Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गंभीर आजारांसाठी २५,००० रुपये अनुदान

0
0

जिल्हा परिषद करणार ५० लाखांची तरतूद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅन्सर, हृदयविकारासारख्या दुर्धर आजाराच्या पेशंटसाठी आजवर देण्यात येणाऱ्या दहा हजार रुपयांच्या अनुदानात वाढ करून २५ हजार रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावाला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. आता हा ​विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी ही माहिती दिली. ‘कॅन्सर, हृदयविकाराच्या पेशंटना जिल्हा परिषदेतर्फे दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दरम्यान, उपचारखर्चांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन मदतनिधी १० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या संदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा घडवून आणून मान्यता देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दुर्धर आजाराच्या पेशंटना मदत कऱण्यासंदर्भातील फाइल्स प्रलंबित असल्याने ही योजना बंद पडली की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे, आदी सूचना करण्यात आल्या,’ असे देवकाते यांनी सांगितले.

जिल्ह्यातील गरीब पेशंटना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा परिषदेने ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधाऱण सभेत हा ठराव मांडला जाणार आहे. दुर्धर आजाराच्या पेशंटना आर्थिक मदत मिळावी यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विश्वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांचा समावेश प्रक्रिया लांबणीवर

0
0

राज्य सरकारकडून अद्याप निर्णय नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांच्या समावेश पालिकेत करण्याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन कोर्टासमोर देऊनही गेल्या महिन्याभरात राज्य सरकारने त्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, गावांच्या समावेशाची प्रक्रिया कदाचित आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.

शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांच्या समावेशाबाबत आज, सोमवारी मुंबई हायकोर्टासमोर पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टासमोर गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये गावांच्या समावेशाबाबत अनुकूल असल्याची भूमिका सरकारने मांडली होती. त्याच वेळी पुढील सुनावणीपूर्वी गावांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना कोर्टाने सरकारला केल्या होत्या. त्यानुसार, गेल्या महिन्याभराहून अधिक कालावधीत सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा केली जात होती.

राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वीच गावांच्या समावेशाची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यावरील हरकती-सुनावणींची सर्व प्रक्रियाही विभागीय आयुक्तांनी पूर्ण करून त्याचा अहवाल सरकारला पाठविला होता. तर, महापालिका आयुक्त आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तांकडून गावांच्या समावेशाबाबत अहवाल मागवून घेण्यात आला होता. या गावांच्या सुनियोजित विकासासाठी त्यांचा समावेश महापालिकेत केला जावा, अशीच शिफारस करण्यात आली होती. महापालिका निवडणुकांमुळे सरकारने त्याबाबत चालढकल केली होती. म्हणूनच, हवेली तालुका नागरी कृती समितीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सरकारने गावांच्या समावेशाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. काही मोजक्या गावांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण झाली. हद्दीलगतच्या ३४ गावांच्या समावेशासाठी हडपसरचे आमदार योगेश टिळेकर, वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक आणि खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर हे तिघे आग्रही आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गावांचा समावेश करावा, अशी विनंती केली होती. महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्या असल्याने या गावांचा समावेश केला जावा, असे सांगितले जात असून, पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र महापालिकेची निर्मितीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

पालिकेवर ताण येण्याची भीती

महापालिकेची सत्ता नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या हाती आली आहे. शहरात समान पाणीपुरवठा करण्यासह पायाभूत सुविधा क्षेत्रात काही महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. हद्दीलगतच्या सर्व ३४ गावांचा समावेश पालिकेत झाल्यास, त्याचा मोठा ताण येण्याची भीती भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांना वाटते आहे. त्यामुळे, एकाच वेळी सर्व गावे घेण्याऐवजी काही ठराविक गावे घेण्याचा आग्रह पक्ष नेतृत्वाकडे धरला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याविषयी नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी वाहतुकीसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण

0
0

खासगी वाहनांची संख्या कमी करण्यावर भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या बहुतांश शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि वाढणारे प्रदूषण या समस्यांवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसह सायकल, पदपथाला प्रोत्साहन देणारे सर्वंकष नागरी वाहतूक धोरण (एसयूटीपी) राज्य सरकारने तयार केले आहे. खासगी वाहनांवर नियंत्रण राखण्यासाठी शहरांमधील पार्किंगची उपलब्धता कमी करण्यासह शहरातील विविध भागांतील बाजारमूल्यानुसार पार्किंगचे शुल्क ठरविण्याची शिफारस धोरणामध्ये करण्यात आली आहे.
राज्य सरकारने ‘एसयूटीपी’ धोरणाचा मसुदा नुकताच वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानुसार दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये या धोरणानुसार अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आहे. नागरिकांना एक महिन्यामध्ये या धोरणासंदर्भात नगररचना विभागाकडे हरकती-सूचना नोंदविता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या अनेक शहरांमध्ये सध्या खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, उड्डाणपूल-रस्ता रुंदीकरण, पार्किंगच्या सुविधा यामुळे याच वाहनांच्या वापराला अधिक प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे, रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असून, प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्थितीपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच, त्याला आळा घालण्यासाठी सरकारने सर्वंकष नागरी धोरण आखले आहे. एक लाख लोकसंख्येमागे सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या प्रवासी बस आणि सायकल ट्रॅक यांचेही प्रमाण निश्चित करून देण्यात आले आहे. मोठ्या गजबजलेल्या शहरांमध्ये जलद बस वाहतूक योजना (बीआरटी) किंवा मेट्रो/मोनोरेल सारखा पर्याय सुचविण्यात आला आहे.
सार्वजनिक वाहतूक, सायकलिंगला झुकते माप देतानाच, खासगी वाहनांचा वापर घटविण्यासाठी शहरातील पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा वापर कमी केला जावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. बीआरटी-मेट्रोलगतच्या ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट’ (टीओडी झोन) भागांत एकूण उपलब्ध जागेच्या केवळ १५ टक्के जागा पार्किंगसाठी असावी, अशी तरतूद केली गेली आहे. तसेच, शहरातील प्रत्येक भागाच्या बाजारमूल्यानुसार खासगी पार्किंगसाठीचे दर निश्चित केले जावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

