Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

$
0
0

म.टा. पुणे : प्रतिनिधी

पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी रेसकोर्सवर वॉकिंगला जात असताना आठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेच रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलबाहेर रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे.

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्येही त्यांनी नगरसेवकपद भुषवले. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. रिपाइंच्या शहराध्यक्षपदावरही ते होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस वेवर बसला अपघात; २६ गंभीर जखमी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळील पुलावर खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या अपघातात २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

लोणावळ्याजवळच्या पुलावर खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात एकूण ५४ प्रवासी जखमी झाले आहेत. या पैकी २६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




जखमींमध्ये ८ ते १० वर्षांच्या चार, पाच मुलांचा समावेश आहे. जखमींवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस मुंबईहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जाणार होती.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणा-या एका २४ वर्षीय तरुणाने रहाटणी येथे रहात्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहटणी येथील वर्धमान हाईट्स येथे राहणारा निनाद देशभूषण पाटील वर्धमान याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारली. त्याला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निनाद याने सुसाईड नोट लिहली आहे. मात्र यात त्याने मी स्वइच्छेने आत्महत्या करत असून यामध्ये माझ्या वडीलांना व आईला दोषी धरु नये असे सांगितले आहे. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्याप कळू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजावरुन ही आत्महत्या नैराश्यातून केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
वाकड पोलीस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतुल तापकीर आत्महत्याप्रकरणी पत्नीला अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'ढोल-ताशा' या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी अतुल तापकीरची पत्नी आणि आणखी तिघांना पोलिसांनी आज अटक केली आहे. पोलिसांनी अतुल तापकीर यांची पत्नी प्रियंका, तिचा मावसभाऊ आणि दोन मानलेल्या भावांना अटक केली असून या सर्वांना आज पुणे कोर्टात हजर करणार आहेत.

अतुल तापकीर यांनी शनिवारी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल प्रेसिंडेटमध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहून मनातील खदखद व्यक्त करीत विष प्राशन करून आपले जीवन संपवले होते. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये पत्नीवर अनेक आरोप केले होते. ‘ढोल ताशा’ सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.

अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनंतर पत्नी प्रियंकावर डेक्कन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज ती स्वत:हून डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. यानंतर तिच्यासह चार जणांना पोलिसांनी आज अटक केली. प्रियंकासह चार जणांना आज पुणे कोर्टात हजर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीच्या बहाण्याने ६७ जणांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुंतवणुकीवर एका वर्षाला साडेअकरा टक्के व्याज किंवा पैशाच्या बदल्यात प्लॉट देण्याच्या आमिषाने ६७ जणांची तब्बल एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅँड स्ट्रक्चर्स प्रा. लि.च्या संचालकांवर हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मैत्रेय ग्रुपमध्ये तब्बल पाच हजार जणांनी गुंतवणूक केल्याची यादी पोलिसांकडे आहे. त्यामुळे हा फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत मनीषा शिंदे (वय ४४, रा. गोंधळेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जनार्दन अरविंद परुळेकर, वर्षा मधुसुदन सतपाळकर या दोघांसह मैत्रेय ग्रुपच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मैत्रेय ग्रुपच्या मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. या कंपनीने रियल इस्टेट या योजनेखाली ऑक्टोबर २०१० मध्ये ठरावीक वर्षासाठी रक्कम गुंतवणूक करा, त्याबदल्यात प्लॉट देणार किंवा साडेअकरा टक्के व्याजदाराने पैसे परत देणार, असे आमिष दाखविले. यामधील बहुतांश गुंतवणुकदार महिला आहेत. त्यात कमीत कमी १० हजारापासून ते १० लाखापेक्षा जास्त रकमेची गुंतवणुक केली आहे. या योजनोचा कालावधी पूर्ण होण्यास आल्यानंतर गुंतवणुकदारांनी याबद्दल चौकशी सुरू केली, त्यावेळी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.
शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये ६७ जणांची नावे आहेत. त्यात बहुतांश महिला असून, पोलिसांना पाच हजार गुंतवणुकदारांची यादी मिळालेली आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे हडपसर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सहायक निरीक्षक एस. व्ही. उमरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षिसपत्रावर तीन टक्क आकारणार मुद्रांकशुल्क

