Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनच्या प्रगतीची पुणेकर आतुरतेने वाट बघत असले, तरी शहरातील उकाडा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. शहरात मंगळवारी संध्याकाळी वातावरण ढगाळ झाले; पण दिवसभरात कमाल ४०.२ अंश सेल्सिअस; तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवसांत शहरात हवामान ढगाळ राहणार आहे.

वळवाच्या पावसाने आठवड्यापूर्वी हजेरी लावल्यानंतर नागरिक आता पुढच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत; पण शहरातील उन्हाचे चटके वाढतच आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शहरात सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सोमवारी रात्रीपासूनच उकाडा वाढला आणि मंगळवारी दिवसभरात तापमानाचा पारा ४०.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. दुपारनंतर शहरात वातावरण ढगाळ झाले होते. उपनगरांमध्ये जोराचा वारा होता; पण शहरात पाऊस पडला नाही. मावळ, मुळशी, जुन्नर भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यातील सर्वाधिक तापमान ४६.६ अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये नोंदवले गेले. पुढील दोन दिवसांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुण्यात दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहिल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ महामेट्रोला जूनपूर्वी जागा द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सरकारी जागा जूनच्या अखेरपूर्वी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला. स्वारगेट येथे ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’साठी नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. मेट्रोच्या डेपो, स्टेशनसाठी आवश्यक असणाऱ्या सरकारी जागा महामेट्रोच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे पुढील महिन्याभराच्या कालावधीत दूर केले जावेत, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पुणे मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यासाठी या जागा महामेट्रोला मिळणे आवश्यक होते. त्यादृष्टीने, महामेट्रोने जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या जागांचे प्रस्ताव सादर केले होते. या जागांबाबत मंगळवारी फडणवीस यांना सादरीकरण देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाच्या डेपोसाठी कृषी महाविद्यालयाची जागा, वनाज ते रामवाडी मार्गासाठी कोथरूड येथील कचरा डेपोची जागा; तसेच शहरातील तिन्ही मेट्रो मार्गांच्या ‘इंटरचेंज स्टेशन’साठी शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेची मागणी महामेट्रोने केली आहे. वल्लभनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) जागेची मागणी करण्यात आली होती.

स्वारगेट येथे एसटी, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस आणि मेट्रो या तिन्ही प्रवासी सेवांचा एकत्रित विकास करण्याची कल्पना मांडण्यात आली. यापूर्वीदेखील स्वारगेट येथे ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या दृष्टिने नियोजन करून पुणेकरांना सर्व प्रवासी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

शिवाजीनगरला ‘ट्रान्सपोर्ट हब’

शिवाजीनगर येथेही रेल्वे, पीएमपी बस, एसटी आणि मेट्रो यांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रयत्न केला जावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. सध्या शिवाजीनगर येथे रेल्वे स्थानकाच्या लगतच एसटी आणि पीएमपीची स्थानके आहेत. तर, शिवाजीनगर येथील मेट्रोचे स्टेशन भुयारी असेल. त्यामुळे, या सर्व प्रवासी वाहतूक सेवांकरिता स्वारगेटच्या धर्तीवर शिवाजीनगर येथेही ‘ट्रान्सपोर्ट हब’ विकसित केला जावा, असे त्यांनी सुचविले.

महामेट्रोला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?

पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) आहे. महामेट्रोच्या ताब्यात येणाऱ्या जागांवर विविध सेवा-सुविधांच्या विकसनामध्ये सध्या काही अडचणी येत असल्याने त्याला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याबाबतची प्राथमिक चाचपणी या वेळी करण्यात आली. हा दर्जा मिळाल्यास स्टेशन आणि त्यालगतच्या सुविधांच्या निर्मितीसाठी त्यांना सातत्याने महापालिका किंवा इतरांकडे परवानगी मागण्याची गरज उरणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून

0
0

पुणे : बुधवार पेठेतील रामेश्वर मार्केट जवळ एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

बित्ती मुल्ला (वय २२, रा. जनता बिल्डींग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. बुधवार पेठेतील रामेश्वर मार्केट येथे महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने भररस्त्यात तरुणाने वार केले. हा तरुण महिलेकडे अधून-मधून येत होता. त्याच्यासोबत इतर काही तरुण होते. हल्ला केल्यानंतर तरुण पसार झाला. भररस्त्यात खूनाची घटना घडल्यामुळे एकच गोंधळा उडाला. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. जी. अंबुरे यांनी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात इंजिनीअरिंगचे पेपर फुटले?

0
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांत इंजिनीअरिंगच्या विविध शाखांच्या दहा विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सुमारे ४० ते ४५ मिनिटांपूर्वी व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाल्या आहेत. या प्रश्नपत्रिकांची इंजिनीअरिंग कॉलेजच्या परिसरात पाचशे ते एक हजार रुपयांत विक्री होत असल्याची चर्चा आहे.

