Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुलीवर बलात्कार; एकाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सागर शिवाजी शिंदे (वय २३, मु. पो. गारडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक मे रोजी ही घटना घडली. आरोपीने फिर्यादी यांच्या चौदा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केले. संबंधित मुलीला तो नाशिक येथे घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला कोर्टाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टायर निर्मिती कंपनीला भरपाई देण्याचा आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निकृष्ट दर्जाच्या टायरची विक्री केल्याप्रकरणी विक्रेता आणि टायरची निर्मिती करणाऱ्या कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे. तक्रारदार ग्राहकाला टायरची सात हजार रुपये किंमत परत द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्या क्षितिजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला आहे. श्रीकांत राजेंद्र पवार (रा. फुरसंगी, ता. हवेली) यांनी हडपसर येथील मे. जय भोले टायर्स आणि अपोलो टायर्स लि. बिबवेवाडी कॉर्नर यांच्याविरुद्ध मंचाकडे दावा दाखल केला होता.

तक्रारदार अनेक वर्षांपासून मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे बोलेरो गाडी आहे. ही गाडी ते भाडेतत्त्वावर देत असतात. २० जून २०१५ रोजी तक्रारदारांच्या गाडीचे टायर खराब झाले. त्यांनी हडपसर येथील जयभोले टायर्स येथून सात हजार रुपये देऊन अपोलो कंपनीचे टायर खरेदी केले. त्यांना टायरची सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली होती. मात्र, आठ दिवसाच्या आत टायर चिरून खराब झाले.

तक्रारदारांनी ही बाब संबं​धितांच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यांनी अपोलो टायर्सकडेही या संदर्भात लेखी तक्रार केली. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यांनी या प्रकरणी मंचाकडे दावा दाखल केला होता.

संबंधितांना नोटीस बजावूनही जयभोले टायर्सच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कोणीही मंचापुढे हजर झाले नाही. तर अपोलो टायर्सच्या वतीने मंचात तक्रारदार ग्राहक नसल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जयभोले टायर्स आणि अपोलो टायर्स यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली असल्याचे मंचाने निकाल देताना नमूद केले; तसेच तक्रारदाराला टायरची किंमत परत देण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंदूत घुसली गोळी, तरीही वाचला जीव!

$
0
0

म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'... याचीच प्रचिती आली आहे, २४ वर्षीय संजयला. दोन व्यक्तींचे भांडण सोडवायला गेलेल्या संजयच्या मेंदूत बंदुकीची गोळी घुसली. पण त्याचे नशीब इतके चांगले की, तो त्यातूनही वाचला असून मेंदूवरील अनेक शस्त्रक्रियांनंतरही त्याच्यात जलद गतीने सुधारणा होत आहे.

संजयचा फुलांचा व्यवसाय आहे. २ जानेवारीला तो नजिकच्या दुकानातील दोन व्यक्तींचे भांडण मिटवायला म्हणून गेला. मात्र हा चांगुलपणाच त्याच्या जीवावर ओढवला. तिकडे संजयच्याच डोक्यावर बंदूक ताणली गेली. क्षणभरात बंदुकीतून गोळी सुटून ती संजयच्या मेंदूत खोलवर घुसली. लगेच जखमी अवस्थेत सकाळी ११.३० वाजता संजयला रूबी हॉल रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे तत्काळ सीटी स्कॅन केल्यानंतर समजले की, गोळी डोक्यात १० सेमी. आत घुसली असून मेंदूच्या आतील नाजूक भागावर प्रहार करत आहे. गोळीने आत जात आपली स्थितीही बदलली होती.

न्युरोसर्जन संजय गांधी सांगतात की, 'वेगवेगळ्या तपासण्या आणि स्कॅनिंग केले गेले. त्यावेळी समजले की, ज्या मार्गाने गोळी मेंदूत घुसली होती, तो भाग पूर्णतः छिन्न-विछिन्न करत गोळी मध्यभागी जाऊन थांबली होती. मेंदूला पसरण्यास जागा मिळावी म्हणून संजयच्या कवटीचा एक भाग वेगळा करावा लागला. तसे केले नसते तर रक्ताचा प्रवाह थांबला असता. एवढं करूनही पहिल्याच प्रयत्नात गोळीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. संजयची स्थिती स्थिर करण्यासाठी ३ दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर गोळी काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया केली गेली.'

गोळी मेंदूत इतक्या खोलवर जाऊनही एखाद्याचा जीव वाचण्याची ही पहिलीच वेळ असून एवढ्या शस्त्रक्रियांनंतरही संजयमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने हा एकूणच प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळ्या नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एवढ्या कठीण प्रसंगातून संजय सुखरूप परतल्याने तो अपवादच ठरल्याचं डॉक्टर सांगताहेत. अलीकडच्या १०-१५ दिवसांत संजयची स्थिती बऱ्यापैकी सुधारली असून तो आपल्या डोळ्यांची हालचाल करू लागला आहे. वेंटिलेटरशिवाय तो श्वास घेऊ लागला आहे.

ही बातमी इंग्रजीत वाचा...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या सायंकाळी पिंपरीत पाणी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीच्या कारणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा उद्या, गुरुवारी (२५ मे) सायंकाळी बंद राहणार आहे, असे प्रशासनाने कळविले आहे. निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची कामे, विद्युत विभागातील रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे या मुळे गुरुवारी एकवेळेस सकाळी पाणीपुरवठा करण्यात येणार असून, ज्या भागाला गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या भागालाही सकाळीच पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सध्या शहरात २० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, गुरुवारी सकाळी एकच वेळेस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ज्या भागाला सध्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामध्ये विषम तारखेस म्हणजेच गुरुवारी (२५ मे) सायंकाळी पाणीपुरवठा आहे. त्या भागाला शक्यतो त्या दिवशी सकाळीच पाणीपुरवठा केला जाईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (२६ मे) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित अथवा न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपखेल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दापोडीकडून बोपखेलकडे जाणारा रस्ता बंद होऊन दोन वर्षे उलटली तरीही पर्यायी व्यवस्था झाली नाही. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी बोपखेलकरांनी पुकारलेल्या बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रस्त्याच्या मागणीकडे राजकीय नेते, पालिका प्रशासन आणि संरक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता. या मागणीसाठी संतोष घुले आणि बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन सुरू केले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेकदा आंदोलने झाली. प्रशासकीय पातळीवर बैठका झाल्या. राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली. परंतु, तोडगा निघालेला नाही. सोमवारी (२२ मे) आंदोलनस्थळी येऊन खासदार राजू शेट्टी यांनीही समस्या जाणून घेतली.

