Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तासभर आधी उपस्थिती हवी

$
0
0

पुणे : ‘इंजिनीअरिंग शाखेत होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा केंद्रांमध्ये सोडण्यात येईल. तसेच, पेपर सुरू होण्यापूर्वी साधारण एक तासापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात यावे लागणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल,’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. पेपर व्हायरल होणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांमधील परीक्षा केंद्र रद्द करण्यात येईल, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेचे दहापेक्षा अधिक पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाल्याप्रकरणी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या प्रकाराला ‘मटा’ने बुधवारी वाचा फोडली होती.
डॉ. करमळकर म्हणाले, ‘इंजिनीअरिंगच्या विविध विषयांच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होऊन विद्यार्थ्यांकडे सुमारे ४५ मिनिटांपूर्वी येणे, ही गंभीर बाब आहे. असे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने तांत्रिकदृष्ट्यादेखील उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या पडत आहेत. विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र असणाऱ्या कॉलेजांना पेपर सुरू होण्यापूवी साधारण तासाभरापूर्वी ई-मेल करण्यात येतात. त्यानंतर त्यांच्या प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना देण्यात येतात. त्यामुळे या एका तासात पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीट परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा केंद्रात सोडण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.’

मोबाइलवर बंदी घालण्याचा विचार
परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्यावर बंदी घालण्याचा विचार आहे. तसेच, परीक्षा सुरू होण्यापूर्वी एखादा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याला जागेवर ‘रस्टिकेट’ करण्याची कारवाई करण्यात येईल. दरम्यान, भविष्यात ज्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून पेपर व्हॉट्सअॅप अथवा सोशल मीडियाच्या साह्याने व्हायरल होतील, अशा कॉलेजांमधील परीक्षा केंद्र रद्द करण्यात येईल. तसेच, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘खंदा सेनानी अन् सच्चा मित्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अजात शत्रू... दलित पँथर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ता... रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) खंदा सेनानी... सच्चा मित्र, सर्वसामान्यांचा आधार... अशा विविध आठवणींना उजाळा देत दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांना सर्वपक्षीयांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर, ‘असा कसा झाला घात... विझून गेली नवनाथची वात... कोण मजबूत करेल माझा हात...! अशी भावनिक कविता सादर करून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला संधी देण्यात यावी आणि ही होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात सर्वपक्षीयांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे, माजी कुलगुरू वासुदेव गाडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे शाम देशपांडे, मनसेचे बाबू वागसकर, ‘एमआयएम’चे अंजुम इनामदार, नगरसेवक उमेश गायकवाड, अभय छाजेड, किरण मोघे, भगवान वैराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब ​आंबेडकरांच्या विचारांनी चळवळीत काम करणारे कांबळे यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांची सेवा केली. झोपडपट्टीवासीयांसाठी काम करताना पँथरची डरकाळी कांबळे यांनी फोडली होती, असे आठवले या वेळी म्हणाले.
‘गोरगरीबांसाठी कष्ट करणारे कांबळे यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. कांबळे यांच्यात वैचारिक स्पष्टता होती. कांबळे यांना श्रद्धांजली वाहताना झोपडपट्टीवासीयांना न्याय द्यावा लागेल. कांबळे यांचे हे स्वप्न होते,’ असे बापट म्हणाले.
‘कांबळे यांच्या कुटुंबाच्यापाठीमागे सर्वांनी एकत्रित उभे राहणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल. कांबळे अतिशय शांत स्वभावाचे होते. कठीण परिस्थितीतही ते विचलित होत नसत. कांबळे यांचे स्मारक उभारण्यात येईल,’ अशी ग्वाही महापौर टिळक यांनी या वेळी दिली. बागवे यांनी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कांबळे यांच्या कुटुंबीतील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास काँग्रेस पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादीची मागणी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका नातलगाच्या लग्नास उपस्थित राहणारे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले आहेत. 'महाजन यांच्यासारख्या एका मंत्र्यानं दाऊदच्या नातलगाच्या लग्नाला जाणं हे गंभीर असून त्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. दाऊद इब्राहिमशी असलेल्या कथित संबंधांवरून भाजपनं यापूर्वी शरद पवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्याची आठवण देत अजित पवार यांनी महाजन यांच्यावर टीका केली.

