Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संपामुळे शहरात दुधाचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी संप आणि महाराष्ट्र बंदच्या हाकेचा परिणाम शहरातील दूध वितरणावर झाला. त्यामुळे शहरात दुधाचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. उद्या पुन्हा दूधपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.
शेतकरी संपामुळे काही दिवसांपासून शहरात येणाऱ्या गोकुळ, चितळे या दुधाच्या वितरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दूध खरेदी करणाऱ्यांना जादा पैसे देऊनही दूध उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांची अडचण निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर दूध संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले.
‘शेतकरी संप; तसेच महाराष्ट्र बंदमुळे ओतूर, वरवंड, अवसरी येथे दूध संकलन अर्थात शीतकरण केंद्रे बंद पडली. ते केवळ २० टक्के दूध संकलन झाले आहे. बंदमुळे दूध शहरात येणे अवघड झाले आहे. त्यामुळे उद्याच पोलिस सरंक्षणात दूध संकलन करून डेअरीमध्ये आणले जाईल. उद्या दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कात्रज दूध डेअरीमधून मंगळवारी ३० ते ३५ टक्के अर्थात सुमारे ७० ते ८० हजार लिटर दूध उपलब्ध होईल,’ अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.
‘चितळे दूध’चे प्रवक्ते गिरीश चितळे म्हणाले, ‘शहरात आमचे साडेचार लाख लिटर दूध विकले जात आहे. नेहमीप्रमाणे दूधपुरवठा असून महाराष्ट्र बंदमुळे संकलनावर परिणाम झाला आहे; परंतु वितरणावर परिणाम होणार नाही. मंगळवारी दूध उपलब्ध होईल. सोमवारी मात्र दुधाचा तुटवडा होता.’
‘पुण्याच्या जवळील भागातून मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध झाले नाही. सुमारे तीन हजार लिटर दूध उपलब्ध झाले. महाराष्ट्र बंदमुळे अमृततुल्यांकडून फारशी मागणी झाली नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा सारखा होता,’ असे पुणे शहर दूध खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तत्काळ कर्जमुक्ती; अन्यथा आंदोलन करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतमालास हमीभाव घेण्यासंदर्भात राज्य सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेऊन आंदोलन करावे लागेल,’ असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कामगार युनियनच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, सोमवारी बाजार बंदच्या आंदोलनामध्ये सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी संस्थेचे कामगार युनियनचे अध्यक्ष नितीन जामगे, सचिव संतोष नांगरे, विलास थोपटे, संजय साष्टे, भरत शेळके, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, प्रवीण पाटील, महात्मा फुले संघटनेचे अंकुश हारपुडे आदी उपस्थित होते.
‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, त्यासाठी सरकार ३० हजार कोटींची तरतूद करील, हमीभावाबाबत कायदा करू आणि शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणाले. ही बाब मात्र शंकास्पद वाटत आहे. त्यासाठी सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी. तसेच त्याची अंमलबजावणी बाजार समित्यांना करण्यास सांगायला हवे,’असे डॉ. आढाव म्हणाले.
दूधाबाबत महासंघ आणि सरकार यांच्यात ३० जूनपर्यंत बैठक होऊन त्यामध्ये दरवाढीविषयी निर्णय घेण्यात येईल. संपाच्या काळात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात येतील. परंतु, जे शेतकरी नाहीत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले. परंतु, पेन्शन, शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा आक्रमक; राज्य ‘बंद’

$
0
0

टीम मटा, पुणे

संपूर्ण कर्जमाफीसह हमीभाव आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी संपातील आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून सोमवारी विविध शेतकरी संघटनांतर्फे पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने बळीराजा आक्रमक झाल्याचे दिसून येत असून, ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला, तर काही ठिकाणी रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळित झाली. शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुकाणू समितीची येत्या गुरुवारी (८ जून) बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल.

शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथून नाशिक जिल्ह्यात सरकले असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक आक्रमक झाले आहेत. संतप्त जमावाने एसटी बसना लक्ष्य केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी आणि अंबोली फाटा येथे दोन बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये एक जण जखमी झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. आंदोलकांनी महामार्गांऐवजी आता ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळते आहे.

शेतकरी संपाचा जिल्ह्यातील विविध बाजारपेठांवर विपरीत परिणाम झाला असून, तेथील व्यवहार अजूनही पूर्वपदावर येऊ शकलेले नाहीत. संपामुळे कळवण, घोटी, सटाणा, येवला, चांदवड, सुरगाणा तालुक्यातील हतगड येथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

खान्देशात संमिश्र प्रतिसाद

जळगाव : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांसाठी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला सोमवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरातील सर्व मार्केट सकाळपासून सुरळीत सुरू होते. बाजार समितीत मालाची आवक मात्र ५० टक्क्यांनी कमी झाली होती. चाळीसगाव, पारोळा, चोपडा, मुक्ताईनगर या तालुक्यात बंदला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, प्रतीकात्मक अंत्ययात्रेसह मोर्चे काढून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. सोमवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संप स्थगित करण्यात येत असल्याची माहिती किसान समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी ‘मटा’ला दिली.

मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद

मराठवाड्यात भाजप वगळता सर्वपक्षाकडून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा म्हणून सोमवारी पाळण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये आंदोलनकत्यांनी तीन बस फोडल्या. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही ठिकाणी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. लातूरमध्ये विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास बस वाहतूक बंद पाडली. औरंगाबाद शहरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

दक्षिण महाराष्ट्रात ‘बंद’

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शेतकरी संघटनांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बाजार बंद पाडले.

‘चर्चा खऱ्या शेतकऱ्यांशी’

‘मी खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणार नाही’, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतली. ‘दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे’, असेही ते एका कार्यक्रमात म्हणाले.

खोत यांच्यावर कडूंची टीका

राज्यात प्रथमच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली हे आंदोलनाचे मोठे यश असून, सरकारतर्फे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर शेतातील बुजगावण्यासारखा केला जात आहे, अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे.

पुढील रणनीती आठ जूनला

शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी ८ जूनला सुकाणू समितीची बैठक होणार आहे. या समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, माकपच्या किसान सभेचे अजित नवले, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, संतोष वाडेकर, संजय पाटील, विजय जावंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले, डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरधर पाटील, गणेश कदम, करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट अशा २१ जणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदमुळे नाही भाज्यांना वाली

$
0
0

खरेदीअभावी भावात मोठी घसरण; बाजारात शुकशुकाट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी संपामुळे मार्केट यार्डात सोमवारी फळभाज्यांची आवक घटली असली तरी, भाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. भाज्यांची आवक कमी होत असूनही ग्राहकांअभावी माल पडून राहिल्याचे दिसून आले. त्याची परिणती भाजांचे दर घसरण्यावर झाली.
संपामुळे शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली होती. त्यात रविवारी समाधानकारक आवक झाली. मात्र, सोमवारी महाराष्ट्र बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भीतीपोटी माल बाजारात आणला नाही. सोमवारच्या बंदच्या भीतीपोटी खरेदीदारांनी रविवारीच माल खरेदी केला. त्यामुळे सोमवारी बाजारात ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे सकाळी दहा वाजेनंतर बाजारात शुकशुकाट होता.
‘मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी अतिशय कमी प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला. मात्र, बंदमुळे स्थानिक तसेच जिल्ह्यातील ग्राहक खरेदीदार खरेदी करण्यास धजावले नाहीत. त्यामुळे भाज्या पडून होत्या. भाज्यांची आवक घटली असली तरी खरेदीदार नसल्याने भाज्यांच्या दरात रविवारच्या तुलनेत निम्म्याने घसरण झाली. भाज्यांचे दर घसरल्याने आवक घटली,’ अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

बंदचा परिणाम नाही
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु, त्याचा पुणे शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मार्केट यार्डात भाज्यांची आवक सोडली तर अन्य व्यवहार सुरळीत सुरू होते. हॉटेल, चहाच्या टपऱ्या, पानटपरीपासून पेट्रोलपंपापर्यंत सर्वच यंत्रणा सुरू होत्या. त्यामुळे कोठेही गोंधळ, हिंसक प्रकार आढळला नाही.

बालगंधर्व चौकात आंदोलन
बंदच्या पार्श्वभूमीवर काही शेतकरी संघटनांनी बालगंधर्व चौकात आंदोलन केले. मात्र, आंदोलकांची तुरळक संख्या होती. काही वेळ आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कुख्यात जफर इराणीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, पोलिस बतावणी करून फसवणूक अशा विविध गुन्ह्यांत राज्यातील पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार जफर इराणी याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पुणे व परिसरातील तब्बल ५१ गुन्हे उघडकीस आणले असून दोन किलो सोने, ६६ लाख रुपये रोख, तीन लाख रुपयांचे परकीय चलन, चांदी असा एक कोटी ४० लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जफर शाहजमान इराणी (वय ३८, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, सध्या दौंड) आणि त्याचा साथीदार अमजद रमजान पठाण (वय ३५, रा. परळी वैजनाथ, बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जफर हा सतत नवीन साथीदार घेऊन गुन्हे करीत होता. त्याने गेल्या तीन वर्षांत केलेले सोनसाखळी चोरीचे १८, घरफोडी ५, फसवणूक १८, इतर चोरी नऊ आणि वाहनचोरी एक असे ५१ गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघांना कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तपासात आणखी काही गोष्टी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इराणी हा मंतरवाडी उंड्रीमार्गे कोंढवा येथे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून इराणी व पठाण यांना पकडण्यात आले. इराणी याच्या घरातून तब्बल एक कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इराणी याच्यावर पूर्वीचे बारा गुन्हे दाखल आहेत. २०१३पासून तो बाहेर आहे. त्याने पुणे, पुणे ग्रामीण व इतर जिल्ह्यांसह दुसऱ्या राज्यातही गुन्हे केले आहेत.

