारणामुळे अडचणीत आल्या आहेत. त्यांना बळ मिळावे, यासाठी सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह इतर काही राज्यांमध्ये मराठी संस्था अस्तित्वात आहेत. शतकांपासून मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेल्या बडोदा, इंदोर अशा शहरांमध्ये अनेक जुन्या संस्था असून त्या वर्षानुवर्षे मराठी संस्कृती जोपासण्याचे काम करत आहेत. याचबरोबर अनेक ठिकाणी काही नवीन संस्था स्थापन झाल्या आहेत. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य जोपासण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. या संस्थांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संस्थांचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.

या निर्णयाविषयी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी ‘मटा’ला सांगितले, ‘सांस्कृतिक धोरण २०१०नुसार बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मदत केली जात होती. धोरणानुसार ही जबाबदारी साहित्य संस्कृती मंडळाकडे दिली होती; पण त्या संस्थेवर ताण येत असल्याने विकास संस्थेकडे जबाबदारी आली आहे. गेल्या वर्षी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे; पण संस्थांची माहिती अर्धवट असल्याने त्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. या संस्थांना आता दोन वर्षांची रक्कम देण्यात येईल. विविध राज्यातील संस्थांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत ही मदत असेल. कार्यक्रमाआधी साठ टक्के आणि नंतर चाळीस टक्के अशी रक्कम देण्यात येईल. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे.’

बृहन्महाराष्ट्रातील संस्थांच्या अनुदानासाठी नियमावली करण्यात आली आहे. अनुदान केवळ साहित्य, भाषा याविषयक काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येईल. संस्थांची पारख करूनच मदत दिली जाईल. संस्थेचे काम पाच वर्षांपेक्षा अधिक असावे, तीन वर्षांतील आर्थिक अहवाल जमा करावा तसेच मदत बांधकामासाठी दिली जाणार नाही, असे नियम करण्यात आले आहेत.

- डॉ. आनंद काटीकर, संचालक-राज्य मराठी विकास संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत साधना पुन्हा गवसली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनेक वर्षांपासून केलेली संगीत साधना, दुर्मिळ आणि गाजलेल्या मैफलीतील गायन, रसिकांना भुरळ घातलेल्या बंदिशी या संगीत साधकाला पैशांपेक्षा मोलाच्या असतात. या आठवणी त्याच्यापासून दूर जातात, तेव्हा विलक्षण दुःख होते. पण, त्या पुन्हा मिळतात तेव्हा आनंद गगनात मावत नाही. मंगळवारी प्रभा अत्रे यांनीही हाच अनुभव घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून चोरीला गेलेला मोबाइल आणि हार्ड डिस्क परत मिळताच अत्रे यांना चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही.

प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘गेल्या अनेक वर्षांमध्ये संगीत क्षेत्रात जी साधना केली. त्याची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ मैफिली, संगीताचे कार्यक्रम, सादर केलेली गाणी पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली. एक प्रकारे अनेक वर्षांची संगीत साधनाच परत मिळाली.’ अत्रे यांनी या वेळी पुणे पोलिसांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी पहाटे चोरांनी अत्रे यांच्या घरातून त्यांचे तीन मोबाइल आणि हार्ड डिस्क चोरल्या होत्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करून चोराला दोन दिवसांत जेरबंद केले. त्याच्याकडून अत्रे यांचे मोबाइल आणि हार्ड डिस्क जप्त करून त्यांनी मंगळवारी अत्रे यांच्या घरी जाऊन सर्व मुद्देमाल परत केला. त्या वेळी ‘पैशांपेक्षा अनमोल असलेला ठेवा पोलिसांनी परत केला आहे,’ असे सांगत अत्रे यांनी पोलिसांच्या पथकाचे अभिनंदन केले.