पुण्यातील कचऱ्याच्या प्रश्नावरूनही त्यांनी भाजपला धारेवर धरले. 'पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याचा प्रश्न आहे. तो अद्याप सुटला नाही. महापौर, पालकमंत्री वेगवेगळे बोलतात. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले असले तरी प्रश्न सुटला नाही,' असा टोलाही पवार यांनी हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या सावकारांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्याजाची रक्कम मिळविण्यासाठी कात्रजमधील दोन सावकारांनी एकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोन सावकारांना अटक केली आहे.
संदीप सुभाष भळगट आणि बालाजी गायकवाड (दोघेही रा.सुखसागरनगर,कात्रज) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरुद्ध एका ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपी भळगट आणि गायकवाड यांच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजदराने पाच लाख ५० हजार रुपये घेतले होते. फिर्यादींनी आरोपींना आतापर्यंत ५ लाख ८५ हजार रुपये परत केले आहेत. या व्यवहाराचा आरोपींनी कोणत्याही प्रकारचा हिशोब ठेवला नाही. फिर्यादीने आणखी १० लाख रुपये द्यावेत यासाठी त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली जात होती.
फिर्यादी हे बुधवारी मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाला घेवून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले आणि व्याजाचे पैसे दे नाहीतर जीवे मारण्याची धमकी देवून शिवीगाळ करू लागले.
भळगट यांच्या मुलाला हिसकावून आरोपी घेऊन जात होते. त्यावेळी फिर्यादींनी भळगटला विनवणी करून मुलाची सुटका करुन घेतली. आरोपींवर महाराष्ट्र सावकारी कायदा कलम ३९ आणि ४२,तसेच भादवि ३६४ (अ),२३२,५०४,५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगले वागण्याच्या हमीवर बांधकाम व्यावसायिकाची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रागाच्या भरात एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर कोर्टाने सुटका केली. तसेच त्याला दहा हजार रुपये भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायाधीश समता चौधरी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
हनुमंत शंकर भिलारे (वय ३५, रा. दुर्वांकुर निवारस, थेरगाव, पुणे) याची सुटका करण्यात आली आहे. प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. एक मार्च २०१६ रोजी वाकड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोरच्या बाजूला रस्त्याच्या कडेला ओटा बांधला होता. रस्त्याच्या कडेला ओटा बांधल्याच्या कारणावरून हनुमंत भिलारे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादीने त्याला त्रास होत असेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करा असे सुनावले होते. त्याचा राग आल्यामुळे भिलारेने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यात फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम झाली होती. या प्रकरणी कोर्टात दाखल झालेल्या खटल्यात भिलारे यांची एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांना कोठडी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दौंड
रेशनिंगच्या काळ्या बाजार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
अटकेत असलेले आरोपी आडत व्यापारी राजू शिंदे, गोदामपाल एकनाथ गुणाले, रेशनिंग दुकानदार दादासाहेब नांदखिले, रामचंद्र टेकावडे, विठ्ठल दरेकर यांची पोलिस कोठडी गुरुवारी संपली. त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज दौंड न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक व या गुन्ह्याचे तपास अधिकारी भगवान निंबाळकर यांनी पुरवठा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची कुणकूण लागताच रजेवर गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पुढे तपासाला गती मिळण्यासाठी रेशन पुरवठा विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणे आवश्यक असल्याने दौंड पोलिसांनी तहसीलदार विवेक साळुंखे यांना पत्र देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना पोलिस चौकशीला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक यांनी वैयक्तिक लक्ष घालून अंत्योदय योजनेतील कीड दूर करण्यासाठी तपासाला दिशा दिल्याने या उद्योगातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या नवीन इमारतीच्या फर्निचरवरून कानउघाडणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीतील फर्निचरचे कामकाज संथगतीने सुरू असल्याबद्दल हायकोर्टातून नुकतेच पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. संथगतीने काम सुरू असल्याबद्दल यापूर्वीही संबंधितांना तंबी देण्यात आली होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्ट सुरू होईल तेव्हा नवीन इमारतीत फॅमिली कोर्ट सुरू होईल, अशी अपेक्षा असलेल्या वकिलांना आणखी दोन- तीन महिने वाट पहावी लागणार आहे. फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरुवातीला निधीअभावी रखडले होते. त्यानंतर इमारतीच्या परवानगीवरून काही काळ काम रेंगाळले होते. इमारतीचे कामकाज पूर्ण झाले. मात्र, आता फर्निचरचे कामकाज संथगतीने सुरू आहे. हायकोर्टातील न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. त्यांच्याबरोबर फॅमिली कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीश, फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. फर्निचरचे कामकाज लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना संबंधितांना या वेळी देण्यात आल्या.
दरम्यान, वकिलवर्गाकडूनही फॅमिली कोर्टाचे लवकर स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येते आहे. ज्येष्ठ वकील अॅड. सुशिलकुमार पिसे यांनी, फॅमिली कोर्टाचे लवकर स्थलांतर झाल्यास वकील आणि पक्षकारांनाचा याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या फॅमिली कोर्टात जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या लिफ्टच्या वापरात तेथील सुरक्षारक्षकांची वकील आणि पक्षकारांना अरेरावी सहन करावी लागत असल्याचे अॅड. पिसे यांनी सांगितले. सुरक्षारक्षकांची अरेरावी, लिफ्ट ठरावीक मजल्यावरच थांबतात, पार्किंगची समस्या, कोर्टाच्या आवारात पुरेशा सुविधा नाहीत अशा परिस्थितीत काम करावे लागते. फॅमिली कोर्टाचे स्थलांतर झाल्यास हे चित्र बदलेल. मुख्य म्हणजे नवीन इमारतीतील सुरक्षा आणि स्वच्छतेकडे पहिल्यापासून चांगले लक्ष द्यायला हवे, असे अॅड. पिसे म्हणाले.
‘नवीन इमारतीत फॅमिली कोर्टाचे स्थलांतर व्हावे यासाठी वकील वर्गाकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले. सध्याच्या सुरू असलेल्या फॅमिली कोर्टातील अपुरी पडते आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांचे हाल होत आहेत. वकिलांना बसण्यासाठी असलेल्या रूम अपुऱ्या पडत आहेत. नवीन इमारतीत या अडचणी जाणवणार नाहीत,’ असे अॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.