इंजिनीअरिंगच्या परीक्षेला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून संबंधित इंजिनीअरिंग महाविद्यालयांना दररोज तासभर आधी प्रश्नपत्रिका ई-मेल करण्यात येतात. त्यानंतर त्यांचे प्रिंटआउट काढून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मात्र, परीक्षेच्या सुमारे पाऊण तास आधी हे पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होत असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. त्यानंतर या प्रश्नपत्रिकांची पाचशे ते एक हजार रुपयांत विक्री होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. व्हॉट्सअॅपहून मिळालेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकच असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मेकॅनिकल शाखेतील दुसऱ्या वर्षाचे एम-टू आणि एम-थ्री हे गणिताचे पेपर, तृतीय वर्षाचा ‘टर्बो मशिन’ हा पेपर, तर अंतिम वर्षाचे ‘मेकॅनिकल सिस्टीम्स डिझाइन’ आणि ‘इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग’चा पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले. सिव्हिल शाखेचे अंतिम वर्षाचे ‘क्यूएसीपी’ आणि ‘एअर पॉल्युशन कंट्रोल’ असे दोन विषयांचे पेपर व्हायरल झाले. इलेक्ट्रिकल शाखेचा तिसऱ्या वर्षाचा ‘पॉवर सिस्टीम्स’ दोन, तर दुसऱ्या वर्षाचा ‘नेटवर्क अॅनॅलिसिस’ या दोन विषयांचे पेपर व्हॉट्सअॅपहून फुटले आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या ‘मॅकेनिक्स’ विषयाचा पेपरदेखील व्हायरल झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपर व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथम वर्षाचा इलेक्ट्रिकल विषयाचा पेपरदेखील व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाला होता. पेपरफुटीचा हा प्रकार थांबविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल विचारला जात आहे.

या प्रकारामुळे प्रमाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रतीक दामा आणि गुणवंत कंदमुळे यांनी केली आहे.

दोषींवर कारवाई करणार : कुलगुरू

इंजिनीअरिंग शाखेचे पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली असून, हा गंभीर प्रकार आहे. याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. असे प्रकार घडू नये, यासाठी ठोस योजना करणार असल्याचे आणि या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा दिवसांनी सापडला मृतदेह

0
0


म. टा. प्रतिनिधी, हडपसर
दत्तवाडी जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये बुडालेल्या १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सोळा दिवसानंतर हडपसर वैदूवाडी वाहतूक कार्यालयाशेजारील कॅनॉलमध्ये आढळला.
भगतसिंग आपत्ती व्यस्थापनच्या कार्यकर्त्यांसह हडपसर पोलिसांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या अवस्थेतील मृतदेहास बाहेर काढले.
कार्तिक प्रकाश डोईफोडे (वय १७, रा. दत्तवाडी पोलिस चौकी शेजारी, पुणे ) हडपसर पोलिस ठाण्याचे ए. एन. होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी कार्तिक आपल्या मित्रांसोबत जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो वर आलाच नाही, तेव्हा सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करून कार्तिकचा खूप शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने मित्रांनी कार्तिकच्या घरच्यांना ही बाब सांगितली. दत्तवाडी पोलिस, कार्तिकचे आई-वडील, नातेवाइक व अग्निशामक दलाचे जवानांनी इंदापूरपर्यंत तब्बल १६ दिवस कार्तिकचा कॅनॉलमध्ये शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने त्याच्या घरच्यांनी आशा सोडली होती.
तब्बल १६ दिवसांनंतर बुधवारी सकाळी हडपसर वैदूवाडी येथील वाहतूक कार्यालयाशेजारील कॅनॉलमध्ये साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अडलेल्या अवस्थेत मृतदेह नागरिकांना दिसला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. हडपसर पोलिसांनी गाडीतळ येथील शहीद भगतसिंग आपत्ती व्यस्थापनाचे कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेला अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यासाठी इतर पोलिस ठाण्यात शोध घेतला असता दत्तवाडी पोलिसांनी कार्तिकच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. कार्तिक हा नुकताच अकरावीची परीक्षा पास झाला होता तसेच त्याला पोहताही येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर- स्वारगेट बीआरटीची पुनर्बांधणी

0
0


म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महापालिकेने दहा वर्षांनंतर पहिल्या बीआरटी मार्गातील त्रुटी लक्षात घेऊन हडपसर- स्वारगेट बीआरटीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल चाळीस कोटी निधी महापलिककडून खर्च करण्यात येणार आहे.
वाहतुकीला सुलभ व जलद सेवा देणारी बीआरटीची अंमलबजावणी योग्य न झाल्याने बीआरटी मार्ग अपघातांचा सापळा बनला आहे. त्यामुळे बीआरटीच्या पुनर्बांधणीत ठेकेदारांचा विचार न करता प्रवास करणाऱ्या पुणेकराला सुलभ सेवा देण्याची गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.
हडपसर- स्वारगेट बीआरटी मार्ग कोट्यवधी रुपये खर्चून करूनही बीआरटी मार्ग अपघातांचा सापळा बनला आहे. हा मार्ग स्वारगेटपासून हडपसरपर्यंत तुकड्या-तुकड्यांमध्येच दिसत असल्याने त्याची सुरुवात आणि शेवट कधी होतो, याबाबत वाहनचालकांत गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे एक फुटाच्या दुभाजकाला वाहने धडकण्याचे प्रकार नेहमीचेच होत आहेत. या प्रकल्पास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत; मात्र बीआरटी मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही, तर पूर्ण झालेल्या कामाची दुर्दशा झाली आहे. रामटेकडी ते वैदूवाडी उड्डाणपुलावरून पथदिवे चालू नसल्याने रात्रीच्या वेळेस रस्ता ओलांडताना कित्येक अपघात होऊन मृत्युमुखी पडले आहेत. फातिमानगर चौक ते जांभुळकरनगरपर्यंत हडपसरकडे जाणारा रस्ता कँन्टोमेंटच्या हद्दीत असल्याने कँन्टोमेंटने अद्याप ताबा दिला नाही. कँन्टोमेंटने ताबा न दिल्याने अरुंद रस्ता असल्याने रस्त्याच्या बाजूला १५ फूट खड्डा असल्याने वाहनचालकांना खाली पडण्याची भीती भेडसावत असते. हडपसर उड्डाणपुलाखालील बीआरटी मार्गात पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत पाणीही साठते. त्यामुळे तो बंद ठेवावा लागतो. रस्त्यावर केलेल्या विविध कामांमुळे जागोजागी पदपथ, सायकल ट्रॅक पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. जागोजागी अतिक्रमणे झाल्याने पदपथ व सायकल ट्रॅक नक्की कोणासाठी हा प्रश्न पडतो. बीआरटी मार्गामधून केवळ बीआरटी बस जाणेच अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणीच तो शिल्लक असल्याने तसेच मार्ग नेमका कोठे सुरू होतो, हे कळत नाही. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. रिफ्लेक्‍टर बसविलेले नाहीत, मुख्य रस्त्यांमधील दुभाजकांची उंची कमी आहे. त्यामुळे ते पटकन लक्षातही येत नाहीत. त्यामुळे दुभाजकाला वाहने धडकून अपघात होण्याचे प्रमाण नित्याचेच आहे. बस बंद पडणे व अपघात होणे या कारणांमुळे वारंवार या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
महापालिकेचे प्रभारी उपअभियंता अभय शिंदे यांनी सांगितले, ‘हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गात आलेल्या त्रुटींबाबत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी मार्गात आवश्यक त्रुटी दुरुस्त करून बीआरटीची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यासाठी तीस ते चाळीस कोटी निधी खर्च अपेक्षित आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताबा जिल्हा परिषदेचा; सातबारा मात्र सरकारचा

