Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विकासकामांसाठीचा ९९ टक्के निधी खर्च

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विविध विकासकामांसाठी दिलेल्या ४५० कोटी ७१ लाख रुपयांपैकी सुमारे ४५० कोटी ५४ हजार रुपये म्हणजे सुमारे ९९.९६ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. आता संबंधित निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला आहे, याची माहिती संकलित करण्याचे काम समितीने सुरू केले आहे.

ग्रामीण भागातील रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, स्मशानभूमी बांधणे, ग्रामपंचायतीचे बांधकाम, अंगणवाडी इमारती बांधणे, जलयुक्त शिवारची कामे, एकात्मिक विकास कार्यक्रम, स्वच्छतागृहे बांधणे, जलसंधारण आदी कामांसाठी हा निधी देण्यात येतो. या वर्षी ४५० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी ४५० कोटी ५४ हजार रुपयांचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाला आहे. या खर्चाचा तपशील संबंधित विभागांकडून मागवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल तयार केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

0
0

आईकडून मुलीला गर्भाशय दान; पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुरुवारी पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ‘आईने दान केलेल्या गर्भाशयामुळे मुलीला स्वतःचे बाळ जन्माला घालता येणार आहे. सध्या ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी तीन आठवड्यानंतरच त्याची यशस्वीतता खऱ्या अर्थाने समजू शकेल,’ अशी माहिती ‘गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’चे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.

‘पुण्यातील गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’ या हॉस्पिटलमध्ये ही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. हे प्रत्यारोपण गर्भाशयाचे देशातील पहिलेच प्रत्यारोपण असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. या प्रत्यारोपणामुळे महिलेला स्वतःचे बाळ जन्माला घालणे शक्य होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये तीन महिलांमध्ये गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिली शस्त्रक्रिया गुरुवारी पार पडली.

ही शस्त्रक्रिया दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाली. रात्री सव्वानऊच्या सुमारास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये बारा तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता, असे या वेळी सांगण्यात आले.

गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. पंकज कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी स्वीडनला जाऊन गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची माहिती घेतली होती. डॉ. पुणतांबेकर यांनी जर्मनीत जाऊन प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणात प्रत्यारोपणाच्या नियमांची (प्रोटोकॉल) माहिती, पेशंटची निवड व प्रत्यक्ष प्रक्रिया आदीचा समावेश होता. स्वीडनमध्ये ओपन सर्जरी करण्यात आली होती. पुण्यात दात्याचे गर्भाशय हे दुर्बिणीद्वारे काढण्यात येणार होते.

दरम्यान, ‘शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मात्र, दाता आणि संबंधित युवती यांना पुढील दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल. त्यानंतर तीन आठवडे त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. तीन आठवड्यांनंतर गर्भाशयाचे कार्य आणि रक्तपुरवठा यावरच त्याची यशस्वीतता अवलंबून आहे,’ असे डॉ. पुणतांबेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्यपदी नायर, थोरात, शेडगे

0
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे भोईर, वाबळे; महापौरांकडून निवड जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पक्षाकडून बाबू नायर, माऊली थोरात, अॅड. मोरेश्वर शेडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांची निवड झाल्याचे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या नावांची औपचारीक घोषणा करण्यात आली. या सदस्य निवडीसाठी नऊ मे रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. पालिकेतील संख्याबळानुसार सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नायर, थोरात आणि शेडगे यांच्या नावांची शिफारस केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी भोईर आणि वाबळे यांची शिफारस केली होती. या निवडीवर सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
भाजपच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले होते. खासदार अमर साबळे आणि अॅड. सचिन पटवर्धन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. तसेच नायर आणि थोरात यांच्याबाबत लेखी निवेदनाद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आक्षेप घेतला होता. त्यामुळे भाजपकडून स्वीकृतची नावे बदलणार अशी अफवा होती. नायर यांनी दाखल केलेल्या स्वयंसेवी संस्थेचे ऑडिट झाले नसून, ते संस्थेचे विश्वस्त आहेत आणि थोरात यांचे घर अनधिकृत असल्यामुळे त्यांची स्वीकृतपदी निवड करू नये, असा आक्षेप रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने घेतला होता. त्यामुळे सभेत काय निर्णय होणार, या विषयी काही प्रमाणात उत्सुकता झाली होती. परंतु, उमेदवारी जाहीर केलेल्या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. पक्षश्रेष्ठी ठाम राहिले. इतकेच काय खासदार साबळे पालिकेत स्वतः उपस्थित होते. त्यामुळे आक्षेप घेणाऱ्या आणि त्यांना छुपा पाठिंबा देणाऱ्यांचा हिरमोड झाला. नावे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करीत आनंद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूर बायपास रस्त्यावरदोन जणांचा अपघाती मृत्यू

0
0

शिरूर शहराजवळून जाणाऱ्या पुणे-नगर राज्य महामार्गावर झालेल्या क्रुझर जीप आणि मोटारसायकलचा अपघातात मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. मृतात अहमदनगर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातासंदर्भात सोमनाथ बाळासाहेब बर्डे (रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. १८ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. क्रुझर जीप पुण्याकडून नगरच्या दिशेने चालली होती. त्या वेळी भरधाव वेगात असलेल्या क्रुझरची रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मोटारसायकलशी धडक झाली. धडकेत मोटारसायकलवरील शंकर शेटिबा औटी (१९, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) व अक्षय बाळासाहेब बर्डे (१७, रा. निमोणे ता. शिरूर) हे दोघे जण जागीच मृत्युमुखी पडले. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. या अपघातानंतर जीप चालक अरविंद मोराळे (रा. वडजी, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास फौजदार बी. व्ही. पाटील करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृत्रिम अवयवांनी फुलते दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू’