काही महत्त्वाच्या तरतुदी
प्रत्येकी एक लाख लोकसंख्येसाठी ५० प्रवासी बस
- प्रत्येकी एक लाख लोकसंख्येसाठी चार किमीचा सायकल ट्रॅक
- सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यासाठी ट्रान्सपोर्ट हब
- प्रत्येक पालिकेत नागरी वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष
- सीएनजी/इलेक्ट्रिकवरील खासगी गाड्यांसाठीचे अनुदान/सवलती रद्द
-प्रत्येक शहराचा स्वतंत्र सर्वंकष वाहतूक आराखडा

नागरी वाहतुकीसाठीच व्हावा शुल्कवापर
सार्वजनिक वाहतूक सेवांच्या तिकीट दरांचा दर वर्षी आढावा घेण्यात यावा, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, तिकीट दरवाढीनंतर पुढील तीन महिन्यांत प्रवासी संख्या कमी झाल्याचे आढळून आल्यास पुन्हा पूर्ववत दर ठेवण्यात यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, विविध सार्वजनिक वाहतूक सेवांच्या तिकिटांतून मिळणारे उत्पन्न आणि पार्किंग शुल्कातून मिळणाऱ्या निधीचा वापर नागरी वाहतुकीसाठी (अर्बन ट्रान्सपोर्ट फंड) केला जावा, अशी तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेखोदाई सुरूच

0
0

पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्तेखोदाई जूनपासून बंद करण्याची पालिका प्रशासनाने केलेली घोषण हवेतच विरली आहे. ३१ मे नंतर रस्त्यांवर खोदाई करु नये, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्रास रस्तेखोदाई सुरू असल्याचे चित्र आहे.
पालिकेतर्फे खासगी मोबाइल कंपन्या, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), महावितरण रस्तेखोदाईची परवानगी देण्यात येते. या कंपन्यांनी ३० एप्रिलपर्यंत सर्व खोदाई पूर्ण करून मे अखेरपर्यंत सर्व रस्ते पूर्ववत करावेत, अशी अट घातली जाते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात मोफत वायफाय सेवा पुरविण्यासाठी एल अँड टी कंपनीसह महावितरण, बीएसएनएल यांना ३१ मे पर्यंत रस्ते खोदाईची परवानगी दिली‌ होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामांची डागडुजी करून ते पूर्ववत केले जातील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही गोष्टीसाठी रस्तेखोदाईची परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र. त्याकडे दुर्लक्ष करून जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अनेक भागात रस्तेखोदाई सुरूच असल्याचे चित्र आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून रस्तेखोदाई सुरू असल्याचे दिसून आले आहे. केबल टाकण्यासाठी खासगी कंपन्यांना दिलेली रस्तेखोदाईची मुदत संपली आहे. त्यामुळे शहरात कोणतीही खोदाई सुरू ‌नसल्याचा दावा पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत केला आहे.
शहरात सध्या सुरू असणारी खोदाई सांडपाणी, ड्रेनेजलाइन तसेच पाणीपुरवठ्यासाठी होत असावी. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही रस्तेखोदाईची मान्यता देण्यात आली नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. ३१ मे नंतर रस्ता खोदू नये, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, हडपसर भागातील सोपानबाग, याबरोबरच म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यानचा डीपी रस्ता खोदण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच डीपी रस्ता खोदण्यास सुरुवात केल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाळा जवळ येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने रस्तेखोदाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या सूचनाही दिलेल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे.
प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनची अजून प्रतीक्षाच

0
0

कोल्हापूरपासून महाबळेश्वरपर्यंत मारली मजल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना प्रतीक्षा असलेला मान्सून अजूनही पुणेकरांपासून दूरच राहिला आहे. राज्यात दाखल होऊन चार दिवस होऊनही मान्सून पुण्यापर्यंत पोहोचलेला नाही. असे असले, तरी मान्सूनने कोल्हापूरपासून महाबळेश्वरपर्यंत तसेच हर्णेपासून श्रीवर्धनपर्यंत मजल मारली आहे. मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून, येत्या दोन दिवसात मान्सून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होईल.
शनिवारी मान्सून कोल्हापूरपर्यंत दाखल झाला. रविवारी परिस्थिती अनुकूल असल्याने राज्यात मान्सून आणखी पुढे सरकून कोकणात श्रीवर्धनपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरपर्यंत मजल मारली. रविवारी तो अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, कोकण व मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकच्या किनारी प्रदेशातील आणखी काही भाग, रायलसीमा व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात राज्यात कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळात डहाणू येथे ५९ मिलिमीटर, यवतमाळ येथे २४, उस्मानाबाद येथे १७, नाशिक येथे २७, सांताक्रूझ येथे २८ तर सोलापूर येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी व बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची व कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

शहरात हुलकावणी; उपनगरात बरसला
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गेले काही दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मात्र, पावसाने पुणेकरांना हुलकावणीच दिली. मात्र, शहराच्या काही उपनगरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. रात्री साडेआठपर्यंत मध्यवर्ती भागात पावसाची नोंद झाली नाही. लोहगाव येथे १.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोथरूड, पाषाण परिसरातही पावसाने हजेरी लावली. सुटीचा दिवस असल्याने या परिसरातील नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पुढील दोन दिवस मात्र, पुण्यासाठी जोरदार पावसाचे ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांड उलगडण्यात यश

