Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रस्ते रूंदीकरणाला लडकत यांचा खो

$
0
0

सरकारदप्तरी मंजूर डीपीला वाटाण्याच्या अक्षता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते रुंद करण्यासाठी विकास आराखड्यात (डीपी) रस्ता रुंदीकरण सुचविण्यात आले आहे. तरीही डीपीच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनीच रस्ता रुंदीकरण न करण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. लालबहाद्दूर शास्त्री रस्ता आणि बिबवेवाडी कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा यात समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार होत असून, वाहतुकीसाठी रस्ते कमी पडत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या डीपीमध्ये महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, शहर समितीच्या अध्यक्षांनी डीपीत सुचविलेले रुंदीकरण रद्द करून सद्यस्थितीतील रस्ते कायम ठेवण्याचीच भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंजूर डीपीमध्ये दांडेकर पूल ते टिळक चौकादरम्यानचा लाल बहादूर शास्त्री रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित आहे. हा रस्ता सध्या अस्तित्वात असल्याप्रमाणेच २४ मीटर रुंदीचाच ठेवावा असे लडकत यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. भाजपच्या मानसी देशपांडे आणि आनंद रिठे या नगरसेवकांनी बिबवेवाडी-कोंढवा हा रस्ता १९८७ च्या विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद विकसित झाल्याचे म्हटले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारती उभारण्यात आल्या आहेत. मंजूर डीपीमध्ये हा रस्ता ४२ मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. सरकारी निर्णयामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मिळकती बाधित होणार असून, लुल्लानगर परिसरातील लष्कराच्या मिळकतीलाही बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्वीइतकाच ३० मीटर रुंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
डीपीतील आरक्षणात बदल करायचा असल्यास प्रस्ताव शहर सुधारणा समितीमार्फत मुख्य सभेच्या मान्यतेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जातो. नगरविकास खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने शहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेत या प्रस्तावांना भाजपने मान्यता दिली तरी मुख्यमंत्री बदलांना मान्यता देणार का याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगरांत बरसला मान्सूनपूर्व पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात मान्सून दाखल झालेला नसला, तरी शहराच्या काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. शहराच्या काही उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, पुढील दोन दिवसात शहरात दुपार किंवा सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात उकाडाही जाणवत होता. मात्र, दुपारनंतर काही उपनगरांमध्ये पावसाच्या सरी बसरल्याने तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत महाबळेश्वर येथे २८, नाशिक येथे १३ आणि वर्धा येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात राज्यात कोकणचा दक्षिण भाग व विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रस्तावावरून राष्ट्रवादीत दुफळी

$
0
0

आज विरोध करण्याची भूमिका घेण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कर्जरोखे घेण्याला स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी पाठिंबा दिला असला तरी, आज बुधवारी होणाऱ्या सभेत विरोध करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पुणेकरांना कर्जबाजारी करून तयार केलेल्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नसताना अशा ठरावांना पाठिंबा कसा देता, या शब्दांत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची‌ कानउघडणी केल्याने हा पवित्रा घेतल्याचे समजते.
शहरात सर्वत्र समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी आवश्यक २,२६४ कोटी रुपयांचा निधी कर्जरोख्यांद्वारे उभारण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मंजूर करण्यात आला. पुणेकरांवर कर्जाचा भुर्दंड टाकून ही योजना राबवू नये, अशी भूमिका घेऊन शिवसेनेने प्रस्तावाला विरोध केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने प्रस्ताव मान्य करविला. या प्रस्तावाला राजकीय पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आयत्यावेळी हा विषय स्थायी समितीसमोर आणून मंजूर करण्याची खेळी केली. स्थायी समितीने मंजुरी दिलेला प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर करण्यासाठी आज, विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
कर्जरोख्यांना सहमती दर्शविल्यास त्याचा जोरदार फटका आगामी काळात पक्षाला बसू शकतो. केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार असतानाही समान पाणीपुरवठा योजनेसाठी कोणताही निधी दिला जाणार नाही. पालिकेला कर्ज काढून ही योजना करावी लागणार असल्याची वस्तूस्थिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पवार यांनी प्रस्तावाला पाठिंबा न देण्याविषयी बजावले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्थायीत पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने पवारांनी पक्षाच्या वरिष्ठांची कानउघडणी केली. त्यामुळे प्रस्तावाला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडले आहेत.

‘स्थायी’ने मागवली ‘ई-लर्निंग’ची मा​हिती
स्थायी समितीने पालिका शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू करण्यासाठी २४ कोटींच्या प्रस्तावाबाबत अधिक माहिती मागवली आहे. एवढा मोठा खर्च करताना विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध होणार, तसेच त्याचा काय फायदा होणार, या अनुषंगाने माहिती मागवण्यात आली आहे.
पालिकेच्या १५१ शाळांमध्ये ‘बीएसएनएल’च्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल क्‍लासरूम ,ई-लर्निंग प्रणाली/ डिजिटल क्‍लासरूम तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘अॅडाप्टिव्ह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासानाने मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला. प्रशासनाने मंगळवारी झालेल्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव मान्यतेसाठी आणला. या पार्श्वभूमीवर समितीतील काही सदस्यांनी अधिक माहिती प्रशासनाकडे मागितली असल्याने तो पुढे ढकलल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गेल्यावर्षी ऑक्‍टोबर म​हिन्यात शिक्षण मंडळाकडून असाच प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवला होता. तेव्हा या योजनेचा खर्च सहा कोटी रुपये होता. आता तो २४ कोटी रुपयांवर कसा गेला, असा सवाल स्थायी समितीचे सदस्य अविनाश बागवे यांनी उपस्थित केला. पालिकेच्या २८७ शाळा पालिकेच्या १४६ इमारतींमध्ये कार्यरत आहेत. या शाळांतील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाकडून २४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार शिक्षण मंडळाच्या शाळांतील ८६१ खोल्या या ‘डिजिटल क्लासरूम’मध्ये रुपांतरीत होणार आहेत. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा, सुव्यवस्था जिल्ह्यात नियंत्रणात

