Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गुगल अर्थवरून होणार ग्रामपंचायतींची प्रभागरचना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) आणि ‘गुगल अर्थ’ नकाशांद्वारे पहिल्यांदाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार केली जाणार आहे; तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरच्या (एमआरसॅक) नकाशांचाही आधार घेण्यात येणार असून, त्याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील ग्रामपंचायत शाखेकडून प्रभागरचना आणि आरक्षण निश्चित होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३२१ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रभागरचना तयार करताना पहिल्यांदाच ‘जीआयएस’ आणि ‘गुगल अर्थ’च्या नकाशाचा आधार घेण्यात येणार आहे. ‘एमआरसॅक’ आणि ‘गुगल अर्थ’चे नकाशे सुपर इम्पोज करून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार प्रभागरचना अंतिम होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यापूर्वी तलाठी कार्यालय स्तरावरील नकाशांद्वारे प्रभागरचना करण्यात येत होती. त्यामुळे प्रभागरचनेमध्ये त्रुटी रहात होत्या. ‘जीआयएस’ आणि ‘गुगल अर्थ’च्या नकाशांद्वारे प्रभागरचना केल्यामुळे प्रभागरचनेत अचूकता येणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना आणि आरक्षणावरील हरकतींवर उप विभागीय अधिकारी स्तरावर सुनावणी होणार आहेत. त्या सुनावणींचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविल्यावर जिल्हाधिकारी हे प्रभागरचना आणि आरक्षणाला अंतिम मान्यता देणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेपरफुटीवर विद्यापीठाचे लक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या परीक्षेत व्हॉट्सअॅपहून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल होऊन पेपरफुटीच्या प्रकरणी विद्यापीठाने कठोर पावले उचलली आहे. या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात पुन्हा पेपरफुटीचे प्रकार होऊ नये, यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत शैक्षणिक, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश राहणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेत विविध शाखेमधील प्रथम ते अंतिम वर्षातील दहापेक्षा अधिक पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी फुटले. या प्रकरणात विद्यापीठाने पेपरफुटीला कारणीभूत असणाऱ्या विद्यानिकतेन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस पाठविल्या. तसेच, विद्यापीठाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोबाइलमध्ये पेपर सापडणाऱ्या पुण्यातील दोन खासगी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. मात्र, पेपरफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या कॉलेजांवर ठोस कारवाई केली नाही. याबाबातची माहिती विविध वृत्तांद्वारे ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही परीक्षा संपायच्या शेवटच्या दिवशी आणखी एक पेपर फुटला. त्यामुळे पेपरफुटी थांबविण्याबाबत विद्यापीठ प्रशासन कमी पडत असल्याचे समोर आले.
या एकूणच प्रकाराची गंभीर दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि कॉलेजांमधून पेपरफुटी होऊ नये, यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. चार ते पाच सदस्य असणाऱ्या या समितीमध्ये शैक्षणिक, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश राहणार आहे. हे सर्व सदस्य येत्या पंधरा दिवसांत सविस्तर अहवाल तयार करून विद्यापीठ प्रशासनाला सोपविणार आहे. त्यानंतर त्या अहवालावर विद्यापीठ पुढच्या उपायोयजना ठरविणार आहे. या समितीमध्ये केवळ एक सदस्य विद्यापीठातील राहणार असून, इतर सर्व विद्यापीठाच्या बाहेरचे राहणार आहे. त्यामुळे कोणताच हस्तक्षेप होणार नाही, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

‘कुलगुरू निर्णय घेणार’
विद्यापीठाने पेपरफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या नगर जिल्ह्यातील विद्यानिकतेन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस पाठविल्या होत्या. या दोन्ही कॉलेजांनी विद्यापीठास उत्तरे पाठविली आहेत. त्यामध्ये दोन्ही कॉलेजांमध्ये विद्यापीठाकडून पेपर ई-मेलद्वारे मिळाल्यानंतर तो डाउनलोड करण्यात आला. त्यानंतर तो पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या व्यक्तींना निलंबित करण्यात आल्याची माहिती कॉलेजांनी विद्यापीठाला दिली आहे. त्यामुळे या दोन कॉलेजांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा निर्णय आता कुलगुरू डॉ. नितीन करमळकर घेणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.

‘कॉलेजांची मान्यता रद्द करा’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरूंना हार घालून ‘सत्कार आंदोलन’ करण्यात आले. या वेळी पेपरफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या कॉलेजांवर फौजदारी करवाई करावी आणि कॉलेजांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. पेपरफुटीबाबत विद्यापीठ प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास ‘आज कुलगुरूंचा फुलांचा हार घालून सत्कार केला आहे, येत्या काळात चपलांचा हार घालू,’ अशी भूमिका मनविसेने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार खरेच घटला?

$
0
0

भ्रष्टाचार खरेच घटला?