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोरेगाव पार्कसारख्या महागड्या आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ताब्यात सुमारे साडेतीन एकर जागा आहे. परंतु, या जागेच्या सातबाऱ्यावर जिल्हा परिषदेचे गेल्या ५५ वर्षांपासून नाव नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे परिषदेच्या विकासकामांना खो बसला आहे. या जागेच्या सातबाऱ्यावर जिल्हा परिषदेचे नाव लागणार कधी, असा प्रश्न आता पदाधिकारी विचारत आहेत.
कोरेगाव पार्क येथे सुमारे साडेतीन एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. ही जागा १९६२ सालापासून ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. तसेच, त्याचा वापर जिल्हा परिषदेकडून होत आहे. परंतु, सातबाऱ्यावर जिल्हा परिषदेचे नाव नसल्याने त्याचा विकास करणे परिषदेच्या प्रशासनाला अवघड झाले आहे.
एखादी जागा विकसित करायची असल्यास त्या भूखंडाच्या सातबाऱ्यावर संबंधित मालकाचे नाव असणे अपेक्षित असते. कोरेगाव पार्क सारख्या शहरातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीची सुमारे साडेतीन एकर जागा आहे. त्या जागेच्या भूखंडाच्या सातबाऱ्यावर जिल्हा परिषदेचे नाव नाही.
या जागेत सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची गोदामे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील औषधे, भूजल सर्व्हेक्षण विभागातील हातपंप, पशुसंवर्धन विभागातील औषधांची गोदामे आहेत. जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याचा परिषदेचा विचार आहे. केवळ सातबाऱ्यावर नाव नसल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला पुढील कार्यवाही करता येत नाही.
या भूखंडाच्या सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा परिषद वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु, नाव लावण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हा परिषदेने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. या जागेच्या सातबाऱ्यावर जिल्हा परिषदेचे नाव कधी लागणार याकडे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘ऑनलाइन’ सातबारा तरीही नाव नाही ?
राज्यात ऑनलाइनद्वारे सातबारा उपलब्ध करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रयोग सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा ऑनलाइन सातबारा तर सोडाच; पण स्वतःच्या मालकीच्या जागेवर त्यांचे नाव अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून लावता आले नाही. त्यामुळे सातबाऱ्यातील गोंधळ अद्याप सुधारलाच नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सातबारा ऑनलाइनवर आला तरी त्यासाठी जिल्हा परिषदेला झगडावे लागत असल्याने पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत खंत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआयएटी’मध्ये तीन नवी केंद्रे सुरू करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय संरक्षण दलांची गरज ओळखून पुण्यातील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी’मध्ये (डीआयएटी) तीन नवी सर्वोत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये रडार टेक्नोलॉजी, प्रपोल्शन टेक्नोलॉजी आणि नॅनोटेक्नोलॉजी केंद्रांचा समावेश आहे.
‘डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तिन्ही संरक्षण दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर रडारचा वापर होतो. ही रडार आयात केली जातात आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीही ती पुन्हा परदेशी पाठवावी लागतात. त्यासाठी खूप खर्च होतो आणि वेळही लागतो. या पार्श्वभूमीवर रडार विकसित करण्यासाठी व त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर प्रपोलशन टेक्नोलॉजी व नॅनोटेक्नोलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहेत. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी सुरुवातीला २५ विद्यार्थी-अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाईल,’ असे डॉ. पाल यांनी सांगितले.
‘त्याचबरोबर सातत्याने समुद्रात राहिल्याने जहाजांवर गंज चढतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी करोजन विषयातील अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा अभ्यासक्रम फक्त नौदलासाठी असेल. त्यानंतर हवाई दलासाठीही हाच अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले. तसेच, संरक्षण क्षेत्रातील अनमॅन्ड एरिअल व्हेइकलचा वाढता वापर लक्षात घेत संस्थेने या संदर्भातील अभ्यासक्रमही सुरू केला आहे. त्याचे एक सत्र आता पूर्ण झाले आहे. दरम्यान, संस्थेने इंग्लंडमधील क्रेनफिल्ड युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार केला असून, यामध्ये शैक्षणिक आदानप्रदानाबरोबरच दोन्ही संस्थांच्या पदवीचाही समावेश आहे,’ असे डॉ. पाल म्हणाले.