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण असलेल्या कुटुंबीयांना किंवा पूर्वज-वंशजांना मालमत्ता दान करण्यावर बाजारभावाच्या तीन टक्के दराने मुद्रांकशुल्क भरावे लागणार आहे. बक्षिसपत्रासंबंधीच्या (गिफ्ट) दस्त नोंदणीवर हे शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. तसेच, स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) नागरी भागात पाच टक्के; तर ग्रामीण भागात चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बक्षीसपत्रासंबंधीच्या (गिफ्ट) दस्तनोंदणीबाबत मालमत्ता दात्याचा पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण असलेल्या कुटुंब सदस्याला किंवा दात्याच्या वंशपरंपरागत पूर्वजाला किंवा वंशजाला मालमत्ता दान केली असेल, तर अशा मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. महानगरपालिका व त्यात संलग्न कँटोन्मेंट, नगरपरिषद किंवा नगरपंचायत हद्दीत किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रात किंवा वार्षिक मूल्यदर तक्त्यातील नमूद प्रभावक्षेत्र यांच्या हद्दीत बाजारमूल्याच्या सरसकट पाच टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.

१०० रुपयांवरील मुद्रांक ई-एसबीटीआरद्वारे
मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त नोंदणी करण्यासाठी सेवाशुल्क आदी बाबींद्वारे सरकारकडे महसुलाची रक्कम जमा होते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रासप्रणाली अंतर्गत ई-एसबीटीआरद्वारे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी किमान मर्यादा पाच हजार रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. डिजिटल इंडिया तसेच इझ ऑफ डुईंग बिझनेसची संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तलाठ्यांना मिळाला ३२ वर्षांनंतर न्याय

$
0
0



म. टा. प्रति​निधी, पुणे
तलाठी पदावर नेमणुका झाल्यानंतर आलेल्या निनावी तक्रारीवरून ३० वर्षे चौकशीचे फेरे झाले. अखेर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) प्रकरण गेले आणि तब्बल ३२ वर्षांनी १२ तलाठ्यांना न्याय मिळाला; पण त्यातील दोन जण मृत, सहा सेवानिवृत्त, एक निलंबित झाले आहेत. तसेच, एकाची खातेअंतर्गत चौकशी सुरू असून, दोन तलाठी पदावरून मंडल अधिकारी पदावर पोहोचले आहेत.
या नियुक्तीच्या प्रकरणाला १९८४ मध्ये सुरुवात झाली. बारामतीचे तत्कालीन प्रांताधिकारी बी. डी. बोराडे यांनी १७ तलाठ्यांची नियुक्ती केली होती. त्यावर एक निनावी तक्रार आली. त्यावर १९९३ मध्ये चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीचे फेरे होत राहिले, तरीही निर्णय झाला नाही. त्यानंतर १२ जणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) धाव घेतली. ‘मॅट’ने २०१६ मध्ये सेवा नियमित करण्याचा निर्णय दिला. तोच निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला. त्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी या १२ तलाठ्यांची सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ३२ वर्षांनी या तलाठ्यांना अखेर न्याय मिळाला आहे.
या तलाठ्यांपैकी दोन जणांचे निधन झाले आहे; तर सहाजण सेवानिवृत्त झाले आहेत. एकजण निलंबित असून, एकाची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे; तसेच दोन जणांना मंडल अधिकारी या पदावर पदान्नती मिळाली असून, ते सेवेत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्फोसिस’मधील अभियंत्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षांच्या अभियंत्याने नैराश्यातून इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रहाटणी येथे मंगळवारी (१६ मे) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी युवकाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

निनाद देशभूषण पाटील (रा. वर्धमान हाईट्स, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद याने राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, माझ्या आत्महत्येत कोणाचा दोष नाही. कुटुंबासह कोणालाच यात दोषी धरू नये अशा आशयाचा मजकूर निनाद याने लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याचे समजते.

पाटील कुटुंबीय मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. निनाद याला दोन विवाहित बहिणी असून, त्याचे आई-वडिल निवृत्त झाल्यावर रहाटणी येथे राहत होते. मंगळवारी सकाळी निनाद हा इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेला आणि त्याने खाली उडी मारली.

जोरात आवाज झाल्याने निनाद याच्या कुटुंबाने त्याला महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच निनाद याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निनाद यने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनासाठी सहा निमंत्रणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुढील वर्षी होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यातून व राज्याबाहेरून एकूण सहा निमंत्रणे आली आहेत. अमरावती, शिरूर, तळोधी (चंद्रपूर), हिवरा (बुलढाणा) यांसह बडोदा आणि राजधानी दिल्लीचेही यंदा निमंत्रण आले आहे.