0
0

लुटमारीच्या उद्देशाने घटना घडल्याचे स्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्याला हादरवून सोडणाऱ्या लोणावळा येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला अखेर यश आले. लुटमारीच्या उद्देशाने ही घटना घडली असून, रविवारी (११ जून) एकाला अटक करण्यात आली. अडीच महिन्यांपूर्वी लोणावळा येथील आयएनएस शिवाजीसमोरील एस पॉइंट डोंगरावर सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या विद्यार्थ्यांचा अर्धनग्न करून खून करण्यात आला होता.
अरिफ ऊर्फ असिफ शेख (रा. लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी याबाबत ‘मटा’ शी बोलताना सांगितले की, ‘अरिफ आणि त्याचा साथीदार लुटमारीच्या उद्देशाने लोणावळा परिसरात फिरत असत. एकांतात बसलेल्या जोडप्यांना हेरून हे दोघे धमकावत. तसेच त्यांना अर्धनग्न करून त्यांच्याकडील ऐवज काढून घेत असत. याबाबत नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणि स्थानिक गुन्हेशाखेच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या अधिकाऱ्यांनी या केसमध्ये अनेक बाबींचा विचार करता आरोपींपर्यंत पोहण्यात यश मिळविले आहे.’
तीन एप्रिलला सकाळी सार्थक आणि श्रृती या दोघांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लोणावळ्यात आंदोलन केले होते. तसेच दोघांच्या कुटुंबीयांनी आणि राजकीय नेत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाबाबत विचारणा केली. नांगरेपाटील हे प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याने तपासात गती आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘मटा’ शी बोलताना सांगितले.

नेमके काय घडले होते?
सिंहगड कॉलेजमध्ये शिकणारा सार्थक आणि श्रृती एस पॉइंट येथे बसले होते. त्यावेळी अरिफ व त्याचा साथीदार तेथे गेले. त्यांनी चाकू दाखवून सार्थक आणि श्रृतीला धमकावले. तसेच आरोपींनी या दोघांचे कपडे काढले. या वेळी आरोपींनी श्रृतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता सार्थकने आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपींच्या हातातील चाकू एका आरोपीला लागला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी प्रथम सार्थकच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने वार केले. तसेच त्यानंतर श्रृतीच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने मारून दोघांचा खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समितीवरून भाजपमध्ये रस्सीखेच

0
0

वर्णी न लागलेल्यांमध्ये पसरली नाराजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील विविध समित्यांच्या निवडीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी विषय समित्यांवर स्थान मिळालेल्या पाच नगरसेवकांचीच पुन्हा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात येत असल्याने इतरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने स्वीकारलेले ‘एक व्यक्ती, एक पद’ हे तत्व कोठे गेले, अशी विचारणा नाराज करीत आहेत.
महापालिकेत बहुमत मिळवून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांबरोबरच बाहेरचे उमेदवार आयात करून भाजपने हे यश मिळवले. त्यानंतर पदांच्या वाटपाच्या निमित्ताने पक्षात गटतट पडल्याचे दिसून येत आहेत. महापौरपद, स्थायी समितीबरोबरच पालिकेतील विविध समित्यांवर आपल्या गटाच्या नगरसेवकाला संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. एकहाती सत्ता मिळाल्याने बहुतांश सदस्यांना पदांवर संधी दिली जाईल, असे नेत्यांनी जाहीर केले होते.
स्थायी समितीसह शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा, नाव समिती तसेच वृक्ष प्राधिकरण समितीवर भाजपने काहींना संधी दिली. त्यानंतर पुन्हा त्यापैकीच पाच जणांच्या गळ्यात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत कोणतीही संधी न मिळालेल्या सभासदांना डावलण्यात आल्याची तक्रार इतर सभासदांनी केली आहे. पालिकेतील पदाधिकारी राजकारण करत मर्जीतील सभासदांनाच पुन्हा पुन्हा संधी देणार असतील तर हे योग्य नाही, अशी टीका नाराज गटातील नगरसेवकांनी केली.
....

एकपेक्षा अधिक पदांवर संधी मिळालेले सदस्य
सभासदाचे नाव सध्याची जबाबदारी नवीन संधी
राजेश येनपुरे नाव समिती कसबा विश्रामबागवाडा प्रभाग समिती
महेश वाबळे शहर सुधारणा धनकवडी सहकारनगर प्रभाग समिती
मानसी देशपांडे नाव समिती बिबवेवाडी प्रभाग समिती
आदित्य माळवे वृक्ष प्राधिकरण शिवाजीनगर, घोले रोड प्रभाग समिती
मारुती तुपे स्थायी समिती हडपसर मुंढवा प्रभाग समिती

पालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता असल्याने प्रत्येक सभासदाला वेगवेगळ्या समित्यांवर संधी मिळणार आहे. यंदा ज्यांना संधी मिळू शकली नाही, त्यांना पुढच्या वर्षी मिळेल. बहुतांश सभासद नवीन असल्याने त्यांना पालिकेचे काम कसे चालते याचा अभ्यास करता यावा, यासाठी पक्षाच्या आदेशानुसार संधी दिली जात आहे.
श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते

प्रभाग समित्यांची आज निवडणूक
प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज, सोमवारी निवडणूक होणार आहे. पालिकेच्या १५ पैकी सहा प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध झाल्याने अध्यक्षपदाची ​औपचारिक घोषणा होईल, तर उ‍र्वरित नऊ प्रभाग समित्यांसाठी मतदान होईल.
बिनविरोध झालेल्या प्रभाग समित्यांमध्ये सत्ताधारी-विरोधकांकडे निवडणूक लढवण्यासाठी सूचक-अनुमोदक नसल्याने त्यांना अर्ज भरता आले नाहीत. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपकडे ११, राष्ट्रवादीकडे तीन अशी प्रभाग समित्यांची विभागणी होण्याची शक्यता आहे. औंध बाणेर : विजय शेवाळे, शिवाजीनगर-घोले रस्ता : आदित्य माळवे, सिंहगड रस्ता : श्रीकांत जगताप, कसबा-विश्रामबाग वाडा : राजेश येनपुरे आणि बिबवेवाडी : मानसी देशपांडे या प्रभाग समित्या भाजपला बि​नविरोध मिळाल्या आहेत. वानवडी-रामटेकडी या प्रभाग समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक परवीन हाजी फिरोज या बिनविरोध निवडल्या जाणार आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या वाट्याला धनकवडी आणि हडपसर या दोन प्रभाग समित्या मिळतील, अशी शक्यता आहे. पालिका निवडणुकीमुळे काँग्रेस प्रभाग समित्यांमधून हद्दपार झाल्याचे चित्र होते. मात्र, उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ढोले पाटील प्रभाग समितीत काँग्रेसला राष्ट्रवादीने हात दिला असल्याने येथे काँग्रेसच्या उमेदवाराला संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनिंग दुकानांना ‘पीओएस’ मशिन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वस्त धान्य दुकानांतून होणारा काळा बाजार रोखण्यासाठी शहरातील बाराशे दुकानदारांपैकी ९९७ दुकानदारांना पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता रेशनकार्डधारकांना बोटाचा ठसा दिल्यावरच दुकानदारांकडून धान्य वितरित होणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘पीओएस’ मशिनच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना धान्य वितरित करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील स्वस्त धान्य दुकानदारांना या मशिन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सर्वांत जास्त मशिन कोल्हापूर जिल्ह्यातील दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
‘पुणे शहरातील ९९७ दुकानदारांना ‘पीओएस’ मशिन देण्यात आल्या आहेत. आधारकार्डची माहिती भरून दिलेल्या रेशनकार्डधारकांना या मशिनच्या साहायाने धान्य मिळू शकणार आहे. त्यासाठी कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबातील आधारकार्ड असलेल्या व्यक्तीचे हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. त्यामुळे थंब केल्यानंतरच धान्य मिळू शकणार आहे. धान्य घेण्यासाठी कुटुंबप्रमुख उपस्थित राहू शकला नाही, तरी कुटुंबातील आधारकार्डची नोंद केलेल्या व्यक्तीला धान्य घेता येणार आहे,’ असे शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले.
‘पीओएस मशिनच्या वापराबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानदारांचा त्यामध्ये समावेश आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

दुकानदारांना प्रशिक्षण
‘पीओएस’ मशिनचा वापर करण्यात येणाऱ्या अडचणी तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दोन मशीन देण्यात आल्या होत्या. संबंधित दुकानधारकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याच पद्धतीने आता उर्वरित दुकानधारकांना या मशिनचा वापर कसा करावा, रेशनकार्डधारकांच्या बोटांचे ठसे कसे कसे घ्यावेत, यासह अन्य आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवलेंनी केली शहांची पाठराखण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले कानावर हात ठेवले. आपल्याला या बाबत काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार महात्मा गांधींचा आदर करणारे आहेत. त्यामुळे शहा हे गांधींचा अनादर करतील असे वाटत नाही. मात्र, शहा असे बोलले असतील तर त्यांना तसे म्हणायचे नसेल. ‘स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांचा सामना चतुराईने केला आहे,’ या अर्थाने शहांनी ‘ते’ उद्गार काढले असतील, असे म्हणत आठवले यांनी शहा यांची पाठराखण केली.

मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पत्रकारपरिषदेत सरकारच्या कामागिरीचा आढावा घेतला. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. सरकारच्या विविध योजना, विकास तसेच सर्वसामान्य जनतेला झालेला मिळालेला दिलासा, याबाबत आठवले यांनी माहिती दिली. भारत-पाकिस्तान संबंध, राष्ट्रपती निवडणूक आणि शरद पवार, काश्मिरातील स्थिती तसेच अमित शहा यांचे गांधीजींबद्दलचे वक्तव्य यावर आठवले यांनी भाष्य केले.

‘पाकिस्तानला खुमखुमी असेल तर भारतही युद्धाला तयार आहे. मोदी सरकार पाकिस्तानबरोबर शांततेचे संबंध प्रस्थापित करू पाहत आहे. मात्र, पाकिस्तानकडून छेड काढण्याचे उद्योग सुरूच राहिले तर, त्यांना एकदा धडा शिकवावा लागेल. वेळ पडली तर भारताने युद्ध करून पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्यावा. तेथील नागरिकांनाही पाकिस्तानात राहायचे नाही,’ असे आठवले यांनी नमूद केले.

देशातील आरक्षण आणि राज्यघटना बदलण्यात येणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस दलितांच्या मनात संभ्रम तयार करण्यासाठी असा खोटा प्रचार करत आहे. पंतप्रधान मोदी यांना राज्यघटनेबद्दल नितांत आदर आहे, असेसी आठवले म्हणाले.