अन्नाच्या गुणवत्तेसंदर्भात अभ्यासक्रम
लष्करासह निमलष्करी दलांमधील जवानांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र, डीआयएटीतर्फे फूड टेक्नोलॉजी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. नौदल व लष्कराच्या अधिकाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम असेल. यामध्ये प्रामुख्याने अन्नाच्या गुणवत्तेविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. डीआरडीओच्या म्हैसूर येथील डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. सुरुवातीला लष्कराच्या १५ व नौदलाच्या १० अधिकाऱ्यांना यासाठी प्रवेश दिला जाईल.

पदवीप्रदान सोहळ्याला अरुण जेटली
खडकवासला येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी’ या अभिमत विद्यापीठाचा नववा पदवीप्रदान सोहळा येत्या रविवारी (२८ मे) होणार आहे. या सोहळ्याला संरक्षणमंत्री अरुण जेटली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर संरक्षण मंत्रालयाचे सचिव व डीआयएटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफरही या वेळी उपस्थित राहतील. या वेळी नऊ पीएचडीधारकांसह १३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भीमाशंकरला शेकरूंची संख्या वाढली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याचे मानचिन्ह असलेल्या शेकरूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या भीमाशंकरमध्ये गेल्या वर्षभरात शेकरूंची संख्या वाढली आहे. वन विभागाने नुकत्याच केलेल्या गणनेनुसार शेकरूंची संख्या २ हजार २०३ वर पोहोचली आहे. गणनेदरम्यान वन कर्मचाऱ्यांनी १३ हजार २२० घरट्यांची नोंद घेतली असून, ४९७ शेकरू प्रत्यक्ष पाहिले आहेत.
भीमाशंकर अभयारण्यामध्ये शेकरूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेकरू हा समृद्ध अभयारण्याचे प्रतीक असून, संपूर्ण पश्चिम घाटात त्याचा वावर आहे. मात्र, प्रत्येक राज्यात त्याच्या रंगामध्ये फरक दिसतो. या प्राण्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी गणना केली जाते. मे महिन्यामध्ये वन्यप्राण्यांची पाणवठ्यांवरील गणनेपूर्वी वनाधिकऱ्यांनी शेकरूंची मोजणी केली होती. यामध्ये संपूर्ण जंगलात १३ हजार २२० वापरातील घरटी आढळली असून, यामध्ये अंदाजे २,२०३ शेकरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांत सातत्याने शेकरूंची संख्या वाढली आहे. शेकरूंची संख्या समाधानकारक असून, समृद्ध जैववैविध्याचे ते प्रतीक आहेत. शेकरूंच्या संवर्धनासाठी अभयारण्य आणि लगतच्या वनक्षेत्रातील झाडांची सलगता (कॅनपी) टिकून राहण्यासाठी वन विभागातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढेही आम्ही गावकऱ्यांना वृक्षारोपणाबद्दल मार्गदर्शन करणार आहोत, असे उपविभागीय वनाधिकारी किर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले.
दर वर्षी प्रमाणे यंदाही भीमाशंकर भाग एक आणि दोनमध्ये शेकरूंची मोजणी करण्यात आली. यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचाही वापर केली होता. शेकरूचे घरटे असलेल्या झाडाचे जीपीएस लोकेशन आणि झाडांच्या नोंदीही घेतल्या आहेत. घरट्यांची माहिती लिहिताना वापरातले घरटे, नादुरुस्त घरटी, सोडून दिलेली आणि पिल्लू असलेल्या घरट्यांची स्वतंत्र विभागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी पिल्लू असलेली अर्थात गर्भ घरट्यांची संख्या जास्त आढळून आली आहेत. शेकरूचा वापर असलेल्या १३ हजार २३० घरट्यांच्या नोंदी झाल्या. साधारणतः एक शेकरू ६ घरटी बनवून त्यात राहते. त्यामुळे मिळालेल्या आकड्यांची सरासरी काढून २ हजार २०३ शेकरू असल्याचा निष्कर्ष काढला आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या भाग एकमध्ये कोंढवळ, निगडाळे, कुंभारखाण, आहुपे देवराई या ठिकाणी तर अभयारण्य दोन क्रमांकमध्ये नांदगाव, खांडस, डोंगरनाव्हे या भागात शेकरूंची सर्वाधिक संख्या दिसली, असे जमदाडे यांनी सांगितले.