पोलिस असल्याची बतावणी करून गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. त्याच्याकडे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र सापडले आहे. लष्कराचा पोशाखही जप्त करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर करून तो नागरिकांना फसवित होता. तसेच, त्याने काही जणांस परदेशी चलन बदलून देण्याच्या आमिषाने फसविल्याचे समोर आले आहे. जफर इराणी हा हिंदुस्तानी इराणी संघ अशा संघटनेचा अध्यक्ष म्हणून शहरात सर्वत्र वावरत होता. या संघटनेच्या नावाखाली तो मोठमोठ्या राजकीय व्यक्तींनाही तो भेटत असल्याचे समोर आले आहे.

दीड एकर जमीन, आलिशान फार्म हाउस

जफर इराणी हा लोणी काळभोर येथे राहण्यास होता. पण, त्याने काही वर्षापूर्वी दौंडजवळील कंजारी वस्ती येथे दीड एकर जमिनीवर आलिशान फार्म हाउस बांधले आहे. आठवड्यातून दोन दिवस तो या ठिकाणी राहत होता. या मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे साधारण दीड कोटी रुपये किंमत आहे. हे फार्म हाउस त्याने चोरीच्या पैशांतून खरेदी केल्याची शक्यता आहे. सारा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतांजन पूल पाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटकांचे आकर्षण असलेला आणि अलिकडच्या काळात अपघात व वाहतूक कोंडीचे केंद्र अशी ओळख निर्माण झालेला पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन १८६ वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाखाली अवजड वाहने अडकून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) यासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, हा पूल पाडण्यासंबंधी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’च्या निर्मितीपूर्वी पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक अमृतांजन पुलावरून होत होती. एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर या पुलाला समांतर असा दुसरा पूल बांधण्यात आला. तेव्हापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, आता हा पूल मोडकळीस आला असून, त्याचा वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला असून, २४ जुलैपर्यंत हरकती मागविल्या आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रवासादरम्यान अमृतांजन पॉइंटवर मोठ्या संख्येने प्रवासी थांबतात. सह्याद्रीचा उंच सुळका असलेला नागफणी डोंगराचा परिसर, हिरवाईने नटलेली दरी, बोगद्यातून लपंडाव खेळत जाणारी रेल्वे, खोपोली शहराचा परिसर, खंडाळा घाटातील नागमोडी वळणे पाहायला मिळत असल्याने येथे पर्यटकांचा ओढा असतो. या दोन्ही पुलांत साधारण पाच फुटांचे अंतर आहे. या पुलावर गवत वाढल्याने दोन पुलांतील अंतर लक्षात येत नाही. यामुळे अनेकदा पर्यटक पाय घसरून खाली पडले आहेत, तर अनेकदा उत्साही पर्यटक स्टंटबाजी करताना खाली पडून मृत पावले आहेत. तसेच, या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. हे चित्र नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे, लोखंडी जाळी बसविण्याची मागणी महामार्ग पोलिसांनी यापूर्वी वारंवार केली होती. त्यामुळे आता अडथळाविरहित वाहतुकीसाठी हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी विमानतळ अखेर 'टेक ऑफ'साठी सज्ज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | पुणे

साई भक्तांसाठी खुशखबर...शिर्डीला आता हवाई मार्गानं पोहोचणं शक्य होणार आहे. बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळ अखेर व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने(एमएडीसी) याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. शिर्डी विमानतळावरून पुढील महिन्याच्या सुरुवातीला विमान प्रवासी सेवेला सुरुवात होणार असून 'एअर इंडिया' यात पुढाकार घेणार आहे. त्यानंतर 'ट्रूजेट'सुद्धा येथून विमानसेवेला सुरूवात करणं अपेक्षित आहे, अशी माहिती 'एमएडीसी'चे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक सुरेश काकनी यांनी दिली.

मुंबईत बुधवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत (एएआय) होणाऱ्या बैठकीकडे आता 'एमएडीसी'च्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. शिर्डी आणि पुणे विमानतळाबाबतच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

शिर्डी विमानतळाला नागरी हवाई वाहतूक विभागाकडून आवश्यक परवानगी न मिळाल्याने विमानसेवा रखडली होती. येत्या दोन आठवड्यांत 'एमएडीसी'ला विमान उड्डाणासाठीची परवानगी मिळणं अपेक्षित आहे.