९१व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रणे पाठवण्याकरिता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने १५ मेपर्यंत मुदत दिली होती. मुदतीअखेर संस्थेकडे सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. त्यामध्ये पुण्यात कार्यरत असणाऱ्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती या दोन ठिकाणांसाठी निमंत्रणे पाठवली आहेत. बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषदेनेही यंदाचे संमेलन बडोद्यात व्हावे, यासाठी निमंत्रण पाठवले आहे. नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी या स्थळासाठी निमंत्रण आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाकडून साहित्य संमेलनासाठी निमंत्रण आहे. याशिवाय, दिल्लीत कार्यरत असणाऱ्या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने संमेलनासाठी निमंत्रण दिले आहे. या सहा ठिकाणांपैकी लवकरच एकाची निवड महामंडळाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या ४ जून रोजी नागपूर येथे महामंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संमेलनाच्या जागानिश्चितीसाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक, साहित्य महामंडळाचे चार, मराठवाडा साहित्य परिषदेचा एक आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा एक अशा सात सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

शिरूर, बडोदा आणि दिल्ली ही तीन निमंत्रणे सोडली, तर इतर तिन्ही निमंत्रणे विदर्भातून आली आहेत. शिवाय, यंदा महामंडळही नागपुरात आहे. त्यामुळे, विदर्भातील एखाद्या ठिकाणाची निवड होणार की काय, अशी चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. सध्या मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ‘मसाप’कडून वारंवार राज्य सरकारच्या साह्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचे संमेलन दिल्लीला झाले, तर मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरू शकते. १९५४मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झाले. त्यानंतर दिल्लीत कधीही संमेलन झालेले नाही. गेल्या सात ते आठ वर्षांच्या काळात पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणांचीच संमेलनासाठी निवड करण्यात येत आहे. इंदूर येथील एकमेव संमेलन वगळता बृहन्महाराष्ट्रातही संमेलन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दिल्लीत संमेलन व्हावे, अशी इच्छा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. बडोदेकरही या स्पर्धेत पुढे असल्याचे समजते आहे.


१५ मे अखेरपर्यंत एकूण सहा ठिकाणांहून आमंत्रणे आली आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या बैठकीत संमेलनस्थळाच्या निश्चितीसाठी समिती नेमण्यात येईल. त्या समितीद्वारे निमंत्रणे आलेल्या स्थळांची छाननी केली जाईल, त्यातून योग्य वाटणाऱ्या काही ठिकाणांना समिती प्रत्यक्ष भेट देईल, त्यानंतरच संमेलनाचे ठिकाण निश्चित केले जाईल.

श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक देणींसाठी ‘एचए’ जागा विकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आर्थिक देणी फेडण्यासाठी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीची जागा विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स’ यांनी २८ डिसेंबरला कंपनी चालविण्यास घेतली होती. त्यानंतर कंपनीची लाएबिलिटी फेडण्यासाठी जागा विकण्याचा निर्णय केमिकल अँड फर्टिलायझर कमिटीने घेतला आहे.

हिंदुस्थान अँटी बायोटिक्स कंपनी (एचए) मधील कामगारांचे वेतन गेले अनेक वर्ष थकित आहे. कंपनी आजारी पडल्याची अवस्था निर्माण झाली होती. देशातील एकमेव कंपनीतील कामगारांच्या पगार, बँकांची देणी तसेच अन्य आर्थिक बाबींचा निपटारा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे एचए कंपनीने जी जागा विकायचा निर्णय घेतला आहे. ती जागा केवळ केंद्र किंवा राज्य सरकारी कंपन्या किंवा संस्थाच विकत घेऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपरे गावाचेही आता बहिष्कारास्त्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १९ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतींनी यापूर्वी बहिष्कार टाकला असताना, अर्ज छाननीच्या दिवशी कोपरे गावाच्या ग्रामस्थांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक, उंड्री, पिसोळी, नांदेड आणि नऱ्हे या ग्रामपंचायतींमध्येच निवडणुका होणार आहेत. अर्ज माघारीसाठी १७ मेपर्यंत मुदत असून, त्यानंतर या गावांमध्ये तरी निवडणुका होणार की नाहीत, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, सोमवारी अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये ​जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी प्राप्त झालेल्या ४७६ अर्जांपैकी छाननीमध्ये तीन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे ४७३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पालिकेत करण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यापैकी २२ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे शहरालगतच्या १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातील दहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. छाननीच्यावेळी कोपरे गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता आंबेगाव बुद्रुक, उंड्री, पिसोळी, नांदेड आणि नऱ्हे या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.