संवर्धनासाठी प्रयत्न
शेकरू करप, आंबा, फणसाडा, माकडलिंबू, जांभुळ, हिरडा या झाडांची फळे, पाने आवडीने खातात आणि याच झाडांवर घरटी करून राहातात. त्यामुळे अशा झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. भीमाशंकरमध्ये फळझाडांचे प्रमाण विपुल असल्याने शेकरूसाठी उत्तम अधिवास आहे. हा प्राणी अत्यंत लाजाळू असून, शक्यतो जमिनीवर उतरत नाही. त्यामुळे या भागातील आच्छादित क्षेत्राची सलगता जपण्यासाठी वन विभागातर्फे वृक्षतोडीविरोधात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असे जमदाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सुमन पाटील यांच्या कारला अपघात

0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी व आमदार सुमन पाटील यांच्या इनोव्हा कारचे पुढील टायर फुटून वारजे पुलावर बुधवारी सायंकाळी अपघात झाला. यामध्ये पाटील यांना किरकोळ जखम झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुमन पाटील, त्यांचा मुलगा रोहित, पुतण्या आणि कारचालक महंमद असरफ नूरमहंमद मोमीन (वय ४५) हे चौघेजण बुधवारी मुंबईवरून सांगली येथे त्यांच्या इनोव्हा कारने जात होते. वारजे पुलावर आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या कारचा पुढील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियत्रंण सुटून कार डिव्हायडरला धडकली. चालकाने वेळीच सावध होऊन कार नियत्रंणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. वारजे माळवाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर सुमन पाटील या दुसऱ्या कारने सांगलीकडे रवाना झाल्या. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे यांच्या पालिका भेटीनंतरच पीएमपीचे पैसे’

0
0

स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पीएमपी कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. महापालिका पीएमपीला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. परंतु, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे येत नाहीत. त्यांनी आमच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे पिंपरी महापालिकेत आल्याशिवाय यापुढे पैसे देणार नाही,’ असे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची बुधवारी (२४ मे) साप्ताहिक सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. सभा संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सावळे म्हणाल्या, ‘पीएमपी कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संलग्न आहे. महापालिका ४० टक्के भागीदार आहे. पीएमपी या कंपनीवर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष हे संचालक आहेत. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी आमच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना अडचणी समजून घेण्यासाठी बोलावले असता वेळ नसल्याचे मुंढे यांनी सांगितले आहे. पिंपरी महापालिका पीएमपीला पैसे देते. पैसे नेण्यासाठी अधिकार नसलेले अधिकारी येतात. पैसे देण्यास महापालिकेचा कसलाच विरोध नाही. आमच्या तक्रारी ऐकूण घेण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष मुंढे यांनी महापालिकेत आले पाहिजे. आमच्या अडचणी, तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत.’ ‘ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, अशा पास केंद्राच्या विभागप्रमुखांना पैसे नेण्यासाठी, बैठकांसाठी पाठविले जाते. त्यामुळे तुकाराम मुंढे हे पिंपरी महापालिकेत आल्याशिवाय यापुढे पैसे देणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला भेट द्यावी, या आशयाचे पत्र मुंढे यांना देण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षप्रेमींनी केले दोन तासांत चार हजार बीज गोळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
यंदांच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाची अनोखी मोहीम राबविण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वृक्षप्रेमी पुणेकर एकत्र आले. बघता बघता अवघ्या दोन तासात एकत्र बसून या मंडळीनी तब्बल चार हजार बीज गोळे तयार केले. पावसाळा सुरू झाल्यावर हे बीज गोळे पुणे परिसरात टाकण्यासाठी निसर्गप्रेमींना वाटण्यात येणार आहेत.
निमित्त होते, भवताल संस्था आणि सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल (सेप) या संस्थेतर्फे आयोजित ‘लोकसभागातून चिखलाचे बीजगोळे बनवण्या’च्या उपक्रमाचे. महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राच्या बागेत झालेल्या या कार्यक्रमात दोनशेहून अधिक पुणेकर सहभागी झाले होते. अवघ्या दोन वर्षे वयाच्या मुलीपासून ते ७३ वर्षे वयाच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटाचे लोकांनी बियांचे बॉल या वेळी तयार केले.
माती आणि शेणापासून चिखलाचे गोळे करून त्यात बी टाकण्याचा हा उपक्रम होता. ‘भवताल’चे अभिजित घोरपडे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या वेळी सुमारे चार हजार बीजगोळे तयार केले. चिंच, जांभूळ, खैर, बहावा आणि आपटा या पाच प्रकारच्या स्थानिक झाडांच्या बिया यासाठी वापरण्यात आल्या. हे बीजगोळे वाळल्यानंतर येत्या पावसाळ्यात ते निसर्गात टाकण्यासाठी वाटण्यात येणार आहेत. या उपक्रमात महाराष्ट्राचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे, भूजल अभ्यासक शशांक देशपांडे सहभागी झाले होते. येत्या शनिवारी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात पुन्हा हा कार्यक्रम होणार आहे.
..
वन विभागातर्फे सातत्याने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. पण केवळ सरकारी उपक्रम परिणामकारक ठरत नाही. चांगला परिणाम साधायला असल्यास लोक सहभाग असलेले उपक्रम व्हायला हवेत. यातूनच वृक्षांचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल.
- माधव गोगटे, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक
००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंध मराठी मातीचा’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रबोधनात्मक भारूड, ठसकेबाज लावणी, सुरेल ओवी अन् आशयपूर्ण नाट्यसंगीताच्या सुरांनी रसिकांनी मराठी मातीचा गंध या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गंध मराठी मातीचा’ या मराठमोळ्या वैशिष्टपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सादर झालेल्या गाणी तसेच नृत्यांनी महाराष्ट्राची परंपरा उलगडली. रसिकांनीही या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.