‘काम वेळेत पूर्ण झाल्यास स्थलांतर शक्य’
फर्निचरचे कामकाज पूर्ण करण्यास उशीर होत असल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. फर्निचरचे काम लवकर पूर्ण झाल्यास तीन महिन्याच्या आत फॅमिली कोर्टाचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे. फॅमिली कोर्टाच्या उद्घाटनासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तारीख ठरविणार आहोत. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आपण याचा पाठपुरावा करणार आहोत, असे फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील उद्योगांना ‘हार्मोनिक्स’चा शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वितरण व्यवस्थेत अडचणी निर्माण करणाऱ्या ‘हार्मोनिक्स करंट’ चे प्रमाण वाढल्यामुळे संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणेत एक प्रकारचे प्रदूषण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशा नोटिसा महावितरणने शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे पाच हजार उच्चदाब ग्राहकांना बजाविल्या आहेत. यामध्ये बहुतांश औद्योगिक ग्राहक असून, या नोटिसांमुळे त्यांच्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये या हार्मोनिक्स करंटचा परिणाम वीजपुरवठा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वीज पुरवठादाराने (महावितरण) पुरविलेला करंट व्यवस्थित न स्वीकारल्यामुळे व्होल्टेजची गुणवत्ता कमी होते आणि ते इतर उपकरणांसाठी त्रासदायक ठरते. व्होल्टेज खराब करणारा हा लोड अधिक असेल, तर त्याचा इतर ग्राहकांनाही त्रास होतो. या प्रदूषित करंटमुळे सर्किट ब्रेकर्स ट्रिप होणे, मोटारी वारंवार जळणे, मेन केबल्स गरम होणे आणि पीएफ कपॅसिटर्स निकामी होणे, अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वतीने पुणे परिमंडळातील सुमारे पाच हजार उच्चदाब ग्राहकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. हा हार्मोनिक्स करंट विशिष्ट मुदतीत कमी न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे या नोटिसांमध्ये म्हटले आहे. मात्र, यावरील उपाययोजना इतक्या कमी मुदतीत कमी करणे शक्य नसल्याने या उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

काँट्रॅक्टर संघटनेचे चर्चासत्र
इतक्या मोठ्या संख्येने ग्राहकांना नोटिसा बजाविण्यात आल्यामुळे उपाययोजनांसाठीही लगबग सुरू झाली आहे. नव्याने उभ्या राहिलेल्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या पुणे शाखेच्या वतीने (इकॅम) आज (शुक्रवारी) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजीनगरमधील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्समध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे संघटनेचे राजीव जतकर यांनी कळविले आहे.

‘हार्मोनिक्स’ची कारणे
हार्मोनिक्सचा समावेश असलेल्या करंटना ‘डिस्टॉर्टेड करंट’ म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढू लागला, मात्र, वीजपुरवठा यंत्रणा जुनीच आहे. तसेच नवी उपकरणे अधिक कार्यक्षम असून वेगाने काम व उर्जाबचतही करतात; मात्र, ही उपकरणे हार्मोनिक्स करंट घेतात, असे तज्ज्ञांना आढळून आले आहे. वापरकर्त्यांबरोबरच वीज वितरण यंत्रणाही जुनी असल्याने हा प्रश्न उद्भवतो.

नुकसान काय ?
-विद्युत चुंबकीय तत्त्वावर चालणाऱ्या उपकरणांमधील (मोटर्स-ट्रान्सफॉर्मर्स) लॉसेस वाढतात. त्यामुळे तापमान वाढून नुकसान होऊ शकते.
-केबल्स, स्विचेस, सर्किट ब्रेकर्स ट्रिप किंवा निकामी होतात.
-विद्युत उपकरणांमधील इन्सुलेशन खराब होऊन त्यांचे आयुष्यमान कमी होते.
-कंपने (व्हायब्रेशन्स) वाढल्यामुळे उपकरणे बिघडू शकतात.


उपाय काय ?
-उच्चदाब ग्राहकांनी हार्मोनिक्स करंटची मर्यादा तज्ज्ञांकडून तपासून घ्यावी
- लघुदाब ग्राहकांना (एलटी) ही तरतूद लागू नसल्याने त्यांनी काही करण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
- शक्यतो प्लांटमधील ‘लोड पॅटर्न ’ २४ तास मोजून तपासणी करून घ्यावी.
-काही वेळा फिल्टर्स तयार करणाऱ्या कंपनीकडून अशी ऑडिट मोफत केली जातात. (मात्र, नको असलेली फिल्टर्स गळ्यात पडण्याचा संभव)
-हार्मोनिक्सची पातळी जास्त असेल, तर अॅक्टिव्ह हार्मोनिक फिल्टर बसविता येतात.