भ्रष्टाचारात महाराष्ट्र चौथा असतानाही एसीबीची कारवाई कमी

Shrikrishna.Kolhe
@timesgroup.com
Tweet : @shrikrishnaMT

पुणे : देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात चौथा असल्याचे नुकतेच एका पाहणीत आढळले असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) होणारी कारवाई झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे राज्यात भ्रष्टाचार कमी झाला की एसीबीकडून होणारी कारवाई घटली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देशातील भ्रष्टाचारासंदर्भात ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ (सीएमएस) या स्वयंसेवी संस्थेने काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. सरकारी कामे करून घेण्यासाठी देण्यात येणारी लाच या आधारावर देशातील भ्रष्ट राज्यांची यादी संस्थेने तयार केली होती. मागील वर्षभरात एक तृतीयांश लोकांना सरकारी कामे करून घेताना वर्षभरात किमान एकदा लाच द्यावी लागली, असल्याचे या पाहणीत आढळले होते. या भ्रष्टाचारात कर्नाटक पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे आढळले होते. पण या पाहणीनंतर महाराष्ट्रात लाच घेताना व बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कारवाईत मोठी घट होत चालली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागील चार महिन्यांत ही कारवाई तब्बल ११९ ने कमी झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नादेड असे एसीबीचे आठ विभाग आहेत. या विभागाकडून त्याच्या हद्दीतील जिल्ह्यात लाच घेणाऱ्या व बेहिशेबी मालमत्ता गोळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. एसीबीचे राज्याचे प्रमुख म्हणून प्रवीण दीक्षित यांनी जबाबदारी घेतल्यानंतर कारवाईचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र, त्यांनी पदभार सोडल्यानंतर पुन्हा कारवाईचा आकडा कमी झाला आहे. नागरिकांना तत्काळ लाच मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देता यावी, एसीबीकडून हेल्पलाइन, अॅप, ऑनलाइन तक्रार अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. तरीही कारवाईत घट होत आहे.
राज्यात २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंदर्भातील १३१६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुढील वर्षी हा आकडा १२७९ वर आला. गेल्या वर्षी एसीबीच्या कारवाईत मोठी घट झाली. २०१६ मध्ये एसीबीचा एकूण कारवाईचा अडका १०१४ वर आला आहे. या वर्षी कारावईचा आकडा कमीच असून पाच महिन्यांत ३४७ झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११९ कमी आहे. अद्यापही सरकारी काम करून देण्यासाठी एकतृतीयांश नागरिकांना लाच द्यावी लागते, असेही पाहणीत आढळले आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात एसीबीकडून लाचखोरांवर होणाऱ्या कारवाईत मोठी घट होत चालली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला की एसीबी कारवाईत कमी पडत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देशामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचाराबाबत चौथ्या स्थानी आहे. तरीही ‘अॅन्टी करप्शन’च्या कारवाईत घट झाली आहे. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘अॅन्टी करप्शन’ने केलेल्या कारवाईत गेल्या चार वर्षांमध्ये बेहिशेबी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता जमा करणे थांबले की, यंत्रणेच्या मदतीने ‘बेहिशेबी’ मालमत्तेचा ‘हिशेब’ व्यवस्थित लावला जातो, अशी चर्चाही
सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याला ३४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येत्या ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपाऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर उपस्थित राहणार आहेत.
‘युवराज छत्रपती संभाजी महाराज हे ५ जून रोजी पायी गड चढणार आहेत. त्यानंतर गडपूजन करून शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर गडावर शाहिरी कार्यक्रम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत,’ अशी माहिती समितीचे पुणे शहर सदस्य अमित गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अतुल चव्हाण, मालोजीराजे जगदाळे, विराज तावरे, धनंजय जाधव उपस्थित होते.

‘रात्र शाहिरांची’ या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतील शाहीर सहाभागी होणार आहेत. ६ जून रोजी पहाटे नगारखान्यासमोरील ध्वजस्तभांवर स्वराज्य ध्वजाचे आरोहन करण्यात येणार आहे. तसेच, या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील मूर्तीला सोन्याच्या नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे. रणवाद्य ढोलताशा पथक, सहृयाद्री गर्जना ढोलताशा पथक, शिवतीर्थ प्रतिष्ठान आदी पुण्यातील ढोलताशा पथके या सोहळयामध्ये सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय महाराष्ट्र’ बस बेळगावात

$
0
0

‘जय महाराष्ट्र’ बस बेळगावात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घातल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा समावेश करून, तो लोगो असलेली पहिली बस बेळगाव मार्गावर सोडली आहे.
सीमा भागात ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर घातलेली बंदी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना बेळगावात नाकारलेला प्रवेश या पार्श्वभूमीवर ते आता या पद्धतीने बेळगावात ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा आहे.बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात आणि बेळगावमधील मराठी बांधवांनी त्यास कडाडून विरोध केला होता. त्यानंतर महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने बेळगावमध्ये निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चाला शिवसेना नेते दिवाकर रावते व अन्य सहकारी हजेरी लावणार होते. मात्र, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते मोर्चाला जाऊ शकले नाहीत. त्याचवेळी महाराष्ट्रात आलेल्या कर्नाटक एसटी महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून शिवसेनेने ‘त्यांच्या’ निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. याबाबत रावते यांना पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत विचारले असता, येत्या काळात एसटीच्या सर्वच बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अखेर एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी महामंडळाचा नवीन लोगो प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये ‘जय महाराष्ट्र’ व महाराष्ट्राचा भगवा नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे. हा नवीन लोगो असलेली पहिली बस मुंबई-बेंगळुरू मार्गावर आज, शुक्रवारी सोडण्यात आली.पुण्यात स्वारगेट एसटी स्टॅण्डवर सकाळी साडेअकरा वाजता या बसचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याबरोबरच सातारा येथे एक वाजता, कराड येथे अडीच वाजता, पेठ नाका येथे साडेतीन वाजता आणि कोल्हापूर येथे पाच वाजता या बसचे जंगी स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदा तपासणीची ‘कमिटी’ची सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ऑप्टिकल फायबर’ केबल टाकण्याच्या निविदांना मंजुरी देण्यापूर्वी या केबल टाकल्यामुळे नेमका किती महसूल मिळणार आहे, त्याला तांत्रिक आधार काय लागणार आहे, तसेच दक्षता समितीकडून निविदांची तपासणी करण्याची सूचना ‘ए​स्टिमेट कमिटी’ने केली आहे. त्यामुळे या निविदांबाबत अर्थविभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभिप्राय घेण्यात येणार आहे.
बहुचर्चित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी २२५ कोटी रुपयांची निविदांबाबत ‘एस्टिमेट कमिटी’त मंगळवारीही निर्णय होऊ शकला नाही. यापूर्वीच्या ‘एस्टिमेट कमिटी’त या निविदेवर आक्षेप घेण्यात आले होते. ‘एस्टिमेट कमिटी’ची मान्यता नसताना या निविदा काढण्यात आल्याने यावेळी काय निर्णय घेणार याची पालिकेत उत्सुकता होती. दरम्यान, ‘एस्टिमेट कमिटी’ने या निविदा अर्थविभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवल्या आहेत.
ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. याबाबत आवाज उठवल्यानंतर ही निविदा मंजुरीसाठी ‘एस्टिमेट कमिटी’समोर ठेवण्यात आली. मात्र, मुळातच एवढ्या मोठ्या रकमेच्या निविदेला स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याचा शेरा ‘एस्टिमेट कमिटी’ने नोंदविला होता. या निविदेंवर पुन्हा मंगळवारी ‘एस्टिमेट कमिटी’ चर्चा झाली असली तरी त्यावर निर्णय झाला नाही.दरम्यान, यापूर्वी शहरात टाकण्यात आलेल्या डक्टची उपयुक्तता आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
ऑप्टिकल फायबर केबलच्या निविदा काढण्यापूर्वी एस्टिमेट कमिटीची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, वेळेअभावी ही मंजुरी घेता आली नसल्याची कबुली आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे. तर, एवढ्या मोठ्या निविदा काढताना त्याला स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याची टीका विरोधकांची आहे.