विमान सेवेसाठी शिर्डी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले असून येत्या आठवड्यात विमानतळाची पाहणी करण्यात येईल. पुढे कोणत्याही क्षणी येथून विमानसेवेला सुरूवात होईल, असं 'एमएडीसी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियभंग करणाऱ्या व्यक्तीला वाहतूक पोलिसाची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बाणेरकडून येणाऱ्या रस्त्यावरून एक दाम्पत्य विरुद्ध दिशेने आल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेटसमोर मंगळवारी सकाळी मारहाण केली. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत गेल्यामुळे शेवटी प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मंगळवारी सकाळी वाहतूक शाखेतील एक उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी एका महाविद्यालयातील प्राध्यापक आणि त्यांची सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेली पत्नी दुचाकीवरून ‘नो एंट्री’तून तेथे आल्याने त्यांना आडविले. दंडाची पावती करताना बाचाबाची झाली. त्यावरून उपनिरीक्षकाने प्राध्यापकाला गाडीवरून खाली खेचत हवालदारांच्या मदतीने मारहाण सुरू केली. त्यावेळी त्या व्यक्तीची पत्नी मध्ये आल्यानंतर त्यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की झाली. या वेळी एका पत्रकाराने हा प्रकार पाहून त्यांच्याकडे मारहाणीबाबत विचारणा केली. मात्र, काही दाद न दिल्यामुळे त्याने हा प्रकार पोलिस आयुक्तांना फोनकरून कळविला. त्यामुळे चिडलेले उपनिरीक्षक पत्रकार व त्या दाम्पत्याला चौकीत घेऊन गेले. पत्रकाराला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शेवटी हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले. त्या पती-पत्नीने आम्ही नोकरदार आहोत. आम्हांला कोणतीही तक्रार द्यायची नाही. आम्हांला दंडाची रक्कम भरून सोडण्यात यावे, अशी मागणी केली. संबंधित अधिकाऱ्याने देखील आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले व कोणतीही तक्रार एकमेकांविरोधात नसल्याचे सांगत प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
रहाटणी येथे २३ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घरात ओढणीच्या साह्याने गळाफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी (५ जून) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. संगमेश बिराजदार (२३, रा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सोमवारी त्याचे सर्व कुटुंबीय लग्नासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी संगमेशने घरात ओढणीने गळफास घेतला. दरम्यान, संगमेशला घरच्यांनी फोन केले असता संपर्क होत नसल्याने त्याच्या वडिलांनी संगमेशला आणण्यासाठी एका नातेवाइकाला पाठवले. त्यावेळी खिडकीतून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी वाकड पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांचा मुलगा दिघीतून बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
दिघीतील आदर्शनगर येथील ज्ञानदीप बालगृहातून १० वर्षांचा मुलगा २ जून पासून बेपत्ता झाला आहे. संतोष शिवाजी पवार असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. संतोष कोणालाही काहीही न सांगता दुपारी दीड वाजता बेपत्ता झाला आहे. गहूवर्ण, अंगाने सडपातळ, उंची ३ फूट ५ इंच, नाक सरळ, डोळे काळे, चेहरा उभट, गळ्यात देवाची माळ, अंगात क्रिम रंगाचा शर्ट व काळी पँट, पायात काळी चप्पल असे त्याचे वर्णन आहे. अशा वर्णनाचा मुलगा कुणाला आढळून आल्याल त्यांनी दिघी पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी दिघी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात गाळयुक्त शिवाराची ७४ कामे पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने जलयुक्त शिवारापाठोपाठ गाळयुक्त शिवारांच्या कामांची मोहीम हाती घेतली असून त्याच्या कामांना पुणे जिल्ह्यात वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत गाळयुक्त शिवाराची ७४ कामे प्रगतीपथावर आहेत. तर जिल्ह्यातील ६९ पाझर तलाव आणि ५ साठवण बंधाऱ्यांमधून गाळ काढण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ही कामे सुरू आहेत. अद्यापपर्यंत १२८.५८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे; तर ५० हेक्टरवर अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. पाण्याची कमी प्रमाणात साठवणूक होते. ही कामे हाती घेण्यात आली असल्यामुळे तलावांमधील गाळ हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होते. जिल्ह्यात ३६.५१ लाख रुपयांची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे, अशी माहिती छोटे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. जे. निकडे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या १० जून रोजी गाळयुक्त शिवाराच्या सर्व कामांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत.
दरम्यान, २०१६ ते १७ या वर्षात जलयुक्त शिवाराची ११२कामे मंजूर करण्यात आली होती. त्यातील ४१ कामे पू्ण झाली आहेत. तर ६९ कामे प्रगतीपथावर झाली आहेत. या जलयुक्त शिवाराच्या कामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये पावसाचे पाणी जास्तीत जास्त गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, नवीन पाझर तलाव, गाव तलाव, तलाव, विहिरीतील गाळ काढणे अशी कामे करण्यात आली आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेपुढे करवसुलीचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आगाऊ मिळकतकर भरणाऱ्यांना सवलत योजना जाहीर केली असली तरी करवसुलीच्या आव्हानामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
करवसुलीसाठी पालिका प्रशासनाने सवलत योजनेबरोबरच धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने कर थकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्या धास्तीने थकबाकीदार असलेल्या ३५ शाळांपैकी दहा शाळांनी आजअखेर एक कोटी ४७ लाख रुपयांचा थकीत कर जमा केला आहे. काही शाळांनी मुदतवाढ मागितली आहे. तर, दहा शाळांनी पालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.
महापालिकेने शंभर टक्के मिळकतकर वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१७ पूर्वी शहरातील काही थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. मात्र, परीक्षा चालू असल्यामुळे थकबाकीदार शाळांवर कारवाई केली नाही. परीक्षा झाल्यानंतर थकबाकीदार शाळांवर मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली. त्यासाठी मोठी थकबाकी असलेल्या ३५ शाळांना जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यानंतर चार शाळांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच इतर वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने, अनेक शाळांनी कर भरण्यास प्राधान्य दिले आहे.
त्याअंतर्गत तळवडेच्या सरस्वती विद्यालयाने १२ लाख, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाने दहा लाख, थेरगावच्या लक्ष्मीबाई तापकीर शाळेने ३३ लाख, भोसरीच्या आदर्श बालमंदिर शिक्षण संस्थेने सहा लाख ९० हजार रुपयांचा कर भरला आहे. चिखलीतील गणगे प्रशालेने नऊ लाख १८ हजार, किवळेच्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने १७ लाख ६६ हजार, थेरगावच्या रोजेस स्कूलने १६ लाख ७४ हजार, थेरगावच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज आणि ब्लॉसम पब्लिक स्कूलने १५ लाख ७७ हजार, नेहरूनगरच्या वसंतदादा पाटील शाळेने एक लाख, निगडीच्या अपंग मित्रमंडळने ५० हजार, तळवडेच्या ज्ञानप्रभात विद्यामंदिरने पाच लाख रुपयांचा थकीत कर भरला आहे.
शाळा ही धर्मादाय संस्था असून, त्यांच्याकडून व्यापारी दराने मिळकतकर वसूल करू नये, या मागणीसाठी काही शाळांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये जयहिंद सिंधू ट्रस्ट, बजाज ऑटो एम्प्लाईज वेल्फेअर फंड, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, आकुर्डी व चिंचवड येथील चंद्रकला किशोरीलाल गोयल विद्यामंदिर, प्रथमेश एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी बसचे ‘बॉडी बिल्डिंग’