‘बच्चू काही बच्चा नाही’

‘बच्चू कडू काही बच्चा नाहीत; ते माझे चांगले मित्र आहेत. तसेच ते दोन-तीनवेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेले विधान नक्षलवाद्यांसारखे आहे. आमदाराने असे बोलणे शोभत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आरपीआय आणि भाजप या दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे,’ असे आठवले म्हणाले.

राष्ट्रपतिपदी मराठी माणूस बसल्यास आपल्याला आनंदच वाटेल. पवारांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर, त्यांनी मोदींची विशेष भेट घ्यावी. मोदी ठरवतील तो उमेदवार भाजपला मान्य असेल. मोदी आणि पवार नेहमीच भेटत असले तरी ते एकमेकांचा अंदाज घेतात. एनडीएचा उमेदवार ठरायच्या आत पवार एनडीएत आल्यास त्यांच्या नावाचा विचार होईल.

रामदास आठवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या होणार जाहीर

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी ही माहिती दिली आहे. गेले अनेक दिवस दहावीच्या निकालाच्या तारखांबाबत उलटसुलट माहिती सोशल मीडियावर फिरत होती. विद्यार्थी आणि पालक त्यामुळे हैराण झाले होते. अखेर उद्या पालकांची प्रतिक्षा संपणार आहे.

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल :-

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
www.jagranjosh.com


'नो यूवर रिझल्ट'च्या खालील बॉक्समध्ये आवश्यक माहिती भरून उद्या आपण आपला निकाल पाहू शकाल.




मोबाईलद्वारे निकाल पाहण्यासाठी -

१) bsnl मोबाईलमधून MHSSC<space><seatno> ५७७६६ या क्रमांकावर पाठवा
२) Times intertnet द्वारे MAH10<space><Roll Number> 58888111 या क्रमांकावर पाठवा.
USSD code (by Times internet) Airtel, Idea, Vodafone and Aircel - Dial USSD string *588#

यावर्षीपासून ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा -
गुणपडताळणी अर्ज - १४ जून ते २३ जून
छायाप्रतीसाठी अर्ज - १४ जून ते ३ जुलै

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जरोख्यांना सरकारची मान्यता

0
0

महापालिकेच्या कर्जाची सरकारकडून हमी नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला २,२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यास सोमवारी मान्यता दिली. मात्र ही मान्यता देताना राज्य सरकारनेकर्जाची रक्कम, तसेच त्यावरील व्याजाची परतफेड करण्याची कुठलिही हमी घेतलेली नाही. कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी राष्ट्रीयकृत बँकेत एस्क्रो खाते उघडण्याची सूचना सरकारने केली असून कर्जरोख्यांची उभारणी आणि परतफेडीचा अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी अशी चोवीस तास पाणीपुरवठा योजनाराबवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जरोखे उभारणारी पुणे महापालिका ही देशातीलपहिली महापालिका ठरणार आहे. या योजनेसाठी ३,५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने कर्जरोखे उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने अवघ्या पाच दिवसांत त्यावर निर्णय घेऊन कर्जरोख्यांना मान्यता दिली.

राज्य सरकारच्या परवानगीनंतर कर्जरोखे उभारण्याच्या कामास गती मिळणारआहे. पुणे महानगरपालिकेने सत्तांतरानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. तसेच, स्मार्ट सिटी योजनेच्या उद्घाटनाला येत्या २५ जूनरोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या दरम्यान हा निर्णय झाला असल्याने त्यासविशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिकेत भाजप वगळता सर्वपक्षीयांनी कर्जरोखे उभारण्यास कडाडून विरोध केला आहे.
...
पुणे महानगरपालिकेने पाठवलेला प्रस्तावावर राज्य सरकारने तत्काळ निर्णयघेऊन त्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या यानिर्णयामुळे कर्जरोखेउभारण्यास गती येणार आहे. या योजनेमुळे पुणेकरांना चोवीस तास समानपाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
- मुक्ता टिळक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा आज निकाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इयत्ता दहावीचा निकाल अखेर आज, मंगळवारी १३ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे १७ लाख विद्यार्थी बसले होते.

दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. राज्यातून दहावीसाठी यंदा १७ लाख ६६ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ९ लाख ८९ हजार ९०८ विद्यार्थी, तर ७ लाख ७६ हजार १९० विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यातील एकूण ४ हजार ७२८ परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या वेबसाइटसोबतच इतर वेबसाइटवरही पाहता येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१८मध्ये फेरपरीक्षा होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी वेबसाइट

www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

www.sscresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.knowyouresult.com

www.rediff.com/exams

www.jagranjosh.com

www.maharesult.nic.in या वेबसाइटवर निकालासोबत सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

'नो यूवर रिझल्ट'च्या खालील बॉक्समध्ये आवश्यक माहिती भरून आपण आपला निकाल पाहू शकाल.



‘बीएसएनएल’च्या मोबाइल ग्राहकांना MHSSC < SPACE> <SEAT NO> असा मेसेज ५७७६६ या क्रमांकावर, तर आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो, बीएसएनएलच्या ग्राहकांना MAH10<SPACE><SEAT NO> असा मेसेज लिहून ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवून निकाल पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पावसाने दाणादाण