तर ती ऐतिहासिक चूक ठरेल
ऑ​प्टिकल फायबर केबल टाकल्यामुळे पालिकेला बँडविड्थ मिळणार आहे. त्यातून पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. जलवाहिनीचे काम करताना या केबल टाकणे अपेक्षित आहे. जलवाहिन्यांचे ‘एस्टिमेट’ करताना ऑप्टिकल फायबर केबलचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, ही केबल टाकली नाही तर ती ऐतिहासिक चूक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन वृत्तीमुळेच संस्कृती टिकून

$
0
0

ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. देगलूरकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सनातन धर्म नदीच्या प्रवाहाप्रमाणे असतो. सनातनी वृत्तीमुळेच आपली संस्कृती टिकली असून, जगातील सर्व प्राचीन संस्कृती लयास गेल्या आहेत,’ असे मत ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
प्रसाद प्रकाशनचे प्रमुख मनोहर तथा बापूसाहेब जोशी आणि त्यांच्या पत्नी मंजिरी जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देगलूरकर यांच्या हस्ते पं. वसंतराव गाडगीळ यांना बापूसाहेब जोशी स्मृती गौरव आणि ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना मंजिरी जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद, ज्येष्ठ समर्थ अभ्यासक सुनील चिंचोलकर आणि संपादक उमा बोडस आदी या वेळी उपस्थित होते.
‘भारतीय संस्कृती सनातन असून अखंड आहे. सनातनवृत्तीमुळे आपल्याला संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे, ’असे सांगून देगलूरकर म्हणाले की शहाण्या लोकांमध्ये राहण्याने शहाणे होता येते. विद्यापीठांमध्ये विद्वान होता येते; पण हल्ली वाङ्मय चौर्य वाढले आहे. प्रसाद मासिकामध्ये प्रबोधनकारी लेखन होते. वैचारिक ज्ञान देणारी मासिके बंद झाली आहेत. मात्र, प्रसाद मासिक गेली सत्तर वर्षे ध्येय, विचारांची उंची, प्राचीन साहित्याची ओळख, प्रबोधन व संस्कृती ठसविण्याची काळजी घेत आहे. वेद, पुराणे वाचून काय मिळणार असे म्हटले जाते. परंतु, ज्ञान लुप्त होत नाही. त्यावर आवरण पडले तर ज्ञान दृष्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
‘प्रसाद मासिकामध्ये १ फ्रेबुवारी १९५९ मध्ये माझा पहिला लेख छापून आला. बापूसाहेबांच्या कारकिर्दीत मासिकाने उंची गाठली,’ अस गौरवोद् गार शेजवलकर यांनी काढले. ‘सोरटी सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेवेळी असणाऱ्या ब्राह्मणांमध्ये गाडगीळ यांचा सहभाग होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ अयोध्येत राम मंदिर बांधतील, तेव्हा पुन्हा गाडगीळांना बोलाविले जाईल,’ असे भाकित चिंचोलकर यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा बोडस यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

$
0
0

डझनामागे आंबा पन्नास रुपयांनी महाग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा गाड्या भाजीपाल्याची आवक झाल्याने दर कडाडले. फळ बाजारातील आवकही थांबल्यामुळे फळांच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली. आंब्याचा हंगाम संपायला आला असतानाच आवक थंडावल्याने आंब्याचे भाव डझनामागे सुमारे ५० रुपयांनी वाढले आहेत.
‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सुमारे शंभर गाड्या भाजीपाल्याची आवक होते. शनिवारी बाजार बंद असल्याने शुक्रवारी नेहमीपेक्षा जास्त आवक होते. मात्र, संपामुळे बाजार समितीमध्ये अवघ्या दहा गाड्यांची आवक झाली,’ अशी माहिती ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. आवक घटल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले. किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर प्रति किलोमागे सुमारे २०० रुपयांनी वाढल्याने नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.
रमजानचा महिना असल्याने कलिंगड, खरबूज आणि पपईला मागणी असते. या फळांची आवक शुक्रवारी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याही दरात दुप्पट वाढ झाली. ‘रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभरात आंब्याची आवक झालीच नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्याची विक्री करण्यात आली. गुजरातमधून आंब्याची आवक सुरू असली तरी, संपामुळे परराज्यातील आंब्याची आवक होऊ शकली नाही. फळ बाजारातील आवक सुमारे ७० टक्क्यांनी घटली आहे,’ अशी माहिती आंबा व्यापारी युवराज काची यांनी दिली.
फळबाजारात खडकवासला, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या भागातून आंब्यांची आवक होते. मात्र, संपामुळे शेतकऱ्यांनी आंबा बाजारात आणला नाही. या हंगामामध्ये सुमारे एक हजार पाट्या आवक होते; पण दिवभरात अवघ्या १०० ते १५० पाट्यांची आवक झाली. त्यामुळे आंब्याच्या दरात डझनमागे सुमारे ५० रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापारी तात्या कोंडे म्हणाले.