‘केशवनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरले आहेत. नियमानुसार आवश्यक असलेला कोरम पूर्ण न झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक होणे शक्य नाही.’ असे हवेलीचे नायब तहसीलदार डॉ. सुनिल शिर्के यांनी सांगितले.

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेल्या २२पैकी हवेली तालुक्यातील सर्वाधिक १६ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, उत्तमनगर, उंड्री, कोंढवे धावडे, किरकटवाडी, कोपरे, खडकवासला, पिसोळी, लोहगाव, मांजरी बुद्रुक, शिवणे, साडेसतरानळी, धायरी, नऱ्हे आणि नांदेड यांचा समावेश आहे. याशिवाय पुणे शहरालगत असलेली केशवनगर ग्रामपंचायत; तसेच मुळशी तालुक्यातील सूस आणि म्हाळुंगे या ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील ३५२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार असून, त्यासाठी ३११ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १२ अर्ज अवैध ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढ सुनावणीत पालकांच्या पदरी निराशा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांनी केलेल्या अवाजवी शुल्कवाढीवर तोडगा काढण्यासाठी विभागीय शुल्क नियामक समितीच्या घेतलेल्या सुनावणीत तक्रारदार पालकांच्या तोंडाला पुन्हा मंगळवारी पाने पुसण्यात आली. या बैठकीत केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याव्यतिरिक्त काहीच झाले नसून, शाळांना त्यांची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला. तसेच, पालकांच्या तक्रारीच ऐकून घेण्यात आल्या नाही. त्यामुळे या सुनावणींचा फायदा तरी काय, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.
पुण्यातील अठरा खासगी शाळांनी त्यांचे शुल्क बेकायदेशीपणे वाढविल्याची तक्रार पालकांनी केली होती. या तक्रारी निकाली काढण्यासाठी विभागीय शुल्क नियामक समितीने तक्रारदार पालक, पालक संघटनांचे प्रतिनिधी आणि शाळांचे प्रतिनिधी यांची आझाम कॅम्पसमध्ये सुनावणी घेतली. मात्र, या बैठकीत समितीने पालक आणि शाळांच्या प्रतिनिधींकडून कागदपत्रांची जुळवाजु‍ळव करण्यातच रस दाखवला. त्यातही शाळांच्या प्रतिनिधींकडे कागदपत्रेच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे याविरोधात ठोस कारवाई न करता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी समितीने त्यांना मुदत दिली.
या बैठकीत समितीच्या सदस्यांनी पालक आणि शाळांच्या प्रतिनिधींची बाजू ऐकणे अपेक्षित होते. मात्र, पुराव्यानिशी आलेल्या पालकांना बोलूच दिले नाही आणि शाळांच्या प्रतिनिधींचे बोलणे व मागणी ऐकून त्यांना अपेक्षेप्रमाणे सवलत दिली. प्रत्यक्ष समोरासमोर सुनावणी झालीच नाही. त्यामुळे या सुनावणींचा फायदा काहीच नाही, असा आरोप पालकांनी केला.

उर्वरित सुनावणी आज
दिवसभर चाललेल्या या बैठकीत पुण्याच्या सहा ते सात शाळांचे पालक व प्रतिनिधी उपस्थित होते. उर्वरित शाळांच्या तक्रारींची सुनावणी आज बुधवारी होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मुळे वाहतूक कर्मचारी त्रस्त

$
0
0

येरवडा : सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या अंतरात असलेले देशी आणि विदेशी दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश दारू आणि बियरच्या दुकानांना टाळे लागले आहे. परिणामी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे ड्रंक आणि ड्राइव्हच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. असे असतानाही ड्रंक अँड ड्राइव्हचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून आग्रह होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कारवाई होत आहे.

वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. पुणे जिल्ह्यातील सोळाशेपेक्षा जास्त दारूची दुकाने आणि हॉटेल्स कायमची बंद झाली आहेत. परिणामी ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेसही कमी झाल्या आहेत. परिणामी वाहतूक विभागाचा दर महिन्यात गोळा होणारा महसूल कमी झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी वाहतूक उपायुक्तांकडून रात्री उशिरापर्यंत थांबून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्याचा आग्रह वरिष्ठांकडून होत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्री थांबावे लागत आहे, अशी माहिती काही वाहतूक कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींची दखल तरी घ्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