$
0
0

पीएमपी बसचे ‘बॉडी बिल्डिंग’

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गेल्या अडीच वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या बसपैकी सुमारे शंभर बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसतील. या बसची दुरुस्ती पीएमपीच्या स्वारगेट आणि निगडी येथील वर्कशॉपमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये बसचे बॉडी बिल्डिंग, एअर सस्पेंशन आणि अन्य प्रकारची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात स्व-मालकीच्या आणि कंत्राटी मिळून एकूण १९८६ बस आहेत. यामध्ये ११३३ बस पीएमपीच्या आहेत. पीएमपीच्या मालकीच्या २०० बस पीपीपी तत्त्वावर चालविण्यात दिल्या आहेत, तर ६५३ बस भाडेकराराने घेतल्या आहेत. पीएमपीकडील ११३३ बसपैकी ८०८ बस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. ३०६ बस कायमस्वरुपी बंद आहेत. यापैकी सुमारे शंभर बसच्या बॉडी बिल्डिंगपासून आव‍श्यक सर्व कामांसाठी पीएमपीकडून टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. पीएमपीच्या वर्कशॉपमध्ये, पीएमपीचे स्पेअरपार्ट्स वापरून केवळ कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीतील सूत्रांनी दिली.
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून बसची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामध्येही पीएमपीच्या मालकीच्या बसची संख्या वाढविण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे पीएमपीच्या बंद असलेल्या बस तातडीने दुरुस्त करण्याला त्यांचे प्राधान्य आहे. त्यासाठी त्यांनी वर्कशॉपमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत ३० बंद बस सुरू करण्यात आल्या आहेत.