पावसाळा तोंडावर आला आहे. महिला, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या तरंगत्या पुलाची सोय व्हावी, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला बोपखेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील दुकाने बंद होती. रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. मागणीकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत सदनिकांवरून धुसफूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात उभारण्यात येणाऱ्या सुमारे साडेनऊ हजार सदनिकांसाठीच्या सुमारे साडेनऊशे कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने सर्वसाधारण सभेला केली आहे. मात्र, दुसरीकडे योजना जाहीर करण्याच्या मुद्द्यावरून सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस चालू झाली आहे. ‘माझ्या परवानगीशिवाय योजना जाहीर करू नका,’ अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी पालिकेच्या सर्व विभागांना केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी नऊ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. यामध्ये चऱ्होली १,४४२, रावेत १,०८०, डुडुळगाव ८९६, दिघी ८४०, मोशी १,४००, वडमुखवाडी १,४००, चिखली १,४००, पिंपरी ५००, आकुर्डी ५०० यांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी सागर गवळी होते.

प्रस्तावित योजनेसाठीच्या काही जागा महापालिका मालकीच्या तर काही सरकारी गायरानाच्या आहेत. चऱ्होली आणि रावेत येथील जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. तर ताब्यात नसलेल्या जागांचे संपादन करण्याची कार्यवाही चालू आहे. सरकारी गायरानाच्या जागांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा चालू आहे. प्रस्तावानुसार नऊ हजार ४५८ सदनिकांसाठी सहा टक्के भाववाढ आणि इतर शुल्कांसह ८८५ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, गृहयोजनेच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सहा टक्के भाववाढ आणि इतर शुल्कासह ५० कोटी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, शहर सुधारणा समितीच्या शिफारशीनंतर पालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर आणि आवश्यक निकष पूर्ण केल्यानंतर योजनेच्या कामाला सुरवात होणार आहे.

योजनेंतर्गत प्रत्येक सदनिकेच्या बांधकामासाठी आठ लाख २७ हजार रुपये खर्च गृहीत धरला असून, केंद्र सरकारचे दिड लाख रुपये आणि राज्य सरकारकचे एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित खर्च लाभार्थ्यांकडून वसूल करण्यात येणार असून, पालिकेचा हिस्सा म्हणून जागेची किंमत, बांधकाम परवाना विकास शुल्क आणि प्रीमिअम शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चौदा मजली उंच इमारतीचा तळमजला वाहनतळासाठी राखीव असणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेला बळ मिळणार आहे, असा दावा केला जात आहे.

महापौरांची नाराजी आणि सूचना

कोणतीही शासकीय योजना राबविताना प्रशासनाने महापौरांना विचारात घेणे गरजेचे आहे. मात्र, प्रधानमंत्री आवास योजना राबविताना विचारात घेतले नाही. यापुढील काळात पालिकेने कोणतीही योजना आपल्या परवानगीशिवाय न राबवण्याचे आदेश महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. यासंदर्भातील रितसर पत्रही त्यांनी दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबत विश्वासात न घेता कार्यवाही केली जात असल्याबद्दल महापौरांनी प्रशासनाला खडसावले आहे. तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत योजना परस्पर राबवित असल्याचा आरोप केला. त्यामुळे महापौर आणि स्थायी समिती यांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भविष्यात कोणतीही शासकीय योजना महापौर आणि आयुक्त हे दोघे प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर करतील, असे काळजे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या संवर्धनास प्राधान्य देणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वाढत्या पर्यटकांच्या रेट्यामुळे महाबळेश्वर-पाचगणीची लोकांना पेलण्याची (कॅरिंग कपॅसिटी) संपली असून तेथील नैसर्गिक जैववैविध्यावर पर्यटनाचा ताण येतो आहे. या अनियंत्रित पर्यटनाचे नियोजन करण्याबरोबरच महाबळेश्वरमधील निसर्ग संपदेचे संवर्धन करण्यास समिती प्राधान्य देणार आहे,’ अशी माहिती महाराष्ट्रातील महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश (इको सेन्सिटिव्ह झोन) समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अंकुर पटवर्धन यांनी दिली.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश (इको सेन्सिटिव्ह झोन) समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अंकुर पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. या पूर्वी या समितीवर प्रभाकर करंदीकर अध्यक्ष होते. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या बायोडायव्हर्सिटी विभागाचे प्रमुख असलेले डॉ. पटवर्धन यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. समितीमध्ये सातारा जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक यांसह राज्य सरकारचा नगर रचना विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य जैवविविधता मंडळ अशा विविध विभागातील पदाधिकारी सभासद असणार आहेत.