इंद्राणी ग्रुपतर्फे गं‘गंध मराठी मातीचा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये लोककला, लोकगीते, लोकनृत्यांचा समावेश होता. भारुड, कोळी गीत, मंगळागौरीची गाणी, दिंडी, ओवी, भावगीते आणि नाट्यगीते सादर करीत सरीता लिमये, संगीता शेवडे, मृदुला अभ्यंकर, शोभा पाटील, स्नेहल माजगावकर आणि सुचेता आडकर या कलाकारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. वृषाली वहीकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले होते.
मनुष्याचे जगणे निर्सगाशी एकरूप होणारे आहे, पूर्वीच्या काळात आपणही निर्सगातीलच एक घटक आहोत ही नम्र भावना बाळगून निसर्गाशी पूरक असे आयुष्य मनुष्य जगत होता. त्याचे प्रतिबिंब तत्कालीन गीतांमधून उमटत होते. त्याचाच अनुभव देणारा हा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी सादर करून कलाकारांनी ईश्वर-निर्सग आणि मनुष्य अशा त्रिकुटात मनुष्याचे आयुष्य कशा प्रकारे वेढलेले आहे, याची झलक सादर केली. भूपाळीनंतर ‘अरे संसार संसार’ हे गीत सादर करण्यात आले. ‘वासुदेव आला, ओ वासुदेव आला’, ‘सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला’ अशी गीते सादर झाली. वसंत कानेटकरांच्या ‘मत्यगंधा’ या संगीत नाटकातील पदाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लबाडांना गुडघे टेकायला लावणार

0
0

आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

शेती व्यवसायाला तोट्यात घालून शेतकऱ्यांना बेदखल करण्याचा डाव आखणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला दिला.
खासदार शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘निवडणुकीच्या काळात मोदींनी व भाजपने ‘अच्छे दिन’ हवे असतील तर भाजपला बहुमत द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला आम्हीही बळी पडलो. मात्र, ‘अच्छे दिन’ येण्याचे आश्वासन खोटे ठरल्याची जाणीव झाल्याने आत्मक्लेश यात्रा काढली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची शेती तोट्यात यावी यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्याला हद्दपार करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यांची जमीन अकृषक कारणांसाठी घेऊन ती विकण्याचा डाव सरकारचा आहे. या लबाडांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही.’
...
समृद्धी हायवेला विरोध
‘मागील वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज जमा केले आहेत. येत्या ३० मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे अर्ज देण्यात येणार आहे. मावळातील शेतकऱ्यांनीही त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा करावा. वेगवेगळ्या कारणांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई ते नागपूर हा समृद्धी हायवे होऊ देणार नाही,’ अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी समृद्धी हायवेला विरोध दर्शविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर

0
0

उड्डाण पुलालाही स्थायी समितीची मंजुरी; ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुल बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे ९० कोटी ५३ लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास पिंपरी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

भक्ती-शक्ती चौक हा पिंपरी-चिंचवड शहरातील गजबजलेला चौक आहे. स्पाइन रोड आणि मुंबई-पुणे रस्ता या चौकात एकत्र येतो. भक्ती-शक्ती ते मुकाई चौक हा ४५ मी. रुंदीचा बीआरटीएस रस्ता लवकरच विकसित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गातर्फे देहूरोड ते निगडी या रस्त्याचे रुंदीकरणही लवकरच चालू करण्यात येत आहे. तसेच, या चौकातील बीआरटीएसचे टर्मिनलच्या बांधकामाचे काम पूर्ण होत आले आहे. या चौकातून चिखली, तळवडे आयटी पार्क येथून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी कायम वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

असे होईल बांधकाम

...

१) ग्रेड सेपरेटर–

- स्पाइन रस्त्याला समांतर.

- येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन.

- प्राधिकरण ते मोशी दक्षिण-उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले जाणार.

- लांबी : ४२० मी.

- रुंदी : २७.० मी., (८.० मी. रुंद २ लेन प्रत्येकी),

- उंची : ५.५० मी.

- उच्चक्षमता द्रुतगती मार्गासाठी राखील जागा : ११.०० मी. रुंद

- नाशिक महामार्गाकडून देहूरोड कात्रज बाहयवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटर मधून जाण्याची व्यवस्था.

२) रोटरी (वर्तुळाकार रस्ता)

- रुंदी : १५.५० मी. (३ लेन).

- पादचाऱ्यांना ये-जा करणे सोयीचे

३) उड्डाणपूल –

- जुना पुणे मुंबई या ६१.० मी रूंद रस्त्याला समांतर

- हॉटेल पुणे गेट ते कृष्ण मंदिरापर्यत जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र पूल.
- प्राधिकरणाकडून पुणे भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधून स्वतंत्र पूल
- पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालुन बीआरटीएस टर्मिनल व
...............
सदर प्रकल्पामुळे होणारे फायदे
- प्राधिकरण ते मोशी दक्षिण-उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले जाणार.

- नाशिक महामार्गाकडून देहूरोड कात्रज बाहयवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटर मधून जाणार.

- रोटरीमुळे पादचाऱ्यांना चौकाचे कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य.
-bचौकात शिल्प पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना फायदा.
- चौकात सिग्नल फ्री असल्याने पादचारी व वाहने यांना थांबावे लागणार नाही.
- वाहनांचे इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत होणार आहे.
- बीआरटी बस सेवेची वारंवारता कायम राखणेस मदत होणार आहे.
- प्राधिकरणाकडून पुणे भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधुन स्वतंत्र पूल.
........