दोन महिन्यांत संख्या वाढणार
पीएमपीच्या ताफ्यातील १९८६ बसपैकी सरासरी १४९३ बस मार्गावर धावतात. यामध्ये पीएमपीच्या स्वतःच्या ७९३ आणि भाडेतत्त्वावरील ७०० बसचा समावेश आहे. या शंभर बसचे काम होऊन त्या टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल होणार आहेत; तसेच दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या दोनशे बसपैकी काही बस जून अखेरपर्यंत आणि काही बस जुलै महिन्यात दाखल होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यातील आणि विशेषतः मार्गावरील बसची संख्या वाढणार हे निश्चित आहे, असे सूत्रांनी सांगि

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ पूल पाडण्यासाठी पुणेकराचा पाठपुरावा

$
0
0

‘तो’ पूल पाडण्यासाठी पुणेकराचा पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्यात यावा, यासाठी पुण्यातील सुधीर थत्ते गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाठपुरावा करीत होते. अखेर ‘एमएसआरडीसी’ने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन १८६ वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी हा पूल पाडण्यासंबंधी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या पुलाखाली अवजड वाहने अडकून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. थत्ते यांनी २२ जून २०१५ रोजी ‘एमएसआरडीसी’ला पत्र पाठवून तेथील सद्यस्थिती कळविली होती; तसेच वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी यामध्ये काही उपाय सांगितले होते.
हा पूल ५०० मीटरचा आहे. यातील १०० मीटरचा भाग तोडला, तरी पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरील वाहतुकीची परिस्थिती सुधारणार आहे. यामुळे वेळेची बचत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, रस्त्याचा टिकाऊपणा वाढेल आणि मुख्य म्हणजे वाहतूक सुरळीत चालेल, असे थत्ते यांचे मत आहे. या पूलाजवळ असलेला ‘यू-टर्न’ भराव टाकून उंच केल्यास चढ आणि उतार एका पातळीवर येऊन वाहनचालकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. थत्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याबाबत पत्र पाठविले होते.
..........

… म्हणून नाव अमृतांजन पूल
पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे वाहतुकीसाठी १८३० साली ब्रिटिशांनी हा पूल बांधला होता. या पुलावर बऱ्याच वर्षांपूर्वी अमृतांजन बामची जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे या पुलाला अमृतांजन पूल नाव पडले. हा पूल गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्याखालून महामार्गाची वाहतूक चालते. तेथे अरुंद रस्ता असल्याने वाहतुकीला अडसर ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभाग होणार ‘कॅशलेस’

$
0
0

अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात

पुणे : आरोग्य विभागात राबविण्यात येणाऱ्या गर्भवती महिला, आशा कार्यकर्तींसह विविध योजनांतर्गत व्यक्तींना देण्यात येणारे अनुदान आता त्यांच्या हातात न मिळता थेट बँकेत जमा होणार आहे. म्हणजेच आरोग्य विभागाचा आर्थिक कारभार आता ‘कॅशलेस’ होण्याच्या मार्गावर आहे.

आरोग्य विभागात अनेकदा विविध कारणास्तव भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वारंवार झाला. औषधाच्या खरेदीपासून ते ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या खरेदीतील भ्रष्टाचार अनेकदा उघडकीस आला आहे. त्यामुळे थेट व्यवहार करणे अथवा आर्थिक उलाढाल करण्यावर अनेकदा निर्बंध आणण्यात आले होते. नोटाबंदीच्या काळानंतर देशात ‘कॅशलेस’ व्यवहाराचा बोलबाला सुरू झाला. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना त्यांच्या विविध विभागांमधील व्यवहार ‘कॅशलेस’ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने गेल्या वर्षीपासून त्याला प्रारंभ केला होता. परंतु, त्यात यश आले नव्हते. अखेर या वर्षी आरोग्य विभागात संपूर्ण व्यवहार ‘कॅशलेस’ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालकांची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे मिशन संचालक प्रदीप व्यास यांनी नुकतीच पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व व्यवहार ‘कॅशलेस’ करण्याचे आदेशही दिले.

आरोग्य विभागांतर्गत जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना प्रसूतीच्या काळात आर्थिक मदत दिली जाते. त्याशिवाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे मानधन, आशा कर्मचाऱ्यांना मोबादला याशिवाय अन्य कारणांसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी अथवा अनुदान थेट त्यांच्याकडे रोख स्वरूपात देण्यात येणार नाही. त्याऐवजी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

‘प्रत्येक लाभार्थ्याचा आधार क्रमांक घेऊन तो आरोग्य विभागाच्या पोर्टलवर भरायचा. त्याबरोबर त्या व्यक्तीची बँक खाते क्रमांकासह इतर माहिती द्यायची. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अनुदान, लाभ मंजूर झाल्यास थेट त्याची रक्कम त्याच्या नावावर बँकेत जमा करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच व्यवहार रोख स्वरूपात न करता ‘कॅशलेस’ पद्धतीने करावेत, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आले आहेत,’ असे आरोग्य विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

माहिती संकलन सुरू

लाभार्थ्याचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, तसेच इतर माहिती संकलित करणे आणि बँकामध्ये ती जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षांपासून आरोग्य विभागाचा कारभार आता १०० टक्के ‘कॅशलेस’ होण्याच्या मार्गावर आहे,’ असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालविवाहांचे प्रमाण शहरात अधिक

$
0
0

देशातील ७० जिल्ह्यांतील सर्वेक्षणाचा निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरात बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी सरकारपासून सामाजिक संस्था, संघटनांपर्यंत सर्वांकडून प्रयत्न केले जात असतानाही, शहरी भागांमध्ये नव्याने बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यानुसार पुणे, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये सर्वाधिक बालविवाह झाले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे (अल्पवयीन) प्रमाण अधिक आहे.