आगामी काळात महाबळेश्वरमधील निसर्ग संवर्धन आणि पर्यटनाचे नियोजन करण्यास समिती प्राधान्य देणार आहे, असे सांगून डॉ. पटवर्धन म्हणाले, पहिल्या टप्प्यात आम्ही गेल्या वीस वर्षांत महाबळेश्वर-पाचगणी परिसरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे पर्यावरणाचे संवर्धन झाले का, याचे सर्वेक्षण करणार आहोत. सर्वेक्षण अचूक होण्यासाठी जीआयएस तसेच अद्ययावत तंत्रज्ञान वापर करण्यात येईल. साधारणतः अशा प्रकारच्या समित्यांसमोर विकास कामांबद्दल होत असलेल्या नुकसानाबद्दलच केवळ चर्चा होत राहते आणि प्रत्यक्षात संवर्धनासाठी पावले उचललीच जात नाही. आगामी काळात आम्ही प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामावर भर देणार आहे, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांकडून आरोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

२४ x ७ पाणीपुरवठा योजनेत ठेकेदारांनी संगनमत करून करोडो रुपयांच्या निविदा भरल्याचे आरोप...कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या निविदा जादा दराने भरल्याबद्दल रद्द करण्यास भाग पडणे...पाणीपुरवठा योजनेत पाण्याच्या टाक्यांच्या कामांची विभागीय आयुक्तांकडून चौकशी...‘स्मार्ट सिटी’ची कामे रखडल्याप्रकरणी केंद्राकडून झालेली कानउघडणी...अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) बसवण्याच्या २६०.८७ कोटी रुपयांच्या निविदेचा निर्णय पुढे ढकलण्याचा निर्णय...

पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता स्थापन होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये भाजपला पालिकेचे कामकाज करताना विरोधकांकडून आरोपांच्या फैरींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसले आहे. भाजपकडून गेल्या दोन महिन्यांत विविध समित्यांवर आपल्या सदस्यांची नियुक्ती करणे, अर्थसंकल्प सादर करणे आणि सभागृहाची त्याला मंजुरी मिळवणे तसेच प्रभाग समित्यांची रचना करून घेणे एवढीच काय ती प्रमुख कामे करता आली आहे.

कचरा आंदोलनात भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अखेर हे आंदोलन संपवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यास भाग पडले. त्यातच महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचा परदेश दौरा वादात सापडला. गेल्या दोन महिन्यांत पालिकेच्या राजकारणात भाजपला टीकेचे लक्ष्य करण्यात विरोधकांना काही प्रमाणात का होईना, यशस्वी मिळाल्याचे चित्र दिसले.

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुलनेने समन्वय नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभाराचा नारा दिला असल्याने प्रशासन आणि सत्ताधारी दोघांकडूनही आपण कसे पारदर्शक कारभाराचे खरे पाईक आहोत, याचे चित्र मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातून एकमेकांविरोधात मुख्यमंत्र्यांसमोर कुरघोडी करण्यास कोणाही कमी पडलेले नाही. परिणामी शहराचे प्रकल्प रेंगाळत असून त्याचा फटका विकासाला बसत आहे. सत्ताधाऱ्यांना पालिका आयुक्त विश्वासात घेत नसल्याने, त्यांच्याकडून आयुक्तांच्या प्रकल्पांना फारसा पाठींबा मिळत नाही. सत्ताधारी जाणीवपूर्वक प्रकल्प रखडवत असल्याचे चित्र आयुक्तांकडून मुंबईत रंगवले जात असल्याचे खासगीत बोलले जात आहे. मात्र, खरे दुखणे काय आहे, हे संबधितांनाच माहीत. सभागृहातील सत्ताधारी भाजपचे ७० टक्के नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना पालिकेचा खरा ‘कारभार’ कळत नसल्याने ते आपले वरिष्ठ नेते सांगतील त्यावर मान डोलवत आहेत. त्यांना पालिकेचा खरा ‘कारभार’ कळू लागल्यावर भाजपपुढील समस्या कमी होण्यापेक्षा वाढतील, असे चित्र आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट संचालक मंडळाची (पीएससीडीसीएल) नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) बसवण्याच्या २६०.८७ कोटी रुपयांच्या निविदेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रस्तावातील तरतुदींवर ‘पीएससीडीसीएल’चे अध्यक्ष डॉ. करीर यांनी शंका उपस्थित केली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सचिवालयातून पुण्याच्या आयुक्तांच्या कामावर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे दिसते आहे.

कारभारी कोण?

पालिकेचा कारभार कोण ​नियंत्रित करतो, याचे उत्तर अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. स्वीकृत सदस्यांची नियुक्ती असो की कचऱ्यांच्या आंदोलनावरील निर्णय, हे दोन्ही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून कुठलाही ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला गेला नाही. शहरातील दोन्ही भाजपचे खासदार पालिकेच्या राजकारणापासून दोन हात दूर असल्याचे चित्र आहे. एकीकडे विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झडू लागल्या असताना दुसरीकडे मात्र वरिष्ठ नेते यावर बोलण्यास काहीही तयार नाही. पालिकेतील झालेल्या तोडफोडीचा साधा निषेधही या वरिष्ठ नेत्यांनी केलेला नाही.


वरिष्ठ अधिकाऱ्यांतील शीतयुद्ध

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना लक्ष्य करण्याची कोणतीही संधी मुंबईतील वरिष्ठ अधिकारी सोडत नाहीत. त्याउलट ही संधी त्यांना कशी मिळेल, याची तरतूद कुणाल कुमार यांच्याकडून करण्यात येते की काय? असा प्रश्न सध्या पालिकेच चर्चिला जात आहे. सभागृहात अर्थसंकल्पाच्या चर्चेत या शितुयद्धावर भाष्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना हे सर्व शितयुद्ध ज्ञात असून ते यापासून दूर राहणे पसंद करत आहेत. याचाही फटका पालिकेतील प्रकल्पांना बसत आहे. सत्ताधारी, प्रशासन तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील ही कोंडी कशी फुटणार, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डमी विद्यार्थी रॅकेटच्या सूत्रधाराला अटक