$
0
0

भाजीपाला, दूध बंदोबस्तात मुंबईला रवाना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकरी संपाच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून, भाजीपाला आणि दुधाची सुमारे ५० टक्के आवक घटली आहे. पोलिस बंदोबस्तात रात्री भाजीपाला आणि दुधाची वाहने ठाणे शहरापर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात झाली आहे,’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
‘संपकाळात जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. शेतकरी संघटनांनी सरकारी कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा दिला होता. जुन्नरमध्ये असा प्रयत्न करण्यात आला; पण पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. सासवड आणि भोर येथे तहसीलदारांना गुलाबाची फुले देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले,’ असे राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘ओतूरमध्ये पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा प्रकार वगळता अन्य ठिकाणी किरकोळ प्रकार घडले आहेत. त्यामध्ये जुन्नर आणि नारायणगाव परिसराचा समावेश आहे. या परिसरासह दौंड, इंदापूर या भागात पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरवठादारांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केल्यानंतर रात्री ठाणे शहरासाठी भाजीपाला आणि दुधाचे टँकर पाठविण्यात येत आहेत. पुणे आणि नाशिकहून मुंबईला भाजीपाला पुरविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

वारीची तयारी पूर्ण
‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी ६०९ अधिकारी आणि ६६१ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. वारीच्या काळात ७८ टँकर, १३० रुग्णवाहिका, दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन शववाहिनी कार्यरत असणार आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्वच्छता केली जाणार आहे. ९६ हजार लिटर केरोसीनचा साठा, आणि २६,२०० गॅस सिलिंडर उपलब्ध करण्यात येणार आहेत. दिंडीच्या नावाने गॅस सिलेंडरचे खाते उघडले जाणार असल्याने अनुदान मिळेल. साखर, केरोसीनसाठी एकच कार्ड सर्व ठिकाणी वापरता येणार आहे,’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले.

दुधाचा पुरवठा सुरळीत होणार

शेतकरी संपामुळे पुण्याबाहेरून येणाऱ्या डेअरीच्या दूध संकलनातील अडथळ्यांमुळे शहरात दुधाचा तुटवडा मंगळवारीही भासला. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक संकलन झाल्याने दुधाचा पुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
शेतकरी संपामुळे शहरात येणाऱ्या दुधाच्या वितरणावर परिणाम झाला आहे. गोकुळ, चितळेसह अन्य डेअऱ्यांच्या दुधाच्या वितरणाचे प्रमाण घटले आहे. मात्र, आजपासून परिस्थिती सुधारेल, असा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात होणारे दूध संकलन सुरळीत सुरू झाले आहे. सुमारे ८० ते ९० टक्के दूध संकलन झाले असून, बुधवारपासून दूधपुरवठा सुरळीत होईल. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुधाचा तुटवडा होता. मात्र, आता परिस्थिती सुधारेल. त्यामुळे दूध वितरणात काहीही अडचण येणार नाही,’ अशी शक्यता प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
‘संपाच्या सहाव्या दिवशीही दुधाचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. गेल्या दोन दिवसांपासून दुधाचा तुटवडा कायम आहे. जिल्ह्यात ६५ टक्के दूध संकलन झाले असून, एक लाख लिटर दूध वितरीत करण्यात आले आहे. दुधाचा तुटवडा भासत असला तरी बुधवारपासून तो कमी होईल. संकलन केंद्रे सुरू झाली तरी संकलनाचे प्रमाण घटले आहे. संकलन केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास दुधाची कमतरता भासणार नाही, ’अशी माहिती जिल्हा दूध खरेदी-विक्री संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.
दुधाचे संकलन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे दुधाचा तुटवडा जाणवणार नाही, असे चितळे दुधाचे प्रवक्ते गिरीश चितळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञान वापरातून ऑनलाइनवर मात

$
0
0

डॉ. आनंद देशपांडे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अमेरिकेमध्ये मॉल, रिटेल साखळ्यांची दुकाने बंद पडण्यामागे ऑनलाइन व्यावसायिक गटाचा मोठा हात आहे. चांगली सेवा, कमी किंमत आणि वेळेमध्ये वस्तू मिळण्याची हमी असल्याने ऑनलाइन सेवेकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. त्यामुळे भारतामध्ये देखील पिढ्यान्-पिढ्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसमोर ऑनलाइन सेवांचे मोठे आव्हान राहणार आहे. त्याला तोंड देण्यासाठी छोट्या व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा,’ असे मत पर्सिस्टंट सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्या वेळी ते बोलत होते. मालपाणी ग्रुपचे संचालक डॉ. संजय मालपाणी, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गांधी, उपाध्यक्ष मदनसिंह रजपूत, शिरीष बोधनी, दिलीप कुंभोजकर, सुरेश नेऊरगावकर, अरविंद पटवर्धन, रवी रणधीर, नितीन पंडित, प्रफुल्ल सुरपुरिया, मोहन साखरिया, सचिन जोशी, गणपत जैन, अनिल प्रभुणे, सुनील शिंगवी, विनायक पावगी, मोहन कुडचे, राजकुमार गोयल, सुनील इनामदार आदी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात दोराबजी अँड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फर्शिद पटेल यांना व्यापार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट दुकान पुरस्कार कुमार ऑप्टिकल्सचे मुकुंद जवाजीवार, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार नेहा स्टीकर्सचे चंद्रूलाल जाशनानी, फिनिक्स पुरस्कार किशोर पिरगल, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार चंदा मुनोत आणि साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार मानसी मळेकर यांना प्रदान करण्यात आले.
‘डोक्यात शांतता, तोंडात साखर आणि ह्रदयात ग्राहकांविषयी प्रेम या तीन गोष्टी उत्तम व्यावसायिकाकडे असतात. परंतु, त्या शिवाय सोशल माध्यमांचाही वापर त्यांनी करणे आवश्यक आहे. ग्राहकांना दिलेल्या सेवेतून मिळणारा आनंद हाच व्यवसायाची श्रीमंती आहे,’ याकडे मालपाणी यांनी लक्ष वेधले. दिलीप कुंभोजकर यांनी सूत्रसंचालन केले. मदनसिंह रजपूत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापचे ‘चलो दिल्ली’ ?