कायद्याचे रक्षण आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवायची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्याबद्दल बारामतीकरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मिळण्यासाठी तक्रार केल्यानंतर संबंधित चौकशी अधिकारी वेळ नसल्याचे कारण देतात आणि तक्रारीची दखलही घेत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुंडांना पोलिसांचा दरारा वाटण्यापेक्षा सामान्य जनतेलाच पोलिसांची दहशत वाटते आहे. परिणामी तक्रारींची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अन्यायाची दाद मागण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवणे, गुंड, मवाली याच्याशी साटेलोटे असल्यास त्याच्या विरोधातील तक्रारी दाखल करून न घेणे, तक्रारदारावरच खोट्या गुन्ह्याची नोंद करणे अशा घटना समोर आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक किंवा सुशिक्षित नागरिक पोलिस निरीक्षक किंवा हवालदाराला काही सांगायला लागल्यास, तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, आम्हाला कायदा कळतो, फार बोलाल तर कोठडीत डांबू, अशी धमकीही काही वेळा देण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

काही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यास गेल्यानंतर संबंधित अधिकारी जागेवर दाखल नसल्याचे आढळून येते. अधिकारी केव्हा येईल याबाबत विचारणा केल्यास समाधानकारक उत्तरे देण्यात येत नाहीत. तक्रारीच्या तपासाचा पाठपुरावा करण्यास गेल्यानंतर तपास अधिकारी हजर नसल्याचे चित्रही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. तपास अधिकाऱ्याला वारंवार विचारणा केल्यावरही तपासातील प्रगती तक्रारदाराला सांगण्यास टाळाटाळ केली जाते, अशी माहिती काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. काही गंुडांना पोलिसांचा पािठंबा असल्याने त्यांच्या विषयी तक्रार करण्यास कोणी आल्यास तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘पुणे ग्रामीण’चे अधीक्षक सुवेज हक यांनी जनतेला विश्वासात घेऊन, बेशिस्त झालेल्या, सामान्य जनतेला सहकार्य न करणाऱ्या संबंधित पोलिस निरीक्षक आणि पोलिसांना शिस्त लावायची मोहीम सुरू केली आहे. हक यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना कडक समज दिली आहे. ते म्हणाले, ‘पोलिस जनतेचे मालक नाहीत, तर ते सेवक आहेत. त्यांनी जनतेशी सौजन्यानेच वागायला हवे. गरिबांच्या तक्रारीची दाद तातडीने घ्यायलाच हवी. पोलिस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख असणे गरजेचे आहे.’ ‘पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून पोलिस सामान्यांचे मित्र आहेत, अशी भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,’ असेही हक म्हणाले.

पोलिस प्रशासन लोकाभिमुख बनवण्यासाठी काम सुरू आहे. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करू.

- बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

गाय खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणी २४ मार्चला तक्रार अर्ज दिला आहे. तपास अधिकारी मला अद्यापही भेटलेला नाही. वारंवार विचारणा करून आणि भेटीची वेळ मागूनही भेट होत नाही. मला न्याय मिळावा ही विनंती.

– विजय गवारे, शेतकरी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला, मुलींसाठी भारत असुरक्षित’

$
0
0

पुणे : ‘मी अनेक वेळा परदेशात एकटी जाते. परदेशात एकटे असताना कोणतीही भिती वाटत नाही. मात्र, मला भारतात एकटे फिरायचे असेल तर जाता येत नाही. एकंदरीतच देशातील सध्याचे वातावरण महिलांसाठी सुरक्षित नाही,’ असे सांगत प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पूना गेस्ट हाउस येथे आयोजित केलेल्या ‘स्नेह मंच’ या कार्यक्रमात सुलभा तेरणीकर यांनी राधा मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी मंगेशकर यांनी ‘महिला सुरक्षेची समस्या देशात दिवसेंदिवस वाढत असून महिला एकट्या फिरू शकत नाहीत,’ अशी खंत व्यक्त केली. ‘परदेशात महिलांना एकटे फिरताना सुरक्षित वाटते. मात्र, भारतात तशी परिस्थिती नाही. मला बिहारमध्ये बोधगया येथे जायचे असेल तर एकटीला जाता येत नाही. अशा वेळी देशीतील वातावरण असुरक्षित असल्याचे वारंवार दिसून येते,’ असे मंगेशकर यांनी सांगितले.