0
0

साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये कृत्रिम हात मोफत बसविण्यासाठी केंद्र
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
‘गरीब दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय लावलेले नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सतत नैराश्य असते. मात्र, त्याला कृत्रिम हात बसविल्यावर ते परावलंबी न राहता स्वावलंबी जगण्याची वाटचाल सुरू करतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्यामुळे दिव्यांगांनाही कुटुंबावर भार बनून न राहता आधार होता येते,’ असे मत रोटरी क्लब पुणे जिल्ह्याचे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी मत व्यक्त केले.
महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ सारस बाग, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन यांच्या तर्फे हडपसर साने गुरुजी हॉस्पिटल येथे कायमस्वरूपी मोफत कृत्रिम हात बसवण्याचे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. या वेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, रोटरी क्लब डाउनटाउनचे पल्लवी साबळे, प्रदीप मनोत, शब्बीर जामनगरवाला उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील एकाच दिवशी २१७ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात बसवण्यात आले होते. या शिबिरात सहभागी होऊ न शकलेल्या दिव्यांग व्यक्तींनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून कृत्रिम हातांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर दिव्यांग व्यक्तीचा कृत्रिम हात बसवण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या साह्याने कृत्रिम हात बसविण्यासाठछी कायमस्वरूपी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा शस्त्र बाळगल्यावरून शिवसेना उमेदवाराला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
धनकवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार सुनील खेडेकर यांना बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पंधरा दिवसांपूर्वी धनकवडीतील चैतन्यनगरच्या मैदानात मध्यरात्री राजकीय नेत्याने दोन गोळीबार झाडल्याची जोरदार चर्चा होती. त्यातच ही अटक केल्याने परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुनील पांडुरंग खेडेकर ( वय ५०, रा. मातोश्री गावठाण, धनकवडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिसांना बातमीदाराकडून खेडेकर यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सहकारनगर पोलिस तपास करत होते. त्यावेळी गुरुवारी खेडेकर यांच्याकडे पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी त्यांना चैतन्यनगर परिसरामधून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तुल आढळून आले. खेडेकर यांच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
धनकवडी परिसरातील चैतन्यनगरच्या मैदानात पंधरा दिवसांपूर्वी मध्यरात्री राजकीय नेत्याने पिस्तुलातून गोळ्या झाडल्याची चर्चा सुरू होती. धनकवडी येथे सध्या राजकीय वातावरण पेटले आहे. त्यामुळे अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. या सर्व घटनांकडे पोलिसांचे लक्ष असले तरी गोळीबाराची घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. चैतन्यनगर येथील सद‍्गुरू शंकर महाराज मठामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिराच्या आवारात संबंधित राजकीय नेत्याला आपला फलक लावायचा होता. तो फलक स्थानिकांनी लावू दिला नाही. या रागापोटी त्याने आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केल्याची चर्चा होती. गोळीबाराची घटना रात्री एकच्या सुमारास घडली असून, त्याचा आवाजही काही नागरिकांनी ऐकल्याची चर्चा आहे. दहशतीमुळे याबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. चैतन्यनगर येथे दबक्या आवाजात मात्र या गोळीबाराची जोरदार चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीच्या पाहणीत मुंढेचा कर्मचाऱ्यांना दणका