खर्च
- स्थापत्यविषयक काम : सुमारे १०५ कोटी
- सर्व सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी : ३० कोटी
- एकूण खर्च : १३५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निलंबित शिक्षणप्रमुख चव्हाण यांना क्लिनचिट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणमंडळाच्या निलंबित प्रभारी शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेऊन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांना क्लिनचिट दिली आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने त्यांना दोषी धरून त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत आयुक्तांनी त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना उपप्रशासकीय प्रमुखपदावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रमुख पदाची जबाबदारी असताना चव्हाण यांनी पालिका आयुक्तांची मान्यता न घेता ४६ लाख रुपयांची बिले दिल्याचे समोर आले होते. मंडळाकडे एक कोटी रुपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात १ कोटी ४६ लाख रुपयांची बिले देण्यात आल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर जोरदार टीका झाली होती. त्या वेळी चव्हाण यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांनी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील केसरी, तुषार दौंडकर आणि अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत चव्हाण दोषी आढळून आल्या होत्या, त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करावी अशी शिफारस करणारा अहवाल या समितीने आयुक्त कुमार यांच्याकडे दिला होत्या. मात्र चव्हाण यांची विभागीय चौकशी होण्याऐवजी त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
चव्हाण यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर रुजू करुन घेण्याचा आदेश आयुक्त कुमार यांनी बुधवारी दिला. त्यानुसार चव्हाण यांना पुन्हा त्यांच्या उप प्रशासकीय अधिकारी या अकार्यकारी पदावर रुजू घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता सुधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्याकडे आर्थिक बाबींशी संबधित कोणतेही कामकाज राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच रुपयात एक लिटर थंड आणि शुद्ध पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वे स्टेशनवर पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ किंवा विक्रेत्यांकडून पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी खर्च करावे लागणारे १५ ते २० रुपये, यापासून प्रवाशांची आता सुटका होणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ‘वॉटर व्हेंडिंग मशिन’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनच्या साह्याने प्रवाशांना पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर थंडगार आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. आज, गुरुवारपासून हे मशिन कार्यान्वित होणार आहे.
पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर तीन मशिन, प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर एक मशिन आणि प्लॅटफॉर्म चार व पाचवर एक मशिन आणि प्लॅटफॉर्म सहावर एक मशीन बसविण्यात आले आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) वतीने ही प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज किमान दीड ते दोन लाख प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाणपोईची व्यवस्था आहे. मात्र, तेथील अस्वच्छतेमुळे अनेक प्रवासी ते पाणी पिण्याऐवजी विक्रेत्यांकडील रेल्वेची ‘रेलनीर’ची पाण्याची बॉटल विकत घेतात. अनेकदा विक्रेत्यांकडून खासगी कंपनीच्या अधिक किमतीच्या पाणी बॉटलची विक्री केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर ही वॉटर व्हेडिंग मशिन बसविली आहेत. ही मशिन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज, गुरुवारपासून ती प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

पालिकेच्या पाण्यावर प्रक्रिया
महापालिकेकडून रेल्वे स्टेशनला केल्या जाणाऱ्या पुरवठ्यातील पाण्यावर या मशिनद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर ते थंड करून प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी मशिन ऑटोमॅटिक चालणार आहे. तसेच, रेल्वेचा एक कर्मचारी तेथे नेमण्यात येणार आहे.

पाणी ग्लास/बॉटल शिवाय ग्लास/बॉटलसह
३०० मिली एक रुपया दोन रुपये
अर्धा लिटर तीन रुपये पाच रुपये
एक लिटर पाच रुपये आठ रुपये
दोन रुपये आठ रुपये १२ रुपये
पाच लिटर वीस रुपये २५ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका प्रशासनाला कोर्टाने फटकारले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देताना झालेल्या भेदभावाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात योग्य खुलासा न केल्याने बुधवारी कोर्टाने प्रशासनाला फटकारले. अधिकारी या दाव्याबद्दल गांभीर्याने पाहत नसतील, तर कोर्ट योग्य तो निर्णय घेऊ शकते, असेही कोर्टाने सुनावले. या प्रकरणी आज (गुरुवारी) निकाल देण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना अधिक निधी; तर इतरांना कमी निधी दिल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे, भय्यासाहेब जाधव यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायाधीश अनुराधा पांडुळे यांच्या कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. निधी देताना भेदभाव केल्याने विकासाला बाधा येणार आहे. कायद्यानुसार असा भेदभाव करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका तक्रारदारांच्या वकीलांनी मांडली. कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत निधी खर्च करण्यास स्थगिती द्यावी, असा अर्ज नगरसेवकांनी केला.
यावर कोर्टाने पालिकेने दोन दिवस हा निधी खर्च करणार नाही, अशी लेखी किंवा तोंडी ग्वाही द्यावी, असे सांगत यावर दहा मिनिटांमध्ये भूमिका स्पष्ट करावी, असे पालिकेच्या वकीलांना सांगितले. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता पालिकेच्या वकीलांनी कोर्टातून निघून जाणे पसंत केल्याने कोर्टान नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पाला स्थगिती दिल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील, असे पालिकेचे विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनी कोर्टात सांगितले. कोर्टाला हमी देण्यासाठी एकही अधिकारी हजर नसल्यानेही न्यायाधीश पांडुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
अर्थसंकल्पावर कोर्टात याचिका दाखल असताना प्रशासनातील एकही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. कोर्टाने दोन दिवस अर्थसंकल्पातील रक्कम खर्च करणार नसल्याची हमी मागितली, मात्र यावर कोणीच पुढे यायला तयार नाही. अर्थसंकल्पाच्या याचिकेवर सुनावणी होत असताना पालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शीतल उगले तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यापैकी कोणीही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टाने या अर्थसंकल्पाला स्थगिती द्यावी, अशीच प्रशासनाची इच्छा आहे की काय? अशी चर्चा पालिकेत सुरू होती.