$
0
0

मराठीच्या अभिजात दर्जासाठी मोर्चेबांधणीला वेग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी आगामी साहित्य संमेलन दिल्ली येथेच व्हावे, अशी मोर्चेबांधणी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुरू केली आहे. अभिजातच्या मागणीची दखल केंद्र सरकारने घ्यावी, राष्ट्रीय स्तरावर मराठीला व्यासपीठ मिळावे, संमेलनाच्या माध्यमातून मराठीचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान व्हावा, या हेतूने साहित्य परिषदेने साहित्य संमेलन दिल्लीतच व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती या दोन ठिकाणांसाठी निमंत्रणे पाठवली आहेत. तसेच बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषद, नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी या स्थळासाठी निमंत्रण, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रम, दिल्लीतील दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थांनी संमेलनासाठी निमंत्रण दिले आहे.
एका ठिकाणाची निवड करण्यासाठी संमेलनस्थळ निवड समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक, साहित्य महामंडळाचे चार, मराठवाडा साहित्य परिषदेचा एक आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा एक अशा सात सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये परिषदेकडून प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. महामंडळाच्या सप्टेंबर महिन्यातील बैठकीपूर्वी संमेलनस्थळावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मार्गदर्शन समितीमध्ये साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, औरंगाबाद साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले-पाटील, मुंबई साहित्य संघाच्या उषा तांबे आदींचा समावेश आहे.

दिल्लीच्या गादीवर कोण?
दिल्लीसाठी मोर्चेबांधणी केली जात असून संमेलन दिल्लीत होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यास अध्यक्षपदाच्या रूपाने दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, यासाठीही चाचपणी सुरू झाली आहे. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिल्लीला आयोजनाचा मान देण्यात यावा यासाठी आग्रही असल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले.

साहित्य परिषदेने अभिजात दर्जासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. लेखकांच्या बैठका, पंतप्रधानांना एक लाख पत्रे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा अशा विविध माध्यमातून प्रयत्न केले आहेत. साहित्य संमेलन दिल्लीत झाले तर राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच सर्व मंत्री येऊ शकतात. यानिमित्ताने अभिजातचा विषय पुन्हा ऐरणीवर येईल तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठीचा सन्मान होईल. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संमेलनाचे अध्यक्ष होते, तर काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष होते. ६३ वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावर मराठीला व्यासपीठ मिळत असेल तर ही संधी असून त्यासाठी साहित्य परिषद आग्रही राहून प्रयत्न करेल.
प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष

महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसच चोरी करतात तेव्हा…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या (एचपीसीएल) पाइपलाइनला लोहगाव येथे वॉल्व्ह बसवून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश करून बुधवारी सहा जणांना अटक केली आहे. या टोळीत दोन फौजदार आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या आरोपींना कोर्टाने नऊ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

इस्माइल शेख (वय ६०, रा. चिंचवड), रवींद्र भिडे (वय ३५, रा. चंदननगर), सुहास ठोंबरे (वय २९, रा. दिवा पूर्व, जि. ठाणे), अविनाश शिवशरण (वय ३४, रा. वडगावशेरी), मोतीराम पवार (वय ३५) आणि दिनेश पवार (वय २३, दोघे रा. गणेशनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यांपैकी भिडे आणि ठोंबरे फौजदार असून, ते अनुक्रमे चंदननगर पोलिस ठाण्यात आणि ग्रामीण पोलिसांच्या शीघ्र कृती दलात (क्युआरटी) कार्यरत होते. शिवशरण हा चंदननगर पोलिस ठाण्यात शिपाई होता. काही महिन्यांपूर्वी ठोंबरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी त्याचे निलंबनही केले होते. त्यानंतर विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबन रद्द करण्यात आले. या पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच इस्माइलने डिझेलची चोरी केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोहगाव येथील तालेरा फार्म येथे एचपीसीएल कंपनीच्या डिझेल, पेट्रोलच्या पाइपलाइनला छिद्र पाडून सुमारे तीन लाख रुपयांचे डिझेल चोरल्याची तक्रार १२ मे रोजी राजेश वाघमारे (वय ५१, रा. लोणी काळभोर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक राजेंद्र कदम करत होते. त्यांनी परिसरातील डम डाटा काढून तपास केल्यानंतर आरोपी निष्पन्न झाले. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

असा केला गुन्हा

फौजदार ठोंबरे व भिडे हे एकाच ब्रँचचे अधिकारी आहेत. ठोंबरेला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्याची इस्माइलशी ओळख झाली. इस्माइलविरुद्ध २००७मध्ये भोसरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. फौजदार भिडे आणि कर्मचारी शिवशरण यांना हाताशी धरून ठोंबरेने लोहगाव परिसरातील एचपीसीएल कंपनीच्या पाइपलाइनला छिद्र पाडून डिझेल चोरी करण्याचा बेत आखला. पाइपलाइन सुमारे आठ फूट खोल असल्याने खड्डा खोदणे आवश्यक होते. त्यासाठी आरोपींनी मोतीराम आणि पवार यांना बोलाविले. इस्माइल ड्रीलची कामे करतो. ११ मे रोजी पहाटे चार वाजता आरोपींनी पाइपलाइनला दोन इंचाचे छिद्र पाडले. त्यामधून पाच हजार लिटर डिझेल काढले आणि एका टँकरमध्ये जमा केले. चोरलेले डिझेल त्यांनी लोणी काळभोर येथे विकले. त्यामधून त्यांना सुमारे साडेचार लाख रुपये मिळाले. ठोंबरे, भिडे आणि शिवशरण यांनी प्रत्येकी एक लाख २० रुपये घेतले, तर ५५ हजार रुपये दिनेश आणि मोतीराम यांना दिले. उर्वरित रक्कम इस्माइलला देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या आरोपींना पुढील तपासासाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन महात्म्यांच्या महात्म्यांचे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अहिंसेची शिकवण देणारे त्यांचे गुरू श्री राजचंद्रजी यांचा संवाद पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला. एका महात्म्याला घडवणाऱ्या महात्म्याचे दर्शन प्रेक्षकांना झाले.
श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर यांच्यातर्फे महात्मा गांधी व श्रीमद् राजचंद्रजी या गुरू-शिष्याच्या संबंधांवर आधारित ‘युगपुरुष महात्मांचे महात्मा’ या नाटकाचा प्रयोग नुकताच अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पार पडला. राजचंद्रजींनी महात्मा गांधींना दिलेली शिकवण, त्यांना केलेले उपदेश गांधीजींनी या शिकवणीचा स्वातंत्र्य चळवळीत केलेला वापर, असा सगळा प्रवास या नाटकातून उलगडण्यात आला. महापौर मुक्ता टिळक व पूज्य गुरूदेव राकेशभाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड या वेळी उपस्थित होते.
महात्मा गांधींना १७ भाषांचे ज्ञान होते. या नाटकातले संवादही विविध भाषांमध्ये लिहिण्यात आले होते. गुरू राजचंद्रजी यांच्याकडून जी शिकवण मिळाली तिचा उपयोग देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी यांनी कसा केला, हे या नाटकांतून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. राजचंद्रजी आणि महात्मा गांधींच्या संवादातून रंगमंचावर इतिहासाचे एक एक पान उलगडत जात होते. आणि रसिकांच्या अंगावर शहारे आणणारा इतिहास उलगडत होता. सत्य, अहिंसा या बळावर स्वातंत्र्य मिळवता येते ही शिकवण गांधीजींना राजचंद्रजी यांनीच दिली.
धर्माच्या आधारे माणसाकडे न पाहता केवळ माणूस म्हणून त्याकडे पाहणे आवश्यक आहे. तरच समाज एकजुटीने जगू शकतो, याचीही शिकवण गांधीजींना राजचंद्रजींकडून मिळाली, त्याबद्दल त्यांनी लिहूनही ठेवले आहे. असे अनेक प्रसंग रंजकपणे या नाटकातून मांडण्यात आले आहेत. आत्तापर्यंत या नाटकाचे ५५० प्रयोग झाले असून भारतभर हे प्रयोग व्हावेत, असा संयोजकांचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य सरकार घाबरले