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जलद बस वाहतूक सेवेची (बीआरटी) पाहणी शुक्रवारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला; तसेच नियमबाह्य कामकाज आणि गैरवर्तन केल्याचे आढळलेल्या १५ कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली.
पीएमपीतर्फे पुणे शहरात कात्रज-हडपसर, संगमवाडी-विश्रांतवाडी आणि येरवडा ते वाघोली असे तीन बीआरटी मार्ग कार्यान्वित आहेत. शुक्रवारी दिवसभरात मुंढे यांनी तिन्ही मार्गांची पाहणी केली. या पाहणीमध्ये प्रामुख्याने बसची स्वच्छता, चालक-वाहकाचे वर्तन, बसमधील आयटीएमएस यंत्रणा, त्यात जाणवणाऱ्या उणिवा या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. मुंढे यांच्यासह पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी आणि आयटीएमएस सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी या पाहणीदरम्यान उपस्थित होते. मुंढे यांनी प्रवाशांशी संवाद साधत, बीआरटी सेवेबाबतची त्यांची मते जाणून घेतली.
मुंढे यांनी कात्रज स्थानकापासूनच या पाहणीची सुरुवात केली. या दरम्यान तेथे जाणविणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी तातडीने संबंधित सरकारी यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चुकीच्या पद्धतीने होणारे पार्किंग आणि अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहाआसनी रिक्षांवर कारवाई करण्यासाठी इतर सरकारी यंत्रणांची मदत घेण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीमध्ये गैरवर्तणूक आणि शिस्तभंग करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, सहा कर्मचाऱ्यांवर एक दिवसाची बिनपगारी कारवाई आणि एका कर्मचाऱ्यांवर शासन सस्पेंड करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वानवडीत दोन किलो चांदी; २१ तोळे सोने चोरीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वानवडीतील औदुंबर सोयासटी येथे फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन किलो चांदी, २१ तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत कृष्णानंद बधानी (रा. औदुंबर सोसायटी, फातिमा नगर बँक ऑफ महाराष्ट्र समोर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बधानी यांचे घर बंद असताना चोरट्यांनी फ्लटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून दोन किलो चांदी, २१ तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. ही घटना समोर आल्यानंतर वानवडी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्थसंकल्पातील योजना प्रत्यक्षात साकारणर का ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट गावांसाठीच्या अपुऱ्या निधीवरून टीका करण्यात येत असतानाच वैद्यकीय, ​नर्सिंग महाविद्यालय, ​विमा योजना, रुबेला लस या योजनांचे जोरदार समर्थन अर्थसंकल्पावरील चर्चेत शुक्रवारी करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्षांनी कागदावर जाहीर केलेल्या योजना प्रत्यक्षात ​जमिनीवर उतरणार का, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.
सर्वसाधारणसभेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू झाली. या प्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी चर्चेला सुरुवात केली. ‘एकाच प्रभागात हा आपला तो परका, असा भेदभाव निधीवाटपात झाला आहे. हा अर्थसंकल्प पारदर्शक नसून भेदभावयुक्त आहे. निधी मिळाल्याने आंदोलन केले तर तो ‘स्टंट’ असल्याची टीका होते. या भेदभावामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागल्याची टीका जाधव यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या वर्षा तापकीर यांनी २४ तास पाणीपुरवठा योजनेचे समर्थन केले. त्याचा फायदा उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, समाविष्ट गावांतील आरक्षणे तातडीने संपादित करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करताना समाविष्ट गावांतील प्रभागांसाठी निधी वाढण्याची माहणी दिलीप वेडे-पाटील केली. आरती कोंढरे, ज्योती कळमकर, स्मिता वस्ते, राजेश येनपुरे यांनीही अर्थसंकल्पाचे समर्थन केले.
भाजपच्या रंजना टिळेकर यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा खरपूस समाचार घेतला. चांदेरे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सदस्यांना चांगली वागणूक दिली नसल्याचे त्या म्हणाल्या. ‘चांदेरे यांनी शहराचा विचार न करता केवळ बाणेर-बालेवाडीसाठीच निधी वापरला,’ असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांनी दक्षिण पुण्यावर अर्थसंकल्पात अन्याय करण्यात आल्याची टीका केली. राष्ट्रवादीने आपल्या सत्तेच्या काळात विरोधकांनाही भरपूर तरतूद केली होती. त्यामुळे भाजपचे अनेक नगरसेवक यंदाही निवडून आले आहेत, त्याची जाणीव भाजपने ठेवावी, असे बजावले.
मनसेचे साईनाथ बाबर यांनी हज हाउस आणि वारकरी भवनासाठी अत्यल्प तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. भाजपच्या प्रा. ज्योस्त्ना एकबोटे यांनी हा अर्थसंकल्प विद्यार्थीकेंद्रित आहे, असे चर्चेदरम्यान सांगितले. राजेश येनपुरे, अमोल बालवडकर, अल्पना वर्पे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत केले.

बाळासाहेब ठाकरेंचा विसर?
अर्थसंकल्पाच्या पुस्तकात सर्व पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र, ​या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. शिवसेनेचे बाळा ओसवाल यांनी भाजपला याचा विसर कसा पडला, असा सवाल उपस्थित केला. तसेच अधिकाऱ्यांमध्ये दोन ‘पार्ट्या’ पडल्या असल्याची टीकाही त्यांनी केली. अधिकाऱ्यांतील शीतयुद्धाचा फटका विकासकामांना बसत असल्याचे ते म्हणाले.

‘समाविष्ट गावांसाठी निधी द्या’
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, समाविष्ट २३ गावांतील रस्ते विकसित झालेले नाहीत. या गावांतील आरक्षणे संपादित करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट गावांसाठी अपुरा निधी असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली असून, पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमध्ये प्रवशाचे पंधरा लाखांचे दागिने चोरणाऱ्याला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई हैदराबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे पंधरा लाख रुपयांच्या दागिन्याची बॅग हिसकावून नेणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सर्व दागिने जप्त करण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण काळे (वय ४०, रा. नवी मुंबई, मूळ- जामखेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विनायक दिनकर जोशी (रा. रहाटणी, पुणे) यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी हे १४ मे रोजी हैदराबाद एक्स्प्रेसने हैदराबादला निघाले होते. पुण्याहून ते रेल्वेत बसल्यानंतर कुर्डूवाडीच्या अलीकडे सोन्याचे दागिने असलेली हँडबॅग चोरटा घेऊन पसार झाला होता. या बॅगेत पंधरा लाखांचे दागिने ठेवलेले होते. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर जोशी यांनी हैदराबाद येथील तिकीट मास्तरांना घटनेची माहिती दिली. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाही माहिती दिली. हैदराबाद या ठिकाणी गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे लोहमार्ग पोलिसांना दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याची माहिती मिळाली.
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिमंत माने पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याची प्रत ई-मेलवर मागवून घेत तपास सुरू केला. त्यावेळी ही चोरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हा इंद्रायणी एक्स्प्रेसने नवी मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली. सातव यांच्या पथकाने आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरलेली पंधरा लाखांच्या दागिन्याची बॅग मिळाली. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवले सुट्ट्यांमुळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट डेपोतील तिकीट बुकिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे. उन्हाळी सुट्ट्या डोळ्यापुढे ठेवून कामाचे तास वाढविण्यात आल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे, तर वेळेत वाढ करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे. या अतिरिक्त कामाचा ‘ओव्हरटाइम’ कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