नगरसचिव, विधी सल्लागारांची धावपळ
अर्थसंकल्पातील भेदभावाबद्दल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी असल्याने नगरसचिव सुनील पारखी हे संपूर्ण दिवसभर कोर्टात बसून होते. जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केल्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचा, याची विचारणा करण्यासाठी पारखी यांना धावपळ करावी लागली. पालिकेने नेमलेले वकील कोर्टातून निघून गेल्याने विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनाच कोर्टात यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी कोणाची मदत घेत असाल, तर सावधान! कारण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार पुण्यात वाढले आहेत. टिंबर मार्केट येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे अशाच पद्धतीने एटीएम बदली करून ७० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मण गायकवाड (वय ४२, रा. पीएमसी कॉलनी, कासेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे सेव्हन लव्हज हॉटेलमध्ये अनेक वर्षांपासून काम करतात. २० मे रोजी हॉटेलच्या मालकांनी पैसे काढून आणण्यासाठी गायकवाड यांच्याकडे एटीएम कार्ड दिले. त्यांना आठ हजार रुपये काढून आणण्यास सांगितले. पण, गायकवाड यांनी कधीही एटीएममधून पैसे काढले नव्हते. तरीही ते एटीएम कार्ड घेऊन टिंबर मार्केट येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गेले. त्या वेळी एक व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेली होती. त्या व्यक्तीला गायकवाड यांनी आठ हजार रुपये काढून देण्यास सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीने आठ हजार रुपये काढून देत पैसे मोजण्यास सांगितले. गायकवाड पैसे मोजत असताना त्या व्यक्तीने हातचलाखी करून दुसरेच एटीएम कार्ड पाकीटात घालून गायकवाड यांच्याकडे दिले.
गायकवाड दिलेले एटीएम कार्ड घेऊन गेला. त्यांनी पैसे व एटीएम कार्ड हॉटेल मालकाकडे दिले. त्यानंतर हॉटेल मालकाला त्यांच्या खात्यावरून ३२ हजार आणि ३८ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित केल्याचा मोबाइलवर संदेश आला. त्यामुळे त्यांनी चौकशी करून एटीएम कार्ड पाहिले असता दुसरेच कार्ड असल्याचे दिसले. त्यांनी गायकवाड यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ खडक पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला.
पोलिसांनी एटीएमजवळी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी एटीएम कार्ड बदल करणारी व्यक्ती अर्ध्या तासापासून त्या ठिकाणी उभी असलेली दिसत आहे. त्या व्यक्तीने दिलेले दुसरे एटीएम ठाण्यातील मकबुल खान नावाच्या व्यक्तीचे आहे. त्या व्यक्तीची ठाण्यामध्ये १७ मे रोजी अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. पी. टेमगिरे हे अधिक तपास करत आहेत.

ही काळजी घ्या
- सुरक्षारक्षक असलेल्या एटीएम केंद्रातून पैसे काढा.
- काही अडचण आल्यास सुरक्षारक्षकाला विचारा.
- एटीएममधून पैसे काढण्याची माहिती नसेल, तर विश्वासू व्यक्तीला सोबत घेऊन जा.
- कोणाची मदत घेतल्यास त्या व्यक्तीने तुमचेच कार्ड परत दिले का, याची खात्री करा.
- एटीएममध्ये बदल केल्याचे समजल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील इंजिनीअरिंग शाखेचे पेपर परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोबाइलमध्ये पेपर सापडलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध बुधवारी गुन्हे दाखल केले. या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये मेकॅनिक्स आणि गणित, अशा दोन विषयांचे पेपर आढळून आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.
इंजिनीअरिंगच्या परीक्षेला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून संबंधित इंजिनीअरिंग महाविद्यालयांना दररोज तासभर आधी प्रश्नपत्रिका ई-मेल करण्यात येतात. त्यानंतर त्यांचे प्रिंटआउट काढून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मात्र, परीक्षेच्या सुमारे पाऊण तास आधी हे पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होऊन पेपरफुटी होत होती. तसेच, पेपरची ५०० ते १००० रुपयांमध्ये विक्री होत होती. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने बुधवारी प्रकाशित केले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित चौकशी करून संबंधित प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
नगर जिल्ह्यातील बोटा येथील विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मेकॅनिक्स व गणित असे दोन पेपर परीक्षा सुरू होण्यापूवी डाउनलोड करण्यात आले. त्यानंतर कॉलेजमधील व्यक्तीने मोबाइलद्वारे पेपरचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपहून इतर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पाठविले. त्यामुळे ते व्हायरल झाले. हे पेपर एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये तर रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याच्या मोबाइलमध्ये आढळून आले. याबाबत कोथरूड पोलिसांनी एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरुद्ध तर लोणीकंद पोलिसांनी वाघोलीच्या रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रथम वर्षातील मेकॅनिक्स आणि गणित अशा दोन विषयांचे पेपर आढळून आले आहे, अशी माहिती डॉ. करमळकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

कॉलेजांना नोटिसा
संगमनेर जिल्ह्यातील बोटा येथील विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मेकॅनिक्स व गणित असे दोन पेपर अनधिकृतपणे डाउनलोड झाले. त्यानंतर ते व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाले. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही कॉलेजांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. तसेच, पेपरफुटीप्रकरणी कॉलेजांवर कारवाई का करण्यात येऊ नये आणि कॉलेजांचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई का होऊ नये, अशी विचारणा दोन्ही कॉलेजांना करण्यात आल्याचे मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images