0
0

रस्त्यांना नाल्याचे स्वरूप; खोदाईच्या कामांमुळे धोका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात दाखल होताच मान्सूनने दमदार सलामी दिली असली, तरी ‘स्मार्ट सिटी’तील पायाभूत सुविधांची पहिल्याच पावसाने पुरती दैना झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. नालेसफाईसह इतर पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला असून, शहरात वेगाने पसरणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे बहुतेक रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर, शहरातील बऱ्याच भागांत अद्याप खोदाई सुरू असल्याने या भागांतही अपघाताचा धोका वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोमवारी दुपारनंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी तास-दीड तास शहराच्या सर्वच भागांत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे, अल्पावधीत ठिकठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार घडले. शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा पहिल्याच पावसात पूर्णतः वाहून गेला. नालेसफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता यासह उपनगरांतील रस्त्यांवरही पाणीच पाणी झाले होते. या पाण्यातून वाट काढताना नागरिक आणि वाहनचालकांची पुरती त्रेधा उडाली. त्यातच, शहरातील खोदाईची कामे अजूनही सुरू असल्याने माती आणि राडारोडाही रस्त्यावर आला. काही भागांत अशा निसरड्या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

शहरातील छोट्या-मोठ्या गल्ली-बोळांपासून ते काही महत्त्वाचे रस्ते सध्या काँक्रिटचे करण्याचे पेव फुटले आहे. सरसकट काँक्रिटचे रस्ते करताना पावसाळी गटारे किंवा पाणी मुरण्यासाठी जागा ठेवली जात नाही. तसेच, आजूबाजूचे रस्ते आणि काँक्रिटचे रस्ते यामध्ये उंचसखलपणा राहिल्याने शहराच्या बऱ्याच भागांमध्ये आज रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. बहुतेक काँक्रिटच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. नैसर्गिक उतार असल्याने आत्तापर्यंत सहज पाणी वाहून जाणारे काही रस्ते अलीकडच्या काळात काँक्रिटचे झाल्याने तेथे ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्याशिवाय, आजूबाजूच्या सोसायट्या आणि घरांमध्येही पाणी शिरण्याचे प्रकार घडले. शहरात सोमवारी दिवसभरात २७ मिमी पाऊस झाला. पहिल्या पावसातच शहराच्या सर्व भागांत अशी दैन्यावस्था झाली असेल, तर यापेक्षा मोठा पाऊस झाल्यास काय अवस्था होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मान्सूनस्य’ प्रथम दिवसे

0
0

शहराच्या चोहोबाजूला बरसल्या पावसाच्या सरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांची मान्सूनसाठी सुरू असलेली प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली. सकाळपासूनच दाटून आलेल्या ढगांमधून दुपारी शहराच्या चोहोबाजूला पावसाच्या सरी बरसल्या.
एकीकडे मान्सूनने दमदार हजेरी लावली असली तरी, पहिल्या पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधा कोलमडल्या. शहरात रात्री साडेआठपर्यंत २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याबरोबरच मुंबईसह मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागात सोमवारी मान्सून दाखल झाला. पुढील दोन दिवसांत मान्सून अरबी समुद्राचा अजून काही भाग, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ वगळल्यास मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलका स्वरुपाचा तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
राज्यातील सर्वाधिक पाऊस चंद्रपूर (५५ मिलिमीटर) नोंदला गेला. परभणी येथे ५२, रत्नागिरी येथे २६, कोल्हापूर येथे १५, महाबळेश्वर येथे ४ मिमी पाऊस नोंदला गेला. पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
केरळबरोबरच राज्यातही यंदा मान्सून दर वर्षीच्या तुलनेत लवकर दाखल झाल्याने पुण्यातही तो लवकर होईल, अशी अपेक्षा होती. गेल्या दोन दिवसांत कोकणासह कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडला. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, पुण्यात मात्र केवळ ढग दाटून येत होते. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना सोमवारी दिलासा मिळाला. सकाळपासून आकाश ढगाळ होते, दुपारी एकच्या दरम्यान शहरामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विविध भागात सलग दोन तास पाऊस पडला.
गेल्या चार दिवसात मान्सूनने कोकण व्यापले असून, सोमवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेश केला. पुढील प्रवासाला अनुकूल असून, चार दिवसात शहरात चांगला पाऊस पडेल. तसेच राज्याच्या उर्वरित भागातही मान्सूचा समाधानकारक प्रवास सुरू राहील, असे हवामान विभागाच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.

मान्सूनने दिले लवकर दर्शन
मान्सूनला यंदा सुरूवातीपासूनच अनुकूल वातावरण मिळाल्याने केरळबरोबरच महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल झाला. पुण्यात गेल्या वर्षी २१ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते, यंदा नऊ दिवस आधी मान्सूच्या सरी कोसळल्याने पुणेकरांनी सुखद अनुभव मिळाला. यापूर्वी २०१५ मध्ये १३ जूनला तर २०१४मध्ये जुलैमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटारे, नालेसफाई, रस्तादुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांना दिले आहेत. पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर महापौरांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
सोमवारी शहरात झालेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साठल्याचे दिसून आले. बहुसंख्य भागात नालेसफाई, गटारेसफाईची कामे अर्धवट असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज लाइनची कामेही अर्धवट स्थितीत असल्याने त्याचाही फटका वाहनचालकांना बसला. पालिकेने केलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळेही जागोजागी पाण्याची तळी साठली होती. काही भागात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास झाला.
शहरात पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी गेल्या महिन्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचे परिस्थितीवरुन दिसत असल्याची टिप्पणी महापौरांनी पत्रकारांशी बोलताना केली. पावसाचे पाणी साठत असल्याची १२४ ठिकाणे प्रशासाने शोधली होती. त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने पहिल्याच पावसात बोजवारा उडाल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले. यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करुन कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजेच्या धक्क्याने नागरिकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथे एका व्यक्तीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल बळीराम बाबर (वय २६, रा. पानमळा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बाबर यांचे पानमळा येथे घर दोन मजली घर आहे. घरात अनेक ठिकाणी विजेच्या वायर बाहेर आल्या होत्या. त्यामुळे जिन्यात प्रवाह उतरला. बाबर जिन्यातून वरच्या मजल्यावरील खोलीत जात होते. त्यावेळी त्यांना धक्का बसला. त्यावेळी त्यांची भावजय घरात होती. नागरिकांनी त्यांना बाजूला काढले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