महावितरणने बजाविलेल्या नोटिसांमुळे वीजपुरवठा क्षेत्रातील हा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘हार्मोनिक्स’ करंटचे प्रमाण मर्यादेत राखणे, ही वीजपुरवठादार आणि वापरकर्ते अशा दोघांची जबाबदारी आहे. या यंत्रणेत बसविण्यात आलेल्या काही उपकरणांमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरील उपाययोजनांचे दृश्य आर्थिक परिणाम दिसत नाहीत. महावितरणने सप्लाय कोडच्या तरतुदींनुसार यावर अंमलबजावणी केली, तर प्रश्न सुरळीतपणे मार्गी लागेल.
नरेंद्र दुवेदी, चार्टर्ड इंजिनीअर आणि एनर्जी ऑडिटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छेडछाड केल्यावरून संस्थाचालकाला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर
चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील पसायदान गुरुकुल संस्थेचे चालक व प्रवचनकार बाबाजी महाराज चाळक व त्यांचे बंधू आबा चाळक या दोघांच्या विरोधात संस्थेतील मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी व बाललैंगिक प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाबाजी चाळक व त्यांच्या बंधूला अटक करण्यात आली असून, चाळक यांना न्यायलयासमोर उभे केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की हा प्रकार जून २०१६ ते फेबुवारी २०१७च्या दरम्यान घडला. फिर्यादीच्या दोन्ही मुली अनुक्रमे १३ व ११ वर्षांच्या असून, त्या चव्हाणवाडी येथील पसायदान गुरुकुल ज्ञानदीपनगर येथे आध्यात्मिक शिक्षणासाठी निवासी राहत होत्या. या मुलीप्रमाणेच इतर १५ ते २० मुली येथे आध्यत्मिक शिक्षणासाठी राहतात.
दिवाळीनंतर मुली गुरुकुलमध्ये गेल्यानंतर फिर्यादीच्या एका मुलीने डिसेंबर २०१६ मध्ये आपणास गुरुकुल येथे राहायचे नाही असे सांगितले; पण वडिलांनी समजावून सांगितले त्या तेथेच राहिल्या. जानेवारी २०१७ मध्ये त्या मुलींसमवेत राहणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या आजोबांनी मुलीचा आश्रमात चालणाऱ्या गैरकृत्या संदर्भात फिर्यादीला माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी हे स्वत: आश्रमात गेले आणि त्यांनी मुलीशी भेट घेवून माहिती घेतली असता तिथे बाबाजी महाराज चाळक हे मुलींची छेडछाड करीत असल्याचे समजले. मुली प्रचंड दडपणाखाली असल्याचे पाहून कोठेही तक्रार न करता फिर्यादी मुलीना घरी घेवून आले व गावाकडील शाळेत टाकले. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांनी चाळक यांच्या विरोधात तक्रार दिली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक प्रतिबंधक कायदान्वये व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बाबाजी चाळक व आबाजी चाळक यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भीमगौंडा पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैद्यांना पासबुकचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
विविध गंभीर गुन्ह्यात येरवडा महिला कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांना दैनंदिन कामे केल्यानंतर मिळणारा पगार यापुढे स्वतःच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कारागृहात काम करून मिळविलेल्या पैशावर आता व्याजही मिळणार आहे. तसेच, रजेच्या कालावधीत बाहेर पडल्यानंतर पैसे खर्च करण्यासाठी त्या एटीएम कार्डचा वापर करू शकतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने येरवडा महिला कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या १३९ महिला कैद्यांचे एसबीआय खडकी शाखेत बचत खाते उघडण्यात आले असून, सर्व कैदी खातेदारांना गुरुवारी पासबुक आणि एटीएम कार्डचे कारागृहात वाटप करण्यात आले. या वेळी बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुभाष दास, शाखा व्यवस्थापक नीलेश सिंग, तेजस्विनी वाघमारे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, उपअधीक्षक दिलीप वासनिक, तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर खरात, महिला कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटराव उपस्थित होते.
येरवडा महिला कारागृहात वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना अगरबत्ती बनविणे, टेलरिंग, मेणबत्ती तयार करण्याचे तसेच शोरूमसाठी लागणाऱ्या वस्तू बनविणे असे विविध कामे देतात. सुमारे १४० कैदी ही कामे करतात.
कारागृहात काम करणाऱ्या महिला कैद्यांना दररोज पंचावन्न रुपये वेतन सरकारकडून दिले जाते. जमा होणारे वेतन आजपर्यंत सरकारच्या स्वतंत्र चालू खात्यात जमा केले जात होते. चालू (करंट) खाते असल्याने त्यावर व्याज मिळत नाही. तसेच, महिलांना आपल्या शिक्षेच्या कालावधीत आजपर्यंत किती रक्कम पगार म्हणून जमा झाली हे लगेच समजत नव्हते.
त्यामुळे कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी पुढाकार घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने प्रत्येक महिला कैद्यांसाठी बचत खाते उघडले. त्यामुळे महिलांना स्वतःचे बँकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड मिळाले आहे.
याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘वर्षानुवर्षे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांना आपण काम करून किती पैसे जमा झाले, किती खर्च झाले हे लवकर समजत नव्हते, तसेच सव्वाशेहून अधिक महिलांच्या पगाराची रक्कम सरकारच्या चालू खात्यात असल्याने त्यावर व्याज मिळत नव्हते; पण आजपासून शिक्षा झालेल्या १३९ महिला कैद्यांचे पगाराचे अकरा लाख रुपये रक्कम त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे कैद्यांना आपण कामातून आजपर्यंत किती पैसे कमविले हे दर महिन्याला कळणार आहे. याशिवाय कारागृहातून रजेवर बाहेर पडताना संबंधित महिलेला त्यांचे एटीएम कार्ड दिले जाणार आहे. त्यामळे त्यांना स्वतःच्या पैशातून हवे ते खरेदी करू शकतील.
पुढील टप्प्यात मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा झालेल्या पुरुष कैद्यांचे एसबीआय बँकेत बचत खाते उघडण्यात येणार असल्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मजली इमारत नऱ्ह्यात जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नऱ्हे परिसरातील अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईत तीन मजली इमारत संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आली. ‘पीएमआरडीए’कडून वारंवार नोटीस बजावून त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये गुरुवारी सकाळी ही धडक कारवाई करण्यात आली.
नऱ्ह्यातील सर्व्हे क्र ५/१/१ या ठिकाणी विशाल राजेंद्र भूमकर आणि राजेंद्र म्हस्कू भूमकर यांच्याकडून अनधिकृत बांधकाम सुरू होते. त्यांना यापूर्वीच नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही, अनधिकृत बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याने संपूर्ण बांधकाम पाडण्यात आले. तळमजला आणि त्यावर तीन मजले असे सुमारे बावीसशे चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएचे अधिकारी आणि पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांच्यासह उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार विकास भालेराव आणि उपअभियंता वसंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