अत्रे म्हणाल्या, ‘मी ज्या जुन्या मैफिलींमध्ये गायले त्यातील अनेक दुर्मिळ अशा बंदिशी हार्ड डिस्कमध्ये होत्या. सध्या एका पुस्तकावर काम करीत आहे. त्यातील मजकूर; शिवाय नव्याने सुरू करीत असलेल्या काही प्रोजेक्ट्सची माहितीही त्यात होती. माझ्यासाठी तो अत्यंत अनमोल असा ठेवा आहे. अनेक आठवणी त्यात साठवलेल्या आहेत. हार्ड डिस्क चोरीला गेल्याने अस्वस्थ व्हायला झाले होते. परंतु, त्या सगळ्या आठवणी पुन्हा परत मिळाल्याने अत्यंत आनंद होत आहे.’ ‘पोलिसांनी अशा प्रकारे पुणेकरांच्या तक्रारींबाबतीत तत्परता दाखवून त्यांच्या प्रकरणांचा छडा लवकरात लवकर लावावा,’ अशी अपेक्षाही अत्रे यांनी या वेळी व्यक्त केली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्वतः अत्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू परत केल्या. या वेळी सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले, या गुन्ह्याचा तपास केलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील आणि त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते.

अल्पवयीन मुलगा ताब्यात

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील बंगल्यात चोरी करून मोबाइल व हार्ड डिस्क चोरणाऱ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून चोरीला ऐवज अत्रे यांना पोलिसांनी जाऊन दिला आहे. याबाबत डॉ. प्रभा अत्रे (वय ८४, रा. स्वरमयी गुरुकुल, जंगली महाराज रोड) यांनी तक्रार दिली होती. आरोपी हा चौथी पास असून फिरस्ता आहे. त्याला पैशांची आवश्यकता असल्यामुळे चोरी केली आहे. त्याच्यावर या पूर्वी वाहनचोरीचा एक गुन्हा दाखल आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

असा झाला तपास..

पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी एक लहान मुलगा चोरी करून जाताना दिसत होता. पोलिस कर्मचारी श्रीकांत वाघवले व इरफान मोमिन यांना या अल्पवयीन चोराची माहिती मिळाली. हा मुलगा चोरीच्या वस्तू विकण्यासाठी मंगला थिएटरजवळ येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुलाला पकडले.

मी ज्या जुन्या मैफिलींमध्ये गायले त्यातील अनेक दुर्मिळ अशा बंदिशी हार्ड डिस्कमध्ये होत्या. सध्या एका पुस्तकावर काम करीत आहे. त्यातील मजकूर; शिवाय नव्याने सुरू करीत असलेल्या काही प्रोजेक्ट्सची माहितीही त्यात होती. या वस्तू परत मिळाल्याने अत्यंत आनंद होत आहे.

प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोही संगीत’तर्फे महोत्सवाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आरोही संगीत अॅकॅडमी’तर्फे येत्या १७ आणि १८ जूनला आरोही संगीत महोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात गायन आणि वादन यांचा मिलाफ पुणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रभात रस्त्यावरील डॉ. श्यामराव कलमाडी सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती अॅकॅडमीच्या संचालिका आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका संपदा विपट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष आहे. महोत्सवाची सुरुवात संपदा विपट यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर कोलकत्याचे प्रसिद्ध तबला वादक पं. समर साहा यांचे एकल तबला वादन होणार असून पं. उमेश मोघे त्यांची मुलाखत घेणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप किराणा घराण्याचे गायक संजय गरुड यांच्या गायनाने होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मयूर कोळेकर यांचे गायन, मिनल उपाध्याय यांचे पखावज वादन, पतियाळा घराण्याच्या गायिका पंडिता अल्पना रॉय यांचे गायन होणार आहे. पं. सुधाकर देवळे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे, असे विपट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढाई ‘पाऊसकोंडी’शी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्यानंतर पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अवघ्या दोन दिवसांनी शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर सुरळीत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