स्वारगेट एसटी स्टॅँडच्या व्यवस्थापकांनी तिकीट बुकिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत वाढ केल्याबाबतची नोटीस लावण्यात आली आहे. दादर, ठाणे, मुंबई, सांगली आणि कोल्हापूर या मार्गांचे तिकीट बुकिंग ‘विंडो’वर दोन शिफ्टमध्ये कामकाज चालते. त्यामध्ये अतिरिक्त दोन तास वाढ करण्यात येत असल्याचे नोटिशीमध्ये नमूद केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडत असून, कामाचा मोबदलाही मिळणार नसल्याने ते या निर्णयास विरोध करीत आहेत.
उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्नसराईमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘विंडो’ तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत दोन तासांनी वाढ केली आहे. दोन ‘शिफ्ट’मध्ये कामांच्या वेळेत केलेली वाढ ही हंगामी आहे, असे स्वारगेट स्टॅंड प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाल्यांची नोंदणी डिसेंबरपर्यंत करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय फेरीवाला कायदा आणि राज्य सरकारच्या पथ विक्रेता अधिनियमातील तरतुदींनुसार डिसेंबरअखेरपर्यंत फेरीवाले/पथारी व्यावसायिकांची नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सरकारने सर्व महापालिकांना दिले आहेत. पुणे महापालिकेने यापूर्वीच फेरीवाल्यांच्या सर्वेक्षण-नोंदणी आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली असल्याने त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय फेरीवाला कायदा २०१४ च्या अनुषंगाने राज्य सरकारने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पथ विक्रेता अधिनियम प्रसिद्ध केले. त्यानुसार, महापालिकांनी फेरीवाले/पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण पूर्ण करणे अपेक्षित होते. काही महापालिकांनी सर्वेक्षण-नोंदणी पूर्ण केली असल्याने त्यांनी अधिनियमातील तरतुदींनुसार उर्वरित प्रक्रिया करणे आवश्यक होते. अनेक महापालिकांकडून त्याबाबत कार्यवाही होत नसल्याचे नुकतेच केंद्रीय आणि राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे, फेरीवाल्यांच्या सर्वेक्षण-नोंदणीपासून त्यांना प्रमाणपत्र देण्यापर्यंत विविध गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार, ३० डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण-नोंदणी, फेरीवाल्यांची यादी आणि त्यांना ओळखपत्र-प्रमाणपत्र वाटप असा सर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
पुणे महापालिकेसह राज्यातील इतर काही महापालिकांमध्ये सर्वेक्षण, नोंदणीचे काम यापूर्वी पूर्ण झाले आहे. अशा महापालिका आणि नगरपालिकांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेने निश्चित केलेल्या २८८ जागांवर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जाणीव संघटनेचे कार्यवाह आणि फेरीवाला समितीचे सदस्य संजय शंके यांनी केली आहे.

फेरीवाला समितीची बैठकच नाही
शहर फेरीवाला समितीची बैठक दर तीन महिन्यांतून एकदा होणे अपेक्षित असताना, गेल्या सहा महिन्यांमध्ये समितीची एकही बैठक झालेली नाही. यापूर्वीची बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. त्यानंतर, निवडणुकांमुळे बैठक घेतली गेली नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी आता निवडणुका होऊन तीन महिने उलटून गेले असल्याने ही बैठक का घेतली जात नाही, अशी विचारणा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायाच्या प्रतीक्षेत महिला

0
0


पुणे : महिलांच्या बाजूने अनेक कायदे असले तरी प्रत्यक्षात कोर्टात न्याय मिळविताना महिलांनाही तारीख पे तारीखला सामोरे जावे लागते. वर्षानुवर्षे कोर्टात न्याय मिळावा म्हणून कोर्टाचे खेटे घालावे लागतात. पुणे जिल्ह्यातील विविध कोर्टांमध्ये महिलांनी दाखल केलेल्या दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या तब्बल २३ हजार १९६ केसेस प्रलंबित आहेत.

देशभरात महिलांकडून दाखल दिवाणी स्वरूपाच्या १२ लाख ८०,८०६; तर फौजदारी १२ लाख ४५,२७१ अशा मिळून एकूण २५ लाख २६,०७४ केसेस प्रलंबित आहेत. यात महाराष्ट्रातील दिवाणी स्वरूपाच्या १ लाख ७१,३९१ फौजदारी १ लाख २९,४९९ अशा मिळून एकूण तीन लाख ,८९० केसेसचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात महिलांनी दाखल केलेले एकूण २३ हजार १९६ केसेस प्रलंबित आहेत.

पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ वकील अॅड. गिरीश शेडगे यांनी, दिवाणी कोर्टात महिलांकडून दावा दाखल करण्यात आला आहे ,म्हणून तो तातडीने निकाली काढण्याची कोणती न्याययंत्रणा नसल्याचे सांगितले. इतर पक्षकारांप्रमाणेच महिलांनाही दिवाणी स्वरूपाच्या केसेसमध्ये निकाल मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत असल्याचे सांगितले. दिवाणी कोर्टात बहिणींनी वारसाहक्कासाठी भावांविरुद्ध दाखल केलेले दावे, मिळकत वाटपाचे दावे, वारसाहक्काचे दावे अशा प्रकारचे दावे महिलांकडून दाखल करण्यात येतात. कोर्टाकडून देण्यात आलेल्या हुकूमाची प्रकिया तहलिसदारांकडे गेल्यावरही पक्षकारांनाही पाच वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागते. कोर्टाच्या हुकूमाची ताबडतोब अंमलबजावणी होत नाही. दिवाणी कोर्टात दाखल केलेल्या पक्षकारांना किमान १५ वर्षे तरी न्याय मिळण्यासाठी वाट पाहावी लागते, त्याला महिलाही अपवाद नाहीत, असे अॅड. शेडगे यांनी सांगितले.
अॅड. वैशाली चांदणे यांनी, फौजदारी स्वरूपाच्या केसेसमध्ये महिलांनी दाखल केलेल्या केसेसमध्ये कोर्टात केस बोर्डावर येण्याच्या प्रक्रियेलाच सुरुवातीला बराच वेळ लागतो. तसेच त्यानंतर कोर्टाकडून महिलांना तारखांनाच वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसची वाढती संख्या, न्यायाधीशांची अपुरी संख्या, कोर्ट प्रक्रियेला होणारा उशीर यामुळे महिलांच्या केसेस प्रलंबित राहतात, असे अॅड. चांदणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’ला मानांकन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सीरीयल नंबर’ (आयएसएसएन) हा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या नामावलीत आता मसाप पत्रिकेचा समावेश झाला आहे. पत्रिकेत संशोधनपर लेखन करणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना या मानांकनामुळे फायदा होणार असून पत्रिकेचा वार्षिक टपाल खर्च ऐंशी हजार रुपयांनी वाचणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सीरीयल नंबर' (आयएसएसएन) हा क्रमांक प्राप्त झाला असून तो आयएसएसएन २४५६-६५६X असा आहे,’ अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
‘यापुढे हा क्रमांक मसाप पत्रिकेत मुखपृष्ठावर डाव्या कोपऱ्यात ठळक अक्षरात छापला जाणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रमाणपत्र मसापला प्राप्त होईल. या मानांकनामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेच्या नामावलीत मसाप पत्रिकेचा समावेश झाला आहे. त्यामुळे पत्रिकेत संशोधनपर लेखन करणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात पोहोचण्यास पत्रिकेचा मार्ग अधिक सुकर होईल. तसेच पत्रिका टपालाद्वारे पाठविण्याचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे,’ असे प्रा. जोशी यांनी सांगितले. हे मानांकन मिळविण्यासाठी पत्रिका संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे, डॉ. संदीप सांगळे, संदीप खाडे यांनी विशेष प्रयत्न केले.

मसाप पत्रिका महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातील सुमारे १३ हजार सभासदांना पाठवली जाते. यासाठी प्रत्येकी दोन रुपये टपाल खर्च येतो. आयएसएसएन मानांकनामुळे प्रत्येक अंकाच्या मागे ७५ पैशांची बचत होणार आहे. त्यामुळे एक वर्षांत ऐंशी हजार रुपयांची बचत होणार आहे. हा निधी साहित्य परिषदेला इतर प्रकल्पांसाठी वापरता येणार आहे.
- सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष, साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. राम साठ्ये यांना केशवराव दाते पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे विविध पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाले. नटवर्य केशवराव दाते स्मृती उत्कृष्ट गद्यनट पुरस्कार डॉ. राम साठ्ये यांना जाहीर झाला आहे. साठे यांच्यासह विविध कलाकारांना तसेच पडद्यामागील कलाकारांना पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा ३९ वा वर्धापनदिन २५ मे रोजी असून त्याच दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. महापौर मुक्ता टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, नगरसेवक दीपक मानकर आणि नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी होणाऱ्या जल्लोष या कार्यक्रमात श्रद्धा सबनीस, स्वामिनी कुलकर्णी, अनुजा शिंदे, सागर पवार, महेंद्र कांबळे तसेच ‘नटरंग कला अकादमी’चे कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख व प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी दिली.