$
0
0

खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘खऱ्या शेतकऱ्याचे ‘सर्टिफिकेट’ कोठे मिळत असेल, तर ते सरकारने सांगावे. नागपूरला रेशीमबागेत मिळणार असेल तर तेथून ‘सर्टिफिकेट’ घेऊन येतो आणि नंतर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला जाऊ,’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ‘राज्यात आलबेल आहे, असे सांगणारे सरकार राज्यातील आंदोलन पाहून घाबरले आहे,’ अशा शब्दांत शेट्टी यांनी तोफ डागली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी पुण्यात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘शेतकरी आंदोलनासंदंर्भात गुरुवारी नाशिक येथे सुकाणू समितीची बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही गेल्या सात दिवसांच्या आंदोलनाचा आढावा घेणार आहोत. आंदोलनाला नेमकी दिशा कशी द्यायची, राष्ट्रीय पातळीवर आंदोलन कसे नेता येईल याबाबत विचारविनिमय केला जाईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या देशासाठी होत्या. त्यामुळे शेतकरी आंदोलनातून देखील देशपातळीवर दबाव गट तयार व्हायला हवा. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन कसे नेता येईल याची दिशा निश्चित करू,’ असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

‘राज्य सरकार म्हणते राज्यात सर्व काही आलबेल आहे. मग आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न का केला जातो आहे,’ असा सवाल करून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ‘सर्वत्र आलबेल आहे असे म्हणणारे सरकार घाबरले आहे. राज्यात तीनशेपेक्षा अधिक बाजार समित्या सुरळीत सुरू आहेत, असे म्हणणारे सरकार संप काळात २७८ कोटींचे नुकसान झाले, असे म्हणते. मग सरकार घाबरले नाही, तर काय आहे? वेळीच सरकारने समस्येवर उतारा काढला नाही, तर त्याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा ही शेट्टी यांनी दिला.

मोदी खोटे बोलले...

‘निवडणुकीपूर्वी देशात स्वामीनाथन आयोग लागू करू. त्यांच्या सूत्रानुसार हमीभाव आणि कर्जमुक्ती देऊ, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. हमी भाव द्यायला तीन वर्षे लावली. आतापर्यंत तुम्ही दिले नाही. त्यामुळ मोदी खोटे बोलले आणि त्यांनी खोटे आश्वासन दिले हे कबूल करा,’ असे आव्हानही खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

सदाभाऊंचा निर्णय कार्यकारिणीत

संप मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊ खोत यांचा वापर केल्याचे दिसून आले. त्याबाबत शेट्टी म्हणाले, ‘संघटना कोणा एका व्यक्तीची नसते. किंवा एकट्यावर जगत नाही. सर्व सदस्य हे त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात. संप काळात मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊंचा वापर करून काट्याने काटा काढण्याची खेळी खेळली आहे. परंतु, सदाभाऊंसदंर्भात राज्य कार्यकारिणीत निर्णय घेऊ. तसेच पक्षाने सरकारला पाठिंबा दिला याचा पश्चाताप झाला आहे. त्यामुळे आत्मक्लेष यात्रा काढली आहे. सरकारमधून बाहेर पडायचे की नाही याबाबत कार्यकारिणीत निर्णय घेऊ.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाच्या अफवांचे पीक

$
0
0

दहावीच्या निकालाच्या तारखेबद्दल बोर्डाची बघ्याची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात दहावीच्या निकालाच्या तारखेवरून सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बघ्याची भूमिका घेतली आहे.

मंडळाचे अधिकारी निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्याऐवजी ‘निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करू, दोन ते तीन दिवसांत निकालाची तारीख सांगण्यात येईल, पुढच्या आठवड्यात निकाल लागेल,’ अशीच उत्तरे देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दहावीचा निकाल नेमका कधी लागेल याबाबत मंडळाकडून ठोस उत्तर न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून त्वरित निकाल जाहीर करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहावीचा निकाल साधारण जूनच्या पहिल्या आ‍‍‍ठवड्यात लागत आहे. मात्र, यंदा पहिला आ‍ठवडा उलटून गेला तरी मंडळाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. राज्यात दरवर्षी बारावीचा निकाल लागल्यानंतर सात ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये दहावीचा निकाल लागतो. गेल्या कित्येक वर्षांपासून अशाप्रकारे निकाल लागतो. मात्र, या वर्षी बारावीचा निकाल देखील उशिरा लागला. या निकालाच्या वेळी देखील सोशल मीडियाहून बारावीच्या निकालाच्या तारखा व्हायरल झाल्या. त्यानंतर निकालाच्या तारखांच्या अफवांचे पेव फुटल्याचे पाहून मंडळाने निकालाची तारीख उशिरा जाहीर केली.