$
0
0

पुणे : पुण्यासह राज्यातील इतर शहरांत पोलिस व इतर शासकीय विभागाच्या वर्ग तीन व चारच्या परीक्षांमध्ये डमी विद्यार्थी पुरविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी अटक केली. या सूत्रधाराचा राज्यातील तीनशे ते चारशे गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यामुळे डमी विद्यार्थ्यांचा सहारा घेऊन नोकरीत लागलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रमोद राठोड (वय ३६, रा. मांडवी, नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुण्यातील पोलिस भरतीमध्ये डमी विद्यार्थी बसविल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी शासकीय परीक्षांमध्ये डमी विद्यार्थी बसविल्याचे गुन्हे दाखल आहेत. ही सर्व माहिती योगेश जाधव या विद्यार्थ्याने माहिती अधिकारात उघडकीस आणली होती. पोलिस भरती, समाजकल्याण, मंत्रालय क्लार्क, महिला व बाल कल्याण विभाग अशा विविध शासकीय विभागांत वर्ग तीन व चारच्या भरतीमध्ये डमी विद्यार्थी बसविल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विविध शहरांत या प्रकरणी गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्यांच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली होती.
विशेष तपास पथकाचे अधीक्षक शंकर केंगार याच्या पथकाला गुन्ह्यातील मुख्य आरोपी राठोड हा मांडवी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. राठोडकडे चौकशी केल्यानंतर यामध्ये लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. राठोडचा सध्या पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी व नांदेड येथील ४० ते ५० गुन्ह्यांत सहभाग असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राठोडला मंगळवारी नांदेड येथील किनवट कोर्टात हजर करण्यात आले. डमी विद्यार्थी म्हणून कोणाला बसवत होता, त्याने किती पैसे घेतले, डमी विद्यार्थी बसविल्यानंतर नोकरीमध्ये किती जणांची निवड झाली, डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट कशा पद्धतीने चालत होते राज्यात ज्या शहरात डमी विद्यार्थ्यांचे गुन्हे दाखल आहेत, त्या ठिकाणी जाऊन तपास करायचा आहे. गुन्ह्याची व्यप्ती मोठी असून, तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. कोर्टाने राठोडला २९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट
राज्यात वर्ग तीन व वर्ग चारसाठी घेतल्या जाणाऱ्या परिक्षांमध्ये डमी विद्यार्थी पुरविण्याचे काम करतो. मूळ विद्यार्थ्यांचे वय एवढाच डमी विद्यार्था त्या मूळ विद्यार्थ्यांच्या जागेवर बसविला जात असे. त्यासाठी लाखो रुपये मूळ विद्यार्थ्यांकडून घेतले जात होते. राज्यात या डमी विद्यार्थ्यांचे मोठे रॅकेट असून, त्याचा तपास आता विशेष तपास पथकाकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळा-मुठा नदीच्या हद्दी निश्चित होणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नद्यांची हद्द निश्चित करण्यासाठी मोजणीची जबाबदारी भूमी अभिलेख विभागाकडे देण्यात आली असून, त्यासाठी लागणारे ५० लाख रुपये तत्काळ जमा करण्यात येणार आहे. या हद्दनिश्चितीसाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड व खडकी कँटोन्मेट बोर्ड या भागातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांवर संवर्धन आणि नदीकाठ विकसन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी या नद्या कुठल्या भागातून वाहतात त्याची हद्दनिश्चिती होणे गरजेचे बनले आहे. या मोजणीची जबाबदारी भूमी अभिलेख कार्यालयावर सोपवण्यात आली असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ५० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे; तर उ‍र्वरित रक्कम देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
नदीचे प्रदूषण कमी करणे, तांत्रिक पद्धतीने नदीचे संरक्षण करणे, नदीकाठचे संवर्धन व सुशोभन करणे अशी विविध कामे सध्या विचाराधीन आहेत. या विकासकामांसाठी नद्यांची हद्द ठरवणे गरजेचे बनले आहे. या हद्द निश्चितीनंतर विशेष कंपनी स्थापन करणे, विकसनासाठी आराखडा तयार करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे असे विविध टप्पे त्यासाठी अवलंबले जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमजी ‘पॉज’ घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमातून टीका होऊ लागली आहे. आघाडीचा रंगकर्मी मोहित टाकळकर यानेही फेसबुकवरून गोखले यांना एक सल्ला दिला आहे. पुढच्या वेळी तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही अभिनयात, संवाद बोलताना ज्या प्रकारे मोठा ‘पॉज’ घेता, त्यापेक्षा मोठा ‘पॉज’ तुम्ही ज्या देशात राहता, त्या देशातील सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी घ्या,’ असे मोहितने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर टीका करणारे अनेक कन्हैया देशात निर्माण होत असून, या सर्वांना फाशी दिली पाहिजे,’ असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘बलराज साहनी पुरस्कार’ स्वीकारताना नुकतेच केल्याने वाद निर्माण झाला आहे. बलराज साहनी यांच्या नावाचा पुरस्कार आणि गोखले यांचे वक्तव्य परस्पर विरोधी असल्याची टीका समाज माध्यमातून होऊ लागली आहे. मोहित टाकळकरसह या क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी गोखले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘विक्रम गोखले आपण कन्हैयाची निंदा करताना आणि अभिनव कौशल्यासाठी बलराज साहनींची प्रशंसा करताना पूर्णपणे विसरला आहात की, साहनी हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय युवक फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते. मी सुचवितो की, आपण पुढच्या वेळी आपले तोंड उघडण्यापूर्वी आपल्या ‘अभिनया’ मध्ये जो ‘पॉज’ घेता, त्यापेक्षा मोठा ‘पॉज’ घ्या आणि देशाची सध्याची परिस्थिती समजून घ्या,’ अशी टिप्पणी मोहितने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’च्या विरोधात औषध विक्रेत्यांचा पुन्हा बंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने औषध विक्री व्यवसायात ऑनलाइनद्वारे विक्री करण्याचा फॉर्म्युला स्वीकारण्याचे संकेत दिल्याने त्यासंदर्भात केंद्र सरकारने जाहीर नोटीस जारी केली आहे. त्या नोटिशीबरोबर सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी देशभरातील औषध विक्रेत्यांनी ३० मे रोजी बंद पुकारला आहे. या संपात देशातील आठ लाख; तर महाराष्ट्रातील ६० हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीर औषध विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राने समिती स्थापन केली होती. त्या समितीने त्या संदर्भात नुकताच केंद्राला अहवाल दिला आहे. त्या अहवालात देशात ऑनलाइनद्वारे औषध विक्रीचे धोरण राबविण्याची शिफारस केल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक कंपन्यांकडून ऑनलाइनद्वारे औषध विक्री बेकायदेशीररित्या सुरू असून, त्याचा फटका औषध विक्रेत्यांना बसत आहे.
नशा, झोप, गर्भपात, कोडीन यासारख्या आरोग्यास धोकादायक औषधांची विक्री या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संदर्भात मुंबई हायकोर्टाने देखील राज्याच्या एफडीएला फटकारले होते. संबंधित ऑनलाइन औषध विक्रीविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाला एफडीएने हरताळ फासला जात असल्याचे बोलले जात असून, सध्या महाराष्ट्रात बिनबोभाटपणे ऑनलाइन औषध विक्री सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘ऑनलाइन औषध विक्रीमुळे प्रतिजैविकांचा वापर वाढण्याची शक्यता असून, त्याचा दुरुपयोग होण्याची भीती आहे. कमी दर्जाच्या, अप्रमाणित, बनावट औषधांची बाजारात विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरुणाईमध्ये नशेसह लैंगिक उत्तेजक औषधांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय औषध घेण्यास मनाई असताना सुद्धा ऑनलाइनद्वारे विविध अॅँटीबायोटिक्ससह अन्य औषधांची खरेदी विक्री होणार आहे.ऑनलाइन औषध विक्रीमुळे सध्या देशात असलेल्या आठ लाख औषध विक्रेत्यांच्या कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. यामुळे ऑनलाइन औषध विक्रीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी ३० मे रोजी देशात औषध विक्रेत्यांनी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