शहरात सोमवारी मान्सूनचे जोरदार आगमन झाले. दुपारी सव्वा ते दीड तास पडलेल्या पावसाने शहरभर वाहतुकीचा वेग मंदावला होता. काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचे मार्गच बंद झाले होते. तर, अनेक रस्त्यांची एक लेन साचलेल्या पावसाने बंद झाली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह अरुंद रस्त्यांवर कोंडीचे चित्र होते. शहराच्या मध्यवस्तीत पीएमपीच्या पाच बस बंद पडल्याने कोंडीत भर पडली होती. तसेच, शहराच्या विविध भागांत रस्त्यांची कामे अपुरी असल्याने कोंडीला आणखी हातभार लागला. सोमवारी सायंकाळी शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, पेठांच्या भागात वाहनांच्या रांगा होत्या. येत्या गुरुवारी शहरातील बहुतांश शाळा सुरू होणार आहेत. मध्यवर्ती भागामध्ये शाळांचे प्रमाण अधिक आहे. शाळांतील विद्यार्थी वाहतूक, रिक्षा, व्हॅन यांसारख्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दर वर्षीप्रमाणे यंदाही भेडसावणार आहे. या समस्यांबरोबरच मोठा पाऊस झाल्यास कोंडीचे आव्हानही प्रशासनासमोर आहे.

‘पीएमपी’पुढे आव्हान

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसचे ‘ब्रेक डाउन’ हा विषय फार जुना आहे. मात्र, पावसाळ्यामध्ये ब्रेक डाउनचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांतील निरीक्षण आहे. एखाद्या रस्त्यावर बस बंद पडल्यास त्या संपूर्ण वाहनांच्या रांगाच लागतात. गेल्या काही महिन्यांत ‘ब्रेक डाउन’चे प्रमाण घटले आहे. पावसाळ्यात ‘ब्रेक डाउन’चे प्रमाण घटविण्याचे आव्हान पीएमपीसमोर असणार आहे.

पोलिसांची भूमिका महत्त्वाची

पावसामध्ये वाहतूक धीम्या गतीने चालते. वीजपुरवठा खंडीत होऊन किंवा तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक नियंत्रक सिग्नल अनेकदा बंद पडतात. अशा वेळी वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नियम डावलून काम केल्याने साचते पाणी

सिमेंट काँक्रिटचे रस्ते करताना पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी बंधनकारक असलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवल्याने आणि पालिकेतील अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांवर त्यासाठी कारवाई न केल्याने विविध रस्त्यांवर पाणी साठून राहत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. प्रभागातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा असावा, या लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.

शहरात पडलेल्या पहिल्या पावसानंतर शहरातील अनेक सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साठले. सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना ते कसे करावेत, याबाबत पालिकेची नियमावली ठरलेली आहे. रस्ते तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे बांधण्याची गरज असते. या गटारांमधून पाणी वाहून जाताना हे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी ठराविक अंतरावर खड्डे (रिचार्ज पीट) तयार गरजेचे असते. मात्र, या नियमावलीला हरताळ फासून रस्त्याचे काम करणारे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करीत असल्याचे अनेक भागांत दिसते. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील सिमेंटच्या रस्त्यांवर पाणी साठत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. तसेच, रस्त्यांची कामे देताना पालिका ठेकेदारांना स्पष्ट सूचना देत नाहीत. ठेकेदाराने केलेले काम योग्य आहे, की नाही, हे तपासण्याची जबाबदारी ही पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर असते. मात्र, याची तपासणी योग्य पद्धतीने होत नाही, केवळ कागदावरच ही कामे होत असल्याने चुकीच्या पद्धतीने रस्ते तयार होतात. चुकीच्या पद्धतीने तयार होणाऱ्या या रस्त्यांमुळे पावसाचे पाणी साठत असल्याचा आरोप भूजल अभ्यासक कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी यांनी केला. रस्त्यांची कामे करताना ठेकेदारांबरोबरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची तपासणी करण्याची जबाबदारी असलेले पालिकेतील अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी रस्त्यांवर खर्च करूनही ‌रस्त्यावर पावसाचे पाणी साठत राहणार, अशी भीती दळवी यांनी व्यक्त केली.

हट्ट सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठीच...