पुरस्कारांचे मानकरी
मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार पुरस्कार - डॉ. विश्वास मेहेंदळे, भार्गवराम आचरेकर स्मृतीप्रित्यर्थ रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवेबद्दल सन्मान - मधू गायकवाड, संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल माणिक वर्मा पुरस्कार - अशोक काळे, ५० वर्षांहून अधिक नाट्यसेवेसाठी बबनराव गोखले पुरस्कार- चंद्रकांत काळे, सुनील तारे स्मृती पुरस्कार - सिद्धेश्वर झाडबुके, गो. रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्कार - वीरेंद्र विसाळ, मधू कडू स्मृती लोकनाट्यातील कलाकार पुरस्कार - संतोष पवार, यशवंत दत्त स्मृती पुरस्कार - चैतन्य देशमुख, पार्श्वनाथ आळतेकर स्मृती उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक - दीपक रेगे, पडद्यामागील कलाकारासाठी छोटा गंधर्व पुरस्कार - सुरेंद्र गोखले, रमाबाई गडकरी स्मृती दिवंगत कलाकार पत्नीस पुरस्कार - प्रतिमा रवींद्र काळेले, दीवाकर स्मृती संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार - नंदकुमार भांडवलकर, वसंतराव देशपांडे स्मृती उदयोन्मुख संगीत कलाकार - श्रद्धा सबनीस, वसंत शिंदे स्मृती रंगभूमी, चित्रपटातील विनोदी कलाकार -आशुतोष वाडेकर, राम नगरकर स्मृती लोकनाट्यातील विनोदी कलावंत पुरस्कार - पराग चौधरी, परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार - राजेश बारबोले, गंगाधरपंत लोंढे स्मृती पुरस्कार - डॉ. संजीवकुमार पाटील, मनोरमा नातू नाट्यलेखन पुरस्कार - आशुतोष पोतदार, नेपथ्यकार पु. श्री. काळे स्मृती पुरस्कार - रवी पाटील, उत्कृष्ट अभिनय (राज्यनाट्य स्पर्धा) - जयदीप मुजुमदार, उत्कृष्ट दिग्दर्शक (राज्यनाट्य स्पर्धा) - सुबोध पंडे, उत्कृष्ट नाट्य निर्मिती (राज्यनाट्य स्पर्धा) - प्रयोग, पुणे, उत्कृष्ट अभिनय स्त्री (राज्यनाट्य स्पर्धा) - शर्वरी जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संग्रहालयाच्या भेटीतून जागले इतिहासाचे भान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इतिहासकालीन वाद्ये, दरवाजे, शस्त्रे, भारतीय नाणी, ताम्रपट, खेळाची साधने, भांडी, देव-देवता यांच्या मूर्ती असा ऐतिहासिक ठेवा त्यांचे इतिहासाचे भान वाढविणारा ठरला. शालेय मुला-मुलींनी या वस्तूंना पाहत आपल्यातील कुतूहल जागविले. विविध वस्तूंच्या निमित्ताने प्रश्नांतून चौकस बुद्धीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. ही सहल विद्यार्थ्यांचे कुतूहल जागविणारी होती.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे जागतिक संग्रहालय दिनानिमित्त मुलांसाठी राजा दिनकर केळकर संग्रहालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा संस्कार केंद्रातील आणि परिसरातील ५० विद्यार्थ्यांनी संग्रहालयाला भेट देऊन इतिहासाचे भान वाढविण्याचा प्रयत्न केला. संग्रहालयाचे व्यवस्थापक सुधन्वा रानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना माहिती दिली. रानडे यांचा सन्मान ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे आणि शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते झाला. मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, अनिल दिवाणजी, हेमंत तिरळे, मधुकर कदम, नरेंद्र व्यास उपस्थित होते.
‘संग्रहालय हे आपले ज्ञान वाढविणारे एक शास्त्र आहे. राज्य, समाज यांचा इतिहास संग्रहालयामध्ये पाहायला मिळतो. विविध ठिकाणची संग्रहालये ही त्या देशाचा आणि समाजाचा ठेवा असतात. व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा छंदाच्या आहारी जाऊन स्वतःला समर्पित करता यायला हवे,’ असे सांगून बलकवडे म्हणाले, ‘कोणत्याही राजा-महाराजाने नव्हे; तर सामान्य माणसाने राजा दिनकर केळकर संग्रहालय निर्माण केले आहे. अनेक प्राचीन वस्तूंचा संग्रह यामध्ये पाहायला मिळतो. भारतातील अनेक ठिकाणी खेडोपाडी फिरून दिनकर केळकर यांनी विविध ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तू जमा केल्या आहेत. परिस्थिती नसतानादेखील केवळ छंदापोटी त्यांनी हे संग्रहालय साकार केले. भारताची कित्येक वर्षांपूर्वीची परंपरा आणि इतिहास आपल्याला या संग्रहालयात पाहायला मिळतो. केळकर संग्रहालय हे भारताचे वैभव आहे.’
‘संग्रहालयांमुळे देशाची समृद्धी आणि इतिहास आपल्याला कळतो. दोनशे ते चारशे वर्षांपूर्वी लोकांची जीवनपद्धती कशी होती, याची माहिती संग्रहालयातील विविध वस्तूंच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये आपले योगदान द्यायला हवे,’ असे खटावकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अपंग कल्याण’च्या आदेशाला हरताळ