राज्यात दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत पार पडली. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचे निकालाचे काम देखील पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, यंदाच्या दहावीच्या निकालाच्या तारखेवरून सोशल मीडिया आणि विशेषतः व्हॉट्सअॅपवरून अफवा पसविण्यात येत आहेत. काही व्हॉट्सअॅपच्या मेसेजमध्ये मंगळवार ६ जून ही दहावीच्या निकालाची तारीख म्हणून पसरविण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी दिवसभर निकालाबाबत गोंधळाचे वातावरण होते. यात आणखी भर म्हणजे काही मेसेजमध्ये ७ ते १० जूनपर्यंतच्या तारखांच्या अफवा व्हायरल केल्या जात आहे. काहींनी तर निकाल पुढच्या आठवड्यात लागणार असल्याचे मेसेज व्हायरल केले आहे. अशा परिस्थितीत मंडळाने निकालाची अधिकृत जाहीर करून अफवांवर पडदा टाकणे गरजे आहे. मात्र मंडळाने बघ्याची भूमिका घेतली आहे.

मंडळाने निकालाची तारीख जाहीर केल्यास विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम दूर होईल आणि अफवा थांबतील, असे पालकांनी सांगितले. दरम्यान, राज्यातून यंदा दहावीसाठी १७ लाख ६६ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ९ लाख ८९ हजार ९०८ विद्यार्थी, तर ७ लाख ७६ हजार १९० विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी राज्यातील एकूण ४ हजार ७२८ परीक्षा केंद्रांवरून परीक्षा दिली आहे.

मंडळाला अध्यक्ष नसल्याने उशीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची शिक्षण विभागाने माध्यमिक विभागाच्या संचालकपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. तसेच, म्हमाणे यांच्याकडे मंडळाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. त्यामुळे मंडळाकडे सध्या अध्यक्ष नाही. त्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मंडळाला नवीन अध्यक्ष मिळाल्यानंतर निकाल जाहीर होणार का, अशी विचारणा शिक्षण वर्तुळातून होत आहे. मात्र, मंडळाने निकालाची तारीख त्वरित जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
...
पालक आणि विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाच्या तारखांच्या अफवांबाबत विश्वास ठेऊ नये. दहावीचा निकाल पुढच्या आ‍ठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्याची माहिती प्रसारमाध्यमांतून देण्यात येणार आहे.
- कृष्णकुमार पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवकल्पनांमध्ये पुणे देशात दुसरे

$
0
0

आयटी कंपन्यांबद्दलचे सर्वेक्षण; बेंगळुरू पहिल्या स्थानी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) बहुतेक सर्व कंपन्या सतत अभिनव संकल्पना (इनोव्हेशन) राबविण्याचा प्रयत्न करतात. या कल्पना राबविण्यामध्ये पुणे हे देशात बेंगळुरू खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही एका अहवालातून पुढे आले आहे.

‘सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर असोसिशन पुणे’तर्फ (सीप) ‘पुणे- नर्चरिंग द फास्ट इमर्जिंग टेक इनोव्हेशन हब’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी ‘सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया’चे संचालक संजय गुप्ता, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, ‘सीप’चे अध्यक्ष आणि ‘थॉटवर्क्स’चे व्यवस्थापकीय संचालक समीर सोमण, ‘न्यूबॉक्स कन्सल्टिंग’चे संस्थापक आशुतोष पारसनीस, ‘केपीआयटी’चे मुख्य तांत्रिक अधिकारी अनुप साबळे, ‘सिंबायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स’च्या प्राध्यापिका अनिता पाटणकर, प्रा. अरविंद चिंचूरकर या वेळी उपस्थित होते. सिंबायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्‍‍सच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पुण्यातील विविध माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शंभराहून अधिक तंत्रज्ञ, व्यवस्थापक आणि तज्ज्ञांशी संवाद साधून हा अहवाल तयार करण्यात आला.

‘भविष्यामध्ये या अभिनव संकल्पना अधिक वेगाने राबविणे आवश्यक आहे. तसेच अभिनव संकल्पना पुढे आणणाऱ्या, तरुण मनुष्यबळाला चालना मिळेल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या पुढच्या काळामध्ये सध्याच्या काही नोकऱ्या कमी होतील, मात्र अनेक नव्या संधीही निर्माण होतील,’ असे पारसनीस यांनी नमूद केले.

‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सतत मोठे बदल घडत असून तरुण नवनव्या संकल्पना घेऊन येत आहेत. बाजारात नव्या संधीही निर्माण होत आहेत, मात्र तुमचे उत्पादन अभिनव असले पाहिजे,’ असे देशपांडे यांनी सांगितले.

‘जग झपाट्याने बदलत असून, उद्योगातील नेतृत्वाला अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘लिबरल आर्ट्‍‍स’सारख्या शिक्षण पद्धतीची आज गरज निर्माण झाली आहे,’ असे पाटणकर म्हणाल्या.

‘आपण विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि नव्या कल्पना ऐकल्या पाहिजेत. दूरच्या कोणत्या तरी देशासाठी, काही विकसित करण्याऐवजी इथल्या स्थानिक प्रश्नांसाठी, पुण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून उत्तर शोधले पाहिजे,’ असे साबळे म्हणाले.

‘इकोसिस्टीम’ची आवश्यकता

‘आयटी कर्मचाऱ्यांना तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे असणारी नवीन कौशल्ये आणि क्षमतांसह सुसज्ज करण्याची गरज आहे. कंपन्या, विद्यापीठे आणि महाविद्यालये, संशोधन प्रयोगशाळा, सरकारी एजन्सीज, स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, सल्लागार, इन्क्यूबेटर्स, बाजार, कर्मचारी अशा सगळ्यांनी एकत्रितपणे एक इकोसिस्टीम व इको कनेक्ट व्यासपीठ म्हणून काम करण्याची गरज आहे,’ असे ‘सीप’च्या अहवालात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृह परिसरात सनईचे सूर

$
0
0

माळरानावर सात एकरांवर लॉनची उभारणी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
कारागृह कर्मचारी कुटुंब कल्याण निधीतून खुल्या कारागृहातील माळरानावर सात एकरावर के. के. मंगल लॉन साकारण्यात आले आहे. कारागृह कर्मचाऱ्यांशिवाय बाहेरील लोकांसाठीदेखील लॉन भाडेतत्वावर उपलब्ध होणार असल्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