ऑनलाइन विक्रीमुळे अनेक समस्या
रशिया, चीन, जपान, इटली सारख्या प्रगत राष्ट्रांनी देखील ऑनलाइन औषध विक्रीचे धोरण स्वीकारले नाही. ज्या राष्ट्रांनी हे धोरण स्वीकारले आहे, त्या राष्ट्रांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जारी केलेल्या ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भातील जाहीर नोटिशीच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंकलेखन बंद झाल्यामुळे अंध विद्यार्थ्यांचे नुकसान

$
0
0

पुणे : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूचनांना डावलून मॅन्युअल टाइपरायटिंग कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मॅन्युअल टायपिंग (टंकलेखन) शिकण्याची इच्छा असणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसोबत अंध विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. अंध विद्यार्थी हे टायपिंगला सुरुवातच मॅन्युअल टायपरायटिंग यंत्रावर करतात. टायपिंग करताना त्यांना एक ‘सेन्सरी’ टच मिळतो. मात्र, कोर्सच बंद झाल्याने आणि कम्प्युटर टायपिंग कोर्समध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच प्रकारची विशेष सुविधा नसल्याने अंध विद्यार्थ्यांनी मॅन्युअल टंकलेखन शिकायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लिपिक, स्टेनो, सहायक आदी सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी मॅन्युअल टायपरायटिंग कोर्स आणि कम्प्युटर टायपिंग कोर्स टाइपिंग परीक्षेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दर वर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. दरम्यान, कम्प्युटरचा सर्वत्र वापर वाढल्याने शिक्षण विभागाने मॅन्युअल टायपरायटिंग कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारने निर्णय घेण्यापूर्वी मॅन्युअल टायपरायटिंग कोर्स आणि कम्प्युटर टायपिंग कोर्स, असे दोन्ही कोर्स एकत्र ठेवायचे का आणि त्याची आवश्यकता काय, हे तपासण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली. यावर परिषदेने टंकलेखनाचे मूलभूत कौशल्य शिकण्यासाठी मॅन्युअल टंकलेखन आवश्यक असल्याचे सरकारला सांगितले; तसेच संगणकीय कोर्सचा मूळ पाया हा मॅन्युअल टंकलेखनावर आधारित आहे. त्यामुळे कम्प्युटर टायपिंग कोर्सच्या बरोबरीनेच मॅन्युअल टायपरायटिंग कोर्स सुरू ठेवावा, अशा सूचना परिषदेने केल्या होत्या; तसेच राज्यात मॅन्युअल टंकलेखनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे साडेतीन हजार संस्था कार्यरत असून, दर वर्षी या संस्थांमधून लाखो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले.