परवानगीची खात्री करून घ्या
‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात घर किंवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी इच्छुक खरेदीदारांनी संबंधित बांधकामास परवानगी आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामांसाठी
पीएमआरडीएचे ‘अॅप’
अनधिकृत बांधकामांची माहिती नागरिकांनाही सहजपणे पोहोचवता यावी, यासाठी ‘पीएमआरडीए’कडून अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून थेट फोटो काढून त्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देता येणार आहे. तसेच, illegalconstructions.pmrda@gmail.com या ई-मेलवरही नागरिकांना अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी करता येऊ शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरणीय निकषांचे पालन आवश्यक
‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रामध्ये पाच हजार स्क्वेअर मीटर ते दीड लाख स्क्वेअर मीटर बांधकाम करताना, पर्यावरणीय निकषांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारने त्यासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा बांधकामांमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन होते का, हे तपासण्यासाठी पाच सदस्यीय ‘पर्यावरण समिती’ (एन्व्हायर्न्मेंटल सेल) कार्यान्वित करण्यात आला आहे. पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत जावळे हे या समितीचे प्रमुख असतील. त्यांच्यासह श्वेता पाटील, श्या. रा. चव्हाण हे पीएमआरडीएचे अधिकारी आणि एम. यू. खोब्रागडे व गायत्री व्यास या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) सहायक प्राध्यापक या समितीच्या सदस्य असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाजनांनी राजीनामा द्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कथित संबंध असल्याचा बिनबुडाचा आरोप भाजपने यापूर्वी केला होता. आता दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजर राहिले. त्यामुळे ही गंभीर चूक असून त्याची जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांचे संबंध असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनी दाऊदच्या नाशिक येथील नातेवाइकांच्या लग्नात लावलेल्या हजेरीबाबत समाचार घेतला. ही गंभीर चूक असल्याचे सांगत महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली.
‘नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेत ५८४ कोटी रुपये तर राज्य बँकेत २१७७ कोटी अडकले आहेत. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांची आहे. नोटाबंदी होऊन आता सात महिने झाले तरी केंद्र सरकारने हे पैसे मोकळे केले नाहीत. त्याकरिता शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मागणी केली होती. मात्र त्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही,’ अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारवर त्यांनी टीका केली.
‘सध्या काश्मीरची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मोदी यांची ५६ इंची छाती पाहायला मिळाली नाही. तर दुसरीकडे तूर, कांदासारख्या पिकांची स्थिती पाहता शेतकऱ्याला चांगले दर मिळाले नाहीत. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना अद्याप ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत. मोदी सरकारने सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
लातूर येथून परतताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. त्याबाबत विचारता पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना बारा कोटी जनतेच्या शुभेच्छा आहेत. सध्या वापरात असलेले हेलिकॉप्टर हे आमच्या काळात खरेदी केलेले आहे. आता अद्ययावत तंत्रज्ञान असलेले आणि दोन पायलट असलेले चॉपर अतिविशेष व्यक्तींसह सामान्यांनी वापरावे.’

‘लवासा’च्या निर्णयाचा परिणाम नाही
लवासासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच एक निर्णय घेतला. लवासासाठी स्वतंत्र असलेले प्राधिकरण रद्द करीत पुणे महानगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत त्याचा समावेश केला आहे. या संदर्भात विचारता, ‘आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सरकारला योग्य वाटेल ते निर्णय घेऊ शकतात. लवासाच्या निर्णयाचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही’, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कचरा प्रश्नाचे काय?
पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक वेगवेगळे वक्तव्य करतात. या प्रश्नासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्याबाबत बैठका झाल्या. परंतु, त्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप झाला नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. पुण्याच्या मित्रमंडळ चौकातील जागेबाबतचा वादासंदर्भात ते म्हणाले, ‘हे मूठभर लोकांचे आणि बिल्डरांचे सरकार आहे. असे आपण पूर्वीच सांगितले होते. ते आता सिद्ध होत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी संघटनांकडून कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील इंजिनीअरिंग शाखेचे पेपर परीक्षेपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपहून व्हायरल होऊन पेपरफुटी झाल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रतिकात्मक तिरडीची अंत्ययात्राच काढली. तसेच, कुलगुरू कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक तिरडीचे दहन करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना आदींनी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि कॉलेजांच्या परीक्षा केंद्र रद्दची मागणी केली.
विद्यापीठाच्या परीक्षेतील इंजिनीअरिंग शाखेचे दहापेक्षा अधिक विषयांचे पेपर व्हॉट्सअ‍ॅपहून व्हायरल होऊन फुटले. या प्रकरणी विद्यापीठाने विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर, एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांविरुद्ध तर लोणीकंद पोलिसांनी वाघोलीच्या रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर ‘अभाविप’ने परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रतीकात्मक तिरडीची अंत्ययात्राच काढली. तसेच, कुलगुरू कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक तिरडीचे दहन करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
इंजिनीअरिंगसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याने प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून केवळ चौकशीचा फार्स करण्यात येतो आतापर्यंत कोणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विद्यापीठ प्रशासन व काही ठराविक महाविद्यालये ही काही मुलांना पास करण्यासाठी संगनमताने पेपर फोडत असल्याचा गंभीर आरोप देखील या वेळी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन मागण्यांची माहिती दिली. प्रतीक दामा, प्रदीप गावडे, गुणवंत कंदमुळे आदींचा समावेश होता. डॉ. चव्हाण यांची हकालपट्टी करण्यात यावी, ज्या कॉलेजांमधून पेपर फुटले आहेत, त्या कॉलेजांवर फौजदारी कार्यवाही व्हावी तसेच परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही केली जावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’तर्फे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी डॉ. करमळकर आणि डॉ. चव्हाण यांच्याकडे केली आहे. या प्रकरणावर कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास येत्या तीन दिवसांत एनएसयूआयतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले. भूषण रणभरे, उमेश कंधारे, युवराज नायडू, उमेश पवार, आकाश काळे, रोहन शेट्टी, पूजा घोलप, संदेश टेंभुर्णे, राकेश आढाव आदी उपस्थित होते. पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांवर कारवाई करावी अन्यथा भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शहर संघटक अतुल दिघे यांनी डॉ. करमळकर यांना दिली. या वेळी किरण पाटील, प्रसाद बागाव, ऋषिकेश जाधव, प्रथमेश पवार उपस्थित होते.