येरवडा मध्यवर्ती खुले कारागृहाच्या विश्रांतवाडी विमानतळ रस्त्याच्या कडेला कारागृह कर्मचारी कुटुंब कल्याण निधीतून उभारलेल्या के. के. मंगल लॉन्सचे उपाध्याय यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य शरद खटावकर, उपअधीक्षक दिलीप वासनिक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एकनाथ शिंदे आणि कारागृह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येरवडा खुल्या कारागृहाचा बराचसा भाग माळरान असल्याने या ठिकाणी शेतीदेखील नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा पडून आहे. अशा पडीक जागेचा वापर करून कारागृह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन कुटुंब कल्याण निधीतून सुमारे तीस लाख रुपये खर्च करून लॉनचे काम सुरू होते. राज्यात खुल्या कारागृहाच्या आवारात प्रथमच लॉन मंगल कार्यालय साकारले आहे. खुल्या कारागृहातील कैद्यांमार्फतच लॉनच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

सात एकरपैकी दोन एकरांवर लॉन विस्तारले असून पाच एकरावर वधू, वर कक्ष, डायनिंग हॉल, भव्य स्टेज, स्वच्छतागृह आणि विस्तीर्ण पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृह कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात लॉन उपलब्ध होणार आहे. याशिवाय बाहेरील नागरिकांना देखील या ठिकाणी भाडे भरून कार्यक्रम घेता येतील. बाहेरील नागरिकांकडून मिळणारे भाडे कर्मचाऱ्यांच्या निधीत जमा केले जाईल.

एसी बसवण्याची मागणी

खुल्या कारागृहात उभारलेल्या लॉनची भव्य आणि आकर्षक उभारणी झाली आहे. वर आणि वधू कक्षाच्या खोल्यांवर पत्रे असल्याने उकाड्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने किमान वधू कक्षात एसी बसवावा, अशी सूचना कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत विद्रूपीकरणाचा विळखा

$
0
0

विद्रूपीकरण प्रतिबंध कायदा कागदावरच

म. टा. प्रतिनिधी, बारामती
बारामती शहरात होर्डिंग, पोस्टरद्वारे होणारे विद्रूपीकरण थांबवण्यास नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे. पालिका प्रशासनाने मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याची अंमलबजावणी न केल्यामुळे बारामती शहरात अनेक भागांत बेकायदा होर्डिंग, पोस्टर यांच्यामुळे शहराचे सौंदर्य धोक्यात आले असल्याचे दिसत आहे.

बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. शहरांत होर्डिंग, पोस्टरद्वारे शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एक वर्षापूर्वी होर्डिंग व पोस्टरबंदी करून प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. होर्डिंग, पोस्टर बंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ (अ) नुसार कारवाई करण्यात यावी, असे सभागृहात ठरले. मात्र, या वर्षी या कायद्यांतर्गत एकही कारवाई केली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

शहरातील तीन हत्ती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम रोड, भिगवण चौक, शरदचंद्र उद्योग भवन पोर्च, सुभाष चौक, गांधी चौक, इंदापूर चौक-रोड, सिनेमा रोड, शिवाजी चौक, कसबा सर्कल, कसबा परिसर, भिगवण रोड, एमआयडीसी रोड परिसारत काही ठिकाणी होर्डिंग व पोस्टर मोठ्या प्रमाणात लागले आहेत. नगर परिषदेच्या समोरच प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वेगवेगळे क्लास, विविध संघटना, संस्था पोस्टर लावून जाहिरातबाजी करत आहेत. मात्र, प्रशासन आणि अतिक्रमणविरोधी विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
...
शहरामध्ये विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तीन झोनमध्ये विभागणी करून काम सुरु आहे. शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका
...
पुरेसे मनुष्यबळ मिळाले आहे. विद्रूपीकरण करणाऱ्यावर विद्रूपीकरण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. शहरातील होर्डिंग व पोस्टरचे पुरावे जमा करून गुन्हा दाखल केला जाईल.
- संजय प्रभुणे, अतिक्रमणविरोधी विभाग प्रमुख
...
स्वच्छ शहराचे विद्रूपीकरण थांबले पाहिजे. त्यासाठी अतिक्रमणविरोधी विभागाची मानसिकता बदलल्याशिवाय कारवाई अशक्य आहे. प्रशासनाने लोकाभिमुख काम केले पाहिजे.
- दीपक शितोळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात नवीन सफाई कंत्राटदार आणि जुने कामगार यांच्यात कामगारांना कामावर घेण्याचा वाद अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सातव्या दिवशीही प्रवेशद्वारावर कामगारांचे आंदोलन चालू होते. नवीन कंत्राटदाराने उद्या, गुरुवारपासून एकाही जुन्या कामगाराला कामावर घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात नव्याने नियुक्त झालेल्या सफाई ठेकेदार आणि जुने कर्मचारी यांच्यात कामगार घेण्यावरून वाद झाल्याने एक जूनपासून शेकडो कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनाचा सातवा दिवस होता.

रुग्णालय प्रशासनाकडून नवीन सफाई ठेकेदाराची नेमणूक करण्याची टेंडर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. टेंडर प्रक्रियेत विजय कांबळे यांनी सर्वांत कमी रकमेचे टेंडर भरल्याने त्यांना रुग्णालयाचे सफाईचे काम देण्यात आले. प्रशासनाकडून एक जूनला कांबळे यांना कामाचा ठेका देण्यात आल्याचा आदेश देण्यात आला.

‘ई-टेंडर प्रक्रियेत बारा लाखांचे सर्वांत कमी रकमेचे टेंडर भरल्याने सफाई कामाचे कंत्राट आपल्याला मिळाले आहे. प्रशासनाकडून एक जूनला सकाळी कामाचा आदेश मिळाल्याने कामाला सुरुवात केली. जुन्या कामगारांना घेण्यास तयार आहे. मात्र, युनियनचे पदाधिकारी खोडा घालत आहे. कामगारांची दिशाभूल करून आंदोलन होत आहे. मागील सात दिवसांपासून सर्व कामगारांना कामावर घेण्याची तयारी दर्शवली. पण त्यापूर्वी कोण कामगार आपल्या संस्थेत काम करणार आहेत त्याची माहिती देण्यासाठी अर्ज भरून देण्याची विनंती केली. मात्र, त्याला त्यांनी नकार दिला,’ असे नवीन कंत्राटदार विजय कांबळे म्हणाले. नवीन कामगारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गुरुवारपासून एकाही जुन्या कामगाराला कामावर घेणार नसल्याची भूमिका कांबळे यांनी घेतली आहे.
...
जुन्या कामगारांनी नवीन कंत्राटदराचे सभासद होण्याची अट शिथिल केल्यास सर्व कामगार कामावर रुजू होण्यास तयार आहेत. जुने कामगार नवीन कंत्राटदाराचे सभासद झाल्यास कामगारांचे अस्तित्व संपेल. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय कंत्राटदाराची कुठलीही अट मान्य करणार नाही.
- अजित अभ्यंकर, कामगार नेते
...
ई-टेंडर प्रक्रियेत विजय कांबळे यांनी कमी रकमेची निविदा भरल्याने मंजूर करण्यात आली आहे. नवीन कंत्राटदाराने कोणाला कामावर घ्यायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
- डॉ. भालचंद्र डोंगळीकर, अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औंधमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