त्यामुळे परिषदेने कोर्स बंद करण्याबाबत शिक्षण विभागाला सांगितले नाही. असे असताना शिक्षण विभागाने कोर्स करण्याचा फतवा ३१ ऑक्टोबर २०१३ राजी काढला. त्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कोर्स सुरू ठेवण्याची मुदतवाढ टंकलेखन संस्थांना ३१ मे २०१७ पर्यंत वाढवून दिली. मात्र, यापुढे ही मुदत वाढणार नसून, ऑगस्ट महिन्यात अखेरची परीक्षा होणार आहे. राज्यात मॅन्युअल टायपरायटिंग कोर्सला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तीन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात अंध विद्यार्थ्यांची संख्या हजारांमध्ये असते. अशी परिस्थिती असताना अंध विद्यार्थ्यांच्या भविष्याचा काही विचार न करता कोर्स बंद केला आहे. मॅन्युअल टायपरायटिंग कोर्समध्ये टायपरायटिंग यंत्रावर टायपिंग शिकताना अंध विद्यार्थ्यांना सेन्सरी टच मिळतो. हा की-बोर्ड शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी सोपा असतो. टायपरायटिंग यंत्रावर मार्गदर्शकाच्या सांगण्याहून संबंधित विद्यार्थी काही दिवसांमध्ये उत्तम टायपिंग शिकतो. काही संस्थांमध्ये त्याला शिकण्यासाठी की-बोर्डच्या बटणांवर सुविधा निर्माण केली जाते. तुलनेने विद्यार्थ्यांना कम्प्युटरच्या की-बोर्डवर हा टच मिळत नसून, मार्गदर्शकाला विद्यार्थ्याला शिकविण्यात प्रचंड अडचणी येतात. असे असताना कम्प्युटर टायपिंग कोर्समध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे कोर्स बंद झाल्यावर अंध विद्यार्थी टायपिंग शिकणार तरी कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे आदर्श कमर्शियल इन्स्टिट्यूटच्या प्रभाकर दंबळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धा कोटी खर्च करूनही सिग्नल व्यवस्था धूळ खात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा वाजलेला बोऱ्या, पार्किंगचा किचकट प्रश्न, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, शहराची सुरक्षा या सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पन्नास लाख रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा कार्यन्वित केली. मात्र, ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळाभावी नगरपालिकेला पोलिसांनी ‘रेड सिग्नल’ दिला आहे.
बारामती शहराच्या नावाला एक राजकीय, सामाजिक वलय आहे. शिक्षणाचे नूतन माहेरघर, सांस्कृतिक शहर, राजकीय पंढरी अशा अनेक पैलूंनी चर्चेत असलेल्या बारामती शहरातील वाहतूक समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. शहराच्या नावलौकिकाबरोबर बारामतीकरांना हा गंभीर प्रश्न सतत भेडसावणारा व तितकाच महत्वाचा आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी (वॉर्डन)१५ गृहरक्षक दलाच्या जवानाचे वेतन महिना तीन हजार रुपयांप्रमाणे ४५ हजार रुपये खर्च करण्यास नगरपालिका प्रशासन तयार आहे. मात्र, पोलिसांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे बारामतीत ५० लाख रुपये खर्च करूनही सिग्नल यंत्रणा कार्यन्वित होऊ शकत नसल्याचे नुकतेच समोर आहे. बारामती शहरात एका नामांकित कंपनीने स्वतःच्या सामाजिक दायित्व निधीतून भिगवण चौक, इंदापूर चौक, एमआयडीसी चौक या तीन चौकातील सिग्नल यंत्रणा बसून दिली. उर्वरित चौकातील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एका विशिष्ट फंडातून ५० लाख रुपये निधी खर्च झाला असल्याचे पालिका प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २० पोलिस जवान कायमस्वरूपी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाने प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास सर्व सुरक्षा शक्य असल्याचे पोलिस प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले.


नगरपालिका प्रशासन सहकार्य करण्यास तयार असेलही; मात्र माझ्याकडे सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचारी वाढून मिळणे गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा करत आहे. सीसीटीव्ही बसवल्यास प्रायोगिक तत्वावर सुरू करणे शक्य आहे.
- विजय जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
बारामती शहर पोलिस ठाणे

सिग्नल व्यवस्था सुरू होणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासन पोलिसांना त्यांच्या गरजेनुसार सहकार्य करेल.
- नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवासा पीएमआरडीएच्या अखत्यारित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील लवासा कॉर्पोरेशनला दिलेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारने रद्द केल्याने यापुढे लवासातील सर्व बांधकामांना ‘महाराष्ट्र नगररचना कायद्या’च्या (एमआरटीपी) तरतुदी लागू होणार आहेत. त्यामुळे डोंगरमाथा-डोंगरउतार यासह चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) बंधनातच लवासातील बांधकाम होऊ शकणार आहे. राज्य सरकारने लवासाच्या अधिकारांवर आणलेल्या निर्बंधांचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.
लवासातर्फे दासवे आणि परिसरात सुरू असलेल्या अनिर्बंध बांधकामांबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत होता. लवासाला देण्यात आलेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जाही चुकीचा असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, कंप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) आणि लोकलेखा समितीनेही लवासाला दिलेल्या नियमबाह्य परवानग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने लवासाला दिलेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या भागाचा विकास करण्यासाठी सरकारने ‘पीएमआरडीए’ची स्थापना केली असून, लवासाचा संपूर्ण परिसर ‘पीएमआरडीए’मध्येच समाविष्ट होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या पुढील काळात लवासामधील बांधकाम नकाशे मंजूर करण्यापासून ते चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) वापरापर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी पीएमआरडीए परवानगी बंधनकारक असेल; तसेच डोंगरमाथा-डोंगर उतारावर सरकारी नियमांचे पालन करूनच बांधकाम परवानगी दिली जाईल.

‘देर आए, दुरुस्त आए’
सरकारच्या निर्णयामुळे ‘लवासा’त मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या बांधकामांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला आता आळा बसेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली. लवासाला दिलेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा चुकीचा होता. सरकारने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यास उशीर केला असला, तरी ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. अवघ्या दोन गावांमध्ये लवासामुळे झालेली पर्यावरणाची हानी पाहता, या निर्णयामुळे इतर गावांतील पर्यावरण टिकून राहील, असा विश्वास आता वाटतो, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले.

प्रकल्पः लवासा हिल सिटी, तालुका-मुळशी, जिल्हा-पुणे
प्रकल्पाचे कामः हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी)
एकूण क्षेत्रफळः २५ हजार एकर (१०० स्क्वेअर किमी)
एकूण बाधित गावेः १८
सध्या झालेल्या बांधकामाचे क्षेत्रः आठशे ते एक हजार एकर (दासवे आणि मुगाव या दोन गावांमध्ये मिळून)
अस्तित्वातील लोकसंख्याः सुमारे १८ हजार
संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित लोकसंख्याः अडीच लाख

मुख्य आक्षेपः-
डोंगरमाथा-डोंगरउतारावर प्रमाणाबाहेर बांधकाम
पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली
लवासाच्या पाण्यासाठी शहराच्या पाण्यात कपात
मुळशी तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविविधतेला धोका

लवासाचा संपूर्ण परिसर आता पीएमआरडीएच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. यापुढे बांधकाम परवानगी देताना, पीएमआरडीएच्या सर्व निकषांची पूर्तता करावी लागेल.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिळकत कर सवलतीस एक महिन्याची मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरण्याची मुदत संपण्यास आठ दिवस शिल्लक असतानाच नागरिकांना सवलतीच्या दरात मिळकत भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी, असा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. अनेक नागरिकांनी अद्यापही पालिकेचा मिळकतकर भरला नसल्याने त्यांना सवलतीमध्ये हा कर भरता यावा, यासाठी हा प्रस्ताव आयत्या वेळी मांडून मान्य करण्यात आला. यामुळे नागरिकांना ३० जूनपर्यंत सवलतीच्या दरात मिळकतकर भरता येणार आहे.