आपल्या प्रभागातील प्रत्येक रस्ता हा सिमेंट काँक्रिटचाच असावा, असा हट्ट लोकप्रतिनिधींचा असतो, त्यामुळे प्रशासनाला इच्छा नसतानाही सिमेंट काँक्रिटच्या कामाचे टेंडर काढावे लागते, असे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

तरुण वाहून गेला
दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरीत आलेल्या पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. महादेव मारुती शितोळे (वय ४०, रा. अजनूज, ता. श्रीगोंदा) असे या तरुणाचे नाव असून कुरकुंभ मोरीच्या रेंगाळलेल्या प्रश्नामुळे त्याचा हकनाक बळी गेला. त्याचा मृतदेह नेनेचाळ येथे गाळात सापडला. शितोळे हे पुण्याहून दौंडला आले होते. कुरकुंभ मोरी येथे खोल गटारीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात पडून वाहून गेले. रिक्षाचालकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. पण, पुढे बंदिस्त गटार असल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.

शहरात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : मान्सूनचे शहरात दोन दिवसांपूर्वी जोरदार आगमन झाले. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली. आकाश दिवसभर ढगाळ असूनही सरी कोसळल्या नाहीत. पुढील दोन दिवसांत शहरात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाच्या झळांना वैतागलेल्या पुणेकरांनी सोमवारी मान्सूनचे जल्लोषात स्वागत केले. दुसऱ्या दिवशीही पाऊस येईल, अशी अपेक्षा ठेवून नागरिक पावसाळी कपड्यांचे साहित्य घेऊन कार्यालयीन कामाला बाहेर पडले. शहरातील बहुतांश भागात मंगळवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते. काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दुपारनंतर काही वेळासाठी ऊन पडले आणि संध्याकाळी पुन्हा ढग दाटून आले. पण, दिवसभरात पावसाने हुलकावणी दिली. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून बुधवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातही मंगळवारी उल्लेखनीय पाऊस पडला नाही. दोन दिवसांत कोकण, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पाणी काढण्याचे काम सुरूच

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लर्निंग लायसन्स विभागात साचलेले पाणी काढण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, येथील कामकाज वरील मजल्यावर सुरू ठेवण्यात आले होते. मान्सूनच्या पहिल्या पावसात आरटीओच्या लायसन्स विभागात व एकूण परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे लर्निंग विभागातील यंत्रणा ठप्प होऊन अनेक नागरिकांना रिकाम्या हातांनी परत जाण्याची वेळ आली होती. या साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने मंगळवारी दुपारपर्यंत ते पाणी काढण्याचे काम सुरू होते. दुपारनंतर लर्निंग लायसन्स देण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळेही अनेकांची गैरसोय झाली. त्याठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साचू नये, यासाठी त्या ठिकाणी भिंत बांधण्याचे काम आरटीओने हाती घेतले आहे.

४६ डबक्यांमुळे वाहतुकीची कोंडी

पुणे : शहरात सोमवारी झालेल्या पावसाने विविध ठिकाणी पाणी साचून राहिले. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होऊन, अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी पाणी साचलेल्या ठिकाणांचा (वॉटर लॉगिंग) आढावा घेतला. त्या वेळी शहरात आणि पिंपरी-चिंचवडच्या काही भागांत ४६ ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा झाल्याचे दिसून आले.

शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये, सखल भागात आणि नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचून राहत असल्याचे आजवर दिसून आले आहे. त्यात गेल्या काही वर्षांत सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्यानेही पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्याचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसत आहे. वाहने बंद पडणे, वाहतुकीचा वेग मंदावणे आदी गोष्टी त्यामु‍ळे घडतात आणि वाहनांच्या रांगा लागतात. हा दर वर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे यंदा हे चित्र टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पहिल्याच पावसात ‘वॉटर लॉगिंग’चा आढावा घेतला. त्यामध्ये निदर्शनास आलेल्या ४६ ठिकाणांची माहिती महापालिका प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

महापालिका प्रशासनाकडून अशा डबक्यांचा तातडीने निपटारा करणे अपेक्षित आहे. तसेच, पाणी साचणार नाही, यासाठी काही उपाययोजना कराव्यात, यासाठी त्यांना कळविण्यात येणार असल्यातेही त्यांनी सांगितले.