कर्मचाऱ्याला शिवीगाळ झाल्याचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, औंध
औंध क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला नगरसेविकाच्या पतीने दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

औंध क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्याविरुद्ध भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे यांनी अतिक्रमण कारवाईचा संदर्भ देऊन शिविगाळ केली. कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचा निषेध व्यक्त करून क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

नगरसेविकेच्या पतीचा कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपाची तक्रार महापौरांकडेही करण्यात आली आहे. काही अठवड्यापूर्वी भाजपने नगरेविकांच्या पतींनी कामकाजात हस्तक्षेप करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. नगरसेविकांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांचा सल्ला ऐकावा लागत असल्याने अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात मधुकर मुसळे म्हणाले, ‘पालिका कर्मचाऱ्याला कोणतीही शिविगाळ केली नाही. एम्स हॉस्पिटलचा गैरप्रकार उघडकीस आणला, तसेच औंध परिसरातील पथारीवाल्यांचे प्रकार वारंवार कळवले. याचा राग मनात धरून माझ्याविरुध्द राजकीय षड्यंत्र रचले जात आहे. मी मागील वीस वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून औंधमधील प्रश्न हाताळत आहे.’ माजी महापौर दत्तात्रय गायवाड म्हणाले, ‘मागील २५ वर्षे औंध परिसरात अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून कामकाजात हस्तक्षेप करण्याचे प्रकार घडले नव्हते. कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्याच्या प्रकाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिरेगावच्या हद्दीत तरुणाचा खून

$
0
0

दौंड : जिरेगाव, भोळोबावाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील वनक्षेत्रात निर्जनस्थळी एका अज्ञात तरुणाचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी या सकाळी या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

अज्ञात तरुणाच्या खून प्रकरणी पांडुरंग लक्ष्मण खटके (वय ३६, रा. भोळोबावाडी, कौठडी, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खटके सकाळी आपल्या दुचाकीवरून जिरेगाव येथे जात होते. जाधवाडी जवळ आले असता दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून ते लघुशंकेसाठी वन विभागात गेले. त्या वेळी त्यांना संबंधित तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली.

अज्ञात तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. मृत तरुण अंगाने सडपातळ असून रंगाने गोरा आहे. त्याने राखाडी रंगाचा टी शर्ट, तसेच राखाडी रंगाची नाइट पँट परिधान केली होती. बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे, दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दौंड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्यांना मागणी; दर स्थिर

$
0
0

पुणे : शेतकरी संपाचा सातव्या दिवशी मार्केट यार्डात भाज्यांची कालप्रमाणेच ७० टक्के आवक झाली. खानावळ, तसेच हॉटेलचालकांकडून भाज्यांना आता मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी सारखी असल्याने कालच्या तुलनेत भाज्यांचे दर स्थिर आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संप सुरू आहे. काही दिवसांपासून शहरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, रविवारनंतर पुन्हा भाज्यांची आवक सुरू झाली. मंगळवारपासून भाज्यांची आवक पूर्वपदावर आली. त्यामुळे स्थानिक, तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या खरेदीदारांना भाज्यांची खरेदी करणे शक्य झाले आहे. परिणामी, संपाची धग कायम राहिली, तर पुन्हा संपाची तीव्रता वाढू शकते. या भीतीने अनेक खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात भाज्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. भाज्यांचा साठा होत असल्याने त्याचे दर वाढले आहेत. परंतु, भाज्यांच्या तुटवड्याच्या भीतीमुळे दरवाढ होत आहे.

‘मार्केट यार्डात बुधवारी भाज्यांची ७० टक्के आवक झाली. भाज्यांना बुधवारीही मागणी होती. त्यामुळे टोमॅटो वगळता अन्य भाज्यांचे दर कालप्रमाणेच १० ते २० टक्क्यांनी वाढलेले असले, तरी स्थिर होते. मागणीनुसार पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे भाज्यांना अधिक मागणी आली. खानावळ, किरकोळ विक्रेते, तसेच हॉटेलचालकांकडून मागणी वाढली,’ अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांप्रमाणे फळांना सध्या रमजानच्या उपवासामुळे मागणी वाढली आहे. फळांच्या आवकेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. फळांची आवक देखील ७० टक्क्यांपर्यंत आहे. तुलनेने आवक कमी झाल्याने सर्वच फळांना चांगले दर मिळत आहेत. फळांचा देखील काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे आहे, असे व्यापारी सांगतात. तर फुलांची देखील तीच परिस्थिती असल्याचे फूलबाजारातील व्यापारी सांगतात.

दूध पुरवठा सुरळीत

जिल्ह्यात शेतकरी संप सुरू असला, तरी कात्रज दूध डेअरीत बुधवारी १ लाख ७० हजार लिटर दुधाचे संकलन झाले. ‘संकलन केंद्रांवर दूध येऊ लागले आहे. त्यामुळे दुधाच्या वितरणावर आता अडचण येईल, असे वाटत नाही. गुरुवारपर्यंत दुधाचा पुरवठा सर्वत्र पूर्वपदावर येईल,’ असे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक ब्राह्मण नथुराम गोडसे नसतो

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

'सर्व जातींचा जातीयवाद भयंकर आहे. ब्राह्मणेतरांचा जातीयवाद ब्राह्मणांना लाजवेल असा आहे. प्रत्येक ब्राह्मण नथुराम गोडसे नसतो', अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी 'पुतळे आणि जातीयवाद' मुद्द्यावर सूचक भाष्य करत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना टोला लगावला आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या नाटककार राम गणेश गडकरी पुतळ्याच्या मुद्द्यावर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गडकरी यांच्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांवर होणारे सर्व आरोप खोडून काढणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव बेंद्रे यांचा पुतळा बसवावा अशी सूचना केली होती. त्या सूचनेचा धागा पकडून डॉ. सबनीस यांनी 'पुतळे आणि जातीयवाद' या विषयावर भाष्य केले आहे.