भारतामध्ये बालविवाहाची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागामध्ये राहत असताना आणि साक्षरतेचे प्रमाण कमी असताना बालविवाहांचे प्रमाण प्रचंड होते. मात्र, शहरीकरण वाढले आणि त्याबरोबरच शिक्षणाचा प्रसारही झाला. त्यामुळे जनजागृती होऊन बालविवाहांचे प्रमाण कमी होत गेल्याचे दिसून येते. मात्र, हे प्रमाण कमी झाले असले तरीही, ते पूर्णपणे बंद झालेले नाही. राष्ट्रीय बालहक्क आयोग आणि आंतरराष्ट्रीय बाल दारिद्र्य संशोधन प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘यंग लाइव्ह इंडिया’ या संस्थांनी २०११च्या जनगणनेनुसार १३ राज्यांत पाहणी केली असता, ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, आंध्र प्रदेशातील हैदराबाद व रंगारेड्डी आणि कर्नाटकातील देवनगेरे या शहरांमध्ये बालविवाहाचे प्रमाण उल्लेखनीय आहे. पाहणी केलेल्या १३ राज्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक १६ जिल्ह्यांमध्ये बालविवाह मोठ्या संख्येने झाल्याचे आढळून आले.

या ७० जिल्ह्यांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के आहे. येथील लोकसंख्येच्या २१ टक्के बालविवाह झाले आहेत. ही संख्या खूप असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे. राज्यात २००१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११मध्ये बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण पाच पटीने आणि मुलांच्या विवाहाचे प्रमाण २० पटीने वाढले आहे.

एकूण प्रमाण घटले

शहरी भागांमध्ये आणि ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले असले तरी देशातील परिस्थितीचा विचार करता बालविवाह घटले आहेत. देशात २००१मध्ये लोकसंख्येच्या २.५ टक्के मुलींचे बालविवाह झाले होते. त्यामध्ये २०११मध्ये घट होऊन, ते प्रमाण २.४ टक्क्यांवर आले होते. ही घट प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेली आहे. शहरी भागामध्ये हेच प्रमाण १.७८ टक्क्यांवरून २.४५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मुलांच्याबाबत हे प्रमाण ९.६ टक्क्यांवरून (२००१) २.५ टक्क्यांवर (२०११) आले आहे.
...
ग्रामीण भागामध्ये विशेषतः नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार किंवा हंगामी कामगारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे लोक सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. या प्रवासामध्ये तरुण मुलींना घेऊन फिरणे किंवा त्यांना मागे सोडून अन्य ठिकाणी जाणे त्यांना जिकरीचे वाटते. त्यामुळे मुलगी वयात आली की तिच्या लग्नाला प्राधान्य दिले जाते.
- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीएतील भरतीची सीबीआय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) २०१२मध्ये झालेल्या प्राध्यपक व सहायक प्राध्यपकांच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.

‘एनडीए’मध्ये प्राध्यपक व सहायक प्राध्यपकांची २०१२मध्ये भरती झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती केली जाते. त्या वेळी काही प्राध्यपकांनी आयोगकाडे खोटी कागदपत्रे सादर करून भरती झाल्याच्या तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. यामध्ये काही जण प्राध्याकप म्हणून कार्यरत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार ‘सीबीआय’ने या प्रकरणी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. यामध्ये लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील ‘एनडीए’मध्ये सी वर्गच्या भरतीत गैरव्यवहार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा दोन कोटींची कीटकनाशक खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थायी समितीने कीटकनाशक खरेदीसाठीच्या दोन कोटी १७ लाख रुपयांच्या तीन निविदांना मंगळवारी मंजुरी दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी करण्यात येणाऱ्या फवारणीसाठी या कीटकनाशकांची आवश्यकता आहे.