बोगद्यात वाहने धडकली
कात्रजच्या नवीन बोगद्यात कार उभी राहिल्यामुळे तिच्या मागे असणारी चार वाहने एकमेकांना धडकली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन टेम्पो, एक मॅजिक आणि एक कार या वाहनांचे नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कात्रजच्या नवीन बोगद्यात एक कार उभी करण्यात आली होती. तिच्या मागे एक टेम्पो पाठीमागे येऊन थांबला. त्यानंतर पाठीमागून टेम्पोला दुसरा टेम्पो धडला. त्या टेम्पोला मागील बाजूला मॅजिक टेम्पो धडकला. मॅजिकला कार धडकली. अपघातानंतर दोन टेम्पोचे चालक पळून गेले. अपघातामुळे कात्रज बोगद्यात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढून वाहतूक कोंडी दूर करण्यात प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसमोर कर्जाचा पेच

0
0

नोटाबंदीनंतर ५८४ कोटी रुपयांचे जुने चलन अद्याप पडून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी कर्जमाफी करण्याच्या राज्य सरकारच्य़ा आदेशात कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांना किती प्रमाणात कर्जमाफी द्यावी आणि किती कर्जवाटप करावे या संदर्भात पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे नोटाबंदीपासून बँकेत जमलेल्या ५८४ कोटी रुपयांच्या जुन्या चलनाचा निर्णय अजूनही न झाल्याने नवीन कर्जवाटप करता येणार नाही, अशी भूमिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली आहे.
अशी माहिती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली. ‘अल्पभूधारकांना कर्जमाफी द्यायची झाल्यास जिल्हा बँकेला ५४९ कोटी रुपये माफ करावे लागतील. सरसकट कर्जमाफी दिल्यास ११७० कोटी रुपये माफ करावे लागतील. मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७०४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मेच्या मध्यापर्यंत ८०६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे यंदा कर्जवाटपात १०० कोटी रुपयांची घट झाली आहे,’ असे थोरात म्हणाले.
नवीन कर्ज सोमवारपासून देण्याचे आदेश रविवारच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. परंतु, कर्जवाटप करण्यासाठी बँकेकडे निधी उपलब्ध नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. बँकेकडे पडून असलेले ५८४ कोटी रुपये स्वीकारावेत आणि त्या बदल्यात नवीन चलन दिल्यास आम्हाला नवीन कर्जवाटप करता येणार आहे. अन्यथा आम्हाला कर्जपुरवठा करणे आता शक्य नाही. याशिवाय बँकेचे अल्पमुदतीच्या कर्जापोटी १७३४ कोटी रुपयांची बाकी येणे असून, ११७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतीकर्जाची एकूण थकीत रक्कम २,२६२ कोटी रुपये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

नोटाबंदीनंतर वसुलीत वाढ
नोटाबंदीनंतर बँकेने चांगली कर्जवसुली केली. यंदा बँकेने १५४७ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेच्या ९७ हजार ५७३ सभासदांना खरिपासाठी कर्जवाटप केले जाणार आहे. खरिपासाठी १३८४ कोटी आणि रब्बीसाठी ४०९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. नोटाबंदी आणि ग्रामीण भागात रोख पैशांची उपलब्धता कमी असल्यामुळे कर्जवाटप घटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख प्रकरणातून अॅड. निकम बाहेर

0
0

सरकारकडे विनंती करून नियुक्ती केली रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर येथील इंजिनीअर मोहसीन शेख खून खटल्यातील अॅड. उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती राज्य सरकारने रद्द केली आहे. अॅड. निकम यांनी सरकारकडे नियुक्ती रद्दचा अर्ज केला होता.
पुण्यातील सत्र न्यायालयात मोहसीन शेख खून खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. या खटल्यातील आरोपी धनंजय देसाईला जामीन मिळावा म्हणून सोमवारी कोर्टात सोमवारी सुनावणी होणार होती. सुनावणी सुरू होण्यापूर्वी अॅड. निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचा लेखी अर्ज दाखल करण्यात आला.
शेख खून खटल्यात हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (वय ३४, रा. हिंदूगड, मुळशी ) आणि इतर २० आरोपी ११ जून २०१४ पासून अटकेत आहेत. यातील काही आरोपींना जामीन मिळाला आहे. फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी केली, तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून दोन जून २०१४ रोजी हडपसरमध्ये दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा खून करण्यात आला. या प्रकरणी शेखच्या भावाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी अॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
देसाई तीन वर्षे कैदेत आहे. त्याला वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मिळावा असा अर्ज आपण कोर्टात केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, अॅड. निकम यांची ​नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे समजले, असे देसाईचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले. सरकारतर्फे सोमवारी कोर्टात कोणीही सरकारी वकील उपस्थित न झाल्यामुळे खटल्यातील दोषारोप निश्चितीचे काम चार जुलै रोजी होणार आहे. देसाईच्या जामिनावर १९ जूनला सुनावणी होणार असल्याचे अॅड. पवार यांनी सांगितले.