संगीताविषयी बोलताना मंगेशकर म्हणाल्या, ‘आपले राष्ट्रगीत ‘जन गण मन’, ‘शांती निकेतन’ आणि ‘विश्व परिचय’ या पलीकडे रवींद्रनाथ टागोर आपणास माहित नाहीत. भारतीय संगीतामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते रवींद्र संगीत म्हणून कोलकाता व पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहेत. रविंद्र संगीतातील नियम आणि अटी अनेक गायकांना मान्य नसतात, त्यामुळे रवींद्र संगीताकडे कोणी वळत नाही. खरे तर रवींद्र संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ते १३० वर्ष जुने आहे. मी ते ऐकत गेले आणि मला ते आवडत गेले. बंगाली संगीतामध्ये रवींद्र संगीत हे एक तत्त्वज्ञान आहे. ते सरळ आणि सोपे नाही. त्यामुळे गायक तिकडे वळत नाहीत.’

‘वडिलांना पंडितजी म्हणते’

मंगेशकर यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘माझ्या वडिलांना मी पंडितजीच म्हणते. त्यांच्यामुळे मला शिरीष पै, कवी ग्रेस, राम शेवाळकर, शांता शेळके, सुरेश भट या दिग्गजांचा सहवास मिळाला. तर लतादीदींमुळे मला मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. लता मंगेशकरांना समजून घेण्यासाठी त्यांची गाणी ऐकणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विकास मार्गा’साठी रेल्वे

$
0
0

पुणे-नगरसाठी प्रवासी संघटनांकडून इंटरसिटी सुरू करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि नगर या शहरांदरम्यान रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून, व्यवसाय व विविध कामांच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या दोन्ही शहरातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे ते नगर हा विकास मार्ग होण्यासाठी दोन्ही शहरांना रेल्वे प्रवासी सेवेने जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पुणे आणि नगर येथील प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.

सध्या पुणे-मनमाड मार्गावरून जम्मू, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, दिल्ली इत्यादी मार्गांवर जाणाऱ्या गाड्या. नगरमार्गे जातात. या गाड्यांना पुण्याहून दौंड आणि त्यानंतर नगरचा थांबा आहे. मात्र, दौंड ते नगर या दरम्यान मोठी शहरे व गावे असून, तेथील स्टेशनवर या गाड्या थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक जण पुण्याला येण्यासाठी दौंडपर्यंत दुचाकीवर येऊन तेथून पुढील प्रवास रेल्वेने करतात. आता पुण्यापासून दौंडपर्यंत इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू आहे. तेथून नगर फक्त ८० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यास अडचण येणार नाही. नगर-पुणे रस्त्यावर दिवसेंदिवस वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, वाढती अपघातांची संख्या, त्यांत जाणारे बळी, त्यामुळे रत्याच्या रुंदीकरणाची सातत्याने वाढती गरज, मात्र त्यासाठी जागेची अनुपलब्धता, परिणामी दळणवळणावर होणार विपरित परिणाम, लोकांचा प्रवासासाठी होणारा खर्च व वाढणारा वेळ याचा विचार करता रेल्वे सेवा हाच समर्थ पर्याय आहे. तशी रेल्वे सुरू झाल्यास दररोज नगर-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर येथील रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या मार्गासाठी गेल्या काही वर्षांपासून जोरदार मागणी लावून धरली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर ही मोठी व्यापारी पेठ आहे. तसेच, शनिशिंगणापूर आणि शिर्डी ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. त्यामुळे नगरला पर्यटकांचा ओघ कायमच सुरू असतो. पुणे ते नगर रस्ते वाहतुकूसाठी सध्या जास्तीत जास्त दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र, त्या तुलनेत दौंड मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना तीन ते साडेतीन तास लागतात. या मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसची संख्या दीड हजाराच्या सुमारास आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अनुकूल परिस्थिती निश्चित आहे, याचा रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी सुरू करण्यासाठी विचार करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर विकासासाठी हवा ठोस निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेत गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुणेकरांना दिलेल्या आश्वासनांचे प्रतिबिंब त्यात उमटले असले, तरी भाजपच्या सदस्यांकडून आपल्याला कमी बजेट मिळाल्याची तक्रार खासगीत करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहराचा विकास ‘सहयादी’च्या माध्यमातून करायचा की संपूर्ण शहरासाठी मोठे प्रकल्प उभे करत ‘प्लॅन वर्क’चा विचार करायचा, याचा ठोस निर्णयही भाजपला आगामी काळात घ्यावा लागणार आहे.

निवडणुका ​​जिंकण्यासाठी भाजपने चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याची खेळी करून विरोधकांवर यशस्वी मात केली. मात्र, या खेळीने अनेक प्रभागांमध्ये विकासकामे करताना नगरसेवक एकमेकांवर कुरघोडी करू लागले आहेत. अर्थसंकल्पात विकासकामांना तरतूद करताना आपल्या विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी मोठे प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. पुणेकरांनी पालिका निवडणुकीत भाजपला निवडून दिले आहे, की नगरसेवकांना याचे आत्मपरीक्षणही भाजपच्या नगरसेवकांना करावे लागणार आहे.