‘कॉलेजांवर कारवाई करून दाखवा’
विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा सावळा गोंधळ त्वरित थांबववा. तसेच, पेपर व्हायरल होणाऱ्या इंजिनियरिंग कॉलेजवर चार दिवसांत गुन्हा दाखल करून त्यांची परीक्षा केंद्राची संलग्नता रद्द करावी. भविष्यात पेपरफुटी होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना आखा अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी डॉ. करमळकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदविण्यापेक्षा पेपर व्हायरल होणाऱ्या इंजिनियरिंग कॉलेजांवर कारवाई करून दाखवावी, असे आवाहन युवासेनेचे शहराध्यक्ष किरण साळी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोतांचा शेट्टींवर निशाणा

$
0
0

खोतांचा शेट्टींवर निशाणा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठे करीत नाही अथवा संपवत नाही. जो तो त्याच्या कर्माने मोठा अथवा छोटा होत असतो,’ असे सांगत राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
खोत यांनी पुणे व पिंपरीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेकडे पाठ फिरविली. हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. पुण्यात एका बैठकीला आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आत्मक्लेशाबाबत बोलायचे नाही असे सांगत भाजपच्या प्रवेशाबाबतही त्यांनी मौन धारण केले. मात्र, सांगवीतील एका कार्यक्रमात त्यांनी शेट्टी यांचे नाव न घेता टिप्पणी केली.
दरम्यान, राज्यात धान्य साठवणुकीच्या क्षमतेसाठी गोदामांची संख्या अपुरी आहे. त्यासंदर्भात पणन मंडळात सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘कडधान्ये, तृणधान्येदेखील नियमनमुक्त केली जाणार आहे. या दोन्ही गोष्टी नियमनमुक्त केल्या तर देशातील इतर राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात येतील. तूर तसेच अन्य डाळी खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. शेतकऱ्यांना स्वच्छ, वर्गवारी केलेल्या कडधान्यांची विक्री करणे शक्य होईल,’ असे खोत यांनी सांगितले.
केंद्र सरकारने दिलेल्या एफआरपीमधील वाढ ही चांगली आहे. त्याचे कृषिराज्यमंत्री म्हणून आपण स्वागत करतो. एफआरपी वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांना २८०० ते ३००० रुपयांपर्यंत पहिला हप्ता द्यावा लागणार आहे. तर काही कारखान्यांना ३१०० रुपयांपर्यंतचा हप्ता द्यावा लागेल. यापूर्वी आम्ही केलेली ३१०० रुपये हप्त्याची मागणी आता पूर्ण झाली आहे. पणन मंडळाच्या आवारात भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवात सुमारे साठेआठ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावर पणनमंत्री सुभाष देशमुख तसेच आपण आग्रही आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे मंडळ निवडणे शक्य होईल, असे खोत यांनी सांगितले.

किरकोळ विक्रीची चौकशी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळाच्या आशीर्वादाने मार्केट यार्डातील भुसार विभागातील घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्री सुरू आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याबाबत पणन राज्यमंत्री खोत यांना विचारता, या संदर्भात बाजार समितीकडून अहवाल मागितला जाईल आणि त्या संदर्भात चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘सरकारकडून सर्वाधिक तूरखरेदी’
पिंपरी : राज्याच्या एकूण तूर उत्पादनापैकी सरकारने सुमारे ९० ते ९५ टक्के तूर खरेदी केली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणारे आतापर्यंतचे हे पहिलेच सरकार ठरले आहे. तसेच उर्वरित तूरखरेदीसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी सांगवी येथे बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व पुणे आणि फरगडे फामर्स इंडिया व इंडिया प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील साईचौकातील पी.डब्लू. डी मैदानावर संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजारचे उद्‌‍घाटन आज खोत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापती शारदा सोनवणे, फरगडे फामर्स इंडिया इंडिया प्रोड्युसर कंपनी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी खोत म्हणाले की, भविष्यातही उत्पादनात वाढ होणार आहे. यासाठी आम्ही आतापासूनच तयार करत आहोत. त्यामुळे सरकार कायम शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. त्यामुळेच शिवार यात्रा किंवा आठवडे बाजार, धान्य महोत्सव या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आठवडे बाजारातील त्रुटीही आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोण काय म्हणते याकडे आमचे लक्ष नाही, त्यापेक्षा कामावर आमचा भर असेल.
या आठवडे बाजारसाठी दौंड, यवत, पाटस, पिंपरखेड, गुळाणी, आळंदी, बारामती येथून सुमारे १६ शेतकरी आपला माल विकण्यासाठी घेऊन आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला जाऊ द्या ना घरी ...!

$
0
0

आजपासून भाजपचे पक्षविस्तार अभियान सुरू होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना येत्या पंधरा दिवसांत ‘मला जाऊ द्या ना घरी,’ म्हणण्याची वेळ येणार आहे. पक्ष विस्तारासाठी आजपासून (२६ मे) या सर्व माननीयांना घरी येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. शहरात घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार आणि नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
भाजपचे केंद्रीय पातळीवरून ठरलेल्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना २६ मेपासून २० जून पर्यंत ही विस्तार योजना आखण्यात आली आहे. ही योजना शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राबवली जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन देशपातळीवर ही कार्यविस्तार योजना अंमलात आणण्यात येणार आहे. भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांना या योजनेत सहभागी होण्यास बंधन घालण्यात आले आहे. नगरसेवकांना त्यांचा प्रभाग, शक्यतो विधानसभा मतदारसंघ सोडून जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वांना पुढील पंधरा दिवस आपल्याकडे जबाबदारी असलेल्या बूथवर जातीने हजर राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्या-त्या परिसरातील कार्यकर्त्यांच्या घरी राहणे, त्या परिसरातील घरोघरी जाऊन पक्ष, मोदी सरकार तसेच सरकारी योजनांचा प्रसार करणे, भाजपचे सदस्य बनवणे, नवीन कार्यकर्ते जोडणे असे या कार्यविस्तार योजनेतून अपेक्षित आहे.
विस्तार योजनेदरम्यान सर्व नगरसेवकांनी बूथ परिसरातील प्रभावी व्यक्तींना भेटावे, त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आदींची माहिती संकलित करायची आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतात. हा कार्यक्रम बूथमध्ये दर महा मोठ्या प्रमाणात करावयाचा आहे. त्याची जागा आणि जबाबदारी आदींची निश्चितीही करण्यात येणार आहे.