अॅड. निकम तीन वर्षे कार्यरत
नोटिफिकेशनद्वारे १९ मे २०१७ला विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. निकम यांची नियुक्ती रद् करण्यात आली. २५ ऑगस्ट २०१४ रोजी विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. निकम यांनी सरकारकडे वकीलपत्र रद्द करण्याची विनंती केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त घेतली पाण्याने सत्वपरीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनच्या दमदार आगमनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एकच दाणादाण उडाली. लर्निंग लायसन्स विभागात सर्वत्र फुटभर पाणी साचले होते. त्यामुळे दिवसभर या विभागातील कामकाज ठप्प झाले. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
शहरात पावसाला सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने लर्निंग विभागात बसलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. लर्निंग लायसन्स विभाग जमिनीला समांतर आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. गेल्या वर्षीही येथे पाणी साचून कामकाज ठप्प झाले होते. आजच्या पावसाने आरटीओमध्ये लर्निंग लायसन्सच्या चाचणीसाठी आलेल्या तीनशे अर्जदारांपैकी अनेकांना चाचणी न देताच परतावे लागले.
वास्तविक, दोन वषार्पूर्वीच या विभागाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही येथील परिस्थिती सुधारलेली नाही. गेल्या वर्षी या विभागात छताला लावलेले प्लायवूड कोसळले होते. ते उरलेले प्लायवूड धोकादायक स्थितीत तसेच लटकलेले आहे. आरटीओ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. याच प्रतिकूल परिस्थितीत कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांनाही येथे धोका आहे. आरटीओकडून राज्य सरकारला दर वर्षी कित्येक हजार कोटींचा महसूल मिळतो. त्या तुलनेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्राकार वाहतूक रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नळ स्टॉप चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्वे रस्ता, प्रभात रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावर केलेल्या चक्राकार वाहतुकीचा फज्जा उडाला. सकाळच्या सत्रांत कर्वे रस्त्यावर करिष्मा सोसायटीपर्यंत, तर पौड रस्त्यावर मोरे विद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर, सायंकाळी प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नळ स्टॉप चौकातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या उपाययोजनेमुळे अधिकच कोंडी झाल्याने ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या सर्व घडामोडीनंतर ही योजना अखेरीस तूर्त रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

वाहतूक पोलिस विभागाने नळ स्टॉप चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चक्राकार ‘रोटरी’ योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सोमवारी सकाळपासून करण्यात आली. यामध्ये कर्वे रस्ता हा नळ स्टॉप चौक ते एसएनडीटी या दरम्यान एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे कोथरूडकडून डेक्कन येणाऱ्या वाहनांना ‘एसएनडीटी’पासून कर्वे रस्त्याने सरळ येण्यास प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यांना कॅनॉल रस्त्याने आठवले चौकात जाऊन उजवीकडे वळून नळ स्टॉप चौकातून पुढे जावे लागत होते. तसेच, लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौकातून प्रभात रस्त्याला जाण्यासाठी वापरला जाणारा कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात आला आहे. त्यासाठी लॉ कॉलेज रस्ताही प्रभात चौकापर्यंत त्या बाजूला जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिस शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक बदलाची अंमलबजावणी केली. मात्र, त्यानंतरच्या तासाभरातच वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच, या परिसरातील अंतर्गत रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढली होती. सायंकाळपर्यंत परिस्थिती सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात वाढच झाली होती. त्यामुळे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी रात्री उशीरा ही योजना तुर्त रद्द स्थगित करण्याचे आदेश दिले.
आठवले चौकात कॅनॉल रस्त्याच्या पलिकडील बाजूस राहणाऱ्या नागरिकांना घरी जाण्यासाठी आठवले चौकातून प्रभात चौकात जाऊन पुन्हा कॅनॉल रस्त्याने आठवले चौकाकडे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.

मोठी वाहने वळविणे कठीण

कर्वे रस्ता व पौड रस्त्याने येऊन एसएनडीटीपासून कॅनॉल रस्त्याला वळताना मोठ्या वाहनांना अडथळा होत होता. त्यातच या रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसची संख्या अधिक आहे. रस्ता अरुंद असल्याने पीएमपी, एसटी बस आणि व्होल्वो वळविताना वेळ लागत होता. वास्तविक, कर्वे रस्त्याच्या तुलनेत कॅनॉल रस्ता रस्ता अरुंद आहे. त्यामुळे एसएनडीटीपासून मागील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हीच परिस्थिती आठवले चौकातही होती. या चौकातून नळ स्टॉप चौकाकडे जाणाऱ्या बस वळविताना चालकाला कसरत करावी लागत होती.

पहिला दिवस आणि पावसाने गोंधळ

नळ स्टॉप चौक परिसरात केलेल्या चक्राकार वाहतुकीचा पहिलाच दिवस असल्याने बहुतांश नागरिकांना या बदलाची माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक नागरिक वाहने थांबवून वाहतूक पोलिसांकडे पुढील मार्गाची चौकशी करीत होते. काही नागरिकांनी थेट त्यांच्याशी वादही घातला. यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. तर, पहिलाच दिवस असल्याने गोंधळाचे वातावरण होते. अनेक नागरिक कर्वे रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होते. त्या तुलनेत उजव्या बाजूने जाणाऱ्यांची संख्या कमी होती. नागरिकांना माहिती झाल्यानंतर परिस्थितीत नक्कीच फरक पडेल, अशी भावना वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लॉ कॉलेज रस्ता निम्मा मोकळा

लॉ कॉलेज रस्त्यावर आठवले चौकातून प्रभात चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली होती. या वाहतूक योजनेमुळे कर्वे व पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या, परंतु लॉ कॉलेज रस्ता नेहमीच्या तुलनेत कोंडीमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. कॅनॉल रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असली, तरीही तेथेही कोंडी झाली नव्हती. दरम्यान, सायंकाळनंतर या रस्त्यावर प्रभात चौकापासून बालभारतीच्या दिशेला वाहनांची मोठी प्रमाणात रांग लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images