भाजी प्रति किलो दर (शुक्रवार) प्रति किलो दर (अन्य दिवशी)
फ्लॉवर ८०-९० ४०-४५
कोबी ८०-९० ३०-३५
सिमला मिरची १२०-१५० ३०-३५
वांगी ७०-८० ४०-४५
घेवडा १८०-२०० ९०-१००
टोमॅटो ३५-४० १२-१५
हिरवी मिरची १२०-२०० ७०-८०
कांदा ९-११ ३-६
बटाटा ८-१३ ७-१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक बदल्यांना ३०जूनपर्यंत स्थगिती

$
0
0

बदल्यांबाबतचा वाद पेटण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी बदल्यांचे नवीन धोरण आणि सुगम आणि दुर्गम शाळांची यादीही जाहीर केली. मात्र, त्या विरोधात काही शिक्षक संघटनांनी कोर्टात जाऊन स्थगिती मिळवली. स्थगितीची यापूर्वीची मुदत ३१ मे होती. ती आता वाढवून ३० जून करण्यात आली आहे. विभागाच्या निर्णयानुसार १५ जूननंतर शिक्षकांच्या बदल्या करता येत नाहीत. त्यामुळे आता शिक्षकांच्या बदल्यांबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्यांसाठी नवीन धोरण जाहीर केले होते. त्यानुसार सुगम आणि दुर्गम शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. धोरणानुसार सुगम भागातील शिक्षक दुर्गम भागात आणि दुर्गम भागातील शिक्षक सुगम भागात जाणार होते. मात्र, पुणे जिल्हा प्राथमिक संघाचे जवळपास १ हजार ९१४ शिक्षक बदलीप्रक्रियेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात गेले. त्यांनी तेथे बदली प्रक्रियेला स्थगिती मिळवली. या स्थगितीची मुदत अगोदर ३१ मे होती. मात्र, सरकारला ३१ मे पर्यंत काहीच न करता आल्यामुळे कोर्टाने मुदत ३० जूनपर्यंत वाढविली. त्यातच पुन्हा १५ जूननंतर कोणत्याही शिक्षकाची बदली करता येणार नाही, असा विभागानेच निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शिक्षकांच्या बदल्या होणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कोर्टात प्रकरण दागल असल्यामुळे अवघड क्षेत्र, सोपे क्षेत्र यांची अंतिम यादी जिल्हापरिषदेस आतापर्यत प्रसिद्ध करता आली नाही. या शिवाय शिक्षकांच्या संवर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करणे, बदली पात्र , बदली अधिकार प्राप्त शिक्षकांकडून शाळांचा पसंतीक्रम घेणे आदी सर्व कामे सुरू ठेवल्यास कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागाच्या हालचाली मंदावल्या आहेत. मात्र, त्यामुळे वर्षानुवर्षे दुर्गम भागात काम करणार्‍या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दुर्गम भागात काम करणारे शिक्षक अमोल गायकवाड म्हणाले, ‘वर्षानुवर्षे दुर्गम भागात अनेक शिक्षक काम करत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना न्याय मिळण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु, शिक्षक संघटनांमुळे या निर्णयाला स्थगिती मिळाली. तरीही ८ जूनपर्यंत ही स्थगिती उठवण्याचा आमचा प्रयत्न राहील ’

कोर्टात एक हजार ९१४ शिक्षकांनी धाव घेतली आहे. त्यांना वगळून अन्य शिक्षकांच्या बदल्या करण्याचा सरकार विचार करत आहे. तसेच, बदलीवरील स्थगिती कोणत्याही परिस्थितीत उठवून लवकरच शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संपामुळे दूध संकलन २५ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध संकलन आणि वितरण यंत्रणा विस्कळित झाली असून, शुक्रवारी अवघे २५ टक्के दुधाचे संकलन होऊ शकले. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांसाठी राखून ठेवलेले दूध नागरिकांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या संपाचा मोठा फटका दूध संकलनाला बसला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध संघाकडे संकलित होणारे दुधाचे प्रमाण घटले. गुरुवारी सुमारे ५० टक्के दूध संकलित झाले होते. शुक्रवारी हे प्रमाण आणखी कमी होऊन सुमारे २५ टक्क्यांवर घसरले. या बाबत पुणे ​जिल्हा सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, ‘दुधाचे संकलन करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शुक्रवारी ​दिवसभरात सुमारे २५ टक्के संकलन होऊ शकले आहे. त्यामुळे शनिवारपासून दूध संकलनाबाबत प्रश्न निर्माण होणार आहे. पोलिस बंदोबस्त दिला गेल्यास दूध संकलन केले जाईल.’
नागरिकांची दुधाची अडचण लक्षात घेऊन पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांसाठी दूध राखून ठेवण्यात आलेले असते. त्यातील दूध हे शनिवारपासून नागरिकांसाठी वितरित केले जाणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी मार्गांच्या उत्पन्नात मोठी वाढ