0
0

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र अद्याप नाहीच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रत्येक तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्र वितरित करावे, असा आदेश महिन्यापूर्वी अपंग कल्याण आयुक्तालयाने एप्रिलमध्ये ससून रुग्णालयाला दिले हाते. मात्र, अद्याप ससून रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी न केल्याने हा आदेश कागदावरच राहिला आहे.
अपंगाचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आखल्या असून, अपंग व्यक्तींना नोकरी, शिक्षणामध्ये तीन टक्के जागा राखीव अशा सवलती देण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाण चाळीस टक्के असावे, अशी अट आहे. पण अपंगत्वाचे प्रमाण कसे मोजावे, याबाबत डॉक्‍टरांची भिन्न मते असल्याने एकाच व्यक्तीच्या अपंगत्वाची टक्केवारी दोन डॉक्‍टर वेगळी सांगतात. संबंधित व्यक्ती डॉक्‍टरांचे परिचित असतील, तर काही घटनांमध्ये अपंगत्वाची टक्केवारी वाढविण्यात येते,डॉक्‍टर चिरीमिरी घेऊन बोगस अपंगत्वाचे प्रमाण देतात, अशाही तक्रारी आहेत. अशा प्रकारे अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांव्दारे शासकीय सवलती लाटल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्यामुळे शास्त्रीय पध्दतीने अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाण अचूक मोजमाप करणाऱ्या ‘सदारेम’ या सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आला आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये अंपगाची पूर्ण माहिती दिल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण किती आहे, याची अचूक शास्त्रीय पध्दतीने टक्केवारी नमूद केलेले कम्प्युटराइज्ड प्रमाणपत्र दिले जाते. अशा प्रमाणपत्रामुळे बनावट प्रकार उघडकीस येत असल्याने प्रणालीद्वारे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जिल्ह्यामध्ये फक्त एकाच शासकीय रुग्णालयामध्ये हे प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात अपंगांची वेळेवर तपासणी केली जात नाही. कम्प्युटर प्रणालीबंद असल्याचे सांगून अपंगाना वारंवार हेलपाटे घालावयास लावण्याचे प्रकार सुरू आहेत. या रुग्णालयामध्ये अपंगांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. एकाच रुग्णालयामध्ये प्रमाणापत्रासाठी गर्दी होते. संपूर्ण जिल्ह्यातील अपंगांना लांबून ससून रुग्णालयात यावे लागते.

आयुक्तांचे आदेश टोलावले
याबाबत अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना अपंगांची गैरसोय कमी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयामधून अपंगात्वाचे प्रमाणपत्र द्यावे; अपंग व्यक्तींना होणारा त्रास, हेलपाटे, अपंग प्रमाणपत्र वितरणातील नियोजनाच्या अभाव, सर्व्हर बंद असणे, चौकशी केंद्र नसणे, अपंग व्यक्तींच्या शौचालय व अन्य सुविधा नसणे, इत्यादी त्रासापासून अपंगाची मुक्तता करावी असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला ससून रुग्णालयाने या आदेशाला केराची टोपी दाखवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सध्याचे सत्ताधारी हिंसाचाराचे पुजारी

0
0

कन्हैय्या कुमार करणार पुण्यातून विचारमंथनाची सुरूवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सध्याचे सत्ताधारी हिंसेचे समर्थक असून, त्यांची विचारसरणी आणि लोकशाहीची तत्त्वे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे संविधानाचे संरक्षण आणि लोकशाहीच्या बचावासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य चळवळीच्या उठावाला पुण्यातून सुरुवात झाली होती. त्यामुळे आम्हीही पुण्यापासूनच ‘संविधान की संघ’ या विषयावरील विचारमंथनाचा प्रारंभ करणार आहोत. पुण्यानंतर देशातील अन्य शहरांमध्ये सभा घेतल्या जाणार आहेत,’ असे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने शुक्रवारी सांगितले.
कन्हैया कुमार, शेहला रशीद, जिग्नेश मेवाणी आणि तेहसीन पुनावाला हे विद्यार्थी नेते एकत्र आले असून, त्यांची जाहीर सभा २० मे रोजी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे. या सभेमागील भूमिका त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कन्हैया कुमार म्हणाले, ‘देशामध्ये हिंसा वाढली की लोकशाही धोक्यात येते. सध्या सैनिकांच्या हत्या, गायींच्या रक्षणाच्या नावाखाली हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसोबत भेदभाव आणि आर्थिक शोषण सुरू आहे. आयआयटी आणि आयआयएममध्ये शिक्षण घेऊनही तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. मनुस्मृतीचे उपासक देशात सत्तेवर असतील, तर समाजामध्ये तेढ निर्माण होते. एकीकडे संविधान तर दुसरीकडे मनुस्मृती आहे. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येत आहे. याविरूद्ध आवाज उठविण्यात येणार आहे.’
सरकारकडून शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हिंसेद्वारे धर्म, भाषा, जाती आधारावर दुफळी माजविण्यात येत आहे, असे सांगून कन्हैया कुमार म्हणाले, ‘सत्ताधारी हे गुलामीचे समर्थक आहेत. आम्ही संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आलो आहोत. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. सध्या सामाजिक आंदोलन आणि विरोधक नसल्याने सत्ताधाऱ्यांवर निर्बंध नाहीत. संसदेमध्ये तर विरोधी पक्ष नेताही नाही. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारत राहणार आहोत.’
देशावर ‘गुजरात मॉडेल’ थोपविले जात आल्याचा आरोप करून मेवाणी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर लव्हजिहाद, घरवापसी आणि गो माता हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करण्यात येत आहेत. दलित आणि मुस्लिमांना त्रास देण्यात येत आहे. सब का साथ आणि सबका विकास ही फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, दलित आणि मुस्लिम भयग्रस्त आहेत. संविधान बाजूला ठेवून ते मनुस्मृतीचे पालन करीत आहेत. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आंदोलन उभारणार आहोत.’ ‘इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) हॅक करण्यात येतात; त्यावर चर्चा केली जात नाही. मोदी यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे,’ असा आरोप पुनावाला यांनी केला.