रंगत-संगत प्रतिष्ठानला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यात महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांच्या हस्ते रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांचा सत्कार करण्यात आला.

या विषयावर बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, कलेला जात, धर्म नसतो. लेखकांच्या पुतळ्यांपेक्षा त्यांची कलाकृती श्रेष्ठ असते. बेंद्रेंचाही पुतळा फो़डायला कमी करणार नाहीत. महापुरूषही सामान्य माणूस असतो. प्रतिभावंतांवर विवेकाची, साधने तपासण्याची गरज आहे. लेखकाच्या मर्यादा सांगताना पुतळे फोडणे हा लोकशाही मार्ग नाही. लेखकांच्या पुतळ्यांमध्ये जातीयवादाचा वास नको.

उद्याने ही झाडांची असतात, ती पुतळ्यांची नकोत असे म्हणत सबनीस यांनी समाज समंजस होत नाही तो पर्यंत पुतळा संस्कृती उपयोगाची नसल्याचे म्हटले आहे. कुणाचेही भक्त कुणाचाही पुतळा उभा करतील. उद्या सदानंद मोरे किंवा माझाही पुतळा उभा करतील. हे परवडणारे नाही. सर्व जातींचा जातीयवाद भयंकर आहे. ब्राह्मणेतरांचा जातीयवाद ब्राह्मणांना लाजवेल असा आहे. प्रत्येक ब्राह्मण काही नथुराम गोडसे नव्हे अशा शब्दांत श्रीपाल सबनीस यांनी जातीयवादावर बोट ठेवले आहे.

या कार्यक्रमात उपस्थित असलेले वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनीही डॉ. सदानंद मोरे यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले. फुटाणे म्हणाले की, सदाआनंद देणारी माणसे कमी भेटतात. बागेतल्या पुतळ्यांना आता आपोआप पाय फुटतील. बागेत सदाआनंद देणाऱ्या सदाआनंदाचा पुतळा बसवावा. त्यामुळे भांडणे आपोआप मिटतील, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यावर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिसेवक परीक्षेची आज ‘मॅट’मध्ये सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकार कृषिसेवक पदासाठीच्या फेरपरीक्षेसाठी चालढकल करत असल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी मनविसेच्या मदतीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी आज, गुरुवारी आहे. परीक्षार्थ्यांनी भारांकन पद्धत रद्द करून फेरपरीक्षा घेण्यासाठी मॅटमध्ये दाद मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी कृषी आयुक्तालयातर्फे ७३० कृषिसेवक पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडे देण्यात आली होती. परिषदेने परीक्षा पार पाडण्यासाठी गजानन एंटरप्रायजेससोबत करार केला. मात्र, या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले. त्यामुळे राज्यात ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे बंडगार्डन पोलिस ठाण्यात परीक्षा परिषद आणि गजानन एंटरप्रायजेसवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लेखी परीक्षा रद्द करून भारांकन पद्धतीने कृषिसेवकांची निवड करण्याचे आदेश दिले, मात्र, या भारांकन पद्धतीमुळे बहुतांश हुशार व होतकरू विद्यार्थी निवड प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. तसेच, लेखी परीक्षेला अनुपस्थित राहिलेले परीक्षार्थी भारांकन पद्धतीमुळे कृषिसेवक पदासाठी पात्र झाले आहेत. भारांकन पद्धतीमध्ये दहावीच्या आणि पदवी अथवा पदविकेच्या एकत्रित गुणांवर गुणवत्ता यादी तयार करण्यात येत आहे. या निकषावर गुणवत्ता यादी तयार करताना २००० ते २००७ आणि २००८ ते २०१६ या दरम्यान दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि नव्या पद्धतीमुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत आहे. २००८ सालापासून २० टक्के प्रात्यक्षिकांचे वाढीव गुण गिले जातात. अशातच २०१० पासून ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पद्धत लागू झाली. दरम्यान, २००० ते २००७ सालापर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे वाढीव गुण देण्याची पद्धत नव्हती. या सर्वांवर ‘मटा’ने वृत्तांद्वारे प्रकाश टाकला आहे.
आज मॅट’मध्ये होणाऱ्या सुनावणीकडे राज्यातील ४० हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर मनसेचे नेतृत्व आता अजय शिंदेंकडे

$
0
0

दोन शहराध्यक्षांच्या प्रयोगावर लाल फुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन शहराध्यक्षांच्या प्रयोगावर फुली मारून शहराचे अध्यक्षपद अजय शिंदे यांच्याकडे सोपविले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच परिवर्तन करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
पालिका निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी मनसेने अजय शिंदे यांच्यासह हेमंत संभूस यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या दोघांकडे प्रत्येकी चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाचे शहर पातळीवरील नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. निवडणुकांनंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेल्या आढाव्यानंतर काही धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यात संघटनात्मक बदल करण्यात आले असून, आगामी काळात आणखी नवे बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
‘पक्ष संघटनेतील व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक पद एक जबाबदारी, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, अजय शिंदे यांच्याकडे संपूर्ण शहराची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे यांनी दिली. निवडणुकीमध्ये चार महत्त्वाच्या मतदारसंघांची धुरा वाहणाऱ्या हेमंत संभूस यांच्याकडे लवकरच नवीन जबाबदारी देण्यात येईल, असेही संकेत त्यांनी दिले.

दोन प्रमुखांची पद्धत जुनीच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या अनुपस्थितीत दोन कार्याध्यक्ष नेमले होते. निवडणुकीपूर्वी सर्व जबाबदारी चव्हाण यांच्याकडे देण्यात आली होती. मनसेने दोन शहराध्यक्षांचा प्रयोग करण्यापूर्वी शिवसेनेनेही दोन शहरप्रमुख नेमले होते. श्याम देशपांडे आणि अजय भोसले यांच्याकडे प्रत्येकी चार मतदारसंघांची जबाबदारी होती. त्यानंतर, विनायक निम्हण यांना पक्षात प्रवेश देतानाच, शहरप्रमुख म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली गेली. त्यामुळे, दोन शहराध्यक्ष/कार्याध्यक्ष या विकेंद्रीकरणातून पक्षाला फायदा होण्याऐवजी कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढत असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images