$
0
0

अन्य वाहनांना प्रवेशबंदी केल्याचा प​रिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील जलद बस वाहतूक योजनेच्या (बीआरटी) मार्गांतून इतर वाहनांना प्रवेश बंदी केल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रवासी संख्येसह बीआरटी मार्ग वापरणाऱ्या बसफेऱ्यांच्या सरासरी उत्पन्नातही वाढ झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.
गेल्या आठवड्यात पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गांची पाहणी केली होती. या वेळी, बीआरटी मार्गावरील त्रुटी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार, बीआरटीसाठी निश्चित केलेल्या मार्गिकेमध्ये सर्रास इतर खासगी वाहने प्रवेश करत असल्याचे आढळून आले होते. या वाहनांना रोखण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करून इतर वाहनांना बीआरटी मार्ग वापरण्यास मनाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, २५ ते २९ मे दरम्यानच्या अवघ्या पाच दिवसांमध्ये बसच्या प्रवाशांसह उत्पन्नामध्येही भरघोस वाढ झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.
हडपसर-धायरी या बस मार्गातून पीएमपीला सरासरी ५६ हजार रुपये उत्पन्न प्राप्त व्हायचे. बीआरटी मार्गांमध्ये इतर वाहनांना प्रवेशबंदी केल्यानंतर या उत्पन्नात सरासरी २५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये पीएमपीला याच मार्गावरून सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच, प्रति प्रवासी मिळणाऱ्या उत्पन्नातही एक हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या मार्गाप्रमाणेच, कात्रज ते शेवाळवाडी, भेकराईनगर ते मनपा, हडपसर ते माळवाडी, भेकराईनगर ते चिंचवडगाव, भेकराईनगर ते निगडी आणि भेकराईनगर ते भोसरी या मार्गांवरील उत्पन्नातही भरघोस वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसातशे बस घेणार

$
0
0

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पीएमपीचा निर्णय ठरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १५५० बस नव्याने दाखल करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांची संख्या आणि बसची आवश्यकता याचा अभ्यास करून बसची खरेदी करण्याचा पीएमपी नेतृत्वाचा कल असून, साधारणपणे साडेसातशे बसची आवश्यकता असल्याची चर्चा पीएमपीच्या वर्तुळात आहे.
पीएमपीसाठी १५५० बस नव्याने घेण्याची घोषणा महापालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. पुणे पालिका १२० तर पिंपरी-चिंचवड पालिका ८० बस खरेदी करणार आहे. उर्वरित ८०० बस अल्प व्याजदरावर आणि ५५० बस भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, सध्या बस खरेदी प्रक्रिया थंडावली आहे. ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट’च्या (सीआयआरटी) अहवालानुसार पुणे शहरासाठी ३१०० बसची आवश्यकता आहे. त्यानुसार नव्याने बस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, गेल्या गेल्या काही वर्षात पीएमपीच्या बससह कंत्राटी बसचाही प्रवासी वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढली नसल्याचे पीएमपी प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे बस खरेदी करताना प्रत्यक्षात किती बसची आवश्यकता आहे, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच बस खरेदीचा निर्णय घेतला जाणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या सरासरी २१०० बस आहेत. त्यापैकी कंत्राटी बसची संख्या ८५० असून, उर्वरित पीएमपीच्या मालकीच्या आहेत. सध्या पीएमपीच्या ७६८, तर ठेकेदारांच्या ८५०पैकी सुमारे ६५० बस मार्गांवर धावतात. तुकाराम मुंढे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारला, तेव्हा सरासरी १३५० बस मार्गावर धावत होत्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे मार्गावरील बसची संख्या वाढून १४५०वर पोहोचली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ताफ्यातील सरासरी १६०० बस येत्या काळात मार्गांवर आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

एसी बसला लाल दिवा
भाडेकराराने बस घेण्यास मुंढे उत्सुक नाहीत. तसेच, ५५० एसी बस खरेदी करण्याची चर्चा होती. मात्र, त्यास देखील तूर्त रेड सिग्नल’ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे बस खरेदीची संख्या निम्म्यावर येईल, असे पीएमपीतील सूत्रांनी सांगितले. तसेच, जादा बस खरेदी करून त्या ठेवणार कोठे, असाही प्रश्न पीएमपी प्रशासनापुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देना बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयडीबीआय आणि युको या सरकारी बँकांवर कारवाई केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आता देना बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बँकेला आता नव्याने कर्जपुरवठा करता येणार नाही. दरम्यान, आर्थिक कामगिरी खालावलेल्या अन्य काही बँकांही रिझर्व्ह बँकेच्या रडारवर असून त्यांच्यावरही निर्बंध लागू होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला दिली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधांमुळे देना बँकेला नवी कर्जे देणे, ठेवी स्वीकारणे, लाभांश देणे आदी कामे करता येणार नाहीत.

केंद्रातील एनडीए सरकारने सरकारी बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन वर्षे ज्ञानसंगम परिषदेचे आयोजन केले होते. पुण्यात झालेल्या पहिल्या ज्ञानसंगम परिषदेनंतर बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’ या सात कलमी कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली. बँकांना या निकषांनुसार आपली आर्थिक कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वारंवार उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. या आढाव्यानंतरही ज्या बँकांची कामगिरी सुधारली नाही, अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने बंधने घालण्यास सुरुवात केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

विविध सरकारी बँकांचे वार्षिक आर्थिक निकाल समोर येत आहेत. त्यामधील रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन अॅसेट्स, कॅपिटल अॅडिक्वसी रेश्यो, कॅपिटल टू रिस्क रेश्यो या बाबींकडे रिझर्व्ह बँकेचे लक्ष आहे. या निकषांवर खराब कामगिरी असलेल्या बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. बँकेचा कॅपिटल टू रिस्क रेश्यो ७.७५ पेक्षा कमी असेल तर बँकेवर निर्बंध लादले जातात. हेच प्रमाण ३.६२५ च्या खाली आले तर बँक बंद केली जाते किंवा बँकेचे विलीनीकरण करण्यात येते. दरम्यान रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध ही धोक्याची घंटा असून, त्या विरोधात कर्मचारी संघटनांनी आवाज उठवला पाहिजे, असे बँक कर्मचारी नेते विश्वास उटगी यांनी सांगितले.