महापालिकेत १६२ सभासदांमध्ये तब्बल ९५ हून अधिक नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. भाजपला पुण्यात एकहाती सत्ता आहे. आठ आमदार, दोन खासदार आणि ९८ नगरसेवकांच्या ताकदीने भाजप पुण्यातील सर्व शक्तिशाली पक्ष बनला आहे. जवळपास १४ प्रभागांत भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले आहेत; तर अगदी मोजक्याच प्रभागांमध्ये भाजपला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. एकीकडे नगरसेवकांची संख्या वाढली आहे, स्थानिक आमदारांनी पत्र पाठवून आपल्या ​मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळावा, याची मागणी स्थायी समितीकडे केली आहे. पुण्यात आठही आमदार भाजपचे असल्याने त्यांनीही विकासकामांना निधी मिळावा, यासाठी दबाबतंत्राचा वापर केला आहे.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत, अशा प्रभागांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विकासकामांना अर्थसंकल्पात निधी देताना एकमेकांच्या विकासकामांमध्ये थोडीफार तरतूद करत आपलाही हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाद उद्भवतील की काय, अशी परिस्थिती आहे. गत पंचवार्षिकमध्ये दोन प्रभाग असताना काही प्रभागांमध्ये माननीय एकमेकांना भिडल्याच्या घटना घडल्या होत्या. या वेळी तर एका प्रभागात चार नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे ‘ड्युप्लिकेशन ऑफ वर्क’च्या घटना या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करताना दिसत आहेत. राजकीय श्रेयासाठी एकमेकांचे प्रकल्प अडवण्याचे प्रकार घडण्याची चिन्हे आहेत. भविष्यातील राजकारणासाठी प्रत्येक जण आपले आडाखे बांधून प्रतिस्पर्धी नगरसेवकाला अडचणीत आणण्यासाठी टपला असल्याचे वातावरण आहे.

सत्ताधारी आणि विरोधक

सत्ताधारी नगरसेवकांची संख्या १०१ आहे; तर विरोधी नगरसेवकांची संख्या केवळ ६६ आहे. या ६६ नगरसेवकांमध्ये गटनेते, विरोधी पक्षनेते, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष अशी अनेक मातब्बर मंडळी निवडून आली आहे. पालिकेचा गाडा हाकताना विरोधकांना डावलून चालणार नाही. त्यामुळे विरोधातील प्रमुख नेत्यांच्या पारड्यात तुलनेने जादा निधी दिला जाणार हे गृहीत होते आणि तेच अर्थसंकल्पात दिसले आहे. मात्र, त्यावेळी सत्ताधारी नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांना मिळणारा निधी तुलनेने कमी गेला आहे. ज्या प्रभागांमध्ये चारही नगरसेवक एकाच पक्षाचे निवडून आले आहेत, त्यांनी एकत्रितपणे प्रभागाचा विचार केला तर सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात १६ ते २० कोटी रुपयांचा निधी किमान गेला आहे. मात्र, एकाच प्रभागातील सत्ताधारी नगरसेवक एकमेकांना किती विश्वासात घेतात, यावर अनेक गणिते अवलंबून आहेत. नव्याने​ निवडून आलेल्या विरोधातील नगरसेवकांच्या पारड्यात दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

‘प्लॅन वर्क’ला प्राधान्य कधी मिळणार?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले होते, योजनाबाह्य खर्चामुळे (नॉन प्लॅन वर्क) अर्थसंकल्पाचा बोजवारा उडत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले. त्यामुळे ‘प्लॅन वर्क’ला प्राधान्य देऊन जुने प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान कायम आहे. पुणे शहराचे ​हे चित्र कायम आहे. सहयादी फुगत असल्याने प्रकल्पांवरील खर्च कमी होतो आहे. परिणामी प्रभागातल्या समस्या कमी होत असल्या तरी पुणेकरांचे प्रश्न सुटत नाहीत, हे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्यांना अटक

$
0
0

पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन वाहनचोरांना पकडून त्यांच्याकडून सात वाहने जप्त केली आहेत. त्यातील आरोपी हा अल्पवयीन असून हे सर्वजण मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