मोटार लावून पाणी काढले

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात रेल्वे पुलाखाली (आरटीओकडे जाताना) प्रत्येक पावसांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. एक फुटापेक्षा जास्त पाणी साचत असल्याने येथून जाताना दुचाकीस्वारांचा गोंधळ उडतो, तर अन्य वाहनांच्या ‘सायलेंसर’मध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर सोमवारी या ठिकाणी साचलेले पाणी मोटार लावून काढण्यात आले.

मंगळवारीही कोंडी

शहरातील मध्यवस्तीतदेखील मंगळवारी सायंकाळी तीव्र वाहतूक कोंडी झाली होती. टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, पेठांमधील अंतर्गत रस्ते, शनिवारवाडा परिसर, भिडे पूल, बेलबाग चौक आदी ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या व खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कोंडीचा फटका बसला. यामध्ये पावसाच्या भितीने रस्त्यावरील चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. उपायुक्त अशोर मोराळे यांनी बेलबाग चौकात प्रत्यक्ष हजेरी लावत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.

दरड कोसळून वाहनांचे नुकसान
येरवडा : येरवड्यातील रामनगर भागात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळून रस्त्याच्या कडेला लावलेल्या रिक्षांचे नुकसान झाले. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी या परिसरात पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत धरूनच रस्त्यावरून ये-जा करावी लागणार आहे. रामनगर भागात राहणाऱ्या नागरिकांना दर वर्षी दरड कोसळण्याची भीती असते. काही वर्षांपूर्वी येथील गेनबा मोझे शाळेसमोर डोंगराचा कडा कोसळून पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने गेल्या वर्षी काँक्रिटची भिंत उभारली आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे म्हणाले, ‘दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागाजवळील पंधरा वीस कुटुंबीयांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी नगर अभियंता विभागाला सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातून रॉकेल हद्दपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रॉकेलचा होणारा काळाबाजार आणि दुचाकींमध्ये रॉकेलचा वापर होऊ लागल्याने प्रदूषणात होत असलेली वाढ लक्षात घेऊन पुणे शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून रॉकेल हद्दपार करण्यात आले आहे. शहर अन्नधान्य वितरण विभागाने या महिन्यापासून शहरातील स्वस्त धान्य दुकानांना रॉकेल वितरण बंद केले आहे.

नागरिकांनी गॅस सिलिंडरचा वापर करावा आणि रॉकेलद्वारे होणारे प्रदूषण रोखले जावे, यासाठी रॉकेलचे वितरण या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. रेशन कार्डावर नाव असलेल्या एका व्यक्तीला दर महिन्याला दोन लिटर, दोन व्यक्तींना तीन लिटर आणि तीनपेक्षा अधिक व्यक्तींसाठी चार लिटर रॉकेल देण्यात येते. या रॉकेलचा वापर दुचाकी वाहनांमध्ये केला जात असल्याचे आढळून आले आहे. पेट्रोलऐवजी दुचाकी वाहनांसाठी रॉकेल वापरल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही ​निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘शहरात बाराशे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. या महिन्यापासून शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना रॉकेलचे वितरण करण्यात आलेले नाही.’ असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले. दरम्यान, गॅस सिलिंडरधारकांच्या रेशन कार्डावर शिक्के मारून त्यांचा रॉकेलपुरवठा यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. याशिवाय, स्वस्त धान्य दुकानांतून रॉकेल आणि धान्य मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची मोहीम यापूर्वी राबविण्यात आली आहे. त्यानुसार दुकानदारांचे नाव, नोंद वहीतील संदर्भ क्रमांक, अनुक्रमांक, रेशन कार्डामधील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, कुटुंबप्रमुखाचा मोबाइल क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि दर महिन्याला वितरित होणारे रॉकेल याची माहिती स्वस्त धान्य दुकानदारांकडून संकलित करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावर आता या महिन्यापासून धान्य वितरीत होणार आहे. त्यासाठी ९९७ स्वस्त धान्य दुकानदारांना पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, या महिन्यापासून शहरात रॉकेल मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images