विस्तारकांनी करावयाची कामे
- बूथवर ध्वजारोहण
- घरोघरी जाऊन साहित्य वाटप
- बूथप्रमुख, बूथस​मिती सदस्यांशी संपर्क
- बूथ समिती नसल्यास नव्याने स्थापना
- बूथवर नवीन सदस्य बनवणे. दिवसाला ५० तर, १५ दिवसांत ७५९ सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट.
- ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी
- पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती

चुकीला माफी नाही
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मोठे नेते याचप्रकारे मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे पक्षात हा कार्यक्रम गांभीर्याने घेण्यात आला आहे. यामध्ये जबाबदारी पाळण्यात कसूर केल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे बजाविण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत अन्य पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना या प्रकारची शिस्त आणि कार्यक्रमांची सवय नाही. त्यामुळे या सर्वांना हे पंधरा दिवस जड जाणार, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये मातीचा भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये माती भरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणण्यात आला.
घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या एका डंपरमध्ये निगडी, ओटास्कीम येथून गेल्या अनेक दिवसांपासून माती भरली जात होता. हा प्रकार नगरसेविका घोलप यांच्या निदर्शनास आला. गुरुवारी कचरा गोळा करणारे कर्मचारी निगडी येथे डंपरमध्ये माती भरत होते. घोलप यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हा डंपर त्यांनी महापालिकेत आणला आहे. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांना या प्रकरणाची त्यांनी माहिती दिली आहे.
डंपरमध्ये ७० टक्के माती भरली जाते आणि दाखविण्यासाठी वर थोडा कचरा टाकला जातो. वजन वाढविण्यासाठी ठेकेदाराने डंपरमध्ये विविध जड वस्तूही ठेवल्या होत्या. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत परिसरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी सहा गाड्या आहेत. या ठेकेदारावर कडक कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या डंपरचे वजन किती आहे, याची माहिती घेऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी, नगरसेविका घोलप, नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज कामामुळे वीजपुरवठा खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या ड्रेनेजच्या खोदकामात गुरुवारी सायंकाळी दोन वीजवाहिन्या तुटल्याने स्वारगेट, पर्वती, सदाशिव पेठ, सहकारनगर आदी परिसरातील सुमारे २३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अडीच तासांसाठी खंडित झाला होता.
महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ड्रेनेजसाठी खोदकाम सुरु आहे. यात जेसीबीने महावितरणच्या २२ केव्हीच्या दोन इन्कमर वीजवाहिन्या तोडल्याने जुन्या पर्वती उपकेंद्राचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे या उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ वाहिन्यांचाही वीजपुरवठा बंद झाला. परिणामी स्वारगेट, सुभाषनगर, पर्वती गाव, मित्रमंडळ चौक, अरण्येश्वर, सहकारनगर, सदाशिव पेठ, बाजीराव रोड, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी, जनता वसाहत, वाघजई, दत्तवाडी आदी परिसरातील सुमारे २३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी पाच वाजता खंडित झाला होता.
महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरु केले. तुटलेली एक वीजवाहिनी साडेसात वाजता दुरुस्त केल्यानंतर जुन्या पर्वती उपकेंद्राच्या पाच वाहिन्यांचा जनता वसाहत, वाघजई, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्त्याचा काही भाग वगळता उर्वरित सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर पुन्हा भारव्यवस्थापन करून व पर्यायी व्यवस्थेतून रात्री साडेआठ वाजता जनता वसाहत, वाघजाई, विठ्ठलवाडी व सिंहगड रस्त्याच्या परिसरातील वीजपुरवठाही सुरु करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘बालचित्रवाणी’ला टाळे

$
0
0

शिक्षणमंत्र्यांची झळाळीची घोषणा हवेतच; सरकारी अनास्था कारणीभूत

पुणे : आर्थिक विवंचनेत सापडल्याचे कारण देऊन शिक्षण विभागाने नियामक मंडळाच्या बैठकीत राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे ‘बालचित्रवाणी’ला झळाळी देऊ, ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा हवेतच विरली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सुमारे दीड कोटी रुपयांचे काम बालचित्रवाणीकडून गुपचूप करून घेण्यात येत होते.

शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ला बालचित्रवाणीची स्थापना केली. संस्थेत आजपावेतो सहा हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती झाली असून, अनेकांना राष्ट्रीय पारितोषिकेही मिळाली आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतच लहानाचे मोठे झाले आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार बालचित्रवाणीच्या मुशीतूनच घडले आहेत. असे असतानाही बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बालचित्रवाणीला केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून एप्रिल २००३पर्यंत अनुदान मिळत होते.

या अनुदानातून बालचित्रवाणीत काम करणारे निर्मिती सहायक, कॅमेरामन, संकलक, वेशभूषाकर, तंत्रज्ञ आदींचा पगार भागवला जायचा. मात्र, एप्रिल २००३ नंतर अनुदान बंद झाल्याने बालचित्रवाणीच्या भविष्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न बिकट झाला. त्यानंतर कार्यक्रमाच्या उत्पन्नातून बालचित्रवाणीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार भागविले जायचे. एप्रिल २०१४ मध्ये खर्च आणि पगार थांबवण्यात आला. त्यामुळे पगार मिळण्यासाठी कर्मचारी कोर्टात गेल्यावर राज्य सरकारला ३२ कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा आदेश दिला.