शहरात डास होऊ नये म्हणून डास प्रतिबंधक ‘पायरीप्रॉक्सिफेन’ या औषधाची फवारणी करण्यात येते. डासांच्या होणाऱ्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यास या औधषाची मदत होते. या औषधाची किंमत ३२९६ रुपये प्रतिकिलो इतकी असून तीन हजार किलो वजनाचे औषध खरेदी करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून त्यासाठी ९८ लाख ८८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

त्याशिवाय ‘बायफ्रेथिंन’ हे औषध खरेदी करण्यात येणार असून त्याची किंमत ३९९७ रुपये प्रतिकिलो इतकी आहे. पालिकेकडून २००० किलो वजनाच्या या औषधाची खरेदी करण्यात येणार असून त्यास ७९ लाख ९४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच, ‘डायफ्लूबेंझेरॉन’ या कीटकनाशकाची प्रतिकिलो किंमत ३,७८५ रुपये असून ते एक हजार किलो खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३७ लाख ८५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने पळवणारी टोळी गजांआड

$
0
0

साडेआठ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त

म. टा. प्रतिनिधी, कात्रज
पुणे शहर व उपनगरात दागिने पॉलिश करून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या बिहारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात भारती पोलिस ठाण्याला यश आले आहे. या टोळीकडून साडेआठ लाख रुपये किंमतीचे २७ तोळे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पुणे शहरात त्यांनी केलेले बारा गुन्हे उघडकीस आले आहेत.

दागिने पॉलिश करण्यासाठी उपनगरातील घरे हेरून महिलांना फसवून दागिने पळवणाऱ्या टोळीला पकडल्यानंतर पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. या वेळी परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंडे, सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव पवार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंह गायकवाड, गुन्हे निरीक्षक राजकुमार वाघचौरे उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, ‘एक तरुण भिलारेवाडी परिसरात एका बंगल्याशेजारी संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताबडतोब त्यास पकडून त्याची झडती घेतली. तपासात त्याच्याकडे पॉलिश करण्यासाठी वापरले जाणारे भांडे, पावडर व ब्रश मिळाला. विनोद रामजी भगत (वय ३२) असे त्याचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. आळंदी देवाची येथे तो राहत होता. भगतच्या सांगण्यावरून त्याचे साथीदार राजा रामबरण यादव (वय २४), महंमद सलाउद्दीन शेख (वय २८),राजेश नागो पंडित (वय २०), सचिनकुमार सोहनप्रसाद गुप्ता (वय ३३), मुन्नाकुमार गेंदालाल शहा (वय ३१), महंमद महिरूद्दीन जाकीर (वय २४, सर्व रा. बिहार) या आठ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.’ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना नऊ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत हवा हॉकर्स झोन

$
0
0

फेरीवाल्यांची मनमानी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज

म. टा. वृत्तसेवा, बारामती
बारामतील शहरातील फेरीवाल्यांच्या मनमानीला आवर घालण्यासाठी तातडीने हॉकर्स झोन तयार करण्याची गरज आहे. शहरातील विविध ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण होऊ शकतात. नगरपालिकेने तातडीने पाठपुरावा करून असे झोन तयार केले, तरच फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे गुदमरलेल्या रस्त्यांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळणार आहे. अर्थात त्यासाठी प्रशासनाने सक्रिय होण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

बारामतीमधील वाहतुकीची शिस्त बिघडण्याला बंद असणारे सिग्नल, रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे, पार्किंगमधील बेशिस्त, तसेच फेरीवाल्यांची (हातगाड्यांवर माल विकणारे) मनमानीही कारणीभूत ठरत आहे. कोणाचीही परवानगी न घेता काही ठिकाणी फेरीवाल्यांनी एकाच जागेवरचा ठिय्या मारला आहे. दुपारनंतर ग्रामीण भागातून खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या ग्राहकांचा लोंढा थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही फेरीवाल्यांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी गाड्या लावत आहेत.

व्यवसायाची अपरिहार्यता

बेरोजगारी, नोकऱ्यांचे घटलेले प्रमाण, अन्य व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल या कारणांमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. हातगाडी खरेदी करून किंवा भाड्याने घेऊन बेरोजगार रस्त्यावर व्यवसाय करत आहेत. यामुळे त्यांच्या व्यवसायावर बंदी घालनेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे या समस्येवर सुवर्णमध्य साधून तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. हॉकर्स झोन तयार केल्यास ही समस्या सुटू शकते, असे नागरिकांनी सांगितले.

संभाव्य हॉकर्स झोन

नीरा डावा कॅनॉलच्या दोन्ही बाजूस, गुल पूनावाल गार्डनसमोर, पाटस रोड-छत्रपती शाहू हायस्कूलसमोर, पाणवठा मंदिर ते डॉ.आप्पासाहेब पवार मार्ग, इंदापूर रस्ता-बाजार समितीलगत, सावरकर जलतरण तलावालगत, हॉटेल नीलम ते मुक्तिधाम रोड कसबा, क्षेत्रियनगर-होमगार्ड कार्यालयालगत, सांस्कृतिक केंद्र बोळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमलगत, खत्री इस्टेट लगत फाटा रोड अशा ठिकाणी हॉकर्स झोन शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images