महापालिकेचा मिळकत कर ३१ मे पर्यंत भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करामध्ये पालिकेच्या वतीने पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. याबरोबरच ऑनलाइन मिळकतकर भरणाऱ्यांना दोन टक्के वाढीव सवलत पालिकेच्या वतीने दिली जात आहे. शहरात सुमारे साडेआठ लाख मिळकती असून या सर्वांना पालिकेच्या मिळकत विभागाने बिले पाठविली आहेत. नागरिकांनी आपला कर वेळेत भरावा यासाठी पालिकेने सवलत जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षापासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ही सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेत बहुतांश नागरिक पहिल्या दोन महिन्यांमध्येच कर भरत असल्याने पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते. मागील वर्षी एक महिन्याची वाढीव मुदत नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी ही मुदत दिली जाणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले होते.

पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळेस सर्वपक्षीय सभासदांनी मिळकत कर भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली. मंगळवारपर्यंत मिळकतकरापोटी ४१० कोटी रुपयांचा महसूल पालिकेकडे जमा झाला आहे. सुमारे ४ लाख ६ हजार नागरिकांनी हा मिळकतकर भरला असून यामध्ये १ लाख ८८ हजार नागरिकांनी ऑनलाइन पेमेंट केले आहे.

पालिका हद्दीत असलेल्या साडेआठ लाख मिळकतींपैकी सहा लाख ३४ हजार ६६० नागरिकांच्या मोबाइलची नोंद पालिकेकडे आहे. त्यामुळे बिल मिळाले नाही तरी, महापालिकेकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे रहिवाशांना त्यांच्या बिलाची रक्कम पाहून त्याचा भरणा करता येईल. मोबाइल क्रमांकाची संकेतस्थळावर नोंद केली तरी, मिळकतींचा क्रमांक रहिवाशांना मिळणार आहे, अशी माहिती मिळकत कर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. महपालिकेच्या https//propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांकाच्या आधारे रहिवाशांना मिळकतकराची बिले पाहता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रश्नावर आराखडा सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील नऊ वर्षांत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार हा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला असून तो महापौर मुक्ता टिळक यांना सादर करण्यात आला आहे.
पुणे शहरात २३ दिवस सुरू असलेली कचराकोंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबर केलेल्या चर्चेनंतर फुटली होती. या बैठकीत एक महिन्याच्या कालावधीत कचरा प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी हा आराखडा तयार केला असून तो महापौर टिळक यांना सादर करण्यात आला आहे.
सद्यस्थिती, कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणे, काही कचरा जमिनीत जिरवणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे, यासर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, धोरणे ठरवणे आणि जमिनीचे अधिग्रहण करणे या आठ मुद्द्यांवर आधारित असा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला असून कचरा किती गोळा होतो आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याचा आढावा घेण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
कचरा तीन ठिकाणांहून गोळा करण्यात येतो. त्यामध्ये झोपडपट्टी, झोपडपट्टी नसलेला भाग, सोसायटी आणि व्यावयासिक आस्थापनांचा यात समावेश आहे. या कचऱ्याची वाहतूक करण्यात येते आणि त्यानंतर ओला, सुका, ओला-सुका आणि विशेष अशा कचऱ्यावर प्रक्रिया होते. ही सर्व प्रक्रिया करण्यात येणाऱ्या अडीअडचणी, सद्यस्थितीचा आढावा या आराखड्यात घेण्यात आला आहे. त्यामध्ये पालिका प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आणि राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

कचरा प्रश्न सोडवण्यासाठीचा कालावधी
कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नऊ वर्षांच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या आराखड्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील अडीच वर्षांत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये कचरा गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, ‘रिजेक्ट’ करण्यात आलेला कचरा जमिनीत जिरवणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

पुणेकरांसाठी दहा कलमी कार्यक्रम
- कचरा पालिकेच्याच ताब्यात द्या.
- वर्गीकरण केलेला कचराच ताब्यात द्या.
- कचरा संकलित करणाऱ्यांना पैसे द्या.
- बागेतील कचरा ठराविक दिवशी पालिकेकडे हस्तां​तरित करा.
- सॅनिटरी नॅपकीन स्वतंत्ररित्या द्या. (लाल रंगाचा डॉट काढण्यात यावा)
- ई-कचरा हा पालिकेच्या स्वतंत्र यंत्रणेच्या हवाली करा.
- कचऱ्याबाबतची माहिती, तक्रार पालिकेच्या यंत्रणेकडे करा. त्यासाठी अॅप, कॉलसेंटर स्थापणार.
- कचरा कुठेही टाकू नका, जाळू नका.

सध्याच्या अडचणी
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस सेवा नाही.
कचरा प्रकल्पांमध्ये तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ कर्मचारी नाहीत.
कचरा गोळा करण्यावर पूर्ण नियंत्रण नाही.
कचरा वर्गीकरण करण्यात अडचणी आहेत.

काय करण्यात येणार आहे?
- प्रत्येक घरातून दरमहिन्यांत किमान २८ दिवस कचरा गोळा करण्यात येणार.
- कचरा संकलित करण्याची दररोज वेळ निश्चित करणार. (स. ८ ते ९)
- प्रभागातील किमान ७५ टक्के भागातून कचरा गोळा करणार.
- कचरा वर्गीकरण करण्यावर प्रामुख्याने भर असणार.