कामकाजावर परिणाम नाही

मत्तेवर मिळणारे उणे उत्पन्न (रिटर्न ऑन अॅसेट) आणि वाढलेली अनुत्पादक कर्जे (एनपीए) यांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या देना बँकेवर रिझर्व्ह बँकेने अखेर निर्बंध घातले. यापूर्वी सरकारी क्षेत्रातील आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक व युको बँक या बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांतर्गत बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाईवरील राजकारण दुर्दैवी

$
0
0

संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गाय हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. परंतु, गो-रक्षणाचा उद्देश कोणत्याही धर्माच्या वा समुदायाच्या विरोधात नाही. या विषयाचे राजकारण होणे दुर्दैवी असून, त्याला संघर्षाचे रूप देणे हे सामाजिक पाप आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ज्येष्ठ लेखक संपादक भानू काळे, प्रांत संघचालक नाना जाधव, द्वितीय वर्ष वर्गाधिकारी अविनाश बडगे, प्रथम वर्ष वर्गाधिकारी विलास चौथाई, संदीप जाधव, धनंजय घाटे आदी उपस्थित होते. या २१ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात ७०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रथम वर्षाच्या २६९ आणि द्वितीय वर्षाच्या ४५० अशा एकूण ७१९ प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली.
गो-रक्षणावरून केले जाणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे सांगत जोशी म्हणाले, ‘गाय ही प्राचीन परंपरेपासून भारताच्या कृषी आणि आर्थिक विकासाचे साधन आहे. त्यामुळेच तो केवळ आस्थेचाच विषय नाही. मात्र, हे समजून न घेताच त्यावरून राजकारण केले जात आहे,’. हिंदू समाजाचे संघटन हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्षेत्र आहे, असे सांगून जोशी म्हणाले, की हिंदू समाजात अनेक दोष आहेत. प्रत्येक महापुरुषाने हे दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. अजूनही हिंदू समाजात काही दोष आहेत. ते दूर करण्यासाठी संघ गेल्या नऊ दशकांपासून कार्यरत आहे. .‘संघाने देशाला नवा विचार दिलेला नाही. संघाचे विचार हे भारतीय प्राचीन परंपरेचे चिंतन करून निर्माण झालेले आहेत. जेव्हा देश या प्राचीन परंपरेपासून दूर गेला, जेव्हा हिंदू संघटन कमजोर झाले, तेव्हा देश रसातळाला गेला. जेव्हा हिंदू संघटन शक्तिशाली होते, तेव्हा भारतही सशक्त होता,’ असेही जोशी म्हणाले.

राष्ट्रभक्ती आणि धर्म अशा मूल्यांचा सध्या होत चाललेला ऱ्हास अत्यंत वेदनादायी असून, या दोन्ही संकल्पना राष्ट्रबांधणीसाठी आवश्यक आहेत. भाषेच्या आधारे राष्ट्र निर्माण होते व टिकून राहते. समर्पणातून घडणाऱ्या सेवाकार्याला राष्ट्राइतके मोठे अधिष्ठान नाही.
भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध ७५ रुपयांवर

$
0
0

भाज्या उपलब्ध नसल्याने चढ्या दराने विक्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकरी संप मिटल्याच्या शनिवारी दिवसभर वावड्या उठल्या असल्या तरी सामान्यांच्या खिशावर पडणारा डल्ला थांबायचे नाव घेत नाही. पावशेर भाजीसाठीसाठी पुणेकरांना ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. पुण्याबाहेरून येणारे दूध बंद झाल्याने शहरात ७५ रुपये लिटर दराने विक्री झाली. चढ्यादराने दूध घेण्याची तयारी असली तरी, ते पुरेसे प्रमाणात मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
शनिवारी शेतकरी संपाचा तिसरा दिवस होता. मार्केट यार्डातील बाजाराला शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे पुणे विभागासह परराज्यातून फळभाज्यांची आवक झाली नाही. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमावेत बैठक घेऊन मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. त्यामुळे संप मिटल्याची पहाटेपासून चर्चा सुरू होती. मात्र, पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संप मागे घेतला नसल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांसह पुणेकरांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.
‘चितळेंसह अन्य दूध डेअऱ्यांचे दूध शहरात आलेच नाही. गणेश पेठेत शुक्रवारी दुधाची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ७५ रुपये मोजावे लागले. शुक्रवारी ३५०० ते ४ हजार लिटर दुधाची आवक झाली. शनिवारी दोन ते अडीच हजार लिटर दुधाचीच आवक झाली. त्यामुळे दुधाचा घाऊक बाजारातील दर ७५ रुपयांवर पोहोचला. ८० रुपये देऊनही दूध मिळत नव्हते. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच १८ लिटर घागरीच्या दुधाला १,३२० इतका उच्चांकी दर मिळाला. रमजान ईद, राखीपौर्णिमा, या सणांसाठी दुधाची मोठी मागणी असते. शहरात मावळ, मुळशी, वेल्हा येथून येणाऱे दूध बंद झाले आहे. त्यामुळे वाघोली, वाडेबोल्हाई, केसनंद, फुलगाव, कॅम्प, अरण्येश्वर, कात्रज येथून दुधाची आवक होत आहे. संप न मिटल्याने दुधाची परिस्थिती आणखी चिंताजनक होईल,’ अशी भीती गणेश पेठेतील पुणे शहर दूध खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी व्यक्त केली.
‘मार्केट यार्ड बंद असल्याने भाज्यांची आवक झाली नाही. हडपसर येथे बाजार सुरू असता तर आवक झाली असती. रविवारी आठवड्याचा बाजार असल्याने मार्केट यार्ड सुरू राहील की नाही याचीही शाश्वती नाही. आवक झाली नाही तर भाजीपाला आणखी महाग होईल,’ अशी भीती भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केली. गुरुवारी खरेदी केलेला माल शिल्लक राहिल्याने त्याची दिवसभर विक्री सुरु होती, असेही ते म्हणाले.