या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळाले. मात्र, गेल्या आठ महिन्यांचा पगार अद्याप झालेला नाही. त्यातच तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यासाठी औद्योगिक कलह कायद्यातील ५० पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते, अशी भूमिका मांडण्यात आली. यासोबतच बालचित्रवाणी स्थापन झाली तो काळ आणि आताचा काळ यात फरक असून शिक्षण तंत्रज्ञानस्नेही झाले आहे. शाळांनी शैक्षणिक व्हिडिओ आणि कार्यक्रम तयार केले आहे. त्यामुळे बालचित्र‍वाणी संस्थेची आता गरज नसल्याचा दाखला देण्यात आला. ई-बालभारती नावाने नवी संस्था सुरू करावी आणि त्या संस्थेमध्ये बालचित्रवाणीचे कर्मचारी शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण करत असतील तर त्यांना सेवेत घ्यावे, अन्यथा त्यांना औद्योगिक कायद्यानुसार देय आर्थिक रक्कम देण्यात यावी, अशा निर्णय झाला आहे.

गुपचूप सुरू होते रेकॉर्डिंग

एकीकडे बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे गुपचूप त्यांच्याकडून कामे करून घ्यायची, असा प्रकार गुरुवारपर्यत बालचित्रवाणीत सर्रास सुरू होता. बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून शिक्षण विभागातर्फे नव्या सातवीच्या पुस्तकांच्या ऑडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंगचे काम गेल्या १९ तारखेपासून गुपचूप सुरू होते. हे काम करण्याचे आदेश माजी शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनीच दिले. सुमारे दीड कोटी रुपयांचे काम महिनाभर चालणार होते. मात्र, अचानक गुरुवारी दुपारी काम थांबविण्यात आल्याने कर्मचारी द्विधा मनस्थितीत आहेत.

बालचित्रवाणीची स्थापना शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी झाली होती; नफा कमाविण्यासाठी नाही. त्यामुळे संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्याचे कारण सांगून बंद करणे योग्य नाही. बालचित्रवाणी सुरू राहण्यासाठी वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये लागतात. हे रुपये महिन्याच्या कार्यक्रमांवर कमविता येऊ शकतात. त्यासाठी सरकारने आम्हाला त्यांच्याच विभागाचे कार्यक्रम ऑडिओ-व्हिडिओ करण्याचे कंत्राट द्यावे. यातून आर्थिक विवंचनेचा प्रश्न सुटेल.

-बालचित्रवाणीतील एक कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत पाऊस पडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा अधिक असल्याने पुणेकरांची उन्हाच्या चटक्यापासून सुटका झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा पारा पुन्हा चाळिशीपर्यंत पोहोचला होता. गुरुवारी त्यामध्ये काहीशी घट झाली. ३७.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान २४ अंशांवर स्थिरावले. तरीही, दिवसभर घामाच्या धारा सहन कराव्या लागल्या. दुपारनंतर काही भागांत ढगाळ हवामान झाले असले, तरी पावसाने हुलकावणी दिली.
येत्या एक-दोन दिवसांत तापमानात फरक पडण्याची शक्यता नाही, असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. तसेच, दुपारनंतर शहराच्या काही भागांत वादळी पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, राज्यातील सर्वाधिक ४७ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली. अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ या शहरांमध्येही पारा ४५ अंशांच्या पुढेच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’मध्ये रंगला किस्सा ‘खुर्ची’चा

$
0
0

वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून ‘मानापमान’ नाट्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापन दिन उद्या, २७ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त आज, शुक्रवारी आणि शनिवारी पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांची तयारी एकीकडे सुरू असताना व्यासपीठावर कोणी बसायचे यावरून साहित्य परिषदेत वितंडवाद सुरू झाले आहेत. काही कार्यकारिणी सदस्यांनी आम्हाला व्यासपीठावर बसायचे आहे, असे ठणकावून सांगितल्याने परिषदेतील राजकारण पुन्हा ऐरणीवर आले आहे. या शिवाय पुरस्कारांच्या प्रमाणपत्रावर कोषाध्यक्षांचे नाव नसल्याची चर्चा आहे.
साहित्य परिषदेतर्फे आज वार्षिक ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक प्रदान समारंभ तसेच उद्या मसाप जीवनगौरव आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार समारंभ असे दोन कार्यक्रम होणार आहेत. परिषदेच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील हा दुसरा वर्धापनदिन आहे. गेल्यावर्षी प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन झाल्याने एकच दिवस कार्यक्रम झाला. जाधव सरांच्या निधनामुळे पुढील कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांना मिरविण्याची संधी गेली. ही संधी यंदा साधण्याचा विडा काही कार्यकारिणी सदस्यांनी उचलला आहे.
परिषदेच्या संकेतानुसार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह व कोषाध्यक्ष हे पदाधिकारी असतात. वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये कार्यवाह व कार्यकारिणी सदस्य यांना संधी दिली जाते. मात्र, गेल्या वर्षभरात विशिष्ट चेहरेच समोर येत असल्याने पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्यात रोष वाढत आहे. त्यातच आता कार्याध्यक्षांच्या खास मर्जीतील कार्यकारिणी सदस्यांनीच आम्हाला व्यासपीठावर बसायचे आहे, असा हट्ट धरल्याने पंचाईत झाली आहे. यामुळे बाकीचे सदस्य नाराज आहेत. ठरावीक सदस्यांनाच संधी का, असा प्रश्न कार्यवाह व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित केला आहे. व्यासपीठावर बसायचे आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या सदस्यांमध्ये सातारा, कोकण, फलटण व चाळीसगाव या शाखेतील सदस्य आघाडीवर आहेत.
बाहेरगावच्या कार्यवाह व प्रतिनिधींना व्यासपीठावर स्थान नको, अशी स्पष्ट भूमिका पुण्यातील काही सदस्यांनी घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम महत्त्वाचा असताना तो पार पाडण्याचे सोडून परिषदेत खुर्चीवरूनच मानापमान नाट्य रंगले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images