कचरा गोळा करण्यासाठी असणारी वाहने
घंटागाडी - १६०
डंपर - ८५
कॉम्पक्टर - २४
बीआरसी - ५६
मॅकॅनिकल स्विपर्स - ०२
इतर - ०६
एकूण - ४४९

कचरा प्रकल्प - ३३
कचरा वर्गीकरण ठिकाणे - ०७

कचऱ्यावर होणारा खर्च
२०१४-१५- १९७ कोटी रुपये
२०१५-१६- १८१ कोटी रुपये
२०१६-१७- २५१ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढीबाबत तावडेंना‘मनविसे’कडून इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुल्कवाढी संदर्भात येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तावडे यांना दिला आहे. शुल्कवाढीविरोधात गेल्या काही दिवसांपासून अनेक पालकांनी तक्रारी केल्या तसेच आंदोलने देखील केली. मात्र, यांनी शुल्कवाढीबाबत योग्य निर्णय घेण्यात आला नसून शिक्षणमंत्री वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपदेखील मनविसेने केला आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमची अंमलबजावणी २०१४ सालापासून संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेला जर शुल्कवाढ करायची असेल, तर शाळा व्यवस्थापनाला पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीसमोर पुढील वर्षाच्या किमान सहा महिन्यांपूर्वी शुल्कवाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर शाळेला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून कार्यालयाची मान्यता घ्यायची असते. मात्र, अनेक शाळा ही मान्यता न घेताच शुल्कवाढ करतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यासाठी सक्ती करतात. यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आघाडीवर आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ शाळांची लेखा परीक्षण तपासणी, निरीक्षण नोंदवह्या इतर दस्तावेज तपासणी तसेच कोणत्याही शाळा व्यवस्थापनाच्या जागेत प्रवेश करून तपासणी करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना शाळाच्या मनमानी कारभारावर कारवाईच करता येत नाही. त्यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालून शुल्कवाढ करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मनविसेने केली आहे.

‘समितीच्या शिफारशींवर निर्णय घ्यावा’
‘शुल्कवाढी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने कायद्यात सुधारणा करण्यासाठी व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्परीक्षण समिती स्थापना केली. समितीला शिफारशी करण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे तावडे यांनी शुल्कवाढीबाबत घोषणा देणे बंद करून शिफारशींवर त्वरित निर्णय घ्यावा. त्यामुळे उपसंचालक कार्यालयाला अधिकार मिळतील. अन्यथा मनविसे शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकेल,’ असा इशारा शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाच्या बारावीचा निकाल पुढील आठवड्याच्या सुरुवातीस ऑनलाइन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा बोर्डातर्फे येत्या एक दोन दिवसांत करण्यात येईल. दरम्यान, निकालाबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर विद्यार्थी, पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखांबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यात बारावीचा निकाल २५ मे रोजी; तर दहावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार असे म्हटले होते. तर काही मेसेजेसमध्ये अन्य तारखांचाही समावेश होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. गतवर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्या वेळचा मेसेज काही व्यक्तींनी गेल्या काही दिवसांत व्हायरल केला होता. त्यामुळेही विद्यार्थी संभ्रमात पडले होते. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. मंडळाने अजून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या तारखांवर विश्वास ठेवू नये, असे मंडळातील सूत्रांनी स्पष्ट केले.

बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन ऑनलाइन निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, यंदा राज्यात महापालिकांच्या निवडणुकांमुळे परीक्षा आठ दहा दिवस उशिराने सुरू झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षा संपण्यासही उशीर झाला. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन झाले असून निकाल तयार करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.

‘सीबीएसई’च्या निकालाबाबत संभ्रम

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षांच्या निकालांबाबतही सोशल मीडियावर विविध मेसेज फिरत आहेत. मात्र, मंडळाने निकालाची अधिकृत तारीख अजून जाहीर केलेली नाही. मंडळातर्फे मेच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर केला जातो. येत्या दोन तीन दिवसांत ऑनलाइन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्सल गहाळ करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीला दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागपूर येथे पाठविलेले तीन पार्सल गहाळ केल्याप्रकरणी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केलेल्या तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे. संबंधित कंपनीने तक्रारदाराचे पार्सल गहाळ करणे ही सेवेतील त्रुटी असून तक्रारदारांनी पाठविलेल्या मालाच्या पार्सलची एक लाख ७६ हजार ९५५ रुपये किंमत नऊ टक्के व्याजदराने परत करण्यात यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी ही केस पुढे चा​लविली होती. तक्रारदार यांच्या वारसांना म्हणजेच त्यांच्या मुलांना ही रक्कम देण्यात यावी, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रभाकर बापूराव इनामदार (मूळ तक्रारदार) यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांची मुले स​चिन प्रभाकर इनामदार, आशिष प्रभाकर इनामदार (रा. कुबेरा गुलशन, औंध) यांनी श्री खुराणा ट्रॅव्हल्सच्या शिवाजीनगर शाखेविरुद्ध हा दावा दाखल केला होता. मूळ अर्जदार प्रभाकर इनामदार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी हा पाठपुरावा केला.
तक्रारदार यांचा स्पेअर पार्टचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी तीन पार्सल संबंधित कंपनीमार्फत पाठविले होते. नागपूरला ११ जुलै २०११ आणि २१ ऑक्टोबर २०११ रोजी हे पार्सल पाठविण्यात आले होते. मात्र त्यांनी पाठविलेले पार्सल पोहोचले नाहीत. याबाबत त्यांनी संबंधितांकडे विचारणा केली होती. मात्र त्यांना कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. त्यांनी पाठविलेला माल वेळेवर माल पोहोचला नाही. सेवेत त्रुटी ठेवल्याप्रकरणी संबंधितांनी मालाची किंमत परत देण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांतर्फे करण्यात आली.
विरुद्ध पक्षातर्फे लेखी म्हणणे सादर करण्यात आले. हा दावा मंचाच्या कार्यक्षेत्रात हा येत नाही. तसेच पार्सलची किंमत दोन हजारांपेक्षा जास्त नाही असे तक्रारदारांनी लिहून दिले, अशी बाजू मांडण्यात आली. मात्र कंपनीतर्फे पार्सल पाठविण्यात आले अथवा नाही हे मंचापुढे मांडण्यात आले नाही, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराचे पार्सल गहाळ करणे ही सेवेतील त्रुटी असून त्यांना पार्सलची किंमत परत देण्यात यावी, असा आदेश मंचाने दिला. तसेच तक्रादाराला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल दहा हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत, असे मंचाने निकालात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images