संप मिटल्याची दिवसभर चर्चा होती. त्यामुळे रविवारी काय होईल, हे सांगता येत नाही. मार्केट यार्डात आवक झाली तरी भाजी उपलब्ध होईल. अन्यथा भाज्या मिळण्याची शक्यता कमीच आहे. मंडईमध्ये शनिवारपुरताच माल शिल्लक आहे. संप मिटल्याच्या चर्चेने अनेक शेतकऱ्यांनी हडपसर बाजारात शनिवारी शेतमाल विकायला आणला.
राजाभाऊ कासुर्डे, मंडई व्यापार संघटना

दुधाची जादा दराने विक्री नको

पुणे : शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे दूध आणि शेतीमालाची किरकोळ विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारी आणि दुकानदारांनी जादा दराने विक्री करू नये, असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
शहरातील काही किरकोळ विक्रेत्यांकडून दूध व शेतीमालाचा संपामुळे तुडवडा निर्माण झाला. त्यामुळे वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे आल्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांची अडवणूक करून वाढीव किंमतीने विक्री करणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. किरकोळ विक्रेत्यांनी आधारभूत आणि एमआरपी किमतीप्रमाणेच विक्री करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु, नागरिकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोल पथकांसाठी कडक नियमावली

$
0
0

अप्पर पोलिस आयुक्तांचे सूतोवाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ढोल पथकांच्या सरावामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. त्यांची शांतता भंग होते. त्यामुळे, यंदा ढोल पथकांसाठी अधिक कडक नियमावली करावी लागेल, अशी शक्यता अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
पुणे पोलिस आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणोशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलिस आणि प्रशासनाने गणेश मंडळांशी चर्चा करून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. महापौर मुक्ता टिळक, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ज्योतिप्रज्ञा सिंग, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, झोन दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, झोन एकचे उपायुक्त बसवराज तेली, पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राजेंद्र जगताप, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, आनंद सराफ आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचे गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष असल्याने गणेश मंडळांवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी मात्र, गणेशोत्सव उत्साहात परंतु, नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या वेळेतच घ्याव्यात, गणेशोत्सवाच्या काळात ज्या दिवसांसाठी राज्य सरकारने रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाची परवानगी दिली आहे, त्याच दिवशी परवानगी देण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ढोल पथकांच्या सरावाबाबतही कठोर नियमावली तयार करावी लागणार आहे. त्याबाबत विचार सुरू असल्याचे सेनगावकर यांनी सांगितले.

यंदा गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करायचा आहे. त्यासाठी गणेश मंडळांनी त्यांच्या सूचना द्याव्यात. त्यावर जरूर विचार केला जाईल.
मुक्ता टिळक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे, कोल्हापूरला भूकंपाचे धक्के

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कोयना धरण परिसर रात्री ११.४४ च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी नोंदवली गेली. कोयना धरण परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपाचे हे धक्के पुणे आणि कोल्हापुरात जाणवले.

भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होते. भूकंपामुळे कुठल्याही हानीचे वृत्त नाही. पण भूकंपाचे धक्के सुरू होताच लोकं भीतीने घराबाहेर पडली. गेल्या महिन्यातही कोयना धरण परिसरात भूकंपाचे अतिशय सौम्य धक्के जाणवले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे पुलाजवळ मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुठा नदीपात्रात बाबा भिडे पुलाजवळ शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढला असून त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल ते ओंकारेश्वर मंदिर या दरम्यान मुठा नदीपात्रात सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एक मृतदेह पाण्यासोबत वाहत असलेला दिसला. या प्रकरणी त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षास माहिती दिली. काही वेळातच डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मयत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस दरम्यान आहे. त्या व्यक्तीच्या अंगावर काळ्या रंगाची पॅन्ट व शर्ट आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला.
मयत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ लक्ष्मण बाळू अजय गंगू अशी सलग नावे गोंदली आहेत. तसेच, उजव्या हाताच्या दंडावर शंकराची पिंड आणि हाताच्या तळव्यावर बदाम गोंदलेला असून त्यामध्ये एलआर अशी अक्षरे लिहिलेली आहेत. या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयत व्यक्तीने आत्महत्या केली की खून झाला, याचा तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा निविदेमध्ये गैरव्यवहाराचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कात्रज कचरा हस्तांतरण केंद्राहून ३५० टन कचरा वाहून नेण्यासाठी ५० कोटी ६३ लाख रुपयांच्या निविदा काढून महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून या निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने याच कामासाठी स्वतःची वाहने खरेदी केल्यास खरेदीची रक्कम तसेच इतर खर्चासह केवळ १२ ते १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे. जे काम केवळ १२ ते १४ कोटी रुपयांमध्ये होऊ शकते त्यासाठी ५० कोटी ६३ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची काही मंडळी मंडळी सामील असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे.
पालिका प्रशासनाने निवडणुकीआधी कात्रज येथून उरळी देवाची येथे कचरा वाहून नेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. या वेळी दोन ठेकेदारांनी या निविदेला प्रतिसाद दिला. मात्र, आचारसंहिता सुरू असल्याने ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही. केवळ दोन ठेकेदार कंपन्यांनी यामध्ये सहभाग दाखवल्याने या निविदेला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र, मुदतवाढ न देता कचरा समस्या बिकट होण्याची वाट प्रशासनाने पाहिली आणि त्यानंतर ५० कोटी ६३ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
‘एस्टिमेट कमिटी’ने या निविदा प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. महापालिकेने अशा परिस्थितीत वाहने खरेदी करणे आवश्यक असताना दुसरीकडे मात्र अर्थसंकल्पात वाहने खरेदीसाठी केवळ ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे पालिकेला वाहने खरेदीसाठी करण्यासाठी तरतूद नाही आणि दुसरीकडे मात्र खासगी कंपन्यांना फायदा मिळेल, अशी परिस्थिती तयार करण्यात आली आहे, असे शिंदे म्हणाले.