‌हृषीकेश सिद्धार्थ नंदुरे (वय १९, रा. संतोष नगर, कात्रज), दाश्या उर्फ दशरथ सिद्धाराम गायकवाड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर गायकवाड याचा अल्पवयीन साथीदार याला ताब्यात घेतले आहे. यातील गायकवाड व अल्पवयीन मुलगा यांनी तब्बल सहा वाहने चोरल्याचे समोर आले आहे. पोलिस कर्मचारी सर्फराज देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक समाधान कदम, अमोल पवार, कुंदन शिंदे यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. तर, नंदुरे हा त्रिमूर्ती चौकातून जात असताना पोलिसांना संशय आला. त्याला गाडी थांबविण्याचा इशारा केला असता तो पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोअर बर्थला छुपी वाढ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे प्रशासनाने रेल्वेतील लोअर बर्थसाठी तिकिटाच्या रकमेबरोबरच ५० ते ७५ रुपये जादा मोजण्यास रेल्वे प्रवाशांनी विरोध दर्शविला आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास सामान्य प्रवाशांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ येईल आणि ही छुपी भाडेवाढ असेल, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

लोअर बर्थच्या तिकिटामध्ये वाढ करण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना बर्थ निवडण्याचा पर्याय मिळतो. त्यामध्ये स्त्रिया, गरोदर माता आणि ज्येष्ठ नागरिक प्राधान्याने लोअर बर्थची मागणी करतात. या मागणीचे प्रमाण अधिक असल्याने त्याकडे कमाईचे नवे साधन म्हणून रेल्वे प्रशासन पाहत आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ देणार असे रेल्वे प्रशासनाकडून पूर्वी सांगण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक व महिलांना ती जागा दिली जाते. ही जागा म्हणजे पैसे कमावायचे साधन नाही. लोअर बर्थला जादा पैसे मोजावे लागणार असतील, तर वरची बर्थ घेणाऱ्या प्रवाशांना कमी तिकीट आकारावे, अशी मागणी शहा यांनी केली.

उरळी परिसरातील श्री प्रयागधाम ट्रस्टच्या यात्रेनिमित्त काही रेल्वे गाड्यांना उरळी रेल्वे स्टेशनचा एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. वास्को-हजरत निझामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेसला २७ मे ते पाच जून या कालावधीत हा थांबा असेल. तर, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसला ३० मे ते तीन जून, निझामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेसला २७ मे रोजी, कोल्हापूर-निझामुद्दीन एक्स्प्रेस सहा जूनला, स्वर्ण जयंती एक्स्प्रेसला ३० मे रोजी, स्वर्ण जयंती एक्स्प्रेसला (डाऊन) तीन जून रोजी, लखनऊ-पुणे एक्स्प्रेसला २९ मे रोजी, पुणे-लखनऊ एक्स्प्रेस (डाऊन) दोन जून रोजी उरळी थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षिसपत्रावर शुल्क तीन टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण असलेल्या कुटुंबीयांना किंवा पूर्वज-वंशजांना मालमत्ता दान करण्यावर बाजारभावाच्या तीन टक्के दराने मुद्रांकशुल्क भरावे लागणार आहे. बक्षिसपत्रासंबंधीच्या (गिफ्ट) दस्त नोंदणीवर हे शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. तसेच, स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) नागरी भागात पाच टक्के; तर ग्रामीण भागात चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बक्षीसपत्रासंबंधीच्या (गिफ्ट) दस्तनोंदणीबाबत मालमत्ता दात्याचा पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण असलेल्या कुटुंब सदस्याला किंवा दात्याच्या वंशपरंपरागत पूर्वजाला किंवा वंशजाला मालमत्ता दान केली असेल, तर अशा मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. महानगरपालिका व त्यात संलग्न कँटोन्मेंट, नगरपरिषद किंवा नगरपंचायत हद्दीत किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रात किंवा वार्षिक मूल्यदर तक्त्यातील नमूद प्रभावक्षेत्र यांच्या हद्दीत बाजारमूल्याच्या सरसकट पाच टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.

१०० रुपयांवरील मुद्रांक ई-एसबीटीआरद्वारे

मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त नोंदणी करण्यासाठी सेवाशुल्क आदी बाबींद्वारे सरकारकडे महसुलाची रक्कम जमा होते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रासप्रणाली अंतर्गत ई-एसबीटीआरद्वारे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी किमान मर्यादा पाच हजार रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. डिजिटल इंडिया तसेच इझ ऑफ डुईंग बिझनेसची संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वज-वंशजांना मालमत्ता दान करण्यावर तीन टक्के दराने मुद्रांकशुल्क.

स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) नागरी भागात पाच टक्के.

ग्रामीण भागात चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images