काश्मीर प्रश्न जाणीवपूर्वक चिघळविण्यात येत आहे. त्याविरोधात आम्ही प्रश्न विचारणार आहोत. अँटि रोमिओ पथकाची स्थापना करून प्रेमाचे राजकारण करण्यात येत आहे.
शेहला रशीद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगडींमुळेच समजला बलाढ्य शत्रू

0
0

कादंबरीकार विश्वास पाटील यांचे गौरवोद् गार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आता सगळेच बोलू लागले आहेत; पण त्यांच्याविषयी कोणी बोलत नव्हते अशा काळात सेतुमाधवराव पगडी ठसठशीत संशोधनातून बोलत राहिले. याच संशोधनातून त्यांनी आपल्यापुढे साधनसामग्री ठेवली. पगडी यांनी केलेल्या संशोधनामुळेच शत्रू किती बलाढ्य होता, हे उभ्या महाराष्ट्राला समजले,’ असे मत कादंबरीकार आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मराठी साहित्य परिषद, तेलंगण यांच्यातर्फे सेतुमाधवराव पगडी यांच्या पाच मराठी खंडांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवधर, आनंद लाटकर, प्राचार्य सुरेश कुलकर्णी आणि प्रा. मीना देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘जाडजूड ग्रंथ प्रसिद्ध होण्याचे योग कमी झाले आहेत; कारण संशोधन करून लिहिणारे हात कमी झाले आहेत,’ अशी टिप्पणी पाटील यांनी केली. ‘संशोधनातून पुढे आलेली माहिती हाताशी नसेल तर, साहित्यनिर्मिती होत नाही. पगडींमुळेच मी पानिपत आणि संभाजी या कादंबऱ्या लिहू शकलो. औरंगजेबने भीमेच्या काठी केलेले बांधकाम आज तीनशे वर्षांनंतरही टिकून आहे. अनेक पूर येऊन गेले, पण बांधकाम ढासळले नाही. शत्रूचे हे आकलन पगडी यांना झाले होते. त्याउलट आज जिल्हा परिषदेने बांधलेल्या शाळा पावसाळ्यात गळू लागतात,’ अशा मार्मिक शब्दांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. पगडी यांच्या कन्या अनुराधा ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले.
पगडी यांचे चिरंजीव अनिल पगडी तसेच डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. राजा दीक्षित आदींचा सत्कार करण्यात आला. जयंत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद देशमुख यांनी आभार मानले.

इतिहास हा विषय नाजूक आहे. तो जपून सांगावा लागतो. सेतुमाधवराव पगडी यांनी जे महत्त्वाचे तेवढेच सांगितले. कमी नाही आणि जास्तही नाही, ही शैली त्यांनी विकसित केली होती. इतिहासाचे लेखक हे स्वत: वर्तमानकाळात जगत नाहीत. त्यामुळे ते आणि वाचक यांमध्ये दुरावा निर्माण होतो. पगडी हे मात्र वर्तमानकाळात जगून इतिहासाचे संशोधन करणारे लेखक होते.
- डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक

‘सेतुमाधवरावांना भेटा’
‘एका मंत्रिमहोदयांना शिवाजी महाराजांवर भाषण द्यायचे होते. तेव्हा सेतुमाधवराव पगडी उपसचिव म्हणून कार्यरत होते. महाराजांविषयी भाषण लिहून द्या, असे पगडी यांना सांगण्यात आले. मंत्र्यांचे भाषण चांगले झाले. प्रतिसाद चांगला मिळाल्याने मंत्र्यांनी पगडी यांना बोलावून घेतले. तुम्ही लिहिलेले भाषण छान होते. सेतुमाधवराव पगडी नावाचे एक लेखक आणि संशोधक आहेत. अधिक अभ्यासासाठी त्यांना भेटा, असे मंत्रिमहोदयांनी पगडी यांना सांगितले आणि पगडी हसत बाहेर आले,’ हा किस्सा पाटील यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत सांगताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा हजारांना चावा

0
0

शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या होतेय गंभीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या वर्षभरात साडेसतरा हजार पुणेकरांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने पालिकेतील सर्व हॉस्पिटलमधील नर्सना ‘इम्युनोग्लोबिन इंजेक्शन’ देण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ही लस पालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत दिली जात असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येला आळा घालण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे ठोस अशी उपाययोजना नसल्याने तोडगा निघत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र त्यानंतरही या समस्येवर तोडगा काढण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे. २०१६-१७ या वर्षात शहरातील १७ हजार ४८५ नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्याचे पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना प्रशासनाने हा खुलासा केला आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत शस्त्रक्रिया आणि लसीकरण केले जाते. शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांना चार दिवसांमध्ये ज्या भागातून पकडले जाते, तेथेच सोडण्यात येते. वर्षभरात भटक्या कुत्र्यांवर पालिकेने ५७.६२ लाख रुपयांचा खर्च केला आहे. या खर्चातून ९ हजार ७०२ कुत्र्यांची नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. कुत्र्यांच्या त्रासाबाबत प्रशासन काय करते, या प्रश्नाला उत्तर देताना कुत्रे चावल्यानंतरच्या इंजेक्शनचे प्रशिक्षण सर्व नर्सना देण्यात आले आहे. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ती लस मोफत दिली जात असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

प्रशासनही उदासीन
शहरात गेल्या काही वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असला तरी प्रशासनाने कोर्टात तसेच केंद्र सरकारकडे नागरिकांची कोणतीही बाजू मांडली नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या ३,१७५ असून नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना कुत्रा पाळण्याची परवानगी दिली जाते. जे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे उत्तरही प्रशासनाने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images