काय आहे प्रकार?
कात्रज येथून उरळी येथे ३५० टन कचरा वाहून नेण्यात येणार आहे. एका वाहनात साधारण १५ टन कचरा वाहता येतो. त्यासाठी २३ वाहने खरेदी करावी लागतील. एका वाहनाची किंमत ३३ लाख रुपये असून त्यासाठी साडेसात कोटी रुपये लागतील. नवीन वाहने घेतल्याने ते पुढील दहा वर्षे सुस्थितीत राहू शकतील. ही निविदा पुढील पाच वर्षांसाठी काढण्यात आली आहे. या वाहनांसाठी वर्षभरासाठी इंधन आणि इतर खर्च एक कोटी रुपये झाला असेही गृहीत धरल्यास पाच वर्षांसाठी हा खर्च १२ ते १४ कोटी रुपयांच्या घरात आहे. या कामासाठी महापालिकेने ५० कोटी रुपयांची ​​निविदा काढली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

​शिंदे यांनी केलेले गंभीर आरोप
- या निविदेमध्ये संबंधित ठेकेदारास पाणी आणि वीज मनपा पुरवणार, मात्र इतर निविदांमध्ये याउलट आहे.
- या निविदेमध्ये संबंधित ठेकेदारास ७५ टक्के टिपिंग फी हमी म्हणून देण्यात येणार. इतर निविदांमध्ये केवळ ५० टक्केच का?
- विशेष अटी आणि शर्ती तयार करताना महापालिका आयुक्तांची मान्यता आवश्यक असतानाही ती घेण्यात आलेले नाही.
- करार रद्द करण्याची वेळ आल्यास वाहने खरेदी करण्याच्या अटी-शर्तींमध्ये विसंगती आहे.
- या निविदांमध्ये नवीन कर लागू झाल्यास त्याची भरपाई महापालिका करणार. यापूर्वीच्या निविदांमध्ये संबंधित ठेकेदावरच जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसईत पुण्याचे शंभर नंबरी यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुण्यातील बहुसंख्य शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवला आहे. या परीक्षेत १० सीजीपीए (क्युमुलेटिव्ह ग्रेड पॉइंट अॅव्हरेज) मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सीबीएसईच्या शाळांमध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
कॅम्पमधील आर्मी पब्लिक स्कूलचेही सर्व विद्यार्थी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. ४३ विद्यार्थ्यांनी दहा सीजीपीए मिळवले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापिका बिनिता पुणेकर यांनी दिली. एनडीए खडकवासला येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रत्येकी ९५ टक्के गुण मिळवत कार्शिणी पुरी, शिवानी भाकेर व शिवम शर्मा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जीजी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून ५३ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळवले आहेत. तर ३४ विद्यार्थ्यांना ९ ते ९.८ सीजीपीए मिळविण्यात यश आले, अशी माहिती मुख्याध्यापिका भारती भगवानी यांनी दिली.
वाघोली येथील द लॅक्सिकॉन स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून १४ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए तर ५० टक्के विद्यार्थ्यांना ९ पेक्षा अधिक सीजीपीए मिळविण्यात यश आले. कोथरूड येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलचाही निकाल १०० टक्के लागला. शाळेच्या १० विद्यार्थ्यांना १० सीजीपीए मिळाले. हार्दिनी विखे या विद्यार्थिनीने ९४.८ टक्के मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला. आदित्य चन्ने याने ९३.८ टक्के आणि आदिती शर्मा हिने ९३.६ टक्के अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. अमनोरा स्कूलचाही निकाल १०० टक्के असून २५ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए मिळाले.
विखे पाटील मेमोरिअल स्कूलच्या ११० विद्यार्थ्यांपैकी सर्व उत्तीर्ण झाले असून २४ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए मिळाले आहेत. औंध येथील डीएव्हीचाही निकाल १०० टक्के असून १५८ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए तर १४० विद्यार्थ्यांना ९ ते ९.९ सीजीपीए मिळाल्याची माहिती प्राचार्य सी. व्ही. माधवी यांनी दिली.
बाणेरच्या ऑर्किड स्कूलचा निकालही शंभर टक्के लागला आहे. ३२ विद्यार्थ्यांनी दहा सीजीपीए मिळवले असून ३६ विद्यार्थ्यांना ९ ते ९.८ सीजीपीए मिळविण्यात यश आले आहे. दिल्ली पब्लिक स्कूलचाही निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेच्या १०४ विद्यार्थ्यांनी दहा सीजीपीए, तर १८० विद्यार्थ्यांनी नऊ सीजीपीए मिळविण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका नीलम चक्रवर्ती यांनी दिली.
संस्कृती स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून आदित देशपांडे यांनी ९८.६ टक्के गुण मिळवून प्रथम, ओंकार गरड याने ९७.४ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि अनिकेत कुलकर्णी याने ९७.२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला, अशी माहिती संस्थेतर्फे संचालक देवयानी मुंगळी यांनी दिली. शाळेच्या २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत; तर १८ विद्यार्थ्यांना दहा सीजीपीए मिळविण्यात यश आले आहे.
सीबीएसई बोर्डाची पुणे महापालिकेची पहिली शाळा ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम राखली असून या शाळेतील प्रथमेश इंगळे हा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत आला आहे.
आर्यन्स वर्ल्ड हायस्कूलचे सर्व १०० टक्के विद्यार्थी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. नऊ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळवले. शाळेच्या ३४ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याची माहिती शाळेचे संचालक मिलिंद लडगे व मुख्याध्यापिका सोनल बंड यांनी दिली.
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना सरासरी ८५.१६ टक्के गुण मिळवले आहेत. २९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपुढे गुण मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक मिलिंद नाईक यांनी दिली. ज्ञानप्रबोधिनीत ईशान पेंडसे याने ९७.४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. स्वप्ना गद्रे हिने ९६.६ टक्के गुणांसह द्वितीय; तर साक्षी भोसले हिने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. तर स्वरंजन नायकने ९५.२ टक्के गुणांसह चौथा व रोहिणी जोशी, रामकृष्ण जोशी व सप्तर्षी जोशी या तिघांनी ९५ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे पाचवा क्रमांक पटकावला.
एअर फोर्स स्कूलचाही निकाल १०० टक्के लागला असून २७ विद्यार्थ्यांना दहा सीजीपीए व ५६ विद्यार्थ्यांनी ९ हून अधिक सीजीपीए मिळाले, अशी माहिती मुख्याध्यापिका रागिणी श्रीवास्तव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images